मराठी साहित्य – विविधा ☆ “आईपण पेलताना” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

🔅 विविधा 🔅

☆ “आईपण पेलताना…” ☆ सौ. अंजोर चाफेकर

तसे पाहिले तर आमच्या पिढीनेही नोकरी, करिअर सांभाळत मुलांना वाढविले.

परंतु मी जेव्हा  माझ्या मध्यमवर्गीय परीघातील पुढची पिढी बघते तेव्हा जीवाची घालमेल होते.

आज स्रीला किती आव्हानांना सामोरे जावे लागते आहे.

केवळ संसाराला हातभार म्हणून अर्थाजन नाही.

तिची करीअर, तिने निवडलेल्या क्षेत्रात तिला ठोस प्रगती करायची आहे.स्वतःला सिद्ध करायचे आहे.त्यामुळे तिचे कामाचे तास वाढले आहेत.९ते५ इतकी मर्यादित कामाची चौकट राहिली नाही.

 

हे सर्व करताना तिचे आईपण ही पेलायचे आहे.

 

सकाळी मुलाला शाळेच्या बस मधे सोडून आले की भरभर आटपून ऑफीसची तयारी.

जेवणाचे डबे,मुलाच्या नाश्त्याचा डबा, संध्याकाळच्या जेवणाची तयारी,सेमिनारची तयारी, मुलांचा अभ्यास,वयस्क आईबाबांची काळजी, त्यांच्या डाॅक्टरच्या अपाॅयन्टमेंट्स आणि बरंच काही.

कधी कधी मनात अपराधीपणाची भावना येते.

‘मी मुलाला त्याच्या वाढत्या वयात पुरेसा वेळ देऊ शकत नाही.’असे शल्य मनाला बोचत होते.

 

मुलाचा अभ्यास इतका वाढलाय.

शिवाय त्याच्या सर्वांगीण विकासासाठी पियानोचा क्लास,

क्रिकेट किंवा फुटबॉलचे कोचिंग,स्वीमिंगचा क्लास, वेदिक मॅथ्स आणि बरंच काही…

 

ऑफीसच्या डेड लाईन्स,कधी कामासाठी बाहेरगावी किंवा परदेशात टूरिंग तर कधी वर्क फ्राॅम होम.

कधी मनाला मरगळ येते, खूप गळून गेल्यासारखे वाटते पण उसंत घ्यायला वेळच नसतो.

ब-राच वेळा जोडीदाराचेही टूरिंग चालू असते. त्यामुळे सिंगल पेअरेंटिंग हाताळावे लागते.

माझ्या ओळखीतली बरीच कपल्स मला म्हणतात, काकी, मूल झाल्यावर आमचे आयूष्यच बदलून गेले.

मूल नव्हते तेव्हा आम्ही खूप कुल होतो.

म्हणजे आईपणाचा आनंदही नीट भोगता येत नाही.

 

हल्ली मुली उशीरा मूल होऊन देतात.

माझ्या ओळखीतल्या एका मुलीला वयाच्या ४०व्या वर्षी जुळ्या मुली झाल्या.

तिने त्यांना सांभाळण्यासाठी  जाॅब सोडला.

तिची आईही आता वयस्क, कशी सांभाळणार या वयात जुळ्या मुलींना?

इतक्या उशीरा मूल झाल्याचा आनंद तर झाला परंतु करिअर सुटल्यामुळे डिप्रेशन आले.आईपण लाभणे ही जशी प्रत्येक स्रीची मानसिक व शारीरिक गरज असते

तसेच हल्ली स्वतःची ओळख असणे ही स्रीची मानसिक गरज असते.आता तिच्या जुळ्या मुली 1वर्षाच्या झाल्यावर तिने जाॅब घेतला.होते थोडी तारांबळ, पण करते मॅनेज.

दोघेही तरूण नवरा बायको  हे नोकरीतल्या कामाचा ताण,स्पर्धा ,उच्च राहणीमान व   कर्जाचे हप्ते यामुळे चिडचिडे झालेले असतात.एकमेकांना वेळ देऊ न शकल्यामुळे एकमेकांना समजून घ्यायला कमी पडतात.

अगदी प्रेमविवाह असला तरी कधी कधी दोघांचे पेटेनासे होते. अशावेळी आपल्या दोघांतील तणाव मुलाला समजू नये यासाठी स्रीची धडपड चालू असते.एकाच वेळी तिला किती अवधाने सांभाळावी लागतात.

स्री जेव्हा माता बनते तेव्हा तिच्यामुळे तिच्याही नकळत एक शक्तीचा स्रोत निर्माण होतो.

जननी हे शक्तीचे पहिले विकसीत रुप आहे.

आपल्या देशात स्रीचे पूजन हे तिच्यातील मातेचे पूजन असते.कारण मातेमधे एक ईश्वरी अंश आहे असे मानले जाते.

आपण माता यशोदा,जीजामाता अशा अनेक मातांना मानतो कारण त्यांनी आपल्या अपत्यांना घडविले.

त्या असामान्य माता असतील.

पण आमच्या आजच्या पिढीच्या सामान्य माता सुद्धा असामान्य आहेत. किती समर्थपणे त्या आपले आईपण पेलत आहेत.वेळेची कसरत करून,अव्याहत काम करून त्या स्वतःलाही घडवतात व आपल्या मुलांचेही भविष्य घडवत आहेत.शिवाय जिद्दीने परिस्थितीला टक्कर देत आहेत.

मला खरंच खूप कौतुक वाटते आजच्या पिढीतल्या या तरूण मातांचे.

या अशा दोन्ही आघाड्या सांभाळणा-रा स्त्रियांकडे बघण्याचा आपला द्रृष्टिकोन आपण कौतुकाचा असला पाहिजे.तिला पुरणपोळ्या किंवा मोदक बनवता नसतील येत. आलेल्या पाहुण्यांची सरबराई करायला वेळ नसेल.

तरीही ती तिच्या परीने स्वीगी, अमॅझाॅन च्या मदतीने वाढदिवस वगैरे साजरे करते.

तिने कितीही स्वतःला सुपर वुमन बनविण्याचा प्रयत्न केला तरी तिला लिमिटेशन्स येणारच.तेव्हा आपणच आई वडील या नात्याने, शेजारी य नात्याने,समाज म्हणून तिला मदतीचा हात पुढे केला पाहिजे.

©  सौ.अंजोर चाफेकर, मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाई, पाचगणी व महाबळेश्वरचे कलापर्यटन – भाग – १ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

🌟 वाई, पाचगणी व महाबळेश्वरचे कलापर्यटन – भाग – १ 🌟 श्री सुनील काळे 🌟

(लोकसत्ता – 24 फेब्रूवारी 2024 . पर्यटन विशेषांक)

वाई ,पाचगणी आणि महाबळेश्वर ही महाराष्ट्राची नावाजलेली ठिकाणे आहेत . वाई हे पर्यटनाच्या दृष्टीने तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते, काही जण वाईला दक्षिण काशी असेही संबोधतात . तीर्थक्षेत्र ही जशी वाईची ओळख आहे तसेच फार पूर्वीपासून विद्वान मंडळीचे गाव किंवा विश्वकोश निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींमुळे वाईला महत्व प्राप्त झाले आहे .

वाई पासून बारा कि .मी अंतरावर पसरणीचा वेडावाकडा घाट पार करून पोहचले की थंडगार वाऱ्याच्या झुळका सुरु झाल्या की ओळखायचे आपण पाचगणीत पोहचत आहोत . पर्यटनाच्या दृष्टीने थंड हवेचे ठिकाण म्हणून पाचगणीला ओळखतातच पण त्याहीपेक्षा ब्रिटींशानी सुरु केलेल्या रेसिडेन्सल बोर्डींग स्कूल्समुळे पांचगणीला एक नवी ओळख मिळाली आहे .

महाबळेश्वर हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नंदनवन व उंचावर असलेले गिरिस्थान आहे . थंड हवेच्या ठिकाणाबरोबरच महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणूनही महाबळेश्वरला महत्व आहे . क्षेत्र महाबळेश्वर येथील पुरातन पंचगगा व कृष्णाबाईचे मंदीरे , कृष्णा नदीचे उगमस्थान व पंचनद्याचे संगमस्थान यामुळे तीर्थक्षेत्र म्हणूनही प्राचीन काळापासून क्षेत्रमहाबळेश्वर सुप्रसिद्ध होते . अशा या महाबळेश्वर पाचगणीला खऱ्या अर्थाने विकसित करण्याचे श्रेय मात्र ब्रिटिशांना किंवा गोऱ्यासाहेबांना दिलेच पाहीजे . याचे मुख्य कारण म्हणजे येथील थंडगार हवा , सुंदर वनश्री , आल्हाददायक वातावरण ही वैशिष्ठये असली तरी या ठिकाणाला येण्यासाठी चांगले रस्ते नव्हते . राहण्यासाठी प्रशस्त बंगले , निवासस्थाने , क्लब्ज , बाजारपेठ , नव्या सुंदर पॉईंटसचा शोध घेऊन तेथपर्यंत अवघड डोंगराळ जागी पोहचण्यासाठी लागणारे रस्ते विकसित करण्याचे काम ब्रिटीश राजवटीत सुरु झाले . पुणे किंवा मुंबईतील असह्य उकाड्यामुळे उन्हाळ्यातील मे महिन्यात व्हाईसरॉय , गव्हर्नरसाहेब यांनी राज्यकारभार करण्यासाठी महाबळेश्वर येथून राजभवन किंवा गव्हर्नर हाऊस नावाचे प्रशस्त बंगले बांधले व खऱ्या अर्थाने पर्यटनाची कारकीर्द सुरू केली . या ठिकाणांचा प्रसार व प्रचार केला त्यामुळे अनेक ब्रिटीश अधिकारी व भारतातील राजे , श्रीमंत व्यापारी , प्रसिद्ध उदयोजक त्यांची बायका मुले  सर्व परिवार घेऊन मित्रमंडळीसोबत सातत्याने  येथे येऊ लागली व हळूहळू खऱ्या जीवनावश्यक सुविधा येथे पुरविल्या जाऊ लागल्या . त्याचबरोबर अनेक इंग्रज कलाकार मंडळी येथे निसर्गचित्र काढण्यासाठी येऊ लागले .

परमेश्वराकडे माझ्या अनेक तक्रारी आहेत पण एका गोष्टीविषयी मी सतत त्याचा कृतज्ञ आहे की त्याने माझा जन्म व बालपण पाचगणीसारख्या सुंदर  निसर्गरम्यस्थानी  घालवले . लोकसत्ताने जेव्हा या तीन ठिकाणी चित्रकाराच्यादृष्टीने या पर्यटनस्थळांचे काय महत्व आहे असा विषय मांडायला सांगितले त्यावेळी जवळपास पन्नासवर्षांपासूनचा एका कलाकाराचा समृद्ध जीवनपटच माझ्या डोळ्यापुढे सरकला . सगळ्या आठवणी जाग्या झाल्या सष्टपणे डोळ्यासमोर चित्र दिसू लागले .

साधारण पन्नासपूर्वी म्हणजे 1975 च्या दरम्यान आम्ही मुले पाचगणीच्या मराठी शाळेत  शिकत होतो . त्या कोवळ्या आठ दहा या बालीश  वयात पाचगणीच्या गावाबाहेर जकात नाक्याशेजारी एका शनिवारच्या अर्ध्या दिवसाच्या शाळेनंतर आम्ही मुले शाळा सारावण्यासाठी शेण गोळा करायला जात होतो . त्यावेळी त्या दुपारच्या शांत वेळी एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले . एक वयस्कर जाडजूड रिचर्ड ॲटनबरोसारखा दिसणारा गोरापान म्हातारा माणूस डोक्यावर मोठी फेल्टहॅट घालून रंगाची एक मोठी पेटी घेऊन छान ब्रशेस कागदाचे पॅड घेऊन बिलिमोरीया स्कूलच्या बाहेर मुख्य रस्त्याच्या कडेला निवांतपणे एक चित्र काढत होता . हा म्हातारा नेमके काय करतोय हे पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी आम्ही मुले त्याच्या बाजूला गोळा झालो . अतिशय व्यवस्थित काटेकोरपणे समोरच्या दृश्याचे पेन्सीलने केलेले रेखाटन व सुंदर रंगसगतीने चित्रित केलेले कृष्णाव्हॅलीचे ते पाहिलेले पहीले

डेमोन्सस्ट्रेशन नंतरच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले . सगळी मुले गेली पण मी मात्र या गोऱ्या चित्रकाराचा शेवटपर्यंत पाठलाग केला . त्यावेळी ते गृहस्थ पाचगणीच्या प्रसिद्ध एम आर ए या राजमोहन गांधी यांच्या संस्थेत गेले . पुढे मोठे झाल्यानंतर त्यांचे नाव व कार्य कळले . या चित्रकाराचे नाव होते  गॉर्डन ब्राऊन . हे मूळचे ऑस्ट्रेलियाचे पण त्यांनी नैतिक पुनरुत्थान केन्द्र (MRA ) ही संस्था उभी करण्यासाठी आर्किटेक्ट म्हणून फुकट काम केले . राजमोहन यांच्या प्रेमाखातर ऑस्ट्रेलियातून स्वखर्चाने येऊन संस्थेचे वास्तूनिर्मितीचे नियोजन व पूर्ण त्रेसष्ट एकरात एक भव्य प्रकल्प उभा केला . पण येथील सुंदर वातावरण , टेबललॅन्डची पठाराखालची संस्था , कृष्णा व्हॅलीची , रस्त्यांची त्यांनी अनेक चित्रे जलरंगात साकारली . त्यातील काही चित्रे एम आर ए या संस्थेच्या इमारतीमध्ये आजही पाहता येतात .

त्यानंतर कलाशिक्षक सुभाष बोंगाळे यांनी अनेक चित्रे जलरंगात जागेवर जाऊन रेखाटलेली आहेत . हिरव्या शेवाळी रंगाच्या सायकलला एक पाठीमागे स्टॅन्ड बांधून रंगाचे सामान घेऊन सिडने पॉईंटच्या व्हॅलीत बोंगाळे सर सतत स्केचिंग व लॅन्डसेकप्स करत बसायचे . पाचगणीच्या या संराच्या चित्रनिर्मितीच प्रेरणा घेऊन मी या लेखाचा लेखक  सुनील काळे आयुष्यभर या परिसरात रेखाटणे करत व जलरंग वापरून सातत्याने तीस पस्तीस वर्ष चित्र काढत राहीलो आहे . कृष्णानदीच्या किनाऱ्यावर धोमधरण बांधल्यानंतर पाचगणीच्या विविध भागातून दिसणारे विहंगम दृश्य , चिखली , पसरणी या गावांची बारावाडीची दिसणारी भातशेती , चमकणाऱ्या सह्याद्री पर्वताच्या रांगा , पाचगणीचे दुतर्फा रस्त्याच्या बाजूला असलेली भव्य वडाची झाडे , अशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सपाट पठार म्हणून प्रसिद्ध असलेली टेबललॅन्डची पठारे या पाच पठारावरून दिसणारे पाचगणी गावाचे दृश्य विलोभनीय दिसते . खिंगर , दांडेघर , आंब्रळ , राजपुरी , तायघाट , भिलार या सभोवतालच्या गावामध्ये पसरलेले शंभर एकरचे एकेक सपाट पठार रंगवणे हे आयुष्यभर आनंद देणारे कार्य ठरले . ब्रिटिशांनी त्यांच्या मुलांमुलीसाठी येथे प्रथम त्यांचा जॉन चेसन नावाचा रिटायर्ड ऑफीसर पाठवून भरपूर अभ्यास केला . सिल्व्हर वृक्षाची झाडे लावली . प्रत्येक वर्षातील बारा महिन्यांचे तापमान पाहून तीनही ऋतूमध्ये काय काय फरक दिसतो याच्या सविस्तर नोंदी केल्या . रिकाम्या पसरलेल्या जागेत मोठ्या शाळा व राहण्यासाठी वसतिगृहे बांधली बंगले बांधले . रस्त्यांचे नियोजन केले . स्ट्रॉबेरी , बटाटा , कॉफी व इतर अनेक फळझाडे वृक्षांची लागवड केली . नगरपालीका बांधली . ऑफीसर्स राहण्यासाठी विश्रामगृहे बांधली . प्रथमच टेबललॅन्डच्या पायथ्याशी शाळा बांधली या शाळांपैकी सेंट जोसेफ स्कूल , किमिन्स स्कूल , सेंट पीटर्स स्कूल , यांनी सव्वाशे वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे .

परंतू सव्वाशे वर्ष होवूनसुद्धा  आजही किमिन्स , सेंट जोसेफ या शाळांमध्ये उत्तम दर्जाचे सुशिक्षित कलाशिक्षक नसल्याने चांगले कलाकार निर्माण झाले नाहीत किंवा कलापरंपरां निर्माण झाली नाही . चित्रसंस्कृती टिकून राहीली नाही ही दुर्देवाची गोष्ट आहे .

सुनील व स्वाती काळे या दाम्पत्याने मात्र या परिसराचा सखोल अभ्यास करून येथील किमिन्स , सेंट पीटर्स , बिलीमोरीया , या शाळांसोबत अनेक ब्रिटीशकालीन बंगले , पारशी लोकांचे बंगले , अग्यारी , चर्चेस , या वास्तूंचे जलरंगात चित्रिकरण केले . गावातील मुख्यरस्ते , सुंदर वनश्री , गार्डनमधील फुले , कुंड्या , कॉसमॉस , हॉलिहॉक्स ,वॉटरलिलीज , रानफुले  तैलरंगात रंगवून पाचगणीचा निसर्ग अनेक मान्यवर कलाप्रेमी मंडळीच्या घरी व अनेक देशात चित्रे विकली त्यामुळे पाचगणी ,महाबळेश्वर व वाईपरिसरातील चित्रकार म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे . नुकतेच त्यांचे प्रदर्शन नेहरू सेंटर येथील AC व सर्क्युलर आर्ट गॅलरीमध्ये भरले होते त्याठिकाणी त्यांनां चित्र रसिकांकडून भरघोस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला .

वाई हे ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचे गाव आहे . लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विश्वकोष निर्मितीचे संपादक मंडळाचे प्रमुख म्हणून अनेक वर्ष काम केले . त्याकामासाठी अनेक तज्ञ व नावाजलेले चित्रकार वाई येथे कलासंपादक म्हणून येऊ लागले .

प्रसिद्ध चित्रकार व जेजे स्कूल ऑफ मुंबईचे डिन असलेले ज . द . गोंधळेकर वाईच्या  विश्वकोषात काही वर्षांसाठी आले होते . त्यांनी गणपती घाट , मधलीआळी घाट , मेणवली घाट येथे पेनने व जलरंगात चित्रे काढलेली आहेत .

– क्रमशः भाग पहिला 

© श्री सुनील काळे [चित्रकार]

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अय्यर सर —एक अविश्वसनीय सत्यकथा” – लेखक : श्री हेरंब कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “अय्यर सर —एक अविश्वसनीय सत्यकथा” – लेखक : श्री हेरंब कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

(आयुष्यभर लॉजच्या खोलीत राहून उरलेला पगार विद्यार्थ्यांसाठी खर्च करणार्‍या एका प्राध्यापकाची ही कहाणी)

*रूम नंबर २०२*

*श्रीकृष्ण रेस्टार्ंट बारामती.*

*प्रवासी मुक्कामाला आला आणि त्याने चेक आऊट ३५ वर्षांनी केलयं …..*

*शेवटची ओळ नाही ना समजली ? नाहीच समजणार. कारण ती आहेच अगम्य.*

*याचा अर्थ त्या हॉटेलात राहायला आलेला प्रवासी एकाच खोलीत ३५ वर्षे राहिला. ८ बाय १० च्या इवल्याश्या खोलीत. आणि आयुष्यभर फिरत होता सायकलवर.*

*का ? परिस्थिती गरीब होती म्हणून का ?*

*मुळीच नाही. वरिष्ठ महाविद्यालयात नोकरी करणारे ते प्राध्यापक होते. होय. गोंधळ उडावा असंच हे प्रकरण आहे. के.एस.अय्यर. बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात सेवा केलेले आणि नुकतेच ५ महीन्यापूर्वी निधन पावलेले.*

*पूर्वी एकदा कवीमित्र संतोष पवार यांनी पगार विद्यार्थ्यांसाठी खर्च करून फकीरी वृत्तीने जगणारा एक प्राध्यापक असल्याचे सांगितले होते. मात्र सर गेल्यावर तपशीलवार माहिती कळली आणि या माणसाला आपण का शोधले नाही, याची जन्मभर व्यापून उरणारी अपराधी बोचणी लागली.*

*नुकताच बारामतीला शारदा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला गेल्यावर आवर्जून सरांनी ज्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात काम केले तिथे गेलो. तिथल्या उपप्राचार्य नेमाडे मॅडम, संजय खिलारे सर, कार्यालय प्रमुख महामुनी, दिपक भुसे हे सारे अय्यर सरांविषयी भरभरून बोलत होते. आपल्याकडे माणूस जिथे राहतो, नोकरी करतो, तिथे त्याच्याविषयी चांगले बोलण्याची प्रथा नाही… पण अय्यर सरांनी सर्वांचे टोकाचे प्रेम आणि आदर मिळवला होता. माझ्यासोबत तिथे आलेल्या मार्तंड जोरी या अभ्यासू शिक्षक मित्राने नंतर मग सरांची माहिती जमवायला मला खूप परिश्रमपूर्वक मदत केली.*

*आज प्राध्यापकांचे वाढते पगार त्यातून येत चाललेली सुखासीनता, त्यातून कमी होत जाणारी ज्ञानलालसा, मिळणार्‍या पैशातून बदलत जाणारी जीवनशैली आणि कमी होणारे सामाजिक भान… यामुळे अपवाद वगळता प्राध्यापक वर्गाविषयी नाराजी व्यक्त होत असते. अशा काळात एक प्राध्यापक आपल्या ध्येयवादाने अविवाहित राहतो, केरळ मधून महाराष्ट्रात येतो, आपल्या इंग्रजी अध्यापनाने विद्यार्थ्यांना वेड लावतो, आणि माणूस किती कमी गरजांत राहू शकतो, याचा वस्तूपाठ जगून दाखवतो, हे अविश्वसनीय वाटावे असेच आहे.* 

*इतके मोठे वेतन असूनही लॉजच्या ८ बाय १० च्या खोलीत एक कॉट. मोजकेच कपडे, एक कपाट आणि त्यात पुस्तके पुस्तके आणि पुस्तके एवढाच या माणसाचा संसार होता. आयुष्यभर सायकल वापरली. गरजा खूपच कमी. मार्तंड जोरी त्या लॉजच्या वेटरला भेटले, तेव्हा सर केवळ एकवेळ जेवत व एक ते दीड पोळी खात असे सांगितले. त्या वेटरला सुद्धा ते अहो जाहो म्हणून आदराने वागवत. इतक्या फकीरीत राहताना मग वेतन आयोग लागू झाल्यावर या माणसाने पगारवाढ देवू नका मला गरज नाही असे म्हणायचे. मग सहकारी चिडायचे. संघर्षाचा स्वभाव नाही. सर शांतपणे सर्वांचा आग्रह म्हणून पगार नाइलाजाने स्वीकारत.*

 *पाचव्या वेतन आयोगाच्या वेळी ते नाइलाजाने स्वीकारताना सरांनी फरकाच्या ५०००० रुपये रकमेतून पुस्तके स्वीकारण्याची महाविद्यालयाला उलटी अट घातली. ही निस्पृहता होती.*

 *सरांचा जन्म १९३३ साली केरळात झाला. वडील सैन्यात होते. शिक्षण राजस्थान बंगालमध्ये झाले. सुरवातीला सरांनी रेल्वेत नोकरी केली. कुटुंबातील सर्वजण सुखवस्तू आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेतून १९६८ साली शिक्षक झाले. कराडला नोकरी केली. नंतर बारामतीत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात अखेरपर्यंत राहिले.*

 *त्यांच्यात हा साधेपणा व ध्येयवाद कशातून आला याचा शोध घेतल्यावर लक्षात आले की, हा गांधींचा प्रभाव आहे. महात्मा गांधींना लहानपणी ते भेटले होते. त्यातून गांधींचा खूप अभ्यास केला. गांधीवादी मूल्य नकळत जगण्यात उतरली. सर आंबेडकरांना आणि गाडगेबाबाबांना भेटले होते. आंबेडकरांची अनेक भाषणे त्यांनी ऐकली होती. त्यातून अभ्यासाची प्रेरणा जागली असावी. स्वातंत्रपूर्व मूल्यांच्या प्रभावातून सरांचे हे सारे साधेपण ध्येयवाद आला होता.*

 *केवळ साधेपणासाठी कौतुक करावे असेही नव्हते, तर सरांचे इंग्रजी विषयाचे अध्यापन हे अत्यंत प्रभावी होते. सर समजा अगदी गाडी वापरुन बंगल्यात राहिले असते, तरी केवळ इंग्रजी शिक्षणासाठी त्यांच्या हजारो विद्यार्थ्यांनी त्यांना लक्षात ठेवले असते. त्यांच्या विद्यार्थांना त्यांच्या अध्यापनाची पद्धती विचारली, तेव्हा सरांची काही शिक्षक म्हणून वैशिष्ट्ये लक्षात आली. सर इंग्रजी साहित्यातील नाटक, कविता, समीक्षा सारख्याच सामर्थ्याने शिकवू शकत. विशेषत: समीक्षेवर खूपच प्रभुत्व होते. सलग घडयाळी 3 तास ते शिकवत. घडयाळी ८ तास शिकवण्याचेही रेकॉर्ड केले. इतकी नोकरी होऊनही प्रत्येकवेळी वाचन करून नोट्स काढूनच वर्गात जात. त्या नोट्स च्या झेरॉक्स करून विद्यार्थ्यांना फुकट वाटत.*

 *सर कधीच चिडत नसत किंवा कधीच बसून शिकवत नसत. १९९५ नंतर निवृत्तींनंतर त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले पुण्यात ३ दिवस ते अध्यापन करीत व ३ दिवस बारामतीत अध्यापन. मृत्यू झाला त्या महिन्यात ही ८३ व्या वर्षीही ते तास घेत होते. याची तुलना रविंद्रनाथांशीच फक्त होऊ शकते. असा आजन्म शिक्षक म्हणून राहिलेला आणि कधीह निवृत्त न झालेला हा शिक्षक होता. शेकडो PhD चे प्रबंध त्यांनी तपासून दिले. नेट सेट सुरू झाल्यावर मोफत मार्गदर्शन सुरू केले. इंग्रजीसोबत त्यांना अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, खेळ याविषयात विलक्षण गती होती.*

 *क्रिकेट चे तर १० वर्षापूर्वीचे तपशील ते अगदी सहज सांगत. सर रिकाम्या वेळेत सतत वाचन करीत. अगदी बँकेत, दवाखान्यात प्रतिक्षा करावी लागे, तेव्हा तिथेही ते पुस्तक वाचत बसत. त्यांच्या लहानशी खोली फक्त पुस्तकांनीच भरली होती. त्यांनी मृत्यूनंतर ही पुस्तके विविध महाविद्यालयांना द्यायला सांगितली होती. सरांनी इंग्रजीत दोन पुस्तके व अनेक संशोधकीय पेपर्स लिहिले.*

 *विद्यार्थ्यांवरचे प्रेम पुत्रवत होते. एम.ए.च्या प्रत्येक बॅच नंतर ते हॉटेलात निरोप समारंभ आयोजित करीत. मुलांना जेवण देत. नंतर ग्रुप फोटो काढून तो फ्रेम करून स्वत:च्या खर्चाने प्रत्येक मुलाला देत. महाविद्यालयात असताना त्यांना निरोपसमारंभात भाग घेता आला नव्हता हे त्यांना शल्य होते. या माणसाचे विद्यार्थी हाच त्यांचा संसार. पगारातील उरलेली सर्व रक्क्म पुस्तके आणि विद्यार्थ्यांच्या फीसाठी ते खर्च करीत. सरांच्या मदतीमुळे माझे शिक्षण पूर्ण झाले, असे सांगणारे आज अनेक विद्यार्थी आहेत. त्यांनी किती विद्यार्थ्यांना काय स्वरूपाची मदत केली, हे त्यांच्या निस्पृह स्वभावामुळे कुणालाच कळले नाही. पण ती संख्या प्रचंड होती.*

 *मला अय्यर सरांचे मोठेपण भारतीय गुरुपरंपरेशी जोडावेसे वाटते. या देशातील ऋषींच्या आश्रमात अगदी राजपुत्र शिकायला असायचे, पण ऋषीच्या जगण्यात फकीरी होती. ज्ञान हीच त्यांची ओळख असायची. कुठेतरी झोपडी बांधून ज्ञानाच्या सामर्थ्याने दीपवणारी ही भारतीय गुरूपरंपरा होती. अय्यर सर हे या परंपरेचे पाईक होते. भारतीय मनाला ही फकीरी भावते. महात्मा गांधी पासून राम मनोहर लोहिया, मेधा पाटकर अण्णा हजारेंपर्यंत भारतीय मन या फकीरीतल्या श्रीमंतीपुढे झुकते. अय्यर सरांनी पुन्हा ही परंपरा जिवंत केली, जगून दाखवली.*

 *या माणसाने आपल्या या फकिरीच्या बीजावर प्रसिद्धीच पीक काढलं नाही. निष्कांचन, अनामिक राहून देवघरातील नंदादीपासारखा हा माणूस तेवत राहिला आणि एक दिवस विझून गेला. आपल्या आयुष्याच्या सन्मानाची किंवा त्यागाच्या वसुलीची कोणतीच अपेक्षा नव्हती. या त्यागातून मिळालेल्या नैतिक अधिकारातून आजच्या चंगळवादी समाजाला किंवा बांधिलकी विसरत चाललेल्या शिक्षणक्षेत्रावर कोरडे ओढण्याचा अधिकार मिळूनही त्यांनी तो वापरला नाही. स्वत:च्या जीवन तत्वज्ञानावर लेख लिहिले नाहीत की भाषणे केली नाहीत. ते फक्त जगत राहिले. त्यांच्या आदर्श बापुजींच्या भाषेत ‘मेरा जीवन मेरा संदेश ‘ पण समाज, शासन, विद्यापीठ म्हणून आपण या माणसाची नोंद घेतली नाही.*

 *अय्यर सर गेले. ज्या पुणे विद्यापीठात वयाच्या ८३ व्या वर्षीपर्यन्त त्यांनी शिकविले. त्या विद्यापीठाने किमान या अनामिक जगलेल्या आणि तन मन आणि धनसुद्धा विद्यार्थ्यांना अर्पण केलेल्या या दधीचि ऋषीचे चरित्र प्रसिद्ध करून ते प्रत्येक प्राध्यापक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवावे आणि ही प्रेरणा संक्रमित करावी. अन्यथा आइनस्टाईन म्हणाला होता तसे ‘असा हाडामांसाचा माणूस होऊन गेला यावर भावी पिढी विश्वाससुद्धा ठेवणार नाही.’*

लेखक : हेरंब कुलकर्णी.

मो. 8208589195

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ न सांगितले गेलेले छत्रपती…!!! – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ न सांगितले गेलेले छत्रपती…!!! – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रमुख्याने फक्त या तीनच गोष्टी सांगितल्या जातात….!

1.अफजलखानाचा कोथळा 

2.शाहीस्तेखानाची बोटे आणि

3.आग्र्याहुन हून सुटका

पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावेसे वाटतील….!

  1. आपल्या आईला जिजाऊ मॉसाहेबांना सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज”सामाजिक क्रांती” करणारे होते…!
  2. रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे”लोकपालक” राजे होते…!
  3. सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे”उत्तम प्रशासक” होते…!
  4. विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे”पर्यावरण रक्षक” होते…!
  5. समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे”स्व-धर्मचिकित्सक” होते …!
  6. मुहूर्त न पाहता, अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून “अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारेचिकीत्सक राजे”
  7. ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे !”जलतज्ञ” राजे छत्रपती शिवराय!!
  8. ३५० वर्षांपूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य असे१०० राहून अधिक गडकिल्ल्यांचे निर्माते,”उत्तम अभियंते राजे”
  9. सर्व जातीधर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे!!
  10. परस्त्री मातेसमान मानत महिलांनासन्मानाने वागवाणारे”मातृभक्त, नारीरक्षक” छत्रपती शिवराय
  11. संपुर्ण विश्वात फक्त छत्रपती शिवरायांच्या दरबारातच मनोरंजनासाठी कोणतीही स्री नर्तीका नाचवली गेली नाही की मद्याचे प्याले ही रिचवले गेले नाहीत

खऱ्या अर्थाने ते “लोकराजे” होते कारण ते धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पहात होते हीच खरी शिवशाही होती…..!

लेखक : अज्ञात

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बडबड बडबड – ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

बडबड बडबड ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

परिचित शब्द आणि कृती आहे ना? अगदी लहान असल्या पासून म्हणजे शब्दही बोलता येत नसतो तेव्हा पासून सुरु होणारी कृती. भावना शब्दात व्यक्त करण्याचे प्रभावी साधन म्हणजे बोलणे. जास्त बोलणे झाले, नकोसे वाटले की त्याची बडबड होते. मग मोठी माणसे म्हणतात कीती टकळी चालू आहे?   आणि बायका जमतात तिथे तर या बडबडीचा उच्चांक असतो. एक असेच हास्य चित्र बघण्यात आले होते. दोन महिलांच्या बोलण्यातून वीज निर्मिती करुन त्यावर रेल्वे चालली आहे असे चित्र होते. यातील अतिशयोक्ती सोडली तर महिला बडबड करतात हे सत्यच आहे. आणि त्याच मुळे त्या मानसिक ताणातून बाहेर पडतात. आणि सर्वात जास्त त्या कोणाशी बोलत असतील? असा विचार आला आणि जरा शोधशोध केली, मैत्रिणींशी चर्चा ( म्हणजे परत बडबडच )  केली. आणि आश्चर्य म्हणजे असे समोर आले, की महिला सर्वात जास्त स्वतःशी बोलतात. आणि  मग स्वतःच स्वतःचे निरीक्षण केले. आणि खूपच गंमत वाटली.

अगदी झोपेतून उठल्या पासून याची सुरुवात होते.

सकाळी उठताना

चला उठा, कामे खोळंबली आहेत. उशीर झाला तर सगळाच उशीर होणार. आयता चहा कोण देणार?  चला चहा करा आणि सगळ्यांना उठवा.

मॉर्निंग वॉकला गेल्यावर

जा बाई जोरात. स्लिम व्हायचे आहे ना. मला काही फरक पडत नाही. मी माझ्याच वेगाने चालणार.

कोणत्याही मीडियावर नवीन लेख दिसला

बरं हिला रोज सकाळी सकाळी मोबाईल घेऊन बसायला जमते. माझी तर कामेच संपत नाहीत. चला आवरायला हवे.

दुपारी विश्रांतीच्या वेळी

आता जरा पडते. फक्त कोणी यायला नको. आणि कंपनीचा फोनही यायला नको. त्यांना हिच वेळ सापडते. जरा पडले की ऑफरचा फोन करतात.

दुसऱ्याचे स्टेट्स बघून

बरा स्टेट्स बदलायला वेळ मिळतो. कुठे कुठे भटकतात कोण जाणे? आणि असले कपडे या वयात शोभतात का?

दुपारी उठल्यावर

चला आवरायला हवे. आता एकेक जण घरी यायला लागेल. मग त्यांचे चहा पाणी. मी घरीच असते ना, मला काय काम? (असे सगळे म्हणतात. एकदा घरातली कामे करुन बघा, म्हणजे कळेल. ) असे म्हणून सगळीच कामे करावी लागतात.

रात्री झोपताना

झालं एकदाचं आवरुन. कोणी मदत करत नाही. हातावर पाणी पडले की सगळे सोफ्यावर मस्त गप्पा मारत बसणार. आणि मी किचन आवरणार. कधी कधी वाटते तसेच पडू द्यावे. पण तो स्वभाव नाही ना.

मध्यरात्री जाग आल्यावर

अगं बाई आत्ता कुठे तीनच वाजले आहेत. झोपा अजून दोन तास. नाहीतर उठायच्या वेळी झोप लागायची.

अशी जास्तीत जास्त स्वतःशी बडबड चालू असते. इथे थोडीच बडबड दिली आहे. असे अनंत विचार चालू असतात. यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, उघडपणे ज्या भावना बोलू शकत नाही त्या मनात बडबड करतो. यात सगळेच असे तक्रार सूर असतात असेही नाही. बरेचदा मी किती नशीबवान आहे. घरातील माणसे माझे कौतुक करतात. नातेवाईक चांगले वागतात, मान देतात. अशीही विधाने असतात. पण ही चांगली विधाने आपण व्यक्त करू शकतो. त्याने कोणाचे मन दुखावले जात नाही. पण तक्रारी, दुखणी, कामे ज्या गोष्टी उघड बोलून कोणी दुखावेल असे वाटते त्याच गोष्टी मनाशी बडबड करतो.

आता मी नाही का मनातली बडबड तुम्हाला सांगितली. कारण तुम्ही सगळी आपली माणसे आहात. माझी ही मनातली बडबड तुम्हाला म्हणून सांगितली. माझी अजून एक गंमत तुम्हाला सांगते. मी ज्यावेळी एकटी वॉकिंग साठी जाते, त्यावेळी अशीच स्वतःशी बडबड करते. आणि गंमत म्हणजे त्यातून एखादी कविता तयार होते. ती विसरु नये म्हणून रस्त्यावरच्या एखाद्या दुकानात जाते आणि तेथून रद्दी पेपर घेऊन त्यावर उतरवते. आणि घरी येऊन डायरीत लिहिते.

तर माझ्या मनातले आज तुम्हाला सांगितले. तुम्ही पण मनातच ठेवा हं!

तुम्हाला म्हणून सांगते. सकाळ पासून लिहायचे म्हणते, पण वेळ कुठे होतोय. शेवटी आज संध्याकाळी फिरायला न जाता लिहिले तेव्हा कुठे हे लिहिता आले.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चिमणचारा… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ चिमणचारा☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

मंदिराच्या कट्ट्यावर विद्वानांचा मेळावा भरला होता. प्रत्येक जण आपल्या ज्ञानाचे दिवे पाजळत होता.

“अहो आहात कुठे ? मी या मंदिराला 1000 देणगी दिली. शिवाय सहस्त्र भोजनही घातलं. सगळ्यांनी आडवं पडेपर्यंत भोजनावर आडवा हात मारला. नको नको म्हणेपर्यंत ब्राह्मणांना भरपूर भोजन दिलय मी. ” मला या ढोंगीपणाची, आत्मस्तुतीची  चीड आली. बढायावर बढाया मारणं चाललं होतं. इतक्यात माझं लक्ष झाडाखाली बसलेल्या साधू बाबांकडे गेलं. शांतपणे डोळे मिटून ते पक्षांचा किलबिलाट ऐकत होते.

तुंदील तनुवर हात फिरवत बसलेल्या पंडितजींकडे मी बघितलं. त्यांच्यासाठीच  मी शिधा आणला  होता. मनात आलं ह्या भरगच्च जेवणावर  ताव मारून ढेकर देणाऱ्या पंडितजींना हा शिधा देण्यात काय अर्थ आहे? अन्नावर अन्न आणि  आणि वस्त्रावर वस्त्र  असंच नाही का होणार ते ? त्यापेक्षा या गरीब साधूला हे सगळं द्यायला काय हरकत आहे? विचारासारखी मी ताडकन उठलो. साधूबाबाच्या जवळ जात म्हणालो,

” बाबा एक विनंती आहे, तुमची काही हरकत नसेल तर हा शिधा देऊ का मी तुम्हाला? घ्याल? नाही म्हणू नका. ”.. माझ्या प्रश्नावर धीरगंभीर आवाजात उत्तर आलं ” बंधू निर्मळ, निरपेक्ष मनाने तू  हे शिधादान करतो आहेस. देवाच्या दरबारातला प्रसाद समजून अवश्य घेईन मी तुझे दान “. कुठली  हाव नाही, कुठलीही  आसक्ती नाही. मिळेल ते दान पदरांत पडल्यावर समाधान मानण्याची  त्यांची  वृत्ती बघून मला बरं वाटलं. लगबगीने मी पिशव्या  त्यांच्या स्वाधीन केल्या. आणि माझ्या लक्षात आलं बाबांना एकच हात आहे. पिशवी जवळजवळ माझ्या हातातून ओढून घेऊन, तांदुळाच्या पिशवीत हात घालून मुठभर तांदूळ बु्वांनी कट्ट्यावर फेकले. माझा राग अनावर झाला. ‘ केवढा हा माजोरेपणा? ‘  ‘ ‘भिकाऱ्याला ओकाऱ्या ‘ म्हणतात ते असंच असावं. पायरीवर बसलेले पंडितजी माझ्याकडे बघून कुचेष्टेने हसले. त्यांच्यासाठी आणलेला शिधा  मी साधूबाबांच्या झोळीत टाकला होता ना !

कुणीतरी म्हणाले सुद्धा, “ हे लेकाचे फार माजलेत. दान सत्पात्रीच द्यावं. अशा माजोरडयांना अशा भिकाऱ्यांना नाही. ”  

मी पण  तिरीमिरीत उठलो  साधूबाबांच्या अंगावर ओरडलो, “अहो काय केलंत हे ? मी तुम्हाला प्रेमाने धान्य दिलं आणि तुम्ही ते भिरकावून दिलंत ? अन्नपूर्णेचा अपमान आहे हा “. ‘ माजोऱ्या सारखा ‘ हा शब्द  मात्र मी गिळून  घेतला. शांतपणे  मान झुकवून ते म्हणाले, ” नाही बंधू.. धान्याचा असा अपमान मी कसा करेनं ? उलट तुमचं धान्य भुकेलेल्या मुक्या जीवांपर्यंत पोहोचवायचं होतं, म्हणून मी ते पारावर टाकलं. तुमचं दान सत्पात्री  पडलय. क्षुधा शांतीने तृप्त झालेली ती चिमणी पाखरं भरल्या पोटी आनंदाने घरट्याकडे वळलीत. तुमच्या धान्यातला कण न कण वेचला  आहे त्यांनी. तिकडे बघा  सहस्त्र भोजन  झालय. पण थाळीमध्ये लोकांनी टाकून दिल्यामुळे उकिरड्यावर  फेकलेलं अन्न वाया गेलंय. पोटभर भोजन करून चिमण्या उरलेले दाणे आपल्या चोचीत साठवून आपल्या बाळांना देण्यासाठी व घरट्यात जाण्यासाठी आसुसल्या आहेत. ”  

मी डोळे विस्फारून  पाराकडे बघतच राहिलो. चिवचिवणाऱ्या चिमण्यांचा थवा दाणा न दाणा टिपून घेत होता. साधूबाबा निर्मळ हसत म्हणाले, ” देख बंधू, ‘दाने दाने पर भगवान ने खानेवाले का नाम लिखा  है।”  आता मी हात जोडले आणि म्हणालो, ” बाबा खरंय तुमचं, बोलक्या जीवांना ओरडून अन्न मिळवता येतं. पण ही मुकी भुकेली पाखरं कशी मागणार धान्य आपल्याजवळ? “ साधू बाबा पुढे म्हणाले, ” चिमण्यांचा चिमणासाचं जीव आहे. पण त्यांनाही पोट आहेच ना?  बलवान पक्षी मारतात त्यांना. अन्यायाविरुद्ध समर्थपणे लढण्याची शक्ती ह्यांच्यातही यायला हवी आहे.. हो ना ? त्यांचा दुबळेपणा जाऊन त्यांनी बलवान व्हावं म्हणून मी हा चिमणचारा त्यांना चारला. क्षमा कर मला. ” …. हे तत्वज्ञान ऐकून मी अवाक झालो. माझ्या मनात आलं सगळीच माणसं ढोंगी लबाड नसतात. देवमाणसं पण जगात आहेत. गाभाऱ्यातल्या अन्नपूर्णा देवीला मी हात जोडले. तिच्या डोळ्यातलं वात्सल्य मला साधूबाबांच्या डोळ्यात दिसलं. साधू बाबा दुसऱ्या पाराकडे  वळले होते. आणि पुन्हा त्यांची पिशवीतल्या तांदुळानी मूठ भरली गेली होती. पाखरांची क्षुधा शांती करण्यासाठी… 

मी ओरडून म्हणालो, “बाबा आपके लिए भी कुछ रखो. “ हसून हात हलवत ते म्हणाले, ” फिकर  मत कर बेटा, तेरे जैसे भगवानने दिया हुआ प्रसाद हैं ये. मै भी उसमे भागीदार हो जाऊंगा…” 

काय किमया आहे बघा ! मलाच ते भगवान समजताहेत आणि मला त्यांच्यात  भगवान दिसतो आहे. मंदिरातली भगवती मात्र आम्हाला आशिर्वाद देत होती. आणि आपल्या सगळ्या लेकरांवरून वात्सल्यपूर्ण नजर फिरवत होती. खडतर आयुष्याचं गणित सोपं करून जगणाऱ्या ह्या निर्मळ मनाच्या साधूबाबांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून मी हात जोडले. काही प्रसंग साधे असतात. पण त्यात मोठा आशय भरलेला असतो नाही का ? आयुष्याचं तत्वज्ञान सहज सोपं करून सांगणारी अशी ही देवमाणसं जगात आहेत. आणि म्हणूनच जग चाललंय… म्हणूनच… जग चाललंय..

(धन्यवाद. मंडळी …  माणसांच्या मनाचे अनेक कंगोरे असतात. कुणी स्वतःच्या पोळीवर तूप ओढून  घेणारे असतात तर. आपल्या घासातला घासही दुसऱ्यासाठी राखून ठेवणारे दिलदारही या जगात आहेत. साधुबुवा एक हाताने अर्थार्जन नाही करू शकत. पण मिळालेल्या धान्यातून ‘चिमणचारा’ ते बाजूला काढू शकतात. एक तीळ सात जणांनी वाटून खावा ही म्हण त्यांना लागू पडते. स्वार्थ आणि परमार्थही ते साधू शकतात. आणि ‘ विश्वची माझे घर ‘ या आनंदात ते जगू शकतात. साधीच माणसं पण विचार मोठे याची प्रचिती मला आली…. म्हणून हा लेखप्रपंच )    

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सातारचे ‘कंदी’ पेढे – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ सातारचे ‘कंदी’ पेढे –  लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का – सातारच्या पेढ्यांना “कंदी पेढे” असंच का म्हणतात?

गोष्ट आहे दीडशे वर्षापूर्वीची.

भारतात ब्रिटिश राजवट होती. साताऱ्यात छत्रपतींच्या संस्थानावर देखील ब्रिटिश रिजंट बसविण्यात आले होते. हे अधिकारी इंग्लंडवरून आलेले होते. त्यांना गोड खाण्याची सवय होती. मग ते कायम वेगवगेळ्या मिठाईच्या शोधात असायचे.

सातारा जिल्ह्यातील जो पाटणकडचा डोंगराळ भाग आहे तिथे त्या काळात शेतीचं प्रमाण कमी होतं. लोकांच उपजीविकेचं साधन मुख्यसाधन हे पशुधन होतं. तिथल्या गायी, म्हैशीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या रानावनात वाढलेल्या होत्या. विकतचा चारा हा प्रकार तिथे नव्हता. यामुळे त्यांचं दुध घट्ट आणि अस्सल असायचं. शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं. हे दुध जवळचं मोठं शहर म्हणून सातारला पाठवून दिलं जायचं. काहींनी या दुधाला कढईत उकळून त्यात साखर किंवा गुळ टाकली. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवले. ते एका करंडीमध्ये भरून ब्रिटीश अधिकाऱ्यांना पेश केले. ब्रिटिशांना ही मिठाई प्रचंड आवडली. त्यांना “करंडी” म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी त्याला “कँडी” म्हणायला सुरुवात केली. पुढे याच कँडीचं सातारकरांनी “कंदी” केलं.

साधारण याच काळात छत्रपतींच्या नवव्या वंशजानी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खडकलाट या गावातून काही मिठाई बनवणाऱ्या कुटुंबाना साताऱ्यात आणून वसविलं होतं. त्यांनी बनविलेले कंदी पेढे लोकप्रिय होत गेले. पुढे त्यांनाच “लाटकर” असे ओळखलं जाऊ लागलं.

कंदी पेढ्याला युरोप मध्ये नेलं ते मात्र तुळजाराम मोदी या हलवायांनी.

त्यांनी सत्तर वर्षापूर्वी विमानात, लंडनमधील सुप्रसिद्ध ठिकाणी या कंदी पेढ्यांच्या जाहिराती लावल्या. त्यामुळेच हा पेढा कानाकोपऱ्यात पोहोचला.

आजही एवढ्या वर्षांनी एवढी तंत्रज्ञानात सुधारणा होऊन देखील मोदी आणि लाटकर हलवाई मात्र  कंदी पेढ्याचा खवा आजही कढईतच भाजतात व प्रत्येक पेढा हातावरच वळला जातो. खव्याची भाजणी विशिष्ट प्रकारे केल्यामुळे पेढ्याची पौष्टिकता, चव व टिकाऊ पणा वाढतो. म्हणूनच गेली १०० वर्ष सातारच्या कंदी पेढ्यांची चव आणि गुणवत्ता तशीच टिकून आहे.

भारतात अनेक ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत. पेढ्याची जन्मभूमीच मथुरा ही आहे. उत्तरेतून ठाकूर राम रतन सिंह यांनी हे पेढे दक्षिणेत धारवाड येथे आणले. त्यांना धारवाडी पेढे म्हणून ओळखलं जातं.

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणचे पेढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यात कोल्हापूरचे फिक्के पेढे, कुंतलगिरीचे पेढे, वाडीचे पेढे व इतर खूप काही. मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस सहज टिकतो.

सातारच्या कंदी पेढ्याची सिक्रेट रेसिपी म्हणजे हे पेढे डबल म्हणजे खरपूस भाजलेले, आणि तुपात परतलेले आहेत. हे पेढे सह्याद्रीतल्या रानातला चारा खाणाऱ्या गाई म्हशीपासून बनलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या पेढ्यांमध्ये सातारच्या माणसांचा “स्वॅग” मिक्स झालाय.

या सगळ्यामुळे सातारच्या पेढ्याचा ब्रँड जगात प्रसिद्ध झाला.

माहिती प्रस्तुती : अनंत केळकर 

लेखक : अज्ञात 

संग्राहक : अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पण असं वाटतच नाही… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ पण असं वाटतच नाही… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

उंदीर  दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात. पण जर तो  जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्या शिवाय चैन पडत नाही….

जर साप दगडाचा असेल तर सर्व  त्याची पूजा करतात. पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात….

जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येकजण पूजा करतो. पण ते जिवंत असताना तर त्यांची किंमत समजत नाही. !

फक्त हेच मला समजत नाही की जिवंताबद्दल इतका द्वेष आणि दगडांबद्दल इतकं प्रेम का आहे?  

लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे पुण्यकर्म  आहे…

पण जर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुषहाल होईल….

एकदा विचार करून बघा….

युधिष्ठराने एक सत्य सांगितलं होतं.. ” मरायचं सर्वांना आहे, परंतु… मरावंसं कोणालाच वाटत नाही.. “ 

आजची  परिस्थिति तर इतकी गंभीर आहे.. “अन्न ” सर्वांनांच हवंय.. पण.. “शेती” करावीशी कोणालाच वाटत नाही…

“पाणी” सर्वांनाच हवंय, पण… “पाणी”  वाचवावे असे कोणालाच वाटत नाही…

“सावली” सर्वांनाच हवीय.. पण.. “झाडे” लावावी, ती जगवावी असे कोणालाही वाटत नाही..

” सून ” सर्वांनाच हवी आहे.. पण.. तिला “मुलगी”च समजावी असं कोणालाच वाटत नाही…

…… विचार  करावा असे प्रश्न… पण… विचार करावा असं कोणालाच वाटत नाही….

….. आणि हा मेसेज सर्वांना आवडतो परंतु फॉरवर्ड करावा असं कोणालाच वाटत नाही.

 …. एक सत्य.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आमचं…आणि यांच…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “आमचं…आणि यांच…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

अर्थातच हे सगळ्या घरांच्या बाबतीत आहे. घरात माझं आणि तुझं असं  नसलं तरी आमचं आणि यांचं यातला फरक बऱ्याचदा बोलण्यात जाणवतो……

आमचं आणि यांचं सारखंच असलं तरी सुद्धा बोलतांना यांचं असतं ते विशेष, खास, त्यात विविधता, नाजूकपणा, कलाकुसर, रंग, डिझाईन, कलात्मक असं सगळं असतं. आणि आमचं मात्र असंच असतं…….. साधं……. सरळ…… सहज…

कपडे आणि दागिने या बाबतीत हे फार जाणवतं. म्हणजे आमचे ते कपडे. यातही शर्ट पॅन्ट, झब्बा लेंगा, फारफार तर सुट. पण यांच्या कपड्यांच्या बाबतीत बोलतांना सुध्दा कोणतीही सुट नसते……

यांची नुसती साडी नसते. तर त्यात शालू, पैठणी, कलकत्ता, सिल्क, महेश्वरी, कांजीवरम असं आणि बरंच काही असतं. परत यात सहावारी आणि नऊवारी असतंच. आणि ते तसंच म्हणावं लागतं. ऊतप्याला मसाला डोसा म्हटल्यावर, किंवा पुलाव ला खिचडी म्हटल्यावर जशा प्रतिक्रिया येतील, तशाच प्रतिक्रिया नऊवारी ला नुसती साडी म्हटल्यावर येऊ शकतात. घरात रोज नेसतो ती आणि तीच साडी. अर्थात रोज नेसली तर. आमचं मात्र घरात काय आणि बाहेर काय? शर्ट पॅन्ट च असतं.

मग आमच कापड अगदी रेमंड, विमल, सियाराम, किंवा कोणतही चांगल्या ब्रॅंडच असलं तरीही शर्ट आणि पँट….. किंवा झब्बा आणि लेंगा…….

यांच्या दागिन्यांचं तसंच…. आमची ती फक्त चेन. पण यांच कोल्हापूरी साज, मोहनमाळ, चपलाहार, नुसत्या मोत्यांची असली तरी ती माळ नाही. तर सर….. आणि परत याची सर काही औरच असते….

आम्ही आमच्या गळ्यातल्या चेन कडे चेन म्हणूनच पाहतो. पण यांच गळ्यातलं मंगळसूत्र पाहण्याचं सूत्र काही और असत. ते सुत्र काय? हे एक औरतच सांगू शकेल.

कानाला अडकवणारे आमच्यात कमीच असतात.  पण आमची ती फक्त भिकबाळी. कसं वाटतं नं हे. पण यांचे कानातले खड्यांचे, झुंबर, किंवा रिंग.

आम्ही पीटर इंग्लंड, काॅटनकिंग या सारखा चांगलं नांव असलेला शर्ट घातला तरी तो फक्त शर्टच. पण यांनी खड्यांच काही घातलं की ते मात्र अमेरिकन डायमंड. या दागिन्याला खड्यांचं असं म्हटलं तर काही वेळा खडे बोल ऐकावे लागतात.

आमच्या मनगटावर फक्त घड्याळ किंवा ब्रेसलेट. पण यांच्या मनगटावर काही चढवलं तर ते बांगड्या, पाटल्या, तोडे, कंगन असं वैशिष्ठ्य पूर्ण. परत हे मनगटावर चढवण्याचा यांचा क्रम सुध्दा यांनी ठरवलेला असाच……. यात मागे, मधे, पुढे असंच असतं. शाळेत कशी रांग आणि रांगेची शिस्त असते तसंच…….

आमच्या पोटावर पॅन्ट रहावी म्हणून आम्ही घालतो तो पट्टा. चामड्याचा किंवा कापडाचा. त्याकडे निरखून पाहिलं जाईलच असं नाही. बऱ्याचदा पुढे आलेल्या पोटामुळे तो झाकला जातो. पण यांच्या कमरेचा मात्र कंबरपट्टा तोही चांदी किंवा सोन्याचा. आमच्या पॅंटला अडकवलेलं कि चेन. पण यांचा मात्र छल्ला. मग त्यात किल्ली नसली तरी चालतं.

फुल, गजरा, आणि वेणी यात फरक असतो हे पण माझ्या लक्षात आलं आहे. आणि गजरा की वेणी यापैकी काय घ्यावं याचापण विचार होतो.

बरं हे फक्त कपडे आणि दागिने यांच्याच बाबतीत नाही. खास कार्यक्रमाआधी आमचे केस वाढले तर, कटिंग करा जरा. हेच वाक्य असत. वाक्य कितीवेळा म्हटलं यावर सुर वेगळा असू शकतो. पण यांचे केस नुसते व्यवस्थित करायचे तरी यांना पार्लर आणि त्यासाठी वेळ घ्यावा लागतो. किंवा ती बाई घरी येणार. आम्ही मात्र कटिंगच्या दुकानाबाहेर टाकलेल्या लाकडी बाकावर हातात मिळेल तो पेपर वाचायचा.

असं आमचं आणि यांचं………

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मास्टरपीस” -लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

??

☆ “मास्टरपीस” -लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

मी काही कामानिमित्त बॅास्टनला गेले होते. काम झाल्यावर जवळच्या एका मॅालमधे जेवायला गेले. तिथे दहा पंधरा प्रकारची वेगवेगळी रेस्टॅारंटस् होती. सगळे प्रकार बघून मी शाकाहारी असल्याने भारतीय जेवणच घ्यायचं ठरवलं. भात व पालक-दाल घेऊन तिथल्या टेबलावर बसले. आजूबाजूला अनेक भाषा, अनेक रंग, अनेक पेहराव, अनेक मूड असलेले सर्व वयाचे लोक होते. 

माझ्या टेबलाच्या अगदी शेजारच्या टेबलवर एक आई व दोन मुली बसल्या होत्या. आईने डोक्याला हिजाब गुंडाळला होता पण बारा आणि दहा वर्षाच्या मुलींनी हिजाब न घालता काळ्या केसांची एक वेणी घातली होती. त्या वेणीला वर आणि खाली चकचकीत फुलाचे रबरबॅंडस लावले होते. आईच्या कपड्यांवरून व भाषेवरून ते कुटुंब इराकचे असावे असे वाटत होते. त्या दोन मुलींनी काय पुण्य केले म्हणून त्यांची इराक मधून सुटका झाली असे वाटले. तिथे या मुली अन्यायाखाली दबून गेल्या असत्या. बायकांना अत्यंत कनिष्ठ दर्जा देणाऱ्या इराकमधे १८ व्या वर्षी त्यांचे लग्न उरकून त्यांच्यावर अत्याचार पण झाले असते. पिंजऱ्यातून सुटलेल्या पक्षासारख्या त्या तिथे बागडत होत्या. त्या आईच्या चेहऱ्यावर मात्र अत्याचार सहन केलेल्या अनेक रेषा दिसत होत्या. Nike कंपनीनं हल्ली हिजाब बनवून विकायला सुरूवात केली आहे म्हणून त्या आईने Nike चा हिजाब घातला होता. “आम्ही तुझ्याबरोबर आहोत” हे Nike सारख्या मोठ्या कंपनीनं सांगितल्या सारखे होतं ते! मला Nike कंपनीचे हिजाब बनवण्यासाठी मनापासून कौतुक वाटले.  

त्या पुढच्या टेबलावर एक भारतीय कुटुंब बसले होते.  त्यांचा १२ वर्षाच्या मुलगा कसाबसा चालत होता. त्याच्या डोळ्याला अत्यंत जाड चष्मा होता. वडील जेवण घेऊन आले पण ते मुलाशी फारसे बोलत नव्हते. आई मात्र कौतुकाने तिच्या लेकराशी गप्पा मारत त्याला भरवत होती. त्या मातृत्वापुढे माझी मान आदराने झुकली. काय काय सहन केलं असेल त्या माऊलीने! आपल्या बाळानं जगातलं सर्व यश मिळवावं हे चिंतणाऱ्या आईला आपला मुलगा आपल्या हाताने जेऊ शकत नाही..चालू शकत नाही हे पाहतांना काय यातना झाल्या असतील? ते दु:ख गिळून कोणाचीही पर्वा न करता ती आई लेकराला भरवताना बघून देवानं आई का निर्माण केली हे परत एकदा कळलं. 

त्याच्या शेजारच्या टेबलावर एक अमेरिकन कुटूंब बसलं होतं. त्यांनाही १३-१४ वर्षांचा मुलगा व ८-१० वर्षांची मुलगी होती. दोघं उंच व बाळसेदार होते. भरपूर खरेदी केल्याने बरोबर अनेक बॅगा होत्या. अत्यंत सुबत्तेत वाढणाऱ्या या मुलांना कसं कळेल की जगात लहानशी गोष्ट मिळावी म्हणून काहींना भगीरथ प्रयत्न करावे लागतात ते! पण तो त्यांचा दोष नाही. ते त्यांचं नशीब होतं. गदिमा नाही का म्हणाले..

घटाघटांचे रूप आगळे। प्रत्येकाचे दैव वेगळे..॥

मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार ॥

चौथं टेबल होतं माझं ! भारतातल्या मिरजेसारख्या लहान गावातून अमेरिकेत आलेली मी भारतातच रहात असते तर कशी घडले असते? परक्या देशात येऊन इथले रितीरिवाज शिकून या देशांतल्या चांगल्या गोष्टी व भारतातल्या चांगल्या गोष्टी याची सांगड मला व माझ्या नवऱ्याला घालता आली का? मुलं आमच्या परीने आम्ही उत्तम वाढवली. त्यांचं कॅालेज, नोकरी, लग्न होऊन सेटल झालेलं बघताना खूप समाधान आहे पण काही करायचं राहिलं का हा प्रश्न मान वर करतोच! 

या विचारांच्या भोवऱ्यात मी खोलात जात असताना समोर एक गोष्ट घडली. इराकी मुलीचा बॅाल त्या भारतीय मुलाकडे गेला. त्याने तो पायाने ढकलला. पुढच्या वेळी तो बॅाल त्या अमेरिकन मुलाकडे गेला. त्याने तो झेलला व परत तिच्याकडे टाकला. धाकटीला तो झेलता आला नाही. त्याने तिला कसा झेलायचा दाखवले. “To me..” तो भारतीय मुलगा म्हणाला. त्याच्या पायातून तो बॅाल घरंगळत पलिकडे बसलेल्या कृष्णवर्णीय मुलीकडे गेला. तिने तो परत त्या मुलीकडे टाकला व त्यांचा खेळ सुरू झाला. ती मुलं एकमेकांकडे बॅाल टाकून खेळत असताना हळूहळू तुझं नाव, गाव, इयत्ता काय वगैरे देवाण घेवाण झाली. एका लहानशा बॅालने जात, धर्म, भाषा, देशाच्या सीमा ओलांडून मैत्री घडवून आणली जे भल्या भल्या राजकारण्यांना हजार वेळा भेटून जमत नाही. 

तेवढ्यात तिथे एक विदूषक आलेला बघून ही मुलं घाईने त्याच्याभोवती गोळा  होऊ लागली. इराकी मुलीनं भारतीय मुलाचा हात धरला व त्याच्या आईला विचारलं,” Can I take him to see the show?” आईने कौतुकाने हो म्हटलं. मुलाच्या डोळ्यात उत्साह मावत नव्हता. त्याने तिचा हात धरला व तो तिरकी पावलं कष्टाने पण उत्साहाने टाकत त्या विदूषकाजवळ गेला. त्याचे बाबा घाईने त्याला आधार द्यायला उठले पण आई म्हणाली, “Let him go!” तिचा मुलाला सुटा करण्याचा प्रयत्न बघून मी मनात टाळ्या वाजवल्या. 

विदूषक त्यांना डोळ्यात पाणी येईपर्यंत हसवत होता आणि ते वेगवेगळ्या संस्कृतीचं, रंगांचं, भाषांचं, देशांचे सुंदर चित्र निरोगी व अपंग या मर्यादा ओलांडून एक मास्टरपीस बनून माझ्यासमोर उभं होतं. माझ्या हातात जवळच्या Museum of Fine Arts ची तिकीटं होती पण तिथे काय दिसेल असं चित्र इथे बघताना अंगावर काटा आला.  

ते सुंदर चित्र माझ्या कॅमेऱ्यात पकडताना वाटलं..

पंछी, नदिया, पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हें रोके

बदलून 

पंछी, नदिया, बच्चे, और पवन के झोंके…

असं करावं. 

मुलांकडून मोठ्यांनी हे शिकायला हवं. सतत बॅार्डरवर युध्द करणाऱ्यांनी तर नक्कीच शिकलं पाहिजे ! मग ते भारत-पाकिस्तान असो, रशिया-युक्रेन असो नाहीतर इस्त्राईल-हमास असो..माणूसकी, दया आणि प्रेम यांनी बनवलेला बॅाल मोठे एकमेकांकडे का नाही टाकू शकत? त्यांना एकमेकांकडे बॅाम्बच का टाकावेसे वाटतात? 

जग मुलांकडे बघून मैत्रीचा हात पुढे करायला कधी शिकेल का?

लेखिका : ©® ज्योती रानडे

(खरी घडलेली घटना आहे. काल्पनिक नाही.) 

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares