☆ अतिथि… – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
“मी आजच्या अतिथींना विनंती करतो की, त्यांनी दीप प्रज्वलन करावं…..”
असं निवेदक म्हणाला
आणि स्मितहास्य फुललं.
अतिथी. … !
माझ्याशी महिनाभर आधी बोलून तारीख , वार , वेळ नक्की करून कार्यक्रम सादर करण्यासाठी निमंत्रित केलेला मी ‘अतिथी ‘कसा काय ठरलो?
तिथी , वार, वेळ न ठरवता जो येतो तो अतिथी.
पण अगदी मोठमोठय़ा कार्यक्रमाच्या पत्रिकेतदेखील ‘प्रमुख अतिथी’ अमुक अमुक असं चक्क दहा दिवस आधीच लिहिलेले असतं.असो !
पण खरंच विचार केला तर आजच्या काळ, काम, वेग या बंधनात पुरते गुरफटून घेतलेल्या टेक्नोसेव्ही मोबाईल जगतात ‘अतिथी ‘म्हणून येणं किंवा जाणं शक्य आहे का?
पंधरा- वीस वर्षांपूर्वी ही मजा नक्कीच होती.
“कालपासून तुझी सारखी आठवण येत होती आणि आज तू हजर “, असं म्हणताना तो खुललेला चेहरा दिसायचा.
“आलो होतो जरा या बाजूला. बरेच दिवस भेट नाही…”
“तुमच्या हातची थालीपीठांची आठवण झाली. चला तेवढंच निमित्त…”
“बसा हो भावोजी, कांदा चिरलेलाच आहे. दहा मिनिटांत थालिपीठ देते आणि आज दहीही फार सुरेख लागलंय हो! आलेच. “
असा संवाद जर आज ऐकवला तर, “बापरे ! किती मॅनर्सलेसपणे वागत होती माणसं ? न कळवता असे कसे कोणाच्या दारात उभी ठाकू शकतात ? भयंकर आहे.” अशा प्रतिक्रिया नक्कीच येतील.
कारण अतिथी परंपरा आता कालबाह्य झाली आहे. नव्हे, ती हद्दपार होणे किती महत्वाचे आहे, हे आम्हाला पटले आहे.
आम्ही स्वतःभोवती एक सोयीस्कर लहानसं वर्तुळ आखून घेतलंय. त्या परिघामध्ये उपयुक्ततेनुसार माणसं वाढतात किंवा कमी होतात.
“येतोय”..”निघालोय”. ..” बस मिळाली” ..”ट्रेन पकडतोय”…”लिफ्टमधे आहे”… अशा अपडेशनमधे कोठेतरी अचानक मिळणारा भेटीचा सुखद धक्का हरवून गेलाय.
परवा मुलीने “अतिथी देवो भव”चा अर्थ विचारला…
तिच्याच भाषेत सांगायचं म्हणून म्हटलं, “outdated software आहे. हे आता नाही कुठे कुणी install करत.”
एकदा आपल्या आवडत्या व्यक्तीला न सांगता, न कळवता, भेटून तर पहा.
old version किती user friendly होतं, याचा अनुभव नक्कीच येईल .
लेखक – अज्ञात
प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४ मो ९९७५६००८८७
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
☆ 2. शाळेची योग्य वेळ… श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
शाळेची योग्य वेळ –
1) आमचं बालपण 2) मुलांचं बालपण 3) शिक्षक म्हणून.
कोकणातलं ठार खेडं. चालतच शाळेत जायचं. आमची पूर्ण प्राथमिक मराठी शाळा. पंचक्रोशीत एकच. ती दुबार भरायची. सकाळी 7.30 ते 10.30 दुपारी 2.30 ते 5.30.
पाच मैलांवरून येणाऱ्या मुलांनी कसं यायचं?केव्हा उठायचं? त्यांच्या दुपारच्या वेळेचं काय? जेवणाचं काय?हा विचार कोणीही का केला नव्हता ? कारण शिक्षण सार्वत्रिक नव्हतं. ब्राह्मणांची मुलं सातवी पर्यंत कशीबशी शिकायची नि मास्तर व्हायची. बाकीची जरा जाणती झाली की “मुंबईक जावन रामाबालू नायतर गिरणीत चिकटुची.” शहरातल्या काही शाळा 11 ते 5 .तरी पहिली ते चौथी सकाळीच. का? माहित नाही.
2) आमची मुलं लहान असतानाही थोडीफार अशीच परिस्थिती होती. मोठ्यांच्या शाळा, कॉलेजीस, ऑफिसेस दुपारी, पण लहान मुलांना मात्र सकाळचीच शिस्त (?) किंवा शिक्षा. कारण?
3) मी शिक्षक असताना फारच दारूण अवस्था होती. आमची शाळा खेड्यातली. तरी टेक्निकल हायस्कूल. टेक्निकलचे वर्ग सकाळी. बाकीचे पाचवीते दहावी सर्व वर्ग 11त 5..गावातल्या पहिली ते चौथी प्राथमिक शाळा — जिल्हा परिषदेच्या. त्याही 11ते 5 होत्या. छान चाललेलं.
— मुलांची संख्या वाढली , तुकड्या वाढल्या. इमारत पुरेनाशी झाली. शाळा दुबार भरवणे हा पर्याय उरला. आणि लहान मुलांवर संकट आलं. पाचवी ते सातवी 7.30 ते 12. आठवी ते आता दहावी कं12.30 ते6. दोन्ही शिफ्टच्या मधल्या सुट्टया लहान झाल्या. आमची शेतकऱ्यांची, मजुरांची मुलं त्यांच्या आयाही कामाला जायच्या. त्यांनी मुलांचे डबे कधी करायचे?बरींच मुलं बिन आंघोळीची यायची. कारण पाणी सुटलं तरी ते भरून ठेवायला हवं आयांना. मुली तर आपापल्या वेण्या कशातरी गुंडाळून यायच्या. केस विंचरायला सवड नको? पहिल्या तासाला वर्गात घाण वास सुटलेला असायचा. पोट साफ करून तरी मुलं येतील ही शंकाच. मुलांना स्वच्छl रहाण्याचं शिक्षण कसं मिळायचं? शाळेची इमारत बांधणं ही काही साधी गोष्ट नव्हती. अशी सगळी आबदा. इमारत होईपर्यंत असंच सगळं.
आता काही उपाय.–
1) शाळेच्या इमारती डामडौल नसलेल्या पण, मोठ्या, सर्व वर्गाना पुरतील अशा बांधाव्यात म्हणजे कमी खर्चात ऐसपैस असाव्यात. दोन शिफ्ट करण्याची वेळच येऊ नये.
2) मुंबई, पुण्याच्या सर्व स्त्रिया नोकरी करतातच. त्यांच्या मुलांची सकाळची शाळा त्यांना सोयीची. मुलांना सगळ्या तयारीनिशी एकदा शाळेत पाठवलं की स्वतःची तयारी. पण त्यात मुलांच्या झोपेचं, शीशूच काय? त्यांच्या बालपणावर उगीचच ताण, त्यांच्या आजी,आबांना ठेऊन घ्याव. ते निवांतपणे, प्रेमाने नातवंडांचं करतील, एकदा मुलांच्या बाजूने विचार केला की उपाय खूप आहेत. शब्द मर्यादेमुळे बास.
☆ …बाळा, निवृत्त हॊ… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
(आई बाबांचे पन्नाशीच्या मुलाला पत्र)
प्रिय बाळा.. शुभाशीर्वाद.
‘आईबाबा मी voluntary रिटायरमेंट घेऊ कां ?’ हा तुझा प्रश्न आणि आमच्याकडून तुला हवं असलेलं उत्तर आणि अनुभवाचा सल्ला विचारण्याचा तुझा हेतू लक्षात आला. तू भविष्याच्या विचाराने गोंधळून न जाता अवश्य रिटायरमेंट घे. आतापर्यंत धावपळीच्या सर्कशीत कितीतरी मोलाचे, सोन्यासारखे क्षण तुम्ही गमावलेत. तुला नोकरी लागल्यापासून सारखा पळतोयसच तु त्यापुढे तुला बायका,मुले,आई वडील यांच्यासाठी द्यायला जराही वेळ नाहीये.इतकं धाऊन-धाऊन काय मिळवता रे तुम्ही? पैसाच नां? अरे तो कितीही मिळवलास ना तरी अपुराच ठरतो. आपल्यापेक्षा खालच्या लोकांकडे बघ. हा गरीब वर्ग एका खोलीतच आपला स्वर्ग सजवतो. तेच स्वयंपाक घर.तिथेच हॉल आणि तिथेच बेडरूम . तुझे मात्र हिल स्टेशनवर दोन बंगले, फार्म हाऊस राहता प्रशस्त प्लॅट आहे .एवढी जागा, बंगले, खरंच लागतात का रे ? आणि तिथल्या शांततेचा अनुभव घ्यायला वेळ तरी मिळालाय का तुम्हाला?या सगळ्या धावपळीच्या चक्रातून तू बाहेर पड. आता पन्नाशी उलटलीय तुझी . कुठेतरी थांबायलाच हवं. मिळवलेल्या पैशाचा उपभोग घेण्याची हीच योग्य वेळ आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करून रोग बळावले तर पुढील आयुष्यात कसा उपभोग घेणार तुम्ही या ऐश्वर्याचा? सेवानिवृत्त होऊन मोकळ्या हवेतला मोकळा श्वास घ्यायला तुझ्या फार्म हाऊस मध्ये जाण्याची हीच योग्य वेळ आहे. आणि कुणासाठी सांठवताय रे इतका पैसा ? मुलांना शिक्षण दिलेस. त्यांच्यासाठी भरपूर पैसा खर्च केलास. पण सहज मिळालेलं आयत सुख मुलांना आळशी बनवतं . त्यांना त्यांच्या हाताने काहीतरी करू दे ना जरा ! स्वावलंबी होण्याची सवय लागू दे त्यांना .तुझ्या बरोबर सुनबाई घरच्या राम रगाड्यात भरडली गेली. तिलाही मोकळी हवा मिळू दे.तिच्याही कष्टी मनाला तुझ्या प्रेमाचा शिडकावा हवाच की रे!आपल्या खानदेशात तुझ्या जन्मगावी तिला घेऊन जा.तापी काठची भरताची वांगी, मेहरूंणची बोरं, उडीद ज्वारी घालून केलेली कळण्याची पौष्टिक भाकरी, भाकरीवरचा झणझणीत ठेचा, तो खातांना ठेच्याच्या झणझणीतपणा बरोबरच आनंदाचे अश्रू पण येतिल तिच्या डोळ्यातून ., ते बघ.
आता बेकारी, महागाई आभाळाला पोचलीय. ज्यांना नोकरी नाही अशांसाठी तू काहीतरी कर.तू तुझी जागा खाली कर म्हणजे नवतरुणांना नवीन जागा मिळेल.सूर्य नाही होता येणार तुला. पण त्यांच्यासाठी आशेचा प्रकाशदिप तर होउ शकतोस ना तू?
तेव्हा बाळा आता निवृत्ती घे. आमच्या अनुभवाची शिदोरी घेऊन खऱ्या अर्थाने शांत,निवांत, निरामय आयुष्याचा आस्वाद घे. लहानपणीच्या आठवणीत रंगून जा. वर्तमानाचा आनंद घेऊन भविष्यकाळाची स्वप्न उज्वल कर.
सौ सुनबाईंना आणि आमच्या गोड नातंवंडांना शुभाशीर्वाद
ही हाळी ऐकून रावसाहेब धोतराचा सोगा सावरत लगबगीने बाहेर आले …
सरकारकडून पत्र होतं ..
ते त्यांनी लगबगीनं फोडलं आणि एका दमात वाचून सरळ उभे राहिले. लगबगीने आत गेले व त्यांच्या कपाटातल्या एका खणात ते पत्र ठेवून त्यास कुलूप लावले व चावी कनवटीस लावली.
एक दीर्घ सुस्कारा सोडला.
तिथून निघाले. सरळ बाहेर आले.आत डोकावून त्यांनी मोठ्या आवाजात आवाज दिला.
‘जरा माळावर जाऊन येतो बरं.’
आणि परतीच्या प्रत्युत्तराची वाट न पाहता कसलीशी खूणगाठ मनाशी बांधली व आलेला हुंदका गिळला .बराच वेळ ते शून्यात नजर लावून बसले होते.
दिवस ढळायची वेळ झाली, तसे ते सावकाश निघाले वाड्याकडे.
ते जरा गप्पच दिसत होते. ते पाहून सारजाबाईंनी विचारलेही, ‘काय झालं’ म्हणून.
पण ते ‘काही नाही’ म्हणून दुस-या विषयावर बोलू लागले.
‘सुनबाईंना कोण घेऊन येणार ? कधी येणार ? की आपण धाडू या मनोहरला ? (रावसाहेबांचा कारभारी) पण २/३ दिवस असा विचार चालला असता सुनबाईंना घेऊन तिचे भाऊ आले .
जुळी मुले अगदी जयंतसारखी दिसत आहेत. सारजाबाईंनी बाळंतिणीवरून भाकरतुकडा ओवाळून टाकला.घर कसं भरून गेल्यासारखं दिसत होतं.
वाड्यावर बाळांच्या आगमनाने चैतन्य आलं होतं.
दिवस कसे भराभर जात होते.अजय सुजय आता चालू लागले होते.थोडेथोडे बोलायचेदेखील.
सुनबाई आनंदी होत्या आता लवकरच मुलांचे बाबा येणार होते घरी.
‘मुलांना पाहून किती खूश होतील!’ह्या जाणिवेने ती पुलकित झाली..
पण मुलांच्या देखभालीत ती मामंजींना विचारायचे विसरून जायची की जयंत कधी येणार? काही पत्र आले का? रोज रात्री ती ठरवायची की उद्या विचारीन पण राहूनच जायचे.
आज मात्र तिने पदराची गाठच मारून ठेवली की सकाळी मामंजींना विचारायचेच.
सकाळी संधी साधून तिने ‘जयंत कधी येणार,याबद्दल काही कळले का?’ हा विषय काढला. तेव्हा रावसाहेब उत्तरले,
‘अग कालच त्याच्या ऑफिसवरून संदेश आला होता. त्याची ड्यूटी वाढली असल्याने त्याला महत्त्वाच्या कामानिमित्त परदेशी पाठवलेय व ते मिशन गुप्त असल्याने तो पत्रव्यवहार नाही करू शकणार, असं सांगितलं त्याच्याऑफिसमधून. कधी नव्हे तो तुला जरा विसावा मिळाला. तू दुपारी झोपली होतीस, म्हणून तुला सांगायचे राहून गेले .बरं झालं, तू आठवण काढलीस.’
ती जरा हिरमुसलीच.
आता काम संपणार कधी आणि जयंत येणार कधी ? मुलांना कधी भेटतील त्यांचे बाबा ? बाबांना कधी भेटतील त्यांची मुलं ?
ती विचार करू लागली.
तितक्यात सुजयच्या आवाजानं तिची विचारशृंखला तुटली व ती मुलांच्यात गुंग झाली.
एक वर्ष उलटलं.
तिचं रोज वाट पाहणं सुरूच होतं.
मग रावसाहेबांनी भर दुपारी बातमी आणली की ‘टपाल कार्यालयात संदेश आलाय की जयंताला शत्रूच्या लोकांनी पकडलेय. तो कधी सुटेल काही सांगता येत नाही.’आणि सुनबाईच्या डोळ्यातून खळकन दोन टीपे गळली.
ती निर्धाराने म्हणाली, ‘मामंजी, ते येणारच सुटून. मी सावित्रीसारखी देवाला आळवेन. माझा विश्वास आहे देवावर. हे येतीलच.तुम्ही काळजी करू नका.’
दिवसांमागून दिवस गेले.
वर्षांमागून वर्ष.
सुजय, अजय आता कॉलेजला जाऊ लागले.
ते आपल्या आईला म्हणत,
‘आई, तुला वाटतं का की बाबा परत येतील?’
तशी ती चवताळायची व म्हणायची,’ते येणारच!
युद्धकैदी सोडतात ना त्यात तेही सुटतील!’
सासुबाईंनीही डोळे मिटले, जयंताची वाट पाहत. मामंजी घरात फारसे राहत नसत .
महिनाभराने मामंजींची खोली साफ करायला सुनबाई त्या खोलीत गेल्या.
त्यांना जयंताची सगळी पुस्तके,लहानपणीचे कपडे एका कपाटात व्यवस्थित ठेवलेले दिसले.
त्या एकेक वस्तू प्रेमाने हाताळत होत्या .जणू त्या वस्तूंमधून जयंत त्यांना दिसत होते .आतल्या खणात काय असावे बरं, इतके किल्ली कुलपात .?
मामंजी तर सगळे व्यवहार माझ्यावर सोपवून निवृत्त झाले होते .सासुबाईही कशात लक्ष घालत नसत.
मग काय असावे बरे आत ?
त्यांनी तो खण उघडला.आत सरकारचे पत्र होते.
त्या मटकन खाली बसल्या
आणि वाचू लागल्या…
‘जयंत रावसाहेब भोसले सीमेवरील बॉंबहल्ल्यात शहीद!’
दुसरे पत्र मामंजीचे. सुनबाईस.
‘चि.सौ.कां.सुनिता,
हो. मी तुला सौ.म्हणतोय कारण मला तुझ्या सौभाग्यलंकारात जयंतास पाहायचे होते .तुला विधवेचे आयुष्य जगू द्यायचे नव्हते .म्हणून मी जयंताची बातमी सर्वांपासून गुप्तच ठेवली होती. मला आणखी एक गोष्ट सिद्ध करायची होती की विधवेने कुलाचार केला तरी देव कोपत नाही. तू माझी स्नुषा नसून सुकन्याच आहेस. तुझ्या मंगळसूत्राने, तुझ्या कुंकवाने, तुझ्या हिरव्या बांगड्यांनी, तुझ्या जोडव्यांनी, तुझ्या किणकिण वाजणा-या पैंजणांनी मला घरात लक्ष्मीचा निवास असल्याचे जाणवायचे .
तू अशीच सौभाग्यलंकार लेऊन रहा .व अखंड सौभाग्यवती म्हणूनच तुझे या जगातून जाणे होऊ दे.
ही या बापाची इच्छा पुरी कर.
-तुझा पित्यासमान मामंजी.’
तिने पत्राची घडी घातली .
अगदी गदगदून पोटभर रडली.
शांतपणे आपले अश्रू पुसले.
कोणी नसताना दोन्ही पत्रे जाळली.
दिवाबत्ती केली.व सुनांच्या हळदीकुंकवाच्या तयारीला लागली.
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ बाळा मला समजून घेशील ना ? ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
(नुकतेच अमळनेर येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले. ते कितपत यशस्वी झाले याबद्दल वेगवेगळी मते/वाद ऐकायला मिळतात. त्या पार्श्वभूमीवर माझा पूर्वी लिहिलेला हा लेख)
रात्रीची शांत वेळ. शहरातली वर्दळ आता कमी झाली होती. रस्ते मोकळा श्वास घेऊ लागले होते. कधी कधी रात्रीची शांत वेळ मला फिरण्यासाठी योग्य वाटते. बऱ्याच वेळा मी या गोदावरीच्या काठी येऊन बसतो. गोदामैया शांतपणे वाहत असते. तिच्या पात्रामध्ये दिव्यांचे छान प्रतिबिंब पडलेले असते. आजबाजूला असणाऱ्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर गॊदामैयाचे हे रूप मला भावते. दिवसभर तिच्या काठाशीही वर्दळ असते. भाविक येतात, व्यापारी येतात,श्रीमंत, गरीब, लहान थोर सारे सारे गोदामाईचा आश्रय घेतात. पण रात्री आपापल्या मुक्कामी निघून जातात. गोदामाई काही म्हणत नाही. पण रात्रीच्या शांत वेळी तिच्या तीरावर जाऊन बसावं. ती यावेळी निवांत असते. दिवसा तिला काही बोलावसं वाटत नसलं तरी यावेळी ती आपलं मन मोकळं करते.
असाच मी तिच्या कुशीत जाऊन बसलो. अंमळ थंडीच होती. पण तिच्याजवळ बसलं की सगळं काही विसरायला होतं. माई म्हणाली, ‘ आलास. ये. बैस जरा. तुला खूप काही सांगायचं आहे. पण त्या आधी तिकडे पलीकडे माझी सखी उभी आहे. आम्ही दिसायला वेगवेगळ्या असलो तरी माझा आणि तिचा आत्मा एकच आहे. तू माझ्याकडे जसा हक्काने येतोस, तसाच तिच्याकडेही जा. तिची थोडी विचारपूस कर. मग पुन्हा तुझ्याशी बोलायला मी आहेच. ‘ मी म्हटलं, ‘ माई, तू काळजी नको करुस. मी जातो लगेच तिच्याकडे आणि तिला काय हवं नको ते पाहतो. ‘
मी गेलो. खरंच भरजरी वस्त्र लेऊन एक कुलीन, घरंदाज स्त्री उभी होती. कपाळावर कुंकवाचा टिळा होता. मुद्रेवर न लपणारं विलक्षण तेज होतं. मी तिला प्रणिपात केला. म्हटलं, ‘ मला गोदामैयाने पाठवलं तुमच्याकडे. कोण आपण .? मी आपल्याला काही मदत करू शकतो का ?
क्षणभर ती माऊली स्तब्ध होती. मग म्हणाली, ‘ असं परक्यासारखं नको बोलूस रे. मी तुझी आईच आहे. एका आईनं तुला जन्म दिला. मी तुला शब्द दिले, भाषा दिली. शेतामध्ये धान्य पेरतो. नंतर ते अनेक पटींनी परत मिळतं. तशी लहानपणापासून तुझ्या अंतरात मी शब्दांची पेरणी केली. ती भाषेच्या रूपाने तुझ्या लेखणीतून, वाणीतून प्रकट झाली. आता तरी लक्षात आलं ना की मी कोण आहे ते !
‘ होय माते, तू तर माझी माय. माय मराठी. मला लक्षातच आलं नाही आधी. मला क्षमा कर. ‘
‘ असू दे लेकरा. चालायचंच. तुझा काही दोष नाही त्यात. ‘
पण माते मला सांग, तू आता इथे कशी काय ?
अरे तुझ्या लक्षात नाही आलं का ? दोन तीन दिवस इथे साहित्य संमेलन होतं ना…! म्हणून आले होते खूप आशेने !
‘ पण माते मला सांग तुझी ही अशी अवस्था कशानं झालं ? तुझ्या अंगावरचा हा भरजरी शालू कशानं फाटला ? माये, तू तर श्रीमंत, धनवान. तुला कशाचीच कमी नव्हती. माझ्या ज्ञानोबा माउलींना तर तुझा केवढा अभिमान ! संस्कृतमधील गीता त्यांनी तुझ्यारूपाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. ज्ञानोबा माऊली म्हणाली, ‘ माझा मऱ्हाटीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. ‘ खरंच माऊलींच्या शब्दाशब्दातून अमृताचे थेंब ठिबकत होते. म्हणूनच माऊलींनी तो वर्णन करण्यासाठी ज्ञानेश्वरी नंतर ‘ अमृतानुभव ‘ लिहिला. माऊलींनी सांगितलेल्या गीतेवरील टीका ‘ ज्ञानेश्वरी ‘ ऐकताना श्रोत्यांनी जे श्रवणसुख अनुभवलं त्याला तोड नाही. उपमा नाही. सर्वांगाचे जणू कान झाले. पुढे तुकोबांनी अभंग लिहिले. त्याची गाथा झाली. तुकोबांच्या मनाला भिडणाऱ्या तरल अभंगांनी इंद्रायणीसारखंच मराठी मनाला भिजवून चिंब केलं. समर्थ रामदासांनी दासबोध सांगितला. मनाचे श्लोक सांगून मनाला बोध केला. शिवरायांना ‘ जाणता राजा, श्रीमंत योगी, सामर्थ्यवंत, वरदवंत, कीर्तिवंत….’ अशी विविध सार्थ विशेषणे लावून तुझ्या श्रीमंतीचा प्रत्यय आणून दिला.
संत नामदेव, चोखामेळा, जनाबाई, मुक्ताबाई अशा कितीतरी संतांनी तुझं वैभव वाढवलं. आमची निरक्षर असलेली बहिणाबाई इतकं सुंदर काव्य बोलली की भल्याभल्यांनी तोंडात बोटं घातली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान तर काय सांगावं…! त्यांच्या शब्दात सांगायचं तर तू म्हणजे स्वातंत्र्यदेवतेसारखीच आहेस.
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज उदधिचे गांभीर्यही तूचि…
या ओळी तुला सुद्धा लागू होतात.
ग दि माडगूळकर, मंगेश पाडगावकर, भा रा तांबे, बा भ बोरकर यासारखे कवी, लोकमान्य टिळक, लोकहितवादी, विष्णुशास्त्री चिपळूणकर, आचार्य अत्रे, वसंत कानेटकर, पु ल देशपांडे, राम गणेश गडकरी यांच्यासारख्या अनेक लेखकांनी तुझ्या अंगावर विविध रूपांचा साज चढवला. कविवर्य कुसुमाग्रज, वि स खांडेकर, विंदा करंदीकर यांनी तर मराठी साहित्यात जी भाषेची समृद्धी, श्रीमंती आणली, त्यामुळे साहित्य अकादमीला तुझी दखल घ्यावीच लागली. कुसुमाग्रज तर मराठी मातीबद्दल बोलताना म्हणाले…
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दर्याखोर्यांतील शिळा
काय बोलू, किती बोलू आणि कसं सांगू असं होतंय मला. आणि माते, तरीही तुझी आज अशी अवस्था ? ‘
‘बाळा, तू म्हणतोस ते सगळं बरोबर आहे. पण या सगळ्या पूर्वसुरींच्या गाथा आपण किती दिवस गाणार ? आता आपण काय करतो ते अधिक महत्वाचं नाही का ? आणखी काही दिवस जर माझ्याकडे लक्ष नाही दिलं तर माझी अवस्था तू कल्पनाही करू शकणार नाहीस अशी होईल. अर्थात सुदैवाने मला माझ्या सुपुत्रांकडून आशा आहे. चांगले दिवस बघायला मिळतील याची खात्री आहे. पण त्यासाठी तुम्हाला हातपाय हलवावे लागतील रे….’
‘तू बघतोस ना की शाळांमधून दिवसेंदिवस मराठी भाषा हद्दपार होताना दिसते आहे. आवश्यक भाषा म्हणून काही शाळा नाईलाजाने शिकवतात ती ! मराठी माध्यमातून शिकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. हिंदी, इंग्रजी या भाषांबद्दल माझ्या मनात आकस नाही रे. पण लहानपणी मुलांना वाढीसाठी आईचंच दूध चांगलं असतं नाही का ? लहानपणी मुलाला आईचं दूध मिळालं तर त्याचा शारीरिक, बौद्धिक विकास निकोप होतो….’
‘साहित्य संमेलनात माझ्या वाढीसाठी खूप काही प्रयत्न होतील अशी मनात आशा ठेवून मी आले होते. तशी माझी अगदीच निराशा झाली नाही. पण कसं होतं ना, घरात मुलाचं लग्न झालं, सून आली की आईची तशी उपेक्षाच होते. तिला आई आई म्हणून म्हटलं जातं . पण घरात होणाऱ्या निर्णयात तिचा फारसा विचार घेतला जात नाही. तसंच काहीसं झालं आहे… ‘
‘माझी एक खंत आहे, सांगू का ? ‘
‘हो, सांग ना…! मलाही जाणून घ्यायचं आहे. ‘
ही दरवर्षी जी साहित्य संमेलनं घेतली जातात ना, ती चांगलीच गोष्ट आहे. पण माझा जो वाचक आहे, साहित्याचा आस्वाद घेणारा रसिक आहे त्याचा विचार कोणी करतं का ? मंडळाचे पदाधिकारी आणि राजकीय नेते जसं ठरवतील तसंच संमेलनाचं स्वरूप असतं. सामान्य माणसांचा विचार कुठे असतो त्यात ? मला राजकीय नेत्यांचं वावडं नाही. त्यांनी साहित्य संमेलनात जरूर यावं. पण केवळ एक रसिक म्हणून. व्यासपीठावर सारस्वतांचीच मांदियाळी असावी. संमेलनाची दशा, दिशा त्यांनीच ठरवावी. तुम्ही सगळ्या रसिक वाचकांनी ठरवलंत तर राजकीय नेत्यांची आर्थिक मदत घेण्याची गरज पडणार नाही. मला ते आवडतही नाही. कारण मग मूळ मुद्दे बाजूला राहतात. किरकोळ कारणांवरून हेवेदावे, धुसफूस होते. आरोप होतात. संमेलनाला गालबोट लागते. तुला म्हणून सांगते. जेव्हा व्यासपीठावर कार्यक्रम सुरु होते ना, तेव्हा मी व्यासपीठावर नव्हतेच ! तुमच्यामध्ये पण बसलेले नव्हते. मी उभी होते एका कोपऱ्यात. आणि कोपऱ्यात उभ्या असलेल्या व्यक्तीकडे कोणाचं लक्ष जातं ? उत्सव माझा, माझ्या नावानं सगळं पण उपेक्षित मीच ! तू जे मघाशी विचारलंस ना की हा भरजरी शालू कशानं फाटला, त्याचं कारण आता तुझ्या लक्षात आलं असेल. नाही म्हणायला मला एका गोष्टीचा आनंद झाला. मराठी वाचकांचा टक्का वाढल्यासारखा मला दिसतो. कारण ग्रंथविक्री विक्रमी झाली…’
‘अनेक नवोदित कवी, लेखक नवनवीन साहित्य लिहून मोलाची भर घालताहेत. तरीही मला वाटतं की अजून उत्तमोत्तम, कसदार साहित्य निर्माण व्हावं. त्या साहित्याच्या वाचनाने नवीन पिढ्या समृद्ध व्हाव्यात. हे साहित्य संस्कार देणारं असावं, जगणं शिकवणारं असावं. सामान्य माणसांच्या आयुष्याशी निगडित गोष्टींची चर्चा साहित्यात व्हावी. त्याला त्यापासून मार्गदर्शन मिळावं. सामान्य रसिक वाचक केंद्रस्थानी ठेवून लेखक, कवींनी लिहितं व्हावं. मराठी मातीत जन्मलेले अनेक सुपुत्र अनेक उच्च पदांवर काम करत आहेत. कोणी शास्त्रज्ञ, कोणी प्राध्यापक इ. पण यातली बरीचशी मंडळी इंग्रजीत लेखन करण्यात धन्यता मानतात. त्यांनी आपले विचार सर्वसामान्यांसाठी मराठीत मांडावे… ‘
‘शासनाकडून मला फार अपेक्षा नाहीत. माझ्या अपेक्षा तुमच्यासारख्या माझ्या सुपुत्रांकडून आहेत. वाचक, लेखक, कवी यांनी मला समृद्ध करावे ही माझी अपेक्षा. साहित्य संमेलने व्हावीत ती तुम्हा सगळ्या रसिक वाचक, लेखकांच्या बळावर असे मला वाटते. त्यात उत्स्फूर्तता हवी, बळजबरीचा रामराम नको… ! बाळा, माझ्या मनातलं सांगितलं तुला. खूप काही बोलण्यासारखं आहे. पण सगळं सांगण्यातही अर्थ नसतो. समोरच्या व्यक्तीनं सुद्धा समजून घेतलं पाहिजे तरच सांगण्याला, बोलण्याला काही अर्थ उरतो. बाळा, घेशील ना मला समजून…? ‘
तिचे डोळे पाणावले होते. उरात हुंदका दाटून आला होता. मी तिच्या चरणांना वाकून स्पर्श केला. माझ्याजवळही आता शब्द नव्हते. मी फक्त एवढंच म्हटलं, ‘ आई, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हण…’ तिचा मोरपिशी हात पाठीवरून फिरला. काय नव्हतं त्या स्पर्शात ! ज्ञानोबा, तुकोबा, सावरकर, कुसुमाग्रज आदी सर्व मराठी सारस्वतांचे आशीर्वाद त्यात सामावले होते. मी भारावून वर पाहिलं, तर माऊली अदृश्य झाली होती. गोदामाई शांततेत वाहत होती. माईला मनोमन नमस्कार केला. तिची मूक संमती घेऊन मार्गस्थ झालो. दिव्यांनी रस्ते उजळले होते आणि तारकांनी आकाश… !
☆ १५६३२ फुट उंच पहाडावरची पहिली हिमदुर्गा ! ☆ श्री संभाजी बबन गायके☆
सियाचिन…. जगाचं जणू छतच. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेली युद्धभूमी आहे ही. आणि ह्या बर्फाच्या साम्राज्यावर आपले पाय रोवून उभे राहण्याची फार मोठी किंमत मोजावी लागते आपल्या सैनिकांना. शून्याच्या खाली साठ सत्तर अंश तापमानापर्यंत खाली घसरणारा पारा जगणं हीच मोठी लढाई बनवून टाकतो. एवढं असूनही आपले जवान इथे रात्रंदिवस पहाऱ्यावर सज्ज असतात. यासाठी गरजेची असणारी शारीरिक, मानसिक क्षमता केवळ पुरूषांमध्येच असू शकते, असं वाटणं अगदी साहजिकच आहे. परंतू या समजुतीला खरा छेद दिला तो राजस्थानच्या उष्ण प्रदेशात जन्मलेल्या एका दुर्गेनं. तिचं नाव शिवा चौहान… अर्थात आताच्या कॅप्टन शिवा चौहान मॅडम.
१८ जुलै १९९७ रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये जन्मलेल्या शिवाचे तिच्या वयाच्या अकराव्या वर्षीच पितृछत्र हरपले. राजेंदसिंह चौहान हे त्यांचं नाव. आईने, अंजली चौहान यांनी मग तिच्या आयुष्याची दोरी आपल्या हाती घेतली.
घरात त्या तिघी. तिची मोठी बहिण कायद्याचं शिक्षण घेण्याच्या प्रयत्नात आणि शिवा मात्र चक्क सैन्यात जाण्याच्या जिद्दीने पेटून उठलेली. पुरूषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचा विचारच हा मूळात मोठ्या हिंमतीचा म्हणावा लागतो. शिवाने सिविल इंजिनियरींगमधली पदवी मिळवली ती केवळ सैन्यात जाण्यासाठीच.
सैन्यात भरती होण्याच्या कठीण मुलाखतीच्या दिव्यातून शिवा प्रथम क्रमांकाने पार पडल्या यातूनच त्यांच्या मनातली प्रखर जिद्द दिसून यावी. २०२० मध्ये त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मध्ये प्रवेश मिळवला आणि पुरूषांच्या बरोबरीने कठीण शारीरिक परीक्षा उत्तीर्ण झाल्या. पुढच्याच वर्षी त्यांना भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी रेजिमेंट मध्ये नेमणूक मिळाली. त्यांच्या विभागाचं नावच आहे ‘फायर अॅन्ड फ्यूरी सॅपर्स….’ अर्थात ‘अग्नि-प्रक्षोप पथक..’ हरत-हेच्या वातावरणात सैन्यासाठी अहोरात्र कार्यरत असणारा विभाग.
मागील दोन वर्षांपूर्वी चीनी सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजीत संघर्षात भीष्मपराक्रम गाजवलेले कर्नल संतोष बाबू याच विभागाचे शूर अधिकारी होते… त्यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले होते.
सैन्य म्हणजे केवळ हाती बंदूक घेऊन गोळीबार करणे नव्हे… सैन्याला अनेक विभाग मदत करीत असतात… अभियांत्रिकी विभाग यात खूप महत्वाचा असतो. आपल्या कथानायिका कॅप्टन शिवा चौहान याच ‘फायर अॅन्ड फ्यूरी’च्या अधिकारी.
Spade म्हणजे फावडे. याचेच फ्रेंच भाषेतील अपभ्रंशित नाव आहे Sappe…सॅपं! त्या काळातील युद्धात किल्ले महत्त्वाचे होते. किल्ल्यांवर ताबा मिळवण्यासाठी त्यांच्या भिंतींच्या अधिकाधिक जवळ जाणे गरजेचे असे. अशा वेळी त्यावेळचे अभियंते वरून झाकले जातील असे खंदक खणत आणि मग सैन्य त्या खंदकांतून पुढे पुढे सरकत जाऊन किल्ल्याच्या समीप जाई. यावरून सैन्यात सॅपर ही संज्ञा रूढ झाली ती आजपर्यंत.
आधुनिक काळात या सॅपर्सचं अर्थात अभियांत्रिकी सैनिकांचं मुख्य काम असतं ते सैन्याला पुढे जाता यावं म्हणून रस्ते बांधणे, पूल बांधणे, भूसुरुंग पेरणं आणि शत्रूने पेरलेले भूसुरुंग शोधून ते नष्ट करणं. या कामांमध्ये अतिशय उच्च दर्जाची तांत्रिक क्षमता आणि अनुभव गरजेचा असतो. आपल्या सैन्यात बॉम्बे सॅपर्स, मद्रास सॅपर्स असे अन्य अभियांत्रिकी विभाग कार्यरत आहेत.
कॅप्टन शिवा चौहान यांनी अगदी कमी कालावधीत अतिशय कर्तव्यतत्पर आणि शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम अधिकारी म्हणून लौकिक प्राप्त केला. उंच बर्फाळ पहाड चढून जाणे, इतक्या उंचीवर अभियांत्रिकी कामांना अंतिम स्वरूप देणे इत्यादी कामांत त्या वाकबगार झाल्या.
त्यांच्या आधी महिला अधिकाऱ्यांना सियाचिन मधल्या १५६३२ फुटांवरील युद्धभूमीच्या खालील ९००० हजार फूट उंचीवर असलेल्या बेस कॅम्पपर्यंतच नेमणूक दिली जाई. उरलेली ६६३२ फूट उंची पार करणं तोपर्यंत एकाही महिलेला शक्य झालं नव्हतं. पण शिवा चौहान यांनी खडतर प्रशिक्षणं लीलया पार पाडली.
सियाचिन भागात सायकल चालवणारी महिला हे दृश्यच अनेकांना कौतुकाने तोंडात बोट घालायला भाग पाडणारे होते. शिवा चौहान यांनी चक्क ५०८ किलोमीटर अंतर कापणारी सायकल मोहिम हाती घेतली आणि पूर्णही करून दाखवली. कारगिल विजय दिनानिमित्त त्यांनी ही अनोखी मोहिम यशस्वी केली. सियाचिन युद्ध स्मारक ते कारगिल युद्ध स्मारक अशी ही सायकल यात्रा कॅप्टन शिवा चौहान यांनी इतर पुरूष अधिकारी, सैनिक यांचे नेतृत्व करून पूर्ण केली, त्यामुळे त्यांच्या क्षमतेबद्द्ल कुणाच्याही मनात शंका उरली नाही.
आणि यानंतर मात्र शिवा चौहान यांनी आणखी ६६३२ फूट उंचीवर जाण्याचा चंग बांधला… प्रचंड कष्ट घेऊन आवश्यक ती सर्व प्रशिक्षणं पूर्ण केली आणि जानेवारी २०२३ मध्ये त्यांना भारतीय सैन्यातील पहिली महिला अधिकारी म्हणून सियाचिन वर प्रत्यक्ष कामावर नेमण्यात आले… एका महिलेसाठी हा एक प्रचंड मोठा सन्मान मानला जावा!
सैनिक हिमवीरांच्या मधोमध मोठ्या अभिमानाने बसलेल्या कॅप्टन शिवा चौहान ह्या नारीशक्तीच्या प्रतीकच आहेत. त्यांच्यापासून समस्त तरूण वर्ग निश्चितच प्रेरणा घेईल. भगवान शिवाचं वास्तव्य असलेल्या हिमाच्छादित पर्वत शिखरांवर शिवा नावाची पार्वतीच जणू भारतमातेच्या रक्षणासाठी बर्फात पाय रोवून उभी आहे!
कॅप्टन शिवा चौहान, आपणांस अभिमानाने सल्यूट… जय हिंद !
☆ “शांता…” – लेखिका : श्रीमती जयश्री दाणी ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
मी शांता. नाही ना ओळखले? श्रीरामाची थोरली बहीण. अवघे रामायण श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि सीतेच्या विविध कथातरंगांनी व्यापले असताना माझा उल्लेख तिथे कुठेच आढळत नाही. अर्थात मला अनुल्लेखाने मारणे हा कुणाचाच उद्देश नव्हता. मी होतेच तशी अदृश्य. गुप्त. अयोध्येत अनोळखी.
माझी ओळख फक्त कौसल्यामातेच्या हृदयात जागी होती. कदाचित तातही मला पदोपदी स्मरत असतील. मी त्यांची पहिली लेक ना! कसे अलगद मला ओटीत टाकून दिले दोघांनी वर्षिणी मावशीच्या. अंगदेश नरेश रोमपाद आणि राणी वर्षिणीला अनेक वर्षे लोटली तरी अपत्य झाले नाही. माता कौसल्येच्या भेटीला दोघे आले असता माझ्या अवखळ बाललिलांनी त्यांचे मन मोहून गेले.
” मला तुझी ही देखणी, मेधावी सुपुत्री देशील का?” माता वर्षिणीने केविलवाण्या आसुसलेल्या स्वरात विचारले. कौसल्या मातेचे मन द्रवले. तिने आणि तात यांनी क्षणात मला दत्तक देऊन टाकले. मला विचारायची गरज नसेल का भासली? कधीतरी पुढे मेंदूत असे विचार येऊनच गेले की माझ्याजागी जर पहिला पुत्र असता तर त्याला इतक्या सहजासहजी दत्तक दिले असते?
अंगदेश नरेशांनी मला प्रेमाने वाढवले. वेदविद्या, शिल्पकलेत निपुण केले. पण मी कन्या असल्याने तिथेही मला राजपद सांभाळायचा अधिकार नव्हता. एकदा तात रोमपद आणि माझा सुसंवाद सुरू असताना एक गरीब ब्राह्मण शेतीची समस्या घेऊन आला. तात यांचे थोडे दुर्लक्ष झाले त्याच्याकडे. दुखावलेल्या ब्राम्हणाने देश सोडला. इंद्रदेवांना ते सहन झाले नाही आणि त्यांच्या क्रोधाने अंगदेशात दुष्काळ पडला.
अस्वस्थ मातापिता ऋषी श्रृंग यांच्याकडे गेले. ऋषीवर्यांनी सांगितलेल्या उपायाने अंगदेशाची भूमी पुन्हा हिरवीगार झाली. प्रसन्न पित्याने माझा विवाह ऋषीदेवांशी लावून दिला. कालांतराने राजा दशरथ यांनी आयुष्याचा उत्तरार्ध जवळ येत आहे, हे बघून कुलगुरू वशिष्ठ यांच्या मार्गदर्शनाने पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचे ठरविले. प्रमुख अतिथी म्हणून यांना व मला मान मिळाला. नाथ म्हणाले, “आतिथ्य स्विकारले तर माझे पूर्वपुण्य पूर्ण लयाला जाईल.” मी म्हणाले, “जाऊ द्या. पितृऋण उतरवायची तेव्हढीच संधी.”
यज्ञपूर्तीच्या वेळी दिलेल्या पायसाने तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या व पुढे मनुष्य जन्माला हरघडी पडणाऱ्या प्रश्नाला ठोस, समर्पक उत्तर देणारे ‘रामायण’ घडले हे सर्वश्रुतच आहे.
रामायण ही रामाची कथा आहे. ‘प्राण जाये पर वचन न जाये’ अशा रघुकुलाची गाथा आहे. त्यात माझे संपूर्ण अस्तित्व लुप्त झाले असले तरी माझ्याही रोमारोमात राम आहे! फारशी चर्चा नसली तरी मी, शांता आणि पती ऋषी श्रृंग यांना या चौघा राजकुमारांच्या जन्माचे श्रेय मिळाले आहे.
हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे माझे मंदिर आहे. या मंदिरात मी पती ऋषी श्रृंग यांच्यासोबत विराजमान आहे. हा पल्ला गाठणे शक्य नसेल तर वाल्मिकी रामायणातील बालकांड मधल्या
“आनाय्य तु महीपाल ऋष्यशृङ्गं सुसत्कृतम् ।
विभाण्डकसुतं राजन् ब्राह्मणं वेदपारगम् ।
प्रयच्छ कन्यां शान्तां वै विधिना सुसमाहितः ॥”
या नवव्या सर्गात मला शोधाल. माझा संदर्भ तिथे नक्कीच सापडेल. एका श्रीरामभक्त राजपुत्रीचा इतका परिचय पुरे नव्हे का?
लेखिका:श्रीमती जयश्री दाणी
संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ज्याचे रूप ऋग्वेदाची मंडले आहेत, शरीर यजुर्वेद आहे, सामवेद ही किरणे आहेत, जो जगाची उत्पत्ती स्थिती व लय यांचे कारण आहे, जो ब्रह्मदेवाचा दिवस असून अचिंत्य व अलक्षी आहे त्या श्रेष्ठ सूर्य देवतेचे मी प्रातःस्मरण करतो.
रोजच सूर्याला नमस्कार करण्याची आपली पद्धत कारण सूर्य आहे म्हणून आपले अस्तित्व आहे, हे आयुष्य आहे हे आपण केंव्हाच जाणले आहे. आपल्या संस्कृतीत प्रत्येक सण हा चांगल्या विचाराने, भावनेने साजरा केला जातो.तसाच हा माघ शुक्ल सप्तमीचा म्हणजेच रथसप्तमी चा सण, सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. तो याच दिवशी साजरा करण्याची कारणे म्हणजे सूर्याचा हा जन्मदिन आहे अशी एक कल्पना, या दिवशी संवत्सर सुरू झाले. याच दिवशी सूर्याला त्याचे वाहन म्हणजे रथ मिळाला ही एक कल्पना!
वास्तव असे आहे की या दिवसापासून सूर्याचे तेज वाढत जाते, तो जास्त वेळ म्हणजे दिवसाचे जास्त तास प्रकाश देतो, आणि आपले आयुष्य आरोग्यदायी करतो.सूर्य आता उत्तरायणात असतो. वसंत ऋतू येतो म्हणजेच सृष्टीची सृजशीलता वाढते.म्हणून सुर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी हा हेतू!त्याचे हे वाढलेले तेज सहन करणारे रथाचे घोडे व त्याचा सारथी अरुण यांच्याप्रती सुध्दा कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी रथासह सूर्याची पूजा करण्याची पद्धत आहे.
(सहज मिळाली म्हणून थोडी रथाबद्दल माहिती सांगते. रथ हे आपले फार प्राचीन वाहन आहे. रथाचे अनेक प्रकार आहेत.देवगणांचा तो देवरथ, राजेमहाराजे यांचा पुष्परथ, खेळांसाठीचा क्रीडारथ, स्त्रियांसाठी चा कणीरथ, रथ विद्येच्या रक्षणासाठी वैजयिक रथ, युद्धासाठी सांग्रमिक रथ.रथ चक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचे चिन्ह, उत्कर्षाचे प्रतीक आहे.)
सूर्याच्या रथाला संवत्सर नावाचे एकाच चाक आहे.त्याला बारा राशी म्हणजेच बारा महिन्यांचे प्रतीक म्हणून बारा आरे आहेत.गायत्री, वृहति, उष्णिक,जगती, त्रिष्टुप , अनुष्टुप, पंक्ती हे सात छंद अश्व रुपात सूर्याचा रथ ओढण्याचे काम करतात. रथाचा विस्तार नऊ हजार योजन तर त्याची धुरा एक करोड सत्तावन हजार योजन आहे.( चौथ्या – पाचव्या शतकात सूर्य सिद्धांतानुसार एक योजन म्हणजे ५ मैल -८ किलोमीटर, पण नंतर १४ व्या शतकात परमेश्वर नावाच्या गणितज्ञाने एक योजन म्हणजे ८ मैल – १३ किलोमीटर आहे असे सांगितले)
एका सूर्य किरणात सात प्रकारच्या ऊर्जा असतात.
प्रभा – तमनाशक, प्राण शक्तिदाता
आभा – धर्मशक्ती दाता
प्रफुल्ला – आत्मज्ञान दाता
रश्मी – सृजनशक्ती दाता
ज्योती – भक्तीरस निर्माती
तेजस्विनी – स्थिती म्हणजेच विष्णूला मदत करणारी
महातेजा – उत्पत्ती व लय म्हणजेच ब्रह्माला व शिवाला सहाय्य करणारी
या सात ऊर्जा रुपी किरणांना त्यांचे त्यांचे रंग असतात. या सात ऊर्जा एकत्रित येऊन सविता तयार होते, ही श्वेत असते.
सूर्याच्या जन्मा बद्दल सांगायचे तर तो आजन्मा आहे. कमळाच्या नाभितून ब्रह्माजी अवतरले. त्यांच्या मुखातून प्रथम ओम् शब्द निघाला, हा तेजरुपी सूर्याचे सूक्ष्म रूप होते. त्यानंतर ब्रह्माजींच्या चार मुखातून चार वेद प्रकट झाले. जे ओम् च्या तेजात एकाकार झाले. हे वैदिक तेजच आदित्य आहे. हा वेद स्वरूप सूर्य पंचदेवांपैकी ( शिव, देवी, विष्णू, गणपती, सूर्य ) एक आहे.
वैवस्वत मन्वंतरात अदितीने सूर्याची कठोर आराधना केली, सूर्यदेव प्रसन्न झाले. तिने सुर्यासारखा पुत्र मागितला. कालांतराने अदिती गर्भवती झाली. तिचे कठोर व्रत सुरूच होते. रागावून कश्यप म्हणाले, अशी उपाशी राहिलीस तर गर्भ कसा वाढेल? तिने तो गर्भ शरीरातून काढला तेंव्हा तो सोन्यासारखा चमकणारा होता. कालांतराने त्यातून एक तेजस्वी, सूर्याचा अंश जन्माला आला, त्याचे नाव विवस्वान ठेवले. असे अदिती कश्यप यांना बारा पुत्र झाले, त्यांना द्वादश आदित्य म्हणतात. हे आदित्य अवकाशातील इतर आदित्यांना ऊर्जा पुरविण्याचे कार्य करतात. (म्हणजे अवकाशात अनेक सूर्य निर्माण होतात अशी कल्पना त्याकाळी सुध्दा होती?)
सूर्याचा विवाह देवशिल्पी व विश्वकर्मा यांची मुलगी संज्ञा हिच्याबरोबर झाला. त्यांना वैवस्वत मनू, यमदेव ही दोन मुले व यमुना (नदी) ही मुलगी झाली. परंतु फार काळ संज्ञा सूर्याचे तेज सहन करू शकली नाही म्हणून तिने आपल्या जागी आपली छाया सोडली व आपण वनात निघून गेली. छायेला सावर्णी मनू, शनिदेव हे दोन मुलगे व तपती ही मुलगी झाली. कालांतराने सूर्याला संज्ञा सापडली, त्यावेळी सूर्य घोडीच्या रुपात होते, त्यांच्या मीलनातून जुळ्या मुलांचा जन्म झाला. अश्व रुपात असताना जन्माला आली म्हणून त्यांचे नाव अश्विनीकुमार!
त्रेता युगातील सुग्रीव हा पण सुर्यपुत्र, त्याच्या जन्माची कथा वेगळीच आहे. ऋक्षराज नावाचे वानर होते, ते एका सरोवरात स्नान करण्यासाठी गेले, सरोवराला मिळालेल्या शापामुळे त्यात स्नान केल्यावर त्याला एका सुंदर स्त्री चे रुप प्राप्त झाले. प्रथम त्या स्त्री वर इंद्रदेव मोहित झाले त्यामुळे बाली चा जन्म झाला. नंतर सूर्यदेव ही मोहित झाले आणि सुग्रीवाचा जन्म झाला. दोन्ही मुले त्याने गौतम ऋषी व अहिल्या यांच्याकडे सोपविली. द्वापार युगात मंत्र सामर्थ्याने कुंतीच्या पोटी जन्माला आलेला कर्ण हा पण सुर्यपुत्र!
सूर्यदेवा,
पहाट वारा जेंव्हा भूपाळी गात असतो तेंव्हा एखादा मोत्यांचा सर सुटावा तसे मोती धारेवर विखुरतात. कोठून आले हे मोती? हां! बरोबर आहे, तुझ्या कंठातला तो मोत्यांचा हार पश्चिमेकडे ठेऊन गेला असशील आणि तिने मोत्यांचा सडा टाकला! सूर्यदेवा, तू येण्याआधीच प्राचीवर गुलाल उधळून तुझ्या येण्याची बातमी अरुण देतो.
माथी किरीट, हाती कमळ,चक्रधारी, शंखधारी,आशीर्वाद मुद्रा, कानी मकर कुंडलांची प्रभा, गळ्यात हार,लाल रंगाच्या सात घोड्यांच्या रथावर, वामांगी पत्नीला घेऊन पद्मासनात आसनस्थ झालेलं, सुवर्ण कांती ल्यालेलं हे तुझं देखणं रुप!
तू तर तिन्ही लोकांचा पालनकर्ता अन्नदाता, त्रिगुणधारी,रोगांचा नाश करणारा, स्वयंप्रकाशी,अध्यात्माचा प्रेरक, आकाश रुपी लिंगाची आराधना करणारा, आकाशाचा स्वामी, ग्रह नक्षत्रांचा अधिपती, तमनाशक, असत्याकडून सत्याकडे, मृत्यूपासून अमरत्वाकडे नेणारा, धर्मपरायण, धर्माच्या व कर्तव्याच्या मार्गाने जाणारा म्हणून कधीही लोप न पावणारे तुझे तेज, चौदा भुवनांचा पालक, चराचर सृष्टीचा आत्मा, विश्वाचा साक्षीदेव, विराट पुरुषाचा नेत्र, अंतराळाचा अलंकार, अमूर्त अशा अग्नी देवतेचे मुख, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश तूच, देव,पितर, यक्ष ज्याची सेवा करतात तो तूच, राक्षस, निशाचर, सिद्ध ज्याला वंदन करतात तो तूच, इतका महान असून तुझे किरण क्षुद्र जीव जंतू, मनुष्य, सर्वांचे चरण स्पर्श करून नम्रतेची शिकवण देतात.
कालस्वरूप, कालचक्राचा प्रणेता, निर्मळ, विकल्प रहित, सर्वज्ञानी आहेस. म्हणूनच मारुतीला आणि कर्णाला तू ज्ञान दिलेस. आणखी काय आणि किती लिहू ? सारं न संपणारे! माझा अवाका ही तेवढा नाही. मला माहित आहे, अनासक्त आहेस तू, त्यामुळेच तिन्हीसांजेला तुझा एवढा मोठा पसारा क्षणात आवरून घेतोस.
तुला एक वचन देते, मावळताना तू जी सूक्ष्म रूपातील तुझी शक्ती व तेज दिव्यात ठेऊन जातोस, त्याचा सन्मान आम्ही करू, आणि घरात रोज एक ज्योत तेवती ठेवू.
राम्या! रग्गड झाली बाबा तुझी शाळासुळा… आरं शाळंत जातुयास कि रोज रोज नवा नव्या खर्चानं बापाच्या सदऱ्याचा खिसाचं फाडतूयासं… आज का म्हनं नवीन वही पायजेल, उदयाला नविन कसलसं पुस्ताकं.. कंपास पेटी, पेन्सल, पट्टी , रबरं, ह्याचं रोजचं विकात घेणं असतयाचं.. काव आला बाबा तुझ्या शाळा शिकण्याचा… आरं लेका शाळतं काय दुसरं शिकवित्यात कि न्हाई.. का नुसतं उगी आज ते आना आनि हे आना एव्हढ्यावरचं शाळा चालली व्हयं… ते बी शाळा सुरू व्हायच्या टायमाला योकदाच काय ते भाराभर घेऊन दिल्यालं असतानं पुन्हा पुन्हा कसली हि पिरपिर चालूच असती.. कवा संपायची रं हि रटरट.. इथं दिवसरात घाम गाळवा तवा कुठं घराचा खुटाना चालतूया… पैश्याचं झाडं अगदी दारात लावलेलं असल्यागत..मागन्याचं भूत कायमचं मानेवरचं बसल्यालं..खाली उतराया मागना व्हयं…काय गरज लागली कि तोड चारपाच पैश्याची पानं भागीव तुझी नडं असं सांगायला येतयं व्हयं… कष्टाबिगर पैका उगवत न्हाई.. आमच्या सारखं ढोर मेहनतीचं काम तुला पुढं करायला लागु नये म्हनुशान दोन चार बुकं शिकलास तर कुठं बी चाकरी करून चार घास सुखानं खाशिला.. म्हनुन ह्यो शाळंचा आटापिटा करायला गेलो तर गळ्यात हि नसस्ती पीडाच पडलीया बघं.. जरा म्हनुन दम खावा इळभर तर तुझ्या शाळंचा एकेक नव्या खर्चाचा वारू चौखूर उधळलेल्या.. आम्ही बी शाळंत गेलो व्हतो.. एक दगडी काळी पाटी नि पेन्सल यावरच शिकलो शाळा सुटं पर्यंत.. कधी वही लागाया न्हाई तर कधी पुस्तकाचं नावं न्हाई.. सगळं घोकंपट्टीचा आभ्यास हुता… आजबी समधं हाताच्या बोटावर नि तोंडावर सगळं आपसूकच येतयं… नि तुमचं टकुऱ्यात तर शिरतं न्हाई पन डझनावारी वह्याचीं रद्दी वाढत जाती… आन तु एकला असतास तरी बी काय बी न कसंबी चालवून घेतलं असतं पर एकाला सोडून तुम्ही चार पाच असताना माझा कसा टिकावं लागावा रं.. एक मिळविनार आनि पाचसहा तोंड खानार..समध्यास्नी लिवता वाचता आलं म्हंजे माप रग्गड झालं… तू थोरला हाईस तवा झाली एव्हढी शाळा लै झाली.. आता कामाधंद्याचं बघुया.. अरं बाबा बाकी सगळी सोंग करता येत्यात पन पैश्याचं सोंग न्हाई आनता येत… आनि त्याचं झाडं बी कुठं लागलेलं नसतयं.. हे तुला आता कळायचं न्हाई.. तू बाप झाला म्हंजी तवा समधं कळंल…
☆ या जगण्यावर शतदा प्रेम करावे — लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
मी आणि आजार ह्यांची ‘दोस्ती ‘ऐन तिशीतली.
‘दोस्ती’ शब्दाने चमकलात? आजार बरोबर घेऊन जगायचं म्हटलं कि दोस्ती होते. .
वयाच्या अडतिसाव्या वर्षी आमच्या दादरच्या शिवाजी पार्कला धावत फेऱ्या मारत असताना मला ह्रृदयविकाराचा गंभीर धक्का जाणवला. माझा भाऊ डाॅक्टर प्रकाश संझगिरीने मला वाचवलं. मी आठवड्याने दक्षिण कोरियातल्या ‘सोल’ ला ऑलिंपिक कव्हर करायला जाणार होतो. तो थेट आयसीसीयूत जाऊन झोपलो. आयुष्य प्रथम तिथे बदललं. पण आधुनिक औषध, भावाची ट्रीटमेंट, जेवण्यातली शिस्त, बायकोचा देवावरचा विश्र्वास, मित्रांचा आधार, सकारात्मक विचार, एन्जियोप्लास्टी आणि ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ ही वृत्ती त्यामुळे मी जवळपास नाॅर्मल झालो.
त्यानंतर ३४ वर्ष भूरर्कन निघून गेली. त्यात अनंत कलात्मक उद्योग मी माझं इंजिनिअरिंग सांभाळून केले. जग फिरलो. मनाच्या एका कोपऱ्यात मृत्यूची भीती होती. पण मनाचा इतर भाग मध्यान्हासारखा उजळला होता. विविध गोष्टी करण्यासाठी मनाला नवी पालवी फुटत होती. नवा मोहर येत होता.
इतक्यात एक दिवस असा आला की सारा मोहरा फिरून गेला.
ती तारीख होती २२ ऑक्टोबर २०२२. मी निघालो होतो ऑस्ट्रेलियाला, टी २० विश्वकपासाठी. त्यावेळची दिवाळी संपता संपता निघणार होतो. बरोबर धनत्रयोदशीला कॅन्सर नावाच्या नरकासुराने गाठलं मला. अचानक रक्ताळलेली लघवी झाली आणि दुसऱ्या दिवशीचा सूर्य अस्ताला जायच्या आत, किडणीच्या चौथ्या टप्प्यातल्या कॅन्सरचं निदान झालं.
मी हादरलो. पण स्वतःला सावरलं. सर्व विसरून तीन दिवस मुलाबाळांसह दिवाळी साजरी केली. दिवाळी संपल्यावर मी एकटाच शिवाजी पार्कच्या एका गल्लीत गेलो. रड रड रडलो. मनात साठलेलं दुःख, भीती, अश्रुतून बाहेर फेकून दिलं. अश्रु पुसले. कुसुमाग्रजांच्या कवितेतले शब्द आठवले. “सर, पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा.” आणि लढायला सज्ज झालो.
डॉक्टर स्मृतीच्या इम्युनो थेरपिने ८ सेंटिमीटरची गाठ, वर्षभरात ५.४ सेंटिमीटर वर आली. त्याकाळात औषधांचे फार वाईट परिणाम मी सहन केले.
कधी कधी वाटायचं, “बस झाले उपचार. थांबवावं सगळं. जे काही आयुष्य त्यानंतर उरेल ते तरी नीट जगावं.”
कधी अतिसार, कधी बध्दकोष्ट, त्यामुळे भगंदरचा त्रास. त्वचेवर लाल व्रण, जिभेची चव पूर्ण गेलेली. इडली सांबारचं सांबारही तिखट लागायचं.
भूक नाही, खाणं कमी, त्यामुळे वजन कमी होत गेलं. मला स्वतःला आरशात पाहणं कठीण जात होतं.
डॉक्टर स्मृतीचं म्हणणं होतं, “आता ऑपरेशन करून ट्युमरग्रस्त किडनी काढून टाकावी” पण माझ्या हृदयरोग तज्ञ भावाने ती कल्पना स्वीकारली नाही. माझी ३५ वर्षाची हृदय रोगाबरोबरची मैत्री काहीतरी परिणाम हृदयावर करणार होती. माझ्या हृदयाच्या पंपाची ताकद कमी झाली होती. ज्याला इजेक्शन रेशो म्हणतात तो ३५ वर आला होता. माझं शरीर माझ्या भावाइतकं कुणालाच ठाऊक नाही.
पण देवाच्या मनात वेगळंच होतं. त्यानेच बोटं धरून मला ऑपरेशन थिएटरकडे नेलं.
पुन्हा दिवाळी जवळ आलेली. क्रिकेटचा विश्वकप सुरू होता. माझं लिखाण सुरू होतं. आणि एक दिवस पोटात दुखायला लागलं. आणि निदान झालं. माझ्या पित्ताशयात खडे आहेत.:
मी स्वतःशी हसलो. कारण विविध आजार माझ्या शरीरावर हल्ला करायला उत्सुक असतात. काय काय आजारांनी ३५ वर्षात माझ्या शरीराचा पाहुणचार घेतलाय! तुम्ही नाव सुध्धा ऐकली नसतील.
‘पायलोनायडल सायनस’ ऐकलंय?
एपिडीडीमायटीस, आय टीपी, वगैरे… सर्जन, डॉ हितेश मेहतांनी माझ्या भावाला सांगून टाकलं, पित्ताशय काढायलाच हवं. म्हणजे ऑपरेशन आलं.
पित्ताशय नाही काढलं तर….
तर ते आत फुटण्याचं भय मोठं. ते फुटलं तर परिणाम भयानक. म्हणजे बहुदा “आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा.” ऑपरेशनची जोखीम घ्यायलाच लागणार होती.
माझा भाऊ डॉ. प्रकाश संझगिरी हा अत्यंत हुशार डॉक्टर आहे. तो हृदयरोग तज्ञ असला तरी त्याचं इतर वैद्यकीय क्षेत्रातलं ज्ञान अद्ययावत असतं. त्याची बौध्दीक चक्र फिरायला लागली. पित्ताशय काढायला ऑपरेशनची जोखीम घ्यायची मग त्याच वेळी उजवी, ट्यूमरग्रस्त किडनी काढायला काय हरकत आहे.? त्याने विचार मांडला.
पण विचार मांडणं वेगळं आणि प्रत्यक्षात तो उतरवणं वेगळं. तो सर्जीकल स्ट्रायिक असतो. त्याचं यश वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. अत्यंत कुशलतेने आखणी करावी लागते. प्रत्येक टप्प्यावर एक नवी अडचण येते आणि त्यावर मात करून पुढे जायचं असतं.
डॉ प्रकाशने त्याचा उत्कृष्ठ संघ निवडला. ॲनेस्थेटिस्ट सर्वात महत्वाचा. बदलत्या परीस्थितिनुसार योग्य निर्णय घेणारा हवा. डॉ प्रकाशने त्याच्या विश्र्वासातला निवडला. डॉ फाल्गुनीची टीम होती. डॉ हितेश मेहता हे पित्ताशय काढणार होते. डॉ हेमंत पाठक किडनी काढणार होते. आखणी अशी होती. आधी पित्ताशय काढायचं. आणि त्यावेळेला इतर महत्वाची (vital) प्यारामिटर्स व्यवस्थित असतील तर किडनी काढायची.
ते विश्वचषकाचे दिवस होते. मी लीलावती हॉस्पिटलमध्ये बिछान्यावर पडून सामने पाहत होतो. लिहित होतो. ऑपरेशन पासून मन दुसरीकडे नेत होतो.
पण एकाक्षणी मी भाऊक झालो. मी भावाला म्हटलं, “दिवाळी नंतर ऑपरेशन करूया का?”
तो म्हणाला, “ऑपरेशन शिवाय मी तुला लीलावती बाहेर पाऊल ठेवायला देणार नाही.”
मी म्हटलं, “बरं मला तीन तास सोड. मी माझं जन्मस्थळ, माझी शाळा किंग जॉर्ज, कॉलेज रुईया, व्हि जे टी आय, शिवाजी पार्क, सावरकर स्मारकाचं स्टेज, शिवाजी पार्कचा गणपती (गणेश उद्यान) सिध्दीविनायक, वानखेडे, आणि माउंट मेरीलां जाऊन येतो.” लहानपणी मला वडील खांद्यावर घेऊन माउंट मेरीला जात असत. ते मला डोळे भरून पाहायचं होतं.
तो म्हणाला, “तू काळजी करू नकोस. ह्या सर्व ठिकाणी तू नंतर स्वतःच्या पायाने जाशील.” ह्या शब्दांनी मला धीर दिला. मनातली ऑपरेशन थिएटर मध्ये आयुष्य संपू शकतं ही भावना दूर पळाली.
ऑपरेशनच्या दिवशी माझी रवानगी आ य सी सी यू मध्ये झाली. लग्नापूर्वी वधूला नटवतात, तसं माझं नटणं झालं.
वेगवेगळ्या नळ्या शरीरात गेल्या. माझी धाकटी सून हेमांगी हळूच पडदा सरकवून आत आली आणि म्हणाली, “बाबा, काय ऐकायचंय?”
मी म्हटलं, “माझा सी रामचंद्र ह्यांचा कार्यक्रम ऐकव.”
मी संगीतात त्या ‘नटण्याच्या’ वेदना विसरून गेलो. नव्या आयुष्याशी लग्न करायला सज्ज होऊन मी ऑपरेशन थिएटर नावाच्या स्टेजवर उभा राहिलो.
आठ तास ती मंगलाष्टकं चालली. शेवटच्या शुभ मंगल सावधानने सर्वांनी निःश्वास सोडला. नव्या आयुष्याच्या उंबरठयावरचं माप मी ओलांडलं होतं.
पण हे इतकं सहज घडलं नव्हतं. माझी अँजिओप्लास्टी आणि एक प्रोसिजर आधी झालेली असली तरी मेजर ऑपरेशनचा अनुभव पहिलाच होता.
जवळचे नातेवाईक, आणि मित्र ह्यांचे हात हातात घेत ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना, त्यांच्या स्पर्शातून प्रेम आणि काळजी जाणवत होती. माझ्या अनंत मित्रांनी, चाहत्यांनी देवाकडे केलेल्या प्रार्थनेची ताकद घेऊन मी आत गेलो. आत देवाचं अस्तित्व डॉक्टरांच्या रूपात होतं. हे डॉक्टर्स त्या परमेश्वराचे दूत होते.
युरोलॉजिस्ट डॉ हेमंत पाठक, अनेस्थेटिस्ट डॉ फाल्गुनी, आणि गॅसस्ट्रो इंटेस्टाईनल सर्जन डॉ हितेश मेहता, यांची टीम माझ्याशी अत्यंत हसून बोलले, माझ्यावरचा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. एक सुई टोचली, आणि जवळपास काही सेकंदात मी झोपेच्या अधीन झालो. अशी झोप, ज्यात स्वप्न नव्हतं, वेदना नव्हत्या, जेंव्हा झोपेतून जागं करण्यात आलं तेंव्हा मधल्या आठ तासातलं काहीही आठवत नव्हतं. मी अशी झोप एकदाच अनुभवली होती. हार्ट ॲटॅकच्या वेळी मला माॅर्फिंनचं इंजेक्शन दिलं होतं तेव्हा.
माझ्या ऑपरेशनचं वैद्यकीय भाषेतल वर्णन Laparoscopic cholecystectomy and right radical nephrectomy असं होतं. डॉ मेहतांनी जेंव्हा पित्ताशयावर हल्ला केला तेंव्हा त्यांच्या लक्षात आलं की पित्ताशयात पस झाला होता. गँगरीन झाल्याचं लक्षण होतं. प्रत्येक अवयवाला एक आवरण असतं त्या आवरणाला आणि यकृताला ते चिकटलं होतं.
चांगल्या शल्य विशारदाचे हात हे कलावंताचे हात असतात. डॉ मेहतांनी हा गुंता, अत्यंत सुंदरपणे आणि अचूक सोडवला. डॉक्टरी ज्ञान, अनुभव आणि कलेचा त्यांच्या हातात अपूर्व संगम होता. डॉ पाठकांनी त्यांना मदत केली.
त्यांनी नुसतं पित्ताशय बाहेर काढलं नाही. पोटातला टाईम बॉम्ब बाहेर काढला. माझा भाऊ हॉस्पिटलच्या बाहेर मला क्षणभरही सोडायला का तयार नव्हता, हे मला कळलं. अपेक्षेपेक्षा जास्त रक्त गेलं होतं. अत्यंत गुंतागुंतीचं ऑपरेशन पार पडलं होतं. जीव वाचला होता.
आणि मग माझ्या भावाने मास्टर स्ट्रोक मारला. माझा भाऊ आणि दोन सर्जन ह्यात चर्चा झाली. पुढे जायचं आणि किडनी काढायची का? माझे इतर पॅरामीटर्स चांगले होते. किडनी काढून टाकायची ही उत्तम संधी होती. हे माझ्या भावाने ताडलं, आणि निर्णय घेतला, जायचं पुढे.
हा निर्णय अत्यंत धाडसी आणि महत्त्वाचा होता.
मग डॉ पाठकना डॉ मेहतांनी किडनी काढायला मदत केली. ऑपरेशन थिएटर मध्ये वैद्यकीय ज्ञान आणि कसब पणाला लागलं होतं. बाहेर बसलेली रक्ताची आणि मैत्रीची नाती, देवाचा धावा करत होती. आणि मी शांतपणे दोन जगाच्या सीमारेषेवर गाढ झोपलो होतो.
त्याच वेळेला वानखेडेवर अफगाणिस्तान विरूध्द ऑस्ट्रेलियाचा सामना अटीतटीने खेळला जात होता. ग्लेन मॅक्सवेल जिवाच्या आकांताने खेळत होता. आमचे डॉक्टर्स तसेच खेळले. आणि जिंकलें. दोघंही जवळपास एकाचवेळी जिंकले.
डॉ स्नेहाने मला जागं करून तो स्कोअर सांगायचा प्रयत्न केला. पण शुध्दी आली नव्हती. नीट शुध्द मी पुन्हा आय सी सी यू त आल्यावर आली. तेंव्हा पाहिलं लक्षात असलेलं वाक्य बायको कानात कुजबुजली, “ऑपरेशन चांगलं झालं. पित्ताशय, किडनी दोन्ही काढलं.”
भारतीय संघ विश्वचषक ऐन मोक्याच्या वेळी दबावाखाली हरला.
माझ्या आयुष्यातला हा मोठा विश्वचषक डॉक्टरांनी दबावाखाली जिंकून दिला. माझा भाऊ डॉ प्रकाश संझगिरी ह्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स सारखं नेतृत्त्व केलं.
देवाने आजार दिले, पण त्यातून बाहेर काढण्यासाठी भाऊही दिला. लढाई संपलेली नाही, पण पुन्हा नवी उमेद मिळाली आहे. या जगण्यावर शतदा प्रेम करण्यासाठी.
लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी
प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈