मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आसवांचा चांद्रप्रवास ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ आसवांचा चांद्रप्रवास ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

… अर्थात तीन वर्षे अकरा महिने आणि सोळा दिवसांची प्रतिक्षा ! 

७ सप्टेंबर,२०१९. या आधी त्या दोन डोळ्यांत कित्येक वर्षे फक्त चंद्रच चमकताना दिसायचा…अमावस्या असली तरी ! आज मात्र दोन्ही डोळ्यांत अमावस्या भरून राहिलेली आहे. हजारो किलोमीटर्स दूर आणि वर असणा-या चंद्राच्या अंतरंगातील ओलावा शोधून काढण्याच्या प्रयत्नात या माणसानं रक्ताचं पाणी केलेलं असताना त्या चंद्राने याच्याच डोळ्यांत दीर्घकाळ टिकून राहील असा ओलावा भरून टाकला ! 

सामान्य पुरुषाचं रडणं खरं तर भित्रेपणाचा,असहाय्यतेचं लक्षण मानलं जातं…पण शूर पुरुष जेव्हा रडतात तेव्हा त्यांचे अश्रू फुलांना जन्माला घालण्याचा प्रण करीत वाहात असतात. जगाला शंभर टक्के यशाचीच गोडी समजते. यापेक्षा कमी जग खपवून घेत नाही. शंभर आणि नव्व्याण्णव यामधील एकचा फरक नव्याण्णवची किंमत अगदी कमी करून टाकतो. 

कैलासविदवू सिवन...एका सामान्य शेतक-याच्या पोटी जन्म. माध्यमिक शिक्षण मातृभाषा तमीलमध्ये घेतलेलं….खाजगी शिकवणी न लावताही अभ्यासात उत्तम गती. दैवाने प्रदान केलेल्या बुद्धीला कष्टाचं खतपाणी घालून देशाच्या सर्वोच्च अंतराळ संशोधन केंद्राचा प्रमुखपदी विराजमान होण्याची किमया. आणि हाती घेतलेलं चांद्रयानाचं व्रत. कोट्यवधी देशवासियांच्या अपेक्षांचं भलंथोरलं ओझं वागवत वागवत प्रचंड कष्टानं चांद्रयान-२ विक्रम लॅन्डर आणि प्रग्यान रोव्हर चंद्रावर, आणि तेही त्याच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याच्या कामात स्वत:ला झोकून दिलेला निगर्वी, मितभाषी माणूस. त्यादिवशी चंद्रालाही हळहळ वाटली असेल…अगदी जवळ येऊनही चांद्रयानाला चंद्राशी नीट गळाभेट घेता नाही आली ! खरं तर फक्त ही गळाभेटच शिल्लक राहिली होती…बाकी जवळजवळ सर्व कामगिरी उत्तम बजावली होती चांद्रयान-२ ने. मात्र ऐनवेळी अपयशाने पायांत खोडा घातला आणि जगाच्या लक्षात त्याचं केवळ कोसळणं लक्षात राहिलं. आमराईमधल्या सर्वांत डेरेदार आम्रवृक्षावर वीज कोसळावी आणि फळं जळून जावीत अशी स्थिती झालेली… 

… तोंडातून शब्द फुटू शकत नव्हते तेव्हा आसवांनी शब्दांची जागा घेतली. टाळ्या वाजवण्याच्या बेतात असलेले अनेक हात खाली झाले, नजरा दूर झाल्या. उभ्या देशाचा विश्वास गमावल्याची भावना मनात जोरात शिरली…आणि आसवांचा बांध फुटला ! देशाच्या नेतृत्वाने सांत्वन केलं, धीराचे चार बोलही सांगितले. सबंध देश निराश झाला होताच…आणि ते साहजिकच होते. पण त्याचक्षणी पुढचं पाऊल टाकण्याचा निर्धार झाला. अगदी सेवानिवृत्त होईपर्यंत त्याच ध्यासाने काम केले…चुकांचा मागोवा घेतला आणि त्या सुधारण्याच्या योजना नव्याने आखल्या. दिवस निघून गेले, वर्षे निघून गेली….आणि १४ जुलै २०२३ चा दिवस उगवला आणि २२ जुलै २०१९चा दिवस आठवला ! 

आजच्या २३ ऑगस्टला सुद्धा ७ सप्टेंबर मनात घर करून होता. चांद्रयान-२ शेवटच्या काही मोजक्या मिनिटांत यशापासून दूर जाऊन कोसळलं होतं ! आज असं व्हायला नको…पण गतवेळी झालेल्या चुका, अपघात यांपासून नव्या दमाच्या शिलेदारांनी धडा घेतला आहेच…सर्व काही व्यवस्थित होईल अशी खात्री होती मनात….तसंच झालं….केवळ चांद्रयानच नव्हे तर के.सिवन नावाच्या या मोठ्या माणसाचं हळवं मनही चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरलं… डोळ्यांत पौर्णिमेचा चंद्र उतरला होता ! आताच्या आसवांना तीन वर्षे अकरा महिने आणि सोळा दिवसांपूर्वीच्या आसवांची याद आली…..मात्र त्या आणि या आसवांमध्ये पृथ्वी आणि चंद्र नव्हे तर जमीन-अस्मानाचा फरक होता….आताची आसवं आनंदाची होती…..! 

कैलासविदवू सिवन साहेब…हा देश आपला सदैव ऋणी राहील ! आपले हार्दिक अभिनंदन ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ मानुष हौं तो वही रसखानि – भाग १ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

महत्वाचे निवेदन

काव्यानंद  या सदरात मराठी भाषेतील  कवितेचे रसग्रहण  अपेक्षित  आहे.आज आम्ही अपवादात्मक  बाब म्हणून  हिंदी भाषेतील काव्य रचनेचे रसग्रहण  प्रकाशित  करीत आहोत.आपला अंक तिनही भाषेत प्रकाशित होत असल्यामुळे त्या त्या भाषेतील साहित्य  प्रकाशित होईल.यापुढील काळात मराठी अंकासाठी अन्य भाषेतील साहित्य  पाठवले जाणार नाही याची कृपया दक्षता घ्यावी, ही विनंती.

संपादक  मंडळ (ई-अभिव्यक्ती -मराठी)

? काव्यानंद ?

☆ मानुष हौं तो वही रसखानि – भाग १ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

कृष्णभक्त रसखान यांच्या ‘सवैये’चा काव्यानुभव

प्रसिद्ध कृष्णभक्त रसखान हे ब्रज भाषेचे कवी! वल्लभाचार्यांपासून सुरु झालेला संप्रदाय म्हणजे वल्लभ संप्रदाय. जेव्हापासून गोकुळ हे वल्लभ संप्रदायाचे केंद्र बनले, तेव्हापासून ब्रजभाषेत कृष्णावरील साहित्य लिहिण्यास सुरुवात झाली. या प्रभावामुळे ब्रजची बोली भाषा (मथुरा, गोकुळ व वृंदावन येथील) एक प्रतिष्ठित साहित्यिक भाषा बनली. सूरदास आणि रसखान यांच्या कृष्णभक्तीने रसरसलेले मधुर ब्रज भाषेतील काव्यप्रकार अतिशय सुंदर भावानुभव देतात. ‘कृष्णलीला’ हा त्यांच्या काव्याचा प्रमुख विषय. त्याची खोली अनुभवायची तर रसखान यांचे काव्यवाचन हाच एकमेव उपाय. त्यातीलच भक्तिप्रेम रसाने परिपूर्ण अशा त्यांच्या कांही प्रसिद्ध ‘सवैये’ या काव्यप्रकाराचा या लेखात समावेश करीत त्यांचे रसग्रहण करण्याचा मी प्रयत्न केला आहे.         

सय्यद इब्राहिम खान उर्फ रसखान यांचा जन्म काबुल येथे (१५७८) झाला तर मृत्यू वृंदावन येथे झाला (१६२८). ते प्रसिद्ध भारतीय सुफी कवी आणि कृष्णाचे परम भक्त होते! आपण बादशाही वंशातील आहोत, असा कवीने स्वतःचा उल्लेख केला आहे. त्यावरून त्यांचे बालपण चांगल्या स्थितीत गेले असावे, असे समजल्या जाते. भागवताचा फारसी अनुवाद वाचून त्यांच्या हृदयात श्रीकृष्णाबद्दल भक्ती उत्पन्न झाली. या संदर्भात अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. शेवटी तात्पर्य इतकेच, की त्यांना अनेक प्रसंगामुळे कृष्णभक्तीची ओढ लागली. वल्लभाचार्यांचे पुत्र विठ्ठलनाथ यांनी कृष्णभक्तीची दीक्षा दिल्यानंतर मुसलमान असूनही त्यांनी वैष्णव भक्ताप्रमाणे जीवन व्यतीत केले. 

त्यांनी प्रेमवाटिका हे काव्य १६ व्या शतकात रचले आणि ते वृंदावन येथे खूपच प्रसिद्ध झाले. बावन दोह्यांच्या या काव्यात प्रेमाची महती वर्णिली आहे. ‘सुजान रसखान’ या केवळ १२९ स्फुट पदांच्या संग्रहाचा नायक आहे ‘सुजान रसखान’ चा प्रिय, आपल्या मुरलीने गोपींना मोहित करणारा श्रीकृष्ण! यातील ‘कवित्तसवैय्ये’ अतिशय लोकप्रिय आहेत. ‘ऐकवा एखादी कविता’ या अर्थी ‘सुनाओ कोई रसखान’ असा वाक्यप्रयोगच या संदर्भात केला जात असे.  ब्रजभाषेत कविता रचणाऱ्या या कवीचा भागवत आणि अन्य संस्कृत ग्रंथांशी चांगलाच परिचय होता असे दिसून आले आहे. आपल्या काव्यात रसखान यांनी या पौराणिक संदर्भांचे उल्लेख केलेले आहेत. त्याच्या कवितेत अरबी, फारसी आणि अपभ्रंश भाषांतील शब्दांचाही विपुल वापर आढळून येतो. त्यांची भाषा साधी व सरळ असूनही सरस आणि समृद्ध आहे. त्यांनी दोहा, कवित्त, घनाक्षरी व सवैय्या छंदांचा (वृत्त) वापर अधिक प्रमाणात केला. आपल्या रचनांतून कृष्णाचे बालपण, त्याच्या विविध लीलांचे रसपूर्ण मनोज्ञ घडवणारा कवी हाच रसखान यांचा सर्वात महान परिचय! काही जाणकारांच्या मतानुसार रसखान यांचे काव्य इतके ‘रसमय’ आहे की ते त्यांना सूरदास या प्रसिद्ध कृष्णभक्त कवीच्याच श्रेणीत नेऊन ठेवतात.

क्रमशः…

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

दिनांक १५ ऑगस्ट २०२3

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नकळत सारे घडते..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

नकळत सारे घडते..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

प्रचंड वेग,तीक्ष्ण धार आणि तीव्र प्रतिक्रिया या सगळ्यांना अतिशय मनापासून स्वतःत सामावून घेऊनही वरवर शांत,सौम्य वाटणारा पण त्या वेग,धार किंवा तीव्रतेमुळे अंतरंगी अफाट सामर्थ्य धारण करणारा असा हा अनोखा शब्द..आवेग!

या शब्दाचे विविध अर्थ पाहिले तर तो प्रत्येक अर्थ स्वबळावर ‘आवेग’ या शब्दाचा पैस सर्वांगाने व्यक्त करण्यास असमर्थ ठरतोय हे लक्षात येईल.

जोर, जोम,आवेश,झपाटा हे अर्थ आवेगाची सूचक रेखाकृती फारतर रेखाटू शकतील पण त्यात इतर विविध अर्थरंगभरण त्यांना शक्य होत नाही.तिरीमिरी, त्वेष, क्षोभ, प्रक्षोभ, मन:क्षोभ हे अर्थशब्द ‘आवेग’ या शब्दाच्या मुख्यत: करड्या रंगछटाच ठळकपणे व्यक्त करु शकतील. सळ,उबळ,उद्रेक,झटका, हे अर्थ फक्त आवेगामागची असह्यता  सांगू शकतील तर त्वरा, घाई, लहर, लाट, हे अर्थ त्याक्षणीच्या मनोवस्थेतली अधीरता सूचित करतील आणि लोंढा,तीव्रता,धार,तडाखा यासारखे अर्थ वरवर शांतपणे तेवणाऱ्या ज्योतीसारख्या भासणाऱ्या ‘आवेग’ या शब्दातला चटका प्रत्ययास आणून देतील.

या सगळ्याच वरवर भिन्न वाटणाऱ्या अर्थशब्दांत आवेगाचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवणारी एकेक परस्परवेगळी रंगछटा लपलेली आहे!

असं जरी असलं तरी या सर्व अर्थशब्दांत एक समान धागाही आहेच.हे सगळे शब्द त्या त्या क्षणीची भावविवशता आणि भावनोत्कटताच व्यक्त करत असतात आणि त्याद्वारे या दोन्हीत लपलेल्या अधीर, उत्सुक, असह्य अशा विविध मनोवस्थाच सूचित करीत असतात.ते सूचन विविध रंगांमधून असलं तरी त्याक्षणीची मनाची अधीर हतबलताच व्यक्त करीत असते!

एका अल्पाक्षरी शब्दाचा हा अर्थपसारा खरोखरच अचंबित करणारा आहे. जोर, जोम, आवेश,द्वेष यातला प्रतिकारासाठीचा ठामपणा, तिरीमिरी,उद्रेक,झटका यातली असहायतेतून निर्माण झालेली अतिरेकी प्रतिक्रिया,क्षोभ,प्रक्षोभ यामधला तीव्र संताप, उमाळा,लाट यामधला मायेचा झरा, लोंढा,तडाखा,झपाटा यातून वेगाने होऊ घातलेला आघात,आणि उग्रता,धार यातली भयभित करणारी संतापाची तीव्रता हा सारा ऐवज सामावून घेणाऱ्या आवेगाचं या सर्व अर्थशब्दांतही लपलेलं एक वैशिष्ट्य म्हणजे भावना वेगात उमटणाऱ्या भल्याबुऱ्या, तीव्र, लोभस, उत्कट वा अतिरेकी अशा सर्वच प्रतिक्रियांमागची नेमकी मनोवस्था! त्या अवस्थेतल्या अधीर, उत्सुक, अस्वस्थ मनाला सारासार विचार ओझरता स्पर्शही करु शकत नाही. त्या अवस्थेत भावनांची उत्कटता एवढी पराकोटीची असते की सारासार विचारासाठी आवश्यक असणारं स्वस्थपणच त्याक्षणी  मन हरवून बसलेलं असतं.मनाच्या त्या गारुडअवस्थेत आनंद असो  दु:ख असो वा प्रेम, माया किंवा क्षोभही ते इतकं उत्कट किंवा तीव्र असतं की त्या झपाटलेल्या आवेगात उमटणारी प्रतिक्रिया त्या अंगभूत उत्फुर्ततेनेच व्यक्त होते.ती जाणिवपूर्वक व्यक्त केली जात नाही तर ती नकळत व्यक्त होते! संतापाच्या भरात उचलला गेलेला हात असो, अत्यानंदाने होणारी थरथर न् डोळ्यात दाटणारे अश्रू असोत, किंवा प्रेमाने दिलेलं उत्स्फुर्त आलिंगन असो ते सगळं नकळतच घडत असतं आणि त्या त्यावेळी भावनातिरेकातून नकळत उमटणाऱ्या या सगळ्याच अस्सल नैसर्गिक प्रतिक्रिया ही त्या भावनांमधील आवेगाचीच परिणती असते!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवदूत : अर्शद सईद भाग-१ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

देवदूत : अर्शद सईद भाग-१ ☆ श्री सुनील काळे 

   अर्शद सईद

मी निसर्गचित्रकार म्हणून जगायचे ठरवले होते . निसर्गात सतत फिरायचे निसर्गाच्या सान्निध्यात राहून जी निसर्गदृश्ये मनाला भुरळ घालतात ती जलरंगात उतरवत राहायचे हा माझा आवडता छंद आहे .

मी पाचगणीत राहायचो . हे तर महाराष्ट्राचे स्वित्झर्लंड. निसर्गाने येथे दोन्ही हाताने भरभरून निसर्गवरदान देलेले गाव .अशिया खंडातील सर्वात मोठे टेबललॅन्डचे पठार , त्या पठारावरून दिसणारी चिखली , पांगारी ,भिलार , तायघाट , भोसे , राजपूरी गावांची व्हॅलींची दृश्ये , स्ट्रॉबेरीची शेती , उंचच उंच सिल्व्हर वृक्षांच्या सान्निध्यातील ब्रिटीशकालीन शाळा व बंगले . हिलस्टेशनची टिपिकल उतरत्या छपरांची घरे , धोम धरणाचे चमकणारे पाणी , कमळगड , नवरानवरीचा डोंगर , महाबळेश्वरच्या सह्याद्री व प्रतापगडाच्या पर्वतांच्या विशाल रांगा , जावळीचे खोरे , वाईचे गणपती मंदीर ,पेशवेकालीन दगडी घाटांचा परिसर व मेणवलीचा घाट चित्रित करताना मी देहभान हरपून जायचो . त्या दृश्यानां कागदावर जलरंगात रेखाटण्याचा माझा छंद इतका विकोपाला गेला होता की माझ्या घरच्यांनी मला पुर्णपणे दुर्लक्षित केले होते.

मी अभिनवला शिकलो व तेथे माझी स्वातीशी मैत्री झाली . नंतर लग्नही झाले पण आम्ही मुंबई पुण्यासारख्या शहरात रमलो नाही . चित्रं काढली तरी ती विकायची कशी याची आम्हाला जाणीव नव्हती . आम्ही तीनचार ठिकाणी स्वतःची आर्ट गॅलरी तयार करून प्रदर्शन आयोजित केले . पण त्यात आम्हाला यश आले नाही. त्यात एकुलत्या एक मुलीचा मृत्यू झाला व नाईलाजाने मला व स्वातीलाही आर्टटिचरची नोकरी करावी लागली . चित्रकारीता पूर्ण बंद करून टाय सूटबूट घालून मी एका ब्रिटीश स्कुलमध्ये स्थिरावलो . या स्कूलमध्ये नाश्ता ,जेवण , राहण्यासाठी बंगला , लाईटबील फ्री व इतर सर्व काही सुविधा होत्या पण पगार खूप कमी होता . सकाळी सात ते रात्री सात पर्यंत बारा तासांची व्यस्त नियोजनबद्ध बांधीलकी होती . फक्त रविवारची एक सुट्टी . चारपाच हजारात सर्व गरजा भागविण्यासाठी संघर्ष करायला  लागायचा. शेवटी कंटाळून आम्ही एकापाठोपाठ या पर्मनंट सुखाच्या नोकऱ्या कायमच्या सोडल्या व चित्रकार म्हणूनच जगायचे या वेड्या ध्येयाने प्रेरीत होऊन नवा प्रवास सुरू केला .

पाचगणी गावाजवळ असलेल्या रुईघर व्हॅलीत गणेशपेठच्या गावाबाहेर आम्ही एक जागा घेतली . या जागेला जायला सत्तर ऐंशी पायऱ्या चढून जायला लागायचे. घर बांधताना गाढवावर वाहून वीट वाळूची वाहतूक करावी लागली . समोर महू धरणाचे विहंगम दृश्य दिसणार होते . भिलार व कासवंड गावाची व्हॅली समोर दिसायची . आम्ही घरबांधणी सुरु केली आणि लवकरच सर्व प्रकारच्या सामानाची वाहतूक करताना येणाऱ्या अडचणींमूळे घराचे बजेट दुप्पट झाले . लवकरच पैसे संपले . चित्रकलेची साधना करत आता जगायचा नवा प्रयत्न आम्ही सुरु केला होता पण स्थिर पगार नव्हता .महिना संपल्यानंतर घरसामान किराणा वस्तू तर विकत आणायला लागणारच होत्या. त्यात सामान वाहतूक व साफसफाईसाठी सुधाकर कांबळे नावाचा गडी कामाला ठेवला होता . त्याला महिन्याला पगार द्यायचे ठरले होते . जीवन जगणे एक कठिण समस्या होती . पैशांशिवाय जगणे म्हणजे मोठी परीक्षाच समोर आली होती .

कलावंत मंडळी थोडी वेडी असतात , त्यानां व्यवहारज्ञान नसते , जगरहाटीचे सर्वसामान्य जगणे त्यानां माहीत नसते असे सगळेजण म्हणतात ते खरे असावे . व्हॅन गॉग नाही का व सतत चित्र काढत फिरायचा तशीच काहीशी माझी मनाची अवस्था झाली होती . आणि येथे तर दोन व्हॅनगाँग होते .असे रोज कलेसाठी वेडे होऊन जगणे म्हणजे रोज विस्तवावरून चालणे असते . जाणूनबूजून नेहमीची तयार वाट सोडून काट्याकुट्यातून प्रवास करत एका अनोळख्या , नव्या अवघड मार्गाचा तो प्रवास असतो . आम्ही अशा काट्यातून प्रवास करत असताना वास्तवात जीवन जगणे किती कठीण असते याची प्रॅक्टीकल झळ आम्हाला वारंवार बसत होती . पण नोकरी करायची नाही या मतांवर मात्र आम्ही दोघेही ठाम होतो .

आम्ही कलावंत आहोत , आम्ही  चित्रांसाठी जगतो ना? मग चित्रांनी आम्हाला का जगवू नये ? असा ठाम विचार मनात घेऊन आम्हीच निर्माण केलेल्या प्रश्नाला आम्हीच उत्तर देत होतो . ” चित्रांनीच आम्हाला जगवले ” पाहीजे हे नवे जीवनसूत्र डोळ्यासमोर ठेऊन जगत होतो . रोज चित्र काढणे, चित्र रंगवणे, चित्रमय राहणे म्हणजे जगणे. आपले जीवन जगणे म्हणजे चित्रनिर्मितीशी १००% प्रामाणिक राहणे या सुत्रांवर आमचे प्रयत्न सुरू असायचे . आलेला दिवस आम्ही आनंदाने चित्रमय जगत मस्त एन्जॉय करत होतो.

विहीरीत पाण्याचा साठा असला तरी विहिरीच्या तळाशी सतत जिवंत निर्झर वाहणारे झरे असावे लागतात तरच विहीर सतत पाण्याने भरत असते . तसे रोजचे जगण्यासाठी पुरेसा पैशांचा साठा असला तरी सतत नवीन पैशांचा पुरवठा करणारी यंत्रणा लागतेच . अन्यथा जवळ असलेला साठा एक ना एक दिवस कधीतरी संपतोच आणि ती वेळ आमच्यावर लवकरच आली . त्याचे मुख्य कारण म्हणजे पावसाळा .

महाबळेश्वर हे महाराष्टातील सर्वात जास्त पाऊस पडणारे गिरिस्थान आहे . त्याच्या शेजारी असलेलया पाचगणीतही कधीकधी प्रचंड पाऊस पडतो . त्यात आम्ही डोगरांच्या व्हॅली फेसिंगला राहत होतो . पावसाळ्यात कडाक्याची थंडी , धुके व पावसाचा तडाखा कायम लक्षात राहील असा असतो , कारण आमच्या घरावर पत्रा बसवला होता . या पत्र्यावर पावसाचा जोर वाढला की दणादण पावसाच्या गारांचा , पाण्याचा वर्षाव व्हायचा . पडणाऱ्या गारा दगडासारख्या टणाटण पत्र्यावर आपटायच्या . निसर्गाचे हे रौद्र रूप आम्हाला त्यावेळी विलोभनीय वाटायचे . पावसाळ्यात पर्यटकांची संख्या खूपच कमी व्हायची . शाळा  जून महिन्यांमध्ये नियमित  सुरु झाल्यामुळे पालकवर्गही यायचा नाही . त्यामुळे चित्र विकत जाण्याची अजिबात शक्यता नसायची . अशा वेळी शांतपणे बसून चित्रनिर्मिती करणे एवढेच हातात असायचे . पण महिन्याच्या गरजा भागविण्यासाठी पैसे कसे कमवायचे ? याची चिंता नेहमीच असायची . असाच चिंतामग्न अवस्थेत असताना तो दिवस उजाडला. जो भावलेला व कायम मनात घर करून राहिला आहे .

त्यादिवशी भयानक गारांचा पाऊस कोसळत होता. गारांमुळे पत्र्यावर दगडांचा वर्षाव झाल्यासारखे वाटत होते . सगळीकडे धुक्याचे इतके दाट पदर पसरले होते की पाचसहा फुटांवरचेही ढगाळ वातावरणामूळे  काहीही दिसत नव्हते . दिवसभर पाऊस ,पाऊस आणि नुसता  पाऊस . पावसामुळे हवेत गारठा वाढलेला होता . त्यात लाईट गेल्यानंतर तर नुसते बसून राहणे एवढेच हातात होते . मुख्य रस्त्यालगत मोठे लोखंडी गेट बसवले होते त्यानंतर सत्तर पायऱ्या चढून रात्रीच्या वेळी कोणी येण्याची शक्यता नव्हतीच . बंगल्यासमोर दुसरे गेट कुलूपबंद करून आम्ही दोघे निवांत बसून राहिलो होतो . बाहेर प्रचंड प्रमाणात पाऊस पडत होता व मनात पैशांची, रोजच्या जगण्याची  चिंता खूपच भेडसावत होती त्यामुळे थोडासा अंधारही भयानक काळोखासारखाच भासत होता .

रात्रीचे सातआठ वाजले असावेत . रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती . स्वाती जेवणाची तयारी करण्यासाठी किचनमध्ये गेली होती . हॉलमध्ये मी निराश मनाने बसून राहिलो होतो आणि अचानक खालच्या पायऱ्याशेजारचे गेट कोणीतरी उघडल्याचा आवाज आला . मी खाली डोकावले तर डोक्यावर हुडी असलेले जॅकेट घालून कोणीतरी अज्ञात तरुण व्यक्ती हळूहळू पायऱ्या चढून येत होती . पायऱ्या चढून आल्यावर  मोठे बंगल्याचे गेट कुलूपबंद असल्याने मी घाबरलो नाही . त्या अनोळखी हुडीवाल्या तरुणाने दरवाजात उभा राहून मला हाक मारली . 

मिस्टर काळे , प्लीज ओपन दी गेट ! 

आय वाँट टू बाय युवर पेटींग्ज . 

मी तर चकीत झालो . एवढया मोठया दाट धुक्याच्या पावसात  चिंब भिजलेली कपडे घालून सत्तर पायऱ्यांचा  हा डोंगर चढून कोण अनोळखी  इसम माझ्या दारात चित्र विकत घेण्यासाठी आला असावा ? कदाचित क्षणभर मीच स्वप्नात आहे की काय ? किंवा मनात जास्त प्रमाणात विचार करून मलाच काही  भास होतोय आहे की काय? असेही मला वाटू लागले .

माय नेम इज अर्शद सईद . 

आय एम स्टेईंग अब्रॉड. 

बट आय स्टडीड इन न्यू इरा स्कूल . 

आता हा पाचगणीतील एका शाळेचा माजी विद्यार्थी , ज्याची माझी कधीही भेट झाली नव्हती , अशा अज्ञात व्यक्तीने माझ्याकडे येऊन चित्र विकत घेण्याची इच्छा प्रकट करावी आणि तीदेखील अशा प्रचंड पावसात पूर्णपणे भिजत . मला तर सगळे प्रकरणच रोमांचकारी वाटू लागले . आणि त्या डोक्यावर छत्री नसलेल्या पण डोक्यावर हुडी घालून नखशिखान्त भिजणाऱ्या तरुणाला मी घरात घेतले .

– क्रमशः भाग पहिला. 

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ प्रत्येकाचा कृष्ण… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ प्रत्येकाचा कृष्ण ☆ श्री सुनील देशपांडे

कृष्णचरित्राचा अभ्यास केल्यास, अभ्यास म्हणण्यापेक्षा चिंतन केल्यास, काही गोष्टी विशेषत्वाने जाणवतात. त्यातली पहिली गोष्ट कृष्णजन्माची…

कृष्णजन्म तुरुंगात झाला. माणसाला जन्मापासून अडचणींचा सामना करावा लागू शकतो.  मग तो कितीही संपन्न  किंवा राजघराण्यातील का असेना. जन्माआधीपासूनच मृत्यू  मागे लागलेला.  वातावरण भयभीत. अशा परिस्थितीमध्ये प्रासादातले सुख सोडून एका गुराख्याच्या घरी बालपण.  या ठिकाणी संपूर्ण उच्चनीचतेच्या आणि जातीयवादाच्या कल्पना मुळातच उखडून काढूनच श्रीकृष्णाचे बालपण पार पडत असतं. 

श्रीकृष्ण हा त्या त्या वयातील आणि विशेषतः बालवयातील घटनांमधून जास्त वैशिष्ट्यपूर्ण रीतीने प्रकट झालेला जाणवतो. बालवयात संस्कार किती गरजेचे असतात आणि सुसंस्कारामुळे माणूस कसा घडत जातो याचा परिपाठच श्रीकृष्णाच्या बाललीलांमध्ये आणि त्याच्या कुमारवयापर्यंतच्या चरित्रामध्ये आढळतो. श्रीकृष्ण चरित्र हे इतकं अद्भुत रसायन आहे की कळत्या न कळत्या वयातील बालकांपासून ते तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांपर्यंत सगळ्यांना आपलेसे वाटणारे, मनाला भावणारे आणि सर्वस्पर्शी असे हे चरित्र आढळून येते. म्हणूनच तर श्रीकृष्णाचा उल्लेख पूर्ण पुरुषोत्तम म्हणून केला जात असावा.  श्रीकृष्ण चरित्र ज्या पद्धतीने मांडलं गेलं आहे, त्यामध्ये महर्षी व्यासांची प्रतिभा त्या व्यक्तिमत्त्वाच्या घडवणुकीत  प्रतिभेच्या सर्वोच्च पातळीवर संचार करत असलेली आढळून येते. बाललीला, खोडकरपणा, खेळकरपणा  या सर्व बालपणीच्या नैसर्गिक भावनांना कुठेही तडा जाऊ दिलेला नाही. त्यामुळेच हे व्यक्तिमत्व बालपणापासूनच आपले लाडके व्यक्तिमत्व होऊन जाते. 

एकदा एका निम्न प्राथमिक शाळेमध्ये साधारण पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या एक दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.  त्या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण होतं.  आता या मुलांना कृष्णाबद्दल काय सांगणार ? परंतु त्यांच्या दहीहंडीचा खेळ चालू असतानाच मला काही ओळी सुचल्या. त्या ओळींच्यावर त्या मुलांनी खूपच सुंदर नाच केला. त्या ओळी त्या मुलांना खूप आवडल्या त्या ओळी अशा होत्या,

खांद्यावरती  उभे राहूया उड्या मारुया कोणी.

शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी….. 

पुढे पुढारी, 

कृष्ण मुरारी,

मागे सारी,

सेना न्यारी,

नाचू कोणी, गाऊ कोणी, 

उड्या मारूया कोणी. 

शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी….. 

सुदाम आला, 

गोपी आला, 

गोटु आला, 

मोटू आला, 

उंच कुणी वा बुट्या कोणी, 

सारे खाऊ लोणी. 

शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी……  

उंच मनोरे, 

करती पोरे, 

वारे वारे, 

म्हणती सारे,

दमते कोणी, 

घसरे कोणी, 

मटकी फोड़े कोणी. 

शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी…..  

करूया कल्ला,

हल्ला गुल्ला, 

चविष्ट काला, 

मट मट खाल्ला, 

यम्मी यम्मी म्हणते कोणी 

भरे तोबरा कोणी. 

शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी…..  

हे गाणे त्या मुलांना इतके आवडले की त्याच गाण्यावर नाचत नाचत मुले घरी गेली. 

कसलं भाषण ? कसले प्रमुख पाहुणे ? 

लहान मुलांचा कृष्ण हा सगळ्यात आवडता देव (खरं म्हणजे देव हे आई वडील म्हणतात म्हणून त्याला देव म्हणतात) परंतु मुलांना तो देव न वाटता स्वतःचा सवंगडीच वाटतो.  म्हणूनच लहानपणापासून कृष्णचरित्राचे झालेले संस्कार हे लहान वयात व्यक्तिमत्त्व घडवण्याचे संस्कार आहेत. 

कुमार वयातील खोडकर पणा, तारुण्यातील शृंगारिकता. त्याचबरोबर गुरुगृही जाऊन घेतलेले शिक्षण, त्या शिक्षणामध्ये सुद्धा गरीब श्रीमंतीचा भेद न करता जुळलेले मैत्रीबंध. गुरूंच्या घरी सगळ्या प्रकारची कामे करणे, गुरुप्रती आदर बाळगणे या सगळ्या घटनांवरून श्रीकृष्णाला खरे म्हणजे व्यासांनी कुठेही देवत्व बहाल केलेले नाही. श्रीकृष्णाचे देवत्व हे चरित्र ऐकणार्‍यांनी वाचणाऱ्यांनी त्याच्या विविध गुण प्रभावामुळे त्याला बहाल केलेलं आहे. 

लहानपणी त्याच्या चरित्रात त्याच्या बालपणातील चमत्कारांचे प्रसंग हे, कीर्तनकार कथेकरी आणि त्याच्या चरित्राचे गुणगान करणाऱ्या त्याच्या भक्तांनी नंतर श्रीकृष्णाच्या चरित्राला जोडलेले आहेत, असे मला वाटते. श्रीकृष्ण राजघराण्यात जन्मला, गुराख्याच्या घरात वाढला, गुरुगृही शिकला, सर्व प्रकारच्या सामाजिक स्तरातील व्यक्तींशी मैत्री केली. तो योद्धा होता पण अजिंक्य नव्हता. त्याचाही पराभव करणारा होताच. त्यालाही त्याच्या राज्यातून पळवून लावणारा भेटला. प्रजेसकट पळत पळत द्वारकेपर्यंत जाऊन तेथे आपल्या राज्याचे पुनर्वसन करावे लागले. ही खरं म्हणजे नामुष्कीची गोष्ट. परंतु या सर्वाचं जे काही विवेचन व्यासांनी केलेलं आहे ते अप्रतिम आहे. अर्थात या पराभवाचा बदला योग्य त्या व्यक्तीकडून त्याने घेतला हे अर्थातच ओघाने आलेच. अन्यायाच्या विरोधात लढणारा न्यायनिष्ठ पण न्यायनिष्ठूर नव्हे, तर समन्वयाने संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करणारा. शांती प्रेमी पण वेळप्रसंगी शांतीचं तत्त्वज्ञान बाजूला ठेवून अन्यायाच्या विरोधात कोणत्याही थरापर्यंत जाण्याचा सल्ला देणारा.  उत्कृष्ट राजकारणी आणि तत्त्ववेत्ता.

माझ्यासारख्या सामान्यासाठी श्रीकृष्णाच्या चरित्राचा अभ्यास ही दूरचीच गोष्ट आहे.  पण किमान त्याच्या चरित्राचं चिंतन ही सुद्धा एका जन्मामध्ये पूर्णत्वाला जाऊ शकणारी गोष्ट नव्हे.  त्यामुळे कृष्णचरित्राचा अभ्यास नव्हे पण कृष्ण चिंतन हा माझ्या विरंगुळ्याचा विषय आहे. मी कृष्णभक्त नव्हे, देव म्हणून मी त्याची पूजा करणार नाही. पण जगाच्या पाठीवरचं एक अद्भुत व्यक्ती चरित्र म्हणून ते व्यक्तिमत्व मनावर प्रभाव पाडून जातं.   त्या चरित्राचे चिंतन हा प्रसन्नतेचा आणि मानसिक ऊर्जा वर्धनाचा भाग म्हणून मी त्या चिंतनात रमतो. 

वरील सर्व विवेचनात एक गोष्ट माझ्याही खूप उशिरा लक्षात आली. तुमच्याही लक्षात आली की नाही माहित नाही. परंतु एवढ्या प्रचंड मोठ्या व्यक्तिमत्त्वाचा, मी  संपूर्ण लेखामध्ये एकेरी उल्लेख केलेला आहे आणि ते कुठेही खटकत नाही…..  यालाच तर अद्वैत म्हणत नसतील ?

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्वासांची उलट गणती ! — एन. वल्लरमथी ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ श्वासांची उलट गणती ! — एन. वल्लरमथी ☆ श्री संभाजी बबन गायके 

अंक शिकवले जाताना ते एक ते दहा असेच शिकवले जातात. पण शून्य स्वतंत्र नाही शिकवला जात. शून्य असतेच….अध्याहृत ! त्याच्या पुढची पायरी म्हणजे दहाच्या पटीत शंभर पर्यंत. मानवी जीवनाचं सूत्रच जणू ही मोजदाद. आयुष्यमर्यादा शंभर आणि जन्माच्या एकातून आरंभ झालेला प्रवास शून्य नावाच्या अंतिमात विलीन होणं सुद्धा तेव्हढंच नैसर्गिक ! शून्याचा शोध तर जगाला भारताचीच देणगी. कुठलीही स्पर्धा, शर्यत सुरू करताना एक—दोन—तीन म्हटलं जातं. हा छोटासा प्रवास स्पर्धकांना भला भासतो. 

एरव्ही साध्या व्यवहारात एक तर दहा ते शून्य अशी गणती केली जात नाही. पण अवकाश मोहिमांमध्ये दहापासून मागे मागे सरणारा प्रवास शून्यापर्यंत पोहोचेपर्यंत जीव टांगणीला लागतो…हे भारताने चांद्रयान-३ प्रक्षेपणाच्या वेळी अनुभवले ! या आणि अशा अनेक मोहिमांच्या वेळी हे शून्य प्रत्यक्षात जगलेली एक महिला तीन सप्टेंबरला शून्यात विलीन झाली. एन. वल्लरमथी हे त्यांचं नाव. ‘ दिवसेंदिवस विकसित होत जाणारा, मोठा मोठा होत जाणारा चंद्र ‘ हा वल्लरमथी या नावाचा अर्थ….यापेक्षा आणखी कोणता योगायोग असू शकतो चांद्रमोहिमेत काऊंटडाऊन करणा-या व्यक्तीच्या बाबतीत? 

तमिळनाडूमधल्या अरियालूर मध्ये एक जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी जन्मलेल्या वल्लरमथी यांनी माध्यमिक शिक्षण तमील भाषेत घेतले होते ! अंगभूत हुशारीच्या जोरावर त्यांनी इंजिनियरींग आणि नंतर इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड कम्युनिकेशन मध्ये उच्च पदवी संपादन केली. एकोणीसशे चौ-याऐंशी साली वल्लरमथी इस्रो मध्ये आल्या. 

Insat 2A, IRS IC, IRS ID, and TES सारख्या अतिशय महत्त्वाकांक्षी अवकाश योजनांमध्ये त्या सहभागी होत्या. २०१२ मध्ये भारताने रडार इमेजिंग सॅटेलाईट -१ अर्थात ‘ रिसॅट ‘ हा भारताने स्वत:च्या हिंमतीवर निर्माण केलेला उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला. या प्रकल्पाच्या प्रमुख होत्या वल्लरमथी ! या कामाच्या शेवटच्या वर्षात वल्लरमथी दिवसातील फक्त पाच तास स्वत:साठी ठेवत. बाकी संपूर्ण वेळ प्रकल्पासाठी !  या कामगिरीबद्द्ल त्यांना दोन हजार पंधरा मध्ये ‘ भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्कारा ‘ ने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष होते आणि त्यासाठी वल्लरमथींना निवडण्यात येणे हे त्यांच्यासाठी आणि इस्रोमधील महिला शास्त्रज्ञांसाठी अभिमानाचे होते. 

अवकाशात प्रक्षेपक सोडण्यापूर्वीची वीस मिनिटे अतिशय महत्त्वाची आणि नाजूक असतात. इतक्या दिवसांची अथक मेहनत याच वीस मिनिटांमध्ये यशस्वी किंवा दुर्दैवाने अयशस्वी होणार असते. परंतू यातील शेवटची दहा-अकरा सेकंड्स खूपच तणावपूर्ण असतात. हाच तो काल….ज्यामध्ये जे काही शिल्लक राहिलं आहे ते सांगून मोहिम थांबवता येते..अन्यथा एकदा का शून्य झाले की आपल्या हातात काहीही नाही रहात ! हा काऊंटडाऊन उच्चारणारी व्यक्ती अतिशय प्रशिक्षित आणि बुद्धीमान असावी लागते. एरव्ही उलट आकडे उच्चारणे तसे सोपे काम असू शकते. पण एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या मोहिमांमध्ये जराशीही चूक होऊन चालत नाही. आणि त्यात सा-या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या मोहिमेत तर मानसिक तणाव किती मोठा असेल, याची कल्पना करवत नाही. हे आपण सर्वांनी चांद्रमोहिमेत अनुभवले असेलच. असो. माझ्यासारख्या किंवा आपणांपैकी ब-याच जणांना यातील तांत्रिक बारकावे माहित असण्याची शक्यता कमीच आहे. पण काऊंटडाऊन म्हणजे आय.पी.एल. सामन्यातील सामूहिक किंवा एखादा पूल सुरूंग लावून पाडण्याच्यावेळी केलेले काऊंटडाऊन..केवळ आकडे उच्चारणे नव्हे, हे मात्र समजते. 

चांद्रयान-३ मोहिमेवेळी हे काऊंटडाऊन करणा-या एक महिला होत्या, त्या ज्येष्ठ,अनुभवी अंतराळ शास्त्रज्ञ होत्या हे त्यांच्या मृत्यूच्या बातमीने जास्त समजले. आपल्या कर्तव्याप्रती असलेली निष्ठा माणसाला कर्तव्यासाठी तहानभूक विसरायला लावते. वल्लरमथी यांना मोहिम यशस्वी झाल्यानंतर आणि आपले सूर्ययान आदित्य यशस्वीरीत्या प्रक्षेपित झाल्यानंतर आपल्या कष्टांचे चीज झाल्याचे समाधान निश्चितच झालेले असणार. यानंतर दुस-याच दिवशी त्यांनी परलोकीची यात्रा आरंभ करावी, हा योगयोगच म्हणावा लागेल. ‘ एन.वल्लरमथी…आपला प्रवास निर्विघ्न पार पडो…तुम्हाला असलेलं अवकाशाचं वेड आता कदाचित तुम्हाला त्या विशाल,अनंत,अनाकलनीय अवकाशाची खरीखुरी सफर घडवत असेल. तुमच्या जाण्याचं काऊंटडाऊन खुद्द काळानेच म्हटलं असावं, असं वाटल्यावाचून राहवत नाही. 

… मॅडम  तुमच्या आत्म्यास सदगती मिळो, ही समस्त भारतीयांच्या वतीने अवकाशाच्या आणि सकल सृष्टीच्या निर्मात्याकडे प्रार्थना. आपल्या भविष्यातल्या काऊंटडाऊनसाठी तुम्ही हव्या होतात..तुमच्या आवाजात आम्हांला दहा ते शून्य अंक नव्याने शिकल्यासारखं वाटलं !    

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ती वेळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? इंद्रधनुष्य ?

☆ ती वेळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आज गोकुळात नंदा घरी मोठी गडबड उडाली होती ! यशोदा अस्वस्थ होती येणाऱ्या बाळाच्या प्रतीक्षेत ! घरातील मंडळी आणि तिच्या सख्या तिची काळजी घेत होत्या. कधी एकदा ते बाळ जन्माला येतंय याची सारे गोकुळ वाट बघत होते ! बाहेर श्रावणाच्या सरीवर सरी येत होत्या. सारं रान कसं हिरवंगार झालं होतं ! गोपगोपाळ आनंद घेत होते सृष्टीचा ! मुक्त, भारलेले, चैतन्यमय वातावरण गोकुळात होते !

त्याउलट मथुरेत कंसाच्या कारागृहात वसुदेव- देवकी सचिंत बसले होते. देवकीचे दिवस भरत आले होते. कंसाचे मन अस्वस्थ होते. कंसाने आत्तापर्यंत जन्मलेली सातही बालके जन्माला आल्याक्षणीच मारून टाकली होती. प्रत्येक जन्माला येणारे बाळ त्याचा ‘आठवा’, त्याला मारणारा ‘काळ’असेल का? या भीतीने प्रत्येक  बाळ त्याने यमसदनास पाठवले होते. पण खऱ्या ‘आठव्या’ चा जन्म आज होणार होता. तेही बाळ मारलं गेलं तर …म्हणून वसुदेव देवकी दुःखी होते…. 

… पण आज परमेश्वरी लीलेचा अवतार होणार होता ! बंद कारागृहाच्या आत नवचैतन्य घेऊन ते बाळ जन्माला येणार होते. हुरहुर होती ती अशांना की, येणारा जीव  परमेश्वरी अंश असणार आहे हे माहीत नसणाऱ्याना !

रात्रीचे बारा वाजले. बाहेर पावसाची धुवांधार बरसात चालू होती !.देवकीने जन्म दिला होता एका बाळाला ..सुकुमार, सुकोमल अशा… आता कंसाला सुगावा लागण्याच्या आत ते बाळ बाहेर काढायला हवे होते !वसुदेवाने एक टोपली घेतली. त्यात मऊ शय्या तयार केली .देवकीने  ते गोजिरवाणी बाळ हृदयाशी धरले. त्या इवल्याश्या जिवाला तिला सोडवेना ! बाळाला कुशीत घेऊन त्याचे पटापट मुके घेतले. मन घट्ट करून तिने  बाळाला टोपलीत  ठेवले. मऊशार वस्त्राने पांघरले. जणू तिने आपल्या मायेचे आवरण त्याच्यावर घातले, की ज्यामुळे ते कोणत्याही संकटापासून दूर राहणार होते ! तो गोंडस जीव तिला हसत होता. जणू म्हणत होता, ‘ अगं,मी तर जगाचा त्राता !  काळजी करू नकोस, मी सुरक्षित राहीन !’ 

वसुदेव बाळाची टोपली घेऊन यमुनातीरी आला. यमुना दुथडी भरून वाहत होती. ‘ या बाळाला मी कसं नेणार पार?’ असा विचार त्याच्या मनात येत होता. टोपली डोक्यावर घेऊन मोठ्या धीराने त्याने नदीच्या पाण्यात पाय टाकला. समोरचा जलमार्ग कापून जायचे होते त्याला ! पण  जसा टोपलीतील बाळाच्या पायाला पाण्याचा स्पर्श झाला तसे पाण्याचा प्रवाह त्याच्यासाठी मार्गच बनला जणू ! ती वेळ त्याची होती. दोघेही यमुना पार झाले. तिकडे नंदाच्या घरी यशोदेच्या कुशीत नुकतेच जन्माला आलेले कन्यारत्न होतेच. यशोदेच्या कुशीत त्या बाळाला ठेवून तिच्या बाळाला नंदाने वसुदेवाच्या स्वाधीन केले. आपल्या कुशीत नुकतंच जन्माला आलेला बाळ दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचं ! किती वाईट वाटलं असेल यशोदेला ! आणि हेही माहीत होतं की, हे बाळ आपल्याला परत दिसणार नाहीये ! यशोदेची लाडकी मथुरेत आली वसुदेवाबरोबर ! 

देवकी प्रसूत झाल्याचे कळताच कंस कारागृहात आला. बाळाचा जन्म होऊन दुसरं बाळ तिथे आणण्याच्या या प्रक्रियेत किती वेळ गेला असेल देव जाणे ! पण कृष्ण सुरक्षित स्थळी पोचला आणि यशोदेची कन्या देवकीकडे आली ! त्यागाची, कसोटीची वेळ होती प्रत्येकाच्या ! वसुदेव- देवकीने मनावर दगड ठेवून आपलं बाळ दुसरीकडे सोपवले होते, तर नंद- यशोदेने आपली  छोटी लेक दुसऱ्याच्या हाती दिली होती !

तो बालजीवही त्यागासाठी सिद्ध होता जणू ! वसुदेव देवकीला उघड्या डोळ्यांनी त्या बालिकेच्या मृत्यूला पहावे लागणार होते ! जीवनातील एक कसोटी पूर्ण करावी लागणार होती. 

… या सगळ्यांना खेळवत होता तो ‘ परमात्मा ‘ .. ज्याचा जन्म, दुष्टांच्या संहारासाठी झाला होता. त्यासाठी बालरूप घेऊन तो पृथ्वीवर अवतरला होता ! त्याच्या नवीन जन्माची हीच ती ‘ वेळ ‘ होती.

कृष्ण जन्माष्टमी साजरी करताना कृष्णाचे हे आश्वासन आपल्या मनात कायम रहाते,

‘यदा यदाहि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत,

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्..

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शिक्षक दिनानिमीत्त्त – “एस्.राधाकृष्णन्…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ शिक्षक दिनानिमीत्त्त – “एस्.राधाकृष्णन्…” ☆ सौ राधिका भांडारकर 

डॉ. राधाकृष्णन् हे एक महान, विद्वान व्यक्तीमत्व! शालेय जीवनात,५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतानाच या महान व्यक्तीमत्वाची, शैक्षणिक पुरस्कर्ता, शिक्षकांचे समाजातील योगदान मौल्यवान मानणारे म्हणून ओळख झाली. प्रचंड आदराची भावना त्यावेळीही होती आणि आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात ती  आहेच.

डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म ५सप्टेंबर १८८८ रोजी .

तामीळनाडूत तिरुमणी या छोट्याशा ,गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला.त्यांचे वडील,सर्वपल्ली विरस्वामी हे गरीब असले तरी विद्वान होते. आपल्या मुलानेही पंडीत व्हावे ही त्यांची इच्छा होती.

डॉ राधाकृष्णन हे अतिशय हुशार विद्यार्थी होते.आयुष्यभर त्यांनी शिक्षणक्षेत्रातल्या अनेक शिष्यवृत्त्या प्राप्त केल्या.

१९०६ मध्ये त्यांनी तत्वज्ञान (philosophy) या विषयात एम ए केले. आणि त्यांची मद्रास रेसीडेन्सी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. पुढे ,लंडन  आॉक्सफर्ड विद्यापीठात भारतीय तत्वज्ञानाचे शिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती.बनारस विद्यापीठाचे कुलगुरु असताना, त्यांनी तत्वज्ञानावर अनेक पुस्तके  लिहीली.

डाॅ. राधाकृष्णन् विवेकानंद आणि वीर सावरकर यांना आपले आदर्श मानतात. लेख आणि भाषणाद्वारे त्यांनी भारतीय तत्वज्ञान संपूर्ण जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. बहुआयामी व्यक्तीमत्व होते त्यांचे. भारतीय प्रतिभा आणि संस्कृतीवर त्यांचे प्रेम होते.

१९४७ साली देश स्वतंत्र झाला. पंडीत नेहरु पंतप्रधान झाले. त्यावेळी नेहरूंनी त्यांना ,सोव्हीएत युनीअन बरोबर खास राजदूत म्हणून मुत्सद्देपणाची कामगिरी करण्यासाठी आवाहन केले.अशा रितीने ते राजकारणात आले. स्वातत्र्यानंतर दहा  वर्षांनी आपल्या देशाच्या घटनेत उपराष्ट्रपतीचे पद नेमले गेले. आणि भारताचे पहिले ऊपराष्ट्रपती म्हणून त्यांची नेमणूक झाली.

 १९५८ साली भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. १९६२ ते १९६७ दरम्यान त्यांनी भारताचे दुसरे  राष्ट्रपती म्हणून हे पद भूषविले.

या दरम्यान भारतीय राजकारणात बरेच चढऊतार झाले. दोन पंतप्रधानांच्या मृत्युसमवेत भारत चीनच्या भयंकर युद्धातल्या पराभवाचा सामना त्यांना कणखरपणे करावा लागला.

जर्मन ऑर्डर पौल ले मेरीट फाॅर आर्ट्स अँड सायन्स पुरस्कार,शांतता पुरस्कार, ब्रिटीश ऑर्डर ऑफ मेरीट अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. ब्रिटीश सरकारने त्यांना सर ही पदवी बहाल केली.

शिक्षण आणि शांततेसाठी मिळणार्‍या नोबेल पारितोषिकासाठी त्यांना १६वेळा नामांकित केले गेले.

विद्यार्थ्यांमध्ये ते अतिशय लोकप्रिय होते.पाच सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन.तो वैशिष्ट्यपूर्ण साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे परवानगी मागितली. डॉ. राधाकृष्णन यांना शिक्षकांविषयी खूप आदर होता.नव्या पीढीचे शिल्पकार म्हणून ते त्यांना मान देत.म्हणून राधाकृष्णन यांनी त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करावा असे विद्यार्थ्यांना सुचवले. आणि तेव्हांपासून शाळांमधून ५ सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून धूमधामपणे साजरा होतो. या दिवशी विद्यार्थीच शिक्षकाची भूमिका पार पाडतात.

१९६७ साली डॉ. राधाकृष्णन निवृत्त झाले आणि मद्रासला येउन स्थायिक झाले.

वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचे शिवकामु या त्यांच्या नात्यातल्या मुलीशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना पाच मुलगे आणि एक मुलगी होती. मात्र त्यांच्या पत्नीचे अकाली निधन झाल्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन विस्कटले.

अखेरच्या दिवसात त्यांना गंभीर आजाराचा सामना करावा लागला. १७एप्रील १९७५ साली वयाच्या ८६व्या वर्षी ते अनंतात विलीन झाले.

भारतीयांसाठी अत्यंत भूषणीय  बहुआयामी व्यक्तीत्व!

।। झाले बहु होतील बहु आहेत बहु। परि यासम हाच।।

त्यांना त्यांच्या जयंती निमीत्त ही आदरांजली वाहूया..

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लिमलेटची गोळी आणि बरंच काही… ☆ श्रीरंग खटावकर ☆

श्री श्रीरंग खटावकर  

? मनमंजुषेतून ?

☆ लिमलेटची गोळी आणि बरंच काही… ☆ श्रीरंग खटावकर  ☆

बाजारात फिरताना अचानक एका दुकानात “ती” दिसली आणि मी एकदम ३५ वर्षांपूर्वीच्या काळात गेलो. 

शाळेतली धावण्याची स्पर्धा, जीव तोडून धावलो, नंबरात नाहीच आलो, पण शर्यत संपल्यावर मराठे बाईंनी हातावर ठेवली, तीच ती लिमलेट ची गोळी.

शर्यतीत धावताना बक्षिसापेक्षा त्या गोळीची क्रेझ जास्त होती. 

नारंगी केशरी रंगातली ती अर्धचंद्रकोर आकारातील गोळी बघूनच तोंडाला पाणी सुटायचं! 

कदाचित त्या काळी फारशी व्हारायटीच नसल्याने त्या गोळीचं अप्रूप असायचं. ५ पैशाला पा….च गोळ्या मिळायच्या हे सांगितलं तर माझी मुलं सुद्धा विश्वास ठेवणार नाहीत. 

असो!

काही विशिष्ट गोळ्याच मिळायच्या त्या काळी! त्यातली सगळ्यात आवडती सगळ्यांना परवडणारी हीच ती लिमलेटची गोळी, हिच्या थोड्या वरच्या पातळीवर होती ती छान प्लास्टिक च्या कागदात गुंडाळून येणारी रावळगाव गोळी, तिच्याच पातळीवर लाकडी काडी लावलेली स्ट्रॉबेरीच्या आकाराची आणि खाल्ल्यानंतर जिभेवर रंग रेंगाळणारी स्ट्रॉबेरीची गोळी. एखादा धाडसी मुलगा कधीतरी हुबेहूब सिगरेट सारखीच दिसणारी, टोकाशी निखारा असल्यागत लाल ठिपका असलेली सिगरेट ची गोळी ऐटीत तोंडात ठेऊन यायचा. उभट चौकोनी आकारात मिळणाऱ्या पेपेरमिंट च्या गोळ्या तर खायला कमी आणि रुखवतात तुळशी वृंदावन नाहीतर बंगल्यासाठी जास्त वापरल्या जायच्या. त्या नंतर कधीकाळी दिसायची ती आठवलेची काजू वडी, परफेक्ट चौकोनी आकारातली, वर सोनेरी कागदाचा रुपया असणारी!! 

पूर्वी शाळेत वाढदिवसाला वाटली जाणारी एकमेव गोळी म्हणजे लिमलेटच!! 

पण काही श्रीमंत मुलं मात्र आम्हाला जणू गुलबकावलीच्या फुला प्रमाणे असलेली, सहजसाध्य नसलेली, वेष्टनापासून चवीपर्यंत सर्वांगसुंदर अशी इकलेअर वाटायचे तेव्हा काय भारी वाटायचं, आणि तेवढया दिवसापुरता त्या मुलाचा भाव वधारायचा!!

आमच्या आईचा एक मामेभाऊ दर दिवाळीच्या आसपास भाऊबीजेला यायचा. आईला ओवाळणीत बंद पाकीट घालायचा. पण आम्हाला त्या चंदुमामा ची ओढ वेगळ्याच कारणासाठी असायची! 

तो आम्हा भावंडांसाठी चक्क एक मोठं फाईव्ह स्टार चॉकलेट आणायचा!!

वर्षातून एकदाच मिळणाऱ्या त्या चॉकलेटची वर्षभर वाट पाहायचो आम्ही!!

कधीतरी बाबा खुश असले तर बाजारातून येताना चंदेरी किंवा सोनेरी वेष्टनात मोल्ड केलेले चॉकलेट आणत तो दिवस म्हणजे तर दिवाळीच!!

आमची एक मावशी परदेशात राहते तिनं पहिल्यांदाच आणलेल्या फॉरेन च्या चॉकलेटची चांदी तर कित्येक वर्षे माझ्या अभ्यासाच्या वहीत होती, आणि त्यावर फुशारकीही मिरवलेली आठवतेय. 

हे सगळं आठवलं ते त्या लिमलेटच्या गोळी मुळे! 

लिमलेटच्या, जिऱ्याच्या, जिऱ्यामीऱ्याच्या, सिगारेटच्या, पेपेरमिंटच्या, एक्स्ट्रा स्ट्रॉंगच्या आठवेलच्या काजू वड्या, इकलेअरच्या गोळ्यांनी आमचं बालविश्व व्यापून उरलं होतं. 

त्याच तंद्रीत ते गोळ्याचं पाकीट घेतलं आणि घरी आलो, मुलांसमोर धरलं तर नाक मुरडत मुलगी म्हणाली “ईई ह्या काय गोळ्या आणल्यास बाबा, अनहायजीनिक असतात त्या” 

आता त्यांना काय डोंबल सांगू की तुमच्या कॅडबरी सिल्क किंवा हल्ली घरोघरी दिसणाऱ्या फॉरेन चॉकलेट (म्हणजे खरंतर एअर पोर्ट च्या ड्युटी फ्री शॉप मध्ये मिळणाऱ्या) च्या जमान्यात आमच्या करता अजूनही लिमलेटची गोळी म्हणजेच फिस्ट आहे म्हणून……..

© श्रीरंग खटावकर

मो – +91 7039410869

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मन शुद्ध तुझं ! – भाग-२ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

मन शुद्ध तुझं ! – भाग-२ ☆ श्री संभाजी बबन गायके 

(मेजर शशीधरन नायर !… सर्वांच्या पुढे चालत होते. कामगिरीवर निघण्याआधी थोड्याच वेळापूर्वी फोनवरून आईशी बोलणं झालं होतं…!) इथून पुढे —

सैन्यतुकडी पुढे निघालेली असताना वाटेवर बेमालूमपणे लपवून, जमिनीत पेरून ठेवलेल्या एका सुरूंगाने घात केला आणि साहेबांना आणि जीवन गुरंग नावाच्या एका रायफलमन सैनिकाला पुरतं घायाळ केलं…. शर्थीचे वैद्यकीय उपचार व्यर्थ ठरले! 

तिरंगी राष्ट्रध्वज पांघरलेली, फुलांनी सजवलेली शवपेटी… त्यात मेजर शशीधरन साहेबांचा निष्प्राण देह…. घरी आला… शेवटच्या दर्शनार्थ… ‘अमर रहे’च्या घोषणांनी परिसर निनादत होता. तिला धावत जायचं होतं त्याचं अंतिम दर्शन घ्यायला…. पण पायांत शक्ती नव्हतीच आधी पासून, आणि आता त्या पावलांना आधार देणारे हातही निघून गेले होते…. जीवनरथाचं एक चाक निखळून पडलं होतं!

तिने त्याचा हात हातात घेतला….. त्या अचेतन हातामधली ऊब तिच्यासाठी अजूनही तशीच होती. ती थोडी मागे सरली…. तिच्या चाकाच्या खुर्चीमागे तो उभा असल्याचा भास झाला तिला… जणू तो म्हणत होता… ‘मी आहे तुझ्या पाठीशी!’ 

शूर वीर सैनिकाच्या मानवंदनेसाठी हवेत गोळीबाराच्या एकवीस फैरी झाडण्यात आल्या…. चिता धगधगू लागली.. ती आता स्तब्ध, नि:शब्द.. तिच्या डोळ्यांतील आसवांचा पूर पापण्यांशी झगडतो आहे…. त्याने तिला उचलून घेतल्याच्या आठवणींच्या डोहात ती बुडून गेलेली…. गोळीबाराच्या आवाजानं सैरभैर होऊन स्मशानातील झाडांवरून उडून गेलेली पाखरं आता पुन्हा फांद्यांवर येऊन बसली होती.. शांत! 

केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील नेदुमबसरी गावचे विजयन नायर पुण्याजवळच्या खडकवासला येथील केंद्रीय जल संशोधन केंद्रात नोकरीसाठी आले होते. शशीधरन हे विजयन आणि लता नायर यांचे एकुलते एक सुपूत्र.

शशीधरन राहत्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सैन्याधिकारी प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या पदकवायतीमधील सावधान-विश्रामचा आवाज घरबसल्या ऐकता ऐकता मोठे झाले. देशभरातून आलेले सुदृढ, बुद्धीमान आणि आत्मविश्वासाने भारलेले युवक बघून त्यांनाही वाटायचं… ‘आपल्याही अंगावर हा गणवेश चढवता आला तर?’

तसं कुटुंबातलं, घरातलं फारसं कुणीही सैन्यसेवेत नव्हतं. याचाच अर्थ शून्यातून आरंभ करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं होतं… एकट्यानं. त्यासाठीचा मार्ग शशीधरन यांनी निवडला आणि त्या मार्गावर आत्मविश्वासाने पावलेही टाकली.  

केंद्रीय विद्यालयांतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते फर्ग्युसन महाविद्यालयात शास्त्र शाखेत शिकू लागले. अर्थातच एन.सी.सी. मध्ये प्रवेश घेतलाच… कवायतीसाठी शशीधरन दर रविवारी वीस किलोमीटर्सचं अंतर सायकल हाकत यायचे आणि परत जायचे….. हे एवढं सायकलींग, त्यात पुन्हा कवायत… थकून जायला व्हायचं… स्वप्नं अशीच तर पूर्णत्वास जातात! 

एके दिवशी शशीधरन डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमी मध्ये दाखल झाले… आणि एक कणखर सैन्याधिकारी म्हणून भारतीय सैन्यात रुजू झाले!

पुण्यात सुट्टीवर आलेले असताना त्यांचा परिचय तृप्ती यांचेशी झाला… परिचयाचं रुपांतर प्रेमात झालं…. साखरपुडा झाला ! आणि काहीच दिवसांत तृप्ती यांना multiple arteriosclerosis नावाचा विकार जडल्याचं निष्पन्न झालं. या विकारात रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंती कडक होऊन जातात. रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होतो. 

तृप्ती यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ही बाब नायर यांच्यापासून लपवली नाही. मित्र-नातेवाईकांनी ‘हे लग्न करू नये’ असा सल्ला शशीधरन यांना दिला, पण साहेबांनी त्यांना साफ नकार दिला. आणि मोठ्या दिमाखात तृप्ती यांना मिसेस तृप्ती शशीधरन नायर असं हक्काचं नाव दिलं… एका सैन्याधिका-याची पत्नी म्हणून सन्मान प्राप्त करून दिला. 

पण पुढे दुर्दैवाने सौ. तृप्ती यांचा आजार बळावला आणि त्यांचे कमरेखालील शरीर लुळे पडले. मेजरसाहेबांनी तृप्ती यांची सर्वतोपरी काळजी घेतली… त्यांना अतिशय सन्मानाने वागवलं. हे दांमप्त्य अनेकांसाठी प्रेमाचा आदर्श बनलं! मेजरसाहेब ११ जानेवारी,२०१९ रोजी देशासाठी कश्मिरमध्ये हुतात्मा झाले!

लेफ्टनंट कर्नल संदीप अहलावत साहेब आपल्या ट्विटर पोस्ट म्हणतात… 

‘If you do not know or have not read about the love story of Maj Shashidharan and Trupti Nair. Then you do not know what pure and selfless love is!!’

‘मेजर शशीधरन आणि तृप्ती यांची प्रेमकहाणी तुम्हांला माहिती नसेल, तुम्ही ती वाचली नसेल तर तुम्हांला पवित्र आणि नि:स्वार्थ प्रेम माहित नाही, असं होईल!’     

“My dear countrymen, Please tell your children about Maj Nair, his life is a lesson in how to respect a woman and how to honour your words!!,”

“माझ्या देशवासियांनो, आपल्या मुलांना मेजर शशीधरन नायर यांच्याविषयी सांगा… शशीधरन यांचे आयुष्य म्हणजे महिलांना कसा आदर द्यावा, आपला शब्द कसा पाळावा, याचा आदर्श वस्तूपाठच आहे.”

अहलावत साहेबांचा हा सल्ला प्रत्येकाने मानला तर किती छान होईल. भारतीय सैन्यपरंपरेमध्ये महिलांचा सन्मान करणे, हे महत्त्वाचे तत्व मानले जाते आणि ते सैनिकांमध्ये बिंबवले जाते. मेजर शशीधरन नायर साहेबांनी हे तत्व प्रत्यक्ष जगून दाखवले. 

मेजर शशीधरन नायर साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली. साहेबांच्या हौतात्म्याच्या काहीच वर्षे आधी त्यांचे पिताश्री विजय नायर देवाघरी गेले होते! साहेबांच्या मातोश्री लताजी यांना, त्यांच्या पत्नी तृप्तीताईंना जीवनाची लढाई लढण्यासाठी परमेश्वर अधिक शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना!

३० जुलै हा शशीधरन साहेबांचा जन्मदिवस. हुतात्मा सैनिकांच्या जन्मदिनी, बलिदानदिनी, उमा कुलकर्णी या भगिनी या सैनिकांची आठवण आपल्याला करून देतात. त्यानुसार त्यांनी मेजर साहेबांची आठवण करून दिली. मेजरसाहेबांची प्रेरणादायी प्रेमकहाणी मला समजली तशी आपल्यासमोर नव्याने मांडली. आपणही इतरांना सांगाल ना?  धन्यवाद! जयहिंद! 

– समाप्त – 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares