मराठी साहित्य – काव्यानंद ☆ औक्षवंत हो… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ निशाशृंगार… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

☆ – औक्षवंत हो – डॉ निशिकांत श्रोत्री ☆

काजळ घेउनिया नयनीचे तीट लावते तुला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।ध्रु।।

 

पहिली बेटी ही धनपेटी म्हणती दांभिक सारे

आदिशक्ती तू माझ्या पोटी कौतुक मजला न्यारे

जीवन माझे सार्थ जाहले उधाण आनंदाला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।१।।

 

सीता तू अन् तूच द्रौपदी तूच जिजाऊ माता

गार्गी बनुनी विदुषी होई तारी या भारता

सुनीता राणी अवकाशाची धन्य मानवी बाला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।२।।

 

कृतघ्न किती हा मानव झाला तुझ्या जीवावर घाला

वाढविते तू वंशा, निर्घृण तुझाच वैरी झाला

तेजस्विनी हो, सौदामिनी हो,लखलखती  तू ज्वाला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।३।।

 

पत्नी जरी तू एका क्षणाची माता तू कालाची

संस्काराचे सिंचन करिते सरस्वती ज्ञानाची

गर्भपात ना कधी घडावा अभय मिळू दे तुला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।।४।।

 

 – डॉ. निशिकांत श्रोत्री.(निशिगंध)

काव्यनन्द

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते

   रमन्ते  तत्र देवता:।।

पिढ्यानुपिढ्या जपलेलं हे सुंदर विचारांचं, सुसंस्काराचं सुभाषित.  पण प्रत्यक्ष जगताना, अवतीभवतीची पीडित स्त्री जीवनं  पाहताना मनात नक्कीच येतं की सुभाषितं ही फक्त कागदावर. समाज मनावर ती कोरली आहेत का? खरोखरच नारी जन्माचा सोहळा होतो का? स्त्री आणि पुरुष यांचा  दोन व्यक्ती म्हणून विचार करताना सन्मानाच्या वागणुकींचं  पारडं नक्की कुणाकडे झुकतं? आजही एकतरी मुलगा हवाच ही मानसिकता कमी झालेलली नाही. पण जिच्या उदरातून हा वंशाचा दिवा जन्म घेतो तिचा मात्र सन्मान होतो का?

“ तुम्हाला दोन मुलीच?”

 या प्रश्नांमध्ये दडलेला,” मुलगा नाही?” हा प्रश्न बोचरा नाही का?

 अनेक शंका उत्पन्न करणारे असे प्रश्नही असंख्य आहेत. सुधारलेल्या समाजाची व्याख्या करतानाही हे प्रश्न सतत भेडसावत असतातच आणि याच पार्श्वभूमीवर औक्षवंत हो ही डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांची गीतरचना माझ्या वाचनात आली आणि मी खरोखरच हे काव्य वाचून प्रभावित झाले. त्याचे मुख्य कारण म्हणजे या काव्याचा उगम एका पुरुष मनातून व्हावा याचे मला खूप समाधान आणि तितकेच अप्रूपही वाटले.

हे गीत  वाचल्यावर प्रथमतःच मनासमोर उभी राहते ती प्रेमस्वरूप, वात्सल्य सिंधू आईच. ज्या मातेने नऊ महिने स्वतःच्या उदरात एक गर्भ मोठ्या मायेने  वाढविलेला असतो त्याला जन्म देताना मातृत्वाच्या भावनेने ती ओथंबलेली असते, मग ते मातृत्व मुलाचं की मुलीचं हा प्रश्नच उरत नाही.  कुशीत जन्मलेल्या बाळाची ती आणि तीच फक्त माताच असते.

 काजळ घेऊनिया नयनीचे तीट लाविते तुला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।ध्रु।।

नुकत्याच सोसलेल्या प्रसूती वेदना ती क्षणात विसरलेली आहे आणि जन्मलेल्या आपल्या कन्येला हातात घेताना प्रथम तिच्या मुखातून उद्गार निघतात,” माझ्या डोळ्यातल्या काजळांचं तीट तुला लावते बाळे,  औक्षवंत हो! दीर्घायुषी हो! हाच आशीर्वाद मी तुला देते.”

या ध्रुपदाच्या  दोन ओळींमध्ये अनेक अर्थ दडलेले आहेत. हा एका नुकतंच मातृत्व लाभलेल्या आईने जन्मलेल्या अथवा तिच्या गर्भात वाढत असणाऱ्या स्त्रीअंकुराला दिलेला आशीर्वाद तर आहेच.  पण औक्षवंत हो म्हणताना कुठेतरी तिच्या मनात भय आहे की माझ्या या  मुलीच्या जन्माचा सन्मान होईल का? तिच्यावर कधी अशी वेळ येऊ नये की तिला अर्धवटच हे जगणं सोडून द्यावं लागेल कारण सद्य समाजाविषयी ती कुठेतरी मनोमन साशंक आहे.

आणि म्हणूनच कदाचित तिला आपल्या बाळीला कुणाचीही नजर लागू नये,सर्व दुष्ट शक्तीपासून तिचे रक्षण व्हावे याकरिता डोळ्यातले काजळरुपी तीट लावावेसे वाटत आहे.

 पहिली बेटी ही धन पेटी म्हणती दांभिक सारे

आदिशक्ती तू माझ्या पोटी कौतुक मजला न्यारे

जीवन माझे सार्थ जाहले उधाण आनंदला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।१।

“म्हणताना म्हणतात हो सारे, पहिली बेटी धनाची पेटी असते. पण ओठावर एक आणि मनात एक असणारे हे सारेच ढोंगी आहेत. पण मी मात्र तुझी आई आहे. माझ्या उदरी जणू काही तुझ्या रूपानने आदीमायेनेच जन्म घेतला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. तुझ्या जन्माने माझी कूस पावन झाली, माझ्या जीवनाची सार्थकता झाली आणि या माझ्या आनंदाला पारावरच नाही. सुखी दीर्घायुष्याचे सगळे मार्ग तुझ्यासाठी मुक्त असावेत हेच माझे आशीर्वचन आहे.”

आशीर्वादाऐवजी कवीने योजलेला आशीर्वचन हा शब्द मला खूपच भावला.  जन्मापासूनच तिने आपल्या कन्येचा योग्य प्रतिपाळ करण्याचा जणू काही वसा घेतला आहे. तिने तसे स्वतःला वचनबद्ध केले आहे असे या शब्दातून व्यक्त होते.

 सीता तू आणि तूच द्रौपदी तूच जिजाऊ माता

 गार्गी बनुनी विदुषी होईल तरी या भारता

 सुनीता राणी अवकाशाची धन्य मानवी बाला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।२।

मुलगी झाली म्हणून त्या मातेला कणभरही कमीपणा वाटत नाही. उलट ती त्या जन्मलेल्या निरागस स्त्री अंशात सीता, द्रौपदी, जिजाऊ माता, विदुषी गार्गी, अगदी अलीकडच्या युगातली अंतराळ वीरांगना सुनीता विल्यमलाच पहात आहे. अशा अनेक गौरवशाली स्त्री व्यक्तिमत्त्वांची तिला आठवण होते आणि आपली ही बालिका ही एक दिवस अशीच दैदिप्यमान कर्तुत्वशाली व्यक्ती असेल असे सुंदर स्वप्न ती पाहते आणि त्या क्षणी पुन्हा पुन्हा ती तिला औक्षवंत हो, कीर्तीवंत हो ,यशवंत हो असे आशिष देत राहते.

कृतघ्न किती हा मानव झाला तुझ्या जीवावर घाला

वाढविते तू वंशा निर्घुण तुझाच वैरी झाला

तेजस्विनी हो सौदामिनी हो लखलखती हो ज्वाला

 औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।३।

मनातल्या ममतेच्या,वात्सल्येच्या वेगाबरोबरच त्या नुकत्याच, या जगात जन्म घेतलेल्या स्त्री जीवाला दुष्ट, संहारी समाजापासून सावध करण्याचेही भान बाळगते. खरं म्हणजे स्त्री ही सृजनकर्ती, जगाची निर्मिती प्रमुख. तिच्याच उदरातून कुळाचा वंश जन्म घेतो. तिच्याशिवाय ज्याचा जन्मच अशक्य आहे तिचाच मात्र तो वैरी बनतो आणि तिची निर्घृण हत्या करण्यास पुढे सरसावतो. ही केवढी विसंगती आहे!  पण तरीही ही धीरोदत्त माता आपल्या हातातल्या त्या निष्पाप, अजाण, कोवळ्या कळीला समर्थ, सक्षम करण्यासाठी म्हणते,”तू नको कसले भय बाळगूस. तू  मूर्तिमंत तेज हो, थरकाप उडवणारी चपला (वीज) हो, गगनाला भिडणारी लखलखती ज्वाला हो.

तेजस्विनी सौदामिनी ज्वाला हे तीनही शब्द तळपणाऱ्या व्यक्तिमत्त्वासाठीच आहेत. कवीने या तीन शब्दांची औचित्यपूर्ण गुंफण केली आहे. आईच्या मनातले समर्थ, बलवान, धारदार विचार ते सुंदरपणे व्यक्त करतात.

 पत्नी जरी तू एक क्षणाची माता तू कालाची

संस्काराचे सिंचन करते सरस्वती ज्ञानाची

 गर्भपात ना कधी घडावा अभय मिळू दे तुला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।४।

स्त्री जन्माविषयी असेच म्हणतात ना? क्षणाची पत्नी आणि अनंत कालची माता.  किती सार्थ आहे हे भाष्य! मातृत्व ही अशी भावना आहे किंवा अशी भाववाचक संज्ञा आहे की जिचा काल अनंत आहे. ज्या क्षणापासून तिच्या उदरात गर्भ रुजतो त्या क्षणापासून ते तिच्या जीवनाच्या अंतापर्यंत ती केवळ आणि केवळ माताच असते. स्वतःच्या उदरातून जन्माला आलेल्या तिच्याच अंशाच्या सुखासाठी, स्वास्थ्यासाठी ती अविरत झटत असते. या काव्यामधली ही माता म्हणूनच त्या अंशाला तिच्या जन्माचं महत्त्व पटवून देते. तिला संस्काराचे सिंचन करणारी सरस्वती, ज्ञानदा म्हणून संबोधते आणि निस्सिमपणे एक आशा मनी बाळगते की कळी उमलण्यापूर्वीच  खुडली न जावो. केवळ “मुलीचा गर्भ” हे निदान होताच तिची गर्भातच हत्या कधीही न होवो. आणि म्हणूनच या ठिकाणी औक्षवंत हो या आशीर्वाचनाला खूप व्यापक असा अर्थ लाभतो.

*अनंत कालची माता*हा स्त्रीविषयीचा उल्लेखही खूप विस्तारित अर्थाचा आहे. आयुष्याच्या एकेका टप्यावर पती पत्नीचं नातंही नकळत बदलतं. शृंगारमय यौवनाचा भर ओसरतो आणि त्याच पतीची ती उत्तरार्धातच नव्हे तर वेळोवेळी कशी मातेच्या रुपात भासते हेही सत्य नाकारता येत नाही.मातृत्व हा स्त्रीचा स्थायी भाव आहे. ती पुत्राचीच नव्हे तर पतीचीही माता होते. असंहे मातृत्व खरोखरच अनंतकाली आहे.

 डॉक्टर श्रोत्रींना मी मनापासून वंदन करते, की या गीत रचनेतून त्यांनी स्त्रीचे महात्म्य अधोरेखित करणारा केवढा मौल्यवान संदेश समाजाला दिला आहे! भृणहत्ये विरुद्ध उभारलेलं हे एक काव्यरूपी शस्त्रच आहे.हे गीत वाचल्यावर निश्चितपणे जाणवते ते हे की हे एका कन्येची माता होणाऱ्या अथवा झालेल्या स्त्रीचे मनोगत आहे. कदाचित जन्मलेल्या कन्येशी किंवा गर्भांकुराशी होत असलेला हा एक प्रेमळ,ममतापूर्ण तरीही काहीसा भयभीत, चिंतामिश्रित संवादही आहे.. आपल्या उदरात वाढणारा गर्भ हा मुलीचा आहे असे समजल्यावर तिने सर्व समाजमान्य कल्पनांना डावलून केलेला एक अत्यंत बलशाली निर्धार आहे. तितक्याच समर्थपणे ती  तिच्या गर्भासाठी एक संरक्षक कवच बनलेली आहे.

सर्वच दृष्टीने हे गीत अर्थपूर्ण आणि संदेशात्मक आहे. मातेची महती सांगणारे आहे.

वात्सल्य रसातले तरीही वीरश्रीयुक्त असे रसाळ, भावनिक गीत आहे,

धनाची पेटी तेजस्विनी सौदामिनी ज्वाला आणि ती लखलखती या स्त्रीला दिलेल्या उपमा खूपच सुंदर वाटतात, आणि यथायोग्य वाटतात.

सारे —न्यारे” माता —भारता’ घाला— झाला— जीवाला ही यमके यातला अनुप्रास हा अतिशय डौलदार आहे.

साधी, सहज भाषा, नेमके शब्द अलंकार, वजनदार तरीही अवघड न वाटणारे सुरेख नादमय शब्द यामुळे औक्षवंत हो हे गीत मनावर एक वेगळीच जादू करते. एका वेगळ्याच भावना प्रवाहात अलगद घेऊन जाते.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ व्यक्ती…  वल्ली…  आणि स्टेटस् – भाग-१ – लेखक : अभय कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ व्यक्ती…  वल्ली…  आणि स्टेटस् – भाग-१ – लेखक : अभय कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

माझ्यासारखे काही लोक जसं खाण्यासाठी जगणारे असतात… तसे काही लोक हे  दाखवण्यासाठी खाणारे असतात ………

आता हीच गंमत बघाना  ….. कराड मधून खूप लोक गाडी घेऊन कायम पुण्याला जात असतात.  कधीतरी गंमत म्हणून यांना विचारून बघा…..  की पुण्याला जाताना किंवा पुण्याहून येताना तुम्ही चहा – नाश्ता घेण्यासाठी कुठे थांबता?  90 टक्के लोकांचे उत्तर येणार की…..  हॉटेल विरंगुळा किंवा हॉटेल आराम…… कारण इथे थांबणे म्हणजे स्टेटस चे लक्षण …….  आमच्या चिंटूला ना विरंगुळा मधले थालपीठ खूप आवडते आणि आमच्या बायकोला ना आराम मधली भजी……..  खरंतर महाराष्ट्रातल्या कुठल्याही हॉटेलमध्ये जशी पदार्थांची चव असते त्याच सर्वसामान्य चवीचे इथले पदार्थ असतात……  इतर हॉटेलमध्ये मिळणारा दहा रुपयाचा चहा येथे वीस रुपये देऊन घ्यायचा आणि चाळीस रुपये चा डोसा शंभर रुपयाला घ्यायचा …….  कशासाठी ? तर स्टेटस दाखवण्यासाठी…..

एकदा मी व माझा मित्र किशोर पुण्याला निघालो असताना पाचवड पुलाखाली एका टपरीवजा हॉटेलमध्ये थांबलो होतो . तिथली मिसळ आणि मिसळ बरोबर ब्रेड च्या ऐवजी दिलेली गरमा गरम पुरी दिल खुश करून गेली.  त्याचबरोबर एक प्लेट कांदा भजी….  आणि दोन कमी साखर स्पेशल चहा …… आणि एवढं सगळं फक्त शंभर रुपयात . आणि चवीच्या बाबतीत म्हणाल तर ही दोन्ही हॉटेल याच्या पासंगालाही पुरणार नाहीत…..  इथे स्टेटस नाही…..  भपका नाही …..पण चव मात्र नक्की आहे.  माझ्या सारखी माणसे मात्र अशी ठिकाणे शोधत असतात .

पुण्यात गेल्यावर सुद्धा  गंमत बघा ….. जे उच्च मध्यमवर्गीय आहेत किंवा नवश्रीमंत आहेत त्यांचे खाण्याबद्दल चे बोलणे कधीतरी ऐका …… मसाला डोसा ना मला वैशाली शिवाय कुठला आवडतच नाही …… आणि इडली खायची तर फक्त व्याडेश्वर मध्येच ……. चायनीज ना Menland China शिवाय कुठेच चांगले मिळत नाही …….. म्हणजेच याचा अर्थ आपण समजून घ्यायचा की……  मी दोनशे रुपये देऊन वैशाली मध्ये जाऊन मसाला डोसा खातो  हे त्यांना सांगायचे आहे ………. काय खातो  या पेक्षा  कुठे खातो ते दाखवण्याची जास्त हौस.

पंजाबी जेवण जेवायचे असेल …..दोन-दोन तास नंबरला थांबून  चांगले जेवण मिळते अशी भ्रामक समजूत करून घेतलेल्या लोकां बद्दल काय सांगायचे? ……  खरंतर पंजाबी जेवण म्हणजे एक शुद्ध फसवणूक आहे …… आठवड्यातून एकदाच करून ठेवलेल्या तीन प्रकारच्या ग्रेव्हीज ……. लाल ग्रेव्ही, पिवळी ग्रेव्ही व पांढरी ग्रेवी याच्या जोरावर हे जेवण चालते.  यामध्ये कौतुकाची फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे …… या तीन प्रकारच्या ग्रेव्ही पासून जवळपास 200 भाज्यांची नावे ज्यांने तयार केली असतील त्याला नोबेल पारितोषिक द्यायला हरकत नाही. 

आता हेच बघा ना  …. पिवळ्या ग्रेव्हीमध्ये हिरवे वाटाणे आणि पनीरचे तुकडे घातले की झालं मटर पनीर …… नुसतेच मटर घातले की झाला ग्रीनपीस मसाला……  नुसतं पनीर आणि वरून थोडे क्रीम घातलं की झाला पनीर माखनवाला …….. या ग्रेव्हीत काजू तळून घातले ती झाला काजू मसाला …….. लाल ग्रेव्हीत उकडलेला फ्लॉवर , वाटाणा,  गाजर घातले की झाले मिक्स व्हेज……  याच मिक्स व्हेजला तिखट पूड घालून तडका मारला की झाले व्हेज कोल्हापुरी …… याच व्हेज कोल्हापुरी वर दोन हिरव्या मिरच्या तळून ठेवल्या की झाला व्हेज अंगारा…….  मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्याला वाटतं अरे वा ….. काय व्हरायटी आहे इथं?  खरंतर भाज्या दहा-बारा प्रकारच्याच असतात ….. पण नावं वेगवेगळी देऊन त्याच पुढे येतात.  आता मला सांगा व्हेज दिलबहार किंवा व्हेज शबनम म्हणून तुमच्या पुढे काय येणार आहे हे तुम्हाला ती डिश समोर आल्याशिवाय काही कळणार आहे का?  नाही . पण मी पैज लावून सांगतो की वर सांगितलेल्या भाज्या पैकीच कोणतीतरी भाजी तुमच्यासमोर नक्की येणार. 

हॉटेलात जाऊन सुद्धा आपण कसे Health Cautious  आहोत असे दाखवणार्यांची  सुद्धा संख्या बरीच असते . गाजर ,काकडी, कांदा, मुळा आणि टोमॅटो यांच्या चार – चार चकत्या ….. की ज्याची किंमत पंधरा रुपये सुद्धा होणार नाही ते ग्रीन सॅलेड म्हणून प्लेटमध्ये सजवून दीडशे रुपयाला समोर येते…..  तीच गोष्ट रोटीची…..  बरेच जण आता रोटी मैद्याची आहे का आट्याची आहे हे विचारत असतात …… आता एवढ्या तेलकट आणि मसालेदार भाज्या , स्टार्टर्स आपण खात असतो पण आपण तब्येतीची काळजी घेतो हे दाखवायला रोटी मात्र आट्याची पाहिजे असते.

हीच गोष्ट पिण्याच्यापाण्याची. तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन टेबलवर बसला की वेटर तुम्हाला विचारतो पाणी कसले आणू ?  साधे की बिसलेरी ?  आता साधे पाणी आण म्हणून सांगण्याची लाज वाटते . मग आपोआप सांगितले जाते की बिसलेरीचे आण . बऱ्याच मोठ्या हॉटेलमध्ये बाहेर वीस रुपयाला मिळणारी पाण्याची बाटली पन्नास रुपयाला मिळते आणि आपण तेही निमूटपणे देतो.  कारण काय तर स्टेटस …… हाच प्रकार वेटरला टीप देण्याच्या बाबतीत. खरे तर चांगली सर्विस देणं हे वेटरचे कामच आहे, आणि त्या साठीच त्याला पगार मिळतो. पण बऱ्याचदा कमी टीप ठेवली तर कसे दिसेल , म्हणून आपले स्टेटस दाखवायला मनात असो वा नसो भरघोस टीप ठेवली जाते. 

अजून एक प्रकार म्हणजे अनलिमिटेड बार्बेक्यु किंवा बुफे. प्रत्येकी साधारण आठशे ते हजार रुपये यासाठी आकारले जातात. तुम्ही हॉटेलमध्ये गेल्या गेल्या तुमच्यासमोर शेफ चा वेश केलेला एक माणूस येतो.  तुम्हाला आदराने नमस्कार करतो. हॉटेलच्या मेनू मध्ये मध्ये आज काय काय स्पेशल आहे त्याची माहिती सांगतो आणि तुम्हाला स्टार्टरच्या काउंटरवर नेऊन सोडतो . या काउंटरवर पाणीपुरी, शेवपुरी ,आलू टिक्की, डोसा, पावभाजी, पकोडे ,दहिवडा अशा प्रकारचे पदार्थ ठेवले असतात. तेथे उभे असणारे कर्मचारी तुम्हाला आग्रहाने एक एक पदार्थ घ्या म्हणून खायला घालतात.  हे स्टार्टर खाऊन होईपर्यंत  तुमचे  पोट बऱ्यापैकी भरलेले असते,  त्यामुळे मेन कोर्स मध्ये एखाद दुसरी भाजी, एखादा फुलका आणि थोडासा राईस घेऊन तुमचे जेवण संपते.  स्वीट्स मध्ये सुद्धा बरेच प्रकार ठेवलेले असतात.  त्यातला एखादा तुकडा किंवा आईस्क्रीमचा एखादा स्कुप कसा तरी खाल्ला जातो आणि आपले जेवण संपते. आपण खाल्लेल्या पदार्थांचे जर वेगवेगळे असे बिल कॅल्क्युलेट केले तर अडीचशे तीनशे रुपये पेक्षा जास्त होणार नाही , पण त्यासाठी आपण जवळपास प्रत्येकी हजार रुपये मोजलेले असतात कशासाठी मी पोर्टिगोला किंवा बार्बेक्यू नेशन ला गेलो आहे हे सांगण्यासाठी. 

हीच गोष्ट चायनीज खाण्याची.  कोबी ,सिमला मिरची, गाजर, आलं, लसूण व हिरवी मिरची या मंडईत नेहमी मिळणाऱ्या भाज्या …… टोमॅटो, चिली आणि सोया हे तीन प्रकारचे सॉस,  व्हीनेगर ची बाटली , शिजवलेला भात आणि शिजवलेल्या नूडल्स आणि सर्वात महत्वाचे म्हणजे …… तोंडाने चिनी माणसासारखा दिसणारा आचारी…….  एवढं सामान जमवलं की झाला चायनीज चा सेट अप तयार.  

लोखंडी चपटी कढई कि ज्याला वॉक म्हणायचे …..ती मोठ्या आचेवर ठेवून , त्यात भरपूर तेल घालून आलं ,लसूण, मिरची, कोबी ,गाजर, सिमला मिरची , इत्यादी सर्व घालायचे आणि परतायचे….  त्यात वर सांगितलेले सर्व सॉस घालायचे आणि त्यात शिजवलेला नूडल्स घातल्या की झाल्या हक्का नूडल्स तयार……..  नूडल्स च्या ऐवजी  भात घातला की झाला फ्राईड राईस…….  यातच जरा सिमला मिरची जास्त घातली कि झाला सिंगापुरी राईस ……. भाताचे ऐवजी कोबीची कॉर्नफ्लॉवर घालून तळलेली वातड भजी घातली की झालं व्हेज मंचुरियन.  सगळ्यात वाईट म्हणजे या पदार्थात अजिनोमोटो नावाची एक पावडर वापरतात ….. याने तुमच्या जिभेवरील टेस्ट बडस उत्तेजित होतात आणि तुम्हाला या खाण्याची चटक लागते.  हा अजिनोमोटो कॅन्सर Causing Agent  आहे आणि त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो.  यावर  जगात सगळीकडे बंदी आहे पण तो सर्रास चायनीज पदार्थात वापरला जातो …..  चायनीज पदार्थांमध्ये वापरले जाणारे सॉस म्हणजे फक्त केमिकल असतात. एकदा माझ्याकडून घरात व्हिनेगरच्या बाटलीतले व्हिनेगर  फरशीवर सांडले. त्यावेळी फरशीवर पडलेला डाग दहा वर्षे झाली तरी तसाच आहे. म्हणजे या गोष्टी खाल्ल्यावर आपल्या पोटाची काय अवस्था होत असेल याचा विचार सुद्धा करवत नाही.  पण माझा मुलगा मांचुरियन शिवाय काही खात नाही असे अभिमानाने सांगणारे महाभाग आपल्याला बरेच दिसतात. 

क्रमश : भाग पहिला

लेखक : अभय कुलकर्णी, कराड

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दोन डोळे आणि तीस म्हणी… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ दोन डोळे आणि तीस म्हणी… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

दोन डोळे आणि तीस म्हणी … 

पहा माय मराठीची समृद्धी …. 

१.डोळा लागणे (झोप लागणे)

२.डोळा मारणे (इशारा करणे)

३.डोळा चुकवणे (गुपचूप जाणे)

४.डोळे येणे (नेत्रविकार होणे)

५.डोळे जाणे (दृष्टी गमावणे)

६.डोळे उघडणे (सत्य उलगडणे)

७.डोळे मिटणे (मृत्यू पावणे)

८.डोळे खिळणे (एकटक पाहणे)

९.डोळे फिरणे (बुद्धी भ्रष्ट होणे)

१० डोळे दिपणे (थक्क होणे)

११.डोळे वटारणे (नजरेने धाक दाखवणे)

१२.डोळे विस्फारणे (आश्चर्याने पाहणे)

१३.डोळे पांढरे होणे (भयभीत होणे)

१४.डोळे भरून येणे (रडू येणे)

१५.डोळे भरून पाहणे (समाधान होईपर्यंत पाहणे)

१६.डोळे फाडून पाहणे (आश्चर्याने निरखून पाहणे)

१७.डोळे लावून बसणे (वाट पाहात राहणे)

१८.डोळेझाक करणे (दुर्लक्ष करणे)

१९.डोळ्यांचे पारणे फिटणे (पूर्ण समाधान होणे)

२०.डोळ्यात प्राण आणणे (आतुरतेने वाट पाहणे)

२१.डोळ्यात धूळ फेकणे (फसवणूक करणे)

२२.डोळ्यात तेल घालून बघणे (लक्षपूर्वक पाहणे)

२३.डोळ्यात डोळे घालून पाहणे (एकमेकांकडे प्रेमाने बघणे)

२४.डोळ्यात सलणे/खुपणे (दुसऱ्याचं चांगलं न बघवणे)

२५.डोळ्यात अंजन घालणे (दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे)

२६.डोळ्यांवर कातडे ओढणे (जाणूनबुजून दुर्लक्ष करणे)

२७.डोळ्याला डोळा नसणे (काळजीमुळे झोप न लागणे)

२८.डोळ्याला डोळा भिडवणे (नजरेतून राग व्यक्त करणे)

२९.डोळ्याला डोळा न देणे (अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे)

३०.दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे (दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे)

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गदिमा आणि काही गंमतीशीर गोष्टी – भाग-2 – लेखक : श्री सुमित्र माडगूळकर ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ गदिमा आणि काही गंमतीशीर गोष्टी – भाग-2 – लेखक : श्री सुमित्र माडगूळकर ☆ श्री सुहास सोहोनी ☆

(गदिमांच्या आंघोळीच्या ‘मिशा’ ते ‘ग. दि. माडगूळकर पोल्ट्री फार्म’.) 

राजा नीलकंठ बढे उर्फ कवि-गीतकार राजा बढे यांची एक कविता गदिमांच्या वाचनात आली. सुंदर कविता होती. पण खाली लेखकाचे नाव होते –  ‘रा. नि. बढे’. आधी गदिमांना लक्षात येईना की, हे कोण लेखक? मग आठवले की, अरे हे तर आपले ‘राजा बढे’. पुढे त्याच सुमारास राजा बढे पंचवटीत आले. त्या वेळी गजाननराव वाटव्यांचे ‘राधे तुझा सैल अंबाडा’ हे गाणे गाजत होते. त्या चालीवर त्यांना बघताच गदिमा गमतीदारपणे मान डोलावत म्हणू लागले…

“कुणी ग बाई केला? कसा गं बाई केला?

आज कसा राजा बढे, रानी बढे झाला?”

गंगाधर महांबरे म्हणून कवी, गीतकार होते. त्यांचे कौतुक करताना गदिमा एकदा खणखणीत आवाजात गर्जून गेले, ”जय’नाद निनादती अंबरे, जय जय गंगाधर महांबरे”!

एकदा गदिमांच्या एका कोल्हापुरी मित्राने त्यांना चक्क व्यवसाय करायची गळ घातली. साधासुधा नाही तर चक्क पोल्ट्री फार्म काढायचा म्हणून! मराठी चित्रपटसृष्टीत तसा पैश्याचा खळखळाटच असायचा. त्यांनी असे काही चित्र रंगविले की, गदिमा त्याला तयार झाले. घरात बऱ्याच चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर मराठी माणसाने एक मोठा उद्योजक होण्याची स्वप्ने पहायला सुरवात केली. नशिबाने ‘ग. दि. माडगूळकर पोल्ट्री फार्म’ असे नाव नाही दिले. पण त्या काळात गदिमांनी चक्क १०, ००० रुपये तरी त्या गृहस्थांना दिले असतील. ५-६ महिने असेच गेले असतील. गदिमा आपल्या कामात व्यस्त होते. श्रावण महिन्यातील मुहूर्त काढून हे गृहस्थ एकदा ३-४ डझन अंडी घेऊन घरी आले, ‘अण्णा, ही आपल्या फार्ममधली अंडी!’ श्रावण असल्यामुळे सर्वच्या सर्व अंडी नोकरचाकरांना देऊन टाकावी लागली! असेच पुढे काही महिने गेले व गृहस्थ रडत आले की, ‘अण्णा अमुक तमुक रोग झाला व सर्व कोंबड्या मरून गेल्या!’ झालं. गदिमांची व्यावसायिक होण्याची स्वप्ने धुळीस मिळाली व महाराष्ट्र एका मोठ्या पोल्ट्री उद्योजकाला मुकला!.

गदिमांनी १९७७ साली ललित मासिकाच्या दिवाळी अंकात ‘ए. क. कवडा’ या टोपण नावाने मराठीतील २० सुप्रसिद्ध लेखकांवर विनोदी बिंगचित्रे लिहिली होती. त्या वेळच्या प्रसंगानुसार किंवा एकूण त्या लेखकाच्या व्यक्तिमत्वानुसार दोन-चार विनोदी ओळी व त्या लेखकाचे व्यंगचित्र असे त्याचे स्वरुप होते. ती खूप गाजली व हा “‘ए. क. कवडा’ नक्की कोण?” अशा चर्चा रंगायला लागल्या होत्या. संपादकांना विचारणा झाल्या. पण नाव काही कोणाला कळाले नाही. डिसेंबर १९७७ मध्ये गदिमांचे निधन झाल्यावर संपादकांनी शोकसभेत जाहीर केले की, ‘ए. क. कवडा’ म्हणजे ग. दि. माडगूळकरांचे हे लेखन होते. ‘

यातली काही स्मरणात असलेली निवडक बिंगचित्रे तुमच्यासाठी खास!

पु. ल. देशपांडे मराठीतील एक दिग्गज लेखक! त्यांचे बंगाली भाषेवर पण तितकेच प्रेम होते. त्यावर गदिमा भाष्य करतात,

“पाया पडती राजकारणी, करणी ऐसी थोर 

मराठीतला तू बिनदाढीचा रवींद्र टैगोर”

गो. नी. दांडेकर तर दुर्गप्रेमी!  चालायची पण त्यांना विलक्षण आवड होती. त्यांच्याबद्दल –

“चाले त्याचे दैव चालते, चढतो, त्याचे चढते.

गळ्यात माळ तुळशीची आणि दाढी कोठे कोठे नडते!”

कविवर्य मंगेश पाडगावकर, काव्यवाचनाची त्यांची एक वेगळीच शैली आहे. त्या काळात त्यांच्या काही कविता लिज्जत पापडाच्या जाहिरातीत झळकत असत. त्यावर गदिमा चिमटा काढतात,

“तुझ्या वाचने काव्यच अवघे वीररसात्मक झाले,

घेऊ धजती इज्जत कैसी, ‘लिज्जत पापडवाले”

दुर्गाबाई भागवतांबद्दल… (त्या वेळी त्यांनी साहित्य विश्वात काहीतरी कारणावरून वादळ निर्माण केले होते!)

“जागविले तू शांत झोपल्या वाड़मयीन जगतां

दुर्गे, दुर्गे, सरले दुर्घट, आता हो शान्ता” 

(शांत स्वभावाच्या शांता शेळके यांचा उल्लेख तर नसेल!)

गोमंतक निवासी कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या ज्येष्ठ कन्येने एका मद्रासी युवकासी प्रेमविवाह केला होता. त्यावेळी शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेमार्फत मुंबईमध्ये वाढलेल्या मद्रासी लोकांविरुद्ध ”लुंगी हटाओ, पुंगी बजाओ” अशी मोहीम चालू केली होती. त्याचा कदाचित संदर्भ घेऊन त्यावर….

“बोरीच्या रे बोरकरा, लेक तुझी चांगली

गोव्याहून मद्रदेशी सांग कशी पांगली?”

रविकिरणी कवितेची थट्टा करीत गदिमा म्हणत,

“गिरीशांची ही गर्द ‘आमराई’

त्यात उघडी यशवंत पाणपोई”

स्वतःलाही त्यांनी सोडले नाही! गदिमांना गीतरामायणामुळे ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणत असत. शेवटच्या काळात ते कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या हातून फारसे लिखाण होत नव्हते. म्हणून स्वतःबद्दलच त्यांनी बिंगचित्र लिहिलं. गदिमांच्या हातात कुर्‍हाड घेतलेल्या व्यंगचित्राखाली लिहिले होते..

“कथा नाही की कविता नाही, नाही लेखही साधा

काय वाल्मिके, स्विकारिसी तू पुन:श्च पहिला धंदा?”

अश्या कितीतरी गंमतशीर गोष्टी, प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडले होते. गदिमा हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. अगदी हिमनगासारखे…. त्यांच्यात एक बिलंदर खेडूत दडलेला होता. एक सुसंस्कृत प्रकांड पंडित दडलेला होता. एक सच्चा राजकारणी दडलेला होता….. काय नव्हते… ? पण सगळ्यात महत्वाचा म्हणजे एक खरा माणूस दडलेला होता. कधी कधी वाटते आपल्यासमोर त्यांची जी बाजू आली, त्याच्या हजारो पट ते आजही पडद्याआड आहेत.

– समाप्त–  

लेखक : श्री सुमित्र माडगूळकर

प्रस्तुती : सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बापाच्या काळजावरचा गोवर्धन ! – भाग – 2 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

बापाच्या काळजावरचा गोवर्धन ! – भाग – 2 ☆ श्री संभाजी बबन गायके 

(योगायोगच म्हणावा की यशोदाही याचवेळी आई होणार होती. पण मीही बाप होणार होतो याचा मला विसरच पडून गेला होता म्हणा !) – इथून पुढे —

व्यवहारी मनाला हा हिशेब पटला होता. माझी मुलगी वासुदेवाच्या हातून कंसाच्या हाती पडेल. आठवा मुलगा असणार होता… आणि हे तर स्त्री जातीचं अर्भक. स्त्री काय करणार या कंसराजाचं? असा विचार अविचारी कंस नक्कीच करणार. कंस तिला देवकीच्या हाती परत सोपवेल आणि निघून जाईल. देवकीचा कृष्ण माझ्याकडे आणि माझी माया देवकीकडे सुरक्षित वाढतील. पुढचं पुढं बघता येईल की… फक्त ही वेळ निभावून नेणं गरजेचं आहे. आणि काळाचंही हेच मागणं होतं माझ्याकडे.

मनावरचा गोवर्धन सावरून धरीत मी तिला दोन्ही हातांवर तोलून धरलं आणि छातीशी कवटाळलं. तिचे डोळे आता मिटलेले होते. आईच्या आधी ती बापाच्या काळजाला बिलगली होती. ती माझ्या हृदयाची कंपनं ऐकत असावी कदाचित. पण मला मात्र ते ठोके निश्चित ऐकू येत होते… नव्हे कानठळ्या बसत होत्या त्या श्वासांच्या आंदोलनांनी. चिखल तुडवीत निघालो. पाऊस थांबला होता. यमुनेपर्यंतची वाट हजारो वेळा तुडवलेली होती… पायांना सवयीची होती. तरीही वीजा वाट दाखवायचं सोडत नव्हत्या. मी आज चुकून चालणार नव्हतं हे त्यांना कुणीतरी बजावलेलं असावं बहुदा! पण माझी पावलंच जड झालेली होती. काही विपरीत घडलं तर या आशंकेने मनाच्या यमुनेत भयानक भोवरा फिरू लागला. योजनेनुसार नाहीच घडलं तर? कंसाशी गाठ होती. कंसाची मिठी सुटली तरच आयुष्याचं प्रमेय सुटण्याची आशा. अन्यथा त्याच्यात अडकून पडावं लागणार हे निश्चित होतं. तीरावर पोहोचलो. आता अंगावर खरे शहारे यायला सुरूवात झाली. यमुना दावं सोडलेल्या कालवडींसारखी उधळलेली होती रानोमाळ. वासुदेव येणार कसा या तीरावर? यमुनेच्या धारांच्या आवाजाने काही ऐकूही येण्यासारखी स्थिती नव्हती आणि त्यात त्या वीजा! माझ्या कुशीत मला बिलगून असलेल्या तिनं… डोळे किलकिले केले आणि यमुना दुभंगली! वाटेवर पाणी असतं, वाटेत पाणी असतं… इथं पाण्यात वाट अवतरली होती. आणि त्या अंधारातून दोन पावलं घाईघाईत या किना-याकडे निघालेली होती. त्या पावलांच्या वर जे शरीर होतं त्या शरीराच्या माथ्यावर एक टोपलं होतं… भिजलेलं. आणि त्यातून दोन कोमल पावलं बाहेर डोकावत होती… जणू ती पावलंच या पावलांना गती देत होती. इकडं माझ्या हातातल्या तिनं डोळे मिटून घेतले होते.

वासुदेव जवळ आला. बोलायला उसंत नव्हती. पण आधीच भिजलेल्या डोळ्यांत आसवं आणखी ओली झाली आणि बोलावंच लागलं नाही फारसं. त्याने टोपली खाली ठेवली. तो माझ्याकडे पाहू लागला. मी तिला वासुदेवाच्या हाती देताना शहारून गेलो. हातांना आधीच कापरं भरलं होतं. आणि त्यात ती माझ्याकडे पहात होती… मायेच्या डोळ्यांतली माया त्या अंधारातही ठळक जाणवत होती. वासुदेवानं तिला त्याच्याकडे अलगद घेतलं. मी त्याच्या मुलाला उचलून घेतलं. वासुदेवानं रिकाम्या टोपलीत तिला ठेवलं. तिने आता डोळे मिटले होते…. ती आता मथुरेकडे निघाली होती.. तिथून ती कुठं जाणार होती हे दैवालाच ठाऊक होतं.

“मुलगी आहे असं पाहून कंस हिला काही करणार नाही. ” वासुदेव जणू सांगत होता पण मला मात्र ते काही पटत नव्हतं… मला म्हणजे माझ्यातल्या पित्याला! धर्माच्या स्थापनेसाठी हा एवढा मोठा धोका पत्करावा लागणारच हे देहाला समजलं होतं पण मनाची समजूत काढणं अशक्य…. आणि त्या बालिकेच्या डोळ्यांत पाहिल्यापासून तर केवळ अशक्य! वासुदेव झपाझप पावलं टाकीत निघूनही गेला…. कंस कधीही कारागृहाचा दरवाजा ठोठावू शकत होता. त्याला त्या रात्री झोप लागू शकतच नव्हती. पण त्याच्या पापण्या क्षणार्धासाठी एकमेकींना स्पर्शल्या होत्या मात्र आणि लगोलग उघडल्या सुद्धा… पण या मिटण्या-उघडण्यामधला निमिष खूप लांबला होता त्या रात्री…. दोन जीवांची अदलबदल जगाला यत्किंचितही सुगावा लागू न देता घडून गेली होती. कृष्ण गोकुळात अवतरले होते आणि नंदनंदिनी माया कारागृहात देवकीच्या पदराखाली निजली होती.

माझ्या मनाने आता माझ्याच वै-याच्या भुमिकेत प्रवेश केला होता नव्हे परकाया प्रवेशच केला जणू. प्रत्यक्ष भगवंत माझ्या हातांत असताना मला कुशंकांनी घेरलं होतं पुरतं. कंस आधीच कारागृहात पोहोचला असेल तर? पहारेकरी जागे झाले असतील तर? कंसाला संशय आला तर? मन जणू यमुनेचे दोन्ही काठ…. प्रश्नांच्या पुराला व्यापायला आता जमीनही उरली नव्हती…. काळजाच्या आभाळापर्यंत काळजीचं पाणी पोहोचू पहात होतं…. विचारांचा गोवर्धन त्यात बुडून गेला होता…. पण त्याचं ओझं कमी मात्र झालं नव्हतं.

पण वाटेत एक गोष्ट लक्षात आली. मघासारखी थंडी नव्हती वाजत आता. बाळाला छातीशी धरलं होतं तिथं तर मुर्तिमंत ऊबदारपण भरून राहिलं होतं. बाळाचे आणि माझे श्वास आता एकाच गतीनं आणि एकच वाट चालत होते. तसाच यशोदेच्या कक्षात शिरलो आणि बाळाला तिच्या उजव्या कुशीशेजारी अलगद ठेवले आणि त्यानं आपण अवतरल्याचा उदघोष उच्चरवाने केला…. सारं गोकुळ जागं झालं…. अमावस्येच्या रात्री पूर्ण चंद्र आकाराला आला होता… हजारो वर्षांपूर्वी अयोध्येत भरदुपारी उगवलेला सूर्य आता गोकुळात चंद्राचं रूपडं लेऊन मध्यरात्री अवतरला होता. जगाच्या लेखी यशोदेला पुत्र झाला होता… नंदाला लेक झाला होता…. गायींना गोपाळ मिळाला होता आणि गवळणींना त्यांचा कान्हा! मी मात्र मथुरेकडे दृष्टी लावून बसलेलो!

वासुदेवही आता मथुरेत पोहोचला असेल… माझी लेक आता देवकीवहिनीच्या कुशीत विसावली असेल. माझी वासुदेवाच्या वाटेकडे पाठ असली तरी माझ्या मनाचे डोळे मात्र त्याचीच वाट चालत होते. मी बाळाला यशोदेच्या हवाली करून राजवाड्याच्या मथुरेकडे उघडणा-या गवाक्षाजवळ जाऊ उभा राहिलो…. !

नीटसं पाहूही शकलो नव्हतो तिला. डोळेच लक्षात राहिले होते फक्त… अत्यंत तेजस्वी. मूर्तीमंत शक्तीच. या मानवी डोळ्यांनी ते तेज स्मृतींमध्ये साठवून ठेवणं शक्तीपलीकडचं होतं. मथुरेकडच्या आभाळात वीजा आता जास्तच चमकू लागल्या होत्या. ढगांचा गडगडाट वाढलेला होता. काय घडलं असेल रात्री मथुरेच्या त्या कारागृहात? कंस कसा वागला असेल मुलगा जन्माला येण्याऐवजी मुलगी जन्मल्याचं पाहून? नियतीची भविष्यवाणी एवढी खोटी ठरेल यावर त्याचा विश्वास बसला असेल सहजी?

आणि एवढ्यात सारं काही भयाण शांत झालं घटकाभर…. सारं संपून तर नाही ना गेलं?

यानंतरचा एक क्षण म्हणजे एक युग. कित्येक युगं उलटून गेली असतील माझ्या हृदयातल्या पृथ्वीवरची. आणि तो क्षण मात्र आलाच…. अग्निची एक महाकाय ज्वाळा आभाळात शिरून अंतरीक्षात दिसेनाशी झाली… तिने मागे सोडलेला प्रकाशझोत मथुरेलाच नव्हे तर अवघ्या गोकुळालाही प्रकाशमान करून गेला…. मायाच ती… ती बरं कुणाच्या बंदिवासात राहील… सारं जग तिच्या बंधनात बांधले गेलेले असताना ती य:कश्चित मानवाच्या कारागृहातील साखळदंडांनी जखडून राहीलच कशी?

कंसाच्या हातून निसटून माझी लेक आता ब्रम्हांड झाली होती. माझी ओंजळ कदाचित तिचं तेज सांभाळून ठेवू शकली नसती म्हणून दैवानं तिला माझ्याच हातून इप्सित ठिकाणी पोहोचवलं असावं… परंतू तिचं जनकत्व माझ्या दैवात लिहून नियतीनं माझ्यावर अनंत उपकार करून ठेवले होते.

मायेने जाताना माझ्या काळजावरचा काळजीचा गोवर्धन अलगद उचलून बाजूला ठेवला होता… एका बापाचं काळीज आता हलकं झालेलं होतं !

पुत्रप्राप्तीच्या आनंदात यशोदा मग्न झाली आहे.. आता पुढे कित्येक वर्षे तिला हे कौतुक पुरेल.. अक्रूर गोकुळात येईपर्यंत. काही घडलंच नाही अशी भावना आता माझ्या मनात घर करू लागली आहे… नव्हे निश्चित झाली आहे… ही सुद्धा तिचीच माया!

(भगवान श्रीकृष्णांच्या जीवनकथा अलौकिक. त्यांचा जन्म आणि त्यांचं गोकुळात यशोदेकडे जाणं यावर करोडो वेळा लिहिलं, बोललं गेलं आहे. घटनाक्रम, संदर्भात काही ठिकाणी बदलही आहेत. पण ते सारे एकच गोष्ट सांगतात… श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव ! हरी अनंत आणि हरिकथा अनंत ! नंदराजाचा विचार आला मनात आणि त्यांच्या मनात डोकावलं. आणि हे काल्पनिक शब्दांमध्ये उतरलं… प्रत्यक्षात जे काही घडून गेलं असेल ते समजायला माझ्या बुद्धीच्या मर्यादा आहेत. जय श्रीकृष्ण.)

– समाप्त – 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाईचा न दिसणारा संसार –‘कालनिर्णय’… लेखिका : अनामिक ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? वाचताना वेचलेले ?

🍃 बाईचा न दिसणारा संसार –‘कालनिर्णय’… लेखिका : अनामिक ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

आईनं रबरबॅन्डमध्ये रोल केललं कालनिर्णय कपाटातून बाहेर काढलं… देवासमोर ठेऊन त्याला हळद कुंकू वाहत नमस्कार केला आणि दरवर्षीप्रमाणं ते फ्रिजजवळच्या भिंतीवर लटकवलं. आई दरवर्षी हे असं करते… मनात प्रश्न आला… काय आहे या साध्या बारा कागदांमध्ये… म्हणून गेल्या वर्षीचं कालनिर्णय चाळत बसलो…

आईनं गॅस सिलेंडर लावलेली तारीख, बाबांच्या पगाराची तारीख, ताईची पाळी, किराणा भरल्याची तारीख व पैसे, दादाची परिक्षा, बचत गटात पैसे भरलेली तारीख, भिशी, दूध, पेपर व लाईट बिल भरल्याची तारीख, ईएमआयची तारीख, घरकाम करणा-या ताईंचे खाडे यासारख्या ब-याच गोष्टींच्या नोंदी होत्या या कालनिर्णयमध्ये… अगदी मावशीच्या मुलाच्या लग्नतारखेपर्यंत…

डिजीटल कॅलक्युलेटर जरी आकडेमोड करत असलं तरी महिनाभराचं आर्थिक नियोजन याच कागदी कालनिर्णयवर उमटत असतं. गरोदर महिलेच्या चेकींगची तारीख, नंतर तिच्या बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवल्याची तारीख ते अगदी बाळंतीण झाल्याचा दिवसही या कालनिर्णयमध्ये लिहून ठेवला जातो…

दहावी बारावी बोर्डाचं टाईमटेबल शाळेतून मिळाल्यावर ते घरी आल्या आल्या या कालनिर्णयवर नोंदवण्याची आमच्यात प्रथा असे… अगदी शाळेत दांडी ज्या दिवशी मारली ती तारीख ते लायब्ररीतून घेतलेलं पुस्तक परत करण्याची तारीख याची नोंद आर्वजून या कालनिर्णयवर व्हायची. सहकुटूंब बाहेर फिरायला जायचं म्हटलं तरी बिचा-या या कालनिर्णयला एक तास चर्चा ऐकावी लागे…

काही घरांमध्ये आजी आजोबांच्या औषधाच्या वेळाही कालनिर्णयवर पाहायला मिळतात. गंमत म्हणजे नवं कालनिर्णय आल्यावर घरातल्यांचे वाढदिवस कोणत्या वारी आलेत, हे पाहण्याचा एक जणू इव्हेंटच असतो. श्रावण, मार्गशीर्षातले उपवास यांचं एक वेगळंच स्थान या कालनिर्णयवर असतं. का कुणास ठाऊक पण संकष्टी चतुर्थी, आषाढी एकादशी, गणेशोत्सव, रक्षाबंधन, नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी, होळी, संक्रांत यासारखे दिवस व सण कालनिर्णयमध्ये एकदा पाहूनही मन भरत नाही, ते पुन्हा पुन्हा पाहण्यात एक वेगळंच समाधान वाटतं.

हातात स्मार्टफोन, एक चांगली डायरी घरी असूनही गृहिणी अशा कालनिर्णय का लिहीत असतील बरं… कालनिर्णयचं निरीक्षण केल्यावर उत्तर मिळतं… डोळ्यांसमोर राहणारं शाश्वत असतं म्हणतात, तसंच काही गोष्टी परंपरागत आहेत… गृहिणी घरात ज्या ठिकाणी जास्त असते त्या स्वयंपाकगृहातच अधिककरून हे कालनिर्णय लावलं जातं. याच कालनिर्णयकडं पाहत एकीकडे बाईच्या मनात आठवड्याभराचं सारीपाट मांडणं सुरु असतं आणि दुसरीकडे तितकाच चोख स्वयंपाक सुरु असतो… या दोन्हीमध्ये गल्लत मुळीच होत नाही…

या कालनिर्णयकडे पाहिल्यावर असं वाटतं घरातल्या प्रत्येकाच्या सुख दुःखाची, चांगल्या वाईट परिस्थीतीची नोंद घेण्याची जबाबदारीच जणू या कॅलेंडरनं आपल्याकडे घेतलीये. कदाचित काही महिलांना या कालनिर्णयकडे पाहिल्यावर काहीसा आधारही वाटत असेल… इवल्याशा हुकवर वर्षभर लटकणारं हे कालनिर्णय पाहिल्यावर कदाचित अनेकांना बळही मिळत असेल…

इतक्यात आतून आईचा आवाज आला, “कालनिर्णय टाकून नको रे देऊ ते… इतक्यात नसतं टाकायचं… ” मला हसू आलं… पण खऱं सागू… ज्या कालनिर्णयवर वर्षभराच्या सुख दुःखाच्या, प्रत्येक घटनेच्या नोंदी झाल्या त्या कालनिर्णयविषयी आईच्या मनात हा जिव्हाळा निर्माण होणं स्वाभाविक आहे…

२०२३ चं कालनिर्णय पुन्हा रोल करून त्याला रबरबॅन्ड लावला. त्यावेळी जाणीव झाली आपल्या हातात आहेत, ते फक्त साधे बारा कागद नव्हे तर, बाईचा न दिसणारा संसार आहे… 

लेखिका : अनामिक

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “याला जीवन ऐसे  नाव….” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “याला जीवन ऐसे  नाव….” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

याला जीवन ऐसे नाव गुलजार ह्यांच्या रचना वाचल्यावर त्या मनात घट्ट रुतून बसतात, भावतात आणि विचारात देखील पाडतात. परवा गुलजार ह्यांच्या खूप आवडतील अशा आशयपूर्ण चार ओळी मैत्रीणीने पाठविल्यात. त्या पुढीलप्रमाणे.

“इतनी सी जिंदगी है, पर ख्वाब बहुत है ।

जुर्म का पता नही, साहब मगर इल्जाम बहुत है।।

खरचं तसं बघितलं तर ह्या मानवजन्माला आलो आणि अवघी एकच इनिंग खेळायचं परमिट मिळालं.त्या अवघ्या पूर्ण हयातीत बालपण आणि म्हातारपण हे तसे बघितले तर जरा परस्वाधीनंच. फक्त जे काही तरुणपण शिल्लक उरतं त्यात आपलं कर्तृत्व दाखवावं लागतं.

हे आपलं कर्तृत्व दाखविण्यासाठी आपण आपल्या जिवाचा आटापिटा करतो जेणेकरून जनतेच्या,लोकांच्या नजरेसमोर आपली उर्जितावस्था आली पाहिजे. सध्याचं आपलं जगं हे खूप आभासी जगं तयार झालयं.ह्या आभासी जगाचा हिस्सा काही मूठभर मंडळी सोडली तर जवळपास सगळेजणं बनतात.

ह्या आभासी जगात वावरण्यासाठी मग “माझा सुखाचा सदरा “ह्याच प्रेझेंटेशन जगासमोर केल्या जातं.कित्येक भावंड सोशल मिडीयावर भाऊबीज, राखीपोर्णिमेचे फोटो धूमधडाक्यात व्हायरल करतांना प्रत्यक्षात मात्र वयस्कर पालकांची जबाबदारी घेतांना वा मालमत्तेची वाटणी करतांना एक वेगळचं चित्र आपल्यासमोर आणतात. तसेच एकमेकांच्या आचारविचारात साधर्म्य नसलेली जोडपी “मेड फाँर इच अदर”भासवतं अँनिव्हर्सरी केक कापतांनाचे फोटो अपलोड करतात.प्रत्यक्षात ही धडपड, द्राविडीप्राणायाम, आटापिटा कशासाठी केल्या जातो हे एक न उलगडलेले कोडेच.काही वेळा आपल्याला इतरांसाठी पण जगावं लागतं म्हणां. कदाचित त्यासाठी असावं.

ह्या आपल्या छोट्याशा आयुष्याच्या तरुणपणाच्या काळात माणूस मात्र स्वप्नं खूप विणतो आणि हे स्वप्नं विणणं अगदी स्वाभाविक असतं.जणू “करलो दुनिया मुठ्ठीमे”सारखीच अवस्था जवळपास प्रत्येकाच्या जीवनात येतेच.

खरचं ही स्वप्नं विणतांना पण खूप मजा येते.काही स्वप्नं ही नशीबाने आपोआपच आपलं काही कर्तृत्व खर्च न करताच पूर्ण होतात,काही स्वप्नं ही धडपड करुन, जिवाचा आटापिटा करुन माणूस पूर्ण करतो.ह्यात त्रास,दगदग, मनस्ताप हा होतोच पण स्वप्नपूर्ती नंतरचा आनंद पण खूप सुख देऊन जातो.काही स्वप्नं ही तशी आवाक्याबाहेरची असतात, आपल्याला कळतं ही अशक्यप्राय आहेत पण तरीपण कुठेतरी असंही वाटत असतं एखादा चमत्कार घडेल आणि कदाचित आपलं हे स्वप्नं पूर्णत्वास जाईल सुध्दा.

ही स्वप्नं उराशी बाळगतं बाळगतं एकीकडे आपण आपल्या जबाबदा-या पार पाडण्याचे काम पण लिलया करीत असतोच.जो घरातील सर्वात जास्त जबाबदार व्यक्ती असतो त्याच्या माथी वाईटपणा हा अटळंच.आपल्या जबाबदा-या पार पाडतांना त्याला कित्येक जणांच्या रोषाला कारणीभूत व्हावं लागतं तर कित्येकांच्या नाराजीचं कारण म्हणजे जबाबदा-यांच ओझं वाहणारी व्यक्ती असते.

जबाबदा-या उचलतांना प्रसंगी व्यक्तींना काही वेळ कठोर भूमिका पण नाईलाजाने घ्यावी लागते.हे सगळं करीत असतांना नशीबाने चांगुलपणा पदरी पडला तर आपण नशीबवान खरे.

ह्या सगळ्या जबाबदा-या स्विकारतांना, प्रमुख भूमिका बजावीत असतांना,ब-याच वेळा घडलेल्या घटनांचे पडसाद जर सकारात्मक उमटले तर काहीच प्रश्न नसतो पण चुकून जर का काही उन्नीस बीस झाले वा पडसाद नकारात्मक उमटले तर दोष हा जबाबदार व्यक्तीच्याच माथी येतो.कित्येकदा आपला स्वतः चा गुन्हा,अपराध नसतांनाही आळ,आरोप हा अंगावर येऊन पडतो.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गदिमा आणि काही गंमतीशीर गोष्टी – भाग-1 – लेखक : श्री सुमित्र माडगूळकर ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ गदिमा आणि काही गंमतीशीर गोष्टी – भाग-1 – लेखक : श्री सुमित्र माडगूळकर ☆ श्री सुहास सोहोनी ☆

(गदिमांच्या आंघोळीच्या ‘मिशा’ ते ‘ग. दि. माडगूळकर पोल्ट्री फार्म’.) 

गदिमांच्या आयुष्यात घडलेल्या काही गंमतशीर गोष्टी, त्यांच्या काही सवयी ज्या तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील !.

गदिमांना त्यांच्या मित्रांना गंमतशीर नावांनी हाक मारण्याची सवय होती. नावांची गंमत करणे हा त्यांचा आवडता छंद असायचा. मधुकर कुळकर्ण्यांना “पेटीस्वारी”, राम गबालेंना “रॅम् ग्याबल”, वामनराव कुळकर्ण्यांना “रावराव”, पु.भा.भाव्यांना ‘स्वामी’, पु.ल.देशपांड्यांना ‘फूल्देस्पांडे’. राजा मंगळवेढेकर यांना ‘मंगळ’, ‘राजा ऑफ मंगळवेढा’. पंचवटीत येणारा नवखा असेल तर ‘या’ असे भारदस्त आवाजात स्वागत व्हायचे. सलगीच्या लोकांना ‘क्यो गुरू’, ‘काय माकडेराव?’, ‘कसं काय फास्टर फेणे?’ असे स्वागत ठरलेले असायचे. अनेक मित्रांची अशी वेगवेगळी नावे ठरलेली असायची.

पु.भा.भावे म्हणजे गदिमांचे खास मित्र! तेही गदिमांना काही नावाने हाक मारत – गम्पटराव, बुवा, स्वामी, डेंगरु, लाल डेंगा, वुल्फ ऑफ माडगूळ, चित्तचक्षुचमत्कारिक!.. आणि गदिमांकडून चक्क त्या नावांस प्रतिसादही मिळत असे!.

त्या काळात जशी गदिमा-बाबूजी जोडगोळी प्रसिद्ध होती, तशी त्याच्या आधी एक त्रिकुट प्रसिद्ध होते – ‘लाड-माड-पाड’.. लाड म्हणजे गीतरामायणाचे जनक सीताकांत लाड, माड म्हणजे ग.दि.माडगूळकर व पाड म्हणजे पु.ल.देशपांडे!

गदिमा आनंदात असले, कुठले काम किंवा गोष्ट मनासारखी झाली, किंवा आवडली, तर त्यांचे वाक्य असे –  ‘गुड रे, गुड गुड गुड गुड गुड गुड….’, तर कधी ‘बेस्टम बेस्ट आणि कोपरानं टूथपेस्ट!’

एकदा गदिमांचा संबंध कोल्हापूरच्या ‘उत्तमराव शेणोलीकर’ नावाच्या गृहस्थांशी आला. त्यांना हे नाव इतके आवडले की त्यांनी त्या नावाचे रूपांतर ‘उत्तमराव’ –> ‘बेष्टराव’ शेणोलीकर असे करून टाकले. घरात कुठला चांगला पदार्थ झाला की त्यांचे पेट वाक्य ठरलेले असे, ‘एकदम ‘बेष्टराव शेणोलीकर’ झाला आहे!’

गदिमांना एक फोन आला, त्यांनी स्वतःच उचलला, समोरून आवाज आला, “मला ग.दि.माडगूळकर यांच्याशी बोलायचे आहे. मी ‘सत्येन टण्णू बोलतो आहे.” गदिमांना वाटले कोणीतरी गंमत करतो आहे. त्यांनी हे आडनाव ऐकले नव्हते. ते लगेच उत्तरले, “मी माडगूळकर अण्णू बोलतो आहे, बोला!”

गदिमांनी मराठी चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान मिळवले होते. ते इतके व्यस्त असत की, सकाळी एक, दुपारी एक व रात्री एक अश्या तीन चित्रपटांच्या कथा ते दिवसभरात लिहायला बसत. कधी कधी त्यात साहित्यिक कार्यक्रम असत. ते १२ वर्षे आमदार होते, त्या संबंधित कार्यक्रम असत. ते तयार होत. जाणे आवश्यक असे, पण कंटाळले की तयार होऊन म्हणत, ‘आम्ही नाय जायचा’, नाही जायचा की अजिबात नाही जायचा…’ मग अगदी मुख्यमंत्र्या॓चीही भेट ठरलेली का असेना!

बऱ्याच वेळा सकाळी उठल्यापासून मित्रांच्या बैठकी रंगत. विद्याताई मधूनच राहिलेल्या आंघोळीची आठवण करत. शेवटी गदिमा नाखुषीने उठता उठता म्हणत, ‘पाच मिनिटात आंघोळीच्या मिशा लावून येतो!’ ‘आंघोळीच्या मिशा’ हे एक गंमतशीर प्रकरण होते. एक गाणे होते गौळण खट्याळ कृष्णाला यमुनेच्या काठावर लाडिक रागाने म्हणत असते, ‘आंघोळीच्या मिषाने भिजविलेस अंग…’ पण एकदा गदिमांच्या नेम्याला (नेमीनाथ उपाध्ये उर्फ पुणे आकाशवाणीचे ‘हरबा’) प्रश्न पडला की ‘आंघोळीच्या मिशा’ कसल्या?  आणि तेव्हापासून गदिमा ‘आंघोळीच्या मिशा लावू का?’, ‘आंघोळीच्या मिशा लावून टाकतो म्हणजे सुटलो’, अशीच स्नानाच्या बाबतीत भाषा वापरत असत.

गदिमांचे एक मित्र होते ‘बाळ चितळे’ नावाचे. त्यांची एक वेगळीच तऱ्हा होती. सगळ्यांसारखे न करता वेगळे काहीतरी करायचे. उदा. सगळेजण हॉटेलमध्ये गेले आहेत व सगळ्यांनी डोसा मागविला, तर हे मिसळ मागविणार! अगदी सगळे करतील, त्याच्या बरोबर उलटे करायचे. यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे आमच्या घरात कोणी असे वेगळे वागायला गेला की त्याला ‘बाळ चितळे’ ही पदवी मिळत असे!.

गदिमांना कधी कधी छोटे अगदी सर्दीसारखे आजार पण सहन होत नसत. मग अगदी शिंक आली तरी त्यांचे मरणवाक्य सुरू होई, ‘मरतंय की काय आता!’ बिलंदरपणा हा त्यांच्यात ठासून भरलेला होता. हे सर्व गुण जन्मजात माडगूळच्या मातीतून आलेले होते. एकदा माडगूळ गावात सभा झाली. सभेनंतर एकाने टेबल-खुर्ची-सतरंजी या सकट अध्यक्ष, वक्ते यांचे आभार मानले. ते आभाराचे भाषण सीतारामबापू नावाच्या सरपंचाना इतके आवडले की, पुढे बोलताना बापू आभार शब्दाशिवाय बोलेनासेच झाले. अगदी त्यांना कोणी सांगितले की, ‘अमक्या तमक्याला मुलगा झाला’. तर ते चटकन म्हणायचे, ‘म्हणजे हे आभार मानायचंच काम झालं!’ कोणी बातमी दिली की कडब्याच्या गंजीला आग लागली, तर बापू झटक्याने म्हणणार, ‘म्हणजे हे आभार मानायचंच काम झालं!’ शेवटी सगळ्या गावाने त्यांचे नाव ‘आभार सीताराम’ असे ठेवले होते. तर सांगायचे असे की, हे विनोदी गुण बहुतेक गदिमांना आपल्या गावाकडच्या मातीतून व माणसांकडून उपजतच मिळाले होते.

गदिमांच्या धाकट्या भावाचे लग्न होते. वऱ्हाड घेऊन मंडळी लग्नघरी गेली. नवरा मुलगा बघायला नवरीच्या मैत्रिणींची पळापळ सुरू झाली. नवरा मुलगा कुठला, हे कोणालाच माहीत नव्हते. एक कोणीतरी मैत्रीण मोठ्याने गावाकडच्या टोनमध्ये म्हणाली, ‘कोन्ता ग कोन्ता?’ झालं. पुढचे अनेक दिवस कुठल्याही बाबतीत चौकशी करायची असेल तर गदिमांचे वाक्य तयार असे ‘कोन्ता ग कोन्ता?’ एखादे वाक्य दुसऱ्याला कंटाळा येईपर्यंत लावून धरणे, हे आम्हा माडगूळकरांचे खास वैशिष्ट्य!.

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री सुमित्र माडगूळकर

प्रस्तुती : सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बापाच्या काळजावरचा गोवर्धन ! – भाग – 1 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

बापाच्या काळजावरचा गोवर्धन ! – भाग – 1 ☆ श्री संभाजी बबन गायके 

वासुदेव दादाला शब्द दिला होता खरा…पण प्रत्यक्षात तो शब्द पाळण्याची वेळ आली तेंव्हा यशोदेच्या शेजारून तिला अलगद उचलताना हात प्रचंड थरथरू लागले!

पुरूषांचं काळीज पाषाणाचं असतं तसं माझंही असेल असा माझा समज होता. पण याच पाषाणातून कधी माया पाझरू लागली ते माझं मलाही समजलं नाही…होय माझ्या पोटी माया उपजली आहे!

आणि या पाझरानं आजच्या या भयाण रात्री महाप्रलयाचं रूप धारण केलं आहे. यमुनेच्या उरात जलप्रलय मावत नाहीये. तिला आणखी दोनचार काठ असते तरीही ते तिला अपुरेच पडले असते त्या रात्री. वीजांचा एरव्ही लपंडाव असतो पावसाच्या दिवसांत. पण आज त्या लपत नव्हत्या…आभाळात ठाण मांडून होत्या! एक चमकून गेली की तिच्या पावलावर पाऊल टाकून दुसरी वीज धरणीला काहीतरी सांगण्याच्या आवेगात आसमंत उजळून टाकीत होती. या दोन क्षणांमधल्या अवकाशातच काय ती अमावस्या तग धरून होती. अमावस्येला निसर्गाने जणू आज खोटं पाडण्याचा चंग बांधला होता. अमावस्या म्हणजे काळामिट्ट अंधार….पण आजच्या रात्री अंधाराने काळेपणाशी फारकत घेतली होती….जगाचं माहित नाही…पण मला तरी स्पष्ट दिसत होतं…सारं काही!

दूर मथुरेच्या प्रासादातले दिवे लुकलुकत होते. आणि तिथून जवळच असलेल्या कारागृहाच्या भिंतीवरच्या पहारेक-यांच्या हातातील मशाली लवलवत होत्या…काहीतरी गिळून टाकण्यासाठी. या कारागृहाने आजवर सात जीव गिळंकृत केले होतेच. त्याच्या भिंतींवर रक्ताचे डाग सदोदित ताजेच भासत असत. सुरूवातीपासून आठ जन्म मोजायचे की शेवटापासून मागे मोजत यायचे हा प्रश्न नियतीने कंसाच्या मनात भरवून दिला होता. पाप कोणताही धोका पत्करत नाही. धोका पत्करण्याचा मक्ता तर पुण्याने घेतलेला असतो. पापाला अनेक सल्ले मिळतात आणि पुण्याला सल्ल्याची आवश्यकताच नसते.!

आज देवकी गर्भारपणाच्या नवव्या महिन्यानंतरच्या नवव्या दिवसात गवताच्या गंजीच्या बिछाण्यावर

निजून आहे. आणि याची तिला सवय झालीये गेल्या सात वर्षांपासून. खरं तर ती राजकन्या. सोन्याचा पलंग आणि रेशमाची सेज तिच्या हक्काची होती. पण दैवगतीपुढे तिचाही नाईलाज होता. तिची कूस माध्यम होणार होती एका धर्मोत्थानाची. पण त्यासाठी तिला एक नव्हे, दोन नव्हे तर आठ दिव्यांतून जावे लागणार होते. पण कसं कुणास ठाऊक आज तिला प्रसुतीपूर्व कळा अशा जाणवतच नव्हत्या..आधीच्या खेपांना जाणवल्या होत्या तशा. आज अंगभर कुणीतरी चंदनाचा लेप लावल्यासारखं भासत होतं. रातराणी आज भलतीच बहरलेली असावी कारागृहाबाहेरची. पहारेकरी देत असलेले प्रहरांचे लोखंडी गोलकावरचे कर्णकर्कक्ष ठोके आज तसे मधुर भासत होते. घटिका समीप येऊ लागली होती. आज तो येणार..आठवा! त्याच्या आठवांनी आत्मा मोहरून गेला होता. पावसाची चिन्हं होती सभोवती आणि वा-यातून पावा ऐकू येऊ लागला होता.

यशोदेच्या दालनाबाहेर मी दुस-या प्रहारापासूनच येरझारा घालीत होतो, याचं सेविकांना आश्चर्य वाटत नव्हतं. या गोकुळाच्या राज्याला वारस नव्हता लाभलेला अजून. बलराम होता पण तो यशोदेचा नव्हता. वासुदेवाचा होता. आम्हांला आपलं बाळ असण्याचा कित्येक वर्षांनी योग आला होता. राजाला चैन कसे पडेल? त्यात हा पाऊस! एखाद्या अनाहूत पाहुण्यासारखा….घडणा-या सर्वच घटनांचा साक्षीदार होण्याचा प्रयत्न करणारा. तो जा म्हणता जाणार नाही!

मध्यरात्र जवळ येऊन उभी आहे सर्वांगी थरथरत. तिलाही जाणीव झालेली असेलच की तिच्या उदरातून उदय होऊ पाहणा-या विश्वाची. माझ्या महालाबाहेर पहा-यावर असणारे गोपसैनिकही आता पेंगळून गेले आहेत. दिवसभर गायी चारायला जाणारी आणि दिवेलागणीला गोकुळात येणारी माणसं ती. त्यांनाही प्रतिक्षा होती त्यांच्या राजाच्या भविष्याची. सुईणी तर दुपारपासूनच सज्ज होत्या. दासी आज त्यांच्या घरी जाणार नव्हत्या. कोणत्याही क्षणी जन्माचं कमलदल उमलेल ते सांगता येत नव्हतं. गोठ्यांतील गायींचाही आता डोळा लागलेला असावा कारण त्यांचं हंबरणं कानी येईनासं झालं होतं आणि त्यांच्या वासरांचे नाजूक आवाजही. पोटभर दूध पिऊन झोपली असतील ती लेकरं.

यशोदेला कळा सुरू होऊन आता तसा बराच उशीर झाला होता. ती प्रचंड अस्वस्थ होती पण तिच्या डोळ्यांत आज निराळीच चमक. अंग चटका बसावा इतकं उबदार लागत होतं. सुईणी सांगत होत्या तशी यशोदा कळा देत होती पण तिची सुटका काही होत नव्हती.

माझी एक नजर यशोदेच्या कक्षातून येणा-या आवाजाकडे तर एक नजर यमुनेपल्याडच्या काठाकडे खिळून राहिलेली होती. आज त्या काठावरून या गोकुळाच्या काठावर प्रत्यक्ष जगत्जीवनाचं आगमन होणार होतं. पण यमुना तर आज भलतीच उफाणलेली! तिला काय झालं असं एकाएकी. असे कित्येक पावसाळे पाहिले होते मी आजवर पण आजचा पाऊस आणि आजची यमुना…न भूतो! पण माझी ही अवस्था कुणाच्या ध्यानात येण्यासारखी परिस्थिती नव्हती. यशोदा तर भानावर असण्याचा प्रश्नच नव्हता. एका जीवाला जन्माला घालताना तिचा जन्म पणाला लागलेला होता.

कळा देऊन यशोदा क्लांत पहुडलेली….सुईणीच्या,दासींच्या पापण्या अगदीच जडावलेल्या होत्या. मानवी देहाच्या मर्यादा त्यांनाही लागू होत्या. त्या निद्रेच्या पांघरूणाखाली गडप झाल्या…तारका काळ्या ढगांनी व्यापून जाव्यात तशा. त्या रात्रीतील सर्वांत मोठी वीज कडाडली आणि इकडे यशोदा प्रसुत झाली….आणि लगोलग तिला बधिरतेने व्यापलं…ती स्थळ-काळाचे भान विसरून गेली. गायींसाठीच्या चा-याचं प्रचंड ओझं डोक्यावरून खाली उतरवून एखादी गवळण मटकन खाली बसावी तशी गत यशोदेची. बाळाच्या श्वासांचा स्पर्श गोकुळातल्या हवेला झाला आणि सर्वकाही तिच्या प्रभावाखाली आलं. मायेचा प्रहर सुरू झाला होता…गोकुळ भारावून गेलं होतं…निपचित पडलं होतं आणि माया गालातल्या गालात मंद स्मित हास्य करीत कक्षाच्या दरवाज्याकडे पहात होती.

मी लगबगीने आत शिरलो तसा माझ्या डोळ्यांवर प्रखर प्रकाश आला. डावा हात डोळ्यांवर उपडा ठेवीत ठेवीत मी यशोदेच्या पलंगापर्यंत पोहोचलो…ती निपचित झोपलेली…तिच्या चेह-यावर पौर्णिमेचं चांदणं.

मला आता थांबून चालणार नव्हतं. वासुदेव यमुना ओलांडून येतच असावा….मला यमुनातीरी पोहोचलं पाहिजे. आणि मी लगबगीनं बाळाच्या मानेखाली हात घातला आणि तिच्या डोळ्यांकडे लक्ष गेलं. कक्षातील दीप अजूनही तेवत होते. बाहेरचा थंड वारा गवाक्षांचे पडदे सारून आत घुसण्याचा प्रयत्न करीत होता. हे तर मुलीचे डोळे….माझ्या मुलीचे डोळे! डोळ्यांच्या मध्यभागी जणू सारी काळी यमुना जमा झालेली. आणि त्या दोन डोहांभोवती पांढरे स्वच्छ काठ. आता मात्र माझी नजर खिळून राहिली….मी सारे काही विसरून जातो की काय असं वाटू लागलं. आणि ठरलंही होतं अगदी असंच…मी सारं काही विसरून जाणार होतो नंतर.

मायेच्या पुरत्या अंमलाखाली जाण्याआधी तिला उचलली पाहिजे सत्वर असं एक मन सांगत होतं पण बापाचं काळीज….गोकुळाच्या वेशीवर असलेला सबंध गोवर्धन येऊन बसला होता काळजावर. आणि तो हलवायला अजून कृष्ण गोकुळात यायचा होता! तोपर्यंत हे ओझं मलाच साहावं लागणार होतं!

वासुदेवाला शब्द देताना किती सोपं सहज वाटलं होतं सारं! दैवाची योजनाच होती तशी. मथुरेत देवकीनंदन येतील आणि गोकुळात नंदनंदिनी. तो वासुदेव-देवकीचा आठवा तर ही माझी,नंद-यशोदाची पहिली! बाप होण्याची स्वप्नं पाहून डोळे आणि मन थकून गेलं होतं. यशोदा गर्भार राहिल्याचं समजताच मला आभाळ ठेंगणं झालेलं होतं. गाईला वासराशिवाय शोभा नाही आणि आईला लेकराशिवाय. शेजारच्या गोठ्यांतील गायींची वासरं पाहून इकडच्या गायी कासावीस झालेल्या पाहत होतो मी. आणि आता माझा मळा फुलणार होता…..मी आणि यशोदा..आमच्या दोघांच्या मनांची रानं अपत्यप्राप्तीच्या सुखधारांनी आबादानी होऊ पहात होती. स्वत:च्या शिवारात आता स्वत:ची बीजं अंकुरणार होती…ही भावना ज्याची त्यालाच समजावी अशी!

कंसाने सात कळ्या खुडून पायातळी चिरडल्या होत्या आणि आता फक्त एक कळी यायची होती वेलीवर. काटेरी कुंपणाआड वेल बंदिस्त होती. वा-यालाही आत जाण्यास कंसाची अनुमती घ्यावी लागत होती. देवकीच्या उदरातून अंकुरलेला जीव मोठा होऊन त्याला संपवणार होता म्हणून तो मोठा होऊच द्यायचा नाही असं साधं सरळ गणित त्याचं. योगायोगच म्हणावा की यशोदाही याचवेळी आई होणार होती. पण मीही बाप होणार होतो याचा मला विसरच पडून गेला होता म्हणा !

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मनोरुग्णांचा कुंभमेळा… — लेखक : प्रा.विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मनोरुग्णांचा कुंभमेळा… — लेखक : प्रा.विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

तुमचं नातं कितीही जवळचं असो….

जाणं येणं कमी झालं .. गाठीभेटी कमी झाल्या .. संवाद होईनासा झाला की प्रेमाला , आपुलकीला ओहटी लागणारच !

शेअरिंग झाल्याशिवाय , दुःख सांगून रडल्याशिवाय कुणीही कुणाचं होऊच शकत नाही !

 

आणि हल्ली हेच होईनासे झाले आहे

किंवा कमी कमी होत होत बंद होण्याच्या मार्गावर आहे !

आपल्याच हाताने आपल्या जवळच्या नात्याला जर तुम्ही अग्नी देणार असाल तर जगण्यामध्ये उदासीनता , डिप्रेशन , भकास वाटणे हे होणारच !

नको तितकी आर्थिक संपन्नता आणि प्रमाणाच्या बाहेर प्रॉपर्टी गोळा करण्याच्या विळख्यात माणूस सापडला की जगण्यातला आनंद , मजा संपणारच !

 

म्हणून Hi , Hello वाली मंडळी जमा करण्यापेक्षा माणसं जपा , नाती जगा !

सुखदुःखात साथ देणारे दोन चार मित्र , हाकेला धावून येणारे सख्खे शेजारी आणि वेळ प्रसंगी धाऊन येणारी चार रक्ताची नाती जर आपल्या जवळ असतील , तर आणि तरच आपले जगणे सुसह्य होऊ 

शकते , नसता मनोरुग्णाच्या कुंभमेळ्यातले आपणही एक मनोरुग्ण व्हायला वेळ लागणार नाही !

 

मी आणि माझं कुटुंब इतक्या छोट्या वर्तुळात आपण ” सुख मिळवण्याचा ” प्रयत्न करत असाल तर आपल्या प्रयत्नांना तडे जाऊ शकतात !

एखाद्या विषयातलं जबरदस्त टॅलेंट , त्याच्या पोटी मिळणारे गलेलठ्ठ पॅकेज ,उच्चभ्रू  सोसायटीतला वेल फर्निशड् फ्लॅट आणि पार्किंग मध्ये असलेली चकचकीत गाडी म्हणजे सुख , या भ्रमातून बाहेर पडा !

काही नाती तरी जपा .. कुणाकडे तरी जात जा .. कोणाला तरी बोलवत जा

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे व्यक्त न होता , दुःख न सांगता कुढण्यापेक्षा जे आहे ते सांगून मस्तपैकी मोकळं रडा !

…. लक्षात घ्या खळखळून हासल्याशिवाय आणि मोकळं रडल्याशिवाय तुम्ही तणावमुक्त होऊच शकत नाही . भावनांचा निचरा झाल्याशिवाय टेन्शन कमी होणारच नाही आणि त्याशिवाय माणूस आनंदी राहूच शकणार नाही .

 

आणि दुसरी महत्वाची गोष्ट …

…. आपलं समजून तुमच्याजवळ जर कुणी मन मोकळं केलं तर त्याचे गॉसिपिंग करू नका , पाठ वळली की त्या व्यक्तीला हसू नका !

…. इतरांना कुत्सितपणे हसण्याची आणि पदोपदी दुसऱ्याला टोमणे मारण्याची सवय लागली की आपल्या मनाला झालेला कॅन्सर थर्ड स्टेजला गेला आहे , असे समजण्यास काहीच हरकत नाही.

लेखक : प्रा.विजय पोहनेरकर

मो 94 20 92 93 89

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares