मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मय्यत… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ मय्यत… ☆ सुश्री शीला पतकी 

सकाळीच साडेसात वाजता मोबाईल वाजला.  खरं तर हल्ली पहाटे छान झोप लागते आणि मग उठायला जरा उशीरच होतो… दिवसभर करायचं काय? त्यामुळे जरा निवांतपण चालू आहे…. मी फोन घेतला … कामवाल्या बाईचा फोन …बाई शेजारी मयत झाली, मी येत नाही ….मी रागाने  फोन बंद केला.  सकाळी उठून कसले फोन करतात …  बरं कोणाचं तरी कुणीतरी मेलेलं असतं, पण ह्यांना तिथे जाणं अगदी जरुरीचेच आहे .मी नवीन कामवाली बाई ठेवताना तिला पहिला प्रश्न विचारला .. ‘ तुझं नाव काय आणि कुठे राहतेस? ‘ कारण तिचा आमचा पाण्याचा वार एक येऊ नये यासाठी ही धोरणात्मक हुशारी …दुसरा प्रश्न विचारला ‘ महिन्यातून मयत किती? ‘ ….. तिला काही कळलं नाही.  ती गोंधळून गेली .. ‘ म्हणजे मयत झाले असे सांगून किती वेळा जाणार आहेस.’ . त्यावर तिचं केविलवाणं उत्तर.. ‘ आम्हाला जावंच लागतं बाई .. ते काय असंच आता सांगता येतं का.’ .. मी म्हटलं ‘ का ग तुम्ही गेला तर ते काय उठून उभारणार आहे ? का काम करावीत मग ?  जावं …. तिथे जाऊन काय करता तुम्ही ? काहीच नाही … एकाला एक आवाज काढून रडत बसायचं.  त्यांच्याबद्दल तुम्हाला प्रेम सुद्धा नसतं,  मग असं का वागता ? पहिल्यांदा कर्माला महत्व द्यावं …..! ‘ डोंबलाचं कर्म … तिला काहीच कळत नव्हतं.  ती म्हणाली, ‘ बाई आम्ही जर गेलो नाही तर आम्हाला कोण येणार ? ‘ .. ‘ अग तुला कुठे दिसणार आहे ..? ‘  हा वाद खूप वेळ चालला ती आपल्या उत्तरावर ठाम होती की मयत झालं तर मला जावं लागणार …  सगळेच तसे …  त्यामुळे मी तिला नाकारू शकत नव्हते .

मग त्या शब्दावरून लहानपणीचा एक प्रसंग मला आठवला.  सहा-सात वर्षांचि मी असेन.  वडिलांबरोबर कार्यक्रमाला जात असे.  वडील एका सायकलवर आणि आमच्याकडे साथीदार असलेला डोके नावाचा मुलगा दुसऱ्या सायकलवर होता… त्याच्या सायकलवर मी डबल सीट बसलेली.  वडील थोडे पुढे निघून गेले, आम्ही थोडे मागे होतो.  एके ठिकाणी पोलिसांनी डबल सीट म्हणून आम्हाला पकडले आणि दंड काढा म्हणून सांगितले.  याच्याजवळ पैसे नव्हते, मला तर काहीच कळत नव्हते.  मी त्यांच्या तोंडाकडे बघत होते.. आधी पोलीस म्हणल्यावर मी घाबरून गेले.. तो डोके म्हणाला ‘ नाही हो बच्चे की मा मर गई है .. मयत मे जाना है .. बच्चे को मावशी की घर से लाया हु ‘ …. पोलीस हळहळला .. ‘ अरे अरे कितने छोटी बच्ची ‘ .. त्याने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि आम्हाला सोडून दिलं … मला काही हा प्रकार कळला नाही.  फक्त एवढं कळलं की त्याने मयत हा शब्द वापरला होता.. माझ्या मनात त्या शब्दाविषयी कुतूहल होते.  असा या शब्दाचा काय अर्थ होता की सरकारी पोलीस सुद्धा हळहळला .. त्याने माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि आम्हाला दंड न करता सोडून दिले.  म्हणजे काहीतरी महान शब्द असावा.  दोन दिवस मी त्याच्यावर विचार करत होते.  दोन दिवसांनी मी वडिलांना एकदा विचारलं.. ‘ दादा मयत म्हणजे काय हो? ‘ वडील म्हणले ‘ तुला काय करायचे, कोणी सांगितलं तुला हे ‘ .. मग मी झाला प्रसंग सांगितला.  वडील म्हणाले ‘ काही तसं नसतं.  तुझ्या आईकडे तू निघाली आहेस अस त्याने सांगितलं.’ पण मला ते काही फारसं पटलं नाही.  

पुढे दोन चार दिवसांनीच आमच्या तिथल्या मशिदीवरून अनाउन्समेंट झाली….’ इनके घर मयत हो गयी है और मयत दो बजे निकलेगी ‘ .. मला कळेना की मशिदीतला माणूस आईला भेटायला जायचे हे माईक वरून सगळ्यांना का सांगतो आहे आणि त्या दिवशी मला मयतचा खरा अर्थ कळला.  मयत म्हणजे माणूस मेलेले असणे.  मात्र मला खूप वाईट वाटले की आमच्या त्या डोके नावाच्या माणसाने माझ्या आईला मारले …. केवळ दंड भरावा लागू नये म्हणून.  मग मी त्याला मात्र लहान असूनही बोलले व ‘ तुम्ही आमच्या आईला मारता काय ‘ आणि मी आईला गच्च मिठी मारली !… 

कुठल्या शब्दाचे अर्थ संदर्भ आपल्याला कधी आणि कसे लागतील ते काही सांगता येत नाही.  अगदी 70 व्या वर्षी सुद्धा काही शब्द नव्याने कळले आहेत.  असो … ‘ मयत ‘ या एका शब्दावरून आज खूप काही आठवलं आणि तेच समोर लिहिलं.  असला विषय आवडला का म्हणून विचारलं खरं ..  नाही ना,  असो….!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ राष्ट्रमाता जिजाबाई… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ राष्ट्रमाता जिजाबाई… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

आज विलक्षण योगायोग आहे. आज एका ‘वीरमाते’चा आणि एका ‘संन्यासी योद्धा’ यांचा जन्मदिन आहे. आपल्या लक्षात आलेच असेल की मी कोणाबद्दल बोलत आहे. हो, आपल्या मनात आहे तेच ..  छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई आणि बंगालमधील भुवनेश्वरी देवींच्या पोटी जन्माला आलेले नरेंद्र दत्त .. अर्थात ज्यांनी पारतंत्र्याच्या काळात आपल्या उण्यापुऱ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात हिंदू धर्म साऱ्या जगाला समजावून सांगितला ते स्वामी विवेकानंद !!!

जिजाबाईंचा काळ लक्षात घेतला तर सुलतानी आणि अस्मानी संकटाचा. जिथे जिजाबाईंच्या जाऊबाईंना (सरदार शहाजीराजांच्या वहिनीला) गोदावरीच्या घाटावरून मुसलमान सरदारांनी पळवून नेली होती, तिथे सामान्य मनुष्याची आणि त्या काळातील आयाबहिणींची अवस्था काय असेल याची कल्पना केली तरी आपल्या अंगावर काटा उभा राहतो. “मोगलाई आहे का ?” असा प्रश्न जिथे दमनशाही होते, तिथे विचारला जातो. पण त्याकाळापासून हा शब्द प्रचलित आहे म्हणजे त्या शब्दाची दाहकता त्यावेळेला किती असेल, याची आपण कल्पनाच केलेली बरी. आजच्या पिढीला ‘मोगलाई’ या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्यांना बाराव्या शतकापासूनचा इतिहास अभ्यासावा लागेल.

संत ज्ञानेश्वरांपासून भागवत धर्माची, म्हणजेच भक्तिमार्गाची मुहूर्तमेढ पुन्हा रोवली गेली… .. 

…. “ज्ञानदेवें रचिला पाया, तुका झालासे कळस।” 

सात्विक शक्तीचे बीज संवर्धन करण्याचे काम एका अर्थाने बाराव्या शतकापासून सुरु झाले. त्या काळातील संतांनी राजकीय सुधारणांच्या मागे न लागता व्यक्तिगत साधना (पारमार्थिक), शुचिता, भक्तिमार्गातून समाजाचे संघटन, किर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन, कुरुढींचे उच्चाटन करण्याचे महत्त्वाचे कार्य केले… .. त्या काळात ‘शंभर वेळा थुंकणाऱ्या यवनाला प्रतिकार न करता तुझ्यामुळे मला शंभरवेळा गोदावरीचे स्नान घडले’ असे म्हणणारे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज त्या काळात होऊन गेले .. 

तसे  ” नाठाळाच्या माथी हाणू काठी” म्हणणारे संत तुकाराम देखील झाले. 

तसेच “शक्तीने मिळती राज्ये, शक्ती नसता विपन्नता” असे म्हणणारे समर्थ रामदास सुद्धा समकालीन संत होत… ..  शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यावेळेस प्रतिकार करु शकत नसतील असे वाटत नाही, पण त्या काळातील संतांचे चरित्र बघितले तर प्रत्येकाचे जीवन हे त्यावेळेच्या समाजपुरुषाचे प्रतिबिंब दाखविणारे होते. संत एकनाथांच्या काळात एका अर्थाने निद्रिस्त असलेल्या हिंदू समाजाचा स्वाभिमान संत तुकारामया आणि समर्थ रामदासांच्या काळात थोडा अधिक जागृत झालेला होता असे म्हटले तर वावगे होणार नाही. या सर्व संतांच्या मांदियाळीचे आपल्यावर अनंत उपकार आहेत आणि म्हणूनच आपण आज हिंदू म्हणून अभिमानाने जगत आहोत. 

नारळाचे रोप कोंब फुटून वरती यावयास सहा महिने लागतात, त्यांनंतर ते रोप जमिनीत लावले तर नारळ (फळ) यावयास सामान्यपणे दहा वर्षे लागतात. इथे तर सामान्य मनुष्य अतोनात हालआपेष्टा सहन करीत जीव मुठीत धरून जगत होता. ‘स्वाभिमान’ नावाचा एखादा गुण असतो, हे सामान्य मनुष्याच्या ध्यानीमनीही नव्हते. अशा निद्रिस्त मनात भक्तिमार्गाच्या सहाय्याने संतमंडळींनी स्वत्वाचे, सात्विकतेचे बीज आधी पेरले, रुजवले आणि मग विकसित केले आणि याचे मूर्तीमंत, तेज:पुंज उदाहरण म्हणजे श्रीमानयोगी छत्रपती शिवाजी महाराज !!!

अंगी पराक्रम असताना आपले सरदार जहागिरी आणि वतनासाठी आपल्याच भाऊबंदाना छळत होते आणि परक्या मोगलांची चाकरी करीत होते. या सर्वाला प्रतिकार करणारा कोणी तरी सुपुत्र तयार करावयास हवा. जिजाबाईंनी ही सर्व परिस्थिती अभ्यासली आणि आपल्या मनाशी पक्की खूणगाठ बांधली. हिंदूंचे स्वतःचे सिंहासन असावे, हिंदू राजा होऊ शकतो हे साऱ्या भरतवर्षाला कळावे असा संकल्प जिजाबाईंनी केला आणि ‘याची देहि याचीडोळा’ सत्यात उतरवला. जरी तो काळ मोगलाईचा होता तरी आपला पूर्व इतिहास हा विजयाचाच होता.  त्यांनी विजयाचा इतिहास आपल्या मुलाला शिकविला. रामाने पत्नीला पळवणाऱ्या रावणाला वानरांची सेना संघठीत करून स्वसामर्थ्याने  युद्धात मारले, अर्जुनाने युद्ध करून आपले धर्माचे राज्य मिळविले, हे शिकविले. कोणतीही गोष्ट किमान दोन वेळा तरी नक्की घडते. त्या प्रमाणे जिजाबाईनी ‘शिवाजी’*ला प्रथम आपल्या मनात जन्मास घातले आणि त्याप्रमाणे आपल्या मुलास घडविले. एक *’आई*ने मनात ठरवले तर काय करु शकते ते छत्रपतींकडे बघितले की लक्षात येते. अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस “मेलास तरी चालेल पण शत्रूला मारल्याशिवाय परत येऊ नकोस” असे म्हणणारं आईचे मन किती कर्तव्यनिष्ठुर असेल. माझ्या अनुमानाप्रमाणे त्याकाळात प्रत्येक घरात एकतरी ‘जिजाऊ’ नक्की असेल. कारण ज्याप्रमाणे वर्गात एकाचाच प्रथम क्रमांक येतो, त्याप्रमाणे *एकच शिवाजी झाला आणि बाकीचे त्यावेळेच्या गरजेनुसार कोणी सरदार झाले तर कोणी मावळे झाले. शिवाजी महाराजांसाठी मरायला तयार होणारे मावळे हे अर्धपोटीच होते, पण त्याच्या माता ह्या जिजाबाईंप्रमाणे शूर होत्या, म्हणून त्यांना आपल्या मुलाच्या ‘करिअर’ची चिंता नव्हती. हिंदवी स्वराज व्हावे ही जशी श्रींची इच्छा होती तशी ती सामान्य मनुष्याची देखील होती. आणि ही ‘ईच्छा’ सामान्य मनुष्याच्या अंतरात प्रकट करण्याचे श्रेय निश्चितच जिजाबाईंना द्यावे लागेल. आणि म्हणूनच त्या काळातील सामान्य आई देखील स्वराज्य हेच मुलाचे ‘करिअर’ मानू लागली. आणि जिजाबाईंप्रमाणे ती देखील लेकराला स्वराज्यासाठी खुशाल बलिदान दे आणि घाबरुन पळून आलास तर मला तोंड देखील दाखवू नकोस असे ठणकावून सांगू लागली. 

आजची परिस्थिती फार वेगळी आहे अशातला भाग नाही. फक्त आक्रमकांचे मुखवटे आणि स्वरुप बदलले आहे. सर्वांचे ध्येय एकच आहे ते म्हणजे हिंदुस्तानचा, हिंदूधर्माचा नाश. आज ‘आई’ होणे हे ‘चूल आणि मूल’*ह्या चौकटीत अडकणे, अशा पद्धतीने समाजात प्रस्तुत केले जात आहे. खरंतर ‘आई’ होणे हा प्रत्येक स्त्रीचा निसर्गदत्त विशेषाधिकार आहे. स्त्री जातीचा *’आई’ असणे हा खूप मोठा गौरव आहे. स्त्रीच्या अर्धनग्न देहाचा विविध उत्पादनांच्या जाहिरातीसाठी उपयोग करणाऱ्या तथाकथित पुढारलेल्या समाजाला मुलींनी ‘आई’ व्हावं, आईपण आयुष्यभर निभवावे, चूल आणि मूल सांभाळावे हे मागासलेपणाचे निदर्शक वाटते. याला काय म्हणावे ? स्त्रीच्या कर्तृत्वाबद्दल निदान भारतात तरी कोणी संशय घेऊ नये. कारण ती यमावर विजय मिळवणारी ‘सावित्री’  झाली , ती ‘गार्गी’ झाली, ती ‘मैत्रेयी’ झाली, ती ‘झाशीची राणी’ झाली, ती ‘अहिल्याबाई होळकर’ झाली, ती ‘अरुणा असफली’ झाली, ती ‘इंदिरा गांधी’ झाली. ती काय झाली नाही असे नाहीच. पण ती चूल आणि मूल यातच अडकली होती किंवा अडकवली गेली होती असे म्हणणे मात्र फार मोठी शोकांतिका आहे.  आपल्याकडे कर्तृत्ववान स्त्रियांची महान परंपरा आहेच.  पण त्यापेक्षा मोठी परंपरा आपल्याकडे जिजाबाईंसारख्या मातांची आहे. स्वामी विवेकानंदांची आई, सरदार भगत सिघांची माता, स्वा. सावरकरांची आई, चाफेकर बंधूंची आई, सर्व क्रांतीकारकांच्या माता, डॉ. रघुनाथ माशेलकराची आई, थोडक्यात सर्व महान पुरुषांच्या माता. कारण चांगल्या प्रतीच्या झाडासच रसाळ आणि मधुर फळे येतात. इकडे शिवजयंतीला  महाराज !! तुम्ही परत या, असं म्हणायचं ? आणि दुसरीकडे स्त्रीभ्रूणहत्या करायची, स्त्रियांवर, लहान लहान मुलींवर अत्याचार करायचे, असं आता चालणार नाही.  समजा छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न झाले आणि मी जन्म घेतो असे म्हणाले तर आपल्याकडे जिजाबाई कुठे तयार आहेत?

आजच्या शुभदिनी आपण सर्वांनी आपल्या घरात, परिवारात ‘जिजाबाई’ कशा घडवता येतील असा संकल्प करुया. मग शिवाजी महाराज आणि मावळे नक्कीच जन्माला येतील यात शंका नाही. 

राष्ट्रमाता जिजाबाई यांच्या चरणी माझे साष्टांग दंडवत… 

छत्रपती शिवाजी महाराजकी  जय।।। 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “थेंबे थेंबे… वीजही वाचे…” ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “थेंबे थेंबे… वीजही वाचे…”  ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

‘मोबाईल चार्जर मोबाइलला लावला नसेल, पण बटन चालू असेल तर वीज वापरली जाते का? ‘ 

…हाच प्रश्न टीव्ही, एसीसारख्या उपकरणांसाठी लागू होतो. ज्यांचे बटन चालू असते, पण वापर सुरू नसतो, तर वीज वापरली जाते का?

वीजनिर्मिती होते त्या ठिकाणी एसी वोल्टेज तयार होते आणि ते आपल्या घरापर्यंत त्याच रूपात पोहोचते. जवळ जवळ सगळीच आधुनिक डिजिटल इलेक्ट्रॉनिक उपकरणे डीसी वोल्टेजवर काम करतात. मग या उपकरणांना एसी वोल्टेजपासून डीसी वोल्टेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी काही कन्व्हर्टर सर्किट वापरले जाते. यामध्ये रोहित्र (Transformer), रेक्टिफायर, फिल्टर या तिघांचा वापर होतो.

आता चार्जरचं उदाहरण घेऊ. हे कसं काम करते?  ….                                     

चार्जर ५ वोल्ट डीसी आपल्या मोबाईलला देतो. आपण चार्जरला २३० वोल्ट एसी देतो. मग रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) या २३० वोल्ट एसीचे १२ वोल्ट एसीमध्ये रूपांतर करतो. कमीत कमी विजेचे नुकसान करून हे रूपांतर करणे रोहित्राचं (ट्रान्सफॉर्मर) काम. मग रेक्टिफायर नावाचे सर्किट डायोड वापरून एसीचे डीसी वोल्टेजमध्ये रूपांतर करते. चार्जर मोबाईलला लावले नसेल तर रेक्टिफायर, फिल्टर व बाकी सगळं काही काम करत नाही व ऊर्जाही वापरत नाही, पण रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) मात्र आपलं काम करत राहतो. कारण रोहित्रामध्ये (ट्रान्सफॉर्मर) प्राथमिक आणि दुय्यम वायडिंग असतात. प्राथमिक वायडिंमधून विजेचा प्रवाह चालूच असतो. मग तुम्ही चार्जर वापरात असाल किंवा नसाल.

१ साधा ५ वॅटचा चार्जर जर बटन बंद न करता दिवसभर चालू राहिला, तर १ वॅट ऊर्जा वाया जाते. चार्जर सुमार दर्जाचा असेल, तर २०% अजून ऊर्जा वाया जाते. वर्षभर असं होत राहीलं, तर ३६५ वॅट ऊर्जेचं नुकसान. ६ रुपये एका युनिटची किंमत पकडली तर जवळपास २००० रुपयांची वीज वाया जाते. पैशामध्ये मोजलं तर जास्त वाटत नाही. पण कित्येक घरांमध्ये असे कित्येक चार्जर चालू सोडले जात असतील. १ किलोवॅट ऊर्जा वातावरणात १ पाउंड कार्बन डायॉक्सिड उत्सर्जित करते. जगात फक्त या चार्जरमुळे लाखो किलोवॅट ऊर्जा वाया जाते आणि त्याजोगे हरित वायूंचे नाहकच उत्सर्जन होते.

मोबाईलच्या चार्जरचे बटन बंद न करणे, हे अज्ञान किंवा आळस असू शकतो. आळसाला काही पर्याय नाही, पण तुम्हाला आतापर्यंत वाटत असेल, की चार्जर न लावता बटन चालू ठेवल्यामुळे ऊर्जा वापरली जात नसेल, तर तो तुमचा गैरसमज आहे, म्हणून आतापासून चांगली पर्यावरणपूरक सवय अंगीकारूया व चार्जरचे बटन बंद ठेऊ या.

जुने चार्जर ५ वॅटचे आहेत, पण नवीन येणारे चार्जर ३० वॅटपर्यंत येतात. ६ पट ऊर्जा म्हणजे ६ पट नुकसान. आधी घरात सगळ्यांचे मिळून एक चार्जर असायचे, पण आता प्रत्येकाचा एक किंवा आळशी लोकांचा प्रत्येक खोलीमध्ये एक चार्जरसुद्धा असतो. त्या हिशेबाने प्रत्येक व्यक्तीकडून किती ऊर्जेचा अपव्यय होतो, याचा विचार करण्याची गरज आहे. भारतात नेहमीप्रमाणे हा उपेक्षित विषय आहे. पण युरोपियन देशांनी १ वॅट धोरण अवलंबले आहे, म्हणजे उपकरणाचे बटन बंद नसेल केलं तर १ वॅटच्या वर ऊर्जा वापरू नये. तसे कायदे आहेत. विजेची मागणी आणि वापर वाढतच आहे.  त्या अनुषंगाने आपल्याला या गोष्टीचा भविष्यात गांभीर्याने विचार करावा लागेल, हे नक्कीच.

मोबाईल चार्ज करत नसाल, तर बटनसुद्धा बंद करा. कारण तो थोडी का होईना वीज वापरतोच. म्हणून शक्य तेवढ्या सर्व उपकरणांना हा नियम लागू करू या. ऊर्जेचा अपव्यय टाळू या, कारण ‘उर्जा बचत’ हीच उर्जा निर्मितीही असते.

चार्जर एक उदाहरण आहे. सर्व इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, लॅपटॉपसाठी वरील नियम लागू आहे. बटन बंद करणे अथवा शटडाऊन करणे, हाच पर्याय आहे.

*आजवर माहीतच नव्हतं हे ठीक आहे! पण आता हे माहित झालं आहे ना? तर किमान आपण आजपासून ठरवूया की, काम नसेल तेव्हा बटन बंद करुया. असा निर्धार केला तर पहा किती मोठा बदल घडू शकेल. थेंबाथेंबातून फक्त तळेच साचत नसते, तर वीज देखील वाचत असते !                            

विचार करा !!…     

(महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) तर्फे ) 

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ साठी ओलांडलेल्या मेंदूची अप्रतिम कार्यक्षमता… माहिती स्त्रोत : न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ साठी ओलांडलेल्या मेंदूची अप्रतिम कार्यक्षमता… माहिती स्त्रोत : न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले  

आश्चर्यकारक !…  

जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे संचालक म्हणतात की वृद्ध व्यक्तीचा मेंदू सामान्यतः वाटतो त्यापेक्षा अधिक व्यावहारिक असतो. या वयात, मेंदूच्या डाव्या आणि उजव्या गोलार्धांचा परस्परसंवाद सुसंवादी बनतो, ज्यामुळे सर्जनशील शक्यतांचा विस्तार होतो. म्हणूनच ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये अनेक व्यक्तिमत्त्वे आढळू शकतात.

अर्थात, मेंदू आता तारुण्यात होता तितका वेगवान राहिलेला नसतो. तथापि, तो लवचिकता प्राप्त करतो. म्हणून, वयानुसार, योग्य निर्णय घेण्याची आणि नकारात्मक भावना कमी होण्याची शक्यता असते. मानवी बौद्धिक क्रियाकलाप शिखर गाठतात वयाच्या ७० च्या आसपास, जेव्हा मेंदू पूर्ण शक्तीने काम करू लागतो.

कालांतराने, मेंदूतील मायलिनचे प्रमाण वाढते, एक स्त्राव, जो न्यूरॉन्स् मधील सिग्नलचा वेगवान मार्ग सुलभ करतो. *यामुळे, बौद्धिक क्षमता सरासरीच्या तुलनेत ३००% वाढतात.

हे देखील मनोरंजक आहे की ६० वर्षांनंतर एखादी व्यक्ती एकाच वेळी मेॆंदूचे दोन्ही गोलार्ध वापरू शकते. जे अधिक जटिल समस्या सोडविण्यास मदत करते. 

मॉन्ट्रियल विद्यापीठातील प्राध्यापक मोंची उरी यांचा असा विश्वास आहे की वृद्ध मेंदू कमी ऊर्जा वापरणारा मार्ग निवडतो, अनावश्यक गोष्टी काढून टाकतो आणि समस्या सोडवण्यासाठी फक्त योग्य पर्याय शोधतो. एक संशोधन केले गेले, ज्यामध्ये विविध वयोगटाच्या लोकांनी भाग घेतला.  

चाचण्या देतांना तरुण लोक खूप गोंधळलेले होते, तर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी योग्य निर्णय घेतला.

आता, ६० ते ८० वयोगटातील मेंदूची वैशिष्ट्ये पाहू. ती खरोखर मजेशीर आहेत.

वृद्ध व्यक्तीच्या मेंदूची वैशिष्ट्ये…  

१. तुमच्या सभोवतालचे सर्वजण म्हणतात त्याप्रमाणे मेंदूचे न्यूरॉन्स मरत नाहीत. जर एखादी व्यक्ती मानसिक कार्यात गुंतली नाही तर त्यांच्यातील संबंध फक्त अदृश्य होतात.

२. भरपूर माहितीमुळे विचलित होणे आणि विस्मरण निर्माण होते. म्हणून, तुम्हाला तुमचे संपूर्ण आयुष्य अनावश्यक क्षुल्लक गोष्टींवर केंद्रित करण्याची गरज नाही.

३. वयाच्या ६०व्या वर्षापासून, एखादी व्यक्ती निर्णय घेताना तरूणांप्रमाणे, मेंदूचा फक्त एक गोलार्ध वापरत नाही, तर दोन्ही गोलार्ध वापरते.

४. निष्कर्ष: जर एखादी व्यक्ती निरोगी जीवनशैली जगत असेल, हालचाल करीत असेल, व्यावहारिक शारीरिक क्रियाकलाप चालू ठेवत असेल आणि पूर्णपणे मानसिकरित्या सक्रिय असेल, तर बौद्धिक क्षमता वयानुसार कमी होत नाहीत, तर अणिक वाढतात, आणि वयाच्या ८०-९० व्या वर्षी शिखरावर पोहोचतात.

आरोग्यदायी टिप्स: — 

१) वृद्धत्वाला घाबरू नका.‌  

२) बौद्धिक विकासासाठी प्रयत्न करा.  

३) नवीन कलाकुसर शिका, संगीत बनवा, वाद्य वाजवायला शिका, चित्रे रंगवा, नृत्य शिका.

४) जीवनात रस घ्या, मित्रांना भेटा आणि संवाद साधा, भविष्यासाठी योजना बनवा, शक्य तितका उत्तम प्रवास करा.

५)  दुकाने, कॅफे, शो मध्ये जायला विसरू नका.

६) एकटे गप्प बसून राहू नका, ते कोणासाठीही विनाशकारीच आहे.

७) सकारात्मक रहा, नेहमी खालील विचाराने जगा. 

 “सर्व चांगल्या गोष्टी माझ्याकडेच आहेत !”

स्रोत: न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन.

(कृपया ही माहिती तुमच्या ६०, ७० आणि ८० वर्षांच्या मित्रांना द्या जेणेकरून त्यांना त्यांच्या वयाचा नक्की अभिमान वाटेल.)

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वाद, वितंड आणि चर्चा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “वाद, वितंड आणि चर्चा…☆ श्री जगदीश काबरे ☆

जगातील कोणत्याही दोन व्यक्ती या कधीच पूर्णपणे एकमताच्या असू शकत नाहीत–अगदी नवराबायकोही कितीही एकमेकांच्या जवळ असले तरीसुद्धा त्यांच्यात मतभिन्नता असतेच. मतभिन्नता असणे हे खरे तर जिवंत मनाचे लक्षण आहे. त्यामुळे दोन विचारी माणसे एकमेकात वादसंवाद करू शकतात; तर दोन अविचारी माणसे मात्र फक्त वितंडवाद घालू शकतात. पण विचारी माणसाचा अहं जेव्हा त्याच्या बुद्धीप्रामण्यावर हवी होतो तेव्हा मात्र समोरच्या माणसाने त्याची एखादी क्षुल्लक चूक दाखवली तरी त्याचा अहं दुखावतो आणि मग तो चूक कबूल करण्याच्या ऐवजी त्या चुकीचे समर्थन करायचा प्रयत्न करताना बेताल होत जातो. ‘समोरचा माणूस आपल्या चुका काढतो म्हणजे काय!’, असा अहंकार त्याला बेताल होण्यास भाग पाडतो. खरे तर असे लहानसहान वाद तात्पुरत्या स्वरूपातील असायला हवेत. हे वाद कानाआड करून पुन्हा नव्याने एकमेकांशी नितळ मनाने आपण संवाद साधायला हवा. पण आपल्या मनात मात्र त्या माणसाविषयी आकस ठेवणारा दृष्टिकोन निर्माण होतो आणि भविष्यात त्याच्याशी वागताना याच चष्म्याने त्याच्याकडे बघत आपण बोलत राहतो.

म्हणून मला असे वाटते की, निदान चळवळीतील कार्यकर्त्यांनी तरी अहंकाराला आपल्या बुद्धीप्रामण्यावर विजय मिळवून देऊ नये. जसे नवराबायकोमध्ये लहानसहान वाद होतात म्हणून ते लगेच घटस्फोटावर जात नाहीत, तसेच चळवळीच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा आपसातील लहानसहान वादांमुळे एकमेकांना शत्रू न मानता आणि मनभेद न करता मतभेद खुल्या मनाने स्वीकारले पाहिजेत. म्हणूनच म्हटले आहे की, ‘वादे वादे जाय ते तत्त्वबोध:’ पण हे केव्हा शक्य होईल, तर वादांकडे आपण मन प्रगल्भ करणारी चर्चा म्हणून पाहू तेव्हाच. पण वादाकडे जर आपण आपला अपमान करणारे शब्द समजायला लागू तर मात्र वाद हे चर्चा न ठरता हारजीतीच्या खेळावर उतरतात आणि त्यांचे वितंडात रूपांतर होते. ज्या वेळेला माणसाला प्रश्न पडत नाहीत, शंका निर्माण होत नाहीत आणि फक्त आदेश पाळणे, आज्ञाधारकपणा हा गुण समजला जातो त्या वेळेला मात्र कुठलाही वाद होण्याची शक्यता नसते. कारण अशी माणसे फक्त यंत्रमानवासारखी असंवेदनाशील सांगकामे असतात. पण विचारी माणसे संवेदनाशील असल्यामुळे सतत प्रश्न विचारत राहतात, शंका उपस्थित करतात म्हणून त्यांच्यात सतत वादविवाद होत असतात. हे वादविवाद माणसाला नवीन काही शिकण्यास आणि प्रगत होण्यास मदत करणारे असायला हवेत, असे वाटत असेल तर अहंकाराला आपल्या काबूत ठेवायला हवे. अन्यथा आज्ञाधारक मेंढरू आणि आपण यात फरक तो काय?

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ज्याचा त्याचा देव्हारा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? मनमंजुषेतून ?

ज्याचा त्याचा देव्हारा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

परवा एका उद्योजक मित्राच्या, तुम्ही बरोबर वाचलेत, उद्योजक मित्राच्या बंगल्याच्या वास्तुशांतीला जाण्याचा योग आला ! उद्योगपती मित्र असायला मी कोणी नेता थोडाच आहे ? असो ! तर त्याने दिलेले त्याच्या बंगल्याचे “ध्यान” हे नांव वाचून, खाली घसरणारी ढगळ हाप पॅन्ट, त्यातून अर्धवट बाहेर आलेला मळलेला शर्ट आणि नाकातून गळणारे मोती, असे शाळेत असतांनाचे त्याचे त्या वेळचे ध्यान डोळ्यासमोर आले आणि मी मनांतल्या मनांत हसलो ! पण पठ्याने पुढे मोठ्या मेहनतीने पैसा कमवला आणि त्याच्या बरोबर थोडं फार नांव !

बंगल्यात शिरल्या शिरल्या उजव्या हाताला एक मोठ देवघर होतं. अनेक देवादिकांच्या मोठ मोठ्या तसबीरींनी त्याची भिंत भरून गेली होती, पण माझं लक्ष वेधून घेतलं ते तिथल्या जवळ जवळ माझ्या उंचीच्या शिसवी देव्हाऱ्याने ! मित्राची आई त्या प्रचंड देव्हाऱ्या समोर आतील असंख्य देवांच्या लहान मोठ्या मूर्तिची, स्वतः एका चौरंगावर बसून पूजा करत होती ! मला थोडं आश्चर्यच वाटलं, कारण माझा मित्र पक्का नास्तिक आहे हे मला ठाऊक होतं. म्हणून तो देव्हारा बघून मी त्याला म्हटलं, “अरे तू एवढा देव देव कधी पासून करायला लागलास ?” “कोण म्हणत ?” “अरे मग हे एवढ मोठ देवघर त्यात तो भला मोठा देव्हारा, हे कशाचं लक्षण आहे ?” “तुला खोटं वाटेल, पण आजतागायत मी आपणहून या देवघरात पाऊल ठेवून त्यांच्या पुढे कधीच हात जोडलेले नाहीत किंवा त्यांच्याकडे काहीच मागितलेले नाही ! माझा माझ्या मनगटावर पूर्ण भरोसा आहे !” “मग हे सगळं…. ” “आई साठी ! त्या देव्हाऱ्यात अनेक देव देवता आहेत, पण मी त्या देव्हाऱ्या समोर डोळे मिटून जेव्हा केव्हा उभा राहतो तेव्हा मला फक्त आणि फक्त त्यात माझ्या आईची मूर्ती दिसते, जिला मी मनोमन नमस्कार करतो, जी माझ्यासाठी सार काही आहे !” त्याच्या त्या उत्तराने मी अंतर्मुख झालो हे नक्की!

मध्यन्तरी बऱ्याच वर्षांनी सुट्टीत गावाला गेलो होतो. एकदा सकाळी गावातून फिरता फिरता, माझ्या लहानपणीच्या शाळेवरून जायची वेळ आली. तेवढ्यात मधल्या सुट्टीची घंटा झाली आणि सगळी चिल्ली पिल्ली आपापल्याला वर्गातून शाळेच्या अंगणात, कोणी खेळायला, कोणी डबा खायला बाहेर उधळली ! मी गेट समोर उभा राहून माझे बालपण आठवत उभा राहिलो ! आताही शाळेत डोळ्यात भरेल असा कुठलाच बदल झालेला जाणवला नाही मला ! नाही म्हणायला, शाळेच्या अंगणातलं पारावरच एक छोटंस मंदिर मला कुठे दिसेना. त्या क्षणी मला काय झालं, ते माझं मला कळलच नाही, मी बेधडक शाळेत शिरून हेडमास्टरची रूम गाठली. तर त्यांच्या त्या खुर्चीत एक चाळीशीची स्मार्ट मॅडम बसली होती.

ओळख पाळख वगैरे झाल्यावर मी त्यांना म्हटलं “माझ्या आठवणी प्रमाणे आपल्या शाळेच्या अंगणात पारावर एक छोटस मंदिर होतं, ते दिसलं नाही कुठे ?” “त्याच काय आहे ना जोशी साहेब, ते मंदिर ना मी इथे बदली होऊन आल्यावर फक्त मागच्या अंगणात शिफ्ट केलंय !” “ओके ! मॅडम, मी आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी असलो तरी मला विचारायचा तसा अधिकार नाही, पण आपल्याला एक प्रश्न विचारला तर राग नाही नां येणार ?” “अवश्य विचारा जोशी साहेब, त्यात राग कसला !” “नाही म्हणजे मला तुम्ही तसं करायच कारण कळेल का ?” “जोशी साहेब मी जेंव्हा इथे चार्ज घेतला, तेंव्हा पहिल्याच दिवशी सगळ्या शिक्षकांना सांगितलं, की मी मंदिर मागे शिफ्ट करणार आहे आणि त्या वेळेस सुद्धा आपल्याला पडलेला प्रश्नच बहुतेकानी मला विचारला !” “मग तुम्ही त्यांना काय सांगितलंत ?” “मी त्यांना म्हणाले, माझी देवावर श्रद्धा आहे पण मी अंधश्रद्ध नाही किंवा त्याचे अवडंबर पण माजवत नाही ! मला असं वाटतं की आज पासून तुम्ही आपापला वर्ग, हाच एक ‘देव्हारा’ मानून, त्यात असलेल्या प्रत्येक विद्यार्थीरुपी नाजूक, ठिसूळ दगडातून सगळ्यांना हवी हवीशी सुबक छान, मूर्ती घडवायच अवघड काम करायच आहे ! तीच त्या प्रभूची सेवा होईल असं मला वाटतं. माझं म्हणणं त्यांना पटलं आणि त्यांनी त्या प्रमाणे वागून, कामं करून गेली सतत पाच वर्ष ‘तालुक्यातील उत्कृष्ट शाळा’ हे बक्षीस आपल्या शाळेला मिळवून दिलं आहे जोशी साहेब !” मॅडमच ते बोलणं ऐकून काय बोलावे ते मला कळेना ! मी त्यांना फक्त नमस्कार केला आणि शाळे बाहेर पडलो ! घरी जातांना, त्या चिमुकल्यांचा चिवचिवाट बराच वेळ कानावर पडत होता !

डिसेंबरचे कडाक्याच्या थंडीचे दिवस होते. कशी कुणास ठाऊक, पण पहाटे पाच वाजताच जाग आली आणि या अशा थंडीत मस्त आल्याचा, गरमा गरम चहा प्यायची इच्छा झाली ! बायकोला उठवायचं जीवावर आलं, म्हटलं बघूया स्टेशनं पर्यंत जाऊन कुठली टपरी उघडी आहे का. कपडे करून खाली उतरलो. रस्त्यावर तसा शुकशुकाट होता. एरवी भुकणारी कुत्री पण दुकानांच्या वळचणीला गप गुमान झोपली होती. लांबून एका रस्त्यावरच्या चहाच्या टपरीचा दिवा पेटलेला दिसला आणि माझा जीव जणू चहात पडला म्हणा नां ! जवळ जाऊन बघितलं तर तो सामानाची मांडा मांडच करत होता. “अरे एक कडक स्पेशल मिळेल का ?” “साहेब पाच मिनिट बसा. आत्ताच धंदा खोलतोय बघा. ” मी बरं म्हणून त्याच्या टपरीच्या बाकडयावर बसलो. थोडयाच वेळात त्याने रोजच्या सवयी प्रमाणे, चहा उकळल्याचा अंदाज घेवून, तो चहा दुसऱ्या भांड्यात एका फडक्याने गाळला. आता फक्त काही क्षणांचाच अवधी आणि ते पृथ्वीवरचे अमृत माझ्या ओठी लागणार होतं ! त्याने मग दोन ग्लास घेवून एका ग्लासात पाणी ओतलं आणि एका ग्लासात चहा. ते पाहून मी आधाशा सारखा हात पुढे केला, पण त्याने माझ्याकडे सपशेल दुर्लक्ष करून, ते दोन ग्लास आपल्या हातात घेतले आणि मेन रोड वर जाऊन काहीतरी मंत्र म्हणून, पहिल्यांदा पाण्याचा आणि नंतर चहाचा ग्लास असे दोन्ही रस्त्यावर ओतले ! मला काहीच कळेना ! इथे त्याच पहिल बोहनीच गिऱ्हाईक चहासाठी तळमळतय आणि त्याने तो चहाचा पहिला ग्लास चक्क रस्त्यावर ओतला ! मी काही विचारायच्या आतच त्याने दुसरा चहाचा ग्लास भरून माझ्या पुढे केला. मी चहा पिता पिता त्याला म्हटलं “अरे तो ताजा चहा आणि पाणी रस्त्यावर कशाला टाकलंस?” “साहेब मी रोजचा पहिला चहा देवाला अर्पण करतो बघा!” “देवाला ? अरे पण मला त्या मेन रोडवर तुझा कुठला मुदलातला ‘देव्हाराच’ दिसत नाही आणि तुला त्यातला देव दिसून त्याला तू तुझा पहिला चहा अर्पण पण केलास ! खरच कमाल आहे तुझी !” “साहेब कमाल वगैरे काही नाही. माझ्या बापाने सुरु केलेली ही टपरी आता मी चालवतोय, पण त्याने शिकवल्या प्रमाणे हा रोजचा रीती रिवाज मी न चुकता पाळतोय बघा ! साहेब शेवटी देव सगळीकडे असतो असं म्हणतातच नां ? प्रश्न फक्त श्रद्धेचा असतो, खरं का नाही ?” त्याच्या या प्रश्नावर मी फक्त हसून मान डोलावली आणि त्याला पैसे देऊन सकाळी सकाळी मिळालेल्या सुविचाराचा विचार करत घरचा रस्ता पकडला !

मंडळी, शेवटी कोणाचा ‘देव्हारा’ कुठे असेल आणि त्यात तो किंवा ती कुठल्या देव देवतांची पूजा अर्चा करत असतील, हे सांगणे तसे कठीणच ! शेवटी, तो चहावाला मला म्हणाला तसं, प्रश्न शेवटी श्रद्धेचा असतो, हेच त्रिकाल बाधित सत्य, नाही का ?

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खोलवर विचार करा – मूळ इंग्रजी लेखक : अनामिक ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

? इंद्रधनुष्य ?

☆ खोलवर विचार करा – मूळ इंग्रजी लेखक : अनामिक ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे

… तुमचा जीवनरक्षक कोण आहे??

अनीता अल्वारेज, अमेरिकेतील एक व्यावसायिक जलतरणपटू. तीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान स्पर्धक म्हणून इतर स्पर्धकांसह जलतरण तलावात उडी घेतली आणि उडी मारताच ती पाण्याखाली गेल्यावर अचानक बेशुद्ध पडली.

जिथे संपूर्ण जमाव फक्त विजय आणि पराभवाचा विचार करत होता, तिथे अनिता नियोजित वेळेपेक्षा जास्त काळ पाण्याखाली असल्याचे तिच्या प्रशिक्षक अँड्रिया यांच्या लक्षात आले.

जगज्जेतेपदाची स्पर्धा सुरू आहे हे सर्व काही क्षणात अँड्रिया विसरली व एक क्षणही वाया न घालवता आंद्रियाने स्पर्धा सुरू असतांनाही जलतरण तलावात उडी घेतली. तेथे असलेल्या हजारो लोकांच्या काही लक्षात येईपर्यंत अँड्रिया अनितासोबत पाण्याखाली होती.

पाण्याखाली गेल्यावर अँड्रियाने अनिताला स्विमिंग पूलाच्या तळाशी पाण्याखाली बेशुद्ध अवस्थेत पडलेले पाहिले. अशा स्थितीत पाण्याखालून ना हात पाय हलवून इशारा करता येतो, ना मदतीसाठी कुणाला आवाज देणे शक्य होते. अशा परिस्थितीत अँड्रियाने बेशुद्ध अवस्थेतील अनिताला बाहेर काढल्याचे बघून हजारो लोक अक्षरशः सुन्न झाले. आपल्या समयसुचकतेमुळे अँड्रियाने अनिताचा जीव वाचवला.

ही घटना आपल्या आयुष्याशी जोडून बघता आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक मोठा प्रश्न सोडवला असल्याचे जाणवेल !

किती माणसं आपल्या आयुष्याशी जोडलेली असतात हे आपल्या लक्षातही येत नाही, आयुष्यात आपल्याला कितीतरी जण दररोज भेटत असतात, पण मनुष्य प्रत्येकाला आपल्या मनातील गोष्ट काही उकल करून सांगू शकत नाही. आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातही तो कुठेनाकुठेतरी बुडत असतो, कोणत्या ना कोणत्या समस्येला तो सामोरा जात असतो, मनावर कसलातरी दबाव घेऊन तो आयुष्यात अस्वस्थ होत असतो, पण कुणाला ते सांगू शकत नाही, किंवा कुणाला सांगण्याइतपत कुणी जवळचं उपलब्ध नसतं.

जेव्हा माणूस आपल्या वेदना, त्रास कोणाला सांगू शकत नाही, तेव्हा मानसिक ताण इतका वाढतो की तो स्वतःला सगळ्या जगापासून, सगळ्यांच्या नजरेपासून दूर, एकांतात, स्वतः ला चार भिंतीत कैद करून घेतो. ही अशी नाजूक वेळ असते जेव्हा माणूस आतल्याआत बुडायला लागतो, त्याची इच्छा संपलेली असते, सहनशीलतेचा अंत झालेला असतो. ना कोणाशी बोलणे, ना कोणाला भेटणे. ही मानसिक परिस्थिती मानवासाठी सर्वात धोकादायक असते.

जेव्हा माणूस त्याच्या अशा बुडण्याच्या अवस्थेतून जात असतो, तेव्हा इतर सर्व प्रेक्षक ज्याच्या त्याच्या आयुष्यात व्यस्त असतात. हा माणूस मोठ्या संकटात सापडला आहे याची कोणालाच पर्वा रहात नाही. एखादी व्यक्ती काही दिवस गायब झाली तरी काही काळ लोकांच्या ते लक्षातही येत नाही.

अचानक काही घटना घडली तेव्हा लोक जमले तर त्याच्याविषयी विचार करतात, की हा पूर्वी किती बोलायचा, आता तो बदलला आहे किंवा त्याला गर्व झाला आहे की आता तो मोठा माणूस झाला आहे. तो बोलत नाही तर जाऊ द्या, आपल्याला काय करायचं! किंवा त्यांना असं वाटतं की जर तो आपल्याला आता दिसत नाही तर तो त्याच्या आयुष्यात आनंदी आहे, म्हणून तो आपल्याला दिसत नाही.

अनिता एक निष्णात व्यावसायिक जलतरणपटू असूनही ती बुडू शकते तर कोणीही त्यांच्या आयुष्यातील वाईट काळातून जाऊ शकतो, हे समजून घेणे आवश्यक आहे. पण त्या इतर लोकांशिवाय एकादी अशी व्यक्ती असेल जी तुमच्या मनाचा कल, मनःस्थिती ताबडतोब ओळखू शकेल, तिला न सांगता सर्व काही आपसूकच कळेल, तो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूवर नेहमी नजर ठेवेल, थोडासा त्रास झाला तरी तो येऊन तुम्हाला तुमच्या समस्या विचारेल.

तुम्ही तुमची वागणूक ओळखा, स्वतःला प्रोत्साहन द्या, तुम्ही स्वतः ला सकारात्मक बनवा आणि अँड्रियासारखे प्रशिक्षक बनून तुम्ही दूसऱ्याचा जीव वाचवा.

आपल्या सर्वांनाच अशा प्रशिक्षकाची खरी गरज आहे… असा प्रशिक्षक कोणीही असू शकतो. तुमचा भाऊ, बहीण, आई, वडील, तुमचे कोणी मित्र, कोणी तुमचे हितचिंतक, कोणी नातेवाईक, कोणीही, जो न सांगता तुमच्या भावना, स्वभावातील बदल ओळखून लगेच सकारात्मक कारवाई करू शकेल.

खोलवर विचार करा व वेळीच शोधा, जीवनातील तुमचा जीवन प्रशिक्षक कोण आहे ते….

 

मूळ इंग्रजी लेखक- अनामिक.

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “तर समजून घ्यावे की…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

 

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ “तर समजून घ्यावे की…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

वटारलेले डोळे पाहून दबणारी बायकोच, आता डोळे वटारून पाहू लागली की समजून घ्यावे कि, ” इहलोकातील आपले अवतारकार्य शेवटच्या टप्यात आहे. “

कमावत्या मुलांच्या आवाजात कडकपणा आला; तर समजून घ्यावे कि, आपण आता कौटूंबीक जबाबदारीतून हळूहळू अंग काढून घ्यावे.

 बसल्या बसल्या ह्या शेंगातील दाणे काढा, असे जेव्हा सुनबाईने म्हटले तर समजून घ्यावे की, बॉस नावाचे पद यांनी खारीज केले आहे.

वय वर्ष 60 नंतर कुणी आपल्याशी चांगले वागेल ही अपेक्षा ठेवु नका. भाऊबंदकीचे नाते कुटूंबाच्या फाळणी बरोबरच संपुष्टात आले, नातेवाईक देणे / घेणे वादातून संपले,

पत्नीचा ओढा नकळत न टिकणाऱ्या मुलांच्या नात्याकडे वळू लागला.

*

कार्यप्रसंगात नातेवाईक भेटतात, केवळ रामराम होतो, फारसी चौकशी होत नाही, तुम्ही मात्र मनात उजळणी करत असता, ह्याला मी किती मदत केली होती…

सगळे कटू अनुभव जमा झाले असतील, कुणी नाही कुणाचे हा अनुभव गर्द झाला असेल.

नाती बिघडली, सबंध बिघडले, वाट्याला एकटेपण आले, आता कुणाचे फोन येत नाहीत, दुखावलेले मन कुणाला फोन कर असेही म्हणत नाही.

तरीपण एक नातं अजून टिकलं आहे, एक फोन चालु आहे, ते नातं मुलीचं.

तितक्यात मुलीचा फोन येतो, ती विचारते— ” पप्पा गेले होते का दवाखान्यात ? औषधं घेतलीत का ? काय म्हणाले डॉक्टर ? जेवण झालं काय ?” 

नाना प्रश्न काळजीचे, आस्थेचं विचारणं, जिव्हाळ्याचे हेच एकमेव नात उरतं…

थोडा पश्चातापही होत असतो, मुलींसाठी काहीतरी करण्यात मी कमी पडलो, त्यांच्यासाठी काहीतरी करायचे राहून गेले, कसे होणार त्यांचे ?

लोक मुलगा झाला कि, स्वतःला भाग्यवंत समजतात, मला असे वाटते, ज्यांना मुली आहेत ते खरे भाग्यवंत होय.

एरवी दोन तीन मुले जेव्हा वडिलांना कुणाकडे ठेवावे, यावरुन भांडत असतात तेव्हा झालेली चूक सुधारण्या पलीकडे गेलेली असते. तेव्हा मुलगी म्हणते,

“बाबा काळजी करू नका मी आहे ना !!…. “

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जशी समजली तशी… – गीतेचे वैशिष्ट्य – भाग – ३ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

☆ गीता जशी समजली तशी… – गीतेचे वैशिष्ट्य – भाग – ३ ☆ सौ शालिनी जोशी

गीतेचे वैशिष्ट्य

पारंपारिक शब्दाना नवीन अर्थ देणे हे गीतेचे एक विशिष्ट्य आहे.

१) धर्म — येथे धर्म म्हणजे हिंदू, बौद्ध, जैन इत्यादी धर्म असा अर्थ नाही. यांना धर्म पेक्षा संप्रदाय म्हणणे योग्य. धर्म या शब्दाचे अनेक अर्थ आहेत.’धृ- धारयति इति धर्म:l’ धर्म म्हणजे समाजाची तर धारणा करणारा विचार किंवा कर्म . धर्म म्हणजे मार्ग किंवा सहज स्वभाव किंवा कायदा, नियम. तसेच धर्म म्हणजे कर्तव्य. तोच अर्थ गीतेला अपेक्षित आहे. त्यालाच गीता स्वधर्म म्हणते. प्रत्येक माणसाचा त्या त्या वेळचा स्वधर्म असतो. त्या त्यावेळी तो करणे कर्तव्य असते. उदाहरणार्थ पित्रुधर्म, क्षत्रिय धर्म, या दृष्टीने आई-वडिलांचे सेवा करणे हा मुलांचा तर मुलांचे पालन करणे त्यावेळेचा आईचा धर्म असतो.आणि राष्ट्रप्रेम हा प्रत्येक नागरिकाचा धर्म.प्रजा रक्षण हा अर्जुन क्षत्रिय होता म्हणून त्याचा धर्म होता. म्हणून गीतेच्या दृष्टीने स्वतःचे कर्तव्य म्हणजेच स्वधर्म .

२) यज्ञ– यज्ञ म्हटले की समोर येते आणि कुंड, तूप, समिधा इत्यादी साहित्य आणि हवन, स्वाहाकार अशा क्रिया. पण गीतेच्या दृष्टीने ममता व आसक्ती रहित असलेले, सर्व काळी सर्वांच्या कल्याणासाठी केलेले कर्म हाच यज्ञ. ‘इदं न मम’ या भावनेने केलेले कर्म हाच यज्ञ. यज्ञात आहुती देताना त्याच्यावरचा हक्क सोडून ते देवतेला अर्पण केले जाते. कर्माचे बाबतीत आसक्ती व ममता सोडून ईश्वरार्पण बुद्धीने केकेले कर्म हाच यज्ञ. मग अन्नपदार्थाबाबत अनासक्तीने केलेले अन्नग्रहण हे यज्ञ कर्मच, ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म’.असा हा निस्वार्थ कार्याला प्रतिष्ठा मिळवून देणारा यज्ञ.

३) पुजा– येथे पुजेसाठी हळद-कुंकू, फुले, निरांजन, नैवेद्य, पाणी कशाचीच गरज नाही. ही पूजा स्वकर्मानी करायची आहे. गीता म्हणते, ‘स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदति मानव:l ‘शास्त्रविधिने नेमून दिलेले कर्म कर्ता भाव सोडून भगवंताला अर्पण करणे म्हणजेच कर्माने भगवंताची पूजा करणे.म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात तुझ्या सर्व क्रिया, खाणे, दान, तप सर्व कर्तुत्वभाव सोडून माझ्यासाठी कर. हीच पूजा, येथे पान, फुल, फळ कशाची गरज नाही. अशी ही शुद्ध कर्माने केलेली पूजा गीतेला अपेक्षित आहे. कर्म हे साध्य नसून ईश्वराची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याचे साधन आहे. ईश्वरावर जो प्रेम करतो त्याची सर्व कर्मे पुजारूपच होतात.

४) संन्यास — गीता म्हणते, ‘ज्ञेय:स नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षतिl’ जो कोणाचा द्वेष करत नाही, कशाची इच्छा करीत नाही तो नित्य संन्याशीच जाणावा. म्हणजे गीतेला अपेक्षित असलेल्या संन्यास हा घरदार सोडून वनात जाण्याचा आश्रम संन्यास किंवा भगवी वस्त्रे घालून यज्ञादि कर्माचा त्याग करण्याचा नाही. हा वृत्ती संन्यास आहे. त्यासाठी वासना कामनांचा, फलाशेचा त्याग अपेक्षित आहे. निष्क्रिय होणे नाही. हा बुद्धीत आहे. कर्म सोडणे या बाह्यक्रियेत नाही. गीतेचा संन्यास हा कर्माचा नसून मी, माझे पणाचा आहे. कर्तुत्वमद आणि फलेच्छा टाकण्याचा आहे. असा संन्यासी लोकसंग्रहासाठी कार्य करतो. घरात राहूनही हा साधणे शक्य आहे.

५) अव्यभिचारी भक्ती– भक्ती म्हणजे भगवंताविषयी प्रेम, त्याची पूजा, नामस्मरण, प्रदक्षिणा करणे एवढा मर्यादित अर्थ नाही. ही भक्ती स्थळ, काळ, प्रकार यांनी मर्यादित आहे. ती संपते व सुरू होते. स्वकर्म आणि कर्मफळ त्या सर्वात्मकाला अर्पण करणे हीच भक्ती. विश्वाच्या रूपाने श्रीहरीच नटला आहे हे जाणून आपल्या सकट सर्व ठिकाणी त्याला पाहणे हेच अव्यभिचारी भक्ती. तेव्हा प्रत्येक वस्तूत, व्यक्तीत भगवंत आहे हा अभेदभाव पटला की प्रत्येक व्यवहार हा भगवंताशीच होतो.’ जे जे देखे भूतl ते ते भगवंत’l हा भाव हीच ईश्वर भक्ती. अशा प्रकारे भक्तीचे व्यापक रूप जे विहितकर्मातून साध्य होते ते गीता दाखवते. प्रत्येकांत देव पाहून केलेला व्यवहार शुद्ध होतो. व्यवहार व भक्ती दोन्ही एकच होतात.

६) अकर्म– व्यवहारात आपण सत्य -असत्य, धर्म -अधर्म या विरोधी अर्थाच्या जोड्या म्हणतो. त्या दृष्टीने कर्म -अकर्म ही जोडी नाही. अकर्म म्हणजे म्हणजे कर्म न करणे नव्हे, तर सामान्य कर्मच यावेळी निरपेक्ष बुद्धीने फलाची अपेक्षा न ठेवता कोणताही स्वार्थ न ठेवता, ईश्वरार्पण पद्धतीने केले जाते.त्यावेळी ते फळ द्यायला शिल्लक राहत नाही. करून न केल्यासारखे होते. त्यालाच अकर्म म्हणतात. म्हणजे इंद्रियांच्या दृष्टीने कर्म होते पण फळाचे दृष्टीने ते अकर्म. कर्माशिवाय माणूस एक क्षणभरही राहू शकत नाही. अशावेळी स्वस्थ बसणे हे ही कर्म होते. म्हणून निष्काम, सात्विक कर्म म्हणजेच अकर्म. थोर लोकांचे कर्म अकर्मच असते. लोकांना ते कर्म करतात असे वाटत असले तरी फलेच्छा व कर्तृत्व भाव नाही आणि लोकहिताचा उद्देश. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने फल रहित बंधरहित क्रिया म्हणून अकर्म.

७) समाधि– गीतेतील समाधी व्यवहारातील समाधी पेक्षा वेगळी आहे. व्यवहारात साधू पुरुषांना गतप्राण झाल्यावर खड्ड्यात पुरतात त्याला समाधी म्हणतात. गीता समाधी सांगते ती कर्म करत असतानाच प्राप्त होते .कर्म होत असतानाही आत्मस्थितीचे समत्व बिघडत नाही. बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते. तेव्हाची योगस्थिती म्हणजे परमेश्वराशी ऐक्य तीच समाधी. अष्टांग योगातील शेवटची पायरी ही समाधी. अशाप्रकारे नेहमीच्या व्यवहारातील धर्म, यज्ञ, पूजा, संन्यास, समाधी, भक्ती, अकर्म या शब्दाला वेगळे अर्थ देऊन गीतेने क्रांतीच केली आहे. येथे कोणतेही कर्मकांड नाही. श्रद्धा एकमेव परमात्म्यावर. या सर्व क्रिया कोणत्याही भौतिक साधनाशिवाय केवळ कर्मातून साध्य होतात. हे दाखवणे हेच गीतेचे वैशिष्ट्य. १८व्या अध्यायात भगवंत सांगतात, ‘ स्वे स्वे कर्मण्यभिरत:संसिद्धि लभते नर:l’ विहित कर्म तत्परतेने व उत्कृष्टपणे केल्याने साधकाला आत्मसिद्धी प्राप्त होते. अशाप्रकारे गीता हे आचरण शास्त्र आहे. आचरण्याची वेगळी वाट दाखवते.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “शुभेच्छा…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “शुभेच्छा…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

तसं तर परिस्थिती जरासुध्दा बदललेली नसते …. तारीख नुसती बदलते..

चोवीसचं पंचवीस झालं .. .. वाटतं की नवीन वर्ष आलं…. नवीन वर्ष आलं..

 

काय झालं बरं वेगळं… अगदी काही नाही…

जरा विचार केला की लक्षात येतं दिवस येतात आणि जातात..

आपणच आपल्याला समजून घ्यायचं…..कारण बाकी कोणी घेत नाही..

शहाण्यासारखं वागत राहायचं….. आपल्या परीने…

कालच्या चुका आज करायच्या नाही असं निदान ठरवायचं तरी .. .. उद्याची फारशी काळजी करायची नाही… भरपूर काम करायचं …. कष्ट करायचे..

मुख्य म्हणजे….. कशाची आणि कोणाकडून अपेक्षा करायची नाही..

झालं .. इतकंच तर असतं…..

नूतन वर्षाच्या वास्तव शुभेच्छा ……

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares