‘सत्ता‘ या शब्दाला वेढून राहिलेला माजोरीचा उग्र दर्प या शब्दातील विविध चांगल्या अर्थाचे कोंब झाकोळून टाकणारा ठरतो.
खरंतर सत्ता वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नसतेच. रक्ताच्या असो वा मैत्रीच्या,जोडलेल्या,मानलेल्या विविध अतूट नात्यांचा अविभाज्य भाग असणारी मायेची, प्रेमाची सत्ता कधीच विध्वंसक नसते. ती संजीवकच असते.
आईवडिलांना त्यांच्या अपत्यांवरील मायेच्या नात्यातून मिळणाऱ्या सत्ता/अधिकारात मायेचा पाझर आणि आपल्या अधिपत्याखाली असणाऱ्या पाल्याच्या हिताची काळजी यांचेच प्राबल्य असते आणि सत्ता या शब्दाला तेच अपेक्षित आहे. म्हणूनच कौटुंबिक पातळीवरील अशा गृहीत सत्तेच्या बाबतीतही प्रेम आणि आदर यांची जागा जेव्हा अधिकार आणि वचक घेऊ लागते तेव्हा मात्र ती सत्ताही संजीवक न रहाता विध्वंसक बनू लागते.
खरंतर ‘सत्ता‘ ही निसर्गानेच स्वतःचं अधिपत्य अबाधित ठेवून निसर्गावर अवलंबून असणाऱ्या सर्वच निसर्ग घटकांच्या व्यवस्थापन सुविहित रहावं या उद्देशाने निसर्गनिर्मितीपासूनच अस्तित्वात आणलेली एक व्यवस्था आहे. सर्व प्राणीमात्रांमधे या सत्तेचं स्वरूप अर्थातच वेगवेगळं असतं. आपण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे असं म्हणतो. पण खरं तर विविध पक्षी आणि प्राणी यांचे जीवनपद्धती पाहिली की त्यात वैविध्य असलं तरी एकमेकांच्या सोबतीने राहण्याची त्यांच्यातील असोशी हा एक समान धागा असल्याचं आपल्या लक्षात येतं. पक्ष्यांचे थवे, माकडांचे कळप, हत्तींची एकत्रकुटुंबे,समुहाने चरणारी जनावरे ही याचीच प्रतिके म्हणता येतील. या विविध पक्षीप्राण्यांमधे त्यांच्या त्यांच्या जीवन पद्धतीनुसार असणार सत्ताकेंद्र आणि त्याचं स्वरूप हा सखोल अभ्यासाचाच विषय ठरावा. अशा जाणीवपूर्वक केलेल्या अभ्यासातून आकाराला आलेली व्यंकटेश माडगूळकर यांची ‘सत्तांतर‘ ही कादंबरी माकडांच्या कळपातील प्रमुखाची सत्ता/वर्चस्व आणि योग्य वेळ येताच त्यात होणार सत्तांतर यांचं अतिशय अचूक आणि नेमकं चित्र करते.
या नैसर्गिक व्यवस्थेत सत्तेमुळे मिळणारा अधिकार आणि वर्चस्व हे गृहीत आहेच पण ते सत्तेमुळे आलेल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पूर्ण करून अवलंबितांचं संगोपन, रक्षण, हित आणि समाधान जपण्याचं मुख्य कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडता यावं यासाठीच. याचं भान पर्यावरणाच्या घातक पडझड विध्वंसानंतरही इतर सर्व निसर्ग घटकांनी आवर्जून जपलेले दिसून येतं. अपवाद अर्थातच फक्त माणसाचा!!
म्हणूनच ‘सत्ता‘ या शब्दात मुरलेल्या माजोरीच्या उग्र दर्पाला जबाबदार आहोत आपणच.सत्तेला अपेक्षित असणारी कर्तव्य आणि जबाबदाऱ्या विसरून सत्तेचे थेट नातं राजकारणाशी जोडलं गेल्याचा हा परिणाम! ‘खुर्ची‘च्या असंख्य किश्शांमधे सत्तेचा लोभ महत्त्वाचा घटक ठरत गेल्याचं आपल्या लक्षात येईल. त्यामुळेच सत्ता प्राप्त होताच ती अबाधित ठेवण्याच्या अतिरेकी हव्यासामुळे सत्य न् स्वत्वाचं मोलही सहजी खर्ची घालण्याची अतिरेकी प्रवृत्ती मूळ धरु लागते आणि हळूहळू फोफावते.मग राजकारण ही व्यवस्था न रहाता विधिनिषेध धाब्यावर बसवून खेळला जाणारा क्रूर खेळ होऊन जातो.अशा परिस्थितीत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीच्या कटकारस्थाने ‘सत्तेपे सत्ता‘ हा जशास तसे या न्यायाने परवलीचा शब्द होऊन बसतो!
निसर्गरम्य पाचगणीत प्रवेश करत असताना उजव्या बाजूला टोलनाका आहे. हा टोलनाका पार केल्यानंतर रस्त्यालगतच हॉटेल (Ravine) रविनचा बोर्ड दिसतो .या हॉटेलमध्ये अनेक प्रसिद्ध ,मान्यवर व्यक्ती आणि बॉलीवूडचे सिनेकलावंत , शूटिंगसाठी येत राहतात . कारण हॉटेलच्या रूममधून दिसणारा कृष्णा खोऱ्याचा , धोम धरणाचा निसर्गरम्य व्हॅलीचा परिसर , पश्चिमेकडे महाबळेश्वरचे डोंगर , पूर्वेकडेचा सिडने पॉइंटचा परिसर सर्व मोसमांमध्ये नेहमीच विलोभनीय दिसतात .हॉटेलच्या मालकीणबाई बिस्मिल्ला सुनेसरा मॅडम व त्यांचा दक्ष परिवार येथे येणाऱ्या सर्व पर्यटकांना उत्तम पद्धतीचे जेवण, राहण्याची सर्व अत्याधुनिक सुखसुविधा व येथील दक्ष स्टाफ मेंबर्स सर्वोत्तम सर्व्हिस देतात. त्यामुळे बॉलीवुडचे अनेक नामवंत सुप्रसिद्ध कलाकार हॉटेल रविनमध्ये राहण्याला प्राधान्य देतात.
अशा या स्टार हॉटेलमध्ये माझे चित्रप्रदर्शन नुकतेच सुरू झाले होते . त्या काळात शाहरुख खान व दिग्दर्शक अशुतोष गोवारीकर यांच्या ‘स्वदेश‘ नावाच्या चित्रपटाची शूटिंग वाईजवळ मेणवली गावात सुरू होती . संपूर्ण दिवस शूटिंगसाठी शाहरुख खान व्यस्त असायचा .त्याच्या स्वतंत्र व्हॅनिटी कॅराव्हॅनमध्येच तो ये जा करत असल्याने व मुक्काम हॉटेलच्या टॉप रुममध्ये असल्याने त्याचे दर्शन दुर्लभ झाले होते .
एके दिवशी सकाळी मॉर्निंग वॉकला सिडने पॉईंटच्या परिसरात चाललो होतो. त्यावेळी हॉटेलच्या परिसरात सकाळी सकाळीच खूप धावपळ सुरू झाली होती. मी सहज चौकशी केली त्यावेळी कळले की आज मेणवली घाटावर सूर्योदयाचा शॉट आहे, आणि त्यासाठी आज भल्या पहाटे शहारुख खान तयार होऊन निघाला आहे. प्रथम तो रिसेप्शनच्या शेजारी असलेल्या रेस्टॉरंटमध्ये येणार आहे. शाहरुख खान सकाळी फक्त एक ग्लास फ्रूट ज्यूस घेतो अशी माहिती तेथील ओळखीच्या वेटरने मला सांगितली. मग मी देखील कोपऱ्यातली एक जागा पकडून शाहरुखच्या दर्शनासाठी थांबलो.
इतक्यात धावपळ सुरू झाली. शाहरुख खान मस्त ऑफव्हाईट कॉटनची पॅन्ट व स्काय ब्लू कलरचा बाह्या दुमडलेला शर्ट घालून रेस्टॉरंटमध्ये आला. त्याने नेहमीच्या सवयीप्रमाणे सर्वांशी हसून सर्वांकडे प्रेमाने हात वर करून शुभेच्छांचा स्विकार केला. नंतर त्याच्या फेव्हरेट फ्रुट ज्यूसची मागणी केली .परंतु रात्रीच्या मॅनेजरने सकाळच्या मॅनेजरला व वेटरच्या टीमलीडरला इतक्या लवकर शूटिंग आहे याची माहिती दिली नव्हती, त्यामुळे फ्रुट ज्यूस तयारच केला नव्हता . मुख्य वेटरने पाच मिनिटात नवीन ज्यूस तयार करतो असे सांगितले. हे ऐकताच शाहरुख खान जरा तडकला, ‘मी रात्रीच इन्स्ट्रक्शन देऊन ठेवली होती तरी ज्यूस का तयार ठेवला नाही‘ अशी विचारणा त्याने केली.
“कमिटमेंट मीन्स कमिटमेंट.. नेव्हर फरगेट“ असे तो बोलला आणि काचेचा दरवाजा उघडून शूटिंगसाठी कॅराव्हॅनमधून थोड्या रागानेच नाराजीने निघून गेला.
इतक्यात हॉटेलच्या मालकीणबाई बिस्मिल्लामॅडम येथे आल्या. त्यांनी काय घडले याची सर्व माहिती घेतली. त्या कोणावरही रागावल्या नाहीत. सरळ किचनमध्ये गेल्या आणि संत्र्याचा दोन ग्लास ज्यूस स्वतःच्या हाताने त्यांनी तयार केला. तो ज्यूस एका मोठ्या बंदिस्त जारमध्ये भरला आणि मुख्य वेटरकडे देऊन ड्रायव्हरला हाक मारली आणि मेणवलीला ताबडतोब शाहरुखच्या गाडीच्या पाठोपाठ लगेच जायला सांगितले. इतक्यात त्यांनी मला पाहिले. इतक्या सकाळी पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले व माझ्यासमोरच मॅनेजरला सांगितले …. ” कमिटमेंट मीन्स कमिटमेंट ” नेव्हर फरगेट . त्या मॅडम आपल्या इतर रोजच्या कामासाठी शांतपणे निघून गेले गेल्या .
मला मात्र मनातून राग आला. पाच दहा मिनिटे थांबला असता तर शाहरुख खानला काय धाड भरली असती का ? ही सगळी स्टार मंडळी पैसा, प्रसिद्धी मिळाली की भाव खातात. त्यांना इगो येतो. .फुकटची हुशारी व स्टाईल मारत राहतात व इतरांवर इम्प्रेशन मारत राहतात. असा भलताच विचार करत मी परत घराकडे निघालो .
मुख्य रस्त्यावरून जात असताना माझा एक जवळचा मित्र वाईच्या दिशेने मोटरसायकलवरून एकटाच चालला होता .माझ्या शेजारी मोटरसायकल थांबवून त्याने मला वाईला चाललोय, येतो का बरोबर असे सहज विचारले .त्यावेळी मी मेणवली येथे शाहरुख खानच्या ” स्वदेश ” या पिक्चरचे शूटिंग चालू आहे व आत्ताच शाहरुख खान तिकडे गेला आहे असे त्याला सांगितले . हे ऐकताच आमचा मित्र चल ,येतोस का मग मेणवलीला ? असे विचारल्यानंतर मी ही लगेच तयार झालो . मला बघायचे होते की इतक्या घाईने शाहरुख खान का गेला ? तिथे जाऊन तो काय असा तीर मारणार होता ? मग जरा वेगाने मोटरसायकल चालवत आमच्या मित्राने शाहरुखची व्हॅनिटी कॅराव्हॅन गाठली. त्याच्यापाठोपाठ हॉटेल रविनची ज्युस घेऊन गाडी चालली होती .त्याच्या पाठोपाठ पाठलाग करत आम्ही देखील मेणवली घाटावर पोहोचलो.
मेणवली घाटावर पोहोचलो आणि मी थक्क झालो .सकाळच्या त्या थंडीत जवळपास तीनशे जणांचा समुदाय घाटावर उपस्थित होता . दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेत्री गायत्री जोशी व इतर जेष्ठ स्त्री-पुरुष कलाकार व मॉब सीनसाठी अनेक स्थानिक गावकरीही सर्व तयारीनिशी उपस्थित होते. कॅमेरामन, सहाय्यक तंत्रज्ञ, ज्युनिअर ॲक्टर्स सर्व मंडळी शाहरुखचीच वाट पाहत होते. शाहरुखच्या नुसत्या एंट्रीनंतर सर्वांनाच जोश व उल्हास आला. सूर्याची कोवळी किरणे घाटावर व मंदिरावर नुकतीच पसरू लागली होती. आशुतोष लाऊडस्पीकरवरून कॅमेरामन व इतर तंत्रज्ञ व सहाय्यकांना सूचना देऊ लागला . सगळे युनिट शॉटच्या तयारीला वेगाने लागले. शाहरुख खानचा ड्रेसमन धावत आला. पांढरी धोती व झब्बा घालून मेकअपसाठी समोर बसला. शाहरुख खानने एकदोन टेक मध्येच शॉट ओके केला आणि शूटिंगची सर्व मंडळी विश्रांतीसाठी थांबली.
खुर्चीवर निवांतपणे बसलेल्या शाहरुख खानला पाहून रविन हॉटेलचा मुख्य वेटर ट्रेमधून ज्यूसचा ग्लास घेऊन समोर उभा राहीला . अनपेक्षितपणे शूटिंगच्या जागेवर आठवणीने बिस्मिल्ला मॅडमने ज्यूस पाठवलेला पाहून शाहरुख खानही भारावला व त्याने वेटरला मिठी मारली आणि म्हणाला ‘ सॉरी , मी लगेच आलो .कारण या सूर्योदयाच्या शॉटसाठी माझ्यासाठी येथे तीनशे लोक पहाटेपासून थंडीत वेटिंग करत आहेत याची मला जाणीव होती . आपण प्रत्येकाच्या वेळेची किंमत केलीच पाहीजे ना ? कमिटमेंट्स मीन्स कमिटमेंट . नेव्हर फरगेट .सकाळी तुला रागावलो . सॉरी वन्स अगेन .’
हा प्रसंग मला मेणवली घाटावर फिरताना नेहमी आठवतो आणि त्यामुळे स्वदेश माझा ऑल टाईम फेव्हरेट पिक्चर आहे . एखादा कलाकार त्याच्या कलेविषयी व स्वतःच्या व इतरांच्याही वेळेप्रती किती कमिटेड असतो याचे हे उत्तम उदाहरण मी स्वतः पाहिले होते .
पण आता दुर्दैवाने अनेक क्षेत्रात अशी कमिटमेंट न पाळणारी माणसेच जास्त आढळतात . आपल्या कृतीमुळे व अनकमिटेड वृत्तीमुळे इतरांच्या मनाला किती यातना सहन कराव्या लागतात याची जाणीव बोथट झाली आहे . व त्याची आता सर्वांना सवयही झाली आहे .
आपण एखाद्या चित्रकाराचे चित्र प्रदर्शन पाहायला जातो व त्यातील चित्र पाहत असताना चित्रातील रंग , आकार , पोत , माध्यम , चित्रातील विषयाचे सादरीकरण मनाला का आवडते ? याचा विचार केला तर कळते की त्या चित्रकाराची त्या चित्रासोबत एक भावनिक ” कमिटमेंट “असते. त्यात त्याने जीव ओतलेला असतो म्हणून ते चित्र देखील पाहणाऱ्याच्याही हृदयाला भिडते . पुन्हा पुन्हा पहावेसे वाटते .
एखाद्या गायकाचे श्रवणीय गाणे ऐकताना किंवा एखाद्या वादकाचे असामान्य कौशल्य पाहून सूर, ताल , लय , आवाजातील जादू, शब्दफेक तुम्हाला का भावते ? कारण त्यात प्राण ओतलेला असतो . कारण गायकाची ,संगीतकाराची , कवीची , वादकाची त्या गाण्यासोबत त्या वाद्यासोबत त्या कवितेसोबत एक मनःपूर्वक जिवंत ” कमिटमेंट ” असते .
एखादा अभिनेता ,अभिनेत्री त्यांची भूमिका इतकी जिवंत व उत्कृष्ट पद्धतीने सादर करतात की ते नाटक किंवा सिनेमा पाहताना प्रेक्षक स्वतःला विसरून जातात कारण त्या कलाकाराची त्या सिनेमातील कॅरेक्टरशी एकरूप होण्याची एक वेगळी ” कमिटमेंट “असते .ती भूमिका ते जगतात .एकरूप होतात , समरस होण्याची , भूमिकेला न्याय देण्याची कृती , रसिकवृत्ती रसिक प्रेक्षकानां खूप भारावून टाकते .
एखादा फोटोग्राफर रोजच्या जीवनातील असा एखादा प्रसंग अशा बारकाईने व शोधक नजरेने टिपतो की तो फोटो पाहून प्रत्येक जण अचंबित होत जातो .हजारो शब्दांचे सामर्थ्य एका फोटोमध्ये असते असे म्हणतात, कारण त्या क्लिकमध्ये त्या फोटोग्राफरची दृश्य पकडण्याची एक “कमिटमेंट “असते .
एखादा लेखक त्याच्या लिखाणातून असे शब्दांचे मायाजाल पसरवतो की ते वाचत असताना वाचक मनातून फार हेलावून ,भारावून जातो . एका वेगळ्या अज्ञात विश्वात तो विहार करायला लागतो .कारण त्या लेखकाची त्या लेखाशी ” कमिटमेंट ” असते ही ” कमिटमेंट ” सगळीकडेच फार फार महत्वाची असते .
तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा तुमची कमिटमेंट त्या क्षेत्राशी प्रामाणिकपणाची असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होत रहाल याची खात्री आहे . तुम्ही शेतकरी असाल तर उत्कृष्ट बी बियाणे , उत्तम खते वापरून , मेहनतीने उत्तम पीक घेण्यासाठी तुम्ही कमिटेड असाल .
तुम्ही छोटे असो वा छोटे हॉटेल व्यवसायिक असाल तर तुमची सर्व्हिस व पदार्थांची चव चाखून हॉटेलबाहेर खाण्यासाठी खवय्यांची मोठी रांग लागते , लागणारच.
उत्कृष्ट वकील , उत्कृष्ट प्राध्यापक , उत्कृष्ट दुकानदार , उत्कृष्ट कारागीर ,उत्कृष्ट बिझनेसमॅन किंवा शालेय शिक्षक किंवा मोठे सरकारी उच्च ऑफिसर किंवा साधा कारकून असाल तरी तुम्ही तुमच्या क्षेत्राशी असलेली ” कमिटमेंट ” पाळली तर यशाची शिखरे व दारे सर्वांना नेहमीच उघडी असतात . फक्त हवी असते एक कमिटेड झोकून देण्याची वृत्ती .
☆ “गावांच्या नावातही मजा आहे…” ☆ श्री कचरू चांभारे ☆
गावांच्या नावातही मजा आहे. चला जरा शोधू या
एकदा मुंबईला जाताना रोडवर एका गावाच्या नावाचा बोर्ड दिसला. गावाचे नाव आहे सरळगाव, ता.मुरबाड जि.ठाणे. .. यात काय नवल ? असं वाटेल. पण नावातच नवल आहे. कारण गाव कधीच सरळ नसतं, पण हे गाव नावाने सरळ आहे.अन् मग काय सरळगावावरून मला अनेक गंमतीशीर गावांची नावे आठवली.
विरुद्ध अर्थी नावाची गावे— उदा. सरळगाव ×वाकडगाव, वाकडेवाडी, आनंदवाडी ×वैतागवाडी, राजापूर ×राणीपूर, मोठीवाडी × छोटीवाडी, नवापूर, नवेगाव× जुनेगाव , प्रकाशा × अंधारवाडी, ,लहानगाव × मोटेगाव
☆ “मला अश्रु देशील का ?” – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
शनिवारी दुपारीच बंड्याचा फोन आला. “उद्या सकाळी वृध्दाश्रमाला भेट द्यायला येता का ?”
“ओके “! मी ही तयार होतोच. नाहीतरी बरेच दिवसांपासून वृद्धाश्रम बघायचं होतं.
सकाळी लवकर उठून बंड्याबरोबर निघालो. वाटेत बंड्याने चिवडा, मिठाई, पत्ते असे बरेच काही घेतले. आत शिरताच तिथली मंडळी खूष झाली. ” हाय हिरो ! ” हाय चिकण्या”!! अशा हाका सुरू झाल्या. सगळे वृद्ध आजी आजोबा आपले वय विसरुन बंड्याला हाका मारीत होते. बंड्याही त्यांच्याशी हसत उत्तरं देत होता. हातातील सर्व वस्तू ऑफिसमध्ये जमा करून फक्त एक छोटा मिठाईचा बॉक्स हातात घेऊन कोपऱ्यातल्या खोलीत शिरला.
त्या खोलीत व्हीलचेअरवर एक वृद्धा बसली होती. पंचाहत्तर एक वय असेल तिचे, पण चेहऱ्यावरील बुद्धिमत्तेचे तेज काही लपत नव्हते. डोळ्यातही वेगळीच चमक होती.
” ओय बुढी, कैसी हो ?” बंड्याने तिला पाहताच आरोळी ठोकली.
” नालायका आहेस कुठे ? तुझ्या मैत्रिणीला विसरलास की काय “? तिने खणखणीत आवाजात उत्तर दिले आणि हात पसरले.
बंड्या हसत हसत तिच्या मिठीत शिरला. माझी ओळख करून देताच तिने माझ्याकडे पाहून विनयाने हात जोडले. मी खाली वाकून पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताच नको नको म्हणत तिने व्हीलचेअर मागे घेतली.
” ही माझी मैत्रीण. थोडी म्हातारी दिसतेय, पण लय खोडकर. एकमेकांना शिव्या दिल्याशिवाय दिवस जात नाही आमचा. मेल्यावर तिची सर्व इस्टेट माझ्या नावावर करणार आहे, म्हणून सहन करतोय तिला,” असे बोलून बंड्या हसला.
” काही मिळणार नाही तुला माझ्याकडून. मरणावर टपलाय माझ्या. डायबिटीस आहे हे माहीत असूनही गोड मिठाई आणतोस नेहमी. माझी इस्टेट तुझ्या नाही तर तुझ्या नातवाच्या नावावर करणार आहे मी”, तिने जोरात उत्तर दिले.
आश्चर्यचकित झालेला माझा चेहरा पाहून दोघेही हसू लागले. मग ती सांगू लागली, “मी जयमाला. पेशाने शिक्षिका, विद्यार्थ्यातून चांगले नागरिक घडवायची जबाबदारी माझी. एका शाळेतून प्रिन्सिपॉल म्हणून निवृत्त झाले. घरात नवरा आणि मी, मुलगा हुशार होता म्हणून बाहेर गेला आणि तिकडचीच गोडी लागली आणि तिकडचाच झाला. आज कुटुंबाबरोबर सुखात आहे. मुलगी लग्न होऊन चांगल्या घरात गेली पंचवीस वर्षे संसार केला, पण माझ्याइतके आयुष्य नाही लाभले तिला. पाच वर्षांपूर्वी तीही एका छोट्या आजाराचे निमित्त होऊन देवाघरी गेली. त्या गोष्टीचा धसका माझ्या नवऱ्याने घेतला आणि दोन वर्षांपूर्वी तेही गेले .
मुलाने माझ्यासाठी चोवीस तास बाई ठेवली. परदेशातून पैसे पाठवत राहिला. मलाही हे गुडघ्याचे आजारपण सुरु झाले आणि ही व्हिलचेअर माझ्या नशिबात आली. माझ्या असल्या अवस्थेमुळे कुठलीच बाई टिकत नव्हती. मुलगी गेल्यावर जावयाने पण संबंध तोडले. मुलाला इकडे यायची इच्छा नाही. खूप निराश झाले होते मी.
शेवटी मुलाने नाइलाजाने वृध्दाश्रमाचा पर्याय आणला आणि मी आनंदाने स्वीकारला. इथे आल्यावर अवती भवती सर्व असायचे, पण एकटेपणाची भावना काही कमी व्हायची नाही. तेव्हढ्यात बंड्या भेटला. तो आणि त्याचे मित्र अनाथ आणि निराधार व्यक्तींवर आपले नातेवाईक समजून अंत्यसंस्कार करतात. देवा…. ! असेही लोक असतात तर समाजात. मग हे लोक मला आपले वाटू लागले.
हा बंड्या नेहमी हसरा. याला दुःख म्हणजे काय ते माहीत नसावे, असेच वाटते. कोणाच्या अंत्यसंस्काराची तयारी करताना याचा चेहरा गंभीर, पण डोळ्यांत दुःख दिसत नाही. पहिल्यांदा मला भेटला तेव्हा मिठाईचा तुकडा हाती दिला. मी म्हणाले, मला डायबिटीस आहे, तर म्हणाला, “असे किती वर्ष जगायचे आहे तुम्हाला ? पुरे झाले आता आयुष्याची आणि तब्बेतीची काळजी करत जगणे. मरण लवकर येऊ दे म्हणता आणि तब्बेतीची काळजी घेता, खा गप्प, तेवढीच वर्ष कमी होतील. मन मारून जगू नका, आणि मीच येणार आहे तुम्हाला पोहचवायला” . त्याचे हे प्रवचन एकून दिवसभर हसत होते.
त्या दिवसापासून माझे आयुष्य बदलून गेले. आता फक्त प्रसन्न रहाणे, स्वतःवर हसणे एवढेच मला माहितीय.”
त्यांचे बोलणे ऐकून आम्ही हसू लागलो.
मी म्हटले ” हो. हा असाच आहे, मीही याला कधी गंभीर बघितले नाही “.
“बंड्या आज फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने मला एक गिफ्ट देशील ?” तसा बंड्या हसला.
“च्यायला या वयातही तुझ्या इच्छा आहेतच का ? काय पाहिजे ग तुला ? तुझे अंत्यसंस्कार तर मीच करणार. दिवस ही करू का ?”
“नको. दिवस नको करुस, फक्त थोडे रडशील का माझ्यासाठी ? आपण मेल्यावर आपल्यासाठी कोणी रडणार नाही ही कल्पनाच काहीतरी वाटते रे ? तुला मी मित्र मानते, पण तूही रडणार नाहीस याची खात्री आहे मला. म्हणून नाइलाजाने आज तुझे अश्रू मागतेय, देशील का रे ?”
अनपेक्षित मागणी ऐकताच बंड्या हादरलाच, एका क्षणासाठी त्याचा चेहरा दुःखाने पिळवटून निघाला. मी ही अस्वस्थ झालो.
“च्यायला! म्हातारे, काहीही मागतेस!”, असे म्हणत बंड्याने तिचे हात हातात घेतले.थोडा वेळ स्तब्ध होऊन तिच्या डोळ्यात पाहिले आणि डोळे पुसत पराभूत योद्ध्यासारखा खोलीच्या बाहेर पडला. पण डोक्यात “तुझे अश्रु मागते” हे शब्द फेर धरून नाचत होते…
संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आजच्या या आधुनिक युगात प्रत्येकाकडे मोबाईल आहेत. मोबाईल मध्ये फोटो काढायचा कॅमेरा देखील असल्यामुळे फोटो काढायचे वेड दिवसेंदिवस वाढतच आहे. फोटो काढून देणारा व्यक्ती नसेल तेव्हा सेल्फी काढला जातो. स्वतःलाच स्वतःचा फोटो काढता येत असल्याने त्याची मजा काही औरच आहे. अलीकडील तरूण पिढी तर सेल्फी काढण्यासाठी वेडी झालेली दिसतात. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी पाण्याच्या जवळ समुद्रकिनारी प्रेक्षणीय स्थळी परिसर चांगला असेल तिथे वाटेल त्या त्या प्रसंगाचे सेल्फी फोटो काढून आठवणीच्या संग्रहात ते ठेवले जातात. अशा फोटोमुळे निश्चितच आयुष्यातील चिरस्मरणीय प्रसंगाच्या स्मृती जपता येतात. हा एक महत्त्वाचा भाग आहे.
त्यामुळे सेल्फीने मानवाला दिलेला हा अमूल्य ठेवाच आहे.
अलीकडच्या तरुणांना तर या सेल्फीने वेडच लावले आहे. दिवसातून कितीतरी वेळा ते आपला स्वतःचा सेल्फी फोटो काढतात. मग पाहतात त्या अँगलने फोटो चांगला निघतो की या अँगलने चांगला निघतो याचा विचार करतात. चांगले निघालेले फोटो ठेवतात. खराब निघालेले डिलीट मारतात. आपल्या मित्रमंडळींसोबत ,कुटुंबातील व्यक्तींसोबत,गर्लफ्रेंड वा बॉयफ्रेंड सोबत असे सेल्फी फोटो काढण्यात त्यांना काही गैर वाटत नाही. गर्लफ्रेन्ड किंवा बॉयफ्रेंड सोबत पुढे लग्न झाले तर काही बिघडत नाही. परंतु दुसऱ्या व्यक्ती सोबत लग्न झाले तर अशा फोटोंचा गैरवापर करून ब्लॅकमेल करणारीही काही मंडळी असतात. आपले प्रेम यशस्वी झाले नाही तर नैराश्य येऊन दुसऱ्या व्यक्तीला देखील सुखाने जगू द्यायचे नाही असे मनाशी ठरवून अशा फोटोंचा गैरवापर करणारेही समाजात आढळतात. तेव्हा सेल्फी काढताना सावध राहणे आवश्यक आहे.सेल्फी काढताना प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहणे हा एक गमतीदार अनुभव असतो कधी रागाचे भाव चेहऱ्यावर असतात तर कधी हास्याचे भाव असतात. कधी चेहरा वाकडा तर कधी हसमुख निघालेले फोटो ही गमतीदार असतात आपण आपल्या फोटोकडे पाहून हसायला लागतो.
सेल्फी म्हणजे स्वतःचा फोटो काढणे असा अर्थ आपण लक्षात घेतो. सेल्फी काढण्याच्या नादात काही अपघात घडून गेल्याचे व्हिडिओ आपण व्हाट्सअप वर पाहिले आहेत यात नदीच्या काठावर सेल्फी काढणाऱ्या मुलाचा पाय मगरीने धरला व मुलाला ओढून नेले कड्यावर उभे राहून सेल्फी काढताना खाली पडणे किंवा पाण्यात पडणे सेल्फी काढताना फोन पाण्यात पडणे अशा काही अपघाताची उदाहरणे आपण पाहिली आहेत. तेव्हा सेल्फी काढताना अपघात होणार नाही स्वतः सुरक्षित राहू याची काळजी घेणे देखील आपले कर्तव्य आहे. सेल्फी म्हणजे स्वतःचा फोटो काढणे असा वरवरचा अर्थ असला तरी आपण कसे आहोत हे पाहणे महत्त्वाचे आहे. स्वतःचे व्यक्तिमत्व जर प्रभावी बनवायचे असेल तर स्वतःच्या अंतरंगाचा सेल्फी काढायला पाहिजे. सेल्फी म्हणजे कॅमेरातून काढलेला बाह्य स्वरूपाचा फोटो होय. परंतु बाह्य रंगापेक्षाही अंतरंग पाहणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या स्वतःच्या अंतरंगाचा फोटो काढायचा असेल तर मला एका दिवसात किती वेळा राग येतो.
लहान सहान गोष्टींवरून माझी चिडचिड होते का?.
चिडचिड कमी करायची असेल तर मला या रागावर नियंत्रण कसे मिळवता येईल त्यासाठी मी काय करायला पाहिजे. माझ्यात या दिशेने परिवर्तन व्हायला पाहिजे. मला पैशाचा मोह होतो का अवैध मार्गाने पैसा गोळा करण्यासाठी माझे मन तयार होते का? हा मोह टाळून कष्टाने मिळवलेल्या पैशात समाधानाने राहण्याची वृत्ती माझी वाढीस लागलेली आहे का?
या दिशेने विचार करणे योग्य ठरते.
कोणतीही सुंदर स्त्री दिसली की कामांध होणे किंवा कोणत्याही सुंदर पुरुषाशी लगट करण्याची इच्छा होणे ही विकृतीच होय. संयमाने मनावर व अशा भावनांवर नियंत्रण ठेवण्याची पावले उचलायला हवीत. आजची तरुण पिढी तर अशा भावनांच्या अधिकच आहारी गेलेली आपल्याला दिसते. स्वतःच्याच रूपाचा व्यक्तिमत्त्वाचा अहंकार वाटणे व माझ्यापेक्षा कोणीही चांगले नाहीच. इतर सारे तुच्छ असे लेखण्याची भावना खूप लोकांमध्ये आढळते. हिंदी चित्रपटात गाणे आहे. गोरे रंगपे न ईतना गुमान कर. गोरा रंग दो दीनमे ढल जायेगा हेच सत्य आहे. अहंकार जाईल व इतरांचा सन्मान करण्याची भावना वाढीस लागेल या दृष्टीने विचार करून पावले उचलावी. द्वेष आणि मत्सराची भावना ही जीवनात अस्वस्थता निर्माण करते.
कोणाचा न करी द्वेष , दया मैत्री वसे मनी!
असे रामदास स्वामींनी म्हटले आहे. द्वेष आणि मत्सराच्या भावनेला क्रोधाची जोड मिळून नको त्या घटना जीवनात घडून आलेली अनेक उदाहरणे आपण रोजच वर्तमानपत्रांमध्ये वाचतो. वेळीच या भावनेला लगाम घातला तर सर्व मंगल होईल. लोभापाई इतरांवर अन्याय करणारे लोक समाजात दिसतात अधिक धन प्राप्त करण्याचा लोभ व तेही विशेष कष्ट न करता मिळत असेल तर चांगलेच म्हणून त्यामागे धावणारे लोक लोभाने मनःशांती गमावतात. सातवा रिकामा हंडा भरावा म्हणून मरेस्तोवर काम करूनही तो भरत नाही म्हणून चिंताग्रस्त होण्याची कथा आपण ऐकली आहे. लोभापाई दिवसभर धावून जमीन पायाखाली घालणारा माणूस शेवटी पूर्वीच्या जागेपर्यंत पोहोचू शकत नाही आणि अति धावल्यामुळे त्याचा मृत्यू होतो. ही कथा सर्वांना माहिती आहे. लोभापाई जीवनाची माती करण्यात काय अर्थ आहे. काम क्रोध मद मोह आणि मत्सर या साऱ्या विकार विचारांना ताब्यात ठेवून जीवन जगाल तर तुमचा सेल्फी आनंदी हसमुख आणि शांत चेहऱ्याचा निघेल एवढे निश्चित.
मॉर्निंग वॉकला गेलो होतो, तळ्याला चार फेऱ्या मारल्यावर बसलो, तेवढ्यात बाजूने आवाज आला. ” काय रे मन्या, आज कवळी विसरलास का रे!”
खणखणीत आवाजातले हे वाक्य ऐकलं, आणि गर्रकन मान वळवली. तळ्याच्या काठावर आठ दहा, सत्तर ऐंशीच्या घरातले तरुण बसलेले, आणि बरमुडा आणि टी शर्ट घालून येणाऱ्या मन्याकडे बघून फिदीफिदी हसत होते. मन्या त्यांना म्हणाला, ” हसा लेको, ज्याची जळते त्यालाच कळते, यु एस ला गेलो होतो, येताना कवळीच विसरलो, पाठवलीय मुलानं कुरियरनी पण अजून आली नाहीये. तीन दिवस झाले पेज खातोय. तुम्हाला काय होतंय खोटे दात काढायला.”
तेवढ्यात एक लेंगा आणि सदरा घातलेले आजोबा उठले आणि लटक्या रागानं म्हणाले, ” खोटे दात काय रे, हे बघ” म्हणत बोळक उघडलं, तर टेडी बिअर सारखे दोन दात लुकलुकत होते, बाकी सगळं वाळवंट! “दात दोनच असले, तरी कडक बुंदीचा लाडू खातो अजून.”
“खातोस की चघळतोस रे” ख्या ख्या, करून सगळे हसले.
“नान्या चघळतोस तू लेका. काल घरी जाताना चार शेंगदाणे तोंडात टाकलेस, ते संध्याकाळी देवळात आलास तरी चघळतंच होतास. ह्ये ह्ये ह्ये.
“हाट, ते साखर फुटाणे होते देवळातले!”
असे मस्त संवाद चालू होते.
मग नादच लागला मला रोज त्यांच्या गप्पा ऐकण्याचा.
जवळपास पाच सहा महिने झाले असतील, मला त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता. पण कधी कोणाची कुरबुर ऐकली नाही. फक्त नोटबंदी झाली त्यावेळेस, नाना तावातावाने, भांडले होते.
“शिंच्या त्या मोदिने माझं पितळ उघडे पाडलन, बायको पासून लपवून ठेवलेले दोन हजार रुपये काढायला लाविलें हो “
“मॅग, लापवायचे कशाला म्हणतो मी! मी बघ निघताना बायको पुढे रोज भिक्षांदेही करतो, ठेवते २०/२५ रुपये हातावर, तेवढीच आपली विडी काडीची सोय! काय?
एक दिवस अचानक सगळा च्या सगळा ग्रुप गैरहजर!
त्यानंतर माझ्या कामामुळे मला दोन तीन दिवस जमलं नाही, चौथ्या दिवशी गेलो तर सगळे हजर!
त्यातल्या तात्यांना विचारलं, “काय हो परवा कोणीच आला नाहीत?”
तर थेट अंतु बर्व्या स्टाईल उत्तर नानांनी दिले.
” अरे, मन्याची ट्रान्सफर झाली ना!त्यालाच सोडायला गेलो होतो”
“कुठे??”
अरे कुठे म्हणून काय विचारतोस, स्वर्गात! ” त्याच्या महायात्रेला गेलो होतो सगळे!” “काही म्हणा, मन्या भाग्यवान हो!
लेक अमेरिकेतून येतो काय, हाटेलात जाऊन पार्टी करतात काय, घरी येऊन झोपतो काय, आणि मुलगा उठवायला गेला, तर हा मन्या केव्हाच गेलेला, स्वर्गाचं दार वाजवायला, रंभेच्या मागं!”
बाकी सगळे खिन्नपणे हसले. मी म्हंटलं, “तात्या इतकं लाईटली घेताय?”
“अरे तू, आता आलास, आधी आम्ही सव्व्हीस जणं होतो, आता बाराच उरलोय! तेही ऐशी नव्वदीचे! विकेटी पडायच्याच रे. आणि म्हणून रडायचं कशाला, दोन दिवस दुःख वाटतं, पण जन पळभर म्हणतील हाय हाय म्हणून सोडून आपलं रुटीन चालू करायचं!”
एकदम काहीसं आठवून मला म्हणाले,” तू केटरिंग करतोस ना रे! तुझा नंबर दे, मन्याच्या मुलाला देतो, तेराव्याची ऑर्डर देईल तुला!”
मी डोक्याला हात लावला, ते बघून अजून एक आजोबा म्हणाले,” अरे आपल्या सगळ्यांच्याच मुलांना देऊया याचा नंबर, वर्षभरात अजून दोन चार तरी विकेट पडणार!” ख्या ख्या ख्या!
दोन दिवसांनी मी जरा घाईत होतो, तेवढ्यात तात्यांनी हाक मारली,” ओ केटरर जरा इकडे या, आज संध्याकाळची ऑर्डर घेणार का पार्टीची!”
“पार्टी?”
“अरे, नान्याच्या सेंच्युरी ला फक्त अकरा वर्ष उरलीत!”
माझा प्रश्नार्थक चेहरा बघून मला म्हणाले,” एवढा कसा बावळट रे, आज नान्याचा एकूणनव्वदावा प्रकटदिन आहे, फार काही नको, मस्तपैकी लुसलुशीत उपमा, आणि चहा, बारा प्लेट”
“बास एवढंच ना? दिलं!”
“आणि हो, कडक बुंदीचे पाच लाडू! आज बघतोच कसा खातो ते, आणि हो! उपमा जास्त तिखट नको हो, हिरड्या झोंबतात नंतर, आणि त्यात उडदाची डाळ बिलकुल नको, कवळी खाली जाऊन बसते, मग जीव जातो काढताना!”
संध्याकाळी ऑर्डर द्यायला गेलो, आणि चकित झालो, सगळे थट्टा मस्करी करीत बसले होते. मन्याच्या फोटो समोर काही चाफ्याची फुलं होती, आणि मोठमोठ्यांदा गाणं चालू होतं.
“जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना!”
मला बघून सगळे थांबले, तात्या पुढे झाले, उपम्याची मुद एकेका बशीत वाढून घेतली, चहा कपांत ओतला, सगळे उभे राहिले आणि “लॉंग लिव्ह नान्या, थ्री चिअर्स फॉर नाना, हिप हिप हुरर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे! करत चहाचे कप, एकमेकांवर आदळून पुन्हा दुसरं गाणं सुरू!
मी काहीश्या संभ्रमावस्थेत घरी आलो, आणि विचार करू लागलो, आज आपण आपल्या कट्ट्यावर भेटतो, पण आपल्या आयुष्याच्या तिन्हीसांजेला असेच हसतमुख, इतकेच जिंदादिल असू का? ह्या म्हाताऱ्यांइतकीच तरुणाई आपल्यात असेल?
असायलाच हवी!
आणि एकदम त्यांच्या पार्टीतलं मी निघतानाचं गाणं ओठावर आलं,
त्याच्या आई-बापाने त्याला कोणतंही नाव द्यायला नकार दिला होता. तिथले सगळेच इतर जगाच्या तुलनेत तसे रंगाने काळे. पण हे पिल्लू त्यांच्यापेक्षाही वेगळं निपजलं होतं. हातापायाच्या काड्या आणि मोठाले डोळे,बसकं नाक. आईनं कसंबसं त्याला अंगावर पाजलं काही दिवस.जसं जसं हे पोर मोठं होऊ लागलं तसं बघणारे इतर त्याला विचित्र नजरेनं पाहू लागले! त्यांच्या त्या देशात चेटकीणी मुलांच्या रुपात जन्माला येऊन लोकांना छळतात म्हणे. हे बाळ म्हणजे तशाच एखाद्या चेटकीणीचा मानवी अवतार! बरं,मानवी अवतार म्हणावं तर तसं फारसं माणसासारखं तरी कुठं दिसतंय? लोकांची कुजबूज वाढली. तो पर्यंत बाळ एक वर्षांचा झाला.
दारिद्र्य,अज्ञान आणि अंधश्रद्धा कायमची वस्तीला आलेल्या त्या पृथ्वीवरच्या नरकाच्या जिवंत देखाव्यात माणुसकी,कणव,सदसदविवेकबुद्धी इत्यादी मानवी गुण औषधालाही आढळत नव्हते. सर्वांनी मिळून त्या बाळाच्या आईबापाला दमदाटी केली…..तुझं पोरगं माणूस नाही…चेटकीण आहे….फेकून दे लगेच ही ब्याद ! … आईबापाला ऐकावं लागलं…आणि त्यांचीही तशीच खात्री पटत चाललेली होतीच काही महिन्यांपासून. त्यांच्या आसपास त्यांनी अशी अनेक चेटकी मुलं पाहिली होती….की ज्यांना लोकांनी दगडांनी ठेचून मारून टाकलं होतं….आपल्या पदरातही असाच निखारा पडला की काय?
एके दिवशी रात्रीच्या अंधारात त्या दोघांनी त्या झोपेत असलेल्या लेकरास उचललं आणि रस्त्यावर आणून टाकलं. त्याला ठेचून मारून टाकण्याची हिंमत नव्हती त्यांच्यात….हे त्या बाळाचं दैव बलवत्तर असल्याचं लक्षण !
सकाळ झाली…बाळाने टाहो फोडला. येणा-या-जाणा-यांनी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं…अशी अनेक मुलं असतात रस्त्यावर फेकलेली. त्यातून हे तर चेटकीणीसारखं दिसणारं पोर….. आठ महिने कशाला म्हणतात? इतक्या दिवस हे बालक जगलं हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हतंच. कुत्र्याच्या एखाद्या पिलासारखं हे माणसाचं पिलू जमेल तसं जगलं…रस्त्यावर रांगता रांगता हाती लागेल ते तोंडात घातलं….पुढे काही दिवसांत स्वत:च्या पायांवर चालू लागलं…अठरा महिने झाले होते त्याला जन्मून. जंगलात हरीणीची पाडसं जन्मल्या नंतर काही तासांतच उड्या मारू लागतात. खरं तर माणसाच्या अपत्यांना ही सवलत नसते. पण हे मूल आता आपल्या मनानेच मोठं झालं होतं !
ती…समाजसेवेसाठी होतं-नव्हतं ते सारं विकून घराबाहेरच नव्हे तर देशाबाहेर पडलेली तरूणी. उत्तम शिकलेली. एका कापड कंपनीत व्यवस्थापक पदावर नोकरी करीत होती आधी. तत्पूर्वी निम्मं अधिक जग फिरून आलेली. कधी कधी एकटीनं प्रवास केलेला होता तिने. तो ही युरोपात नव्हे तर दारिद्र्य,रोगराई,गुंडगिरी,अंधश्रद्धा यांनी ग्रासलेल्या आफ्रिकी देशांमध्ये. नायजेरीया सारख्या देशांत वेगळं रूप घेऊन जन्मलेल्या मुलांना चेटकीणी समजून त्यांच्या हत्या केल्या जातात, हे तिने पाहिले आणि अनुभवलेही होते.
नोकरीतून साठवलेले काही पैसे, स्वत:च्या नावे असलेली स्थावर, जंगम मालमत्ता विकून आलेले काही पैसे तिने गाठीशी बांधले आणि ती निघाली….या चेटकीण बालकांना वाचवायला. तिला तिथल्या लोकांनी शक्य तो सर्व त्रास दिला, ती काही महिन्यांची पोटुशी असताना तर तिचं तिच्या एका स्थानिक कार्यकर्त्यासह चक्क अपहरणही झालं होतं पैशांसाठी. तिला अनेकवेळा धमकावण्यातही आलं होतं….ध्येयासाठी सर्वस्व पणाला लावून घर सोडलेली ती….आपलं मानवीय कार्य करीत राहिली. तिचा लाईफ पार्टनरही तिच्या सोबत आला होता या कामात तिला मदत करायला.
टळटळीट दुपारची वेळ. आफ्रिकेतील ऊन ते. सगळीकडे धुरळा उठलेला. रस्त्यावर शेकडो लोक आहेत. त्यांच्या गर्दीत तिला ते मूल दिसलं…कसंबसं हालचाल करीत एक एक पाऊल पुढे टाकीत निघालेलं दिसेल त्या दिशेला. ती गाडीतून खाली उतरली. तिने त्या लोकांना विचारलं…कुणाचं मूल आहे? नाव काय याचं? कुणी याला खायला घातलंय की नाही गेल्या कित्येक दिवसांत? कुणाकडेही काहीही उत्तर नव्हतं. गेली आठ महिने अन्नान दशेत जगलेलं हे मूल…शरीर कसंबसं तग धरून होतं….. तिने आपल्या हातातील बिस्कीटांपैकी एक बिस्कीट त्याच्या हातात दिलं…त्यानं ते लगेच घेतलं आणि तो अत्यंत हळूहळू आणि काळजीपूर्वक एक एक घास खाऊ लागला. तिने पाण्याची बाटली त्याच्या सुकलेल्या ओठांपाशी नेली. त्याने तिच्याकडे बघत बघत एक एक घोट पाणी प्यायला आरंभ केला. खपाटीला गेलेलं पोट..सर्व बरगड्या सताड उघड्या. दुस-याच क्षणी तिने निर्णय घेतला….या कुणाच्याही नसलेल्या बाळाला सोबत घेऊन जायचं !
तिने त्याला कपड्यात गुंडाळलं अलगद. कारमध्ये बसली त्याला मांडीवर घेऊन. तिच्या नव-याने तिच्याकडे पाहिलं…त्याचे डोळे तिला जणू सांगत होते..हे बाळ काही फार दिवसांचं सोबती नाहीये! ती म्हणाली….मला आशा आहे हे जगू शकेल! आपण याचं नाव होप ठेऊयात का? हो,छान आहे…तो म्हणाला. आणि ते दोघं त्यांनी उभारलेल्या एका बालकाश्रमात आले. तिथं अशीच काही मुलं होती लोकांनी चेटकीण म्हणून हाकलून दिलेली…मारून टाकण्याचा प्रयत्न केलेली.
माणसाला जगायला अन्न लागते,पण जीवनाला प्रेम,वात्सल्य गरजेचं असतं. मथुरेतून आलेल्या कन्हैय्याला यशोदेनं दूधही पाजलं आणि प्रेमामृतही…म्हणूनच कान्हा वाढला. या कृष्णवर्णीय बालकाला तिने आपल्या बालकाश्रमात आणून भरती केलं. जणू ते काल-परवाच जन्माला आलंय अशी त्याची काळजी घ्यायला सुरूवात केली…जणू त्याचं आयुष्य अठरा महिन्यांनी मागे गेलं होतं…नव्यानं आरंभ करण्यासाठी.
तिच्या मनातील आशेने आता बाळसं धरायला प्रारंभ केला. साजेसं अन्न,स्वच्छता,निवारा आणि नि:स्वार्थ प्रेम या चार गोष्टींनी आपला परिणाम दाखवला काहीच दिवसांत….खुरटलेलं,रोगानं ग्रासलेलं,सुकलेलं हे मानवी रोपटं आता अंग धरू लागलं…..आता ते जिवंत राहण्याचं स्वप्न पाहू शकत होतं…आणि ते जगावं अशी तिला आशा होती….आणि तसं झालंच! त्या कुरूप वेड्या पिलाचं एका राजहंसात रूपांतर झालं! चेटकीणीचा शिक्का बसलेलं ते मूल आता देवदूतासारखं दिसू लागलं होतं! होप आता शाळेत जाऊ लागला आहे. (ही काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे…आता होप बराच मोठा झाला असेल.)
तिचं नावAnja Loven. यातील j चा उच्चार ‘य’ असा करायचा. अन्या लोवेन तिचं नाव. आडनावात तर Love आधीपासूनच असलेलं..जणू देवानंच दिलेलं नाव….. अन्या डेन्मार्क मध्ये जन्मलेली. पदवीधर. शिक्षणानंतर जग पाहण्यासाठी हिंडली. एका हवाई कंपनीत नोकरी केली काही दिवस. तिच्या आईला जीवघेणा कॅन्सर झाला म्हणून तिच्या सेवेसाठी ती घरीच राहिली…आई गेल्यानंतर तिने आपलं गाव सोडलं. एका कापड व्यवसायात व्यवस्थापकपदी पोहोचली. एका वर्षी सामाजिक कामाच्या निमित्ताने मालावी देशात जाऊन आली. टांझानियातील शाळांच्या मदतीसाठी तिने निधी जमवायला सुरूवात केली. २०१२ मध्ये अन्याने एक सामाजिक संस्था स्थापन केली. नायजेरीय सारख्या देशातील बालक-चेटकीण अंधश्रद्धेविषयी तिने ऐकलं आणि तिला ध्येय गवसलं…जवळचे सर्व विकून ती नायजेरीयात राहायला गेली…तिथे एक बालक संगोपन केंद्र काढलं जिथे अशा चेटकीण-बालकांना आसरा,शिक्षण दिलं जातं. नायजेरीयातील एका कायदेतज्ज्ञ माणसाशी, इम्यानुअल उमेम शी विवाह केला….त्यांना एक मुलगा आहे आता. अन्याने २०१५ मध्ये स्वत:ची जागा विकत घेऊन काम वाढवलं आणि लॅन्ड ऑफ होप चिल्ड्रेन्स सेंटर सुरू झालं. इथं आता शंभरच्या आसपास मुलं आहेत….चेटकीणींचं रूपांतर देवदूतात करण्याचा प्रयत्न सुरू आहे….कारण तिच्या मनात अखंडीत आशा आहे !
(इंटरनेटवरील प्रोजेक्ट नाईटफॉल पेजवरील एका विडीओमध्ये अन्याची गोष्ट पाहिली आणि तुम्हांला सांगावीशी वाटली. आपल्याकडेही सिंधुताई सपकाळांसारख्या माई होऊन गेल्या…त्यांची आठवण झाली यानिमित्ताने. अन्या म्हणते… HOPE means Help One Person Everyday!अन्याचं खरंच आहे…हे आपण करूच शकतो !)
☆ अखिल हिंदु विजयध्वज गीत… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆
☆ अखिल हिंदु विजयध्वज गीत…. स्व. वि. दा. सावरकर ☆
अखिल – हिंदु – विजय – ध्वज हा उभवुया पुन्हा ॥ध्रु॥
या ध्वजासची त्या काली । रोविती पराक्रमशाली
रामचंद्र लंकेवरती । वधुनि रावणा ॥१॥
करित जैं सिकंदर स्वारी । चंद्रगुप्त ग्रीकां मारी
हिंदुकुश – शिखरी चढला । जिंकुनि रणा ॥२॥
रक्षणी ध्वजाला ह्याची । शालीवाहनाने साची
उडविली शकांची शकले । समरि त्या क्षणा ॥३॥
हाणिले हुसकिता जेथे । हूणांसि विक्रमादित्ये
हाच घुमवि मंदसरच्या । त्या रणांगणा ॥४॥
जइं जइं हिंदू सम्राटे । अश्वमेध केले मोठे
करित पुढती गेला हाचि । विजय घोषणा ॥५॥
उगवुनि सूड हिंदूंचा । मद मर्दुनि मुस्लीमांचा
शिवराय रायगडी करिती । वीरपूजना ॥६॥
ध्वज हाच धरुनि दिल्लीला । वीरबाहु भाऊ गेला
मुसलमीन तख्ता फोडी । हाणुनि घणा॥७॥
पुढती नेम कांही ढळला । ध्वज जरी करातुन गळला
उचलुया पुनरपि प्राणा । लावुनि पणा ॥८॥
(आंग्ल दैत्य तोचि आला । सिंधुतूनि घालुनि घाला
बुडविला सिंधुतचि त्याही । करुनि कंदना ॥८॥)
– कवी – वि. दा. सावरकर
☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆
भारत पारतंत्र्यात असताना १९३८ साली सावरकरांनी ही कविता लिहिली होती. त्यावेळी त्या कवितेत पहिली आठ कडवी होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५१ साली या कवितेतलं आठवं कडवं बदलून, त्याजागी सावरकरांनी वर कंसात दिलेलं आठवं कडवं जोडलं.
या देशातल्या पौराणिक व ऐतिहासिक वीरांनी परकीय आक्रमणाला कसं तोंड दिलं, शत्रूला पळवून लावलं आणि हिंदूंचा विजयध्वज कसा फडकत ठेवला याचं वीरश्रीपूर्ण वर्णन या कवितेत केलेलं आहे. कवितेतले जोशपूर्ण शब्द, काळजाला भिडणारे प्रसंग, प्रत्येक कडव्याच्या शेवटी येणारे, यमक साधणारे खणखणीत शब्द, भारतीयांची छाती अभिमानाने फुगविणारे इतिहासातले दाखले देऊन हिंदुंच्या वीरश्रीला साद घालणारी, त्यांचा आत्मविश्वास वाढविणारी विजयाची वर्णने अपेक्षित परिणाम नक्कीच साधतात, रोमांचित करतात. सावरकर या कवितेत, प्रभू रामचंद्रांनी केलेला रावणवध, सम्राट चंद्रगुप्ताने सिकंदराचा पराभव करून त्याचा सेनापती सेल्युकसला, त्याच्या ग्रीक सैन्यासह हिंदुकुश* पर्वतापर्यंत घ्यायला लावलेली माघार, शक व हूणांचा* शालिवाहन व विक्रमादित्य* यांनी केलेला पराभव, मुस्लीम पातशाही नेस्तनाबूत करण्यासाठी शिवाजी महाराजांनी उभारलेला स्वातंत्र्यलढा व मिळवलेले विजय, सदाशिवभाऊ पेशव्यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणेची मोहिम फत्ते केल्यानंतर उत्तरेच्या मोहिमेत २ ऑगस्ट १७६० रोजी मराठ्यांनी जिंकलेलं दिल्लीचं तख्त* या व अशा ओजस्वी इतिहासाची हिंदु बांधवांना आठवण करून देऊन, इंग्रजी सत्तेविरुद्ध लढण्यासाठी व हिंदू विजयध्वज फडकविण्यासाठी कवी या कवितेद्वारे हिंदूंना उद्युक्त करीत आहेत.
*हिंदुकुश पर्वत = हिमालयीन पर्वत रांगांचा अफगाणिस्तान पासून ताजिकिस्तान पर्यंत पसरलेला पश्चिमेकडील भाग.
*शक व हूण = पूर्व/मध्य आशियातील रानटी, लुटारू टोळ्या
*शालिवाहन = गौतमीपुत्र सातवाहन/ सालाहन/ सालीहन ( इ स ७२ ते ९५) म्हणजेच शकारी किंवा शककर्ता शालीवाहन. शकांवरील विजयाचे (इ.स.७८) स्मरण म्हणूनच त्याने चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारे शालिवाहन शक १९४५ वर्षांपूर्वी सुरू केले. हे युद्ध आताच्या नाशिक परिसरात झालं, कारण नाशिकला लागूनच गुजरात व राजस्थान इथं शक राजा नहापानने आपली सत्ता प्रस्थापित केली होती.. याविषयीचा शिलालेख नाशिक येथे उपलब्ध आहे.
*विक्रमादित्य = दुसर्या चंद्गुप्ताचा नातू स्कंदगुप्त. याने देखिल आपल्या आजोबांप्रमाणे विक्रमादित्य हे बिरुद धारण केले होते.
*मंदसर(मंदोसर/मंदसौर)= मेवाड व माळवा यांच्या बाॅर्डरवरील शहर. येथे अफूची शेती होते. हे रावणपत्नी मंदोदरीचं माहेर मानलं जातं. येथे झालेल्या युद्धात विक्रमादित्याने हूणांचा दारूण पराभव केला. त्यानंतर ४०/५० वर्षे हूणांनी भारतावर आक्रमण केले नाही.
*दोन ऑगस्ट १७६० रोजी दिल्ली जिंकल्यानंतर दोन महिन्यांनी मराठ्यांनी १० ऑक्टोबर रोजी शाह आलम या मुघल वंशजाला दिल्लीच्या गादीवर बसवलं.