बाळंत या शब्दाचाचं अर्थ मुळात बाळ तरी, नाही तर अंत तरी असा आहे.
गर्भात आकाराला आलेला जीव पूर्ण रुपात साकारताना मांडलेला जीवाचा आकांत म्हणजे बाळंतपण.
बाळंतपण म्हणजे असतो बाईचा नवा पुनर्जन्म.
बाईपणातून आईपणात रूपांतर होणारी अत्युच्च पातळी म्हणजे बाळंतपण.
बाळंतपणाच्या प्रसूती वेदनांची तीव्रता असते तरी किती..? तर ४३ डेल इतकी… म्हणजे माणसाची २० हाडे फ्रॅक्चर झाल्यानंतर जितक्या वेदना होतात माणसाला तितक्या वेदना बाळंतपणात सहन कराव्या लागतात बाईला.
दुःखातून जन्म पावणाऱ्या वेदना वाहतात नेहमी दुःखाचा भार… पण इथं असतं उलटं…
वेदनेतून सुख जन्माला येतं आणि शेवटी मानते ती या वेदनांचेचं आभार.
वेदना कोणाला हवीहवीशी वाटेल…?
परंतू कितीही असह्य असल्या तरी तिला त्या हव्याहव्याशा वाटतात.
वेदना नको म्हणून कुठलीही बाई नाकारत नसते कधीच बाळंतपण.
मरणयातना भोगून पुन्हा मिळणार असते तिला जिवंतपण.
वेदनेचं नी बाळंतपणाचं नातं असतं अतूट.
सोसत नसते तरी सोसते…अनावर किंकाळी फुटत असते.
व्याकुळ होते…कासावीस होते भान हरपून जात असते.
आणि जीवन मरणाच्या मधली झुंज बाई देत असते.
शेवटी बाळ तरी…नाही तर अंत तरी.
इतक्या अटीतटीची निकराची झुंज असते बाळंतपण म्हणजे.
कित्येक बाया बाळंतपणात आई होताना गेल्या आहेत हे जग सोडून… मागे एखादं गोंडस बाळ ठेऊन.
कित्येक आया आजही भोगताहेत बाळंतपणानंतरच्या कळा अजून.
पण नसते कधीच भीती तिच्या मनात अशा दुर्दैवी घटनांची.
किती मोठा त्याग असतो ना बाईचा…आई होण्यासाठी… शरीरासोबत जीवाचं समर्पण देते ती यासाठी.
शेवटी अनंत यातनेचा वेदनेचा अंत पाहणाऱ्या सहनशीलतेचा सामना करून होते ती बाळंत..
टाकते सुटकेचा निश्वास…देते एका जीवाला श्वास…जणू ओतते आपला जीव त्या जीवात.
हाडामासाचं जिवंत-साजिवंत सुंदर कलाकृती साकारणारी विश्वातली एकमेवाद्वितीय कलावंत असते ती म्हणजे बाळंतीण.
बाळ जन्म घेतो आणि बाईचाही आई म्हणून जन्म होतो.
सोपं नाही आई होणं ते दिव्य पार करावं फक्त बाईनं.
आईपणाच्या अंगावर फुटणारा पान्हा.. आणि छातीला बिलगून दूध पिणारा तान्हा…
आहे ना हा अद्भुत आणि अद्वैत नात्याचा नमुना..
बाईलाच आईपणाची का हो असते चाहूल..?.. वेदनेचा हा भोगवाटा बाईच्याच का वाट्याला ?
तिच्याच वाट्याला निसर्गानं का हे बाळंतपण दिलंय..?.. निसर्गानं नवनिर्मितीचं आणि सृजनशीलतेंच सौख्य एक मातीच्या आणि दुसरं मातेच्या पदरी घातलंय.
मातीच्या आणि मातेच्या नावात एका वेलांटीचा फरक आहे असं म्हणतात. .. खरंय ते…
जगाचे काही नियम असतात. काही विशिष्ट शिष्टाचार, विचारांच्या चौकटी असतात. या चौकटीतच सर्वसामान्य माणूस वावरत असतो, समाजमान्य होईल असे वागत असतो. या चौकटींच्या पलीकडे जात स्वतःच्या मनाप्रमाणे, स्वतःच्या आनंदासाठी जगणाऱ्याला ‘कलंदर’ म्हणतात. ” त्याचं सगळं जगावेगळंच असतं ” असा ठपकाही त्याच्यावर येतो. अशाच एका मनस्वी कलाकाराचे मनोगत म्हणजे डॉ. निशिकांत श्रोत्री लिखित ‘ वेडा कलाकार ‘ ही कविता. आज आपण तिचा रसास्वाद घेणार आहोत.
मी एक कलाकार आहे. कवी आहे. मनाने खूप दिलदार आहे.पण मी कलंदर म्हणा, मनस्वी म्हणा, म्हणजे अगदी बिनधास्त जगणारा, स्वतःच्या आनंदासाठी जगणारा स्वाभिमानी, समाधानी माणूस आहे.
ही कविता प्रथम पुरूषी एकवचनात लिहिली आहे हे याचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कवी आपले मनोगत सरळपणे, प्रांजळपणे मांडतो.
नाही जमलं तोलायला कधी
घेतलेलं व्रत चांदीच्या तराजूतून
शब्द, सूर, रंग, इतकच काय
माणसाचं आयुष्य देखील मापायचं असतं
सोन्याच्या मापाने
कधी उमगलंच नाही मला
मुक्तछंदातली ही कविता संपूर्णपणे रूपकात्मक आहे. चांदीचा तराजू आणि सोन्याचे माप ही इथे रूपके आहेत. कवी म्हणतो, ” एखादे व्रत घेतल्यासारखे मी माझ्या मनाप्रमाणे जगताना फक्त समाधान मिळविले कोणत्याही गोष्टींपासून तोटा काय आहे फायदा किती आहे याचा कधी विचारच केला नाही. म्हणजे त्या गोष्टींना चांदीच्या तराजूत तोलले नाही. त्यातून मिळालेले समाधान हीच माझी मिळकत आहे.
जग खूप व्यवहारी आहे. लोकांचे यशाचे मापदंड वेगळे आहेत. त्यामुळेच साहित्य, संगीत, चित्रकला यासारख्या गोष्टींचेच फक्त नव्हे तर अगदी माणसांचे पण मोजमाप केले जाते, तेही सोन्याच्या मापाने. म्हणजे सगळे काही पैशातच मोजले जाते. हा व्यवहार मला कधी जमलाच नाही, समजलाच नाही. कारण मला पैशांपेक्षा या गोष्टीतून मिळणारे समाधान खूप मोलाचे वाटते.”
कवीच्या या मनस्वी वागण्याने जगाने छांदिष्ट, विक्षिप्त अगदी वेडा अशी विशेषणे त्याला दिली. पण कवीने कधी त्याची फिकीर केली नाही.
श्रीखंड चाटलं, जामून खाल्ला
भुरके घेतले बासुंदीचे मनसोक्त
अगदी मनमुराद आस्वाद घेतला भेळेचाही
त्यांच्या चवीतच रमून गेलो
पर्वा नव्हती खातोय कसल्या चमच्याने याची
कधी बोट, कधी द्रोण तर कधी पुठ्ठ्याचे
तुकडे सुद्धा
मी प्रत्येक गोष्ट आनंदासाठी, समाधानासाठीच केल्याने अनेक सुखाचे, यशाचे, आनंदाचे चांगले अनुभव घेतले. असे क्षण मनापासून अनुभवले. त्यामध्ये अगदी मनापासून रममाण झालो. यामध्ये मला समाधान मिळवणे हे साध्यच खूप महत्त्वाचे होते. ते मिळवण्यासाठी कोणत्या साधनांचा, कोणत्या गोष्टींचा वापर केला याला माझ्या दृष्टीने फारसे महत्त्व नव्हते.
इथे पक्वान्ने, भेळ, द्रोण, पुठ्ठ्याचा तुकडा ही रूपकेच आहेत. कवीने आपली मनोधारणा जपताना, त्याप्रमाणेच वागताना कधी अगदी श्रीखंड, गुलाबजाम, बासुंदी ही मिष्ठान्ने तर कधी अगदी चटकदार भेळेचाही आस्वाद घेतला. म्हणजे आपल्या जगण्यातून भरपूर आनंद,सुखाचे क्षण, अतीव समाधान मिळवले. त्याच वेळी त्यासाठी काय काय करावे लागले, किती कष्ट करावे लागले, कोणत्या मार्गांचा अवलंब करावा लागला याची कधी पर्वा केली नाही. म्हणजे या पक्वान्नांच्या आस्वादासाठी चमचा, बोट, द्रोण, अगदी पुठ्ठ्याचा तुकडाही कधी वापर करावा लागला तरी त्याची फिकीर केली नाही. फक्त पदार्थांचा आस्वाद घेणे हीच गोष्ट महत्त्वाची होती. त्यामुळे त्यासाठीची साधने गौण मानली.
अन अचानक अनपेक्षितपणे मिळाला
हातात एक सोन्याचा चमचा
हरकून गेलो, मोहून गेलो
तोंडात घालताना एकेक घास
काय खातोय जाण नव्हती
सोन्याच्या चमच्याने खातोय
हीच धुंदी होती
मी आयुष्यात पक्वांन्नांचा आस्वाद मनसोक्तपणे घेतला. तेव्हा ते खायला कोणत्या साधनांचा वापर केला याला फारसे महत्त्व दिले नाही. तर आस्वाद घेणे हेच उद्दिष्ट होते. पण अचानकपणे ध्यानीमनी नसताना मला सोन्याचा चमचा मिळाला. त्यामुळे मी अगदी हरखून गेलो. मती गुंग झाली. त्या नादात आता काय खातोय याचे भानही मला नव्हते. फक्त सोन्याच्या चमच्याने खातोय याचीच धुंदी मला चढली होती.
इथे सोन्याचा चमचा हे खूपच महत्त्वाचे रूपक आहे. ते म्हणजे लक्ष्मीचे वरदान, भरपूर कमावण्याचा मार्ग. हे आजच्या वास्तवाचे, प्रगतीचे रूपक आहे.आजकाल अगदी भरपूर पगाराच्या नोकऱ्या मिळतात. सांपत्तिक स्थिती खूप सुधारते. त्या पैशांचा मोहपाश आवळत जातो. काम-काळ-वेळेचे गणित चुकत जाते. पैसा भरपूर कमावतात. पण त्याचा आस्वाद घ्यायला हाताशी सवड नसते. म्हणजेच हातात सोन्याचा चमचा आहे पण त्याच्या धुंदीपायी आपण काय खातोय हेच समजतही नाही. फक्त खाणे होते अन् अनुभूती शून्य.
धुंदी वाढतच होती
पण पोट भरल्याचं काही जाणवत नव्हतं
का ?
लक्षात आलं
तोंडात न श्रीखंड, न बासुंदी, न भेळ
नुसता चमचा चघळतोय
………सोन्याचा………
ही धुंदी अशी वाढतच होती. पण पोट भरल्याचं मला जाणवत नव्हतं. असं का होतंय ? असा विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की, माझ्या तोंडात ना पक्वान्न आहे ना भेळ. तर मी नुसताच चमचा चघळतोय. तोही सोन्याचा चमचा.
इथे कवितेचा क्लायमॅक्स आहे. पैसा मिळवणे आणि पैशाचा मोह, हव्यास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अती पैशाने संवेदना बोथट होतात. एक प्रकारची पैशाची धुंदी मनाला ग्रासून टाकते. त्यामुळे पैशाचा आनंद घेणे, उपभोग घेणे, त्यातून मन:स्वास्थ्य मिळवणे या गोष्टी होतच नाहीत. आपण फक्त त्या पैशाच्या हातातले खेळणे बनून त्याच्या मागे धावत राहतो. म्हणजेच तो सोन्याचा चमचा नुसताच चघळत रहातो आणि पोट काही भरत नाही.
या कवितेत कवीने रूपकांचा फार सुंदर वापर केला आहे. चांदीचा तराजू, सोन्याचे माप, श्रीखंड, जामुन, बासुंदी, भेळ, बोट, द्रोण, पुठ्ठ्याचा तुकडा, सोन्याचा चमचा या रूपकां मधून कवींने आजकालच्या जीवन पद्धतीचे फार अचूक वर्णन केलेले आहे. रूपकांमुळे कमीत कमी शब्दात सखोल वर्णन केले गेलेले आहे. जगण्यासाठी नेमके किती हवे, त्यातून मिळणारे समाधान जपायचे का पैशाची हाव धरून त्यामागे धावायचे आणि मग त्यापायी जगायचेच राहून जाते हे भीषण वास्तव आहे.
असे हे एका मनस्वी, कलंदर कलाकाराचे मनोगत सांगताना त्यातून कवीने फार मोठा संदेश दिला आहे. तो म्हणजे पैसा मिळवणे हे जितके महत्त्वाचे आहे त्यापेक्षा त्या पैशाचा योग्य उपभोग घेणे महत्त्वाचे आहे. त्यातून मिळणारे समाधान हे खरे लाखमोलाचे असते. आपल्या कृती-उक्तीतून मिळणारे समाधान हेच आपले खरे वैभव असते हीच गोष्ट कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांच्या ‘वेडा कलाकार ‘या कवितेतून आपल्याला सांगतात.
प्रेमाचे प्रकार अनेक. प्रत्येक प्रकाराचे रंगही अनेक. आयुष्यात प्रेमाची सुरुवात ही मातृप्रेमाने होते. त्यानंतर पितृप्रेम. त्यानंतर भ्रातृ व भगिनी प्रेम. अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रेमाच्या विविध प्रकारांची आपल्याशी गाठ पडते.
प्रेमा तुझा रंग कसा हे नाव प्रा. वसंत कानेटकर यांच्या एका सुंदर नाटकाचे. प्रेमाच्या अर्थात मी वर्णन केलेल्या प्रेम प्रकारां व्यतिरिक्त, स्त्री-पुरुषांच्या तारुण्यापासून निर्माण झालेल्या प्रेमाच्या विविध रंगांच्या छटा त्यामध्ये खूप सुंदर तऱ्हेने दाखवल्या आहेत. प्रेम हे विरोधाभासातूनही निर्माण होऊ शकते. आयुष्यात प्रेमाची जपणूक करताना विविध प्रकारे अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते.
आपण याच प्रकारच्या प्रेमाबाबत विचार करूया.
प्रेमाचे विविध रंग, त्याच्या विविध छटा आपणाला लहानपणापासूनच श्रीकृष्णाच्या चरित्रफ्रसंगातूनच ओळख देऊन जातात. राधा, रुक्मिणी, सत्यभामा, द्रौपदी, मीरा !
किती वेगवेगळे रंग!
राधा, मनामनांच्या एकरुपतेमधून शारिरीक ही म्हणता येणार नाही आणि अशारिरीकही म्हणता येणार नाही असे अनोखे प्रेम. मानसिक एकतानता, त्यातून निर्माण झालेले अद्वैत व अद्भुत प्रेमरंग. या प्रेमाला काय नाव द्यावे हे कुणाला समजणारच नाही किंवा कोणतेही नावच देता येणार नाही. पण एक अनोखी सुंदर आणि भावनिक रंगछटा या प्रेमातून व्यक्त होत असते. भावुकतेची उधळण भावनांची जपणूक या सर्वातून निर्माण झालेल्या या विविध रंग छटा! श्रीकृष्णाच्या बालपणीच्या या अगम्य अद्भुत प्रेमलीलांना कृष्णचरित्रात एक अक्षय अढळ स्थान प्राप्त झाले आहे.
प्रथमदर्शना पासूनच समर्पण भावनेतून निर्माण झालेले अलौकिक प्रेम. प्रथम दर्शनानंतर दुसऱ्या कोणाचाच विचार मनात येऊ शकणार नाही एवढे उत्कट प्रेम ! ही एक अद्भुत रंगछटा रुक्मिणीच्या प्रेमातून दिसते.
प्रेम आणि क्रोध हे एकमेकांच्या विरोधी आहेत का पूरक आहेत याचा संभ्रम पडावा कृतककोपापासून ते क्रोधागाराच्या भितीपलीकडे घेऊन जाणारे, पण प्रेमच! सत्यभामेच्या या प्रेमाला काय नाव द्यावे ? एक अनोखा रंग हे चरित्र उधळून जाते.
एखाद्या स्त्रीला भगिनी मानून एक उच्च कोटीचा भगिनी प्रेमाचा उदात्त अनुभव देणारा, कृष्ण द्रौपदीच्या अद्वितीय प्रेमाचा एक अभिनव रंग !
मीरेचे भक्तिमय पण कालातीत असे प्रेम ! शारिरीक आकर्षणापलीकडचे स्वप्निल भावनेतून निर्माण झालेले अगम्य, अनाकलनीय असे भक्तीरसपूर्ण पण कालमर्यादांना भेदणारे प्रेम !
एका श्रीकृष्णाच्या चरित्रातच स्त्री-पुरुष प्रेमाच्या किती विविध रंगछटा पहावयास मिळतात हे एक अद्भुतच.
आपल्याला असे वाटेल की अशा रंगांचे प्रेम अलीकडे कुठे बघायला मिळेल ? एकाच व्यक्तीच्या जीवनात एवढ्या विविध प्रेम रंगांची उतरण सापडणे अवघड आहे. परंतु विविध व्यक्तींच्या जीवनात यापैकी काही रंगांची उधळण अवश्य दिसून येईल.
पाहताक्षणी प्रेम ही माझ्या तरुणपणात मला भाकड कथा वाटत असे. परंतु माझाच एक अत्यंत जवळचा मित्र त्याच्या आयुष्यात हे घडले, प्रत्यक्ष ! त्याला मी साक्षीदार आहे. त्यांचे लग्नही झाले. पळून जाऊन नाही. आई-वडिलांच्या संमतीने रीतसर. पन्नास वर्षाचा संसारही झाला. त्या अत्यंत उत्कट आणि सुंदर प्रेमाशी माझा परिचय ही झाला.
अमृता प्रीतम यांचे चरित्र वाचताना एका आगळ्यावेगळ्या आणि उत्कट प्रेमाचा एक नवीन अनुभव वाचायला मिळाला. अमृता व साहिर लुधियानवी. हा त्यांच्या चरित्रातील एक उतारा वाचा
‘अमृता लाहोरला होत्या तेंव्हा साहिर त्यांना भेटायला त्यांच्या घरी यायचे. घरी आले की या दोघांच्या मनसोक्त गप्पा व्हायच्या. गप्पा मारता मारता साहीर सिगारेटी फस्त करत राहायचे. अमृता मात्र साहिरनी सोडलेल्या धुम्रवलयात आपली स्वप्ने पाहायच्या. साहिर तिथून गेल्यावर त्यांनी पिऊन टाकलेल्या सिगारेटची थोटके त्या गोळा करायच्या, अन हळूहळू त्यांना पुन्हा शिलगावून ओठी लावायच्या ! त्या आपल्या ओठांवर साहिरना अनुभवायच्या ! या नादात अमृतांना सिगारेटचे व्यसन जडले. अमृता साहिरला कधीच विसरू शकल्या नाहीत.’
त्यांचे हे प्रेम शारीरिक पातळीवर कधीच गेले नाही. हा किती अनोखा प्रेमरंग! अशा तऱ्हेचे उत्कट प्रेम कधी ऐकले नव्हते. बहुधा असे प्रेम हे फक्त अमृता प्रीतम यांचे एकमेवाद्वितीयच.
त्यांचे संपूर्ण चरित्र हे विविध प्रेमांचा एक अद्वितीय आणि अतिंद्रीय अनुभव देऊन जाते.
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि गोपाळराव जोशी यांचे विरोधाभासात्मक प्रेम. चिडचिडेपणा, क्रोध, धाक ही प्रेमाची अंगे असू शकतात ? परंतु यातून ही एक विरोधाभासात्मक प्रेमाचे उदाहरण आपणाला दिसते. त्यांच्या चरित्रातून आपल्याला जाणवते. प्रेमाच्या विरोधी अर्थातून प्रेमाचे विविध पैलू आणि प्रेमरंग आपल्याला अनुभवायला मिळतात.
भगिनी निवेदिता यांच्या चरित्रातून आपणाला भगिनी प्रेमाचे एक अलौकिक दर्शन घडते. साता समुद्रा पार असलेली एक मुलगी एका अनोख्या देशात येते. एका तेजस्वी वाणीने आणि समृद्ध ज्ञानाने प्रभावित होऊन एका परधर्माच्या धर्मकार्यात स्वतःला झोकून देते. स्वामी विवेकानंदांची ही मानस भगिनीं, त्यांच्या कार्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करते. हे अद्भुत भगिनी प्रेम एकमेवाद्वितीयच.
बाबा आमटे आणि साधनाताई यांचे प्रेम ही सुद्धा मला नतमस्तक करणारी भावोत्कट प्रेमाची कहाणी, साधनाताईंच्या चरित्रात आपल्याला वाचायला मिळते. बाबांच्या कार्यात आपले आयुष्य झोकून देणाऱ्या परंतु वेळप्रसंगी बाबांच्या वैचारिक भूमिकेला विरोधही करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमाची आपणास ओळख होते. बाबा नास्तिक तर साधनाताई देवपूजक. बाबांनी साधनाताईंना त्यांच्या देवधर्मासाठी विरोध केला नाही, पण सहकार्य ही केले नाही. कुष्ठरोग्यांची लग्ने लावण्याबाबत बाबांचा विरोध मोडून काढून साधनाताईंनी त्यांच्या आयुष्यात विविध रंग भरले. प्रेमाच्या समर्पणातून सुद्धा स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्व घडवता येते आणि प्रेमातून फुलवता येते हा प्रेमाचा कुठला रंग म्हणावा ?
या सगळ्या प्रेमाच्या रंगांची उधळण पहात असताना वेगवेगळ्या रंगछटांचे एक इंद्रधनुष्य आपण पाहत असतो या सगळ्या पार्श्वभूमीवर अलीकडे या रंगांतून आयुष्य फुलवण्याला नवी पिढी पारखी होत आहे काय, असे वाटू लागते. या सर्व प्रेमाच्या रंगावरून समर्पणाच्या भावनेतूनही स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवता येते हे वारंवार सिद्ध होत असते, समर्पणाची भावना नसली तरी किमान समन्वयाची भावना ठेवून तडजोडीने आपले आयुष्य रंगीत करता येते याची जाणीव नवीन पिढीतील अनेकांना का असू नये ?
या सर्व प्रेम रंगातून आणखीही एक रंग त्याबाबत जास्त विवेचन न करता व नामोल्लेख न करता त्या प्रेमाचा उल्लेख करावासा वाटतो. सामाजिक नीती मूल्यांना तडा देत, स्वतःच्या जीवनात प्रेम रंगाची उधळण करणारी काही उदाहरणे आहेत. समाजाने त्यांना बदनाम केले असेल, बहिष्कृतही केले असेल किंवा त्यांची निंदानालस्ती ही केली असेल. त्यांचे बद्दल अनेक गैरसमज पसरवले असतील. त्यांच्याशी समाज फटकूनही वाढला असेल. परंतु त्यांनी स्वतःचे आयुष्य त्यागाने प्रेमाने आणि समन्वयाने वेगळ्या तऱ्हेने रंगीत बनवले. परंतु हे रंग त्यांच्या आयुष्यापुरतेच मर्यादित राहिले. समाजात मात्र त्यांच्या प्रेम रंगांची एक ग्रे शेड ज्याला म्हणतो तो फक्त एक पारवा रंगच दिसून आला आहे. हा सुद्धा एक प्रेमाचा रंगच नव्हे काय ?
व्यक्ती स्वातंत्र्याचा हट्टाग्रह न धरता समन्वयाने आणि एकमेकांना पूरक भूमिका घेत भले भांडण होत असेल, भले अबोला होत असेल, भले चिडचिड होत असेल, काहीही असो. परंतु प्रेमाच्या भावनेने एकमेकांना धरून ठेवण्यातच रंगांची उधळण होत असते हे नवीन पिढीतील मुलांना समजावून सांगण्याची खरोखरच गरज आहे असे वाटते. त्यासाठी मी एक विशेष मंगलाष्टक बनवले होते. सावधानता ही लग्नातच अधोरेखित का केली जाते हे समजले पाहिजे.
शुभमंगल सावधान…
शुभमंगल जरी आज होतसे, जीवनी सावधचित्त असावे
शुभमंगल या दिनी म्हणूनी, सारे म्हणती सावधान,
शुभमंगल सावधान………
मुखी कुणाच्या वह्नी येता, दुज्या मुखाने पाणी व्हावे
मी मी तू तू कुणी बोलता, दुज्या मुखाने मौनी व्हावे
एक मुखाने मौनी होता, दुज्या मुखाने प्रेमी व्हावे
दिनी आजच्या शुभमंगल पण, जीवनी सावधचित्त असावे
शुभमंगल जरी आज होतसे, जीवनी सावधचित्त असावे
शुभमंगल या दिनी म्हणूनी, सारे म्हणती सावधान,
शुभमंगल सावधान………
कुणी कुणाला काय बोलले,
भांडण मिटता विसरुन जावे
मोठ्यांचे कटुबोल कोणते,
मनात कधीही नच ठेवावे
मनास होता जखम कोणती,
प्रेम दुज्याचे औषध व्हावे
दिनी आजच्या शुभमंगल पण, जीवनभर ते प्रेम जपावे
शुभमंगल जरी आज होतसे,
जीवनी सावधचित्त असावे
शुभमंगल या दिनी म्हणूनी,
सारे म्हणती सावधान,
शुभमंगल सावधान………
एका क्षणी भाळलात तरीही, जीवनभर तुम्ही सांभाळावे
क्षण एक पुरे तो तुटण्यासाठी, जीवनभर जे जुळवून घ्यावे
म्हणून सांभाळावे क्षण क्षण,
कायम सावधचित्त असावे
आज भरून घ्या आशिर्वचने,
जीवन सारे मंगल व्हावे
शुभमंगल जरी आज होतसे,
जीवनी सावधचित्त असावे
शुभमंगल या दिनी म्हणूनी,
सारे म्हणती सावधान,
शुभमंगल सावधान………
सहजीवनाच्या सुरुवातीलाच पुढे येणाऱ्या अनेक अडचणीच्या प्रसंगी समन्वयाची भूमिका घेऊन आयुष्य प्रेममय केल्यास रंगांची उधळण होत राहील. अर्थात हे सर्व तात्विक विवेचन ही वाटेल परंतु आमच्या पिढीच्या सर्वसामान्यांच्या जीवनातही विविध अडचणीचे संघर्षाचे प्रसंग येऊनही आज आमचे सहजीवन यशस्वी झाले असे लोक म्हणतात. परंतु प्रत्यक्ष जीवनाचा अनुभव घेताना काय घडत होते हे सुद्धा माझ्या एका कवितेत सांगितले आहे.
☆ अदृश्य बंधनातून ‘मुक्त’ होऊयात? ☆ डॉ. प्राप्ती गुणे ☆
… ” वाॅव ! सगळेजण किती छान डान्स करत आहेत… मी पण जाऊ का?…. नको राहू देत.”
… ” मला वाटतंय आज हा राणी पिंक ड्रेस घालूयात…. पण नको, जरा जास्तच भडक वाटायचा तो….. बघू, नंतर घालू पुन्हा केव्हातरी.”
… “आज असं वाटतंय की स्पा मध्ये जाऊन, छान रिलॅक्स व्हावं…पण नको, परीक्षा दोन महिन्यांवर आल्या आहेत.”
… “ढोल पथक पाहून मला एकदम भारावल्यासारखं वाटतं. किती जोशपूर्ण वातावरण निर्माण होतं. मीही यावर्षी ढोल पथकात भाग घेऊ का ? अरे… पण ऑफिसहून आल्यावर मला खूप दमून गेल्यासारखं होतं.”
प्रत्येक वेळी मनात एखादी कल्पना आली– की काहीतरी नवीन ‘ट्राय’ करून बघूयात, की त्याला क्षणार्धात ‘प्रत्युत्तर’ देणारा आवाज नेहमी हजर होतोच. आणि बऱ्याचदा तो नकारात्मक आणि डीमाॅरलायझिंग असतो ….. ” मला नाही जमणार, मला वेळ नाही, मला आता शक्य नाही, उगाच वेळ वाया जाईल ” …. वगैरे वगैरे…… या प्रत्युत्तरांची यादी कधीही न संपणारी आहे.
मला प्रश्न पडतो की हे सगळे मनाचे इन्स्टंट रिप्लाय नकारात्मक असतील तर आपण लगेच ऐकतो आणि कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टींचा पिच्छा पुरवणं लगेच सोडून देतो.
पण मन म्हणालं की –
… जा, डान्स कर !
… तो राणी पिंक ड्रेस घाल !
…. रिलॅक्स हो !
…. ढोल पथकात भाग घे !
तर आपण आपल्या मनाचं ऐकत नाही. आपल्याच मनामध्ये हे द्वंद्व सतत चालू असते आणि आपण त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत राहतो. आणि मग स्वतःच देवाकडे तक्रार करतो की मला जे हवं ते मला कधीच मिळत नाही.
मग ही अदृश्य बंधने कोणती आहेत जी आपल्याला आपलं मन म्हणते तसं जगण्यापासून अडवत असतात? आपल्याला हवे ते मिळवण्यापासून रोखत असतात ?…….
तर ही बंधने म्हणजे …… आपल्या मनात खोलवर रुजलेल्या ” गैरसमजुती “ !
नकळतपणे लहानपणापासून घडलेल्या काही गोष्टींचा, घटनांचा, समजुतींचा किंवा त्यावेळच्या काळानुरूप दिल्या गेलेल्या शिकवणुकींचा आपल्यावर खोलवर परिणाम घडत असतो. त्या गोष्टींचा इम्पॅक्ट जरी प्रत्यक्षात त्या क्षणापुरता घडून येत असला, तरी त्याचे परिणाम मात्र आपल्याही नकळत लाईफ-लॉन्ग आपल्या मनात रेंगाळत राहिलेले असतात. आणि प्रत्यक्ष आयुष्यात त्याच परिणामांचे दडपण आपण विनाकारण बाळगत राहतो… काळाबरोबर त्या पूर्वीच्या गोष्टींचे संदर्भ किंवा अन्वयार्थ नक्कीच बदलतात आणि ते आवश्यकही असते. पण आपण मात्र त्या पूर्वीच्या परिणामांच्या बंधनातून मनापासून बाहेर यायला उगीचच कचरत असतो. आता हेच बघा ना ….
जाता येता कोणीतरी तिसरा त्याला वाटलं म्हणून काहीतरी कमेंट पास करतो ….
… राणी पिंक कसा भडक रंग वाटतो….
… परीक्षा संपेपर्यंत मी रिलॅक्स होऊच शकत नाही…
… कंपनीचं काही सांगता येत नाही, आज सांगेल, उद्या कामावर येऊ नका… रिस्कच नको.
… सगळ्यांसमोर डान्स करायला जायचं आणि सगळेजण आपल्यावर हसायचे…
— आणि आपल्या मनात दडलेल्या अशाच काही गैरसमजुती अशावेळी नेमक्या आपल्या मनाला आत्ता मनापासून जे वाटतंय ते ऐकण्यापासून थांबवतात…. हीच ती मला अनेकदा जाणवणारी आणि विचार करायला अगदी भागच पडणारी बंधने …
परंतु ही बंधने शब्दशः ‘अदृश्य’ असल्याने आपल्याला ही प्रत्यक्ष दिसत नाहीत. आणि जे बंधन ‘प्रत्यक्ष’ दिसत नाही ते तोडणार कसं ना ? …हा एक बाळबोध प्रश्न स्वतःला विचारून आपण एक प्रकारे स्वतःची खोटी समजूत घालत असतो. बरोबर ना …
पण या प्रश्नाचे उत्तर मी सांगू ?…… मन जे म्हणते ते एकदा प्रत्यक्ष करून तर पहा ! आणि मग ही अदृश्य बंधने तुमच्याही नकळत तुटलीच किंवा तुटायला सुरुवात झाली असं नक्की समजा.
मग नुकत्याच साजऱ्या झालेल्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आपणही मनाच्या ह्या अदृश्य बंधनांतून “ मुक्त “ होऊयात ?….
… मनापासून प्रयत्न केला तर नक्कीच जमेल … Try n try n try … But never cry …
☆ मन शुद्ध तुझं ! – भाग-१ ☆ श्री संभाजी बबन गायके☆
… गोष्ट एका विशालहृदयी सैनिकाची !
नियतीने स्वर्गात बांधलेली त्यांची लग्नगाठ आता सैल होईल आणि सुटून जाईल, असं सर्वांनाच वाटलं होतं. किंबहुना त्याच्या काळजीपोटी त्याच्या आप्तांनी, मित्रांनी त्याला ‘ ही गाठ सोडवून घे ‘ असा सल्लाही दिला होता… जगाला व्यवहार जास्त प्रिय असतो आणि त्यात चुकीचंही काही नाही म्हणा !
पण हा पडला शिपाईगडी… शब्दाचा पक्का… इमान राखणारा! देशासाठी तळहातावर शीर घेऊन मरणाला सामोरं जाण्याची खरीखुरी तयारी ठेवणारा जवान !
लढाई सीमेवरची असो किंवा जीवनातली… दोन्ही आघाड्यांवर निष्ठा महत्त्वाची! प्रेमात आणि युद्धात सर्वकाही क्षम्य असतं असं म्हटलं जात असलं तरी त्याला प्रेमात कोणताही अपराध करायचा नव्हता !
त्याला ती अशीच योगायोगाने भेटली होती… सुंदर, सालस आणि मनमोकळी. पहिल्याच भेटीत त्यानं तिला आपलं काळीज बहाल केलं…. महिलांशी अत्यंत सुसंस्कृतपणे वागणारा रुबाबदार व्यक्तिमत्वाचा तो तिला भावला नसता तरच नवल! तिने त्याच्या हातात निर्धास्तपणे आपला हात दिला…. आणि ते दोघं आता एक झाले… प्रेमाच्या आणाभाका झाल्याच आणि या प्रेमाच्या या अलंकाराला व्यवहाराचं, समाजमान्यतेचं साखरपुड्याच्या गोडीचं कोंदणही लगोलग लाभलं… सीमेवरील कर्तव्ये बजावताना थोडेशी उसंत काढावी आणि लग्नबंधनात स्वत:ला बांधून घ्यावं, असं ठरलं !
मोहरलेल्या मनाची ती, आनंदाच्या वाटेवर अलगद चालत निघालेली.. पण कसा कुणास ठाऊक, त्या पावलांमध्ये शारीरविकाराचा काटा शिरला… विव्हल होऊन गेली ती. चालणारी पावलं आता कुणाच्यातरी आधाराची मिंधी झाली. कशी चालणार सप्तपदी? लोक म्हणाले… ‘ थांबव तुझा हा प्रवास. त्यालाही मोकळं कर या तुझ्यासोबतच्या प्रवासातून… त्याला त्याची एखादी वाट खुणावेलच कधी ना कधी तरी !’
तिलाही हे पटलं… आणि त्याला काही इलाजही नव्हताच की ! लग्न म्हणजे शरीराचा व्यवहार…. यात एक व्यंग आणि एक अव्यंग अशी जोडी विजोड. त्याच्या कानांवर सुद्धा हा आघातच होता… पण असे आघात पचविण्याची सवय असते सैनिकाच्या मनाला. तो म्हणाला… “आमचं लग्न झालं असतं आणि मी लढाईत माझे पाय गमावले असते तर तिने मला सोडले नसते… माझी खात्री आहे !”
तो सीमेवरून थेट आला आणि विवाहवेदीवर चढला.. ती विकल… असहाय… तो तिचे पाय झाला…. एकट्यानं अग्निप्रदक्षिणा केल्या… एक पाऊल त्याचे आणि एक तिचे. सातव्या पावलावर वधूने वराला वचन द्यायचे असते.. ‘मी तुझ्याशी माझे मैत्र अविनाशी ठेवीन… काहीही झाले तरी… आता आपली पावले जोडीने जीवनाच्या वाटेवर सुखाने मार्गाक्रमण करीत जातील !’
तिची पावले आता तर जमीनीला स्पर्शूही शकणार नव्हती…. पण तो म्हणाला… ‘ मी चालेन तुला कवेत घेऊन !’ आणि देव, ब्राम्हण, सगे-सोयरे यांच्या साक्षीने तिचा पत्नी म्हणून स्विकार केला….. आता चार पावलांचा प्रवास दोन पावलं करू लागली होती. दिवस फुलपाखरांची सोंगं घेऊन येतात… नकळत उडूनही जातात.
आठ महिन्यांत तिच्या शारीरविकाराने उसळी घेतली आणि निम्म्या देहाची आणि संवेदनांची ओळख कायमची पुसली गेली. हे तर निम्मं जगणं… अर्धाच श्वास घेणं जणू! पण तो तसूभरही डळमळला नाही! आता तिचे श्वासही तोच घेऊ लागला आणि तिच्या उरलेल्या देहात चैतन्य भरू लागला.
तो कुठंही एकटा जात नसे… ती सोबत पाहिजेच. त्याचा तसा आग्रहही असायचा. ती संकोचून जायची. त्याने तिची भीड चेपवली. लग्नसमारंभ, मेजवान्या, हॉटेल्स, भेटी-गाठी या सर्वांत तो तिला चाकांच्या खुर्चीतून न्यायचा… आणि वेळप्रसंगी तिचा भारही वहायचा… प्रेमानं ! बघणारे स्तिमित होऊन जायचे.. आणि तिचा हेवाही करायचे !
रंगरूप, तारूण्य, विचार, भावना आणि आर्थिक, सामाजिक स्थान यांच्यात तफावत पडत गेल्यावर एकमेकांपासून दुरावणारी, प्रसंगी खुशाल अनैतिकतेच्या मार्गाने जाणारी दांम्पत्ये पाहण्याची सवय झालेला समाज…. त्याला आश्चर्य होणारच! पण भारतीय सैन्यामध्ये महिलांचा सन्मान राखण्याची, जपण्याची शिकवण ही अंगभूत. सहकारी, अधिकारी त्याच्या ह्या दिलदारपणावर बेहद्द फिदा होते.
युद्धात पाय गमावलेला एखादा सैनिक जेंव्हा चाकांच्या खुर्चीवर बसलेला असतो, तेव्हा त्याच्या खुर्चीमागे त्याची पत्नी चालत असलेली पाहण्याचा अनुभव असलेले डोळे हे दृश्य बघून विस्फारले जायचे… आणि त्याच्याकडे मोठ्या आदराने बघत रहायचे…. तिला संकोचून जायला होऊ नये अशा बेताने… आणि ती सुद्धा आता सरावली होती !
दिवस म्हणजे पाखरं… उडून जाण्यासाठी खाली उतरलेली. तो सीमेवर गेला आणि कर्तव्यात गुंतला… आता त्याची दोन मनं होती… एक कामात आणि एक तिच्या आठवणींमध्ये रमलेलं.
तो असाच सुट्टीवर आला आणि त्याने तिला मनसोक्त हिंडवून-फिरवून आणलं! आणि त्याची सीमेवर जायची वेळ आली नेहमीप्रमाणे, आणि निघाला सुद्धा !
त्याला आता संघर्षरत सीमेवर कर्तव्यासाठी नेमलं गेलं होतं… ती मनातून घाबरली… तो म्हणाला होता ‘मी परत येईन! आधी नव्हतो का परतलो…. उंच पर्वतशिखरांवरून, मृत्यू भरलेल्या जंगलांतून आणि प्रत्यक्ष सीमेवरूनही? आपल्या घराजवळच नव्हती का काही महिने पोस्टींग मिळाली मला? तेंव्हा होतोच की सोबत! आता सीमांनी पुन्हा एकदा बोलावणं धा डलं आहे… जायला पाहिजे… राणी!’
आणि मेजर शशीधरन साहेब सीमेवर रुजू झाले. शत्रूने रस्त्यात सुरुंग पेरून ठेवलेले होते… त्यात आधीच आपले काही जवान जखमी झाले होते. अतिरेक्यांचा शोध घेऊन त्यांना ठार मारणं अनिवार्य होतंच. ही कामगिरी करण्यासाठी निघालेल्या गोरखा रायफल्सच्या पथकाचे नायक होते… मेजर शशीधरन नायर!… सर्वांच्या पुढे चालत होते. कामगिरीवर निघण्याआधी थोड्याच वेळापूर्वी फोनवरून आईशी बोलणं झालं होतं…!
☆ असा शिष्यवर होणे नाही…☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆
पुण्यातील धनकवडीचे योगी शंकर महाराज यांनी १९४७ साली समाधी घेऊन आपले प्राण पंचतत्वामध्ये विलीन केले. त्यांच्या भक्तांनी त्या काळात महाराजांचे शरीर पुण्यात सर्वत्र शेवटचे दर्शन करण्यासाठी फिरवले. आणि पदमावतीला आणले. तेथेच जमीन खणून महाराज यांचे शरीर त्या जमिनीत ठेवले. वरून माती टाकली. त्या मातीच्या ढिगाऱ्यावर हार व फुले होती.
जसा जसा अंधार पडायला लागला होता, तसे तसे सर्व भक्त आपापल्या घरी गेले. कारण त्या काळी १९४७ साली त्या धनकवडी भागात सर्वत्र मोठे जंगल होते. त्या जंगलात रानटी कुत्रे, वाघ आणी इतर जंगली प्राणी होते… त्यामुळे ‘ महाराजांची भक्ती करणे वेगळे आणि आपला जीव वाचवणे वेगळे. रात्री या जंगलात थांबणे योग्य नाही. महाराज गेले. त्यांचे शरीर आपण विधीवत पुरले. आता आपले काम झाले. शेवटी आपला पण संसार आहे,’ असा विचार करत हळूहळू सर्व जण निघून गेले.
रात्र झाली. त्या भयंकर जंगलात महाराजांच्या समाधीजवळ त्यांचा एक शिष्य थांबला होता.
त्या शिष्याने विचार केला की, जंगलात रानटी कुत्रे आहेत. रात्री त्यांनी जर महाराजांच्या समाधीवरची माती उकरून महाराजांचे शरीर बाहेर काढले आणि खाल्ले तर?
…आपल्या लाडक्या गुरूच्या शरीराची अशी दुर्दशा व्हायला नको. म्हणून तो शिष्य, तेथून घरी परत गेलाच नाही.
रात्री अनेक वेळा जंगली कुत्री आली. त्या शिष्याने त्यांना दगडी मारून पळवून लावले. तो शिष्य रात्रभर जागत जंगली प्राण्यांना न भिता तेथेच समाधीचे रक्षण करत राहिला… काय त्या शिष्याचे धाडस बघा.
तुम्ही जर फक्त एकच रात्र एकटे एखाद्या जंगलात.. जेथे रानटी कुत्रे व इतर जंगली प्राणी आहेत, त्यांना दगडाने हाकलत काढली तर तुम्हाला कल्पना येईल की, त्या शिष्याने काय धाडस केले होते.
दुसरे दिवशी सकाळी त्याने विचार केला की, आता आपल्याला महाराजांच्या समाधीचे रक्षण करण्यासाठी येथेच कायमचे थांबले पाहिजे. त्याने तसा निश्चय केला. तो तेथेच थांबला.
त्या शिष्याने एक दोन दिवस नव्हे तर तब्बल पंचवीस वर्षे महाराजांच्या समाधीची राखण करत राहीला.
त्याबद्दल त्याला कोणी दरमहा पगार देत नव्हते. की खायला अन्न ही देत नव्हते. पण त्याला कशाचीच अपेक्षा नव्हती. त्याबद्दल त्याला कोणी पुरस्कार देणार नव्हते की, चार पैसे मिळणार नव्हतेच. पण केवळ गुरू वरच्या अफाट प्रेमासाठी आणि आपल्या गुरूच्या शरीराची जंगली प्राण्यांनी दुर्दशा करू नये म्हणून तो तेथेच थांबला होता.
भूक लागली की, त्या जंगलात दुरवर कोठे तरी चार पाच घरे होती, त्या घरात जाऊन भिक्षा मागायची. ती माणसे जे देतील ते समाधानाने घ्यायचे, आणि परत महाराजांच्या समाधीजवळ यायचे. सात आठ दिवस झाले. इकडे त्या शिष्याची बायको, नवऱ्याला सगळीकडे शोधायला लागली. तिला काळजी पडली की, आपला नवरा घरी का आला नाही? कुठे गेला? ती बिचारी नवऱ्याला शोधत शोधत महाराजांच्या समाधी जवळ आली. तर तिने पाहिले की, आपला नवरा वेड्यासारखा एकटाच त्या समाधीजवळ बसून आहे. तिने नवऱ्याला घरी परत येण्यासाठी विनवले. पण त्या शिष्याने घरी परत यायला नकार दिला.
आपला नवरा आता ऐकणार नाही हे त्या माऊलीच्या लक्षात आले. तेव्हा त्या माऊलीने पण त्याच्याबरोबर समाधीजवळच राहण्याचा निर्णय घेतला. त्या गुरूवेड्या शिष्याची ती पतिव्रता साधीभोळी बायको, तिने विचार केला की, जेथे माझा नवरा राहील तेथेच मी पण रहाणार.
… ती घरी जाऊन थोडीफार भांडी घेऊन आली. दोघांनी तेथेच छोटीशी झोपडी उभी केली. आणि तेथेच राहू लागले….. आपल्या गुरूच्या समाधीची राखण करणारा तो वेडा शिष्य आणि त्या शिष्याची काळजी करणारी त्याची वेडी पतिव्रता बायको.
उन्हाळ्यात महाराजांच्या समाधीला ऊन लागू नये म्हणुन त्याने छत्री दिवसभर धरली, तर पावसाळ्यात पाण्याचे लोटच्या लोट यायचे. तेथे त्या काळी भरपूर उतार होता. त्या पाण्याच्या लोटाने समाधीवरची माती वाहून जाऊ नये म्हणून, तो वेडा शिष्य त्या समाधीच्या वरच्या भागावर आडवा झोपायचा. वरून पडणारा प्रचंड पाऊस, वरून वेगाने येणारे पाण्याचे लोट, त्या शिष्याने आपल्या अंगावर घेतले, पण गुरूच्या समाधीला काही होऊ दिले नाही.
…. आणि असे एक दोन नव्हे तर तब्बल पंचवीस वर्षे !
काही दिवसांनी महाराजांचे काही शिष्य तेथे समाधीचे दर्शन घ्यायला आले होते. त्यांनी पाहिले की, तो शिष्य समाधीची राखण कशी करत आहे ते? मग त्यांनी एकत्र येऊन समाधीभोवती विटांचे बांधकाम केले. वरून पत्रा टाकला.
हळूहळू काळ बदलला. तेथे जंगल कमी होऊन माणसे रहायला आली.
पंचवीस वर्षानंतर आपल्याला आता जे मंदिर दिसत आहे. ते मंदिर उभे राहिले.
कशाचीच अपेक्षा न करता आपल्या गुरूच्या समाधीची राखण करणारा तो वेडा शिष्य होता ……
प.पू .बाबुराव रूद्रकर !
हा लेख जे वाचत आहेत त्यांना पदमावतीचा सातारा रोडवरील महाराज यांची समाधी असलेला मठ माहीत असेल. पण त्यांच्या समाधीची पंचवीस वर्षे राखण करणाऱ्या बाबुराव रूद्रकर यांचा ‘ रूद्र शंकर मठ ’ भारती हॉस्पिटलजवळ आहे. हे माहित नसेल.
जी माणसे शंकरमहाराज यांना नावे ठेवतात, त्यांनी या रूद्कर यांच्या पंचवीस वर्षाच्या सेवेचा जरूर विचार करावा. शंकर महाराज हे दिव्य पुरुष होते. त्यांनी खुप चमत्कार केले. ते चमत्कार रूद्रकर यांनी स्वतः पाहिले. अनुभवले. रूद्रकर यांच्या लक्षात आले की, हा माणूस वेडा नाही तर खूप मोठा योगी आहे. यांच्याकडे दैवी शक्तीचे अस्तित्व आहे. म्हणूनच रूद्रकर यांनी शंकर महाराज यांना गुरू मानले. आणि त्यांच्या समाधीची पंचवीस वर्षे राखण केली.
बाबुराव रूद्रकर यांनी १९८५ मध्ये आपला देह ठेवला.
धन्य ते गुरू शंकर महाराज आणि धन्य ते शिष्य बाबुराव रूद्रकर ….
असा गुरू होणे नाही.. आणि असा गुरूवर अफाट प्रेम करणारा शिष्यही होणे नाही.
संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
भावना त्याच पण माझ्या नजरेला त्याचे बदलणारे स्वरूप जाणवले.
बालपणीचे रक्षाबंधन म्हणजे मज्जा!महत्वाचे म्हणजे शाळेला सुट्टी.नारळाचे पदार्थ खाणे.घरी येणारे आणि लाड करणारे मामा.आणि मामा घरी आल्यावर आमच्या खोड्यांना उधाण!एक दिवस मोठ्यांच्या शिस्तीतून सुटका.
हळूहळू या सणाचे महत्व लक्षात येऊ लागले.पण त्यातील गंमत होतीच.पण वय वाढले तसा एक वेगळाच जाच सुरु झाला.आणि राखी पौर्णिमा नावाचा निबंध रुपी त्रास उभा राहिला.बरं माझी गंमत अशी व्हायची की मला वाटायचे जसा सण साजरा केला तसे लिहायचे.आणि फजिती व्हायची.एकंदरीतच साहित्य,कल्पना विस्तार,रसग्रहण यातील माझी बालबुद्धी काही मोठी झाली नाही. त्यामुळे संदर्भा सहित स्पष्टीकरण या बाबत पहिल्या पासून मी सलाईन वरच असते.तर ज्यांच्या निबंधाला शाबासकी मिळायची ते जग जिंकल्याच्या आनंदात असायचे.आणि यांनी निबंधात लिहिलेले केव्हा घडले,किंवा यांनी हा सण असा कधी साजरा केला याचा विचार मी करत रहायची.मग एका मैत्रिणीने सांगितले त्यात कल्पना असतात.माहिती असते.काही गाण्याच्या ओळी असतात.मग तो निबंध छान होतो.हे समजले आणि माझा निबंध म्हणजे समालोचन आहे हे समजले.
जसे जसे वय मोठे होत गेले तसे सणाची तयारी.त्यातील अडचणी लक्षात येऊ लागल्या.आणि विविध वाचन,मिळणारी माहिती यातून रक्षाबंधन याचा अर्थ कळू लागला.
अजून एक बाल मनाला पडलेला प्रश्न असा होता की इतकी सुंदर राखी असते मग त्याला बंधन का म्हणायचे?आणि दुसऱ्यावर असे बंधन का टाकायचे?मग त्यात आनंद कसा?आणि भाऊ लहान असेल तर तो बहिणीचे रक्षण कसे करणार? ज्यांना भाऊच नाही त्यांचे काय?
मग वाचनातून, मोठ्या माणसांकडून याची उत्तरे मिळाली..
ते मायेचे,प्रेमाचे बंधन आहे.कोणतीही गोष्ट थोड्या बंधनात असेल तर ती योग्य वाटेने जाते आणि आनंद देते.जसे नदीला काठ,बांध गरजेचे असतात नाहीतर ती विध्वंस करेल.शाळेतील विद्यार्थ्यांना पण शालेय बंधने आवश्यक असतात.वाद्यांवर पण काही बंधने,ताण असेल तरच ती सुरात वाजतात.
या सणातून दोन व्यक्तींमध्ये एक नाते निर्माण होते.असलेले दृढ होते.आणि आपण एकमेकांच्या वेळेला उपयोगी पडायचे आहे याची जाणीव टिकून राहते.जरी हा सण बहीण भाऊ यांचा मानत असले तरी रक्षणकर्ता कोणीही असू शकते.तिथे नाते,वय असा भेदभाव नसतोच.एक मानसिक आधार असतो.
आम्ही आमच्या शाळांमध्ये हा मोठ्या उत्साहात साजरा करतो.त्यामुळे शाळेतील मुलांमध्ये न कळत संस्कार होतात.सैनिक हॉस्पिटल मध्ये जाऊन तेथील सैनिकांना राखी बांधतो.त्या मुळे आपले खरे रक्षक त्यांना समजतात. आणि शाळेतील झाडांना पण मुले राखी बांधतात.त्या मुळे निसर्ग आपला सोबती,रक्षक आहे व आपण त्याचे जतन,रक्षण केले पाहिजे ही भावना वाढीस लागते. बहुतेक सगळे देवाला राखी बांधतात.आम्ही बहिणी एकमेकींना राखी बांधतो.
तर माझ्या दृष्टीने मज्जा ते व्यापक जबाबदारी, भावना अशी अनेक रुपे रक्षाबंधन याची समोर आलेली आणि अनुभवलेली आहेत.
न बदललेली मात्र एकच गोष्ट अनुभवली आहे,ती म्हणजे आकाशवाणी वर लागणारी हिंदी,मराठी गाणी तेथील गाणी लावणारे बदलले किंवा गायक निवर्तले आहेत.पण प्रसारित होणारी गाणी मात्र त्रिकालाबाधित आहेत.
असे हे बंधन मनापासून स्वीकारु या.आणि कोणाचा तरी मानसिक आधार बनू या.
योग थेरपिस्ट – आजपर्यंत योग या विषयावर ६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
मनमंजुषेतून
☆ प्रिय परमेश्वरा… ☆ सौ. अंजली धडफळे ☆
प्रिय परमेश्वरा!…
दंडवत प्रणाम
‘तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम ‘ …. खरंच तुझ्यामुळे हा जीवनाचा प्रवास चालला आहे. तुझी रुपं तरी किती ! अगाध आणि अफाट !!
परमेश्वर – देव आहे की नाही, तर ‘ आहेच ‘ असं उत्तर येतं.
कारण या जीवनरुपी सागरात नौका घातली… आणि आता पैलतीर जवळ येऊन ठेपला… हे कोणी केले... तूच केलेस रे परमेश्वरा ! देवा ! तूच ताकद देतोस.
काल माझी नात म्हणाली, ‘God is there or not I don’t know. But I feel God.’ एवढ्या छोट्या मुलीला देव आहे का नाही कळत नाही, पण तो कळतोही. मी तिला म्हटलं, ‘ तू मोठी झालीस ना, की तुला कळेल देव आहे का नाही. ‘
तुझ्या परवानगीशिवाय झाडाचे एकही पान हलू शकत नाही. तू ब्रम्हांडात आहेस, पिंडात आहेस, पंचमहाभूते तुझ्यामुळे निर्माण झाली. मग दर्शन का देत नाहीस? ही सृष्टी हेच तुझे दर्शन मानायचे ना!
कर्ता करविता तूच आहेस. `दळिता कांडिता तुज गाईन अनंता |`
सोमवारी तू शंकर भगवान असतोस, मंगळवारी दुर्गा माता, बुधवारी पांडुरंग, गुरुवारी दत्त महाराज, शुक्रवारी तुळजाभवानी, शनिवारी वीर मारुती, रविवारी खंडोबाराया. कोणत्याही रूपात असलास तरी तुझं दर्शन विलोभनीय आहे, हेच खरं.
किती दिवस सगुणाची उपासना करायला लावणार? निर्गुणाकडे जायचंय. द्वैत सोडून अद्वैताची साधना करायची आहे. त्यासाठी तूच हवास बळ यायला.
ईश्वरीय भक्ती अगाध, अनाकलनीय आहे. तुझ्या दर्शनाचा तुझा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू झालीये. त्यातही तूच साथ देतोस, देणार आहेस.
शब्देविण संवादू अशी तुझी भाषा. शब्दांशिवाय पण तुझं असणं कळतं बरं का !
घराबाहेर पडताना मी तुला नमस्कार करते व म्हणते,
‘देवा माझ्याबरोबर चला !’
‘गातांना देवा माझ्या गळ्यात या !’
‘चालताना देवा माझ्या पायात या !’
‘खाताना देवा जेवायला या माझ्याबरोबर !’
‘झोपताना देवा उद्याची सकाळ प्रेरणादायी होण्यासाठी रात्रभर माझ्याजवळ राहा !’
लिहिताना हातात, शिकवताना गळ्यात रहा असे म्हटले की तुझी जाणीव प्रकर्षाने होते…. असे म्हणत राहण्यासाठी ताकद दे. दर्शन दे.
☆ वि. स. खांडेकर स्मृतिदिनानिमित्त – आठवणींची सांजवात… भाग-२ ☆ श्री कचरू चांभारे ☆
भाऊ माझे अतिशय आवडते लेखक आहेत. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी लिहिलेल्या सांजवात या कथासंग्रहाचा परिचय करून देत आहे. भाऊंचे लेखन म्हणजे जीवनाचा वास्तववाद. लेखन हे काल्पनिक असले तरी ते वाचताना, हे कथानक भोवताली घडले आहे असे वाटत राहते.
सांजवात: लेखक वि.स.खांडेकर
प्रथम आवृत्ती 1948
प्रकाशक.. मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे
या कथासंग्रहात एकूण सात कथा आहेत.
1.तीन जगे
2.शिखर
3.दोन मोसंबी
4.शांती
5.सोन्याची गाडी
6.दोन भुते
7.सांजवात
यापैकी शांती, शिखर व दोन भूते या तीन रूपक कथा आहेत.
तीन जगे : …
समाजातील तीन वर्ग म्हणजे खांडेकरांनी मांडलेली ‘ तीन जगे ‘ ही कथा होय. श्रीमंत वर्ग ,कनिष्ठ वर्ग व मध्यमवर्ग असे तीन वेगवेगळे विश्व आहेत. आजही या तीन वर्गात फार मोठी तफावत आहे. ती पुढे कधी भरून येईल असं वाटत नाही. या कथेत शेटजी नावाचे एक पात्र आहे. हा कथासंग्रह लिहिला तेव्हा गांधीयुग होते. त्यामुळे गांधीजींची शिकवण कथासंग्रहात डोकावते आहे. कथेतील शेटजी गांधीजींच्या व्याख्यानाला जातात, पुतळा उभारण्यासाठी सढळ हाताने मदत करतात. रोशन नावाच्या आपल्या रखेलीवर वारेमाप खर्च करताट., पण एका हरिजन विद्यार्थ्यास शिकायला पैसे देत नाहीत. यालाच म्हणतात खायचे दात वेगळे व दाखवायचे वेगळे. समाजातही अशाच रूपाची अनेक माणसे दिसून येतात. मयत झालेल्या व्यक्तीस खांदा द्यायला पुण्य समजतात, श्रदांजली लिहिताना भावूक होतात, पण नियातीपुढे हतबल झालेल्या जिवंत माणसास टेकू देण्यास असमर्थतता व्यक्त करतात.
दोन मोसंबी :
दुःख मांंडताना वेदनेच्या भळभळीलाही फुलांच्या महिरपीत सजवावं .हे भाऊंचे वैशिष्ट्ये .दोन मोसंबी ही कथा वाचताना अश्रू येतात.या कथेचा नायक एक कवी आहे.कवीची भाची आजारी असते.तिला दोन मोसंब्या हव्या असतात.पण जगाचं सुख दुःख मांडणा-या शब्दानं श्रीमंत असलेल्या कवीच्या खिशात दमडीही नसते.खिशात एखादा आणा सापडतो का ? हे चाचपण्यासाठी कवी खिशात हात घालतो ,तर खिशात पैसा नव्हताच पण कविता लिहिलेला एक कागद सापडतो.कवितेवर काही पैसे मिळतील व भाचीसाठी मोसंबी घेता येईल म्हणून कवी संपादक ,चित्रपट व्यावसायिक यांच्याकडे जातो.कुठेही पैसा मिळत नाही पण अवहेलना मात्र खिसाभरून मिळते.इकडे आजारी भाचीला झोप लागते.झोपेतच तिला दोन मोसंब्या मिळाल्याचं स्वप्न पडतं.अन् या स्वप्नाच्या बळावरच ती ठणठणीत बरी होते.स्वप्नावरचं जीणं म्हणजे गरीबीचं आवसान होय.मूळ कथा आपण वाचावी.
सोन्याची गाडी :
ही कथा मूल्य पेरणारी कथा आहे. कथेचा नायक दादासाहेब लहाणपणी चोरी करतो. दादासाहेबांचे वडील त्यांना खूप मारतात. पण रात्रीच्यावेळी सगळे झोपलेले असताना वडील ढसढस रडत असतात. उरातला बाप अंधारात उफाळून आलेला असतो. स्फूंदण्याचा आवाज ऐकून बालपणीचे दादासाहेब उठून वडिलांजवळ येतात. लेखकाने बाप-लेकातील रंगवलेला संवाद कोण्याही काळातील बापलेकाची भाषा आहे. तो संवाद म्हणजे अमर उपदेश आहे. मुलाने चोरी केल्याचे कळताच हवालदिल झालेल्या बापाच्या मनात येतं.. गुलाबाच्या झाडाला कुठून कीड लागते कळत नाही. पण कीड लागल्याचे कळताच त्याच्या फांद्या वेळीच छाटाव्या लागतात नाहीतर झाड मरून जातं. वडील मुलाला सांगतात … विकाराची वाळवी मनाला लागली की पोखरलेल्या मनामुळे आयुष्य भंगूर व्हायला वेळ लागत नाही.
सांजवात :
कथासंग्रहाचे शीर्षक असलेली सांजवात ही या पुस्तकातली शेवटची कथा. देशभक्ती ,ध्येय व तत्व यांची सांगड म्हणजे सांजवात. सांजवात कथेचा नायक दिनकर गांधीजींच्या विचाराने भारावलेला आहे. तो स्वतः नास्तिक आहे. पण त्याची आई दररोज तुळशीवृंदावनापुढे सांजवात लावत असते. आई म्हणजे दिनकरचा गुरूच. सांजवात लावण्यामागचे कारणही आई त्याला सांगत असते, पण दिनकरला ते पटत नाही.1942 च्या क्रांतिकारी आंदोलनात तो सक्रीय सहभागी असतो. गांधीजींच्या विचाराने तो भारावलेला असतो. पण आईला व भावाला त्रास होऊ नये म्हणून तो माफीचा साक्षीदार व्हायचे ठरवतो. आईला याची कुणकुण लागताच ती त्याला जे सांगते त्या मातृपदेशाला तोडच नाही. मॕक्झिम गॉर्की लिखित आई कादंबरीची आठवण व्हावी असा तो प्रसंग आहे. आई दिनकरला म्हणते .. “ बाळा असं कृतघ्न होऊ नकोस. देशासाठी तू फासावर जा.” … खरं तर असे सर्वच संवाद मूळ कथेत वाचायला हवेत. .
आईचा काही दिवसानंतर मृत्यू होतो. आईच्या मृत्यूनंतर नास्तिक असलेला दिनकर उठतो व तुळशी वृंदावनासमोर सांजवात लावतो. ती वात म्हणजे आपली आईच आहे,असं त्याला वाटत असते. आईच्या मृत्यूनंतर तो दररोज सांजवात लावतो.
… भाऊंनी जे जे लिहिलं ते अमर ,अभिजात आहे. भाऊंनी लिहिलेल्या साहित्यावर एकूण २८ चित्रपट निघाले आहेत. देशातील व परदेशातील काही भाषांत त्यांची पुस्तके अनुवादित झालेली आहेत.ही गोष्ट त्यांचे अलौकिकत्व सिद्ध करते.
आज भाऊंचा स्मृतिदिन. स्मृतिदिनी भाऊंना विनम्र अभिवादन करताना एक गोष्ट सांगण्यास मला स्वतःचाच अत्यंतिक अभिमान वाटतो की भाऊंनी लिहिलेल्या सर्व कादंब-या ,तीन कथासंग्रह मी वाचलेली आहेत. पण एकही नाटक न वाचल्याची खंत आहे हेही तितकेच खरे.
मॉर्निंग वॉकवरून येताना गणपती मंदिरा जवळ रथ बाहेर काढलेला बघून एकदम मन आनंदाने उसळले.एक नवचैतन्य सळसळले.का बरं असं होत असावं ?माझाच मला मी प्रश्न विचारला.एखादी गोष्ट आपल्या बालपणाशी निगडित असली की आपण खूप आनंदी होतो.कारण त्या गोष्टीमागे,गोष्टीसोबत बऱ्याच घटना,बऱ्याच आठवणी निगडित असतात.एखादी मोत्यांची माळ सुटत जावी तशी आठवणींची लड सुटत राहते न आपण प्रफुल्लित होतो.उत्सव म्हणलं की चैतन्य,उत्साह,आनंद,परंपरा,ऊर्जा आणि गजबज.कोणताही सार्वजनिक उत्सव माणसांनी याचसाठी चालू केला की दररोजच्या त्याच त्या रुटीन मधून वेगळेपणा जगावा,सर्वांनी एकत्र येऊन आनंदी क्षणांची देवाणघेवाण करावी आणि जगण्यासाठी नव ऊर्जा प्राप्त व्हावी.मरगळलेपणा जाऊन उत्साह यावा,नवचैतन्य यावे.वेगळा आहार- विहार करावा अन अगदी सर्वच तळागाळातील शेवटच्या घटकाचे समाजमन देखील आनंदी व्हावे.
गणेश चतुर्थी आली की तासगाव संस्थानच्या गणपती मंदिरातला गणपतीचा तीन मजली लाकडी रथ बाहेर काढला जातो व स्वच्छ केला जातो.गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी खूप मोठी यात्रा भरते व या रथातून श्रींची मिरवणूक काढली जाते.त्यासाठी पंचधातूच्या धातूची मूर्ती मंदिरातून बाहेर काढली जाते.
उत्सवाच्या अगोदर ठिकठिकाणी गणपती मूर्तींचे स्टॉल लागले जातात.वेगवेगळ्या आकाराच्या,रूपाच्या,रंगांच्या आकर्षक लोभस मूर्ती पाहून मन हरखून,भान हरपून जाते.सजावटीच्या वेगवेगळ्या साहित्याचा बाजार भरतो.
श्रीमंत भाऊसाहेब पटवर्धन गणपतीपुळेच्या सिद्धी विनायकाचे निस्सीम भक्त होते.त्यांना गणपतीने दृष्टांत देऊन तासगावचे मंदिर बांधून घेतले व पूजा करायला सांगितले.त्यानुसार त्यांनी तासगावात सांगली रस्त्यावर पूर्वाभिमुख मंदिर बांधले.इथला गणपती उजव्या सोंडेचा असून तो नवसाला पावतो असा समज आहे.मंदिराच्या पुढं दाक्षिणात्य पद्धतीची गोपुरे आहेत.सम्पूर्ण बांधकाम विशिष्ट दगड-चुन्यातील असून स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे.राजवाड्यातील दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जना प्रित्यर्थ इथे मोठी रथयात्रा भरते.कोरोनाची दोन वर्षे सोडली तर अखंड अडीचशे वर्षांची परंपरा इथल्या यात्रेला आहे.
रिमझिम पाऊस,उन्हाचे मधूनच डोकावणे,हिरवेगार पीक,कडधान्याची काढणी,मळणी,विशिष्ट प्रकारचे गवततुरे,गवतफुले,भिरभिर रंगीत फुलपाखरे,वातावरणातील अनामिक चैतन्यआणि त्यासोबत येणारा गणपती उत्सव आणि त्या अनुषंगाने होणारी लगबग मला बालपणीच्या सगळ्या आठवणीत घेऊन जाते.
उत्सव…गणेश प्रतिष्ठापना,त्यासाठी लागणारी पाने,फुले..मग घरोघरी गौरी,त्यासाठी लागणारा फुलोरा शोधण्यासाठी सगळ्या गावंदरी पालथ्या घालणे,गौरींची घरोघरींची सजावट बघायला जाणे,सार्वजनिक मंडळाचे देखावे बघायला जाणे,त्यांनी ठेवलेले फुकटचे पिक्चर बघायला जाणे,गौरींचे कान उघडायला काटवटी, पराती जोरजोरात करकर वाजवणे,जत्रेसाठी घरोघरी पाहुण्यांचे आगमन सर्वच आठवते न मन उल्हसित होते.
आमच्या गल्लीत रमेश (आमच्या भाषेत रमशा)गणपती करतो अगदी दहावीत असल्यापासून त्याने शाडूच्या मूर्ती बनवायला सुरुवात केली.बेंदराच्या अगोदरच तो माती भिजवून चिखल करून मूर्तीच्या तयारीला लागायचा.दुपारी शाळेतून आलं की तो मूर्ती बनवताना,रंगकाम करताना आमचे तास न तास हरवणे सगळं आठवतेय.लहानपणी गणपतीची सर्वात लहान मूर्ती सव्वा रुपयाला मिळायची.रात्री आणायला गेलं की मग एकच रुपयाला.सव्वा दोन रु,पाच रुपये,दहा रुपये अशी मूर्तींची किंमत असायची.सर्वात महाग गणपतीमूर्ती पंचवीस रुपयाला मिळायची.
पण सर्वजण घरोघरी लहान मूर्तीच आणत.खरेतर दिवळीपूर्वीचे सर्व सण निसर्गाच्या वेगवेगळ्या रुपांच्या संगतीने पार पडतात;अर्थात भौगोलिक परिस्थितीनुसार मग देवाला नैवेद्यही तसाच शेती भातीशी निगडित असतो.आमच्याकडे गौरीला शेपूची भाजी आणि ज्वारीच्या भाकरीचा नैवेद्य असतो.पाच दिवस घरोघरी आरती करायला जायचे.चुरमुऱ्याचा प्रसाद खायचा.दोन दिवस सलग सुट्टी असायची.ओढे,विहिरी,तळी जिकडे तिकडे पाणी असायचे.पाचव्या दिवशी विहिरीत ओढ्यात घरगुती गणपतीचे विसर्जन करून मनात अपार उत्साह भरून माणसे आपापल्या कामाला लागायची.घरातून एखादा माणूस गावाला गेल्यासारखे जीवाला हुरहूर लागायची गणपती विसर्जनानंतर.
आता काळ बदललाय.साधेपणा जाऊन दिखाऊपणा आलाय,सार्वजनिक मंडळाचे स्वरूप देखील बदललंय. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती,रासायनिक रंगामुळे उरल्या सुरल्या स्वच्छ पाण्याचे साठे प्रदूषित होत आहेत. नद्या,तलाव प्रदूषित होत आहेत,पण त्याची कुणाला फिकीर नाही.जो तो आपापल्या नादात आहे.
मला निसर्गाबरोबर रहायला आवडते.आम्ही आम्हाला परवडेल अशी शाडूची मूर्ती आणतो.यावर्षी तर ठरवलंय की पुढील वर्षी धातूची मूर्ती आणायची अन तीच पुजायची.मातीचा छोटा गणोबा कुंभारवाड्यातून आणून सोबत त्याचेही पूजन करायचे व त्याचेच विसर्जन करायचे.
आराशीला तर आम्ही कधीच थर्माकोल वापरत नाही त्यामुळं दिव्याची रोषणाई आणि कृत्रिम फुलांच्या माळा वापरून परत ते सर्व काढून बांधून ठेवतो.
तुम्हालाही एक विनंती.जमले तर शाडूचीच मूर्ती आणा आणि पर्यावरण रक्षणात खारीची भूमिका बजवा.येणारा गणेशोत्सव तुम्हा सर्वांना आनंददायी,आरोग्यदायी ठेवो हीच मंगल, शुभ कामना.