मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नंदकुमार सप्रे… ☆ श्री सुनील होरणे ☆

श्री सुनील होरणे

अल्प परिचय

नाव : सुनील नीलकंठ होरणे, अहमदनगर

शिक्षण: बी.ए.(अर्थशास्त्र)

व्यवसाय : इंटेरिअर डिझायनर आणि कॉन्ट्रॅक्टर

छंद : मराठी साहित्य लेखन, मानवी नातेसंबंध, व्यक्ती चित्रण, अध्यात्म आणि हिंदी चित्रपट

सामाजिक कार्य : विविध संस्थांमध्ये कार्यरत, एकाकी वृद्ध व्यक्ती तसेच, विद्यार्थी आणि युवकांसाठी विशेष कार्य. रामकृष्ण  मिशन बेलूर मठ कलकत्ता याना संलग्न असलेल्या संस्थेमध्ये कार्यरत.

? इंद्रधनुष्य ?

||◆||  नंदकुमार  सप्रे  ||◆||  श्री सुनील होरणे ||◆|| 

मध्यंतरी  एका अंत्यविधी साठी अमरधाम मध्ये गेलो होतो. जवळचे नातेवाईक आणि मृताच्या घरचे लोक चितेच्या ओट्याजवळ तयारी करत होते. इतर जे परिचित हजेरी लावण्या साठो आले होते, ते नेहमी प्रमाणे समोरच्या पायऱ्यांवर  एकमेकांची ख्याली खुशाली विचारत हास्य विनोदात दंग होते. सर्व विधी पूर्ण झाल्यावर एक गृहस्थ तिथे आले. त्यांच्या हातात एक पिशवी होती. त्या पिशवीत दोन तीन पाण्याच्या बाटल्या आणि एक थर्मास होता.

मृताच्या घरच्या लोकांना त्याने पाणी पिण्यास दिलं आणि नंतर पेपर कपमध्ये चहा प्यायला दिला. कोणी नातेवाईक असावेत असं मला वाटलं.

या घटने नंतर बऱ्याच दिवसांनी मी नोबल हॉस्पिटलमध्ये कोणालातरी भेटायला गेलो होतो.

ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बरेच लोक बसले होते. बहुधा त्यांच्या कोणा नातेवाईकांचं आत ऑपरेशन चालू असावं. आणि अचानक बघितलं तर त्या दिवशी अमरधाम मध्ये दिसलेले ते गृहस्थ इथं देखील त्या बसलेल्या लोकांना चहा देत होते. आता माझी उत्सुकता वाढली. थोड्या वेळाने सर्वांना चहा देऊन ते थोडे बाजूला आले, मी ताबडतोब त्यांच्या जवळ गेलो.

“नमस्कार!” मी म्हंटल. त्यांना हे अपेक्षित नसावं ते कावरे बावरे होऊन माझ्याकडं बघू लागले. मी पुन्हा नमस्कार केला, या वेळी त्यांनी फक्त मान हलवली.

“आपलं नाव काय?” मी विचारलं. त्यांचा पुन्हा प्रश्नार्थक चेहरा. यावेळी कपाळावर आठया देखील. 

“तुमचं नाव सांगा.” त्यांनी तुटकपणे मलाच उलटा प्रश्न केला. आता मी त्यांच्या जवळ गेलो, त्यांचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणालो

“अहो महाराज, माझं नाव प्रशांत कदम. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून नाव विचारलं. आपण दोन मिनिटं बोलू शकता का?”

“नाही.” समोरून फटकन उत्तर आलं. आता मला धक्के पचवायची सवय झाली होती.

“नाही म्हणजे आत्ता नाही कारण आत्ता मला आणखी बऱ्याच ठिकाणी जायचंय. आपण नंतर कधीतरी भेटू. आणि माझं नाव नंदू… म्हणजे नंदकुमार सप्रे.”

एवढं बोलून ते तरा तरा चालायला लागले. मी त्यांच्या पाठमोऱ्या छबी कडे बघतच राहिलो.

साधारण साडेपाच फूट उंची,  मध्यम किंवा त्यापेक्षा बारीक शरीरयष्टी, अंगात पांढरा शर्ट आणि पायजमा, पायात चपला. अहो हा माणूस बोलायला तयार नाही.

पण एक गोष्ट लक्षात आली. याला कुठंतरी काहीतरी दुःख आहे, वेदना आहेत. आणि त्या दिवसापासून माझा त्याच्यातील इंटरेस्ट वाढू लागला. आता याला पुन्हा एकदा भेटलं पाहिजे.

आणि तो दिवस लौकरच आला. मी कुठंतरी चाललो होतो आणि हे महाराज रस्त्याच्या कडेला सायकल हातात धरून उभे होते. बहुधा कोणाची तरी वाट पहात असावेत. मी ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला संगितली आणि पटकन खाली उतरून सप्रेच्या समोर जाऊन उभा राह्यलो.

“सप्रे कोणाची वाट बघताय?” मी.

“नाही वाट नाही बघत, सायकल पंक्चर झालीय.”

“अरेच्चा, थांबा आपण पंक्चर काढायची व्यवस्था करू.” मी ड्रायव्हरला बोलावून सायकल पंक्चर काढायला पाठवलं.

“अहो तुम्ही कशाला त्रास घेता, मी आणली असती करून.” सप्रे कसनुसा चेहरा करून म्हणाले.

“असू द्या हो सप्रे, चला आपण तो पर्यंत गाडीत बसून बोलू.”  सप्रे अक्षरशः बळजबरीने गाडीत येऊन बसले.

अतिशय अस्वस्थ झाले होते. मी बोलायला सुरुवात केली, “सप्रे ही चहाची काय भानगड आहे? जरा सांगता का? सप्रे गप्प. मला कळेना हा माणूस असा का वागतोय, धड बोलत देखील ही.

आणि माझं लक्ष्य त्यांच्या चेहऱ्याकडे गेलं, अहो हा माणूस रडत होता. त्याच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा वहात होत्या. मला एकदम अपराधी असल्या सारखं वाटलं. मी दोन्ही हातांनी सप्रेना धरलं “सप्रे मला माफ करा. तुम्हाला दुखवायचा माझा हेतु नव्हता. जाऊ द्या, मला काही सांगू नका पण कृपा करून तुम्ही शांत व्हा. पुन्हा मी तुम्हाला असले प्रश्न विचारणार नाही. I am sorry.”

दोन तीन मिनिटांनी सप्रे शांत झाले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. “प्रशांतजी, आज पर्यंत या विषयावर मी कोणाशी बोललो नाही पण आज मी तुम्हाला सगळं सांगणार, याचं कारण अस आहे की, फक्त तुम्ही एकट्यानेच हा प्रश्न मला विचारला.

मी आणि माझी पत्नी दोघेही सरकारी अधिकारी.

मुलगा आणि सून दोघेही अमेरिकेत. तीन वर्षांपूर्वी पत्नीचे कोविड मध्ये निधन झाले. आम्ही दोघेही बाधित होतो. मला हॉस्पिटल मिळालं, तिला खाजगी हॉस्पिटल मिळालं नाही म्हणून सरकारी दवाखान्यात ऍडमिट केलं आणि चौथ्या दिवशी ती गेली.

इथं मी कोणालाही दोष देऊ इच्छित नाही, कारण परमेश्वरावर माझा पूर्ण विश्वास आहे. तिची वेळ भरली होती, त्यामुळे ती गेली, एवढंच सत्य आहे.

आणि मुळातच एकदा माणूस गेल्यावर त्याची कारणमीमांसा तपासत बसू नये असं मला वाटतं.

तिला चहा फार आवडायचा, दिवसातून चार पाच वेळा तरी ती चहा घेत असे. दुर्दैवाचा भाग असा की तिला हॉस्पिटलमध्ये चार दिवसात एकदाही चहा मिळाला नाही. आणि या गोष्टीचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटलं आणि त्याच वेळी मी ठरवलं की आपण काहीतरी करायचं.

माणूस गेल्यानंतर त्याचे जवळचे नातेवाईक जास्त दुःखी असतात. आणि त्यांना काही हवंय का? हे देखील कुणी विचारत नाही. म्हणून मी थेट स्मशानभूमीत जाऊन ही सेवा देतो. त्यांच्या समाधानी चेहऱ्यात मला माझ्या पत्नीचा चेहरा दिसतो. हॉस्पिटल मध्ये गंभीर पेशंटचे नातेवाईक अतिशय तणावात असतात. त्यांना मी जाऊन भेटतो. चहा देतो, चौकशी करतो आणि दिलासा देतो. थोडा वेळ का होईना पण त्यांना बरं वाटतं. मी रिटायर असल्याने माझ्याकडे भरपूर वेळ आहे.

सुदैवाने आर्थिक परिस्थिती चांगली आहे. मोठा बंगला आहे आणि मी एकटाच आहे. म्हणून तिथं पंधरा अनाथ विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केलीय.

मी प्रचंड भारावून गेलो होतो. काय बोलावे हे देखील मला कळत नव्हते.

“सप्रे तुम्ही फार मोठं काम करताय, You are great.” एवढंच मी बोलू शकलो. सप्रेची सायकल तयार होऊन आली होती.

सप्रे गाडीतून उतरले, मला त्यांचं व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि ते निघून गेले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मी फक्त नतमस्तक झालो.

त्यानंतर सप्रेची आणि माझी गाठ भेट नाही.

एक दिवस कोणीतरी सप्रे गेले अस सांगितलं.

मी सप्रेच्या घरी गेलो. बंगल्याच्या गेटवर मोठा बोर्ड होता “मालती सप्रे मेमोरियल ट्रस्ट” आत एक जोशी नावाचे मॅनेजर होते. त्यांनी सांगितलं इथं राहणारे विद्यार्थीच आता सप्रेचं काम करतात.

मला आनंद चित्रपटातला शेवटचा प्रसंग आठवला.

राजेश खन्ना मरतो आणि नंतर अमिताभ तिथं येतो. त्यावेळी तो दोन वाक्य बोलतो.

“आनंद मरा नहीं,  आनंद मरते नहीं।

© श्री सुनील होरणे

९८२२११६६३६

E-mail : horanesunil@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कायमचा पत्ता…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “कायमचा पत्ता…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

आमच्‍या संयुक्‍त कौटुंबिक घरात आम्‍ही ५ ते ९५ वयोगटातील १४ जण राहायचो.

माझ्या आईचा रोज  वावर असलेली दोन्ही घरे आता निर्वासित आहेत आणि आता त्यांचा व त्यांच्या बागांचा निसर्गाने  ताबा घेतलेला मी पाहतो. जांभूळ, शेवगा, काही अशोक, कडुनिंब आणि पिंपळ टिकून आहेत.

परंतु आता असंख्य रंगांची मनमोहक फुलं गेली. एकूणच सर्व सौंदर्य क्षणिक आणि नाजूक आहे आणि एन्ट्रॉपीचा नियम शक्तिशाली आहे, हेच सत्य.

माझ्या आईच्या हातातून रोज दाणे टिपणाऱ्या मोराच्या कुटुंबाचे काय झाले असेल, हा मला पडलेला एक अगम्य प्रश्न आहे. बुलबुल, चिमण्या, पोपट, स्पॉट फ्लायकॅचर, कोकिळा, माकडांची एक मोठी टोळी जी महिन्यातून एकदातरी त्या ठिकाणाचा विध्वंस करायची – हे सगळे कुठे आहेत?

माणसे निघून गेली की वास्तू एक घर बनते. सुरुवातीला मला वास्तू विकाविशी वाटली नाही. पण  आता तेथे जावेसेदेखील वाटत नाही. एक तर काळ आमच्या चौदापैकी दहा जणांना घेऊन गेला आहे.

मी आमच्या वास्तुच्या आजूबाजूला फिरतो आणि शेजारील वास्तू बघतो. जवळपास माझ्या घरासारखे चित्र मला दिसते. कधी एकेकाळी आयुष्याने भरलेल्या अनेक घरांचे नशीब आता फिरले आहे, बदलले आहे किंवा ते घरच आता पडलेले आहे.

आपण घरे बांधण्यासाठी एवढे कष्ट का घेतो?

बऱ्याचदा, आपल्या मुलांना त्याची गरज भासणार नाही किंवा त्याहूनही वाईट, ते त्यासाठी भांडणे करतील.

हा कोणता मानवी मूर्खपणा आहे,  की या अनिश्चित कार्यकाळ असलेल्या भाडेतत्त्वावरील आपल्या जीवनासाठी आपण  एक कायमस्वरूपी मालकी स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतो?

 हे आयुष्य आपल्याला मिळाले आहे. त्याच्या कालखंडाबद्दल आपल्याला काहीच अधिकार नाही. त्याच्या अटी- शर्तीवर आपले नियंत्रण शक्य नाही आणि त्याविरुद्ध कोठेही दाद मागणे शक्य नाही. त्यावर अपील नाही त्यासाठी.कुठले न्यायालयदेखील नाही.

एक दिवस, आपण प्रेमाने बांधलेले हे सर्व विश्व आणि मासिक हफ्ते भरून  उभ्या केलेल्या वास्तू, एकतर उद्ध्वस्त होतील किंवा त्यासाठी भांडण केली  जातील किंवा त्या विकल्या जातील किंवा नष्ट होतील.

प्रत्येक वेळी मी एखादा फॉर्म भरतो, तेव्हा ‘कायम पत्ता’ विचारणारा रकाना भरतो तेव्हा मला मानवी मूर्खपणाबद्दल हसू येते.

झेनची एक कथा आहे, एकदा एक वृद्ध भिक्षू एका राजवाड्यात गेला आणि रक्षकाला विचारले की तो या विश्रांती गृहामध्ये एक रात्र घालवू शकतो का? रक्षकांनी त्यावर त्याला खडसावले, “काय विश्रांती गृह?तुला हा राजवाडा आहे, हे दिसत नाही का?”. साधू म्हणाला, “मी काही दशकांपूर्वी इथे आलो. तिथे कोणीतरी राज्य करीत होते. काही वर्षांनी, त्याच्याकडून त्याचे राज्य कोणीतरी घेतले, नंतर कोणीतरी. कोणतीही जागा जिथे रहिवासी सतत बदलत राहतो, ती जागा एक विश्रांती गृह आहे.”

जॉर्ज कार्लिन म्हणतात, “घर हे फक्त एक ठिकाण आहे जिथे  बाहेर जाताना तुम्ही तुमचे सामान ठेवता आणि परत येताना अधिक सामग्री घेऊन येता.”

जसजशी घरं मोठी होत जातात तसतशी कुटुंबं लहान होत जातात. जेव्हा घरात अनेक  रहिवासी सदस्य असतात, तेव्हा आपल्याला एकांत हवा असतो आणि जेव्हा घरटे रिकामे होते, तेव्हा आपल्याला सहवास हवा असतो.

आपल्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी जगणे सोडून देणाऱ्या आणि शेवटी, कायमस्वरूपी निवासस्थान म्हणून समजलेल्या विश्रांती गृहामधून निघून जाणाऱ्या माणसांवर पक्षी आणि प्राणी नक्कीच हसत असतील.

मानवी इच्छेचा वृत्तीचा खरा फोलपणा!                   

प्रस्तुती: सौ. राधा पै.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माझे मृत्युपत्र… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ माझे मृत्युपत्र… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆ माझे मृत्युपत्र… स्व. वि. दा. सावरकर ☆

[३]

हे मातृभूमी! तुजला मन वाहियेले

वक्तृत्व, वाग्विभवही तुज अर्पियेले

तुतेंचि अर्पिली नवी कविता रसाला

लेखाप्रती विषय तूंचि अनन्य झाला

त्वत्स्थंडिली ढकलले प्रिय मित्रसंघा

केले स्वयें दहन यौवन-देह-भोगां

त्वत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवा

त्वत्सेवनीच गमली रघुवीर सेवा

त्वत्स्थंडिली ढकलिली गृहवित्तमत्ता

दावानलात वहिनी नवपुत्रकांता

त्वत्स्थंडिली अतुल-धैर्य वरिष्ठ बंधु

केला हवी परम कारुण पुण्यसिंधु

त्वत्स्थंडिलावरि बळी प्रिय बाल झाला

त्वत्स्थंडिली बघ अतां मम देह ठेला

हे काय, बंधु असतो जरि सात आम्ही

त्वत्स्थंडिलीच असते दिधले बळी मी

संतान या भरतभूमिस तीस कोटी

जे मातृभक्ती-रत सज्जन धन्य होती

हे आपुले कुलहि त्यांमधि ईश्वरांश

निर्वंश होउनि ठरेल अखंड वंश

[४]

कीं तें ठरो अथवा न ठरो परंतु

हे मातृभू, अम्हि असो परिपूर्ण हेतु

दीप्तानलात निज-मातृ-विमोचनार्थ

हा स्वार्थ जाळुनि अम्हि ठरलो कृतार्थ

ऐसें विवंचुनि अहो वहिनी! व्रतातें

पाळोनि वर्धन करा कुल-दिव्यतेतें

श्रीपार्वती तप करी हिमपर्वतीं ती

की विस्तवांत हसल्या बहु राजपूती

तें भारतीय अबला-बलतेज कांही

अद्यापि या भरतभूमिंत लुप्त नाही

हे सिद्ध होइल असेंचि उदार उग्र

वीरांगने, तव सुवर्तन हो समग्र

माझा निरोप तुज येथुनि हाच देवी

हा वत्स वत्सल तुझ्या पदिं शीर्ष ठेवी

सप्रेम अर्पण असो प्रणती तुम्हांते

आलिंगन प्रियकरा मम अंगनेते

कीं घेतले व्रत न हें अम्हि अंधतेने

लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग-मानें

जे दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचे

बुध्याचि वाण धरिलें करि हे सतीचें

कवी वि दा सावरकर

(शब्दार्थ – स्थंडिल = यज्ञ, होम इ. करिता केलेला एक हात चौरस व चार अंगुळे उंचीचा मातीचा ओटा, यज्ञपात्र, अंगुळ = बोटाच्या रूंदीचे माप)

रसग्रहण

नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांच्या हत्येच्या प्रकरणातील सहआरोपी म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांना १९१० च्या मार्चमध्ये लंडन येथे अटक करण्यात आली. तेथील ब्रिक्स्टन जेलमध्ये असतांना ही कविता सावरकरांनी आपल्या वहिनींना, अंतिम निरोप म्हणून पाठविली होती.

‘विश्वात आजवरी शाश्वत  काय झाले’ या कवितेप्रमाणे ही कविता देखिल ‘वसंततिलका’ या अक्षरगणवृत्तांत निबद्ध आहे. या वृत्ताविषयीची माहिती त्या अंकात आलेली असल्यामुळे द्विरुक्ती टाळून आपण अर्थाकडे वळुया.

या कवितेचे चार भाग असून, ती जवळपास ९५/९६ ओळींची आहे. त्यामुळे आपण त्यातला फक्त तिसरा व चौथा भाग पहाणार आहोत. तथापि पहिल्या दोन भागांचा गोषवारा माहितीसाठी देत आहे.

पहिल्या भागांत कवी आपल्या घराचे वर्णन करून तिथे आजूबाजूचे तरूण, तरुणी कसे जमायचे, वहिनी त्यांना सुग्रास  स्वयंपाक करून कशी जेवायला, खायला द्यायची व नंतर अंगणात बसून पारतंत्र्य, अन्याय, जागतिक  घडामोडी यावर कशी चर्चा व्हायची,  मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी काय केले पाहिजे याविषयी जमलेल्या तरूणांना मार्गदर्शन कसे केले जायचे, वीररसपूर्ण अशा कविता म्हटल्या जायच्या वगैरे गोष्टींचा उल्लेख आहे.

दुसर्‍या भागात आपण केलेल्या प्रयत्नांना केवळ आठ वर्षांतच यश येत असल्याचे पाहून कवी आनंदित आहेत. दीनपणा सोडलेले व वीरश्रीचा संचार झालेले देशातील युवक, युवती स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. या धगधगत्या यज्ञकुंडात पहिलं बलिदान देण्यासाठी श्रीरामांनी आमंत्रण  दिलेलं असताना, हा बहुमान आपल्या कुटुंबाला मिळावा, ही किती अभिमानाची गोष्ट आहे. ज्या आणाभाका आम्ही घेतल्या, त्याप्रमाणे प्रत्यक्ष वर्तन करून आम्ही कृतार्थ  झालो आहोत. असे वीरश्रीपूर्ण निवेदन करून, सावरकर आपल्या वहिनींनी धैर्यानें अशा प्रसंगांना सामोरं जावं, यासाठी त्याचं मनोबल उंचावत आहेत. ते आठवण करून देतात की आपण हे धगधगते सतीचे वाण, आंधळेपणांने किंवा क्षणिक उत्तेजनाने नाही, तर जाणून बुजून, समजून उमजून हाती घेतले आहे.

तिसऱ्या भागात ते म्हणतात की, मातृभूमीलाच मी माझं मन वाहिले आहे. माझं सारं वक्तृत्व, वाङ्मय तिलाच अर्पण केलय. मी, माझं तारुण्य तसेच सगळ्या देहभोगांचं हवन या स्वातंत्र्य यज्ञामधे केलं आहे. देशकार्य हेच देवकार्य समजून, घरदार, पैसाअडका इतकेच नव्हे तर मित्रपरिवार, वडील बंधू, वहिनी, मुलगा, पत्नी यांनादेखील या यज्ञवेदीवर मी ढकलले आहे. आणि आता त्या वेदीवर आहुती म्हणून बळी जाण्यासाठी माझा देहपण मी ठेवला आहे, आमचा निर्वंश झाला तरी चालेल, पण मातृभूमी स्वतंत्र झाली पाहिजे. आपल्या कुलात नक्कीच  ईश्वरी अंश असला पाहिजे, म्हणूनच आपल्याला हा आहुतीचा मान मिळाला आहे. आम्ही सात बंधू असतो तरी सर्वांनी देशासाठी बलीदान दिले असते. तरी हे वहिनी, जसे पार्वतीने हिमाच्छादित  पर्वतावर तप केलं, जशा हजारो राजपूत स्त्रियांनी हसत हसत अग्निप्रवेश केला, तसेच तुम्ही देखिल या व्रताचे पालन करा. भारतीय स्त्रियांचं तेज लुप्त झालेलं नाही हे दाखवून द्या. इथे कवी, वहिनींना ‘विरांगने’ म्हणून संबोधतात व त्यांना नमन करतात. शेवटी ते पुन्हा एकदा सांगतात की, जर आपण जाणुन बुजून हे सतीचे वाण हातात घेतले आहे, तर अग्नीप्रवेश करण्याची आपली तयारी आहेच. यज्ञवेदीवर चढलो आहोत तर ते हवन होण्यासाठीच!

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आधुनिकता की प्रदर्शन ?” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “आधुनिकता की प्रदर्शन ?” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

आजकाल खरोखरीच खूप जास्त अच्छे दिन आलेले आहेत . महागाईच्या नावाने ओरडत ओरडत प्रत्येक जण आपले सगळे सणसमारंभ, सोहळे धूमधडाक्यात पार पाडतोय. ऐच्छिक गोष्टी केव्हा आवश्यक सदरातून अत्यावश्यक सदरात शिफ्ट झाल्यात ते आपले आपल्यालाही कळलेच नाहीं.पूर्वीची कुठल्या गोष्टीसाठी किती पैसा द्यायचा असतो ही गणितच मुळी हौस ह्या सदराखाली संपूर्णपणे बदलल्या गेली आहेत. फक्त हे करतांना ह्या ऐच्छिक गोष्टी प्रघात बनून कुणाची गैरसोय बनू नये ही इच्छा.

मध्यंतरी एक बातमी वाचनात आली आणि मन खरचं खूप सुन्न झालं.एक शाळकरी मुलाने त्याच्या आईबाबांनी वाढदिवस आजच्या पध्दतीनुसार साजरा करु दिला नाही म्हणून आत्महत्या केली. सगळ्यां करीताच विचारात पाडणारी दुःखद घटना आणि त्या पालकांच्या सांत्वनासाठी शब्दही सुचेना.

हल्ली  जग बरचसं आभासी झालयं. सोशल मिडीया हे दुधारी शस्त्रासारखं आहे. त्याचा वापर तुम्ही कसा करताय ह्यावर ते फायदेशीर की नुकसानकारक हे ठरणार आहे. जे मोठमोठे इव्हेंट सहज साजरे होताना मोठया स्क्रीनवर बघितल्या जातात ते प्रत्यक्षात अमलात आणणं खूप कठिण असतं हे कुठेतरी सगळ्यांना कळायला हवे.

वाढदिवस, लग्नांचे वाढदिवस ही खरोखरच कुटूंबातील आनंददायी घटना.या प्रसंगातून सगळेजण एकमेकांच्या मनाशी जोडल्या जातात.असे कुटुंबातील छोटेछोटे समारंभ आनंद देतात, एक प्रकारचे चैतन्य निर्माण करतात.

पण दुर्दैवाने ह्याचे स्वरुप, त्याचा अतिरेक हा समाजासाठी खरोखरच डोकेदुखी ठरला आहे.प्रेम म्हणजे मनाशी मनाचे जुळलेले नाते,त्याग ह्या संकल्पना सोडून वरपांगी दिखाऊ प्रदर्शनीय बाब होऊ घातलीय.

हे अवर्णनीय आनंद देणारे कौटुंबिक प्रसंग ज्यांना आम्ही मराठी मध्ये “समारंभ”किंवा “सोहळे” म्हणतो त्याचे रुपांतर आभासी,दिखाऊ अशा “इव्हेंट” मध्ये झालेय.आणि खरोखरच हे “इव्हेंटचे भूत” सर्वसामान्य माणसाच्या अक्षरशः बोकांडी बसलयं

फेसबुक किंवा व्हाट्सएपवर वाढदिवसाचे किंवा लग्नाच्या वाढदिवसाचे केक कापतांनाचे फोटो एकदा आपलोड केले की जणू आपल्या सुखी जीवनाचा पुरावा सादर केल्यासारखी भूमिका काही लोक सादर करतात. कुठल्याही इव्हेंट मध्ये जाणे,तिथे सेल्फी काढून ते भराभर अपलोड करणे, खरचं ही सुखाची परिभाषा आहे का हा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे.

वाढदिवस, लग्नांचे वाढदिवस, प्रीवेडींग शूट हे ज्यांना परवडतं त्यांच्यासाठी उत्तमचं . पण ह्या सगळ्या गोष्टींचा पायंडा पडतोय हे खूप घातक.ह्या आभासी सुखामुळे,ह्या पायंड्यामुळे कितीतरी मुलं नैराश्येच्या खाईत लोटल्या जातात आहे हे पालकांना समजूनच यायला मुळी खूप ऊशीर होतोय.

ह्याची सुरवात होतांनाच पालकांनी जागरूकतेने ह्याबद्दल मुलांना नीट समजावून दिले तर ती सगळ्यांसाठीच खूप फायद्याचे ठरेल पण त्यासाठी आधी पालकांनी आधी या “सो काँल्ड आधुनिकतेला” आळा घालणं गरजेचं आहे.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तुझे येणे… ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

??

☆ तुझे येणे… ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

तुझे असे येणे .. जणू आनंदाचे गाणे

गत काळातील आठवणीत मन सुन्न सुन्न होणे

एकत्र घालवलेल्या क्षणांची जणू जत्राच भरून येणे

 

तुझे असे येणे जणू आनंदाचे गाणे

 

क्षण क्षण टिपून घेता सुख ओसंडून जाणे

शब्दांचा ही जणू आत्ता गोंधळ उडणे 

 

तुझे असे येणे जणू आनंदाचे गाणे

 

भेटीच्या  सुखद क्षणांची गुंफण करत जाणे

मैत्रीच्या ह्या नात्याला मनातल्या सिंहासनावर बसवणे

 

तुझे असे येणे जणू आनंदाचे गाणे

 

परतण्याची वेळ येता मन सुन्न सुन्न होणे

आठवणींचा आयुष्यात  कवडसा होवून जाणे 

 

तुझे असे येणे जणू आनंदाचे गाणे

 

© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे

संपर्क :  सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.

फोन   : ७५०६२४३०५०

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बहिणाबाई चौधरी – अहिराणी-मराठी कवयित्री… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

बहिणाबाई चौधरी – अहिराणी-मराठी कवयित्री... – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

स्मृती दिन ३ डिसेंबर,१९५१

बहिणाबाई नथुजी चौधरी यांचा जन्म असोदे (जळगाव जिल्हा ) ह्या गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे. जन्म नागपंचमीच्या दिवशी २४ ऑगस्ट १८८० रोजी महाजनांच्या घरी झाला.

१८९३ साली वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला.बहिणाबाईंना तीन मूळ होती  ओंकार, सोपान आणि काशी. वयाच्या तिसाव्या वर्षी  बहिणाबाईंना वैधव्य आले.

बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी व काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या.

त्या निरक्षर होत्या; तरिही त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. छापील मजकुराविषयीची ही असोशी अनक्षर बहिणाबाईंनी या कवितेत उतरवली आहे. 

मंमई बाजारावाटे

चाले धडाड-दनाना

असा जयगावामधी

नानाजीचा छापखाना… 

नानाजीचा छापखाना

त्यात मोठे मोठे पुठ्ठे

तसे शाईचे दराम

आन कागदाचे गठ्ठे… 

किती शिशाच्या चमट्या

ठसे काढले त्यावर

कसे निंघती कागद

छापीसनी भरभर…

चाले ‘छाप्याचं यंतर’

जीव आठे बी रमतो

टाकीसनी रे मंतर

जसा भगत घुमतो… 

मानसापरी माणूस

राहतो रे येडजाना

अरे होतो छापीसनी

कोरा कागद शहाना…

सोपानदेव चौधरी आणि त्यांचे मावस भाऊ ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या.

पुत्र सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर लिहून घेतलेल्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे म्हणाले,

‘ हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे’

आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित झाली.

‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहोरांचा हंडा आहे’, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता.बहिणाबाईंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे कारणीभूत ठरले.आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीची ओळख  महाराष्ट्राला आणि जगभर पसरलेल्या माताही माणसाला झाली.ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता लिहून न ठेवल्यामुळे  त्यांच्याबरोबरच नष्ट झाली आणि माय मराठीचे अतोनात नुकसान झाले.

बहिणाबाईंच्या कविता वऱ्हाडी-खानदेशीत, त्यांच्या मातृबोलीत, रचल्या आहेत .त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इ.सणसोहळे; काही ओळखीची माणसे,असे आहेत.

अहिराणी (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे.खानदेशातील आसोद हे बहिणाईंचे जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी/अहिराणी भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वत: शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग – या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.

उदा. ‘असा राजा शेतकरी चालला रे आलवानी (अनवाणी) देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी.

तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होती. ‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर’ किंवा ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ अशा कमीत कमी शब्दात अर्थाची कमाल त्या करत असत.

‘अरे संसार संसार – जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके – तव्हा मीयते (मिळते) भाकर’ किंवा ‘देव कुठे देव कुठे – आभायाच्या आरपार देव कुठे देव कुठे – तुझ्या बुबुयामझार’. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, (आणि कमी) शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत.बहिणाबाईंच्या काव्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश असतो.

बहिणाबाईंच्या काव्यरचनांवर आधारित “खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा” हा सांस्कृतिक कार्यक्रम मराठवाड्यातील गायकांच्या आवाजात सादर केला जातो. बहिणाबाई चौधरींच्या कवितांवर आधारित व हा कार्यक्रम दत्ता चौगुले आणि माधुरी आशिरगडे यांनी संगीतबद्ध केला आहे.

दूरदर्शनने बहिणाबाईंवर लघुपट काढला होता. त्यात भक्ती बर्वे यांनी बहिणाबाई साकारली होती. उत्तरा केळकर यांनी त्यामधली गाणी .ओव्या म्हटली आहेत त्यानंतर दिग्दर्शक अतुल पेठे यांनी बहिणाबाईंच्या कवितांच्या प्रेरणांवर आधारित ‘बहिणाई’ नावाच्या लघुपटाची निर्मिती केली.

बहिणाबाईंच्या काव्याचा इंग्रजी अनुवाद ’फ्रॅग्रन्स ऑफ दि अर्थ’ या कवितासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे. अनुवादक माधुरी शानभाग आहेत. बहिणाबाईंचे अल्पचरित्र, आचार्य अत्रे, बा.भ. बोरकर, पु.ल. देशपांडे, इंदिरा संत यांनी लिहिलेली स्फुटे आणि मालतीबाई किर्लोस्कर आणि प्रभा गणोरकर यांनी केलेली समीक्षा देखील या पुस्तकात समाविष्ट केली आहे.

यापूर्वी प्रा. के.ज. पुरोहित यांनी बहिणाबाईंच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद केला होता.

बहिणाबाईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

लेखक : अज्ञात 

संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अचूक चुकीची वेळ… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

अचूक चुकीची वेळ… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

दोन दिवसापूर्वी एक वाक्य ऐकले आणि लगेच त्याचा प्रत्यय पण आला. ते वाक्य एका गाण्याच्या कार्यक्रमात ऐकले. ज्या वेळी प्रत्यक्ष कार्यक्रम म्हणजे लाईव्ह प्रोग्रॅम बघतो त्या वेळी असे अनुभव येतात. त्या कार्यक्रमात तबलजी इतका निष्णात होता. की त्याने लावणी पूर्वीची ढोलकी तबल्यावर वाजवली. ऐकायला फारच अप्रतिम! डोळे बंद  केल्यावर तर हा तबला आहे यावर विश्वास ठेवणे अवघड होते. त्यातील निवेदकाने आधीच एक वाक्य वापरले होते, ते म्हणजे वेळेवर शिट्टी येऊ द्या. आणि ते वाक्य ऐकून हसू आले. कारण माझीच कायम अशी फजिती होते. लावणीला शिट्टी मारायची तयारी केली तर ती पुढच्या भक्तिगीताला तरी वाजते किंवा एखाद्या दुःखी गाण्यात तरी वाजते. मग असे होऊ नये म्हणून मी तो नादच सोडला आहे.

अजून एक प्रसंग आठवला एका अंत्य यात्रेत कोणाचा तरी फोन वाजला आणि रिंगटोन वर गाणे वाजले अकेले अकेले कहा जा रहे हो सोबतच्या लोकांना मोठाच पेच पडला, हसावे की रागवावे?

काही प्रसंग तर असे घडतात की आपण विचारात पडतो. एका लग्नात बँडवर गाणे वाजत होते छोड गये बालम आणि दिल का खिलौना टूट गया किंवा परदेसियो से ना आंखिया मिलाना ही तर जणू लग्नात वाजवण्याची फेवरेट गाणी.

आणि पूर्वीच्या लग्नाच्या पंक्तीत कायम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे श्लोक ऐकू यायचा. पूर्वी लग्न लागल्या नंतर नवरी वरपक्षाच्या खोलीत जायची. तिथे सगळे कौतुकाने तिच्याकडे बघत असायचे. कोणी चेष्टा करायचे,तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचे. अशाच एका प्रसंगाची नेहेमी आठवण येते. अशाच एका लग्नात त्या वधूला गाणे म्हणण्याचा आग्रह झाला. आणि तीने गाणे म्हंटले न जाओ सैया हे ऐकून काय प्रतिक्रिया आली असेल, कल्पनाच करु शकत नाही.

अशा गमती जमती पावलो पावली अनुभवायला मिळतात. मुले तर फार मजेशीर असतात. मुलांच्या व शाळेत अनुभवलेल्या गमती जमती पुन्हा केव्हातरी.

अशी गंमत फजिती कायम अनुभवायला येते. आणि काय प्रतिक्रिया व्यक्त करावी हेच कळत नाही.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ पेपर तसा सोपा होता ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

पेपर तसा सोपा होता ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

लहानपणी आईने अ, आ, ई शिकवलं. अवघडच होते ते गिरवणं. पाटीवर पेन्सिल टेकवून लिहायचं. वेडंवाकडं निघायचं. कधी कधी आई रागवायची मात्र बऱ्याचवेळा हाताला हात धरून वळण लावायची. मग पाटीवर अक्षरे निघू लागली वळणदार. तरीही मी अक्षरांबाबतीत तसा कच्चाच राहिलो. आजपर्यंत ते सुधरलंच नाही. माझं अक्षर वाईट याचं वैषम्य अधूनमधून वाटत राहतं. पण ते सुधरवून घेण्याच्या भानगडीत मी पडत नाही. असं सांगतात की ज्याचं अक्षर चांगलं तो चांगला चित्रकारही होऊ शकतो. मात्र असंही आढळून आलंय की बडी बडी माणसं जी असतात त्यांचं अक्षर हस्ताक्षर वाईटच असतं. मी दुसऱ्या कॅटेगरीतला अशी साधीभोळी समजूत मी स्वतःला घालत असतो. 

आईचं गिरवून झाल्यावर पाठीशी लागली ती शाळा. शाळा कुणाला चुकलीय. असं तर बऱ्याचदा ऐकिवात आलंय की चौथी वा सातवी आठवीला शाळा सोडून माणसं मोठमोठे उद्योगपती, खेळाडू, थोर नेते बनलेत. माझ्या नशिबी तो योग नव्हता. शाळा काही सुटली नाही. पाटी काही फुटली नाही. मात्र शालेय जीवन होय जीवनच मस्तपैकी जगलो. गळ्यात गळा घालणारे मित्र मिळाले. हातावर छडी देणारे मास्तरही भेटले. पोटात चिमटा काढणे वा कान उपटणे, उठाबशा काढायला लावणे हा तर त्यांचा जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखं असायचं. ते मारायचे व माया ही करायचे. त्यातून मात्र घडत गेलो. बाबा ही शाळेत शिक्षक होते त्यामुळे निदान माझी शिक्षा द्विगुणित व्हायची. वरच्या कक्षांमधे गेलो तसे चुका कमी व्हायला लागल्या. शिक्षणाची गोडी लागली. मग शाळेचे दिवस, रम्य ते दिवस होऊ लागले. मास्तरही आवडायला लागले. शिकणं झालं, खेळणं झालं, गेदरिंगमधे नाट्य नाटिका केल्या. जास्तीतजास्त मार्कं मिळवण्याची चढाओढ ही केली. वार्षिक परिक्षेचा रिझल्ट लागण्याचा दिवस अतिमोलाचा ठरू लागला. पहिला दुसरा नंबर आला तर कोण आनंद व्हायचा. जरी पहिल्या पाचामधे आलो तरी आनंद व्हायचा. मग सर्वांना रिझल्ट दाखवायची खुमखुमी यायची. नववीत असताना सायन्सच्या पेपरला तेरा सप्लिमेंट जोडल्या होत्या. सर्वात जास्त मार्क मिळाले. त्यापेक्षाही आमच्या शिक्षिकेने माझी संपूर्ण उत्तरपत्रिका नोटिसबॉर्डावर लावली होती. आदर्श उत्तरे कशी लिहावीत याचं प्रात्यक्षिक म्हणून. बरेच दिवस कॉलर टाईट होती. अकरावीची परिक्षा आली अन् गेली. त्या अगोदर सेंडॉफ झालेला. शाळा सुटल्याचं दुःख अपरिमित. काहीजण तर चक्क रडलेच. 

शाळा सोडून कॉलेजचे दिवस सुरू झाले. ते मोरपंखी का काय ते !! खरंतर ती गद्धेपंचविशीच होती. अभ्यासापेक्षा इतर उद्योगच जास्त व्हायला लागले. कविता काय, कथा काय भलतं भलतंच सुचू लागलं. त्यात कॉलेजच्या पहिल्या वर्षीच आंतरमहाविद्यालयीन दिवाळी अंक कथास्पर्धेत बक्षिस मिळालं तसं आमचा रथ दोन बोटं वरच धावू लागला. परिक्षा आली की अभ्यासाला लागायचं तेव्हढ्यापुरतं जमिनीवर. आणखीन मित्र भेटत गेले. धमाली घडू लागल्या. सहली घडू लागल्या. अरेतुरेची लज्जत यायला लागली. सगळं काही घडत होतं. नासिक काय पुणे काय, पुणे येथे तर काय उणे. सांस्कृतिक राजधानीच. उधाण न आलं तरच नवल. मन भरून जगलो ते दिवस, मन लावून अभ्यासही केला.  चारवर्षात डिग्रीधारक झालो. सगळ्या परिक्षा पास झालो. 

आता खरी परिक्षा सुरू झाली आयुष्याची. मध्यंतरी लग्न झालं हे ओळखलंच असेल बहुतेकांनी. काही दिवसांपूर्वी नातेवाईकाच्या मुलाचा साखरपुडा होता. त्याला शुभेच्छा देताना बेस्ट ऑफ लक ही म्हटले. वरतून म्हटलं, परिक्षेच्या अगोदर बेस्ट ऑफ लक म्हणतात ना तसं!! तर तो दोन मिनिटं माझ्यासमोर पहातच राहिला. मग त्याला समजवलं, त्याचं  असं असतं की प्रश्नपत्रिकेत जसं सांगतात ना की, एका ओळीत उत्तर द्या, आन्सर इन वन सेन्टेन्स, थोडक्यात लिहा, बी ब्रीफ, कोण कोणाला काय म्हणाले हू सेड टु हूम. जोड्या जुळवा, मॅच द पेअर, समानार्थी शब्द द्या, हे प्रकरण तसं अवघड, विरुद्धार्थी शब्द द्या, हे तसं सोपं. वरतून पत्रलेखन, निबंध, आत्मचरित्र, हे जसं परिक्षेत असतं तसं सगळं आयुष्यात ही असतं. तेव्हा तयार रहा, बी प्रीपेर्ड. तो होतकरू मुलगा खो खो हसायला लागला. मीही. खरंतर हे माझे अनुभवाचे बोल. 

किती परिक्षा दिल्यात? तसं तर पदोपदी परिक्षाच. एक पेपर सोडवून झाला की दुसरा हजर. रसायन शास्त्रासारखे इक्वेशन्स, इतिहासात असतात तशा लढाया त्या रक्तरंजित नसतात तरी जीवघेण्या नक्कीच. समाजशास्त्र मात्र इथे वेगळंच. सर्वात अवघड गणिताचाच पेपर आयुष्यातही. सोपे गणित लवकर सुटतं. कूटप्रश्न मात्र अनुत्तरित राहणारे. सोडूनच द्यावी लागतात. इथे हुशारी फारशी चालत नाही. कस लागतो तो समंजसपणाचा.  सुपरवायझर वरती बसलेला. अनेक जटिल प्रश्न व समस्या नव्या कोऱ्या प्रश्नपत्रिकेसारख्या. त्यातून तावूनसुलाखून बाहेर पडलो की हुश्श वाटणारं. अधिक मार्कांचा अट्टाहास इथे चालत नाही.  बऱ्याचवेळा स्वतःला हरवत इतरांना जिंकू देत पास होता येते आयुष्याची परिक्षा. पण एकूणच पाहिलं तर वाटतं आतापर्यंतचं जगणं पाहून, पेपर तसा सोपा होता. 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खरे “Indian Idol” – डॉ.पी.वीरमुथुवेल… लेखक : श्री संपत गायकवाड ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆  खरे “Indian Idol” – डॉ.पी.वीरमुथुवेल… लेखक : श्री संपत गायकवाड ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

फ्लॅटचे ७२ लाख कर्ज असताना बक्षीस मिळालेले २५ लाख दान करणारे अवलिया वैज्ञानिक. चांद्रयान-३ पूर्वतयारी सुरू असल्याने चार वर्षात एकही रजा घेतली नाही. 

इस्रोचे वैज्ञानिक,  चांद्रयान- ३ मोहिमेचे संचालक डॉ.पी.वीरमुथुवेल यांनी बक्षीस मिळालेले २५ लाख रुपये विविध शिक्षण संस्थांना दान केले त्यांचे वडील रेल्वेत तंत्रज्ञ होते. गरिबीत जीवन जगले व वडिलांचे संस्कार म्हणून बक्षिसाची रक्कम दान केली. एक लाख पगारातून कर्जाचे हप्ते फेडत सामान्य नोकरदाराप्रमाणे हे ISRO चे वैज्ञानिक संसार चालवत आहेत.

२३ ऑगस्ट २०२३ रोजी लॅडिंग झालेल्या चांद्रयान-३ मोहिमेचे ISRO चे प्रकल्प संचालक डॉ.पी.वीरमुथुवेल यांच्यासह ८ वैज्ञानिकांना तामिळनाडू सरकारने प्रत्येकी २५/२५ लाख रुपये बक्षीस दिले होते.

डॉ.वीरमुथुवेल यांनी बक्षीस मला मिळाले असले तरी यावर अनेकांचा हक्क आहे, म्हणून स्वतः ला मिळालेले २५ लाख रुपये सगळेच्या सगळे, ज्या शैक्षणिक संस्थांनी वैज्ञानिक घडवले त्या संस्थांना दान करण्याचा निर्णय घेतला.

डॉ.पी.वीरमुथुवेल यांनी भारतीय स्टेट बँकेकडून ७२ लाख रुपये कर्ज घेऊन फ्लॅट घेतला आहे. दरमहा १ लाख रुपये पगारातून हप्ता जातो. स्वत:वर कर्ज असूनही बक्षीसाची २५ लाख रक्कम एलुमलाई पॉलिटेक्निक कॉलेज वेस्ट तांबरम, चेन्नई माजी विद्यार्थी संघटना, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT), तिरुचिरापल्ली श्रीसाईराम अभियांत्रिकी महाविद्यालय आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT मद्रास यांना दान केली.

ISRO ही संस्था देशाची शान आहे. राष्ट्रीय विकासात योगदानासाठी समृद्ध वातावरण इस्त्रो संस्था देत आहे त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. २०१९ ते २०२३ या कालावधीत चांद्रयान-३ मोहिमेचे काम सुरू असल्याने एकही रजा डॉ.पी.वीरमुथुवेल यांनी घेतली नाही.

देशाचे खरेखुरे Idol, खरेखुरे हिरो आपल्या देशातील वैज्ञानिक आहेत.

डॉक्टर पी.वीरमुथुवेल यांच्या दातृत्वास व निष्काम सेवेसाठी साष्टांग नमस्कार. इस्रोच्या सर्वच वैज्ञानिकांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे ही परमेश्वराचे चरणी मनोमन प्रार्थना. 

लेखक : श्री संपत गायकवाड (माजी सहायक शिक्षण संचालक)

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “थँक्स गिव्हिंग डेज…” – लेखिका :सौ. प्रतिभा कुलकर्णी ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “थँक्स गिव्हिंग डेज…” – लेखिका :सौ. प्रतिभा कुलकर्णी ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

डिसेंबर महिन्यातील पहिला  आठवडा हा thanks giving days म्हणून साजरा होतो. ह्या आठवड्यात सगळ्या Near and Dear ones ना काही चुकले असेल तर साॅरी म्हणून, त्यांचे आभार आणि प्रेम व्यक्त करतात आणि त्यांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व अधोरेखित करतात….

पण खरं सांगू,

मला हे केवळ परकीयांचे अंधानुकरण वाटते.

हे म्हणजे कसं झालं ना, वर्षभर केलेल्या चुका सुधारण्यासाठी एखादा सत्यनारायण किंवा होम करायचा आणि परमेश्वराकडे क्षमा मागायची आणि पुन्हा त्याच चुका करण्याचा परवानाच घ्यायचा. त्यापेक्षा नित्य नेमाने सद्वर्तन करावे आणि परमेश्वराचे मनोभावे आभार मानावेत ना.

मला आठवतं आमच्या लहानपणी आम्ही रुसून बसलो की भूक नाही असे सांगत असू. मग माझी आई तिचा हुक्मी एक्का काढायची, ” तू जेवली नाहीस तर मी पण जेवणार नाही. ” आता काय बिशाद होती आमची न जेवण्याची आणि आई वर रागावण्याची? पण हे राग रुसवे किती गोड होते.

माझी मुलंही खूप गुणी आणि समजूतदार होती. पण तरीही मुलंच ती.काहीतरी चुकणारच. अशा वेळेस माझी एकमेव शिक्षा म्हणजे” अबोला”!पण तीच त्यांना त्यांची चूक कळायला पुरेशी असायची. काही वेळातच,”आई तू मला रागव, पण अशी गप्प नको ना राहूस….”  असं  म्हणत त्यांनी मारलेली मिठी मला विरघळायला पुरेशी असायची.

शाळेत मैत्रिणीशी  भांडण झाले की आईला काहीतरी छान, तिच्या आवडीचा डबा करायला सांगायचा आणि मधल्या सुट्टीत गाल फुगवूनच तिच्यापुढे तो डबा चक्क आपटायचा, की कट्टीची बट्टी झालीच पाहिजे.

अगदी पती- पत्नीच्या नात्यातलीही रुसव्याफुगव्याची गंमत लज्जतच आणते की.सकाळीच ऑफिसला जाताना झालेले भांडण एखाद्या गजऱ्याने किंवा तिच्या आवडत्या कचोरीने चहाच्या कपातील वादळच ठरते.  त्यासाठी बायकोनेही कन्सेशन घेऊन  तासभर आधी येऊन त्याच्या आवडीचा केलेला झणझणीत वडापावचा बेत घरातील वातावरणातला जिवंतपणा कायम  ठेवतो.

इतकंच काय ,अगदी जवळची, जिवाभावाची सखी असो किंवा फेसबुकवरील तुमच्यासारखे कधीही न भेटलेले तरीही एक अनोखे नाते निर्माण झालेले मित्र मैत्रीणीही, काही दिवस आले नाही तर विचारतात, “काय गं,काही झालंय का ? बरी आहेस ना? ” त्यावेळी ही  जी ओढ, काळजी असते तिची जाणीवही खूप सुखावणारी असते.

एकंदरीत काय तर ,असे रुसवेफुगवे..त्यानंतरचे मनवणे ( अगदी आमच्या सारख्या सिनियर सिटीझनसमध्येही, बरं   का!)  आहे तोपर्यंतच आयुष्यातील खुमारी आहे. सुग्रास जेवणात जसे झणझणीत लोणचे अथवा चटणी हवीच .तसेच आयुष्यातही अशी हक्काने रागावणारी आणि तितक्याच मायेने मनवणारी नाती हवीतच.

त्यांना असे एका दिवसात थॅन्क्स म्हणून किंवा माफी मागून परके करू नये, असे मला वाटते.

म्हणूनच मला  इकडच्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना अजिबात थॅन्क्स अथवा साॅरी न म्हणता त्यांच्या ॠणातच रहाणे आवडेल.

लेखिका: सौ. प्रतिभा कुळकर्णी.

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares