मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “आप की ऩजरो ने समझा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“आप की ऩजरो ने समझा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… अलिकडे अलिकडे  रिक्त हस्ताने रात्र माझ्या दारी अवतरते… उदासीचा घनघोर काळा अंधार बसतो पहाऱ्याला.. अन रात्रभर दार सताड  उघडेच असते… कुणी येईल याची आतुरतेने वाट पाहात राहते… निराशा पदरी पडते पण कुणाचेही पाय इकडे वळत नाहीत… आलेली रिक्त रात्र मग सकाळ होताच तशीच निघून जाते दारातूनच.. उसासे भरून.. सगळया मोहल्यात तर दररोज संध्याकाळपासून दिव्यांची रोषणाई उजळून टाकत असते रंगीबेरंगी दारं, खिडक्या आणि भिंतीनां… अप्सरांचे मुखवटे दारी, सज्जात घुटमळत असतात मुरकत, भुवया उडवत, कंबर लचकत आपल्या नव्या नव्या सावजाच्या प्रतिक्षेत… साज शृंगाराने नटलेले शरीर, अत्तराचा घमघमाट, मोगऱ्याच्या गजऱ्याचा नाजूक सुकोमल फुलांचा पसरलेला सुगंध सारा माहोल धुंद करून सोडलेला असतो.. सुंगधी केवड्याच्या बनात नागीण लपून बसते तशी इश्काच्या माशुकी सळसळत राहतात आपल्या हवेलीत, हवेलीच्या वाटेवर… रात्र गडद होत जाते तशी हळुहळू इश्काचे माशुक येतात चोर पावलांनी दबकत दबकत… आपल्या मनाच्या

दुखऱ्या जखमेवर प्यारीचा हळवा कोपरा शोधत… व्यवहाराच्या सौद्या नुसार प्रेमाची देवाणघेवाण  इथं रात्रभर चालते… घडी घडीला दार खिडक्यांची उघड मीट होत राहते… डोळयांची उघडझाप व्हावी तशी… भिडू बदलत गेला तरी पण  आतली प्रीतीचा खेळ  मात्र उत्तरोतर रंगत रंगत जातो… लखलखाटात प्रेमाचा मिना बाजार रात्रभर  झळाळून निघत असतो इथं… पोटाच्या वितभर खळगी साठी, परिस्थितीच्या दुर्दैवी वरवंट्याखाली चेपून चिपाडं झालेली शरीरं नि मेलेली मनं घेऊन माशुकीं  हतबलतेने उसने हासू चेहऱ्यावर दाखवत आयुष्यातली आपली एकेक रात्र कमी कमी करत जातात… थकलेलं शरीर, मरगळलेलं मन, चुरगाळलेल्या चादरी, काळवंडून सुकुन कोमजलेल्या मोगऱ्याच्या कळ्यांच्या बाजेवर सैलावून पडतं… त्राणं नसलेलं आंबलेलं  शरीर दिवस तसाच लोळून काढतं… दोरीवर टाकलेले विरलेले, डागळलेले कपडे लोंबत असतात विस्कटलेल्या मनाच्या चिंध्या चिंध्या झाल्यासारख्या… मग पुन्हा संध्याकाळ झाली कि बेगडी प्रेमाची झुल अंगावर पांघरून घेतली जाते… अंगावरील वस्त्राच्या धागे सुटलेल्या कलाबुताचे दिव्याच्या उजेडात क्षीणपणे चमकताना दिसतात..

… मी ही त्यांच्यांतील एक… पोरसवदा वयात फसलेली.. नशिबाच्या फेऱ्यात अडकलेली… घरादाराने, समाजाने कलंकित म्हणून लाथाडलेली या वस्तीत कधी कशी आले काही कळलेच नाही… त्या सगळ्या लपंट देहातील.. वखवखून उसळून आलेली वासनाने शेवटी चांदनी बाजारापर्यंत आणून सोडले…. समज आली पण त्या मागचं गांभिर्य लक्षात येणारं वयं कधी आलचं नाही…. निराधाराला आधार अमिनाबाईची हवेली…. नजरेची जरब असणारी अमिनाबाई… वसुलीची पक्की…. कुठल्याही पुरूषात गुंतून पडायचं नाही हा एकमेव नियम मात्र कटाक्षाने पाळण्यास सांगितला जाई… दावणीला बांधलेल्या माजाला आलेल्या बैलांच्या  नाकात वेसणीचा रज्जू असतो तसा हवेलीची मोहर उजव्या हातावर ठसठशीतपणे गोंदवलेली असल्याने तिथून बाहेर पडण्याचा मार्ग कायमचा बंद केलेला… असं असतानाही.. असचं एका रात्री बऱ्याच उशीराने त्याचं येणं झालं होतं.. ओळखी नंतर  त्याचं येणं मग सुरूच झालं…. अमरप्रेममधील नायका सारखा… घरच्या स्त्री कडून झिडकारला गेलेला… प्रेमाचा भुकेला… आणि मी… नकळत त्याच्यात गुंतून गेलेली… या नरकातून माझी सुटका तोच करेल या आशेवर विसंबलेली… माझ्या मनीचे गुज ओळखले त्यानें आणि   लवकरच येथून बाहेर घेऊन जाईन असा विश्वास दिला… या नरकातून फक्त मरणच सुटका करतं हेच सत्य असतं आणि बाकी सगळचं झुट असतं… हे मानायला नादावलेलं मन कुठे तयार असतं… अचानकपणे हळूहळू त्याचं येणं कमी कमी होतं जातं… खोट्या कारणांची ढाल तो पुढे करत राहतो… त्याचा उधवस्त होणारा संसाराच्या मोहात तो अडकून पडतो.. कमळात अडकलेल्या भुंग्यासारखा.. आणि येणं बंद होतं  काहीही न कळवता सवरता… आशाळभूतपणे रोजची रात्र त्याचीच वाट पाहण्यात जाते… आज तो नक्की येईल.. पण तो त्यानंतर कधीच फिरकला नाही…

नेहमी सारख्या बाकीच्या आपआपल्या कोठीत दार बंद करून राहिल्या….. मला कुणी भेटलचं नाही त्या रात्री… वाटलं आजची रात्र आपल्याला फाके पडणार आणि त्यात  अमिनाबाई चे गाली गलौच ऐकून घ्यावे लागणार ते वेगळे… रात्रभर तारवटलेले दिवे  वाट पाहत राहीले, पहाटेला चला उशिराने का होईना पण आता तरी प्रकाश मिटून पडून राहता येईल. म्हणून… पण तसं काही झालं नाही… आता आता माझे डोळे सुद्धा भरून वाहणे विसरून गेलेत… आणि आणि… अलिकडे अलिकडे  रिक्त हस्ताने रात्र माझ्या दारी अवतरते… उदासीचा घनघोर काळा अंधार बसतो पहाऱ्याला.. अन रात्रभर दार सताड  उघडेच असते… कुणी येईल याची आतुरतेने वाट पाहात राहते… शमा जलती रही परवाने कि आने कि पैगाम पर… निराशा पदरी पडते पण कुणाचेही पाय इकडे वळत नाहीत… आलेली रिक्त रात्र मग सकाळ होताच तशीच निघून जाते दारातूनच  गुणगुणत… जी हमे मंजूर है आपका ये फैस़ला…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘बाई…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ ‘बाई…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

घरातल्या प्रत्येकाला 

प्यायला पाणी लागतं 

बाई भरते पाणी

घागर डोक्यावर काखेत कळशी

 

चालत जाऊन नदीतून 

विहिरीतून रहाटानी ओढुन  

हापसा असेल तर हापसते पाणी…. खड्यांत नळ असला की पाणी जोरात येते…

बाई पाणी भरते खड्यांत उतरून..

 

” अरेच्चा…

तुम्हाला  हे माहित नाही ?”

खरंच अजूनही असं पाणी भरणाऱ्या बाया आहेत

 

नळ घरात असेल तर 

बाई पिंप, माठ भरून ठेवते

 तेवढ्यात आवाज येतो..

” तुझं काय ते पाणी भरून झालं असेल तर चहा टाक” 

 

तुझं पाणी…..

 

ती विचारात पडली 

विचार केल्यावर लक्षात आलं

हो… हो.. माझंच पाणी 

खरंच की.. मीच  तर भरत आले 

…. खूप वर्षे झाली आहेत.. ती पाणी भरते आहे

 

आता तर घरात अॅक्वागार्ड आहे.. चोवीस तास पाणी..

दोन बटणं दाबायची.. की पाणी सुरू होतं 

तरी ते काम तिचचं… ती  ते करते…

घागरीतून पाणी भरणारी ती अशिक्षित, अडाणी होती

अॅक्वागार्ड मधुन पाणी भरणारी ती डॉक्टर, इंजिनियर, शिक्षिका, प्रोफेसर आहे.

.. पण पाणी भरते तीच

 

 घरातल्यांची तहानभूक भागवायची जबाबदारी तिची आहे 

ती आनंदाने पार पाडते.. न कंटाळता… न रागवता

 

म्हणूनच सुखी माणसाचा सदरा हुडकला जातो..

पण सुखी बाईची साडी कोणी हुडकत नाही..

 

 मला तर वाटतं जगातली प्रत्येक बाई ते वस्त्र तिच्यात अंगभूत घेऊनच आलेली आहे…

 ते तिला उतरवता येतच नाही…

आहे त्या संसारात सुख शोधून बाई आनंदात राहते..

काय म्हणता? “आपलीच गोष्ट आहे ना?…. “

“हो हो… आपलीच”

मग…

” अशाच आनंदात रहा ग.. बायांनो “

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘स्त्री शक्तीचा जागर करणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन (८ मार्च)’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘स्त्री शक्तीचा जागर करणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन (८ मार्च)’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार प्रिय मैत्रांनो ! 

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः।।” 

(अर्थ- जेथे स्त्रियांची पूजा केली जाते, अर्थात त्यांना मान दिला जातो, तेथे देवता आनंदपूर्वक निवास करतात. जेथे त्यांची पूजा होत नाही, अर्थात त्यांचा मान राखला जात नाही तेथील सर्व चांगली कर्मे देखील निष्फळ होतात.) हा अर्थपूर्ण श्लोक चिरंतन आहे, म्हणूनच आजच्या काळात देखील तितकाच प्रासंगिक आहे.

८ मार्च या अंतर्राष्ट्रीय महिला दिनानिमित्य अभिनंदन आणि शुभेच्छा! या सर्वांनाच लागू होतात. कारण आजचा काळ असा आहे की पुरुषांची म्हणून लेबल लावलेली कामे महिला बिनधास्तपणे करतात, तर या उलट स्त्रियांची पारंपारिक कामे कधी कधी पुरुषमंडळी अगदी निगुतीने करतात. (यासाठी पुरावा म्हणून मास्टर शेफचे एपिसोड आहेतच).

आंतरराष्ट्रीय (जागतिक) महिला दिनाचा इतिहास

मंडळी आंतरराष्ट्रीय (जागतिक) महिला दिनाचा इतिहास थोडक्यात सांगते. अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ संपूर्ण जगातील स्त्रियांना २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यात क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे. ‘ अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड निदर्शने केली. त्यात दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या प्रमुख मागण्या होत्या. सोबतच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक स्तरावर समानता आणि सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क हे देखील मुद्दे होते. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ रोजी या अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा क्लाराचा मंजूर झाला.

नंतर युरोप, अमेरिका आणि इतर देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्री संघटनांना बळकटी आली. जसजसे बदलत्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तसतशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.

स्त्रियांचे सक्षमीकरण- माझा अनुभव               

या निमित्याने मी महिला सशक्तीकरणाची एक आठवण शेअर करीत आहे. प्रवासात असतांना त्या त्या प्रदेशातल्या स्त्रिया कशा वागतात, त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य कितपत विकसित आहे, हे मी उत्सुकता म्हणून बघत असे. साधारण २००३ चा काळ होता. (मैत्रांनो, मित्रांनो हे लक्षात असू द्या की, हा काळ वीस वर्षे जुना आहे. ) मी केरळ येथे फिरायला गेले होते, देवभूमीचा हा सुंदर प्रवास रम्य अशा हिरवाईतून करीत होते. नारळांच्या वृक्षांच्या लांब रांगा अन लगत समुद्राचे निळेशार जल (समुद्र कुठला ते विचारू नका प्लीज)! बसमधून असे विहंगम दृश्य दिसत होते. बस कंडक्टर एक मुलगी होती, विशीतली असावी असे मला वाटले. अत्यंत आत्मविश्वासाने ती आपले काम करीत होती. बस मध्ये फक्त महिलांसाठी असे समोरचे २-३ बेंच आरक्षित होते. त्यावर तसे स्पष्ट लिहिले होते. कांही तरुण त्यावर बसले होते. एका स्टॉपवर कांही स्त्रिया बसमध्ये चढल्या. नियमानुसार त्या राखीव जागांवरून तरुणांनी उठून जायला हवे होते. त्यांनी तसे केले नाही. त्या स्त्रिया उभ्याच होत्या. तेवढ्यात ती कंडक्टर आली आणि मल्याळम भाषेत त्यांना जागा रिकामी करा असे तिने सांगितले, मात्र ते तरुण हसत होते आणि तसेच बसले होते. मी आता बघितले की, ती रोडकीशी मुलगी रागाने लाल झाली. तिने त्यांच्यापैकी एकाची कॉलर पकडली अन त्याला जबरदस्तीने उभे केले. बाकीचे तरुण आपोआप उठले. तिने नम्रपणे त्या स्त्रियांना बसायला जागा करून दिली, अन जणू कांही झालेच नाही असे दाखवत आपले काम करू लागली.

मैत्रांनो मला आपल्या ‘जय महाराष्ट्राची’ आठवण आली. असे वाटले की इथं काय झाले असते? केरळात साक्षरतेचे प्रमाण १०० टक्के आहे! (तेव्हां आणि आत्ताही) मेघालयच्या प्रवासाचे वर्णन मी नुकतेच एका लेख मालिकेत केले, तिथे देखील स्त्रियांच्या संपूर्ण साक्षरतेमुळे आणि आर्थिक स्वातंत्र्यामुळे जे स्त्री शक्तीचे अद्भुत रूप मी ठायी ठायी अनुभवले, ते वारंवार नमूद केले आहेच.   

मंडळी, यात कुठलीच शंका नाही की, मतदानाचा हक्क तर महत्त्वाचाच, पण त्या योगे स्त्री स्वतंत्र झाली असे समजायचे कां? तो तर दर पाच वर्षांनी मिळणारा अधिकार आहे. स्त्रीला घरात आपले मत मांडण्याचा अधिकार आहे का?  बरे, मांडले तरी ते विचारात घेतल्या जाते कां? हे सुद्धा बघायला नको कां? अगदी साडी खरेदी करायची असेल तर आर्थिक स्वातंत्र्य आहे कां, अन ते असले तरी स्वतःच्या पसंतीची साडी घेता येते कां? मंडळी प्रश्न साधा आहे पण उत्तर तितके सोपे आहे कां? ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी’ हे शब्द अजूनही जिवंत कां आहेत? १९५० साली आलेल्या ‘बाळा जो जो रे’ या सिनेमातील ग दि माडगूळकरांची ही रचना आज देखील सत्याशी निगडित कां वाटावी? जिथं स्त्रीला देवीच्या रूपात पुजल्या जाते तिथे तिची अशी अवस्था कां व्हावी?

युनायटेड नेशन्सच्या ८ मार्च २०२४ च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम आहे, “महिलांमध्ये गुंतवणूक करा: प्रगतीचा वेग वाढवा”. यात स्त्री अंकुराचे रक्षण, स्त्री आरोग्य, स्त्रियांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीचा आलेख जलदगतीने उंचावणे हे सर्व मुद्दे आहेत. पण स्त्रियांचे सबलीकरण करण्याच्या दृष्टीने त्यांच्यावरील अन्याय आणि अत्याचार रोखणे आणि ते झाल्यास अपराध करणाऱ्याला कठोर शिक्षा करणे, या बाबी तितक्याच महत्वाच्या आहेत. समाजात स्त्रीचे स्थान अजूनही दुय्यम कां आहे? यावर सामाजिक विचारमंथन होणे आवश्यक आहे. भलेही संविधानात नमूद केल्याप्रमाणे कुठल्याही स्तरावर लिंगभेद नसावा हे स्पष्ट आहे, पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.

मला या दिनाविषयी इतकेच वाटते की, स्त्रीला देवी म्हणून मखरात बसवू नये तसेच तिला ‘पायाची दासी’ देखील बनवू नये. पुरुषाइतकाच तिचा समाजात मान असावा. ‘चूल आणि मूल’ या सेवाभावाकरता सकल आयुष्य खर्ची घालणाऱ्या स्त्रीचे कौटुंबिक आणि सामाजिक स्थान ते सर्वमान्य व्हावे. तिच्या भावभावना, बुद्धी आणि विचारांचा सदोदित सन्मान झाला पाहिजे. खरे पाहिलॆ तर हे साध्य करण्यासाठी ८ मार्चचाच ‘प्राणप्रतिष्ठेचा दिवस’ नसावा तर ‘प्रत्येक दिवस माझा’ असे समस्त महिलावर्गाने समजावे. त्यासाठी पुरुषमंडळींकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घ्यायची गरज असू नये. असा निकोप अन निरोगी सुदिन केव्हां येणार? प्रतीक्षा करावी, लवकरच हे स्वप्न पूर्ण होईल! 

“Human rights are women’s rights, and women’s rights are human rights. ” 

 –  Hillary Clinton.

“मानवी हक्क हे स्त्रियांचे हक्क आहेत आणि स्त्रियांचे हक्क हे मानवी हक्क आहेत. ”   

– हिलरी क्लिंटन

धन्यवाद!     

Attachments area

टीप- संयुक्त राष्ट्र द्वारा प्रसारित एक गाणे शेअर करते

“One Woman” song to celebrate International Women’s Day (March 8th-2013)

©  डॉ. मीना श्रीवास्तव

दिनांक – दिनांक ८ मार्च २०२४ 

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खेड्यातील स्त्री जीवन… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

खेड्यातील स्त्री जीवन… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

कुटूंबाचा भक्कम आधार मानली जाणारी खेड्यातील स्त्री ही नोकरी करणार्‍या अथवा शहरी स्त्रीच्या दोन पावले पुढेच असते .आपला देश हा शेतीप्रधान देश मानला जातो. तसे पाहिले तर शेतीविषयक ग्रामीण स्त्रीचे योगदान खुपच अमुल्य आहे. खेड्यातील स्त्री ही जास्त करून आपल्या रानात रमलेली असते.तिच्या कष्टाळू आणि धैर्यवान वृत्तीतून ती आपले घर आणि शेत दोन्ही सावरत असते .खेड्यातून पाहिले तर जास्त करून कुटुंबाचे प्रतिनिधित्व हे त्या कुटुंबातील स्त्रीच करते. कुटुंबाचे पालनपोषण  , तसेच आर्थिक नियोजन या गोष्टी ग्रामीण स्त्री मोठ्या धैर्याने पार पाडते.

खेड्या-पाड्यातून पाहिले तर सरसकट स्त्रीया या शेतावर राबताना दिसतात. यातील बर्‍याचजणी तर दुसर्‍याच्या शेतावर मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. आपल्या कुटुंबावर येणाऱ्या प्रत्येक संकटांचा सामना त्या मोठ्या धैर्याने करत असतात. पिकणाऱ्या शेतमालातून  किंवा मोलमजूरीतून, तसेच दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन इत्यादी मार्गातून पैसा उपलब्ध करून खेड्यातील स्त्री आथिर्क नियोजन करते.   आपल्या कुटुंबाची आर्थिक नियोजनाची घडी ती उत्तम बसवते.

ग्रामीण भागातून निरीक्षण केले तर काही अपवाद ओघळता ग्रामीण स्त्रीच आर्थिक व्यवहार संभाळताना निदर्शनास येते. त्यामुळेच तीआपल्या कुटुंबाचा भक्कम आधार असते. मोठ्या चतुराईने आणि नियोजनबद्ध नेतृत्व यातून ती आपले कुटूंब आर्थिकदृष्टय़ा सुरळीत चालविते. कुटूंबाची काही कारणाने विस्कटलेली घडी  ,सुरळीत करणे हे कौशल्य जणू ग्रामीण स्त्रीच्या अंगी रूळलेले असते. त्यानुसार ती स्वतःला आपल्या कुटुंबासाठी सर्वस्व वाहून देते.

खेड्यातील स्त्री ही फक्त कष्टाळूच असते असे नाही. ती प्रेमळ, मनमिळाऊ सुध्दा असते. शेतावर एकत्र राबताना एक भाजी चारचौघीत वाटून खाण्याची तिला सवय झालेली असते. त्यामुळे ग्रामीण स्त्रीमध्ये मदतीचा हात पुढे करण्याची भावना शहरातील स्त्रीयांच्या तुलनेत जास्त असते.  एकमेकींच्या प्रसंगाना, गरजेला उभे रहाण्यास त्या क्षणाचाही विचार करत नाहीत. अनेक सण , उत्सव , सांस्कृतिक कार्यक्रम खेड्यातील स्त्रीया एकत्र येऊन साजरे करतात. यासर्वाचा आनंद देखील घेतात. या सर्वात त्यांचा  सहभाग आणि आनंदाचा वाटा जास्त असतो. हे सर्व त्यांना शेतीवाडीने दिलेले असते. शेतात टोकणी,भांगलण ,सुगी करत असताना  अनेकजणी एकत्र येतात. शेतात राबताना एकमेकींजवळ व्यक्त होतात.एक दुसरीच्या सुख-दुःखाच्या भागीदार होतात. हे सर्व शहरातील स्त्रियाच्या वाट्याला येत नसते. शहरातील स्त्रीचे जीवन एका विशिष्ट चाकोरीतून जाते.तिला घड्याळाकडे पाहून कामे करण्याची सवय झालेली असते. ग्रामीण स्त्रीच्या जगण्याचा परीघ विस्तृत असतो.  पहाटेला उठून ती आपल्या दैनंदिनीत मग्न होते सकाळपासून ते दिवस मावळेपर्यत तिचे हात रानासी बांधलेले असतात.  आलेल्या संकटाना तोंड देतादेता या तिच्या संघर्षमय जीवनवाटाच तिला खंबीर , साहसी कष्टाळू, चातुर्यवान बनवितात.

खेड्यातील स्त्री कोणत्याच परिस्थितीत आपल्या कुटुंबाची वाताहात होऊन देत नाही. कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या प्रबल ठेवण्यास तिची धडपड असते. ती काटकसर करून आर्थिक नियोजन ठेवते. येणारे सण, उत्सवात मोठेपणाची अवाढव्यता न दाखविता ती आपल्या ऐपतीनुसार सण साजरे करते. यामध्ये ती स्वतः आनंदात रहाते आणि आपल्या कुटुंबालासुध्दा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. आजची ग्रामीण स्त्री ही आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत सुध्दा तत्पर झाली आहे. त्यामुळेच खेड्यातील मुले सुध्दा आज उच्चशिक्षित होत आहेत इतकेच नाहीआपल्या मुलीच्या शिक्षणाचा सुध्दा ती सकारात्मक विचार करत असते. अर्थात ग्रामीण स्त्रीदेखिल प्रगतशील वाटचाल करत आहे.  ती आपले कुटूंब एकसंध मायेच्या धाग्यात बांधून ठेवते.

आपले दुःख  ,वेदना  ,येणारी संकटे याचा ग्रामीण स्त्री कधी त्रागा करत नाही. यासगळ्याची घुटकी घेऊन ती जगत असते.  तिला तशा जगण्याची जणू सवय झालेली असते. त्यामुळे येणारी संकटे झेलण्याची क्षमता ग्रामीण स्त्रीमध्ये जास्त असते. तिचा बहुतांश वेळ शेतावर जातो. आपले कुटुंब  ,शेती  ,पाऊस या गोष्टीत ती रमलेली असते. फडक्यात बांधून आणलेली भाजी भाकरी ती शेताच्या बांधावर बसून समाधानात खाते.

कुणास ठाऊक ‘ जागतिक महिला दिन ‘ त्या खेड्यातील,  रानात राबणाऱ्या बाईला  माहित आहे की नाही. तिच्यासाठी प्रत्येक दिवस कष्टाला सोबत घेऊन उगवतो आणि रानासोबत समाधानाने मावळतो. “येणारा प्रत्येक दिवस जी अनेक बुध्दीकौशल्यानी  आपलासा करते , तिच्या कार्यास सलाम असो आणि तिच्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाला खुप खुप शुभेच्छा ”

“जागतिक महिला दिनाच्या ” सर्व महिलांना शुभेच्छा

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा, जि. सांगली, दुरभाष्य क्रमांक-९९२२७३०८१५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पिवळं विमान…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “पिवळं विमान…” ☆ श्री मंगेश मधुकर 

अपघातामुळे सक्तीची विश्रांती घ्यावी लागली.प्रचंड बोर झालेलो पण नाईलाज.मित्राचा फोन आला “काय रे,काय उद्योग करून घेतला.”

“विशेष नाही.छोटासा अक्सीडेंट झाला”

“काही सीरियस नाही ना”

“अं हं,मुका मार जास्त लागलाय.”

“नक्की काय झालं.” 

“पिवळ्या विमानानं धावती भेट घेतली.”

“कुठल्या विमानानं??”

“पिवळ्या.रोज सकाळी लेकीला शाळेत सोडायला जातोस तेव्हा पाहिलं असशीलच की….”

“कशाला डोक्याची मंडई करतोस.नीट सांग नाहीतर फोन ठेवतो”मित्र वैतागला.

“अरे स्कूल व्हॅनची धडक बसली”

“असं स्पष्ट बोल की,उगीच विमान वगैरे कशाला??”

“बस,व्हॅन,रिक्षा रस्त्यावर सकाळी विमानाच्या स्पीडनं तर पळतात.” 

“हो रे,कशाही गाड्या चालवतात.भीतीच वाटते.खरंच रस्त्यावरची विमानच.काहीतरी करायला पाहिजे.”

“एक कल्पना आहे.तुझी मदत पाहिजे”

“नक्की!!काय करायचे ते बोल.”

“व्हिडिओ शूट करायचयं.कुठं,कधी,कसं ते सांगतो.आपल्या भागातील प्रसिद्ध शाळेच्या प्रिन्सिपलची अपॉईटमेंट मिळालीय.सोबत येतोस का”

“डन,काळजी हे”मित्राने फोन ठेवला.ठरल्याप्रमाणं प्रिन्सिपलांना भेटलो.उपक्रमाची माहिती दिली.त्यांनीसुद्धा लगेचच  सहकार्य करण्याची तयारी दाखवली आणि कार्यक्रम ठरला. 

रविवारी सकाळी शाळेच्या हॉलमध्ये प्रिन्सिपल,शिक्षक,पालक प्रतिनिधी आणि सुमारे पंचवीस स्कूल बस,व्हॅन,रिक्षाचे ड्रायव्हर जमले होते.नक्की कसला कार्यक्रम आहे याविषयी सर्वांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती.“पिवळं विमान” व्हाटसप ग्रुपमध्ये ऍड केल्याचं प्रत्येकाच्या मोबाईलवर नोटिफिकेशन आल्यावर आपसात चर्चा सुरू झाल्या.तितक्यात प्रिन्सिपल मॅडमनी बोलायला सुरवात केली.“आज सुट्टी असूनही आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप खूप आभार.एका चांगल्या कारणासाठी ग्रुप तयार केलाय.कृपया कोणीही ग्रुपमधून बाहेर पडू नये.आज इथं का जमलोय,काय करायचं सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.जास्त वेळ घेणार नाही.”प्रिन्सिपल मॅडमनी थोडक्यात प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सूत्र माझ्याकडं दिली.वॉकरच्या आधारानं उभं राहत बोलायला सुरवात केली. “पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद!!नवीन ग्रुपवर शॉर्ट व्हिडिओज पाठवलेत ते आधी पहा.नंतर बोलू” व्हिडिओ बघितल्यावर चूळबुळ सुरू झाली. 

“हे काय आहे”वैतागलेल्या एकानं विचारलं.

“आपल्याच शाळेच्या गाड्यांचे गेल्या आठ दिवसातले व्हीडिओज.” माझ्या उत्तरावर एकदम गदारोळ सुरू झाला. काही ड्रायव्हर तावातावानं,ओरडून बोलायला लागले. 

“आम्ही आमचं काम प्रामाणिक पणे करतो आहोत.उगीच चुकीची माहिती पसरवू नका.”

“बदनामी करण्यासाठी बोलावलंयं का?तसं असेल तर आम्ही पण गप्प बसणार नाही.”

“सगळी पोरं सेफ आहेत.तरी सुद्धा असले विडिओ कशाला दाखवता”

“रस्ता म्हटल्यावर किरकोळ गोष्टी होणारच.आम्ही व्यवस्थितच गाड्या चालवतो.”

“पोटच्या पोरांइतकीच गाडीतल्या मुलांची काळजी घेतो.”

“उगीच शाळेच्या आणि पालकांच्या मनात काहीबाही भरून देऊ नका”

“तुम्ही कोण कुठले.शाळेशी काय संबंध” चिडलेले ड्रायव्हर संतापून बोलत होते.प्रिन्सिपल मॅडमनी विंनती केल्यावर सगळे शांत झाले.मी पुन्हा बोलायला सुरवात केली“सर्वप्रथम एक गोष्ट क्लियर करतो की इथं कोणाला दोष देण्यासाठी किवा जाब विचारण्यासाठी हा कार्यक्रम नाहीये.”

“मग हे व्हिडिओ कशासाठी?.मुलांची काळजी घेतो.त्यांचे लाड करतो ते दिसलं नाही का?”एकाच्या बोलण्यावर बाकीच्यांनी ‘बरोबरयं’ म्हणत माना डोलावल्या. 

“तुमच्याविषयी तक्रार नाही परंतु हे व्हिडिओज सुद्धा वस्तुस्थिती आहे.”

“आधी तुम्ही कोण ते सांगा.”

“पंधरा दिवसांपूर्वी सकाळी स्कूल व्हॅननं मला उडवलं. नशीब बलवत्तर म्हणून पायावर निभावलं.”

“रस्त्यावर अपघात होणारच.नेहमी दोष ड्रायव्हरचा नसतो”

“शंभर टक्के मान्य.माझ्या केसमध्ये ड्रायव्हर खूप घाईत,मोबाइलवर बोलत गाडी चालवत होता.”

“मग त्याच्यावर कारवाई करायची.”

“पण त्यानं मूळ प्रश्न सुटणार नाहीये.”

“एकानं चूक केली म्हणून सगळे वाईट नसतात.”

“रोज रिस्क घेऊन ओव्हरटेक करता,गरज नसताना कट मारता,रॉंग साइडनं गाडी घुसवता,गाडी सोबत फोनही चालूच असतो.हे खूप धोक्याचं आहे.आतापर्यंत काही गंभीर घटना झाली नाही परंतु यापुढे कधीच होणार नाही ही खात्री नाही.त्यात गाडीत लहान मुलं असतात.बेफाम गाडी चालवून त्यांच्यासमोर काय आदर्श ठेवत आहोत.याचा जरा विचार करा.सर्वांना विनंती आहे की विनाकारण जीव धोक्यात घालू  नका.” 

“पुढे काय होईल याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही.” 

“करेक्ट पण काळजी घेणं तर आपल्या हातात आहे.वेळ गाठण्याससाठी म्हणून मन मानेल तशी गाडी चालवणं बरोबर नाही.स्वतःबरोबर  अनेक पालकांचा काळजाचा तुकडा तुमच्यासोबत असतो त्याचाही जीव पणाला लावता.” बोलण्याचा परिणाम तात्काळ दिसला.हॉलमध्ये चिडिचूप शांतता पसरली.

“माफ करा.साहेब.तुमचं बोलणं ऐकून डोळे उघडले.”एकजण हात जोडत म्हणाला. 

“तुम्ही माफी मागावी म्हणून नाही तर बेदरकारपणे सुसाट वेगानं जाणाऱ्या गाड्या पाहून पोटात गोळा येतो.तसंही आता घराबाहेर पडलं की जीव मुठीत घेऊनच फिरावं लागतं.हे अनेकांचं मत आहे.मला ठेच लागल्यावर लक्षात आलं की नुसती चडफड करण्यापेक्षा तुमच्याशी एकदा संवाद साधावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला.कोणावरही टीका करण्याचा हेतू नाही.कृपया गैरसमज करून घेऊ नये, ही नम्र विनंती आणि मनपूर्वक धन्यवाद!!”

“साहेब,आजपासून आम्ही काळजी घेऊ.हा ग्रुप आता आम्ही चालवू.आमच्या गाड्यांना तुम्ही दिलेलं “पिवळं विमान” नाव भारीयं.आता गाडीचा स्पीड वाढला की हे नाव नक्की आठवेल आणि आपसूकच कंट्रोल होईल.”ड्रायव्हरच्या दिलखुलास बोलण्यावर ‘हो, हो’ म्हणत सगळे मोठ्यानं हसले.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अमीन सयानी — ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ अमीन सयानी — ☆ श्री प्रसाद जोग ☆

अमीन सयानी

नुकतीच अमीन सयानी यांचं वयाच्या ९१ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्याने निधन झाल्याची बातमी आली आणि बिनाका गीतमालाचे दिवस आठवले.

अमीन सयानी यांचा ‘बहनों और भाईयों ’ हा आवाज रेडिओमधून आला की दर बुधवारी लोक सरसावून बसायचे ,कारण बिनाका गीतमाला सुरु व्हायची. कोणताही कार्यक्रम असुदे , तो रंगतदार व्हायला पाहिजे तर त्याचा निवेदक देखील तसाच हुशार, अभ्यासपूर्ण असला पाहिजे म्हणजे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत जातोच जातो.

एके काळी याच अमीन सयानीनी ‘आवाजकी दुनियाके दोस्तो’ अशी स्नेहपूर्ण साद घालून रसिकांच्या मनावर आणि हृदयावर ‘बिनाका गीतमाला’ या प्रचंड लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वर्ष राज्य गाजवलं होत. तोच लाघवी, आर्जवी आवाज अजूनही मंत्रमुग्ध करतो.गेली कित्येक वर्ष मा.अमीन सयानी हे पडद्यामागे राहूनच श्रोत्यांचं मनोरंजन करत होते.

नभोवाणीवरील निवेदकांच्या बाबतीत जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा एका नावापुढे सर्वजण नतमस्तक होतात तो आवाज असतो अमीन सयानीचा. “जी हाँऽऽ प्यारे बहेनों और भाईयों, तो अब अगली पायदानपर पेश होने जा रहा है…” असा आवाज ऐकला, की आजही तो काळ सर्रकन डोळ्यांपुढे चमकून जातो. थोडीथोडकी नाही तब्बल ४२ वर्षे त्यांनी ‘बिनाका गीतमाला’चे प्रसारण केले.

आकाशवाणीच्या इतिहासातील हा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ठरला. या माध्यमातून भारतीय सिनेमाला घराघरापर्यंत पोचवण्यात अमीन सयानींचा फार मोठा सहभाग होता . त्यांनी रेडीओवर अनेक प्रायोजित कार्यक्रम केले. त्या काळातील सर्वच कार्यक्रम ‘लाजवाब’ होते. एस. कुमार का फिल्मी मुकदमा, सॅरीडॉन के साथी, शालीमार सुपरलॅक जोडी, बोर्नव्हिटा क्वीज कॉन्टेस्ट, मराठा दरबार की महकती बाते, रिको मुस्कुराहटे.

जाहिरात आणि विपणन या शब्दांची जादू समाजापर्यंत पोचायच्या कितीतरी वर्षे अगोदर अमीन सयानी यांनी ती आयडिया यशस्वी करून दाखवली होती. १९५२ सालापासून रेडिओ सिलोनवर त्यांचा ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम सुरू झाला. आजच्या पिढीला कदाचित खोटे वाटेल पण प्रत्येक बुधवारी रात्री ८ वाजता रस्ते निर्मनुष्य असायचे. सारा देश त्यावेळी फक्त आणि फक्त बिनाका ऐकत असायचा. श्रोत्यांशी मनापासून साधलेला संवाद, सोपी-सुलभ भाषाशैली, उत्कंठा वाढवणारे रसाळ निवेदन आणि सोबतीला सिनेमाच्या अस्सल सुवर्णकाळातील गाणी! रसिकांचे या स्वराशी नाते जुळले ते कायमचेच.

साठच्या दशकात एकदा ‘बिनाका’ सादर करताना एका पित्याने त्यांना पाठवलेले पत्र त्यांनी वाचून दाखवले. त्या पित्याचा एकुलता एक मुलगा काही कारणाने रुसून घर सोडून गेला होता. आईवडील खूप दु:खात होते. त्या काळात संपर्काची माध्यमे अतिशय कमी होती. त्या कुटुंबाला ‘बिनाका’ ऐकायची भारी आवड होती. त्या पित्याने अमीनभाईंना विनंती केली, की जगाच्या पाठीवर माझा मुलगा कुठेही असला तरी बिनाका ऐकल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही या कार्यक्रमातून त्याला घरी परतण्याचा सल्ला द्या. तो जरूर तुमचे ऐकेल. अमीन सयानी यांनी ते पत्र वाचून दाखवले. आणि काय आश्चर्य! महिन्याभरात त्या पित्याचे पत्र आले, मुलगा सुखरूप परत घरी आल्याचे.

त्या वेळेस तर गाणी ऐकण्याची साधने कमी होती . गाणी ऐकायची तर सिनेमाला जाऊन बसायचं नाही तर रेडिओ सिलोन ऐकायचा, कारण केंद्रीय माहिती व नभोवाणी खात्याचे मंत्री डॉक्टर बी. व्ही. केसकर यांनी ऑल इंडिया रेडिओवर सिनेसंगीत वाजवण्यास बंदी घातली होती. त्याचाच फायदा सिलोनला मिळाला.’’हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात बिनाका गीतमाला ‘माइलस्टोन’च्या रूपाने उभी आहे आणि अमीन सयानी त्याचे अविभाज्य घटक. ३ डिसेंबर १९५२ ला बिनाका गीतमाला सुरु झाली आणि चित्रपटसंगीताची थक्क करून सोडणारी अफाट लोकप्रियता जगासमोर आली.

मा.अमीन सयानी  सांगत असायचे  ‘‘त्या वेळेस ‘हिट परेड’ नावाचा इंग्लिश कार्यक्रम रेडिओ सिलोनवर होत असे. सहज एक कल्पना निघाली, हाच कार्यक्रम हिंदीतून पेश केला तर! एक प्रयोग म्हणून गीतमाला सुरू झाली. सात-आठ गाणी वाजवायची त्यांची क्रमवारी बदलून, लोकप्रियतेनुसार त्यांना नंबर देऊन ऐकणाऱ्यांनी जॅकपॉट जिंकायचा. त्या वेळेस टपाल, पत्रं एवढं एकच माध्यम होतं. रेडिओ सिलोनच्या अधिकाऱ्यांनी चाळीस ते पन्नास पत्रांची अपेक्षा ठेवत यंत्रणा सज्ज केली होती. प्रत्यक्षात नऊ हजार पत्रं आली. हा धक्का जोरदार होता आणि पहिलं वर्ष संपता संपता पत्रांचा आकडा प्रत्येक आठवडय़ाला साठ हजारांपर्यंत पोहोचला.’’

बिनाका गीतमालाचा इतिहास मा.अमीन सायानी यांना पाठ होता . शंकर जयकिशन, नौशादपासून मदनमोहन पर्यंत आणि सचिनदेव बर्मन पासून राहुलदेव बर्मन पर्यंत त्यांच्यापाशी आठवणींचा खजिना होता.  

याच संगीतकारांच्या अमर्याद कर्तृत्वाच्या छायेत मा.अमीन सायानी यांचे व्यक्तिमत्व फुलले होते.

याच संगीतकारांच्या अमर्याद कर्तृत्वाच्या छायेत मा.अमीन सायानी यांचे व्यक्तिमत्व फुलले होते.

 जुन्या काळात तुमचे आमचे सर्वांचे आयुष्य आनंदी करणाऱ्या अमीन सयानी यांना विनम्र अभिवादन.

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निरोप… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ निरोप… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

तुला काय आणि कसं सांगू ? मला ना गेले सात-आठ दिवस सारखी हुरहूर लागून राहिलीय. अरे तू आता जाणार ना रे आम्हाला सोडून? खरं तर तू खूप मोठं सत्कार्य करायला निघालायस. आपल्या देशाच्या बॉर्डरचं रक्षण करायला निघालायस. केवढं मोठं जबाबदारीच आणि धाडसाचं काम आहे ना रे! पण तू शूरवीर आहेसच. म्हणूनच तर तुझं नाव रणवीर ठेवलय ना! तू मोठं आणि अवघड काम करायला निघालायस. तरीपण आपली ताटातूट होणार, हा विचारही बेचैन करतोय. सारखं डोळ्यातून पाणी येतय रे. किती लळा लावलायस आम्हाला सगळ्यांना. रोज तुझ्या आवडीचे काही ना काही करते, आणि तू आवडीने खातोयस ना, बरं वाटतंय बघ मला. अरे, रणवीर परवा आपल्याकडे ते बॉस आले होते ना, ते तुला किती काम सांगत होते. आणि खरंच त्यांनी सांगितलेली कामं तू अगदी मनापासून करत होतास. त्यामुळे तुझ्यावर बेहद खुश झालेत ते. तेही  येतील तुझ्याबरोबर कदाचित. खरं तर तुला सांगायची गरज नाहीये. पण तरीही सांगावसं वाटतं ना!

हे बघ ,भारत मातेचे नाव घ्यायचं . ” भारत माता की जय” म्हणायचं .आणि जोरदार आक्रमण करून ,आतंकवाद्यांना चांगलं लोळवायचं .वीरचक्र ,शौर्य चक्र मिळवायचं. आणि तुझं ‘रणवीर ‘ हे नाव सार्थकी करायचं. तुझी शौर्याचे गाथा आम्ही ऐकली ना ,की ऊर भरून येईल आमचा. अभिमान वाटेल तुझा आम्हाला

आता तुला बरोबर काय काय द्यायच बरं? इकड ये जरा. मला ना तुझ्या चेहऱ्यावरून ,पाठीवरून हात फिरवायचाय .  आशीर्वाद देणार आहेत सगळेजण तुला. तू असा गप्प गप्प का रे? तुला पण आता आम्हाला सोडून जाणार, म्हणून कसं तरी वाटतंय का ? आता काही नाही . हसत हसत सगळ्यांशी बोल बघू.

उँ, उँ , उँ, हं ,हं,भुः, भुः, भुःभुः

आमचे स्नेही आचार्य यांनी आपले तीन महिन्यांचे लाब्राडोर जातीचे पिल्लू, देश कार्यासाठी आर्मीच्या डॉग स्कॉड कडे सुपूर्त केले . त्यांची पत्नी श्री रंजनी हिच्या मनातल्या निरोपाच्या प्रेमळ भावभावना.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाई, पाचगणी व महाबळेश्वरचे कलापर्यटन – भाग – २ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ वाई, पाचगणी व महाबळेश्वरचे कलापर्यटन – भाग – २ ☆ श्री सुनील काळे 

(लोकसत्ता – 24 फेब्रूवारी 2024 . पर्यटन विशेषांक)

विश्वकोषासाठी विशेष नोंदी करण्यासाठी आलेले चित्रकार सुहास बहुळकर  तर वाईच्या प्रेमातच पडले . त्याचे सुंदर वर्णन त्यांनी वाई कलासंस्कृती या पुस्तकात केले आहे . पेशवेकालीन पुण्याचे वास्तुवैभव , महिरपी खिडक्या , वाडयांचे दरवाजे , चौकटी , कोनाडे हे त्यांच्या चित्रांचे विषय आहेत . या विषयांची प्रेरणा घेऊन आकारसंस्कृती नावाचे त्यांनी केलेले प्रदर्शन खूप गाजले आहे .

वाईच्या घाटाची तर अनेकांनी चित्रे काढलेली आहेत त्यापैकी ना. श्री . बेन्द्रे यांच्या आत्मचरित्रात वाईच्या घाटाचे पेनने चित्र रेखाटलेले पाहता येते . वि .मा . बाचल मूळचे वाईचे . काही वर्ष त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केले आहे . त्यांनी काढलेली रेखाटने व घाटाची चित्रे फर्ग्युसनच्या शताब्दी स्मरणिकेत पाहायला मिळतात .

वाईचे सु .पि .अष्टपुत्रे सर व गजानन वंजारी सर हे दोघेही वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये कलाशिक्षक होते . त्यांना ज्यावेळी वेळ मिळत असे तेव्हा ते गणपती घाटावर चित्रे काढायला यायचे . अष्टपुत्रेसर अपारदर्शक कलर्स म्हणजे पोस्टर कलरमध्ये व वंजारीसर तैलरंगमध्ये निसर्गचित्रे रेखाटतात . मूळचे पसरणी गावाचे पण सध्या इंग्लडमध्ये वास्तव्य असणारे तुषार साबळे यांनीही वाई घाटपरिसरातील , मेणवली घाटाची चित्रे रेखाटली आहेत .

सुप्रसिद्ध सिनेनट चंद्रकांत मांडरे , चित्रकार पी एस कांबळे , दिवाकर प्रभाकर, या जुन्या पिढीतील कलावतांनी वाईची चित्रे साकारलेली आहेत . बाळासाहेब कोलार , श्रीमंत होनराव (वाई) , यांच्या बरोबरच मिलींद मुळीक , संजय देसाई , शलैश मेश्राम , कविता साळुंखे , दिवगंत सचीन नाईक , कुडलय्या हिरेमठ (पुणे) , प्रफुल्ल सावंत , सागर गायकवाड (सातारा ) , संदीप यादव ( पुणे), अमोल पवार , निशिकांत पलांडे (मुंबई ), गणेश कोकरे (सातारा) विजयराज बोधनकर (ठाणे ) सुनील काळे अशा नव्या दमाच्या चित्रकारांनी वाई परिसरातील अनेक चित्रे काढलेली आहेत .

एडवर्ड लियर या ब्रिटीश चित्रकाराने वाईच्या घाटाचे केलेले सुरेख  रेखाटन अरुण टिकेकर यांच्या ‘ स्थलकाल ‘ या पुस्तकात पाहायला मिळते . त्याचबरोबर जॉन फेड्रीक लिस्टर 1871 याने एलफिस्टन पॉईंटची व्हॅली रंगवलेली आहे . तर 1850 साली विल्यम कारपेंटर या चित्रकाराने प्रतापगडाचे विहंगम दृश्य रंगवल्याचे गुगलसर्च केल्यावर सापडले . एम.के . परांडेकर यांनी रेखाटलेल्या ऑर्थरसीट पॉईंटचे चित्र खूप प्रसिद्ध आहे . त्याचबरोबर अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिवंगत श्री . दिवाकर डेंगळे यांनीही पांचगणी वाई महाबळेश्वर येथील चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत .

प्रसिद्ध चित्रकार जहाँगीर साबावाला याचां महाबळेश्वरमध्ये बालचेस्टर नावाचा बंगला आहे . त्यामुळे त्यांनी महाबळेश्वरच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्यांच्या अमूर्त शैलीत ऑईलकलर मध्ये साकारले आहे . नाशिकचे शिवाजी तुपे यांनी घोड्यांचे पार्कींग असलेले इमारतीचे चित्र काढले आहे तर रवि परांजपे यांनी प्रसिद्ध पंचगंगेच्या मंदिराचे प्रवेशद्वार त्यांच्या शैलीत रेखाटले आहे .वासुदेव कामत यांनीही या परिसरात चित्रांकन केलेले आहे .

मेणवली घाट , धोमचे नरसिंहाचे मंदीर , गणपती घाट , गंगापुरी घाट , मधलीआळी घाट , भीमकुंडआळीचा घाट , असा घाटांचा परिसर व मंदिराचे गाव म्हणून जरी वाई प्रसिद्ध असले तरी या घाटांच्या आजूबाजूला वाढलेले स्टॉल्स , टपऱ्या , दुकाने , कातकऱ्यांच्या वस्त्या , स्थानिक नगरपालीकेचे व सर्व घरांचे नदीपात्रात सोडण्यात येत असलेले दुषित सांडपाणी उघडपणे कृष्णा नदीत राजेरोसपणे सोडले जाते . त्यामुळे ट्रॅफिकची प्रचंड वर्दळ , गोंगाट , उघडी नागडी नदीत अंघोळ करणारी माणसे, भांडीकुडी कपडे धुणारी व हागणदारी करत नदीशेजारीच झोपड्यात राहणारी माणसे प्रदुर्षण करतात . मंदिराशेजारची वाढणारी गलीच्छ वस्ती पाहीली की चित्र काढण्याचा चित्रकाराचा मूड जाण्याचीच जास्त शक्यता असते . त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही . भंगारवाल्याच्या टपऱ्या , मेणवली जोर रस्त्यावर जाणाऱ्या जीपगाडया , छोट्या पुलावर बसणारे छोटे व्यावसायिक पाहीले की रस्त्यातून गाडया चालवणे किंब चालत जाणे एक मोठे संकट आहे . तरीही कलामहाविद्यालयाचे विद्यार्थी व चित्रकार येथे येऊन चित्र काढत बसतात . मेणवली घाटावर लेखी परवानगी घेऊन फी देऊन फोटो व चित्र काढावे लागते . मेणवली घाटावर उतरत असताना डाव्या बाजूला जवळच स्मशानभूमीची जागा आहे व त्याशेजारी उघड्यावरची हागणदारी पाहीली की येथे पैसे देऊन चित्र का काढावे असा प्रश्न पडतो . तेथे बसून चित्र काढावे असे कधीकधी वाटत नाही .

खूप वर्षांपूर्वी एकदा फलटणचे रघुनाथराजे निंबाळकर यांच्या घरी राहण्याचा योग आला होता . त्यावेळी औंधचे कलाप्रेमी बाळासाहेब पंतनिधी महाराज यांचे तैलरंगातील २ फूट बाय ३ फूट आकारातील एक मेणवलीच्या घाटाचे चित्र पाहायला मिळाले . त्या चित्रातील वातावरण व शांतता आता कधीच अनुभवता येईल असे वाटत नाही . सगळीकडे व्यापारीकरण सुरु आहे .

पाचगणीच्या टेबललॅन्डच्या पठारावर आता मोठी तटबंदी बांधली आहे . त्याच्या सभोवताली खाण्याच्या टपऱ्या व घोडागाडीची रेलचेल पाहीली की चित्र काढणाराच चकीत होतो . सगळीकडे हॉटेल्स व त्यांच्या जाहीरातीचे फ्लेक्स दिसतात त्यातून निसर्ग शोधावा लागतो . शिवाय अति गर्दीमुळे पर्यटकांचा त्रास असतोच . महाबळेश्वरला शनिवार रविवारी जायचे असेल तर घाटातच ट्रॅफीक जामचा अनुभव येऊन ड्रायव्हींग करताना मुंबई पुण्यासारखा इंच इंच लढवावा लागतो . प्रसिद्ध पॉईंटसवर चित्रे काढणाऱ्या चित्रकारानां परवानगी घ्यावी लागते अन्यथा तुमचे रेखाटलेले चित्र खोडणारे नतद्रष्ट येथे आहेत . नियमांचा बडगा दाखवून कलाप्रेमीनां काम करताना बंद पाडणारे हाकलून देणारे महाभाग येथे आहेत . त्यामुळे कलेविषयी सातारा जिल्हयात अनास्था भरपूर आहे .

संपूर्ण सातारा जिल्हयात एकही कलादालन नसल्याने चित्रकारांनी काढलेली चित्रे प्रदर्शित करण्यासाठी कोठेही जागा नाही . कापडाच्या बांबूच्या कनाती बांधून नाटक असल्यासारखे प्रदर्शन करावे लागते . येथे अनेक व्यावसायिक मंडळी , राजकीय पुढारी , मुख्यमंत्री , आमदार ,खासदार , शिवरायांचे वशंज राजेमंडळी आहेत पण जिल्ह्यात वाई ,पाचगणी ,महाबळेश्वर , सातारा , कराड येथे कोठेही सुसज्ज चित्रप्रदर्शनासाठी कलादालन नाही आणि याची कोणाला लाज वाटत नाही . सगळ्या चित्रकारानां नाईलाजाने पुण्यामुंबईत प्रदर्शनासाठी जावे लागते . एकंदर कलेविषयी खूप लाचार अनास्था या पर्यटनस्थळी आहे . त्यामुळे प्रदर्शने भरत नाहीत , कलाप्रेमी तयार होत नाहीत व कलारसिकही नाहीत .

एकंदर परिस्थिती गंभीर आहे पण चित्रकार मात्र मनाने खंबीर आहेत .

आजही चित्रकार मनापासून चित्रे रेखाटत आहेत व भावी पिढीचेही नवे चित्रकार भविष्यातही चित्रे रेखाटत राहतील कारण निसर्गाची ओढ, जुन्या स्थापत्यशैलीतील मंदीरे,घाट, सहयाद्री पर्वताच्या डोंगरांच्या दूर पसरलेल्या रांगा , भव्य सपाट टेबललॅन्डची पठारे कायम चित्रकारानां प्रेरणा देत राहणारच आहेत . चित्रकारांची ही चित्रे आणखी काही वर्षांनी इतकी महत्वाची असतील कारण जे वेगाने बदल होत आहेत त्या बदलांचे हे एक प्रकारे दस्तीकरण होत असते .निसर्गदेव सदैव दोन्ही हातांनी भरभरून देत राहणार आहे .  माणूस नावाचा प्राणी मात्र निसर्गाची वाट लावायला रोज नवी यंत्रणा राबवतो , त्याच्या कुठे तरी भलताच  ‘ विकास ‘ करण्याच्या प्रयत्नांनां मात्र लगाम घातला पाहीजे .

– समाप्त – 

© श्री सुनील काळे [चित्रकार]

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पालनकर्ता शंकर — ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ पालनकर्ता शंकर – ☆  श्री मकरंद पिंपुटकर

पालनकर्ता शंकर…

पौराणिक कथांमध्ये “शंकर” हा संहार करणारी देवता आहे. मात्र आपल्या महाराष्ट्रात असलेले  ८१ वर्षांचे शंकरबाबा मात्र पालनकर्ता देवतास्वरूप आहेत.

महाराष्ट्रातील ‘अमरावती’ जिल्हा हा तसा कोरडवाहूच. पण येथील ‘परतवाडा’ तालुक्यातल्या रूक्ष ओसाड रखरखाटात, ‘वझ्झर’ गावच्या टेकाडावर मात्र मायेचं हिरवंगार पांघरूण अंथरलेलं आहे. ही माया आहे शंकरबाबा पापळकर यांची. 

खरंतर शंकरबाबा इथे येण्यापूर्वी मुंबईत ‘देवकीनंदन गोपाळ’ नावाचं नियतकालिक चालवत होते. मुंबईतील कुंटणखान्यातील – वेश्या व्यवसायातील स्त्रियांची कुचंबणा त्यांना विद्ध करून गेली.  “त्याहूनही वाईट परिस्थिती होती शारीरिक अथवा मानसिक दृष्ट्या अपंग असणाऱ्या मुलींची. गावोगावांतून अशा मुलींना या ना त्या बहाण्याने मुंबईत आणलं जायचं आणि वेश्या व्यवसायात ढकललं जायचं,” आपल्या कार्याची सुरुवात कशी झाली ते विषद करून सांगताना शंकरबाबा सांगतात.

“मला हे सहन झालं नाही, आणि या अशा व अन्य अनाथ मुलामुलींना सहारा देण्यासाठी वझ्झर येथे मी ‘अंबादासपंत वैद्य बालसदना’ची पायाभरणी केली. जसजशी कामाची माहिती लोकांना होत गेली, विश्वासार्हता वाढत गेली, तसतसे ठिकठिकाणाहून आई वडिलांनी – समाजाने टाकून दिलेल्या अपंग, मतीमंद लेकरांना माझ्याकडे पाठवलं गेलं. अनेकांना तर खुद्द पोलिसांनीच माझ्याकडे आणून सोडलं.”

१९९० ते १९९५ या काळात २५ मुलं आणि ९८ मुली अशी एकूण १२३ लेकरं शंकरबाबांच्या आश्रयाला आली. १९५७ साली पारित झालेल्या कायद्यानुसार, अशा अनाथ मुलांना त्यांच्या वयाच्या १८ वर्षांनंतर ते केंद्र – तो आश्रम सोडणे भाग असतं. 

“पण जे शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत अथवा मतीमंद आहेत, अशांचा हा आधार काढून घेणं सर्वथा अयोग्य आहे. वयाच्या १८ वर्षांनंतर पुन्हा उघड्यावर पडलेले असे हे तरुणतरुणी पुन्हा अनाथ होतात, आणि उदरनिर्वाहासाठी वाम मार्गाला तरी लागतात अथवा कोणी त्यांचा गैरफायदा घेतो,” बाबा कळवळून सांगतात. “म्हणूनच मी कोणतीही सरकारी मदत घेत नाही. त्यामुळे नियमानुसार या मुलांना बाहेर काढणं मला बंधनकारक नाही.”

आणि म्हणूनच मुलांची संख्या १२३ झाल्यावर बाबांनी त्यांचेच नीट लालनपालन करायचे ठरवले, आणखी मुलांना स्वीकारलं नाही. या मुलांना त्यांनी शिकवलं, आपल्या पायावर उभं करण्यासाठी प्रशिक्षण दिलं. 

बाबांना अनेक ठिकाणी आपले अनुभव सांगण्यासाठी बोलावले जाते. अशा कार्यक्रमांत मिळणारे मानधन, देणगी आणि समाजातील अन्य दानशूर व्यक्तींच्या मदतीने त्यांचे हे व्रत चालू राहिले आहे. 

आपल्या आसऱ्याला आलेल्या या सर्वांना बाबांनी आपले नाव दिले. १९ मुलींची लग्नं लावून दिली, अगदी अंध विद्यार्थ्यांच्या देखील शिक्षणाची सोय केली, त्यातील एक अंध विद्यार्थिनी ‘माला शंकरबाबा पापळकर’ तर MPSC परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.

“जी मुलं मतीमंद आहेत, अशांना मी वृक्षवल्लींची निगा राखायला शिकवलं. त्यांच्या मेहनतीनेच आज या बालसदनाच्या अवतीभवती ही वृक्षराजी उभी राहिली आहे.”

बालसदनातील मुलं – तरुण तरुणीच बाकीच्यांची काळजी घेतात. पोलियोग्रस्त रूपा सर्वांना जगातल्या घडामोडींचे updates देते. मूक बधिर ममता आणि पद्मा बाल सदनातील सगळ्यांच्या खानपानाची व्यवस्था बघतात. बेला सगळ्यांच्या दर महिन्याच्या आरोग्य तपासण्या, औषधं, दवाखान्याच्या वाऱ्या सांभाळते. प्रत्येक जण आपापला खारीचा वाटा उचलत असतो.

यंदाच्या वर्षीचा मानाचा “पद्मश्री” पुरस्कार जाहीर झाल्यावर शंकरबाबांची पहिली प्रतिक्रिया होती की “मी पंतप्रधानांची भेट मागणार आहे, १९५७ चा तो कायदा रद्द करणे कसं आवश्यक आहे हे मी त्यांना पटवून देणार आहे.”  

अशा आनंदाच्या क्षणीसुद्धा स्वतःच्या गौरवापेक्षा देशातील अंध, अपंग, मतीमंद अनाथांचे भले कसे होईल हाच विचार प्रथम आला. 

म्हणूनच सुरुवातीला म्हटलं, महाराष्ट्रातला शंकरबाबा पालनकर्ता देवता आहे. 

शंकरबाबांच्या मानवसेवेला साष्टांग दंडवत.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सारे भारतीय माझे ‘बांधव‘ आहेत…?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “सारे भारतीय माझे ‘बांधव‘ आहेत…?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

मी शाळेत गेलो — त्यांनी माझी जात नोंदवून घेतली.

मग आम्ही सर्वांनी….

“सारे भारतीय माझे बांधव आहेत…!” – ही प्रतिज्ञा रोज रोज म्हटली..!

 

त्याला पुस्तके ड्रेस मिळाली, मी पण मागितली…

तर ते म्हणाले, — “तो गरीब आहे.”

“मी पण गरीबच आहे.”

“तू गरीब आहेस मान्य, पण तुझी जात वेगळी आहे.”

 

…. दोन गरीबांची पण जात वेगवेगळी असते हे मला त्या दिवशी कळालं.

 

त्याला शासनाच्या…. फी माफी आणि अन्य सर्व सुविधा मिळत होत्या,

आणि …. माझी आई रोजंदारी करुन माझं शिक्षण करत होती…!

 

आम्ही सोबतच स्पर्धा परीक्षा दिली.

(इथे स्पर्धा हा शब्द थोडा चुकीचा नाही का वाटत..?)

तो सिलेक्ट झाला…

मी नव्हतो झालो…!

 

मी मार्कलिस्ट बघितली तर…

त्याला 150 पैकी…. 108 मार्क होते

आणि मला 145…!

नंतर कळलं,

त्याने फॉर्मसोबत स्वतःचं जात प्रमाणपत्र जोडलं होतं.

स्पर्धेतही जातीची परीक्षा असते…… हे मला त्या दिवशी कळलं !

 

पुढे तो सेटल झाला… चांगला पैसा ही आला.

घर, गाडी सर्व आलं…. त्याचं आयुष्य मजेत चालू झालं…!

 

अधूनमधून कुठे कुठे व्याख्यानंही द्यायचा….

सामाजिक समानतेवर तो भरभरुन बोलायचा….!!

 

एके दिवशी त्याची एका सुंदर मुलीशी भेट झाली….

आणि बघताच त्याला ती खूप आवडली…!

तिच्या मनात काय हे याला नव्हतं माहीत,

तिच्यावर मात्र याची जडली होती प्रित…!

काहीही करुन हवी होती ती त्याला…

तिला मिळवण्याचा खटाटोप त्याने सुरु केला.

एके दिवशी मात्र तो गारच पडला,

तिची जात दुसरी…. हे माहीत झालं त्याला..!

प्रचंड संतापला ….. अन् पारा त्याचा चढ़ला,

जातीच्या ठेकेदारांवर …. जोराने ओरडला..!

….. हा जातिभेद काही मूर्खांनी तयार केला,

माणूस सर्व एकच असतो कोण सांगेल यांना…?

 

नंतर मग,

त्याच्या व्याख्यानाचा एकच विषय असायचा….

‘ जात गाडून टाका ‘

भरसभेत सांगायचा…!

 

आत्तापर्यन्त साथ देणारी ” जात “च बाधक झाली होती….

त्याची मात्र यामुळे पुरती गोची झाली होती…!

 

काय करावे सुचेना त्याला…

आपली जात आडवी येतेय…

सर्व आहे पण एका गोष्टीमुळे मन बैचैन होतेय…!

 

एके दिवशी तो असाच… स्वतःची फाईल चाळत होता,

रागारागाने तो आपल्याच ” जात ” प्रमाणपत्राकडे पाहत होता !

 

त्याच्याकडे बघून … ते प्रमाणपत्र ही हसले….

” चुकतोयस बेटा तू,.. जरा विचार कर “ म्हणाले…!

 

ज्या जातीने जगवलं तिचाच तुला आता राग येतोय….

फायदा बघून स्वतःचा….. तूच आज स्वार्थी होतोयस…!

 

तो बघ… तुझ्या सोबतचा “तो” गुणी मुलगा,

खाजगी कंपनीत जातोय….माझ्यामुळे बेट्या,

तू मात्र…. सुखाची रोटी खातोयस…!

 

जातिभेद वाईट…. हे कुणीही मान्य करेल,

पण तुला तेव्हाच हे खटंकतय …. 

जेव्हा ते तुझ्या हिताआड येतंय…!!

 

याआधी तूही तुझी जात अभिमानाने मिरवायचास…

जातीमुळे मिळणारे सर्व फायदे…तोऱ्यात उचलायचास…!

 

हे ऐकून तो थोडा स्तब्धच झाला….

मनाशी काही विचार करता झाला….!

 

त्या दिवशी “तो” माझ्या लग्नात आगंतुक पाहुणा म्हणून आला….

“जिंकलास गड्या तूच…” .. मजपाशी येऊन म्हणाला…!

 

रोख त्याच्या बोलण्याचा मलाही कळला होता….

त्याला आवडणाऱ्या मुलीच्या गळ्यात,

मी हार घातलेला होता…!

 

तीच सुंदरी माझी जीवनसाथी झाली होती,

कारण तिची न् माझी … जात एकच होती…!

 

कसं आहे ना भावा…

जीवनात प्रत्येकाला सर्वच मिळत नसतं…

कुठे न कुठे प्रत्येकाला नमतं घ्यावंच लागतं…!

 

तुला तुझी जात प्यारी तशीच माझी मलाही…!!

कशाला तत्वज्ञान सांगतोयस भावा….

फायद्यासाठी काहीही..?

 

खरंच दूर करायचेत का जातिभेद?

चल मग दोघे मिळून करु…

जातीवर नको,

जो आर्थिक गरीब त्यालाच स्कॉलरशिप,सवलती मिळवून देऊ…!

 

जात प्रमाणपत्रे कशाला वाटायची…

आपण फक्त भारतीय होऊ….

तू अन् मी एकच .. हीच शिकवण सर्वांना देऊ…!

 

ज्याच्यात असेल गुणवत्ता .. त्याचंच सिलेक्शन होईल…

त्या दिवशी माझा देश .. खऱ्या अर्थाने महान होईल….!

 

तू ही माणूस मी ही माणूस, मग कसला आपल्यात भेद?

जातीत विखुरला माणूस..  त्याचाच वाटतो खेद..!

 

जात हा मुद्दा भाऊ निवडणुकीतही गाजतो…

दरवेळी तुमचा उमेदवार इलेक्शन त्यावरच जिंकतो…!

 

तुझे अन् माझे लालच रक्त,

माणूस आपली जात…

स्वार्थ नको.. आणू थोडी उदात्तता हृदयात…!

 

माहीत मजला रुचणार नाही, हे कधीही सर्वांना अजिबात ….

कारण,

प्रत्येकाला हवीय येथे….आपल्या सोईची “जात”……!!

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares