मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका शूरवीराचे शब्द !  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

एका शूरवीराचे शब्द ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

एका शूरवीराचे शब्द ! 

अर्थात… शूर नायक…कर्नल वसंथा वेणुगोपाल ! 

आसमंतात धुकं नुसतं भरून राहिलंय. माझ्या जवानांनी मस्तपैकी शेकोटी पेटवून ठेवलीये माझ्या खोलीतल्या शेकोटीच्या जागेत….छान ऊब मिळतीये काश्मिरातल्या त्या नाजूक लाकडांतून उठणा-या सडपातळ ज्वाळांची. मी अंगावर रजई पांघरूण पडलो आहे निवांत भिंतीला गुडघे टेकवून. सारं कसं धुंद आहे….आपण प्रेमात असतो ना तेंव्हा वाटतं तसं…सगळं मधाळ. केनेथ ब्रुस गोरलिक ज्याला सर्वजण केनी जी म्हणतात…त्याचं स्मूद जॅझ सॅक्सोफोन कानांवर हलकेच पडतं आहे….द मोमेंट वाजवतो आहे केनी. 

पण खोलीच्या बाहेर रात्रीच्या अंधारात इकडून तिकडे सतत येरझारा घालणारा प्रकाशझोत आहे आणि त्याचा उजेड थोड्याथोड्या वेळाने खोलीत येऊन जातोय…..हा प्रकाश डोंगरावर काहीतरी शोधतो आहे डोळ्यांत तेल घालून. माझी एके-४७ माझ्या हाताशीच आहे….या शस्त्राचा तो थंड स्पर्श! यातून सुटणारा आगीचा लोळ क्षणार्धात समोरचा देह कायमचा थंड करणारा…..आणि म्हणूनच या सुंदर वातावरणात वास्तवाचं भान सुटता सुटत नाही. आणि ते सोडून चालणार नाही. मी इथं जीवनाचा आनंद घेण्यासाठी, सुट्टीवर आलेलो नाहीये. आपल्या सीमेत कुणीतरी घुसण्याच्या प्रयत्नांत आहे….शत्रू! आणि त्याला थोपवण्यासाठी,संपवण्यासाठी या जीवघेण्या थंडीतही अंगात ऊब टिकवून ठेवायला पाहिजे…..मी जागाच आहे. 

आज पहाटे दोन वाजताच आम्ही शत्रूच्या मागावर निघालो होतो….सात वाजेपर्यंत चालू होता आजचा खेळ. आम्ही दबा धरून बसलो होतो….प्रचंड साचलेल्या बर्फात….अंगातील हाड न हाड गोठून चाललेलं….सर्वांच्या हातातील एके-४७ रायफल्स….एखाद्या बाळाला जसं हातांवर अलगद झुलवत रहावं तसं या रायफल्स खेळवत,सांभाळत सर्व सज्ज होतो! आम्ही त्यांची वाट पहात होतो….शिकार रायफल्सच्या टप्प्यात येण्याची वाट पहात बर्फात निजलेलो होतो….कसलाही आवाज न करता…आमच्या श्वासांचाही आवाज बहुदा होत नसावा…श्वासांना वेळकाळ समजते! 

पण आज त्यांची शंभरी भरलेली नसावी बहुदा….आम्ही आयोजित केलेल्या या स्वागतसमारंभाकडे मंडळी फिरकलीच नाहीत….त्यांना बहुदा आमचा अंदाज आलेला असावा. किंवा मिळालेली गुप्त माहिती अपुरी असावी! असं होतं कित्येकदा. पण बेसावध राहून चालत नाही! आम्ही परत आलो आहोत! पण लवकरच त्या आगंतुक पाहुण्यांची गाठ पडणार हे निश्चित! 

हे शब्द आहेत एका नीडर आणि तरीही मनाने अत्यंत कोवळ्या असलेल्या एका सैन्याधिका-याचे….आपल्या प्रिय पत्नीला सुभाषिणीला लिहिलेल्या एका पत्रातील. अशी चारशेपेक्षा अधिक पत्रं संग्रही आहेत वीरनारी सुभाषिणी वेणुगोपाल यांच्याकडे. आणि या पत्रांचे लेखक आहेत कर्नल वसंथा वेणुगोपाल. 

वेणुगोपाल साहेब १९८९ मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीच्या ‘घातक नववी’ म्हणून ख्यातकीर्त असलेल्या नवव्या बटालियनमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले होते. त्यांची सैन्य कारकीर्द तब्बल १८ वर्षे बहरत राहिली. २००६ मध्ये वेणुगोपाल साहेबांना याच नवव्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर म्हणून जबाबदारी मिळाली….कर्नल वसंथा वेणुगोपाल यांच्या नेतृत्वात यावेळी ही बटालियन जम्मू-काश्मिरातील उरी येथे कर्तव्यावर होती. आणि बटालियनच्या प्रत्येक अतिरेकी विरोधी अभियानात कर्नल साहेब जातीने पुढे असत. एकदा त्यांच्या आईसाहेबांनी त्यांना विचारले होते….कर्नल दर्जाच्या अधिका-यास असं प्रत्येक वेळी प्रत्येक कामात पुढं असावंच लागतं का? त्यावर साहेबांनी मातोश्रींना हसत हसत सांगितलं होतं…अम्मा….माझी माणसं जिथं तिथं मी! जवानाचं नेतृत्व असं अग्रभागी राहूनच करावं असं मला वाटतं! 

आजही असंच केलं साहेबांनी. ३०  जुलै २००७…पाकिस्तानातून अतिरेक्यांचा एक मोठा गट उरीमध्ये घुसण्याच्या तयारीने सीमा पार करून आपल्याकडे घुसलेला आहे….ही खबर पक्की होती. साहेबांनी आपले कमांडो सज्ज केले आणि स्वत: पुढे निघाले. अतिरेक्यांसाठी भरभक्कम सापळा रचला. अतिरेकी रात्रभर बर्फाच्या कड्यांच्या आडोशाने लपत छ्पत पुढे येत होते….गुहांमध्ये लपत होते. पण आपल्या जवानांनी त्यांना नजरेने टिपलेच… 

कर्नल साहेबांनी आता मात्र त्यांना चारी बाजूंनी घेरलं…त्यांना आपल्याकडे घुसू तर द्यायचेच नाही पण परत पाकिस्तानी सीमेत जिवंतही पळून जाऊ द्यायचे नाही….हा प्रत्येकाचाच निर्धार होता. प्रचंड बर्फ होतं…..वीस-तीस फुटांच्या घळी होत्या वाटेत. त्यांच्या निमुळत्या जागांमध्ये आडवे झोपून अतिरेक्यांच्यावर लक्ष ठेवून रहावे लागत होतं. वेणुगोपाल साहेबांना आपला वेढा करकचून आवळत आणला. साहेबांसोबत रेडिओ ऑपरेटर लान्स नायक शशिकांत गणपत बच्छाव नावाचा मर्दमराठा शूर गडी सावलीसारखा होता. 

३१ जुलै,२००७ची सकाळ उजाडली होती…काही तासांपूर्वी तुफान गोळीबार करीत राहणारे अतिरेकी आता एकाएकी शांत झाल्याचे वाटले. म्हणून शशिकांत यांनी अर्धवट उभे राहून गुहेच्या दिशेने पाहिले तर तिकडून एके-४७ ची मोठी फैर शशिकांत साहेबांच्या छातीत घुसली….पण कोसळता कोसळता या पठ्ठ्याने समोरच्या अतिरेक्याला अचूक टिपून वरती पाठवले. आता मात्र वेणुगोपाल साहेब चवताळून पुढे सरसावले. अतिरेक्यांसमोर त्यांचा साक्षात मृत्यूच उभा ठाकला होता..

साहेबांनी एकाला तर अगदी समोरासमोर उडवला….पण इतर अतिरेक्यांनीही नेम साधले आणि साहेब गंभीर जखमी झाले आणि वीस फूट खाली कोसळले…जवानांनी त्यांना पुन्हा वर आणले व सुरक्षित जागी निजवले…पण तशाही स्थितीत साहेबांनी सूचना,नेतृत्व आणि स्वत: गोळीबार जारी ठेवला…रक्तस्राव सुरू असतानाही. वैद्यकीय मदत मिळायला अवकाश होता….! साहेबांनी अशाही स्थितीत आणखी दोन शत्रू टिपले….घातक नववी मराठा बटालियन आता अतिरेक्यांवर आवेशाने तुटून पडली….एकूण आठ अतिरेकी होते….कर्नल साहेब, शशिकांत साहेब आणि उर्वरीत कमांडोज यांनी मिळून हे आठ राक्षस निर्दाळले होते. 

पण लान्स नायक शशिकांत गणपत बच्छाव जागीच वीरगतीस प्राप्त झाले होते तर कर्नल वसंथा वेणुगोपाल साहेब रूग्णालयात उपचार मिळेपर्यंत स्वत:चे प्राण राखू शकले नाही….प्रचंड जखमी झाल्याने त्यांच्या श्वासांचाही नाईलाज होता! 

कर्नल साहेबांना मरणोत्तर अशोक चक्र सन्मान दिला गेला. लान्स नायक शशिकांत बच्छाव यांना मरणोत्तर वीरचक्राने सन्मानित करण्यात आले. २५ मार्च ही कर्नल साहेबांची जन्मतिथी. आज ते ५५ वर्षांचे असते आणि त्यांच्या आंतरीक इच्छेनुसार निवांत जीवन जगत असलेले असते…पण…असो. भावपूर्ण श्रद्धांजली…साहेब. 

शहीद कर्नल वसंथा वेणुगोपाल यांच्या पत्नी श्रीमती सुभाषिणी वेणुगोपाल पती गमावल्यानंतरच्या अवघ्या तीनच महिन्यांत निश्चयाने उभ्या राहिल्या…त्यांनी सैनिकांसाठी काम सुरू केले आणि हे काम अतिशय उत्तम सुरू आहे. 

कर्नल साहेबांच्या दोन्ही मुलींनी मिळून फॉरएव्हर फोर्टी नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात कर्नल साहेबांनी कुटुंबियांना लिहिलेल्या चारशेच्या वर पत्रांचा उल्लेख,संदर्भ आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्याची माझी इच्छा आहे. पुस्तक मागवले आहे. लवकरच त्याबाबतीत कार्यवाही सुरू करीन. कारण ही शूर आयुष्यं आणि त्यांच्या धीरोदात्त कुटुंबियांचा संघर्ष सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजेत…असं वाटत राहतं. 

(वरील छायाचित्रात डाव्या बाजूला कर्नल साहेब आणि उभे असलेले लान्स नायक शशिकांत साहेब दिसत आहेत.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ परफेक्ट… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ परफेक्ट… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

सध्या ओ टी टी मुळे सगळं जग हातात आलं आहे. मला हव्या त्या देशातील, हव्या त्या भाषेतील सिनेमे आणि सिरियल बघता येतात. आणि मला आवडतं निरनिराळ्या देशातले लोक, तिथल्या पद्धती, तिथला निसर्ग बघायला. त्यामुळे इंग्लिश मध्ये भाषांतर केलेल्या सिरीयल मी बघते.

अशीच एक सिरीयल बघत होते. त्यात आजकालच्या स्त्रियांना किती ताण असतो, घरचं सगळं करून, नोकरी करून, मुलं सांभाळून, शिवाय पुन्हा स्वतःच्या आवडीचं काही करायला कसा वेळ मिळत नाहीये यावर त्यातली पात्रं चर्चा करत होती.

मला ही चर्चा पाहताना पटकन असं वाटलं की ही गोष्ट किती ग्लोबल आहे. हाच संवाद आत्ता मुंबईत एखाद्या लोकलच्या डब्यातपण चालू असेल, जपानच्या बुलेट ट्रेन मध्ये किंवा अमेरिकेत एखाद्या कॅफेतसुद्धा सुरू असेल.

तेवढ्यात त्या चर्चेत सहभागी नसलेली, पण शेजारच्या खोलीतून सरबत घेऊन आलेली एक आज्जी असते, तिला त्या सगळ्या जणी विचारतात की, “ए, तू कसं मॅनेज केलंस गं सगळं? तूही कॅफे चालवत होतीस, तूही घरी येऊन पुन्हा सगळं काम करत होतीस, मुलांची शाळा, अभ्यास, मोठ्यांचे आजार सगळं छान मॅनेज करत होतीस. तुला आम्ही कधीही थकलेलं पाहिलं नाही.”

यावर ती आज्जीबाई छान गोड हसते आणि म्हणते, “मी थकत असे कधीकधी, पण मला ताण मात्र कधीही आला नाही. कारण मला पर्फेक्ट व्हायची भूक नव्हती. किंबहुना आमच्या काळी असं ‘पर्फेक्ट असं काही नसतं’ असं लोकांना मान्यच होतं.

आई म्हटल्यावर ती चुरगळलेल्या ड्रेसमध्ये केस विस्कटलेली असू शकते. मुलांनी भरलेलं घर हे पसारायुक्तच असणार. चाळीशी पार केलेला मुलांचा बाबा, टक्कल असणारच त्याला. पर्फेक्ट असं काही नव्हतं आणि ते असावं असा अट्टाहाससुद्धा नव्हता. त्यामुळे सोप्पं गेलं जरा तुमच्यापेक्षा.”

पुष्कळ आत्मपरीक्षण करायला लावणारा प्रसंग आहे हा.

का अट्टाहास करतोय आपण पर्फेक्ट असण्याचा आणि कुणासाठी?

जाहिरातीत दाखवतात तशी संध्याकाळीसुद्धा तरतरीत आणि केससुद्धा वाकडा न झालेली आई प्रत्यक्षात नसते, कारण प्रत्यक्षातल्या आईला संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर गॅसजवळ उष्णतेची धग सोसत पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा असतो. सणाच्या दिवशी 12 माणसांचा स्वयंपाक आणि आदरातिथ्य करताना मेकअप आणि भरजरी साडी नाही सांभाळू शकत सगळ्या, त्याऐवजी कुर्ता घातला असेल तर सरसर कामे करता येतात.

ऑफिसला प्रेझेंटेशन असेल त्यादिवशी घरी काम जरा बाजूला ठेवावेच लागणार आहे.मुलांच्या परीक्षा असतील तर आईनेच अभ्यास घ्यायचा असं कुठल्याही ग्रंथात सांगितलेले नाही. चित्रातल्यासारखं आवरलेलं घर हे फक्त चित्रात नाहीतर नाटक सिनेमातच असतं.

स्वतःहून अभ्यास करणारी आणि पहिले नंबर वगैरे आणणारी मुलं तर मला वाटतं बहुधा फक्त स्वप्नातच असतात. कुणाचा तरी पहिला नंबर येणार म्हणजे इतरांचा दुसरा तिसरा चवथा पाचवा येणारच. अभ्यास छान करून घ्या, पण नंबर येऊ दे की पंचविसावा. नोकरी देताना शाळेतला चवथी ब मधला नंबर कोण विचारतो?.

तब्येत सांभाळावी हे ठीक, पण पन्नाशीच्या बाईने पंचविशीतील दिसण्याचा अट्टाहास कशासाठी?वजनाचा काटा आटोक्यात असावा जे ठीक, पण ‘साइझ झिरो’ चा हट्ट कशाला? सगळ्यांना वन पीस चांगलाच दिसला पाहिजे, हा हट्ट कशासाठी ? काहींची वळणे साडीमध्ये काय सुरेख दिसतात. टाचा मोडून पडतात की काय असं वाटेपर्यंत दुखावणार्‍या हाय हील कशासाठी. टाच महत्वाची आहे की फोटो?

मुळात या पर्फेक्शनच्या व्याख्या कोण ठरवते आहे?

ऑफिसला काय घालावे, घरी काय घालावे, कसे रहावे, कसे चालावे, कसे बोलावे, कसे दिसावे, कुठे फिरायला जावे, काय आणि कधी खावे, अगदी कुठल्या गादीवर आणि कसे झोपावे, सगळं काही ठरवण्याचे हक्क आपण मिडियाला नेमके का आणि कधी दिले?

एक माणूस दुसर्‍या सारखं कधीही नसतं मग सगळ्यांना एकच व्याख्या कशी लागू होईल?

करा की मस्त भिंतीला तंगड्या लावून आराम. होऊ देत घराचं गोकुळ. अघळपघळ गप्पा मारा मुलांशी, नवर्‍याशी. मस्त मोठमोठ्याने गाणी म्हणत फिरा घरभर गबाळ्या अवतारात. आणि तेवढ्यात पाहुणा आलाच तर त्यालाही आग्रह करा गोष्ट सांगायचा. सध्या दुर्मिळ होत चाललेली कला आहे ती.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चैत्रांगण… ☆ सुश्री मानसी चिटणीस ☆

सुश्री मानसी विजय चिटणीस

? विविधा ?

☆ “चैत्रांगण…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस

चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर म्हणजे अन्नपूर्णा आसनावर किंवा झोक्यावर बसवली जाते. रेशमी वस्त्रे, मोगरीची फुलं, चंदनगंधाचे विलेपन यांनी तिला सजवले जाते..माहेरपणाला आलेली लाडाची लेकच जणू.. त्या झोक्यात बसलेल्या गौरीला पाहून मला इंदिराबाईंची, ‘आली माहेरपणाला’ ही कविता आठवते नेहमी..

               “आली माहेरपणाला

                 आणा शेवंतीची वेणी

                 पाचू मरव्याचे तुरे

                 जरी कुसर देखणी “

सासरी राबून थकलेल्या लेकीला विसाव्याचे चार क्षण मिळावेत, तिला आनंद व्हावा, तिच्या चेहऱ्यावर हसू फुलावे म्हणून आईची कोण धडपड..लेक माहेरपणाला आलीय, कुठे तिच्यासाठी शेवंतीची वेणी कर, कुठे तिच्या पोलक्यावर पाचू जडव तर तिला सुगंध आवडतो म्हणून तिच्यासाठी मरव्याचे अत्तर बनव..आईची ही सारी धडपड संसारीक वैशाखाने रणरणलेल्या लेकीच्या मनाला थोडा तरी गारवा मिळावा..

चैत्र, चांद्रवर्षाचा पहिला महिना. या महिन्यातल्या पौर्णिमेच्या आसपास चित्रा नक्षत्र अवकाशात असते म्हणून हा चैत्र महिना. ऋतूराज वसंताचा लाडका महिना..आणि म्हणूनच या काळात येणाऱ्या नव्या तांबूस पोपटी पालवीला चैत्रपालवी म्हणतात. साऱ्या सृष्टीचे सृजन या काळात होते. म्हणूनच आदिशक्ती आणि शिव या सृष्टीच्या उगमकर्त्यांचे पूजन या महिन्यात करण्याचा प्रघात पडला असावा. भारतात अनेक ठिकाणी या काळात गणगौरी पुजन युवती आणि विवाहित स्त्रीया करतात. आपल्या घरी हळदीकुंकू करतात. मनाला आणि शरीराला गारवा देणारे मोगरीची फुले, ओले हरभरे, विड्याचे पान-सुपारी, कलिंगड, आंंब्याची डाळ आणि पन्हे यांचे वाण दिले जाते. या हळदीकुंकवाच्या निमित्ताने माय-लेकी, बहिणी-बहिणी, मैत्रीणी एकमेकांना भेटतात..एकमेकींची सुखदुःख निगूतीने ऐकतात..त्यावर फुंकर घालताना आपल्या डोळ्यांतील पाणी लपवतात.

मला आठवतंय..लहानपणी, जेव्हा गौरीला झोक्यात बसवलं जायचं तेव्हा मी ही आईकडे झोक्यासाठी, गौरीसारखं नटवण्यासाठी हट्ट करायचे तेव्हा कधी आई गालातल्या गालात हसायची तर कधी डोळ्यांत पाणी आणायची. आज तिच्या त्या वागण्याचा अर्थ कळतोय. स्त्रीचे भावविश्व अशा सणवार व्रतवैकल्य यांच्याशी जोडलं गेलयं. चैत्रगौर ही सृजनदेवता आणि स्त्री देखील..हे मांडलं जाणारं चैत्रांगण किंवा हळदीकुंकू हे याच सृजनाचं संक्रमण असावं. एका उर्जेचा एकीकडून दुसरीकडे चालणारा प्रवास असावा. चैत्र हा ही सृजनसखाच..तर चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या चैत्र महिन्यात अंगणात; मग ते अंगण ग्रामिण असो की शहरी.. चैत्रांगण रेखाटले जाते. ६४ शुभचिह्नांनी युक्त अशा या रांगोळीत चैत्रगौर, तिचे पती शंभू महादेव, तिचे सौभाग्यालंकार, मोरपीस, बासरी, ती जगत्जननी असल्याने सूर्य चंद्रापासून साप-हत्तीपर्यंतचा तिचा संसार रेखला जातो. तिची पावले, तिच्या अस्तित्वाचे प्रतिक असलेले स्वस्तिक आणि तिचे आवडते कमळ, तिच्या पुजेसाठीचे शंख, घंटा, ध्वज असे सारे ऐवज रेखले जातात. ते चैत्रांगण बघताना वाटते की कुणा चिमुकलीची भातुकलीच मांडली आहे की काय? या साऱ्या रांगोळीचे रेखाटन चैत्र महिना संपेपर्यंत केले जाते.

माहेरपणाला आलेल्या गौरीला पाळण्यात बसवले जाते. पाळण्यात बसवण्यापूर्वी देवीच्या मुर्तीला अंघोळ घालून, पूजा-अर्चा करून नैवेद्य दाखविला जातो. फुलांची सजावट केली जाते. देवीसमोर वेगवेगळे पदार्थ, देखावे यांची आरास मांडली जाते. खिरापत म्हणून सुके खोबरे व साखर दिली जाते. छोट्या तांब्यात देवीसाठी पाणी भरून ठेवले जाते.बत्तासे, कलिंगड, काकडी, कैरीची डाळ, भिजवलेले हरभरे, पन्हे आदी पदार्थ देवीसाठी केले जातात व नंतर हळदी कुंकू करून वाण म्हणून दिले जातात. सुगीच्या हंगामात केल्या जाणाऱ्या या व्रतात आपली मुले-बाळे, घर-दार यांच्या सुखसमृद्धी ची मनोकामना केली जाते.

अशा या माहेरपणासाठी आलेल्या लेकीचे कौतुक करण्यासोबतच सृजनाचीही पूजा केली जाते. लेकीचे कोडकौतुक करताना लेकीने आईपासून लपवलेले अश्रू असोत की मनातले सल.. चैत्रांगण टिपतेच असे स्त्रीभावनांचे गूढ पदर..

डोळ्यांत आसू अन् ओठांवर हसू

सुखाच्या ओंजळीत दुःखाचे पसू…

या आणि अशा अनेक झळांवर गारव्याचे लिंपण म्हणून तर झोक्यातले झुलणे आणि चैत्रातले रेखाटन असेल का?

चैत्रांगण

© सुश्री मानसी विजय चिटणीस

केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कुकर आणि गॅसवरचा पाडवा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? मनमंजुषेतून ?

☆ कुकर आणि गॅसवरचा पाडवा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“अहो ऐकलंत का जरा !”

“अगं लग्न झाल्यापासून तुझ्या शिवाय कुठल्या बाईच ऐकलंय का मी ?”

“आता मला कसं कळणार, ऑफिसमध्ये कोणा कोणाचं ऐकता ते ?”

“बरं, बरं, कळतात हो मला टोमणे ! ते जाऊ दे, सकाळी सकाळी मला सणा सुदिला वाद नकोय ! बोल काय म्हणत होतीस तू ?”

“अहो आपण किनई या पाडव्याला स्वर्गात जाऊ या !”

“काय s s s s ?”

“अहो केवढ्या मोठ्याने ओरडताय ? शेजारी पाजारी बघायला येतील, काय झालं म्हणून !”

“अगं मग तू बोललीसच तशी ! दसऱ्याला जसं सिमो्लंघन करतात तसं पाडव्याला काय स्वर्गारोहण करतात की काय ?”

“अहो नीट ऐकून तर घ्याल किनई, का लगेच सुतांवरून स्वर्ग गाठाल ?”

“अगं मी कुठे स्वर्ग गाठायला चाललोय ? तूच म्हणालीस नां, की आपण या पाडव्याला स्वर्गात जाऊ या म्हणून ?”

“अहो हा स्वर्ग म्हणजे एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची शो रूम !”

“अगं मग असं सविस्तर सांग नां, मला कसं माहित असणार तुझ्या डोक्यात कुठला स्वर्ग आहे ते ? पण तिथून तुला काय घ्यायच आहे ते नाही बोललीस.”

“अहो आता मला प्रत्येक पाडव्याला नवीन साडी वगैरे नकोय. अजून पाच सहा कोऱ्या साडया तशाच पडल्येत !”

“पण त्या साडया काय तुला ‘इधर का माल उधर !’ करण्यात कधीतरी कामाला येतीलच नां ?”

“म्हणजे ?”

“अगं म्हणजे एखादी मिळालेली साडी आवडली नाही, तर तोंड दाबून बुक्क्याचा मार खाल्ल्यागत तुम्ही बायका ती ठेवून घेताच की नाही ?”

“मग तोंडावर कसं बरं सांगणार आवडली नाही म्हणून ? ते बरं दिसत का ?”

“हो ना, मग तीच साडी कधी ना कधी तरी दुसऱ्या बाईला देता नां, त्यालाच मी ‘इधर का माल….’

“कळलं, कळलं ! आम्हां बायकांचं ते ट्रेड सिक्रेट आहे !”

“यात कसलं आलंय सिक्रेट, ओपन सिक्रेट म्हणं हवं तर ! बरं ते जाऊ दे, तुला त्या स्वर्गाच्या शो रूममधे कशाला जायचय ते नाही कळलं.”

“मला ‘ठुशी’ घ्यायची आहे ! सासूबाईंनी त्यांची खरी ‘ठुशी’ मोठ्या जाऊबाईंना दिली, तेंव्हा पासून माझ्या डोक्यात निदान एक ग्रॅमची ‘ठुशी’ घ्यायच फारच मनांत आहे.”

“अगं पण तुला आईनं, वहिनीला दिलेल्या ठुशीच्या बदल्यात तिचा ‘घपला हार’ दिला ना, मग?”

“अहो त्याला ‘घपला हार’ नाही ‘चपला हार’ म्हणतात!”

“तेच ते, अगं पण मी काय म्हणतो आपण तुला एक ग्रॅमची खोटी खोटी  ‘ठुशी’ कशाला घ्यायची ? आपण त्यापेक्षा वा. ह. पे. कडून किंवा पु. ना. गा. कडून खरी सोन्याची ‘ठुशी’ घेऊ या की ?”

“नको गं बाई, हल्ली खरे दागिने घालायची सोय कुठे राहील्ये ? सगळ्या बायकांचे सगळे खरे दागिने लॉकरची शोभा वाढवताहेत झालं.”

“मग माझ्या डोक्यात एक नाही दोन वस्तू आहेत, ज्या नुकत्याच बाजारात नव्याने आल्येत.  त्या नवीन आणि इनोव्हेटिव्ह असल्यामुळे खूप म्हणजे खूपच महाग आहेत, त्या घेऊ या का ?”

“अगं बाई, त्या आणि कुठल्या ?”

“प्रेशर कुकर आणि…..”

“काय  s s s ?”

“अगं किती जोरात ओरडलीस ? शेजारी पाजारी बघायला येतील ना ?”

“अहो तुम्ही बोललातच तसं ! प्रेशर कुकर काय बाजारात नवीन आलेली वस्तू आहे ? गेली कित्येक वर्ष मी वेग वेगळे कुकर वापरत्ये.”

“अगं खरंच सांगतो, हा प्रेशर कुकर बोलणारा आहे, जो नुकताच नवीन आलाय बाजारात!”

“काय सांगताय काय ?”

“अगं खरं तेच सांगतोय, या कुकर मधे ना शिट्याच होत नाहीत !”

“मग कळणार कसं कुकर झाला आहे का नाही ते ?”

“अगं जरा नीट ऐक. मी तुला म्हटलं ना, की हा बोलणारा कुकर आहे म्हणून, मग त्याच्यात शिट्या कशा होतील ? तुला किती शिट्या हव्येत त्यावर तो सेट करायचा आणि गॅस चालू करायचा !”

“बरं, मग ?”

“मग त्यातून थोडया थोडया वेळाने one, two, three असे आवाज येतील, त्यावरून तुला कळेल की कुकरच्या किती शिट्या झाल्येत त्या.”

“अस्स होय ! मग बरंच आहे, सिरीयल बघायच्या नादात मला मेलीला कळतच नाही किती शिट्या झाल्येत त्या ! चालेल मला, आपण तो बोलणारा कुकर घेऊयाच. ते ठुशी बिशीच जाऊ दे, पुन्हा कधी तरी बघू !”

“Ok, मग उद्याच जाऊन बोलणारा कुकर घेऊन येवू, काय ?”

“हो चालेल, पण तुम्ही दुसरी वस्तू पण म्हणाला होतात, ती कुठली ?”

“आहे, म्हणजे तुझ्या लक्षात आहे मी दोन वस्तू म्हटल्याचे.”

“म्हणजे काय? आम्हां बायकांची मेमरी तशी पुरुषांपेक्षा बरी असते असं म्हणतात!”

“असं कोण म्हणत ?”

“आम्ही बायकाच!”

“अगदी बरोबर, पण ती फक्त तुम्हाला हव्या असलेल्या खरेदीच्या बाबतीतच बरं का ! बाकी सगळा उजेडच म्हणायचा.”

“कळलं, कळलं ! मला पण तुम्ही म्हणालात तसा सणा सुदीला वाद नकोय, ती दुसरी वस्तू काय आहे ना, ती बोला चटचट, मला अजून बरीच कामं पडल्येत !”

“अगं त्या दुसऱ्या नवीन वस्तूच तू नांव ऐकलंस ना, तर नाचायलाच लागशील बघ !”

“नाच करायचा कां आनंदाने गायचं ते नंतर बघू, पटकन त्याच नांव….”

“रिमोट कंट्रोलची गॅस शेगडी !”

“का s s य ?”

“अगं आपल्या टीव्हीला कसा रिमोट कंट्रोल असतो ना, तसाच या गॅसच्या शेगडीला पण असतो. बसल्या जागेवरून तू गॅस चालू किंवा बंद करू शकतेस.  बोल कशा काय आहेत या दोन नवीन वस्तू !”

“झ ss का ss स ss ! आता सिरीयल सोडून मधेच उठायला नको गॅस बंद करायला !”

एवढं बोलून बायको किचन मधे पळाली आणि मी…. खरी सोन्याची ठुशी परवडली असती, पण या दोन नवीन, त्याहून महागडया वस्तू घ्यायचे कबूल करून, स्वतःच्या पायावर धोंडा तर मारून नाही ना घेतला, या विचारात पाडव्याला आडवा पडलो !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तू आहेसच…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “तू आहेसच” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

ईश्वर – परमेश्वर – देव —भगवान…

तुझी असंख्य नांवे…. अनेक रूपे

तू नाहीस असं ठिकाणच नाही …. चराचरात भरून राहिला आहेस तू…

हो तू आहेसच …. मी मानतेच तुला. ..

तुझी पूजा, नैवेद्य, आरती करत असते …. तुझी स्तोत्र.. मंत्र म्हणत असते … जप करते..

सप्तशतीचा पाठ करते…

 

आताशा एक जाणीव मात्र  व्हायला लागली आहे की…

हे सगळे बाह्योपचार झाले रे…. … आणि इतके दिवस त्यातच रमले मी …. ..

पण आता मात्र….. सगुणातून निर्गुण भक्तीकडे वळावे असे वाटायला लागले आहे…

मनाला सगुण भक्तीची सवय आहे त्यामुळे ती सवय लगेच सुटणार नाही पण…..

…. खोलवर जाऊन अगदी मनापासून तुझ्या जवळ यावं असं वाटायला लागलेल आहे….

 

आता तुझ्याकडे एक विनम्र विनवणी आहे. …

मी जे वाचते जे म्हणते  … त्यातले जे ज्ञान आहे जी शिकवण आहे  जे तत्त्वज्ञान आहे…

……  रोजच्या जगण्यात ते माझ्या…. वाणीतून …. कृतीतून …. विचारातून …. वर्तनातून … अंतरंगातून

प्रगट होऊ दे….. तनामनातून पाझरू दे….. मगच  ती तुझी खरी पूजा होईल. आणि मला माहित आहे..

तुलाही भक्तांकडून हेच अपेक्षित आहे….

प्रसाद म्हणून सद्गुरूंचा हात हातात असू दे त्यांची कृपा माझ्यावर राहू दे….

 

नुसतं शांत बसावं…

आत्मसमर्पण हा खूप मोठा मार्ग आहे..  कठीणही आहे…

पण आता चालायला सुरुवात करावी म्हणते……

चालताना अडखळायला, ठेचकळायला …. थोडं भरकटायलाही होईल ……पण सावधपणे सावकाशपणे चालत राहीन.. .. हळूहळू तो मार्ग ओळखीचा होईल……

चिंतन कशाचं करायचं याचाही अभ्यास करायचा आहे…

 

एक खरच मनापासून सांगू का? खूप काही नको आहे

आता राहिलेलं आयुष्य सहज सोपं करून जगायचं आहे….

देणारा हात …  दुःख ओळखून ते बघू  शकणारे डोळे ….  सत्य ऐकणारे कान …  निर्मळ मन … 

 आणि मधुर वाणी………

… तू आहेसच की वाट दाखवायला …,.. आणि  तुझा हात हातात आहे हे केवढे मोठे भाग्य आहे ….

.. मग जमेलच……

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कैकयी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ कैकयी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

रामायणातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे कैकयी. तिच्यामुळेच रामायण घडले. वनवासात जाण्यापूर्वी राम  हा इतर राजांप्रमाणे फक्त रामराजा होता. पण रावणाचा वध करून, 14 वर्षांचा वनवास संपवून जेव्हा तो अयोध्येस परत आला तेव्हा तो” प्रभू रामचंद्र” झाला. शुद्ध परात्पर राजाराम वगैरे  सर्व विशेषणे त्याला त्यावेळेला लागली. आणि यासाठी कैकयीच  कारणीभूत आहे.

ती केकय देशाच्या अश्वपती राजाची कन्या होती. दशरथा पासून तिला भरत नावाचा पुत्र झाला. आपल्या मुलाला अयोध्येचे राज्य मिळावे म्हणून तिने सावत्र मुलगा राम याला वनवासास धाडण्याची गळ दशरथाला घातली. परंतु पुत्र विरहाच्या शोकामुळे दशरथाचा मृत्यू झाला. रामाचा वनवास व दशरथाचा मृत्यू या घटनांना कारणीभूत ठरल्यामुळे  तिला खलनायिका ठरवतात.”माता न तू, वैरिणी “या प्रसिद्ध

गाण्यामुळे तर ती जास्तच दुष्ट वाटू लागते. पण प्रत्यक्षात तसे नाही.

कैकयी अत्यंत सुंदर, धाडसी ,युद्धकलानिपुण, ज्योतिषतज्ञ होती .त्यामुळे दशरथाची सर्वात लाडकी राणी होती. एकदा देवराज इंद्र संब्रासुर नावाच्या राक्षसाशी लढत होता. पण तो राक्षस खूप शक्तिशाली होता म्हणून इंद्राने दशरथाकडे मदत मागितली. दशरथ युद्धाला सज्ज झाला. कैकयीदेखील त्याच्याबरोबर गेली. युद्धामध्ये दशरथाच्या सारथ्याला बाण लागला.  दशरथ हादरला. पण कैकयीने स्वतः उत्तम सारथ्य केले. दुर्दैवाने रथाचे एक चाक खड्डयात अडकले. कैकयी पटकन रथातून खाली उतरली. रथाचे चाक खड्डयातून बाहेर काढले. ते पाहून राक्षस घाबरला आणि पळून गेला. दशरथाचे प्राण वाचले. त्याने तिला दोन वर दिले.

रामाचा राज्याभिषेक ठरला. कैकयीने वराप्रमाणे दशरथाला रामाला 14 वर्षे वनवास आणि भरताला राज्याभिषेक असे दोन वर मागितले. त्याची खरी कारणे खालील प्रमाणे आहेत.

१)कैकयी ज्योतिष जाणत होती. तिने रामाच्या राज्याभिषेकावेळी कुंडली मांडली. त्यावेळी तिच्या लक्षात आले की सध्या चौदा वर्ष जो कोणी सिंहासनावर बसेल तो स्वतःचा आणि रघुवंशाचा नाश करेल. ते टाळण्यासाठी तिने रामाला वनवासाला पाठवले.

२) ती युद्ध कला निपुण होती. त्यावेळी वाली नावाचा एक राजा होता. त्याला वरदान मिळाले होते की जो कोणी त्याच्याशी युद्ध करेल त्याची निम्मी शक्ती त्याला मिळत असे. त्याच्याशी युद्ध करायला दशरथ आणि कैकयी गेले. पण दशरथ हरला. तेव्हा वालीने त्याला दोन अटी घातल्या. तुला सोडतो पण मला कैकयी  देऊन टाक किंवा तुझा राजमुकुट दे. अर्थात् दशरथाने आपला राजमुकुट त्याला दिला. ही गोष्ट फक्त या दोघांनाच माहीत होती. राजमुकुटाशिवाय राज्याभिषेक करता येत नाही . म्हणून तिने राज्याभिषेकाच्या आदल्या  रात्री रामाला बोलावले. विश्वासात घेऊन हे सांगितले .” तू वनवासाच्या निमित्ताने वालीचा वध कर आणि तो  राजमुकुट घेऊन ये.”  राम तयार झाला. आणि म्हणूनच राम जेव्हा रावणाचा, वालीचा ,वध करून अयोध्येस परत आला तेव्हा त्याने सर्वात प्रथम कैकयीला नमस्कार केला नंतर कौसल्येला.

३) श्रावणबाळाच्या मातापित्यांनी दशरथाला शाप दिला होता की तू देखील आमच्यासारखाच पुत्रशोकाने प्राण सोडशील. राज्याभिषेकाच्या वेळी दशरथ तसा वृद्धच झाला होता. रामाच्या मृत्यूपेक्षा विरहाच्या पुत्रशोकाने दशरथाचा मृत्यू झालेला बरा. असा सूज्ञ विचार करून , रामाचा मृत्यू योग टाळण्यासाठी तिने रामाला वनवासात पाठवले.

४) रामाचा जन्मच मुळी रावण किंवा सर्व राक्षसांचा वध करणे यासाठी होता.  राज्याभिषेकाच्या वेळी सर्व देवांना चिंता पडली की हा जर इतर राजांप्रमाणे राज्यकारभार करू लागला तर राक्षसांचा वध कोण करणार? ते सगळे सरस्वतीला शरण गेले. सरस्वती मंथरा दासीच्या जिभेवर आरूढ झाली. तिने कैकयीला गोड बोलून भुलवले आणि रामाला वनवासात पाठवण्यास भाग पाडले.

५) खरे तर तिचे भरतापेक्षा रामावर जास्त प्रेम होते. ती भरताबरोबर रामाला भेटण्यासाठी चित्रकूट पर्वतावर गेली. व म्हणाली, मी कुमाता आहे. तू मला क्षमा कर. तेव्हा रामाने तिची समजूत घातली.” तू सुमाता आहेस. ज्या मातेने भरतासारखा भाऊ मला दिला ती सुमाताच आहे .”

… मग आपणही तिला कुमाता न म्हणता सुमाताच म्हणूया ना?

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बुवा.. ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ बुवा… ☆ श्री सुनील शिरवाडकर

ट्रकने मुंबईत प्रवेश केला तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. एका साध्या टपरीवजा हॉटेलपाशी ट्रक थांबला. बुवा ड्रायव्हर शेजारीच बसले होते. ड्रायव्हरनं खाली उडी मारली. बुवांनाही जाग आली. रात्रभर म्हणावी तशी झोप लागलीच नव्हती. आणि रात्रभरच्या ट्रक प्रवासात ते शक्यही नसतं. पहाटे कुठं डोळा लागला तर मुंबई आलीच.

बुवांचं वय झालं होतं. त्यांना ट्रकच्या केबिन मधुन खाली उडी मारणं शक्य नव्हतं. ड्रायव्हर सोबतच्या माणसानं कशीतरी कसरत करुन बुवांना खाली उतरवलं. टपरीपुढे एक लाकडी टेबल होता.. आणि चार लोखंडी खुर्च्या. बुवा तेथे टेकले. प्लास्टीकच्या जगमधुन पेल्यात पाणी ओतले. खळखळुन चुळ भरली.. तोंडावर पाणी मारलं. खांद्यावरच्या पंच्याला तोंड पुसलं.

टवके उडालेल्या कपात एका पोरानं चहा आणुन दिला. त्या गरम चहाचा पहिला घोट घेतल्यावर बुवांना जरा बरं वाटलं. थोडी तरतरी आली.

ट्रक ड्रायव्हर नंतर चहाचे पैसे दिले.. ते ठरलेलंच असायचं. बुवांची परिस्थिती ड्रायव्हरला माहीत होती. म्हणुन तर तो नेहमी बुवांना कोल्हापूर पासुन मुंबई पर्यंत घेऊन यायचा.. काहीही पैसे न घेता. जातानाही तसंच.. त्याच ट्रकमधून बुवा पुन्हा कोल्हापुरला जायला निघायचे.

चालत चालत बुवा निघाले.. आणि पंधरा मिनिटांत आकाशवाणी केंद्रावर आले. त्यांचा अवतार बघून खरंतर गेटवर त्यांना अडवायला पाहिजे होतं.. पण बुवांना आता तिथे सगळे जण ओळखत होते. चुरगळलेला सदरा.. गाठी मारलेलं धोतर.. झिजलेल्या वहाणा.. पण दाढी मात्र एकदम गुळगुळीत. काल रात्री निघण्यापूर्वीच बुवांनी दाढी केली होती.

आकाशवाणी केंद्राच्या प्रतिक्षा गृहात बुवा आले. नेहमीच्या सोफ्यावर बुवांची नजर गेली. तो रिकामाच होता. बुवांना जरा बरं वाटलं. तिथे कुणी बसायच्या आत बुवा घाईघाईने गेले.. आणि सोफ्यावर चक्क आडवे झाले. दोनच मिनिटांत बुवा छानपैकी घोरु लागले.

एवढा आटापिटा करून कोल्हापुराहुन मुंबईला येण्याचं काय कारण? तर केवळ पैसा..

बुवांची परिस्थिती खुपच हलाखीची होती. साक्षात सवाई गंधर्वांचा आशिर्वाद मिळालेल्या कागलकर बुवांची सध्या ही अशी परिस्थिती होती. एकेकाळी सवाई गंधर्वांचे शिष्य म्हणून त्यांना कोण मान होता. पण आर्थिक नियोजनचा अभाव. कुणीतरी सांगितलं.. मुंबई आकाशवाणीवर गाण्याचा कार्यक्रम केला की साठ रुपये बिदागी मिळते. त्यांनी आकाशवाणी केंद्रावर चकरा मारायला सुरुवात केली.

तिथं त्यांना सांगण्यात आलं.. ’ तुम्ही कोल्हापूरचे.. त्यामुळे पुणे केंद्रावर जा. ’

पण झालं होतं काय.. पुणे केंद्रावर कलाकारांची गर्दी.. तिथं नंबर लागणं कठीण.. शिवाय बिदागी पण कमी.. म्हणून मग मुंबई केंद्रावर चकरा.

अखेर कुणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी मुंबईचा असाच एक डमी पत्ता दिला.. आणि आपण मुंबईकर आहोत असं सिद्ध केलं. मुंबई केंद्रावर त्या वेळी रविंद्र पिंगे अधिकारी होते. त्यांनीही समजुन घेतलं. वर्षाकाठी पाच सहा कार्यक्रम देण्याची व्यवस्था केली.

आकाशवाणी केंद्रावरच्या माणसांनी बुवांना जागं केलं. बुवांच्या रेकॉर्डिंगची वेळ झाली होती. बुवा उठले चुळ भरली.. तोंडावर पाणी मारलं.. ताजेतवाने झाले.. आणि रेकॉर्डींग रुममध्ये आले.

गळ्यात दैवी सुर घेऊन जन्मलेले कागलकर बुवा गायला बसले.. आणि..

.. त्यांच्या अलौकीक गायनानं सगळा रेकॉर्डींग रुम भारुन गेला.

अर्ध्या तासाचं रेकॉर्डींग झालं.. बुवा बाहेर आले. केंद्रावर असलेल्या कॅन्टीन मध्ये एक रुपयात राईस प्लेट मिळत होती. तिथे जेवण केलं. साठ रुपयांचा चेक खिशात टाकला.. आणि डुलत डुलत पुन्हा कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले.

उमेदीच्या काळात मिळालेला पैश्यात भविष्य काळाची तरतूद करणं सगळ्यांना तरच जमतं असं नाही. मग म्हातारपणी त्यांची ही अशी अवस्था होते. कागलकर बुवांचं नशीब थोडंफार चांगलं.. त्यांना आकाशवाणीनं मदतीचा हात दिला.

कागलकर बुवा ज्याला त्याला अभिमानाने सांगत.. पु. ल. देशपांडे यांनी माझा गंडा बांधला होता. आता पु. ल. तर बालगंधर्वांच्या गायकीचे चहाते.. मग सवाई गंधर्वांचे शिष्य असलेल्या कागलकर बुवांचा गंडा ते कसे बांधणार?

हाच प्रश्न एकदा रविंद्र पिंगे यांनी पु. लं. ना विचारला.

पु. ल. देशपांडे म्हणाले..

मी तेव्हा बेळगावात रहात होतो. कागलकर बुवा पण तेव्हा बेळगावातच रहात होते. मी बुवांची परिस्थिती पाहिली. दोन पैसे मिळावेत म्हणून त्यांनी गाण्याचा क्लास काढला होता. पण त्यांना विद्यार्थी मिळेनात.

मी विचार केला.. मी जर बुवांचा गंडा बांधला, तर बुवांचा जरा गाजावाजा होईल‌.. त्यांना विद्यार्थी मिळतील. केवळ म्हणून मी बुवांचा गंडा बांधला.. त्यामुळे मला अपेक्षित असलेला बोलबाला झाला.. त्यांच्याकडे बरेच विद्यार्थीही आले हे खरं.. पण माणूस मात्र खुपच गुणी.. त्यांच्यासारख्या थोर गायकाला अश्या परिस्थितीतला सामोरं जावं लागलं हे दुर्दैव..

आणि हे आम्हाला पाहायला लागतं आहे.. हे आमचं दुर्दैव!

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘आईचा खिसा’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘आईचा खिसा’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

मला लहानपणी नेहमी प्रश्न पडायचा की बाबांना कसा खिसा असतो, त्यात ते पेन , सुट्टी नाणी, कधी कधी बंद्या नोटा ठेवतात,तसा आईला खिसा का नसतो?शाळेची फी भरताना बाबा कसे ऐटीत खिशातून काढून फीसाठी पैसे देतात , किंवा प्रगति पुस्तकावर खिशातलं पेन काढून ऐटीत सही करतात. तसा आई जवळ खिसा का नसतो? आणि जर असलाच खिसा तर नेमका कुठे असतो? आईला विचारलं तर ती फक्त हसायची. “तुला भूक लागली असेल ना?” असं म्हणून पदर खोचून शिऱ्यासाठी रवा भाजायला घ्यायची .  रवा भाजण्याच्या त्या वासावर भुकेशिवाय दुसरं काही सुचत नसे. एकदा खेळताना पडल्यावर पायाची जखम पुसायला कापसाचा बोळा मिळाला नाही म्हणून चक्क कॉटनच्या नव्या साडीच्या टोकाने  माझी जखम तिने पुसून काढली आणि  कपाटातील कैलास जीवन काढून त्यातलं लोण्याच्या गोळ्यासारखं मलम माझ्या जखमेवर लावलं.

मला रात्री लवकर झोप यायची, तेव्हा घरातली कामं लगबगीने आवरून ती तिच्या जुन्या साडीचा काठ घडी करून मला दिव्याच्या उजेडाने  त्रास होऊ नये म्हणून डोळ्यांवर मांडायची आणि मला त्या साडीसारखीच अगदी तलम निद्रा यायची.

कुठे बाहेर जाताना बाबा खिशातून पैसे काढून रेल्वेची तिकीट काढायचे आणि आई मात्र खिडकीतून झो झो येणारा वारा माझ्या कानाला बसतो म्हणून माझ्या काना- केसांभोवती आपला पदर गुंडाळून घ्यायची. तेव्हाही माझं लक्ष खिडकीतल्या बाहेरच्या दृश्याबरोबर बाबांच्या खिशाकडे असायचं.

मोठा झाल्यावर मीसुद्धा बाबांसारखा खिसा शिवून घेऊन त्यात वेगवेगळ्या वस्तू ठेवणार, हे ठरवून ठेवले होते. नेमकी तेव्हाच आई पदराच्या टोकाला गुंडाळून ठेवलेली गोळी (मला तहान लागली असताना) हळूच माझ्या जिभेवर ठेवायची. तृषा पूर्ण शांत व्हायची. कधी खेळताना सर्व मुलं बॉल आणण्यासाठी वर्गणी काढत. अशा वेळी आई तिच्या पदरात बांधलेला रुपया- दोन रुपये काढून देत असे आणि वर रुपया देऊन “उन्ह फार आहे. पेपरमिंट खा चघळायला,” म्हणून सांगत असे. मित्र म्हणत, ” तुझी आई खूप छान आहे रे!” तेव्हा कॉलर टाईट होत असे.

आईकडे खिसा नसताना बाबांपेक्षा जास्त गोष्टी तिच्याकडे कशा, हा प्रश्न मला  थोडा मोठा  होताना पडू लागला. आणि एक दिवस मला माझंच उत्तर सापडून गेलं. आईकडे खिसा असतो. आणि त्या खिशाला चौकट नसते. तो आईचा पदर असतो, जो कायम मुलांसाठी सुखं बांधून ठेवत असतो आणि तोच आईचा कधीही  रिक्त न होणारा खिसा असतो .

लेखक  :अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 341 ⇒ चंदू पारखी… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “चंदू पारखी।)

?अभी अभी # 341 ⇒ चंदू पारखी? श्री प्रदीप शर्मा  ?

अगर हमारे जीवन में टीवी और फिल्म जैसा माध्यम नहीं होता, तो क्या हम चंदू पारखी जैसी प्रतिभाओं को पहचान पाते। मराठी रंगमंच और हिंदी सीरियल व्योमकेश बख्शी से अपनी पहचान बनाने वाले इस कलाकार की कल २६वीं पुण्यतिथि थी।

इंदौर में जन्मे इस शख्स के बारे में मैं केवल इतना ही जानता हूं कि सन् ६४-६५ में हम दोनों एक ही स्कूल श्री गणेश विद्या मंदिर के छात्र थे। मुझे याद नहीं, कभी हमारी आपस में बातचीत भी हुई हो, क्योंकि चंदू एक अंतर्मुखी और एकांतप्रिय छात्र था। हमेशा कमीज पायजामा पहनने वाला, अक्सर उदासीन और कम बोलने वाला और अपने काम से काम रखने वाला।।

स्कूल कॉलेज में कौन आपका दोस्त बन जाए, कुछ कहा नहीं जा सकता। लेकिन कुछ नाम और चेहरे किसी खासियत के कारण स्मृति पटल पर कायम रहते हैं। उचित अवसर पर कुछ प्रकट हो जाते हैं, और शेष जाने कहां गुम हो जाते हैं ;

पत्ता टूटा डाल से

ले गई पवन उड़ाय।

अबके बिछड़े कब मिलेंगे

दूर पड़ेंगे जाय।।

और यही हुआ। चंदू पारखी जैसे कई साथी जीवन के इस सफर में कहां खो गए, कुछ पता ही नहीं चला। वह तो भला हो कुछ हिंदी टीवी सीरियल का, जिनमें अचानक चंदू पारखी वही चिर परिचित अंदाज में दिखाई दिए। पहचान का भी एक रोमांच होता है, जो किसी भी परिचित चेहरे को ऐसी स्थिति में देखकर महसूस किया जा सकता है। अरे ! यह तो अपना चंदू है, ठीक उसी अंदाज में, जैसे हमारे प्रदेश के बाहर हमें कोई MP 09 वाला वाहन देखकर होता है, अरे यह तो अपने इंदौर की गाड़ी है।

उनके पौत्र यश पारखी के अनुसार ;

चंदू पारखी 150 रुपए लेकर मुंबई की ओर निकल पड़े थे… चंदू पारखी का जीवन कठिनाइयों से भरा था। कलाकार ने अपने अंदर के अभिनय प्रतिभा को उम्दा तरीके से समझ लिया था। उन्होंने ठान लिया था कि अब अपना जीवन रंगभूमि को समर्पित करूंगा। मात्र 150 रुपए अपने कपड़े की झोली में रखकर अपनी मंजिल को पाने के लिए चल दिए। वे कला की नगरी मुंबई पहुंच गए। नए लोग और नई चुनौतियों के बीच हमेशा ऐ मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम गुनगुनाते थे। इस गाने का उन पर बहुत बड़ा प्रभाव पड़ा। वे कपड़े की झोली में लहसुन की कलियां रखते थे। जब भी भूख लगती एक-दो कलियां खा लिया करते थे। मायानगरी में पहला नाटक आचार्य अत्रे द्वारा लिखित तो मी नव्हेच में काम करने का मौका मिला। इसमें प्रमुख भूमिका में नटश्रेष्ठ #प्रभाकर_पणशीकर थे। नाटक में चंदू पारखी जी ने न्यायाधीश की भूमिका निभाई थी। उन्हें असली पहचान निष्पाप नाटक के बाद मिली।

बड़ी कठिन है डगर अभिनय की। अवसर कभी दरवाजे पर दस्तक नहीं देते। प्रतिभाओं को ही अवसर तलाशना पड़ता है। जिन दर्शकों ने टीवी पर जबान संभाल के सीरियल देखा है, उन्हें चंदू परखी की प्रतिभा के बारे में कुछ कहने की जरूरत नहीं है। मराठी सस्पेंस फिल्म अनपेक्षित में भी चंदू पारखी के अभिनय को बहुत सराहा गया।।

आज जब मैं टीवी सीरियल जबान संभाल के, के चंदू पारखी के रोचक और मनोरंजक पात्र चतुर्वेदी के किरदार को देखता हूं, और स्कूल के सहपाठी चंदू से उसकी तुलना करता हूं, तो दोनों में जमीन आसमान का अंतर होते हुए भी, कहीं ना कहीं, अभिनय की संभावनाओं का अनुभव तो हो ही जाता है।

बस चंदू पारखी को कोई नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर जैसा पारस मिल जाए, तो वह सोना क्या हीरा हो जाए। अफसोस, इन प्रतिभाओं की उम्र विधाता कम ही लिखता है। १४ अप्रैल १९९७ को मेरा यह भूला बिसरा सहपाठी, मुझसे मिले बिना ही बिछड़ गया। बस स्मृति शेष में केवल श्रद्धा सुमन ही बचते हैं ..!!

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चैत्र… ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

डाॅ. व्यंकटेश जंबगी

?  विविधा ?

☆ चैत्र… ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

वसंत, किती वसंत येऊन गेले जीवनात रमून जातो आपण आठवणीत किती सांगू माझ्या वसंताचे ऋण फुलवितो जीवन मोगर्यासमान आठवती बालपणीची गाणी….

“सुखावतो मधुमास हा…”

“आला वसंत येथे मज ठाऊकेच नाही…”

“आला वसंत ऋतू आला….”

“कुहू कुहू बोले कोयलिया….”

“कोयलिया बोले अंबुवा डालपर ऋतू बसंतकी देत संदेसवा..”

वसंत, कोकिळ,आम्र आणि उन्हाळ्याची सुट्टी यांचं नातं आंब्यासारखं…आभ्यासाच्या साली काढून सुट्टीच्या गराचा आस्वाद घ्यायचा.. नव्या वर्गात जाण्यासाठी कोय पेरायची….

आठवतात का…..

काचाकवड्या,कैरम,गोट्या,पत्ते पोहणे.. सायकलवर काम फत्ते.

आमच्या चकार्या ज्येष्ठांच्या चकाट्या..पिट पिट पिटायच्या.

आठवतात का ते दिवस….

मामा,काका, मावशी, आत्या त्येकाची मुलं पाच…

भल्या मोठ्या मामाच्या वाड्यात फक्त धुडगूस आणि नाच….

आठवतात का, गाण्याच्या भेंड्या  सारे आजोबा उडवायचे शेंड्या..

आठवतात का फणस, त्याच्या भाजलेल्या बीया, चुलीत हात घालून बाहेर सुखरूप काढणार्या आजीची किमया.

आठवतात का, मोठे झालो.. किती वसंत जीवनात आले ? 

वसंतराव देशपांडे,वसंत देसाई, एकाचे गाणे एकाची सनई वपुतल्या वसंताने किमया केल्या आजी स्टाईलने कथा सांगितल्या.

वसंत बापटांच्या कविता अजून रेंगाळतात मनाच्या कोपऱ्यातून चांदोबा चंपक साथ सोडून गेले मोबाईलची “साथ” लावून गेले.

सगळे “वसंत” वाचनालयी राहिले गुपचुप कपाटात नंबराने थांबले.

आजी झाली कार्टून,काका झाले यूट्यूब, आजोबा झाले गुगल मामा आत्याची दांडी गुल.

असाच परवा  “वसंत” भेटला.

“ओळखलस का ?” म्हणाला.

मी बालपणात घेऊन गेलो त्याला गळ्यात पडून ढसढसा रडला.  मी म्हणालो “झालं काय?”

म्हणतो,”अजून शिशीरच आहे रे.

मामाचा वाडा ओस आहे.

आंब्याचे झाड उदास आहे.

कैर्यांच्या फोडी भेळेत खातात, माझ्या कैर्या तशाच राहतात.

आता मी “वसंत”नाही “समर”

आहे, फक्त पंचांगापुरता अमर आहे.कोकिळ गात नाही आता फक्त रडतो आहे,पंचम आता वाद्यांच्या गोंगाटात लुप्त आहे.”

माझेही डोळे पाणावले,म्हणालो “वसंता,जरा धीर धर.तुझ्याही जीवनात “वसंत”येईल..!”

“खरच?”डोळे पुसत वसंत म्हणाला..मी म्हणालो,”हां,हां शिशीर आया है,तो वसंतके आनेमें देर कहां?”

वसंत तोच आहे,सृष्टी बदलत नाही,माणसाची द्रुष्टी बदलते त्याला इलाज नाही!

© डॉ. व्यंकटेश जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares