मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मला आवडते तुमची कलरफुल जनरेशन… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ मला आवडते तुमची Colourful Generation…. लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

नात : “नानी, तू किती generations बघितल्या ?”

मी : “ मी न……. ५…… बघ हं… माझी आजी, माझी आई, मी, माझी मुलगी आणि माझी नात… तू…”

नात: ” यापैकी कोणती generation तुला सर्वात जास्त आवडते ?”

मी : “ तुझी…. “

नात : “ वॉव…. पण का ?”

मी: “ कारण ती सर्वात जास्त colourful आहे. ”

नात: “ म्हणजे कशी ?”

मी : “ म्हणजे असं….. की माझ्या आजीच्या पिढीचा एकच रंग होता… ‘ घर… घर काम, घरच्यांची सेवा आणि    घरी येणाऱ्यांचे आदरातिथ्य.

मग माझी आई… या घरकामाच्या रंगात अजून एक रंग वाढला…

तो म्हणजे शिक्षणाचा…. आणि या शिक्षणाबरोबर खेळ, कला, जवळपासचा समाज… यामुळे आईच्या जीवनात बरेच रंग आले.

मग माझी पिढी… माझ्या पिढीत उच्च शिक्षण आणि विस्तृत समाज यामुळे आमचं क्षितिज बरंच रुंदावलं…

 नवनवीन प्रयोग, प्रवाह, पाऊलवाटा तयार होऊ लागल्या… generation colourful होऊ लागली.

मग.. तुझ्या आईची generation………

Technology चा एक जबरदस्त रंग बाकी सगळ्या रंगांवर हावी होऊ लागला…. ‘स्पर्धेचा नवीनच रंग भराभर गडद होऊ लागला. नवनवीन पाश्चिमात्य रंग डोकावू लागले… जागतिकीकरणाचा पहाट-रंग क्षितिजावर दिसू लागला…

आणि त्यानंतर…

नात : “ मी….. पण माझीच generation तुला का आवडते ?”

मी: “ कारण आधीच्या सगळ्या रंगात घोळून आत्मविश्वासाचा प्रसन्न रंग  लेवून जन्मलेली तुझी पिढी…. technology ला तर तुम्ही आपली दासी बनवलयं… जग तुमच्या बोटांवर नाचतं…

ग्रहांच्या पलिकडे तुमचं क्षितिज विस्तारलयं…

समानता खऱ्या अर्थाने तुमच्या नसानसात भिनली आहे….

माझ्या आजीच्या ‘घर आणि संस्कार’  पासून ते…

तुमच्या ‘अवकाश’ या प्रचंड कक्षेतील सगळे ‘सुखद’ रंग जपण्याचा आणि ‘दु:खद’ रंगांशी झुंजण्याचा तुमचा ‘Cool’ रंग मला फार आवडतो……

तुमच्या या रंगात आधीच्या सगळया पिढ्या अक्षरशः न्हाऊन निघतात…

BE BOLD FOR CHANGE….

 व्हा धाडसी…. बदलासाठी… !!!

लेखक : अज्ञात

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ माणुसकीचे कफन… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ माणुसकीचे कफन… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“वाचवा. !.. वाचवा.. !. कोणी हाये का तिथं?… ऐका !… ऐका. !. मी बुडतोय!… अहो कुणीतरी लवकर मला बाहेर काढा हो!… नाका तोंडात पाणी गेलयं… श्वास कोंडलाय!… लवकर धावून या!.. नका उशीर करू… आता फार वेळ दम धरवणार नाही!… कसेही करा पटकन इथे उडी मारून या आणि मला इथून बाहेर काढा… “

जिवाच्या आकांताने तो ओरडून सांगत होता बिचारा… पाण्याच्या खोल डोहात फसला होता.. गरगर फिरत होता… त्याचे स्व:ताचे सुटकेचे प्रयत्न निष्फळ ठरले होते… तो अधिकाधिक डोहात गुरफटत गेला होता… त्याचा आरडाओरडा ऐकून बघ्यांची खूप गर्दी जमा झाली तेथे.. पण त्यांना या लाईव्ह ऑंखे देखा हालचं व्हिडिओ शुटींग करण्याचा मोह आवरला नाही.. ते बुडणाऱ्या माणसाला  म्हणाले,

” अरे थांब!लगेच असा बुडू नकोस.. दोन मिनिटे आधी शुटींग करून घेऊया मग तुला कसा यातून वाचविता येईल याची आम्ही आपआपसात चर्चा करतो… पट्टीचा पोहणारा तरी आमच्यात कुणी दिसत नाही.. एखादा मोठा दोरखंड मिळतोय का ते पहावे लागेल.. तो आणे पर्यंत तरी तुला असेच थांबणे गरजेचे आहे… आमच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ शुटिंग करून झाले कि मग कुणाला तरी गावात पाठवतो.. तुझ्या घरी तसा निरोप देऊन ताबडतोब मदतीला या म्हणून सांगतो.. तू आता काळजी करू नकोस… तुझ्या जीवावर बेतलं आहे याची आम्हाला काळजी किती वाटते ते या व्हिडीओ शूटिंग व्हायरल झाले कि सगळ्यांना कळेल.. जो धाडसी आणि पट्टीचा पोहणारा असेल त्याने हा व्हिडिओ बघितला कि तो लगेच धावून आल्याशिवाय राहणार नाही… मग तू नक्की वाचशिल यात शंका नाही… तुला वाचताना पुन्हा आम्हाला शुटींग घेता येईल… एक  माणूस, सुजाण नागरिक या नात्याने आम्हाला आमचं माणुसकिचं कर्तव्य पार पाडल्याचं समाधान मिळेल… तू धिराचा आहेस, .. अखेर पर्यंत तुला लढा द्यायचा आहे… हिथं थांबून आम्ही हे शुटींग करता करता तुझं माॅरल कसं वाढेल हे आम्ही पाहतो… तू थोडावेळ असाच धीर धरून रहा मदतीला कोणी येईलच इतक्यात… आणि कुणी आलं कि तुला आम्ही मोठ्याने आवाज देऊ… होईल होईल तुझी सुटका नक्की होईल… मग आमच्या सोबत एक सेल्फी घेऊ… चॅनेलवर ब्रेकिंग न्यूज झळकवू  काळ आला होता पण वेळ आली नव्हती.. देव  तारी त्याला कोण मारी अशी सनसनाटी  हेड लाईन देऊन आम्हीच तुझ्या वतीने मुलाखत देऊ… या या व्हिडिओ शुटींगचा रिल व्हायरल झाल्याने बुडणाऱ्या माणसाचे प्राण वाचवले… पण पण हे केव्हा तूला मदत मिळून बाहेर काढल्यावरं.. बघं एका रात्रीत तू हिरो होणार आहेस.. तोवर हे तुला या डोहात गटांगळ्या खाऊन का होईना जिवंत राहावे लागणार आहे… अरे टि आर. पी. किती वाढेल याची तुला काहीच कल्पना करता येणार नाही.. ते सगळं आम्ही बघून घेतो.. तू मात्र डोहात लढते रहो हम कपडा संभालके देखते है… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ ☆ पाणवठा…! ☆ श्री सुजीत कदम  ☆

श्री सुजीत कदम

? क्षण सृजनाचे ?

💦 पाणवठा…! 💦 ☆ श्री सुजीत कदम 

कसं असतं ना आपल्या लेखकांचं..?

काही वेळा खूप लिहायचं असतं.. पण विषय सुचत नाही.एखादा विषय सुचलाचं तर, काय लिहायचं हेच कळत नाही. कथा लिहायची, कविता लिहायची, की ललित लेख..? का आजकाल सर्वांनाच आवडणारी गझल लिहायची..? नक्की काय लिहायचं हेच कळत नाही. हे सारं ठरवत असताना सुचलेला विषय हळूहळू पुसट होत जातो आणि मग आपण पुन्हा नव्याने एखाद्या विषयाच्या शोधत हरवून जातो.. हे सगळं करत असताना सहज हसू येतं ते लहान पणीच्या एका कवितेने

“घड्याळात वाजला एक,

आईने आणला केक

केक खाण्यात एक तास गेला

मी नाही अभ्यास केला”

हे असंच काहीसं.. अजूनही होतंय की काय असं वाटतं राहत… दिवस भर विचार करून जेव्हा काहीचं लिहलं जात नाही तेव्हा आपल्यातला लेखक कुठे हरवलाय की काय..? असं वाटू लागतं. हे करता करता, दिवसा मागून दिवस जातात आणि एखाद्या दिवशी काहीच ठरवलं नसताना अगदी सहज भरं भर कागदावर काहीतरी उतरतं.. आणि मग… इतके दिवस ह्या विषयावरुन त्या विषयावर फिरणारं मन, एक वेगळाच विषय घेऊन कागदावर स्थिरावतं. तेव्हा कागदावर उतरलेले शब्द पाहिले ना की मनात येतं.. “

कित्येक दिवस दूर दूर चा प्रवास करून कुठल्याशा गावचे हे पक्षी..

ह्या पांढ-या शुभ्र कागदाच्या पाणवठ्यावर उतरले असावेत..

ह्या पाणवठ्याचा एकांत दूर करण्यासाठी…!

हे पक्षी काही क्षण थांबतील किलबिलाट करतील आणि पुन्हा उडून जातील..

एका नव्या प्रवासाच्या दिशेने…!

एका नव्या पाढं-या शुभ्र पाणवठ्यावर…

मी मात्र पुन्हा एका नव्या विषयाच्या शोधत फिरत राहीन पुढचे कित्येक दिवस वहिचा पांढरा शुभ्र पाणवठा घेऊन… पुन्हा काही नवे पक्षी , पांढ-या शुभ्र पाणवठ्यावर येतील ह्या एकाच आशेवर…!

© श्री सुजित कदम

पुणे

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आवडनिवड…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “आवडनिवड…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

प्रत्येक व्यक्तीचा स्वतःच्या आवडीचा जणू एक साचाच असतो. त्या साच्यातून  तो आपल्याला आवडणारं राहणीमान, खानपान, वाचन,गायन,जीवन जगण्याची पद्धत ह्या सारख्या आवडी जपतं असतो. त्यामुळे तो जीवनात स्वतःला आवडणा-या गोष्टींचा आस्वाद घेतो पण हा आस्वाद घेतांना जर कधीतरी अवचट आपल्या आवडीचं वळण बदलून दुसऱ्यांच्या आवडीच्या वाटेवर चालून बघितलं तर ते कधीकधी जास्त पण आवडून जातं. पण असा बदल हा एखादेवेळीच स्विकारला जातो, एरवी आपली स्वतःची आवड,कल हा तसा ठाम असतो.

जबाबदा-या,कर्तव्य उरकंत आल्या की वेध लागतात स्वतः कडे नीट लक्ष देण्याचे, आपल्या आवडीनिवडी जपण्याचे, बरीचशी आवडती कामं,कला,छंद जोपासण्याचे. ह्या आवडीनिवडी,छंद जोपासण्याची पण एक  गंमत आहे.आपण दुसऱ्या ला सहजसहज सल्ले देतो,अमूक एक गोष्ट कर म्हणून आग्रही होतो पण विचार केला तर लक्षात येतं आपण सुचवलेली गोष्ट ही समोरच्या व्यक्तीच्या आवडीनुरुप आहे की नाही ? की आपण आपली मतं त्यावर लादतोय.माझा स्वतःचा पिंड नोकरी करण्याचा ह्या उलट माझ्या बहिणीचा पिंड हा अतिशय उत्कृष्ट, आदर्श अशी गृहीणी होण्याचा.माझ्या बहिणीसारखी सुगरण,टापटिप घर ठेवणारी,अगदी बारीकसारीक सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणारी, घरच्यांच्या आरोग्याची उत्तम सुश्रुषा करणारी आणि घरच्या अगदी लहानात लहान कामापासून ते मोठमोठ्या कामांचा पण भार लिलया पेलू शकणारी स्त्री अभावानेच आढळते.  आणि ही सगळी कामं ती अतिशय आवडीने, आनंदाने आणि उत्स्फूर्तपणे करते. जर अशावेळी मी तिला बाहेर नोकरी करण्याचे सल्ले दिले तर तो तिच्यावर नुसता अन्यायचं होणार नाही तर तिच्या उत्तम व्यवस्थापन कौशल्याचा एक प्रकारे अपमानच होईल. थोडक्यात काय तर प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते,त्यामुळे आवडीनिवडी बदलविण्याच्या चुकीच्या अट्टाहासापेक्षा त्या व्यक्ती मधील गुणांना पुरक कौतुकाची थाप देणं,तिला उत्तेजन देणं ही खरी माणुसकी.

मला स्वतःला विचाराल तर आता नोकरीमुळे असलेल्या अतिशय व्यस्त दिनचर्ये पेक्षा निवृत्ती नंतरचे आयुष्य हे अतिशय शांत, कमी गजबजलेल्या ठिकाणी घालवायला आवडेल, त्यामध्ये माझं वाचनं आणि शांत ठिकाणी भ्रमंती व पर्यटन हे आलचं. प्रवासाचं म्हणाल तर माझ्या बकेटलिस्ट मध्ये सागरीप्रवास याने की क्रुझ वरुन सागराच्या शांत सानिध्यात फेरफटका मारणे,अगदी “मै ओर मेरी तनहाई अक्सर बाते करेंगे”च्या स्टाईलमध्ये “डोंट डिस्टर्ब”चा बोर्ड न लावताही मिळणारा एकांत, बाजूला मंद,अलवार,हळू आवाजात ऐकू येणारे पण ह्रदयाला भिडणारे संगीत, ती अर्थपूर्ण हिंदीमराठी गाणी,स्वतःमध्ये रमुन जाण्याचे क्षण ह्याला मी नक्कीच अग्रक्रम देईन. बघूया आपली बकेटलिस्ट बनवून ठेवायला तरी हरकत नाही.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अडगळ ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ अडगळ ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

‘कुणी घर देता का घर?’ इथं पासून ‘कुणी घर आवरुन देता का घर’ इथपर्यंत आयुष्याची गाडी घरंगळत आली खरी, पण कशी कधी ते कळलंच नाही. पैसा – नोकरी – घर – पद – प्रतिष्ठा ही स्टेशनं बघता बघता मागे पडली आणि ‘निवृत्ती’ या शेवटच्या स्टेशनवर ती सुसाट धावणारी गाडी कधी ना कधी येऊन थांबणार हे कळत असूनही वळत मात्र नव्हतं… तोपर्यंत सतत कशाच्या ना कशाच्या मागे धावणं, स्वत: सर्वात पुढे रहाण्याच्या अट्टाहासापायी ठेचकाळणं… धडपडणं… आज हे हवं… उद्या ते हवं… हवं म्हणजे हवंच हा हट्ट… (की हवरटपणा) कधी घट्ट मित्र झाला ते कळलंही नाही.

अखेर त्या शेवटच्या स्टेशनवर येऊन थांबलेल्या गाडीतून बाहेर पडल्यानंतर, आता नेमक्या कुठल्या रस्त्याने जावं हे ठरवण्यातच काही वर्षं सरली… त्यात शरीरही थकलं आणि मनही.  

‘ घरात त्या शेजारच्यांसारखं फर्निचर हवं… अमकी सारखी क्रोकरी हवी… तमकीसारखा फ्रीज हवा… घरातल्या प्रत्येकासाठी स्वतंत्र आणि सुसज्ज खोली हवी… आणि ओघानेच ती ‘डेकोरेटिव्ह’ हवी…’ या सगळ्या हव्यासापायी किती सामान साठवलं होतं घरात ते आता प्रकर्षाने जाणवायला लागलं… पिल्लं आकाशाचा वेध घेत घरातून उडून गेलेली… आणि आता आम्हीही त्या सामानासारखीच एक अडगळ बनायला लागलेलो…

काय करावं… कितीतरी गोष्टी आता अनावश्यक वाटायला लागल्या होत्या. म्हणजे त्यांची अडगळच वाटायला लागली होती… कमी करायला हवी ती अडगळ. पण कशी?…एकट्याला झेपणारं कामच नव्हतं ते…

किती ठिकाणी… किती जणांना विचारलं… मदत करता का म्हणून… जाहिरातही दिली… पण खात्रीशीर कुणी भेटलंच नाही. मग काय… हे सगळं स्वत:च आवरायला लागणार या विचारानेच हतबल झाल्यासारखं वाटलं… कुठून सुरुवात करावी या विचारात एक दिवस नुसतीच बसून राहिले होते… आणि…

आणि अचानक आणखी एक घर मला कळवळून हाका मारतंय्… माझ्यातलीही अडगळ काढून टाक म्हणून विनवण्या करतंय् असं जाणवायला लागलं… आणि क्षणभरात लख्खकन् ते घर डोळ्यासमोर आलं… हो… ते दुसरं घर… माझ्या मनाचं घर… आणि माझ्याही नकळत क्षणार्धात मी त्या घरात पोहोचले सुध्दा… स्थळकाळाचं भान हरपून गेल्यासारखी… आणि ते घर पहातांना आपोआप डोळे विस्फारले…

बापरे… या मनातल्या मूळच्या सुंदर-नितळ घराला ना भिंती… ना छप्पर… ना दार… ना कड्या कुलुपं…आणि आपोआपच अडगळ साठवायला जागाच जागा… आणि खरोखरच साठलेली प्रचंड अडगळ… नुसती अडगळ नाही… त्यावर घट्ट चिकटलेली गडद जळमटं… कधी कशी साठत गेली ही एवढी अडगळ? आठवायचा प्रयत्न करायला लागले. खरं तर कितीतरी गोड-सुखद आठवणींची प्रसन्न हिरवाईही होतीच की त्या जोडीने. पण या दाट जळमटांनी ती पूर्ण झाकून टाकली होती. एक एक जळमट प्रयत्नपूर्वक झटकायला लागले… आणि… हळूहळू सगळं दिसायला लागलं…

‘‘बाबांनी ताईला मात्र झालरी झालरींचा सुंदर फ्रॉक आणला… आणि मला मात्र हा असा… फुलंबिलं आहेत यावरही… पण रंग कसला? काय तर म्हणे मी कपडे खूप मळवते…” इथूनच सुरूवात… हा विचार एका कोप-यात दडून गेलेला… पण नेमकाच आठवला… आणि झाली सुरूवात… किती-किती गोष्टींची अडगळ होती त्या घरात…

‘ माझी काहीही चूक नसतांना बाईंनी मला शिक्षा केली… आणि चूक करणारी ती दुष्ट मुलगी माझ्याकडे पाहून कुत्सित हसली ’… तिचं हसणं विसरूच शकत नव्हते मी… ते आत्ता असं इथे पुन्हा दिसलं. 

‘ तो मला असं म्हणाला ’… ‘ ती मला विनाकारण असं बोलली ’… ‘ आणि तो काय समजतो स्वत:ला… जगातला काही एकमेव मुलगा नाहीये तो ’… अश्रूंनी माखलेला हा विचार… अश्रू सुकले तरी अजून आहेच की एका कोप-यात…

‘ सासूबाई किती भेदभाव करतात माझ्यात आणि माझ्या जाऊबाईंमध्ये… नणंदेमध्ये ’…. ‘ ‘ यांना ना काही कौतुकच नाहीये माझं… त्या तिच्यासारखी बायको मिळायला हवी होती यांना, मग कळलं असतं…’

…हे असले विचार निरर्थक आहेत हे समजेपर्यंत त्यांची अडगळ फारच साठते आहे मनात हे लक्षातच कसं नाही आलं आपल्या?…’ पण हा विचारही नकळत बारगळला प्रत्येक वेळी… आणि तितक्याच नकळत या अडगळीत दिसेनासा झाला.

… ‘ यांना कशी बाई अशी पटकन् छान नोकरी मिळते?’

… ‘ त्या काल बदलून आलेल्या क्लार्कवर साहेबांचा जास्त भरवसा… आणि आम्ही इथे मरमर काम करतोय्… त्याची दखली नाही?…’

…‘ तिला कसा इतका छान फ्लॅट मिळाला?… आमच्या मेलं नशिबातच नाही…’

…‘ यांना ब-या हव्या तिथे बदल्या मिळतात… आम्ही आपली गाठतोय वर्षानुवर्ष… दोन दोन तास खर्च करायला लावणारी लोकल… सकाळ… संध्याकाळ…’

… बापरे बापरे… आता आपोआप दिसायला लागले अनेक वेगवेगळे स्टँड आणि त्यावर दाटीवाटीने अडकवलेली ही इतकी प्रचंड अडगळ… किती भक्कम असतील हे स्टँड… असूया – मत्सर -द्वेष – हेवेदावे – हाव – असंतुष्टपणा – राग – संताप – गढुळलेले विचार… अस्वस्थता.. अशांतता… अशी आणि आणखी कितीतरी लेबलं लावलेले स्टँड आणि त्यांना लटकलेल्या असंख्य आठवणींची… वेळोवेळी मनात आलेल्या अविचारांची अक्षरश: ‘अडगळ’.

… आणि जाणवलं… रहात्या घरातली अडगळ तशीच ठेवून निरोप घेणं फारसं अवघड नसावं… पण ही मनातल्या घरातली अडगळ स्वच्छ न करता निरोप घेणं, म्हणजे ती तशीच सोबत घेऊन जाणं भाग पडणं… नको नको… रिकाम्या हाताने आणि रिकाम्या मनाने आलो होतो… तसंच अगदी तसंच… परत जायला हवं… तेव्हा हात तर रिकामेच असतील आपोआप… पण मन मात्र जाण्याआधी स्वत:च प्रयत्नपूर्वक रिकामं करायला हवं… त्यासाठी कितीही पैसे मोजले तरीही कुणी येणार नाही मदतीला हे प्रकर्षाने जाणवलं, आणि नकळत मनानेच निर्धार केला… त्याहीपेक्षा हिंमत बांधली… कंबरच कसली म्हणा ना… आणि केली तर आहे आता सुरुवात… बघू… प्रयत्न तर चालू आहे मार्ग शोधण्याचा… पण ही मनातली अगम्य आणि मनाइतकीच अथांग पसरलेली अडगळ किती आणि कशी आवरता येणार आहे हे तो परमात्माच जाणे… पण त्याच्या चरणी एकच प्रार्थना आहे… ही अडगळ मनातून पूर्ण काढून टाकून अगदी स्वच्छ-निर्मळ आणि निरपेक्ष मनाने त्याच्याकडे पोहोचेपर्यंत पुरतील एवढे दमदार श्वास मात्र त्याने पुरवावेत… त्याच्याकडून आता एवढीच अपेक्षा आहे.      

माहिती संकलन : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ते सतरा दिवस – भाग -2 ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

? इंद्रधनुष्य ?

☆ ते सतरा दिवस… – भाग-2 ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

(निराश होता कामा नये हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचला. सर्वांनी एका आवाजात साहेबांच्या शब्दांवर प्रतिध्वनी उमटवला, जय हो !!) — इथून पुढे 

आजचा तिसरा दिवस, बहात्तर तास उलटून गेलेले बाहेरचं जग पाहून. विजेची लाईन शाबूत असल्याने त्या उजेडात एकमेकांना पाहू तरी शकत होतो. पाण्याच्या बाटल्या, रेशनिंगचं धान्य संपत आलेले.  हेल्मेटमधे तांदूळ शिजवून गिळत असलेलो. काही ठिकाणी डोंगरातून पाणी ठिबकत असलेलं. तिथेही हेल्मेट उपडी ठेवलेली. ते काही वेळानं जुजबी भरत असे. सुकलेला गळा ओला करायला तेवढंसं पुरे. पण ..  पण हे असं किती दिवस? हा यक्षप्रश्न आ वासून उभा ठाकलेलाच. नुकतंच थोडंफार पोटात ढकलून आडवं पडणं झालं, डोळे पेंगुळत असलेले…. 

… तेवढ्यात सरसर आवाज आला. वाटलं जनावर वगैरे काही आलं की काय? आवाजाच्या रोखानं मोबाईलची बॅटरी रोखली तर काय सहा इंची पाईप बोगद्यात तोंड उघडत असलेला. त्यातून पाठोपाठ अनोळखी आवाज येत असलेला. ” कैसे हो सब लोग?” बोगद्यातील सर्वजण चित्कारलेच. “ ठीक है भैया, कैसे तो भी गुजारा कर रहै है. हमें यहां से निकालो जल्दी.”  आमचा आवाज ऐकून बाहेर एकच गलका झाला असावा. लगेच, “ डरो मत, हम कोशिश कर रहे हैं. जल्दही आप निकल पाओगे. धैर्य रखना, बौखनाग की कृपा से सब बाहर आओगे.” सर्वांना आठवलं, मागच्याच आठवड्यात तर बौखनागचं मंदिर पाडलं होतं. तोच कोपला असेल. सर्वांनी हात जोडून त्याचा धावा सुरू केला. त्या सहा इंची पाईपमधून पाण्याच्या बाटल्या यायला लागल्या. मग बिस्कीटांचे पुडे, ड्रायफ्रूटचे पॅकेट्स, फळं. चला, निदान शिदोरी वाढत असलेली पाहून सर्वांचे डोळे चमकले. त्या खाऊपेक्षाही बाहेरच्या जगाशी संपर्क होत असलेला पाहून हायसं वाटलं. त्यातून येणारा आवाज तर वॉकीटॉकीपेक्षाही स्पष्ट होता. 

नियमित खुराक मिळण्याची सोय तर झाली. गोळ्या औषधंही आली पाईपमधून. सगळ्यांचं मनोबल वाढावं म्हणून मनोचिकित्सक ही हजर पाईपच्या दुसऱ्या टोकाला. तितकंच बरं वाटलं. थोडंफार निर्धास्त होता आलं. कुणीतरी आपल्यासाठी धडपडतंय ही जाणीव सुखावहच. आणखीन दोन दिवसांनी तर घरच्यांचा आवाज पाईपमधून. कोळशाच्या खोलीत कोंडणारी आई  गलबलून हुंदका देत बोलत होती, 

“बबुआ कैसन बा?” कोळशाच्या खोलीत रमणारा बबुआ हमसून हमसून रडत बोलत होता, “ ठीक हूं मैय्या, फीकर मत करना, टेम से तू खाना खा लेना. ” सर्वांचेच डोळे पाणावले. 

दहाएक दिवसांनी गरम गरम जेवण मिळू लागले. छोले, पराठे अन् खिचडी.  शीख बांधवांनी लंगर चालू केलंय वाटतं. वाहे गुरू त्यांचं भलं करो. रोज चिणल्या गेलेल्या भिंतीतून मोठाले पाईप टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे हे बातम्यांसारखं सांगितलं जायचं. मधेच अडथळे यायचे. काम थांबवावं लागायचं. प्रगती खुंटायची. काहीच कळायचं नाही. बाहेर तरी निघू की नाही ही साशंकता. मग इतके दिवस नेहेमी सोबतीला असणारे, एकमेकांचेच चेहरे पाहून कंटाळलेलो, एकमेकांवरच चिडचिड करू लागलो. काहींनी तर त्रागाही केला. इंजिनीयर साहेबांनी मग वेगवेगळे खेळ खेळण्याची टूम काढली. काहींचे मोबाईल अजूनही चालू, त्यांनी मोबाईलवरच लुडो खेळायला सुरुवात केली. इंजिनीयर साहेबांनी मग मोजकेच चार्जर मागवून घेतले. चार्ज केल्यावर फोन तर लागत नव्हते, पण त्यातील खेळ व जुने मेसेजेस वाचून, दिवस वा रात्र ते काहीच कळत नव्हतं, तरीही पण ढकलत होतो.  सगळेच्या सगळे काही मोबाईल वेडे नव्हते.  मग काहींनी दगडावर रेघोट्या ओढून चल्लस खेळायला सुरुवात केली.  काही दगडी चेंडूने क्रिकेट खेळायला लागले, बोगद्याच्या भिंतीवरच स्टम्प्स उगवले. एकाने चार पाच गोल दगड  एका पाठोपाठ वर फेकत जगलर्स स्कील ही दाखवले. काहींनी गाणी म्हणायला सुरुवात केली. त्यात बंगाल्यांनी तर कहरच केला. अगोदर ऐकायला गोड वाटलं, पण किती गावं? सारखं तेच तेच कानी यायला लागलं, आमार शोनार बांग्ला आणि बाऊल गीति, काय काय ते. सगळ्यांचे कान किटले.  फिल्मी गाण्यांची अंताक्षरीही काही काळ चालली मग त्याचाही वीट आला.  

कितीही मन रमवण्याचा प्रयत्न करत असलो तरीही मोकळ्या वातावरणाची आस प्रत्येकाच्या मनात. जसजसा वेळ सरकत होता तसे बोगद्याच्या भिंती खायला उठतात की काय? वाटायचे. एकमेकांना धीर देणं तर चालूच होतं, पण बोगद्यामधला मुक्काम लांबतच चाललेला. घरच्या माणसांची ओढही बळावत चाललेली.  कधी त्यांची गळाभेट घेऊ असं होऊन गेलेलं. उद्या सकाळपर्यंत बाहेर निघणार, अगदी चार पाच तासच उरलेत म्हणता म्हणता विघ्न समोर ठाकल्याचंही कानी यायचं. मशिन बिघडलं, बंद पडलं. अडकून पडलं. दोन दिवस अधिक लागतील.  ऐकून ऐकून कान विटले. देवाचा धावा तर सारखा चालूच होता. नवसाचंही बोलून झालं होतं. मधेच दिवाळी होऊन गेल्याचं कळलं. बाहेरच्या जगात सगळ्यांसाठी दिवाळी होती. बोगद्यात व मनात तर अंधारच अंधार दाटलेला. 

थोडक्यावर अडून पडलंय. नवीन खुदाई सुरू झालीय. काही हाताचेच अंतर बाकी आता. इंजिनीयर साहेबही तांत्रिक भाषेत बोलत होते. बाकी सगळे कधी शिळा उघडते, सीम सीम खुलजाच्या धर्तीवर याची प्राण कंठाशी आणून वाट पहात होते. काहीही करत नसले तरी सगळे दमूनभागून पेंगुळलेल्या डोळ्यांनी निपचित पडले होते. तेवढ्यात धपकन् काही पडल्याचा आवाज आला, पाठोपाठ खणन् खणन्  व लगेच कटरचा चिरपरिचित आवाज येऊ लागला.  तो आवाज पहिल्यांदाच मंजुळ नादमय वाटला. सर्वांचे डोळे बंद झालेल्या बोगद्याच्या मुखावर. त्याला चिरे पडू लागले. मोठमोठाले घाव हातोड्याचे व मग भगदाडच पडले एकदम. सरसर पाईप सरकत आत आला.  त्यातून नवा चेहरा व नवा उजेडही आत आला. सगळ्यांनी आरोळी दिली, जय हो !! तो आवाज बोगदाभर घुमला. धुळीने माखलेल्या चेहेऱ्यांवर आनंद पसरला. कुणी नाचू लागले, कुणाला अश्रू आवरेना. बौखनाग बाबांचा जयघोष केला गेला. आता खरी दिवाळी साजरी होईल याची खात्री पटली.  शेवटी एकदाचे गिळू पाहणाऱ्या बोगद्याच्या कराल जबड्यातून बाहेर येत मोकळा श्वास घेतला. हुश्श ! एक दुःस्वप्न विरलं !! 

– समाप्त – 

© डॉ. जयंत गुजराती

२९/११/२०२३

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आपण इतके तुसडेपणाने का वागतो ?” – लेखक : श्री दिलीप ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “आपण इतके तुसडेपणाने का वागतो ?” – लेखक : श्री दिलीप ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

हल्ली एक बदल अगदी ठळकपणे दिसून येतो. पूर्वी कुठल्याही सणा – समारंभाला माणसे जमली की एकमेकांना भेटत असत. गप्पा तर संपता संपत नसत. कार्यक्रमस्थळी म्हणजे घरामध्ये, मंडपामध्ये, कार्यालयामध्ये एखादे कुटुंब शिरले की त्याचे सहजपणे विभाजन होऊन पुरुष मंडळी पुरुष गटात, स्त्रिया त्यांच्या गटात तर लहान मुले इतर मुलांमध्ये झटकन मिसळून जात असत. पुरुष पानसुपारीच्या तबकाभोवती किंवा एखाद्याची चंची उघडून गप्पाष्टक सुरु होत.कुठलेही खेळणे उपलब्ध नसताना मुलांचा धुडगूस सुरु होत असे. तमाम स्त्रियांच्या वनितावृंदाचा खास एपिसोड सुरु होई. त्यावेळीही एकमेकांत मानापमान,हेवेदावे, रुसवेफुगवे,वितुष्ट,असूया, धुसफूस, अबोला असायचा,पण तो ठराविक मर्यादेपर्यंत. मुलांचे एकमेकांना चिडवणे, बोचकारणे असायचे. तरीदेखील यासर्व गोष्टींच्या अस्तित्वासह माणसं एकमेकांना भेटत होती, एकमेकांकडे जात होती, बोलत होती.हे सारे अगदी बळवंतराव, सदुकाका, दामुअण्णा, अनुसूयाकाकू, गंगामावशी, सिंधूआत्या, बंड्या, चिंगी, चंदू यांच्यापासून ते अगदी वसंतराव, विश्वासराव, मालती, उषा, मोहन, किशोर यांच्यापर्यंत व्यवस्थित चालू होतं !

आता मात्र बदल इतका झालाय की लोकांचा एकमेकांशी संवाद जवळजवळ बंदच झाला आहे. हल्ली घरांमध्ये होणारे छोटेखानी समारंभ बंद झाले आहेत. मध्यम कार्यक्रम किंवा मोठे कार्यक्रम हॉलमध्ये साजरे होतात. त्याला इतकी माणसं निमंत्रित असतात की यजमानाची तुमच्यावर एक नजर पडली तरी खूप झाले. मग जमलेली माणसं आपापला गट करूनच स्थानापन्न होतात मग लगेचच स्क्रीनमग्न होतात. समारंभ कसला आहे, कोण कोण आलंय, काय चाललंय यांच्याशी कसलाही संबंध नसल्यासारखी माणसं मोबाईलमध्ये व्यस्त होतात. हा ‘ शब्देवीण संवादु ‘ संपला की थोडंसं जुजबी बोलायचे… ‘ अरे आहेस कुठे हल्ली तू ? काय नवीन विशेष? US ला गेला होतास ना तू? ‘ ‘ काय ग किती बारीक झालीस, ड्रेस काय मस्त आहे, तुझी मुलगी काय क्यूट दिसते, मुलगा काय ICSE ला ना,’ ..  असले औपचारिक संवाद घडतात. तेवढ्यात कुणाचा तरी मोबाईल वाजतो आणि हा संवादसुद्धा थांबतो. कुणी आपणहून कुणाशी बोलतच नाही. प्रत्येकाला दुसऱ्याबद्दल असे वाटते की ” तो हल्ली स्वतःला खूप शहाणा समजतो ” ! बरं, हे सगळे बाजूला सारून जर एखादा आपणहून सर्वांकडे जाऊन बोलू लागला तर इतरांना वाटतं ” हा हल्ली ज्याच्या त्याच्या गळ्यात का पडतो कुणास ठाऊक “!…… हे सगळे अनुभवल्यावर असे वाटते की काय झालय आपल्याला ? का आपण हल्ली इतके तुसडेपणाने वागतो ?

मला त्याची कांही कारणे अशी वाटतात. माणसांचे एकमेकांवरील अवलंबित्व संपत चालले आहे. सक्तीची एकत्रित कुटुंब पद्धती, पैशांचे पाठबळ, मनुष्यबळ, रात्री अपरात्री लागू शकणारी मदत, सुरक्षितपणा, धंदेवाईक असलात तर व्यवसायबंधूंचा आधार, अशा अनेक गोष्टींमुळे पूर्वी माणसं एकमेकांशी जोडलेली राहत असत. आता एकत्र कुटुंब मोडून विभक्त कुटुंब झाली. माणसांचे उत्पन्न वाढले त्यामुळे खर्च करण्याची शक्ती वाढली. बँकांमधून मिळणारी कर्ज, एटीएम इत्यादींमुळे पैशाची आकस्मिक गरज भागते. पैसे टाकले की मनुष्यबळ उभे करता येते हा आत्मविश्वास. घरात आजारी माणसाला सांभाळणाऱ्या माणसापासून मंगल कार्यातील केटररच्या सेवेपर्यंत सर्व काही उभे करता येते. अपरात्री फोन करून रुग्णवाहिका येते तर मृत्युप्रसंगी सर्व काही सांभाळणाऱ्या व्हॅन मागवता येतात. ऑनलाईन खरेदी विक्रीमुळे तर दुकानात जायची देखील आवश्यकता राहिली नाही.

समाजाऐवजी गटसमूह तयार होतायत. त्यात राहूनही माणूस एकाकी पडतोय. मानसिक – भावनिक आधार तुटत चाललाय. अपयश, दु;ख, आजारपण अशा गोष्टींमुळे खचून संपूर्ण कुटुंबच जेव्हा आत्महत्त्या करते तेव्हा असे वाटते की काय झालय आपल्याला ? वरकरणी सर्वत्र भरभराट आणि ऐश्वर्य दिसत असतांना अति ताणामुळे मधुमेह, रक्तदाब, हृद्रोग वेगाने वाढतोय. माणसा – माणसांमधील सहज आणि नैसर्गिक संवादामुळे होणारे भावनांचे अभिसरण ( ventilation ) थांबलंय ! जुनी मुरलेली मैत्री विसरून मित्र आपापल्या मोठेपणाच्या कोषात जाऊन बसतात. लग्नप्रसंगी, शुभकार्यात पूर्वीची एकमेकांना मदत करण्याची पद्धत गेली. आता तर अगदी सख्खी भावंडंसुद्धा एकमेकांशी बोलत नाहीत….. मग पुन्हा माणूस ‘ एकला चालो रे ‘ कडे वळतो. तुडडेपणाचे एक नवीन आवर्तन सुरु होते !

कळतच नाही आपण असे का वागतो?

पहा … तुम्हाला काही उत्तर सुचतंय का ?

काही सुचले तर अवश्य शेअर करा. 

आपल्यातील माणुसकी एकदमच संपायच्या आत आपणच काही करू शकलो तर परत एकदा आनंदी समूह म्हणून रहायला लागू.

लेखक : श्री दिलीप

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “डिसेंबर अर्थात मार्गशीर्ष…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “डिसेंबर अर्थात मार्गशीर्ष…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

इंग्रजी डिसेंबर महिन्याची सुरवात आणि मराठी मार्गशीर्ष नुकताच लागलेला, म्हणजे आनंददायी, उत्साहवर्धक वातावरण.मस्त हवीहवीशी गुलाबी थंडीची सुरवात असते.ह्या थंडीला गुलाबी विशेषण देणा-या रसिकाला सँल्युट. ह्या दिवसात हवामान एकदम मस्त, दुधदभतं, फळफळावळ,भाजीपाला ह्यांची रेलचेल. दिवसभर भरपूर उत्साहाने काम करायचं मग आपल्या सुखाच्या,हक्काच्या झोपडीत परतायचं,रात्री मस्त मऊमऊ ,उनउनं खिचडी, गरमागरम टोमॅटो चं सूप ओरपायचं आणि मग मस्त दिवसभराच्या दगदगीनं मस्त मऊमऊ गोधडीत अवघ्या काही मिनीटातच निद्रादेवीच्या अधीन व्हायचं, खरचं सुखं, सुखं म्हणतात ते हेच,आपल्यापाशीच असतं फक्त आपल्याला हुडकून त्याच्या आस्वाद घेता यायला हवा.

मार्गशीर्ष मास वा डिसेंबर महिना हे धार्मिक दृष्टीने पण खूप महत्त्वाचे, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार,चंपाषष्ठी,दत्तजयंती ह्याच काळातील.

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात. तसेच या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात.

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीची देवता खंडोबा किंवा मल्लारी ही आहे . मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात . मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदीपावली किंवा मोठी दिवाळी. मुख्यत: चित्तपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना आळवण्याचा हा दिवस. चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव-देवता महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबांत पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा, चोवीस, नऊ अशी कोणतीही असते.

लगेच येणारा उत्सव म्हणजे दत्तजयंती चा उत्सव.मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.

दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.

दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असतं. बडने-या जवळ “झिरी”येथे.दत्तमहाराजांचे जागृत देवस्थान आहे.

असा हा हवाहवासा मार्गशीर्ष व डिसेंबर महिन्याच्या शुभेच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चित्रकाराचे भूत – भाग – २ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ चित्रकाराचे भूत – भाग – २ ☆ श्री सुनील काळे 

(रात्रीच्या ११ वाजल्यानंतर थोडा उशीरा गेलो तर गाड्यांची व माणसांची गर्दी देखील खूप कमी असते व निवांतपणे चित्र पुर्ण करता येईल हे माझ्या लक्षात आले) इथून पुढे

एक दिवस ठरवून माझे चित्रकलेचे स्टॅन्ड ( ईझल ), बसण्याची फोल्डींगची छोटी खुर्ची, कोणी ओळखू नये म्हणून डोक्यावर मोठी क्रिकेटची टोपी, व रंगकामाचे इतर सर्व साहित्य सॅकमध्ये घेऊन मी रात्रीच्या ११ वाजता मेनरोडवर रस्त्याच्या बाजूला निवांत बसलो व रेखाटनास सुरुवात केली. माझ्या डोक्यात फक्त हा रात्रीचा लाईट चित्रात कसा आणता येईल ? हाच विचार चालला होता व वेगळ्या विचारात मी चित्रकामात पूर्ण गुंग झालो होतो.

पाचगणी हे मुख्य शहर आहे व त्याच्या आजूबाजूला दांडेघर, आंब्रळ, खिंगर,  भिलार, राजपूरी, तायघाट अशी छोटी मोठी खेडेगाव आहेत. त्याठिकाणावरून दिवसभर दुकानात, हॉटेलात कामे करून परत त्यांच्या गावाला परतणारा मोठा कामगार व व्यापारीवर्ग आहे. आजही काही कामगार दांडेघर गावाकडे उशीरा निघाले होते. त्यातले काही कामगार थोडी फार नशापाणी करून जाणारेही असतात.

इकडे माझे  ११ वाजता सुरु झालेले चित्रकाम १२ वाजेपर्यंत रंगात आले होते. मी पूर्ण स्वतःचे  देहभान विसरून चित्रात मग्न झालो होतो.आणि अचानक समोरून येणाऱ्या दांडेघरच्या दोन माणसांचा मोठा आरडाओरडा ऐकू आला. 

“ भूत, भूत,चित्रकाराचे भूत……… चित्रकाराचे भूत…….पळा पळा “

असे घाबरून ओरडत ते माघारी पळू लागले हातातल्या पिशव्या सांभाळण्याचेही त्यानां भान राहिले नाही आणि ते वेगाने परत आल्या दिशेने पळू लागले, म्हणून त्यांच्या पाठीमागे येणारे आणखी दोनचार जण घाबरून तेही पळू लागले.

त्यांना असे पळताना पाहून मीही घाबरलो. कारण मला ओळखले तर शाळेत बोंबाबोंब होईल व मला जाब विचारला, तर रात्रीची चित्रे काढतो म्हणून कदाचित नोकरी देखील जाईल या विचाराने  पटापट सामान आवरून मी रस्त्याच्याजवळ एका मोठ्या वडाच्या पाठीमागे जाऊन लपून बसलो.

दांडेघरची ही माणसे आता  राम राम राम राम राम राम राम असे मोठ्यानेच म्हणत  म्हणत दबकत दबकत हळूहळू, दमादमाने सावधपणे येत होती. आणि बघतात तर तेथे कोणीच दिसेना. त्यातला एक प्यायलेलाच होता. तो छाती ठोकून आत्मविश्वासाने सर्वांना सांगत होता….. 

“ म्या इथंच बघितला ते भूत, मोठ्ठी टोपी घातली होती.”

दुसरा त्यात भर घालून म्हणाला.. 

“ अरं इंग्रजाचे होतं ते भूत “

“नाय,अरं बाबा ही पारशांची शाळा होती, म्हंजी भूत पारशीच असणार नव्ह.”

“अरं पारशी चित्रकाराचे भूत म्हंजी जालीम लेका, लई डेंजर असणार ‘

“लई कटकटी असत्यात पारशी लोकं, म्हंजी भूत भी कटकटी आन जालीम असलं तर सोडणार नाय, आपल्या मागंसुद्धा लई कटकट  लागलं. “ एकाने असा अनुभव सांगितला. 

“अरं तुला सांगतो एकदा का धरलं ना, तर आजिबात सोडत नाहीती ही भूत. मानगुटीवर बसत्यात, नाचत्यात, लई हाल हाल करत्यात.” 

मग एका सुरात सर्वजण राम राम राम राम राम राम राम राम राम असं मोठ्याने ओरडत एकमेकांचा हात पकडत त्यांनी जकात नाका पार केला. मी देखील झाडामागे अंधारात रोखून धरलेला श्वास सोडला. रात्रीचे चित्र काढणं एवढ काही सोप्प काम नाही हे माझ्या लक्षात आले व नंतर काही माझी चित्र पूर्ण करण्याची मानसिकता राहीली नाही. सगळा मूडच गेला आणि मी चित्राचे सामान घेऊन गूपचूप पणे परत शाळेत परतलो. 

दुसऱ्या दिवशी शाळेतला दांडेघरचा एक कामगार सर्व स्टाफला सांगू लागला, की रात्री शाळेच्या रस्त्यावर चित्रकाराचे भूत गावातल्या लोकांनी पाहिले….. 

…  भूत असा छोट्या खूर्चीवर बसला होता, लई मोठी हातभर लांब टोपी घातली होती. त्याचे पाय व हात खूप लाबंच्या लांब होते. ते पारशी भूत होते. लई जालीम, लई डेंजर. थोडक्यात वाचली मंडळी, नाहीतर मानगुटीवर बसला असता. 

लई डेंजर भूत होते. यापुढे रात्रीचे सावध रहा,असा सल्ला देखील त्याने दिला. मी देखील हो हो म्हणत  त्याच्याकडे दुर्लक्ष केले. भारी गंमत वाटली. माणसे एखादी घटना अव्वाच्या सव्वा करून कसे सांगतात ते मी अनुभवले.

त्यादिवसापासून आता मी रात्रीची चित्रे काढतो पण घरात बसूनच. रात्री चित्र काढायला कधी बाहेर ऑन दी स्पॉट जात नाही. पण एक नाईटस्केपचा चांगला विषय चित्रित करायचा राहिला याचे शल्य मनात मात्र राहूनच गेले.

आज मागचा विचार करताना जाणवते हे चित्रकाराचे भूत अजब असते. त्याने एकदा पकडले की ते कधीही आपल्याला सोडत नाही. आजही डोंगररांगा, शेतीची हिरवळ, समुद्र, बोटी, झाडे, इमारती, टेबललॅन्डची पठारे, वाईची मंदीरे, घाट, महाबळेश्वरचे  सृष्टीसौंदर्य पाहिले की  मनात परत परत चित्रे काढण्याची उर्मी नव्याने दाटून येते व आपण चित्रवेडाने पछाडलेलो आहोत याची पुन्हा खात्री होते. या  चित्रकाराच्या भूताने आपल्याला पछाडल्यामूळे, झपाटल्यामूळे कितीतरी असामान्य कलाकृती आपल्या हातून घडून गेल्या. 

कितीतरी मोठी माणसे अनपेक्षितपणे आपल्या जीवनात आली. आपली आर्थिक परिस्थिती पार बदलून गेली. चित्रकाराच्या भूतामूळे आपले जीवनच पालटले. हे भूत तुमची ध्येये सतत आठवण करून देते व कामाला जुंपते. नवनव्या गोष्टी, संशोधन, साधना करण्यास भाग पाडते. त्यामुळे माणूस सतत उत्साही व कार्यमग्न राहतो.

आपण आपल्या कलेने वेडे झाल्याशिवाय जग आपल्याला शहाणे म्हणत नाही हेच खरे. 

आपण कोणत्याही क्षेत्रात असलो उदा.  लेखन, चित्रकला, शिल्पकला, खेळ, गायन, वादन, संगीत, नाट्य, नृत्य,चित्रपट, शिक्षण, वकील, इंजिनियर्स, पत्रकारिता, डॉक्टर,सरकारी किंवा खाजगी नोकरीत असो किंवा स्वत:च्या उद्योग व्यापारक्षेत्रात असो.आपण कार्य करत असलेल्या त्या त्या क्षेत्रात स्वतःला झोकून पूर्णपणे आंतरबाह्य झपाटलो, पछाडलो तर काम उत्तम होते. 

हाती घेतलेले कार्य मनापासून,आनंदाने उत्साहाने पूर्ण करण्याची प्रक्रिया एन्जॉय करायला शिकलो,त्यातून सर्वांना आनंद घ्यायला व द्यायला शिकलो तर कार्यात सर्वांना यश हे १००% नक्की मिळणारच. 

म्हणून सर्वानांच ज्या त्या आवडत्या विषयातील भूताने पछाडलेच पाहिजे असे मला मनापासून वाटते. ज्यावेळी हे भूत आपल्याला पछाडते त्यावेळी आपली सर्व शक्ती वापरून खरोखर उत्तम कार्य करण्याची असामान्य प्रेरणा मिळते. स्वत:ला विसरून दिवसरात्र आवडीच्या क्षेत्रात यश संपादनासाठी झोकून घ्यावेसे वाटते.

त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

– समाप्त –

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ते सतरा दिवस – भाग -1 ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

? इंद्रधनुष्य ?

☆ ते सतरा दिवस… – भाग-1 ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

“लहानपणी माझी आई मला असंच कोंडून ठेवायची. द्वाड होतो ना मी ! तासनतास खोलीचं दार उघडायची नाही. अगोदर बरं वाटायचं.. खोलीत मी एकटा व भवताली अंधार. कोळशाची खोली होती ना ती ! चार बाय दोनची. मी त्यातही खेळायचो. महिनाभराचा कोळसा त्या खोलीत ओतला जायचा. तीन चार गोण्या तर खास, आंघोळीला व सैंपाकासाठी चूल त्यावरच चालायची. गॅस तर आता कुठे चार वर्षांपूर्वी आला घरात उज्ज्वला योजनेतून. आई फुंकणीने चूल पेटवायची व दोन खोल्यांचे घर धुराने भरून जायचे. आता आताशा तर धूराने आईला धापही लागत होती. गॅस आल्याने तेवढं बरं वाटतं तिला ! खरंतर त्या कोळशाच्या खोलीत कोंडले गेल्यावर मला बरं वाटायचं. खोड्या काढणं, उनाडक्या करणं याने मी गल्ली, मोहल्ल्यात बदनाम. रोज कुणी ना कुणी तक्रार घेऊन यायचंच घरी, आई कावली जायची. व शिक्षा म्हणून मी कोळशात. पण खरं सांगू का त्या उनाडक्या व त्या खोड्या मला जाम आवडायच्या.  कोणीतरी रागावून घरी येतंय आपल्यामुळे याचं समाधानही वाटायचं, मला शिक्षा झाली की सूड उगवल्याचं समाधान आरोप करणाऱ्याला होणार नाही इतकं मला व्हायचं. मग कोळशाने मी काळा ठिक्कर झालो तरी त्याचं काही वाटायचं नाही. काही वेळाने आईच मला बाहेर काढायची. मग रगरग रगडून आंघोळ घालायची. मला घालून पाडून बोलायची. कशाला एवढी मस्ती करतोस? आपण गरीब माणसं, इतकं द्वाड असू नये, तुझ्यामुळे मलाही बोलणी खावी लागतात. अपमान गिळावा लागतो.  त्या गल्लीत आम्हीच तेवढे गरीब, मग माझ्याने आमच्या गरिबीबद्दल बोललेलं मला सहन व्हायचं नाही. मी उट्टं काढण्याच्या प्रयत्नात. बाबा पैका कमवायला बंबईला गेले आणि आम्ही बिहारला पोरकेच. ” त्याने एक दीर्घ सुस्कारा टाकला. 

सगळे त्याचं म्हणणं कान टवकारून ऐकत होते. तेवढंच तर करता येत होतं. एकमेकांशी बोलत राहण्यावाचून पर्याय नव्हता. काहीच कळत नव्हतं, दिवस आहे की रात्र. नेमका काळ ओढवल्यासारखं वाटायचं. जीवाची घालमेल सारखी. सगळे कोंडाळे करून बोलत रहायचे. आजचा तिसरा दिवस बहुतेक. परवाच तर घटना घडलेली. तेव्हा उठलेले अंगावरचे शहारे अजूनही तसेच. कितीतरी वेळा जे घडलं तेच डोळ्यासमोर येत असलेलं सारखं. 

धडामधाडधाड करत दगड माती खाली आली. वाटलं डोंगरच कोसळला. डोक्यावर पडू नये तसे सगळे सावध होऊन पुढे पळाले तसा परतीचा मार्गच बंद झाल्याचे लक्षात आले. अरे देवा !! जो तो हळहळायला लागला. अगोदर तर धुरळाच उठलेला. सगळं अंधूक अंधूक दिसत असलेलं. नुसता आरडाओरडा बोगद्यात. अजूनही दगड खाली येत असलेले. पुढे धावताना कुणी ठेचकाळलं, पडलेही, मग एकमेकांचा आधार घेत हाताला हात धरून उभं राहणं झालं. नेमकं काय घडलंय याचा अंदाज यायलाच अर्धा तास लागला. ज्युनियर इंजिनिअरसाहेब बरोबर होते  ते ओरडले, “ लॅण्ड स्लाईड झालीय बोगद्यात. आपापल्या डोक्यावर हेल्मेट आहे ना ते पाहून घ्या, अजून डोंगर खाली येऊ शकतो. आपण चाळीसच्या वर होतो चमूत. तितकी डोकी आहेत ना शाबूत मोजून घ्या, कुणाला खरचटलं, लागलं तर नाही ना? हाडं वगैरे मोडली नाहीत ना? बांका प्रसंग आलाय. धीर धरा, बघू काय करता येतंय ते. ” धूरळा बसायला लागला तसं सगळ्यांना धीर आला. सगळेच तसे धूळीने माखलेले. अगदी नाकातोंडातही धूळ. कुणी अंग झटकतंय, कुणी खोकतोय. चलबिचल प्रत्येकाची. काय घडलंय याची स्पष्ट जाणीव होत असलेली हळुहळू व पुढे काय वाढून ठेवलंय याची धाकधूक. जीव तसा अधांतरीच प्रत्येकाचा. 

अचानकच घडलं एकदम. बोगदा खोलवर खोदत असताना मागच्या मागे डोंगराने दगड माती लोटून भिंतच उभारली. वाटलं असेल दोन चार फूट लांब पण इंजिनिअर साहेब म्हणाले शंभर दोनशे तीनशे मीटर लांब असू शकते. पहिल्यांदा तर आवाजाबरोबर काळोखच पसरलेला. मग बोगद्याच्या कडेने टाकलेल्या लाईनीतील ब्रॅकेटमधले दिवे पुन्हा लुकलुकायला लागले. जसजसं दिसायला लागलं थोडंफार तसं  ‘आहे रे ‘चा पुकारा सर्वजण करू लागले. सर्व मिळून एक्केचाळीस डोकी गणली गेली. इंजिनीयरसाहेब एका दगडावर उभे राहिले. त्यांचेही हातपाय लटलटत असलेले. बाकीचे सगळे मटकन् खाली बसले धुळीतच. अंधुकशा उजेडात साहेब गंभीर दिसत होते. डोक्यावरचं पिवळं हेल्मेट सावरत, दगडावरचा तोल आवरत ते ठामपणे उभे राहिले. खोलवर गेलेल्या आवाजाने बोलू लागले. “ माझ्या बांधवांनो, माझ्या आयुष्यातील हा पहिलाच कटोकटीचा प्रसंग उभा ठाकलाय. आपणा सर्वांसमोरच मोठं आव्हान आहे. आपण ज्येठ, कनिष्ठ, लहानमोठं कुणीही नाही. सर्व भारत मातेची लेकरं आहोत. आपण आत अडकलोय हे बाहेरच्यांना एव्हाना कळलं असेल. ते आपल्याला बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करतील, पण आतमधे एकमेकांना सांभाळून राहायची जबाबदारी आपलीच आहे. तेव्हा एकमेकांना सहकार्य करत हा प्रसंगही निभावून नेऊ. देवाची प्रार्थना करूयात. तो जगन्नियंता आपल्याला तारून नेईल यावर विश्वास ठेवा. आपापल्या चीजवस्तू कमीत कमी वापरा. विशेषतः मोबाईल व त्याची बॅटरी जपली पाहिजे. एका दोघांचेच चालू ठेवा, बाकीचे स्वीचऑफ करा, किमान तीन चार दिवस तरी त्यावर काढता येईल. निदान  वेळ व तारीख तरी कळेल. पिशव्यांमधे जे काही हाताशी शिल्लक असलेले धान्य, खुराक याचं रेशनिंग करूयात. आपल्याकडे दोन किलोमीटरचा पट्टा आहे. त्यात हिंडू फिरू शकतो. कमीतकमी हालचाल करूयात , म्हणजे दमणं होणार नाही. आपली ताकद जपूयात.  विश्रांती जास्तीत जास्त घेऊयात. यातूनही मार्ग निघेल, आपले देशबांधव आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाहीत याची खात्री आहे मला.  तेव्हा जय हो !! “

साहेबांच्या शब्दा शब्दागणिक जगण्याचा हुरूप वाढत गेला. निराश होता कामा नये हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचला. सर्वांनी एका आवाजात साहेबांच्या शब्दांवर प्रतिध्वनी उमटवला, जय हो!! 

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares