मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘श्रीमत् दासबोध – रामबाण औषधांचे परिपूर्ण दालन’ – लेखक : श्री वीरेंद्र ताटके ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

श्रीमत् दासबोध – रामबाण औषधांचे परिपूर्ण दालन’ – लेखक : श्री वीरेंद्र ताटके ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

औषधाच्या दुकानात हजारो औषधे असतात. त्यापैकी प्रत्येक औषध गुणकारी असतं पण प्रत्येक औषध प्रत्येकाला उपयोगी असेलच असं नाही. आपल्याला कोणता त्रास होता आहे त्याप्रमाणे आपल्याला औषध घ्यावे लागते.

समर्थ रामदास स्वामी रचित श्रीमत दासबोध हे असंच एक ‘रामबाण’ औषधाचे दालन आहे. आपल्याला झालेल्या भवरोगांवर इथे औषधे मिळतात.

या औषधाच्या दालनात औषधांचे वीस विभाग आहेत ( या विभागांना ‘दशक’ म्हटले जाते ) तर प्रत्येक विभागात प्रत्येकी दहा उपविभाग आहेत ( या उपविभागांना ‘समास’ म्हणतात ). यातील प्रत्येक औषध हे अत्यंत गुणकारी आहे. पण आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक औषध लगेचच लागू पडेल असे नाही.

मात्र सध्याच्या काळात सर्व वयोगटात हमखास आढळणाऱ्या काही आजारांवर पुढील रामबाण औषधे या दालनात मिळतात. इच्छुकांनी त्याचा उपयोग करून घ्यावा.

१ ) आजाराचे लक्षण – छोट्याछोट्या गोष्टींचा गर्व होणे

औषध – मूर्ख लक्षण 

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक दुसरा समास पहिला 

२ ) आजाराचे लक्षण – तुटपुंज्या ज्ञानाचा आणि हुशारीचा अभिमान वाटणे 

औषध – पढतमूर्ख लक्षण 

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक दुसरा समास क्रमांक दहा

३ ) आजाराचे लक्षण – आपल्या कुटुंबाचा गर्व वाटणे 

औषध – स्वगुणपरीक्षा 

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक तिसरा समास क्र. दोन ते पाच 

४ ) आजाराचे लक्षण – स्वतःला अमर समजणे 

औषध – मृत्यूनिरूपण 

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक तिसरा समास क्रमांक नऊ 

५ ) आजाराचे लक्षण – स्वतःविषयी अज्ञान

औषध – बद्धलक्षण 

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक पाचवा समास क्रमांक सात.

६ )आजाराचे लक्षण – अत्यंत स्वार्थीपणा 

औषध – निस्पृहलक्षण

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक करावा समास क्रमांक दहा 

७ ) आजाराचे लक्षण – आयुष्यात प्रगती कशी करावी हे न कळणे 

औषध – सर्वज्ञसंग निरूपण

औषध मिळण्याचे ठिकाण – दशकअठरावा समास दुसरा 

८ ) आजाराचे लक्षण – करंटेपणा 

औषध – करंटपरीक्षा निरूपण

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक अठरावा समास क्रमांक पाच

९ ) आजाराचे लक्षण – आधुनिक जगात कसे वागावे न कळणे

औषध – दशक नववा

औषध मिळण्याचे ठिकाण – संपूर्ण दशक नववा ( समास क्रमांक एक ते दहा ) 

१० ) ग्रंथाची संक्षिप्त माहिती मिळण्याचे ठिकाण : 

दशक पहिला समास पहिला 

हे सर्व करत असताना ‘ तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे ‘ ही प्रार्थना समर्थांना करावीच, जेणेकरून “मला दासबोध कळला “ असा गर्व होऊन त्यातील औषधांचा ‘ साईड इफेक्ट’ होत नाही.

लेखक : श्री वीरेंद्र ताटके

पुणे फोन ९२२५५११६७४

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ धुंद वाऱ्या… ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

डॉ. निशिकांत श्रोत्री

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ धुंद वाऱ्या… ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

स्मृतीरंजन संगीत रचनेचे

साधारणपणे १९८६ च्या दरम्यानची घटना असावी. दूरदर्शनवर शब्दांच्या पलीकडले या कार्यक्रमात विनय देवरुखकर यांनी संगीतबद्ध केलेल्या काही गीतांचा कार्यक्रम होता. पुढे काही दिवसांनी त्यातील एका गीताच्या बाबतीत काही समस्या निर्माण झाल्यामुळे ते गीत विनय वापरू शकत नव्हता; तथापि त्याला त्या गीताला दिलेली संगीत रचना अतिशय आवडली होती. म्हणून त्याने मला त्याच चालीवर एक नवीन गीत लिहून द्यायचे आवाहन केले. त्या चालीतून प्रेमवेड्या प्रेयसीची आर्तता जाणवत होती. नकळतच क्षणार्धात माझ्याकडून पुढील ‘धुंद वाऱ्या’ हे गीत प्रसवले गेले.

 ☆ धुंद वाऱ्या ☆

धुंद वाऱ्या थांब येथे दूर तू जाऊ नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||ध्रु||

गुपित जपले मन्मनी जे ते उगा पसरू नको

लाजरीचा रंग गाली तू नभ देऊ नको

दाटले माझ्या मनी साऱ्या जगा सांगू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||१||

 *

भाव माझे तूच नेता मी सख्या सांगू कशी

शीळ होता बोल माझे मी मुकी राहू कशी

भाववेडी स्वप्नगंधी छेड तू काढू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||२||

 *

अंतरी दाटून माझ्या तू तुला विसरून जा

विरून येथे तूच माझे स्वप्नही होऊन जा

आण माझ्या प्रीतिची रे अंतरी मोडू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||३||

हे गीत माझ्या मनाची पिल्ले या काव्यसंग्रहात समाविष्ट होते. अत्यंत गुणी गायक आणि संगीतकार चंद्रशेखर गाडगीळ याच्या वाचण्यात हे गीत आले. त्याला ते इतके आवडले की त्याने ते सूरबद्ध केले आणि मला घरी बोलावून ते ऐकविले. ती स्वररचना माझ्या अगदी हृदयात जाऊन पोहोचली.

पुढे आकाशवाणीवर हेच गीत जानेवारी महिन्याच्या स्वरचित्रे साठी निवडले गेले आणि त्याला स्वरबद्ध करण्यासाठी विलास आडकर यांच्याकडे ते सोपविले गेले. अतिशय सुरेल आणि भावपूर्ण अशा चालीत त्यांनी ते माधुरी सुतवणे यांच्याकडून गाऊन घेतले. खूप गाजले हे गीत.

तरीही या गीताची चंद्रशेखर गाडगीळ याने दिलेली चाल माझ्या मनातून जात नव्हती. एवढी उत्कृष्ट स्वररचना अशीच वाया जावी हे मनाला पटत नव्हते. अशा घालमेलीतच पुलाखालून बरेच पाणी गेले. अखेरीस, साधारण पंधरा वर्षांनंतर चंद्रशेखर गाडगीळ याच्या स्वररचनेवर मी आणखी एक गीत लिहायचे ठरवले.

गीत लिहून झाले आणि आकाशवाणीवर माझ्या काही गीतांना स्वरबद्ध केल्यानंतर माझ्या खूप जवळ आलेले आकाशवाणीचे आणि एकेकाळी ‘प्रभात’ फिल्म कंपनीत असलेले ज्येष्ठ संगीतकार सुरेश देवळे घरी आले. आल्या आल्या त्यांनी विचारले, ‘डॉक्टर, एखादे नवीन गीत?’

नुकतीच प्रसविलेले गीत मी त्यांना वाचून दाखविले:

☆ चांदण्याच्या राजसा रे ☆

 *

चांदण्याच्या राजसा रे वाकुल्या दावू नको

प्रीत सजता आज माझी दृष्ट तू लावू नको ||ध्रु||

मन्मथाने धुंद केले कुच मनी मी बावरी

स्पर्श ओठांनाच होता हरवले मी अंतरी

भान जाता हरपुनीया जग तू आणू नको

प्रीत सजता आज माझी दृष्ट तू लावू नको ||१||

रोम रोमा जागवी तो स्पर्श मी विसरू कशी

चिंब झालेल्या मनाची प्रीत मी लपवू कशी

प्रेमवेडी आर्त होता संयमा शिकवू नको

प्रीत सजता आज माझी दृष्ट तू लावू नको ||२||

रात्र सजवीता अनंगे लाजुनी राहू कशी

धुंद झाला देह माझा अंतरी वेडीपिशी

आज माझ्या राजसाची पापणी लववू नको

प्रीत सजता आज माझी दृष्ट तू लावू नको ||३||

‘छान आहे डॉक्टर, द्या मला; मी याला चाल देणार आहे, ’ त्यांनी माझ्या हातातून गीताचा कागद ओढूनच घेतला.

मी त्यांना ते गीत रचण्यामागील माझी भूमिका सांगितली, ‘चंद्रशेखरच्या चालीसाठी रचले आहे मी हे गीत. ’

‘त्याकरता तुम्ही आणखी एक गीत बनवा हो, ’ देवळे काही मागे हटायला तयार नव्हते.

अखेरीस चाल देण्यासाठी ते गीत ते घेऊन गेलेच. पुढे त्यांनी ते गीत आकाशवाणीवर गाऊन देखील घेतले.

मला मात्र स्वस्थ वाटेना. चंद्रशेखरची चाल काही मला स्वस्थ बसू देईना. दुसऱ्याच दिवशी मी पुन्हा हातात लेखणी घेतली नी त्या स्वररचनेच्या मीटरमध्ये नव्याने गीत रचले:

रात्र तू विझवू नको

 *

पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रा क्षितिजावरी उतरू नको

अंतरी बेभान मी रे रात्र तू विझवू नको ||ध्रु||

चांदण्याने आज तुझिया रंग मी भरले इथे

उर्मीच्या मम कुंचल्याने प्रेम हे साकारले

धुंदिचा बेरंग माझ्या करुनिया जाऊ नको

अंतरी बेभान मी रे रात्र तू विझवू नको ||१||

 *

आर्त झालेल्या मनातुन सूर हे धुंदावले

छेदुनीया मुग्धतेला अंबरी झेपावले

प्रेम भरलेल्या सुरांना बेसुरी गाऊ नको

अंतरी बेभान मी रे रात्र तू विझवू नको ||२||

फुलविली मी मुग्ध कलिका रात्र सजवीली नभी

भान हरुनी रातराणी गंध दरवळते जगी

फुलून येता मन्मनी तिज निर्दळी बनवू नको

अंतरी बेभान मी रे रात्र तू विझवू नको ||३||

आणि आता जगदीश कुलकर्णी यांनी या गीतावर उत्कृष्ट स्वरसाज चढविला आहे.

मी आता मात्र विचार करतोय, माझ्या ज्येष्ठ स्नेही आणि मार्गदर्शिका कै. संजीवनी मराठे यांच्या ‘नकळता निघून जा’ या गीताला जर चार संगीत दिग्दर्शकांनी स्वरसाज चढवला आहे तर माझ्या गीतांना देखील तसे झाले तर बिघडले कोठे? उलट हा तर माझा मानच आहे.

तरीही मला चंद्रशेखर गाडगीळची स्वररचना वाया नाही जाऊ द्यायची. बघू कोणच्या स्वररचनेचा कोणत्या गीतासाठी कसा योग येतो आहे ते!

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नदी… ☆ सुश्री मानसी चिटणीस ☆

सुश्री मानसी विजय चिटणीस

? विविधा ?

☆ “नदी…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस

समुद्र तहान थोडीच भागवतो? त्यासाठी हवी असते नदी.. मग ती कोणतीही असो.. प्रत्येक तहानेचं उत्तर नदीकडे असतं.. जोवर ती आटत नाही किंवा संपून जात नाही.. आपल्या प्रवाहात येणार्‍या प्रत्येकाला भिजवत, त्याची तहान भागवत नदी वाहत राहते. स्वत:चे तट, चौकटीत सांभाळते. आपल्यातील अमृताचा झरा ती रिकामा करते वर्षानुवर्ष, येणार्‍या पुढच्या प्रत्येक पिढीसाठी. हे नदीचे दायीत्व आहे की तिच्याकडे येणार्‍या प्रत्येकाला तिथे तृप्त करावे, सांभाळावे, प्रसंगी पोटात घ्यावे. पण नदीही आटते कधीकधी. पोटातले सारे विकार, भावना, साल यांचा गाळ साठत जातो. क्षणांचे थरावर थर साचत जातात आणि वाहती नदी साचायला लागते जागोजागी. तिची निर्मळता, स्वच्छता, शुचिता संपायला लागते आणि मग नदीचे डबके होते. या भावना तरी कशा असतात? सगळीकडून सारख्या वाहणार्‍या. असलाच तर थोडाफार किंचितसा इकडचा, तिकडचा फरक असेल कदाचित. या भावना काळसापेक्ष असतात बर्‍याचदा. काळ बदलेल तशा बदलतात. नदीही प्रवाह बदलतेच की पण तिचा प्रवाह बदलण्याची क्रिया खूप संथ होते. एखाद्या संसारात मुरत गेलेली बाई जशी कालांतराने शांत होते तशीच नदी खोल खोल होत जाते नाहीतर मग किनार्‍यांच्या चौकटी मोडते.

नदीलाही हवाच की पाण्याचा पुरवठा सतत प्रवाही राहण्यासाठी. नदी आटायला लागली की आपण पात्र खोल करतो. नदीचे झरे मोकळे करतो नदीला प्रवाहित करण्यासाठी.. आपल्या मनाचंही असचं असतं थोडफार. तुझं आहे तुजपाशी असं असताना आपण शोधत राहतो बाह्यजगात.. मग वाटत राहातं.. आधी होतं तेच चांगलं होतं

‘वक़्त बीतने के बाद अक्सर ये अहसास होता है…

कि, जो छूट गया वो लम्हा ज्यादा बेहतर था…. ‘

दुःख माणसाला जगण्याची सवौत्तम अनुभूती देतं, फक्त ते.. प्रवाहित करता यायला हवं. मला नेहमी वाटत बायका या नदीसारख्या असतात. कधी अल्लड झर्‍यासारख्या गात सुटलेल्या, कधी भावनांच्या दरीत स्वत:ला झोकून देणार्‍या धबधब्यासारख्या, साचलेल्या डोहासारख्या गहन आणि गूढ. कधी तारुण्याच्या अवखळ काठावर ; पाणी भरायला आलेल्या तरुणीसारख्या किंवा मग वेगाबौंड होत रस्त्यातले सारे खाच-खळगे पार करणार्‍या, वाटेतल्या दगड-धोंड्यांना स्वत:च्या प्रवाहासोबत वाहून नेणार्‍या, प्रसंगी रौद्ररूप धारण करून आपलं अस्तित्व दाखवणार्‍या, आसपासच्या परिसराला तृप्त करून… त्या हिरवाईला स्वतःच्या अंगावर दागिन्यांसारखे मिरवणार्‍या‍ या परिपक्व बाया कायम नदीसारख्याचं दिसतात मला..

अनेक कथा-कहाण्या स्वत:सोबत जगताना नदी, आपलेच काठ रुंदावत जाते. स्वत:च्या विचारांच्या कक्षा वाढाव्यात तशी आपली सारी निर्मळता काठांनी जपत राहते. एखाद्या युगाची पापनाशिनी होवून उद्धारत राहते पिढ्या न पिढ्या. नदी सामावून घेते तिच्याजवळ येणार्‍या प्रत्येकाला जशी आई आपले तान्हुले कुशीत घेते. किंवा मिठीत घेते तिच्यावर प्रेम करणार्‍याला प्रत्येकाला, तिच्या आसर्‍याला आलेल्या प्रत्येकाला. बाया पण तशाच तर असतात. जरी भावनांनी कोरड्या झाल्या तरी मधूनच त्यांना मायेचे उमाळे फुटतात आणि त्या वाहू लागतात अविरत. अशावेळी जाणवतो तो त्यांच्यातला मायेचा अथांग समुद्र. प्रत्येक बाई आपल्यात समुद्राचा उणापुरा एक तरी अंश जपतेच. बायका आणि नदी सारख्याच असतात सर्वार्थाने. आपल्यातले प्रवाहीपण जपताना दोघीही.. जिवंत रहात, खळाळत जगताना आपल्यातला समुद्र काही मरू देत नाहीत.

अशावेळी जिथे नदी समुद्राला जावून मिळते तिथे तिचा, तिच्या वाहण्याचा अंत होतो हे माहिती असूनही ती कोणत्या ओढीने समुद्राकडे धावते ? हे न उमजणारे कोडे आहे. का आहे हे नदीचे संपूर्ण समर्पण? नव्या जन्माच्या ओढीने की संपून जाणार्‍या प्रवाहाला जपण्यासाठी? काहीही असो ती जीवन संपवते हे निश्चित. हेच तर… आहेही आणि नाहीही… मनात रुजलेला क्षण सांभाळायचा, वाढवायचा, फुलवायचा आणि तो सरला की कृष्णार्पणमस्तू म्हणून पुढच्या क्षणाचं स्वागत करायचं. इतकं सोपं असतं जगणं? नदी होणं? आणि बाई ही होणं? 

 

© सुश्री मानसी विजय चिटणीस

केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ महाकुंभ : भक्त, सेवक आणि साधना… लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

💥 मनमंजुषेतून 💥

☆ महाकुंभ : भक्त, सेवक आणि साधना… लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

प्रयागराज येथील महाकुंभ सोहळ्यात तीन दिवस घालवल्यानंतर, तिथल्या त्रिवेणी संगमावर लोटलेला मानवतेचा महासागर पाहिल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे महाकुंभ प्रामुख्याने फक्त दोनच प्रकारच्या लोकांचा आहे, भाविकांचा आणि सेवकांचा! 

खरे भाविक, जे कुणीही न बोलावता श्रद्धेने भरलेले हृदय घेऊन प्रयागराजला येतात मिळेल त्या वाहनाने, प्रसंगी आपली सामानाची गाठोडी डोक्यावर ठेवून मैलोनमैल चालत येतात ते भाविक, जे संगम स्नानासाठी तासचे तास शांतपणे वाट पाहतात, जे गंगाजल भरण्यासाठी आठ दहा मोठे कॅन घेऊन येतात आणि ते भरलेले, जड कॅन मोठ्या कष्टाने वाहून त्यांच्या त्यांच्या गावी नेतात, त्यांच्या स्वतःसाठी नव्हे, तर नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, सुहृदांना देण्यासाठी. जे रात्री झोपायला खोली मिळाली नाही तर शांतपणे पथारी पसरून नदीच्या काठावर वाळवंटात झोपतात, कसल्याच सुविधा नसल्या तरी ते तक्रार करत नाहीत.

पवित्र संगमात स्नान करताना त्यांच्या मिटलेल्या डोळ्यातून आपसूक पाणी वाहते. गंगेच्या थंडगार प्रवाहाच्या कुशीत ते अश्या निःशंकपणे शिरतात जणू त्यांना पूर्ण खात्री असते की त्या क्षणी गंगामाई त्यांना आपल्या निळसर सावळ्या प्रवाहात अशी अलगद सामावून घेईल जशी एक आई आपल्या बाळाला गर्भात सांभाळते. पाण्यात डुबकी घेऊन जेव्हां ते वर येतात तेव्हा त्यांच्या चेहेऱ्यावरची तृप्तीच सांगत असते की त्यांना पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या आत्म्यावर साचलेल्या कर्मरूपी धुळीची पुटे त्या स्नानाने वाहून गेली आहेत. गुडघाभर पाण्यात उभे राहून जेव्हा ते सूर्याला अर्घ्य देतात तेव्हां सोनेरी उन्हाने झळाळून निघालेल्या त्यांच्या चेहेऱ्यावरचे संपूर्ण समर्पण भाव पाहण्यासारखे असतात. कुंभ खऱ्या अर्थाने त्यांचा असतो.

परमार्थ निकेतनच्या साध्वी भगवती सरस्वती यांनी म्हटल्याप्रमाणे, खरे भक्त हे फक्त आस्थेसाठी, भक्तीसाठी येतात. त्यांचे पूर्वजही कधीकाळी असेच आले असतील प्रयागला, इथल्याच मऊ वाळूत उभे राहून त्यांनी असेच सूर्योदय पहिले असतील. इथल्याच थंडगार पाण्यात असेच स्नान करताना त्या लोकांनी ज्या प्राचीन मंत्रांचा उच्चार केला होता, त्याच मंत्रांचे, त्याच भाषेतले उच्चार त्यांचे वंशज आजही करतात. गंगेचा शांत, प्रेमळ प्रवाह मात्र तेव्हाही असाच अविरत वाहात होता, आजही तसाच वाहात आहे. बाहेरच्या जगाला महाकुंभ म्हणजे काय हे माहिती नव्हते तेव्हांही हे सच्चे भाविक संगमस्नानासाठी प्रयागला येत होते आणि भविष्यात जग महाकुंभ विसरले तरीही ते इथे येतच राहतील. कारण हा महाकुंभ त्यांच्या भक्तीचा महाकुंभ आहे.

मानवतेचा महासागर हे कुंभमेळ्याचे वर्णन काही आजचे नाहीये. ह्युएन त्संग (Xuanzang) हा प्रसिद्ध चीनी बौद्ध भिक्षू सातव्या शतकात भारतात आला होता. त्याने Great Tang Records on the Western Regions या प्रवासवृत्तांतात भारतातील अनेक ठिकाणांचे, संस्कृतीचे आणि धार्मिक परंपरांचे वर्णन केले आहे. कनौजचा सम्राट हर्षवर्धन याच्या राज्यकाळात प्रयागराज येथे भरलेल्या कुंभमेळ्याचे वर्णन करताना तो म्हणतो की या मेळ्यात हजारो लोक भारताच्या वेगवेगळ्या भागांतून एकत्र आले होते ज्यात हिंदू साधू तर होतेच, पण जैन मुनि, बौद्ध भिक्षू, विद्वान आणि सामान्य नागरिकही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. मेळ्यात धार्मिक प्रवचने, ग्रंथांचे वाचन, आणि विद्वानांचे वादविवाद (शास्त्रार्थ) चालत असत. लोक येथे मानसिक शांती आणि चित्तशुद्धीसाठी येत असत असे ह्युएन त्संग म्हणतो, जे आजही खरे आहे. वरची आवरणे, पेहनावा जरी बदलला असला तरी कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची आतली भक्ती तीच आहे आणि म्हणूनच महाकुंभ सर्वप्रथम त्यांचाच आहे.

महाकुंभ त्यांचाही आहे, जे इथे काही देण्यासाठी येतात, घेण्यासाठी नाही.

१५, ००० सफाई कर्मचारी, जे दिवसातून चार वेळा नदीकाठ झाडून इथल्या लाखो पाऊलखुणा मिटवून टाकतात, नव्या दिवसाची सुरुवात नव्या पावलांच्या खुणांनी व्हावी म्हणून. १२५, ००० पोलिस, जे प्रयागमध्ये जमलेल्या मानवतेच्या महासागराच्या लाटा अंगावर झेलण्याचे अवघड काम करतात, कधी मार्गदर्शन करतात, कधी संरक्षण देतात, तर कधी शांतता आणि शिस्त राखण्यासाठी ओरडतातही. बचाव पथकातील हजारो स्वयंसेवक, जे नेहमी दक्ष असतात, त्यांच्या कौशल्याची कधीच गरज पडू नये अशी त्यांची आशा असते, पण दुर्दैवाने अशी गरज पडलीच तर ते त्यासाठी सदैव सज्ज असतात. इथल्या ५५० शटल बसचे चालक, जे अखंड फेऱ्या मारून यात्रेकरूंना संगमापर्यंत पोहोचवतात. अनेक मठ, मंदिर, धार्मिक संस्थांचे स्वयंसेवक जे उपाशी लोकांसाठी रात्रंदिवस खपून जेवण बनवतात. थकलेल्या यात्रेकरूंच्या पायांना मालिश करणारे सेवाभावी लोक, धार्मिक संस्थांच्या दवाखान्यांत सेवा देणारे डॉक्टर, पडद्याआड असलेले अदृश्य सरकारी अधिकारी जे अठरा अठरा तास काम करून इथली व्यवस्था सांभाळण्याचे आपले कर्तव्य बजावतात. कुंभ जितका भाविकांचा आहे तितकाच त्यांचाही आहे. सेवकांचा. जे निरपेक्ष भावनेने सेवा देतात त्यांचाही आणि जे कर्तव्य म्हणून सेवा देतात त्यांचाही.

बाकी आपण बहुतेक सारे – कुतूहलापोटी आलेलो असतो. महाकुंभाचा थक्क करणारा आवाका पाहून आपण भारावून जातो. इथली मैलोनमैल पसरलेली तंबूंची नगरे, अशक्यप्राय वाटणाऱ्या ठिकाणी बांधलेली स्वच्छतागृहे, आकाशात घिरट्या घालणारे ड्रोन, नदीकाठी उभारलेली तात्पुरती शहरे, रस्ते, हेलिपॅड वगैरे सुविधा पाहून आपण अचंबित होतो, आपण स्नानही करतो, कदाचित आपल्यापैकी काही जणांना गंगेच्या पाण्याच्या स्पर्शाने भक्तीचा परिसस्पर्शही होतो.

पण मुळात आपण न निखळ श्रद्धावान भक्त असतो, ना निःस्वार्थ सेवा देणारे सेवक.

आपण आहोत घटकाभर थबकून इतिहासाच्या खिडकीतून कुतूहलाने ह्या श्रद्धा आणि भक्तीच्या सोहळ्याकडे डोकावून पाहणारे प्रवासी. आपण उद्या इथून निघून गेल्यावरही महाकुंभ सुरूच राहील, गंगेच्या प्रवाहात छोटा खडा फेकल्यावर उठणारा क्षणिक तरंग आहोत आपण फक्त.

महाकुंभ फक्त एक ‘इव्हेंट’ नाही, तर तो भारताच्या नाडीचा दर बारा वर्षांनी निनादणारा एक ठोका आहे, जो खऱ्या भक्तांना आपसूक ऐकू येतो आणि सेवाभावनेने कार्य करणाऱ्या लोकांना आवाहन करतो.

होय, तुम्ही, मी, आपण बहुतेक जण केवळ पर्यटक आहोत. कुंभ खरा फक्त अश्याच लोकांचा आहे, जे एकतर पूर्ण श्रद्धेने भक्ती करतात किंवा संपूर्ण समर्पण भावाने सेवा देतात!

लेखिका : सुश्री शेफाली वैद्य

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संवेदनाशून्य सजीवांच्या फौजा… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? मनमंजुषेतून ?

☆ संवेदनाशून्य सजीवांच्या फौजा… ☆  श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

२५ जानेवारीची संध्याकाळ. आधीच शनिवार-रविवार आणि त्यात पुन्हा राष्ट्रीय सुट्टी आलेली. आजूबाजूची सगळी शोरुम्स आणि मॉल्स गर्दीनं खचाखच भरुन वाहत होते. कुणाला तरी भेटायला गेलो होतो आणि तिथं आम्हाला बराच वेळ लागला, म्हणून जवळच्या एका मॉलमध्ये आम्ही पोट भरण्यासाठी गेलो. पण तिथल्या कॅफेटेरियाचे दर बघून आमचे डोळेच पांढरे व्हायची वेळ आली. पंधरा-वीस स्टॉल्स होते खरे. पण किंमती अवाढव्य होत्या. ८० रुपयांची पाणीपुरी, २०० रुपयांचं सँडविच, १८० रुपयांपासून पुढे सुरु होणारी चाट हे खिशापेक्षा मनालाच परवडत नव्हतं.

मी त्यांना म्हटलं, “जाऊ द्या. आपण टपरीवर चहा घेऊ. ” 

ते म्हणाले, “जीबीएस कसा भडकला आहे, बघतोयस ना. उघड्यावरचं काही नको रे बाबा. ” आम्हीं पंधरा वीस मिनिटं तिथं होतो आणि शेवटी काहीही न खाता पिता तिथून निघालो. पण त्या मॉल मध्ये जे दृश्य होतं, ते बघून मला धक्का बसला.

तरुण मुलामुलींची तर गर्दी होतीच, शिवाय शेकड्यांनी परिवारसुध्दा होते. तिथं पाणीसुद्धा विकत घेऊन प्यावं लागत होतं. चार-पाच जणांचं बिल एक हजाराच्या वर सहजच जात असेल. कितीतरी लहान लहान मुलं त्या कॅफेटेरिया मध्ये जंक फूड मनसोक्त खात होती. कॉलेजवयीन मुलामुलींच्या जोड्या होत्या. ५०० रुपयाचं सिझलर घेऊन टेबलावर गप्पा मारत बसलेलं एक युगुल दहा मिनिटांनी ती डिश तिथंच तशीच टाकून उठून निघून गेलं. कितीतरी लोक खाणं अर्धवट टाकून उठून निघून जात होते. छोले भटुरे मागवलेल्या एका ग्रुपनं तर निम्मे भटुरे तसेच टाकले. विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या सुद्धा अर्धवट टाकून निघून गेलेले लोक मी बघत होतो.

बरं, असला “टाकून माजण्याचा” मस्तवालपणा करणारी जी जनता होती, ती काही मर्सिडीज क्लास नव्हती. सगळेच्या सगळे मध्यमवर्गीयच होते. “पेट्रोल २५ पैशांनी महागले अन् जनतेचे कंबरडे मोडले” किंवा “कोथिंबीर कडाडली, लोकांनी खायचं काय?” असले मथळे लिहिणाऱ्यांनी मॉलमधले हे मध्यमवर्गीय बघितलेले असतात का? असा प्रश्न मला पडला.

मेसचे डबे लावून जेवणाऱ्या मुलांचं आणि मुलींचं मी अनेकदा निरीक्षण केलंय. आठवड्यातून तीनदा तरी डब्यातलं अन्न जसंच्या तसं कचऱ्यात गेलेलं असतं. घराघरांतून गोळा केला जाणारा ओला कचरा तुम्ही अवश्य पहा. चांगल्या प्रतीचं ब्रँडेड अन्न कचऱ्यात फेकून दिलेलं तुम्हाला दिसेल. हॉटेलमध्ये सँडविचच्या डिशमध्ये कोबी किसून डेकोरेट करुन सर्व्ह करतात. तो कच्चा कोबी कितीजण खातात? मोठमोठ्या कॉफी शॉप्स मध्ये मी पाहतो, मला फार वाईट वाटतं. पाचशे-सातशे रुपये किंमतीची कॉफी अर्धवट टाकून लोक निघून जातात. पाचशे रुपयांतले तीनशे रुपये आपण कचऱ्यात ओतले, याचं त्यांना भानही नसतं आणि त्याचं त्यांना वाईटही वाटत नाही.

एकदा सोलापूरहून पुण्याला येत असताना एका प्रसिद्ध हॉटेल मध्ये आम्ही ब्रेक घेतला. शेजारच्या टेबलावर सात आठ जण बसले होते. आठ जणांनी आठ वेगवेगळ्या भाज्या मागवल्या. इतके स्टार्टर्स, इतक्या डिशेस.. टेबल अख्खं भरलं होतं. पण खाल्लं किती? जितकं मागवलं होतं त्यातलं निम्मंसुद्धा नाही.. ! बिल भरुन माणसं निघूनही गेली.

याला आपण नेमकं काय नाव द्यावं? ‘महागाई किती वाढलीय’ असं ओरडणारी अगदी साधी साधी माणसंसुद्धा वडापाव घेताना पाच सात मिरच्या घेतात आणि त्यातली एखादीच खाऊन बाकीच्या चक्क कचऱ्यात टाकतात.. ! पराक्रम दाखवण्याच्या नादात एकस्ट्रा तिखट मिसळ मागवतात आणि चार घासातच त्यांचा धीर गळून पडतो. अन्न वाया.. ! सँडविचची हिरवी चटणी जास्तीची घेतात आणि टाकून देतात.. ! एखाद्या सँडविचवाल्याची किलोभर हिरवी चटणी दररोज सहजच उकिरड्यावर जात असेल..

गुरुवारी – शनिवारी देवळाबाहेर हात पसरुन बसलेली माणसं सुद्धा आता रुपया-दोन रुपयांचं नाणं, पार्ले बिस्कीट पुडा, एखादा वडापाव असलं काही दिलं तरी तोंड वेंगाडतात. त्यांना दहा रुपयांचं नाणं हवं असतं. ताजी पोळी-भाजी दिली तरी टाकून देणारे सुद्धा भिकारी मी पाहिलेत. मग भीक मागण्यामागची त्यांची नेमकी भावना तरी काय? आपल्याला आपल्या पात्रतेनुसार किंवा पात्रतेपेक्षा कितीतरी अधिक पटींनी मिळतंय, याची जाणीव इथेही दिसत नाही.

न कमावणारे, कमी कमावणारे, भरपूर कमावणारे, आपकमाईवाले, बापकमाईवाले सगळे सगळे या एकाच बोटीत बसलेले आहेत. काहीजणांची ही वृत्तीच आहे आणि काहीजणांना आपलं काहीतरी चुकतंय याची लांबलांबपर्यंत जाणीवच नाही. आणि दुसरं कुणी ह्यांना ही जाणीव करुन द्यायला तयार नाही.

महिन्यातले पंधरा दिवस मेसचा अख्खा डबा कचऱ्यात टाकणारे विद्यार्थी आणि मुलांच्या हट्टापायी भारंभार पदार्थ मागवून त्यातलं निम्म्याहून जास्त अन्न टाकणारे सुशिक्षित पालक दोघेही समाजाचे दोषी नाहीत का ? 

महागाई वाढल्याचं ढोंग करणारी माणसं त्यांची जीवनशैली जराही बदलायला तयार नाहीत. बापकमाईवर घेतलेला ब्रँडेड कपडा जास्तीत जास्त चार पाच वेळा घालून कपाटात कोंबणारे अन् पुढच्या महिन्यात पुन्हा नवे कपडे घेणारे विद्यार्थी त्यांच्या आयुष्याचा नेमका कसा विचार करत असतील? त्यांचे आईवडील त्यांना दर महिन्याला पैसै पाठवताना काय विचार करत असतील? कॉलेजच्या ऑफिसात फी माफीचे अर्ज करुन घेणारी मुलं मला जेव्हां त्यांच्या परमप्रिय मैत्रिणीसोबत फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये दीडशे रुपयांचा उत्तप्पा खाताना दिसतात, तेव्हां त्यांची गरिबी नेमकी कोणती? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण कॉलेजची फी खोटं कारण दाखवून माफ करुन घेऊन हॉटेलात एकावेळी पाचशे रुपयांची नोट खर्च करणं हे प्रामाणिक माणसाचं लक्षण नाही.

आमच्या आजूबाजूच्या परिसरात रात्री बारा वाजता पंधरा वीस बुलेट बाइक्स मोठाला आवाज करत गेल्या आणि अर्धा तास हवेत तीन चार हजार रुपयांची फटाक्यांची आतषबाजी होत राहिली की, आपण ओळखावं – आज कुठल्यातरी बेरोजगार दिवट्याचा वाढदिवस आहे आणि चार घरी धुणीभांडी करुन घराचा गाडा ओढणाऱ्या आपल्या आईच्या कमाईवर फुकट मजा मारणारं पोरगं आज एक वर्षानं मोठं झालं आहे. . ! रेशनचं अन्न आणून जगणाऱ्या घरच्या पोरांचे वाढदिवस रात्री बारा वाजता भर रस्त्यावर दोन-दोन केक आणून कसे होतात? सर्वच स्तरांमध्ये माणसांच्या जगण्याच्या व्याख्या बदलतायत आणि त्या अमिबासारख्या आकार उकार बदलत चालल्या आहेत, हे स्पष्ट दिसतं. याचा विचार कुणी एकट्यानं नव्हे तर, संपूर्ण समाजव्यवस्थेनं केला पाहिजे आणि तो अत्यंत गंभीरपणे केला पाहिजे.

लोकांच्या खिशात पैसा उदंड झालाय? जास्तीचे पर्याय सहज उपलब्ध झालेत? मोकळीक अन् स्वातंत्र्य वाढलंय? की माणसाला कशाचीच किंमत राहिली नाहीय? जाणिवांचं श्राद्ध घालून कुठल्याशा पोकळ धुंदीत वागण्याची ही रित समाजातल्या सर्वच स्तरांमध्ये जाणवण्याइतपत वाढतेय, हे प्रगतीचं अन् शहाणपणाचं लक्षण मानणाऱ्यांपैकी मी तरी नाही.

खरोखरचं सुजाण पालकत्व आणि आपण सुजाण पालक होण्यासाठी करत असलेला अनाठायी खर्च या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत का? संवेदनाशून्य सजीवांच्या फौजा निर्माण करुन आपण काय मिळवतो आहोत, याचा हिशोब कधीतरी कुणीतरी लावला पाहिजे की नको? 

नादारीचा मुखवटा घालून आतून काजू-बदामावर ताव मारणं हे माणसांच्या खोटारडेपणाचं स्वच्छ लक्षण आहे.

© श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ,

 संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक मातृभाषा दिन… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

? इंद्रधनुष्य ?

☆ ✍️ जागतिक मातृभाषा दिन… ☆ सुश्री अपर्णा परांजपे

जागतिक मातृभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

प्रगल्भ अशी आपली मातृभाषा मराठीचा आपल्याला अभिमान आहे.

ॐ‌ हे अक्षरब्रह्म आहे यातूनच शब्द निर्माण झालेत. आधी शब्द मग वाक्य वाक्य: संपूर्ण वाक्याचा सरळ अर्थ समजणे ही प्रक्रिया असते. जेवढं लिहिलंय, वाचलंय त्याचा सरलार्थ समजणे.

महावाक्य: ज्ञानी व अनुभवी व्यक्तींच्या तोंडून बाहेर पडलेल्या शब्दांचा, वाक्यांचा अर्थ जरी समजला नाही तरीही त्यांच्याच कृपेने त्याची अनुभूती घेणे ! 

विज्ञान एक प्रमेय व त्याची सिध्दता देते, तद्वतच ऋषिंचे शब्द म्हणजे त्या शब्दांची सिध्दता असते.

“आपुल्या सारखे करिती तात्काळ”

हे वचन सिध्द आहे कारण ते स्वानुभवातून आलेले आहे.

नुसती कल्पना जरी करता आली या वचनांची तरीही समाधान वाटते.

“मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी”

जशी आपली भावना व भाव असेल तसा अनुभव येतो कारण सिध्द केल्याशिवाय प्रमेयाला अर्थ नाही.

संगत्याग आणि निवेदन| विदेहस्थिती अलिप्तपण|

सहजस्थिती उन्मनी विज्ञान| हे सप्तही येकरूप. .

(||४:५:८|| दासबोध)

यातील प्रत्येक वाक्य समजू शकते पण ते महावाक्य असल्याने त्याचा अनुभव घेणे कल्याणकारी आहे.

असे स्वानुभवी सत्पुरुष भक्ताला स्वतः सारखे करतात ह्यावर निरपेक्ष श्रध्दा म्हणजे ॐ या अक्षरब्रह्माला हृदयात साठवणे व त्याचा आनंद घेणे आहे.

अशी ही मराठी जिला मातेचा दर्जा आहे ती लेकराला तिच्या जवळ जे जे आहे ते प्रदान करण्यास तत्पर असते व आपले बालक आपल्यापेक्षाही सुखी व्हावे असा बहुमोल आशीर्वाद ही देते! 

एकदा का मनाला हे पटले की काम झाले ह्यात शंका नाही.

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘श्रीसमर्थ रामदास पुण्यतिथी…. अर्थात दासनवमी’…भाग -२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘श्रीसमर्थ रामदास पुण्यतिथी…. अर्थात दासनवमी’…भाग -२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

“शक्तीने मिळती राज्ये | युक्तीने येत्न होतसे |l शक्ती युक्ती जये ठाई | तेथे श्रीमंत धावती ||३०||”

अध्यात्म सार. – समर्थ रामदास

या उक्तीनुसार स्वतः शक्ती सामर्थ्य कमविणे गरजेचे वाटले म्हणून हा मुलगा आपल्या घरापासून कोसोमैल दूर असलेल्या टाकळीला गेला. टाकळीत पाय ठेवलेल्या दिवसापासून त्याच्या तपश्चर्येला सुरुवात झाली. ‘केल्याने होत आहे रे आधी या केलेची पाहिजे, नव्हे ! आपणच केले पाहिजे’ असे ठरवून त्याने स्वतः रोज सुमारे हजार सूर्यनमस्कार, नंतर सद्ग्रंथाचे वाचन, चिंतन, भिक्षेच्या निमित्ताने समाजमनाचे सूक्ष्म अवलोकन, असे विविध उपक्रम चालू केले.

साधारण बारा वर्षांनी साधनेचा अर्थात जीवीतकार्याच्या पूर्वतयारीचा एक टप्पा पूर्ण केल्यावर हा तरुण देशाटन करण्याकरिता टाकळीतून बाहेर पडला. अंदाजे चोवीस वर्षाचे वय. स्वयंप्रेरित होऊन स्वतःहून निवडलेला एका अर्थाने जगावेगळं संकल्प !!

 “बहुत लोक मेळवावे| एक विचारे भरावे| कष्ट करोनी घसरावे| म्लेंच्छांवरी||१४||” (श्रीसमर्थांचे संभाजी राजांना पत्र) 

हा एकमेव उद्देश मनात ठेऊन संपूर्ण देशभर प्रवास केला. या मुलाने भारताच्या कानाकोपऱ्यात प्रवास करून देश काल परिस्थितीचा अभ्यास केला आणि तो या अनुमानापर्यंत पोचला की आपल्याकडे भारतात कसलीच कमतरता नाही. कमतरता एकाच गोष्टीची आहे ती म्हणजे असलेल्या साधनसंपत्तीचा उपयोग करुन, नीट योजना करून कार्य सिद्धीस नेणाऱ्या ‘योजकाची’. एका शब्दात सांगायचे तर संघटनेची आणि सक्षम, लोकोत्तर नेतृत्वाची. हिंदू मनुष्य पराक्रमात, सामर्थ्यात कुठेच कमी नव्हता. कमतरता एकाच गोष्टीत होती ती म्हणजे ‘मी जिंकू शकतो’ या वृत्तीची. आणि सर्वात महत्वाचा अभाव होता ‘राष्ट्रीय’ दृष्टिकोनाचा!! संघटनेच्या माध्यमातून समाज आपल्याला हवे ते सर्व करू शकतो हे सिद्ध करण्याची गरज होती. बारा वर्षांच्या देशाटनात श्रीसमर्थानी अशी हुकमी माणसे हेरून देशाच्या विविध भागात शेकडो मठ स्थापन केले. प्रत्येक मठात महंत नेमून मुख्य हनुमान भक्ती आणि बलोपासना ही कार्य सांगितलीच, पण सामान्य मनुष्यात स्वाभिमान जागृत करण्याचे महत्कार्य या तरुणांकरवी करायला सुरुवात केली.

“मुख्य हरिकथा निरुपण। दुसरे ते राजकारण।। तिसरे ते सावधपण। सर्वा विषई।।” ( दा. ११. ०५. ०४)

त्या काळात दळणवळणाची अल्पस्वल्प साधने असताना देखील या सर्व मठातील संपर्क, सुसंवाद आणि सुसूत्रता उत्तम होती. याचा उपयोग छत्रपतींना ‘स्वराज्य’ संस्थापनेसाठी झाला हे सर्वज्ञात आहे. अलौकिक जीवनदृष्टीने कार्य करणाऱ्या आणि आपल्या असामान्य कर्तृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्या या तरुणास समाजाने उस्फूर्तपणे ‘समर्थ’ ही उपाधी बहाल केली. रोज हजार सूर्यनमस्कार घालणारा आणि प्रचलित पद्धतीने मठ स्थापन करुन राजाश्रयावर मठ न चालविणारा हा आगळा संत लोकांना आकर्षित करीत होता. तरुण पिढी हनुमान आणि बलोपासनेमुळे धष्टपुष्ट होत होती आणि संकुचित विचार सोडून समाजाचा म्हणजेच समष्टीचा विचार अंगी बाणवत होती.

छत्रपतींनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला हे खरेच. पण कोणीही एकटा मनुष्य राज्य तोपर्यंत निर्माण करू शकत नाही, जोपर्यंत तत्कालीन समाज ते मनापासून स्वीकारीत नाही. राज्य व्हावे ही श्रींची इच्छा !! ह्या उद्गारांना विशेष मूल्य नक्कीच आहे. पण हे वाक्य त्याकाळातील समाजातील प्रत्येक मनुष्याचे ‘ब्रीदवाक्य’ झाले होते, याचीही आपण दखल घेतली पाहिजे. जेव्हा समाज एका विशिष्ठ ध्येयाने प्रेरित होतो तेंव्हाच शिवाजी महाराजांसारखे असामान्य नेतृत्व आणि कर्तृत्व घडते. शिवाजी महाराजांचे भौगोलिक साम्राज्य आजच्या दोन-तीन जिल्ह्याइतके मर्यादित असले तरी भावनिकरित्या ते राज्य इथे राहणाऱ्या प्रत्येक मावळ्याचे होते. दिल्लीश्वराने स्वराज्य बुडविण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्याला त्यात कधीही यश मिळाले नाही. शेवटी त्याला स्वतःला दिल्ली सोडून महाराष्ट्रात यावे लागले आणि स्वतःला इथेच गाडून घ्यावे लागले तरीही स्वराज्य जिंकणे त्यास शक्य झाले नाही. ह्याला एकमेव कारण म्हणजे छत्रपतींच्या मागे असलेली समाजाची सात्विक शक्ती आणि विजिगीषू वृत्ती. ही वृत्ती प्रज्वलीत करण्याचे काम ह्या मठातून अखंड चालू राहिले.

त्या काळात युद्ध होतं होतीच, माणसे मरत होती, मारीत होती, जगत होती. फक्त कशासाठी जगायचे ? कशासाठी मरायचे ? कशासाठी मारायचे? हे सांगणार कोणी नव्हते. ते सांगण्याचे काम कोणी केले असेल तर त्या समर्थांनी. ह्यामुळेच जिवा महाला, बाजीप्रभू तानाजी, येसाजी मरायला तयार झाले. हे जेव्हा मरायला तयार झाले तेव्हा त्यांची पत्नी विधवा होणारच होती, त्यांच्या मुलांचे पितृछत्र हरपणारच होते. पण त्यांनी आपल्या कुटुंबापुरता संकुचित विचार न करता देशाचा, थोडक्यात कर्तव्याचा विचार केला आणि ही शिकवण समर्थांमुळेच शक्य झाली.

आपण संकल्पित केलेलं कार्य ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला मिळण्याचे भाग्य फार थोड्या लोकांना मिळते. श्रीसमर्थ रामदास स्वामी या बाबतीत भाग्यवान ठरले. श्रीसमर्थांच्या चरित्राचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की श्रीसमर्थ कर्मयोगी होते. शके १७५२ (इसवीसन 1674) ला शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला. हिंदूना सार्वभौम राजा मिळाला. सुमारे सातशे वर्षांची गुलामी नष्ट झाली. ही फक्त राजकीय गुलामी नव्हती तर सांस्कृतिक गुलामी देखील होती. छत्रपतींनी ही गुलामी झिडकारून टाकली आणि नवी हिंदू राज्यव्यवस्था निर्माण केली. अनेक बाटलेल्या हिंदूंना त्यांनी नवीन विधिविधान निर्माण करुन शुद्धीकरण करुन स्वधर्मात घेतले. छत्रपतींनी समर्थाना आपले गुरु मानले होते. सद्गुरुंची सेवा घडावी म्हणून शिवाजी महाराजांनी आपले सर्व राज्य समर्थांच्या झोळीत टाकले आणि समर्थानी निःस्पृहपणे ते परत देऊन टाकले. त्याकाळात आणि आजही असा संत महात्मा बघायला मिळणे अति दुर्मिळ! अशा या समर्थांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर ‘आनंदवनभुवनी’ हे काव्य लिहिले.

“उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करायला।”

एका सामान्य कुटुंबातील मुलगा मनाशी संकल्प करून प्रतिकूल परिस्थिती असतानाही स्वतःच्या बुद्धिकौशल्याचा उपयोग करून, रामावर प्रचंड श्रद्धा ठेवून सामान्य मनुष्यातील सात्विक शक्तीचे जागरण करून हिंदू सिंहासन निर्माण करु शकतो. हे मराठवाड्यातील जांब गावच्या ठोसरांच्या नारायणाने सिध्द करून दाखविले. फक्त त्यासाठी त्याला ‘नारायणा’चे ‘रामदास’ व्हावे लागले. ‘नारायण ठोसर ते समर्थ रामदास’ हा प्रवास विलक्षण आहे, तो मुळातून अभ्यासायला हवा, खास करून तरूणांनी! आजची समाजाची परिस्थिती फार वेगळी आहे असे नाही. ‘संघशक्ती कलींयुगे’ हेच खरे.

दासनवमी म्हणजे श्रीसमर्थांचा निर्वाणदिन. संत सूक्ष्मातून जास्त कार्य करतात असे म्हटले जाते. धर्मजागृती चे त्यांचे कार्य चालू असेलच, त्याला आपला हातभार कसा लागेल याचा विचार आपण सर्वांनी करावा असे नम्रपणे सुचवावेसे वाटते. बलोपासना आणि सगुणभक्ती या दोन गोष्टी सर्वांनी कराव्यात असा त्याचा प्रयत्न असे. प्रयत्न, विवेक आणि वैराग्य अशी त्यांची त्रिसूत्री होती. आजच्या पावनदिनी आपण सर्वांनी त्यांच्या चरित्राचे चिंतन करावे, रामनाम स्मरण करावे आणि राष्ट्रीय विचारसरणीने कार्य करणाऱ्या एखाद्या संघटनेत सक्रीय सहभागी व्हावे. *’समर्थ’ होण्याचा प्रयत्न जरूर करावा पण त्यासाठी आधी ‘दास’ होऊन दाखवावे. आपण प्रयत्न करू.

जय जय रघुवीर समर्थ।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “विसंगती…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “विसंगती…” ☆ श्री जगदीश काबरे

२५ नोव्हेंबर, १९४९ला संविधान सभेत डॉ. आंबेडकरद्वारा दिल्या गेलेल्या भाषणातील महत्त्वाचे आणि आजच्या काळासाठी अत्यंत चिंतनीय असे हे उद्धृत. . .

२६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपल्याकडे समता राहील; परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपल्याकडे विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत.

अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण आणखी किती काळ समता नाकारणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल, तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत, ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाहीची संरचना उध्वस्त करतील.

लेखक : अज्ञात  

माहिती संग्राहक व प्रस्तुती : जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – तू गाये जा ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

उगवतीचे रंग – तू गाये जा ? ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

तू गाये जा…

बेकरार दिल तू गाये जा

खुशियों से भरे वो तराने

जिन्हे सुनके दुनिया झूम उठे

और झूम उठे दिल दीवाने…

‘दूर का राही’ या चित्रपटात किशोर कुमार यांनी गायलेलं हे सुरेख गाणं ! असेच आयुष्य जणू जगल्या सुरील्या आवाजाच्या धनी असलेल्या प्रसिद्ध गायिका चारुशीला बेलसरे. त्यांच्या गाण्यांनी रसिकांना भरभरून आनंद दिला. आई-वडिलांच्या असलेल्या संगीताचा वारसा घेऊन हे रोप वयाच्या अकराव्या वर्षीच बहरलं आणि मग पुढे त्याचा वटवृक्ष होऊन रसिकांवर सूर-सुमनांचा वर्षाव करू लागला.

गाणं चारुशीलाच्या रक्तातच होतं. वयाच्या केवळ तिसऱ्या वर्षी आपल्या बोबड्या बोलात ‘ विठ्ठला समचरण तुझे धरिते ‘ हे गीत ती गुणगुणायला लागली. या ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम केलं ते तिच्या आई-वडिलांनी आणि त्यातून एवढी सुंदर मूर्ती घडवली की प्रत्यक्ष हृदयनाथ मंगेशकरांनी तिला ‘ बाल लता ‘ असं संबोधलं. आई वडील हे तिचे आद्य गुरु झाले. आपली नोकरी सांभाळून त्यांनी स्वतःची गायनकला जोपासली आणि विकसित तर केलीच पण या आपल्या चिमुकलीला गान कलेचा वसा आणि वारसा दिला. ‘ बोलात बोबडीच्या संगीत जागविले. ‘ आणि मग एक एक सूर अमृतात न्हावून येऊ लागला.

वयाच्या केवळ ११ व्या वर्षीच तिने आपला स्वतंत्र संगीताचा कार्यक्रम केला. १५ फेब्रु. १९७० या दिवशी हा कार्यक्रम झाला. तो ही तिकीट लावून. अर्थात आई-वडील साथीला होतेच. या कार्यक्रमाला मान्यवरांची मांदीयाळी हजर होती. तिच्या गायनाला बाल लता म्हणून दाद देणारे स्वतः हृदयनाथ मंगेशकर, पंडित सी आर व्यास, शिरीष पै, गायक अरुण दाते, ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग. या कार्यक्रमात शाळकरी विद्यार्थिनी असलेली चारुशीला एवढ्या आत्मविश्वासाने आणि तन्मयतेने गायली की श्रोत्यांसह या मान्यवरांची दाद तिला मिळाली.

मग तिचे एकेक पाऊल पुढे पडत गेले. प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांनी तिचे गाणे ऐकले आणि तिला आपल्या चित्रपटात संधी देण्याचे मान्य केले. तसेच प्रख्यात गायक आणि संगीतकार बाबूजी उर्फ सुधीर फडके यांनीही तिचे गायन ऐकून तिला शाबासकी दिली आणि मग ‘ कार्तिकी ‘ या चित्रपटासाठी तिचं पहिलं गीत रेकॉर्ड झालं. त्यानंतर १९७५ पर्यंत आहुती, बाईने केला सरपंच खुळा, पाच रंगाची पाच पाखरं, चंदनाची चोळी अंग अंग जाळी या पाच चित्रपटातील गीते गाण्याची संधी मिळाली या काळात राम कदम, सुधीर फडके, एल बी सारंग, विश्वनाथ मोरे, यशवंत देव, शांकनिल, शशिकांत राजदेरकर यांच्यासारख्या विविध संगीतकारांकडून त्यांना गायनातील बारकावे शिकता आले. केवळ नववीत असताना प्रख्यात संगीतकार सी रामचंद्र यांचे बहुमोल मार्गदर्शन त्यांना लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गीते त्यांनी गायली.

याच काळात महाराष्ट्रात विविध ठिकाणी गीत रामायणाचे आणि सुगम संगीताचे कार्यक्रम करण्याची संधी त्यांना मिळाली यातूनही त्यांच्या गायनात परिपक्वता येत गेली. मराठी चित्रपटांप्रमाणेच अनेक नाटकांमध्ये पार्श्वगायनाची संधीही त्यांना मिळाली. त्यामध्ये यज्ञ, दुभंग, प्रतापगड, भक्तीमहिमा, दुर्गा झाली गौरी, वृक्षवल्ली आम्हा, सत्य महाभारत अशा नाटकांचा समावेश आहे. १९७५ च्या सुमारास दूरदर्शनवर झालेल्या ‘ किलबिल ‘ या कार्यक्रमात त्यांनी काही बालगीते गायली. याच कालावधीत प्रसिद्ध संगीतकार दशरथ पुजारी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘ रिमझिम झरती श्रावणधारा.. ‘ हे गीत गायले. काही गीते सुरेश वाडकर यांबरोबर गायली. दिल्ली दूरदर्शनवरही कार्यक्रम झाले. मुंबई आकाशवाणीवर भावसरगम या कार्यक्रमात गजानन वाटवे, श्रीनिवास केसकर, प्रभाकर पंडित, यशवंत देव, भूमानंद बोगम यांच्यासारख्या संगीतकारांनी त्यांच्याकडून विविध लोकप्रिय गीते गाऊन घेतली आणि एक गायिका म्हणून चारुशीला बेलसरे हे नाव महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र बाहेरही रसिकमान्य झाले.

पं सी आर व्यास हे शास्त्रीय संगीतातील मोठे व्यक्तिमत्व ! त्यांनी चारुशीला यांना सहा वर्ष शास्त्रीय संगीत शिकवले. ग्वाल्हेर घराण्याची गायकी आणि बसंत, मालकंस, अहिरभैरव, यमन आदी विविध राग त्यांनी शिकवले. ‘फुल खिले है गुलशन गुलशन ‘ हा लोकप्रिय कार्यक्रम मुंबई दूरदर्शनवर सादर करणाऱ्या बेबी तबस्सुम यांच्याबरोबर चारुशीला यांनी अनेक ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम ‘ तबस्सुम हिट परेड ‘ या नावाने केले केवळ पाच वर्षात जवळपास २००० कार्यक्रम संपूर्ण भारतभर त्यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये नामवंत कलाकारांची हजेरी असायची.

कोणाही व्यक्तीला आपला शिष्य म्हणून सहजपणे न स्वीकारणारे ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी यांनी जेव्हा चारुलता यांचा आवाज ऐकला, तेव्हा त्यांना शिकवण्याचे मान्य केले आणि पंडितजींनी कडून त्या किराणा घराण्याची गायकी शिकल्या. या काळात त्या एसएनडीटी महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठात संगीत शिकवत होत्या. परंतु गायन शिकायचे तर त्यासाठी वेळ दिला पाहिजे असे पंडितजींनी सांगितल्यावर त्यांनी या नोकरीचा राजीनामा दिला. आणि पूर्ण वेळ संगीताला वाहून घेतले. पंडितजींनी जवळपास दहा वर्षे त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि त्यांची अवस्था ‘ देता किती घेशील दो करांनी ‘ अशी झाली.

आपणा सर्वांना मोहन जोशी हे नाव उत्तम अभिनेते म्हणून माहिती आहे परंतु ते उत्तम गातातही हे फार थोड्या लोकांना माहिती असेल. त्यांच्यासोबत चारुशीला यांनी ‘ गोविंदा आला रे ‘ या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमामध्ये अनेक गीते गायली. साक्षात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासमोर त्यांची गाणी त्यांनी गाऊन दाखवली आणि लतादीदींनी त्यांचे खूप कौतुक केले. मॉम कॅसेट कंपनीने त्यांची ‘ हिट्स ऑफ लता ‘ ही कॅसेट प्रसारित केली. ती अतिशय लोकप्रिय ठरली.

पुढे त्या पुण्याला स्थायिक झाल्या. योगायोगाने त्यांची संत साहित्याचे अभ्यासक असलेले डॉ अरविंद नेरकर यांच्याशी भेट झाली. मग त्यांच्या दोघांच्या सहकार्यातून अनेक सुंदर कार्यक्रमांची निर्मिती झाली. त्यामध्ये मन हे राम रंगी रंगले, पांडुरंगी मन रंगले, दिंडी चालली चालली, अमृतवाणी ज्ञानियांची, रंग भक्तीचे यासारखे अनेक कार्यक्रम सादर झाले. या कार्यक्रमांना डॉ अरविंद नेरकर यांचे रसाळ निवेदन आणि चारुशीला यांचे सुश्राव्य गायन असा सुरेख संगम असायचा. हे कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय झाले आहेत. २४ गायत्री मंत्रावर आधारित २४ गायत्री मंत्राचा लाभ सांगणारा ‘ स्वरगायत्री ‘ हा आगळावेगळा कार्यक्रमही त्यांनी सादर केला. त्यासोबतच स्वरांच्या हिंदोळ्यावर सप्तसूर रंगले, चांदणे शिंपीत जाशी, रागांचे रंग यासारखे अनेक सुगम संगीताचे अनेक कार्यक्रम त्यांनी डॉ नेरकरांसोबत सादर केले आहेत आणि ते रसिकांचे अतिशय आवडते आहेत. केवळ इथेच त्या थांबल्या नाहीत तर साहित्यातील शब्द आणि संगीतातील गांधार असा विचार डोळ्यासमोर ठेवून या दोघांनी ‘ शब्दगांधार ‘ या दिवाळी अंकाची निर्मिती केली आणि गेल्या पंधरा वर्षापासून दर्जेदार दिवाळी अंक वाचकांना हे दोघे सादर करीत आहेत.

संगीत क्षेत्रात जवळपास ५० वर्षानूनही अधिक काळ साधना, तपश्चर्या करणाऱ्या आणि आपले अमूल्य योगदान देणाऱ्या चारुशीला यांना आपले जीवन कृतार्थ झाल्याचा अनुभव या क्षणी येतो आहे. यापुढील आयुष्यात समाजातील उपेक्षित घटकांची जास्तीत जास्त सेवा करायची आणि त्यांच्यासाठी कार्यक्रम करायची असे त्यांनी ठरवले आहे. विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. विजया फाउंडेशनच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार त्याचप्रमाणे मॉम इंडिया कंपनीतर्फे जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे इतरही अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना लाभले आहेत. नुकताच स्वरगायत्री प्रतिष्ठान या संस्थेचा जीवनगौरव पुरस्कारही त्यांना जाहीर झाला आहे. या गानतपस्विनीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “रोजच्या व्यवहारातला दासबोध…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “रोजच्या व्यवहारातला दासबोध…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

त्या दिवशी दासबोध वाचत होते……

” अंतरासी लागेल ढका

ऐसी वर्तणूक करू नका

जिथे तेथे विवेका

प्रगट करी…. “

हे वाचताना अचानक जोशी बाईंची आठवण आली.

मी पाचवीत असतानाची गोष्ट. शाळा नुकतीच सुरू झाली होती बाई वर्गात आल्या आणि म्हणाल्या..

” मी काय सांगते ते नीट ऐका. उद्या आपल्या वर्गात मीनल नावाची नवीन मुलगी येणार आहे. तिच्या वडिलांची इथे बदली झाली आहे. तिला आई बद्दल काहीही विचारू नका….

कारण काही दिवसांपूर्वी तिची आई देवाघरी गेली आहे. “

सगळ्या वर्गात एकदम शांतता पसरली… स्तब्धच झालो…

गरीब.. बिचारी… बापरे. तीच्यावर किती मोठं संकट आलं आहे…

एखादीला आई नाही हे केवढे दुःख….. कारण त्या वयात आई हे मुलींच सर्वस्व असतं…

किती… किती विचार आमच्या मनात आले.. बाईंच्या ते लक्षात आले.

त्या म्हणाल्या,

” मीनलला तुमच्यात सामील करून घ्या. ईथे कोणी तिच्या ओळखीचं नाही. तुम्ही तिच्याशी गप्पा मारा. तिला मदत करा… “

सुट्टीत बोलायला तोच विषय होता.

आई नाही तर तिच्या घरी स्वयंपाक कोण करत असेल, घरं कोण आवरत असेल, तिची वेणी कोण घालत असेल हा सुध्दा प्रश्न आम्हाला पडला…

दुसरे दिवशी मीनलची आम्ही वाट पहात होतो. बाईंनी तिला मध्यभागी बसवलं. त्यामुळे आम्ही तिच्या जवळ होतो. दिवसभर आम्ही तिच्या मागेमागे होतो. डब्यातला खाऊ तिला दिला. शाळा दाखवली. जे शिकवून झाले होते ते दोघींनी तर तिच्या वहीत लिहूनही दिले… काय काय केलं….

तिचे वडील तिला न्यायला आले. ती त्यांना खुशीत म्हणाली,

” बाबा मला शाळा, बाई फार आवडल्या. आज मला नव्या मैत्रिणी मिळाल्या. “

नंतर हळूहळू ती सहजपणे रुळली…

आज समजतं त्या दिवशी बाईंनी आम्हाला केवढा मोठा धडा शिकवला होता.

एखाद्याचे दुःख समजून घ्यावं.. त्याला होईल ती मदत करावी, चारचौघात त्याला त्याविषयी विचारून कानकोंडं करू नये…. मुख्य म्हणजे त्याला आपल्यात सामील करून घेऊन देता येईल तो आनंद द्यावा.

आजही जोशीबाई आणि तो वर्ग आठवतो. बाईंनी शिकवलेलं अजून लक्षात आहे.

अंतःकरण न दुखावता विवेकानी वागायचा प्रयत्न सुरू ठेवू…

रामदास स्वामी आहेत शिकवायला…

त्यांनी त्यांच्या ग्रंथातून हेच तर सांगितलेले आहे. म्हणून ग्रंथ वाचताना समजून उमजूनच वाचावा.

आज दासबोध वाचायला घेतला तेव्हा हे सर्व आठवले…

रामदास नवमी जवळ आलेली आहे तर या ओव्या पण वाचा…

” आपणांस चिमोटा घेतला

 तेणे जीव कासावीस झाला

 आपणा वरून दुसऱ्याला

 पारखीत जावे”

*

” विचार न करता जे जे केले 

ते ते वाऊगे व्यर्थ गेले

 म्हणून विचारी प्रवर्तले

 पाहिजे आधी”

*

“उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा

 शब्द निवडून बोलावा

 सावधपणे करीत जावा

 संसार आपला”

*

नरदेहाचे उचित 

काही करावे आत्महित 

यथानुशक्त्या चित्तवित्त

सर्वोत्तमी लावावे”

*

आपल्या दृष्टीने सर्वोत्तम कुठले आहे हे आपले आपण ठरवायचे आहे. तिथे आपले सर्वस्व पणाला लावून स्वतःची ऊन्नती करून घ्यायची आहे.

सरळ सोप्या भाषेत रामदासांनी अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत.

रामदास स्वामींचे शब्दचं इतके बोलके आहेत की वाचता क्षणी त्याचा अर्थ लागतो. मनाला भावतो.. पटतो.. खूप क्लिष्ट नसल्याने आपण तो सहज अमलात आणू शकतो…..

 हळूहळू आपली प्रगती निश्चित होईल ही खात्री आहे.

आता हे पण लक्षात येत आहे की पोथी, ग्रंथ हे नुसते वाचायचे नसतात. त्यातला अर्थ, भावार्थ, गुढार्थ, समजून घ्यायचा असतो. त्यातले गुह्य काय आहे हे ओळखायचे जाणुन घ्यायचे असते.

संतांनी अपार तत्त्वज्ञान अभंग, ओव्या, भारूड, ग्रंथ, पोथ्या यातून सांगितलेले आहे.

त्यातले काही थोडे तरी.. आपल्याला घेता आले पाहिजे. ते नुसते घेऊन थांबून चालणार नाही…

तशी वागणुक करून ते आपल्या प्रत्यक्ष कृतीतून, वाणीतुन दिसले पाहिजे. तरच त्या वाचण्याला अर्थ आहे….. यातूनच आपल्या मनाची शक्ती वाढणार आहे. मनाचे श्लोक वाचताना याचे प्रत्यंतर येतेच…

आपण जसजसे वाचू लागतो तसतसे कळत जाते की वरवर दिसतो तितका हा मार्ग सोपा नाही. त्यासाठी सातत्य, प्रयत्न, निष्ठा, प्रेम, अभ्यास आणि मनापासून बदलायची तयारी हवी तरच हे जमेल.

समर्थांनी दासबोधात हे कसे करायचे ते पण सांगितले आहे.

” आलस्य अवघाची दवडावा 

यत्न उदंडची करावा

 शब्द मत्सर न करावा 

कोणा एकाचा”

साधक होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे….

” अवगुण त्यागी दिवसंदिवस

 करी उत्तम गुणांचा अभ्यास

 स्वरूपी लावी निजध्यास

 या नाव साधक”

समर्थांनी सांगितलेले शब्द लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागूयात. त्यातील आवडलेल्या ओव्या लिहून ठेवू. कधीही काढून तेवढ्याच वाचता येतील… त्यातील सखोल अर्थ मनात झिरपत राहील… त्यातून हळूहळू प्रगती निश्चित होईल. मार्ग दाखवायला आपला दासबोध आहेच..

जय जय रघुवीर समर्थ.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares