मराठी साहित्य – विविधा ☆ राॅबर्ट फ्राॅस्ट यांच्या कवितेचे शताब्दी वर्ष -२०२२ ☆ श्री सुबोध अनंत जोशी ☆

श्री सुबोध अनंत जोशी

परिचय:

शिक्षण – एम्.ए., एम्.फील.

निवृत्त उपप्राचार्य, निवृत्त असोसिएट प्रोफेसर,इंग्रजी विभाग ,मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली.

एम्.फील साठी यु.जी.सी. ची संशोधन  शिष्यवृत्ती.

संशोधक  व विद्यार्थी उपयुक्त  पुस्तके:

  1. A comparative study of Robert ब्राउनिंग and Diwakar
  2. Literary perceptions

संपादन:

  1. गोपुर दिवाळी अंक 1980
  2. झेप- गौरवग्रंथ 2003
  3. संवेदना – अनाथ मुलांमुलींवरील
  4. कथासंग्रह  1984

लेखमालिका :

  1. भारतीय स्वातंत्र्य वीरांनी तुरुंगातून  लिहीलेली पत्रे
  2. प्रेरणादायी पुस्तके

वृत्तपत्रे, मासिके यांतून नियमित लेखन-कथा, कविता, पुस्तक परिचय  इत्यादी.

विद्यापीठ अनुदान मंडळ संमत दोन संशोधन प्रकल्प पूर्ण.

विविध संशोधन नियतकालिकांतून संशोधन निबंध प्रकाशित.

?  विविधा ?

☆ राॅबर्ट फ्राॅस्ट यांच्या कवितेचे शताब्दी वर्ष -२०२२ ☆ श्री सुबोध अनंत जोशी ☆

Stopping by Woods on a Snowy Evening. (1922.)

राॅबर्ट फ्राॅस्ट यांच्या कवितेचे शताब्दी वर्ष -२०२२.-त्या निमित्त:

रॉबर्ट फ्रॉस्ट(१८७४-१९६३) हा अमेरिकन कवी,परंतु त्यांच्या कविता प्रथम इंग्लंडमध्ये प्रकाशित झाल्या.  निसर्ग वर्णन,अमेरिकन बोलीभाषेचा वापर, ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांचे चित्र ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. ज्यावेळी औद्योगीकरणाला सुरुवात झाली होती, त्याचवेळी रॉबर्ट फ्राॅस्ट लिहीत होते. तरी देखील औद्योगिक शहराबद्दल, आयुष्याबद्दल  त्यांनी  फारसं लिहीलं नाही. त्यांच्या बऱ्याच कविता स्मरणरंजन विषयक(sweet nostalgia)  आहेत.The Road not taken,Birches,Mending Wall, Nothing Gold can Stay, Stopping by Woods on a Snowy Evening या त्यांच्या लोकप्रिय कविता होत.New Hampshire या काव्यसंग्रहासाठी त्यांना पुलिट्झर प्राईझ मिळाले होते.

Stopping by Woods on a Snowy Evening ही चार कडव्याची चिमुकली कविता आहे.या कवितेचे अनेक अर्थ, अन्वयार्थ काव्य समीक्षकांनी सांगितले आहेत आणि ते साहजिक आहे .कारण एखाद्या सर्वोत्कृष्ट ठरलेल्या कवितेची चिकित्सा अनेक जण अनेक प्रकाराने करतात. खरे तर, प्रत्येकाने स्वतंत्र बुद्धीने स्वतंत्र दृष्टीने ही कविता समजून घ्यावी.

ही एक साधीसुधी भावकविता आहे.  निवेदक  आपला एक छोटा अनुभव सांगतो आहे. तो घोडागाडीतून जंगलातून जात आहे आणि त्याला पहिला प्रश्न पडतो” हे कोणाच्या मालकीचे जंगल आहे ? ” त्या जंगलाचा मालक निवेदकाच्या परिचयाचा असावा.म्हणून तो सांगतो की त्या मालकाचे घर गावात आहे आणि  तो इथे थांबला आहे हे त्या मालकाला माहीत होणार नाही. पुढच्या ओळीत निवेदक सांगतो की ते जंगल बर्फाने भरून जात आहे  आणि ते बर्फाळलेले जंगल पाहण्यासाठीच कवीला तेथे थांबावे असे वाटत आहे.इथे सृष्टिसौंदर्य एवढे मंत्रमुग्ध करणारे आहे की थोडा वेळ तरी तेथे थांबून ते सौंदर्य न्याहाळावेसे कवीला वाटते.

दुसऱ्या कडव्यात आपण थांबल्याबद्दल आपल्या घोड्याला काय वाटलं असेल याची तो कल्पना करतो.(निवेदक घोडागाडीतून प्रवास करत आहे.) कोणतेही शेतघर जवळ नाही. असं असलं तरी गोठून गेलेलं तळं आणि जंगल यामध्ये आपण त्या अंधारलेल्या संध्याकाळी थांबलोय हे त्या घोड्याला चमत्कारीक वाटत असणार  अशी तो कल्पना करतो.खरे तर हे सर्व कवीच्या मनातलेच विचार आहेत.घोड्याच्या माध्यमातून तो आपल्या भावना वाचकांपर्यंत पोचवितो.

तिसऱ्या कडव्यात निवेदक सांगतो  की घोडा मान हलवतो आणि तिथे लावलेल्या घंटीची किणकिण होते.निवेदकाची कल्पना अशी की मान हलवून घोडा विचारतो आहे की तिथे अवेळी, संध्याकाळी जंगलाजवळच्या वाटेवर थांबणं चुकीचं तर नाही ना?  या ध्वनीव्यतिरिक्त दुसरा ध्वनी तेथे उमटत असतो तो म्हणजे वाऱ्याच्या झोताचा आणि बर्फवृष्टीचा. कवीची अशी ही दोन मने आहेत. एक मन त्याला तिथे थांबायला सांगते, तिथल्या सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घ्यायला सांगते आणि दुसरे मन हे घोड्याच्या मनात काय चालले आहे अशी कल्पना करून त्याचे मन त्याला तिथे न थांबण्याचा सल्ला देत असते. त्याच्या मनाची स्थिती काहीशी अशी द्विधा झालेली आहे.परतु अशी दोलायमान अवस्था फार वेळ राहणे शक्य नसते. नंतरच्या, चौथ्या आणि शेवटच्या कडव्यात कवी ठामपणे सांगतो की जंगल सुंदर, घनदाट,अंधारं आहे, परंतु  मला मी दिलेल्या वचनांची पूर्तता  करायची आहे.झोपण्यापूर्वी कितीतरी अंतर मला  पार करायचे आहे.

The woods are lovely,dark and deep

But I have promises to keep

And miles to go before I sleep

And miles to go before I sleep.

तिथे न थांबता पुढे जाण्याचा आणि  आपल्या इप्सितस्थळी जाण्याचा निर्धार कवीने व्यक्त केला आहे आणि तोच त्याचा अंतिम निर्णय आहे असे  त्यानं केलेल्या पुनरूक्तीवरून स्पष्ट होते.

But I have promises to keep ही ओळ समुद्रात अचानक एखादी मोठी लाट उचंबळून यावी तशी येते आणि या ओळीपासून मूड बदलतो. आता ही निसर्गकविता रहात नाही. ही एकच ओळ अशी आहे की त्यात शंभर टक्के भौतिक, व्यवहारिक गरजेची निकड स्पष्ट केली आहे.बाकीचे शब्द आणि शब्दप्रयोग प्रतिमांच्या रूपात वापरलेले आहेत.Promises to keep हा खूप अर्थघन शब्दप्रयोग आहे.व्यवहारी जगात माणूस वचनबद्ध  असतो. कुटुंब,समाज,देश अशा अनेक घटकांशी आपली बांधिलकी असते.कौटुंबिक, सामाजिक,कायदेशीर, नैतिक अशा कित्येक नियमांचे पालन आपल्याला करावे लागते.ही वचनबद्धता आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असते.त्यासाठी खूप कांहीं करावे लागते.खूप संघर्ष करावा लागतो.विसावा घ्यायचा तो नंतरच.किंबहुना,आपला मृत्यू ही झोप असे मानले तर मृत्यूपूर्वी आपली कर्तव्ये पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे.”कर्मण्येवाधिकारस्ते” हाच तो संदेश आहे आणि या संदेशामुळेच या चार ओळी  जगप्रसिद्ध झाल्या आहेत . यशस्वी आयुष्याचे सूत्र या ओळीमध्ये आहे. कवितेचा हा ध्वन्यार्थ  आपल्या मनावर गारुड करतो. वाच्यार्थ एवढाच होता की सुंदर जंगल पहात थांबावं वाटतं पण तसं केलं तर झोपण्यापूर्वी आपल्याला आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचता येणार नाही.वाच्यार्थापेक्षा ध्वन्यार्थातला  उदात्त संदेश आपल्या मनाला खूप भावतो.

या संदेशामुळेच ही कविता कित्येक वर्षे शालेय विद्यार्थ्यांपासून जगप्रसिद्ध व्यक्तीपर्यंत सर्व थरातील वाचकांना आवडत आली आहे. निसर्ग कविता म्हणून  या कवितेकडे पाहता येते.निसर्गातील सौंदर्य woods, snow अशा प्रतीकातून, तर भयाची जाणीव dark, deep अशा प्रतीकात्मक शब्दातून कवी व्यक्त करतो.निसर्गातले सौंदर्य आणि त्याला जोडून येणारी किंचित् भयाची जाणीव यामधून अचानक उसळी घेते स्वकर्तव्याची जाणीव.यामुळेच And miles to go before I sleep या ओळीबरोबर  ही कविता फक्त निसर्ग कविता रहात नाही.  प्रौढ वाचक  या कवितेतील  संदेश आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करतात. कर्तव्यपूर्ती हे लक्ष्य असणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या  भारतीय नेत्याला हा संदेश मृत्यूपूर्वी आपल्या टेबलावरील कागदावर लिहून ठेवावा असे वाटणे साहजिकच आहे.

एक रचना (structure) म्हणून देखील या कवितेचा अभ्यास करता येईल. Mcleish या समीक्षकाने कवितेने कांहीही सांगू  नये, ती एक रचना असावी,असे म्हटले आहे.(A poem should not mean but be) एक रचना म्हणून या कवितेचा असल्यास केला तर असे दिसेल की या कवितेत रुबायतचा Stanza form आणि डॅन्टे या इटालियन कवीच्या कवितेतील terza Rima वापरून नाविन्यपूर्ण काव्यरचना केली आहे.

कवितेत निवेदक स्वतःशीच बोलतो आहे म्हणजे एक प्रकारे हे स्वगतच आहे आणि ते स्वगत कुजबूज या स्वरूपातले. त्यामुळेच त्याचे शब्द संभाषणात्मक आहेत. सॅम्युअल कोलरीजने कवितेची व्याख्या A lyrical, linguistic shorthand अशी केली आहे.ही कविता तशीच आहे.भावमधुर आणि अल्पाक्षरी.काहींच्या मते ही संपूर्ण कविता म्हणजे जीवनमृत्यूचे  रूपक आहे . बर्फाने भरलेले जंगल म्हणजेच मृत्यू आणि घोडा गाडी म्हणजे आयुष्य अशी कल्पना केली आहे.कवितेतील प्रेरणादायी संदेश मनाला सर्वात जास्त भावतो. यामुळेच काव्य म्हणजे जीवनाचे भाष्य(Poetry is the criticism of life) ही मॅथ्यू अर्नोल्ड यांनी केलेली काव्याची व्याख्या  या कवितेला चपखलपणे लागू पडते.

१९२२ या वर्षी राॅबर्ट फ्राॅस्ट यांनी लिहिलेल्या, Stopping by Woods on a Snowy Evening या कवितेला  २०२२ साली  शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत.एवढे मार्गक्रमण करूनही ही चिमुकली कविता काव्यरसिकांच्या मनात घर करून राहिली आहे.जीवनाचे सूत्र सांगणा-या अशा कविता स्थलकालातीत असतात हे खरे!

ले. सुबोध अनंत जोशी

सांगली

मो 9423661068.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विश्वरूप दर्शनाचे दोन परिणाम ! — भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

??

विश्वरूप दर्शनाचे दोन परिणाम !  भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

कुरूक्षेत्राच्या मध्यावर श्रीकृष्णाने अर्जुनाला संपूर्ण गीता सांगितली. तरी अर्जुनाच्या मनात काही शंका बाकी होत्या. शेवटी कृष्णाने अर्जुनाला आपले विराट विश्वरूप दाखवले. या विश्वरूपासमोर मात्र अर्जुनाचे उरलेसुरले सर्व अहंकार गळून पडले. तो श्रीकृष्णाला पूर्णपणे शरण गेला. त्यानंतर अर्जुन केवळ श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार वागला. शेवटी म्हणतात ना, ‘चमत्काराला नमस्कार असतो !’

खरे तर श्रीकृष्णाने अर्जुनाआधी आणखी एका व्यक्तीला आपल्या विश्वरूपाचे दर्शन दिले होते. 

चक्रवर्ती सम्राट पांडूच्या अकाली मृत्यूनंतर त्याची मुले मोठी होईपर्यंत हस्तिनापूराचे राज्य धृतराष्ट्राला विश्वस्त म्हणून सांभाळायला दिले गेले होते. पण युधिष्ठिराचा अभिषेक करायची वेळ आल्यावर कौरवांनी वारणावताच्या लाक्षागृहात पांडव आणि कुंतीच्या हत्येचा प्रयत्न केला. विदुराच्या सल्ल्यानुसार ते तात्पुरते भूमिगत झाल्यावर घाईघाईने दुर्योधनाचा युवराज म्हणून अभिषेक केला गेला. द्रौपदीच्या स्वयंवरात पांडवांचे खरे रूप समोर येऊन पांडव हस्तिनापूरला परत आल्यावर पांडूचे राज्य त्यांना परत देण्याऐवजी राज्याच्या वाटण्या केल्या गेल्या. अर्ध्या राज्याच्या नावावर पांडवांना खांडववनासारखी बंजर भूमी दिली गेली. पांडवांनी त्यातही नंदनवन फुलवले. राजसूय यज्ञात पांडवांना मिळालेले यश पाहून असुयेने आंधळा झालेल्या दुर्योधनाने धूर्त शकुनीच्या सांगण्यावरून कपटी द्यूतक्रिडेचे आयोजन केले. द्युतक्रिडेदरम्यान पांडव बंधूंचे घोर अपमान झाले. सर्वात मोठा अधर्म म्हणजे भर सभेत द्रौपदीची विटंबना झाली. त्यानंतर पांडवांना वनवासात धाडले गेले. पांडवांचा बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास संपल्यावरही पांडवांनी स्वकष्टाने उभे केलेले इंद्रप्रस्थाचे राज्य दुर्योधन त्यांना परत करण्याची लक्षणे दिसेनात. कौरवांनी केलेले हे सर्व अधर्म पांडव विसरलेले नव्हते. पांडव स्वतः प्रचंड शूर होते. पांडवांना सासरचा म्हणजे पांचाळनरेश द्रुपदाचा आधार होता. आता मत्स्यराज विराटही त्यांचे व्याही झालेले होते. साक्षात श्रीकृष्ण त्यांच्यामागे खंबीरपणे उभा होता. त्यात कौरवांकडून पांडवांचे इंद्रप्रस्थ परत न देण्याचा आडमुठेपणा केला गेला. युद्धाचे ढग दाटू लागले. 

श्रीकृष्णाने तोपर्यंत केलेल्या अलौकिक कामांमुळे लोक एव्हाना त्याला परमेश्वर म्हणू लागले होते. कौरव-पांडव युद्ध हे केवळ इंद्रप्रस्थ आणि हस्तिनापूरात होणार नव्हते, तर भारतातील बहुतेक राजे दोन्हीपैकी एक पक्ष निवडून युद्धात सामील होणार होते. या युद्धाच्या व्याप्तीमुळे लाखो लोक मारले जाणार होते. फक्त श्रीकृष्णाच्या अंगी युद्ध टाळण्याची शक्ती होती. भीष्म, द्रोण, विदूर आणि धृतराष्ट्र यांच्यासारखे ज्येष्ठ कौरव श्रीकृष्णाला देवासमान मानत त्याचा प्रचंड आदर करत होते. पांडव तर कधीच श्रीकृष्णाचे भक्त झालेले होते. दोन्ही पक्षांना समजावून सांगून युद्ध टाळण्याची क्षमता फक्त श्रीकृष्णात होती. पण श्रीकृष्णाने आता काही हालचाल केली नसती तर ‘अंगी क्षमता असूनही युद्धातील रक्तपात टाळला नाही’ असा बोल समाजाने त्याला लावला असता. तसेच सरळमार्गी पांडवांना, खास करून युधिष्ठिराला, कौरव किती आडमुठे आहेत हेही दाखवून देणे गरजेचे होते. त्यामुळे युद्ध टाळण्यासाठीचा शेवटचा प्रयत्न म्हणून श्रीकृष्ण शांती प्रस्ताव घेवून हस्तिनापूरला गेला. भीष्म, द्रोण, आणि कृपाचार्यांसारख्या महानुभावांनी श्रीकृष्णाचे हस्तिनापुरात यथासांग स्वागत केले. हस्तिनापूरच्या दरबारात श्रीकृष्णाने शांती प्रस्ताव मांडला. पांडव द्युतसभेत झालेले सर्व अपमान विसरून कौरवांशी सख्य करतील. बदल्यात कौरवांनी ठरल्या- -प्रमाणे पांडवांचे इंद्रप्रस्थचे राज्य त्यांना परत करावे अशी मागणी श्रीकृष्णाने केली. पण दुर्योधन इंद्रप्रस्थचे राज्य परत करायला अजिबात तयार नव्हता. श्रीकृष्णाने दरबाराला हर त-हेने धर्म काय हे समजावून सांगितले. पण दुर्योधनाच्या हट्टासमोर कुणाचेच काही चालले नाही. त्यावर श्रीकृष्णाने दरबाराला अजून एक प्रस्ताव दिला. हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ या दोन साम्राज्यातील केवळ पाच गावे पांडवांना दिली तरी युद्ध आणि रक्तपात टळेल असे श्रीकृष्णाने दरबाराला सुचवले. यावर दुर्योधनाने ते प्रसिद्ध उद्गार काढले, “सुईच्या अग्रावर मावेल इतकी भूमीही पांडवांना मिळणार नाही.” 

यावर श्रीकृष्ण ठामपणे म्हटला, “आता मात्र अहंकाराचा आणि अधर्माचा कळस झाला. आता युद्ध आणि कुरूकुलाचा नाश अटळ आहे.”  यानंतर श्रीकृष्णाने मूर्ख दुर्योधनाच्या अहंकाराला, त्या अहंकारातून निर्माण होणाऱ्या त्याच्या महत्वाकांक्षांना , आणि त्या महत्वाकांक्षापुढे अगतिक होऊन दुर्योधन करत असलेल्या अधर्माला आवर न घातल्याबद्दल संपूर्ण दरबाराला बोल लावला. 

– क्रमशः भाग पहिला 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ परकीय युद्धभूमीवरचं भारतीय शौर्यगीत ! – मेजर समरपाल सिंग तूर !… भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ परकीय युद्धभूमीवरचं भारतीय शौर्यगीत ! – मेजर समरपाल सिंग तूर !… भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्या भल्या मोठ्या लष्करी विमानाचा महाकाय दरवाजा उघडला. कॅप्टन समरपालसिंग ‘८, राजपुताना रायफल्स’च्या योद्ध्यांची तुकडी घेऊन याच विमानाने दक्षिण सुदान देशात निघाले होते….. संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय शांतिसेनेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी.  

२०११ मध्ये सैन्यात अधिकारी म्हणून भरती झाल्याबरोबर पहिल्याच वर्षी समरपालसिंग साहेबांना सियाचीन मध्ये कर्तव्याची संधी मिळाली होती. आणि त्यानंतर केवळ दोनच वर्षांत त्यांना आंतरराष्ट्रीय शांतिसेनेत भारतीय तुकडीचे प्रमुख म्हणून नेमणूक मिळाली होती. तसा हा एक मोठा बहुमानच!

आपल्या आजोबांच्या आणि वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकून समरपाल सिंग सैन्यात दाखल झाले होते. समरपाल या नावाचा एक अर्थ आहे युद्धाने किंवा युद्धभूमीने संगोपन केलेलं बालक, अर्थातच लढवय्या! आणि दुसरा अर्थ आहे युद्धगीत! एका योद्ध्याला हे नाव किती शोभून दिसते!

दक्षिण सुदान! जगाच्या पाठीवरील सर्वांत नवा अधिकृत देश! त्यांची निम्मी लोकसंख्या तिशीच्या आतली आहे. ९ जुलै, २०११ रोजी हा देश अस्तित्वात आला आणि १३ जुलै, २०११ रोजी या देशाला सार्वभौम देश म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिली. 

सुदानचा इतिहास तसा खूपच रक्तरंजित आहे. इथे आणि एकूणच आफ्रिकेत विविध जमातींच्या टोळ्यांचे राज्य आहे. जगातील अगदीच अविकसित राष्ट्रे या भागात जगतात. जंगल, जनावरे यांच्यावर उपजिविका असते. काही ठिकाणी तेलाचे साठे, खनिज संपत्तीही आहे

परंतू सामान्य लोकांचे पोट जनावरांचे मांस, दूध यांवर जास्त अवलंबून आहे. त्यांच्या उपजिविकेसाठी अनिवार्य असलेल्या जनावरांसाठी गवताची कुरणं आणि पाणी यांसाठी या टोळ्या एकमेकांशी भिडतात. शिवाय चालीरीती, वंशश्रेष्ठत्व या भावना आहेतच. अज्ञान, अंधश्रद्धा, गरीबी, रोगराई मोठ्या प्रमाणात आहे. 

प्रत्येक टोळी हिंसेच्याच जंगली मार्गाने जगत असते. यात आजवर लाखो माणसं कीडामुंगीसारखी मेली आहेत, मुले अनाथ झाली आहेत. भुकेने कहर केला आहे आणि मानवी देहावर गिधाडे, जंगली श्वापदे तुटून पडताना दिसतात. परिस्थिती आपल्या आकलनापलीकडे भयावह आहे! 

सुदानमध्ये तशा अनेक टोळ्या आहेत. परंतू डिंका आणि नुअर या टोळ्या मोठ्या आहेत आणि शस्त्रसज्ज आहेत. त्यात डिंका जास्त शक्तिशाली मानली जाते. जगातील अनेक भागांतून इथे चोरट्या मार्गाने शस्त्रे पाठवली जातात. अगदी आठ-दहा वर्षांच्या पोराच्या हातात एके-४७ सारखी घातक शस्त्रे असतात‌ त्या पोरांच्या स्वत:च्या उंचीएवढी या हत्यारांची उंची आणि वजन असते.

हल्ल्यासाठी जाताना हे सर्व अतिरेकी दारूच्या, अंमली पदार्थांच्या नशेत धुंद असतात. एका टोळीने दुसऱ्या टोळीतील गावांवर सशस्त्र हल्ला चढवायचा, लुटायचं, संपत्ती बळकवायची, जाळपोळ, बलात्कार आणि नरसंहार करायचा…. आणि लहान मुलांचे अपहरण करायचे. ही अपहृत बालके आपली म्हणून सांभाळायची… त्यामुळे टोळीची लोकसंख्या वाढते म्हणून! ‘नरेची केली किती हीन नर…’ या उक्तीची जिवंत प्रचिती म्हणजे यांचा संघर्ष! 

पण जगाची सुरक्षितता, मानवता या दृष्टीकोनातून जगाला या संघर्षापासून स्वत:ला अलिप्त ठेवता येत नाही. म्हणून या संघर्षरत भागांत संयुक्त राष्ट्रसंघाचे सैन्य शांततारक्षणासाठी पाठवले जाते. या शांतिसेनेत भारताचा वाटा खूप मोठा आहे. भारतीय सैन्य आपले सर्वोत्तम अधिकारी आणि जवान आफ्रिकेत पाठवते. जागतिक पातळीवरील सामरिक आणि राजनैतिक समीकरणासाठी हा त्याग अत्यावश्यक ठरतोच शिवाय नैतिक कर्तव्याच्या परिभाषेतही या कृतीचा समावेश होतो. म्हणून आजवर भारतीय सैनिकांनी या मोहिमांमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे भाग घेतला असून पाकिस्तान, चीन या शत्रूंशी लढताना दाखवलेलं शौर्य तिथेही दाखवण्यात कसूर केलेली नाही. 

दोन संघर्षरत टोळ्यांमधील संघर्ष थांबवणे आणि इतर मानवतावादी कार्यात हातभार लावणे हे मुख्य काम असते या सेनेचे. परंतू दुर्दैवाने ज्यांच्या रक्षणासाठी हे शूरवीर तिथे तैनात असतात त्यांच्यावरच तिथले राक्षसी टोळीवाले प्राणांतिक हल्ले करतात आणि या वीरांचे बळी जातात! 

त्यादिवशी भारतात उतरलेल्या त्या लष्करी विमानातूनच आपले सैनिक दक्षिण सुदानकडे समरपालसिंग साहेबांच्या नेतृत्वात झेपावणार होते. पण या दिवशी समरपाल साहेबांकडे आणखी एक जबाबदारी दिली गेली होती…… दक्षिण सुदानवरून आलेलं अतिशय महत्त्वाचे काही सन्मानाने ताब्यात घेणे! 

कोणत्याही भारतीय खांद्यांना पृथ्वीपेक्षाही जड होतील अशा लाकडी पेट्या….. एक भारतीय लष्करी अधिकारी आणि चार लष्करी जवानांच्या शवपेट्या! ज्या विमानातून या शवपेट्या आल्या आणि जेथून या शवपेट्या आल्या… त्याच विमानातून त्याच ठिकाणी कर्तव्यावर रुजू होण्यासाठी ८, राजपुताना रायफल्सचे शेकडो जवान निघालेले होते… शिस्तीत, एका रांगेत आणि शस्त्रसज्ज! 

डिसेंबर, २०१३. लेफ्टनंट कर्नल महिपालसिंग राठौर हे त्यावेळी शांतिसेनेच्या तुकडीतील भारतीय सैन्याचे नेतृत्व करीत होते. महिपालसिंग साहेबांचा तेथील कार्यकाल समाप्त होत आलेला असतानाच त्यांना आणखी एक महिना कर्तव्यावर राहण्याचा आदेश मिळाला होता. अफ्रिकन बंडखोरांबरोबर एका आठवड्यापूर्वी झालेल्या चकमकीत ते थोडक्यात बचावले होते. 

आणि आज…. त्यांच्या समवेत असलेल्या आणि जंगलातून जात असलेल्या ३२ सैनिकांचा समावेश असलेल्या वाहनताफ्यावर २०० सशस्त्र अतिरेक्यांच्या टोळीने अचानक मोठा हल्ला चढवला! तुफान गोळीबार होत असताना महिपालसिंग साहेबांनी आणि सोबतच्या भारतीय जवानांनी प्रतिकारास आरंभ केला. साहेबांनी एक दोन नव्हे तर तब्बल बारा अतिरेकी ठार मारले! साहेब रायफल मधील मॅगझीन बदलत असताना त्यांच्यावर अगदी समोरून अतिरेक्याने गोळ्या झाडल्या, त्यातील काही साहेबांच्या छातीत उजव्या बाजूने घुसून बाहेर पडल्या. त्यांच्यापासून केवळ तीस मीटर्सच्या अंतरावरील नर्सिंग असिस्टंट त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत साहेबांची जीवनज्योत त्या परकीय युद्धभूमीवर मालवली होती. 

महिपालसिंग साहेबांनी कारगिल संघर्षातही मर्दुमकी गाजवली होती. साहेबांसमवेत असलेले नायब सुबेदार शिवकुमार पाल, हवालदार हिरालाल, हवालदार भरत सिंग आणि शिपाई नंदकिशोर हे सुद्धा वीरगतीस प्राप्त झाले! 

महिपालसिंग साहेबांचा एक मुलगा पुढे एन.डी.ए. मधून लष्करी अधिकारी झाला तर मुलगी हवाईदलात फ्लाईट लेफ्टनंट झाली. त्यांची सैनिकी परंपरा पुढे सुरू आहे…. हिंदुस्थानाला शूरवीरांची खाण म्हणतात ते खरेच !

त्या महाकाय विमानाचा कार्गोचा दरवाजा उघडला गेला… कॅप्टन समरपाल लगबगीने पुढे झाले. त्यांनी शवपेट्यांसोबत आलेल्या जवानांच्या डोळ्यांत पाहिले…. आसवं वहात नव्हती पण ज्वालामुखीत खदखदणाऱ्या लाव्ह्यासारखी उचंबळत मात्र होती…… जवानांची हृदयं जखमी होती….. पण भारतीय सैन्याची शान राखताना बलिदान दिलेल्या सहकाऱ्यांविषयी अत्यंत आदराची भावनाही दिसत होती प्रत्येकाच्या हालचालीत. 

विमानातून शवपेटया सन्मानाने खाली उतरवल्या गेल्या… हुतात्मा वीरांना श्रध्दांजली वाहिली गेली आणि सैनिकांची ही तुकडी त्याच विमानात स्वार झाली…. मृत्यूशी झुंजायला… आदेशाचं पालन करायला. यात आपण मरू, आई-वडील निपुत्रिक होतील, पत्नी विधवा होईल, मुलं अनाथ होतील…. त्याला इलाज नाही! सैनिक बलिदानासाठीच तर निर्माण झालेला असतो.. इथं भावनांपेक्षा कर्तव्यच श्रेष्ठ! 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘आनंद…’ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘आनंद…’ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

काहीच पुरेसं नसूनही

हसतखेळत आनंदात राहणारे बघितले आहेत.

पास होण्या पुरते ३५% मिळवूनही खूश होऊन पार्ट्या देणारे आणि ९५% मिळवून ही २% कमीच पडले म्हणून रडत बसणारेही बघितले.

जॉब अचानक गेल्यामुळे आता तसंही दुसरा जॉब मिळेपर्यंत अनायासे सुट्टीच आहे तर मस्त फिरुन येऊ म्हणणारे आणि अपेक्षित Increment मिळालं नाही म्हणून करुन ठेवलेले Flight Bookings कॅन्सल करुन घरात उदास बसून राहणारेही बघितले आहेत.

जिभेच्या कॅन्सर मुळे नाकात नळी असतांनाही उत्साहाने गर्दीत जाऊन पहिल्या रांगेत बसून नाटक एन्जॉय करणारा आणि नको त्या गर्दीत नाटक बिटक, उगीच कशाला आजाराला निमंत्रण म्हणून घरात बसून राहणाराही बघितला आहे.

बाल्कनीतून किती छान दिसतोय इंद्रधनुष्य म्हणून दोन्ही काखेत crutches लावून तरातरा बाल्कनीत बघायला जाणारा आणि कितीदा बघितलाय यार फोटोत, त्यात काय बघायचं म्हणत लोळत पडून राहणारा त्याचा रुम पार्टनर ही बघितला आहे.

फर्निश्ड थ्री बीएचके फ्लॅटमध्ये  तेव्हाच थोडे पैसे अजून टाकून फोर बीएचके घेऊन टाकायला हवा होता म्हणून हळहळत बसणारे नवरा बायको आणि एकाच खोलीत काहीच पुरेसं नसूनही हसतखेळत आनंदात राहणारं पाच जणांचं एक कुटुंबही बघितलं आहे.

हे नको खायला- असं होईल, ते नको प्यायला- तसं होईल ह्या टेंशन मधे ठराविक मोजकं मिळमिळीत खाऊन पिऊनही अटॅकची चिंता डोक्यात ठेवणारे आणि जातील त्या ठिकाणी मिळेल ते झणझणीत चटपटीत  बिनधास्त खाऊनही काही नाही होत यार म्हणत मजेत असणारे खवय्येही बघितले आहेत.

आयुष्य सगळ्यांना सारखंच मिळालेलं असतं. पण काही ते फुलवत जगतात , काही सुकवत जगतात, आता त्याला कोण काय करणार. प्रत्येकाला कधी, कुठे, कशात आनंद, सुख, समाधान मिळेल ते सांगता नाही येत. पण त्यांना ज्यात आनंद मिळेल ते त्याने करावे. कोणाला निसर्गात फिरण्यात आनंद मिळतो, तर कोणाला फक्त डोंगर दऱ्या चढण्यात आनंद मिळतो, कोणाला फक्त घरात लोळत राहण्यात तर कोणी कायम हसत खेळत मजेत राहण्यात आनंद मानतात.

आनंदी असण्याचे प्रत्येकाचे मोजमाप वेगवेगळे आहे.

कोणी वस्तू खरेदी करून आनंदी होतं. कोणी भटकंती करून आनंद मिळवतं . कोणाला नवनवीन पदार्थ करण्यात आनंद मिळतो तर कोणाला खाऊ घालण्यात आनंद वाटतो.

जितक्या व्यक्ती तितक्या प्रत्येकाच्या तऱ्हा असतात.

या सगळ्या आनंद व्यक्त करण्याच्या वाटा झाल्या.

मी आनंदी आहे. कसल्याही प्रकारच्या त्रासाशिवाय निरोगी आयुष्य जगतेय म्हणून. आई बाबा प्रत्येक निर्णयात सोबत असतात म्हणून. जीव लावणारी भावंडं आहेत म्हणून. ते प्रेम करणारे निस्वार्थ प्रेम करतात म्हणून. थोडाही चेहरा उतरला तर “तू ठीक तर आहेस ना” विचारणारी मित्र आहेत म्हणून. आणखी काय हवं?

अडचणी कुणाच्या आयुष्यात नसतात? आणि सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टी मला तरी नकोत! सतत आनंद वा मनाला समाधान देणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी, ज्या कधी लक्षात सुद्धा आलेल्या नसतात, त्यांची किंमत अशावेळीच तर कळते.

एक निरोगी शरीर, जे लढण्यासाठी समर्थ असेल. बास्स. जास्त काहीच नको. माझ्यासाठी तोच आनंद आणि तेच समाधान!

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ सायंकाळी रानात चुकलेले कोंकरू… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ सायंकाळी रानात चुकलेले कोंकरू… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सायंकाळी रानात चुकलेले कोंकरू... स्व. वि. दा. सावरकर ☆

कां भटकसी येथें बोले। कां नेत्र जाहले ओले

कोणी कां तुला दुखविलें। सांग रे

 

धनी तुझा क्रूर की भारी । का माता रागें भरली

का तुझ्यापासुनी चुकली । सांग रे

 

हा हाय कोंकरु बचडें। किती बें बें करुनि ओरडे

उचलोनि घेतलें कडें। गोजिरें

 

कां तडफड आतां करिसी। मी कडें घेतलें तुजसी

चल गृहीं चैन मग खाशी। ऐक रे

 

मी क्रूर तुला का वाटे। हृदय हें म्हणुनि का फाटे

भय नको तुला हें खोटें। ऐक रे

 

हा चंद्र रम्य जरि आहे। मध्यान् रात्रिमधी पाहे

वृक वारुनि रक्षिल ना हें। जाण रे

 

तो दूर दिसतसे कोण। टपतसे क्रूर बघ यवन

गोजिरी कापण्या मान। जाण रे

 

कमी कांही न तुजलागोनी। मी तुला दूध पाजोनी

ही रात्र गृहीं ठेवोनी। पुढति रे

 

उदईक येथ तव माता। आणिक कळपिं तव पाता

देईन तयांचे हातां। तुजसि रे

 

मग थोपटुनी म्यां हातें। आणिलें गृहातें त्यातें

तो नवल मंडळींना तें। जाहलें

 

कुरवाळिति कोणी त्यातें। आणि घेति चुंबना कुणि ते

कुणि अरसिक मजला हंसते। जाहले

 

गोजिरें कोंकरु काळें। नउ दहा दिनांचे सगळें

मऊमऊ केश ते कुरळे। शोभले

 

लाडक्या कां असा भीसी। मी तत्पर तव सेवेसी

कोवळी मेथी ना खासी। कां बरें

 

बघ येथें तुझियासाठीं। आणिली दुधाची वाटी

परि थेंब असा ना चाटी। कां बरें

 

तव माता क्षणभर चुकली। म्हणुनि का तनू तव सुकली

माझीही माता नेली। यमकरें

 

भेटेल उद्यां तव तुजला। मिळणार न परि मम मजला

कल्पांतकाल जरि आला। हाय रे

 

मिथ्या हा सर्व पसारा। हा व्याप नश्वरचि सारा

ममताही करिते मारा। वरति रे

 

ह्या जगीं दु:खमय सारें। ही बांधव, पत्नी, पोरें

म्हणुनिया शांतमन हो रे। तूं त्वरें

 

तरि कांही न जेव्हां खाई। धरुनियां उग्रता कांही

उचटिलें तोंड मी पाही। चिमुकलें

 

हळु दूध थोडके प्यालें। मग त्वरें तोंड फिरवीलें

कोंकरुं बावरुन गेले। साजिरें

 

स्वातंत्र्य जयांचे गेलें। परक्यांचे बंदी झाले

त्रिभुवनीं सुख न त्यां कसलें। की खरें

 

लटकून छातिशीं निजलें। तासही भराभर गेले

विश्व हें मुदित मग केलें। रविकरें

 

घेउनी परत त्या हातीं। कुरवाळित वरचेवरतीं

कालच्या ठिकाणावरती। सोडिलें

 

तों माता त्याची होती। शोधीत दूर शिशुसाठीं

दगडांचे, तरुंचे पाठीं। हाय रे

 

हंबरडे ऐकू आले। आनंदसिंधु उसळले

स्तनी शरासारखें घुसलें। किती त्वरें

 

डोलतो मुदित तरुवर तो। सप्रेम पक्षी हा गातो

तोकडा प्रतिध्वनि देतो। मुदभरें

 

हे प्रभो, हर्षविसी यासी। परि मला रडत बसवीसी

मम माता कां लपवीसी। अजुनि रे

कवी – वि दा सावरकर

रसग्रहण

नवतरुण सावरकरांनी ही कविता १९०० साली म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी लिहिली आहे. ओवी या करूणरसाला पोषक अशा छंदात ही कविता बांधलेली आहे. हे काव्य जरी करूणरसाने युक्त असलं तरिही, कवीने एक सुखान्त प्रसंग यात रेखाटला आहे. हे शब्दचित्र त्यांनी इतकं हुबेहुब रंगवलं आहे की, चलचित्राप्रमाणे तो प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर घडताना आपण पाहू शकतो. ‘तरि कांही न जेव्हां खाई। धरुनियां उग्रता कांही

उचटिलें तोंड मी पाही। चिमुकलें’ या ओळी वाचताना तर याची प्रचिती येऊन, वाचकाच्या चेहर्‍यावर हसू आल्यावाचून रहात नाही.

ही कविता वाचताना मला शाळेतलं स्वभावोक्ती अलंकाराचं ‘मातीत ते पसरले अति रम्य पंख, केले उदर वरी पांडुर निष्कलंक’ हे प्रसिद्ध उदाहरण आठवलं. पण इथे केवळ शब्दचित्र नाही तर, त्याच्या अनुषंगाने, कवीचे हळुवार मन, त्यांचे प्राणी प्रेम, कणव, पशुहत्येला असणारा त्यांचा विरोध यांचं दर्शन होतं. कवीच्या हृदयात दडलेलं मातृवियोगाचं दुःख व त्या दुःखाला असलेली अध्यात्मिक किनार यांचंदेखील या निमित्तानं प्रकटीकरण होतं. फक्त वैयक्तिक  दुःखाला नाही तर, पारतंत्र्यात राहणाऱ्या सार्‍या भारतीयांच्या दुःखाला पण ही कविता स्पर्शून जाते.’त्रिभुवनीचं सुख सुद्धा स्वातंत्र्य गमावलेल्यांना आनंद देऊ शकत नाही’ असं कवी सांगतात.

सावरकरांना शब्दप्रभू किंवा भाषाप्रभू का म्हटलं जातं याची प्रचिती याही कवितेत येते. उदाहरणार्थ, ‘वृक वारुनि रक्षिल ना हे’ (म्हणजे मी तुझी भूक भागवून तुझे रक्षण करीन) किंवा ‘

विश्व हे मुदित मग केले। रविकरें’ (सकाळ झाली, ही साधी गोष्ट किती गोड शब्दात सांगितली आहे). कोंकराला आई भेटल्यानंतर फक्त त्या दोघांनाच वा कवीलाच आनंद झालेला नाही तर, या आनंदात निसर्ग  सुद्धा सहभागी झाला आहे, ‘डोलतो मुदित तरुवर तो। सप्रेम पक्षी हा गातो’ असं कवी म्हणतात.

अशी छंदबद्ध व यमक, स्वभावोक्ती अशा अलंकारांनी नटलेली तसेच जाता जाता सहजपणे ‘संसार दुःखमय आहे’, विश्वाचा पसारा मिथ्या आहे’ अशी त्रिकालाबाधित सत्य सांगणारी कविता सावरकर एवढ्या कोवळ्या वयात लिहितात यावरूनच त्यांच्या बुद्धीची झेप दिसून येते. त्रिवार नमन!!

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गणितातील एका संकल्पनेची गोष्ट ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

गणितातील एका संकल्पनेची गोष्ट ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

आज अक्षय जरा लवकरच उठला आपला आपला, कांही रागावून न घेता ब्रश करून दूध घेऊन, अंघोळीला गेला, ते सुद्धा टॉवेल घेऊन! भराभर आवरून शाळेसाठी तयार!

“अरे, विक्रम! जरा खिडकी उघडतोस का?”

“कां गं?”

“सूर्य कुणीकडे उगवलाय बघते.”

“तुझं बाळ आता शहाणं, मोठ्ठ झालंय”

“हो का? मग दृष्टच काढायला हवी!”

“अगं पण काही कारण कळलं का? अक्षय! आज शाळा लवकर आहे का?”

“नाही.”

” मग इतक्या लवकर आवरलंस!”

” बाबा, आज विसापुरे सरांचा तास आहे. आणि पहिलाच आहे. त्यामुळं अजिबात उशीर करून चालणार नाही. प्रार्थनेच्या आधी पोचायला पाहिजे नाहीतर मागं बसावं लागतं.”

“तुला तर आवडतं की मागं बसायला.”

“बाबा, तो नावडता तास असेल तर! विसापूरे सर गणित शिकवतात ते ही गोष्टीतून! छान छान गोष्टी सांगतात. जाम एक्साईट झालोय, आज कुठली गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून! बाबा, तुम्हाला माहित आहे? ते म्हणतात, तुम्ही शास्त्र विषयाला घाबरत नाही पण तुम्हाला  गणित म्हटलं की भिती वाटते. पण या विषयाला आपण गणित का म्हणायचं? ते तर फक्त संख्याशास्त्र आहे. त्यामुळं माझ्या तासाला गणिताचा न म्हणता संख्याशास्त्राचा म्हणायचं.”

“बरं, बरं पुरे. चल मग तुला 5 मिनिटे लवकरच सोडतो.”

अक्षा, मक्या आणि पिट्या हे त्रिकुट आज लवकर येऊन पहिल्या बाकावर बसलं सुद्धा!विसापूरे सर तासावर आले आणि एकच गलका सुरू झाला. ‘सर, गोष्ट!सर, गोष्ट!—

सर म्हणाले,” आज आधी एक हुमान घालणार आहे, हुमान म्हणजे कोडं! ‘ओघराळ्याखाली अडकले बाई, हात पाय किती मारले, बाहेर यायला मार्गच नाही, ओघराळ्याखाली अडकले बाई, हात पाय किती मारले, बाहेर यायला मार्गच नाही’, सांगा कोण?”

सगळी एकमेकांकडे बघायला लागली, कुणालाच कळेना.

सर म्हणाले,”ओघराळं माहीत आहे कां? माठातून, समोर बसलेल्या नव्हे हं! डेऱ्यातून पाणी काढण्यासाठी वापरायची पळी म्हणा हवंतर. तीचा आकार कसा, मध्ये एक दांडी, तिच्या एका टोकाला पाणी भरून घ्यायची वाटी आणि दुसऱ्या टोकाला आडवा दांडा, हातात धरायचा.”

दोन चार मुलं म्हणाली, माहीत आहे म्हणून, पण ते विसापुरे सर होते. प्रत्यक्ष ओघराळं घेऊन आले होते, मुलांना दाखवायला. सर म्हणाले,” आता मला सांगा, अशी कुठली संख्या आहे? तिला काय नाव आहे?”

मुलं डोकं खाजवायला लागली तेवढ्यात मकरंद उठला.” डोक्यावर ओघराळं असणारी संख्या म्हणजे वर्गमुळातली संख्या असणार.”

“बरोबर”

अक्षय उठला,” तिला बाहेर पडायला मार्ग नाही, म्हणजे तिचं वर्गमूळ निघत नाही.”

“बरोबर”

“पण सर अशा पुष्कळ संख्या आहेत. 2,3,5,6,7 सारख्या!” पिट्या म्हणाला.

सरांनी त्या सगळ्या संख्या ओघराळ्यासह फळ्यावर लिहिल्या.म्हणाले,” तुम्हाला भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढता येतं. अशी कुठलीही एक संख्या घेऊन तिचं वर्गमूळ काढा बघू. पण एका बाकावरच्या तिघांनी वेगवेगळ्या संख्या घ्यायच्या.”

 थोड्या वेळाने मुलांची कुजबुज सुरू झाली. पान भरलं तरी उत्तर निघत नाही. शेवटी राधा उठली, ” सर, किती दशांश स्थळापर्यंत उत्तर काढायचं?”

“वर्गमूळ निघेपर्यंत!”

” निघणार नाही, सर. कारण भागाकार संपत नाही आणि आवर्ती पण येत नाही.”

एक वल्ली उठलाच,” सर माझं निघालं.”

“किती आलं?”

“सहा”

“संख्या किती घेतली होतीस?”

“36”

“ज्याचं वर्गमूळ अवयव पाडून निघत नाही किंवा ज्या मूळ संख्या आहेत, अशा घ्यायच्या.”

सगळी मुलं रडत सर, एक पान भरलं, कुणी सर, दोन पानं भरली. संपतच नाही.

“थांबा, मग!”फळ्यावर लिहीत लिहीत सर मुलांना सांगू लागले. “ज्या संख्या आपण दशांशात किंवा आवर्ती दशांशात लिहू शकतो, म्हणजेच अ/ब या रुपात लिहू शकतो, त्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. ज्या परिमेय नाहीत त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात.आणि परिमेय संख्येच्या अपरिमेय वर्गमुळाला करणी संख्या म्हणतात. या ओघराळ्यात अडकलेल्या संख्या म्हणजे सगळ्या करणी संख्या. ह्या करणी नावाची एक गंमतशीर गोष्ट आहे. फळ्यावरच्या महत्वाच्या गोष्टी लिहून घ्या मग गोष्ट सुरू करूया.

सरांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली.” भारतीय गणितज्ञ हे सगळ्या जगाच्या पुढे होते. इसविसन पूर्व म्हणजे पायथागोरस च्या कितीतरी आधी ‘सुलभ सूत्र नावाचा ( म्हणजे ज्याला आपण पायथगोरस चा सिद्धांत म्हणतो) सिद्धांत होता. काटकोन त्रिकोणाच्या दोन्ही बाजूच्या वर्गांची बेरीज करून त्याचे वर्गमूळ काढले की कर्णाची लांबी येते. पण बऱ्याच वेळा कर्णाचे वर्गमूळ निघत नाही त्यामुळे कर्णाची अचूक लांबी काढता येत नाही. त्यामुळे कर्णाचे दोन प्रकार पडले, वर्गमूळ निघणारा सुकर्ण आणि न निघणारा अकर्ण. ह्या अकर्णाच्या उत्तराचं नाव झालं करणी संख्या.

भारतात इसविसन पूर्व काळात दोन मोठी विद्यापीठे होती. सगळ्यात जुनं तक्षशिला आणि त्यानंतरचं नालंदा. या विद्यापीठात प्रचंड मोठी वाचनालये होती. त्या काळात छपाईचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळं निरनिराळ्या विषयावरची लाखो पुस्तकं हाताने लिहिलेली होती. या अफाट ज्ञानाची किंमत माहीत नसणाऱ्या माणसांनी हल्ला करून नालंदा नगर काबीज केलं आणि विद्यापीठाला आग लावली. असं म्हणतात की इतक्या चांगल्या प्रकारे जपलेली ती पुस्तकं महिनोनमहिने जळत होती. अरे! हे जाऊ दे!आपलं विषयांतर व्हायला लागलं आहे.”

“नाही सर सांगा की!”मुलं मागं लागली.

” अरे, आपली करणीची गोष्ट पुरी करूया. विद्यापिठाच्या गोष्टी फार मोठ्या आहेत. त्याला स्वतंत्र तास लागेल. ऑफ पिरियड असला की मला बोलवा, तेंव्हा सांगतो.

तर आपण करणी संख्या या नावाची गम्मत बघत होतो. तर भारतात आसपासच्या देशातून शिकण्यासाठी मुलं येत असत. असाच एक अलख्वारिझमी नावाचा पर्शियन खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होता. तो बगदाद च्या सर्वात मोठ्या लायब्ररीचा प्रमुख होता. तो साधारण नवव्या  शतकात भारतात आला. त्याला माहित नसलेल्या गोष्टी शिकून, कांही पुस्तकं मिळवून परत गेला. तो आपल्या १ ते ९ व शून्य या संख्यांच्या शोधामुळे प्रभावित झाला होता. त्यानं Hindu- Arabic Numeral system नावाचं पुस्तक अरेबिक मध्ये लिहिलं. नंतर त्याचं लॅटिन, इंग्लिश व युरोपियन भाषांत भाषांतर झालं.संस्कृत चं अरेबिक मध्ये भाषांतर करताना कर्ण म्हणजे कान हा अर्थ घेतल्यामुळे अकर्ण म्हणजे कान नसलेला म्हणून असम हा शब्द आला.लॅटिन मध्ये त्याच अर्थाचा सर्ड्स हा शब्द आला  आणि इंग्रजीत सर्ड ! म्हणजे जसं कानगोष्टी खेळताना मूळ शब्द बाजूलाच राहतो आणि नवीन निर्माण होतो तसं करणी संख्या या नावाचा मूळ अर्थ बाजूलाच राहिला आणि अर्थाशी कांहीही संबंध नसलेले शब्द तयार झाले.

 

आपल्याकडे आजकाल ” सगळे शोध आपणच लावले आहेत असं म्हणायची फॅशन झाली आहे” हे वाक्य ऐकायला मिळतं. पण अशी एखादी गोष्ट ऐकली की मग पटतं, की आपला अभिमान निरर्थक नाही. नाहीतर सगळ्या भाषांमध्ये असा असंबद्ध शब्द कां तयार झाला असता? आपल्या शास्त्रज्ञांनी एक चूक केली की कोणत्याही सिद्धांताला संशोधकाचं नाव दिलं नाही,कोणतही चांगलं, बुद्धीचं काम हे आपल्या हातून दैवी शक्ती घडवून आणते, त्यात आपलं कर्तुत्व काही नसतं, असं मानण्याची आपल्याकडे परंपराच आहे. आपण तर वेद ही अपौरुषेय मानतो, म्हणजे कोणत्यातरी अज्ञात शक्ती कडून त्यांची निर्मिती झाली आहे. नाहीतर वेदांवर सुध्दा ऋषींना हक्क सांगता आला असता. चला, तास संपल्याची घंटा झाली.”

        

सरांचा तास संपला पण अक्षय च्या डोक्यातून ती अडकलेली बया जाईल तर नां! घरी गेल्या गेल्या आज त्याला खायला नको होतं, खेळायला नको होतं. हातात वही पेन घेऊन बसला आणि लिहायला सुरुवात झाली. आईनं किती विचारलं, पण “थांब गं, नंतर सगळं सांगतो.” तासाभरानंतर एक कविता लिहून दाखवायला आईकडे आला. विसापुरे सरांच्या तासाला काय झालं ते सगळं इत्यंभूत सांगितलं आणि मग आईला कविता दाखवली.आई गहिवरली, मनोमन असेच शिक्षक त्याला आयुष्यभर लाभू देत अशी देवाकडे प्रार्थना केली आणि आपल्या डोळ्यातल्या काजळाचे बोट त्याच्या गालावर टेकवायला विसरली नाही. अक्षय बिचारा भांबावून आईकडे बघतच राहिला.

त्याची कविता तर तुम्हाला वाचायला आवडेल नं!

मी कोण समजायला सोपं आहे

नका करू कुणाची मनधरणी

एक पानावर ज्या गणिताचे उत्तर

मावत नाही ती नां मी ‘करणी’

 

हे नाव कसं, कुठून, कधी आलं

कथा आहे रंजक, ऐका पूर्ण

पायथागोरसच्या आधी आपल्या

गणितात होता सुकर्ण,अकर्ण

 

सुकर्णाचे निघत होते वर्गमूळ

अकर्णाचे मात्र बाकीत उरले

पण कर्णाचा दुसरा अर्थ कान

घोळ घालायला निमित्त पुरले

 

अलख्वारिझमीने  केलं मला असम अन् झाले बहिरी अरेबिकमध्ये

लॅटिनमध्ये झाले सर्ड्स – बधिर,  अन् मूक- सर्ड इंग्रजीमध्ये

 

बंदिस्त मी, कुणी येत जात नाही जणू,

सगळीच  माझ्यावर रुसली

एक बया दिसे ओघराळ्यासारखी

कायमची डोक्यावर येऊन बसली

 

बेरीज वजाबाकी कांही होत नाही

हाती येईल तुमच्या नुसती घंटा

गुणाकार भागाकार करायला मग

येईल  शत्रूपक्ष, सुरू  होईल  तंटा

 

हुश्श! झाली माझी सगळी गोष्ट न् वाटे

अभिमान भारतीयअसण्याचा         

राग येतो या शास्त्रज्ञांचा

आपले संशोधन मिरविण्याचा

 

माफ करणार नाही काळ त्या दुष्टांना

विचारवंतांचे ग्रंथ पेटविणाऱ्यांना

 

त्या राखेतून अगणित आले अन् येतील

पहा, कसे कवेत सारे जग हे घेतील

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परदु:ख शीतलम् !! ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ परदु:ख शीतलम् !! ☆ श्री सुहास सोहोनी ☆

“आमच्या पिढीला खूप कष्ट करावे लागले. खूप खस्ता खाव्या लागल्या. आमच्या आधीच्या पिढीला अशी धावपळ नव्हती, स्वास्थ्य होतं. आमच्या पुढची पिढी कामं खूप करते, पण पैसाही तसाच मिळतो की !!”

मला वाटतं की प्रत्येक पिढीतली  माणसं हेच म्हणत असतात ! त्याचं कारण एकच. “परदु:ख शीतलम् !!”

खरं म्हणजे प्रत्येक पिढी अतोनात कष्ट करून, अगदी रक्त आटवून आपला संसार चालवत असते आणि जेवढं जमेल, तेवढं काहीतरी पुढच्या पिढीसाठी करून सुद्धा ठेवत असते ! आपल्या वकुबानुसार, आर्थिक  परिस्थितीप्रमाणे आणि स्वतःच्या बुद्धी/समजूतीप्रमाणे. पण अनेक ठिकाणी पुढच्या पिढीला त्याची फार मोठी किंमत वाटत नाही, कारण परिस्थिती बदललेली असते. आर्थिक स्तर उंचावलेला असतो. गांवाकडे घेतलेली जमीन किंवा बांधलेलं घर, ही asset नसते, तर liability ठरत असते. त्यामुळे आधीच्या पिढीच्या कामगिरीवर विनाकारण शेरेबाजी सुरू होते. “खूप ओढाताण करून गांवाला तीन एकर जागा घेतली त्यांनी. त्याच्या ऐवजी मुंबई-पुण्याकडे तीन गुंठे जागा घेतली असती तर ? आणि त्यावेळी त्यांना ते शक्य सुद्धा  होतं !!” 

अशा comments वर काय बोलणार? त्यामुळे मधल्या आळीतले झंपूनाना चितळे रोखठोक म्हणायचे तेच खरं, ” ज्याचे त्याने स्वतःपुरते बघावे. जास्तीत जास्त, कंबरेस चड्डी बांधण्यापुरती नाडी दुसऱ्यास द्यावी. अखंड चड्डी देण्याच्या भानगडीत पडू नये. त्यात आपलीच लंगटी सुटते. शेवटी ज्याचा तो !”

… हा खरा लाख मोलाचा सल्ला !!

लेखक : सुहास सोहोनी. 

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “लिफ्ट…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “लिफ्ट…” ☆ श्री मंगेश मधुकर

मस्तपैकी थंडीचे दिवस,सकाळी सातची वेळ,खरंतर डबल पांघरून घेऊन झोपायची अतीतीव्र इच्छा तरीही मोह आवरून फिरायला जाण्यासाठी उठलो.नेहमीच्या रस्त्यावरून जाताना आजही ‘तो’ दिसला.गोल चेहरा,मोठाले डोळे त्यावर काडीचा चष्मा,फ्रेंच कट दाढी,तुळतुळीत टक्कल,अंगात निळा टी शर्ट,ग्रे ट्रॅक पॅन्ट अशा अवतारात चौकात स्कूटरवरून चकरा मारणारा ‘तो’ लक्षात रहायचं कारण म्हणजे त्याचं वेगवेगळ्या लोकांना स्कूटरवरून घेऊन जाणं आणि पुन्हा चौकात येऊन थांबणं.त्याचं वागणं पाहून आश्चर्य वाटलं आणि कुतूहलही जागं झालं.नेहमीप्रमाणं ‘तो’ चौकात उभा असताना जवळ जाऊन विचारलं. 

“सर,एक मिनिट!!”  

“येस”

“तुमच्या सोबत चहा घ्यायचाय”

“का?”

“चहाला कारण लागतं नाही.”मी 

“अनोळखी व्यक्तीकडून आमंत्रण असेल तर लागतं”

“ओके”मी नाव सांगितल्यावर त्यानेही नाव सांगितलं.”

“आता ओळख झाली.चला चहा घेऊ,तुमच्याशी थोडं बोलायचं होतं.”

“नक्की,पण पाच मिनिटानंतर,इथंच थांबा.आलोच” उत्तराची वाट न पाहता ‘तो’ स्कूटर घेऊन गेला.मी फक्त पाहत राहिलो.रस्त्यावरून घाईत चाललेल्या माणसाजवळ स्कूटर थांबवून ‘तो’ काहीतरी बोलला लगेच पायी चालणारा मागच्या सीटवर बसला अन दोघं निघून गेले.अवघ्या काही मिनिटांनी ‘तो’ परत आला.(संडे डिश™) 

“सॉरी,सॉरी,तुम्हांला थांबाव लागलं”

“नो प्रॉब्लेम.चला हॉटेलमध्ये जाऊ”मी 

“नको.त्यापेक्षा टपरीवरचा चहा भारी असतो”

“एक विचारायचं होतं”

“बिनधास्त”

“अनेक वर्षे सकाळी फिरायला जातो.वेगवेगळी माणसं बघायला मिळाली पण त्यात तुम्ही फार हटके वाटला.”

“काही विचित्र वागलो का”

“आठ दिवस तुम्हांला पाहतोय.सकाळी चौकामध्ये स्कूटर घेऊन उभे असता.लोकांना स्कूटरवरून सोडून आल्यावर परत इथे थांबता याविषयीच बोलायचं होतं.” (संडे डिश™)

“नक्की काय समजून घ्यायचयं”

“मला वाटतं तुम्ही लोकांना स्वतःहून लिफ्ट देता?”

“हो”

“का? कशासाठी?”

“आवड म्हणून”

“वेगळीच खर्चिक आवड आहे.हरकत नसेल तर जरा सविस्तर सांगता”

“ आवड खर्चिक असली तरी परवडतं म्हूणन करतो.आता पर्यंत टिपिकल आयुष्य जगलो.जबाबदाऱ्या आणि टेंशन्स घेऊन नोकरी केली. पन्नाशीनंतर मात्र एकेक व्याप कमी केले.व्हीआरएस घेतल्यावर छोटासा बिझनेस सुरू केला.गरजेपुरतं आणि भविष्यासाठी कमावलंयं.इतके दिवस फक्त स्वतःपुरतं आणि फॅमिलीचा विचार करून जगलो.आता इतरांसाठी काहीतरी करावं असं खूप वाटतं होतं.दिवासतला थोडा वेळ चांगल्या कामासाठी द्यावा असं ठरवलं.माझ्या निर्णयाला घरच्यांनी पाठिंबा दिला.”

“उत्तम विचार.”

“त्यानुसार विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना भेट दिली.सर्वांचं काम चांगलं होतं पण माझं मन रमलं नाही.काहीतरी वेगळं काम करायचं होत पण नक्की सुरवात कशी करायची हेच समजत नव्हतं”

“या कामाची सुरवात कशी झाली”

“एकदा मुलीला कॉलेजला जाण्यासाठी निघायला उशीर झाला म्हणून स्कूटरवरून तिला बसस्टॉपला सोडलं.परत येताना एकजण रस्त्याच्या बाजूने पाठीवर सॅग,हातात सुटकेस घेऊन अत्यंत गडबडीत चालत होता.घामाघूम झालेल्या त्याला एकही रिक्षा मिळत नव्हती.जाम वैतागलेला होता.त्याला पाहून मला कसंतरीच वाटलं. (संडे डिश™)

“मग!!”

“त्याच्या जवळ गेलो आणि स्कूटरवर बसायला सांगितल्यावर त्याचा चेहरा भूत पाहिल्यासारखा झाला पण ताबडतोब स्कूटरवर बसला.बस स्टॉपला वेळेत पोचल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मला खूप समाधान मिळालं.बसमध्ये शिरताना तो सारखा “थॅंकयू,थॅंकयू” म्हणत होता.त्याच्या आनंद पाहून मला दुप्पट आनंद झाला.”

“नंतर हे लिफ्ट देण्याचं काम सुरू केलं”

“हो,हटके काम करण्याचा मार्ग अचानक सापडला”

“खरंच वेगळं काम आहे”

“तसं पाहिलं तर खूप साधी गोष्ट आहे.खूप महत्वाचं काम असेल किवा परगावी जायचं असेल तर घरातून बाहेर पडायला उशीर होतो खूप धांदल उडते.सर्वांनीच या परिस्थितीचा कधी ना कधी अनुभव घेतलेला आहे.अशावेळी रिक्षा मिळत नाही.ऑनलाइन राईड बुक होत नाही.सोडायला येणारं कोणी नसतं आणि वेळ गाठायची असते नेमकं अशातच जर न मागता मदत मिळाली तर होणारा आनंद हा फार फार मोठा असतो.मला लोकांना आनंदी करण्याचा मार्ग सापडला.म्हणून मी रोज सकाळी स्कूटर घेऊन उभा असतो.” (संडे डिश™) 

“फार भारी कल्पनायं.लिफ्टची गरज आहे अशांना कसे शोधता कारण सकाळी व्यायामासाठी भराभर चालणारे अनेकजण असतात.”

“फार सोप्पयं, टेन्शनग्रस्त चेहऱ्यानं वेळ गाठण्यासाठी लगबगीनं चालणारे पटकन ओळखू येतात.”

“लिफ्ट सेवेला लोकांचा प्रतिसाद मिळतो?”

“खूप छान!!घरातून निघताना उशीर झालेला असताना जर  लिफ्ट मिळाली तर कोणीही आनंदानं तयार होणारच ना”

“ही सेवा सुरू केरून किती दिवस झाले”

“दोन महीने”

“पैसे घेता”

“गरजूंना लिफ्ट देतो त्यामुळे पैशाचा प्रश्नच येत नाही आणि अपेक्षाही नाही.”

“ग्रेट ”

“कोणी घाईघाईत चालताना दिसलं की मी जवळ जाऊन फक्त ‘बसा’ एवढंच म्हणतो.अनपेक्षितपणे मिळालेल्या मदतीमुळे लोक प्रचंड खुष होतात.तणावाखाली असणाऱ्या चेहऱ्यावर छान हसू फुटतं ते माझ्यासाठी लाखमोलाचं आहे”

“रागावणार नसाल तर एक विचारू” (संडे डिश™)

“अवश्य”

“हे सगळं कशासाठी करता”

“छान वाटतं म्हणून…” 

“एक से भले दो.माझ्याकडे सुद्धा स्कूटर आहे.उद्यापासून येतो” म्हटल्यावर ‘तो’ मोठ्यानं हसला आणि अचानक स्कूटर सुरू करत म्हणाला “आलोच”.मागे वळून पाहिलं तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनं पाठीवर बॅग, हेडफोन लावलेला तिशीतला आयटी वाला कंपनीची बस गाठण्यासाठी ताडताड चालत होता.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फटाके आणि फाटके… – लेखक : श्री. बापूसाहेब शिंदे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ फटाके आणि फाटके… – लेखक : श्री. बापूसाहेब शिंदे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

परवा सहज बाहेर पडलो. दिवाळी तशी म्हटली तर संपत आली होती.तसंही हल्ली दिवाळी पाचवरून दोन दिवसावर आली आहे.

म्हटलं,जरा सकाळी सकाळी फेरफटका मारून येऊ.

असाच रस्त्याने एकटा चालत होतो. अचानक माझी नजर रस्त्याचा दुसऱ्या बाजूला गेली. 

४-५ पोरं-पोरी.  जेमतेम  ७-१० वयोगटातील असतील…

पोरं तशी फक्त चड्ड्या घालूनच होती आणि त्या पण बऱ्याच ठिकाणी फाटलेल्या, नायतर  ठिगळं जोडलेल्या.पोरींचे कपडे पण तसेच ठिगळंच जास्त होती.

प्रत्येकाच्या हातात झाडू होता आणि ते रस्त्याला पडलेले फटाक्यांचे कागद झाडून  काढत होते.

जेवढा आनंद आमच्या पोरांच्या चेहऱ्यावर फटाके फोडताना दिसत असतो, त्यापेक्षा दुप्पट त्यांच्या चेहऱ्यावर होता.

जणू त्यांच्यातच शर्यत लागली होती, जास्त कचरा कोण साफ करतोय.

मला कुतुहल वाटलं त्यांचा उत्साह आणि ती धावपळ पाहून .

मी सहज रस्ता पार करून त्यांचेकडे गेलो.

सर्वांना बोलावले आणि विचारले,

“का रे,एव्हढी का गडबड सुरू आहे तुमची..?”

हे ऐकून त्यातला एक पोरगा म्हंटला,

”आमचे आई- बाप रस्त्याची साफ सफाई करतात. आम्हाला दिवाळीची सुट्टी आहे,

म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलंय, जो जास्त झाडलोट करेल त्याला भरपूर दिवाळी फराळ आणि नवीन कपडे मिळतील आणि प्रत्येकानं आपल्या आपल्या कचऱ्याचे वेगळे वेगळे ढीग  करायचे.मंग आमचे आय – बाप त्यात काय  फटाके असतील तर ते आम्हाला शोधून वाजवायला देणार…”

हे ऐकून मी सुन्न झालो. त्यातून मी सावरून सहज विचारले,”अरे, तुम्हाला तर फटाके ह्यातले शोधून देणार. मग तुम्हाला नवीन कपडे  आणि फराळ कसा काय देऊ शकतात ते..?” त्यांच्यातली सगळ्यात मोठी पोरगी बोलली,

”काका ते आमचे आई बाप झाडू मारत मारत जे बी घर रस्त्यात येतं,त्यांना विचारतात काय  फराळ उरले असेल तर आमच्या पोरासनी द्या.  कुणी देतो,कुणी असूनही हाकलून देतं.

काही लोक लय चांगली असतेत. ते न इचारता देतात.कपड्याचं पण तसंच. कुणी चांगली  कापड देतं, कुणी फाटलेली मग आमची आई त्याला जमत असल तर शिवते नायतर ठिगळ लावून देते आणि मंग आम्ही ती आमची  दिवाळीची कापडं म्हणून वरीस भर घालून फिरतो…”

हे माझ्यासाठी खूप भयानक होते,

असंही असू शकतं ह्यावर माझं विश्वास बसेना. माझ्या पायाखालची जमीनच सरकली….

सुख – समाधान कशात असतं,हे मला ह्या १० वर्षांच्या पोरांनी दोन मिनिटात शिकवलं होतं.

नाहीतर आम्ही १०० ची माळ आणली तरी त्या मोजत बसतो आणि १-२ फटाके जरी उडले नाही किंवा आवाज जरी कमी वाटला तरी सणासुदीला पण त्या दुकानदाराचा उद्धार करत बसतो…

कपडे तर आम्ही AC शोरूम शिवाय घालतच नाही. त्याशिवाय दिवाळी होतंच नाही, असा  आमचा गैरसमज असतो.

कुठं ती AC त गारठलेले कपडे आणि कुठं ती  ठिगळांची कपडे ज्यातून गारठापण रोखला जात नाही.

पण त्यासाठी त्या छोट्या जिवांची चाललेली धडपड .त्यांची धडपड आणि आमची धडपड पाहून एकच फरक जाणवला, ते आनंदानं समाधानाने मिळेल तेच सुख मानणारी वाटत होते , पण आमची धडपड ही कधीच आनंदी वाटली नाही.कधी चेहऱ्यावर समाधान दिसलेच नाही.

पण धडपडत राहत जायचे हेच आम्हाला माहिती. कारण आम्हाला सुख कशात आहे,

हेच समजत नाही .मी तसाच मागे फिरलो …घरातले सारे डब्बे शोधू लागलो. मिळेल तो फराळ पिशवीत घातला, पोरांचे मिळतील ते ५-६ कपड्याचे जोड, बायकोच्या कपाटातल्या ढीगभर साड्यातल्या ३-४  साड्या, माझी काही कपडे एका पिशवीत भरले आणि थेट त्या  पोरांकडे निघालो.

इकडे माझं काय सुरु आहे, हे माझ्या बायको पोरांना समजत नव्हते .त्यांचा तिकडे दंगा सुरु होता. आमचे कपडे ,खाऊ घेऊन गेले.

मी ते सारं त्या पोरांना दिलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. त्यांना काय करू आणि काय नको असं झालं होतं.

मी परत फिरलो आणि जाता जाता त्यांना  सांगितलं, इथून पुढं कोणत्याही सणाला माझ्या  घरी यायचं आणि इथून पुढे तुम्हाला दिवाळीचे नवीन कपडे ,फराळ आणि फटाके दरवर्षी मी  देत जाईन …माझे डोळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून पाण्याने डबडबले.

स्वतःला सावरत घरी आलो.

आता माझी बारी होती. मला घरी उत्तर द्यायचे होते …मी घरी पोहचणार तोच दारात सारी मंडळी उभी होती. मी तसाच पायरीवर बसलो. दोन्ही मुलांना जवळ घेतलं.बायको फुगून दाराला टेकूनच उभी होती. मी मुलांना जे काय पाहिलं ते सगळं सांगितलं.

आपण आपल्या ऐपतीप्रमाणे भारीत भारी कपडे, दागिने, सुगंधी साबण आणि सुगंधी उटणं लावले तरच दिवाळी होते, असं समजून आपण विनाकारण किती वायफळ खर्च करतो आणि समाजात असे किती तरी लोक आहेत  ज्यांना साधं साबण , तेल अशा साध्या साध्या  त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळत नाहीत.

हे समजावू लागलो. तुम्ही २ फुलबाजे कमी घेतले तरी रुसून बसता पण ती मुलं तुमच्या उडवलेल्या फटक्याच्या ढिगातून एकादी न उडलेली फटाकी मिळेल ह्या आशेने मन लावून तुम्ही केलेला कचरा साफ करत आहेत.

हे समजावण्याचा प्रयत्न करत होतो.

ती पोरं रस्ता झाडत झाडत आमच्या घराजवळ आली होती.आमच्या घरचे सारे टक लावून त्यांचेकडे पाहत होते.

साऱ्यांचे चेहरे पडले होते.

तोच माझा छोटा मुलगा माझ्या जवळून उठला,  थेट घरात गेला आणि लपवून ठेवलेले  एक टिकल्याचे पॅकेट आणि बंदूक घेऊन बाहेर  आला नि सरळ त्या पोरांकडे गेला आणि  त्यांना दिले.

हे पाहून त्या पोरांनी काम सोडलं आणि जणू काय आपल्या हातात हजाराची माळ  पडल्यासारखे एक-एकजण ते टिकल्या  बंदुकीत घालून वाजवत नाचू लागले.

माझा मुलगा तसाच पळत आला नि माझ्या  कुशीत बसून रडायला लागला. त्याला काय समजलं मला माहिती नाही आणि मीही त्याला विचारणं मुद्दाम टाळलं,काहीही असेल…

तरी एक वात पेटली होती याची मला जाणीव झाली होती. ह्या साऱ्यातून एक गोष्ट मला  आणि माझ्या कुटुंबाला समजली. ती म्हणजे  “फटाके”आणि “फाटके”  ह्यात फक्त एका “कान्याचा” फरक असतो आणि तो “काना” एकाद्या “काठी” सारखा असतो योग्य ठिकाणी  लागला तर साऱ्या गोष्टींचा आनंद देणारा  आधार बनतो. नाहीतर ते आयुष्याचं ओझं होतो ….

म्हणून ठरवलं आता कोणताही सण आला की अशा २ का होईना,पण ह्या पोरांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचं काम करायचं.

फटाके एकदा पेटले की एकदा मोठा आवाज  करून कागदच होतात पण कोणाच्यातरी  चेहऱ्यावर एकदा पेटवलेले आनंदरुपी समाधान आवाज न करता पण एखाद्या रंगीत फुलबाज्याप्रमाणे फुलत राहतं.

लेखक :श्री.बापूसाहेब शिंदे.

संग्राहिका :सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – बोलकी मुखपृष्ठे ☆ “चैतन्याचा जागर” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “चैतन्याचा जागर” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

काल श्री घावटे सर यांचा षष्ट्यब्दीपूर्तिसमारंभ  उत्कृष्ट रितीने पार पडला देखणे सरांच्या आशिर्वादानेच कदाचित देखणा सोहळा झाला असावा. 

असो. 

त्या कार्यक्रमाबद्दल सगळ्यांनी लिहिलेच आहे. पण मला मात्र काल ज्या पुस्तकाचे प्रकाशन केले त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाबाबत आवर्जून लिहावेसे वाटले.

मनात विचार आला कविता पुस्तक किंवा लेखनकृती या बद्दल रसग्रहण बरेच करतात. पण ज्या मुखपृष्ठामुळे पुस्तकाची ओळख बनते ते मुखपृष्ठही खूप विचारपूर्वक अतिशय परिश्रमाने बनलेले असते.

त्यामुळे त्या मुखपृष्ठाचा अर्थही लोकांनी ग्रहण करावा म्हणजे मग त्या पुस्तकाला खरा न्याय मिळेल असे मला वाटते .

म्हणूनच कालच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ  मला  अतिशय भावले. पुस्तकातील लेखनाशी तादात्म्य साधणारे अतिशय कमी गोष्टींमधून खूप मोठा विचार देणारे आणि बरेच काही सांगून जाणारे आहे. 

कदाचित मी जे पाहिले मला जे दिसले त्यापेक्षा जास्त अर्थही असू शकेल या चित्राचा. पण मला भावलेले माझ्या नजरेने सांगितलेले अर्थ मी उलगडून सांगणार आहे.

प्रथमत: इतके चांगले मुखपृष्ठ करणार्‍या श्री संतोष घोंगडे यांचे आभार.

०१) प्रथमत: मुखपृष्ठावर मध्यभागी असलेल्या चित्रावर नजर केंद्रित होते आणि दिसते डमरूच्या आकाराचे हे चित्र.

***  यामधे हा डमरू म्हटला तर श्री शंकराचे हे वाद्य तिन्ही लोकात याचा आवाज जाईल हे सांगते. 

*** जर डमरू म्हणून नाही पाहिले तर मोठमोठ्या देवालयात वाजणारा चौघडा किंवा नगारा किंवा डंका आहे. हा नगारा  त्रेलोक्यात याचा त्याचा डंका पिटणार आहे.

*** जर हे दोन्ही नसेल तर देवीचा संबळ याचे दोन भाग एकावर एक ठेऊन हा संबळ आता जागरण गोंधळ मांडणार आहे आणि जागर करणार आहे.

०२) नंतर लक्ष जाते त्यावरील दोन भगव्या पताकांकडे

*** या पताका म्हणजे समईतील दोन फडकणार्‍या वाती वाटतात

*** ज्योत से ज्योत जलाते चलो हा पण अर्थ त्यातून निघू शकतो. मोठ्या ज्योतीने म्हणजे मोठ्या पिढीने आपले ज्ञान पुढच्या लहान पिढीला सांगितले पाहिजे. ही ज्ञानज्योत ही ज्ञान पताका सदा फडकत राहिली पाहिजे.

*** ही पताका म्हणजे वारकरी संत वैष्णवांची द्योतक आहे अशी ही पताका संस्कृती परंपरा यांचे प्रतिक आहे. जणू संस्कृती जागर करत आहे

*** हीच पताका राजे शिवछत्रपती यांच्या यशोगाथा प्रत्येक मराठा मावळा शिवभक्तच नाही तर अटकेपारही झेंडा फडकावते. 

***घावटे सर स्वत:ही शिवाजीराजे भक्त आहेत हे कार्यारंभी केलेल्या शिवाजी प्रतिमापूजनाने लक्षात आलेच असेल. म्हणून त्यांच्याप्रतीची ही कृतज्ञताही यातून व्यक्त होते.

शिवाजी शिवाय राष्ट्र पूर्ण होऊच शकत नाही म्हणून राष्ट्र जागर ही चालला आहे

*** या पताकाच्या काड्या उद्बत्ती सारख्या दिसतात. या उद्बत्तीचा दरवळ आसमंतापर्यंत जावा.

०३) नंतर लक्ष जाते या चित्राच्या सावलीकडे•••

*** ही सावली देवघरातील निरांजनाप्रमाणे दिसते.  पुन्हा संस्कृती जागर. 

*** हा जागर करताना त्यातील ज्योत मोरपिसाचा आकार घेऊन येते. म्हणजेच हा जागर मनात कल्लोळ निर्माण न करता मनाला एक मोरपिशी स्पर्श देऊन जातो. 

*** मोरपिसामधला डोळा म्हणजे सगळ्या वाचकांनी मनाच्या डोळ्यांनी हे वाचन करावे असे सुचवते 

*** हाच डोळा स्त्री गर्भासारखा वाटतो 

डोक्यावर पदर घेतलेल्या स्त्री सारखा वाटतो 

स्वत: एका कोषात गुंतलेल्या स्त्री प्रतीमेचा वाटतो .

•• हेच नारी सन्मानाचे द्योतक वाटते

हेच नारींना सबला करण्यासाठी मांडलेल्या विचाराचे प्रतिक वाटते 

*** अर्थातच समाजातील स्त्री प्रतीमा उज्वल करण्यासाठी केलेला समाज जागर वाटतो .

०४) नंतर लक्ष जाते या संपूर्ण चित्राच्या बाजूला असलेल्या दोन कोयर्‍यांकडे

*** पुन्हा संस्कृती प्रतीक

*** या कोयर्‍या म्हणजे पताकांची फडफडणारी ज्योत मालवू नये म्हणून केलेले हातांचे कोंदण वाटते . आपली श्रेष्ठ परंपरा सांगणारी ही छोटीशीच प्रतिमा.

*** नीट पाहिले तर लक्षात येते या कोयर्‍या म्हणजे अवतरण चिन्ह आहे. जे घावटे सरांचे म्हणणे या पुस्तकातील अवतरणात घेऊन आले आहे. हा प्रबोधन जागर चालला आहे.

०५) त्यानंतर बाजूला स्पष्टपणे दिसणार्‍या अस्पष्ट रेषांकडे लक्ष जाते

*** त्यामधे दिसतात असंख्य चेहरे ते समाजाचे प्रतिक आहे आणि हा समाज जागर चालला आहे सांगते.

*** हेच चेहरे आपल्या राष्ट्राचे द्योतक आहे म्हणून या राष्ट्रासाठी मांडलेला राष्टीय जागर ही वाटतो .

०६) नंतर लक्ष जाते रेषांच्या सरस्वतीकडे

*** हे ज्ञानाचे प्रतिक आहे ज्ञान जागर चालला आहे.

*** ज्या सरस्वतीने ही बुद्धी दिली त्या ज्ञानदे प्रती कृतज्ञता व्यक्त होत आहे

*** अज्ञान तिमीरांधस्य ज्ञानांजन शलाकया प्रमाणे जेथे जेथे अज्ञान आहे तेथे तेथे यातील ज्ञान शलाकेने जीवन उजागर होवो म्हणून दिसणारा हा तेजोमय प्रकाश अर्थातच सफेद रंगात लिहिलेली अक्षरे•••      “चैतन्याचा जागर”  

खरोखर इतके बोलके मुखपृष्ठ नक्कीच पुस्तक वाचायला प्रेरणा देणारे आहे.

सरांनी समाज जागर , संस्कृती जागर, राष्ट्रीय जागर, विकास जागर, प्रबोधन जागर या पाच विभागात जरी विभागणी केलेली असली तरी ज्ञान जागर, देवी जागर, शारदा / सरस्वती जागर इ अनेक जागरांच्या नद्या मिळून निर्माण होणार्‍या चैतन्य सागराचा हा चैतन्य जागर आहे. पुस्तकात काय आहे हे चटकन सांगणारे हे चित्र आहे.

एखादी सुंदर तरूणी पाहिल्यावर तिच्या मनात काय चालले आहे हे तिच्या चेहर्‍याकडे पाहिले डोळ्यात बघितले तरी लगेच समजते.तसेच या मुखड्यावरून अंतरंग लगेच समजते.

 हे मुखपृष्ठ या जागराची शक्ती दाखवणारे आहे. 

मला तर वाटते  नुसते चित्र एक सुरेख पेंटींग होऊन घरातील भिंतीवर यायलाही काही हरकत नाही. सतत नजरेसमोर जागर राहील. 

या उत्कृष्ट मुखपृष्ठ चित्रासाठी श्री संतोषजी घोंगडे यांचे पुन्हा आभार. 

एक चित्र परिक्षण करण्याची संधी मिळाली म्हणून हे चित्र निवडणार्‍या घावटे सरांचे आणि संवेदना प्रकाशनच्या नितीनदादा हिरवे यांचेही आभार.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares