मराठी साहित्य – विविधा ☆ ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

“माझा मराठी चा बोल कौतुके।

परि अमृताते  ही  पैजा जिंके।

ऐसी अक्षरे रसिके।

मेळवीन ।।”

(ज्ञानेश्वरी-अध्याय सहावा)

नमस्कार मैत्रांनो,

२७ फेब्रुवारी हा मराठी भाषेला गौरवान्वित करणारा सुवर्णदिन! २०१३ पासून हा दिवस ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. विष्णू वामन शिरवाडकर उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ – १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, ही एकुलती एक बहीण सर्व भावांना जीव की प्राण सर्वांची लाडकी, म्हणून कुसुमचे अग्रज   अर्थात  ‘कुसुमाग्रज’ असे नाव त्यांनी धारण केले.समाजाभिमुख लेखन करणाऱ्या मराठी लेखकांमधील हे शिखरस्थ नाव! बहुउद्देशीय आणि बहुरंगी लेखनकलेचे उद्गाते असे कुसुमाग्रज जितक्या ताकदीने समीक्षा करीत इतक्याच हळुवारपणे कविता रचित. रसिकांच्या मनात ज्या नाटकाचे संवाद घर (उदाहरण द्यायचे तर ‘कुणी घर देता का घर) करून आहेत, असे ‘नटसम्राट’ नाटक, ज्याच्या लेखनाने कुसुमाग्रज ज्ञानपीठ विजेते (१९८७) ठरले! शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे केल्या गेले आहे. वि.स. खांडेकर (त्यांना ययाती कादंबरीकरता हा १९७४ मध्ये हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला) यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. संतसाहित्यात तर संत ज्ञानेश्वरांनी (१२९०) वरीलप्रमाणे मऱ्हाटी भाषेचे केलेलं हे कौतुक! आपली मराठी भाषासुंदरी म्हणजे ‘सुंदरा मनामधिं भरलि’ अशी रामजोशींच्या स्वप्नातील लावण्यखणीच जणू! अमृताहुनी गोड अशा ईश्वराचे नामःस्मरण करतांना मराठीची अमृतवाणी ऐकायला आणि बोलायला किती गोड, बघा ना: ‘तिन्ही लोक आनंदाने आनंदाने भरुन गाउ दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे!’    

या महाराष्ट्रात निर्माण झालेले साहित्य म्हणजे साक्षात अमृत ठेवाच! ज्या महाराष्ट्रात गर्भश्रीमंत सुविचारांची अन अभिजात संस्कारांची स्वर्णकमळे प्रफुल्लित आहेत, जिथे भक्तिरसाने ओतप्रोत अभंग अन शृंगाररसाने मुसमुसलेली लावण्यखणी लावणी ही बहुमोल रत्ने एकाच इतिहासाच्या पेटिकेत सुखाने नांदतात, तिथेच रसिकतेच्या संपन्नतेचे नित्य नूतन अध्याय लिहिले जातात. या अभिजात साहित्याचे सोने जितके लुटावे तितके वृद्धिंगत होणारे! म्हणूनच प्रश्न पडतो की मराठीला ‘अभिजात भाषा’ म्हणून सरकारदरबारी मान्यता मिळायला आणखी किती समृद्ध व्हावे लागेल? पैठणीसारखे महावस्त्र नेसल्यावर आणखी कुठले वस्त्र ल्यायचे तिने?

मराठी भाषेचे पोवाडे गायला, तिच्या लावण्याच्या लावण्या गायला आणि तिच्यावरील भक्ती दर्शवण्याकरता अभंग म्हणायला मराठीच हवी. तिचे स्तवन, कीर्तन, पूजन, अर्चन इत्यादी करणारे महान साहित्यिकच नाही तर सामान्य माणसे कुठे हरवली? शब्दपुष्पांच्या असंख्य माळा कंठात लेऊन सजलेली आपली अभिजात मायमराठी आज आठशे खिडक्या नऊशे दारं यांतून कुठं बरं बाहेर पडली असावी? ‘मराठी इज अ व्हेरी ब्युटीफुल ल्यांगवेज!’ असे कानावर पडले की संस्कृतीचे माहेरघर अशी मराठी असूनही, तिच्या हृदयाला घरे पडतील अशी मराठी ऐकून! सगळं ‘चालतंय की’ असे म्हणत म्हणत ‘ती मराठी’ शासकीय आदेशांत बंदिस्त झाली. 

‘मी मराठी’ चा गजर करणारे आपण मराठी साहित्य विकत घेऊन मुलांना ते वाचण्याकरिता किती प्रवृत्त करतो? मराठी सिनेमे घरीच बघत का आनंद मानतो? मराठी नाटकसुंदरीची खरी रंगशोभा रंगमंचावर! कुठलीही भाषा शिकण्याचा प्रारंभ पाळण्यातून होतो. (गर्भसंस्कार विचारात घेतले तर गर्भावस्थेतच) बाळ जन्माला आल्यावर त्याच्या कणावर जे पडते ते अति महत्वपूर्ण शिक्षण! हे बाळ भाषेचा पहिला उच्चार ‘आई’ म्हणून करते का ‘मम्मी’ म्हणून? थोडा मोठा झाला की ते ‘nursary rhymes’ शिकते की रामरक्षा अथवा शुभंकरोती?

बरे, मराठी माध्यमात आपल्या मुलांना शिकवण्याची उर्मी कुणात आहे? मराठी माध्यमातील शाळेत मुलाने जावे हे बऱ्याच पालकांना पटणार नाही. मात्र एक भाषा म्हणून मराठीची निवड करणे अत्यावश्यक आहे. सरकारी पातळीवर हे कार्य सुरु आहेच. मराठी भाषेची गोडी निर्माण होईल असे मराठी भाषेतील साहित्य, नाटके, सिनेमे पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना उपलब्ध करून द्यावेत. मला याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा असा वाटतो की, पालक, आजी, आजोबा आणि शिक्षकांनी यांनी मुलांशी मराठी भाषेतून संवाद साधावा. प्रत्येक मराठी घराघराने किमान एक तास आपल्या भाषेला समर्पित करावा. त्यात अस्खलित मराठी बोलणे, अभिजात मराठी साहित्य वाचणे, सुंदर मराठीत जे असेल ते श्राव्य साहित्य ऐकणे, हे उपक्रम राबवावेत. यात टी व्ही/ ओ टी टी या माध्यमातील मराठी सिरीयल/ सिनेमे इत्यादींचा समावेश नसावा. रोज रोज ती भाषा कानावर पडल्यावर अथवा नजरेखालून गेल्यावर मुलांना आपोआपच ‘मराठी भाषेतून विचार करण्याची’ सवय लागेल. मराठी शुद्धलेखन शिकायचे तर कुठल्याही (शाळेतील पाठ्यक्रम सोडून) अवांतर विषयावर मुलांनी रोज पानभर मजकूर लिहावा किंवा रोजनिशी लिहिण्यास मराठीचा वापर करणे अत्युत्तम!

मात्र यात पालक कुटुंबातील सदस्य, समाजातील व्यक्ती आणि महाराष्ट्र सरकार, या सर्वांच्या सहकार्याशिवाय मराठी भाषेचे संस्कार मुलांवर होणार नाहीत. यासाठी हृदयातून साद यायला हवी ‘माझी माय मराठी!’

या लेखाची सांगता कविवर्य सुरेश भटांच्या प्रेरणादायी मराठी गौरव गीताने करते.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी,

आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी,

आमुच्या उरा उरात स्पंदते मराठी, आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी, आमुच्या लहानग्यात रांगते मराठी

आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी, आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी, येथल्या फुलाफुलात हासते मराठी

येथल्या दिशादिशात दाटते मराठी, येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी, येथल्या वनावनात गुंजते मराठी

येथल्या तरुलतात साजते मराठी, येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी, येथल्या पिकांमधून डोलते मराठी

येथल्या नद्यांमधून वाहते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी

हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

सुरेश भट

प्रिय वाचकांनो, मराठी भाषेच्या अभिजात सौंदर्याला नटवणाऱ्या आणि सजवणाऱ्या काना, मात्रा अन वेलांट्यांची शप्पथ, माझी अमृताहुनी गोड मराठी मला अतिप्रिय आणि तुम्हाला? 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

दिनांक – २७ फेब्रुवारी २०२४

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ आला किनारा… कुसुमाग्रज ☆ रसग्रहण – सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? काव्यानंद ?

☆ आला किनारा… कुसुमाग्रज  ☆ रसग्रहण – सौ.मंजिरी येडूरकर ☆

२७ फेब्रुवारी, कुसुमाग्रज यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने

कुसुमाग्रज म्हणजे शब्दांची, कल्पनांची मुक्त उधळण करणारा अवलिया! मराठी वरचं प्रेम, देशावरचं प्रेम, समाजावरचं प्रेम, निसर्गावरचं प्रेम अशा अनेक अंगांनी वाहणारा कवितांचा अखंड झरा! समाजातील विषमता, जाती – जातीतले भेद, अस्पृश्यतेचा कलंक यावर कवितांतून कोरडे ओढणारा समाजवादी! हा तर सरस्वतीच्या मुकुटातला लखलखणारा हिरा!

अशा या शब्दप्रभू च्या स्मृती जागविण्याचा आजचा दिवस! अर्थात कधी एखाद्या दिवसासाठी सुध्दा विस्मरणात जावा, असा हा माणूसच नाही.किमान पक्षी रोज त्यानं पाठीवर हात ठेऊन “लढ” म्हणावं, असं तरी प्रत्येकाला वाटतंच. मी आज त्यांच्या विस्मरणात चाललेल्या सुंदर कवितेची आठवण करून देणार आहे.विस्मरणात चाललेली असं म्हणायचं एकच कारण, मला ही कविता गुगल गुरू कडे मिळाली नाही, त्यावरचा एकही लेख, आठवण काहीही मिळालं नाही. आठवणीतील गाणी यावर सुध्दा मिळाली नाही. शेवटी ती मला टाईप करावी लागली.

मी कधीच ही कविता विसरू शकणार नाही. आम्ही मैत्रिणी सांगलीतील गायिका स्मिता कारखानीस यांच्याकडे गाण्याच्या क्लासला जात होतो.रिटायरमेंट नंतर सुचलेली कला असल्यामुळे त्या सोपी सोपी गाणी शिकवतील आणि निदान गुणगुणण्या एवढं तरी गाणं यायला लागेल अशी माफक अपेक्षा होती. त्या जरा धाडसी शिक्षिका निघाल्या. त्यांनी आम्हाला ही कुसुमाग्रजांची कविता, आम्ही कुठेही कधीही न ऐकलेली, त्यांनी स्वतः चाल लावलेली, शिकविली.तशी चाल अवघड होती, त्यामुळं गाणं चांगलं म्हणायला जमलं नाही, पण इतकी सुंदर कविता कळली, गुणगुणता आली, त्यामुळे पाठ झाली, याचा प्रचंड आनंद होता. त्यासाठी स्मिताला मनापासून  धन्यवाद!

कुसुमाग्रज हे स्वातंत्र्य संग्रमाचा दाह सोसलेले आणि नंतर स्वातंत्र्याचा आनंद अनुभवलेले होते. त्यांच्या बऱ्याच कविता या विषयावरच्या आहेत. त्यांनी हताश होवून सुवर्ण महोत्सवाच्या वेळी लिहिलेली ‘स्वातंत्र्य देवीची विनवणी ‘ ही कविता आज अमृत महोत्सव साजरा झाला असला तरी वर्तमानाला साजेशीच वाटते. कवितेमधून सत्य परखडपणे मांडण्याचं कसब आणि तो सच्चेपणा त्यांच्यात होता.

मी घेतलेली आजची कविता स्वातंत्र्य संग्रामाशी निगडित असली तरी आनंद घेऊन आली आहे. ज्या क्षणाची सगळे वाट पहाट होते तो क्षण जवळ येऊन ठेपला आहे, हे सांगणारी ही कविता आहे.भारतमातेच्या सुपुत्रानी एक खूप मोठ्ठं स्वप्न पाहिलं. त्याच्या पूर्ततेसाठी लाखो लोकांनी अनेक तपे अथक परिश्रम केले. या मार्गात असंख्य अडचणी, अगणित वेदना आहेत हे ठाऊक असूनही, मार्ग सोडला नाही. कारावास भोगला, प्राणांची आहुती दिली, कुटुंबाची होळी केली. जीवाची पर्वा न करता या खवळलेल्या सागरात उडी घेऊन आयुष्य पणाला लावलं. आता किनारा जवळ आला आहे, तो स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ आला आहे. आता सगळे श्रम संपणार आहेत. ज्यांच्या समर्पणाने आजच्या या क्षणाला आकार दिला त्यांच्या स्मृतीला गौरवाने वंदन करुया आणि किनाऱ्यावर जयाचे झेंडे उभारुया. या अर्थाची सुंदर कविता तुम्हाला स्मिताच्या You tube channel वर त्यांच्या गोड आवाजात ऐकायला मिळेल.

निनादे नभी नाविकांनो इशारा,

आला किनारा, आला किनारा

*

उद्दाम दर्यामध्ये वादळी,

जहाजे शिडावून ही घातली

जुमानित ना पामरांचा हाकारा

आला किनारा, आला किनारा

*

सरायास संग्राम आला आता

तपांची समोरी उभी सांगता

युगांच्या श्रमांचा दिसे हा निवारा

आला किनारा, आला किनारा

*

प्रकाशे दिव्यांची पहा माळ ती

शलाका निळ्या लाल हिंदोळती

तमाला जणू अग्निचा ये फुलोरा

आला किनारा, आला किनारा

*

जयांनी दले येथ हाकारली

क्षणासाठी या जीवने जाळली

सुखेनैव स्विकारुनि शूल – कारा

आला किनारा, आला किनारा

*

तयांच्या स्मृती गौरवे वंदुनी

उभे अंतीच्या संगरा राहुनी

किनाऱ्यास झेंडे जयाचे उभारा

आला किनारा, आला किनारा

*

अशा या शब्दप्रभूला त्रिवार वंदन!!!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आज आमचा नंबर आहे … पण उद्या ?” – लेखक : डॉ. प्रकाश कोयाडे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “आज आमचा नंबर आहे … पण उद्या ?” – लेखक : डॉ. प्रकाश कोयाडे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

गेल्या दोन दिवसांपासून आमचं कुटुंब एका विचित्र परिस्थितीमधून जात आहे. हे फार गंभीर आहे आणि तुमच्या सोबत हे घडू नये म्हणून हे इथं मांडतोय… २९ तारखेला दुपारी ३.२० वाजता माझ्या बायकोच्या व्हाट्सअपवर एक मेसेज आला ! 

मी ड्युटीवर होतो म्हणून डिटेल्स काही न सांगता ती एवढंच म्हणाली की, ‘ लवकर घरी या फार महत्त्वाचं बोलायचं आहे.’ चार वाजता घरी आलो तर तिने रडायला सुरुवात केली. आधी तिला समजावून सांगितले, शांत केलं आणि काय झालं आहे याबद्दल स्पष्ट विचारलं तेव्हा जे समजलं ते मलाही शॉकिंग होतं. कुठल्यातरी अनोळखी नंबर वरून तिला पैशाच्या मागणीसाठी मेसेज आला होता,  ज्यामध्ये —  

‘तुमचा आठशे रुपयांचा EMI बाकी आहे आणि तो भरा अन्यथा तुमचा फोटो व्हायरल करु’ अशी धमकी होती. 

आधी बायकोला पैसे मागितले तेव्हा त्यात काही वाटलं नाही पण समोरच्या व्यक्तीने एक मॉर्फ केलेला फोटो पाठवला. तेव्हा मात्र तिने एका सेकंदात तो फोटो डिलीट केला आणि तो नंबर ब्लॉक करून डिलीट केला.

पॅनिक न होता हे प्रकरण हाताळणं आवश्यक होतं, तिला धीर देणं त्याक्षणी सर्वात महत्वाची गोष्ट होती. समाधानाची गोष्ट हीच होती की, घाबरून जाऊन बायकोने समोरच्या व्यक्तीला पैसे पाठवले नव्हते!

आम्ही सायबर क्राईम ऑफिसला जाऊन कंप्लेंट केली. तसेच एक कंप्लेंट जवळच्या पोलिस स्टेशनलाही केली. तसं पाहिलं तर पोलिसांसोबत संपर्क रोजचाच पण आजचं कारण वेगळं होतं. त्यांनी फार शांतपणे सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या आणि समजावून सांगितल्या. काहीही झालं तरी पॅनिक व्हायचं नाही आणि कोणालाही पैसे पाठवायचे नाहीत हे सांगितले… अर्थात आम्ही तेवढे स्ट्रॉंग होतोच! 

काल दुपारी आणखी एका नंबरवरून साडेतीन हजार रुपयांची मागणी केली. तसेच ‘तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील प्रत्येकाला फोन/मेसेज करून पैसे मागू’ अशी धमकी दिली. तो नंबर आणि डिटेल्सही पोलिसांना पाठवले. आणखी आठ दहा दिवस हे होतच राहणार आहे. बायकोने याबद्दल व्हाट्सअपवर स्टेटस ठेवलं आणि संपर्कातील जवळपास सर्वांना स्वतः सांगितलं जेणेकरून त्यांनाही याबाबत कळावं, त्यांना काही अडचण येऊ नये. 

तिने कोणतंही लोन ऍप्लिकेशन डाऊनलोड केलेलं नव्हतं. एक गोष्ट मात्र नक्की की, मोबाईल वापरतेवेळी तिच्याकडून कुठेतरी चूक झाली होती, एखाद्या अनोळखी लिंकवर क्लिक झालेलं असणार आहे.

आम्हाला हेही माहीत नाही की, समोरील व्यक्ती पुरुष आहे की स्त्री! बिहार, झारखंड या भागातील लोक असावेत. पोलिसांनी सांगितलं की दिवसाला किमान चार ते पाच केस आपल्याकडं अशा दाखल होत आहेत. सध्या याचं खूप प्रमाण वाढत आहे.

या प्रकरातून एक गोष्ट तर समजली आहे की, ते लोक माईंड गेम खेळत असतात. आपलं घाबरून जाणं हे त्यांचं भांडवल असतं. आपला मेंदू या गोष्टींसाठी तयार नसतो, बदनामीची भीती असते. हे लोक याच गोष्टींचा फायदा घेतात. जे लोक कोणाला याबाबत बोलत नाहीत, गोष्ट लपवून ठेवतात ते आणखी अडकत जातात. एका पोलिस मित्राच्या म्हणण्यानुसार काही प्रकरणं आत्महत्येपर्यंत सुद्धा पोहोचली आहेत. 

व्हाट्सअपवर स्टेटस ठेवलेलं बघून माझ्याच ओळखीच्या दोघांनी त्यांच्याबद्दल घडलेले असेच किस्से सांगितले. त्यापैकी एका मुलीने एका मेसेज मुळे घाबरून जाऊन पंचवीस हजार रुपये समोरच्याला दिले होते.

हे सर्व इथं का लिहितोय तर त्याला दोन कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आमचा संदर्भ देऊन कोणी पैसे मागत असेल, धमकी देत असेल तर कोणी लक्ष देऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कोणासोबत असं घडू नये आणि समजा घडलंच तर त्या जाळ्यात अडकू नये!

‘जमतारा’ ही वेब सीरीज ज्यांनी पाहिली असेल त्यांना माहीत असेलच हे सर्व. सीरीजच्या नावातच त्यांनी लिहिलं आहे… सबका नंबर आयेगा ! आपल्या मोबाईलमधली माहिती सुरक्षित नाही. कोणतंही ऍप्लिकेशन घेताना, काहीच न वाचता आपण ‘I Agree’ करतो. कोणत्याही लिंक नकळत उघडतो आणि हे चक्र सुरू होतं. 

आज आमचा नंबर आहे उद्या कोणाचाही असू शकतो… so be careful!

लेखक : डॉ.प्रकाश कोयाडे

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जोडणारा” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “जोडणारा” – लेखक :  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

एका गावात एक शेतकरी राहत होता.रोज सकाळी तो झऱ्यातून स्वच्छ पाणी आणण्यासाठी दोन मोठ्या घागरी घेऊन जात असे. तो त्या  खांबाला बांधून खांद्याच्या दोन्ही बाजूला लटकवत असे .त्यापैकी एकीला कुठेतरी तडा गेला होता. ती फुटलेली होती आणि दुसरी धड,परिपूर्ण होती .अशाप्रकारे तो दररोज घरी पोहोचेपर्यंत शेतकऱ्याकडे फक्त दीड घागरी पाणी उरत असे .

उजव्या घागरीला अभिमान होता की ती सर्व पाणी घरी आणते आणि तिच्यात कोणतीही कमतरता नाही. दुसरीकडे,फुटलेली घागर घरापर्यंत फक्त अर्धेच पाणी पोहोचवू शकत होती  आणि शेतकऱ्यांची मेहनत व्यर्थ, वाया जात होती.या सगळ्याचा विचार करून ती फुटलेली घागर खूप व्यथित व्हायची. एके दिवशी तिला ते सहन झाले नाही.ती शेतकऱ्याला म्हणाली, “मला माझी लाज वाटते. मला तुमची माफी मागायची आहे.”

शेतकऱ्याने विचारले,”का? तुला कशाची लाज वाटते?”

तुटलेली घागर म्हणाली , “कदाचित तुम्हाला माहीत नसेल; पण मी एका ठिकाणी फुटले आहे आणि गेल्या दोन वर्षांपासून मी जेवढे पाणी घरी आणायला हवे होते,त्यातील निम्मेच पाणी आणू शकले आहे.ही माझ्यातली मोठी कमतरता आहे आणि त्यामुळे तुमची मेहनत वाया गेली आहे.”

घागरीबद्दल ऐकून शेतकरी थोडासा दुःखी झाला आणि म्हणाला,”काही हरकत नाही. आज परत येताना तू वाटेत पडलेली सुंदर फुले पाहावीस , अशी माझी इच्छाआहे.” तुटलेल्या घागरीने तसे केले.तिला वाटेत सुंदर फुले दिसली.असे केल्याने तिचे दुःख काही प्रमाणात कमी झाले; पण घरी पोहोचेपर्यंत अर्धे पाणी सांडले होते.निराश होऊन ती शेतकऱ्याची माफी मागू लागली .

शेतकरी म्हणाला,”कदाचित तुझ्या लक्षात आलं  नाही.वाटेत सगळी फुलं होती.ती फक्त तुझ्या बाजूने होती . घागरीच्या उजव्या बाजूला एकही फूल नव्हते. कारण तुझ्यातला दोष मला नेहमीच माहीत होता आणि मी त्याचा फायदा घेतला.तुझ्या दिशेच्या वाटेवर मी रंगीबेरंगी फुलांच्या बिया पेरल्या होत्या.

तू त्यांना दररोज थोडे थोडे पाणी पाजलेस आणि संपूर्ण मार्ग इतका सुंदर बनवलास .आज तुझ्यामुळेच मी देवाला ही फुले अर्पण करू शकलो आणि माझे घर सुंदर करू शकलो.

जरा विचार कर, ‘तू जशी आहेस तशी नसतीस,तर मी हे सर्व करू शकलो असतो का?’

आपल्या प्रत्येकामध्ये काही उणिवा असतात,पण या उणिवा आपल्याला अद्वितीय बनवतात.म्हणजे तुम्ही जसे आहात तसेच राहा.त्या शेतकऱ्याप्रमाणे आपणही सर्वांना तो जसा आहे, तसा स्वीकारला पाहिजे.त्याच्या चांगुलपणाकडे लक्ष दिले पाहिजे.जेव्हा आपण हे करू तेव्हा तुटलेली घागरही चांगल्या घागरीपेक्षा अधिक मौल्यवान होईल.

लेखक:अज्ञात

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आयुष्याचा उद्देश – सिद्धांत ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ आयुष्याचा उद्देश – सिद्धांत  ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा असतात. त्या गोष्टी मिळाव्यात अशी गरजही असते. त्याचा क्रम साधारण पुढील प्रमाणे असतो.

अन्न,वस्त्र,निवारा,पैसा,प्रतिष्ठा व मी कोण? याचा शोध.

त्यातील अन्न,वस्त्र,निवारा,पैसा व भौतिक सुख सुविधा याच्या मागे माणूस लागतो.आणि आपण जेवढे त्याच्या मागे लागतो तितकेच ते पुढे पळते.जशी सावली धरता येत नाही तसेच काहीसे होते. मग ही सावली आपल्या मागे कशी येईल याचा विचार केला पाहिजे. आपण सूर्याकडे पाठ करुन चाललो तर सावली आपल्या पुढे असते.पण सूर्याकडे तोंड करुन चाललो म्हणजे सूर्याला सामोरे गेलो तर सावली मागे येईल. मग हा सूर्य कोण? तर आपण स्वतः …..

स्वतः कोण आहोत? स्वतः मधील क्षमता ओळखल्या तर या सगळ्या सावल्या,भौतिक सुखे,लोकप्रियता आपल्या मागे येते. म्हणजेच आपल्या आयुष्याचा उद्देश आपल्याला माहिती असणे महत्वाचे असते. जगात इतकी माणसे असताना माझा जन्म झाला आहे म्हणजे निसर्गाला माझ्या कडून काही काम करुन घ्यायचे आहे.हे लक्षात घ्यावे.

▪️ आपल्या सभोवती जी वैश्विक शक्ती आहे त्याचे आपण शक्तिशाली मानवी रूप आहोत. आणि या वैश्विक शक्तीला आपल्या कडून काही करून घ्यायचे आहे हे कायम लक्षात ठेवावे.

▪️ स्वतः मध्ये कोणते टॅलेंट म्हणजे दैवी शक्ती आहे याचा शोध घ्यायचा आहे. प्रत्येक व्यक्ती युनिक असते. प्रत्येकाची हुशारी,कौशल्ये वेगळी असतात.

▪️ या वेगळे पणाचा व आपल्यात असलेल्या वैश्विक शक्तीचा उपयोग करुन आपल्या संपर्कात येणाऱ्यांना आपण कशी मदत करु शकतो याचा विचार करायचा आहे.

How can I help? हा विचार प्राधान्याने करायचा आहे.

आपण जे लोकांना देतो ते आपल्याकडे कित्येक पटीने परत येते. म्हणून मला काय मिळणार या पेक्षा माझ्या कडून कोणाला काय मिळणार? माझ्यामुळे किती जण आनंदी होणार? याचा विचार करुन त्या प्रमाणे आचरण केले तर तोच आनंद कित्येक पटीने आपल्या कडे येणार आहे.

या साठी पुढील गोष्टी आचरणात आणाव्यात.

▪️ माझ्यात वैश्विक दैवी शक्ती आहे.माझा जन्म काही कारणा साठी झाला आहे. हे मान्य करावे.

▪️ स्वतः मधील युनिक टॅलेंट म्हणजे वेगळ्या दैवी शक्तीची यादी करावी.

ही यादी करताना काही गोष्टींचे स्मरण केले तर यादी करणे सोपे होईल.

उदा. आई वडील काय केल्यावर शाबासकी देत होते?

माझ्याकडे माणसे कोणत्या गोष्टी मुळे येतात?

माझ्या कोणत्या कृतीने माणसे आनंदी होतात?

माझ्या मधील कोणत्या गोष्टी मुळे मी लोकांना प्रिय आहे?

याचा विचार केला तर आपल्यात कोणते विशेष व इतरांच्या पेक्षा वेगळे गुण म्हणजेच वेगळी दैवी शक्ती आहे ते लक्षात येईल.

▪️ माझ्याकडे अमर्याद पैसा व वेळ असेल तर मी इतरांच्या साठी काय काय करु शकेन याची यादी करणे. जे करावेसे वाटेल ते म्हणजे विशेष गुण आहेत.ज्या गोष्टी करायला आवडतात त्यांची एक यादी करणे.

▪️ माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी कशी व कोणती मदत करु शकेन? ज्या मुळे त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल.

हे जर आपण अंमलात आणले तर नक्कीच आपल्या आयुष्यात एक वेगळा आनंद निर्माण होणार आहे.

हे सगळे करण्याचा उद्देश एकच आहे. तो उद्देश म्हणजे स्वतःला ओळखणे.

स्वतः मधील क्षमता,सकारात्मकता व स्वतः मधील वेगळे पण ओळखणे. एकदा आपण स्वतःला ओळखले की बाकीच्या गोष्टी आपोआप मागे येणार आहेत.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फलाट… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

☆ फलाट… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

दुपारची वेळ असूनही फलाट सुमसाम होता. गाडी यायला अजून दोन तासांचा वेळ होता. साडेचारची गाडी साडेचारला येईलच याची शाश्वती नव्हती. तोपर्यंत ताटकळणं आलंच. दिवसातून एकदा पॅसेंजर एकदा या दिशेला, दुसरी त्यादिशेला जायची. असलाच कुणी पॅसेंजर तर घ्यायची पोटात. नाहीतर थांब्याची वेळ तीन मिनिटे संपली की निघायची. तसं चाकांचं रूळावरून धावणं अव्याहत. बाकीच्या गाड्या थांबत नव्हत्या. धडधड धावून जात होत्या. फलाट त्यांच्यासाठी सावकाच.

रणरणत्या उन्हात फलाटावर तो एकटाच. स्टेशन तसं छोटं असल्याने छप्पर ही छोटंच. कौलारू. काही कौलं सुटी झालेली. त्यातून उन्हाची तिरीप फलाटावर येणारी तीही नेमकी बाकावर. बाकं ही मोजकीच. कोपऱ्यात मोठं रांजण लावलेलं आडोशाला.त्याला लाल कपडा गुंडाळलेला. तो मात्र ओला होता. माठातलं गार पाणी घशा खाली ढकललं. तेवढंच बरं वाटलं. जंबूखेडा हे काहीसं वेगळं वाटणारं नाव स्टेशनला. ते नाव लाल रंगाने मोठ्या अक्षरात पाटीवर लिहीलेलं ठळकपणे. स्टेशनच्या दोन्ही बाजूला. जिथून स्टेशनला उतार लागतो.पाटीवर गावाच्या नावाखाली एमएसएल ही लिहीलेलं. मीन सी लेवल नऊशे छत्तीस फूट. अर्थात गाड्यांतून मुशाफिरी करणाऱ्या मुशाफिराला त्या आकड्यांशी काही देणं घेणं नव्हतं. दिवसातून एकदा गाडी येते जाते हेच खूप होतं त्यांच्यासाठी.फलाटही फारसा उंच नव्हताच. सिंगल लाईनवर धावणाऱ्या गाडीसाठी फलाटावर दोन्ही बाजूला रूळ असलेले. कधी अवचित काही घडलं तर मालगाडी वा पॅसेंजरही थांबायच्या बराच वेळ दुसऱ्या रूळावर.       फलाट छोटासाच असल्याने नीटनेटका साफ असलेला. दिवसातून दोन वेळा केर काढला तरी पुरे. माणसांची नियमित ये जाच नसलेली तेव्हा कचरा होणार कसा? डोक्यावरून उन्हं कलली तरी फलाट तापलेलाच. घामाच्या धारांनी चिंब होणं होत असलेलं चिकट चिकट. कौलांवर कावळे तेवढे हजर असलेले. त्यांची काव काव अजून दोन तास ऐकावी लागणार. 

गाव तसं पाच मैल लांब तेही छोटंसंच. पाच पन्नास घरं असतील नसतील. आठवड्यातून एकदा आठवडे बाजार भरतो तेव्हा थोडा फार गलबला होतो गावात. एरवी शांतच. गावातली मंडळी दिवसभर शेतात. रात्रीही निजानिज लवकर घडत असलेली. गावाच्या मध्यावर असलेलं देवीचं देऊळ. त्यात गणपती, मारूती, शंकर पिंडीच्या रूपात, देवी समोर सिंह, शंकरा समोर नंदी सगळे गुण्यागोविंदाने नांदत असलेले. गणपतीला दुर्वा, महादेवाला बेल, देवीला लाल फुल, मारूतीला तेल अजूनही वाहिलं जात असलेलं. गाव अजूनही तसंच वीस पंचवीस वर्षांपूर्वी होतं तसंच. बदल तसा फारसा नाहीच. अनोळखी चेहेऱ्यांची भर पडली इतकंच. गावाच्या ओढीने आलो तर गावातल्या खाणाखुणा तशाच मात्र गाव तसं अनोळखीच. घरोघरी ओट्यावर बसून असलेली म्हातारी मंडळी सोडली तर परिचित असलेलं तसं कुणीच नाही. मुद्दाम ओळख लपवली मग. कुणाचाच विचार करायचा नाही हे पंचवीस वर्षांपूर्वी ठरवलं होतं जेव्हा गाव सोडलं होतं तेव्हा. आताही तेच. वेगळा विचार करणं शक्यच नव्हतं. राहत्या घरात दुसरीच माणसं राहत असलेली. शेत जमीनही गेलेली. नदीचं पाणी तर नेहेमीच आटणारं. जेमतेम चारसहा महिने वाहायची तेव्हा. उन्हाळ्यात कोरडीठाक. आताही तशीच होती कोरडीठाक. गावात मोजक्याच विहीरी. त्यावर निभावून नेलं जाई. तेवढाच ओलावा. येणं तर झालं गावात. पण जीव लावणारं, ओलावा देणारं कुणी उरलंच नव्हतं. 

एक कुत्रं धावत धावत गेलं फलाटावरून. तेही पाहत होतं विचित्र नजरेने. कोण हा पाहुणा? त्याचं धावणं पाहिलंन् आठवलं. असाच धावत येत होतो गावातून. गाडीची वेळ झाली की. मग डोकावून डोकावून पाहणं व्हायचं लांबचलांब रूळांवर. वेळ झाली की वेळेवर वा कधी उशिरा ते यायचंच काळं धुड धडधडत, कोळशाचा काळा धूर ओकत. त्या कोळशाच्या धुराचा वास ही खोलवर घ्यावासा वाटायचा. माथी फडकी बांधून असलेले ड्रायव्हर हीरो वाटायचे. कधीकधी गार्ड, स्टेशनमास्तर व ड्रायवरचे बोलणं व्हायचं. तितकाच वेळ गाडी जास्त थांबायची. तेवढ्यात ही गाडीत चढउतर करून घ्यायचो. गाडी हलली की उडी टाकायची. मग इंजिनकडे पळणं व्हायचं. गाडी बरोबर शर्यत लावणं मजेशीरच असायचं. करवंद, जांभळं विकणाऱ्या मुली हमखास असायच्या. मग तो मेवा चाखत चाखत गावाकडे परतणं व्हायचं.  तेव्हा माहित नव्हतं की एके दिवशी डोक्यात राख घालून याच गाडीतून लांब निघून जाणं होणारेय कायमचं. 

गाडी येण्याच्या अर्धातास अगोदर  स्टेशन मास्तरने खिडकी उघडली. सर्वात अगोदर तिकीट काढून घेतलं. थेट मुंबईचं तिकीट काढल्याने स्टेशन मास्तर अचंबित होऊन बघत होते. मागून आणखी एकाने तिकीट काढलं. बस तेवढाच व्यवहार खिडकीवर झाला. पुन्हा बाकावर येऊन बसलो तर स्टेशन मास्तरही शेजारी येऊन बसले.“ नवीन दिसताय गावात? ” चौकशी केलीच त्याने. “ मी इथलाच. ” इतकंच म्हटलं तर त्याच्या डोळ्यात कोण आश्चर्य उमटलेलं. “ कधी बघितलं नाही? ” तसं मग परवाच्या फ्लाईटचं युएसचं तिकीटच त्याच्या हातात ठेवलं. त्याने ते न्याहाळून लगेच परत केलं. दुसरे तिकीट काढलेला सुटेडबुटेड तरूण दुसऱ्या बाकावर ऐटीत बसला होता. त्याच्या पाया जवळ पागोटं घातलेला म्हातारा बसलेला. त्याचं सारखं टुकूरटुकूर पाहणं चाललेलं. काही वेळानं तो आलाच जवळ. पुन्हा एकदा त्याने निरखून घेतलं. हात जोडून राम राम केला.  “ निंबा पाटलाचा पोर ना रे तू! ” आठवत नव्हतं कोण असावा हा. पण जसं तो बोलला तसं लख्खं आठवलं. ज्याच्या अंगाखांद्यावर खेळलो होतो तो हा धोंडू. आता जख्ख म्हातारा झालेला.  पटकन खाली वाकणं झालं. धोंडूने तर  छातीशीच कवटाळलं. त्याच्या डोळ्यात पाणीच पाणी. “ पहाटेच आलास अन् लागलीच निघाला व्हय मुडद्या. ” गळाच दाटून आला. बोलवेचना त्याच्याने. पाण्याची बाटली धरली तर दोन घोट घेत भडाभडा बोलायलाच लागला. “ घराच्या जोत्या समूर उभं राह्यलं तवाच वळखलं तवास्नी. मालकाचं पोर हाय, लई मोठं झालंस रे! कुटं निगून गेला व्हतास. असं कुनी काय निगून जातं का रागास्नी!  तुजी आई गेली झुरून झुरून तुज्यापायी. आबांनी घर शेती विकली गेलं शहरात. तुजी भाऊ बहिणी कुनी फिरकत नाही गावाकडं. तू कसं येणं केलंस? ” आता माझ्या डोळ्यात पाणी. “ गाव आठवलं. गावाकडची माणसं आठवली. देवीच्या देवळातली शाळा आठवली. अन् हा फलाट आठवला बघ अन् आलो तसाच. ”

बराच वेळ धोंडू बोललाच नाही. नुसतं डोळ्यातनं पाणी.  मग स्वगत म्हटल्यासारखा धोंडू बडबडत राहिला. “ हा माझा नातू गाव सोडून शहरात चाललाय. एकेक करून सोडत चाललेत. गाव गाव नाही राहिलं आता. रयाच गेली. जुनी जिव्हाळ्याची माणसं नाही राहिली. विखरून पडलंय गाव. विसरलं ही जाईल काही दिसांत. ”  धोंडू स्वतःतच हरवत चाललेला. इतक्यात गाडीची  शिट्टी वाजली.  फलाटावर गाडी येऊन दिमाखात उभी राहिली. तसं धोंडूने स्वतःला आवरलं. तसं एकमेकांच्या पुन्हा पाया पडणं झालं. मी धोंडूचा खांदा थोपटत म्हटलं. “ गाडीची वेळ झाली की निघून जावं लागतं. थांबणं होत नाही. ” गाडीने वेग घेतला तसा फलाट मागे पडत गेला. 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “फक्त अर्धा ग्लास पाणी” ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ “फक्त अर्धा ग्लास पाणी” ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

आज काही मित्रांना भेटायला एका हॉटेल मधे गेलो होतो..

विषय अर्थातच पाण्याचा होता, गप्पा चालू होत्या, विषय जसा-जसा पुढे सरकत होता, तसं एक observe करत होतो, अनेक टेबल्सवर लोक बिल पे करून निघून जाताना पिऊन उरलेले पाण्याचे अर्धे ग्लास तसेच राहत होते… गोष्ट अतिशय नॉर्मल अन कित्येकदा स्वतः केलेलीही अन पाहिलेलीही…

आमच्याही टेबल वर जाताना मला 4 ग्लास अर्धेच दिसले. आमच्याच नकळत घडलेलं हे.

मनाला काहीतरी खटकत होतं.

मिटिंग संपली. सगळे बाहेर आलो. मित्रांना Bye करून परत हॉटेल मध्ये घुसलो. परवानगी घेतली अन वेटर्सचा मॅनेजर होता त्याला भेटलो. 

म्हटलं, हे आता जे आमच्या टेबलवरचं चार अर्ध ग्लास पाणी होतं, त्याचं काय केलं?

तो म्हटला ज्या वेटरने टेबल क्लिअर केला असेल त्याने ते पाणी बेसिन मधे ओतून दिलं असणार, तेच करतो आम्ही. त्या उष्ट्या पाण्याचा काही उपयोग नाही ना आता.!

 म्हटलं विक-डेज मधे तासाला अंदाजे किती लोक येत असतील?

तो म्हटला, नाही म्हटलं तरी 15 ते 20 जण सरासरी. दुपारी लंचला अन रात्री डिनरला जास्त.

म्हटलं. म्हणजे 10 तास हॉटेल चालू आहे असं पकडलं तर साधारण सरासरी 250 जण एका दिवसात हॉटेलला येतात. हेच शनिवार रविवार दुप्पट होणार. त्यातून तुमचं हे छोटं हॉटेल. मोठ्या हॉटेल्सची हीच संख्या हजारात असणार!

म्हणजे सरासरी रोज 350 जण. यातल्या साधारण 200 जणांनी जरी अर्धा किंवा एक ग्लास पाणी न पिता तसंच ठेवलं तर अंदाजे 100 लिटर पाणी बेसिन मधे “रोज वाया”.

म्हणजे एक हॉटेल कमीतकमी 100 लिटर “अतिशय चांगलं अन प्रोसेस्ड पाणी” बेसिन मधे रोज ओतून देतं. हे पाणी ड्रेनेज मधून जाऊन शेवटी नदीच्या इतर ‘घाण’ पाण्यात मिसळतं.

पुण्यात सध्या अंदाजे छोटे मोठे पकडून 6000 च्या वर हॉटेल्स आहेत. 

म्हणजे दिवसाला 6000*100 लिटर,

 म्हणजे 6 लाख लिटर प्यायचं पाणी आपण रोज नुसतं ओतून देतोय. आता या घडीला.

हे झालं एका दिवसाचं , असं आठवड्याचं म्हटलं तर 42 लाख लिटर अन वर्षांचं म्हटलं तर 22 कोटी लिटर शुद्ध पिण्याचं पाणी आपण फक्त ओतून देतोय. या पाण्याला शुद्ध करायचा आलेला खर्च वेगळाच.

हे एका शहराचं, अशी महाराष्ट्रात कमीत कमी 15 मोठी शहरं आहेत . मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, वगैरे वगैरे कित्येक.

बर हे कोणत्या देशात, कोणत्या राज्यात घडतंय?? तर जिथं सरकारी आकडेवारीनुसार जर 4 तासाला एक जण ‘शुद्ध पाण्याअभावी’ होणाऱ्या डायरिया सारख्या रोगाने मरतोय त्या राज्या देशात. म्हणजे एका बाजूला लोक पाण्यावाचून तडपून मरतायत अन दुसऱ्या बाजूला एवढं शुद्ध केलेलं पाणी आपणच मातीत मिसळतोय.

बरं हे पाणी येतं कुठून..तर आपल्या आसपासच्या dams मधून. पुण्याच्या आसपास 7 dams आहेत, पुण्याला दरवर्षी साधारण 13 TMC पाणी लागतं, अन यावर्षी उपलब्ध पाणी आहे 17 TMC,  उरलेलं 4 TMC पाणी शेतीला. 

यावर्षी मात्र पाऊस कमी झाल्याने अन पुण्याची लोकसंख्या सतत वाढत असल्याने शेवटी राज्य सरकारने आदेश दिलेत की 17 TMC पाणी हे पुण्याला देण्यात यावं  म्हणजे शेतीला उन्हाळी आवर्तनासाठी पाणी जवळ-जवळ नाहीच!!. म्हणजे आपण जे वाया घालवतोय ते या शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी आहे. “उद्या शेतकऱ्याच्या गळ्यात पडणारे फास आपण आपल्या हातानेच एका बाजूला आवळत असताना, दुसऱ्या बाजूला आपणच त्यांना वाचवायच्याही बाता करतोय”… हा क्रूर विरोधाभास आहे!

पण हे सगळं थांबू शकतं, फक्त तुमच्या ओठातून येणाऱ्या “दोन” शब्दांनी.. मोजून दोन… 

इथून पुढं कधीही वेटर समोर तुमच्या ग्लास मधे पाणी ओतत असेल तर त्याला फक्त एवढंच म्हणा … अर्धा ग्लास!! 

याने तुम्हाला लागेल एवढंच पाणी तुम्ही घ्याल अन उरलेलं पाणी वाचेल, हॉटेलचं वाचलं म्हणजे नगरपालिकेचं, नगरपालिकेचं वाचलं म्हणजे धरणांचं अन धरणांचं वाचलं म्हणजे “आपलंच..!!”

फार छोटी गोष्टय,  फक्त दोन शब्द उच्चारायचेत पण तुमचे दोन शब्द तुमचेच 22 कोटी लिटर पाणी वाचवू शकतात…

लक्षात ठेवा ज्या प्रगत मानवजातीने, सेकंदाच्या दहाव्या भागाच्या प्रिसीजनने परग्रहावर माणूस यशस्वी उतरवलाय,, त्याच मानवजातीला अजून पर्यंत ‘पाणी’ मात्र निर्माण करता आलेलं नाहीये..

मग आपण जे निर्माण करत नाही, ते कमीतकमी वाचवूयात तरी की… तेही आपल्याच माणसांसाठी…!! 

सो इथून पुढं हॉटेल मध्ये असलो की …. “अर्धाच ग्लास पाणी..!!!”

— ( हे फक्त पुण्यातच घडतं असं समजुन दुर्लक्ष करु नका…. पोस्ट गरजेची म्हणून पाठवली, साभार : डी डी कट्टा ग्रुप)

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “हयातीचा दाखला…” – लेखक : श्री मिलिंद पाध्ये ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “हयातीचा दाखला…” – लेखक : श्री मिलिंद पाध्ये ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

काल सकाळी अगदी बँक उघडल्याउघडल्याच बँकेत जाऊन, नियमांनुसार आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून, मी जिवंत असल्याचं सिद्ध करून आलो.वरचं आमंत्रण मध्येच आलं नाही तर पुढचं वर्षभर पेन्शन सुरळीतपणे मिळावं म्हणून. मनात आलं, जवळजवळ चाळीस वर्षं

नोकरी केली; पगार घेतला आता पुढची चाळीस वर्षं पेन्शन खात जगायला मिळालं तर…..!

एक महत्त्वाचं काम हातावेगळं केल्याच्या समाधानात बँकेतून बाहेर पडलो आणि बाजूच्याच टपरीवरच्या ताज्याताज्या भज्यांचा घमघमाट नाकाशी दरवळला. जीभ चाळवली, पावलं थबकली. गरमागरम कांदा भजी आणि मग कडक चहा. सुख म्हणजे आणखी काय असतं, मनात आलं. ऑर्डर देणार तोच… तोच कालपरवाच व्हॉट्सअपवर वाचलेला कुणा डाएटीशीयनचा लेख आठवला…. वयानुसार बीपी-कोलेस्टेरॉल, शुगर किती असावं, कुठल्या वयात काय खावं-काय खाऊ नये, काय करावं-काय करू नये वगैरे वगैरे. हे सगळं पाळणारा शतायुषी होऊ शकतो, असंही त्यात लिहिलेलं आठवलं. शंभर वर्षं पेन्शन खायचं असेल तर आत्ता भजी खाऊन कसं चालेल, मनात आलं. एव्हढा तरी संयम पाळायलाच हवा, स्वतःलाच बजावलं आणि मागं फिरलो.

येताना वाटेवरच्या भाजीमार्केटमधनं मोड आलेली कडधान्यं आणि फळं घेतली. त्या डाएटीशीयनच्या म्हणण्यानुसार माझा आहार आता असाच असायला हवा होता. पुढची ३७ वर्षं आता हेच खायचं. निरामय जीवनाचा मार्ग आता आपल्याला सापडलाय, या आनंदात घराकडे येणारा मार्ग कधी संपला कळलंही नाही.

“पटापट आंघोळ, देवपूजा आटपा हं, आज तुमच्या आवडीची झुणकाभाकर, लसणाची चटणी…” बायकोचं वाक्य पुरं व्हायच्या आतच तिच्या हातात कडधान्य, फळं देत म्हटलं, “सखे, करूया फलाहार, नको झुणकाभाकर अन् जगूया आपण वर्षे शंभर.” काही बोलली नाही ती त्यावर, अवाक् का काय म्हणतात, तशी झाली असणार. तिनं झुणकाभाकरच खाल्ली. वर “नाही जगायचे मज फुकाचे वर्षे शंभर, चवदार चविष्ट खाऊनी मी जगणार मस्त कलंदर” म्हणाली. जेवल्यावर तिखटमीठ लावलेली पेरूची फोड खातखात, “मला नाही अळणी खायला आणि जगायला आवडत,” असंही म्हणाली.

“मी नाही येणार,” मी त्यांना म्हणजे कट्टयावरच्या माझ्या मित्रांना म्हटलं. वीकेंडला कुठल्याश्या रिसॉर्टवर जायचं ठरवत होते सारेजण.

खायचं -प्यायचं, गायचं- नाचायचं, हास्यविनोद – धमालमस्ती. पण मी “नाही” म्हटलं. शंभर वर्षं जगायचं तर असला बेबंदपणा करुन कसं चालेल? “तू आलंच पाहिजे” असा माझा फारच पिच्छा पुरवला त्यांनी, तेव्हा मग मी त्यांना माझा शंभर वर्षं जगण्याचा प्लॅन सांगितला, तर ते हसून कट्टयावरच गडबडा लोळले, म्हणाले, “च्युतिया आहेस साल्या. यातलं काही करणार नाहीस, खाणार-पिणार नाहीस तर मग शंभर वर्षं जगून करणार काय तू?” बँकेत लागण्यापूर्वीचे दिवस आठवले. नोकरीच्या शोधात असतांना दिलेल्या इंटरव्ह्यूजमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर येत नसलं की मी असाच खजील होऊन समोरच्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यांकडे बघत बसत असे.

“ऐकताय का, शेजारच्या जोशीवहिनी विचारत होत्या, चारधाम यात्रेला येताय का म्हणून. ते दोघं जातायत. एकमेकांना कंपनी होईल, ट्रिपही होईल आणि वर तीर्थयात्रेचं पुण्यही पदरी पडेल म्हणत होत्या. जाऊया ना?” रात्री बेडवर पडतापडता बायको विचारत होती. “छे, अजिबात नको. डोंगरदऱ्यांतून घोड्यावर बसून देवदर्शनाला जायचं म्हणजे केवढं रिस्की. च्यायला! घोड्याचा पाय घसरला तर वर जाऊन समोरासमोरच देवाचं दर्शन व्हायचं. त्यापेक्षा शंभर वर्षं पेन्शन घेत, देव्हाऱ्यातल्या देवाचं रोज दर्शन घेतलेलं बरं.” मी तिचा प्रस्ताव धुडकावून लावला. ती पुन्हा उठून बसली, म्हणाली, “शंभर वर्षं जगायचं, हे काय खूळ डोक्यात शिरलंय हो तुमच्या? आहे ते आयुष्य मजेत जगावं की माणसानं. पाडगांवकरांची कविता वाचली आहे ना तुम्ही … ‘सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा!’ तिने अख्खी कविता ऐकवायच्या आत डोक्यावरनं पांघरूण घेऊन झोपल्याचं सोंग घेऊन मोकळा झालो.

“गुड मॉर्निंग मंडळी,” वरच्या मजल्यावरचे पाटीलकाका हातातलं नुकतंच उमललेलं टवटवीत जास्वंदाचं फूल बायकोच्या हातात देत सोफ्यावर विसावले.

बायकोनं दिलेल्या थालीपीठाचा तुकडा मोडत ते मला काही विचारणार, तोच बायको म्हणाली “ते नाही खायचे असलं काही. काल हयातीचा दाखला देऊन आल्यापासून शतायुषी व्हायचं खूळ शिरलंय त्यांच्या डोक्यात.”

“च्यामारी, काय करणार आहेस रे तू शंभर वर्षं जगून? म्हणजे काही उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे आणि त्यासाठी जगायचं असेल इतकं, तर ठीक आहे. अदरवाईज हे नाही खाणार, ते नाही करणार, तिकडे नाही जाणार असं करत घरकोंबड्यासारखं शंभर वर्षं जगण्यात कसली मजा आहे? काही समजत नाही बुवा मला. एकविसाव्या वर्षीच समाधी घेणारे आपले ज्ञानोबा, पन्नासाव्या वर्षीच स्वर्गस्थ झालेले छत्रपती शिवाजी महाराज हे कुठे जगले होते शंभर वर्षं? पण ते काय करून गेले त्यांना मिळालेल्या आयुष्यात, हे वेगळं सांगायला नको. महर्षी कर्वे एकशे चार वर्षं जगले; पण स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी. तसं काही करणार आहेस का तू? वाटत तर नाही तसं – तुला काय आज ओळखतोय का मी? अरे आपण छोटी माणसं. म्हणूनच सांगतोय – माणसानं जिंदादिल रहावं नेहमी. खावं-प्यावं, हिंडावं-फिरावं, छंद जोपासावेत आणि हो, अडलेल्या नडलेल्यांना जमेल-झेपेल इतपत मदतही करावी. हा खराखुरा हयातीचा – तुझ्यातला माणूस जिवंत असल्याचा दाखला. काल बँकेत जाऊन करून आलास ती तू हयात असल्याची कागदोपत्री नोंद.”

दरवाज्यापर्यंत पोचलेले पाटीलकाका परत वळले आणि राजेश खन्नाच्या स्टायलीत म्हणाले … “बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए,लंबी नहीं….”

मनापासून हसलो. काकांनी दिलेलं जास्वंदाचं फूल आता जरा जास्तच टवटवीत दिसत होतं.

थालीपीठ खातखात “जिंदगी एक सफर है सुहाना” गुणगुणलो.

लेखक :श्री.मिलिंद पाध्ये

प्रस्तुती :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ क्षणभर स्वतःसाठी ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

 

क्षणभर स्वतःसाठी ☆ सौ कल्याणी केळकर बापट

सध्याचं प्रत्येकाचं जीवनमान हे खूप धकाधकीचे, घाईगडबडीचे झाले आहे.पर्यायाने ते कसल्यातरी तणावाचे पण झाले आहे.आपल्या नित्य दैनंदिन कामकाजात आपण खूप लोकांशी संवाद साधतो.त्या संवादातून, जवळीकेतून कधी मदतीच्या भावनेने आपली कामे इतरांकडून करुन घेतो वा आपण इतरांची कामे करुन देतो.हे सगळं आपण करतो खरं पण अजूनही आपल्याला पूर्णत्वाचा,संतोषाचा,  समाधानाचा कळसोध्याय हा पूर्णच झाल्या नसल्याचे उमगते.आणि मग कारणं शोधतांना एक महत्वाचे कारण सापडते तो म्हणजे आपल्या आतील मनाचा आवाज ऐकण्याचा अभाव.आपले अंतर्मन नेहमी आपल्याला ज्या हव्याहव्याशा वाटणा-या गोष्टी सांगतं त्या खुणावणा-या गोष्टींकडं आपण कधी गरज म्हणून तर कधी संकोच म्हणून, कधी आडमुठेपणा तर कधी संस्कारांचा पगडा म्हणून चक्क कानाडोळा करतो. ह्याचे परिणाम लगेच दिसतं नसले तरी मनावर खोल दूरगामी उमटतं असतात.त्यामुळे सगळं हातातच असून वाळू निसटल्यागतं सारखा गमावल्याचा भास होतो आणि हा भासच आपल्याला आनंदी राहण्यापासून वंचित ठेवत़ो.हा विचार करतांना ह्या मला सुचलेल्या काही ओळी खालीलप्रमाणे……… 

कधी कधी मज रहावे वाटते एकटे,

स्वतःच स्वतःशी बोलावे वाटते नीटसे,

डोकवावे वाटते कधी स्वतःच्याच अंतरी,

कधीतरी न दाबता खंत करावी मोकळी ।।।

*

श्वास घ्यावा मोकळा,दडपण हे संपवावे,

ऊत्तरायणातील दिवस हे मनासारखे जगावे,

सताड उघडोनी कवाडे,स्वातंत्र्याचे वारे प्यावे,

सल मनीचा तो काढून,मुक्तमनाने बागडावे।।।

*

सगळ्यांचा विचार करतांना फार न त्यात गुंतावे,

जखम मनीची ओळखून त्यावर हलकेच फुंकावे,

आपल्यांना साभाळतांना कधी स्वतःलाही जपावे,

नुसतेच झोकून देतांना,”मी”चे महत्व पण जाणावे।।

*

काय हवे हो नेमके मनी एकदातरी पुसावे,

इतरांसाठी जगतांना थोडे आपल्यासाठी पण जगावे,

सगळ्यांना देता देता आपुले न निसटू द्यावे,

झोकून देतांनाही क्षणभर स्वतःसाठी थबकावे

झोकून देतांनाही क्षणभर स्वतःसाठी थबकावे।।

*

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “हे सोहळे की देखावे…….” – लेखिका : सुश्री ज्योती चौधरी ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ “हे सोहळे की देखावे….…” – लेखिका : सुश्री ज्योती चौधरी ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित

नाना आमचे स्नेही.. परवा त्यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा मोठ्या थाटामाटानं संपन्न झाला खरंतर हा सोहळा त्यांच्या मनाविरुद्धच, कारण त्यांना त्यांचा जन्मसोहळा नव्हे तर 81 वी जीवनयात्रा त्यांच्या ठराविक स्नेह्यांसमवेत  घरी साजरी करायची होती पण मुलांसाठी सुनांसाठी अन नातवंडांसाठी ही एक पर्वणी होती स्वतः चे हितसंबंध जपण्याची ! 

आता बघा नाना रिटायर्ड -80 पूर्ण तर  नानी 75 वर्षाच्या!  तिन्ही मुलं फ्लॅट संस्कृतीत रमणारे, गावातच राहतात अन बैठ्या घरात नाना नानी एकटेच राहतात ! जमत नाही हल्ली स्वयंपाक करणं म्हणून एका मावशींकडचा डबा  सकाळीच येतो. खरं तरं गरमागरम जेवण ही नानांची तरुणपणची आवडच ! 

“ बरेच दिवस झालेत गरमागरम जेवण जेवून “..  चार दिवसापूर्वीच ते नानींना म्हणालेत ! पोळी चावत नाही, भाजी तिखट असते म्हणून नानी मिक्सरमधून  पोळी काढून वरणासोबत देतात. घरकामास अनेक  वर्षांपासून मदतीला असते मालू ! 

आठ दिवसांपूर्वी मुलं सुना सर्वजण नानींकडे जमले, नानींना कोण आनंद झाला. लगेच त्यांनी श्रीखंडाच्या वड्या सर्वांच्या हातावर ठेवल्या. धाकट्या सुनेनं येण्याचं  प्रयोजन सांगितलं .. ‘ आम्हा सगळ्यांना नानांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा करायचाय,’  क्षणभर शांतता.!.

.. हल्ली असले  सोहळे आणि तो दिखावू थाट नाही सहन होत म्हणून नानांनी विषय बंद केला ,नानी म्हणाल्या, ” छान घरी करू साजरा यांचा वाढदिवस, तुमच्या किलबिलाटानं घरं हसेल, आनंदून मोहरेल . यांना आवडेल असे गरमागरम दोन पदार्थ अन् मऊसा वरण- भात- तूप ठेवू, त्यांचे समवयस्क  स्नेही 

बोलवू !”  …..पण नवीन पिढीला नव्या पद्धतीने करायचं होतं सेलिब्रेशन.. परवा नाना-नानींना  सत्कार मूर्ती   बनवून बॅंक्वेट हॉलच्या सजवलेल्या सोफ्यावर बसवलं, नाना कडक सफारीत तर नानी  भारी भक्कम पैठणीत आणि दागिन्यांनी मढवलेल्या..चेहरा थकलेला न् शरीर दमलेलं ! येणारे पाहुणे कुणीच ओळखीचे नसल्यानं आलेली, भेदरलेली भावना ! 

मुलांचे बॉस.. सहकारी.. मित्र मंडळ.. नातवंडांचे कॉलेज कंपू.. सुनांचे किटी ग्रुप्स.. सोशल नेटवर्किंग, यात 250 माणसं झाली  मग झालं काय…नाना अन् नानींचे 8-10 जण ‘ उगीचच वाढतात ‘ म्हणून बोलवले गेलेच  नाहीत..! त्यामुळे सोहळा नक्की कुणाचा याचा नाही म्हटलं तरी नानींना राग आलेला ! बरं दणक्यात सोहळा करायचा तर पदार्थही वेगवेगळे हवेत ! कुणाला चायनीज आवडतं तर कुणाला पंजाबी ..साउथ इंडियन डिशसुद्धा आपली स्टाईल दाखवत होत्या..महाराष्ट्रीयन पदार्थ नेहमीच होतात म्हणून त्यांना सुट्टी दिलेली ! आईस्क्रीम अन्  विविध पदार्थांची  रेलचेल ..पण नाना नानींना गोडबंदी होती, मग खायचं काय..?दात नसलेल्या सत्कारमूर्तींसाठी खाण्याचा पार आनंदच होता ! बरं खाण्याच्या टेबलपर्यंत जायचं कसं? मॅनर्स पाळायला हवेत म्हणून आजी आजोबा गेल्या तीन तासापासून नुसतेच सूप पिवून गप होते ! 

एकदाचा सत्कार सोहळा दिमाखात  संपन्न झाला अन आता रात्रीचे 10:30  झालेत. ‘ जेवण  जात  नाही रे बाबाsss ‘ म्हणत दोघांनी जरासं पुन्हा सूपच घेतलं !  मुलांनी रात्री 11वाजता नानांना  घरीच रिलॅक्स वाटतं म्हणून बैठ्या घरी आणून सोडलं…!

 ….. …. 

सकाळी मालू आली.. जणू सगळं जाणणारी… 

नानांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा याचा नीट उच्चारही करता न येणा-या, न समजणा-या तिनं  मात्र आज त्यांच्या आवडीचा  गरमागरम वरण भात घरून करून  आणला अन् वरून तुपाची धार ओतत ती म्हणाली, 

” माह्या मायबापाले मी तं पायलं नाय जी, पर तुमी मायेनं मले वागोता यातच मले माहे बावाजी भेटले.. माह्याकडून काय द्यावा इचार केल्लो अन् आठोलं तुमाले गरम वरन भात लै आवडते..नानी नं दिवाडीले देल्लेल्या जास्तीच्या  पैशातनं तूप आनलं.. नाई मनू नका जी..! “ 

… काय बोलणार  होते दोघं …. डबडबलेल्या डोळ्यांनी नानींनी नानांना वरण भाताचा घास भरवला.. 

मालू आज दोघांसाठी ख-या अर्थी अन्नपूर्णा होती. ! 

लेखिका : ज्योती चौधरी

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares