अनावश्यक रुढी-रिती-रिवाज, परंपरा लादल्या गेलेल्या, उपास-तापास मुकाटयाने सहन कराव्या लागणाऱ्या,.. अंधःश्रद्धेच्या जोखडात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीचा तुम्ही आवाज होता..!
तुम्ही देव वा देवावरची लोकांची श्रध्दा कधीच नाकारली नाहीत. तरीही तुमची भीती वाटली इथल्या काहींना.
विवेकनिष्ठ, विज्ञानवादी समाजाचं स्वप्न तुम्ही पाहिलं..सर्वांना दाखविण्याचा प्रयत्न केला..!
त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त दुःख झालं… तुम्ही गेल्यावर..!
तुम्ही कळला नाहीत, रुचला नाहीत, पचला नाहीत,
तुमची भीती वाटली म्हणून तुम्हाला गोळ्या घातल्या गेल्या..!
….. पण .. .. कितीही गोळ्या घातल्या तरी तुम्ही मरणार नाहीत.
कारण गांधी, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश
मरत नसतात… हेच त्यांना कळत नाही.
विचारांची लढाई विचारांनी लढणाऱ्या प्रत्येक माणसांत तुम्ही आहात..तुमच्या विवेकनिष्ठ विचारांनी, तुम्ही केलेल्या प्रत्येक परिवर्तनवादी लढाईतील आठवणीत तुम्ही जिवंत आहात…
☆ वि. स. खांडेकर स्मृतिदिनानिमित्त – आठवणींची सांजवात… भाग-१ ☆ श्री कचरू चांभारे ☆
2 सप्टेंबर हा दिवस वि. स. खांडेकर यांचा स्मृतिदिन. विष्णू सखाराम खांडेकर म्हणजे मराठी साहित्यातला कोहिनूर हिरा.एका शब्दाच्या स्पष्टीकरणासाठी त्या शब्दाला उपमानाचे विविध अलंकार चढवून ,इंद्रधनूची कमान सजवून तो शब्द मांडावा तो खांडेकरांनीच. वि.स.ना भाऊ या नावाने संबोधत असत, पण हेच भाऊ साहित्यातला ‘ दादा ‘ माणूस होता ,बाप माणूस होता.
ऊंचा जन्म कोकणातला .आजोळचं राहणं एका गणपती मंदिरातलं. गणपती मंदिरातच त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांचे नाव गणेश ठेवले होते. गणेश आत्माराम खांडेकर हा बालक शाळेत खूप हुशार होता. वडिलांचं छत्र जास्त दिवस मिळालं नाही. बाल गणेश जेमतेम बारा तेरा वर्षाचा असतानाच वडील सोडून गेले. मामाच्या मदतीने त्यांनी उच्च शिक्षण घेतले. 1913 साली ते मॕट्रिक उत्तीर्ण झाले तेव्हा अहमदाबाद ,बेळगाव,मुंबई या बोर्डातून ते पहिल्या दहात होते. वाचन व लिहिण्याची त्यांना खूप आवड होती.सोळाव्या वर्षीच त्यांनी ‘ रमणीरत्न ‘ नावाचे नाटक लिहिले होते.त्यावेळचे प्रख्यात नाटककार वासुदेवा शास्त्री त्यांना म्हणाले होते की ,’ हे नाटक तू लिहिले आहेस.यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही.’ ते नाटक म्हणजे उत्कट प्रेमाचा आशय होता.हे नाटक प्रकाशित होऊ शकले नाही.
शिरोडे जि.सिंधुदुर्ग येथे भाऊंनी जवळपास अठरा वर्षे शिक्षक म्हणून काम केले. ययाति,अमृतवेल वगळता त्यांच्या अनेक साहित्यकृती शिरोड्याच्या शाळेतच जन्माला आल्या. ‘ हृदयाची हाक’ ही पहिली कादंबरी लिहिली व भाऊ थेट ज्ञानपीठापर्यंत पोहचले. साहित्य क्षेत्रातलं सर्वोच्च मानाचं पद स्वीकारत असताना त्यांच्या पूर्णतः दृष्टीहीन डोळ्यात सगळा जीवन चित्रपट उसळला असेल. वडिलांच्या मृत्यूनंतर ते खूप पोरके झाले होते. मामा वगळता जवळच्या नात्यातून कोणाची मदत होत नव्हती. त्यांचे चुलते सखाराम यांनीही मदत नाकारली होती. या सखारामला चौदा अपत्य होऊनही फक्त एकटी वारणाक्का जिवंत होती. पुढे याच सखारामने वारसा चालविण्यासाठी गणेशला दत्तक घेतले व हा गणेश म्हणजेच तिथून पुढचा विष्णू सखाराम खांडेकर होय. वारणाक्का बहिणीने दिलेले भाऊ हे कौटुंबिक नाव त्यांना आयुष्यभर चिटकून राहिले.
भाऊंनी अमर्याद लेखन केले. लेखनाचे विषय व त्या विषय अनुषंगाने उभी केलेली पात्रे अजरामर झाली.
‘रिकामा देव्हारा‘ ही त्यांची कादंंबरी स्त्रीचे महत्व सांगणारी आहे. ज्या घरात स्त्रीस देवतेसमान मानले जात नाही, ते घर म्हणजे रिकामा देव्हाराच होय. एवढ्या एका ओळीवरून कादंबरीच्या विषयाची प्रचिती येते. ‘ जळलेला मोहर ‘ मांडताना त्यांनी स्वप्नभंग झालेल्या स्त्रीची कथा मांडली आहे.’ अश्रू ‘ कादंबरीचा नायक म्हणजे शिक्षकी व्यवसायतल्या गुरूजीच्या तत्वनिष्ठेचा उत्कृष्ट नमुना होय.
लहानपणीपासूनच प्रकृतीने कृश असलेल्या खांडेकरांना उत्तम प्रकृतीमानाचे स्वास्थ्य लाभले नाही. दोन्ही डोळे अधू होते .कणकण व अंगातला ताप तर कायम पाचवीला पुजलेला. शिरोडे येथे कार्यरत असताना एकदा सर्पदंशही झाला होता. वाढत्या वयानुसार डोळ्याचा नंबरही वाढत गेला.1972 साली भाऊंच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करावी लागली. दुर्दैवाने शस्त्रक्रिया अयशस्वी ठरली व जगाला शब्दसूर्याचा प्रकाश देणारा हा शब्दमहर्षी कायमचा अंधकारमय झाला. चार लेकरं पदरात देऊन पत्नीनेही जाण्याची घाईच केलेली होती. जीवापाड जपलेली उषा ,अर्ध्या वाटेतच काळोख करून गेली होती. पत्नीवियोगानंतरचं आयुष्य अत्यंतिक खडतर असतं. पत्नी उषाताईच्या अकाली जाण्याने भाऊ खचले होते .वाचन व लेखन या दोन शक्ती त्यांच्या प्राण होत्या. मंदाकिनी ही त्यांची लेक भाऊंची आईच झाली होती. स्वतःची नोकरी सांभाळत तिनं अंध भाऊचे आजारपण सक्षमपणे पेलले होते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत.
राम गणेश गडकरी हे वि.स.खांडेकरांचे गुरू. एकदा बालगंधर्वाच्या घरी गडकरी व विशीतला वि.स.गेले होते. त्यावेळी हा तरूण कोण ? या बालगंधर्वाच्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले होते.. ‘ हा तरूण श्रीपाद कोल्हटकरांच्या गादीचा वारसदार आहे.’ त्या काळात सांगली म्हणजे नाट्यासाठी स्वर्गभूमी होती व श्रीपाद कृष्ण कोल्हटकर या रंगभूमीचे निर्विवाद देव होते. इतक्या मोठ्या माणसासोबत झालेली तुलना व तुलना करणारे गडकरी म्हणजे साहित्य क्षेत्रातला अढळ तारा…. या दोन्हीचा सुखात्म परिणाम खांडेकरांच्या हृदयात लेखनाचे बीज पेरून गेला व त्यांनी जे पेरले ते आज जगासमोर आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता व लोकशाही या मूल्यांची कास वि.स.खांडेकरांच्या लेखनात दिसून येते. प्रस्तावना हे भाऊंचे खास बलस्थान. औपचारिक प्रस्तावना असं न लिहिता भाऊ ‘ दोन शब्द ‘ असं लिहून पुस्तकाची पार्श्वभूमी लिहितात. ‘ पहिले प्रेम ‘ या पुस्तकाला तर कादंबरीपेक्षा प्रस्तावनाच मोठी वाटावी इतकी ती विस्तृत आहे. स्वतःच्या सर्व ग्रंथासह इतर ६३ लेखकांसाठी त्यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
त्यांच्या प्रस्तावनेचे गारूड कुसुगाग्रजांच्या नजरेतून सुटले नाही. कुसुमाग्रजांनी वि.स.च्या प्रस्तावनेवर एक ग्रंथ लिहिलेला आहे. साहित्य क्षेत्राततल्या एका प्रज्ञासूर्याला दुस-या प्रज्ञासूर्याकडून वेगळी मानवंदना काय असू शकते ? नाटक, कादंबरी, समीक्षा ,कविता, कथासंग्रह ,ललितलेखन,निबंधलेखन,नियतकालिकासाठी स्तंभ लेखन,संपादन, अग्रलेख…. असं जे जे म्हणून साहित्यातलं काही असेल त्या प्रत्येक क्षेत्रात भाऊंनी एखाद्या चक्रवर्ती सम्राटाप्रमाणे अनभिषक्त राज्य केले आहे. तुमची कोणती साहित्यकृती तुम्हाला फार आवडते ?असं भाऊंना विचारल्यावर भाऊ मिश्किलपणे म्हणत.. ‘ आईला सगळी लेकरं सारखीच.’ तरीही भाऊंना ‘ उल्का ‘ कादंबरी खूप आवडत असे. त्यांनी उल्केच्या प्रास्ताविकातही हे लिहिलं आहे.
उल्का म्हणजे काही अंशी त्यांचं स्वतःचं कथानक आहे. तत्वाला मुरड घालणाऱ्या व मरेपर्यंत तत्वाला चिकटून राहणाऱ्या अशा दोन मतप्रवाहांची कथा म्हणजे उल्का. या कादंबरीत भाऊसाहेब हे एक पात्र आहे. अनेक लोकांना हे पात्र म्हणजे वि.स.खांडेकरच वाटतात. वि.स.खांडेकर लेखनाच्या श्रीमंतीत कुबेराहून अधिक श्रीमंतीचं जीवन जगले पण आर्थिक सारीपाटावर त्यांचे घर नेहमीच दैन्यावस्थेचे प्रतीक राहिले.सहकारी शिक्षकमित्राच्या मुलीच्या लग्नासाठी स्वतःच्या एका कादंबरीचे संपूर्ण मानधन देणारा हा दाता ,स्वतःसाठी मदतीची याचना करू शकला नाही. अप्रत्यक्षपणे त्यांनी मांडलेली विवंचना लोकांना पुस्तकाचाच भाग वाटली.
ह्यावेळी अधिक महिन्यामुळे सगळया सणाना जरा विलंबच झाला . कधीपासून श्रावणाची वाट बघत होतो, नुकतेच श्रावणाचे आगमन झाल्याने एक प्रकारचा उत्साह आला. नारळीपोर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण कधीकधी एकाच दिवशी तर कधीकधी लागोपाठच्या दोन वेगवेगळ्या दिवशी येतात.पोर्णिमेची तिथी दोन दिवसात विभागल्या गेली तर आधीचा दिवस नारळी पोर्णिमा आणि नंतरचा दिवस राखीपोर्णिमा.
सणसमारंभ आले की बाजारात जरा चहलपहल,लोकांमध्ये जरा उत्साह आलेला नजरेस पडतो. आपले हे सणसमारंभ आपल्याला मानसिक मरगळतेतून बाहेर काढतात आणि मनाला एकप्रकारची उभारी आणतात.
तसे हे दोन्हीही सण विदर्भातील नाहीत. नारळीपोर्णिमा हा सण कोकणातील, प्रामुख्याने सागरीकिनारा लाभलेल्या भागातील. तर रक्षाबंधन वा राखीपोर्णिमा हा सण प्रामुख्याने उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश ह्या भागातील, पण आजकाल सगळे सणवार हे बहुतेक सगळ्या भागांमध्ये साजरे केल्या जातात.
नारळीपोर्णिमा हा सण कोळी लोकं वा समुद्रकिनारी राहणाऱ्या, तेथे वस्ती करणाऱ्या लोकांसाठी अतिमहत्त्वाचा सण.नारळीपोर्णिमेच्या दिवशी समुद्राच्या किनाऱ्यावर कोळी लोकं नारळ वाढवून खवळलेल्या समुद्राला शांत होण्याकरिता प्रार्थना करतात. ह्या दिवसापासून मासेमारी
साठी ते आपापल्या होड्या घेऊन सागरात उतरतात आणि गेले काही दिवस त्यांनी बंद ठेवलेल्या व्यवसायाचा परत एकदा श्रीगणेशा करतात. आता हा दर्याच त्यांचा मायबाप, देव सगळंकाही असतो.नारळीपोर्णिमेचा खास पदार्थ म्हणजे नारळीभात. ओल्या नारळाचा चवं,लवंग, बेदाणा,साखर आणि चांगल्या प्रतीचे तांदूळ ह्यापासून नारळीभात करतात. ह्यात केशराच्या काड्या मिसळल्या तर सोने पे सुहागाच. नारळीभातासाठी लागणारे मुख्य साहित्य हे कोकणात पिकणारे तसेच समुद्रकाठावरील.कोळी लोकं हा दिवस त्यांची पारंपरिक नाच,गाणी करीत खूप उत्साहाने साजरा करतात.
रक्षाबंधन वा राखीपोर्णिमा हा सण बहीणभावाच्या प्रेमाचे,स्नेहाचे प्रतीक म्हणून साजरा केल्या जातो.परगावी असलेल्या. बहीणी आठवणीने, न चुकता भावाला राखी पाठवतात. आपली संस्कृती, सणांची जपणूक ह्यामुळे ह्यादिवशी हाताला राखी न बांधलेला पुरुष अभावानेच आढळत असेल.ह्यादिवशी कित्येक भगिनी आपल्या सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांना राखी बांधायला जातात वा राखी पाठवितात.
लहानपणी साजरी केल्या गेलेले रक्षाबंधन खूप अनोखे असायचे.माझा भाऊ तर आधी पूर्ण बाजार हिंडून त्याला आवडलेल्या राख्या आणि ते दुकान सांगायचा.तेथून आम्ही बहीणी राख्या आणायचो,मोठ्ठ्या चमकीच्या आणि नोटांनी सजविलेल्या वगैरे.तेव्हाच तो एक कर्तबगार, यशस्वी बँकर होणार ह्याची नांदी असावी. असो लहानपण खूप छान आणि निरागस,अल्लड असतं.
राखीपोर्णिमा वा रक्षाबंधन ह्या संकल्पनेचा संबंध हा रक्षणाशी निगडित आहे. भाऊ आणि बहीण ह्यांच नातं प्रेमाचं,जिव्हाळ्याचं स्नेहाचं आणि तितक्याच हक्काचं सुद्धा असतं. ह्या दिवशीच्या निमित्ताने हे एकमेकांना भक्कम आधार देणारं नातं ,संकटसमयी रक्षा करण्याचं वचन देणारं नात तर महत्वपूर्णच, पण ह्या सणा च्या निमित्ताने अजूनही कितीतरी भक्कम आधार देणारी, रक्षा करणारी,अशी अजूनही कितीतरी नाती असतात.ह्या दिवशी हटकून ह्या नात्यांची,ह्मा भावनांची जपणूक करणाऱ्यांची हटकून आठवणं येते आणि त्यासाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त कराविशी वाटते.ह्या भक्कम आधारामध्ये आपल्याला सुरक्षित ठेवणारे लष्करातील जवान,आपल्या जिवीताची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असणारी प्रत्येक व्यक्ती, आपल्या नागरी सुरक्षा राखणा-या पोलीस खात्यातील प्रत्येक व्यक्ती, आपल्या आरोग्याच्या काळजीत मोलाची मदत करणारे सफाई कामगार तसेच ह्या प्रकारच्या तत्सम क्षेत्रातील आपली रक्षा करणारी,आधार देणारी कुठल्याही व्यक्ती चे ह्या त्यांनी पुरविलेल्या रक्षणाच्या कार्याप्रती मी मनापासून आदर,कृतज्ञता व्यक्त करते.ह्या दिवशी आपल्याला आधार देणा-या वनसंपदेला पण विसरून चालणार नाही. तेव्हा ह्या सगळ्यांची आठवण काढून त्यांच्याप्रती असलेल्या अभिमानाने खूप छान वाटतं.
आपल्याला भावनिक आधार देणारी,आपलं मनोबलं वाढविण्यास मदत करणारी एक शक्ती असते,मी त्या शक्तीला “देव” म्हणते,ह्या शक्तीलाही माझे कायम रक्षण करण्यासाठी एक राखी अर्पण.
खरंच धन्य आपली विवीधतेने नटलेली भारतभूमी, जेथे आपण सर्वधर्मसमभाव जोपासून सगळे सणवार गुण्यागोविंदाने, प्रेमानेआत्मियतेने आणि उत्साहाने साजरे करतो.
हल्लीच्या पिढीबाबत, आपल्या देशाबाबत आणि अनेक सरकारी योजनांबाबत (आपापल्या वैयक्तिक अनुभवांमुळे) आपण कमालीचे निराशावादी असतो. पण दिल्लीच्या सौरभ वर्मा यांना २०१७ साली आलेला अनुभव म्हणजे या काळ्या ढगांची एक चंदेरी किनार आहे.
सौरभ दिल्ली मेट्रोने प्रवास करत असताना एक typical कॉलेज विद्यार्थी कानांना हेडफोन्स लावून, गाणी ऐकत मांडीवर डबा ठेवून, खाताना त्याला दिसला. काहीतरी झालं आणि त्या विद्यार्थ्याचा डबा खाली पडला आणि मेट्रोच्या फ्लोअरिंगवर ते सगळं अन्न सांडलं.
सौरभने मनातल्या मनात कपाळावर हात मारला. आता हे खरकटं दहा जणांच्या पायाखाली येणार, आणि सगळीकडे बरबट होणार हे सगळं भविष्य त्याला लख्ख दिसू लागलं.
पण पुढच्याच क्षणी त्याला एक आश्चर्याचा सुखद धक्का बसला. ” लगे रहो मुन्नाभाई “चा परिणाम म्हणा किंवा ” स्वच्छ भारत अभियानाचा ” परिणाम म्हणा, पण तो विद्यार्थी उठला… आपल्या वहीतून त्याने एक पान फाडून घेतलं, त्यात ते सगळं खरकटं गोळा केलं, जवळच्या पाण्याच्या बाटलीने ती जागा पुसून घेतली आणि चक्क स्वतःच्या हातरूमालाने जमीन पुसून काढली. जिथं अन्न सांडलं होतं तो मेट्रोचा भाग आता पुन्हा पूर्ववत स्वच्छ झाला होता.
सौरभने आवर्जून त्या विद्यार्थ्याला त्याचे नाव विचारले. स्वच्छ अभियानाचा तो हिरो होता ” प्रांजल दुबे “.
सौरभने आपल्या फेसबुकवर ही कथा छापली होती.
सत्कृत्य करणारा प्रांजल आणि ते लोकांपर्यंत पोचवणारा सौरभ यांच्याकडे पाहिलं की नक्कीच म्हणावंसं वाटतं —– “ मेरा देश बदल रहा है !”
☆ “एका गांधी टोपीचा प्रवास …” ☆ श्री हेमंत तांबे ☆
आपण स्व. पु.ल.देशपांडे यांचं खिल्ली हे पुस्तक वाचलं असेलच.
त्यातील ” एका गांधी टोपीचा प्रवास ” पु.लं.च्या भाषेत देतो…..
स्वातंत्र्याला फक्त पंचवीस वर्षे झाली होती !
पु.ल. लिहितात……
राष्ट्रीय चळवळीत भाग घेतलेल्या एका वृद्ध स्नेह्याला मी विचारलं, ” गेल्या पंचवीस वर्षांत कशात जास्त परिवर्तन झालं, असं तुम्हाला वाटतं?”
” गांधी टोपीत ! ” ते म्हणाले.
” ते कसं काय? ”
” पूर्वी गांधी टोपी घालायला इंग्रज सरकारची भीति वाटत असे. आता आपल्याच जनतेची भीती वाटते.”
“असं का म्हणता? “
” तूच पाहा, गांधी टोपी, पायघोळ धोतर, खादीचा झब्बा आणि जाकीट घालून हातात कातडी ॲटॅची घेतलेल्या माणसाविषयी तुझं प्रथमदर्शनी काय मत होतं? “
पु.ल. बोलले नाहीत !
या गांधी टोपीचा प्रवास मला पु.लं.कडून नीट कळला आणि मोठं झाल्यावर मी अनुभव सुध्दा घेतला.
पण या टोपीचा उगम कसा झाला ? हा प्रश्न त्रास देत असे ! मग तो शोध सुरू झाला……
१) १९१९ साली मोहनदास रामपूरच्या नवाबाला भेटायला गेले होते. त्यावेळी डोक्यावर काहीतरी हवं म्हणून तिथल्याच एका दर्जीकडून त्यांनी एक टोपी शिवून घेतली होती… ती गांधी टोपी !
२) एका ठिकाणी कै. काका कालेलकर यांच्यासोबत मोहनदास बोलत असताना, आपल्या डोक्याला सूट होणारी टोपी शोधत असताना, या टोपीचा शोध लागला, असं मोहनदास म्हणतात….. असा तो जन्म !
ही टोपी मोहनदासांनी १९१९ — १९२१ घातली… लोकमान्य १९२० मध्ये स्वर्गवासी झाल्यावर स्वातंत्र्य चळवळ मोहनदासांच्या हातात आली…. तोपर्यंत टोपीचा उपयोग मोहनदासांनी शिकून घेतला होता !
१९२१ नंतरचा मोहनदासांचा टोपी घातलेला फोटो शोधून मिळत नाही…..
….
मला भविष्य सांगता येत नाही, पण भूतकाळ थोडा माहिती आहे.
ती जुनी, छान, ‘ टोपीवाला आणि माकडं ‘ ही गोष्ट तुम्हाला माहीत आहेच… तिची पुनरावृत्ती करत नाही !
पण त्या गोष्टीचा दुसरा भाग तुम्हाला माहीत नाही. तो असा —
तो मूळ टोपीवाला, म्हातारा होऊन मरण्यापूर्वी त्यानं आपल्या मुलाला ती गोष्ट सांगून बजावलं, ” कधी तुझ्यावर जर माझ्यासारखी वेळ आली, तर लक्षात ठेव आपल्या डोक्यावरील टोपी खाली काढून टाकायची, आपल्या सर्व टोप्या परत मिळतात.”….आणि त्या म्हाताऱ्यानं डोळे मिटले !
मुलगा टोप्यांचाच व्यवसाय करत होता. दररोज फिरून टोप्या विकत असे… एकदा फिरून थकला, भागला आणि एका झाडाखाली बसला. जेवून जरा झप्पी घेऊन उठला तर टोप्या गायब… वर पाहतो तर माकडांच्या डोक्यात टोप्या. त्याला बापानं माकडांची मानसिकता सांगितली होती…. त्यानं आपल्या डोक्यावरील टोपी काढून खाली टाकली… चटकन एक टोपी न मिळालेलं माकड खाली येऊन ती टोपी घेऊन झाडावर गेलं !
हा विचार करू लागला, ‘असं कसं घडलं? ….’ .तोपर्यंत ती माकडं टोप्या घेऊन जाताना दिसली. यानं विनवणी केली, ‘ असं करू नका, माझ्या टोप्या परत द्या, please.’
एक माकड थांबून म्हणालं, ” आता आपली भेट २०१४ साली, तोपर्यंत टोप्या आमच्या डोक्यावर ….. ! “
☆ असाही एक सफाई कामगार ! ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆
१९९८ सालची गोष्ट. क्षेपणास्त्रे (मिसाईल) बनवण्यासाठी भारताचे जोरदार प्रयत्न चालू होते. अमेरिकेच्या उपग्रहांना सुगावा लागू नये म्हणून क्षेपणास्त्रांच्या प्रकल्पाबाबत कमालीची गुप्तता राखली जात होती. क्षेपणास्त्रांकरिता आवश्यक असलेली क्रायोजेनिक इंजिन्स गुप्तपणे चेन्नई बंदरामध्ये आणली जात होती. तेथून ती इंजिन्स हवाई मार्गाने पुढे नेण्याची योजना होती. त्यासाठी भारतीय वायुसेनेची हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर्स वापरली जाणार होती.
चेन्नई बंदरापासून क्षेपणास्त्रांच्या लॉन्च पॅडपर्यंत पोहोचण्याकरता हेलिकॉप्टरला दोन तास पुरेसे होते. परंतु, अमेरिकेच्या उपग्रहांना चकवण्यासाठी, नागमोडी मार्गाने उडत, आणि चार वेगवेगळ्या ठिकाणी दोन-दोन तास थांबे घेत जाण्याचे आदेश हेलिकॉप्टर्सच्या वैमानिकांना दिले गेले होते. त्यामुळे, प्रत्यक्षात दोन तासांचा असलेला प्रवास आम्ही सोळा तासांमध्ये पूर्ण करणार होतो. अर्थात, आपल्या राष्ट्रीय उद्दिष्टांबाबत गुप्तता राखण्यासाठी मोजली जाणारी ही किंमत अगदीच नगण्य होती.
हेलिकॉप्टरमध्ये वजनदार क्रायोजेनिक इंजिने ठेवलेली असल्याने, प्रवासी क्षमतेवर खूपच मर्यादा आली होती. क्षेपणास्त्र प्रकल्पाचे फक्त १२ कर्मचारीच एकावेळी इंजिनसोबत प्रवास करू शकणार होते. या १२ कर्मचाऱ्यांमध्ये दोन सफाई कामगारांचाही समावेश होता. त्याचे कारण असे की, क्रायोजेनिक इंजिनमधून सतत गळून हेलिकॉप्टरमध्ये सांडणारे तेल व क्रायोजेनिक इंधन वेळोवेळी स्वच्छ करत राहणे आवश्यक होते.
भारत सरकारच्या सर्वोच्च पातळीवर ज्यांची नावे मंजूर झालेली होती अशा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही हेलिकॉप्टरमध्ये प्रवेश देऊ नये असे स्पष्ट आदेश आम्हाला होते. परंतु, सफाई कामगारांपैकी एखादा कामगार बदलून त्याच्या जागी ऐनवेळी दुसरा कामगार नेमण्याचे अपवादात्मक विशेषाधिकार क्षेपणास्त्र प्रकल्प निदेशकांना दिलेले होते. मात्र त्यासाठी प्रकल्प निदेशकांची लेखी परवानगी त्या कामगाराच्या हातात असणे आवश्यक होते.
चेन्नईहून आम्ही निघण्याच्या तयारीत होतो. इतक्यात, भुरकट लांब केस असलेला एक माणूस आमच्यापाशी येऊन म्हणाला, ” मला लॉंच साईटवर पोहोचणं अत्यावश्यक आहे, पण माझी फ्लाईट चुकलीय. मला तुमच्यासोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. प्लीज मला घेऊन चला.” …. पण आमच्या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एकही जादा मनुष्य आम्ही सोबत नेऊ शकणार नव्हतो. त्यामुळे आमच्यापाशीही त्याला नकार देण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता.
आम्ही अगदी उड्डाण करण्याच्या तयारीत असताना तो मनुष्य पुन्हा आमच्यापाशी धावत-धावत आला आणि म्हणाला, ” हे पहा, माझ्यापाशी प्रकल्प निदेशकांचे लेखी परवानापत्र आहे. अमुक-अमुक सफाई कामगाराच्या ऐवजी मला जागा दिली गेली आहे.” … आता काहीच हरकत नसल्यामुळे, मुख्य वैमानिकाने त्याला चढायची परवानगी दिली. एखाद्या लहान मुलाप्रमाणे आनंदाने उडी मारून तो मनुष्य हेलिकॉप्टर मध्ये चढला.
आमच्या प्रवासाचा एक टप्पा पूर्ण करून आम्ही एके ठिकाणी थांबलो होतो. चार तासांचा हॉल्ट होता. आम्ही निवांत चहा पीत बसलो होतो. तिथूनच आम्हाला दिसले की तो मनुष्य हेलिकॉप्टरचा अंतर्भाग अगदी काळजीपूर्वक पुसून काढत होता. आमच्या सोबतच्या कर्मचारीवर्गात काही वरिष्ठ शास्त्रज्ञ देखील होते. ते त्या माणसाशी काहीतरी बोलत असल्याचे आम्हाला दिसले.
इतक्यातच एक शास्त्रज्ञ धावत आमच्यापाशी आला आणि म्हणाला, “अहो, ते जे हेलिकॉप्टर स्वच्छ करतायत त्यांना प्लीज थांबवा. ते आमचं ऐकत नाहीयेत. ते स्वतःच आमच्या क्षेपणास्त्र प्रकल्पाचे निदेशक आहेत, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम !”
हे ऐकून आम्हाला धक्काच बसला. आमच्या मुख्य वैमानिकाने लगेच जाऊन त्यांना ते काम थांबवण्याची विनंती केली. त्यावर हसून ते इतकेच म्हणाले, ” मी या हेलिकॉप्टरमध्ये एक सफाई कामगार म्हणून प्रवास करत आहे. माझे कर्तव्य बजावण्यापासून तुम्ही कृपया मला रोखू नका.” आमचा नाईलाज झाला. त्यापुढच्या हॉल्टमध्येही या सद्गृहस्थांची कर्तव्यपूर्ती अव्याहत चालू राहिली. अक्षरशः हतबुद्ध होऊन पाहत राहण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकत नव्हतो. गंतव्यस्थानी पोहोचल्यानंतर आम्ही या अजब प्रकल्प निदेशकाचा आणि त्याच्या टीमचा हसतमुखाने निरोप घेतला.
या घटनेनंतर बऱ्याच वर्षांनी मला राष्ट्रपती भवनातून एक निमंत्रणपत्र आले. राष्ट्रपतींनी तेथील ‘ मुघल गार्डन्स ‘ चा केलेला कायापालट मी पहावा आणि राष्ट्रपती एक सफाई कामगार म्हणून चांगले आहेत की ते त्याहून अधिक चांगले माळी आहेत हे मी सांगावे, असे त्या पत्रात लिहिले होते !
त्या काळी मी परदेशात असल्याने, आमंत्रण स्वीकारू शकत नसल्याचे मी विनम्रतापूर्वक कळवले.
कालांतराने, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची मी आवर्जून भेट घेतली. तेंव्हाही त्यांनी खळखळून हसत त्या जुन्या प्रसंगाची आठवण जागवली.
… एका असामान्य भारतीयाला माझा सॅल्यूट !
मूळ इंग्रजी अनुभव लेखक: विंग कमांडर अब्दुल नासिर हनफी, वीर चक्र, (सेवानिवृत्त)
मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४
संग्राहक : मेघ:शाम सोनावणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ उघडले चंद्राने द्वार… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
… आलास ? ये ये कधीपासून तुझीच वाट पाहत आहे या इथे… बाकी पुढारलेल्या देशातील मोजकेच जण आतापर्यंत इथं माझा पाहुणचार घेऊन गेले… तर काहीजण माझ्या परीघाभोवती फिरतच राहिले, तर काही जण यानातून उतरले गेलेच नाही.. काही तरी घोळ झाला असावा त्यावेळी… बिचारे अभागी ठरले आणि आपल्या देशी अपयशाचे धनी होऊन परतले… किती म्हणून त्यांच्या देशानी अपेक्षा, आशा बाळगल्या होत्या त्या सर्व फोल ठरल्या गेल्या… पण तू मात्र सगळ्यांच्या मागाहून तयारी करत होतास… पुढच्यास ठेच नि मागचा शहाणा या चालीवर त्यांच्या अनुभवाचा चांगला उपयोग करून संभाव्य चुका टाळून या इथे उशीराने का होईना पण व्यवस्थित आलास… मला स्वतःला खूप खूप आनंद झाला… आता तुला काय हवं ते तू कर… माझी कशालाच ना नाही बरं… हवा तितका दिवसाचा मुक्काम कर… संशोधन कर.. जा ये कर… आणखी कुणी तुझ्या बरोबर कुणी येणार असतील तर त्यांनाही बेलाशक आण…आतिथ्य करायला मी सदैव तयार आहे… आगमनाच्या द्वारावर मी स्वतः उभा राहून बरं… तू इथे येउन गेल्याच्या पदचिन्हाबरोबर तुझ्या देशाचा झेंडा येथे लावून जायला विसरू नको.. तुझ्या नंतर जे कोणी इथे येतील त्यांना खुणेच्या गोष्टी पाहून अती आनंद वाटेल… आजवरी तुम्हाला उंच उंच लांब लांबच्या अंतरावरून पाहत होतो पण आपली अशी भेट होईल हे स्वप्नात देखील कल्पिलेले नव्हते… आजवर दूर राहून तुम्ही सगळे जण मला या ना त्या नात्याने बोलवत होतात.. कुणाचा मी चंदामामा, तर कुणाचा मी प्रियतमेचा चंद्रमा, कुणाचा भाऊराया, तर कुणाचा सखा जिवलगा… कितीतरी गुजगोष्टी मी ऐकत आलो आहे.. लिंबोणीच्या झाडामागे दडलो आहे.. पौर्णिमेला खळखळून हसलो आहे नि कधी कधी उगाचच अमावस्येला रूसून अंधारात दडी मारून बसलो आहे… पण पण तो इतिहास आता मागे पडला.. आता तूच माझ्या कडे आलास.. त्या कविंंनां, लेखकांना, गझलकारांना म्हणावं आता खुशाल माझ्या कडे वास्तव्य करून भरभरून लिहा.. तुमची प्रतिभा शारदीय चांदण्या सारखी सतत स्त्रवत राहूदे… भाऊ नसलेल्या बहिणीनां म्हणावं आता हक्कानं माहेरपणाला या.. हा भाऊराया तुम्हाला भरभरून प्रेम देईल.. प्रियकर प्रेयसीनां म्हणावं, आता नारळाच्या, माडाच्या आडोशात बसून प्रिती गुंजन चांदण्यात कशाला करता… चक्क इथे या आणि आपली प्रिती विवाहाची, मधुचंद्राची रात्र साजरी करा… ज्याला जे जे हवं ते ते मी द्यायला तयार आहे… पण पण कलंकित, डागळलेली माणसांना मी काहीच देऊ शकणार नाही… कारण मी स्वतः एक कलंकित, डागळलेला आहे आणि तशाच माणसांना मी मदत केली तर माझं लांछन अधिक वाढेल… मला त्यातून मुक्त व्हायचं आहे… तेव्हा मी काय सांगितले तेव्हढचं पक्क ध्यानात ठेवा… कलंकित, पापी, डागळलेल्यांना माझ्या इथं प्रवेश निषिद्ध आहे… बाकी स्वच्छ, कलंक विरहित, पुण्यशील लोकांना हरणाची जोडीची गाडी पाठवून देईन.. तूप रोटीचं सुग्रास भोजन असेल, शेवरीच्या कापसाची मऊ मुलायम गादी निजायला असेल… आल्हाददायक रूपेरी चांदणं, शीतल वायू.. जे स्वप्नात सुद्धा पाहिले नसेल ते ते… पण पण फक्त त्यांना
… अरे अरे हे काय तू आता आला नाहीस तोवर लागलीच परत निघालास… राग आला का माझ्या बोलण्याचा तुला… असा मनुष्य शोधूनही मिळणार नाही म्हणतोस या त्रिखंडात.. म्हणजे माझी आशा विफल ठरली कि काय… पण काही हरकत नाही पुन्हा येशील तेव्हा या गोष्टीचा नीट अभ्यास करूनच ये… मी तुझी वाट पाहत थांबेन… मेरा घर खुला है… खुलाही रहेगा.. तुम्हारे लिए…
ऊबदार आणि रेशीमस्पर्शी नाती प्रत्येकालाच हवीहवीशी वाटतात. तहहयात अशा नात्यांचा अनुभव येणे हा नशिबाचा भाग. पण प्रत्येकानेच अश्या नात्यांचा अनुभव केव्हातरी, काहीकाळ तरी घेतलेलाच असतो. एकाच नात्यातही हा अनुभव कधी येतो तर कधी येत नाही. नात्यात जेव्हा हा अनुभव येतो, तेव्हा आपण त्याचे श्रेय मनातल्या मनात स्वत:ला आणि समोरच्यालाही देत असतो. अर्थात त्यातही बऱ्याच नात्यात जादा श्रेय आपण स्वत:कडेच घेत असतो. याच न्यायाने ऊबदार, रेशीमस्पर्शी अनुभव येत नाही,तेव्हाही खरे तर याचा दोष दोघांनी वाटून घेणे आणि त्यातही दोषातला अधिक वाटा आपण घेणे उचित ठरते. पण असे घडत नाही. अशा प्रसंगात सर्व दोष समोरच्याच्याच माथी मारुन आपण मोकळे होतो.
सुज्ञ व्यक्ती मात्र असे करत नाहीत. नात्याचे वस्त्र सुखकर, सुंदर विणले गेले नाही, ‘मन नाती विणता विणता, मन ठेवी करुनि गुंता’ असे घडले, तर या गुंत्याचा दोष त्या व्यक्ती स्वत:कडे घेतात. आपणच या नात्याचे वस्त्र विणण्याच्या कौशल्यात कमी पडलो, असे म्हणून ते कौशल्य आत्मसात करण्याच्या प्रयत्नाला लागतात. गुलजारांची एक सुंदर कविता आहे. कवयित्री शांता शेळके यांनी या कवितेचा तेवढाच सुंदर मराठी भावानुवाद केला आहे. ही कविता विणकाम करणाऱ्या विणकराला उद्देशून आहे. गुलजार म्हणतात, ‘हे विणकरा, तूझे विणकाम अखंड चालू आहे. धागा कधी तुटतो, कधी संपतो. तू पुन्हा नव्याने विणकाम सुरु करतोस. पण एकसंध. त्यात कुठेही गाठी नाहीत. मी एकदाच नात्याचे वस्त्र विणायला घेतले मात्र… त्याच्या अनेक गाठी मला दिसत आहेत. तेव्हा हे विणकरा, गुंता होऊ न देता, गाठी पडू न देता वस्त्र विणण्याचे हे तुझे कौशल्य तू मला शिकव. या कवितेतला संदेश मोलाचा आहे. किमान हवीहवीशी वाटणारी, पण तरीही दूरावत आहेत असे दिसणारी नाती तरी, हे कौशल्य आत्मसात करून सांभाळणे, पुन्हा त्यात जवळीकता आणणे आवश्यक आहे.
नात्यात कौशल्याचा वापर करण्यावर आक्षेपही असू शकतो. प्रेमाच्या, आपलेपणाच्या नात्यात कौशल्यासारखी तांत्रिक गोष्ट का? आणि कशाला हवी? हे प्रश्नही उपस्थित होऊ शकतात. त्याची उत्तरे देणेही आवश्यक आहे. कोणतेही कौशल्य शिकतांना सुरुवातीस तांत्रिक वाटते, पण तेच एकदा पूर्णतः आत्मसात झाले की तो आपला सहजस्वभाव होते. आपल्या घरी दुरुस्तीसाठी येणारा इलेक्ट्रिशियन, विद्युत प्रवाह सुरू असतांनाही दुरुस्तीचे काम करत असतो. त्याने प्राप्त केलेले कौशल्य त्याचा सहजस्वभाव होऊन जाते. त्याला आल्यावर आधी पुस्तक उघडून काही वाचावे लागत नाही वा थांबून पुढचा टप्पा काय? असे आठवावेही लागत नाही. नात्यांच्या विणकामातले कौशल्यही असेच आहे. सुरुवातीस ते शिकावे लागेल. पण एकदा का अंगवळणी पडले की ते सहजस्वभाव होऊन राहील. गाठी न पडता वस्त्रांची वीण करणे सुलभ होऊन जाईल.
अन्य कामातले कौशल्य हे बुद्धीचे असते. बुद्धीच ते आत्मसात करते आणि बुद्धीपर्यंतच ते सीमीत रहाते. फार तर हात, पाय असे आवश्यक देहांचे अवयव करावयाच्या कामाच्या आवश्यकतेनुसार त्यात सहजपणे सामील होतात. पण मनाने स्वतंत्रपणे त्यात करण्यासारखे काही नसते. नात्यांतील विणकामाचे कौशल्य मात्र मनाचे असते,मनापासून असते. ते वापरत असतांना बुद्धीला काय वाटते आहे, याचा फार विचार न करता पुढे जायचे असते. कारण नात्यांच्या विणकामातले हे कौशल्य स्वतःच्या हितापेक्षा समोरच्याच्या हिताचाच अधिक विचार डोळ्यासमोर ठेऊन मनाने आत्मसात केलेले असते व मनाकडून त्याचा वापर होत असतो.बऱ्याचदा समोरच्याला हे कळायला वेळ लागतो. पण कधीतरी ते कळतेच .
समोरच्याच्या हिताच्या विचाराबरोबरच समोरच्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याची वृत्ती आणि नात्यात समोरच्याची वारंवार परीक्षा न घेण्याची वृत्ती, ही नात्यांच्या विणकामातील आवश्यक दोन मुख्य कौशल्ये आहेत. पत्नीच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण जर असा विचार करायला लागलो की, बघू या हिचे प्रेम खरे आहे का? आज काहीच भेट नको नेऊ या.तरी तिचे प्रेम तसेच राहते का बघू या…तर गुंता झाला आणि गाठ पडलीच म्हणून समजा. असा विचार करण्यापेक्षा आपण मोगऱ्याचा गजरा, सोनचाफ्याची फुले आणि एखादी छोटीशी भेटवस्तू घेऊन गेलो तर ती पाहून तिला किती आनंद होईल ! असा विचार प्रबळ होऊन तिचा आनंदी चेहरा डोळ्यासमोर आला की नकळत आपल्याकडून तशी कृती होते. त्यातून दोघांना आनंद होतो. नात्याची वीण अधिक घट्ट होते. विणकाम नवीन उत्साहात सुरु होते. केवळ पती- पत्नी नात्यात नव्हे तर कोणत्याही नात्यात वारंवार समोरच्याची परीक्षा घेणे टाळणे आणि ज्या काही छोट्या छोट्या गोष्टींनी त्याला आनंद होईल, अशा गोष्टी करणे, नाती सुखदायी होण्यासाठी आवश्यक असते.
नात्याचे वस्त्र विणतांना त्याग करण्याची वृत्ती असणेही आवश्यक असते. हा त्याग काही फार मोठा असा अपेक्षित नसतो. समोरच्याला ‘तू माझ्यासाठी खूप विशेष आहेस’,असे सांगणारी लहानशी कृतीही यात पुरेशी असते. आपला मित्र एखादे पुस्तक किंवा औषध त्याच्या गावी मिळत नसल्याचे आपल्याला कळवितो व मिळालेच तर पाठव,असे सांगतो.खरे तर वाट पाहण्याची त्याची तयारी असते. पण आपण त्याच दिवशी खास वेळ काढतो, बाजारात शोधून ते पुस्तक किंवा औषध मिळवितो आणि त्याला कळवितो, ‘तुझे काम केले आहे.’ या आपल्या कृतीतून आपल्यासाठी तो ‘विशेष आहे’ हा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचतो. मैत्रीचे नाते अधिक घट्ट होते.
जीवनप्रवासात आलेल्या नात्यांपैकी काहीच नाती आपण हदयाशी जपतो. ही अशी जपलेली नाती आठवून पाहा. यातील प्रत्येकाने, किमान एकदातरी ‘तुम्ही त्याच्यासाठी विशेष आहात’, हा अनुभव तुम्हाला देणारी कृती तुमच्यासाठी आणि तुम्हीही त्याच्यासाठी केल्याचे नक्कीच आठवेल.
नात्याचे वस्त्र विणण्याची अशी अनेक कौशल्य सांगता येतील. लेखनमर्यादा लक्षात घेता, शेवटची आणखी दोन कौशल्ये नमूद करतो. त्यातले पहिले म्हणजे समोरचा सुखात असतांना आपले दुःख व्यक्त न करणे आणि समोरचा दुःखी असतांना आपले सुख लपविणे आणि दुसरे म्हणजे नात्यात केवळ ‘सांगणारे’ न होता ‘ऐकणारे’ही होणे. समोरच्याच्या सुखात सहभागी होऊन त्याचे सुख दुप्पट करणे आणि दुःखात सहभागी होऊन दुःख निम्मे करणे ही भावना मनात रुजलीच पाहिजे. अनेकदा मित्रांच्या व्हाट्सॲप ग्रुपवर एखाद्याच्या जवळच्या नातलगाच्या दुःखद निधनाची बातमी येते. किमान त्या दिवशी तरी हास्य, विनोदाच्या पोस्ट ग्रुपवर टाकणे टाळले पाहिजे. तेच एखाद्याने आधीच आनंदाची पोस्ट शेअर केली असेल तर दुसऱ्याने ग्रुपवर दुःखाची बातमी शेअर करणे टाळले पाहिजे. ही साधी सोपी पथ्ये आहेत. परस्परांच्या सुखदुःखाशी एकरूप झाले तरच ही पाळली जातात.ही पाळली गेली तरच मनात अढी बसत नाही,नात्याच्या वस्त्राच्या विणकामात गाठी पडत नाहीत. अशी संवेदनशीलता असेल तरच दुसऱ्याला समजून घेणे,ऐकून घेणेही घडते.
काही नाती जन्मताच मिळतात. काही नाती विवाहाने व त्यानंतर जीव जन्माला घालून आपण निर्माण करतो. काही मैत्रीची, सख्यत्वाची नाती असतात. तर काही नाती कारणपरत्वे आयुष्यात ये-जा करणारी असतात. या सर्व प्रकारच्या नात्यात प्रत्येक व्यक्तीशी असणाऱ्या नात्याचे वस्त्र स्वतंत्र असते, त्याचे विणकाम स्वतंत्र असते. पण या प्रत्येक विणकामात गुंता,गाठी न होण्यासाठी वर सांगितलेली कौशल्ये आवश्यकच असतात. यासोबतच अलिप्तता आणि भावनिक गुंतवणूक या दोन रंगांच्या धाग्यांपैकी कुठला धागा, कुठल्या वस्त्राच्या विणकामात जास्त वापरायचा?याचे विवेकी ज्ञान देखील आवश्यक आहे. कौशल्ये प्राप्त होऊनही या रंगांचे प्रमाण चुकले तरी फसगत होते. ‘मन नको त्यावरि बसते, मन स्वत: स्वत:चि फसते, नसत्याच्या धावे मागे’, असे होऊन बसते. यासाठी अलिप्तता आणि भावनिक गुंतवणूक यांचे योग्य प्रमाण ठेवण्याचे कौशल्यही आवश्यक आहे. काही नाती सुटावीशी वाटत असूनही सुटत नाहीत, तोडावीशी वाटत असूनही तोडता येत नाहीत. काही तुटतात, त्यातली काही पुन्हा येऊन जुळतात. नात्यांचे हे असेच असते,हेही समजून असले पाहिजे. सर्व कौशल्य आणि अलिप्तता-भावनिक गुंतवणुकीचे योग्य प्रमाण राखूनही नात्यांची वीण जुळत नसेल, जमत नसेल, तर त्या नात्यांवर जास्त वेळ खर्च न करता ,काही काळ ती नाती आणि विणकाम बाजूला ठेवलेले बरे.
प्रत्येक नात्याच्या मधुमासाचा एक काळ असतो. काही नात्यात तो अल्पकाळ, तर काही नात्यात तो दीर्घकाळ चालतो. या सुरुवातीच्या मधुमासाच्या काळात परस्परांना समजून घेतले आणि ते नाते टिकविण्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत, हे समजून घेऊन,प्राप्त करून घेऊन, योग्य प्रमाणात अलिप्तता आणि भावनिक गुंतवणूकीची गुंतवणूक केली तरच ती नाती मधुमास संपल्यावरही लाभदायी, आनंददायी ठरतात. असे होण्यासाठी गुलजारांनी केलेली प्रार्थनाच आपणही विणकराला करू या. ‘प्रिय विणकरा, नात्याचे वस्त्र विणण्यासाठी तुझे कौशल्य आम्हाला तू शिकव.’
” नही साब ” त्याच्या डाव्या बाजूला जमिनीकडे बोट दाखवत तो म्हणाला,
” इधर निचे बडा पाईपलाईन है. ढक्कन निकल गयेला है “
तो त्या मॅनहोलमध्ये कोणी पडू नये, म्हणून तिथे उभा होता !
रस्त्याखालचा पाईप पूर्ण भरला असावा, अन्यथा पाणी चक्राकार आत घुसताना दिसले असते. फुटभर उंचीचे पाणी वरून वेगाने जात होते. पायी चालणाऱ्याला वा दुचाकीवरून जाणाऱ्या कोणाला जाणवलेही नसते, की खाली खोल सांडपाण्याचा पाईप आहे !
मी अवाक झालो ! कोण होता हा? कोणासाठी हा असा पाण्यात उभा राहिलाय?
मी भर पावसात खाली उतरलो. त्याला म्हटले, ” बहोत बढिया, भाई !”
तो फक्त कसनुसं हसला आणि म्हणाला,
” बस, कोई गिरना नै मंगता इधर “
” कबसे खडा है?”
” दो बजे से “
घड्याळात पाच वाजले होते !
३ तास तसेच उभे राहून याला भू =क लागली असणार. दुदैवाने माझ्याकडे काहीच नव्हते. सगळी दुकानेही बंद… हा भुक लागल्यामुळे जागा सोडेल, असे काहीच चिन्ह नव्हते !
… कुठल्या प्रेरणेने तो हे करत होता? त्या गुडघाभर उंचीच्या घाण पाण्यात उभे राहून तो तीन तासांपासून कोणाला वाचवत होता? आणि का? दोन वाजल्यापासून त्याने कित्येक जणांना वाचवले असणार. कोणाला त्याची जाणीवही नव्हती. खुद्द याला तरी त्याची कुठे पर्वा होती?
… ही अशी छोटी छोटी माणसे हे जग सुंदर करून जातात !
मागच्या डिसेंबरमध्ये दादरला फुटपाथवर एक आंधळा म्हातारा ‘ कालनिर्णय ‘ विकत बसलेला दिसला.
दुकानातून घेण्याऐवजी, याच्याकडून घेतलेले काय वाईट, असा विचार करून थबकलो.
“कालनिर्णय’ केवढ्याला, काका? “
“फक्त बत्तीस रूपये, साहेब ” .. केविलवाणेपणाने तो म्हणाला. सकाळपासून काहीच विकल्या गेलेले दिसत नव्हते. मी एक घेतले. पन्नासची नोट होती. ती त्याला दिली. हाताने चाचपडत तो ती नोट तपासतच होता, की उंची कपडे घातलेला साठीतला एक देखणा गृहस्थ खाली वाकला…
“कितने का है ये? “
“बत्तीस रुपया “
“तने है? “
“चौदा रहेंगे, साब “
ज्याला मराठी येत नाही, असा हा माणूस मराठीतले कालनिर्णय कशासाठी विकत घेतोय?
त्या माणसाने खिशातून साडेचारशे रुपये काढून त्याला दिले आणि ते सगळे कालनिर्णय बखोटीला मारले !
मी आश्चर्यचकित ! छापील किंमतीत विकत घेतोय, म्हणजे पुनर्विक्रीसाठी निश्चितच घेत नाहीये. तसाही, कपड्यांवरूनही हा असले किरकोळ धंदा करणाऱ्यातला वाटत नव्हता. तो गृहस्थ थोडा पुढे गेला असेल. मला राहवलेच नाही. मी थांबवून त्यांना विचारलेच !
हे मूळचे लखनौचे महोदय, एअरइंडियातल्या मोठ्या पदावरून नुकतेचं निवृत्त झाले होते. शिवाजी पार्कात स्वत:चे घर होते. एकुलता एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला होता. लठ्ठ पेन्शन येत होती.
” वो बेचारा पंधरा कालनिर्णय बेचके कितना कमाता होगा? सौ, डेढ़ सौ ? वैसे भी बेचारे को सौ रुपये के लिए दिनभर ऐसेही धुपमे बैठना पडता था. मैने उसका काम थोडा हलका कर दिया. बस इतनाही !”
मला काही बोलणेच सुचले नाही ! पण एवढ्या चौदा कालनिर्णयांचे तो करणार काय होता?.. न राहवून शेवटी मी त्याला विचारलेच ….
” सोसायटी मे बहुत मराठी फ्रेंडस है, उनमे बांट दूंगा !”
.. मी दिग्मूढ !
” तू एक मिनिट लेट आता, तो तुझे भी फोकट मे देता ! ” मला डोळा मारत, हसत तो लखनवी देवदूत रस्ता पार करून गेला सुद्धा !
माणुसकी याहून काय वेगळी असते?
एखाद्या हॉस्पिटलबाहेर ‘तत्काळ रक्त हवे ‘ असा फलक वाचून, ऑफिसला वा घरी जायला उशीर होईल, याची तमा न बाळगता रक्त देणारे कोण असतात? ते ही रांग लावून ! ..
… कोण असतात हे? कुठल्या जातीचे? कोणत्या धर्माचे? ‘ भैये ‘ असतात की ‘आपले’ मराठी?’
मुंबईत रस्त्यावर चहा विकणारे लाखो ‘ चायवाले ‘ आहेत. बहुतांश उत्तरेकडले. सकाळी चहा बनवल्यावर पहिला कपभर चहा ते रस्त्यावर फेकतात… पण दिवसाचा पहिला चहा रस्त्यावर न फेकता भिकाऱ्याला पाजणारा बांद्र्याचा एक ‘ चायवाला ‘ मला माहिती आहे ! सकाळी सकाळी भिकारी आलाच नाही, तर एका भांड्यात तेवढा चहा बाजूला काढून, धंद्याला सुरूवात करतो ! त्याबद्दल त्याला एकदा विचारले होते , तर
“बर्कत आती है ” एवढीच कारणमीमांसा त्याने दिली होती.
डोळे उघडून पाहिले, तर असे असंख्य अज्ञात देवदूत आपल्याला ठायीठायी आढळतात, पण आपली नजरच मेलेली असते.
परवा थायलंडमध्ये गुहेत अटकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी हजारो अनामिक हात मदतीस आले. गुहेतले पाणी पंपाने बाहेर काढावे लागले. ते पाणी कुठे फेकले ? ज्याच्या शेतात ते पाणी फेकावे लागले, त्या शेतातले तीन एकरातले उभे पीक या पाण्याने अक्षरशः वाहून गेले. एका छोट्या शेतकऱ्यासाठी हे प्रचंड नुकसान. एका पत्रकाराने त्या शेतकऱ्याला या नुकसानीविषयी खोदून खोदून विचारले…
“नुकसानीचे काय एवढं? मुले वाचली ना? पेरणी परत करता येईल. मुलांचे प्राण परत आणता आले असते का?”…. हे उत्तर ऐकूनच डोळ्यात पाणी आले !
हे जग सुंदर आहे. ते सुंदर करणारे अनामिक देवदूत आजही या जगात आहेत आणि राहतीलही.
… फक्त तो तिरस्काराचा, आत्मकेंद्री स्वार्थाच्या काळ्या काचांचा गॉगल डोळ्यावरून काढला पाहिजे !
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “नागपंचमी …नागपूजेच्या पलिकडे…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆
साप आपले मित्र आहेत, निरुपद्रवी आहेत हे प्रत्यक्ष कृतीतून निलिमकुमार खैरेंनी दाखवले…त्यासाठी किती मोठे धाडस केले…त्याचा हा छोटासा वृत्तांत…
थोड्याच दिवसांत प्रकाश कर्दळे (निवासी संपादक, इंडीयन एक्सप्रेस) यांनी ही बातमी देशभर व्हायरल केली … ‘नीलिमकुमार खैरे बहात्तर विषारी सापांच्या सान्निध्यात बहात्तर तास राहून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करणार…’
बातमी देशभर पसरली. आम्ही सगळेच जोशात तयारीला लागलो. अण्णा (निलिमकुमार खैरे) त्या वेळी ब्लू डायमंडमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होता. जगप्रसिद्ध उद्योगपती शंतनुराव किर्लोस्करांचे धाकटे बंधू कै. पी. एल. किर्लोस्कर हे त्यावेळी ब्लू डायमंड हॉटेलचे कार्यकारी संचालक होते. खूपच सरळमार्गी आणि सज्जन उद्योगपती असा त्यांचा लौकिक होता. अण्णाच्या आगामी विश्वविक्रमाची योजना आम्ही त्यांच्यासमोर मांडली. त्यांना ती पसंत पडली. आपल्या कंपनीचा एक तरुण कर्मचारी जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न करतोय याचं त्यांना समाधान वाटलं. त्यांनी आर्थिक सहाय्य करण्याचंही मान्य केलं. माझा मित्र सुहास बुलबुले तेव्हा बी. जे. मेडिकल कॉलेजचा ‘कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह’ होता. त्याच्यामुळे बी.जे.च्या मैदानावर हे वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचं ठरलं. आवश्यक त्या परवानग्या मिळवल्या आणि आम्ही खोली बांधण्याच्या मागे लागलो. ॲक्रिलिक शीट्स वापरून १० फूट बाय १० फूट आकाराची पारदर्शक खोली तयार केली. खाली वाळू पसरली. आतमध्ये बसण्यासाठी एक आरामखुर्ची ठेवली. दुसरीकडे विषारी साप गोळा काम सुरू होतं. आमचा सर्पप्रेमी मित्र राजन शिर्के याच्या नेतृत्वाखाली पुण्यातल्या सर्व सर्पमित्रांनी विषारी साप जमवायला सुरुवात केली. कलकत्ता स्नेक पार्कचे संस्थापक दीपक मित्रा अण्णाबद्दलची बातमी वाचून त्यांच्याकडचे विषारी साप घेऊन स्वतः पुण्यात आले. अखेर ठिकठिकाणाहून नाग, माया घोणस, फुरसं आणि पट्टेरी मण्यार अशा एकूण ७२ विषारी सापांची जमवाजम झाली. दरम्यान, मी इंग्लंडच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या कंपनी संपर्क साधून होतो. या रेकॉर्ड्ससाठी त्याच क्षेत्रातील दोन व्यक्तींची रेफरी किंवा पंच म्हणून नेमणूक केली जाते. मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटचे उपसंचालक तसंच सर्पविषतज्ज्ञ डॉ. नीलकंठ वाड आणि पुण्याच्या मॉडर्न कॉलेजच्या प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. वाय. परांजपे या दोन प्रतियश शास्त्रज्ञांची अण्णाच्या वर्ल्ड रेकॉर्डसाठी रेफरी म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी एक रजिस्टर तयार केलं होतं. दर तासाला अण्णाच्या आणि सापांच्या हालचालीच्या डोळ्यात तेल घालून नोंदी घेऊन त्यावर दोघांना सह्या करायच्या होत्या.अखेर सगळी तयारी झाली आणि २० जानेवारी १९८० रविवारी या दिवशी दुपारी चार वाजता अण्णाने सापांच्या खोलीत प्रवेश केला. पुढचे बहात्तर तास नाट्यमय असणार होते. अण्णाला काही होणार नाही याची मनोमन खात्री होती. तरीही थोडी धाकधूक होतीच. अण्णा आत गेला तेव्हा त्याच्या आरामखुचीवर काही साप आरामात विराजमान झालेले होते. बऱ्याच वेळाने अण्णाला खुर्चीवर बसायला जागा मिळाली. या काळात काही सापांनी एकमेकांशी भांडणं उकरून काढली. अण्णानेच ती सोडवली. थंडीमुळे काही साप त्याच्या टी- शर्टमध्ये घुसले. अण्णाने एकेका सापाला हलकेच धरून बाहेर काढलं पण एकाला काढलं की त्याच्या जागी दुसरा हजर! शेवटी हताश होऊन अण्णा तसाच झोपून गेला. दहा-बारा सापही त्याच्या टी-शर्टमध्येच झोपले. आम्हालाही बाहेर डोळा लागला. सकाळ झाल्यावर अण्णाने एकेका सापाला हलकेच बाहेर काढून बाजूला ठेवलं आणि चहा घेतला. नियोजित वर्ल्ड रेकॉर्डच्या बहात्तरपैकी चौदा तास संपून गेले होते. अजूनही अठावन्न तास बाकी होते. दरम्यान, ब्लू डायमंड हॉटेलमधून खास अण्णासाठी सॅण्डविचेस आणि फुट ज्यूस आला होता. अण्णाने फक्त थोडा ज्यूस घेतला. सॅण्डविचेस आम्ही संपवली.
आता अण्णा आणि साप जणू एकमेकांसोबत एकरूप झाले होते. सुरुवातीला त्या खोलीत ७२ साप आणि एक माणूस होता. पण आता मात्र एका खोलीत एकत्र नांदणारे ते ७३ प्राणी होते.
अण्णाचा हा विक्रम बघण्यासाठी तीनही दिवस पुणेकरांची प्रचंड गर्दी होत होती. एवढे विषारी साप अंगाखांद्यावर खेळत असूनही माणसाला चावत नाहीत, हा लोकांसाठी चमत्कारच होता. त्यामुळे थक्क होऊन लोक त्याकडे पाहत राहत. ज्या कारणासाठी आम्ही काम करत होतो आणि ज्यासाठी अण्णाने हा जागतिक विक्रम करण्याचा घाट घातला होता तो सफल होताना पाहून समाधान वाटत होतं. अत्यंत थरारक आणि नाट्यमय असे तीन दिवस होते ते. अण्णासाठी तर होतेच, पण आमच्यासाठीही होते. त्या तीन दिवसांत आई-दादांची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. ते दोघंही खाणंपिणं आणि झोप -सोडून घरीच थांबले होते. आई तर तीन दिवस देव पाण्यात ठेवून बसली होती.
अखेर ७२ तास संपत आले. जागतिक विक्रम घडण्याची वेळ आली! या आगळ्यावेगळ्या विक्रमाच्या पूर्ततेप्रसंगी शंतनुराव किर्लोस्कर स्वतः जातीने हजर होते. पुण्यातले आणि राज्यातले आमचे सर्प आणि प्राणिमित्रही गोळा झाले होते. दीपक मित्रांसारखी राज्याबाहेरून आलेली मंडळीही होती. बुधवारी, २३ जानेवारीला दुपारी चार वाजता दीपकने केबिनच्या दाराची कडी काढली. बाहेर येताच अण्णाने त्याला आलिंगन दिलं. त्या दोघांचे आणि आमचेही डोळे आनंदाश्रूंनी भरून वाहत होते. त्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. अण्णाचे अनेक फोटो काढले गेले. त्यानंतर मी ‘गिनीज बुक’च्या लंडनमधल्या मुख्य कार्यालयात जागतिक विक्रम प्रस्थापित झाल्याचं वृत्त विश्रामबाग- वाड्याजवळच्या ऑफिसमधून तारेने कळवून टाकलं. अण्णाने जागतिक विक्रम कला होता. ७२ तासांपूर्वी माणसांचा एक प्रतिनिधी सापांच्या सान्निध्यात रहायला गेला आणि ७२ तासांनंतर तो सापांचा प्रतिनिधी बनून माणसांत आला होता! पुढे आयुष्यभर अण्णा सापांचा अन् प्राण्यांचा प्रतिनिधी म्हणूनच काम करत राहिला. आजही करतो आहे.
— ‘सोयरे वनचरे’ (ले.अनिल खैरे) या पुस्तकातून
(माहिती संकलन : सतीश खाडे,पुणे)
प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈