मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “खरे प्रेम…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “खरे प्रेम…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

.. तो रस्त्यावरचा भटका  कुत्रा  नेहमी रात्रभर तिच्या घराच्या दाराशी जागा असायचा. एकप्रकारे तिचं संरक्षण करण्याचं व्रतच त्याने घेतलं होतं..

तिच्या मनी त्याच्याप्रती भूतदया जागृत झाल्याने, त्याला सकाळ संध्याकाळ नेमाने ब्रेड बटर प्रेमाने खाऊ घालायची.

प्रेमाने केलेल्या क्षुधाशांतीच्या तृप्ततेने  तो आनंदाने आपली शेपटी हलवत सतत तिच्या आजूबाजूला, घराजवळ घुटमळत राहायचा..

तिच्या नवऱ्याला कुत्र्यांबद्दल तिडीक असल्याने  तो तिच्यावर सारखा चिडायचा ; कुत्र्याला हडतूड करायचा. आणि एका रात्री…

 मुसळधार पाऊस झोडपत असताना तिच्या नवऱ्याने  कडाक्याच्या भांडणातून तिला घरातूनच कायमचे हाकलून दिले; त्यावेळी तो भटका कुत्रा तिच्याजवळ येऊन ,तिची ओढणी ओढत ओढत  तेथून आपल्या बरोबर घेऊन जाऊ लागला, जणूकाही इथून पुढे इथं राहून अधिक मानहानी करण्यात काही मतलब नाही हेच तो सुचवत होता..

आजवरचं मालकिणीचं खाल्लेलं मीठ नि तिनं दिलेलं प्रेम या जाणीवेला तो भटका  असला तरी  आता  त्याच्या इमानीपणाला जागणारं होता..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- पगार होईपर्यंत पुरेल एवढंच मोजकं सामान आणून दिल्यानंतर खिशात राहिली होती फक्त शंभर रुपयांची एक नोट. त्या एका नोटेतच पुढे घडणाऱ्या आक्रिताचे धागेदोरे लपलेले होते. )

“हे काय? एवढंच सामान?” रात्री जेवणाची तयारी करून ठेवल्यानंतर मी आणलेलं सामान आवरताना आई म्हणालीच.

” होय अगं. अगदी निकडीचं आहे तेवढंच आणलंय. नंतर चांगल्या दुकानातून महिन्याचं सर्व सामान आणूया” 

“आणि चहा पावडर?ती नाही आणलीस?”

“अगदीच संपली नाहीय ना?”

“आज घरमालकीण बाई येऊन भेटून गेल्या. संध्याकाळी कुलकर्णी आजी आणि वहिनीही आल्या होत्या. त्या सगळ्यांना चहा केला होता रे. त्यानंतर आता जेमतेम आपल्या दोघांच्या सकाळच्या चहापुरती शिल्लक असेल बघ. “

ही कुलकर्णी मंडळी शेजारच्याच पोस्टल काॅलनीत रहायची. प्रमोद कुलकर्णी आमच्याच बँकेच्या इथल्या दुसऱ्या ब्रॅंचमधे हेडकॅशिअर होता. त्याने माझी ओळख करून घेतली, आमचे विचार जुळले तसे मग ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले होते. दोघांच्याही आपापल्या व्यापांमुळं रोज खूप वेळ भेटणं-बोलणं व्हायचं नाही पण रोज रात्री जेवण झाल्यावर आम्ही दोघं कोपऱ्यापर्यंत पाय मोकळे करायला मात्र नियमित जायचो.

“आज प्रमोद आणि मी रात्री फिरायला जाऊ तेव्हा एखादं दुकान उघडं असेल तर घेऊन मयेईन. नाहीतर मग उद्या नक्की”

मी चहा-पावडरीच्या विषयाला असा पूर्णविराम दिला खरा पण काही झालं तरी आज मी चहाची पावडर आणणार नव्हतोच. कारण प्रमोद बरोबर असताना त्याच्यासमोर फक्त शंभर ग्रॅम चहापूड कशी मागायची हा प्रश्न होता. त्यापेक्षा उद्या दुपारी घरी जेवायला येताना आणता येईल असा विचार मी केला होता. पण झालं भलतंच. रात्री जेवण आवरून मी हात धुवत होतो तोवर प्रमोदची हांक आलीच.

“आई, मी जाऊन येतो गं” म्हणत मी बाहेर पडलो तेवढ्यांत घाईघाईने आई दारापर्यंत आली.

“लवकर ये रे. आणि येताना चहापावडर आण आठवणीनं ” प्रमोदपुढंच तिनं सांगितलं. “हो आणतो” म्हणून मी कशीबशी वेळ मारुन नेली.

आम्ही नेहमीप्रमाणे गप्पा मारत कोपऱ्यापर्यंत जाताच मी परतीसाठी वळणार तेवढ्यात प्रमोदने मला थांबवलं.

 “अहो, चहा पावडर घ्यायचीय ना? आई म्हणाल्या नव्हत्या का?ते बघा. त्या दुकानात मिळेल. ” 

ला ‘नको’ म्हणता येईना. विरोध न करता अगदी मनाविरुध्द मी मुकाट्याने प्रमोदच्या मागे गेलो.

” किती.. ?पाव किलो?” त्यानेच पुढाकार घेत मला विचारलं..

“चालेल. ” मी नाईलाजाने म्हणालो. खिशातली ती एकमेव शंभर रुपयांची नोट दुकानदाराला देऊ लागलो. त्याने ती घेतलीच नाही.

“मोड नाहीये. २५ रुपये सुटे द्या” दुकानदार शांतपणे म्हणाला. ते माझ्या पथ्यावरच पडलं होतं.

“ठीक आहे. राहू दे ” म्हणत मी विषय संपवला पण तिकडे लक्ष न देता प्रमोदने माझ्या हातातली ती नोट वरच्यावर काढून घेतली.

“सर, ती समोरची टपरी माझ्या मित्राचीच आहे. तिथे मोड मिळेल. थांबा. मी आलोच. ” तो घाईघाईने म्हणाला आणि रोड क्रॉस करून त्या टपरीच्या दिशेने गेलासुध्दा. तिथेही त्याला मोड मिळूच नये असा सोयीस्कर विचार मी करत होतो तेवढ्यात तो आलाच. मुठीत धरलेल्या पैशांमधील २५ रुपये परस्पर त्याने दुकानदाराला दिले आणि चहाचा पुडा घेऊन तो माझ्याकडे देत हातातली बाकीच्या नोटांची घडीही त्याने माझ्याकडे सुपूर्त केली. ते पैसे मी तसेच खिशात ठेवले आणि आम्ही परतीची वाट धरली.

हा खरं तर किती साधा प्रसंग. पण तो इतका सविस्तर सांगण्याचं एक खास प्रयोजन मात्र आहे. तसं पाहिलं तर कांही दिवसांपूर्वी घडून गेलेल्या त्या ‘लिटिल् फ्लाॅवर’ च्या एपिसोडशी या अगदी सरळसाध्या प्रसंगाचा अर्थाअर्थी कांहीतरी संबंध असणे शक्य तरी आहे कां? पण तसा तो होता हे नंतर चार दिवस उलटून गेल्यावर अगदी अचानक माझ्या लक्षात येणार आहे याची पुसटशी जाणिवही मला त्याक्षणी झालेली नव्हती!

पुढे चारच दिवसांनी पौर्णिमा होती. शनिवारी कामं आवरून मी निघणार होतो. शुक्रवारी रात्री झोपण्यापूर्वीच मी माझी बॅग भरून ठेवत असतानाच…..

” पहाटे तुला किती वाजता उठवायचं रे ?” आईनं विचारलं.

” पाच वाजता. ” 

सकाळी लवकर बँकेत जाऊन तातडीची कामं पूर्ण करायची तर पाचला उठणं आवश्यकच होतं. अंथरुणाला पाठ टेकताच मला गाढ झोप लागली. अचानक कुणाची तरी चाहूल लागली आणि मी एकदम जागा झालो.

” कोण आहे?” मी अंदाज घेत विचारलं.

ती आईच होती.

“पेपर आलाय रे. इथं टीपॉयवर ठेवतेय. ऊठ बरं”

“पेपर इतक्या पहाटे?” मला आश्चर्य वाटलं.

मी लाईट लावला. पेपर घेऊन सहज चाळू लागलो. माझी नजर एका पानावर अचानक स्थिरावली. मी झपकन् उठलो. कपाट उघडून पॅंटच्या खिशातलं मिनी-लॉटरीचं तिकीट बाहेर काढलं. पेपरमधल्या त्या पानावरच्या मिनी लॉटरीच्या रिझल्टनेच माझं लक्ष वेधून घेतलं होतं! हातातल्या तिकिटावरचा नंबर मी पडताळून पाहू लागलो. माझ्या तिकिटावरचे शेवटचे तीन आकडे ४७५ असे होते ज्याला एक हजार रुपयांचं बक्षीस लागलेलं होतं! माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. अनपेक्षित अशा आनंदाच्या लहरींनी मी उत्तेजित झालो. कधी एकदा हे आईला सांगतोय असं होऊन गेलं आणि मी तिला हांका मारू लागलो. पण माझ्या हाकांचा तो आवाज आईपर्यंत पोहोचतच नाहीये… दूरवर जाऊन प्रतिध्वनींमधे परावर्तित झाल्यासारख्या माझ्याच आवाजातल्या त्या हांका मलाच ऐकू येतायत असं मला वाटत राहिलं. मी अस्वस्थ झालो. कुणीतरी मला हलवून उठवतंय असा भास झाला न् मी दचकून जागा झालो.

“पाच वाजलेत रे.. उठतोयस ना?” आई जवळ येऊन मलाच उठवत होती..

.. म्हणजे मी पाहिलं ते स्वप्नच होतं हे मला जाणवलं. खरंतर पहाटे पडलेलं स्वप्न म्हणजे शुभ शकूनच! पण त्याचा आनंद क्षणभरच टिकला. कारण मी कधीच लाॅटरीचं तिकीट काढत नाही. ‘जे लॉटरीचं तिकीट मी काढलेलंच नाहीय त्याला बक्षीस लागेलच कसं?’ या मनात उमटलेल्या प्रश्नाचं मलाच हसू आलं. ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ म्हणावं तर झोपताना मी पहाटे लवकर उठून आवरायच्याच विचारात तर होतो. लॉटरीबिटरीचा विचार ओझरताही मनात असायचा तर प्रश्नच नव्हता. आणि तरीही… ? 

या अशा स्वप्नांना कांही अर्थ नसतो असं वाटलं, पण अर्थ होताच! ते सूचक असा शुभसंकेत देणारं स्वप्न होतं!!

त्यादिवशी कामं आवरून घरी जेवायला यायलाच दुपारचे दोन वाजून गेले होते. लगेचच तीनची बस पकडायची होती. तशी काल रात्रीच मी बॅग भरून ठेवली होती म्हणून बरं. कसंबसं जेवण आवरून कपाटातला समोरचा हाताला येईल तो हँगर ओढला. घाईघाईने कपडे बदलले आणि बॅग घेऊन बाहेर पडलो.

बस सुटता सुटताच कशीबशी मिळाली. बसायला जागा नव्हतीच. हातातली बॅग वरच्या रॅकवर ठेवण्यापूर्वीच कंडक्टर तिकिटासाठी गडबड करू लागला. खिसे चाचपून पैसे बाहेर काढले. नोटांच्या घडीतली वरची ५० रुपयांची नोट कंडक्टरला दिली. तिकीट घ्यायच्या गडबडीत हातातल्या नोटा खाली पडल्या. त्या उचलायला वाकलो आणि माझ्या लक्षात आलं त्या नोटांच्या घड्यांमधे कसल्यातरी कागदाची छोटी घडी दिसतेय. बसच्या हादऱ्यांमुळे धड उभं रहाताही येत नव्हतं त्यामुळे तो कसला कागद हे न बघता नोटांबरोबर तो कागदही पॅंटच्या खिशात तसाच सरकवला आणि तोल सावरत उभा राहिलो.

नृ. वाडीला गेल्यावर प्रसादाच्या नारळ-खडीसाखरेचे पैसे देण्यासाठी खिशातून बाहेर काढले तेव्हा ती कागदाची घडी म्हणजे ५० पैशांचं मिनी-लाॅटरीचं एक तिकिट आहे हे लक्षात आलं. ‘हे इथं आलं कुठून?’ हा विचार मनात येत असतानाच माझी आश्चर्यचकित नजर त्या तिकीटावरच खिळलेली होती. त्या नजरेलाच जाणवलं कीं या तिकिटावरचे शेवटचे तीन आकडेही ४७५ हेच आहेत… !

, मनात आश्चर्य होतं, हुरहूर होती, उत्सुकता होती आनंदही! त्याच मनोवस्थेत दर्शन घेऊन मी वर आलो. वाटेतल्या लॉटरी स्टॉलवर ते तिकीट दाखवलं.

” एक हजार रुपयाचं बक्षीस लागलंय” स्टॉलवाला म्हणाला. हे अपेक्षितच होतं तरीही मनातल्या मनात झिरपणारा आनंद मी लपवू शकलो नाही.

” तिकीटं देऊ?” 

“नको. पैसेच द्या” मी बोलून गेलो.

“दीडशे रुपये कमिशन कापून घ्यावे लागेल. “

” चालेल. ” मी म्हटलं.

त्याने कमिशन वजा जाता राहिलेले ८५० रुपये मला दिले आणि मी शहारलो. नेमके आठशे पन्नास रुपये? कितीतरी वेळ हे स्वप्नच असेल असंच वाटत राहिलं.

मन स्थिर झालं तेव्हा मात्र ‘मी कधीच न काढलेलं ते लॉटरीचं तिकीट माझ्या खिशात आलंच कसं?’ हा प्रश्न माझ्या मनाला टोचत राहिला. त्याचा थांग लागला तो मी सोलापूरला परत आल्यानंतर प्रमोद कुलकर्णी मला भेटला तेव्हा!

चहाचा पुडा घेण्यासाठी माझ्या हातातली शंभर रुपयांची नोट घेऊन मोड आणायला तो समोरच्या टपरीकडे धावला होता. त्याला मोड मिळाली होतीही पण ती देताना त्याचा तो टपरीवरचा मित्र त्याला सहज चेष्टेने ‘काहीतरी घेतल्याशिवाय मोड मिळणार नाही’ असं हसत म्हणाला तेव्हा प्रमोदलाही आपल्या मित्राची गंमत करायची लहर आली. ती टपरी म्हणजे त्या मित्राचा लाॅटरीचा स्टाॅल होता. त्यावरचे फक्त ५० पैशांचे ‌एक मिनी लॉटरीचे तिकीट काढून घेत प्रमोद म्हणाला, “काहीतरी घ्यायचंय ना? हे मिनी लाॅटरीचं एक तिकीट घेतलंय बघ. “

मित्रही मजेत हसला. त्याने सुट्टे पैसे परत दिलेन. प्रमोदने त्यातले पंचवीस रुपये दुकानदाराला देऊन मला दिलेले बाकीचे पैसे मी न बघताच खिशात ठेवून दिले होते आणि त्या नोटांच्या घडीतच हे लाॅटरीचं तिकिटही होतंच!

हे सगळं कसं घडलं याचं तर्काला पटणारं उत्तर माझ्याजवळ आजही नाहीय. पण दोन्ही प्रसंगांमधले एकमेकात गुंतलेले धागेदोरे आणि त्यांच्यातली वीण इतकी घट्ट होती की त्यात लपून बसलेलं कालातीत सत्य मला त्याक्षणी जाणवलं नव्हतं पण त्याच दिशेने सुरु असलेल्या विचारांमधूनच जेव्हा ते जाणवलं ते मात्र अगदी लख्खपणे…!!

दैनंदिन आयुष्यात सहज घडणाऱ्या साध्यासाध्या घटना- प्रसंगांच्या क्रमांमधेही कुणीतरी पेरून ठेवलेला एक विशिष्ठ असा कार्यकारणभाव असतोच. ते नेमकं तसंच आणि त्याक्रमानेच कां, कसं घडतं? याचा फारसं खोलात जाऊन सहसा आपण कधी विचार करत नाही. पण असा एखादा गूढ अनुभव मात्र त्याचा तळ शोधायला आपल्याला नकळत प्रवृत्त करतोच. हे सगळं कसं घडतं, कोण घडवतं ते समजून घेणं आणि ‘त्या’ ‘कुणीतरी’ पुढे नतमस्तक होणं एवढंच आपण करायचं असतं!

चहापावडर आणायची आठवण आईने प्रमोदसमोरच मला करून देणे, स्वत: पुढाकार घेऊन प्रमोदने मला त्या दुकानात माझ्या मनात नसतानाही घेऊन जाणे, तिथे मोड नाहीय हे समजताच समोरच्या टपरीवरून सुटे पैसे आणायला त्याचे प्रवृत्त होणे, तिथे अगदी न ठरवताही सहजपणे लाॅटरीचे तिकीट विकत घेणे, नोटांच्या घड्यांमधे त्याने ठेवलेले ते तिकीट अलगद माझ्या खिशात पुढे चार-पाच दिवस असे सुरक्षित रहाणे या सगळ्या घटनाक्रमांमागे विशिष्ट अशा कार्यकारणभाव होताच होता आणि त्याचा थेट संबंध माझी कसोटी पहाणाऱ्या त्या ‘लिटिल् फ्लॉवर’ एपिसोडशीच तर होता! म्हणूनच “माय गॉड वुईल रिइंबर्स माय लाॅस इन वन वे आॅर आदर.. ” हे सहजपणे बोलले गेलेले माझे शब्द असे शब्दशः खरे ठरलेले होते! याच्याइतकेच ते घडणार असल्याची सूचक कल्पना अकल्पितपणे माझ्या मनात त्या पहाटेच्या स्वप्नाद्वारे मला ध्वनीत होणे हेही अलौकिक आणि म्हणूनच खूप महत्त्वाचे आहे आणि तेवढेच आश्चर्यकारकही !!

आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा ते स्वप्न माझ्या मनात अजूनही टवटवीत आहे. हे घडल्यानंतर माझ्या अंतर्मनाचा कण न् कण शुचिर्भूत झाला असल्याची भावना त्या क्षणी मला अलौकिक असा आनंद देऊन गेली होती! त्या आनंदाचा ठसा आजही माझ्या मनावर आपल्या हळुवार स्पर्शाचं मोरपीस फिरवतो आहे!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘महालक्ष्मी – आईचंच रूप…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘महालक्ष्मी – आईचंच रूप…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

माझ्या आईचं, शैलजा फेणाणीचं सर्वांत लाडकं दैवत म्हणजे ‘महालक्ष्मी’ ! म्हणून तर तिनं तिच्या मंगळसूत्रामध्ये सुंदर, सुबक, नाजूक, रंगीत मीनाकाम चितारलेल्या आणि कमळात उभ्या असलेल्या ‘लक्ष्मी’चं लॉकेट दिमाखात घातलं होतं! 

माझे बाबा, शंकरराव फेणाणी हे भारतातील ‘स्क्रेपर बोर्ड’ या ब्रिटिश चित्रकलेतील मोठे तज्ज्ञ म्हणून गणले जायचे. ते उत्कृष्ट चित्रकार होते. लहानपणी ते कारवारला असताना, त्यांना ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये शिकण्यासाठी आणि चित्रकलेतून उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबईला यायची फार इच्छा होती. परंतु चित्रं काढून कोणी पोट भरू शकतं का? यावर त्याकाळच्या उच्चशिक्षित (संस्कृत आणि गणितात तज्ञ असलेल्या) माझ्या आजोबांना यावर विश्वास नव्हता. लग्नापूर्वी अत्यंत कठीण परिस्थितीतही, चित्रकलेच्या माध्यामातून उदरनिर्वाह करण्याची बाबांची जिद्दच, त्यांना मुंबईला घेऊन आली.

बाबा मुंबईला आल्यावर त्यांच्या आयुष्यात, शैलजाच्या पावलांनी मात्र ‘लक्ष्मी’ घरी आली! त्यावेळी घरात केवळ एक खाट आणि कांबळ होती. परंतु दोघांच्या अत्यंत प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाच्या कमाईने, लक्ष्मीच्या हातांनी घर हळूहळू सजू लागलं. जसजसा संसार फुलू लागला, तसतसं आईचं ‘महालक्ष्मी’ मंदिराशीही नातं जुळू लागलं, आणि अधिकाधिक दृढही होऊ लागलं! आई जेव्हा महालक्ष्मीची पूजा करत असे, त्यावेळी तर तिच्या चेहर्‍यावर विलक्षण तेज, सोज्ज्वळता, सात्त्विकता याची प्रचिती येई! एका क्षणात् त्या ‘देवत्वाशी’ ती एकरूप होई! तिच्या महालक्ष्मीवरील जबरदस्त श्रद्धेमुळेच माझ्या जन्माआधी, दर शुक्रवारी ती नवचंडिकेची यथासांग पूजा करून, कुमारिकांना बोलावून, सन्मानपूर्वक, भेटवस्तू देऊन, जेवण घालीत असे.

गणेशोत्सवातील हरितालिकेच्या (पार्वतीच्या – शैलजाच्या) पूजेच्या दिवशी आणि गणपती आगमनाच्या दिवशीसुद्धा दोन्ही दिवस, ती निराहार, उपवास करून, ताजे, खमंग आणि स्वादिष्ट असे अनेक तिखटा-गोडाचे पदार्थ करुन शंभरएक नातेवाईक आणि भक्त मंडळींना घरी जेवू घालत असे. पाण्याचा एक थेंबही न घेता, ही ताकद तिला कुठून येत असेल बरं? याचं आम्हां सर्वांना कोडंच पडत असे. नक्कीच तिला तिची ‘महालक्ष्मी’ उदंड ऊर्जा देत असावी!

माझ्या आईचं माहेरचं नाव ‘कमल’. माझ्या जन्मानंतर ‘नवचंडीचा प्रसाद’ म्हणून आणि कमळात जन्मलेली – (पद्मात् जायते इति) म्हणून, आमच्या भाई काकांच्या (म्हणजे सर्वांचे लाडके सुप्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांच्या) आईनं, “हिचं नाव ‘पद्मजा’च ठेवा, ” असं सांगितलं. ‘नवचंडिकेच्या वरदानाने ही ‘चंडिका’च माझ्या पोटी जन्मली!’ असं कधीकधी आई गंमतीने माझी चेष्टा करत म्हणायची! त्यानंतर दिवसेंदिवस आईची भक्ती पाहून, मीही देवीची भक्त झाले.

बारावीनंतर माझी अ‍ॅडमिशन मायक्रोबायोलॉजी हा विषय असलेल्या ‘सोफाया’ कॉलेजमध्ये झाली. आणि योगायोग म्हणजे हे कॉलेज ‘महालक्ष्मी’ मंदिराकडून, पायी अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर होतं. जणू महालक्ष्मीनेच मला जवळ बोलावून घेतलं होतं! त्यामुळे मीही दर शुक्रवारी महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी जात असे; आणि देवीसमोर, माझे गुरू ‘पद्मविभूषण’ पंडित जसराजजींनी मला शिकवलेलं ‘माता कालिका’ हे सुंदर भजन आणि इतर देवीची भजनंही मी गात असे. ते गाताना देवीची तिन्ही रूपं पाहून मन खूप प्रसन्न होई. तिथली पुजारी मंडळीही माझी दर शुक्रवारी आतुरतेने वाट पाहत, आणि माझ्या गाण्याचा आनंद घेत. त्यानंतर मला ते पेढे, नारळ, हार, फुलं असा भरपूर प्रसाद देत. अशा वेळी मी देवीसाठी गायले म्हणून हा प्रसाद तिनं ‘माझ्यासाठीच’ पाठवला आहे, असं मला वाटे आणि मोठ्या आनंदाने माझी आई त्याचा स्वीकारही करी.

नित्यनियमाप्रमाणे असेच एकदा मी कॉलेजमधून परतताना शुक्रवारी ‘महालक्ष्मी’ला दर्शनाला गेल्यावेळी, तिच्यासमोर मी ‘माता कालिका’ डोळे मिटून अत्यंत भावपूर्णपणे गायले. मी गात असताना शेजारीच कुणीतरी मुसमुसून रडण्याचा मला आवाज आला. मी दचकून पाहिले… तर एक मध्यमवयीन दाक्षिणात्य स्त्री रडत असल्याचं मला दिसलं. माझं भजन संपल्यावर मी तिला, ‘काय झालं? तुम्हाला काही त्रास आहे का?’ असं विचारल्यावर तिनं मला काय सांगावं?… ती टिपिकल दाक्षिणात्य टोनमध्ये म्हणाली, “आपका गाना सुनकर अमको इतना अच्चा लगता ऐ, तो बगवाऽऽऽन को कितना अच्चा लगता ओगा!” हे ऐकून मला गालातल्या गालात हसू आवरेना! असे अविस्मरणीय प्रसंग नेहमी परमेश्वराची आठवण करून देत त्याच्या ‘अस्तित्वाचीही’ साक्ष देतात!… 

साधारणपणे ४२-४३ वर्षांपूर्वी, याच महालक्ष्मीचा प्रसाद घेऊन, मी माझे गुरू, ‘पद्मश्री’ पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडे जात असे.

‘भारतरत्न’ लतादीदींना खास भेटून मी हा प्रसाद देत असे. असंच एकदा दीदींना भेटल्यावर हा प्रसाद देत मी म्हटलं, “आज मला दोन महालक्ष्मींचं सुंदर दर्शन झालं.. !” हे ऐकल्यावर दीदी जोरात, खळखळून हसल्या आणि म्हणाल्या, “मी महालक्ष्मी नाही काही… , मी ‘कडकलक्ष्मी’ आहे!” दीदींची विनोदबुद्धी अफाट होती! तशीच महालक्ष्मीवरील श्रद्धाही!

विशाल अरबी समुद्राच्या एका छोट्याश्या काठावर वसलेल्या या मंदिरात गाताना, मला अपार आनंद मिळे! साथीला समुद्राच्या लाटांचा तानपुऱ्यासारखा ‘लयबद्ध नाद’ मला साथ करीतसे. देवीची महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशी तिन्ही सुंदर रूपं, मी हृदयात साठवत असे! 

एकदा तिथल्या पुजार्‍यांनी, पूजा केलेला तिन्ही देवींचा एकत्र फोटो, माझं गाणं ऐकून मला दिला होता, जो आजही आईच्या देव्हाऱ्यात पूजला जात आहे.

आई मला बालपणापासून सांगे की, ‘या महालक्ष्मी, महाकाली, आणि महासरस्वतीचा मिलाप म्हणजेच स्त्री शक्ती! स्त्रीमध्ये ही तीनही रूपं सामावलेली आहेत. ’

यातली महालक्ष्मी म्हणजे सुखसंपत्ती आणि वैभवाचं रूप आहे. ही अतिशय शांत, प्रसन्न, प्रेमळ आणि नेहमीच ऊर्जा देणारी आहे.

दुसरी महाकाली – हे समाजाला अत्यंत उपयुक्त असं रूप आहे. ही महाकाली समाजकंटक, गुंडप्रवृत्ती आणि दुष्टांचा नायनाट करणारी महिषासुरमर्दिनी आहे, जी स्त्रियांविरुद्धच्या अन्यायाला चिरडून टाकते. तिच्यातील रौद्ररूप आणि त्वेष आपल्याला मदत करतात. ती शक्तीशाली, बलशाली आणि कणखरही आहे. चांगलं काम करण्याससुद्धा ती प्रवृत्त करणारी आहे.

आणि तिसरी म्हणजे महासरस्वती – ही तर आम्हां कला – सारस्वताचं सुंदर रूप आहे, आमचं दैवतच आहे. तिची अमृतवाणी मोहिनी घालणारी आहे. ही वीणापुस्तकधारिणी आहे. त्या पुस्तकातलं ज्ञान आणि विद्या देणारी आहे. तिचं रूप मोहक आणि लोभसवाणं आहे.

संगीत हा आम्हां कलाकारांना परमेश्वराशी जोडले जाण्याचा सोपा मार्ग आहे. तो सर्वांत जवळचा दुवा आहे. ते एक प्रकारचं मेडिटेशन आहे.

माझ्या आयुष्यातल्या तीन महत्त्वाच्या स्त्रिया, ज्यांनी मला खऱ्या अर्थाने घडवलं, त्या म्हणजे – थोर विदुषी स्वातंत्र्य सेनानी दुर्गाबाई भागवत! त्यांनी मला संगीतकार बनवलं. त्यांचं – माझं नातं म्हणजे आजी नातीचंच जणू! अत्यंत प्रेमळ असलेल्या या दुर्गा आजीचं आणीबाणीच्या काळात, अन्यायाविरुद्ध लढणार्‍या दुर्गा देवीचंच, कणखर रूप पाहायला मिळालं. अशा महान स्त्रीचा सहवास घडणं हे माझं सद्भाग्यच! 

दुसरी स्त्री महासरस्वती – म्हणजे लतादीदी! माझ्या सांगीतिक कारकीर्दीच्या सुरुवातीलाच, अमेरिकेतील पत्रकारांनी लतादीदींना ‘Is there any other voice ranking alongside you?’ असं विचारल्यावर, लतादीदींनी क्षणाचाही विलंब न करता, “Padmaja is extremely talented with an outstanding voice and she is my hope!” असं स्वच्छ सांगून, त्यांनी माझ्याकडून ‘निवडुंग’ चित्रपटासाठी ‘केव्हातरी पहाटे’ आणि लवलव करी पातं’ सारखी आव्हानात्मक गाणी गाऊन घेऊन, माझ्या पंखांत गरूडभरारीचं बळच भरलं! हेही माझं भाग्यच! 

आणि तिसरी स्त्री म्हणजे माझी आई – शैलजा – महालक्ष्मीचं रूप! जिच्यामुळे आयुष्यभर मी संगीतातूनच सरस्वतीची आणि महालक्ष्मीची पूजा करत आहे, साधना करत आहे. आत्म्याच्या निकट असणारी एकमेव गोष्ट म्हणजे बुद्धी! ही बुद्धिदेवता- महालक्ष्मी आपल्याला संस्कार आणि समृद्धी देते! 

जिनं माझं आयुष्य संस्कारमय आणि सुखसमृद्धीमय केलं, मला घडवलं, त्या माझ्या आई शैलजाप्रमाणेच, ही महालक्ष्मीही, माझ्या ‘आई’चंच रूप आहे!

या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता|

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:||

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “== कान ==” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “== कान ==” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

गणपतीला शूर्पकर्ण का म्हणतात माहिती आहे का? तर त्याचे कान सूपासारखे आहेत म्हणून आणि डोळे का बरं बारीक? सगळं बारकाईने पहाता यावे म्हणून. माणसानेही नेहमी कमी बोलावं जास्त ऐकावं बारकाईने पहावं आणि सगळं डोक्यात ठेवावं. प्रवचन चालू होते आणि अचानक कानठळ्या बसणार्‍या आवाजाने तिकडे कान टवकारले गेले.

बाहेर येऊन पाहिले तर काय अंगणात एका मुलाने दुसर्‍याच्या कानाखाली आवाज काढला म्हणून दुसर्‍यानेही पहिल्याच्या कानशिलात वाजवली होती.

कारण काय जाणून घ्यायच्या आतच त्यांचा आवाज ऐकू येत होता.

रागाने कानातून धूर निघत होता. आणि पहिला विचारत होता या कानाचे त्या कानाला कळू न द्यायची गोष्ट कानोकानी खबर लागत दूरवर गेलीच कशी? 

अरे भिंतीला कान असतात रे बाबा. तर तर म्हणे भिंतीला कान असतात तूच लावत असशील भिंतीला कान. त्यावर दुसर्‍याने कानावर हात ठेवले. * म्हणाला तुझेच कोणीतरी *कान फुंकलेले दिसताहेत. आता नीट कान देऊन म्हण किंवा कान उघडे ठेऊन ऐक ••• 

कितीही कानी कपाळी ओरडले तरी कानामागून यायचे आणि तिखट व्हायचे जगाचा नियमच आहे.

तेवढ्यात आई तेथे आली आणि म्हणाली माझ्या कानावर आले ते खरे आहे तर! तुमचे कान फुटले नाहीत हे मला माहित आहे. म्हणून दोघांचीही कानउघाडणी करणार आहे. काहीही झालं तरी मारामारीवर उतरायचं नाही. समजलं? वाईट सगळे या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायचे असते हा कानमंत्र म्हणून काळजावर कोरायचा असतो. हे कान पिरगळून सांगितले. परत मारामारी केली तर कान लांब करीन बरका म्हणून धमकी दिली. शिक्षा म्हणून कान धरायला सांगितले. आईनेच कान टोचलेले दोघांच्याही ध्यानात रहाणार होते.

शेवटी आई ती आईच! ती कान उपटू शकते, कानाखाली जाळही काढू शकते आणि कानात तेलही घालू शकते हे मुलांना कळल्यामुळे मुलांनी लगेच कान धरून माफी मागितली आणि त्यांचे परत सुत जुळले.

आता तुम्ही कान समृद्ध करा….

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “भारतीय नवदर्शनांतील नास्तिक दर्शनांचे वेगळेपण” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “भारतीय नवदर्शनांतील नास्तिक दर्शनांचे वेगळेपण☆ श्री जगदीश काबरे ☆

भारतीय दर्शनशास्त्रात एकूण नऊ दर्शने आहेत ज्यांना “नवदर्शने” असेही म्हणतात. ही नऊ दर्शने आणि त्यांचे सूत्रकर्ते ऋषी खालीलप्रमाणे आहेत:

  1. न्याय दर्शन (न्यायशास्त्र)-महर्षी गौतम
  2. वैशेषिक दर्शन (वैशेषिकशास्त्र)-महर्षी कणाद
  3. सांख्य दर्शन (सांख्यशास्त्र)-महर्षी कपिल
  4. योग दर्शन (योगशास्त्र)-महर्षी पतंजलि
  5. मीमांसा दर्शन (मीमांसाशास्त्र)-महर्षी जैमिनि
  6. वेदांत दर्शन (वेदांतशास्त्र)-महर्षी व्यास (बादरायण)
  7. चर्वाक दर्शन (चर्वाकशास्त्र)-महर्षी बृहस्पति
  8. बौद्ध दर्शन (बौद्ध मतशास्त्र)- गौतम बुद्ध
  9. जैन दर्शन (जैन मतशास्त्र)- आदिनाथ आणि महावीर

ही नऊ दर्शने प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानातील विविध वैचारिक शाखांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामध्ये वास्तविकता, ज्ञान, धर्म, नैतिकता, आणि मुक्ती या विषयांवर विविध दृष्टीकोनांनी विस्तृतपणे विवेचन केलेले दिसते. या महर्षींना प्रत्येक दर्शनाचे सुत्रकर्ते म्हणतात. कारण त्यांनी त्या त्या दर्शनीक तत्त्वज्ञानाचे मूलभूत सिद्धांत सुत्रबद्ध केले. याचा अर्थ या दर्शनांमधील विचार या ऋषींच्या आधीही अनेक वर्षे अस्तित्वात होतेच. त्या विचारांना संकलित करून एकत्रितपणे सूत्रबद्ध करून त्या ऋषींनी त्यांची मांडणी केली म्हणून त्यांना त्या त्या दर्शनाचे सूत्रकर्ते संबोधले जाते.

भारतीय दर्शनशास्त्रातील नऊ दर्शने ही आस्तिक आणि नास्तिक या दोन वर्गात विभागली जातात:

आस्तिक दर्शने (६):

  1. न्याय दर्शन
  2. वैशेषिक दर्शन
  3. सांख्य दर्शन
  4. योग दर्शन
  5. मीमांसा दर्शन
  6. वेदांत दर्शन

नास्तिक दर्शने (३):

  1. चर्वाक दर्शन
  2. जैन दर्शन
  3. बौद्ध दर्शन

लक्षात घ्या, येथे आस्तिक आणि नास्तिक या शब्दांचा आज आपण जो अर्थ गृहीत धरतो आहोत तो नाहीये. आज आपण ढोबळमानाने आस्तिक म्हणजे ‘देव मानणारे’ आणि नास्तिक म्हणजे ‘देव न मानणारे’ असा अर्थ घेतो. पण

आस्तिक दर्शने वेदांच्या अधिकारित्वाला मान्यता देतात, तर नास्तिक दर्शने वेदांच्या अधिकारित्वाला मान्यता देत नाहीत. याचा अर्थ ‘वेद मानणारे’ ते आस्तिक आणि ‘वेद न मारणारे’ ते नास्तिक असा आहे.

~~~

सांख्य दर्शन हे जरी अस्तिक दर्शनात घेतलेले असले तरीही सांख्यदर्शन हे एक असे दर्शन आहे जे वेदांच्या अधिकारित्वाला मान्यता देते, परंतु ते आत्मा, पूर्वजन्म आणि पुनर्जन्म या संकल्पनांना वेगळ्या प्रकारे मानते. सांख्यदर्शनात, पुरुष (आत्मा) आणि प्रकृति (निसर्ग) या दोन मूलभूत तत्वांचे अस्तित्व मानले जाते. पुरुष हे ज्ञानाचे स्वरूप आहे, तर प्रकृति ही विश्वाची उत्पत्ती आणि विकासाचे कारण आहे. सांख्यदर्शनात पुनर्जन्माची संकल्पना नाही, परंतु ते आत्म्याच्या अस्तित्वाला मान्यता देते. आत्मा हा पुरुष स्वरूपाचा असतो आणि तो प्रकृतीच्या प्रभावाखाली येत नाही. ते वेदांच्या अधिकारित्वाला मान्यता देते आणि ईश्वराचे अस्तित्व मान्य करते. म्हणून सांख्यदर्शन आस्तिक आहे. परंतु त्याची ईश्वराची संकल्पना वेगळी आहे. सांख्यदर्शनात ईश्वर हा निर्गुण आणि निराकार मानला जातो. अशाप्रकारे सांख्यदर्शनाचे तत्वज्ञान इतर आस्तिक दर्शनांपेक्षा वेगळे आहे.

~~~

जैन आणि बौद्ध दर्शने पुनर्जन्म आणि मोक्ष मानतात, परंतु ती नास्तिक दर्शने मानली जातात कारण ती वेदांच्या अधिकारित्वाला मान्यता देत नाहीत. जैन आणि बौद्ध दर्शने वेदांच्या अपौरुषेयत्वाला (दैवी उत्पत्ती) मान्यता देत नाहीत. त्याऐवजी त्यांनी त्यांचे एक वेगळे स्वतंत्र तत्वज्ञान तयार केलेले आहे. जैन आणि बौद्ध दर्शने पुनर्जन्म आणि मोक्ष मानतात, परंतु त्यांच्या स्वतंत्र तत्वज्ञानातून.

~~~

बौद्ध दर्शनाच्या तत्त्वज्ञानात आत्म्याला कुठेही जागा नाही. त्यामुळे आत्मा अमर आहे ही त्यांच्या लेखी खुळी समजूत आहे. त्यांचा पुनर्जन्म हा चैतन्याच्या प्रवाहाच्या स्वरूपात असतो आणि मोक्षाला त्यांनी निर्वाण म्हणजेच मुक्ती म्हटले आहे. बौद्धांनुसार पुनर्जन्म हा आत्म्याचा पुनर्जन्म नाही, तर शरीर आणि मनाच्या संयोगाचा पुनर्जन्म आहे.

बौद्ध दर्शनात पुनर्जन्माचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे:

  1. अनात्मवाद: बौद्धांनुसार आत्मा हा एक अविनाशी आणि अनंत असा वास्तविक तत्व नाही. त्याऐवजी, शरीर आणि मन हे क्षणिक आणि बदलणारे आहेत.
  2. प्रतीत्यसमुत्पाद: बौद्धांनुसार पुनर्जन्म हा कारण आणि परिणाम (कर्म) यांच्या आधारे ठरवला जातो. प्रत्येक कृतीचे परिणाम त्याच्या भविष्यातील जन्मांवर परिणाम करतात.
  3. विज्ञान: बौद्धांनुसार पुनर्जन्म हा विज्ञानाच्या आधारे ठरवला जातो, ज्यामध्ये मनाची अवस्था आणि कर्माचे परिणाम यांचा समावेश होतो.
  4. संस्कार: बौद्धांनुसार पुनर्जन्म हा संस्कारांच्या आधारे ठरवला जातो. बौद्ध पुनर्जन्माचे उद्दिष्ट म्हणजे निर्वाण प्राप्त करून दुःखाच्या चक्रातून मुक्ती करून घेणे होय. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या पुस्तकामध्ये निर्वाण या शब्दाचा अर्थ सदाचारी म्हणजेच निर्दोष जगणे असा घेतलेला आहे. त्यामुळे जिवंतपणीच माणूस निर्वाणपदाला पोहोचू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

बुद्ध दर्शनात मात्र मोक्षाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे. मोक्ष म्हणजे:

  1. दुःखाच्या चक्रातून मुक्ती: बुद्धांनुसार मोक्ष म्हणजे दुःखाच्या चक्रातून मुक्ती करून घेणे, ज्यामध्ये जन्म, मृत्यू, आणि पुनर्जन्म यांचा समावेश होतो.
  2. निर्वाण: मोक्ष म्हणजे निर्वाण प्राप्त कराणे म्हणजे दुःखाच्या मूळ कारणांचा नाश करणे होय.
  3. तृष्णा (वासना) मुक्ती: मोक्ष म्हणजे तृष्णा (वासना) मुक्ती करून घेणे, ज्यामुळे व्यक्ती दुःखाच्या चक्रातून बाहेर पडते.
  4. शांती आणि समाधान: मोक्ष म्हणजे शांती आणि समाधानाची स्थिती प्राप्त करून, ज्यामध्ये व्यक्ती स्थिर आणि शांत राहते.

बुद्धांच्या मोक्षाचा मार्ग हा अष्टांग मार्ग (आठ सूत्रे) आहे, ज्यामध्ये योग्य दृष्टीकोन, योग्य संकल्पना, योग्य वचन, योग्य कृती, योग्य जीवन, योग्य प्रयत्न, योग्य स्मृती, आणि योग्य समाधान यांचा समावेश होतो. हा अष्टांग मार्गच बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या निर्वाणासंबंधित विचारात घेतलेला आहे.

~~~ 

जैन धर्मात आत्म्याची संकल्पना मानली जाते. जैनांनुसार आत्मा हा एक अविनाशी आणि अनंत असे एक वास्तविक तत्व आहे, जे शरीरात वास करते. म्हणून जैन दर्शनात आत्म्याला “जीव” असे म्हटले जाते. जीव हे एक स्वतंत्र असे तत्व असून ते शरीरापासून वेगळे आहे. जीवाचे अस्तित्व शरीराच्या जन्मापूर्वी आणि शरीराच्या मृत्यूनंतरही असते.

जैनांनुसार जीवाचे मुख्य गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत:

  1. चेतना: जीव हा चेतन असतो आणि त्याला अनुभव आणि ज्ञान असते.
  2. अविनाशी: जीव हा अविनाशी असतो म्हणून त्याचा नाश होत नाही.
  3. अनंत: जीव हा अनंत असतो आणि त्याचे अस्तित्व विश्वाच्या सर्व भागात आहे.
  4. स्वतंत्र: जीव हा स्वतंत्र असतो आणि त्याचे अस्तित्व शरीरापासून वेगळे आहे.

जैन धर्मात आत्म्याच्या संकल्पनेचा महत्वाचा भाग म्हणजे त्याचा कर्माशी असलेला संबंध. जीवाचे कर्म हे त्याच्या कृतींचे परिणाम आहेत जे त्याच्या भविष्यातील जन्मांवर परिणाम करतात. जैनांनुसार आत्म्याची मुक्ती कर्मांच्या बंधनातून मुक्त होऊन आणि मोक्ष प्राप्त करून शक्य आहे. त्यालाच ते कैवल्यानंद असे म्हणतात.

~~~

या सर्व नास्तिक दर्शनाहून वेगळे आहे ते चार्वाक दर्शन. ते इहवादी दर्शन असून तर्काधिष्टीत आहे. म्हणून चार्वाकांना विज्ञानवादी दृष्टिकोनाचे प्रवर्तक म्हणतात. चार्वाक दर्शनाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  1. भौतिकवाद: चार्वाक दर्शन हे भौतिकवादी तत्वज्ञान आहे, ज्यामध्ये भौतिक जगाच्या अस्तित्वाला मान्यता दिली जाते.
  2. नास्तिकवाद: चार्वाक दर्शन हे नास्तिक तत्वज्ञान आहे, ज्यामध्ये वेद, ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म, आणि मोक्ष या संकल्पनांना मान्यता दिली नाही.
  3. इंद्रियवाद: चार्वाक दर्शनात इंद्रियांना महत्वाचे स्थान आहे, आणि त्यांनी इंद्रियांच्या अनुभवाला मान्यता दिली. म्हणून त्यांचा प्रत्यक्ष प्रमाणावर भर असतो.
  4. वेदविरोध: चार्वाक दर्शनात वेदांच्या अधिकारित्वाला मान्यता दिली नाही, आणि त्यांनी वेदांच्या अधिकारित्वाला नकार दिला.
  5. सुखवाद: चार्वाक दर्शनात सुखाला महत्वाचे स्थान आहे, आणि त्यांनी सुखाच्या अनुभवाला मान्यता दिली.
  6. ईश्वरविरोध: चार्वाक दर्शनात ईश्वराच्या अस्तित्वाला मान्यता दिली नाही.
  7. आत्मविरोध: चार्वाक दर्शनात आत्म्याच्या अस्तित्वाला मान्यता दिली नाही.
  8. पुनर्जन्मविरोध: चार्वाक दर्शनात पुनर्जन्माच्या संकल्पनेला मान्यता दिली नाही.
  9. मोक्षविरोध: चार्वाक दर्शनात मोक्षाच्या संकल्पनेला मान्यता दिली नाही. त्यामुळे जे काही भोगायचे आहे ते या जन्मातच असे त्यांचे तत्त्व आहे.

या विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की, वरील सर्व नास्तिक दर्शनांमध्ये खऱ्या अर्थाने चार्वाक दर्शन हेच एकमेव नास्तिक दर्शन आहे. जर चार्वकांची विचारसरणी भारतीयांनी उचलून धरली असती तर विज्ञान क्षेत्रात भारताने त्याकाळी जी भरारी मारली होती त्यापेक्षा आज भारत जगात कितीतरी पुढे असता. कारण दहाव्या शतकापूर्वी आयुर्वेद, रसायन, वैद्यक, शिल्प इत्यादी विषयांवर इथे अभ्यास पूर्ण ग्रंथरचना झाली होती. भूमिती, व्याकरण, कला यांचाही समावेश त्यात होता. पण नंतर समाज योगधारणा, भक्तीमार्ग, मोक्षसाधना, परलोक, मृत्यूनंतर जीवन यामागे लागला. त्यातून भारतीयांचा निराशावादी दृष्टिकोन वाढीस लागला तसे विज्ञान आणि वैचारिक विचार मागे पडत गेले आणि भारताची अधोगती सुरू झाली. आणि आजही बाबांच्या सत्संगाला भरणारी गर्दी पाहून यात फारसा बदल झालेला आहे असे वाटत नाही. हे जर बदलायचे असेल तर सातत्याने समाजाचे प्रबोधन करण्याची गरज आहे, प्रश्न विचारण्याचे धाडस निर्माण करण्याची गरज आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून जगण्याची गरज आहे. तसेच चार्वाकांच्या विचारसरणीचा पुन्हा एकदा साकल्याने विचार करण्याची गरज आहे.

☘️☘️

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आपल्या झाेपेचा साैदा… — लेखक – पत्रकार विकास शहा ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? विविधा ?

आपल्या झाेपेचा साैदा… — लेखक – पत्रकार विकास शहा ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

याच वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातली घटना. बंगलोरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स म्हणजेच निमहान्स या संस्थेत एका २६ वर्षाच्या बेरोजगार तरुणाने स्वतःला व्यसनमुक्तीसाठी दाखल करून घेतलं. या तरुणाला कशाचं व्यसन होतं.. ? तर नेटफ्लिक्सवरच्या निरनिराळ्या सीरिअल्स आणि सिनेमे बघण्याचं.

हा तरुण दिवसाचे जवळपास ८ तास २९ मिनिटं सलग नेटफ्लिक्स बघण्यात घालवत होता. निमहान्स संस्थेने या तरुणाला व्यसनमुक्तीसाठी दाखल करून घेतलं आहेच. शिवाय महत्वाचं म्हणजे नेटफ्लिक्सच्या व्यसनाची नोंद झालेली जगातली ही पहिली केस मानली जाते. जगभर नेटफ्लिक्सच्या व्यसनाबद्दल जोरदार चर्चा सुरु झाली असली तरी सलग नेटफ्लिक्स बघण्याचा, त्याचा जागतिक कालावधी ६ तास ४५ मिनिटांचा आहे. या तरुणाचं नेटफ्लिक्स बघण्याचं ८ तास २९ मिनिटं हे प्रमाण गेले ६ महिने असल्यामुळे अर्थातच त्याची रवानगी व्यसनमुक्तीसाठी करण्यात आली आहे.

ही बातमी वाचत असताना आजूबाजूचे नियमित नेटफ्लिक्स बघणारे अनेक चेहरे डोळ्यासमोर येऊन गेले. विचार करत होते इतकं सतत बघण्याचा कंटाळा येत नाही का.. ? तितक्यात काही दिवसांपूर्वी वाचलेली अजून एक बातमी आठवली. नेटफ्लिक्सचे सीईओ रीड हेस्टिंग्स यांना नेटफ्लिक्सचा सगळ्यात मोठा स्पर्धक कोण आहे.. ? असं विचारलं गेलं तेव्हा त्यांनी अगदीच अनपेक्षित उत्तरं दिलं. सर्वसाधारणपणे नेटफ्लिक्स आणि अमेझॉनमध्ये बाजार काबीज करण्यासाठी चढाओढ चालू असते. असा आपला अंदाज असतो त्यामुळे नेटफ्लिक्सचा सगळ्यात मोठा स्पर्धक अमेझॉन असं आपण गृहीत धरतो, पण रीड हेस्टिंग्सने मात्र वेगळाच विचार मांडला. ते म्हणाले, ‘झोप हा आमचा सगळ्यात मोठा स्पर्धक आहे. ’ सहज हसण्यावारी नेण्यासारखा हा मुद्दा नाहीये. स्वतःच्या घरात आणि आजूबाजूला बघितलं कि नेटफ्लिक्स कुणाशी स्पर्धा करतंय हे सहज दिसतं. घुबडासारखी रात्र रात्र जागून सिरिअल्सचे सीझन्स संपवणारी माणसं हे काही दुर्मिळ दृश्य राहिलेलं नाही. एक संपली कि दुसरी अशीच सलग बघणारेही अनेक आहेत. एका तरुण मुलाला आपण व्यसनी बनत चाललो आहोत याची जाणीव होऊन त्याने त्यातून मुक्तता मिळावी आणि आयुष्याची गाडी रुळावर यावी यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात धाव घेतली पण उरलेल्यांचं काय.. ? 

नेटफ्लिक्स, त्याचं व्यसन या सगळ्याची गुंतागुंत समजून घ्यायची असेल तर सगळ्यात आधी आपल्या मनोरंजनाच्या पद्धती बदलल्या आहेत. हेही समजून घेतलं पाहिजे. एखादी सीरिअल एकत्र बसून बघणं हा प्रकार जवळपास कालबाह्य व्हायला आला आहे. कालपर्यंत मनोरंजन हा कुटुंबाचा एकत्रित वेळ होता. लोक टीव्हीवरच्या सीरिअल्स आवडो न आवडो एकत्र बसून बघत होते. त्यामुळे त्याला काही एक मर्यादा होती. आता हातातल्या स्मार्ट फोनवर सगळंच उपलब्ध झाल्यावर मनोरंजनही ज्याच्या त्याच्या मोबाईलच्या स्क्रीन पुरतं मर्यादित झालं आहे. ‘मी काय बघते हे तू बघू नको आणि तू काय बघतोयस हे बघायला मी डोकावणार नाही. ’ असा सगळं मामला. शिवाय या सगळ्याला स्थळ, काळाचं बंधन उरलेलं नाही. अमुक एक वाजताच सीरिअल बघावी लागेल, रिपीट एपिसोड बघायचा असला तरीही अमुक एक वाजताच ही भानगडच नाही. ज्याला जेव्हा वाटेल तेव्हा बघता येण्याची सोय क्रांतिकारी असली तरी माणसांचं मनोरंजन चौकटीत कोंबून टाकणारी आहे. त्यामुळे मनोरंजनाचा आस्वाद घेण्याची पद्धतच मुळापासून बदलली आहे. त्यातलं सार्वजनिक असणं लोप पावत चाललं आहे. आणि व्यक्तिकेंद्रित मनोरंजनाकडे आपण झपाट्याने चाललो आहोत.

शिवाय नेटफ्लिक्स काय किंवा अमेझॉन काय ही माध्यमे मुक्त आहेत. अजून तरी सेंसॉरशिप लागू झालेली नाही. त्यामुळे निरनिराळ्या सीरिअल्समधले मुक्त लैंगिक व्यवहार जे सॉफ्ट पॉर्न प्रकारातले असतात, सहज बघण्याची सोय आहे. ते चांगलं कि वाईट हा निराळ चर्चेचा मुद्दा. मुळात उपलब्ध आहे हे महत्वाचं. मनोरंजन स्वतःपुरतं मर्यादित राखण्यामध्ये हाही महत्वाचा मुद्दा असतोच, नाकारून चालणार नाही.

या सगळ्याचा आपल्या झोपेवर परिणाम होतोय. नेटफ्लिक्स आज उघडपणे म्हणतंय कि त्यांची स्पर्धा माणसाच्या झोपेशी आहे. तो जितका कमी झोपेल आणि नेटफ्लिक्स बघण्यात वेळ घालवेल तितकं बरं.. ! खरंतर नेटफ्लिक्सने हे उघडपणे सांगितलं इतकंच बाकी अमेझॉन, हॉटस्टार यांचीही स्पर्धा झोपेशीच आहे. इतकंच कशाला या सगळ्या आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म आधी आलेल्या युट्युबनेही न बोलता कायम आपल्या झोपेशी स्पर्धा केली आहे. फेसबुकही तेच करतंय. झोपेतून उठत नाही तोच फेसबुक आणि व्हाट्स अँप उघडणारे अनेक असतात. मध्यरात्री अचानक उठून फेसबुक बघणार्‍यांची आणि मग त्याच तंद्रीत परत झोपणार्‍यांची संख्या वाढतेय. रात्री झोपताना तरी किमान फोनचा डाटा बंद केला पाहिजे हा विचार डाऊनमार्केट आणि कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.

रोजचा दीड जीबी डाटा ही स्वस्ताई नाहीये, त्या दीड जीबीसाठी आपण झोपेच्या निमित्ताने प्रचंड मोठी किंमत चुकती करतो आहोत. ज्याचा संबंध थेट आपल्या शारीरिक-मानसिक-सामाजिक आणि आर्थिक आरोग्याशी आहे. आपल्याला आभासी जगात एखादी गोष्ट स्वस्तात किंवा फुकट मिळते म्हणजे ती खरोखर फुकट नसते. फेसबुक वापरण्याचे खिश्यातून पैसे आपण देत नाही. नेटफ्लिक्स वापरण्याचे जे पैसे देतो त्याच्या कितीतरी पट अधिक मनोरंजन आपल्या हातात असतं, ज्यामुळे ते जवळपास फुकट आहे असं आपल्याला वाटत असतं. पण आधुनिक काळात, आभासी जगाच्या दुनियेत बाजार निराळ्या पद्धतीने पैशांची वसुली करत असतो. इथे कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही. स्वस्तातही मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत असते. मनोरंजन अधिकाधिक व्यक्तिकेंद्रित बनत चाललंय कारण सध्या सौदा आपल्या झोपेचा आहे.

आपण जितके कमी झोपणार, डिजिटल माध्यमातून मनोरंजन देणार्‍या कंपन्या तितक्याच मोठ्या होत जाणार. हे भयंकर आहे. अस्वस्थ करणारं आहे. प्रत्येकजण बोली लावतोय, माणसांची झोप कमी व्हावी यासाठी तेव्हा, आपल्या झोपेचा सौदा किती होऊ द्यायचा याचाही ज्याने त्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

 ♥ ♥ ♥ ♥ ♥

लेखक : पत्रकार विकास शहा,

तालुका प्रतिनिधि दैनिक लोकमत, शिराळा ( सांगली )

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ किमया मिरचीची…  ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? मनमंजुषेतून ?

☆ किमया मिरचीची…  ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

मिरची म्हटलं म्हणजे ठसकाच लागतो नाही का! एकेकाळी झणझणीत तिखटाला चटावलेली माझी जीभ आता या वयात मात्र नुसत्या मिरचीच्या दर्शनाने देखील होरपळून निघते. माझ्या पानापासून मिरचीने दूरच रहावे अशी मी मनोमन प्रार्थना करत असतो इतकं आता माझं आणि मिरचीचं वैर झाले आहे.

तरीही या मिरचीनेच नुकतेच माझ्यावर थोर उपकार केले, अगदी इंग्रजीत म्हणतात तसे ब्लेसिंग इन डिसगाईज!

माझ्या पानातला एवढा मोठा मिरचीचा तुकडा मला दिसला नाही हे बघताच माझा मुलगा तडक मला नेत्रविशारदाकडे घेऊन गेला. तेथे माझ्या नेत्रपटलात काही तरी गडबड झाल्याचा संशय आल्याने नेत्रपटलाची सखोल तपासणी करण्यासाठी माझूया डोळ्यात औषध घालून मला डोळे बंद करून बसविले होते.

डोळे बंद करताच संपूर्ण जग पापण्यांच्या पलिकडे गेल्यावर मात्र माझ्या मस्तकात विचारांचे मोहोळ उठले. एक डोळा तर नेत्रपटल फाटल्याने फारसे काहीच काम करू शकत नव्हता. गेली पंधरा-सोळा वर्षे मी या एकाच डोळ्याने सगळे करत होतो. हळूहळू मी वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त झालो होतो. तथापि माझे साहित्यिक लिखाण एका डोळ्याच्या आधारावर चालू होते. आता याही डोळ्याची दृष्टी अधू झाली तर मी लिहायचे कसे; शब्ददेवतेची आराधना करायची कशी? विलक्षण कासावीस झालो मी!

आणि माझ्या मनात शब्ददेवतेला उद्देशून काही विचार येऊ लागले. त्यांना मूर्तस्वरूप द्यायला मी डॉक्टर कडे कागद मागितला. त्यांना वाटले मला डोळे टिपायला कागद हवा आहे. मात्र मी माझा हेतू सांगताच त्यांनी मला डोळे उघडता येणार नाहीत याची आठवण करून दिली.

अन् मी तशाच बंद डोळ्यांनी शब्ददेवतेला उद्देशून काव्य रचून कागदावर लिहिले. ते तुमच्यासाठी सादर करीत आहे.

☆ शब्ददेवते… ☆

शब्ददेवते रुसू नको गे अपुल्या भक्तावरी

लीन दीन मी शरण पातलो तुझिया चरणांवरी ||ध्रु|

*
कुवत जशी मी सजवीत आलो अलंकार चढवुनी 

कथा कविता कादंबरीना नटविले रूपांनी

अगतिक झालो वयोपरत्वे दृष्टी झाली अधुरी

लीन दीन मी शरण पातलो तुझिया चरणांवरी ||१||

*

सादाविले तुम्हाला येता ओथंबुन भाव मना

निराश कधी न केले माझ्या भावभावनांना

असे कसे मी सांडू माझ्या कवीकल्पनांना 

लीन दीन मी शरण पातलो तुझिया चरणांवरी ||२||

*

देवी शारदे कृपा करावी जागृत ठेवी कविता 

अमर करी मम साहित्याला देऊनिया शाश्वता

सारे सोडून गेले तरीही ते पावो अक्षरा

लीन दीन मी शरण पातलो तुझिया चरणांवरी ||३||

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तोंडी लावणं ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? मनमंजुषेतून ?

तोंडी लावणं ! 😅 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

मंडळी लेखाचं शीर्षक परत एकदा नीट वाचा ! ते “तोंडी लावणं” असं आहे, “तोंडी लागणं” असं नाही, हे कृपया ध्यानात घेऊन पुढे वाचा, लेख पूर्ण वाचणार असलात तर, 😅 म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही ! “तोंडी लागणं” हा दुसऱ्या स्वतंत्र लेखाचा विषय असू शकतो, हे आपण सूज्ञ असल्यामुळे, कोणाच्याही तोंडाला न लागता, नक्कीच मान्य कराल. तर त्या “तोंडी लागण्यावर” पुन्हा कधीतरी, पण ते सुद्धा आपण तशी इच्छा प्रकट केली तरच, बरं का ! 😅 नाहीतर मला स्वतःला कोणाच्या(ही) तोंडाला स्वतःहून लागायची सवय अजिबातच नाही, याची खात्री असू दे ! असो !

“चल रे, पटापट पोळी खाऊन घे ! शाळेत जायला आधीच उशीर झालाय. ” आईच असं फर्मान आल्यावर, “तोंडी लावायला काय आहे गं ?” असा प्रश्न लहानपणी आपल्या तोंडून निघाल्याचे, माझ्या पिढीतील लोकांना नक्की आठवेल ! त्यावर “भाजी अजून शिजत्ये, तुला गूळ तूप देवू का ?” असं म्हणून आई गरम गरम पोळीवर लोणकढ तूप घालून, वर गुळाचा चुरा घालत असे !

आमच्या काळी “तोंडी लावण्याचे” सतराशे साठ वेगवेगळे प्रकार होते आणि त्यातला एक जरी प्रकार जेवतांना असला म्हणजे झालं, त्यावर आमचं अख्ख जेवण होतं असे! नुसत्या मेतकूटात दही घाला, लसणीच्या तिखटात दही घाला नाहीतर तिळकुटावर तेल घ्या, “तोंडी लावणं” तयार ! आणि सोबत जर भाजलेला, तळलेला नाही बरं, पोह्याचा किंवा उडदाचा पापड असेल तर काय, सोन्याहून पिवळं! मग त्या दिवशी दोन घास जास्तच जायचे ! कधीतरी नुसतं गावच्या कुळथाच पिठलं पण जेवणाची बहार उडवून जायचं ! जेवतांना तांदूळ किंवा बाजरीची भाकरी असेल तर त्याच्या बरोबर कांदा ठेचून, कापून नाही आणि नाका डोळ्यातून पाणी आणणारी फोडणीची मिरची असली की काम तमाम. त्यातून ती मिरची गेल्या वर्षीची चांगली मुरलेली असेल, तर मग त्या मिरचीतली चढलेली मोहरी त्याचा अनोखा स्वाद, डोळ्यातून पाणी आणि तिचा ठसका दाखवल्याशिवाय रहात नसे ! अचानक रात्री अपरात्री कोणी पाहुणा आला आणि तो जेवायचा असेल, तर आईचा दहा मिनिटात मस्त पिठलं आणि भात तयार ! पाहुणा पण पिठलं भात खाऊन वर मस्त ताक पिऊन खूष व्हायचा ! पिकलेलं मोठ केळ आणि गरम पोळी यांची चव, ज्यांनी हा प्रकार खाल्ला आहे त्यांनाच कळेल ! इतकंच कशाला, गरमा गरम पोळी बरोबर वर म्हटल्या प्रमाणे तूप गूळ किंवा तूप साखर म्हणजे जणू स्वर्ग सुख ! सासुरवाडी गेल्यावर खाल्लेली सासूबाईंच्या हातची दारातल्या टाकळ्याची किंवा शेगटाच्या पाल्याची पौष्टिक भाजी, यांची चव अजून जिभेवर आहे मंडळी ! कधीतरी गावच्या आमसुलाच, नारळाच्या दुधात बनवलेलं सार किंवा रात्रीच्या ताकाची मस्त गरमा गरम कढी, आहाहा ! आणि जर त्या कढीत भजी असतील, तर मग काय विचारायलाच नको ! त्या काळी नुसती मुळ्याची, गाजरची किंवा काकडी टोमॅटोची कोशिंबीर सुद्धा जेवणाची खुमारी वाढवत असे !

तर हा “तोंडी लावणं” काय प्रकार आहे, हे माझ्या पिढीतील लोकांना माहित असला आणि त्यांनी तो माझ्या प्रमाणे चाखला असला, तरी आताच्या नवीन पिढीला हे पचनी पडायला थोडं जडच ! त्यांच्या भाषेत या “तोंडी लावण्याला” हल्ली “साईड डिश” का असंच काहीतरी म्हणतात म्हणे ! त्यात पुन्हा काहींचे चोचले असतातच. म्हणजे पोळी बरोबर एकच सुख्खी भाजी चालत नाही त्यांना, दुसरी कुठली तरी एक रस्सा भाजी लागतेच लागते ! आणि आपण जर म्हटलं, “की अरे आमटी आहे ना, मग ती खा की पोळी बरोबर. ” त्यावर वरकरणी हसत “अहो आमटी भातावर घेईन की” असं उलट आपल्यालाच ऐकायला लागतं !

पण आता, गेले ते दिन गेले, असं म्हटल्या शिवाय माझ्या समोर काहीच पर्याय नाही मंडळी ! आता कसं आहे ना, बेचाळीस वर्ष सुखाचा संसार करून सुद्धा, स्वतःच्या बायकोला, आज आमटी किंवा भाजी बिघडली हे सांगण्याचं धारिष्टय होतं नाही माझं ! 😞 तुमची पण कमी जास्त प्रमाणात हीच अवस्था असणार, पण आपण ती कबूल करणार नाही, याची मला खात्री आहे ! पण ते आपल्या बायकोला आडवळणाने कसं सांगायचं, याच माझं एक गुपित आज मी तमाम नवरे मंडळींच्या फायद्यासाठी उघड करत आहे, ते लक्ष देऊन वाचा आणि वेळ आली की त्याचा उपयोग जरूर करा, हा माझा सगळ्या नवरे मंडळींना मित्रत्वाचा सल्ला ! 🙏

आज काल पुण्या मुंबईत बारा महिने चकली किंवा कडबोळी उपलब्ध असतात. हल्ली या पदार्थांचा दिवाळी ते पुढची दिवाळी हा अज्ञातवास आता संपला आहे ! 😅 त्यामुळे आपल्या आवडत्या दुकानातून, पुण्यात असाल तर कुठून हे सांगायची गरज नाही 😅 पण मुंबईकर आणि त्यात दादरकर असाल तर खूपच चांगले ऑपशन्स तुम्हांला available आहेत ! तर अशा एखाद्या आपल्या आवडत्या दुकानातून, एक एक चकली आणि कडबोळीचे पॅकेट घरी आणून ठेवा. ज्या दिवशी आमटी किंवा भाजी थोडी बिघडली आहे, असं जेंव्हा आपल्याला वाटेल तेंव्हा, “अगं, परवा मी ते चकलीच पाकीट आणलं आहे बघ, त्यातल्या दोन चकल्या दे जरा” असं अत्यन्त नम्रपणे बायकोला सांगावं ! आणि ती चकली किंवा कडबोळी भातात आमटी किंवा भाजी बरोबर खुशाल चूरडून खावी ! मंडळी मी छातीठोकपणे तुम्हांला सांगतो, त्या दिवशी भाजी किंवा आमटी बिघडली आहे हे आपण विसरून जाल आणि दोन घास जास्त खाऊन मला मनोमन धन्यवाद द्याल, याची मला 100% खात्री आहे ! 😅

शेवटी, तुमच्या सगळ्यांवर आणि अर्थात माझ्यावर सुद्धा 😅 अशी स्वतःच्या बायकोकडे वारंवार, जेवतांना चकली किंवा कडबोळी मागण्याची वेळ येऊ देवू नकोस, हिच खऱ्या “अन्नपूर्णा देवीला” प्रार्थना !

रसना देवीचा विजय असो !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वैय्याकरणी यास्मिन शेख ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

वैय्याकरणी यास्मिन शेख ☆ सौ. मंजिरी येडूरकर

“भाषेला धर्म नसतो. भाषेला जात नसते. मराठी माझी मातृभाषा आहे. माझं माझ्या भाषेवर जीवापाड, नितांत प्रेम आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्रात जन्मलेल्या, वास्तव्य करणाऱ्या प्रत्येकाची आहे. ” हे शब्द आहेत जन्माने ज्यू, लग्नाने मुसलमान, तरी मराठी भाषेवर नितांत प्रेम असणाऱ्या यास्मिन शेख यांचे! नितळ गोरा रंग, मृदू स्वभाव, स्वच्छ सुंदर मराठी शब्दोच्चार, नखशिखांत महाराष्ट्रीयन संस्कृतीशी एकरूप झालेलं व्यक्तिमत्त्व! 

त्यांचे मूळ नाव जेरूशा रूबेन. त्यांचे वडील जॉन रूबेन हे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला होते. त्यांच्यासारख्या बदल्या व्हायच्या पण त्या महाराष्ट्रातच झाल्या. त्यांचे नाशिकला स्वतःचे घर होते. त्यांची मुलगी, जेरुशा रूबेन, कॉलेज शिक्षणासाठी पुण्याला आल्या व परशुराम महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने बी. ए. उत्तीर्ण झाल्या. त्यांना एम. ए. साठी फेलोशिप मिळाली पण तब्येतीच्या तक्रारीमुळे त्या नाशिकला परत गेल्या. तेथे वसंत कानेटकरांची ओळख झाली. त्यांनी अगदी एम. ए. च्या अभ्यासासाठी कोणती पुस्तके हवी हे सांगण्यापासून त्यांना सर्वच बाबतीत मार्गदर्शन केले. कानेटकरांच्या मुळे परिचित झालेल्या एका तडफदार देखण्या पुरुषाशी मैत्री झाली व तिचे रूपांतर विवाहात झाले. आणि त्या यास्मिन शेख झाल्या. हा प्रवास तसा सोपा नव्हता कारण हिंदू -मुस्लिम पेक्षा ज्यू -मुस्लिम हा भेद भयावह होता. दोन्ही कुटुंबे सुधारक विचारांची, उदारमतवादी, सुशिक्षित असल्यामुळे दोघांच्या घरातून विरोध नव्हता. जेरुशाला धर्मांतरासाठी कोणीही आग्रह धरला नाही त्यामुळे त्या ज्यूच राहिल्या.

एम. ए. नंतर औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात काही वर्षे अध्यापनाचे कार्य केले. पुढे 28 वर्षे सायन येथे S. I. S. महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले. त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या. श्री. पु. भागवतानी प्रभावी अध्यापन करावयाचे असेल तर आधुनिक भाषाशास्त्र शिकण्याचा सल्ला दिला तो त्यांनी लगेच मान्य करून डेक्कन कॉलेजमधल्या या विषयासाठी प्रवेश घेतला. मराठी साहित्यातील सौंदर्याबद्दल, शुद्धतेबद्दल बोलणाऱ्या श्री. म. माटे यांच्या त्या आवडत्या विद्यार्थिनी होत्या. कदाचित त्यामुळेच त्यांना मराठी व्याकरणात गोडी निर्माण झाली. भाषेकडे व्यापक नजरेने पाहण्याची दृष्टी लाभली. त्याबरोबर त्यांना ‘ मौज ‘ च्या श्री. पु. भागवत यांच्याकडे काम करण्याची संधी मिळाली. भानू काळे संपादक असणाऱ्या ‘ अंतर्नाद ‘ या मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून त्यांनी पंधरा वर्षे काम केले. मुंबई येथील नियतकालिकातून वर्तमानपत्रातून ‘भाषा सूत्र ‘ हे मराठी भाषेच्या भाषेतील त्रुटींवर सदर चालवले. बालभारतीच्या मराठी पुस्तकाचे सात वर्षे संपादन केले. एस. आर. एस. महाविद्यालयात सहा वर्षे मराठी विभाग प्रमुख म्हणून काम केले. निवृत्तीनंतरही दहा वर्षे त्या आयएएस च्या विद्यार्थ्यांना शिकवीत होत्या. दरम्यानच्या काळात ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ व ‘मराठी शब्द लेखन कोश’ अशा दोन ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना डॉक्टर अशोक केळकर ‘भाषा अभ्यासक’ पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल जो समारंभ झाला त्यावेळी ज्येष्ठ लेखक व संपादक भानू काळे यांनी त्यांच्यावरील ‘ यास्मिन शेख – मूर्तिमंत मराठी प्रेम ‘ या गौरव ग्रंथाचे संपादन केले आहे. उत्तुंग व दिव्य व्यक्तिमत्व लाभलेल्या, परिपूर्णतेचा ध्यास असणाऱ्या, निर्मळपणा, शिस्त, बुद्धिमत्ता, परिश्रम करण्याची ताकद असणाऱ्या यास्मिन यांनी स्वतःच्या विकासाबरोबरच अनेकांना सावली दिली.

यास्मिन यांनी आपले सारे जीवन व्याकरणातील सौंदर्य शोधण्यासाठी खर्ची घातले. काही लोकांना व्याकरण आणि सौंदर्य हे दोन शब्द एकत्र येणं म्हणजे वदतोव्याघात वाटेल, पण हेच कदाचित या लोकांचं वेगळेपण असेल. बोलताना इतर भाषेतील शब्द वापरण्यावर त्यांचा आक्षेप आहे. जितक्या सहजतेने आपण इतर भाषेतील शब्द वापरतो तितकी सहजता आपल्याच भाषेतील शब्द वापरताना का येत नाही? हा त्यांचा प्रश्न असतो. गेली 75 वर्षे व्याकरण हाच ध्यास घेणाऱ्या शेख वयाच्या 90 नंतरही तेवढ्याच उमेदीने मराठी भाषेवर काम करताना दिसतात. त्यांच्या मते भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे, समृद्ध करणे हे प्रत्येक मराठी भाषिकाचे कर्तव्य आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आज लोकांनी जे कष्ट घेतले त्यापेक्षा कणभर जास्त कष्ट यास्मिन यांनी घेतले आहेत. त्यांनी आयुष्यभर मराठीच्याच अभिजाततेची कास धरली आणि तेच त्यांचे कार्यक्षेत्र झाले. मराठी प्राचीन भाषा आहे याचे पुरावे ही मिळाले आहेत. त्यामुळे तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा. असे त्या आवर्जून सांगत. योगायोग पहा, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षातच ‘ याची देही याची डोळा ‘ त्यांना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे प्रत्यक्ष पाहता आले. केवढा आनंद झाला असेल त्यांना!!

यास्मिन शेख म्हणतात, मातृभाषा सहजपणे बोलता येणे आणि ती व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध असणे या गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी मराठी भाषा बोलली जाते. म्हणजेच प्रादेशिक भाषा किंवा बोलीभाषा वेगवेगळ्या असल्या तरी औपचारिक लेखनासाठी जी भाषा वापरली जाते ती प्रमाणभाषा सर्वांनी वापरली पाहिजे. बोलीभाषा व प्रमाणभाषा यात वाद असू नये. ललित साहित्यात बोलीभाषा महत्त्वाची कारण बोलीभाषेमुळे लेखनात सच्चेपणा किंवा जिवंतपणा येतो. वैचारिक, औपचारिक लेखनात प्रमाणभाषा यायला हवी. त्यामुळे लेखन बहुश्रुत, बहुज्ञात होते आणि त्यामुळे भाषा समृद्ध होते. भाषा बोलताना तिचे सौंदर्य व सौष्ठव याचे भान असले पाहिजे असे म्हणणारे व मराठी भाषेच्या अस्मितेवर, तिचे व्याकरण, यावर अखंड विवेचन करणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा वारसा घेऊन यास्मिन शेख यांची वाटचाल झाली. त्या म्हणतात आपण कोणत्या धर्मात जातीत जन्म घेणार हे माहीत नसते. व ते आपल्या हातातही नसते. आपण माणसे आहोत. त्यामुळे माणुसकी हाच आपला धर्म असला पाहिजे.

जेरुशा यांचा जन्म 21 जून 1925 चा! त्याबद्दलची एक गमतीदार आठवण त्या सांगतात. एक दिवस त्या गणवेश न घालता शाळेत गेल्या होत्या. वर्गशिक्षिका त्यांना खूप रागवल्या. पण जेरुशा गप्पच. काहीच बोलली नाही. शेवटी तिची मैत्रीण म्हणाली, की बाई आज तिचा वाढदिवस आहे म्हणून तिने गणवेश घातला नाही. तेव्हा शिक्षिका म्हणाल्या आज 21 जून, वर्षातला सगळ्यात मोठा दिवस. या दिवशी तुझा जन्म झाला म्हणजे पुढे तू खूप मोठी होणार आहेस आणि खरोखरीच जेरुशा शतायू झाल्याच पण कर्तुत्वाने, मानानेही मोठया झाल्या. आणि वर्गशिक्षिकांचे शब्द खरे ठरले.

शंभरीतही स्मरणशक्ती मजबूत, नवं काही करण्याचा उत्साह, स्वतःच्या हाताने कागदावर लेखन करण्यात आनंद, असणाऱ्या, वैय्याकरणी म्हणू की वैय्याकरण योगिनी म्हणू, यास्मिन शेख यांना आज म्हणावेसे वाटते “तुमच्या या अभ्यासू वृत्तीला वयाचे ग्रहण कधीच लागू नये, असे निरामय दीर्घायुष्य लाभू दे. “

जेरुशा भारतीय कशा झाल्या, याचा थोडा इतिहास. ज्यू लोक मुळातच बुद्धिमान. जसे कार्ल मार्क्स, आईन्स्टाईन, फ्रॉइड हे शास्त्रज्ञ, फेसबुक व्हाट्सअप चे झुकरबर्ग, गुगलचे समी ब्रिन हे उद्योजक, स्टीव्हन्स स्पिलबर्ग हा सिने दिग्दर्शक, थॉमस फ्रीडमन हा पत्रकार, बॉब डीलन हा गायक ही सगळी नावे ज्यू समाजातील प्रतिभावान लोकांमधील काही प्रसिद्ध व्यक्तींची आहेत. जगाच्या लोकसंख्येत पाव टक्का असलेला हा समाज! पण नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्यांचे प्रमाण वीस टक्के आहे. पॅलेस्टाईन व आसपासचा परिसर हे त्यांचे मूळ स्थान. दोन हजार वर्षांपूर्वी पासून सुरू झालेल्या आक्रमणांना तोंड देत देत अखेरीस देशोधडीला लागले. निरनिराळ्या देशात जाऊन हे लोक स्थायिक होऊ लागले. असाच एक गट एका मोडक्या जहाजातून पळून जात असताना जहाज भरकटले व अलिबाग जवळ जहाज आदळून त्याचे तुकडे तुकडे झाले. बहुतेक सगळे बुडाले. पण असे म्हणतात की त्यातील सात जोडपी नौगाव च्या किनाऱ्यावर कशी तरी पोहोचली. अंगावरच्या वस्त्रानिशी बाहेर पडलेली, जवळ काहीही नाही, अशा अवस्थेत आलेल्या लोकांना कोळी समाजाने आसरा दिला. कालांतराने यांची संख्या वाढत गेली. त्यांनी आपला धर्म जपला पण भाषा रितीरिवाज स्थानिक लोकांचे घेतले. 1948 मध्ये इस्त्राइलच्या निर्मितीनंतर बहुतांश ज्यू लोक परत गेले पण काही आपल्या प्रेमापोटी इथेच राहिले. त्यांच्या मनात भारतीयांबद्दल अपार कृतज्ञता होती. फ्लोरा सॅम्युअल लिहितात, “मी साऱ्या जगाला सांगू इच्छितो की भारत हा जगातील एकमेव देश असा आहे की जिथे आम्हा ज्यूंचा धार्मिक कारणावरून कधी छळ झाला नाही. ” भारतीयांच्या सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव या गुणांची आणखी काय पावती हवी!!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लोकशाहीचा बाळगू अभिमान – चला करू या मतदान ☆ डॉ. शैलजा करोडे  ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 विविधा 🌸

☆ लोकशाहीचा बाळगू अभिमान – चला करू या मतदान ☆ डॉ. शैलजा करोडे 

देशाचा चौथा आधारस्तंभ म्हणजे लोकशाही.

लोकांनी, लोकांचे, लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही. यात लोकांचाच सहभाग महत्वाचा असावा. लोकांचा सहभाग निश्चित होतो मतदानातून.

मतदानातून निवडून उमेदवार हे जनतेचे प्रतिनिधी म्हणून काम करतात किंवा त्यांनी तसे करावे ही खरी लोकशाहीची व्याख्या.

पण आजकाल तसे होत नाही. मतदारांना पैशांचे आमिष दाखवून मतं खरेदी करणं, धाक धपटशा दाखवून मतदान केंद्र ताब्यात घेणं, मतदान पेट्या पळविणं, EVM मशीनमधील घोळ हे प्रकार अगदी सर्रास होतात.

उमेदवार लोकांना भूलथापा देतात, निवडणूकी चा जाहीरनामा व प्रत्यक्ष स्थिती यात जमीन आसमान चा फरक असतो. मतदानासाठी दारोदार फिरणारे हे उमेदवार निवडून आल्यानंतर जनता जर्नादनाला लवकर भेटही देत नाही, त्यांचे काम करणे तर दूरच.

आपल्याला हवा तो उमेदवार निवडून यावा यासाठी सगळ्यांनी मतदान करणे फार गरजेचे आहे.

उमेदवार शिकलेला असावा, एकदमचं अंगूठाछाप नसावा, जनतेच्या प्रश्नांची जाणीव व त्यासाठी झटणारा हवा. गुन्हेगारी प्रवृृृृत्तीचा तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला हवा. बोलणं व प्रत्यक्षकृती यात अंतर ठेवणारा नसावा. थोडक्यात तो सच्चा देशभक्त व लोकसेवक असावा.

मतदारांनी आपले मत विकू नये. तसे करणे म्हणजे एका भ्रष्ट उमेदवाराला मत दिले जाईल. या दिलेल्या पैशांची वसूली तो किती भ्रष्ट मार्गांनी करेल याची कल्पनाच न केलेली बरी.

म्हणूनच आपलं अनमोल मत योग्य उमेदवाराला द्या. मतदान करा. कारण मतदार हा खर्‍या अर्थानं राजा आहे. म्हणून प्रत्येकानं आपलं राजेपण जपावं. लोकशाहीला अबाधित ठेवण्यास हातभार लावावा.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
image_print