मराठी साहित्य – विविधा ☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – २” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – २” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

आम्ही आज गुलमर्गला भेट देणार होतो. प्रत्यक्ष हिमशिखरावर चढाई. मनात खूप उत्सुकता होती. पहाटे साडेपाच वाजता आमची बस निघाली. त्यामुळे गाडीतून सूर्योदय बघायला मिळाला. अगदी सूर्योदयापासूनची निसर्गाची विविध रूपे बघायला मिळत होती. रस्त्याच्या दुतर्फा उंच उंच देवदार वृक्ष, सूचीपर्णी झाडे, सफेदाची झाडे होती.

तो धावता निसर्ग अक्षरशः नजर खेचून घेत होता. मधूनच हिमशिखरे दिसत होती. शिखर दिसले की एकमेकांना हाका मारून दाखवणे आणि त्याचे वर्णन करणे अखंड सुरू होते. सगळेच जण अतिशय उत्साहीत होते.

गुलमर्गच्या आधी तांगमर्गला सर्वांनी फरकोट, हातमोजे आणि गमबूट घेतले. तिथून छोट्या गाड्यांनी सर्वजण पुढे गुलमर्गला गेलो. वळणावळणाचा  घाटरस्ता आणि त्यातून दिसणारा निसर्ग खुणावत होता. इथून आता खास आकर्षण असणाऱ्या गोंडोला राईडने म्हणजेच केबल कारने पर्वतावर जायचे होते.

सुरुवातीला केबल कारने पहिला टप्पा कांडोरी स्टेशनवर गेलो. आम्ही अंदाजे दहा हजार फूट उंचीवर पोहोचलो होतो. एकदम वातावरणात फरक जाणवत होता. उंचावरची बर्फाच्छादित शिखरे, धुके, खोल दरी यांचे दृश्य खूपच सुंदर होते. ज्यांना हवेचा त्रास जाणवत होता,  पुढे उंचावर जायचे नव्हते असे अनेक जण याच टप्प्यावर हाती काठी घेऊन किंवा घोड्यावरून समोरील उंच टेकडीवर चढत होते. इथला बर्फ जुना असल्याने खूप टणक आणि घसरडा होता. इथे काचेचे इग्लू रेस्टॉरंट आहे.

या स्टेशनवरून आम्ही केबल कारने अफरवत पर्वतावरील दुसऱ्या टप्प्यावर गेलो. तिथे आम्ही १३५०० फूट उंचीवर आलो होतो. केबल कारने वर जाताना खाली खोल खोल दरी,  उतारावरील उंच उंच पाईन वृक्ष आणि वरची एकदम उंच शिखरे यामुळे पोटात खड्डा पडल्यासारखे वाटत होते. असे अधांतरी तरंगत जाण्यातला थरार मात्र जबरदस्त होता. आजूबाजूचे दृश्य अतिशय मनमोहक होते. सर्व झाडे, पर्वताचा बराचसा भाग बर्फाच्छादित असल्याने पांढरा दिसत होता.  दुसऱ्या टप्प्यावर आलो आणि शब्दशः बर्फात उतरलो. चारीबाजूने बर्फाच्छादित शिखरावर पोहोचलो होतो. समोरचे दृश्य बघून अक्षरशः नजरबंदीच झाली.

शिव शंभूची पवित्र भूमी

 बर्फाच्छादित शुभ्र कडे

विलोभनीय निसर्गाचे

 भव्य दिव्य दर्शन घडे ||

तिथे एकदम खूपच थंड हवा होती. सर्वांनी सर्व जामानिमा परिधान केलेला असल्याने थंडीचा त्रास होत नव्हता. बर्फ एकदम ताजा होता. अगदी भुरभूरीत. हाताने गोळा करता येत होता. तिथे आल्यावर सर्वच पर्यटकांचे बर्फातले खेळ सुरू झाले. नातवंडांनी गोळे केले, बाहुल्या बनवल्या, चक्क बर्फावर लोळणही घेतली. बर्फावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशाने डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून सर्वांनी गॉगल्स घातले होते. एकंदरीतच प्रत्येकाचे रूप एकदम इथे वेगळेच झाले होते.

या ठिकाणी फोटो काढायची तर पर्वणीच होती. विविध पोज मध्ये सर्वांचेच फोटो सेशन सुरू होते. बरेच जण बर्फात स्किईंग, स्नो-बोर्डिंग करत होते. इतके दिवस ऐकू येणारी हिमशिखरांची साद इथे वरती आल्यावर शांत झाली होती. आम्ही वरपर्यंत येऊ शकलो याचे समाधान खूप मोठे होते. त्यामुळे एक खूप मोठा आनंददायी अनुभव मिळाला होता

जवळजवळ दोन अडीच तास इथे घालवायला मिळाले. किती  बघू आणि किती नको असं झालं होतं. कितीही पाहिलं तरी मनाचं समाधानच होत नव्हतं. ऐकणं, सांगणं आणि प्रत्यक्ष अनुभवणं यात फार फरक असतो त्याची इथे चांगलीच प्रचिती आली.  निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार प्रत्यक्ष अनुभवण्याच्या समाधानात केबल कारने पुन्हा खाली आलो.

गुलमर्ग हे पीर पंजाब रेंजमध्ये आहे. ते पूर्वी ‘गौरी मार्ग’ म्हणून ओळखले जात असे. केबल कारने म्हणजेच गोंडोलाने अफरवत पर्वतावर आपण जातो. इथून खिल्लनमर्गचे विलोभनीय दर्शन होते. अप्रतिम नजारा दिसतो. काश्मीर ट्रीपचे खास आकर्षण म्हणजे ही गुलमर्गची गोंडोला राईड. ही गोंडोला आशियातील सर्वात उंच तर जगातील दुसरी सर्वोच्च आणि दुसरी सर्वात लांब केबल कार आहे. एका कारने सहा जणांना जाता येते.  इतरांच्या केबल कार वर जाता येता पाहणे, आपण स्वतः जाता येतानाचा अनुभव घेणे, त्या वेळेचे निसर्गदर्शन हा एक खूप वेगळाच पण सर्वांगसुंदर अनुभव आहे. पांढरे झालेले असंख्य उंचच उंच पाईन वृक्ष, बर्फाच्छादित उंच शिखरे आणि खाली खोल दरी यामध्येच ऊन आणि धुक्याचा पाठशिवणीचा खेळ हे अतिशय मनोरम दृश्य असते. केवळ एक अविस्मरणीय असा बेजोड अनुभव घेऊन आम्ही खाली उतरलो.

परत येताना काश्मिरी कार्पेट फॅक्टरीला भेट दिली. प्रत्येक प्रांताचे एकेक वैशिष्ट्य असते. काश्मिरी गालिचे ही इथली खास निर्मिती. कार्पेट कसे बनवतात याची झलक आणि असंख्य सुंदर असे नमुने बघितले. अगदी लाखाच्या पुढे किंमत असलेला अप्रतिम गालिचा बघीतला. एक अतिशय उत्तम आणि खास अशी ही कलाकारी आहे. ही कार्पेटस् घराच्या दिवाणखान्याला किंवा बैठकीच्या खोलीला एकदम खानदानी रूबाब बहाल करतात. अशा रीतीने आजचा दिवसही अतिशय छान गेला. हिमशिखरांचा एक अविस्मरणीय असा सहवास अनुभवता आला. आता वेध होते ते पहेलगामचे.

क्रमशः…

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अमूर्ततेचा शोध ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ अमूर्ततेचा शोध… ☆ श्री सुनील काळे 

भारतात अनेक जातींची, वेगवेगळ्या धर्मांची, विविध पंथाची, विविध भाषांची , वेगवेगळ्या विचारसरणींची , वेगवेगळा पेहराव करणारांची जशी रेलचेल  आहे तशीच चित्रकलेच्या क्षेत्रातही असंख्य वेगवेगळे प्रकार आहेत . काहीजण वास्तववादी चित्र काढतात , काहीजण व्यक्तीचित्र रेखाटण्यात तर काहीजण निसर्गचित्रात माहीर असतात . काहीजण अमूर्त आकारांच्या चित्रशोधात सतत मग्न व तल्लीन झालेली असतात . या सर्व चित्रकारांची माध्यमेही वेगवेगळी असतात . काही चित्रकार जलरंगात , काही तैलरंग तर काहीजण ॲक्रलिक रंगाचा वापर करतात .  एकाच विषयाच्या , वेगळ्या अमूर्त आकारांच्या चित्रशोधकार्यात कलाकार मंडळी कधी पाहून रंगवत असतात तर काहीजण प्रथम रंगवतात व नंतर पाहत असतात . प्रत्येकाची रंगवण्याची पद्धती वेगवेगळी असते .माझा एक जिज्ञासू चित्रकार मित्र भेटला की मला नेहमी अमूर्त चित्रांविषयी माहिती विचारायचा पण त्याच्या प्रश्नानां उत्तरे देताना मी भांबांऊन जायचो कारण अँब्स्ट्रॅक्ट  चित्र काढणे एक अवघड आणि तितकीच सोपी पण आव्हानात्मक व मानसिक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे असे मला आजही प्रामाणिकपणे वाटते .

1993 साली उमेदीच्या काळात मी मुंबईच्या प्रिन्सेस स्ट्रीटला पारशी डेअरी शेजारी असलेल्या प्रसिद्ध केमोल्ड फ्रेम्समध्ये कामाला होतो . त्याठिकाणी अनेक प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे फ्रेमिंगसाठी येत असत . एके दिवशी खास मजबूत पॅकींग केलेले एक मोठे पार्सल खास स्पेशल गाडीत घेऊन कंपनीचे मालक केकू गांधी स्वतः वर्कशॉपला आले होते . एका मोठ्या चित्रकाराचे चित्र खास स्पेशल महागडी फ्रेम करण्यासाठी आले होते . ते अमूर्त चित्र एक कोटी रुपयांचे असून त्या चित्राला कंपनीद्वारे खास विमा संरक्षण केले होते . त्यामूळे त्या चित्राची फ्रेम काळजीपूर्वक करून घेण्याचे मोठे आव्हान माझ्यापुढे होते .

वर्कशॉपचा इन्चार्च म्हणून मी काम करत असल्याने त्या चित्राची पूर्ण जबाबदारी माझी होती . त्यासाठी मी सर्व तयारी केली . पण मलाही चित्र समजून घेण्याची उत्सुकता मोठी होती . वर्कशॉपला एक मोठे बर्हीवक्र भिंग घेऊन ते अमूर्त चित्र इतके महाग का आहे याचाच शोध घेण्याचे ठरवले . ते चित्र पूर्ण रात्रभर अगदी जवळून भिंगातून मी पहात होतो . कधी दूरून पाहायचो . त्या अदभूत चित्राचे आकार , रंगाचे ॲप्लीकेशन भलतेच वेगळे वाटत होते . कशाचा कशालाच मेळ लागत नव्हता . कधी वाटायचे फाटक्या विविध रंगाच्या लहानमोठ्या  चिंध्या एका लाकडाच्या तुकड्यात अडकल्या आहेत . तर कधी वाटायचे ह्या छोट्या छोट्या आकारांच्या रंगाच्या फटकाऱ्यांमूळे या चित्रात एक वेगळी रंगसंगती तयार झाली आहे . संपूर्ण चित्रात एक निर्जर निवांत शांतता पसरली आहे असे वाटायचे. कधी वाटायचे एक निवांत बेदरकार वाहणारी नदी एका नादभऱ्या तालात मनसोक्तपणे , स्वच्छन्दीपणे वहात आहे . ते चित्र गतिमान वाटायचे तर काही अँगलमधून शांत वाटायचे . अनेकवेळा पाहूनही मला त्यावेळी त्याचा अर्थ नक्की समजला नव्हता . त्या चित्राचे न समजलेले आकार , रंग , चित्राची रचना कित्येक वर्ष कायमची डोक्यात ठाण मांडून बसलेली होती . ते अमूर्त चित्र नक्कीच विसरण्यासारखे नव्हते .

पावसाळा संपल्यामूळे आज सकाळी सगळीकडे स्वच्छ वातावरण होते . मेणवली गावाजवळ कृष्णा नदी वाहते तेथे निवांतपणे फिरायला नदीकिनारी गेलो होतो . सगळीकडे हिरवागार परिसर , थंड हवा व नुकतीच सुर्याची किरणे पडत असल्याने पाण्याचा खळखळाट व त्या पाण्यावरील प्रतिबिंब मोत्याचा सर पडल्यासारखे चमकत होते . अनेकविध पक्षांच्या चिवचिवटामूळे आसंमतात एक वेगळे नादभरे संगीत कानांवर पडत होते .

नदीच्या किनाऱ्यावर चालताना मात्र एकदम वेगळेच अद्भूत चित्र दिसले . नदीच्या प्रवाहातून वहात आलेली घाण ,माणसांनी टाकलेली रंगीबेरंगी फाटलेले कपडे , प्लास्टीकच्या पिशव्या , बारदाने , थर्माकोलच्या वस्तू , बिसलरीच्या बाटल्या , जुन्या बॅगा , वापरलेल्या बूटांच्या व चपलेच्या जोड्या , झाडांच्या मोठमोठ्या बुंध्यावर व लटकत्या फांद्यांवर लोंबकळत होत्या . 

ती लाल ,पिवळी , जांभळी असंख्य अनेकरंगी छोटी छोटी फाटकी लफ्तरे निसर्गाच्या मोठ्या कॅनव्हासवर जणू अमूर्त चित्रांसारखी वाऱ्यावर डोलत होती . त्याच्या एकत्रित असण्याने ,फडकण्यामूळे त्या कॅनव्हासला एक अद्भूत गुढता निर्माण झाली होती . त्या चमकणाऱ्या सुर्यकिरणांच्या साक्षीने तो कॅनव्हास आता एका मोठ्या अमूर्त पेंटींग असल्यासारखाच भासत होता . 

तीस वर्षानंतर त्या अमूर्त चित्राचा विषय आता मनामध्ये हळूहळू पूर्णपणे उलघडत होता . माणसांनी टाकलेल्या अनेक बिनवापराच्या वस्तू , माणसांनी टाकलेला कचरा माणसांसाठीच  किनाऱ्यावर मुक्तपणे सोडून नदी मात्र स्वच्छपणे पाण्याच्या प्रवाहाचा खळखळाट करत नव्या उर्जेने , नव्या उमेदीने , नव्या धेय्याने , नव्या आकांक्षेने वाहत चालली होती 

नव्या अमूर्ततेच्या शोधात . . . . 

कोणतीही अपेक्षा , कोणतीही गुंतागुंत ,  कोणतीही तक्रार न करता ,मनात कोणतीही आढी न ठेवता स्वच्छ पाण्यासोबत नदी वेगाने वाहत चालली होती 

नव्या अमूर्ततेच्या शोधात . . . . . . 

आपणही कोणती अढी , कोणत्या इच्छा , कोणतेही वादविवाद डोक्यात न ठेवता नदीसारखे स्वच्छ वहात राहत राहीले पाहीजे कशातही गुंतून न राहता.  सगळा जात , पात, धर्म , उच्च , नीच आशा , अपेक्षांचा साचलेला डोक्यातला कचरा , राग , लोभ, मोठेपणाची हाव किनार्‍यावरच सोडून दिली पाहीजे आणि जीवनात मुक्तपणे आशाविरहित निर्विकार प्रवास केला पाहीजे …. नदीप्रमाणे  

नव्या अमूर्ततेच्या शोधात…….

नव्या अमूर्ततेच्या शोधात…….

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “देवाचं दुकान” ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

“देवाचं दुकान ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

एके दिवशी मी रस्त्याने जात होतो. वाटेत एक बोर्ड दिसला, ‘ईश्वरीय किराणा दुकान…’

माझी उत्सुकता वाढली. या दुकानाला भेट देऊन त्यात काय विकले जाते ते का पाहू नये?

हा विचार येताच आपोआप दार उघडले. थोडेसे कुतूहल असेल तर दरवाजे आपोआप उघडतात. ते उघडावे लागत नाहीत.

मी दुकानात पाहिले तर सर्वत्र देवदूत उभे होते. एका देवदूताने मला टोपली दिली आणि म्हणाला, “माझ्या मुला, काळजीपूर्वक खरेदी कर, माणसाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट इथे आहे.”

देवदूत पुढे म्हणाला, “जर तुला टोपली एकाच वेळी भरता येत नसेल, तर पुन्हा ये आणि पुन्हा टोपली भर.”

आता मी सगळं बघितलं. आधी संयम विकत घेतला, मग प्रेम, मग समजूतदारपणा, मग विवेकाचे एक-दोन डबे घेतले.

पुढे जाऊन विश्वासाचे दोन-तीन डबे उचलले. माझी टोपली भरत राहिली.

पुढे गेलो.पावित्र्य दिसले. विचार केला- कसं सोडू? तेवढ्यात शक्तीची पाटी आली.शक्ती पण घेतली..

हिंमतसुद्धा घेतली.वाटले की हिमतीशिवाय आयुष्यात काहीच चालत नाही.

आधी सहिष्णुता घेतली. मग मुक्तीची पेटीही घेतली.

माझे सद्गुरू प्रभुजींना आवडणाऱ्या सर्व वस्तू मी विकत घेतल्या. मग एक नजर प्रार्थनेवर पडली.मी त्याचाही डबा उचलला.

कारण सर्व गुण असूनही माझ्याकडून कधी काही चूक झाली, तर मी देवाला प्रार्थना करेन की देवा,मला माफ कर.

आनंदी होऊन मी टोपली भरली, मग मी काउंटरवर गेलो आणि देवदूताला विचारले, “सर.. या सर्व गोष्टींसाठी मला किती पैसे द्यावे लागतील?”

देवदूत म्हणाला, “माझ्या बाळा, इथली बिल भरण्याची पद्धतही दैवी आहे. आता तू जिथे कुठे जाशील, तिथे या गोष्टींची उधळपट्टी कर, सर्वांना मुक्तपणे वाट. या गोष्टींचे बिल असेच भरले जाते…”

या दुकानात क्वचितच कोणी प्रवेश करतो. जो आत जातो, तो श्रीमंत होतो. तो या गुणांचा भरपूर उपभोग घेतो आणि लुटतो.

प्रभूंच्या या दुकानाचे नाव आहे ‘सत्संगाचे दुकान’….

सद्गुणांचा खजिना भगवंताने दिला आहे. रिकामा झाला तरी सत्संगाला या आणि टोपली भरा.

देवाच्या या दुकानातून मी एकतरी वस्तू आपलीशी करू शकेन असा मला आशीर्वाद द्या.

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ काहूर मनी दाटले… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ काहूर मनी दाटले… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

या निर्जन निवांत स्थळी, आणि अश्याच रोजच्या कातर वेळी, वाट पहात बसते तुझी प्रेमात बुडालेली वेडी खुळी. तू हवा हवासा  असतोस जवळी..दिनवासर दिनकर निरोपाचे काळवंडलेले अस्तराचे पालाण घालून आसंमाताला जातो अस्ताला डोंगरराजीच्या पलिकडे दूर दूर. ते पाहून  हूरहूर मनातील उमटते  तरंग लहरी  लहरी ने तडागाच्या जलाशयावर. आता क्षणात येशील तू अवचित जवळी अशी मनास माझ्या समजूत घालते  आभासमय आशेवर. निराशेच्या काळ्या मळभाने गिळून टाकतात डोंगर, तलावाचे काठ, नि पाते पाते तरूलताचे, तृणपातीचे माझ्या मनासहीत..चाहूल पदरवांची येईल का , आतुर झालेले कान नि दाटून गेलेल्या  चोहिकडेच्या अंधकाराने भयकंपिताचे आलेले भान. आजची आशा निराशेत नेहमीप्रमाणे  लुप्त झाली, तसे उठून निघाले पाय ओढीत तनाचे मण मण ओझे घराकडे.चुचकारीले कितीतरी परी हटवादी मनास जोजवेना ते आढेवेढे..

.. अशी रोजच संध्याकाळी कातर वेळी, वाट पहात बसते तुझी प्रेमात बुडालेली वेडी खुळी. काहूर मनी दाटले नेत्रातून पाझरले.

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – १” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – १” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची

दरवेळी हे नाट्यगीत ऐकताना हिमालयाची ओढ जागी व्हायची. खरं तर ती शुभ्र हिमशिखरे डोळा भरून पाहण्याची माझ्याप्रमाणे अनेकांची इच्छा असते. पण ती प्रत्यक्षात येणे इतके सोपे नसते. इतकी वर्ष ती शिखरं साद घालीत होती. यावर्षी आम्ही तिला प्रतिसाद दिला. या सुट्टीत काश्मीरला भेट देण्याचे ते स्वप्न प्रत्यक्षात आले.

भारतभूच्या  ‘नंदनवना’ची सफर ठरली. नियोजनाचे सर्व सव्यापसव्य पार करीत आम्ही अगदी सहकुटुंब त्या देवभूमीत जाऊन पोहोचलो. त्यावेळी संध्याकाळ झालेली होती. त्या संधीप्रकाशात ‘दल’ सरोवरात एका शिकाऱ्यातून आमच्या नियोजित हाऊस बोटवर जाऊन पोहोचलो. विविध रंगात, विविध प्रकाराने, रोषणाईने सजविलेले शिकारे, मोठ्या हाऊस बोटस् आणि त्यांची पाण्यातील प्रतिबिंबे ! एकूणच भुरळ घालणारं मोठं मोहक वातावरण होतं.

आत्तापर्यंत सिनेमातून पाहिलेली शिकाऱ्यातली गाणी आठवली. काश्मिरी गालिचे, कलाकारी, लाकडी कलाकुसर, झुंबरं यामुळे हाऊस बोट मधील वातावरणात आपोआपच शाही महालाचा आभास जाणवत होता. या बोटीवर राहण्याचा अनुभव खूप खास होता. एक वेगळाच आनंद मिळला.

या हाऊस बोटची संपूर्ण लाकडी बांधणी आणि रचना खूप वेगळी असते. देवदार वृक्षापासून ती बनवतात. हे लाकूड पाण्यामधे खराब न होता सुरक्षित रहाते. एक बोट बनवायला अंदाजे ३ ते ५ कोटी पर्यंत खर्च येतो. या बोटी इथल्या पर्यटनाच्या खासियत आहेत. करोना काळानंतर आता पर्यटनाने पुन्हा वेग पकडला आहे.

चार चिनार’च्या बेटावर जाताना फक्त आपापल्या कुटुंबासोबत केलेली अडीच तीन तासांची शिकारा राईड केवळ अविस्मरणीय होती. साथीला ‘आपलं माणूस’, संथपणे जाणारी बोट, आजूबाजूला जाणारे असंख्य शिकारे,  दूरवर पसरलेले दल सरोवर, पार्श्वभूमी वरती उंच उंच चिनार, देवदारची झाडे, पर्वतरांगा केवळ अप्रतिम ! अगदी स्वप्नवत अनुभव होता तो.

चार चिनारच्या बेटावर प्रसन्न, आल्हाददायक वातावरण होते. दूरवर दिसणारे अप्रतिम निसर्गसौंदर्य, ‘कावा’ चहाची सुंदर चव, कश्मिरी फिरन / फेरन मधील फोटो सेशन असे सुखद क्षण घेऊन परत फिरलो.

परत येताना फ्लोटिंग मार्केटमध्ये काश्मिरी साड्या, ड्रेस मटेरियल, कार्पेट्स, लाकडी वस्तू, ज्वेलरी यांच्या शोरूमस्, दुकाने बघितली. या सरोवरात गवताच्या बेटांवर वाफे बनवून शेती केली जाते ही गोष्ट खूप वेगळी होती.

यानंतर बघितले ते पुरातन धार्मिकस्थळ म्हणजे शंकराचार्य मंदिर. गोपाद्री पर्वत किंवा शंकराचार्य टेकडीवरील शंकराचार्य मंदिराला ‘जेष्ठेश्वर मंदिर ‘ असेही म्हणतात. या मंदिरात शंकराचे अति भव्य लिंग आहे. शंकराचार्यांचे साधना स्थळ पण तिथे आहे. उंच पायऱ्या चढण्याचा काहीही त्रास न होता आध्यात्मिक महत्त्व असणाऱ्या या पवित्र मंदिराला भेट देता आली याचे मनाला खूप समाधान मिळाले. या मंदिर परिसरातून श्रीनगरचे आणि भव्य निसर्गाचे विलोभनीय दर्शन झाले‌. हा मंदिर परिसर मिलिटरीच्या अधिपत्याखाली असल्याने सर्व व्यवस्था, स्वच्छता वगैरे गोष्टी उत्तम आहेत.

त्यानंतर श्रीनगरमधील प्रसिद्ध ‘निशात बागे’ला भेट दिली. असंख्य नमुन्याचे गुलाब पाहून मन अतिप्रसन्न झाले. अगदी छोट्या गुलाबापासून खूप मोठ्या आकाराचे कलमी गुलाब होते. असंख्य रंग, आकार, एकाच फुलात वेगवेगळ्या रंगछटा, वेली गुलाब असे एकाहून एक वेगवेगळे गुलाब पाहून ‘हे पाहून का ते’, ‘ हे सुंदर का ते जास्त सुंदर ‘ असे होऊन गेले.  शोभेची छोटी छोटी फुले सुद्धा तितकीच विविध आकार आणि रंगात आकर्षित करीत होती. चिनारचे मोठे मोठे वृक्ष वातावरण जास्तच शितल आणि आल्हाददायक बनवीत होते. बागेच्या मध्यातून वाहणारा पाण्याचा धबधबा, कारंजी नेत्रसुखद होती. एकंदरीत ही बाग ‘ दि गार्डन ऑफ प्लेजर’ हे नाव सार्थ करत होती.  

त्यानंतर ‘शालिमार बागे’ला भेट दिली. इथेही मोठे मोठे चिनार वृक्ष, असंख्य रंगीत गुलाब, धबधबा, कारंजी, राणीमहाल, इतर दोन-तीन जुन्या इमारती आहेत. प्रचंड मोठी अशी ही बाग माणसांनी पण भरलेली होती.

एकंदरीतच अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य, शिकारा सफर, शंकराचार्य मंदिर दर्शन यामुळे श्रीनगर मधील पहिला दिवस खूप आनंद देऊन गेला. आता प्रत्यक्ष हिमशिखरावर जायची जास्ती उत्सुकता होती.

क्रमशः… 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पाठीवर हात असू दे… – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ पाठीवर हात असू दे… – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

तुटपुंज्या पगारात पै पै बाजूला काढून गणपतीला गावाला नेणारे वडील आठवतात, जिच्या चपलेचा सोडल्यास इतर कुठलाही कुरकुर आवाज न करणारी आई आठवते, पहाटेच्या अंधारात वडिलांची विहिरीवरची आंघोळ, ते मंत्रपठण आठवतं, आईच्या आवरून घेण्यासाठीच्या हाका आणि आजीनी गोधडी बाजूला करून गालावरून फिरवलेला खरबरीत हात आठवतो, ‘झोपलाय तर झोपू दे गं, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता कळत नाही, अंग दुखत असेल, मुंबैहून यष्टीनी यायचं म्हणजे खायचं काम नाहीये, आरत्या व्हायच्या वेळेस उठेल बरोब्बर आणि मेले सगळे एकदम उठले तर पाणी कशात तापवशील एवढ्या सगळ्यांसाठी’ असं म्हणायची.

मला कायम प्रश्न पडायचा, असल्या खरबरीत हातांनी एवढे सुंदर, मऊसूत, एकसारखे पांढरेशुभ्र मोदक ती कशी काय करते? तिला विचारलं तर ती धपाटा घालून म्हणाली होती, ‘ रांडेच्या, माया लागते रे त्यासाठी मनात, पारीला चिकटून येते मग ती, पारी हातात फिरते ना तेव्हा देवाचं म्हणते मी, चिरा सांधतो रे तो सगळ्या, नावं माझं मेलीचं होतं ‘..  

आता यातलं कुणीही नाही. काय एकेक आठवणी असतात बघा, आईचा मोदक फुटू नये म्हणून मी तिच्याजवळ बसून देवाचं म्हणायचो लहानपणी…  वेडेपणा नुसता सगळा.   

काय एकातून एक आठवत जातं बघा. आरत्या झाल्यावर आजीला नमस्कार केला की ती दोन तीन मिनिटांचा आशीर्वाद पुटपुटायची. आजोबा जानव्याची किल्ली दाखवून लपवलेल्या खाऊची, गमतीची लालूच दाखवायचे आणि खुणेने म्हणायचे, ‘ ये इकडे, तिचं संपायचं नाही ‘. 

सात दिवस हा हा म्हणता सरायचे….  विसर्जनाला जाताना आजी आजोबा नि:शब्द रडायचे. लहानपणी वाटायचं त्यात काय रडण्यासारखं आहे, आता कळतं. आपलाही काळ आता सरत चाललाय, एक दिवस आपल्यावर हीच वेळ, असंच वाटत असावं का?

आजोबा गणपती उचलताना म्हणायचे, ‘ पुढच्या वर्षी मी नसलो तरी चिंतामणी करेल हो तुझं सगळं नीट, पाठीवर हात असू दे तुझा सगळ्यांच्या ‘. 

मग सगळे भरल्या डोळ्यांनी पाय ओढत नदीकडे जायचे. लहानपणी कळायचं नाही एवढं पण तेव्हाही नदीवरून परत येताना काहीतरी हरवल्यासारखं, विसरून आल्यासारखं वाटायचं. 

दुसऱ्या दिवशी निघताना आज्जी तोंडावरून हात फिरवायची आणि बोळक्या तोंडानी आवाज करत पापी घ्यायची. आमच्या निघायच्या वेळेला आजोबा उगाच लक्षात नसल्यासारखं अंगणात कामं करत रहायचे. आम्हांला सोडायला पुलावर यायचे गड्यासोबत आणि गाडी सुटली की नदीवरून परत चालल्यासारखे हळू हळू परत जायचे. 

घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांचं विसर्जन करून सुद्धा खूप काळ लोटलाय आता. त्यांच्यामागे जमेल तेवढा उत्सव केला. पण त्यात मन काही रमलं नाही एवढं खरं. 

आयुष्याचे सरळ सरळ दोन भाग पडले, एक त्यांच्यासह, एक त्यांच्याशिवाय. आता उकडीचा मोदक तोंडात जाताना आजीच्या, आईच्या खरबरीत हाताचा स्पर्श ओठाला व्हावा असं वाटून जातं. आता तो कितीही चविष्ट असला तरी घशाखाली आवंढ्याची सोबत असल्याशिवाय जात नाही.

माझंही वय विसर्जनाच्या आसपासच आहे म्हणा आता. पाटावर बसून मीही तयार आहे.

पण विसर्जनाची मिरवणूक बघितली की मला हसू येतं. देवाला सुद्धा नंबर लागल्याशिवाय विसर्जन सोहळा नाही तिथे माझ्यासारख्या सामान्याची काय कथा !  

प्रत्येकाची ‘अनंत चतुर्दशी’ ठरलेली आहे….”कधी”? एवढाच काय तो जीवघेणा प्रश्नं. 

चला, आता एकूणच सगळं घाईनी आवरायला हवंय, नाहीतर विनायकराव उखडायचे उगाच. .

लेखक : श्री जयंत विद्वांस

(जवळ आलेल्या चतुर्दशीला नजरेआड करून, नव्हे तिच्या आगमनाची चाहूल टाळून चतुर्थीचा  आभास निर्माण करणाऱ्या, आणि स्वतः “अनंत” असल्याची दिशाभूल करून घेणाऱ्या माझ्या पिढीला समर्पित…) 

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मृत्यूनंतरही अवयवदानाने जिवंत राहा…” – लेखक : श्री निरेन आपटे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “मृत्यूनंतरही अवयवदानाने जिवंत राहा…” – लेखक : श्री निरेन आपटे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

आपण जीवनभर इतरांच्या उपयोगी पडत असतो. आपण मृत्यूनंतरही इतरांच्या उपयोगी पडू शकतो. त्यासाठी उपाय आहे अवयवदान किंवा देहदान!

आपल्या मृत्यूनंतर आपले , चांगल्या स्थितीत असलेले अवयव , दुसऱ्याला दान करण्याची किंवा संपूर्ण मृतदेह दान करण्याची व्यवस्था तुम्ही करू शकता. त्याबद्दल सांगत आहेत निरेन आपटे. 

ग.दि. माडगूळकरांनी गीतरामायणात लिहिले आहे, 

“मरण कल्पनेशी थांबे, तर्क जाणत्यांचा. 

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.”

माणूस जे काही जगतो, तर्क लावतो, शोध लावतो ते मृत्युपाशी येऊन थांबतात. मृत्यूनंतर पुढे काय होतं, हे कोणालाही माहित नाही. कारण आपण पराधीन आहोत. तरीही आपले डोळे, त्वचा, किडनी, यकृत, हृदय, फुफ्फुस, आतडी, स्वादुपिंड, हात, पाय दुसऱ्याला देऊन आपण आपल्या मृत्यूनंतरही अवयवाद्वारे ह्या जगात राहू शकतो. आपला मृत्यू नैसर्गिकपणे मेंदू बंद होऊन (ब्रेन डेड) झाला असेल तर आपण एकूण ९ व्यक्तींना विविध अवयव देऊ शकतो. अवयवदान करून झाल्यानंतर मृत व्यक्तीचा देह त्याच्या नातलगांकडे सोपवला जातो. जेणेकरून ते अंत्यविधी करू शकतील. संपूर्ण शरीर दान केलं असेल तर मात्र मृतदेह नातलगांकडे सोपवत नाहीत. ज्या हॉस्पिटलमध्ये किंवा मेडिकल काॅलेजमध्ये शरीर दान केलं ते हॉस्पिटल साधारणपणे ५ वर्षे तो देह जपून ठेवतात. देह टिकाव म्हणून त्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. असा देह वैद्यकीय प्रशिक्षण व संशोधनासाठी उपयोगात आणतात. त्यानंतर काळजी व सन्मानपुर्वक मृतदेहाची विल्हेवाट लावतात. हा मृतदेह वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतो. ते विद्यार्थी मृत शरीर उघडून प्रत्येक अवयव प्रत्यक्ष पाहू व हाताळू शकतात. पुढे तेच डॉक्टर बनतात आणि वैद्यकीय सेवा पुरवून मानवी जीवन सुखकर बनवतात. 

एका आकडेवारीनुसार दरवर्षी ४,००,००० व्यक्ती अवयवाची वाट पाहत असतात. अवयव मिळाला नाही तर नाईलाजाने मृत्यू स्वीकारतात. त्यांच्याकडे एकच उपाय असतो तो म्हणजे अवयव मागणाऱ्यांच्या प्रतिक्षा यादीमध्ये नाव नोंदवणे! प्रत्यारोपणासाठी अवयव न मिळाल्यामुळे दर दोन मिनिटाला एक भारतीय माणूस आपले प्राण गमावत असतो. अवयव मागणाऱ्यांच्या प्रतिक्षा यादीत जरी नाव नोंदवले तरी अवयव दान करणाऱ्यांची संख्या खूप कमी असल्यामुळे अवयव मिळत नाहीत. १९९५ सालापासून आतापर्यंत मेंदू बंद पडून मृत झालेल्या फक्त १४,००० व्यक्तिंनी अवयव दान केले आहेत. सामान्य भारतीय माणूस अवयव दान करायला राजी होतं नाही. कारण अवयव दान केल्यामुळे पुढील जन्मी दान केलेल्या अवयवाशिवाय जगावे लागेल, मृत व्यक्तीचे शरीर खराब होईल, ज्येष्ठ व्यक्तीचे अवयव दान करता येत नाहीत, मृत व्यक्तीच्या घरी सरकारी ऍम्ब्युलन्स अवयव काढून घ्यायला येते असे बरेच गैरसमज आहेत. मात्र ह्यातील काहीही खरं नाही. एखादी व्यक्ती मृत पावली तर त्याचे शरीर जाळून किंवा पुरून टाकतात. मरणारा व्यक्ती आपला देह इथेच सोडून जातो. त्याची राख होते. पुढील जन्म असेल तर ते शरीर तो सोबत नेत नाही. थोडक्यात त्याचे शरीर वाया जाते. अवयवदान किंवा देहदान केलं तर शरीराचा चांगला उपयोग होऊ शकतो. 

अवयव किंवा देहदानाला वयाची मर्यादा नाही. २४ तास, ७ दिवस केव्हाही दान स्वीकारले जाते, मात्र मृत्यूनंतर ठराविक अवधीत, शक्य तितक्या लवकर दान करावे लागते. त्यासाठी फक्त मृत व्यक्तीच्या जवळच्या नातलगांनी परवानगी द्यावी लागते. हाॅस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर असतानाच मेंदू बंद पडून मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे हाॅस्पिटलचे अधिकृत मार्गदर्शन व सेवा उपलब्ध असते. हृदय बंद पडून घरी मृत्यू आल्यास दानासाठी संबंधित संस्थेला किंवा व्यक्तीला कळवावे लागते (NGO). त्यांना कळवल्यानंतर त्वचादान व नेत्रदान स्वीकारण्यासाठी त्वचापेढी व नेत्रपेढीचे त्यांचे (Skin / Eye Bank) डॉक्टर घरी येऊन दान स्वीकारतात. मात्र दान दिल्यानंतर त्याबदल्यात पैसे मिळत नाहीत. हे दान निस्वार्थी मनाने करावे लागते. देहदानासाठी मृतदेह जवळील मेडिकल काॅलेजच्या एनाटॉमी डिपार्टमेंट मध्ये नेऊन द्यावा लागतो. (त्यासाठी काही मोजक्या मेडिकल काॅलेजकडून शववाहिनी पाठवली जाते). तसेच १८ वर्षांपुढील कोणतीही व्यक्ती दान करण्यासाठी आपलं नाव नोंदवू शकते. नाव नोंदवले नसेल तरीही हे दान करता येते. 

अवयव दान करण्यासाठी प्रत्येक अवयवाचे “शेल्फ लाईफ” ठरवलेले आहे. “शेल्फ लाईफ” म्हणजे माणूस मृत झाल्यानंतर त्याचे अवयव काढून गरजू व्यक्तीवर ठराविक तासात प्रत्यारोपित करण्याचा कालावधी. त्वचा आणि डोळे दान करायचे असतील तर मृत्यूनंतर ५ ते ६ तासात काढून घ्यावे लागतात. हे अवयव काढून घेताना मृत व्यक्तीचं एक थेंबही रक्त सांडत नाही. त्वचा दान केली असेल तर ती आग, विद्युत अपघातात त्वचा गमावलेल्या व्यक्तीला जीवघेण्या संसर्गापासून बचावासाठी उपयोगी पडू शकते. त्वचा दान केल्यानंतर ती पुढील ५ वर्षे जतन करून ठेवता येते. 

डोळे दान केल्यावर ते ४८ तासांमध्ये अंध व्यक्तीला देता येतात. दान केलेल्या डोळ्यांचे प्रत्यारोपण केल्यामुळे त्या व्यक्तीला दिसू लागते. हात दान केला असेल तर तो १२ तासांमध्ये गरजू व्यक्तीला द्यावा लागतो. अवयव किंवा देहदान करण्यासाठी मृत्यूचे कारण तपासले जाते. तसेच, गरजू व्यक्तीचा रक्तगट जुळून येणे इत्यादी गोष्टी तपासल्या जातात. सुदैवाने, विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की एका व्यक्तीचे अवयव दुसऱ्या व्यक्तीला लावण्यात फार अडचण येत नाही. 

देहदानासाठी १९४९ साली आणि अवयवदानसाठी १९९४ साली कायदा झाला. पण पुरेशी जनजागृती नसल्यामुळे फार कमी प्रमाणात दान दिले जाते. मुळातच मृत्यूवर फारशी चर्चा होत नाही. अशी चर्चा करणे अशुभ मानले जाते. आपोआपच मृत्यूनंतर इतरांच्या उपयोगी पडणाऱ्या अवयवांचं काय करायचं हा विचार मनात येणं कठीण असतं. 

लिव्हर, आतडी, स्वादुपिंड हे आपले अवयव आपला मेंदू बंद पडल्यानंतरही काम करू शकतात हे अनेकांना माहित नाही. जर जनजागृती झाली, मोठ्या प्रमाणावर दान झाले तर एकट्या नेत्रदानामुळे देशातील सर्व 

” कॉर्नियल अंध” व्यक्तींना दृष्टी मिळेल. ते हे सुंदर जग पाहू शकतील. 

मृत्यू दोन प्रकारे होतो. सामान्यपणे हृदय बंद पडून मृत्यू होतो. दुसरा प्रकार आहे मेंदू बंद पडून मृत्यू होणे. अवयवांना सतत रक्तपुरवठा लागतो. म्हणून हृदय बंद झाल्यानंतर काही अवयव निकामी होतात तर त्वचा, डोळे, हाडे हे अवयव कामी येऊ शकतात. हे अवयव मृत्यू झाल्यानंतर ५ तासांमध्ये काढून घ्यावे लागतात. त्वचेचे ३ थर असतात. त्वचा दान केली असेल तर मांडी व पाठीची त्वचा काढून घेतली जाते आणि त्यानंतर मृतदेह नातलगांकडे दिला जातो. ज्यांना अवयव दिले जातात त्यांची नोंद किंवा निवड सरकारी नियमानुसार होते. त्यात पारदर्शकता असते. 

मृत्यूनंतर संपूर्ण देह दान केला असेल तर रसायने वापरून हा देह ५ वर्षापर्यंत टिकवला जातो. एक देह डॉक्टर बनणाऱ्या १० विद्यार्थ्यांना उपयोगी पडतो. हे डॉक्टर दिवसाला किमान एका व्यक्तीचा जीव वाचवतात. 

४० वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत, ते सर्व मिळून १,२०,००० जणांचे प्राण वाचवू शकतात. म्हणजे मृत झाल्यानंतरही आपला देह इतक्या लोकांच्या उपयोगाला येतो! फक्त अपघातामुळे निधन पावलेल्या, किंवा पोस्टमॉर्टेम झालेल्या वा मृत्यूसमयी बेडसोर झालेल्या व्यक्तींचे मृतदेह आणि गँगरीन, हेपिटायटिस, एड्स, डेंगू, कोरोना इत्यादी कारणांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह देहदानासाठी स्वीकारले जात नाहीत. 

पुराणामध्ये दधिची ऋषींनी मृत्यूनंतर आपल्या अस्थी दान केल्याचा उल्लेख सापडतो. म्हणजे प्राचीन काळीही अवयवदानाची संकल्पना होती. कविवर्य बा.भ. बोरकर ह्यांनी असे म्हटले की मी आयुष्यभर मासे खाल्ले. माझा मृत्यू झाल्यावर, माझा देह समुद्रात फेकून द्यावा. जेणेकरून मासे मला खातील. अवयवदान किंवा देहदानाचा विचार आधीही झाला होता. आता विज्ञानाच्या प्रगतीमुळे तो शक्य होत आहे. ही एक मोठी चळवळ बनावी ह्यासाठी हा लेख पुढेही फॉरवर्ड करा. 

अवयवदान आणि देहदानासंबंधी आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही खालील क्रमांकावर फोन करू शकता, आपले नक्कीच स्वागत होईल. 

श्री आपटेकाका: + 91 9820078273 

सौ. नीला आपटे: 08291019157

लेखक : श्री निरेन आपटे

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सु-शिक्षित ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

सु-शिक्षित ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

खूप वर्षांपूर्वी मी पावसाळी दिवसात लोणावळा एसटी स्टँड वर एका खूप गरीब आणि खूप म्हाता-या आजीकडून एक रुपया देऊन बारा आण्याच्या भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा घेतल्या आणि एसटी कडे धावलो. माझी जागा खिडकीकडे होती. एसटी सुटायला वेळ होता. मी खिडकीशी जागा पकडली आणि तितक्यात मी त्या म्हाता-या आजीला निरनिराळ्या एसटी बसेस मध्ये डोकावून लंगडत लंगडत धावत येताना पाहिलं.

आमच्या एसटीत तिला मी दिसताच तिचे डोळे चमकले आणि ती निर्मळ हसली. तिने हात उंचावून मला तिच्याकडून येणे असलेले चार आणे दिले आणि म्हणाली “भ्येटला रं तू,  लय शोधला म्या तुला. ह्ये घे तुजं चार आनं. म्या म्हटलं की तुजं पैसं देण्यासाठी आता फुडला जल्म घ्यावा लागतोय मला बग.”

एसटी सुटायला वेळ होता, म्हणून मी तिला थांबायला सांगून आणि शेजा-याला ‘येतोय’ अशी खूण करून खाली उतरलो.

मी तिला विचारलं, ‘काय गं आज्ज्ये, एवढ्यासाठी तुझी पाटी तिथे तशीच सोडून मला शोधत आलीस होय ? त्यावर ती म्हणाली “बाबा, आंदळ्याची गुरं द्येव राखतोय बग. आनी बाजूची म्हतारी हाय की लक्ष ठिवायला”.  मी विचारलं, “आज्ज्ये, राहिले असते चार आणे तुझ्याकडे तर काय झालं असतं गं एवढं ?”

त्यावर ती जे उत्तरली, ते मला निरुत्तर करणारं होतं. ती म्हणाली, ‘असं बग बाबा, ऱ्हायलं असतं चार आनं माज्याकडं तर आपला दोगांचा पुन्ना जल्म काय चुकत न्हवता बग. माजा तुजं चार आनं देन्यासाटी आन् तुजा चार आनं घेन्यासाटी, आन् त्येला जबाबदार व्हते मी. आन् पुन्ना फुडला जल्म कंचा येतुंय कुणाला ठावं, माणसाचा, प्रान्याचा कीं आणखी कुनाचा, म्हंजी आला का पुन्ना चार आण्यासाटी पुन्ना पुन्ना जल्माचा फ्येरा ? आणि त्यात आपण पुण्य करतोय की पाप काय म्हाईत, आन् मग ह्ये चक्र बंद व्हनार कदी ?” मी खल्लास !

एसटी सुटायला अजून वेळ  होता. मी मनात म्हटलं, की अजून जरा आजीकडून काही तरी शिकावं, आणि म्हणून मी तिला म्हटलं, “आज्ये, माझे चार आणे देऊन टाकायचे कुणाला तरी गरीबाला.” त्यावर आजी म्हणाली “आरं, कुनाचं तरी पैसं कुनाला तरी द्यायचा अदिकार मला न्हाय, पैसं तुजं आणि त्यावर मी कशापाई पुण्य कमवू? मी तुजं चार आनं तुला दिलं, आता मी सुटले बग.”मी निरुत्तर झालो.

तितक्यात कंडक्टर आला, त्याने घंटी मारली, मी पटकन् त्या आजीला वाकून नमस्कार करून एसटीत शिरलो तर ती आजी मोठ्या समाधानात पाठमोरी आपल्या पाटीकडे लंगडत लंगडत निघाली होती. माझे डोळे भरून आले होते.

या घटनेतून मी इतकाच बोध घेतला की माझ्याहून ती कितीतरी अधिक सुसंकृत होती आणि म्हणूनच सुखी, समाधानी होती, मी ‘शिक्षित’ असेन पण ती ‘सु-शिक्षित’ होती, सु-संस्कृत होती.

म्हणून मी तत्क्षणी तिला गुरूपदाचा मान दिला.

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “लोकमान्य  आणि गणेशोत्सव…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “लोकमान्य आणि गणेशोत्सव…” ☆ सौ राधिका भांडारकर 

गणेश स्थापनेमागील लोकमान्य टिळकांचा असलेला उद्देश आज पूर्णत्वास गेलेला दिसतो का?

गणेशस्थापने मागील लोकमान्य टिळकांचा असलेला उद्देश आज पूर्णत्वास गेलेला दिसतो का? या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही याच फूटपट्टीत अपेक्षित असावं.  “हो” तर म्हणू शकतच नाही. उत्तर “नाही” हेच असले तरी नाही असे म्हणतानाही मनात अनेक विचार आणि प्रश्न वाहत राहतात.  त्याबद्दल लिहिण्यापूर्वी आधी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या गणेशोत्सवाची उद्दिष्टे, हेतू काय होते, यावर बोलूया. 

देश पारतंत्र्यात होता.  ब्रिटिशांच्या गुलामगिरीमुळे  पिचलेला होता.  समाज विस्कटलेला होता.  अनेक जाती वंश, वर्ण, अंधश्रद्धा आज्ञान यामुळे समाज एकसंध नव्हता.  ब्रिटिशांचेच लांगुलचालन करणारा एक भारतीय वर्गही  होता.  मात्र सामान्य जनांना,   परकीय सत्तेचा जुलूम आणि अत्याचार याविरुद्ध  एकत्र आणणे हे जरुरीचे आहे असा विचार जाज्वल्य देशाभिमानी आणि राष्ट्रवादी,  स्वातंत्र्यप्रेमी लोकमान्य टिळकांच्या मनात सतत असे. 

वास्तविक तेल्या तांबोळ्यांचा नेता म्हणूनही त्यांचा उपहास करण्यात आला होता. ब्रिटिशांच्या मते तर भारतीय असंतोषाचे ते जनकच होते.  ब्रिटिशांशी सामना हा केवळ अर्ज विनंत्या करून होणार नाही हे जसे टिळकांनी  जाणले होते तसेच लोक भावनेची ही नस त्यांनी ओळखली होती. जाती,  उपजातीच्या जंजाळात अडकलेल्या जनतेला धार्मिक आवाहन केल्यास हेवेदावे विसरून,  ही जनता एकत्र येऊ शकेल हे लोकमान्य टिळकांनी जाणले आणि त्यातूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना त्यांना सुचली. म्हणजेच या गणेशोत्सवाची मूळ कल्पना स्वराज्यासाठी संघटन ही होती.  आणि म्हणूनच घराघरातला गणेशोत्सव त्यांनी हमरस्त्यावर आणला. हा खाजगी उत्सव सार्वजनिक केला.

लोकमान्य टिळकांनी १८९३साली  केसरी वाड्यात त्याची सुरुवातही केली.  समाज प्रबोधन हा या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मागचा मूळ हेतू होता.  या माध्यमातून  त्यांनी क्षात्रतेज आणि देशप्रेम यांची अलौकिक सांगड घातली.  स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांनी अशा पद्धतीने लोकांच्या मनावर बिंबवले.  थोडक्यात लोकमान्य टिळकांच्या या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागे  राष्ट्रकारण होते.  एक अत्यंत उदात्त,  प्रेरक असे कारण होते.  धर्मकार्य हा केवळ बहाणा होता.  स्वराज्य निर्मितीची आस उत्पन्न व्हावी हेच ध्येय होते. 

या सार्वजनिक गणेशोत्सवाची किर्ती चहुदूर पसरली आणि गावोगावी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापन होऊ लागली.  आणि ती परंपरा आज सव्वाशे वर्षानंतरही टिकून आहे.

मात्र आजच्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सवातील उद्दिष्टे दिसतात का या प्रश्नाचे “नाही” असे ठाम उत्तर देताना माझ्या मनात काही विचार येतात आणि तेही मला इथे  व्यक्त करावेसे वाटतात. 

माझा जन्म स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाला.  पारतंत्र्याच्या काळाचा फक्त इतिहास मी मनापासून अभ्यासला आणि त्याचा मला आजही अभिमान आहे.  या लेखाच्या निमित्ताने मला माझे बालपणी अनुभवलेले कित्येक सार्वजनिक गणेशोत्सव आठवले.  गणेश मूर्तीभोवती  केलेले ते सुंदर महाभारत, रामायणातल्या कथा सांगणारे देखावे आठवले.  गणेशोत्सवात सादर केलेली नाटके आठवली.  कित्येक नामवंत कलाकार या गणेशोत्सवांनी रंगभूमीला दिले.  उत्तम वक्त्यांची प्रबोधन पर भाषणे ऐकली.कीर्तने ऐकली. संगीत मैफिलीतले नामवंत गायक आठवले.  ते परिसंवाद, बौद्धिके सारं काही आठवलं आणि त्या पार्श्वभूमीवर आजचे गणेशोत्सव अनुभवताना नक्कीच उदासीनता येते.  लोकमान्य टिळक तर यातून हरवलेलेच आहेत. आता उद्दिष्ट हरवले आहे आणि उत्सव राहिला आहे.  त्यातही पैसा, दिखावा, राजकारण यांचा प्रवेश झालाय.  सण उत्सव हे संघटनात्मक असतात.  समाजात ऐक्य, बंधुभाव प्रेम, समता, निर्माण करण्यासाठी असतात ही भावना न दिसता स्पर्धात्मक वादच दिसतात.  अहमहमिका, चढाओढ दिसते.  राष्ट्र कारण न दिसता राजकारण जाणवते. गोंगाट आणि धिंगाणा अनुभवायला मिळतो.  शहरात तर कित्येक वेळा सार्वजनिक गणेशोत्सवामुळे गल्लोगल्ली वाहनांची कोंडी होऊन जनजीवनच विस्कळीत होते.  म्हणूनच आजच्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कल्पना टिकून आहेत का? या प्रश्नाचे नाही असे उत्तर देतानाही  एकच वाटते की आता काळ बदललाय. देश स्वतंत्र ही झालाय.

देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे झाली.  स्वातंत्र्यासाठी जनजागृती किंवा संघटन हे या गणेशोत्सवा मागचे टिळकांचे उद्दिष्ट आज ऊरले नसले तरी उद्दिष्टे बदलू शकतात.  ती अधिक सकारात्मक असू शकतात. आज देश स्वतंत्र असला तरीही मानसिक गुलामगिरीत आहेच.  आजच्या सार्वजनिक गणेशोत्सवात आपण आपला देश, आपल्या राष्ट्रीय समस्या, आपले विज्ञान प्रगत जीवन, त्याचबरोबर आपली घसरत चाललेली नीती मूल्ये, देशाभिमान  यासंदर्भात पुन्हा एकदा देशाला संघटित करण्याची,  ऐक्याच्या प्रवाहात आणण्याची प्रेरणा बाळगली पाहिजे.नव्या पिढीला आपल्या प्रेरक इतिहासाची ओळख करून द्यायला हवी.

म्हणूनच  नुसतेच ढोल ताशे नकोत. थिल्लरपणा नको.  एकापेक्षा एक गणेश मूर्तींचे प्रदर्शन नको.  नुसताच उत्सव नको. सोहळा नको. तर जी परंपरा सव्वाशे वर्ष आपण टिकवली आहे त्यात नवी आवाहने पेलण्याचं सामर्थ्य दिसलं पाहिजे.  आणि हे इतर अनेक सार्वजनिक उत्सवासाठीही लागू आहे.

तर आणि तरच लोकमान्य टिळकांच्या या सार्वजनिक उत्सवाला दिलेला मान ठरेल आणि आजच्या ‘नाही” चे उद्याच्या ‘हो’ मध्ये परिवर्तन होऊ शकेल. असे मला वाटते…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तीन प्रकारचे भारतीय — भाग-3 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

??

☆ तीन प्रकारचे भारतीय — भाग-3 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

(पण काळाच्या ताकतीपुढे सर्वांना झुकावेच लागते. हळूहळू का होईना पण सर्व कालबाह्य प्रथापरंपरांचा नाश होतोच.) – इथून पुढे —-

परंपराबद्दल माझी समज मी आपल्याला सांगितली. पण खरे विचाराल तर मी विचारलेला प्रश्न सनातन परंपरांबद्दल नव्हताच मुळी!  उत्तर देणाऱ्या व्यक्तीचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती सकारात्मक आहे हे तपासण्यासाठीची ही परीक्षा होती. तुमच्या मनाला हा प्रश्न पडेलच की तुमची परीक्षा घेऊन मला काय मिळाले? मला तुमच्याकडून काहीच नकोय. उलट मलाच तुम्हाला काही तरी द्यायचे आहे. मला तुम्हाला द्यायचे आहे सकारात्मक विचारांनी जगण्याचे भान! 

आमुक समाजातील सर्व परंपरावर चांगल्या आहेत किंवा वाईट आहेत असा जनरल शिक्का मारणा-या व्यक्तीचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन त्यातून दिसतो.  सर्व चांगल्या परंपरा असणारा आदर्श समाज कुठेही अस्तित्वात नाही. तसेच सर्वच परंपरा खराब असणारा समाजही कुठे अस्तित्वात नाही. प्रत्येक समाजात काही चांगल्या तर काही वाईट प्रथापरंपरा आहेत.  परंपराच काय तर आपल्या वाट्याला आलेले व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग वा संस्था यापैकी काहीही परिपुर्ण नाही. त्यात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी आहेत. आपण स्वतःतरी कुठे परिपुर्ण आहोत? मग जगाकडून परिपुर्णतेची अपेक्षा ठेवायचा अधिकार आपल्याला कसा असेल? 

आपले सकारात्मक आणि नकारात्मक विचार आपल्या मानसिकतेवर कसा परिणाम करतात ते पाहू. नवरा बायकोचे उदाहारण घेऊ. नवरा-बायको दोघेही परिपुर्ण नाहीत. दोघांमध्येही चांगले-वाईट गुण आहेत. बायकोने नव-यातील केवळ चांगले गुण पहायला सुरवात केली. या सकारात्मक विचारांमुळे काही वेळात ‘आपल्याला देवासारखा नवरा मिळाला आहे’ अशी भावना बायकोच्या मनात निर्माण होते. ही भावना बायकोच्या मनाला सुखावणारी आहे. या भावनेने तिच्या मनात वैवाहिक जिवनाविषयी समाधान निर्माण होते. आता त्याच बायकोने त्याच नव-यामधील सर्व दुर्गुण पहायला सुरूवात केली. तासाभरात तिला जाणवेल की ‘मला राक्षस नवरा मिळाला आहे’. ही भावना बायकोच्या मनात दुःख निर्माण करणारी आहे. या भावनेने तिच्या मनात वैवाहिक जिवनाविषयी असमाधान निर्माण होणार आहे. दुःख आणि असमाधानाने भरलेले मन सुख आणि समाधान शोधायला बाहेर पडते. आनंद आणि समाधान मिळवायचा एकच मार्ग आपण शिकलेलो असतो. अपेक्षा ठेवायच्या आणि त्या पुर्ण करायच्या. अपेक्षा पुर्ण झाल्या की मन, तात्पुरते का होईना पण, आनंदी आणि समाधानी होते. या अपेक्षा असतात तरी कुठल्या? कुणाला सत्ता हवी असते तर कुणाला संपत्ती मिळवून आनंद मिळतो. कुणी प्रतिष्ठेच्या मागे लागतो तर कुणी मुलांच्या यशात आनंद शोधतो. पुरेशा प्रमाणात सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि गोड नातेसंबंध मिळालेले असतील तर अशा व्यक्तीचे आयुष्य यशस्वी झाले असे आपण म्हणतो. 

अपेक्षांच्या शेवटी थोडाफार आनंद असला तरी अपेक्षापुर्तीचा मार्ग मात्र काटेरी आहे. यशाची अपेक्षा निर्माण झाली की सोबत अपयशाची भीती आपोआप निर्माण होते. भीती ही मोठी त्रासदायक भावना आहे. तिचे लवकरात लवकर निरसन करणे क्रमप्राप्त ठरते. मग भीतीचे कारण आणि उपाय शोधण्यासाठी चिंतन चालू होते. यशाच्या अपेक्षेच्या प्रमाणात अपयशाची भीती वाढते आणि भीतीच्या प्रमाणात चिंतन गहन होत जाते. चिंतन गहन झाले की त्यालाच चिंता असे म्हणतात. चिंता मनासाठी अतिशय खराब असते.

“चिता मृत शरीरको एक बार मे जला डालती है.

लेकीन चिंता जिंदा मन को हर वक्त जलाती रहती है.”

प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्थांपैकी काहीही परिपुर्ण नाही. त्यात चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी आहेत. बघायचे काय याचे स्वातंत्रही प्रत्येकाला आहे. तरी केवळ वाईट गोष्टी बघून स्वतःच्या मनात दुःख, असमाधान, अपेक्षा, भीती आणि चिंता अशा त्रासदायक भावनांना जन्म देणे कितपत शहाणपणाचे आहे? हा एक प्रकारे आत्मघातच आहे.

मानसशास्त्रज्ञांच्या मते माणसाच्या मनात येणाऱ्या विचारांपैकी ८०% विचार हे आत्मघाती नकारात्मक विचार असतात. यामागे नेमके कारण काय? सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही गोष्टी समोर असताना लोक स्वतःलाच दुःखी करणाऱ्या नकारात्मक गोष्टीच का पाहतात?

जसे पाणी चढाकडून उताराकडे सहज वाहते तसाच मानवी मनाचा सहज प्रवाह सकारात्मकतेकडून नकारात्मतेकडे असतो. आपल्या आजुबाजुला असलेल्या सर्व सकारात्मक गोष्टी या अपेक्षित असतात. अपेक्षित गोष्टी जागेवर असतील तर मेंदू त्याची नोंद सुद्धा घेत नाही. उदा. गृहणीने नेहमीप्रमाणे जेवनात अपेक्षित मीठ घातले तर त्याचे कुणी कौतुक करत नाही. याउलट सर्व नकारात्मक गोष्टी या अनपेक्षित असतात. उदा. नेहमी सुग्रण स्वयंपाक करणाऱ्या गृहणीने जेवनात जास्त किंवा कमी मीठ घातले तर सर्वजन लगेच ते बोलून दाखवतात. अनपेक्षित गोष्टी समोर आल्या तर आपल्या मेंदूला धक्का बसतो. मेंदू त्याची तात्काळ दखल घेतो. त्या धक्कादायक नकारात्मक गोष्टीची कारणमिमांसा होते. ती गोष्ट परत घडणार नाही यासाठी उपाय शोधले जातात. या चिंतनात एका नकारात्मक विचारांमधून दुसरा नकारत्मक विचार जन्माला येतो. प्रत्येक नकारात्मक विचाराचा शेवट दुःख, असमाधान, अपेक्षा, भीती आणि चिंतेत होतो.

प्रत्येकाला मनाच्या सहज प्रवाहाविरूद्ध नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे प्रयत्नपुर्वक जायचे आहे याचे भान देण्यासाठी हा लेख लिहला आहे. मी सुद्धा हीच धडपड करतो आहे. मनाच्या प्रवाहासोबत दुःख आणि असमाधानाकडे वाहावत जायला प्रयत्न करावे लागत नाहीत. पण प्रवाहाविरूद्ध सुख आणि समाधानाकडे आयुष्याची नाव न्यायची असेल तर मात्र तिला सतत वल्हवावे लागते. हे भान सुटले आणि वल्हवणे थांबले की लगेच आपली नाव नकारात्मतेकडे वाहू लागते. एका बाजुला आपल्या वाट्याला आलेल्या सर्व सकारात्मक गोष्टी प्रयत्नपूर्वक शोधून त्यांची प्रशंसा झालीच पाहिजे. दुसऱ्या बाजुला धक्कादायकपणे समोर आलेल्या नकारात्मक गोष्टींना चघळत बसण्यात आत्मघात आहे याचे सदैव भान ठेवावे लागणार आहे. पण कुणी कर्तव्यास चुकले तरी पदरी दुःखच पडते. त्यामुळे नकारात्मक गोष्टी सुधारण्यासाठी आपल्या आवाक्यात असणारी आवश्यक ती कृती करून झाली की नकारात्मक गोष्टींशी गांधींजींच्या तीन माकडांप्रमाणे वागायचे. 

बुरा मत देखो

बुरा मत बोलो

बुरा मत सुनो

नकारात्मकतेकडून सकारात्मतेकडे जाण्याचे भान प्रत्येकामध्ये सदैव जागृत व्हावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना ! 

– समाप्त –

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares