श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ३६ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- दुसऱ्या दिवशी तिन्हीसांजेला जेव्हा न रडता बाळ छान खेळत राहिलं तेव्हा मात्र सगळ्यांच्या डोक्यावरचं ओझं आपसूकच हलकं झालं. बाबा गेले असले तरी या ना त्या रूपात ते आपल्याजवळच आहेत असा दिलासा देणारी ही घटना जेव्हा पुढे गप्पांच्या ओघात मला समजली तेव्हा ते ऐकून माझ्या मनात त्याबद्दल कणभरही साशंकता निर्माण झालेली नव्हती. पण या घटनेला परस्पर छेद देणारी अशीच एक घटना जेव्हा पुढे माझ्या संसारात घडली तेव्हा मात्र…. ?)
माझ्या संसारात घडलेल्या त्या घटनेने निर्माण झालेल्या जीवघेण्या दु:खाशी कधीकाळी माझ्या आयुष्यात येऊन गेलेल्या व्यक्तींचे धागेदोरे जुळलेले असणे शक्य तरी आहे का? पण ते तसे होते. त्याचा थांग मात्र आज चाळीस वर्षे उलटून गेल्यानंतरही मला लागलेला नाही. ते सगळेच अनुभव इतक्या वर्षांनंतर आजही नुकतेच घडून गेलेले असावेत तसे मला लख्ख आठवतायत!
वर उल्लेख केलेल्या खूप वर्षांपूर्वी आमच्या संपर्कात येऊन गेलेल्या त्या व्यक्ती म्हणजे आमचे किर्लोस्करवाडीचे माझ्या बालपणातले शेजारी. बाबांच्या बदलीनंतर आम्ही कुरुंदवाडहून किर्लोस्करवाडीला रहायला आलो तेव्हा कॉलनीतल्या आमच्या शेजारी रहात असलेले ते पाटील कुटुंबीय. त्यांचा शेजार हा माझ्या आयुष्यातला खरंच अतिशय आनंदाचा काळ होता!
किर्लोस्करवाडीला आमचं जाणं म्हणजे आमच्यासाठी वाडासंस्कृतीतून एका आखीव-रेखीव, चित्रासारख्या सुंदर अशा काॅलनीत रहायला जाणे होते. तिथे शेजार कसा असेल याबद्दल दडपणमिश्रित उत्सुकता आईच्या मनात होती आणि ‘आपल्याबरोबर खेळायला तेथे मित्र असतील ना?’ ही अनिश्चितता आम्हा भावंडांच्या. बहिणींनी बोलून दाखवलं नाही तरी मैत्रिणी कशा मिळतील याची उत्सुकता त्यांच्याही मनात असणारच. आमच्या सर्वांच्या या अपेक्षा एकहाती पूर्ण केल्या आमच्या शेजारी रहाणाऱ्या पाटील कुटुंबाने!
बाबा आधीच चार दिवस कि. वाडीला पोस्टात हजर झाले होते. आई बांधाबांध करुन आम्हा भावंडांना घेऊन आलेली. बाबा स्टेशनवर उतरून घ्यायला आले तेव्हा याच सगळ्या भावना मनात गर्दी करीत होत्या. आम्ही तिथे स्टेशनबाहेर आलो तेव्हा बाबांनी आधीच ठरवून ठेवलेला टांगा आमच्या स्वागताला सज्ज होता. टांग्यात प्रथमच बसायला मिळणार असल्याने आम्ही सर्व भावंडे हरखून गेलो.
“ते बघ. बाळाला घेऊन त्या मुली दारात बसल्यात ना त्याच्या शेजारचंच आमचं घर. तिथं थांबव. ” बाबा टांगेवाल्याला म्हणाले.
‘त्या दोन मुली म्हणजे शेजारच्या पाटील कुटुंबातल्या लिला आणि बेबी या दोन बहिणी. जेमतेम १७-१८च्या आसपास वय असलेल्या त्या दोघी पुरता महिनाही न झालेल्या एका लहान बाळाला वाटीत दूध घेऊन ते कापसाच्या बोळ्यानं एकेक थेंब पाजवत बसलेल्या. ते विचित्र दृश्य पाहून आईचा जीव कळवळला. प्रवासातून दमून आलेली असूनही घरात न जाता आई पहिल्या पायरीवरच थबकली.
“एवढ्या लहान बाळाला असं बाहेर दूध पाजवत कां बसलायत ? गार वारं नाही कां गं लागणार त्याला? उठा बरं. त्याला आत न्या. आणि तुम्ही का करताय हे सगळं? बाळाची आई कुठे आहे?” आई म्हणाली.
त्या दोघी एकदम गंभीर झाल्या. मग कसनुसं हसल्या.
“आईला घटप्रभेच्या दवाखान्यात बाळंतपणासाठी नेलंय. तिला खूप बरं नाहीये. म्हणून या इवल्याशा चिमणीला इथे घेऊन आलोय. बाळाला आईजवळ ठेवू नका असं डॉक्टरांनी सांगितलंय. मग काय करायचं? आईला अजून पंधरा दिवसांनी सोडणारायत. “
त्या दोघींमधल्या मोठ्या बहिणीने, लिलाताईने तिच्या वयाला न शोभेल अशा पोक्तपणे सांगितलं. ते ऐकून आई कळवळली.
“तुम्ही सगळे आज येणाराय असं काकांनी सांगितलं होतं. आम्ही दोघी वाटच पहात होतो. बरं झालं आलात. महिनाभर होऊन गेला शेजारचं घर रिकामं झाल्याला. आम्हाला करमतच नव्हतं. ” लिलाताई मनापासून म्हणाली आणि बाळाला घेऊन उठली.
“वहिनी, तुम्ही हातपाय धुवून घ्या. मी चहा करून आणते तुम्हा सगळ्यांचा”
“छे.. छे. मुळीच नाही हं. यांना अजिबात आवडायचं नाही. मला तर नाहीच नाही. तुम्ही या पिल्लाला घेऊन आत जा बरं आधी. काळजी घ्या त्याची. कांही लागलं सवरलं तर कधीही हाक मारा मला. संकोच नका करू. “आई म्हणाली.
त्या पाटील कुटुंबियांंचा औपचारिक परिचय होण्यापूर्वीच अशी आपुलकीची देवाण-घेवाण झाली आणि त्यामुळेच नवीन बि-हाडी आमचा गृहप्रवेश होण्यापूर्वीच दोन्ही कुटुंबात आपुलकीचं, माणुसकीचं नातं अलगद रुजलं गेलं तसंच नंतर अधिकच घट्ट होत गेलं!
ही १९५९ सालातली गोष्ट. सुरुवातीच्या भागांमधे उल्लेख आलेत त्यानुसार बाबांच्या निवृत्तीनंतर माझ्या काॅलेज शिक्षणासाठीची सोय म्हणून आम्ही मिरजेला रहायला आलो ते १९६७ मधे. या आठ वर्षांच्या प्रदीर्घ काळांत येईल त्या परिस्थितीला तोंड देता देता बऱ्याच चढउतारांना सामोरे जात आमची दोन्ही कुटुंबे परस्परांशी मनाने जोडली गेली होती. आम्ही कि. वाडी सोडताच मात्र नंतरच्या काळात आमच्या भेटी आणि संपर्कही जवळजवळ राहिलाच नाही. याला अपवाद ठरली ती एकटी लिलाताई आणि त्यालाही निमित्त ठरली होती तिची दत्तमहाराजांवरील श्रध्दाच!योगायोग असा कीं तिच्या मनात ही श्रध्दा मूळ धरु लागली ती माझ्या बाबांना गाणगापूरला मिळालेल्या प्रसादपादुकांमुळे आणि त्या पादुकांच्या आमच्या अंगणातील लहानशा मंदिरामुळे!
या सगळ्याचाच मागोवा घेणं, माझ्या संसारात अचानक घडलेल्या ‘त्या’ दु:खद घटनेमागचा कार्यकारणभाव शोधण्यासाठी अपरिहार्य तर आहेच तसंच जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म या अखंड चक्रामधल्या गूढ रहस्याची दारं थोडी कां होईना किलकिली होण्यासाठीही.. !
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈