मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्टोईसीजम —प्रतिक्रिया नाही प्रतिसाद ! ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्टोईसीजम — प्रतिक्रिया नाही प्रतिसाद ! ☆ प्रा. भरत खैरकर 

जरा विचार करा की आधी किती वेळा आणि कधीकधी तुम्ही तुमचा आत्मविश्वास हरवला होता. आणि तुम्ही त्याला कसे सामोरे गेले होते. आपण स्वतःच आपल्या कृतीचे कारण असतो. जी काही आपली प्रतिक्रिया वा प्रतिसाद असतो. तो आपल्यातील मूल्य आणि आपली जडणघडण, विचारसरणी यावर अवलंबून असतो. ह्यातूनच ग्रीक तत्वज्ञान ‘स्टोईसीजम’ आले आहे जे आपल्याला जीवनामध्ये येणाऱ्या विविध समस्यांना धैर्याने सामोरे जाण्याची शिकवण देते.

आपल्या मेंदूला, मनाला प्रशिक्षित करण्याची एक कला आहे. यामध्ये फक्त आपण स्वतःला नियंत्रित ठेवणे, रिऍक्ट न होणे, स्वतःला रागात झोकून न देणे, शांत ठेवणे. स्वतःला सतत वर्तमानात ठेवणे.. जमिनीवर ठेवणे. आजूबाजूच्या गोष्टीचा परिणाम न होऊ देणे. जीवनाकडे प्रायोगिक पद्धतीने बघणे हे तत्वज्ञान सांगतं. आपणाशी घडणाऱ्या निगडित असणाऱ्या कितीतरी घटनांबाबत आपलं नियंत्रण नसतं. त्या घटनेला.. प्रसंगाला आपण कसे सामोरे जातो? हे मात्र आपल्या हातात असतं. हा मूळ गाभा ह्या तत्त्वज्ञानाचा आहे.

आपल्या आवाक्यात आणि नियंत्रणात नसलेल्या गोष्टींवर.. परिस्थितीवर प्रतिक्रिया न देता प्रतिसाद देणे ह्या कलेला ग्रीक आणि रोमन लोकांनी एक जीवन प्रणाली म्हणून अंगीकारली स्वीकारली तीच कालांतराने ‘स्टोईसीजम’ नावाने तत्त्वज्ञान रुपात आली. ह्या तत्त्वज्ञानाचा नेल्सन मंडेला, जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस 

जेफरसन, इत्यादींनी आपल्या आयुष्यात वापर केल्याचं आपण बघतो. जीवनामध्ये मूल्याची जपणूक करणे.

ह्याच गोष्टीला महत्त्व आहे. चांगले जीवन जगण्यासाठी भौतिकवस्तूंची गरज.. आवश्यकता नाही. असे म्हणणाऱ्यापैकी हा वर्ग आहे! जोवर आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंपैकी नेमक्या वस्तू स्वीकारत नाही. तोवर बिनकामाच्या बऱ्याचशा वस्तू उपलब्ध आहे म्हणून आपण त्या वापरत असतो. बाळगत असतो‌ हे सत्य आहे.

जन्मापासून सारखं आपण स्वतःला व मुलांना एका ‘शर्यती’त उतरवले आहे. आपला समाजही ह्याच गोष्टीला म्हणजे जगण्याला शर्यत म्हणूनच खतपाणी घालत आहे. त्यामुळे आपण आनंदी असे कधीच नसतो सतत

‘स्पर्धामोड’मध्ये असतो. पैसा, प्रसिद्धी, फीडबॅक, लाईक्स, आदींच्या मागे लागून न संपणारी भूक आपण जागृत केली आहे आणि असमाधानी बनलो आहे. आपण मेंढरं बनलो आहे कळपात चालणारे! कोणीतरी आपल्याला लीड करतो आहे आणि आपण त्याला फॉलो करतोय.. शर्यतीत कितीतरी अंतर कापल्यानंतर मागे वळून बघितल्यावर जाणवतं की, ‘धावलं नसतं तरी चाललं असतं!’ म्हणून आपण जीवनाकडे कसे पाहतो. त्यावरच आनंद अवलंबून आहे.

आपण कुठले मूल्य, भावभावना जपतो हे अधिक महत्त्वाचा आहे. आजूबाजूच सत्य स्वीकारण्याची तयारी ठेवल्यावर समस्या राहत नाही. मूल्य जपणे हाच आनंदाचा ठेवा आहे. असं म्हणणारी स्टोईसीजम ही जीवन पद्धती आहे. चांगलं जीवन जगण्यासाठी मनुष्याने नैसर्गिक नियमाचे पालन केले पाहिजे. प्रत्येक गोष्टी मागे मुळात निसर्गच आहे. असे ही विचारप्रणाली सांगते.

जगाला आहे तसेच स्विकारा. त्यासाठी कठीणात कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला टिकून ठेवण्यासाठी क्षमता वाढवा. स्वतःमध्ये तार्कीक, माहितीपूर्ण आणि शांतीयुक्त अशा स्वभाव गुणांची वाढ करा, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही.. स्वतःची मजबुती वाढवीत राहणे. जरी एखाद्याने चुकीचे केले, तरीही निर्णय घेताना न्याय बुद्धीने समसमान निर्णय घेणे. स्वतःमधील धैर्य वाढविणे. ते केवळ विपरीत परिस्थितीतच न दाखवता जीवनामध्ये रोजच्या रोज बाहेर वाढून ठेवलेल्या.. आलेल्या समस्यांना खुल्या आणि स्वतंत्र विचाराने सामोरे जाणे. स्टोईसीजमचा सेनेका नावाचा तत्वज्ञ सांगतो की, कधी कधी केवळ जिवंत राहणे.. टिकून राहणे सुद्धा धैर्यच असते!

स्टोईसीजम हे स्वतःभोवती किंवा स्वतःलाच महत्त्व देणारे तत्वज्ञान नसून इतरांचाही मानवतेने स्वीकार करायला सांगते. जो व्यक्ती स्वतःमध्ये नियंत्रण आणि मूल्याची जपणूक करणारा असतो तोच इतरांमध्ये पॉझिटिव्ह बद्दल आणू शकतो. मार्कोस इलेरिअस ह्या राजाने १९ वर्षे राज्य केले. खूप लढाया केल्या. त्यामध्ये त्याची मुले मारल्या गेली. सर्वच्या सर्व नाहीसं झालं.. त्यानंतर त्याने लिहिलेलं तत्वज्ञान म्हणजे स्टोईसीजम होय.

हेच तत्त्वज्ञान वापरून नेल्सन मंडेलांनी २७ वर्षे जेलमध्ये आपण कसे टिकून राहिलो आणि वर्णभेदाचा लढा कसा दिला हे सांगितले आहे.. भूतकाळात आपण बदल करू शकत नाही पण भविष्याकडे आपण बघू शकतो. हे सांगून त्यांनी आफ्रिकन जनतेला स्टोईसीजम चा मार्ग अवलंबाचा सल्ला दिला आहे. आपण आपल्या जीवनातील घटनांमधून दुःखी होत नाही तर आपण त्या घटनेला दिलेल्या जजमेंटल प्रतिसादामुळे दुःखी होतो.

कुठलीही परिस्थिती उद्भवल्या नंतर थांबा, पहा, आणि काय करायचं ते निवडा! ती निवड प्रतिक्रियात्मक नसावी ती प्रतिसादात्मक असावी. हे स्टोईसीजम शिकवते. त्यासाठी आपलं अंतर्मन, आत्मशांती ढळू देऊ नका. आतून तुम्ही शांत रहा. आपली विचारसरणी, मूल्य, आत्मसन्मान, कशात आहे? याचा विचार करून प्रतिसाद द्या. त्यासाठी कुठलीही परिस्थिती उद्भवल्या नंतर लगेच प्रतिक्रिया न देता थोडा पॉज घ्या म्हणजे विचार करा.. क्षणभर खोल श्वास घ्या, क्षणिक मेडिटेशन करा आणि त्यानंतरच रिस्पॉन्स द्या प्रतिसाद द्या.. हे करताना स्वतःला तुमच्यासाठी कुठले मूल्य महत्त्वाचे आहेत. हे विचारा म्हणजे म्हणजे तुमचा प्रतिसाद सकारात्मक असेल. कधी कधी दुसऱ्याच्या दृष्टिकोनातूनही समस्याकडे बघायला लागा म्हणजे त्या समस्येला संकटाला समस्या न समजता संधी समजायला लागा. त्यामुळे आपण आपली ऊर्जा व्यवस्थित वापरू शकतो.. स्टोईसीजम त्यासाठी स्वतःचे परीक्षण, रोजचा अभ्यास, मूल्यजपणूक, स्वयंसुधारणा, इत्यादी गोष्टींना महत्त्व देते. चला तर मग आपणही कुठल्याही समस्येला सरळ सरळ प्रतिक्रिया न देता प्रतिसाद देऊया.. आणि आयुष्यात मूल्यांची जपणूक करून सुखी, समृद्ध नि शांत जीवन जगूया !

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “८ मार्च : स्त्री संघर्षाचा इतिहास !” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “८ मार्च : स्त्री संघर्षाचा इतिहास !☆ श्री जगदीश काबरे ☆

भारतात शेतीप्रधान व्यवस्थेमुळे शेकडो वर्षे स्त्रिया शेतात काम करत होत्या. पण ते काम घरचेच काम असल्यामुळे वेठबिगारीसारखे २४ तास चालणारे होते. तसेच अजूनही घरकाम करणाऱ्या गृहिणी असोत की कामकरी स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात शोषण होतेच आहे. त्यातही एक सूक्ष्म फरक आहेच. गृहिणीला धर्म आणि सामाजिक व्यवस्थेतून हे काम म्हणजे तिच्यावरती असलेली सांस्कृतिक जबाबदारी आहे, असे तिच्या मनात ठसवण्यात आले आहे आणि कष्टकरी स्त्रियांच्या बाबतीत धार्मिक आणि जातीय उतरंड त्यांचे शोषण करण्यास कारणीभूत ठरत आहे. आणखी एक व्यवहारिक फरक आहे… तो म्हणजे, गृहिणीला तिच्या कामाचा मोबदला मिळत नाही. पण नवऱ्याच्या पंखाखाली २४ तास सुरक्षितता मिळते. तर कष्टकरी, कामकरी महिलेला मात्र तिचे शोषण होत असले तरी तिच्या कामाचा कमी-जास्त मोबदला मिळतो. पण दोन्ही प्रकारच्या स्त्रियांवर बऱ्याच ठिकाणी अजूनही काळ बदलला तरी पुरुषांची अरेरावी चाललेली असते.

१९व्या शतकात युरोप आणि अमेरिकेत औद्योगिक क्रांतीमुळे स्त्रिया कामगार म्हणून मोठ्या प्रमाणावर कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी घराच्या बाहेर पडू लागल्या होत्या. पण त्या कामाच्या वेळेला धरबंध नव्हता. काम करण्याच्या ठिकाणी प्रचंड गैरसोयी होत्या. कामाचे तास नक्की नव्हते, वेतन अत्यंत कमी होते. त्या विरोधात त्यांनी हळूहळू आवाज उठवायला सुरुवात केली. कामाच्या ठिकाणी स्त्रिया एकत्र असल्यामुळे त्यांना एकत्रितपणे एकजुटीने संघटित उठाव करणे त्यामुळे शक्य झाले होते.

या उठावाची पहिली ठिणगी पडली ती १८२० मध्ये इंग्लंड-अमेरिकेतील कापड उद्योगात. येथील कामकरी स्त्रियांनी ‘द वुमन्स ट्रेड युनियन’ लीगची स्थापना केली आणि त्या युनियन तर्फे त्यांनी आठ तासाचा कामाचा दिवस, पाळणाघर, कामगारांसाठी घर, प्रजनानावरील स्त्रियांच्या नियंत्रणाचा हक्क, तसेच मतदानाचा हक्क अशा विधायक मागण्या केल्या होत्या. अर्थात सुरुवातीला पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे या सगळ्यांना केराची टोपली दाखवली गेली, हे वेगळे सांगायला नकोच. पण स्त्रियांना आपण एकजुटीने आपल्या मागण्या रेटू शकू याविषयी आत्मविश्वास निर्माण झाला.

त्यानंतर ८ मार्च १८५७ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील कापड कारखान्यातील स्त्री कामगारांनी कामाच्या तासांमध्ये कपात, वेतनवाढ आणि चांगल्या कामाच्या परिस्थितीसाठी आंदोलन केलं. पण पोलिसांनी हे आंदोलन चिरडून टाकलं. तरी स्त्रियांचा संघर्ष सुरूच होता.

त्यामुळे पुढच्या काळात ८ मार्च हा दिवस स्त्रियांच्या एकजुटीमुळे विशेषत्वाने गाजू लागला. कसा ते आपण पाहूया…

१) ८ मार्च १९०८ ला न्यूयॉर्क येथील रुदगर्स चौकात हजारो कामगार स्त्रिया एकत्र जमल्या आणि स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी आंदोलन केले.

२) ८ मार्च १९१० मध्ये जर्मनीतील समाजवादी नेत्या क्लारा झेटकिन यांनी महिलांच्या हक्कांसाठी जागतिक स्तरावर हा दिवस पाळावा असा प्रस्ताव दिला.

३)८ मार्च १९११ मध्ये ऑस्ट्रिया, डेनमार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये पहिला महिला दिन साजरा झाला.

४) ८ मार्च १९१७ रोजी रशियात स्त्री कामगारांनी “भाकरी आणि शांतता” या साठी संप पुकारला.

५) ८ मार्च १९३६ या दिवशी हजारो स्पॅनिश स्त्रियांनी फ्रॅंकोच्या हुकूमशाही विरोधात निदर्शने केली.

६) ८ मार्च १९४३ रोजी इटालीतील हजारो स्त्रिया मुसोलिनीच्या हुकूमशाही विरोधात रस्त्यावर आल्या. त्याच वेळेस भारतात स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात पहिला महिला दिन साजरा झाला.

७) ८ मार्च १९७२ रोजी मथुरा नावाच्या आदिवासी मुलीवर पोलीस ठाण्यात झालेल्या बलात्काराविरुद्ध देशभर संतप्त मोर्चे निघाले.

८) ८ मार्च १९७४ ला अमेरिकेने व्हिएतनामवर केलेल्या आक्रमणाविरुद्ध व्हिएतनामी स्त्रियांनी बुलंद आवाज उठवला.

९) ८ मार्च १९७५ ला संयुक्त राष्ट्रसंघाने ‘जागतिक महिला दिन’ म्हणून मान्यता दिली.

१०) ८ मार्च १९७७ रोजी स्त्रियांना ‘समानतेचा अधिकार मिळावा’ असा ठराव संयुक्त राष्ट्रसंघाने पारीत केला.

११) ८ मार्च १९८० मध्ये कॅनडा आणि युरोप मधील स्त्रियांनी सुरक्षित गर्भपातासाठी कायदेशीर हक्क मिळावा या मागणीसाठी मोर्चा काढला. तर भारतात न्याय यंत्रणेला जाब विचारण्यासाठी देशभर मोर्चाचे आयोजन केले गेले.

१२) ८ मार्च १९८१ ला इराणच्या फॅसिस्ट आणि मुलतत्ववादी राजवटीविरोधात तेहरान शहरात सुमारे पन्नास हजार स्त्रियांनी एकत्र येऊन आवाज उठवला.

१३) ८ मार्च १९८३ पासून ‘स्त्रीमुक्ती आंदोलन समिती’तर्फे दरवर्षी ८ मार्चच्या दिवशी त्या त्या वर्षाच्या मागण्या निश्चित करण्याचा कार्यक्रम ठरवले जावू लागले.

१४) ८ मार्च १९९६ पासून संयुक्त राष्ट्रसंघाने दरवर्षी त्या दिवसाची विशिष्ट संकल्पना राबवायला सुरुवात केली.

१५) ८ मार्च २०२५ साठी सर्व स्त्रिया आणि मुलींसाठी ‘हक्क, समानता आणि सक्षमीकरण’ अशी संकल्पना योजली आहे.

थोडक्यात काय तर ८ मार्च दिवस स्त्रियांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक हक्कांसाठी लढा देण्याचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी समान वेतन, कामाचे चांगले वातावरण, मतदानाचा अधिकार, सन्मानाचे आयुष्य यासाठी स्त्रियांचा हा संघर्ष अजूनही सुरूच आहे. म्हणून स्त्रियांसाठी हा दिवस फक्त आनंदाचाच नव्हे, तर अजूनही सुरू असलेल्या लढ्यांची आठवण करून देणारा आहे. कारण अजूनही स्त्रियांना अनेक ठिकाणी पुरुषाच्या तुलनेने कमी वेतन, विषमता, अत्याचार, भेदभाव, शिक्षणाचा अभाव, राजकीय प्रतिनिधित्व कमी असणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो आहे. अर्थात शिक्षणामुळे काही पुरुषांच्या वागणुकीत हळूहळू बदल होतो आहे. त्यामुळे काही घरांमध्ये ‘ही पुरुषी कामे, ही बायकी कामे’, असा भेदभाव नष्ट होतो आहे. तरीही समाजाला स्त्री-पुरुष समानता गाठणे अजून बराच दूरचा पल्ला आहे. तोपर्यंत ८ मार्च म्हणजे स्त्रियांसाठी “लढा, हक्क आणि समानता” या मागण्यांचा पाठपुरावा करणारा दिवस राहील. म्हणून यावर्षी आपण खालील घोषवाक्यांचा उद्घोष करून जागतिक महिला दिन साजरा करूया…

१) स्त्री शक्ती जागी झाली, बदलाची मशाल पेटली!

२) समान हक्कांची लढाई, स्त्रीमध्ये निर्माण होई धीटाई!

३) जग बदलायचंय? तर आधी स्त्रीचा सन्मान करायला शिका.

४) मुलगी शिकली, प्रगतीची वाट झाली मोकळी!

५) मुलगा-मुलगी भेद नसावा, समानतेने संवाद असावा!

६) स्त्री आत्मविश्वासाने उभी राहिली, समाजात क्रांती घडली!

७) न्याय, स्वातंत्र्य आणि समानता, स्त्री जीवनाची हीच खरी इतीकर्तव्यता!

८) स्त्री अंधश्रद्धेतून मुक्त झाली, समाजाची प्रगती झाली.

९) पुरुषी वृत्तीचा करा लोप, स्त्रियांना येईल शांत झोप! 

१०) स्त्रीविना पुरुष अधुरा, पुरुषाविना स्त्री; दोघांनी मिळून सुजलाम सुफला करा धरित्री!

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिला दिन आत्ताच का? ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ महिला दिन आत्ताच का? ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

अनादी अनंत चार युगे उलटली महिला आहे, म्हणूनच जग आहे. हे खरं आहे, जगाला आजच का सजगता आली, स्त्री केव्हापासून पूजनीय वाटू लागली? पूर्वी ती पूजनीय नव्हती का? चाली रूढी परंपरा ही तर भारतीय संस्कृती. विसरलात का! मग आजच नारीचा, नारीशक्तीचा डांगोरा पिटण्यात कुठला पुरुषार्थ (स्रीअर्थ) आला बुवा?

पाश्चात्य संस्कृतीचे अंध अनुकरण का? पूर्वी इतकी स्त्री पूज्यनीय आता आहे असं वाटत नाही का? बिलकुल नाही. पूर्वी जेवढी स्त्री पुजनीय होती, तेवढी आता नाही! होय मी ह्या विधानाचा समर्थन करतोय.

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः—– ह्या विधानात सर्व काही आले व ते खरे केले. पुरुष प्रधान संस्कृतीच आत्ता ज्यास्त फोफावली आहे हे लक्षात ठेवा. बस म्हटले की बसणारी, उठ म्हटले की उठणारी स्त्री म्हणजे हातातील खेळणं आहे असं वाटत काय?

हल्ली काळानुसार सोई सुविधांचा वापर करणे इष्टच, कारण ती गरज आहे. गरज शोधाची जननी! काळ बदलला, नारी घरा बाहेर पडली. कारण परिस्थितीच तशी चालून आली. एकाच्या कमाई वर भागात नाही म्हणून, प्रत्येक क्षेत्रात ती उतरली. व ते साध्य साधन करून दाखवत, ती सामोर गेली व उभी राहिली. ती साक्षर झाली, मिळवती झाली, अर्थ कारण हा पुरुषार्थ तिने सहज साध्य केला. अस जरी असलं तरी तिच्या मागचा चुल, मुलं, बाळंतपण, पाळणा ह्या गोष्टी परत आल्याच व त्या पण साध्य केल्या, हे त्रिवार सत्य!

पूर्वीच्या काळातही परिस्थिती ला अनुसरून महिलांनी घर खर्चाला आधार कैक पटीने ज्यास्त दिला! आठवा त्या गोष्टी गिरणी नव्हती हाताने दळण कांडणच काय? घरातील जनावरांचा पालन पोषण, गाय म्हैस बकरी इत्यादीचे धारा, चारा पाणी, इत्यादी करून दुध दुभते त्या विकून घरार्थ चालवीत. अजूनी खेड्यात ही प्रथा चालु आहेच. जोडीला शेती काण्यात पण स्त्रिया मागे नव्हत्याच!

मथुरा असो की द्वारका तिथं पण हे वरील सर्व व्यवहार सुरळीत चालु होतेच की. नुसतं गौळण श्रीकृष्ण राधा, रासक्रीडा काव्यात जे मांडतो ते, तिथं अस्तित्वात होतच ना? कपोलकल्पित गोष्टी नाहीतच ह्या. स्त्रीया पुरुषां बरोबरीने अंग मेहनत करत. त्या अर्थार्जन करत होत्या! ! !

लग्न झालेली नवं वधु तिचे आगमन, तिच्या हाताचे पायाचे कुंकवाचे ठसे, जोडीने केलेली पुजा असो वा कुलदैवत दर्शन असो तिचे मंगळागौर असो किंवा डोहाळ जेवण इत्यादि गोष्टी ह्या, स्त्री जन्माला आलेला मान पानच, किंवा गौरव च होतो ना! प्रत्येक गोष्टीत तिचा पुढाकार हा महिला दिनच होता ना!

सावित्री, रमा, जिजाऊ, कित्तूर राणी चन्नांमा, झाशीची राणी ह्या सर्व लढाऊ बाण्याची प्रतीकच होती ना?

काळ बदलला, आस्थापना, कार्यशैली बदलली. युग नवं प्रवर्तन घेऊन नवं कार्याचा भाग पण बदलला.

तरी स्त्री आजुनी खम्बीर आहे. कामाचा व्याप क्षेत्र बदलले. पूर्वीपेक्षा अत्याचार, बलात्कार, गर्भपात मात्र दिवसा गणिक वाढते आहे! पूर्वी पेक्षा नारी सुरक्षित नाहीं कारण स्पष्टच. चित्रपट टेलीव्हिजनवर येणाऱ्या मालिका, चंगळवाद यांनी मनोवृत्ती बिघडली आहे.

महिला दिनाच्या निमित्ताने नारी संघटित होऊ पाहत आहे. पूर्वीही संघटीत होत्या. नाही असे नाही. तरीपण आज मात्र ही काळाची गरज आहे!

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्रीची आत्मनिर्भरता जोपासणारे समर्थ रामदास!! ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ स्त्रीची आत्मनिर्भरता जोपासणारे समर्थ रामदास!! ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

स्त्रियांनी शिकावे, स्वत:च्या पायावर उभे रहावे या ध्येयाने प्रेरित होऊन त्यासाठी आयुष्य वेचणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, तसेच विशेषत: निराधार महिलांसाठी याच दृष्टीने सतत प्रयत्नशील असणारे महर्षी कर्वे हे समस्त स्त्री जातीसाठी कायमच अतिशय वंदनीय आहेत यात दुमत असण्याची शक्यताच नाही.

स्त्रीने शिकायला हवे, आत्मनिर्भर व्हायला हवे, या विचाराचे बीज मुळात कुठे रोवले गेले असावे, असा विचार करतांना मात्र मन नकळत १७ व्या शतकात पोहोचले… सज्जनगडावर घिरट्या घालू लागले, शिवथर घळीत रेंगाळले, ते या संदर्भात श्री समर्थ रामदास स्वामींची प्रकर्षाने आठवण झाली म्हणून. याबाबतीत समर्थांनी इतक्या वर्षांपूर्वी उचललेली पावले, आणि एकूणच त्यांच्या प्रागतिक विचारांचा आजच्या महिला दिनाच्या निमित्त जरासा आढावा घेण्याचा हा प्रयत्न…..

समाजाला बरोबर घेऊन जाणारा संप्रदाय अशी समर्थ संप्रदायाची सार्थ ओळख सांगता येईल. त्या काळच्या परिस्थितीत अनेक नको त्या अहितकारी आणि अवाजवी विचारांमुळे आणि अस्मानी तसेच सुलतानी संकटांमुळे अती दीन झालेल्या आणि रूढी-परंपरांना अनेक प्रकारे जखडल्या गेलेल्या समाजाचा कायापालट करण्याचा निर्धार समर्थांनी केला होता हे त्यांच्या चरित्रावरून आणि दासबोध, मनाचे श्लोक यासारख्या त्यांच्या ग्रंथनिर्मितीवरून स्पष्टपणे लक्षात येते. संपूर्ण समाज संघटित करायचा, समाजाचा कायापालट करायचा तर स्त्री-पुरुष समानता आवश्यक आहे, या विचाराची ठाम जाणीव समर्थांना होती, असेच खात्रीने म्हणायला हवे. त्यावेळच्या सामाजिक विचारधारेच्या पूर्णपणे विरोधात जाऊन, समाजाने स्त्रीच्या आत्मसन्मानाची जाणीव ठेवायला हवी हे त्यांनी स्वत:च्या आचरणातून दाखवून दिले होते. ‘परमार्थ’ हा प्रांत फक्त पुरुषांसाठी राखीव नसून, स्त्रियांनाही तो हक्क आहे असे फक्त आवर्जून सांगून ते थांबले नाहीत, तर त्यांनी स्त्रियांनाही आपल्या संप्रदायाचे शिक्षण दिले…आपले लोकहिताचे… लोककल्याणाचे विचार त्यांनाही शिकवले. (‘लोकहित’.. ‘लोककल्याण’ म्हणजे काय या विचारात किंवा व्याखेत त्या काळाच्या तुलनेत आता आमूलाग्र बदल झालेला आहे हे तर यासंदर्भात गृहीतच धरायला हवे. ) समाजाला त्यावेळी आवश्यक असणारी योग्य दिशा दाखवण्याच्या आपल्या सततच्या कार्यात स्त्रियांनाही, अगदी अल्प प्रमाणात का होईना, पण सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी अविचल प्रयत्न केले. त्या काळात त्यांनी एकूण ४० स्त्रियांना सती जाण्यापासून रोखले होते हे वास्तव अनेकांना बहुदा ज्ञात नसावे… हे अंधश्रद्धेविरुद्ध उचललेले पाऊल नक्कीच होते.

आपले उदात्त ध्येय साध्य करण्यासाठी भ्रमंती करत असतांना मिरज येथे त्यांना वेण्णाबाई भेटली… केवळ लग्न झाले होते म्हणून ती ‘बाई’… प्रत्यक्षात ती जेमतेम ११-१२ वर्षांची बालविधवा होती. आणि त्यावेळी ‘मान्यता प्राप्त’ असलेले विधवेचे जीवन जगत होती… घरकाम, देवाचे नाव घेत रहाणे आणि चुकून अक्षर ओळख झालेली असली तर जमेल तसे धार्मिक ग्रंथ वाचणे… एवढंच काय ते ‘जीवन’.

एकदा समर्थ तिच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेलेले असतांना, वेण्णाबाई एकनाथी भागवत वाचत असल्याचं त्यांनी पाहिलं आणि ‘‘ मुली तुला यातले काही समजते का? ” असं विचारलं. आणखीही काही प्रश्न विचारले… समर्थांना तिचं…तिच्या बुध्दीचं वेगळेपण जाणवलं. आणि वेण्णाबाईलाही ‘हेच आपले गुरू’ असं मनापासून जाणवलं…आणि त्यांनी समर्थांचं शिष्यत्व पत्करलं… त्याही काळात त्यांचं वाचन प्रचंड होतं, नकळत अध्यात्माची आवडही निर्माण झाली होती…पण हे सगळं उंबऱ्याच्या आत… चार भिंतीत. पण त्यांच्या वडलांना त्यांची तगमग समजत होती… ज्ञानाची ओढ समजत होती… त्यांनी तिला समर्थांबरोबर जाण्याची परवानगी दिली. आणि हेही त्या काळानुरुप अपवादात्मक आणि म्हणून कौतुकास्पदच होते.

‘‘उत्कट भव्य तेचि घ्यावे। मळमळीत अवघेंचि टाकावे।

निस्पृहपणे विख्यात व्हावे। भूमंडळी॥”

– – हा समर्थांनी त्यांना शिकवलेला पहिला धडा असावा. यातला ‘मळमळीत’ हा शब्द तेव्हाच्या स्त्री जीवनावर लख्ख प्रकाश टाकणारा आहे.

‘उत्कट निस्पृहता धरिली। त्याची कीर्ती दिगंती फाकली। उत्कट भक्तीने निवाली। जनमंडळी॥’

– या विचाराचे बीजही समर्थांनी त्यांच्या मनात पेरलं. त्यांची तैलबुद्धी आणि गोड गळा लक्षात घेऊन समर्थांनी त्यांना सातत्याने ग्रंथवाचन, पाठांतर तर करायला लावलंच, पण एक गायन गुरू नेमून गायनदेखील शिकवलं.. आणि एक दिवस त्यांना चक्क कीर्तनाला उभं केलं. विधवा स्त्रीने लोकांसमोर उभं राहून कीर्तन करणं ही स्त्रीच्या आत्मनिर्भरतेची अनासायाने सुरुवातच समर्थांनी करून दिली होती असं नक्कीच म्हणायला हवं… पण त्या काळात विधवा स्त्रीने असं जाहीर कीर्तन करणं ही खरोखरच एक ‘क्रांती’ होती. समाजाच्या उध्दारासाठी अशी क्रांतीकारक पावलं उचलणा-या सर्वांनाच आधी जननिंदेला, समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतं हे वास्तव आपल्याला ज्ञात आहेच, आणि समर्थ त्याला अपवाद नव्हते.

मानवी जीवनाचा अटळ नियम असा आहे की कालांतराने जीवन मूल्यांमध्ये, जीवनपद्धतीमध्ये परिवर्तन घडावेच लागते… घडवावे लागते. त्यामुळे समाजातील जिवंतपणा टिकून रहातो. त्यासाठी ‘क्षणाक्षणा परीक्षिले पाहिजे लोक’ असं समर्थांना ठामपणे वाटत असे. पण म्हणून त्यांनी स्त्रियांना हे क्षेत्र उपलब्ध करून देतांना उतावळेपणा केला नव्हता.

‘अभ्यासे प्रगट व्हावे। नाहीं तरी झाकोन असावे।’ असाच त्यांचा उपदेश होता. स्त्रीने आत्मनिर्भरता अंगी बाणवावी, पण ते करत असतांना मनातली मातेची ममता त्यागू नये हेही त्यांनी स्त्रियांना बजावल्यासारखे सांगितले होते हे आज आवर्जून लक्षात घ्यायला हवे. … ज्ञान मिळवतांना आणि स्वावलंबी होतांना स्त्रीने हेही लक्षात ठेवले पाहिजे की … वीट नाही कंटाळा नाही। आलस्य नाही त्रास नाही। इतुकी माया कोठेचि नाही। मातेवेगळी॥ असेही त्यांनी आवर्जून बजावले होते. पण आत्ताच्या काळातल्या आत्मनिर्भर होऊ इच्छिणा-या स्त्रिया नेमके हेच विसरतात की काय, अशी शंका येते, कारण अशीच परिस्थिती आता दिसते आहे.

समाज परिवर्तन करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सुधारायला हवे यावर समर्थांचा भर होता, आणि हे साध्य करण्यासाठी स्त्री-पुरुष असा भेद अजिबातच असायला नको असंच त्यांचं प्रतिपादन होतं, म्हणून त्यांनी स्वत:ही असा भेद केला नाही. स्त्रियांनीही आत्मोन्नतीची संधी सोडू नये यासाठी ते आग्रही होते. अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा हक्क स्त्री-पुरुष सर्वांनाच आहे हा विचार त्यांनी आपल्या वागण्यातून ठळकपणे अधोरेखित केला होता. त्या काळानुसार समर्थांनी यासाठी भक्तिमार्ग सांगितला खरा, पण तो मार्ग विलक्षण बुध्दीप्रधान आणि विवेकाचा पुरस्कार करणाराच होता. परमार्थ हा सगळ्यांसाठी आहे…सगळ्यांना…म्हणजे स्त्रियांनाही तेथे अधिकार आहे हे सांगतांना… ‘‘भवाच्या भये काय भीतोसी लंडी। धरी रे मना धीर, धाकासीं सांडी॥” हा त्यांचा सल्ला स्त्री-पुरुष दोघांनाही दिलेला होता, हे आवर्जून लक्षात घेण्यासारखे आहे.

वेण्णाबाईंप्रमाणेच त्यांनी आक्काबाई, अंबिकाबाई या स्त्रियांनाही अभ्यासासाठी प्रवृत्त केले. कीर्तने करण्यास अनुमती दिली. वेण्णाबाईसारखी एक बालविधवा स्त्री धर्मग्रंथांचा अभ्यास करते, कीर्तने करते, जनतेचे प्रबोधन करते, याचा निषेध म्हणून कोल्हापुरात त्यांच्यावर अनेक आरोप होत होते. विषप्रयोगही झाला पण त्यांनी ते विष पचवून दाखवले… निंदकांना पश्चात्ताप झाला आणि त्यांनी त्यांची व समर्थांची क्षमा मागितली… त्यांनीही मोठ्या मनाने क्षमा केली…मग त्यांचा आणि त्यांच्याबरोबरच्या इतर स्त्रीशिष्यांचा अभ्यास आणि कीर्तन करणे चालूच राहिले. ‘ स्त्री कीर्तनकार इथूनच उदयाला आल्या ‘ असे म्हटले तर अजिबात वावगे ठरणार नाही.

याखेरीज वेण्णाबाईंमधील व्यवस्थापन-क्षमताही समर्थांनी जाणली होती. आणि अनेकदा रामनवमी उत्सवाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती अर्थात् वेण्णाबाईंनी ती उत्तम प्रकारे पार पाडली होती. त्यांनी त्याकाळात ‘सीता-स्वयंवर’, मंचीकरण (वेदान्तावरील गद्य टिप्पण्ण्या), रामायणाची कांडे, आणि यासारखे ७-८ ग्रंथही लिहिले होते. काही अभंग, पदे असे स्फुट लेखनही केलेले होतं. आणि यासाठीही समर्थांनी त्यांना उत्तेजन दिलेलं होतं.

दुस-या शिष्या संत अक्काबाई यांनी समर्थ हयात असतांना ३५ वर्षे चाफळचा कारभार सांभाळला होता…त्यांच्या पश्चात ३८ वर्षे सज्जनगडाचा कारभार सांभाळला. १२व्या वर्षापासून त्या समर्थांबरोबर होत्या आणि त्यांच्यातले गुण ओळखून समर्थांनी त्यांना त्यानुसार शिक्षण देऊन तयार केले होते. (यासाठी ‘व्यवस्थापन’ हा वेगळा विषय तेव्हा नक्कीच नव्हता हे लक्षात घ्यायला हवे. ) विशेष म्हणजे औरंगजेबाने आक्रमण केल्यावर अक्काबाईंनी स्वत: हिम्मत करून गडावरचे पंचायतन वाघापूरला नेऊन रामनवमी साजरी केली होती.. आणि हे नियोजन आणि त्यामागचे त्यांचे धाडस याचे श्रेय समर्थांच्या द्रष्टेपणाला द्यायलाच हवे. आपल्या चाफळच्या मठात अशा अनेक विधवा, परित्यक्ता, अनाथ स्त्रियांना समर्थांनी बापाच्या मायेने आश्रय दिला होता. समर्थ इतक्या पुरोगामी विचारांचे होते की त्यांनी अशा प्रत्येक स्त्रीचे उपजत गुण, आवड, आणि कुवत लक्षात घेऊन प्रत्येकीला वेगवेगळी कामे शिकायला प्रवृत्त केले होते. कुटुंबाला नकोशा झालेल्या कित्येक स्त्रियांना आपल्या विविध मठांमध्ये त्यांनी फक्त मानाने आसराच दिला नाही, तर योग्यतेनुसार प्रत्येकीला आवश्यक तेवढे शिक्षण देऊन वेगवेगळ्या कामांची स्वतंत्र जबाबदारी पेलण्याइतके सक्षमही केले.

आत्ताच्या तुलनेत अशा स्त्रियांची संख्या अतिशय कमी होती हे जरी खरे असले, तरी “ स्त्री आत्मनिर्भर असायलाच हवी “ या समर्थांच्या ठाम विचाराचे इवलेसे बीज नक्कीच त्यामुळे रोवले गेले आणि आता त्या बीजाचा अवाढव्य वृक्ष झाला आहे हे सत्य नाकारता येणार नाही. या विचारामागची समर्थांची कळकळ, अतिशय दूरगामी विचाराने त्यादृष्टीने त्यांनी टाकलेली अत्यंत महत्वाची पावले, म्हणजे “ स्त्री शिक्षण.. तिचा आत्मसन्मान.. आणि तिचे आत्मनिर्भर असणे “.. या समाज-सुधारणेसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या एक प्रकारच्या ‘ क्रांती ‘ साठी पायाच्या दगडासारखी होती हे सत्य त्रिवार मान्य करायलाच हवे …. काळ कितीही पुढे गेला तरीही.

श्री समर्थ रामदास हे खऱ्या अर्थाने काळाच्या पुढे असलेले द्रष्टे गुरू होते, स्त्री-उन्नतीचे खंदे समर्थक आणि आद्य पुरस्कर्ते होते, आणि त्यासाठी सर्व काही करण्यास तत्पर असणारे हाडाचे कार्यकर्ते होते … खऱ्या अर्थाने ‘ समाजसेवक ‘ होते, असं नक्कीच म्हणायला हवं … नव्हे मान्य करायला हवं. त्यांना मनःपूर्वक वंदन.

©️ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रिय माऊली मराठीस… लेखिका : सुश्री वैशाली ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

☆ प्रिय माऊली मराठीस… लेखिका : सुश्री वैशाली ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

प्रिय माऊली मराठीस

माझा मनोमन दंडवत!

आज मराठी भाषा दिन आहे. खरं म्हणजे तू श्वासातच इतकी भिनलेली आहेस की तुला वेगळं काढून एखादा दिवस तुझी गाणी गावीत असं शक्यच नाही. पण असो. श्वास आजन्म घेतला तरी प्राणायामातून घेतलेल्या श्वासानं जसं निर्मळ वाटतं, श्वासाचं खरं मूल्य समजतं तसंच तुझ्याबाबतीत आहे.

आज असंच तुझ्याशी शिळोप्याचं काही बोलावंसं वाटलं. बघितलंस? शिळोप्याच्या गप्पा… किती दिवसांनी वापरला हा शब्द! अगं तो वापरावा इतका वेळच नसतो आणि आता ज्येष्ठ वयात शिळोप्याचं बोलावं तर आहेच कोण रिकामं? मग वाटलं तू आहेस की. तुझ्या मांडीवर डोकं ठेवून थोडंसं स्मरणरंजन करावं.

आई, आज ना मला जुन्या स्वयंपाकघरात जाऊन तुला शोधावंसं वाटतंय. आमच्या नव्या किचनमध्ये तू आगदीच मला गरीब वाटायला लागलीयस.

बघ ना, चूलपोतेरे, सांडशी, ओगराळं, उभे लावून रांधप करणं. (अगं, माझ्या नातवंडांनी उभे लावून म्हटल्यावर आ केला. तेव्हा समजावून सांगावं लागलं, बाबांनो, उभेलावणं हा सोवळ्यातल्या स्वयंपाकाचा गणवेश होता. आडजुनं (म्हणजे अगदी पार फाटलेलंही नाही आणि सरसकट नेसायच्याही अवस्थेतलं नाही असं लुगडं अंघोळीनंतर घट्टमुट्ट कासोटा घालून, दोन्ही खांद्यांवरचा पदर पोटाशी खोचून गृहीणी रांधप करायच्या. नंतर सावकाशीनं नेहमीचं लुगडं चोळी परिधान करायची,) बघ शब्द शोधताना त्याच्या संदर्भसंदुकीही उघडाव्या लागतात.

तर, आता कुटणे, वाटणे, निपटून घेणे, चिरणे, परतणे, फोडणीस टाकणे, आधण, वैरणे, लाटणे, थापणे, वळणे या सगळ्यासाठी एकच… ‘बनवणे. ‘ चहासुद्धा बनवतात. जेवण बनवतात.

शिजवलेल्या अन्नाला स्वयंपाक म्हणतात, ताटात वाढलेल्या अन्नाला जेवण म्हणतात. हे विसरलोय आम्ही.

शकुंतला भांडं, पेढेघाटी डबा, फिरकीचा तांब्या, ताकाचा कावळा (चोच असलेलं झाकणाचं भांडं) गडवा (म्हणजे छोटा उभट तांब्या) वेळणी (म्हणजे पसरट थाळी.. पातेल्यातला भात थेट पानात वाढण्याची पद्धत नव्हती. तो वेळणीत घेऊन उलथन्याच्या टोकाने अगदी शिस्तशीर पंगतीत वाढायचा. ) कर्म माझं… पंगत पण शोधावी लागेल.

मिसळणाचा डबा, मिठाची दगडी, थारोळ्यावर ठेवलेलं दूध, शिंकाळं, पळीवाढं, अंगासरशी रस्सा…

तुपाची खरवड, शि-याची, पिठल्याची किंवा भाताची खरपूस खरपुडी काय काय आठवू?

न्याहारी, माध्यान्ह भोजन, वैश्वदेव, आपोष्णी, आंचवणे यांनाही हल्ली गाठोड्यातच बांधलंय.

पदार्थात मीठ तिखट मिसळत होतो. आता अॕड करतो. भाज्या चिरत नाही. कट् करतो.

तुझ्यात घुसखोरी करणारे हे शब्द आमच्या पिढीला खटकतात गं. पण तू बाई, उदार आहेस हो. सामावून घेतेस सगळ्यांना.

समजावतात काहीजण की, मनातल्या भावना पोचवू शकते ती भाषा. भाषिक आग्रह सोडला तर तळागाळातून संवेदनशील माणसं मोकळेपणे व्यक्त होऊ शकतात. त्यांना काय सांगायचंय ते कळलां म्हणजे पुरे.

काळानुसार झालंय खरं तसं.

पण सांगू का?

तू मुळातच डौलदार, सौष्ठवपूर्ण आणि श्रीमंत आहेस. काही दागिने आता कालमानानुसार कालबाह्य झालेले असले तरी आपल्या संतांनी आपल्या अभंगात, साहित्यिकांनी त्यांच्या प्रातिभ आविष्कारात, आपल्या वेल्हाळ मालणींनी त्यांच्या लोकगीतांत तुला सजवून ठेवलेलं आहे. तो वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची जबाबदारी आमचीच आहे. हेच तर आजच्या दिवशी स्वतःला बजावायचं आहे.

मन ओतलं तुझ्याजवळ. खूप हलकं वाटलं बघ.

येत राहीन अशीच तुझ्या उबदार कुशीत.

सारस्वत माये, तुझी कन्या..

वैशाली.

लेखिका : सुश्री वैशाली 

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाय फाय बालपण… भाग – ३ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ वाय फाय बालपण… भाग – ३ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

(त्यातला कल्याणी म्हणून एक मित्र होता तो जरा बेरकी होता. _ – इथून पुढे —- 

उशिरा येऊन झोपणार आणि लवकर उठून जाणार. तो एका कोपऱ्यात शेवटी झोपत असे. उठून गेला की त्याची चादर व त्याच बेडशीट तसाच टाकून जात असे. हे त्याच बरेच दिवस चालले होतं. एकेदिवशी राजाने मजा करायची ठरवली. सगळीजण लवकरच झोपेच सोंग घेतलं. ट्यूबलाईट विझवली. दरवाजा नुसतं पुढ केला. कल्याणी लाईट बंद आहे बघून आला. त्याने दरवाज्याला कडी लावलं. खालच्या पायाच्या अंगाने सरकत आला. व जोरात अंग अंथरुणात अंग टाकून दिलं. तसा जोरात किंकाळ्या मारत उठला. तस पक्याच्या पायाजवळ लाईट बटन होते, त्यांनी लाईट लावली. सगळी हसत हसतं उठले. कल्याणीला मात्र अंथरुणात लपवलेले खडे दगड जोरात टोचली होती. नंन्तर पक्क्याने त्याला ताकीद केली, तुझं अंथरून तुझं तू काढणे. चादर घडी घालून ठेवणे.

असेच एक दिवस सगळी रात्री झोपले होते. सागऱ्या रोज सकाळी उठल्यावर म्हैस चारायला मोती तळयावर जात होता. जाता जाता पाण्याचा लोटा घेउन जात असे. एके दिवशी रात्री तो सोप्यात येऊन लवकर झोपला. आम्ही सगळी मजा म्हणून.

चुना पातळ केला, कोळसा पण पाण्यात उगाळून त्याच्या चेहऱ्यावर राक्षसचे चित्र कोरले त्यावर सोनकांवाने लाल ठिपके पण दिले. झालं हे महाशय उठल्यावर नेहमी प्रमाणे म्हैस सोडली. आणि हातात लोटा. हे ध्यान चावडीवरुनं जाताना सगळेच लोक बघू लागले व फिदी फिदी हसू लागले. असं जवळ पास दोन तास चालले होते. त्यात आमची रात्रीची झोपणारी मुलं होती. मुद्दाम बाहेर काय चाललंय बघण्यासाठी मोती तल्यावर गेले व लांबून नजारा बघत फिदी फिदी हसतं परंतु लागले. झाले परत हे ध्यान घरी आल्यावर त्याचीच आई बघून हसू लागली. गल्लीत पण सगळे हसतं होते. शेवटी नं राहवून त्याने आरसा बघितला. गरम पाण्याने तोंड धुवून घेतले. ते तडक आमच्या घराकडे आला. पण घरात कोणीच दिसलें नाही. आम्ही परस दारी मुद्दाम बसलो. ते ध्यान परत घरी फिरले. मग आम्हाला पण हसू आवरले नाही.

दिवस उन्हाळ्याचे पाण्याचे हालं होतं होते. जो तो उठला की घागरी घेउन पाणी भरण्यासाठी जाऊ लागला. अडाचे खार पाणी खर्चाला. आणि प्यायचे पाणी दवाखान्याच्या विहिरीचे. हा सरकारी दवाखाना पार गावापासून दीड किलोमीटर लांब. पण नाईलाज होता. गावात चहुकडे हेच चित्र होते. पाणी भरले की अकरा वाजता न्याहरी. शिळ्या भाकरी दही चटणी काय असेल ते खाऊन, पोहायला विहीरवर. चांगले दोन तीन तास पाण्यात उड्या मारून, तिथे पण शिवाशिवीचा खेळ रंगत असे. गावातील सगळी मुलं विहिरीवर. कोण शिकणारा, कोण शिकवणारा असं चालेल असे. घरात अंघोळ केली की परत दोन बार्डी पाणी वाया जायला नको म्हणून घरात पण काही बोलत नसतं. पोहून आले की जेवण व दुपारी पत्ते कुटणे किंवा चिन्नी दांडू.

उन्ह वाढत चाललेल. उष्मा व घामाच्या धारा, घरातील उन्हाळी कामे चालूच होती.

पाणी भरणे, म्हसर चरयाला सोडणे. येताना शेतातून कडबा वैरण आणणे. दुपारी खेळ. संध्याकाळी फिरायला जाणे. चिकोडी रोडवर एक स्वामी आलेले. वय झालेलं. अंगाने कृष व सावळे, लहान मूर्ती होती. म्हूणन त्यांना मरी बाबा म्हणत असतं. मरी म्हणजेच कानडीत लहान बाबा. भाविक त्यांना येऊन रोज नमस्कार करीत. आणि आपले गाऱ्हाणं सांगत. त्याप्रमाणे त्यांना उपाय पण स्वामी सांगत असतं. लोक त्यांना मानत असतं.

आम्ही पण रोज संध्याकाळी फिरायला गेलो की नमस्कार करून. त्यांना सगळेच एकच प्रश्न विचारत होतो. बाबा आम्ही परीक्षेत पास होऊ का. त्यावर ते होणारच असं उत्तर देत. संध्याकाळी गार वारा सुटला की, आम्ही तो अंगावर मनसोक्त घेत असू. येताना वरच्या बस स्टॅन्ड जवळ, कोठारी यांची ऑइल मिल.

त्यात सरळ आत घुसून शेंगतेल कस काढल जात असे ते रोज बघत होतो. शेंगदाणे पण खाऊन, आवर्जून गरम पेंड पण खात होतो. ति खायला गोड आणि तेलकट लागतं होती.

तसेच मिरज रोडला एकमेव स्लॅब असलेली इमारत होती. त्याचा जिना बाहेरून असल्यामुळे, आम्ही त्या टेरेस वर जाऊन गार वार अंगावर घेत असूत. इमारतीत निलगिरी तेल, कांही औषधी तयार होतं असतं.

घरात आले की मग गाण्याच्या भेंड्या, गावाच्या नावच्या भेंड्या खेळत असू. उन्हाळ्यात रात्री आमच्या अंगणात चांदणी भोजन होतं असे. प्रत्येक जण घरातून ताट वाढून घेउन येत असे. नाही म्हणायला, घरातून आम्ही पाणी, लोणचे चटणी आंबील आणि ताक मधो मध आणून ठेवलेले असणार. ज्यांना जे पाहिजे ते ताटात वाढून घेत असे. अंगत पंगत चांदणी भोजन झाले की, अंगणातच सगळी झोपत होतो. त्यामुळे आम्हाला उन्हाळा जाणवत नसे.

उन्हाळ्यात शेंगाचे बी तयार करण्यासाठी शेंगा फोडायला सगळेच मित्र जमत. सकाळ पासून संध्याकाळी पर्यंत हे काम चार दिवस चालत असे.

मापट्याला पाच पैसे, त्यावेळी मिळत असे. शिवाय दुपारी भडंग आणि चहा सुद्धा. पण कोणीच मित्र मंडळी कंटाळा करीत नसतं. घरचेच काम काम समजून ते नेटाने पार पडत असे. वर त्यांना पैसे ही मिळत असतं.

घरची शाखारणी करावी लागे. घरे ही कौलरू असल्यामुळे वर्षाला, पावसाळ्या आधीच हे काम होतं असे. बघता बघता रिझल्ट लागे. आणि सगळेच पास होतं असू. वर्षे भरभर निघून गेली. आम्ही सातवी पास झालो. आमच्या वेळी ही बोर्डाची परीक्षा असे, फायनल व्हरनाकुलर म्हणत.

1972 ला आम्ही सहावी पास झालों आणि पाण्याचे दुरभीक्ष. दुष्काळी दिवस चालू झालेले. पाऊस सतत दोन वर्षे पडला नाही. गावात दुष्काळी कामे चालू झालेली.

रोजगारसाठी लोक धडपड करीत रानो माळ भटकंती करत होते. सुखडी वाटली जाऊ लागली. शेति ओस पडलेली. बंडिंगचे काम चालू झाले. विहिरीनी तळ गाठलेला. प्यायला पाणी मिलने अवघड झालेले. पाच किलोमीटर वरुनं प्यायला पाणी आणावे लागे. घरे रिकामी पडू लागली. पीक पाणी नव्हतेच. लोक घरातील धान्य जपून वापरू लागले. दिवस रात्र लोक पाण्यासाठी भटकंती करत होती. काही विहिरीत रात्री दोन वाजता घागर भरत असे. लोक उठून रात्री दोन वाजता पाणी भरत. आमचं टोळक त्यात पुढे असे. रात्री दोन पर्यंत पत्ते कुटायचे. दोन नंन्तर विहिरीवर जाऊन पाणी भरायचे. घरी त्यासाठी सगळ्यांना मुभा दिली जायची.

कारण परिस्थिती बिकट होती.

— समाप्त —

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘‘कृतीला गतिमान करा…’’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘कृतीला गतिमान करा…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

(आंतरराष्ट्रीय महिला दिवस- ८ मार्च २०२५ या निमित्ताने) 

नमस्कार प्रिय मैत्रांनो!

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।

यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः।।” 

(अर्थ- जेथे स्त्रियांची पूजा केली जाते, अर्थात त्यांना मान दिला जातो, तेथे देवता आनंदपूर्वक निवास करतात. जेथे त्यांची पूजा होत नाही, अर्थात त्यांचा मान राखला जात नाही तेथील सर्व चांगली कर्मे देखील निष्फळ होतात. ) या ओळी आपण सर्वजण प्राचीन काळापासून वाचत आणि ऐकत आलो आहोत. हा श्लोक चिरंतन आहे, अर्थपूर्ण आहे अन म्हणूनच आजच्या काळात देखील तितकाच महत्वाचा आहे.

८ मार्च या अंतर्राष्ट्रीय महिला दिनानिमित्य अभिनंदन आणि शुभेच्छा! या सर्वांनाच लागू होतात. कारण आजचा काळ असा आहे की पुरुषांची म्हणून लेबल लावलेली कामे महिला बिनधास्तपणे करतात, तर या उलट स्त्रियांची पारंपारिक कामे कधी कधी पुरुषमंडळी अगदी निगुतीने करतात. (या साठी पुरावा म्हणून मास्टर शेफचे एपिसोड आहेतच).

मंडळी महिला दिनाचा इतिहास थोडक्यात सांगते. अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ संपूर्ण जगातील स्त्रियांना २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. १९०७ साली स्टटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यात क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे. ‘ अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यू यॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड निदर्शने केली. त्यात दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या प्रमुख मागण्या होत्या. सोबतच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक स्तरावर समानता आणि सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क हे देखील मुद्दे होते. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ रोजी या अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा क्लाराने मांडलेला ठराव मंजूर झाला. नंतर युरोप, अमेरिका आणि इतर देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून इंग्लंड येथे १९१८ साली आणि अमेरिकेत १९१९ साली या मागण्यांना यश मिळाले. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्री संघटनांना बळकटी आली. जसजसे बदलत्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.

या निमित्याने मी एक आठवण शेअर करीत आहे. प्रवासात असतांना त्या त्या प्रदेशातल्या स्त्रिया कशा वागतात, त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य कितपत विकसित आहे, हे मी उत्सुकता म्हणून बघत असे. साधारण २००३ चा काळ होता. (मैत्रांनो, हा काळ जवळपास २२ वर्षे जुना) मी केरळ येथे फिरायला गेले होते, देवभूमीचा हा सुंदर प्रवास रम्य अशा हिरवाईतून करीत होते. नारळांच्या वृक्षांच्या रांगा अन लगत समुद्राचे निळेशार पाणी (समुद्र कुठला ते विचारू नका प्लीज) बसमधून अतिशय रमणीय असे विहंगम दृश्य दिसत होते. बस कंडक्टर एक मुलगी होती, विशीतली असावी असे मला वाटले. अत्यंत आत्मविश्वासाने ती आपले काम करीत होती. बस मध्ये फक्त महिलांसाठी असे समोरचे २-३ बेंच आरक्षित होते. त्यावर तसे स्पष्ट लिहिले होते. कांही तरुण त्यावर बसले होते. एका स्टॉपवर कांही स्त्रिया बसमध्ये चढल्या. नियमानुसार त्या राखीव जागांवरून तरुणांनी उठून जायला हवे होते. त्यांनी तसे केले नाही. त्या स्त्रिया उभ्याच होत्या. तेवढ्यात ती कंडक्टर आली आणि मल्याळम भाषेत त्या तरुणांना जागा रिकामी करा असे तिने सांगितले, मात्र ते तरुण हसत होते आणि तसेच बसले होते. मी आता बघितले की, ती रोडकीशी मुलगी रागाने लाल झाली. तिने त्यांच्यापैकी एकाची कॉलर पकडली अन त्याला जबरदस्तीने उभे केले. बाकीचे तरुण आपोआप उठले. तिने नम्रपणे त्या स्त्रियांना बसायला जागा करून दिली, अन जणू कांही झालेच नाही असे दाखवत आपले काम करू लागली.

मैत्रांनो मला आपल्या ‘जय महाराष्ट्राची’ आठवण आली. असे वाटले की इथं काय झाले असते? तिथल्या साक्षरतेचे प्रमाण १०० टक्के! (तेव्हां आणि आत्ताही) मी २०२२ साली मेघालयाचा प्रवास केला, त्यातील प्रामुख्याने जी गोष्ट मला जाणवली ती सर्वांगाने दृश्यमान होणारे स्त्री स्वातंत्र्य. तेथे देखील या स्त्री स्वातंत्र्यसूर्याच्या उदयाला कारणीभूत आहे स्त्रियांची संपूर्ण साक्षरता आणि मत्रीसत्ताक पद्धतीमुळे गावलेली आर्थिक सुबत्ता! याच्या परिणामस्वरूप तेथे स्त्री शक्तीचे अद्भुत रूप मी ठायी ठायी अनुभवले.

मतदानाचा हक्क महत्त्वाचाच मंडळी, पण त्या योगे स्त्री स्वतंत्र झाली असे समजायचे कां? तो तर दर पाच वर्षांनी मिळणारा अधिकार आहे. स्त्रीला घरात आपले मत मांडण्याचा अधिकार आहे का? बरे, मांडले तरी ते विचारात घेतल्या जाते कां? हे सुद्धा बघायला नको कां? अगदी साडी खरेदी करायची असेल तर आर्थिक स्वातंत्र्य आहे कां, अन ते असले तरी स्वतःच्या पसंतीची साडी घेता येते कां? मंडळी प्रश्न साधा आहे पण उत्तर तितके सोपे आहे कां? ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी’ हे शब्द अजूनही जिवंत कां आहेत? १९५० साली आलेल्या ‘बाळा जो जो रे’ या सिनेमातील ग दि माडगूळकरांची ही रचना आज देखील सत्याशी निगडित कां वाटावी? जिथं स्त्रीला देवीच्या रूपात पुजल्या जाते तिथे तिची अशी अवस्था कां व्हावी?

यंदाच्या युनायटेड नेशन्सच्या आंतरराष्ट्रीय महिला दिवस ८ मार्च २०२५ साठी “Accelerate Action” अर्थात “कृतीला गती द्या” हा विषय निवडण्यात आला आहे. याचा मुख्य उद्देश महिलांना पुरुषांबरोबर समान दर्जा देण्याच्या प्रक्रियेला गतिमान करणे होय. ही थीम सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये महिलांना येणाऱ्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करण्यासोबतच त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ठोस पावले उचलण्यावर भर देते. म्ह्नणजेच केवळ चर्चा करण्याएवजी आता महिलांचे अधिकार सुनिश्चित करण्यासाठी निश्चितपणे परिणाम साधणारी प्रभावी पावले उचलण्याची गरज आहे. याअंतर्गत महिलांसाठी विशिष्ट योजना लागू करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरुन महिलांना रोजगार आणि निर्णय घेण्याची क्षमता मिळेल. (यात लाडकी बहीण सारख्या योजनेचे प्रयोजन नसावे, अशी इच्छा! ) स्त्रीचे समाजातील दुय्यम स्थान यावर सामाजिक विचारमंथन होणे आवश्यक आहे. भलेही संविधानात नमूद केल्याप्रमाणे कुठल्याही स्तरावर लिंगभेद नसावा हे स्पष्ट आहे, पण त्याची अंमलबजावणी करणे हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.

मला या दिनाविषयी इतकेच वाटते की स्त्रीला देवी म्हणून मखरात बसवू नये तसेच तिला ‘पायाची दासी’ देखील बनवू नये. पुरुषाइतकाच तिचा समाजात मान असावा. ‘चूल आणि मूल’ या सेवाभावाकरता सकल आयुष्य खर्ची घालणाऱ्या स्त्रीचे सामाजिक स्थान अत्यंत महत्वाचे आहे आणि ते सर्वमान्य व्हावे. तिच्या भावभावना, बुद्धी आणि विचारांचा सदोदित सन्मान झाला पाहिजे. खरे पाहिलॆ तर हे साध्य करण्यासाठी ८ मार्चचाच नवसाचा दिवस नसावा तर ‘प्रत्येक दिवस माझा’ असे समस्त महिलावर्गाने समजावे. त्यासाठी पुरुषमंडळींकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घ्यायची गरज असू नये. असा निकोप अन निरोगी सुदिन केव्हां येणार?

“Human rights are women’s rights, and women’s rights are human rights.” – Hillary Clinton.

(“मानवी हक्क हे स्त्रियांचे हक्क आहेत आणि स्त्रियांचे हक्क हे मानवी हक्क आहेत. “-  हिलरी क्लिंटन)

(या निमित्ताने तुराज लिखित शंकरमहादेवन यांनी गायलेले Womens Anthem हे स्फूर्तिदायक गाणे आपल्याला नक्कीच आवडेल.

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “देवा तुझी किमया अगाध आहे…!” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “देवा तुझी किमया अगाध आहे…!” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

(नशीब कसं वळण घेते)

ती फिरायला गेली असताना तिला एक जुन्या पध्दतीचं व ठसठशीत असं कानातलं सापडले.

सोन्याचं वाटलं म्हणून खात्री करून घेण्यासाठी ती सराफाकडे गेली. सराफाने बघून सांगितले की ते कानातले सोन्याचे आहे. ते घेऊन ती घरी आली.

घरी कामाची बाई सखू रडताना बघून तिने कारण विचारले. सखू म्हणाली, “वहिनी, लेकीची चार महिन्याची फी भरली नाही म्हणून तिला शाळेतून घरी पाठवलं. थोडे पैसे उसने द्या.”

ती म्हणाली, “हे बघ मला आत्ताच सोन्याचं कानातलं सापडले आहे. ते मी तुला देईन. ते विकून तू सगळ्या वर्षाची फी भरू शकतेस.”

सखू म्हणाली, “नको वहिनी. या महिन्याची फी द्या. पुढचं काहीतरी करून जमवेन मी. आणि त्या कानातल्याचा फोटो टाका ते फेसबुक का काय म्हणतात त्यावर. विचारा की या भागात फिरताना कुणाचं कानातलं हरवले आहे का म्हणून. कुणी कष्टाने हे बनवलं असलं आणि मी ते वापरले तर मला पाप लागेल. पै पै जमवून बायका दागिना बनवतात, तो मी कसा वापरणार?”

वहिनी म्हणाली, ”छान आहे ग आयडिया.” तिनं लगेचच कानातल्याचा फोटो व ज्या भागात ते सापडले ती माहिती फेसबुक वर लिहली.

दोन तासातच तिला मेसेज आला की हे माझं कानातलं आहे. असं दुसऱ्या कानातलं मी दाखवायला घेऊन येते.

.. ललिता कान्हेरे नावाची मध्यम वयाची बाई भल्या मोठ्या चकचकीत गाडीतून आली.

तिनं दुसरं कानातलं दाखवलं. वहिनीनं सखूला बोलावलं आणि कान्हेरे बाईंना सांगितलं, “तुम्हाला या सखूमुळे तुमचं कानातलं मिळालं बरका.” व सारी हकीकत सांगितली.

कान्हेरे बाई खूष होऊन सखू ला म्हणाली, “थॅंक्यू सखू. तुमचे दोघींचे मनापासून आभार मानते. हे माझ्या आजीचं कानातलं आहे. तिची आठवण आहे ही. कानातून पडल्यापासून चैन नव्हती मला. सगळीकडे शोधून आले. आज तुमची फेसबुक पोस्ट बघताच जीव शांत झाला. कसे तुमचे आभार मानू? बक्षिस काय देऊ तुम्हाला?”

वहिनी म्हणाली, “ललिताताई तुम्हीच त्या नव्या १२ वी पर्यंतच्या शाळेच्या संस्थापक ना? तुमचा फोटो मी बरेचदा वर्तमानपत्रात बघितला आहे!”

“हो. मीच ती ललिता कान्हेरे. आजीची ईच्छा होती शाळा काढण्याची पण तिच्या हयातीत तिला जमलं नाही. तिचं स्वप्न मी पूर्ण केलं. देवाच्या कृपेने शाळा उत्तम चालली आहे.” कान्हेरे बाई म्हणाल्या.

“बक्षिस वगैरे काही नको पण सखूच्या मुलीला कमी फी मधे तुमच्या शाळेत घ्याल का? “ वहिनी म्हणाली.

“अहो अगदी आनंदाने! Actually, मी तर म्हणेन मी तिला मोफत शिकवेन. वह्या, पुस्तकं, युनिफॅार्म सर्व काही मी बघेन. चालेल का सखुबाई?” कान्हेरे बाई म्हणाल्या.

सखूचे डोळे भरून आले. “वहिनी, माझे नशीब म्हणून मी तुमच्यासारखीकडे काम करते.”

वहिनी म्हणाली, “सखू माझं नशीब म्हणून तू मला भेटलीस. मुलीला शाळेतून घरी पाठवलं फी भरता आली नाही म्हणून, तरी तुझा विवेक ढळला नाही. ”

कान्हेरे बाई कौतुकाने हसून म्हणाल्या, “निघू मी? सखू ये उद्या लेकीला घेऊन. आज शांतपणे झोपेन बघ. Thank_you_so_much. ”

सखू चार तासात झालेल्या घडामोडी बघून थक्क झाली होती. “देवा तुझी किमया अगाध आहे…. क्षणात रडवतोस आणि क्षणात डोळे पुसतोस रे बाबा! ” असं म्हणत ती गणपतीच्या फोटोसमोर हात जोडून उभी राहिली.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “पापी पेट का सवाल…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “पापी पेट का सवाल…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

खाजगी क्षेत्रातील कर्मचारीची स्थिती जे चित्रात दिसतयं त्याहून वेगळी आहे का हो?.. केवळ भारवाहू… धडधाकट शरीर प्रकृती आणि  अधिकाधिक कामं करण्याची उर्जा, क्षमता या बळावर डोळ्यासमोर दिसणारे, भेडसावणारे  त्याचे अनेक प्रश्न, समस्यांवर जास्तीत जास्त पैसा मिळवून तो सोडविण्याचा प्रयत्न करणारे… आपला मान.. सन्मान, अभिमान, स्वत्व या वैयक्तिक पण आपण माणूस आहोत कुणाचे गुलाम नव्हेत या गोष्टीला सोयिस्कर रित्या विसरून जाणारे… आकर्षक पॅकेज, बढतीची सहजी वाढणारी कमान, रेटिंग नि इन्सेंटीव्ह या भुलभुलैय्यात आपल्या तेज दिमागी बुद्धीला ओलीस ठेवणारे… कायम वरिष्ठांची इंग्रजाळलेल्या परिभाषेत.. यस सर.. आय विल डू दॅट… इनफक्ट आय वुड लाईक टू से.. सारखी हांजी हांजी ची गुळ पोळी तोंडात चघळणारे… टारगेट च्या भुताच्या हाडांची मोळी मधे बेसुमार वाढत जाणारी मागण्यांच्या हाडाच्या वजनाने आपली पाठ, कंबर खचेल, मोडेल.. मन थकेल. किंवा  आपल्याला पुढं चालता येणारचं नाही अशी अवस्था केली तरी.. आपला आवाक्याकडे डोळेझाक करून.. ये बिल्कुल हो जायेगा सर.. असा अंधविश्वास देणारे… आणि तो प्रत्यक्षात सार्थ न ठरवता आला तर ताशीव घडीव कारणांची मालिका समोर मांडून वरिष्ठांचा रोष ओढवून घेऊन साॅरी सर म्हणून आपलं अपयश पदरात पाडून घेताना… कामाचा मोबदल्यात अवाजवी घट  अनसंग एम्पलाॅयी म्हणून शिक्कामोर्तब करून घेणारे… स्वताच्या तसेच आपल्या कुटुंबाची पोटाची भूक मारत मारत कंपनी नि वरिष्ठांचं कधीही न भागणारी  नि  समाधानानं  कधीही तृप्त न होणाऱ्या भुकेची काळजी करता करता आपली सारी जिंदगी दाव पर लगा देणारे… ते ते सगळे… यात आपण सारे कमी अधिक प्रमाणात येतो बरं का… दोष त्यांचा किंवा आपला नसतोच मुळी.. तर हे घडवून आणणारी सगळी व्यवस्था दुषित आहे… जे शिक्षण देते त्याला रोजगार मिळत नसतो आणि रोजगार उपलब्ध आहेत त्याप्रमाणे शिक्षित कर्मचारी मिळत नाही.. इंग्रजांनी केवळ कारकून घडविणारी शिक्षणपद्धती इथे आणली राबवली आणि आपण आजही तीच पुढे राबवत आहोत… स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तरी उलटूनही अजून शिक्षणव्यवस्थेची केवळ शकले करण्यात धन्यता मानून तरूण पिढीच्या स्वप्नाचे तिन तेरा वाजवले आहेत.. परिपूर्ण बुद्धिचातुर्य चा संस्कारी विध्यार्थी घडविण्याऐवजी एक बुध्दीभारवाहू परीक्षार्थीं मात्र घडवत गेलो… गाजराचे कवळ तोंडा समोर धरून  पळायला लावून भारवाही गर्दभासारखे   राबवले जाताना दिसते… लाखातून एखादाच तो या कळपातून बाहेर पडतो… स्वताची कुवत ओळखतो आणि बाजारात आजमवण्याचा प्रयत्न करतो… पण असे किती जण अगदी अगदी नगण्य… आणि बाकी सगळे पापी पेट का सवाल है भाई… म्हणत झुंडमें रहते है और चलते है…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सुशिक्षित आहेत तरी कोठे?…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “सुशिक्षित आहेत तरी कोठे?…☆ श्री जगदीश काबरे ☆

शिक्षणाचा प्रचार-प्रसार वाढला तसे साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे… वाढले नाही ते “सुशिक्षित”तेचे प्रमाण. उच्चपदवीधरही क्वचितच सुशिक्षित असतांना दिसून येतात. कारण ते त्यांच्या अविकसित जाणीवांच्या, बुरसटलेल्या विचासरणींच्या अधीन राहिल्यामुळे आणि आधुनिक विचारांपासून दूर पळण्याच्या प्रवृत्तीमुळे. त्यामुळे सामाजिक-सांस्कृतीक प्रश्न सुटणे तर दुरच, पण अधिकाधिक गुंतागुंतीचे होत चालल्याचे आढळुन येते. त्याचे पडसाद आपण जातपंचायतीच्या अनाचारातून अथवा नित्यश: वाढतच चाललेल्या जाती-धर्म-वर्चस्ववादातून आणि अंधश्रद्धायुक्त घटनांचे छद्मविज्ञानाच्या साह्याने समर्थन करतांना पाहू शकतो.

झापडबंद शिक्षणपद्धतीमुळे नागरिक “सुशिक्षित” होत नाही म्हणूनच तो आधुनिकही होऊ शकत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञाने मुबलकपणे वापरात आणली म्हणून कोणी आधुनिक होत नसतो. उलट असे कारणे म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देणे होय. कारण आधुनिकता ही विचारांत व आचारांत आणावी लागते. सहिष्णुता-उदारता आणि प्रश्न मुळातून समजावून घेत नंतरच त्यावर भाष्य करण्याची प्रवृत्ती विकसीत करावी लागते. प्रत्यक्षात आपल्या सामाजिक जीवनात त्याचा दिवसेंदिवस अभाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अर्धवट ज्ञानाने अत्यंत घाईत नि:ष्कर्ष काढण्याच्या प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळत आहे.

वाढत्या असहिष्णुतेचे दुसरे उदाहरण म्हणून आपण चिकित्सा नाकारण्याच्या वाढत्या दु:ष्प्रवृत्तीकडे पाहू शकतो. धर्मपंडितांना चिकित्सा अमान्य असते, हे गृहित धरले तरी ज्ञानाच्या विकसनासाठी ती सर्वसामान्यांना आवश्यक असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. इतिहासाची, ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचीही पुन्हा पुन्हा चिकित्सा करणे हे समाजाच्या भावी विकसनासाठी आवश्यकच असते. किंबहुना अचिकित्सक समाज हा अंध समाज बनत जातो. म्हणूनच तो अंधारयुगात जगत असतो. आज अंधश्रद्धेच्या गर्तेत खोलवर बुडणारा, ढोंगी बाबांबुवांच्या पायाशी लीन होणारा आपला समाज एकूणातच अंधारयुगाकडे जोमाने वाटचाल करत आहे, असे खेदाने म्हणावे लागतेय. कारण आम्ही क्रमश: इतिहासाची परखड चिकित्सा आणि धर्मचिकित्सा थांबवत नेल्या आहेत. इतिहासाचे नको तसे उदात्तीकरण आणि ऐतिहासिक पुरुषांचे दैवतीकरण करत चाललो आहोत.

आज बुद्ध, राम, पैगंबर, शिवाजी महाराज ते बाबासाहेब यांची चिकित्सा करणे म्हणजे कोणता ना कोणता समाज सरळ शत्रू बनवून घेणे होय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चिकित्सा, टिकात्मक टिप्पणी म्हणजे द्वेष पसरवणे असा सर्वसाधारण समज आपल्याकडे दृढ होत चालला आहे. प्रत्येक महापुरुष जातीत वाटला गेल्याने आपला इतिहास हा जातीनिहाय, धर्मनिहाय बनत गेला आहे. इतिहासाचे शुद्धीकरण करण्याच्या नादात जातीय मंडळी इतिहासाचे विकृतीकरण करत चालली आहेत. हे आपण असंख्य उदाहरणांतून पाहू शकतो. कुंभमेळा दरम्यान कोट्यावधी लोकांनी आंघोळ केल्यामुळे गंगेचे पाणी प्रदूषित झाले, त्यात मानवी विष्टेचे कण आढळले असा निष्कर्ष काढणाऱ्यांना आपण सहजपणे हा सनातन धर्माचा अपमान आहे म्हणून मोकळे होतो. एखाद्या व्यक्तीवरील टीका म्हणजे ती त्या व्यक्तीच्या जातीतील सर्वांवरीलच टीका असा सोयिस्कर अर्थ घेतल्यामुळे टीकाकारांवर झुंडीने हल्ले चढवणाऱ्या ट्रोलर महाभागांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचे कारण म्हणजे लोक पक्षीय, जातीय आणि धार्मिक बेड्यांत घट्ट अडकत आहेत. या बेड्या त्याला झुंडीच्या मानसशास्त्रानुसार वर्तन करायला लावतात.

चिकित्सेच्या अभावात ज्ञान आणि विचार पुढे जावू शकत नाहीत याचे भान आपण हरपून बसलो आहोत. आमचे पालक चिकित्सा नाकारतात. आमची शिक्षणपद्धतीही चिकित्सा नाकारते. धर्मशिक्षण, शालेय शिक्षण, उच्च-शिक्षण हे एकाच तागड्यात मोजता येईल असे बनवले जात आहे. धर्म नेहमीच चिकित्सा नाकारतो, कारण धर्माची बिंगे फुटण्याचा धोका असतो. धर्मचिकित्सकाला “पाखंडी” ठरवून मोकळे होणे त्यांना गरजेचे वाटते. माध्ययुगात युरोपातही असे घडून गेले आहे…पण तिकडील विचारकांनी धर्मलंडांचा प्रसंगी छळ सोसुनही शेवटी त्यांना शरण आणले. वैज्ञानिक सत्य स्वीकारण्यास भाग पाडले. कारण ते चिकित्सक होते… प्रश्न विचारत होते… उत्तरेही शोधत होते. म्हणून ते आधुनिकही बनले. आपण केव्हा बनणार? की अजूनही आपली मानसिकता प्राचीन आणि मध्ययुगात अडकलेली रहाणार?🤔

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares