स्वाभिमान …किती जणांना असतो ? तुम्ही म्हणाल ” स्वाभिमान तर प्रत्येक मनुष्याला असतोच “. तुमच्या म्हणण्यात खोट नाही परंतु त्यामध्ये यथार्थता नाही हे अधिक खरं आहे. बहुतांशी लोकांचा एक गोड गैरसमज असा असतो की ते स्वाभिमानी आहेत.या गोड गैरसमजात माणसे जगतात आणि मरतात देखील . पण स्वाभिमान या शब्दाची नेमकी जाणीव व त्याचा गाभा किती जणांना आकळलेला असतो ? कोण जाणे. स्वाभिमान हा शब्द मानवी जीवनात अगदी अलिकडे दाखल झाला असावा.याचे कारण असे की , मुख्यतः विज्ञानयुगानंतरच मनुष्याच्या वैयक्तिक व विश्वात्मक भावनांना काही एक निश्चित अशी चौकट उपलब्ध झाली आहे. तत्पूर्वी स्वाभिमान हा शब्द इतर वेगळ्या अर्थाने कार्यरत असावा. त्याच्या मध्ये सखोलतेची व व्यापकतेची त्रुटी असावी.
स्वाभिमान …शब्द उच्चारताना अंग किती मोहरून येते. आपण स्वाभिमानी बाण्याचे आहोत हा गोड गैरसमज बहुतांशी लोकांना सन्मान पुरवत असतो. पण या बहुतांशी लोकांनी स्वाभिमान या शब्दाची परीक्षा आपल्या जीवनात सखोलपणे अभ्यासलेलीच नसते हे कटू वास्तव आहे. स्वाभिमान या शब्दाचा शब्दशः अर्थ स्वतः विषयीचा अभिमान असा होईल. पण हा अर्थ या शब्दाला सखोलपण पुरवत नाही . स्वाभिमान या शब्दांत जोपर्यंत ” स्व जाणण्याची प्रक्रिया ” पार पडत नाही तोवर मनुष्याला स्वाभिमान कळणार नाही .हा ” स्व जाणण्याची प्रक्रिया ” अध्यात्मवादी धारणेची नसून ती वेगळ्या पण योग्य अर्थाची आहे. स्व जाणणे म्हणजे ज्या नैसर्गिक घडणीतून तुमची जडणघडण झाली आहे ती नैसर्गिक प्रक्रिया जाणून तिच्यानुसार प्रामाणिक वर्तन करणे होय. यामध्ये नक्कीच कालसुसंगत लवचिकता असतेच मात्र यामध्ये आशयाला धक्का पोचेल असे असत्य असू नये.मनुष्याच्या नैसर्गिक स्वभावाला मुरड घालून काही अन्य स्वार्थापोटी जेव्हा तो दुसरा एखादा मुखवटा चढवून समाजात वावरतो तेव्हा ” स्वाभिमान ” हा शब्द गळून पडलेला असतो. तुम्ही तुमच्या नैसर्गिक धाटणीशी प्रामाणिक राहून वर्तन करत असाल तर तुम्ही ” स्व ” जाणलेला आहे आणि त्या ” स्व ” चा योग्य अभिमान तुमच्या मनाच्या तळाशी आहे. हा तळ म्हणजेच तुमचा स्वाभिमान असतो. हा तळ ढवळावा लागतो आणि त्या मंथनातून बाहेर पडते तुमचे नैसर्गिक रुप. हे रुप जसेच्या तसे समाजात घेऊन वावरणे म्हणजेच स्वाभिमान जागृत ठेवणे असा होतो. हीच आहे स्वाभिमान शब्दाची जाणीव व यथार्थता …
बहुतांशी लोकांना वरवरचा व शाब्दिक अर्थच अपेक्षित असतो. शब्दाच्या तळाशी असणारे रंग त्यांना जाणवत नाहीत की पृष्ठभागावर तरंगणारे नैसर्गिक तवंग त्यांना दिसत नाहीत . त्यांना फक्त शब्दाच्या समुद्रात दिसतो आपला चेहरा .हा चेहरा फसवा असतो. कारण या चेहऱ्याने ” स्व ” जाणण्याची प्रक्रिया पार पाडलेली नसते. अशावेळी केवळ शब्दजंजाळात अडकून स्वाभिमान बाळगण्यात कोणतीही यथार्थता नाही . स्वाभिमान बाळगायचाच असेल तर पहिल्यांदा ” स्व जाणण्याची प्रक्रिया ” पार पाडा. नंतर त्या ” स्व ” चा मनापासून स्विकार करा. त्यानुसार तुमचे वर्तन करा…” स्वाभिमान ” तिथेच सापडेल.
पाच वाजून गेले. कार्यशाळा संपण्याची काही लक्षणं नव्हती. नंदिताचं सारखं घड्याळाकडं लक्ष जात होतं. सकाळचा खडखडीत रस्ता आठवून तिच्या पोटात गोळा येत होता. आता त्याच रस्त्यानं जायचं आहे परत. निदान अंधाराच्या आत पोहोचलं तर बरं. पण छे! समारोप, चहापान हे सगळं होऊन कार्यशाळा संपायला सात वाजले.
नंदिता धावतच बसस्टँडकडे निघाली. पळव्यासारखं छोटंसं गाव. इनमिन दोन-अडीचशे वस्तीचं. एव्हाना सगळीकडे सामसूम झाली होती. त्यात वीज कपातीचे दिवस. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही असा मिट्ट काळोख होता. सुदैवाने मोबाईलच्या टॉर्चमध्ये ती कशीबशी बसस्टँडवर पोहोचली. नशीब! तिथे मिणमिणता का होईना दिवा होता. मोजून सहा माणसं होती. नाही म्हणायला सातवा एक जण चहा उकळत होता. दूर कुठंतरी कुत्री केकाटत होती. त्यामुळे आणखीनच भीतीदायक वाटत होतं. सहा माणसात एक म्हातारी होती. धावतच नंदिता पटकन् तिच्याजवळ जाऊन उभी राहिली. धापा टाकतच नंदिताने विचारलं, ‘‘केव्हा येईल हो गाडी?’’
नंदिताला आपादमस्तक न्याहाळत म्हातारी म्हणाली, ‘‘ईल आता. तिचा काय नेम सांगावा?’’ म्हातारीच्या या बिनधास्त बोलण्यानं नंदिता जरा रिलॅक्स झाली. तिच्या बोळकं असलेल्या तोंडामुळं म्हातारी फार प्रेमळ वाटत होती. नंदितानं मोबाईल काढला. सकाळपासून देवेनला फोन करायलाच जमलं नव्हतं. तो काळजी करत असेल. बराच वेळ टुंग, टुंग वाजत राहिलं आणि नंतर ‘द नंबर यु आर ट्राईंग, इज करंटली नॉट रिचेबल, प्लीज ट्राय लेटर’. नंदिता वैतागली. पाच-पाच मिनिटाला फोन करत राहिली तरी प्रत्येक वेळेस तेच उत्तर! छे!
आज नेमके तिच्याबरोबर असणारी तिची मदतनीस आणि शिपाई दोघांनी ऐनवेळी दांडी मारली. देवेन म्हणत होता गाडी, ड्रायव्हर घेऊन जा, पण नंदिताची तत्त्व आड आली.
‘‘नको रे, किती गरीब माणसं असतात. त्यांच्यासमोर गाडी वगैरे घेऊन जाणं म्हणजे…!’’
‘‘ठीक आहे. पण लवकर निघ आणि अंधाराच्या आत घरी ये म्हणजे झालं.’’
हंऽ! आत्ता तिला पश्चात्ताप होत होता. एवढ्यात खडखड करत लाल डब्बा आला. सारे बसमध्ये बसले. नंदिता म्हातारीच्या जवळच बसली. हुश्श! तिनं सुस्कारा सोडला. शेवटी एकदाची बस मिळाली. आता नेईल अकरा-साडेअकरापर्यंत. नंदिता थोडीशी रिलॅक्स झाली. दिवसभराचा थकवा न् गार वार्याची झुळूक! त्यामुळे नंदिताला डोळा लागला. किती वेळ गेला कुणास ठाऊक. अचानक बसच्या गचक्यांनी तिला जाग आली. तिनं चटकन् म्हातारीच्या मांडीवर हात ठेवला. म्हातारी म्हणाली, ‘‘घाबरलीय व्हय? रोजचंच हाय. काय न्हाय. काळजी करू नगंस!’’ नंदिताला जरा दिलासा वाटला. ती बाहेर बघू लागली. बसच्या दिव्यांशिवाय सर्वत्र दाट अंधार होता. खड्ड्यांमुळे बसला धक्के बसत होते. तसा दिव्यांचा प्रकाशही खालीवर होत होता आणि तिचा जीवही. तिनं परत देवेनला फोन लावला. पुन्हा – तेच! ‘नॉट रिचेबल.’
जरासा चढ लागला अन् बस घरघरत चालू लागली. पाचेक मिनिटं ती कशीबशी चालू होती. नंदितानं घड्याळात पाहिलं. अकरा वाजून पाच मिनिटं झाली होती. बस नीट चालली, तर जेमतेम अर्ध्या तासात बस पोहोचली असती. पण छे! धाड-धाड आदळून बस जागेवर उभी राहिली. भीती अन् चिंतेनं नंदिता गोठल्यासारखी झाली. म्हातारीच्या मांडीवरचा हात तिनं घट्ट धरून ठेवला. म्हातारीनं पण तिच्या हातावर थोपटलं. तेवढ्यात उद्दाम आवाजात कंडक्टर म्हणाला, ‘‘उतरून घ्या. धक्का माराय लागंल. समदे उतरा.’’ धक्का मारला तरी ती बस टस् की मस् हलेना.
मिट्ट काळोख! रस्त्यावर वाहतूक नाही. बस सुरू होण्याची शाश्वती नाही. रात्री साडेअकरा, बाराच्या दरम्यान नंदिता एका पारावर बसली होती. बसमधले सहाजण इकडे-तिकडे फिरत होते. म्हातारी तिच्या शेजारीच, हाताची उशी करून लवंडली होती. तिला लगेच डोळाही लागला असावा. क्षणभर नंदिताला तिचा हेवा वाटला.
दोन तरुण तिथं आसपास फिरत होते. एकजण विड्या फुंकत झाडाला टेकून बसला होता. ड्रायव्हर-कंडक्टरचा आसपास पत्ताही नव्हता. कितीही अवसान आणलं तरी नंदिताच्या काळजाचा ठाव सुटलेला होता. देवेनची आठवण येऊन घशात आवंढा येत होता. फोनला अजिबात रेंज नव्हती. फोनची डबी हातात घेऊन नंदिता हताशपणे बसून होती. एका क्षणी, ती डबीही फेकून द्यावीसं वाटलं. एवढ्यात, तो समोर दिसला. थोडंसं दूरवर एका झाडाला टेकून बसलेला. चक्क लॅपटॉपवर काम करत होता.
म्हणजे… म्हणजे… नक्की त्याला रेंज असणार! या जगाशी कनेक्टेड असा ‘तोच’ होता. त्याच्याकडून काहीतरी आशा होती. त्याच्या फोनला रेंज असली तर? देवेनला कळवता तरी येईल. पण तो… तो तर बघायलाही तयार नव्हता. कोण असेल तो? कामात व्यग्र आहे की मुद्दाम करतोय? भला माणूस असेल का? नंदिता स्वतःशीच बोलत होती. ‘बोलावं का त्याच्याशी?’ अशा विचारानं नंदिता उठली. दोनच पावलं टाकली अन् तशीच माघारी फिरली. नको! नकोच! कोण, कुठला तिर्हाईत माणूस अशा जागी, अशा वेळी त्याच्याशी बोलायला नको नकोच!
जगाशी संपर्क साधायला एकही साधन नाही. एकमेव तोच आशेचा धागा आहे. पण त्याला जराही स्त्रीदाक्षिण्य नाही? राग, संताप, भीती, चिंता, अगतिकता, असहाय्यता, उद्विग्नता अशा सर्व टोकाच्या भावनांमुळे नंदिताला बधिरपणा आला. मोठा सुस्कारा सोडून आकाशात पहात राहिली. नशिबानं आकाश निरभ्र होतं. चांदणं पसरलं होतं. तेवढ्यानंही नंदिताचं मन हलकं झालं.
अचानक मागच्या बाजूला, तिला एक उग्र दर्प जाणवला. काहीतरी चाहूल लागली. तिनं चमकून पाहिलं तर एकजण तिच्याजवळच बसलेला दिसला. ती अंगभर शहारली. संतापून त्याच्याकडं पाहिलं. राग, चीड, घृणा त्यातून व्यक्त केली. तर तो उलट म्हणाला, ‘‘काय नखरा? लई शाणी गं!’’ बळं-बळं आणलेलं तिचं अवसानच गळालं. नंदिता चटकन उठली न म्हातारीच्या पलिकडं जाऊन बसली. तिनं थरथरता हात म्हातारीच्या अंगावर ठेवला. म्हातारीचाच काय तो एकमेव आधार होता.
दूरवर दिवे दिसत होते. जवळ-जवळ आले अन् तसेच दूर गेले. ट्रक होता तो एक. हंऽ! सुस्कारा सोडून तिनं पुन्हा एकदा फोन लावण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, पण पुन्हा ‘‘द.नं.यू.आर. ट्राईंग इज करंटली नॉट रिचेबल’’ हंऽ! पुन्हा-पुन्हा तेच उत्तर त्याच आवाजात देणार्या त्या बाईचाही तिला राग आला. काय करावं? विचारावं का लॅपटॉपवाल्याला? तेवढ्यात दूरवर पुन्हा वाहनाचा प्रकाश दिसू लागला. बस आली की काय? पण छे! ही तर कार आहे. जाईल निघून आली तशी म्हणून ती तशीच निराश, हताश बसून राहिली.
आश्चर्य म्हणजे, ती कार त्यांच्याजवळच येऊन थांबली. कार आलिशान होती. त्यामधून ड्रायव्हर खाली उतरला अन् लॅपटॉपवाल्याजवळ गेला. त्याची लॅपटॉपची बॅग घेऊन कारच्या मागच्या सीटवर ठेवून दरवाजा उघडून उभा राहिला. तो लॅपटॉपवाला मागे न बसता पुढच्या सीटवर बसला. ड्रायव्हरशी काहीतरी बोलला. ड्रायव्हरने दरवाजा बंद केला अन् तिच्यासमोर येऊन उभा राहिला. नंदिता पहातच राहिली.
‘‘काऽऽय?’’ ती ओरडलीच. कोण साहेब? अन् मला का सांगितलं, एवढा वेळ तर शब्दानं चौकशी नाही अन् आता एकदम गाडीत बसा?
तिला कळेचना. ड्रायव्हर परत म्हणाला, ‘‘हो मॅडम चला. रात्रीची वेळ आहे. इथं आडरानात किती वेळ बसणार?’’
ते तर खरंच होतं. पण हा कोण, कुठला? त्याच्यावर कसा विश्वास ठेवणार? क्षणभर ती विचारात पडली. पुन्हा विचार केला. याच्याबरोबर गेलं तर काही तरी परिस्थिती बदलेल. नाहीतर इथे किती वेळ बसून रहाणार? ‘इकडे आड तिकडे विहीर’ तिने विहिरीत उडी घ्यायची ठरवलं. ती उठली. ड्रायव्हरने तिच्या हातातली पिशवी घेतली, म्हणाला, ‘‘चला मॅडम, आधीच खूप उशीर झाला आहे.’’ ड्रायव्हरचं बोलणं सज्जन, सभ्यपणाचं वाटत होतं. ती नाईलाजानं यंत्रवत त्याच्या मागोमाग जाऊन गाडीत बसली. ‘‘आपण कोण?’’ असं बोलण्यासाठी तिनं तोंड उघडलं, पण तिचा आवाजच फुटला नाही. पाणी प्यावं म्हणून पर्समध्ये पाण्याची बाटली पाहिली तर ती नव्हतीच.
सर्व भरवसा देवावर सोडून अतीव मानसिक त्रासाने ती डोकं मागं ठेवून डोळे मिटून बसून राहिली. तिचे पाय लटपटत होते. धडधडणारं काळीज बाहेर येईल असं वाटत होतं. आपण सुरक्षित आहोत की आणखीन धोक्यात चाललोय तिला कळेना. पण आता विचार करण्याचेही त्राण तिच्यात नव्हते. जेमतेम दहा-बारा मिनिटातच गाडी थांबली. आता काय? म्हणून तिनं घाबरून डोळे उघडले तर गाडी चक्क तिच्या घरासमोर उभी होती. तिचा विश्वासच बसेना. देवेन फाटकातच उभा होता. ड्रायव्हरने दार उघडताच, ती धावत जाऊन देवेनला बिलगली. देवेनने तिला थोपटलं अन् पुढे झाला.
तोही गाडीतून उतरला. म्हणाला, ‘‘सांभाळ तुझी अमानत.’’ देवेननं त्याता हात हातात घेत म्हटलं, ‘‘थँक्स यार निनाद. तुझ्या रूपानं देवच भेटला. आत ये ना कॉफी घेऊ.’’
‘‘अरे नाही. परत कधीतरी. आता फार उशीर झालाय.’’ असं म्हणून तो गाडीत बसून क्षणात दिसेनासा झाला.
नंदिता पहातच राहिली. कोण निनाद? त्याचा देवेनशी काय संबंध? आणि त्यानं मला अलगद घरी कसं आणलं?
देवेननं तिला जवळ घेतलं अन् हसत तिच्याकडे बघत राहिला.
‘‘अरे हसतोस काय? सगळा काय प्रकार आहे!’’ म्हणून तिनं विचारलं.
तेव्हा देवेननं तिला सांगितलं- ‘‘अगं आम्ही मागच्या वर्षी बंगलोरला एकत्र होतो.’’
हे सगळं व्हॉटस्अॅप प्रोफाईलच्या दोघांच्या फोटोमुळं झालं. त्यावरून त्यानं तुला ओळखलं अन् मला विचारलं, ‘‘अरे मी इथं आडरानात अकडलोय. माझ्यासमोर एक स्त्री आहे. ती तुझ्या बायकोसारखी वाटते. ती जर तीच असेल, तर मी कार बोलावली आहे, तिला घेऊन येतो.’’
त्यावर मी तुझा एक फोटो त्याला पाठवला. कन्फर्मेशन झालं. पत्ता पाठवला अन् तू अशी अलगद घरी आलीस! सो सिंपल!
सो सिंपल? अरे फार भयंकर होतं सगळं, पण खरंच अशी माणसं जर असतील, ना तर समस्येलाच म्हणावं लागेल, ‘‘नॉट रिचेबल!’’
☆ पोच पावती… लेखक : श्री विकास शहा ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
मागे एकदा पोस्टात गेलो असताना एक आजोबा स्टाफला विचारत होते, ” ह्याची पोचपावती मिळेल ना ?”
बरेचदा मी ही हिला सांगतो acknowledgment म्हणून जपून ठेव!
नेहमीप्रमाणेच तो शब्द माझ्या मनात फिरू लागला आणि बोटं लिहू लागली…
पोचपावती ही आपल्या व्यवहारात जितकी महत्वाची, तितकीच आयुष्यातही का असू नये ??
ही पोचपावती म्हणजे प्रत्येक वेळी कौतुक असाच अर्थ नसावा.
कधीतरी एखाद्या गोष्टीची घेतलेली दखल किंवा म्हणतात ना appreciation असू शकतं.
ह्या पोचपावतीचे माझ्या आयुष्यातील उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आई- अप्पा.
घरात कोणताही एकत्र कार्यक्रम होवो किंवा एखादा नवीन पदार्थ केला, कोणतीही चांगली कृती केली की सुनांना ते तसं आवर्जून सांगतात “छान झाला बर का आजचा कार्यक्रम” आणि मग त्यांच्या ह्या शब्दांनी कार्यक्रमामुळे झालेली दमणूक एकदम निघून जाते आणि पुन्हा पुढचा कार्यक्रम करायला अजून उत्साह येतो!
पोचपावती तुमच्या आयुष्यात मोठी जादूची कांडी फिरवते
एखाद्याला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींच appreciation देऊन बघा अगदी मनापासून त्याच्या चेहऱ्यावर कसं हसू फुलतं.
आमची घर कामवालीला गजरे , फुल घालून यायची फार आवड, कधी त्या मोठा गजरा घालून कामाला आल्या की हिच्या तोंडून उस्फूर्तपणे येतं – “प्रमिला काय मस्त दिसतेय, चल एक फोटो काढते तुझा !” ह्यानेसुद्धा त्या खूप खुश होतात.
लहानांपासून मोठ्यांपर्यन्त आणि अगदी लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींसाठी ही पोचपावती खूप मोठा परिणाम करून जाते आणि छान आठवण मनात ठेवून जाते.
एखादं मोठं प्रोजेक्ट complete केल्यावर बॉसने त्याची घेतलेली दखल असो की वर्गात “छान निबंध लिहिलंस हो” अस म्हणून बाईंची मिळालेली शाबासकी असो, हिने खपून केलेल्या पदार्थाची घरातल्यानी केलेली स्तुती असो की, कधीतरी नवीन साडी नेसल्यावर हिला न बोलता दिलेली दाद असो.
ह्या पोचपावती साठी माणूस फक्त जवळचाच हवा असं नाही कधीतरी दुकानदाराला ही म्हणावं “काका तांदूळ चांगले होते हं तुमच्याकडून घेतलेले “
सामान्य माणसांपासून अगदी कलाकारांपर्यन्त ह्या पोचपावतीची गरज असतेच, ही दखल घायला आणि द्यायलाही वयाच बंधन नसावं.. कधीच.
काही काही नाती ही पोचपावती पलीकडची असतात ,
पण तरीही अधूनमधून ह्याचा शिडकावा नात्यात नक्की आनंद देऊन जातो ..!
बरेचदा सततच घेतली जाणारी दखल काही खरी वाटत नाही.
तसं करूही नये कारण पोचपावती जितकी उस्फुर्त, तितकीच जास्त खरी !
पोच पावती फक्त शब्दातूनच नाही तर डोळ्यातून तर कधी कृतीतून, स्पर्शातूनही व्यक्त व्हावी. जसं जसं ज्याच्याशी नातं तशी तशी ती पोचवावी.
कधी योग्य आदर ठेवून, कधी गळा मिठी मारून, अगदी कधी “च्यामारी भारीच काम केलंस तू भावड्या” अशी वेगळ्या भाषेतून ही यावी.
माणूस जितका दिलखुलास तितकीच ही दाद उस्फुर्त,
महत्वाचं म्हणजे ती स्वीकारणाराही तितकाच आजकालच्या मुलांच्या भाषेत cool dude हवा.
ह्या पोच पावतीने काम करायला दुप्पट ऊर्जा मिळते, उत्साह मिळतो, नातं घट्ट व्हायला एक छोटासा धागा मिळतो.
आणि तसं म्हणाल तर ह्यासाठी काही लागत नाही
…… फक्त मोकळं व स्वच्छ मन !
लेखक : श्री विकास शहा
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘मार्क’ म्हणजेच गुणवत्ता नाही ! ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆
नुकतीच एक बातमी वाचली….
नेहमी चांगले मार्क मिळवणाऱ्या मुलीला दहावीचा पहिला पेपर चांगला नाही गेला. संध्याकाळी तिने आत्महत्या केली. अजून परीक्षाही संपली नाही. पण मुलगी संपली. मागे एका मेडिकलच्या विद्यार्थ्यांने शेवटच्या वर्षांला गोल्ड मेडल ऐवजी सिल्वर मेडल मिळाले, म्हणून आत्महत्या केली होती.
माणूस मरायला घाबरत नाही, पण किंमतशून्य जगायला घाबरतो.
एका नामांकित शाळेच्या स्कॉलर वर्गातील मुलांशी बोलताना मी त्यांना विचारले की, “सर्वजण त्यांना काय म्हणतात?”
मुले म्हणाली, की ‘स्कॉलर’.
मी विचारले ‘का?’,
मुले म्हणाली, “कारण आम्हाला चांगले मार्क मिळतात.”
मी समीकरण मांडले.
‘अ = ब’
व
‘ब = क’
त्याअर्थी ‘अ = क’.
म्हणजेच,
‘मी = स्कॉलर’
व
‘स्कॉलर = मार्क’.
याचा
अर्थ ‘मी = मार्क’.
जेव्हा आपण आपली किंमत मार्कावरून करायला लागतो, तेव्हा जरा मार्क कमी मिळाले की, आपली किंमत कमी झाली असे वाटते.
सर्व परीक्षा बोर्डांनी मार्क वाटायला सुरुवात केल्यापासून तर हे समीकरण पालक व मुले यांच्या डोक्यात गच्च बसायला लागले आहे. हे धोकादायक आहे….
माझी भाची शाळेतही जात नसताना तिने काढलेल्या एका चित्राला मी ‘वा’ म्हटले.
ती लगेच म्हणाली-मार्क दे.
मी चित्राच्या बाजूला लिहिले ‘छान’.
ती म्हणाली मार्क दे. शंभरपैकी.
अडूनच बसली.
शाळेत जायच्या आधीपासूनच हे डोक्यात शिरत आहे. हे आजूबाजूच्या वातावरणात आहे. या विषारी वातावरणाने वरील बळी घेतले आहेत.
जेव्हा कधी पालकांना विचारले की, तुमच्या मुलांबाबत काय व्हावे असे तुम्हाला वाटते? तेव्हा
हमखास उत्तर येते की, ‘तो चांगला नागरिक बनावा, चांगला माणूस बनावा.’
जरा विरोधाभास पाहूया…
मेडिकलच्या विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले की त्यांना चांगला डॉक्टर बनायचे आहे.
मी विचारले “चांगला डॉक्टर कोणाला म्हणता?”
तर मुले म्हणाली की, “जो जास्तीत जास्त लोकांना चांगल्यात चांगला उपचार देऊन बरा करतो तो.”
सिल्वर मेडल मिळालेल्या त्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांलाही चांगला डॉक्टर बनायचे असेल ना?
पण बनला का?
त्याच्या आधीच गेला.
चांगला नागरिक,
चांगला माणूस,
चांगला डॉक्टर,
चांगला व्यावसायिक…
आपण जेव्हा काहीतरी चांगले “करतो” तेव्हा बनतो. नुसत्या मार्कानी नाही बनत.
एका नववीतील मुलीला चाचणी परीक्षेत गणितात वीसापैकी १४ मार्क मिळाले म्हणून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.
माझ्याशी बोलताना तिचे पहिले वाक्य होते की, ‘आय एम युझलेस’.
या मुलीला दहावीनंतर क्रीडा पत्रकार बनायचे आहे. त्यासाठी ती कलाशाखेला जाणार आहे.
मी विचारले की आर्ट्सला गणित असते का?
ती म्हणाली ‘नाही’.
मी म्हटले की याचा अर्थ तू दहावी नंतर गणिताला टाटा करणार, मग तू गणितासाठी जीव का देत होतीस?
हे ऐकल्यावर तिलाही हसू आले.
काय आहे की,
‘गुणी मुलगी’,
‘भावंडात हुशार मुलगी’,
‘सर्वाची आवडती’,
‘९०% मिळायला हवेत हं’. या इतरांच्या मनातील प्रतिमेला जपण्याचे तिला दडपण आले होते. ही प्रतिमा आपण जपू शकलो नाही तर आपण युझलेस….!
मुलांमध्ये खूप क्षमता असते,
परंतु मार्कांवर लक्ष केंद्रित
केल्यामुळे त्या क्षमतांना
‘किंमत’ दिली जात नाही.
आज जग जवळ आले आहे. अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
पालकांनी लक्षात घ्या की, हे “आपल्या” लक्षात न आल्यामुळे जेव्हा मुलांना कमी मार्क मिळतात तेव्हा “आपण” नकळत हिंसक होतो. मुलांच्या आत्मविश्वासावर घाला घालतो.
मार्कांवरून मुलांची किंमत किंवा लायकी ठरवू नका. आपण जन्माला आलो ही एकच गोष्ट आपण जगायला लायक आहोत यासाठी पुरेशी आहे. आता जगताना काय करायचे याचा विचार करूया.
‘थ्री इडियट’ सिनेमातील मुलाखतीच्या प्रसंगात आजवर मार्कांवरून आपली किंमत ठरवणारा, घाबरणारा मुलगा म्हणतो… ‘जिंदगी में कुछ तो ठीकठाक कर ही लूंगा’..
हा आत्मविश्वास मुलांना द्या !
आवडले तर नक्की शेयर करा…!
तुमचा हा संदेश कित्येक पालक आणि विद्यार्थ्याचे मनपरिवर्तन करु शकतो…
लेखक : डॉ. अरुण नाईक. (मानसोपचारतज्ञ)
प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे .
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी☆
पर्यावरणपूरक गणेशोत्सव व सामाजिक जबाबदारी ह्या नूतन संगमातून ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प चिंचवड येथील श्री शंकर महाराज सेवा मंडळ राबवत असून त्यातून मिळणारी आर्थिक मदत वृद्धाश्रमासाठी व विविध सामाजिक कार्यासाठी वापरली जाते.
श्री शंकर महाराज सेवा मंडळ, चिंचवड ही धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत संस्था असून रक्तदान शिबिरांपासून संस्थेची सुरुवात झाली आहे. गेल्या ३० वर्षांपासून वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम संस्थेद्वारे राबविले जातात व त्यापैकीच एक महत्वपूर्ण प्रकल्प म्हणजे संस्थेकडून किवळे येथे ‘स्नेहसवली – आपलं घर’ हा निशुल्क वृद्धाश्रम चालविला जातो. आज रोजी संस्था २५ निराधार आजी – आजोबांचा सांभाळ करत असून त्यांचा निवास, भोजन, कपडे, इतर संबंधी गरजा तसेच महत्वाचे म्हणजे आवश्यक मोफत वैद्यकीय सेवेची जबाबदारी संस्था घेत आहे. सांभाळ करत असणाऱ्या वृद्धांचे वयोमानानुसार अंगी लागणारे आजार, वैद्यकीय तपास व गरजेप्रमाणे बायपास सर्जरी, कॅटरॅक्ट ऑपरेशन, हिप रिपलेसमेंट सारखे अवघड व खर्चीक शस्त्रक्रियेची जबाबदारी देखील निशुल्क उचलली जाते. हा सर्व डोलारा चलविण्यासाठी येणारा खर्च हा साधारण दोन लाख रुपये प्रति महिना असून तो उभा करण्यासाठी संस्था अनेक उपक्रम राबवते व त्यातून मिळणारे दान व होणारी आर्थिक मदतीतून वृद्धाश्रमाचा सर्व खर्च भागविला जातो. ह्या मध्ये दैनंदिन स्तरावर संस्थेकडून रद्दीदान व भंगारदान उपक्रम राबविला जातो ज्याअंतर्गत संस्थेद्वारे घरोघरची रद्दी व भंगार गोळा करून निधी निर्माण केला जातो व ह्याकरिता साधारण सतरा हजार कुटुंब दानस्वरूपी मदत संस्थेला वर्षभर करतात. ह्याबरोबरीने संस्थेकडून अभिनव संकल्पनेने दरवर्षी नियमितपणे ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ हा उपयुक्त प्रकल्प राबविला जातो.
‘मूर्ती आमची किंमत तुमची’ ह्या प्रकल्पांतर्गत केवळ नैसर्गिक रंगात रंगवलेल्या (हळद, कुंकू, बुक्का व गुलाल हयातून निर्मित) पर्यावरण स्नेही शुद्ध शाडू मातीच्या मूर्तींचे दालन भरवले जाते. अभिनव संकल्पना अशी की ह्या दालनामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ही केवळ प्रदर्शनाला ठेवली जाते व त्याची कोणतीही विक्री किंमत मांडली जात नाही. उलट येणाऱ्या भक्ताने आपल्या मनाला पसंत पडेल ती मूर्ती निवडायची असते व भक्ताला जी किंमत वाटेल ती गुप्तदान पद्धतीने दानपेटीत टाकून मूर्ती घेऊन जायची एवढी सोपी पद्धत आहे. लोकांना चांगल्या गुणवत्तेच्या मूर्ती उपलब्ध करून देणे, मनुष्याची भाविकता जपणे व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होणे हा त्यामागचा उद्देश असून अधिकाधिक लोकांशी संस्थेला जोडता यावे व अधिकाधिक दान पदरात पडावे, जेणेकरून समाजाची अधिकतर सेवा करता यावी हा या उपक्रमामागचा सुप्त हेतू आहे. वेगवेगळ्या आकारातील व विविध प्रकारामध्ये श्रींच्या मूर्ती ह्या दालनात प्रदर्शनाला ठेवल्या जातात. तसेच प्रदर्शन कालावधीमध्ये अखंड नामजप, दत्त याग, गणेश याग, संत पादुका दर्शन, रक्तदान शिबिर,मोफत आरोग्य तपासणी शिबिर, पुस्तक प्रदर्शन असे अनेक कार्यक्रम संस्थेकडून आयोजित केले जातात. गणेशमूर्तीविषयी प्रत्येकाला एक ओढ असल्यामुळे हा प्रकल्प काय आहे हे समजावून घेण्याच्या मनस्थितीत कोणी नसतो. परंतु पर्यावरण, सेवा, अध्यात्म, धर्म, राष्ट्रप्रेम, माणुसकी, दान, समाज संघटन या अष्टसुत्रीवर हा प्रकल्प आधारित असून हा समाजाने समाजासाठी चालविलेला समाजाचा सामाजिक प्रकल्प आहे. जगात असे कोठेही उदाहरण नाही जेथे एक उत्पादक आपल्या वस्तूंची किंमत ग्राहकाला ठरविण्यास सांगतो आहे. अगदी भाजी, दूध, वर्तमान पत्र या पासून सोनं नाणं, जमीन जुमला या पर्यन्त कोठेही आपल्या मर्जी प्रमाणे पैसे देण्याची किंवा अजिबात पैसे न देता सेवा/वस्तू घेण्याची मुभा नसते पण येथे आपणास ही मुभा आहे कारण नात्यानात्यामधील विश्वास स्थापित करण्यावर संस्थेचा भर आहे. संस्थेचे कार्य सर्वदूर पोहोचावे व लोकांनी ह्या सामाजिक कार्याला हातभार लावावा यासाठी ही प्रयत्नांची पराकाष्टा केली जाते. यंदा ह्या प्रकल्पाचे १० वे वर्ष असून सुमारे २२०० मूर्ती दलनामध्ये प्रदर्शनास उपलब्ध आहेत. गेली ९ वर्षे मोजके भाविक परदेशात गणेश मूर्ती घेऊन जातात तसेच भारताच्या जवळजवळ प्रत्येक प्रांतात व महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भाविक मूर्ती घेऊन गेल्याचा संस्थेचा अनुभव आहे. आगळ्यावेगळ्या ‘ स्नेहसावली – आपलं घर ’ या नि:शुल्क वृध्दाश्रमास भेट द्या व गणेश मूर्ती घेऊनच जा, मूर्ती मिळो, घेवो अथवा न घेवो. प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाने तेथे ठेवलेले एक पाकिट घेऊन दानधर्म या स्तुत्य सामाजिक कारणासाठी करावा ही अपेक्षा व आवाहन संस्थेकडून लोकांना केले जाते. यंदा हे प्रदर्शन दि. ०८/०९/२०२३ रोजी सं. ४ पासून मूर्ती संपेपर्यंत चिंचवडे लॉंन्स, हॉटेल रिव्हर व्यू समोर, चिंचवडगाव येथे खुले असणार आहे.
ह्या बरोबरीनेच संस्था गेली 30 वर्षे रक्तदान क्षेत्रात कार्यरत आहे व आजपर्यंत सुमारे १५०० हून अधिक रक्तदान शिबिरांचे आयोजन सामाजिक बांधिलकी ह्या नात्याने केले आहे. संस्थेद्वारे समाजातील गोर-गरीब, गरजू लोकांना रुग्णसेवा दिली जाते, ज्यात प्रामुख्याने गरजू रुग्णांचे विविध शस्त्रक्रिया करून संबंधित औषधोपचार व उपयुक्त वैद्यकीय वस्तू, जसे वॉकर, व्हील चेअर, डायपर्स, ई. निःशुल्क पुरविले जाते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत देखील संस्था आजवर करत आली आहे. तसेच कापडी पिशवी चे वितरण व इतर संबंधित पर्यावरणपूरक विविध उपक्रम राबवण्यात देखील संस्थेचा अधिक जोर आहे.
संस्था संपर्क –
संस्थेचे संचालक : डॉ. अविनाश वैद्य – ९५७९२२५२९८ / डॉ. मनाली वैद्य – ९४२०८६३९२०
संस्थेचे व्यवस्थापक : सौ. आशाताई पात्रुडकर – ९४०४८३०१६०
☆ ये रे घना.. ये रे घना… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
आजही जेव्हा जेव्हा मी अशी खिडकी जवळ बसुन असते… बाहेर पावसाची रिमझिम रिमझिम सुरू झालेली बघत राहते… मनाला केव्हढं सुख मिळतंय म्हणून सांगू… हवा कुंद झालेली काळ्या ढगांची शाल पांघरलेली बाहेरचं जग पाहते.. व्रात्य मुलासारखे पावसाचे उडणारे तुषार अंगावर पडत जातात अंगावरील स्वेटरवर इवलसे मोती चमचमताना दिसतात.. मधुनच एखादी थंडगार झुळूक अंगाला लपेटून जाते ,तेव्हा सुरकुतलेल्या कायेवर शिरशिरीचा काटा थरारतो… झुळूक कानात काही बोलून जाते.. ‘काय कुठे लागलीय तंद्री? तरुणाईतली ऐकू येतेय वाटतं वाजंत्री!’.. तिचा चेष्टेचा सूर झंकारतो..मनात विचारांचा पिंगा घुमू लागतो… गतकाळातील एकेक आठवणींची सर सर ओघळू लागते…दु:खाचे नि आनंदाचे तुषार मनात उडत असतात…घरातले एकाकीपण वाकुल्या दावतात…पोटच्या पिलांनी पंखातले बळ अजमावण्यासाठी करियरचे क्षितीज लांब लांब विस्तारले,. आणि मायेच्या ओढीला नाईलाजाच्या आवरणाखाली आचवले.. प्रपंचाचा गाडा ओढता ओढता धन्याने जीवनाची इतिकर्तव्यता साधली.. चार सुखाचे दिवस पाहण्यासाठी मला मागेच ठेवली.. भावनेचा कल्लोळ तो उठतो मनात ,पण शब्द जुळवून येता ओठी ते तिथेच अडकतात.. कातर होतो गळा नि हुंदका होई गोळा… पाऊस बाहेर पडत राहतो.. पाऊस मनातही उसळत राहतो.. आठवणींच्या गारा टपटप पडत राहतात.. एकेक गार हळूहळू वितळत जाते… नि माझं मनं विषण्ण विषण्ण होत जाते…
काल एका गुरुजींनी आशिर्वाद देताना म्हंटले “सुखी व्हा, समाधानी रहा,” आशिर्वाद जाम आवडला आणि पटला. समाधान ह्या शब्दामध्ये मन गुंतले आणि विचारात देखील पाडले.समाधान ही गोष्ट आपल्याला मिळवावी लागते, अनुभवावी लागते.”स्वाद लियो तो जानो”ह्या सारखं ती अनुभवल्या वरच खरी तिची लज्जत, खुमारी ही कळते.समाधान म्हणजे खरतंर वर्णन करायला शब्दही तोकडे पडतात अशी गोष्ट.समाधान ही अनुभवण्याची एक गोष्ट.बरं ही गोष्ट अनुभवली तर अगदी इटुकल्या पिटुकल्या ,साध्यासुध्या गोष्टीतही मिळते.फक्त ही गोष्ट मिळवण्याचं कसब मात्र हवं हं.
अलार्म बंद केल्यानंतर जी पुन्हा डुलकी लागले ती खरी झोप.आणि ह्या साखरझोपेतून मिळतं एक वेगळंच स्वप्नाळू समाधान.
महिनाअखेर अचानक साडीच्या घडीतून मिळालेले पैसे म्हणजे खरा धनलाभ. आणि ह्या अचानक धनलाभातून मिळतं घबाडाएवढं समाधान.
कडकडून भूक लागली असता मस्त जमून आलेली पिठलं भाताची पंगत म्हणजे खरी मेजवानी.आणि ह्या मेजवानीतून मिळतं एक भरपेट ओतप्रोत,तुडुंब आनंदायी समाधान.
एखाद्या गोष्टीचे अप्रुप वाटत असतांनाच अचानक अलगद ओंजळीत पडलेली ती गोष्ट म्हणजे खरे सुदैव.आणि ह्या सुदैवातून मिळतो “अच्छे दिन” वालं साक्षात्कारी समाधान.
आपल्याला काय मिळाले ह्याचा ताळेबंद बघुन यापेक्षा आपल्याला खूप काही मिळाले ह्याची जाणीव म्हणजे खरी त्रुप्ती.आणि ह्या त्रुप्तीतुनचं मिळते उद्याचे उज्ज्वल आशादायी समाधान.
रात्री गादीवर पाठ टेकताच लागलेला डोळा म्हणजे खरे सुख.आणि ह्या सुखातुनचं मिळतं एक आत्मिक समाधान.
मी तरी स्वतः ला खूप नशीबवान समजते.कारण ह्याची अनुभुती मी पावलोपावली घेते.तुम्हीही समजून बघा खूप मस्त वाटेल. ह्या जन्मावर,ह्या जगण्यावर,शतदा प्रेम करावे.
(जाई सासरी रमून गेली आणि अरुण माईंचं तर पान हलेना जाई शिवाय. ) इथून पुढे —
अरुण पुढची परीक्षा पास झाला आणि त्याला घसघशीत पगारवाढ मिळाली. माईंच्या डोळ्यात आनंदाने पाणी आलं. ‘ जाई, हे श्रेय तुला जाते ग बाई ! तू किती समजूतदारपणे बदल घडवलास अरुणमध्ये ग ! मी खूप प्रयत्न केले ग पण माझं काही चालेना बघ आबांसमोर ! सतत त्याचा पाणउताराच केला नंदिनी आणि त्यांनी ‘.
‘जाऊ दे हो माई, आता झालंय ना सगळं चांगलं? गुणी आहे हो अरुण ! मला हे आलं होतं लक्षात पहिल्यांदाच.म्हटलं मी एक शिक्षक आहे ना, तर हा विद्यार्थी बघू सुधारतो का ! त्याच्या आत्मविश्वासावर बसलेल्या राखेवर मी फुंकर घालायचं काम केलं इतकंच हो !’ माईंचे डोळे भरून आले. गुणांची पोर ग बाई माझी म्हणून डोळे पुसले त्यांनी.
पुढच्या वर्षी नंदिनी भारतात आली. अरूणच्या लग्नाला ती येऊ शकली नव्हती. यावेळी नंदिनी एकटीच आली होती. तिच्या नवऱ्याला रजा नव्हती इतकी ! आल्याआल्या नंदिनीने घरात झालेले बदल एका क्षणात ओळखले.
“आबा माई, काय म्हणतात नवीन सूनबाई? “ नंदिनी म्हणाली.
“ तूच आता प्रत्यक्ष बघ ना “
जाई सकाळी नाश्ता घेऊन नंदिनीच्या खोलीत गेली. नंदिनीताई, इथेच घेता का येता डायनिंग टेबलावर?सगळे वाट बघत आहेत तुमची ! जाई हसतमुखाने म्हणाली. नंदिनी बाहेर आली.आबा माई अरुण तिची वाट बघत होते. “ ये ग नंदिनी ! तुला आवडतात तसे दडपे पोहे केलेत जाई ने !” अरुण म्हणाला. नंदिनीने बघितलं, केवढा बदलला होता अरुण. आनंदी, अभिमानाने उंच झालेली मान आणि पूर्वीचा चाचरत, डोळ्याला डोळा न देता बोलणारा अरुण जणू गायबच झाला होता. नंदिनीला समजले या घरातले पूर्वीचे स्थान डळमळीत झाले आपले. जाईला पाहून ती म्हणाली, “ जाई, छान हुशार आहेस ग तू. आमच्या अरुणला कसं काय पसंत केलंस? “ जाई हसून म्हणाली,” का हो ताई? किती चांगला आहे तुमचा भाऊ ! आता सगळेच कसे डॉक्टर आणि वकील आणि मोठ्या पोस्टवर असणार? आमच्यासारख्या शिक्षकांचीही गरज आहेच की समाजाला, आणि अरुणसारख्या लोकांची फॅक्टऱ्याना ! त्याशिवाय यंत्र आणि माणसांचं कसं चालेल? “ अरुण कौतुकाने जाईकडे बघत होता. असा त्याचा ‘स्व’ कोणीच नव्हता जपला. . त्याची अशी बाजूही नव्हती कोणी घेतली इतकी वर्षं. आणि हसत हसत नंदिनीसमोर धीटपणे बोलायची हिम्मतही नव्हती कोणी दाखवली आजपर्यंत !
चार दिवसात नंदिनीच्या लक्षात आले, आबा माई सगळे जाई जाई करत असतात. त्या दिवशी जाई शाळेत गेली तेव्हा नंदिनी आणि माई बाल्कनीत चहा पीत गप्पा मारत होत्या. नंदिनी म्हणाली, “ माई, जाईने चांगलीच छाप पाडलीय ग तुमच्यावर ! आबा सुद्धा जाई जाई करत असतात.”
“ नंदिनी हो ग. फार गुणी आणि कर्तृत्वाची आहेच बघ जाई ! अरुणची काळजी होती ग बाई मला फार. कसा हा मुलगा, वडील सतत हेटाळणी करत असायचे आणि मी तरी किती संभाळून घेऊ? माझी फार ओढाताण व्हायची ग ! पण बघ ना, जाईला पसंत करताना आम्हाला माहीत होतं, ही गरीब घरातून आलीय. तिला ऍडजस्टमेंटची सवय असणार. ती आणि अरुण लग्नाआधी चारवेळा भेटले होते त्यामुळे अरुण कसा आहे ते तिला समजले होतेच. आमचा निर्णय योग्य ठरला अगदी. बघ ना,आता लग्नाला तीन वर्षे झाली की. किती बदल घडून आला घरात. अरुण इतका सुखी आणि आत्मविश्वासाने वावरलेला मी कधीही बघितला नव्हता.”
“ हो माई, छानच आहे ग जाई. आवडली मला.”
नंदिनीचे परत जायचे दिवस जवळ आले. अरुण नंदिनीला म्हणाला, “उद्या दुपारी आपण बाहेर जेवायला जाऊया .आमच्याकडून तुला ट्रीट.! “ हा अरुण कोणी वेगळाच होता. एका छानशा हॉटेलमध्ये अरुणने सगळ्यांना जेवायला नेलं. कॉन्फिडन्सने ऑर्डर देणारा, विनोद करणारा अरुण बघून नंदिनीला खूप आनंद झाला.
कौतुकाने नंदिनी म्हणाली. “ किती छान वाटतंय रे अरुण, तुला असं आनंदात बघून. जाई, हे सगळं श्रेय मी तुला देईन. माझ्या भावात आमूलाग्र बदल घडवून आणायचं !. किती छान फुलवलंस ग तू त्याला. हे खरं तर मी करायला हवं होतं. पण मी माझ्या यशाच्या धुंदीत असायची आणि अरुण कोमेजतच गेला. माझी चूक झाली. आणि मीही लहानच होते ग जाई त्यावेळी. माझ्या हे लक्षातच आलं नाही कधी. आबा,तुमचीही खूप चूक होती तेव्हा. किती उपमर्द करत होतात या बिचाऱ्याचा तेव्हा तुम्ही ! एकटी माई तेवढी उभी असायची अरुणसाठी .अरुण, मला माफ कर हं.” नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलं. आबाही म्हणाले “अरुण, माझं चुकलं. दोन मुलात इतका जमीनअस्मानाचा असलेला फरक मला सहनच व्हायचा नाही रे. मला तुझं अपयश हा माझा पराभव वाटायचा. मी तुला समजू शकलो नाही. माई,अरुण मला माफ करा रे तुम्ही !”
जाई म्हणाली, “ काय चाललंय हे ! अरुण हे केव्हाच विसरून गेलाय. हो ना अरुण? ही सगळी तुम्ही आपली, आमची माणसं आहात. आमचं तुम्ही कायम भलंच चिंतणार. होतात चुका हो आपल्या हातून. आमचंही चुकत असणार. अरुणही चुकला असेल त्यावेळी !” अरुण हसला आणि म्हणाला,” हो !वाईटच होते ते दिवस. पण तेव्हा मला जाईसारखी मैत्रीण मिळाली असती तर मी असा डिप्रेशन मध्ये नसतो गेलो. माझंही खूप चुकलं. आता वाटतं, आबांच्या वरच्या रागामुळं मी मुद्दाम पुढं शिकलो नाही. किती चुकलं माझं. पण जाई माझ्या आयुष्यात आली आणि तिने माझ्या स्वाभिमानावरची धूळ झटकली. माझ्यातला स्फुल्लिंग जागा केला आणि मी माझ्या नोकरीत किती तरी वर जाऊ शकलो. थँक्स जाई. पण एक सांगतो, मी चांगला पिता होईन आणि माझ्या मुलावर कधीही अन्याय होऊ देणार नाही, की त्याची हेटाळणी करणार नाही.”
माई हसून म्हणाल्या, “ हो का? जाई, पिता होण्याची तयारी झालेली आम्हाला नाही का सांगायची?”
जाई लाजून लाल झाली आणि म्हणाली,” माई अरुण तरी ना !अहो, कालच तर आला रिपोर्ट माझा पॉझिटिव्ह.” माईंनी उठून जाईला मिठीच मारली आणि ते कुटुंब आनंदात बुडून गेलं.
… हे सगळं आत्ता माईंना आठवत होतं.
आबा कालवश झाले आणि नंदिनी महिनाभर राहून कालच अमेरिकेला गेली. माई एकट्या बाल्कनीत बसून हा भूतकाळ आठवत होत्या. आबांच्या आठवणीनं पाणी येत होतं त्यांच्या डोळ्यात ! शेवटी शेवटी किती बदलले आबा. छोट्या अद्वैतचा जन्म झाल्यावर तर ते पूर्ण बदलून गेले. आबा असे मृदू, प्रेमळ आजोबा असतील हे माईंना स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. आबांच्या आठवणींनी डोळे भरून आले
त्यांचे ! अद्वैत माईंना शोधत बाल्कनीत आला, आणि म्हणाला, “ रडू नको ना माईआजी ! आपले आबा देवबाप्पाकडे गेले ना? तू रडलीस तर त्यांना वाईट वाटेल.” आपल्या छोट्याशा हातानी अद्वैतने त्यांचे डोळे पुसले आणि तो त्यांना घरात घेऊन गेला.