मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खरेखुरे रक्षाबंधन… भाग-3 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆ खरेखुरे रक्षाबंधन… भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

(मग ऑपरेशन, त्यानंरच्या असह्य वेदना, महिनोन्महिने अंथरूणालाच खिळून राहाणे, आपल्याला हे सगळं काही भोगावं लागलं असतं…) – इथून पुढे —

हे ऐकल्यावर आईने माझ्या डोक्यावरून हात फिरविला. मी तिची काळजी करतो यापेक्षा मी माझ्या बहिनींच्या आरोग्याची अशी काळजी करतोय याचा तिला जास्त आनंद झाला होता. 

माझ्या सर्व बहिणी उच्चशिक्षित आहेत. सर्व जनी सरकारी नोकरीत आहे. त्या स्वावलंबी आणि मनाने कणखर आहेत. त्यांचे रक्षण करण्याची फारसी संधी मला आजवर कधी मिळाली नव्हती. बहिणीकडून राखी बांधून घेवून बहिणीच्या रक्षणाचे कर्तव्य भाऊ स्विकारतो. आजवर अनेक रक्षाबंधने झाली. पण भावाच्या कर्तव्याची पुर्ती केल्याचा खरा आनंद मला प्रथमच मिळाला होता. बहिणींच्या सर्व छोट्या मोठ्या आजारांचे वेळीच निदान झाल्याने पुढील धोके टळले होते. माझ्या या रक्षाबंधनच्या आगळ्या वेगळ्या गिप्टच्या कल्पनेवर मीच खुप खुष झालो होतो. 

तात्पर्य

मित्रांनो, आज प्रत्येकाच्या घरांत, भले कमीजास्त प्रमाणांत असेल, मात्र अनेक वस्तू, गॅजेटस्, पैसाअडका, सर्वकाही सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीला आणखी एखादी वस्तू भेट देऊन त्यांच्याकडे आहे त्यात आणखी भर घालण्यात काहीच अर्थ नाही. या भेटींचा तेवढ्या पुरता हसून स्वीकार होतो आणि ती वस्तू कायमची त्या घरात धूळ खात पडून राहाते.

लोकसंख्येचा विस्फोट तसेच वाढत्या शहरीकरणामुळे ताणतणाव आणि प्रदुषणासारख्या समस्यांनी आज गंभीर स्वरूप धारण केलेले आहे. त्यामुळे जीवनशैलीशी निगडीत असलेल्या अनेक “सायलेंट किलर” आजारांचे प्रमाण आज प्रचंड वाढलेले आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉल, जीवनसत्वांची कमतरता, हाडे ठिसूळ होणे तसेच वेगवेगळ्या कॕन्सरचे प्रमाण पटींमध्ये वाढले आहे. पण या आजारांबाबत आणि त्यांच्या प्रतिबंधाबाबत आपल्या देशात पाश्चात्त्य देशांइतकी जागरूकता नाही. पाश्चात्त्य देशात वार्षिक आरोग्य तपासणी अनिवार्य असते. पाश्चात्त्य देशांना आरोग्य तपासण्यांचे महत्व पटलेले आहे. पाश्चात्त्य देशात माणसाच्या जिवाला जशी किंमत आहे तशी आपल्याकडे का नाही? उदाहरणार्थ, पाश्चात्त्य देशांनी नियमीत पॕप स्मिअर या तपासणीद्वारे गर्भाशय मुखाचा कॕन्सरच्या ८०% केसेस थांबवल्या आहेत. आपल्याकडे मात्र हा कॕन्सर ८०% वेळा तिसऱ्या वा चौथ्या स्टेज मध्ये लक्षणे आल्यावर सापडतो. आपल्याकडे मात्र आजही वर्षाला ६० ते ७० हजार स्रिया या आजाराने दगावतात. पाश्चात्त्य देशात आठ स्तनाच्या कॕन्सरपैकी केवळ एक स्री दगावते. पाश्चात्त्य देशात स्तनाचा कॕन्सर लक्षणे यायच्या आधीच्या स्टेजेस मध्येच वार्षिक मॕमोग्राफीवर पकडला जातो. आपल्याकडे मात्र स्तनातील गाठ हाताला लागू लागल्या स्री घाबरून डॉक्टरांना दाखवायला जाते. तोपर्यंत उशीर झालेला असतो. आपल्याकडे आठ स्तनाच्या कॕन्सरपैकी चार स्रिया वर्षाच्या आत दगावतात. भारतात दर वर्षी ७० ते ८० हजार स्रिया स्तनाच्या कॕन्सरने दगावतात. भारतात प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे दर वर्षी २६ नवीन स्तनाच्या कॕन्सरच्या केसेस आणि २२ नवीन गर्भाशय मुखाच्या केसेस सापडतात. दुर्दैवाने बहुतेक वेळी आजार तिसऱ्या वा चौथ्या स्टेज मध्ये असतो. हाडांच्या ठिसूळपणामुळे खुब्याचे हाड मोडल्यास २०% लोक वेगवेगळ्या गुंतागुंती होऊन वर्षाच्या आत मरतात. भारतात प्रत्येक एक लाख लोकसंख्येच्या मागे दर वर्षी २०० ते २४० खुब्याची हाडे मोडतात. वयाच्या पन्नाशी नंतर एखाद्या स्रिची स्तनाच्या कॕन्सरने मरण्याची जितकी शक्यता असते तितकीच खुब्याचे हाड मोडून मरण्याची शक्यता असते. ही आकडेवारी भयंकर आहे. भारतात आज डायबेटीसची कॕपिटल झाला आहे. भारतातील एकुण शहरी लोकसंख्येच्या ३३% लोक तर ग्रामीण लोकसंख्येच्या २५% लोक रक्तदाबाने ग्रस्त आहेत. भारतातील एकुण शहरी लोकसंख्येच्या २७% लोकांच्या आणि ग्रामीण लोकसंख्येच्या १७% लोकांच्या रकातील कोलेस्टेरॉलने धोकादायक पातळी ओलांडलेली आहे.  हे तिन्ही आजार कसलेही लक्षणे न दाखवता शरीराला वाळवी लागल्यासारखे आतून पोखरून टाकतात. अनेक वर्षांनंतर जेव्हा हे आजार सापडतात तेव्हा हृदय, किडनी, मेंदू सारख्या शरीरातील अनेक महत्वपुर्ण अवयवांना कायमस्वरूपीची इजा होऊन गेलेली असते. बहुतेक सगळ्या सायलेंट किलर आजारांची भारतात हीच स्थिती आहे. 

रक्षाबंधन, भाऊबीज यांसारख्या सणांमधून आपल्या आया-बहिणींचं रक्षण करण्याची जबाबदारी आपण घेत असतो. जीवाचे रक्षण हे सर्वात मोठे रक्षण असते. त्यामुळे रक्षाबंधनाची जबाबदारी खऱ्या अर्थाने पेलायची असेल तर त्यांचे आरोग्य अधिक सुदृढ राखण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.  स्री ही भारतीय कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे. भारतीय स्रियांनी प्राधान्यक्रमात त्यांच्या स्वतःच्या आरोग्याला सर्वात शेवटी प्राधान्य दिलेले असते. ती कुटुंबासाठी दिवसरात्र झटत असते. तिला सुट्टी नाही. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला तिला वेळ नाही. तिला आजारी पडायचीही सोय नाही. स्वतःच्या कुटुंबासाठी तिने केलेला हा एक त्यागच असतो. पण या त्यागाची किंमत तिला गंभीर स्वरूपाचे आजार स्विकारून चुकवावी लागते. हे होऊ नये म्हणून त्यांच्या रक्षकाने (कुटुंबप्रमुखाने वा भावाने) प्रोॲक्टीव्हली चार पावलं पुढे टाकण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक रक्षाबंधनला आपल्या घरातील स्रियांना “वार्षिक आरोग्य तपासणी पॕकेज” भेट दिले तर खऱ्या अर्थाने त्यांचं रक्षण करण्याकामी ते आपले योगदान ठरेल. ती करत असलेल्य त्यागाची परतफेड करणे शक्य नाही. किमान तिचे आरोग्य जपले तर ज्या कुटुंबासाठी ती त्याग करते आहे त्या कुटुंबाचा भाग म्हणवून घ्यायला आपण लायक ठरू.

कसा वाटतो हा विचार? पटल्यास आम्हांला जरूर कळवा..

..आणि हो, आम्हांला कळवण्याहून अधिक महत्वाचं म्हणजे या विचारावर कृती करून तो नक्की अंमलात आणा. 

यापुढे आपणही असे ‘खरेखुरे रक्षाबंधन’ नक्की साजरे करा.

– समाप्त –  

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गणपती का बसवतात ?… अज्ञात ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ गणपती का बसवतात ?… अज्ञात ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

गणपती का बसवतात ? त्याचे विसर्जन अनंत चतुर्दशीला का होते?…. 

आपल्या धर्मग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषी यांनी महाभारत हे महाकाव्य रचले. परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली व त्यांना महाभारत काव्य लिहिण्याची विनंती केली. मला गणपती ने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालेल, त्यामुळे गणपतीला थकवा येईल त्यावेळी पाणीही ‌ वर्ज्य होते अशावेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास ऋषींनी गणपतीच्या शरीरावर मृतिकेचे लेपन केले. आणि भाद्रपद चतुर्थीला त्याची यथासांग पूजा केली. मातीचे लेपन असल्यामुळे गणपती अडकून पडला. म्हणून यांना पार्थिव गणपती हे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर गणपतीच्या शरीराचे तापमान वाढले आहे आले. हे तापमान कमी व्हावे आणि गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपतीला पाण्यात ठेवले. तेव्हापासून चतुर्थीला गणपती बसवला जातो.  त्याला वेगवेगळे पदार्थ खाण्यास दिले जातात आणि अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन होते ही प्रथा पडली.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आजच्या दहिहंडी वरील छान विवेचन!!! ☆ अनामिक ☆

🌸 विविधा 🌸

☆ आजच्या दहिहंडी वरील छान विवेचन!!! ☆ अनामिक ☆

अष्टमीचा अर्धचंद्र विलक्षण सौंदर्यानं लकाकत होता … समुद्राच्या लाटा त्याला भेटायला अधीर झालेल्या … आणि तशात पांढऱ्या शुभ्र वाळूवर प्रकाशाचा प्रकाशझोत पडला … तेज:पुंज पुष्पक विमान वाळूवर अलगद उतरलं … आणि दरवाजा उघडला तसा इवलासा कान्हा धावत बाहेर आला … पाठोपाठ पेंद्या आणि बाकीचे बालगोपाल उतरले … कान्हा वळला आणि उत्साहात म्हणाला … सखे हो … आज किमान दहा हंड्या फोडायच्या बरं .. दही .. दूध .. लोणी .. सगळी चंगळ करून टाकायची … पेंद्या पुढे आला आणि कान्हाच्या डोईवरचं उत्साहानं थरथरणारं मोरपीस सरळ करत म्हणाला .. आधी वाटणी ठरवायची … कान्हा … कान्हाला काही कळेना … तो म्हणाला .. माझ्या हातचा दहीभाताचा घास मोत्यांच्या घासापेक्षा मौल्यवान मानणारी तुम्ही मंडळी .. अचानक .. पेंद्या म्हणाला … काळ बदलला .. कान्हा … आता हंड्या दह्याच्या नाही .. रुपयांच्या लागतात. लाखांत बोली लागते .. मग आम्ही दहीभाताच्या घासावर समाधान कसं मानायचं ? कान्हा समजुतीच्या स्वरात म्हणाला .. मग काय हवं तुम्हाला .. ? पेंद्यानं एकवार बाकीच्या बालगोपालांकडे पाहिलं … नि म्हणाला … बक्षिसात सारखा वाटा … सेलिब्रिटी बरोबर फोटो .. स्टेजवर एन्ट्री … मिडियासमोर बाईट ची संधी … आणि अपघाती विमा … कान्हाला आता हसू आवरेना. तो थेट पुष्पक विमानाच्या दिशेनं चालायला लागला … पेंद्या गोंधळला … म्हणाला … इतकं टोकाचं का वागतोयस … ? काहीतरी सुवर्णमध्य काढू हवं तर … काही मागण्या कमी जास्त करून .. कान्हा वळला … हसला. पेंद्याजवळ आला .. खांद्यावर हात ठेवून ममत्वानं म्हणाला .. प्रयोजनच संपलंय रे सगळं … ! पेंद्या .. मला घरात दूध दही मिळत नव्हतं म्हणून हंड्या फोडायचो का रे मी .. ? एकत्र या … मनोरा बांधा आणि ध्येय साध्य करा … इतका साधा सरळ विचार … पण ते चार हात एकमेकांच्या खांद्यावर ठेवण्यामागे माणसं जोडण्याची प्रेरणा होती … मुठभर दहीभात घासाघासाने खाण्यात अर्धी भाकरी प्रेमानं वाटून घेण्याची दीक्षा होती .. तेव्हा कान्हा हाच सेलिब्रिटी होता … त्याचा सहवास ही मोक्षाची संधी होती आणि कान्हाची बासरी ऐकायला मिळणं ही बक्षिसाची सर्वोच्च कल्पना होती … अपघात होईल अशी साधी कल्पना ही कधी मनाला शिवायची नाही .. कारण साक्षात शिव सोबत असताना जीवाची भिती कसली … ? पण आता तुझ्या बोलण्यातून जाणवलं .. आता तो विश्वास संपलाय … एकत्र येण्याची उमेद संपलीय … थर वाढले … पण श्रद्धा संपलीय … माझा जन्म हा आता सोहळा न रहाता इव्हेंट बनलाय … आता इथे न आलेलंच उत्तम .. आणि त्यानं विमानात पहिलं पाऊल ठेवलं सुद्धा … पेंद्याला एव्हाना चूक कळली होती … तो घाईनं म्हणाला .. पण कान्हा … कान्हा शांत स्वरात म्हणाला .. अष्टमी येत राहील … पण त्यात कान्हा नसेल … आणि काळजी करू नकोस … कॉर्पोरेट विश्वात रमलेली माझी भक्त मंडळी कान्हा शिवाय हा सण असाच साजरा करत रहातील .. असा म्हणून तो आत गेला सुद्धा … क्षणात आतून बासरीचे करुण स्वर ऐकू येऊ लागले आणि पेंद्यासह बालगोपाल मंडळी जड पावलांनी विमानाच्या दिशेने चालायला लागली..

– अनामिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मी… माझा बाप… आणि माझी आई… !!!… भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मी… माझा बाप… आणि माझी आई… !!!… भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

ही मला भेटली होती साधारण तीन वर्षांपुर्वी … !  वय साधारण ३५ ,  सोबत ५-६ वर्षांचा मुलगा…! एका धार्मिक स्थळाबाहेर मागून खायची. औषधं देता देता चांगली ओळख झाली. मला ती दादा म्हणायला लागली ! 

दरवेळी मला कोडं पडायचं… हा मुलगा कुणाचा ? जर तिचा असेल, तर याचे वडील कुठं आहेत ? याला वडील असतील, तर मग ही एकटीच कशी दिसते ? 

एके दिवशी मी विचारलंच… ! 

… लहानपणीच आईवडील वारले, जवळचं कुणी नाही… पूर्णतः निराधार. जगण्यासाठी भीक मागणं हे सोपं काम निवडलं. दिवसा भीक मागायची आणि रात्री कुठंतरी आडोसा शोधून झोपायचं, हा रोजचा दिनक्रम !

रानटी जनावरं फक्त जंगलातच नाही, तर समाजातही अनेक ठिकाणी सापडतात. मला तर वाटतं नरभक्षक जनावरं जंगलात आणि मादीभक्षक जनावरं समाजात राहतात! 

अशाच एका मादीभक्षक जनावराच्या तावडीत ती एका रात्री सापडली… आरडाओरडा केला पण तो ऐकायला कुणालाच वेळ नव्हता… ! प्रत्येकाला कुठंतरी पोचायचं होतं… ! 

या झटापटीत एक मूल हिच्या पदरात पडलं… ! एकटीची जगायची भ्रांत, त्यात अजून एकाची भर पडली. 

‘ठीक आहे, जगात आपलं असं कुणीच नव्हतं, आता आपलं म्हणावं, असं आपलं मूल तरी आपल्याबरोबर आहे, आधार होईल भविष्यात जगण्याचा ‘ या सकारात्मक   विचारानं तिनं आईपण जपलं… मुलाला जमेल तसं ती वाढवत गेली  ! 

आणि याचवेळी मला ती भेटली होती…. तीनेक वर्षांपूर्वी ! 

“काम का नाही करत गं ?” मी तिला तेव्हा विचारायचो. ती फक्त मान डोलवत गूढ हसायची. वेगवेगळे व्यवसाय मी तिला सुचवायचो… मदत करतो असं म्हणायचो… पण ती ऐकल्यासारखं करायची आणि पोराला हाताला धरुन दूर जायची ! उदास होऊन शुन्यात बघत रहायची ! 

बरोबर आहे, इतक्या मोठ्या विश्वासघाताची भेट मिळाल्यानंतर तिनं माझ्यावर तरी का विश्वास ठेवावा ? 

भरल्या पोटानं दिलेला सल्ला उपाशीपोटी पचत नाही हेच खरं ! गाण्यातले सूर हरवतात तेव्हा ते गाणं बेसुर होतं… आणि जगण्यातला नूर हरवला की ते जगणं भेसुर होतं…! असं सर्वच हरवलेलं ती…!

एकट्या राहणाऱ्या या तरुण मुलीला सांभाळुन घेणारा, मनासारखा कुणीतरी जोडीदार मिळाला, म्हणजे ती डिप्रेशनमधुन बाहेर येईल असं मला डाॕक्टर म्हणुन सारखं वाटायचं. 

डिप्रेशनच्या पेशंटला औषध न लगे… ! 

औषध ‘नल’ गे तीजला !

औषध फक्त त्या पेशंटचा हक्काचा ‘नल’ ! 

अत्याचार झालेल्या, भीक मागणाऱ्या मुलीला तिच्या मुलासह कोण स्विकारणार ? हा मोठा प्रश्न होता. तिला हा हक्काचा ‘नल’ कधी सापडणार…. ? कसा ?

दिवसांवर दिवस जात होते. अशात मला एक तरुण भेटला. चुणचुणीत आणि गोड बोलणारा. यानेही आयुष्यात खुप थपडा खाल्ल्या होत्या, ढोलासारख्या ! थपडा मारुनही ढोल नाद निर्माण करतो…. ! हा सुद्धा त्या ढोलासारखाच ! थपडा खाऊनही बोलणं आणि वागणं अतिशय नम्र आणि गोड, एक नाद निर्माण करणारं ! 

आपल्या शब्दांत नम्रता आणि गोडवा असेल तर  शब्दांना वजन प्राप्त होतं. शब्दांतली नम्रता आणि गोडवा हरवला की याच शब्दांचा स्वतःला भार होतो आणि दुसऱ्याला ओझं ! असो…

तर, यालाही मी काम करण्यासाठी विनवलं…! याला भीक मागायचीच नव्हती… कमीपणा वाटायचा याला भीक मागण्यात… व्यवसाय सुरु करण्याची जिद्द होती याच्यात, पण संधी मिळत नव्हती ! मी हात देतोय म्हटल्यावर, झट्दिशी त्याने तो पकडला. व्यवसाय सुरु केला… आणि बघता बघता छान चालायलाही लागला… ! 

अतिशय प्रामाणिक आणि मनमिळाऊ असलेला हा मुलगा मला आवडायचा. एकदा गंमतीने याला म्हटलं… “काय मालक ? आता लग्न करा की राव …!”

“करु की सर, तुम्ही बघा मुलगी… सांगाल त्या मुलीशी लग्न करतो…” तो म्हणाला होता. 

हसून हा विषय तिथं संपला खरा… पण ‘सांगाल त्या मुलीशी लग्न करतो…’ या त्याच्या वाक्यानं मला रात्र रात्र झोप यायची नाही…! 

एकदा मनाचा हिय्या करुन याला ‘ती’ ची सर्व परिस्थिती सांगितली. हात जोडून म्हणालो… “करशील का रे लग्न तिच्याशी ?”

क्षणभर विचार करत, माझ्या नजरेला नजर भिडवुन म्हणाला, “माझ्यासारख्या भीक मागणाऱ्याला तुम्ही हात देऊन बाहेर काढलंत सर, मी रोज विचार करायचो की या डाॕक्टरच्या उपकाराची परतफेड कशी करायची ? उभं असलेल्या माणसाला पाडायला फार ताकद लागत नाही, पडलेल्या माणसाला उठवायला जास्त ताकद लागते, हे मी तुमच्याकडनं शिकलो सर…. तुम्ही मला तेव्हा उठवलंत… आता पडलेल्या कुणालातरी उठवायची पाळी माझी आहे… तुम्ही जे माझ्यासाठी तेव्हा केलंत, आज ते मी पुन्हा करणार तुमच्यासाठी …!”

माझ्या डोळ्यात पाणी ठरेना ! 

तो तिच्याशी लग्नाला तयार झाला यापेक्षाही..  ‘आपण सावरल्यावर, दुसऱ्याला हात द्यायचा असतो ‘, हे तो शिकला यात मला जास्त आनंद होता…!

माझ्यापेक्षा लहान आहे तो… पण मला त्याचे पाय धरावेसे वाटले…!

पाय तरी कसं म्हणू ? चरण म्हणणंच जास्त योग्य ! 

भरकटतं ते पाऊल, घसरतात ते पाय… आणि दिशा दाखवतात ते चरण… ! 

अत्याचारीत मुलीला तिच्या मुलासह स्विकारण्याची तयारी आणि तिच्या मुलाला आपलं नाव देऊन त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचा विचार करणाऱ्या त्या तरुणाचे पाय मला जणु चरणच भासले… !

यानंतर दोघांची भेट घडवून आणली ! ‘दोघांनी एकमेकांना समजून घेऊन, पुर्ण विचाराअंती निर्णय घ्यावा. कोणताही निर्णय घेण्याचा समसमान अधिकार दोघांनाही आहे, कसलीच बळजबरी कुणी कुणावर करणार नाही’ या बोलीवर त्यांना बोलणं आणि भेटण्याची संधी दिली. 

— क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खरेखुरे रक्षाबंधन… भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆ खरेखुरे रक्षाबंधन… भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

(‘मेडिकल टेस्ट रिपोर्ट करणे टाळायचे’ ही ९९.९९ टक्के लोकांची मूलभूत प्रवृत्ती असते हे मला जाणवले.) इथून पुढे —

वास्तविक, ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर…’ हा फक्त वैद्यकीय नव्हे तर आपल्या रोजच्या जगण्यातील प्रत्येक गोष्टीला लागू पडणारा मंत्र आहे. कँसर, उच्च रक्तदाब, मधुमेह, हाडांचा ठिसूळपणा इत्यादी अनेक सायलेंट किलर आजार आज समाजात सर्रास आढळतात. या आजारांना सुरवातीच्या अवस्थांमध्ये काहीही लक्षणे नसतात. आजार वाढून लक्षणे आल्यावर मात्र डॉक्टरांना फार काही करण्यासाठी शिल्लक राहिलेले नसते. अशा सायलेंट किलर आजारांना सुरवातीच्या अवस्थामध्ये पकडण्यासाठी ठराविक अंतराळाने नियमित तपासण्या करून घेणे गरजेचे असते. 

पण ‘रिपोर्टमधून आपल्या शरीरात चाललेली काही गडबड जर सापडली तर आपल्याला ट्रीटमेन्टच्या चक्रात अडकावे लागेल. कशाला नसत्या फंदात पडायचं? सध्या थोडासाच त्रास होतोय. जेव्हा तो असह्य होईल तेव्हाचं तेव्हा पाहू..’ अशा विचारांचा अधिक प्रभाव असतो.

…आणि इथेच आपण फसतो. 

अनेक वेळा, वेगवेगळ्या प्रसंगी, घरातल्या घरातच बोलताना मी एखाद्या विषयाच्या अनुषंगाने सर्वांनाच ‘सावध व्हा अन्‌ वेळीच टेस्ट करून घ्या,’ असे सांगत असे. सर्व सायलेंट किलर आजारांची माहिती देत असे. नियमित तपासण्याचे महत्त्व सांगत असे.  मात्र खुद्द माझ्या घरात देखील प्रत्येकाचा प्रतिसाद अगदी थंड असायचा. परिस्थिती बदलण्यासाठी वेगळे काय करावे हे मात्र मला कळत नव्हते. 

ही बाब मला सतत सलत होती. अखेर मला एक कल्पना सुचली. बहुधा जून महिना चालू होता. चातुर्मासाची सुरुवात जवळ आली होती. एका रविवारी दुपारी माझ्या सहाही बहिणींना फोन केले आणि दृढनिश्चयी आवाजात निक्षून सांगितले, ‘‘यंदा रक्षाबंधनानंतर ओवाळणी म्हणून मी तुम्हाला साडी वा इतर कुठलीही भेटवस्तू घेणार नाही. या वर्षापासून ‘वार्षिक आरोग्य तपासणी’ हिच तुमची रक्षाबंधनची भेट असेल. जी बहीण या तपासण्या करून त्याचे रिपोर्टस्‌ मला दाखवेल, फक्त तिच्याकडूनच मी रक्षाबंधनला राखी बांधून घेईल. अन्यथा मी  रक्षाबंधनला राखी तर बांधून घेणार नाहीच पण भाऊबीजेलाही ओवाळून घेणार नाही.’’ आईलाही सांगितले, ‘‘या ठराविक टेस्टस्‌ केल्या नाहीस तर यंदा नरकचतुर्दशीला पाटावर बसून अंगाला तुझ्याकडून मी सुगंधी तेलाने अभ्यंग करून घेणार नाही अन्‌ पाडव्याला ओवाळूनही घेणार नाही.”

सर्वांना निक्षून सांगितले, ” गर्भाशय मुखाच्या कॅन्सरसाठी पॕप स्मिअर, स्तनाच्या कॅन्सरसाठी मॕमोग्राफी, हाडांचा ठिसुळपणा तपासण्यासाठी बोन डेंसिटी, जनन इंद्रियांची आणि पोटातील इतर अवयवांची सोनोग्राफीने तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तक्षयासाठी हिमोग्लोबीनची तपासणी, डायबेटीससाठी शुगरची तपासणी, कोलेस्टेरॉलची तपासणी, व्हिटामीन B13 आणि D3 ची तपासणी, थायरॉईडची तपासणी या सर्व १० तपासण्यांचे रिपोर्ट दरवर्षी समोर असतील तरच यापुढे रक्षाबंधन आणि भाऊबीज साजरे होतील.’’

ही मात्रा मात्र लगोलग लागू पडली. चक्क सहाही बहिणींनी तसंच आईने सुद्धा, भले निरिच्छेने असेल, पण सांगितलेल्या सर्व टेस्टस्‌ केल्या. सर्व जणी रिपोर्टस्‌ घेऊन आल्या. मी आणि जान्हवीने सगळे रिपोर्टस्‌ अभ्यासले. प्रत्येकीला समोर बसवून त्यांचे रिपोर्ट समजावून सांगितले. आम्हाला त्यात भन्नाट गोष्टी सापडल्या.

सर्वात मोठ्या बहिणीच्या म्हणजे निर्मलाच्या गर्भाशयाला फायब्रॉईडची गाठ असल्याचे लक्षात आले. पाळीच्या वेळी तिला जो काही त्रास होत होता तो तिने इतर कुणालाही न सांगता स्वत:च्या मनात (आणि शरीरात) कडेकोट बंदिस्त करून ठेवला होता. मात्र तिचा रिपोर्ट पाहून तिला स्पष्ट विचारल्यानंतर तिने पाळीत खूप वेदना तसेच अती-रक्तस्राव नेहेमीच होत असल्याचे कबूल केले. त्यामुळे तिचे हिमोग्लोबीन सुद्धा खूपच कमी झाले होते. त्यावरही लगेचच यथायोग्य औषधोपचार सुरू झाले. ती आता कोणतीही पीडा-वेदनेमध्ये कुढत न रहाता सुखाने आपल्या दैनंदिन कामाला लागली आहे. 

माझ्या दोन नंबरच्या बहिणीच्या म्हणजे उषाताईच्या ओव्हरीमध्ये छोटासा ट्यूमर असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याही पुढील एक-दोन चाचण्या करून लगेच यथायोग्य उपचार केले. जो ट्यूमर पुढे वाढून धोकादायक ठरण्याची शक्यता होती. ऑपरेशन करून तो ट्यूमर काढून टाकला. पुढचा धोका टळला. आज तीही सुखाने आपल्या रोजच्या कामाला लागलेली आहे. 

तीन नंबरच्या बहिणीला, आशाताईला, बीपीचा त्रास असल्याचे उघडकीस आले. तिच्यावर आम्ही अगदी त्याच दिवसापासून उपचार सुरू केले आणि आता रोज रात्री झोपताना एक गोळी घेतली की बाकी त्रास थांबला आहे.

माझ्या चार नंबरच्या बहिणीच्या, सरलाताईच्या, हृदयाच्या तपासणीत ‘मरमर’ हा वेगळा आवाज ऐकू येत होता. आम्ही तिचा 2 D Echo करून घेतला होता. तिच्या हृदयाच्या वरील दोन कप्प्यांमधील पडद्याला जन्मापासून छिद्र होते. आजपर्यंत तिला त्याचा फारसा त्रास होत नव्हता. पण आता तिला थोडा दम लागू लागला होता. पण हा प्रॉब्लेम आजवर कधीच डिटेक्ट झाला नव्हता. रिपोर्ट ऐकून ती देखील हादरली. माझ्या हार्ट स्पेशालिस्ट मित्राकडे, डॉ हेमंत कोकणेकडे, मी तिला कन्सल्टेशन साठी पाठवले. त्यांनी एएस्‌डीसी (म्हणजे ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट डिव्हाईस क्लोजर) ही छोटी शस्रक्रिया करून ते छिद्र बंद केले. त्यानंतर तिला आजवर कधीच त्रास झाला नाही.

तिन बहिणींना B12 डेफिशियन्सी असल्याचे आढळले. त्यासाठी इंजेक्शनचा कोर्स प्रिस्क्राईब केला आणि त्याचे चांगले परिणाम त्यांनाच अनुभवास येत आहेत.

दोन बहिणींना D3 डेफिशियन्सी असल्याचे आढळले. त्याला योग्य ते उपचार दिले. त्यांचीही तब्येत आता आणखी सुदृढ होते आहे.

आईच्या रिपोर्टमध्ये तिच्या हाडांचा टी-स्कोअर रेड झोनमध्ये असल्याचे दिसले. ही खुपच गंभीर बाब होती. तिच्या वयाला स्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाने मृत्यू होण्याची आणि हाडे ठिसूळ झाल्याने खुब्याचे हाड मोडून मृत्यू होण्याची शक्यता सारखीच असते. तिची हाडे कमालीची ठिसूळ झालेली होती. याला आम्ही ‘severe osteoporosis’ म्हणतो. तिच्यावर त्याच दिवसापासून उपचार सुरू केले. सलग काही महिन्यांच्या ट्रिटमेन्ट नंतर तिचा टी-स्कोअर ‘रेड’मधून आधी ‘यलो’ व नंतर ‘ग्रीन’ झोनमध्ये आला आहे. आजमितिला तिला काहीही त्रास नाही. 

‘‘सगळं काही आलबेल आहे असं आपण सगळे कायमच समजून चालतो. पण आई, कल्पना कर… तू ही टेस्ट केली नसती तर तुझी हाडे ठिसूळ झाली आहेत याचा आपल्याला थांगपत्ताही लागला नसता. अशात तू पाय घसरून थोडीशी जरी पडली असतीस ना; तर त्याची परिणती थेट तुझ्या खुब्याचे हाड मोडण्यातच झाली असती. मग ऑपरेशन, त्यानंरच्या असह्य वेदना, महिनोन्महिने अंथरूणालाच खिळून राहाणे, आपल्याला हे सगळं काही भोगावं लागलं असतं…’’

— क्रमशः भाग दुसरा… 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आईची आई… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ आईची आई… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

ज्यांना ज्यांना आई आहे, मग ती तरुण असो की वृद्ध, त्या सर्वांनी मुद्दाम खालील लेख वाचून तसे आचरण करण्याचा प्रयत्न करावा…!

( पेशाने सर्जन असणाऱ्या मुलाने लिहिलेला अतिशय सुंदर लेख !) 

 

वयोपरत्वे तोल जाऊन पडल्याने आई अंथरुणाला खिळली ती कायमचीच. सर्व अवयव नव्वदीतले. 

झिजलेल्या कंबरेवरचा मुकामार तिला कायमचा परावलंबी करून गेला. पाय उचलणं सुद्धा अशक्य झालं.

तिच्या संवेदना कमी झाल्याने सगळे सोपस्कारही कपड्यातच… वृद्धत्व सोडून दुसरा आजार नव्हता. 

पण म्हातारपण म्हणजे सुकून जीर्ण झालेलं बालपण. तोच हटवाद आणि वागणंही तसंच लहरी. 

 

सल्ला मसलतींचा पाउस पडला. लाख मोलाच्या आईसाठी काही हजाराची केअरटेकर… मनाला पटेना.

अनेक पर्यायांचा उहापोह झाला. आम्हा दोघांची कामं अत्यावश्यक सेवेतली. सलग सुट्ट्यांचा दुष्काळ.

मग मीच ठरवलं केअरटेकर व्हायचं. चिडक्या, हट्टी म्हातारबाळाची आई व्हायचं.

 

लाळेरं लावून सकाळी चमच्याने पाजलेला चहा… दमदाटी करत भरवलेलेचे चिऊ काऊचे घास. 

कधी ठसका, कधी मळमळ तर कधी उलटी… बहाणेच बहाणे.

 

पेशाने सर्जन, मलमूत्र रोगांशी जुनी दोस्ती. त्यामुळे संकोच सोडणं सोपं गेलं. डोळे मिटून घेण्याशिवाय तिच्या संकोचाला  पर्यायच नव्हता. वेळोवेळी डायपर बदलून, अंग पुसून, पावडर लावून कपडे घालण्यापासून ते तेल लावून वेणी फणी करण्यापर्यंत सगळं.

 

दिवसातून दोन तीनदा घर ते हॅास्पिटल, हॅास्पिटल ते घर अप-डाऊन. धावपळ होत होती; पण थकवा आला तरी जाणवत नव्हता. तिच्या प्रत्येक हाकेमुळे मनातल्या मनात माझाही पान्हा फुटत असावा. 

मनाच्या कुठल्यातरी पातळीवर कधीही न मिळालेलं समाधान अनुभवत होतो. कुठल्याही कळा न सोसता मला तिचं आईपण मिळालं हे माझं किती मोठं भाग्य होतं ! 

 

पण फार काळ नाही. काही महिन्यांची सेवा आणि एका प्रसन्न सकाळी माझ्या हिरकणीने गड सोडला.

 

मी माझं कर्तव्य समजून तिची सेवा केली. कुणीतरी म्हणालं पुण्य कमावलंस. 

त्यांचं खरं असेल तर हे छोटंसं पुण्य चित्रगुप्ताच्या डायरीतील माझं पान भरायला पुरेसं होईल.

 

देव आणि आई एकाच नाण्याच्या दोन बाजू. देव खाली येऊ शकत नाही म्हणून आईला पृथ्वीवर पाठवलं। असं कुठंतरी वाचलेलं. त्या वाक्याचा प्रत्यय यावा अशी आपली आई.

 

रामची असो की शामची.

कैकयी असो की गांधारी.

आई सगळ्यांची सारखीच.

 

शरीराने आणि मनाने आपल्या गूढ देवराईतील शक्ती देवता… फक्त आपल्या भल्यासाठीच तिच्या ओंजळीतली माया रिकामी करणारी लक्ष्मी… प्रत्येकाच्या छोट्याशा आकाशातील अढळ स्थानावरील ध्रुवतारा…  तिचं गुरुत्वाकर्षण तर पृथ्वीपे‌क्षाही भारी. खालून वर नेणारं… बिजांडातून ब्रम्हांडात पोहचवणारं.

तिच्या बिजांडात अंकुरलेला सूक्ष्म कोंब म्हणजे आपण… एक दशांश मि.मि.पेक्षाही लहान. गर्भाशयाच्या भिंतीवर ‌मुळं पसरून, तिचंच रक्त शोषून तगणारं बांडगुळ.

 

मधेच केव्हातरी पारंबी फुटावी तशी नाळ फुटते बेंबीतून. त्यातून मिळणाऱ्या खतावर कोंबाचं रोपटं होण्याची सुरुवात होते… चैत्राच्या पालवीसारखे हळूहळू फुटलेले कोवळे कोवळे अवयव. तिचीच ऊर्जा घेऊन सुरू झालेली इंजिनं… आदिपासून अंतापर्यंत अव्याहत पळणारी.

नव्या फुफ्फुसाचा पहिला श्वास आणि नव्या ह्रदयाचा पहिला ठोका तिच्याच मालकीचा. 

नॅनोग्रॅम पासून ते किलोग्राम पर्यंतची वाढही तिच्याच कोठारातील.

 

कणाकणानं वाढणारं ओझं घेऊन तोल सांभाळणारा कणखर मणका….  

कितीही वाकला तरी पोटातल्या गोळ्याला सुरक्षित वाहणारा. 

लाथा मारणारं बाळ, आणि लाथा मारणारी परिस्थिती, दोघांना झेलत तारेवर झुलणारी डोंबारीण.

 

नऊ महिने नऊ दिवसांची कसरत. .. ढोलकं बडवायला नवरा आणि टाळ्या पिटायला ढिगभर जमाव. 

पण मदतीसाठी थाळी फिरवली की सगळ्यांचं घुमजाव.‌

 

बाळनिवासाच्या पायाभरणीत फिक्कट करणारे दिवस. .. धापा टाकत टाकत केलेलं रांधा वाढा, उष्टी काढा. .. सुजून जडावलेले पाय आणि वाढलेले श्वास म्हणजे घटीका भरल्याची नांदीच.

 

चंद्र, ग्रह, तारे बाळाच्या कुंडलीत स्थिरावले, की सुरू झालेल्या प्रसव कळा.

खोल, गूढ, अगम्य कृष्ण विवरातील वादळ.

सुरुवातीला समुद्राच्या हळुवार लहरींचे हिंदोळे. .. नंतर याच लहरींवर स्वार झालेल्या भरतीच्या धडका…  

एकामागून एक…  

…. बाळाच्या ओढीने वाढलेल्या कळा जणू चंद्रासाठी उसळणाऱ्या पौर्णिमेच्या लाटा. काही सौम्य काही रौद्र… उरल्या सुरल्या शक्तीला मुठीत घट्ट आवळून घेतलेल्या, कळांवर कळा…

 

प्राण पुरवणारा वार जागा सोडण्यासाठी भिंतीपासून विलगू लागतो… 

मुळापासून विस्थापित होण्याच्या भितीने बाळही अस्वस्थ होऊ लागते.. .

अशुभ संकेतांची टिटव्यांची टिवटिव… गुदमरणाऱ्या बाळासाठी, खचलेला धीर मुठीत आवळून एक जोराची किंकाळी आणि  निकराची एक शक्तीशाली कळ.

 

किनारा चिरणाऱ्या पाण्याच्या लोंढयात तरंगत आलेलं आणि दाईने झेललेलं गोंडस बाळ.

…. मातेने सोसलेल्या यातनांना बाळाने रडून दिलेली दाद, म्हणजे बाहेरच्या जगातला पहिला श्वास.

…. दुपट्यातल्या सुखाला उराशी कवटाळून अमृतकुंभाला शोधणाऱ्या अधाशी ओठांना कौतुकाने पाहणारे आईचे डोळे.

…. फुटलेल्या पान्ह्यातून गळणारे थेंब वेदनांचा निचरा करत बाळाच्या ओठांवर विसावले की, अमृताच्या अभिषेकात न्हाऊन तिच्या काळजाचा तुकडा झोपी जातो.

 

माता कुराणातील असो वा पुराणातील. तिचं वात्सल्य कुणालाही नतमस्तक करणारं… 

अनुसूया असो की आदिती….. दिगंबराची असो किंवा पैगंबराची… 

…. आई शेवटी आईच असते !

 

जन्माला आलेल्या बाळासाठी तिचं त्याचं नातं अद्वैत…  

तिने शून्य बॅलन्स वापरून उधळलेली अनमोल ममता… 

त्यामुळे त्याच्या उत्पन्नात वाढणारा प्रत्येक मोठा आकडा तिच्या ममतेशी गुणला की शुन्यच. 

 

जगभर फिरला, पण तिच्या उपकारांची परतफेड करणाऱ्या वस्तूंचा मॅाल नाही दिसला.

 

डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पासबुकं ही या नात्यात फक्त कागदं आहेत…..  

आईचं कर्ज फेडण्याइतका त्यात बॅलन्स कुठे आहे ?

 

या ओझ्यातून किंचित मुक्त होण्याचा एक मार्ग… एक उतराई…..  

…. शक्य असेल तर जरूर बना !

 

लेखक : अज्ञात.

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शिक्षक –बदलते स्वरूप… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ शिक्षक –बदलते स्वरूप… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.  शिक्षक हे समाजातील सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या हातूनच समाजाचा पाया रचला जातो. शिक्षकांची गुणवत्ता जितकी दर्जेदार तितकेच चांगले विद्यार्थी घडले जातात. समाजाचा मुलभूत घटक खरेतर शिक्षकच आहे. पुर्वी समाजात कोणतेही शुभकार्य असो , शिक्षकांची उपस्थिती महत्त्वाची मानली जात होती. इतकेच नाही तर गुरूजी, सर समोरून येताना दिसले की, आपोआप नजर खाली जाऊन शिक्षकांबद्दल विलक्षण आदर, त्यांचा दरारा मनात येत असे. पण आज कुठेतरी हे चित्र बदलताना दिसत आहे.

पुर्वी ज्ञान मिळवण्याचे एकमेव साधन शाळा आणि गुरूजी अथवा सर हेच होते. पण आज संगणक युग आले, लहान मुलांपासून ते काॅलेजात जाणाऱ्या युवकांपर्यंत हातात मोबाईल आले आहेत. जरूरी असणारी सर्व माहीती गुगलवर मिळू लागली आहे.  त्यामुळे शिक्षकांचे महत्त्व कमी होत चालले आहे. दुसरे म्हणजे आज गल्ली गल्लीतून शिकवणी वर्ग घेतले जात आहेत. यामुळे ज्ञानाचे मुख्य केंद्र असणारे, शाळा आणि शिक्षक यांचे समाजातील स्थान ढासळत चालले आहे. शिक्षकांबद्दल असणारा आदर, त्यांचा दरारा आजच्या विद्यार्थ्यांमध्ये फारसा दिसून येत नाही.  काही ठिकाणी तर शिक्षकांना अपमानित करणे, उध्दटपणे बोलणे  असे घृणास्पद प्रकार घडताना दिसतात.  एकेकाळी शिक्षक हे समाजातले आदरस्थान होते. पण आज शिक्षकांचे समाजातील महत्त्व कमी होत चालले आहे.  ही स्थिती समाजासाठी घातकच ठरेल.  कारण आजचे विद्यार्थी हे उद्याचे, भावी नागरिक असतात.  शिक्षकांच्या हाताखालीच हे समाजाचे खांब मजबूत, गुणवंत, आदर्शवादी होत असतात. त्यामुळे शिक्षक हेच भावी समाजाचे ‘आधारवड ‘ आहेत. समाजाने सुध्दा शिक्षकांचे आजचे ढासळणारे स्थान,  महत्त्व इ. बाबींना सावरले पाहिजे.  ‘ शिक्षक हेच गावातील बहुमूल्य व्यक्तिमत्त्व आहे  ‘ हा विचार समाजमनावर कोरला जावा.

दुसरे म्हणजे स्वतः शिक्षकांनी सुध्दा आपले शाळेतील  ,समाजातील स्थान अबाधित राहील याकडे लक्ष देऊन उत्तम ज्ञानदान करावे. वर्गात शिकविताना ज्या विषयाचे संपूर्ण ज्ञान आहे असाच विषय अध्यापनास निवडावा. शिक्षकांनी आपल्यातील गुणवत्ता ही फक्त हुशार विद्यार्थी अधिक हुशार कसा होईल याकरताच न वापरता, वर्गातील सर्वसामान्य विद्यार्थीसुध्दा उत्तम व्हावा याकडे लक्ष केंद्रित करावे. आपले ज्ञान हे आभ्यासात मंद असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचेल ह्याकरिता प्रयत्न करावेत.  दर्जेदार शिक्षक , शाळा आणि विद्यार्थी या गोष्टीवर सुध्दा समाजाचे भवितव्य अवलंबून असते. वर्गात शेवटच्या बाकावरील विद्यार्थी आणि पहिल्या बाकावरील विद्यार्थी यात शिक्षकांची समदृष्टी असावी.  “आदर्श विद्यार्थी  ,आदर्श शाळा  ,आदर्श समाज  हे प्रत्येक शिक्षकाचे लक्ष्य असावे. शाळा हेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे त्यामुळे शाळेसारख्या पुण्यस्थानी शिक्षणाचा बाजार होवू नये याचे ध्यान आपण सर्व पालक ,विद्यार्थी  आणि सर्व शिक्षक मिळून ठेवले पाहिजेत.

सर्व शिक्षक बंधू -भगिनींना शिक्षकदिनाच्या खुप खुप शुभेच्छा !

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सेवानिवृत्ती … शाप की वरदान – लेखक – अज्ञात ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

?जीवनरंग ?

☆ सेवानिवृत्ती … शाप की वरदान – लेखक – अज्ञात ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

ठरल्याप्रमाणे, म्हणजे अगदी सटवाईनं लिहून ठेवल्याप्रमाणे 58 व्या वर्षी तो रिटायर्ड झाला आणि त्याचं जगच बदललं.

नोकरीत असतांना त्याची एक ठराविक दिनचर्या होती. सकाळी साडे नऊला तो घराबाहेर पडायचा. अत्यंत प्रामाणिकपणे ऑफिसच्या वेळांत नेमून दिलेलं काम आटपायचा. भाजी, किराणा सामान घेत, भेटलेल्या कुणाशी चर्चा करून रमत गमत घरी परतायला त्याला संध्याकाळचे सात वाजत आल्यावर जेवण, शतपावली वगैरे झालं की पलंगावर पडल्या बरोबर त्याचे डोळे मिटायला लागत. 

ऑफिसात सगळा स्टाफ त्याच्या वर खुश असायचा. त्याचा हसरा चेहरा बघायची संवय झालेले त्याचे सहकारी त्याच्या रिटायर्डमेंटच्या सभारंभाला खूप हळहळले, पण सरकारी नियमांपुढे सर्वांचाच नाईलाज होता.

एरवी त्याचे दिवसभराचे कार्यक्रम इतके साचेबध्द होते की ,सुटीच्या दिवशी घरांत त्याचा जीव घाबरायला लागायचा. दुपार खायला उठायची आणि करायला काहीच नाही म्हटल्यावर त्याचे पाय बायकोच्या हक्काच्या स्वैंपाकघराकडे वळायचे. मग ही बरणी उघड, तो डबा उचक, असे त्याचे उद्योग दुपारभर चालायचे. वामकुक्षी आटोपून बायको उठली की तिला विस्कटलेलं स्वैंपाकघर दिसे. आणि तिचा संताप होई. सुटीचा एक दिवसही हा माणूस घरांत नको, असं तिला वाटायला लागे. 

त्यालाही अपराध्यासारखं होत असे, जितके व्यवस्थित आपण ऑफिसात असतो., तेवढं घरी रहाणं जमत नाही ,ही खंत त्याला पुढील आठवडाभर त्रास देई.

रिटायर्ड झाल्यापासून तो कायम घरांतच असायचा. तिला मात्र याचा त्रास व्हायचा. तिच्या हौशीचे दिवस कधीच सारून गेले होते आणि जेंव्हा हौस करायची वेळ होती ,तेंव्हा हा सतत ऑफिसचं तुणतुणं वाजवायचा, हे ती विसरली नव्हती, किंबहुना तिच्या मनांत याचा सुप्तसा रागही असावा.

रजेपुरता पैसा घरांत येत असला की माणसांचं ओझं व्हायला लागतं. वर्षानुवर्षाच्या त्याच्या संवयी तिला आता त्रासदायक होऊ लागल्या, त्याच्याबद्दलच्या तिच्या तक्रारी वाढू लागल्या. त्याने स्नान केल्यावर ओला टॉवेल पलंगावर फेकायची त्याला संवय होती, तो ऑफिसात जायचा तेंव्हा ती कर्तव्य म्हणून तो ओला टॉवेल उचलून धुवायला घेत असे ,पण आता त्याला ‘ भरपूर वेळ असल्यानं असली कामं त्यानेच आपणहून करायला हवीत  ’ असा तिचा आग्रह होता.

हा आग्रह त्याला मान्यही होता, मात्र तिने सूचना चांगल्या शब्दांत द्याव्या, असा त्याचा सूर होता. तिच्या स्वभावामुळे कदाचित, तिला त्याची ही गोड बोलण्याची अपेक्षा पूर्ण करणं जमत नव्हतं.

तो रिटायर्ड होऊन आरामाचं आयुष्य जगतोय आणि आपल्याला मरेपर्यंत रिटायर्ड होता येणार नाही ,ही जाणीव तिला बोचत असावी. 

खरं तर तिचंही वय उताराला लागलं होतं आणि व्याप वाढत असल्याने तिची आता दमछाक होऊ लागली होती. मुलांची लग्न, सुनेशी जमवून घेतांना होत असलेली तारांबळ, तो घरीच असल्याने त्याचेकडे येणारी माणसं, आणि हे कमी का काय म्हणून चोवीस तास समोर वावरत असलेला, पण घरकामाला  काडीचा हातभार न लावणारा तीचा हा स्थितप्रज्ञ नवरा. 

तो समोर नसला की, त्याच्याबद्दलच्या असूयेनं आणि समोर असला की त्याचं तोंड बघूनच तिचं रक्त उसळायला लागायचं. तो पाणी प्यायला जरी स्वैंपाकघरात शिरला तरी ‘ तू मुद्दाम माझ्या मध्ये मध्ये लुडबुड करतोस ’ म्हणत ती त्याला झिडकारायची. 

हळूहळू तिला तो डोळ्यासमोरही नकोसा होऊ लागला. आणि त्या दिवशी ती प्रचंड चिडली. कारण काय होतं कुणालाच कळलं नाही, तिलाही. पण इतक्या दिवसांचा मनांत साचलेल्या रागाचा स्फोट झाला आणि तिने त्याच्यावर खूप आरडा ओरडा केला. त्याला अद्वा तद्वा बोलली, थेट त्याच्या आई वडिलांचा, बहीण भावांचा उद्धार केला. तो हादरला, पण रिअॅक्ट करण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. तो तिला चिडायची कारणं विचारत राहिला. आणि ती प्रत्येक वेळी सांगत राहिली, ‘तू मला आता डोळ्यासमोर नकोस, बस्!

त्याने ऐकलं आणि निराश होत विचारलं! ‘आयुष्याच्या या स्टेजवर आता मी कुठे जाऊ?’ तिला वाटलं हा चिडवतोय, ती मग आणखीनच चिडली. हातवारे करत किंचाळली! ‘कुठेही जा. मेलास तर फारच बरं होईल, माझी सुटका तरी होईल.’ हे ऐकून हा एकदमच शांत झाला. तश्याही परिस्थितीत म्हणाला, ‘ते माझ्या हातात नाही, पण तुझा शाप माझ्या आतपर्यंत पोहोचला. तू मात्र खूप जग, माझं उरलेलं आयुष्य तुला मिळू दे. शतायुषी हो ! 

हे असं वारंवार होऊ लागलं. अगदी चिमुटभर कारणासाठीही ती त्याला मरणाचा शाप द्यायची आणि मोबदल्यात तो तिला शतायुषी होण्याचा आशीर्वाद द्यायचा. तिच्या मनात तसं काही नसायचं. त्याने खरंच त्यांच्या संसारातून, या जगातून कायमचं निघून जावं असं तिला वाटणं शक्यच नव्हतं. शेवटी तिनेही त्याचबरोबर पस्तीस छत्तीस वर्ष संसार केला होता, त्याने बांधलेलं मंगळसूत्र तिने सन्मानाने मिरवलं होतं, वर्षानुवर्षे त्याचं आयुष्य वाढावं म्हणून वड पूजले होते, हरताळकेचे कडकडीत उपास घातले होते, त्याचा मृत्यू मागण्याइतकी ती खचितच दुष्ट नव्हती. 

पण तिच्यासमोरचा त्याचा सतत होणारा वावर जाणवला की तिची विचारशक्ती संपूर्णपणे नष्ट व्हायची, मेंदू अक्षरशः पेट घ्यायचा आणि तिच्या तोंडातून नको ते शब्द बाहेर पडायचे आणि एक दिवस अचानकच तो गेला. सकाळी उठून त्याने चहा घेतला, लांब फिरून आला आणि ‘ थकवा वाटतोय ’ म्हणत सोफ्यावर आडवा झाला तो उठलाच नाही.

घरात धावपळ झाली, डॉक्टर आले, त्यांनी तपासलं आणि त्यांच्या प्रथेनुसार इंग्रजीत ‘सॉरी, ही इज नो मोअर’ सांगितलं. एकच हलकल्लोळ झाला.

तो मात्र त्याच्या स्वभावाप्रमाणेच एकदम शांत पहुडला होता. प्रत्येकजण त्याच्या वेदनारहित मृत्यूचा हेवा करीत होते. ‘Before Time असं मरण नको होतं ‘ ,असा प्रत्येकाचाच सूर होता.

तिच्यासाठी मात्र लोक खूपच हळहळले. ‘ आता कुठे सुखाचे दिवस आले होते, नवऱ्याचा पूर्णकाळ सहवास लाभला होता ,तर ही वेळ आली ’ असे लोक म्हणत होते . आकाशाकडे बोट दाखवून, ‘त्याच्या इच्छेपुढे कुणाचं काय चालतयं का ?वगैरे बोलून तिचं औपचारिक सांत्वन करून लोक त्यांच्या निघून गेले. 

आता ती एकटी राहिली. प्रेम, राग, विरोध, काळजी या मनातील भावना व्यक्त करायला हक्काचं कुणी उरलं नाही. तसं मुलं, सुना लक्ष द्यायचे तिच्याकडे, पण त्यांना त्यांचाही संसार होता.

तिनं देवळं धुंडाळली, मित्र मैत्रिणी झाले, काही काळ माहेरच्यांचं कौतुक झालं, मग मात्र सारेच आपोआप दूर झाले.

असेच दिवस जाऊ लागले, महिने गेले, वर्षे सरली. मुलांनी थाटात तिचा पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा केला. पण ‘सतत तुझंच कौतुक कसं  करायचं ?’ म्हणत मग त्यांनीही अंतर राखायला सुरुवात केली.

नातू, नात लहान होते तोवर तिचे होते, मोठे झाल्यावर त्यांचं जग विस्तारलं, आजीचा पदरही न सोडणारी बाळं तिनं चारदा आवाज दिल्यानंतर एकदाच ‘काय आहे आजी?’ असं चिडक्या स्वरात विचारू लागले. 

तिला हे त्रासदायक व्हायचं, नेमका तेव्हाच, नवऱ्याशी केलेला व्यवहार आठवायचा, पण ‘काळाला मागे नेऊन चूक सुधारता येत नाही’ हे ठाऊक असल्याने, तिला नेमून दिलेल्या जागी पडलेला चेहरा घेऊन ती बसून रहायची. 

तिच्या वयाचा आकडा वरवर जात राहिला, कार्यक्षमता मात्र दर दिवसाला कमी होत गेली. आता मात्र ती प्रचंड थकली, हातपाय चालणं कठीण झालं, वेळ काढणं जड जाऊ लागलं. ‘ तुझी  उपयोगिता संपायला आलीय ‘ याची जाणीव लोक आडून पाडून  तिला करून देऊ लागले आणि नकळत ती मरणाची वाट बघायला लागली.

एव्हाना पन्नाशी ओलांडलेले मुलगा आणि सूनही थकायला लागले होते. त्यांनाही त्यांचे जावई सुना आल्या होत्या आणि नवी सून तिच्याच सासूचं काही करेना, तिच्याकडून आजेसासूसाठी काही अपेक्षा करणं तर फारच कठीण होतं. 

ती रोज आतल्या आत रडायची. ‘ देवा, उचल मला ’ म्हणून प्रार्थना करायची. ‘ भोग भोगायला मला एकटीला अश्या परिस्थितीत सोडून तो सुखासुखी निघून गेला ’ म्हणत मनातल्या मनात त्याला दुषणे देत पडून रहायची. 

फारसं आठवायचं नाही तिला काही आज काल. मात्र तिने दिलेले शाप आणि त्याने दिलेले आशीर्वाद, प्रयत्न करूनही तिच्या स्मृतीतून निघत नव्हते….!

‘मेलास तर फारच बरं होईल, माझी सुटका होईल.’ हा तिनं त्याला दिलेला शाप होता की आशीर्वाद होता ! ‘ तू मात्र खूप जग, शतायुषी हो,’ हा त्याने तिला दिलेला आशीर्वाद होता का शाप होता? हे मात्र तिला तिचंच कळत नव्हतं….

मित्रांनो !

आपलेही बरेच मित्र सेवेतून निवृत्त झाले आहेत व काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. एकमेकांना खूप जीव लावा आणि उर्वरित आयुष्य सुखाने जगा. हे असे प्रसंग कुणाच्या तरी आयुष्यात घडून गेलेले असावेत, असे जरी गृहीत धरले तरी देखील, सदरची घटना सहजासहजी  मान्य करावयास कुणाचेही मन तयार होणार नाही हे निश्चित. मात्र अशाही घटना कुणाच्या आयुष्यात सेवानिवृत्तीनंतर जर घडत असतील, तर हे फारच भयानक व हृदयद्रावक चित्र आहे.

  * “ जगात सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस ” *— 

लेखक : अज्ञात . 

प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अष्टमीच्या पावसाला… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ अष्टमीच्या पावसाला… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

एक काळ असा होता की, धो धो कोसळणारा पाऊस अंगावर झेलत – रस्त्यात, शेतात, नदीच्या काठावर, नाही तर हिरव्यागार कुरणातून चालण्या-भटकण्याचा – मनसोक्त आनंद लुटत होतो.

ते दिवस तर आता संपले. आता तोच आनंद लुटत असतो, उघड्या पडवीत आरामखुर्चीत निवांत बसून – धो धो पाऊस, थोडीशी थंडी, भीमाण्णांचे मल्हाराचे सूर, कांद्याची भजी, आल्याचा चहा – या सगळ्यांचे कथ्थक नर्तन अवलोकून!

या पावसाच्या चालू हंगामामध्ये – पाऊस भजी चहा – असे अपूर्व त्रिवेणी योग तीन-चार वेळा जुळून आले आणि मानस तृप्त जहाले !!

आजही पाऊस पडतोच आहे. पण संतत धार नव्हे. एकदाच पडला. अगदी धो धो नसला, तरी बऱ्यापैकी सरी कोसळल्या. पण आज मला फक्त पाऊसच हवा आहे. बाकी काहीच नकोय्.  दर क्षणांला स्वत:ला आकाशातून झोकून देत पृथ्वीकडे झेपावणारे पाण्याचे लाखो थेंब – शुद्ध, सात्विक आणि पवित्र – मी नजरेने पीत आहे – किती तरी वेळ! आता मला त्यासोबत इतर कुठले अर्कही नकोयत आणि दर्पही नकोयत.

कारण आजचा पाऊस, हा अष्टमीचा पाऊस. अष्टमीचा पाऊस म्हणजे कृष्णाचा पाऊस! त्याच्या जन्मकाळी  पडला तोच हा पाऊस. वसुदेवाचा पाऊस, देवकीचा पाऊस, यशोदेचा  पाऊस – आणि माझा पाऊस !!

हा पाऊस माझ्यासाठी घडवून आणील दुर्मिळ दर्शन श्रीमुखाचे, अलभ्य श्रवण वेणूनादाचे, अलौकिक स्पर्श चरणकमळांचे आणि उन्मनी गंधवेड ‘ अवचिता परिमळूचे ‘ !!

जसे इच्छिले तसेच घडले

मनिचे हेतू पूर्ण जाहले

 

थेंबाथेंबातून जाहले

दर्शन श्रीहरिचे

धारांच्या नादातुन आले

गुंजन मुरलीचे

 

मोरपीस लेवून मस्तकी

प्रभुजी अवतरले

अष्टमीच्या धारांतून दैवी

इंद्रधनू प्रकटले

लेखक : सुहास सोहोनी. 

दि. ७-९-२०२३ – कृष्ण जन्माष्टमी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गणपत्ती बाप्पा मोरया …… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

??

गणपत्ती बाप्पा मोरया… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

एका मित्राच्या बर्थडे पार्टी होती. एका छानशा बँक्वे हॉलमध्ये ही पार्टी ठेवली होती. मित्राचे बरेच ओळखीचे आणि परिचयाचे लोक तिथे आले होते. “हाय! हॅलो!!” वगैरे सगळं झालं. मलाही माझे कॉलेज मधले कॉमन मित्र भेटले. पार्टी रंगात येऊ लागली होती. मग जेवणाच्या आधी ‘ड्रिंक्स & डान्स’ चं आयोजन होतंच.

सगळ्यांचे हात ग्लासांनी भरले. डी.जे.चं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. नाचायला पूर्ण तयार झालेली लोक, आता कुठलं गाणं हा डी.जे. लावेल आणि त्यावर कुठल्या स्टेप्सवर नाचायचं ह्यावर काही उत्साही मंडळी चर्चा करत होती… आणि गाणं सुरु झालं!

“गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया… मंगलमूर्ती…” सगळे आलेले लोक अवाक होऊन एकमेकांकडे बघू लागले. बर्थडे पार्टी, हातात दारूचे ग्लास आणि कसलं हे गाणं ? गजानना गणराया ?” लोकांची कुजबुज जाणवण्याएवढी वाढली. शेवटी त्या उत्साहावर पाणी पडलेल्या एकाने विचारलं, “ऐ, हे काय, पार्टीत काय हे गाणं लावता ? कोई पार्टीवाला गाना लगाओ यार!” तसा माझा मित्र, ज्याचा वाढदिवस होता, हातात माईक घेऊन स्टेजवर चढला.

“मित्रांनो, माझी बर्थडे पार्टी आहे. आता पार्टी म्हंटली कि त्यात कुठचंतरी पार्टी सॉन्ग वाजेल अशीच तुमची अपेक्षा होती ना ? अर्थात असणारच! पण जसं एखाद्या पार्टीत हे ‘गजानना गणराया’ गाणं शोभत नाही ना, तसंच एखाद्या गणपतीच्या मांडवात देखील एखादं पार्टी साँग शोभत नाही. पण त्यावेळेस आपण आपला विरोध दर्शवतो का? नाही! ‘आपल्याला काय करायचंय?’ म्हणून सोडून देतो. पण हे चुकीचं आहे. गणेशोत्सव हा ‘उत्सव’ आहे आणि गणपती हा आपण देव मानतो. त्याला ‘Showpiece’ करून ठेवू नका. आत्ता ह्या पार्टीत जसा विरोध दाखवलात ना, तसाचं विरोध एखाद्या गणपतीच्या मांडवातसुद्धा दाखवा. D.J. फक्त पार्टीची शोभा वाढवतो, उत्सवाची नाही! हे लक्षात ठेवा. हातात दारूचे ग्लास, पार्टीत बरे वाटतात, गणपतीच्या मिरवणुकीत नाही. विरोध दर्शवा. आपण गप्प बसतो म्हणून हे खूळ बोकाळलंय. सगळीकडे दारू आणि डी.जे चालणार नाही हे कळूदे ना गणेशोत्सव मंडळांना. जिथे असला थिल्लरपणा चालत असेल अशा उत्सव मंडळांना वर्गणी, देणगी, जाहिरात देऊ नका. मग बघा परिवर्तन होतं कि नाही ते. आणि, सो सॉरी. मला ही गोष्ट खटकते. गणपती यायला आता फक्त 10-12 दिवस उरलेत आणि आज तुमच्यापर्यंत माझा विचार पोचावा अशी माझी इच्छा होती, म्हणून हे सगळं मीच घडवून आणलं. Now enjoy your Party, Friends!” म्हणत हा खाली उतरला.,टाळ्यांचा कडकडाट झाला!

मी मात्र नाचण्याऐवजी ड्रिंकचा आस्वाद घेणं prefer केलं. हा माझा मित्र माझ्या शेजारी येऊन उभा राहिला आणि खांद्यावर हात ठेवत म्हणाला, “लोकांना ना ज्या भाषेत समजतं, त्याच भाषेत समजवावं लागतं. कशी वाटली आयडिया ?” तसं मी हसत म्हटलं, “साल्या, डोक्याचा उपयोग अगदीच उशीवर ठेवण्याकरता करत नाहीस. ग्रेट! चियर्स!!”

कृपया हा मेसेज तुमच्या प्रत्येक ग्रुप वर शेयर करा जेणेकरून किमान ह्या गणपति उत्सवात देवाचे पावित्र्य जपले जाईल  शेवटी मला जे योग्य वाटले ते मी सांगितले शेवटी प्रत्येकाला निर्णय स्वातंत्र्य आहे गणपत्ती बाप्पा मोरया …… 

लेखक : अज्ञात

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares