☆ ✹ ३१ डिसेंबर ✹ इतिहासाचार्य वि. का. राजवाडे स्मृतिदिन — संकलन : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
जन्म – १२ जुलै १८६३ (वरसई,रायगड)
स्मृती – ३१ डिसेंबर १९२६ (धुळे)
इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील वरसई येथे झाला. ते मराठी इतिहास संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते. बीए पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले. १८९८ साली त्यांनी लिहिलेल्या ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. ७ जुलै १९१० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली. राजवाडे म्हणायचे, “ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेला नाही.”।महाराष्ट्राच्या विचारविश्वात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा मोठा दरारा, दबदबा आणि धाक होता. राजवाडे आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनून गेले होते. राजवाडे यांच्यावर भरपूर टीका झाली. त्यांच्या हयातीतच प्रबोधनकार के.सी. ठाकरे, विठ्ठल रामजी शिंदे, जिवाजी मंगेश तेलंग यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले होते. नंतरही इतिहास संशोधक त्र्यं.शं. शेजवलकर यांनी राजवाडे यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. तथापि, या सर्व गोष्टी एकत्र केल्या तरी राजवाडे यांचे वाक्य न् वाक्य ब्रह्मवाक्य मानणारा एक वर्ग अस्तित्वात राहिलाच आणि विशेष म्हणजे मराठी विचारविश्वात याच वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे राजवाडे यांचे स्थान अबाधित राहिले. राजवाडे यांच्या नावावर स्वतंत्र असा एकही ग्रंथ नाही. त्यांनी नियतकालिकांमधून किरकोळ स्वरूपाचे लेख लिहिले. ‘महिकावतीची बखर’ आणि ‘राधामाधवविलास चंपू’ या प्राचीन ग्रंथांचं संपादन केले आणि मुख्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करून ती तब्बल बावीस खंडांमध्ये छापली. त्यांच्यापैकी काही खंडांना प्रस्तावना लिहिल्या. राजवाडे संपादनांपेक्षा अधिक गाजले ते या प्रस्तावनांमुळे. ज्यांना या प्रस्तावना आवडल्या नाहीत, त्यांनाही राजवाडे यांनी अविश्रांत कष्ट घेऊन, प्रचंड भ्रमंती करून जमा केलेल्या इतिहासाच्या साधन सामग्रीसाठी त्यांच्या ऋणात राहण्यावाचून पर्यायच नव्हता. राजवाडे यांनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण’ या पुस्तकाची प्रस्तावना मूळ पुस्तकापेक्षा अधिक वाचनीय आहे. असेच त्यांच्या बहुतेक पुस्तकां बद्दल म्हणता येईल. राजवाडे बुद्धिमान तर होतेच; पण त्यांना प्रतिभा शक्तीचीही देणगी लाभली होती. जबरदस्त आत्मविश्वास हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. त्यामुळं साधा अंदाज किंवा कयास सुद्धा ते अशा पद्धतीने व अशा आक्रमकपणाने मांडत, की जणू काही तो त्रिकालाबाधित सत्य असलेला महासिद्धान्तच आहे.
संकलन : श्री मिलिंद पंडित, कल्याण
संदर्भ : विकिपीडिया
संग्रहिका – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
☆ माझा संसार व मी……लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
माझ्या लग्नानंतर मला कळलेल्या व पटलेल्या आणि मनाला भिडलेल्या, बऱ्याच गोष्टी या लेखात मला वाचण्यास मिळाल्या, पहा वाचा तुम्हालाही कदाचित पटतील व विचार करण्यास भाग पाडतील…
आपल्या नवयुवकाना याची फार मदत होईल नक्की वाचा…
— संसार काय असतो हे नेमक्या आणि मोजक्या शब्दात येथे मांडलंय
कागदावर जुळलेली पत्रिका आणि काळजावर जुळलेली पत्रिका यात अंतर राहतं…
लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं जवळ-जवळ
अशक्य आहे, हे मानूनच हा डाव मांडायचा असतो.
वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे?
सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं हीच तर नियतीची जुनी हौस आहे. सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. या न देण्याचंच ‘देणं’ स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं.
निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं नाही, तर तुला मिळणारा ‘जीवन साथीदार’ अगदी तुला हवा तसा
असणार कसा?.
त्याचे – आपले, काही गुण जुळणारे नसणारच.. त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच, त्याचं माणूस म्हणून वेगळेपण आहे, हे मान्य करणार असाल तरच संसारात पाऊल टाकावं.
श्रद्धा-अंधश्रद्धा असे तेलकट प्रश्न विचारा.. या प्रश्नांची उत्तर ही सौंदर्य-स्पर्धेतील मेकअप केलेल्या
सुंदर मुलींच्या भंपक उत्तरांसारखीच.
लग्नानंतर मग खरं काय ते एकमेकांना कळत जातं…..
तेव्हा म्हणाली होती, ‘वाचनाचा छंद आहे’ पण नंतर साधं वर्तमानपत्र एकदाही उघडलं नाही बयेनं…
जाब विचारू शकतो आपण?
किंवा —
तो म्हणाला होता – ‘प्रवासाची आवड आहे; जगप्रवास करावा, हिमालयात ट्रेकिंग करावं – असं स्वप्न आहे!’
पण –
प्रत्यक्षात कळतं; कामावरून आला की जो सोफ्यावर लोळतो की गव्हाचं पोतं जसं. जेवायला वाढलंय..
हे ही चारदा सांगावं लागतं…
प्रवासाची आवड कसली? कामावर दादरला जाऊन घरी परत येतो ते नशीब…
वर्षभर सांगतेय, माथेरानला जाऊ तर उत्तर म्हणून फक्त जांभया देतो…
कसले मेले ३२ गुण जुळले देव जाणे… उरलेले न जुळलेले ४ कुठले ते कळले असते तर…
मनापासून सांगतो, त्या न जुळलेल्या गुणांशीच खरं तर लग्न होत असतं आपलं.
तिथं जमवून घेणं ज्या व्यक्तीला जमलं, तीच व्यक्ती टिकली… नाही जमलं की विस्कटली.
अन्याय -शोषण, सहन न करणं, हा पहिला भाग झाला…
पण न जुळलेल्या गुणांमध्ये एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन नातं जुळतंय का हे पाहण्याची सहनशीलता दोघांमध्ये हवी…..
…. पण आज हे लग्नाळू मुला-मुलींना सांगितलंच जात नाहीये;
आपल्याला ‘हवी तशी’ व्यक्ती मिळणं हे एक परीकथेतील स्वप्न असेल;
पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत आयुष्य जोडतं ठेवावं लागतं हेच खरं वास्तव आहे.
धुमसत राहणाऱ्या राखेत कसली फुलं फुलणार ?..‘ एकमेकांचे काही गुण जुळणारच नाहीत, ते मी स्वीकारणार आहे का?’–या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वत:शी देऊन मगच संसार मांडायला हवा.
आपल्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या व्यक्तीचं वेगळेपण सहज स्विकारणं हे या वाटेवरच
पहिलं पाऊल…
ते पाऊल योग्य विश्वासाने पडलं की इतर सहा पावलं सहज पडत जातात..
आणि मग ती “सप्तपदी” – “तप्तपदी” होत नाही..
हेच संसाराचं खरं मर्म आहे.
हरीॐ
“मेड फॉर इच अदर” आपोआप होत नाहीत… होत जातात…
लेखक : अज्ञात
संग्रहिका : प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सध्याच्या युगात परदेशी प्रवास ही एक सहजासहजी शक्यप्राय गोष्ट झाली आहे.पूर्वी दळणवळणाच्या साधनांची कमतरता आणि आर्थिक दुर्बलता ह्यामुळे पंचक्रोशी ओलांडणे सुध्दा जिकीरीचे होते.हल्ली मात्र प्रगत तंत्रज्ञानामुळे उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना आपल्या उन्नतीसाठी विदेशी शिक्षणाची गरज भासू लागली.सरकारी नोक-यांमध्ये मिळणारे एल.टी.सी. आणि सेवानिवृत्ती नंतर हाती आलेल्या एकरकमी पैशामुळे विदेशात हौशीखातर फिरणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली.
9 जानेवारी,”प्रवासी भारतीय दिन”.
ह्या दिवशी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून आपल्या देशात परत आलेत. ह्या दिवसाचे औचित्य साधून आपल्या भारताचे माजी पंतप्रधान मा.अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी 2003 सालापासून हा दिवस “प्रवासी भारतीय दिन”म्हणून साजरा करायला सुरवात केली.पहिला प्रवासी दिन भारताची राजधानी दिल्ली ला साजरा केल्या गेला.
आपली जिवाभावाची, जवळची व्यक्ती तिच्या उन्नतीसाठी परदेशात गेली तरी ती व्यक्ती परत कायम आपल्याजवळ येण्यासाठी आपण आतुरतेने वाट बघतो.आपल्या सगळ्यांच्या उत्कर्षाकरिता आपण तिचा विरह ही सहन करतो.पण ती व्यक्ती कायमची आपल्याकडे परत येण्याचा दिवस हा आपल्यासाठी “सोनियाचा दिवस”असतो.बस ह्याच सोनियाच्या दिवसाचे औचित्य साधून साजरा करण्यासाठी मा.अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या कडून ह्याचा श्रीगणेशा झाला.
2019 मध्ये हा सोहळा वाराणशीला तीन दिवसाच्या समारंभात साजरा झाला.मोठमोठे उद्योगपती आणि राजकीय संबंधित व्यक्ती ह्या सोहळ्यास आवर्जून हजर होते.ह्या सोहळ्यामुळे आपले जवळपास 110 देशांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतात ही दूरदृष्टी मा.अटलजींची होती.देशाच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी असे उपक्रम राबवून घेणे हे सच्च्या देशप्रेमीचेच लक्षण होय.
प्रवासावरून वीणा वर्ल्ड वाल्या वीणाताई आठवल्या. परवाच त्यांचा सिंप्लीफाय ॲप्लीफाय हा खुप छान लेख वाचनात आला. आइनस्टाइन कायम एकाच रंगाचा आणि त्याच प्रकारचा ड्रेस परिधान करायचे. दुसऱ्या वेशात त्यांना कधी कुणी बघितले नाही असं म्हणतात. त्याचं म्हणणं हया अशा गोष्टींवर आपला वेळ, पैसा आणि मेंदूला होणारा शिण हे टाळून आपण आपला फायदा, प्रगती करू शकतो. अर्थात अगदीं साधी राहणी, साधं जीवन जगणं, संग्रह न करणं ह्या गोष्टी आचरणात आणण्यास खूपच कठीण पण कायम लक्षात ठेवल्या तर कधीतरी अमलात आणण्याची पण शक्यता वाढते.
तर अशा ह्या प्रवासी जागतिक दिनाच्या आपल्या भारतवासियांना शुभेच्छा,.
“इतके दिवस ती सहज अशी कधीच गेली नाही. दारातली रांगोळी सकाळची कधी चुकली नाही …आता पेपर वाचत बसते मग कधीतरी नऊला काढते …. पूर्वी खरेदीला मला घेऊन जायची. आता आपली आपण जाते… जे मनाला येईल ते घेऊन येते.. मध्ये चतुर्श्रुंगीला जाऊन आली …”
सायली एक एक सांगायला लागली….
“अशी का गं वागत असेल ?”
“तुम्हाला तिचा काही त्रास होतो आहे का ?तिची ती जाते तर जाऊ दे ना…”
“अग पण..असं कसं ..”
” घरात कशी असते?”
“अगदी नॉर्मल नेहमीसारखी..”
” बरं ती जाते तर तुमची काही अडचण होते का?”
“नाही काहीच नाही..”
“ मग झालं तर..”
“अग रविवारी अचानकच देहू आळंदीला गेली मैत्रिणींना घेऊन…….. म्हणाली जेवायचं काय ते तुम्ही तुमचं मॅनेज करा.. केलं आम्ही ते …..”
“अगं मग प्रॉब्लेम काय आहे?”
“अगं नीता मावशी हे सगळं अॅबनॉर्मलच वाटतंय … मी आनंदशी बोलू का? काही सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम तर नसेल ना …”
मी जरा स्तब्ध झाले..
म्हटलं “ तुला वाटत असेल तर तू जरूर बोल…”
“हो बोलतेच ..” .. असं म्हणून ती गेली.
मनात आलं….
… समाजाच्या घराच्या चौकटीत बाईने अगदी तसंच वागलं पाहिजे .. जरा कुठे वेगळं घडलं .. मन इकडे तिकडे लावलं तर …कुठे बिघडलं ? ….पण नाही…लगेच ते खटकतं ..
मी मैत्रिणींना हे सांगितलं तर त्यांच्या प्रतिक्रिया ….
“मी पण माझ्या चुलत वहिनीला उद्या भेटायला जाते …खूप दिवस घोकते आहे…”
“मला कॅम्पात जरा एकटीने जाऊन यायचं आहे आता मी जातेच..”
“मला सारसबागेत गणपतीच्या सकाळच्या सातच्या आरतीला जायचं आहे उद्या जाऊन येते…
कितीतरी वर्ष मनात आहे पण असं उठून जावं हे काही कधी सुचलंच नाही बघ …”
एक मैत्रीण म्हणाली..
“नीता मला कॅफे कॉफी डे ची ती महागडी कॉफी एकदा प्यायचीच आहे. तुझ्या घराजवळच आहे . उद्या आपण जाऊया ..कशी असते ती बघूया तरी…”
मैत्रिणी धडाधड सगळं मनातलं बोलायला लागल्या.
सायलीचा फोन आला .
“आनंदशी बोलले. त्यांनी छान समजावून सांगितलं मला .” ती शांत झाली होती. वाटलं तिला सांगावं …
“ अग त्यापेक्षा आईचं मन वाचलं असतंस तर…फार काही नसतात ग बाईच्या अपेक्षा… साध्या साध्या गोष्टी तर आहेत ..करू दे की तिला .. इतके वर्ष तुमची सेवा केली, आता थोडं मनासारखं वागते आहे वागू दे की…”
तुम्हाला एक कानमंत्र देते..
वागावं थोडं मनासारखं …. निदान आता तरी …
ही अशीच वागते हे कळलं की ते आपोआप शहाणे होतील…
आता तुम्हाला अजून एक आतली गंमत सांगते बरं का …
मीनाने हे संकल्प मला सांगितले होते…
तिला म्हटलं, “अगं नवीन वर्षाची कशाला वाट बघतेस ? आत्ताच सुरु कर की..” .
तिने मनासारख वागणं सुरू केलं आणि ही सगळी मज्जा सुरू झाली…..
मला काय म्हणायचं आहे ते आता तुम्हाला समजलच असेल.. फोड करून सांगत नाही…
सख्यांनो फार मोठी मागणी नसतेच हो आपल्या मनाची …
वागा की थोडं मनासारखं…
मग कोणी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत तरीसुद्धा तुमचे दिवस आनंदाचे आणि सुखाचे जातील याची खात्री मी तुम्हाला देते….
☆ समाधी संजीवन… लेखिका : सुश्री विद्या हर्डीकर सप्रे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
बराच वेळ नकाशातून वाट काढत काढत मी आणि माझा नवरा एका दफन भूमीच्या दारात पोहोचलो. मला पहाताच समोरची बाई चटपटीतपणे पुढे आली आणि हसतमुखाने विचारती झाली, “Are you here for Dr Joshi?” मी चकितच झाले. “How do you know?” मी विचारले..
तिन सांगितलं की ,” तू भारतीय दिसते आहेस. इथे खूप भारतीय येतात डॉ. जोशींच्या समाधीला भेट द्यायला.! खरं तर या दफन भूमीत सर्वात जास्त भेट दिली जाणारी .. सर्वात लोकप्रिय समाधी आहे ही ! “
आणि आमच्या वॉकिंग टू र मध्ये आम्ही या समाधीचाही समावेश केलाआहे.”
हे ऐकून मला अभिमानानं भरून आलं !
त्या स्वागतिकेन मला दफनभूमीचा नकाशा दिला. ‘कार्पेन्टर/ Eighmie लॉट’ कुठे आहे त्याची खूण नकाशावर केली आणि तिथे जायचा मार्गही दाखवला. आमचे मिशन ‘ए २१६’ सुरु कझाले ! (Eighmie हे कार्पेन्टर मावशीच्या माहेरचे नाव.)
मी त्यांच्या नोंदणीपत्रकात मोठ्या अभिमानाने आमची नाव नोंदवली आणि आम्ही मार्गस्थ झालो.
कार्पेन्टर लॉट तसा मोठा आहे. आता इतक्या सगळ्या थडग्यातून आनंदीबाईंची समाधी कशी शोधायची असा विचार करत आम्ही चालत होतो. तेवढ्यात मला’ ती’ दिसली. मी समाधीचा फोटो पाहिला होता. त्यामुळे चटकन दिसली. “ भेटलीस ग बाय ..” असं म्हणत मी उंचवटा चढून लहानशा टेकाडावर गेले, ..काहीशा अधीरपणे!
समाधीच्या दगडाच्या एका बाजूला अक्षर अस्पष्ट होती. पण दुसऱ्या बाजूला सुस्पष्ट अक्षरात
“द फर्स्ट ब्राह्मण वुमन टू लीव्ह इंडिया टू ऑबटेन ऍन एज्युकेशन “ असे आनंदीबाईंबद्दल कोरून ठेवले आहे.
माझ्या डोळ्यांसमोरून दीडशे वर्षांपूर्वीचा आनंदीबाईंच्या जीवनाचा सगळा पट उलगडला होता…. कादंबऱ्या आणि चरित्रातून वाचलेला.. पण मनावर त्याचा सुस्पष्ट अक्षरातला खोल ठसा उमटवून गेलेला.
समोरून उतरत्या सूर्याची किरणे समाधीवर पडली होती. बाजूला काही हिरवळ, काही पाचोळा होता. आम्ही ते सर्व बाजूला करून आमच्या बरोबर आणलेली फुले समाधीसमोर ठेवली. काही फुले समाधीवर छान रचून ठेवली. कातर मनाने , भरल्या डोळ्यांनी मी तिला वाकून नमस्कार केला… आणि मग तिच्या जवळ थोडा वेळ निशब्द पणे बसून राहिले. मध्ये उलटलेल्या काळाचा वारा मनात सळसळत होता.
किती वर्षे या भेटीची आस लागून राहिली होती !
मन काही वर्षे मागे गेले. .. १९९१ पर्यंत..मी फिलाडेल्फयाला एका स्नेह्यांकडे गेले होते, तो दिवस आठवला. त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना भेटण्यासाठी मलाही मुद्दाम बोलावले होते. जवळच्याच एका लहान गावात रहाणारे अशोक आणि मनीषा गोरे आणि त्यांच्याबरोवर आलेल्या त्यांच्या नातेवाईक ‘अंजली कीर्तने !’ हे नाव मी ऐकलं होत. मला वाटत चेरी ब्लॉसम की अशा काही नावाचं त्यांचं पुस्तक वाचलं होत. अंजलीताई मुद्दाम आल्या होत्या त्या आनंदीबाई जोशींवर संशोधन करायला. फिलाडेल्फियातल्या कॉलेज मध्ये आनंदीबाईंची डॉक्टर ची डिग्री झाली होती. तिथे अंजलीताईना घेऊन जाऊन श्री. गोरे यांनी तिथल्या पुरातत्व विभागात कागदपत्रे शोधायला सुरवात केली होती. आजवर कधीच माहिती नव्हता तो माहितीचा खजिना तिथे मिळाला होता. त्यात एक पुस्तक हाती आलं. कॅरल डॉल ने लिहिलेलं आनंदीबाईंचं चरित्र ! त्यात एका वाक्याचा उल्लेख होता : आनंदीबाईंची अमेरिकेत कार्पेन्टर मावशींकडे पाठवलेली रक्षा कुठे जतन केली जाणार आहे त्याचा.
तेवढ्या धाग्यावरून ती समाधी शोधून काढण्याचा खटाटोप चालू होता. गोपाळराव जोशी यांनी आनंदीबाईंचा रक्षाकलश बोटीने अमेरिकेत पाठवल्याचे उल्लेख आहेत. पण त्याच पुढे काय झालं ते कोणाला माहिती नव्हतं.
मी अमेरिकेत आल्यावर त्यांची समाधी शोधून काढण्याचा विचारही मी कधी केला नव्हता ! पण आपल्याला देवतेसारख्या वाटणाऱ्या आनंदीबाईंच्यासाठी चाललेल्या या प्रकल्पाबद्दल आता मात्र मलाही उत्सुकता वाटायला लागली.
गोरे पतिपत्नी आणि अंजलीताई यांची ओळख नुकतीच झाली होती, पण पहिल्याच भेटीत त्यांच्याशी कुठेतरी सूर जुळले .त्यामुळे न्यूयॉर्क राज्या मध्ये एका लहानशा गावात कुठेतरी असणारा तो कार्पेन्टर लॉट शोधण्यात त्यांना कशी मदत करता येईल याचा विचार मी करु लागले. गुगल , विकिपीडिया आणि इंटरनेट यांच्या आधीचे ते दिवस. म्हणजे “आपल्या ओळखीचं कोण कोण आहे न्यूयॉर्क राज्यात” अशी आठवणींची साखळी बांधून माझी विचारांची साखळी सुरु झाली. योगायोग असा की कार्पेन्टर लॉटबद्दल चा उल्लेख आहे त्या गावाच्या आसपास माझे एक मित्र विराज आणि लीना सरदेसाई रहात होते, हे मला एकदम आठवलं.
मी लगेच विराज ला फोन केला.तोपर्यंत विराजचा संदर्भ आणखी कोणीतरी सुद्धा अंजलीताईना दिला. होता. गावातल्या दफन भूमी विंचरून हा कार्पेन्टर लॉट शोधण्याची आणि तिथेच रक्षाकलश असण्याचे पुरावे शोधण्याची जबाबदारी विराजने घेतली. पुष्कळ परिश्रम करून त्याने हे इतिहास संशोधन केलं. आणि अंजलीताईना तिथे पोहोचता आलं. मला त्यावेळी जण शक्य नव्हतं. पण अंजलीताईनी समाधीचा फोटो आठवणीने मात्र पाठवला.( मी तो अजूनही जपून ठेवला आहे. )….
शंभर वर्षे उलटून गेल्यावरही आनंदीबाईंची समाधी तिथे होती .. वादळ वारे , हिमवर्षाव सहन करत होती. खोदलेली अक्षरे पुसट झाली होती. त्यात खडू भरून त्या अक्षरांना उठाव देत कोरलेली वाक्ये वाचावी लागली.
दफनभूमीवरील यादीत आनंदीबाईंचं नाव होत. पण बाकी माहिती कुणालाच नव्हती. ती अंजलीताईनी दिली आणि कागद प्रत्रातले रिकामे रकाने भरले गेले. इतिहासाच्या अक्षरांना पुन्हा उठाव मिळाला.
आनंदीबाई आली अमेरिकेत तेव्हा इथे कोणी नव्हतं. पण आनंदीबाईनी इथे जात, धर्म, भाषा यांचे तट ओलांडत कॅरल डॉलशी मैत्रीचे बंध जुळवले. कार्पेन्टर मावशीनं तर तिला कुटुंबातच सामावून घेतलं आणि माहेरच्या दफनभूमीत तिच्यासाठी खास जागा निर्माण केली. तिची समाधीशिळा उभारली.
त्याकाळच्या मराठी बाईची चाकोरी माजघर, स्वयंपाकघर ते मागील आंगण एवढीच होती. ती ओलांडून आनंदीबाई वेगळ्या वाटेने चालल्या. .. ती वाट शिक्षणाची होती. अमेरिकेत जाऊन शिक्षण घेणे .. म्हणजे केवळ चाकोरीबाहेरची वाट चोखाळणे नव्हते, तर व पायवाट सुद्धा नव्हती तिथे राजमार्ग उभारणे होते.. पहिली भारतीय डॉकटर स्त्री होण्याचा सन्मान घेताना आनंदीबाईंच्या या अलौकिक कार्याचं सार्थक झालं खरं; पण त्या राजमार्गावरून पुढे जाण्यापूर्वीच त्यांना मृत्यूने कलाटणी दिली आणि त्यांच्या रक्षा या न्यूयार्क मधल्या आडगावात एका दफनभूमीत एकाकी होऊन पडून राहिल्या होत्या. नंतर इतके मराठी लोक आले, त्यांनाही याचा पत्ता नव्हता. ..
बाविसाव्या वर्षी पराक्रम करून गेलेल्या झाशीच्या राणीच्या समाधीस्थळी
‘रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी …..” अशी भा रा तांबे यांनी घातलेली साद …
तशी बाविसाव्या वर्षी पराक्रम करून गेलेल्या आनंदीबाईच्या समाधीस्थळी अंजली कीर्तने , विराज , लीना सरदेसाई, अशोक, मनीषा गोरे यांनी घातलेली ही साद …
मराठी, भारतीय लोकांपर्यंत हळू हळू पोहोचली. आणि आता इथे लोक दर्शनाला येऊ लागले.
हे सगळं आठवत मी समाधीपाशी स्तब्ध झाले होते…
माझी ही तीर्थ यात्रा पूर्ण झाली ती विराज आणि लीना यांच्या घरी जाऊनच.. लीना आणि विराज आता त्या गावात रहात नाहीत. ते आता दूरच्या एका गावात असतात. मधल्या काळात आमच्या भेटी झाल्या होत्या, काही प्रकल्पसुद्धा आम्ही एकत्रित पणे केले होते.
पण तरीही समाधीदर्शनानंतर लगेच त्यांना भेटल्याशिवाय तीर्थयात्रा पूर्ण होणार नव्हती. म्हणून आम्ही पुढे निघालो. त्या दोघांनाही आमच्या या विशेष भेटीचा खूप आनंद झाला. .पुष्कळ जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तेव्हाच्या आठवणी विराजने सांगितल्या. संशोधनाचं आव्हान, समाधी सापडल्याचा आनंद, कितीतरी गोष्टी.! आम्ही ऐकताना भारावून गेलो होतो…
समाधीच्या शिळेवरची अक्षर पुसट झाली, ती महत्प्रयासाने परवानग्या काढून विराजने पुन्हा खोल करून घेतली. त्यामुळे एका बाजूला आता सुस्पष्ट खोदकाम दिसते. हा ऐतिहासिक दुवा मला कळला.
आनंदीबाईंवर अंजलीने पुस्तक लिहिले. लहान माहितीपट केला. लेख लिहिले. (अलीकडेच आनंदीबाई गोपाळरावांवर एक चित्रपटही निघाला)
या समाधी संशोधनानंतर अनेक लोकांनी समाधीला भेट द्यावी अशी तिची इच्छा होती आणि आहे. तिच्या संशोधनाचे आणि धडपडीचे सार्थक झाले. आज खरोखरच जास्तीत जास्त लोक येऊन या समाधीला भेट देतात….. अमेरिकेत आलेल्या प्रत्येक भारतीय डॉकटर ने विशेषतः: महिला डॉक्तरने समाधीला भेट द्यावी असे मला मनोमन वाटते. त्यासाठी मी काही लेख लिहून समाधीचा पत्ता प्रसिद्ध केला. आमच्या दुसऱ्या पिढीच्या मुलींनी ही समाधी पहावी आणि काही प्रेरणा त्यांना मिळावी! कारण आनंदीबाईनी चाकोरीचे आणि परंपरांचे अवघड घाट ओलांडून, आमचे मार्ग सोपे केले. आम्ही आज इथे आहोत, ते त्यांच्यामुळे आणि आमच्या मुली आज मोठ्या मोठ्या भराऱ्या घेत आहेत , त्या त्यांच्याचमुळे ! आम्ही आनंदीबाई जोशींच्या लेकी आहोत !
तेव्हा आनंदीबाईनी विराज, लीना, अशोक, मनीषा , अंजली आणि मी यांचे बंध अनुबंध जुळवले, ते आज तीस वर्षांनंतरही जुळलेले आहेत. आनंदीबाईंच्या संजीवन नामाने नामांकित झालेले आहेत !
या दफनभूमीच्या वॉकिंग टूर मध्ये आनंदीबाईंच्या समाधीला असते.
Her ashes were sent to Theodicia Carpenter, who placed them in her family cemetery at the Poughkeepsie Rural Cemetery in Poughkeepsie, New York. The inscription states that Anandi Joshi was a Hindu Brahmin girl, the first Indian woman to receive education abroad and to obtain a medical degree).
मी जर महाभारत काळात जन्माला आलो असतो तर… लेखक : श्री दीपक राऊत ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)☆
मी जर महाभारत काळात जन्माला आलो असतो तर माझा समावेश कौरवांच्या पार्टीतच झाला असता.
कारण ..
श्रीकृष्णाची कधी प्रत्यक्षात गाठ पडलीच तर मी त्याला एकमेव प्रश्न हा विचारेन की …
” देवाधिदेवा… भगवतगीता अर्जुनाला सांगण्याऐवजी , दुर्योधनाला आणी दु:शासनाला सांगितली असतीस् तर हे महाविनाशी युध्द टाळता आले असते ना ?
इतका मोठा संहार झाला नसता. तू असे का केले नाहीस ?
भग्वद्गीतेचे हे दिव्य ज्ञान कौरवांना झाले असते तर महाभारत हे , युद्धाच्या तत्त्वज्ञानाऐवजी बंधुभावाच्या, प्रेमाच्या तत्त्वज्ञानाची शिकवण देणारे झाले नसते का ?”
सध्यातरी कृष्णाने प्रत्यक्ष दर्शन देणे शक्य नव्हते. त्यामुळे इंटरनेटच्या जंजाळात मी हा प्रश्न प्रसूत केला. बघताबघता हा प्रश्न प्रचंड व्हायरल झाला. फेसबुक, whatsapp, quora, युट्युब सगळीकडे या प्रश्नाने धुमाकूळ घातला. आणि अखेरीस ईतके ट्रॅफिक ओसंड्ल्यामुळे प्रत्यक्ष श्रीकृष्णाला त्याची दखल घ्यावी लागली.
आणि …एके दिवशी मला श्रीकृष्णाचा video कॉल आला.
अक्षयकुमार आणि परेश रावलचा OMG बघितलेला असल्यामुळे, श्रीकृष्ण अगदी साध्या वेशभूषेत येणार हे मला अगोदरच ठावूक होते.
थेट स्वर्गातून , पृथ्वीवर कॉल लावलेला असल्यामुळे , खुप डेटा खर्च होत असणार, त्यामुळे श्रीकृष्णाने थेट मुद्द्याला हात घातला .
“ वत्सा , कशाला ईतके अवघड प्रश्न नेटवर टाकतोस ? सगळे ट्रॅफिक जाम झाले.”
“देवा , हा आखिल मानवजातीच्या मार्गदर्शक धर्मग्रंथाचा प्रश्न आहे. तुम्ही हे युद्ध टाळण्यासाठी हे ज्ञान कौरवांना दिले असते तर युध्दचं झाले नसते ..हा प्रश्न इंटरनेटच्या ट्रॅफिकपेक्षा कितीतरी महत्वाचा नाही का ?”
“मला उपदेश करू नकोस ” ………. श्रीकृष्णांचा एकदम बदललेला स्वर ऐकून मी भांबावलो.
“ देवा , माझी काय बिशाद तुम्हाला उपदेश करण्याची “ ….मी गयावया केली.
“ वत्सा …अरे तुला नाही म्हणालो.”
…मला हायसे वाटले.
“ मला उपदेश करू नका …असे दुर्योधन मला म्हणाला होता.
….तुला काय वाटते ? मी हे युध्द टाळण्यासाठी दुर्योधनाकडे गेलो नसेन ?
भग्वद्गीतेमधील न्याय अन्याय , नैतिकतेच्या गोष्टी त्याला सांगितल्या नसतील ?”
“ काय सांगताय देवा ? दुर्योधनाला प्रत्यक्ष तुम्ही गीतेचे ज्ञान सांगून देखील त्याला ते कळाले नाही ? तो सरळसरळ तुम्हाला उपदेश करू नका म्हणाला ?”
“ वत्सा , अगदी असेच घडले बघ.
दुर्योधन म्हणाला …..मला चांगले वाईट, पाप पुण्य, नैतिक अनैतिक या सगळ्याचे ज्ञान आहे. सद्वर्तन आणी दु:वर्तन यातील फरकही मी जाणतो , त्याचा उपदेश मला करू नका “.
“ वत्सा , पाप काय आहे हे दुर्योधनच काय तुम्ही सुद्धा जाणता ..पण त्यापासून दूर रहाणे तुम्हालाही जमत नाही. अनैतिकता म्हणजे काय हे दुर्योधन ही अन् तुम्ही ही ओळखता, पण टाळत नाही.
तुमच्यासाठी चांगले काय आहे आणि वाईट काय आहे हे तुम्ही जाणता , पण तुम्ही वाईटाचीच निवड करता. दुर्योधनाने स्वत:च्या वर्तनाची अगतिकता सांगून बदल नाकारला, त्याने स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ ढालीसारखा वापरला”.
.
.
आता मात्र मला दुर्योधनाच्या जागी माझा चेहरा दिसायला लागला .
.
.
“ मला उपदेश करू नका“……वडिलांना उद्देशून हे वाक्य मी शंभरवेळा उच्चारले असेन.
मित्रांबरोबर उनाडक्या करणे , चुकीचे होते हे मला माहिती होते, पण मी त्याचीच निवड करीत होतो. आणि वडिलांना “ उपदेश करू नका” असे सांगत होतो.
सकाळी लवकर उठून व्यायामाला जाणे माझ्या फायद्याचे होते हे मला ठावूक होते. पण अंथरुणात लोळत पडणे हे माझे वर्तन होते, आणी “लवकर उठत जा” असे सांगणाऱ्या आईला , “ उपदेश करू नकोस” असे सांगणारा “दुर्योधन” मीचं होतो.
“तंबाखू खाऊ नका , दारू पिऊ नका , मांसाहार करू नका “ , हे उपदेश आम्हाला ऐकायचे नाहीत. त्यामुळे शरीराचे नुकसान होते हे आम्हाला ठाऊक आहेत, पण त्याची अंमलबजावणी आम्हाला करायची नाही . कारण आम्ही ‘दुर्योधन’ आहोत. आम्ही कौरव आहोत.
अर्जुन आणि दुर्योधनात हाच फरक होता की, दुर्योधनाने समजत असूनही स्वत: चे वर्तन बदलले नाही आणि अर्जुनाने स्वत:चे वर्तन श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून बदलले…
संस्कार, प्रकृती, राग, श्रेय, प्रिय, प्रतिक्रिया, कर्म, विषय ….याबद्दलच्या संकल्पना जाणून घ्या .
कधीतरी स्वत: च्या आतल्या श्रीकृष्णाला प्रश्न विचारा ……तरच भग्वदगीता वर्तनात येईल…वाचण्याची इच्छा होईल.
इच्छा होईल तोच सूर्योदय.
सध्यातरी मी कौरव नंबर “१०१” आहे ….
.तुम्ही? …..
लेखक : श्री दीपक राऊत
प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
नुकतीच नववर्षाची सुरवात झाली. नवीन वर्ष तसं काळजीत,संकटाच्या भितीखाली, निराशेचं, गेलं.नवीन वर्ष आले तसे सगळेजणं मनावरील मळभं झटकून नवी आव्हाने स्विकारायला सज्ज झालेत. नवीन योजलेल्या संकल्पांना सुरवात केल्या गेली. मोठ्या हुरुपाने योजलेले संकल्प निदान काही दिवस तरी सुरळीत बिनबोभाट पार पडावेत ही मनोमन ईच्छा बाळगून त्या नुसार आपल्या ईच्छित कार्यक्रमाची रूपरेषा प्रत्येक जण आखायला लागले.
माझा ह्या वर्षीचा संकल्प म्हणजे पहाटेची भटकंती .प्रभातफेरी मारायचा अगदी ठाम निश्चय झाला होता.पहाटे फिरण्याचे फायदे डाँक्टरांनी तसेच नियमीत फिरायला जाणा-यांनी वेगवेगळ्या पध्दतीने समजावून सांगितले होते.त्यामुळे रात्रीच व्यवस्थित दोनदोनदा गजर लावलेला तपासून घेतला.पुलंनी रोजनिशीत लिहील्या प्रमाणे झोपेतच गजर बंद करुन परत झोपणे,उशिरा जागे झाल्यावर लौकर जाग आली नाही ह्या सबबीखाली परत झोपणे असे काहीही करायचे नाही,असे मनाला वारंवार झोपतांना बजावले.रात्रीच फिरायला जायचे शूज,स्वेटर,शाल स्कार्फ काढून ठेवले .
गजर गजरात वाजला आणि आजपासून रात्र खूपच लहान झाली की काय असा प्रश्न पडला.झोप नीट मनासारखी न झाल्याचं फील आलं.तरीही मनाचा हिय्या करुन उठले.भराभर आपलं आवरून फिरायला जायला बाहेर पडले.
नियमीत फिरायला येणा-या बायका तेरड्याचा रंग तीन दिवस ह्या नजरेने बघताहेत असं उगाचच वाटून गेलं.फिरायला येणाऱ्या मंडळींची बरीच गर्दी रस्त्याने होती.तेव्हा नियमित फिरायला येणाऱ्या काकूंनी ,ही गर्दी पंधरा जानेवारी नंतर आपोआप कमी होईल ही दाव्याने खात्री दिली.ज्या रस्त्याने फिरायला जायचे त्या रस्त्याने रागात,लाडात येणारी कुत्री नाहीत नं ह्याची आधीच खातरजमा करुन घेतली होती.
पहाटेपहाटे मस्त फिरतांना फुललेली फुले,हवेने डोलणारी झाडे,निवांत रवंथ करणारे प्राणी, मंजुळ कलरव करणारे पक्षी बघत बघत सैर करण्यात खूप जम्मत असते हे फक्त ऐकून होते. ऐकलेल्या सगळ्याच गोष्टी ख-या नसतात ह्याची परत एकदा खात्री पटली.माणसांइतकीच कुत्र्यांनाही माणसांच्या संगतीत प्रभातफेरीची गरज असते हे नव्यानेच उमगले.
फिरुन आल्यावर खूप उत्साह वाटतो हे त्रिकालाबाधित सत्य असल्यासारखे ठोकून सांगितलेला ऐकीव दाव्याचा अनुभव तसा आला नाही हे पण नक्की. मग हळूहळू सवय झाल्यानंतर ते फील येत हे नव्याने कळलं.
फिरायला गेल्यानंतर वेगवेगळ्या हिरव्या रंगाची द्रव्ये बाटल्यांमध्ये भरलेली दिसली.उगीचच कडक चहाची आठवण आली आणि त्या रसांकडे बघून ढवळायला लागलं.
अशात-हेने वेगळे अनुभव घेत का होईना प्रभातफेरी सुरू तर केली.काही कालांतराने आवडायला लागेल ह्या अनुभवी महिलांच्या सांगण्यावर विश्वास असल्याने सध्यातरी साखरझोप आठवत आठवतं प्रभातफेरी सुरू ठेवलीय. पण जोक अपार्ट साखरझोेतप कितीही चांगली वाटतं असली तरी पहाटे फिरणं हेच तंदुरुस्त तब्येतीसाठी अत्यावश्यक बिनखर्चिक औषधं आहे हेच खरे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, वर्ष सरत आलेलं पाहून, परतीच्या वाटेवरच्या प्रवासातलं एक “स्टेशन “मागे पडलं ही भावना मनात येतेच.
सत्तरी पर्यंतच्या प्रवासात, गंतव्य स्थान ठरवून केलेल्या प्रवासाच्या मिश्र आठवणी बरोबर असताना अटळ अशा गंतव्य स्थानाकडे परतीचा प्रवास सुरु झालाय.
यात कुठेही दुःख, खास करून नैराश्य याचा लवलेश ही नाही.
जन्माला आलेला प्रत्येक जण हे मनापासून स्वीकारतो.
तरीही परतीचा प्रवास कसा असावा याचे आडाखे बांधतोच.
वयपरत्वे कमी झालेली शारीरिक क्षमता, आत्मविश्वास आणि स्मरणशक्ती ही इंधनं परतीच्या प्रवासातली गाडी थोडी धिमी करतात. हे हसत मान्य केलं तरी ही इंधनं शेवटपर्यंत संपू नयेत ही प्रार्थना मनोमन सतत बरोबरीने चालत असते.
परतीच्या प्रवासात आपली ही “कुडी “derail “(अपंगत्व ) होऊ नये ही तर प्रत्येकाचीच इच्छा असते.
आपल्या मुलांची गाडी सुसाट धावत असते. कौतुक भरल्या अभिमानाने त्या कडे बघत असलो तरी तरी मनात चटकन येऊन जातंच की आपली गाडी त्यांनी “siding “ला टाकू नये.
त्यांचा वेग झेपणारा नाहीये तर आपल्या वेगाशी कुठे तरी जुळवून घेत मधे मधे अशी स्थानक दोघांनी निर्माण करावीत की तिथे ऊर्जा भरून घेता येईल अशी क्षणभर विश्रांती अनुभवता येईल.
या वाटेवरची विधिलिखित स्टेशन्स तर टाळता येणार नाहीच आहेत. पण प्रवास सुखकर होण्यासाठी ची आगाऊ आरक्षणं तर करूच शकतो.जसे की….
साठी नंतर तब्बेतीविषयी अधिक जागरूक राहून स्वतः ला fit ठेवणं गरजेचं आहे.
आर्थिक नियोजन चोख करावं…. छंद जोपासत आपला स्वतः चा समवयस्क गोतावळा, मैत्रीचं कोंडाळ असावं.
नवीन गोष्टींचं मनापासून स्वागत करावं. पुढच्या पिढी बरोबर कमीत कमी संघर्षाची वेळ यावी या साठी आपली आणि त्यांची मानसिकता प्रयत्न पूर्वक, जाणीव पूर्वक जोपासावी.
☆ “पुण्यातल्या काही ऐतिहासिक आठवणी…” – संग्राहक : सुनील इनामदार ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
पुण्यातला बाहुली हौद आणि स्त्री शिक्षणाची पहिली बळी ……
महात्मा जोतिबा फुलेंनी आपल्या पत्नी क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या सोबतीने पुण्यात भिडेवाडा येथे मुलींची शाळा सुरू करून भारतात स्त्री शिक्षणाचा पाया घातला.
त्याकाळी पुणे हे अत्यंत कर्मठ व सनातनी शहर मानलं जातं होतं. जोतिबा आणि सावित्रीबाई यांच्यावर अनेकदा हल्ले झाले. काही वेळा हे हल्ले शारीरिक होते तर काही वेळा मानसिक अत्याचार केला गेला.
याच पुण्यात काहीजण असे होते जे फुले दाम्पत्याच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. त्यांच्या कार्याला पाठिंबा दिला, इतकंच नाही तर त्यांचा वारसा पुढे नेला.
यातच प्रमुख नाव येते डॉ. विश्राम रामजी घोले यांचे.
गुहागर येथील अंजनवेलच्या किल्लेदार गोपाळराव घोले यांच्या नातवाचा हा मुलगा. घराण्याची ऐतिहासिक परंपरा जपत वडील ब्रिटिश पलटणीमध्ये भरती झाले, सुभेदार झाले.
वडील सैन्यात नोकरीला असल्यामुळे विश्वास घोले यांना शिक्षणाची संधी मिळाली. ते शिकून सर्जन बनले. १८५७ सालच्या बंडात देशभर फिरून जखमी सैनिकांची त्यांनी सेवा केली. ब्रिटिश आमदानीत एक नामवंत शल्यविशारद म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती पसरली. डॉ. घोले यांना गव्हर्नरच्या दरबारात रावबहादूर ही पदवी देण्यात आली होती.
पुण्यात असताना विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून ते लोकमान्य टिळक, आगरकर यांच्या पर्यंत तत्कालीन पुढाऱ्यांशी त्यांची चांगली मैत्री होती पण त्यांना भारावून टाकले महात्मा फुले यांच्या सुधारकी विचारांनी.
सत्यशोधक समाजाचा दुसरा वार्षिक समारंभ 1875 ला साजरा करण्यात आला. त्यावेळेस सत्यशोधक समाजाचे अध्यक्षपद डॉ. विश्राम रामजी घोले यांना देण्यात आले.
महात्मा फुलेंचे विचार सर्वत्र पोहचवेत म्हणून डॉ. घोले प्रयत्नशील होते. उक्ती व कृती मध्ये त्यांनी कधीच अंतर येऊ दिलं नाही. साक्षरतेचा प्रसार केला मात्र सुरवात स्वतःच्या घरापासून केली. आपल्या मुलींना इंग्रजी शिक्षण दिले.
त्यांच्या थोरल्या मुलीचं नाव होतं काशीबाई. सर्वजण तिला लाडाने बाहुली म्हणायचे. या काशीबाईला त्यांनी मुलींच्या शाळेत घातले. जुन्या विचारांच्या अनेकांनी त्यांना विरोध केला, प्रसंगी धमकी दिली.मात्र डॉ. घोले मागे हटले नाहीत.
ही बाहुली शाळेत हुशार व चुणचुणीत होती. दिसायला देखील ती गोड बाहुली सारखी दिसायची. तिचे शाळेत जाणे पहावले नाही. डॉ. घोले यांच्या नातेवाईकांपैकीच कोणी तरी तिला काचा कुटुन घातलेला लाडू खायला दिला. यातच त्या आश्रप मुलीचा मृत्यू झाला.मात्र या घटनेनंतरही विश्राम रामजींनी माघार घेतली नाही. आपली दुसरी मुलगी गंगूबाई हिला त्यांनी जिद्दीने शिकवले. केवळ तिचे शिक्षणच केले नाही तर तिचे लग्नही लहानपणी न लावता वयाची सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच केले. तिचे पती डॉक्टर होते.
आपल्या लाडक्या बाहुलीचा स्मरणार्थ डॉ. घोल्यानी १८८० साली पुण्यात बुधवार पेठेमध्ये आपल्या घरासमोरच हौद बांधला आणि तो सर्व जातीधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला. कोतवाल चावडी समोर असलेल्या या हौदाचा लोकार्पण सोहळा मातंग समाजातील थोर सुधारक दादा भुतकर यांच्या हस्ते भाऊबीजेच्या दिवशी करण्यात आला.
याच हौदाला बाहुलीचा हौद म्हणून ओळखले जाऊ लागले. हौदावरील उल्लेखानुसार काशीबाईचा जन्म १३ सप्टेंबर १८६९ रोजी व मृत्यू २७ सप्टेंबर १८७७ रोजी झाला होता. तिची एक मूर्ती या हौदावर उभी केली होती. कात्रजवरून येणारे पाणी या हौदात पाडण्यात येत असे. या अष्टकोनी हौदावर कारंजा देखील होता.
पुढे रस्ता रुंदीकरणामध्ये हा हौद हलवण्यात आला. इथली बाहुलीचा मूर्ती देखील गायब झाली. आता हा हौद फरासखाना पोलिस चौकीच्या हद्दीत सध्याच्या दगडूशेठ दत्त मंदिराजवळ आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती याला “बाहुलीचा हौद गणपती” असेच पूर्वी ओळखले जायचे.
घोलेंनी बांधलेला हौद, तिच्या वरची ती बाहुलीची मूर्ती या जुन्या पुणेकरांच्या आठवणीतच उरला आहे. या ठिकाणी वापरलेला फोटो देखील प्रातिनिधिक नागपूरच्या बाहुली विहिरीचा आहे. स्त्री शिक्षणाचे स्मारक म्हणून काशीबाई घोले यांचे स्मारक जुन्या वैभवात उभे केले.
संग्राहक : श्री सुनील इनामदार
मो. ९८२३०३४४३४.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
गणित तर समजून घ्या. “मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा – एक मजेशीर गणित” पहा, सोडवा किंवा सोडून द्या पण आनंद जरूर घ्या.
आपण असे मानू या की.
A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z = अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26.
म्हणजेच A=1, B=2, C=3 असे
मानले तर माणसाच्या कोणत्या गुणाला पूर्ण शंभर गुण मिळतात हे पाहू या.
आपण असे म्हणतो की, आयुष्यात “कठोर मेहनत / HARDWORK” केले तरच आयुष्य यशस्वी होते.
आपण “HARDWORK चे गुण पाहु या. H+A+R+D+W+O+R+K =
8+1+18+4+23+15+18+11 = 98% आहेत पण पूर्ण नाहीत.
दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे “ज्ञान” किंवा ‘Knowledge’. याचे मार्क्स पाहु या
K+N+O+W+L+E+D+G+E =
11+14+15+23+12+5+4+7+5= 96% हे पहिल्या पेक्षा कमी.
काही लोक म्हणतात “नशिब”/ LUCK हेच आवश्यक. तर लक चे गुण पाहु या.
L+U+C+K = 12+21+3+11 = 47%, “नशिब” तर एकदमच काठावर पास.
काहींना चांगले आयुष्य जगण्या साठी “पैसा /MONEY” सर्व श्रेष्ठ वाटतो. तर आता “M+O+N+E+Y=किती मार्क्स ?
13+15+14+5+25= 72%, पैसा ही पूर्णपणे यश देत नाही.
बराच मोठा समुदाय असे मानतो की, “नेतृत्वगुण / LEADERSHIP” करणारा यशस्वी आयुष्य जगतो. नेतृत्वाचे मार्क्स =
12+5+1+4+5+18+19+8+9+16= 97%, बघा लीडर ही शंभर टक्के सुखी, समाधानी नाहीत, आनंदी तर अजिबात नाहीत.
मग आता आणखी काय गुण आहे, जो माणसाला १००% सुखी, समाधानी आणि आनंदी ठेऊ शकतो ?
काही कल्पना करू शकता ?
नाही जमत ?
मित्रांनो, तो गुण आहे, आयुष्याकडे पाहण्याचा “दृष्टिकोन / ATTITUDE”
आता एटिट्यूड” चे आपल्या कोष्टकानुसार गुण तपासू…
A+T+T+I+T+U+D+E = 1+20+20+9+20+21+4+5= 100%. पहा आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण करून सुखी, समाधानी आणि आनंदी आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा आहे, ‘आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन’. तो जर सकारात्मक असेल तर आयुष्य १००% यशस्वी होईल आणि आनंदी ही होईल.
“दृष्टिकोन बदला …आयुष्य बदलेल”
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈