मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पाॅपकाॅर्न…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “पाॅपकाॅर्न…” ☆ सौ राधिका भांडारकर 

पॉपकॉर्न या शब्दाशी तशी आयुष्यात जरा उशीरच ओळख झाली.  पण पाहता क्षणीच मी त्या शब्दाच्या आणि चवीच्याही प्रेमात पडले.  “ती पाहताच बाला कलीजा खलास झाला”  अशीच काहीतरी अवस्था मनाची झाली.  “अगदी सुंदरा मनामध्ये भरली”.

इतक्या दिवसांच्या जीवन प्रवासात वेगवेगळ्या चवींचे अनुभव काय थोडे असतात का? आता बघा पॉपकॉर्न मधला पॉप थोडावेळ बाजूला ठेवूया आणि  उरलेल्या त्या काॅर्नशी आपला  संबंध होताच की? काॅर्न  हा शब्द असेल परदेशी थाटाचा, काहीसा नखरेल, आधुनिक संस्कृतीशी चटकन शेक हँड  करणारा पण आपल्यासाठी त्याचा एकच अर्थ मका.  आणि मका म्हटलं की एकावर एक मस्त मखमली धाग्यांचं, मऊ वस्त्र लपेटलेलं एक सुंदर दाणेदार कणीस!  दाणे कधी पांढरे कधी पिवळसर पण रूप अतिशय देखणं,  आणि या मक्याचे आणि पावसाचे एक घट्ट नाते आहे.  छान पावसाच्या सरी कोसळत असाव्यात, वातावरणात ओला गारवा, असावा कुठेतरी झाडाच्या खाली अथवा रस्त्याच्या  कडेला पावसापासून सुरक्षित निवारा शोधून मक्याच्या कणसांची रास गाडीवर ठेवून, कोळशाची शेगडी पेटवून , त्या तप्त निखाऱ्यांवर कणसे भाजणारा “तो” किंवा “ती” दिसावी आणि तिथे टुणकन् उडी मारून आपण जावं. त्या उडणार्‍या ठिणग्या आणि तडतडणारे दाणे आणि नंतर त्या शेगडीवर भाजलेल्या, वरून तिखट, मीठ, लिंबू पिळलेल्या खमंग, गरम कणसांचा आस्वाद घ्यावा.  ते खरपूस, रसदार दाणे चावून खाताना रसनेची होणारी तृप्ती…क्या बात है!.. अलौकिकच! ज्या कोणी याचा आनंद घेतला नसेल तर तो जीवनातल्या महान आनंदला कायमचा मुकला आहे असेच मी म्हणेन.

तर अशा या मक्याशी— काॅर्नशी  असलेलं, आपलं नातं तसं जुनच.  पिढ्यानु पिढ्या चालत आलेलं.  पण या मक्याचे “पॉपकॉर्न” असं नामकरण झालं आणि आपण एका वेगळ्याच संस्कृतीत पाऊल टाकलं.जसं निवडुंगाचं कॅक्टस झालं,तसंच काहीसं.पण  ही संस्कृती आहे. हलकीफुलकी, नाचणारी, बागडणारी, उडणारी पॉप संस्कृती. रेडीमेड पण चविष्ट, खमंग आणि सहज नेत्रांना सुखावणारी,  रसनेलाही भावणारी.   म्हणजे पॉपकॉर्न या उच्चाराबरोबर काॅर्न  किंवा मका खाण्याचे वैज्ञानिक, आरोग्य विषयक नियमांचे विचार वगैरे येत नाहीत  बरं का? म्हणजे त्याचे अँटिऑक्सिडंट घटक, हृदयाला ऊर्जा देणारी गुणवत्ता वगैरे असं काहीही गंभीर, अभ्यासात्मक मनाला त्यावेळी स्पर्शूनही जात नाही. ते सारं ज्ञान एकीकडे आणि कागदाच्या उभट  द्रोणातून भरभरून वाहणारे वेगवेगळ्या फ्लेवरचे (चवीचे न म्हणता) पॉपकॉर्न खाण्याची  मजा काही औरच. 

पण क्षणभर थांबा.  आता या खाद्याच्या मजेच्या, आनंदाच्याही पातळ्या वेगवेगळ्या आहेत.  म्हणजे हे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता.  त्यातही पुन्हा ऑप्शन्स आहेत. “ए वन  पॉपकॉर्न” या ब्रँडचे छोटे, कागदी पुडीतले, इन्स्टंट म्हणजे मायक्रोवेव्हमध्ये दोन मिनिटात तडतड उडणारे पॉपकॉर्न खाऊ शकता किंवा चक्क सुकलेले मक्याचे दाणे किंचित तेलावर, शिट्टी न लावलेल्या कुकरमध्ये गरम केले की  तुम्हाला या मक्याच्या सुंदर, नक्षीदार, हलक्या लाह्या घरबसल्या  मिळतील.    मग त्यावर तुमच्या आवडीचं, कुठलंही मसालेदार, चटकदार मिश्रण भुरभुरा. पॉपकॉर्न तयार.  आता मात्र त्यास मक्याच्या लाह्या हे पारंपारिक विशेषनाम न देता काय म्हणाल? 

 “पॉपकॉर्न”

“. बरोब्बर”

मस्त . टीव्हीवरच्या अथवा ओटीटी वरच्या एखादा अत्यंत कंटाळवाण्या सिनेमाचीही  रंगत हे पॉपकॉर्न वाढवतात. जोडीला बाहेर पाऊस पडत असेल तर मग अगदीच दुग्ध शर्करा  योग. यातही भरपूर मजा आहे.

पण मंडळींनो! पॉपकॉर्न आणि मजा याची ही अगदीच मर्यादित, सामान्य पातळी  आहे. अगदी उपहासाने, काहीसं तिरसटपणे, तुच्छतेने उच्चभ्रुंच्या ठेवणीतलं म्हटलेलं  वाक्य म्हणजे “मिडल क्लास मेंटॅलिटी”  “मध्यमवर्गीय मानसिकता” घरीच बनवा,घरीच खा हा ट्रेंड. कारण पॉपकॉर्नचं खरं नातं आहे ते आजच्या नवयुगातल्या मॉल संस्कृतीशी.  पीव्हीआर, आयनॉक्स,  सिने संस्कृतीशी.  थिएटर मधल्या गोल्ड, प्लॅटिनम, रेक्लायनर या बैठक संस्कृतीशी.  त्या मस्त थंड काळोखात घमघममणारा तो पॉपकॉर्नचा विशीष्ट, नमकीन सुगंध तुम्हाला कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. 

बाहेरच्या काउंटरवर काचेच्या मागे त्या आनंदाने टप टप उडणाऱ्या, गरमागरम लाह्या , (लाह्या नाही हो…पाॅपकाॅर्न) न खाता किंवा खिशात हात न घालता तुम्ही पुढे गेलात तर हाय कंबख्त!  एक तर तुम्ही अत्यंत कंजूष  किंवा “इतके पैसे कशाला मोजायचे?””दोन रुपयाच्या ठिकाणी दोनशे का द्यायचे?” या काटकसरी, कर्तव्यनिष्ठ, समंजस,धोरणी,संयमी  वयस्कर समूहातले असाल. फार तर लार्ज कप नका घेऊ. थोडेसे तरी पैसे वाचवून स्मॉल कप घ्या, पण घ्या.  त्याशिवाय पीव्हीआर मध्ये जाऊन सिनेमा पाहण्याच्या  निखळ आनंदाची पूर्तता होणारच नाही.सिनेमा भिक्कार कां असेना पण पॉप काॅर्न हवेतच.  वाटल्यास चित्रपटगृहात बालदीभरून पॉपकॉर्न खाणाऱ्यांबद्दल, “काय ही आजची युवापीढी, बापाच्या जीवावर मजा करते किंवा आयटीत जॉब असेल. लहान वयात भरपूर पैसा मग काय मजा..  किंवा आजकाल काय खिशात क्रेडिट कार्ड असतेच ना..” असे शेरे तुम्ही या खर्च करणाऱ्या, उधळपट्टी करणाऱ्या पिढीवर मनातल्या मनात मारू शकता.  पण घरी आल्यावर हिशोबाच्या डायरीत सिनेमाची— मी आणि सौ— दोन तिकिटे..रु. साडेसातशे प्लस पॉपकॉर्न रु.साडेतीनशे अशी नोंद करताना मुळीच हळहळू नका.

या वयातही “थोडीसी रुमानी हो जाये”  हाच अटीट्यूड ठेवा की !  नाही तर भूतकाळात रमाल.  आम्ही दोन रुपये देऊन पिटात पिक्चर पाह्यचो. फार तर मध्यंतरी पुडीतले  चणे किंवा थोडे पैसे असतील तर मटका कुल्फी.  काय कमी मजा होती  का यात?  अगदी गेला बाजार नाट्यप्रेमींचा आनंद काय होता?  खरं म्हणजे आजही आहेच  तो. मध्यंतरात मस्त जायफळ, वेलची घातलेली मधुर कॉफी आणि गरम बटाटेवडे.  पण हे दृष्य गडकरी रंगायतन  किंवा बालगंधर्व मध्ये.  पीव्हीआर मध्ये नक्कीच नाही. तिथे मात्र हेच अहंकारी, शिष्ट, तडतड उडणारे तरीही तुम्हाला खुलवणारे, बोलवणारे, तुमच्या “पैसे बचाव” घट्ट संस्कृतीच्या रेषा ओलांडायला लावणारे, हलकेफुलके पॉपकॉर्नच. 

तर मंडळी पॉपकॉर्न ही एक संस्कृती आहे.  त्या पलीकडे जाऊन मी म्हणेन ती एक मानसिकता आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मराठी भाषा विषयक अभिमानाला आणि मराठी माणसाने मराठीतच बोलावे या संदेशाला सादर प्रणाम करून आणि नंतर त्यांची मनस्वी क्षमा मागून विनम्रपणे मी म्हणेन की “पॉपकॉर्न” या धबधब्यासारख्या, एका विशिष्ट लय असलेल्या, उच्चारवातच आनंदाची कारंजी उडवणाऱ्या, हलक्या फुलक्या शब्दाशीही नाते आणि खाद्य संस्कृती जुळवण्याचा एक प्रयत्न तरी करून बघूया.   बदलत्या काळाबरोबर जरा जगायला शिकूया की.

आनंददायी खवय्येगिरी .

जाता जाता आणखी एक…..   पॉप काॅर्न या शब्दातही एक संदेश दडलेला आहे. नाचा, उडा, मुक्त व्हा आणि मूळचा कडक,कठीण, सुका भाव उधळून पिसासारखे हलके व्हा.”

“मन उडू उडू झाले” याचा हा  वेगळाच अर्थही जाणून घेऊया.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “यमक…” ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ “यमक…” ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

ज्योतिताईंनी एकदा विचारलं, “एका ओळीने शेवट झाला की पुढच्या कडव्याची सुरुवात त्याच ओळीनं होते, या काव्यप्रकाराला काय म्हणतात?”  माझा हक्काचा स्रोत  म्हणजे आई-दादा!

दादांचा फोन बंद होता आठ दिवसांपासून! जाम बेचैन झाले. म्हणून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट करून ठेवलं. पाचव्या मिनिटाला दादांचा फोन! 

“अगं, आत्ताच फोन सुरू झाला आणि तुझा मेसेज वाचला. ऐक, यमकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तू म्हणतेस ते दाम-यमकाच्या जवळपास जाणारं यमक असेल, असं आई म्हणत्ये.”

मागून मला आईच्या नाजूक गुणगुणण्याचा आवाज आला. आईची स्मरणशक्ती अफाट! कोणतीही कविता पाठ असते. 

‘श्रीपति झाला दशरथ-सुत राम दशाननासि माराया|

मा राया जनकाची होय सुता त्रिजगदाधि साराया|

सारा या प्रभुची हे 

लीला गाती सदैवही सुकवी|

सुकवी भवजलिं निधितें निरुपमसुख रसिक जन मनीं पिकवी|’ 

(पहिल्या ओळीचा शेवट ती पुढच्या ओळीची सुरुवात. पण अर्थ वेगळा.) 

दादा म्हणाले, “हे बघ ऐक!” त्यांनी तोवर, ते आठवीत असतानाचं (आईला ८४ वर्षे पूर्ण होतील आता. दादा ८६ वर्षांचे!) मराठीचं पुस्तक आणलं होतं.  पाय प्रचंड दुखतात त्यांचे! पण ब्रिज आणि भाषा हे विषय आले की, त्यांना पंख लाभतात! 

तर कुमार भा. वि. जोशी, इयत्ता आठवी, असं लिहिलेलं पुस्तक हातात घेऊन त्यांनी मला यमकाचे प्रकार सांगितले. ते थोडक्यात इथे मांडत आहे. 

१) एकाक्षरी यमक:  

एक्या पदे भूमि भरोनि थोडी

दुजा पदे अंडकटाह फोडी

(डी ला डी हे एकाक्षरी यमक) 

२) द्व्यक्षरी

 दे तीसरा पाद म्हणे बळीला

म्हणोनी पाशी दृढ आकळीला

(ळीला हे द्व्यक्षरी) 

३)चतुराक्षरी

बाई म्यां उगवताच रवीला

दाट घालुनि दही चरवीला

त्यात गे फिरवितांच रवीला

सार काढुन हरी चरवीला

(काय अफाट आहे ना हे!  प्रत्येक ‘चरवीला’ वेगळा आशय मांडतो.) 

४) मग एकाचा अन्त्य आणि दुसऱ्याचा आदि चरण सारखा. 

सेवुनि संतत पाला, संत तपाला यदर्थ करतात

तो प्रिय या स्तवना की, यास्तव नाकीहि तेंचि वरितात

५) दामयमकाचं उदाहरण वर दिलंच आहे. 

६) पुष्पयमक: प्रत्येक चरणात यतीच्या ठिकाणी येणारं यमक. 

सुसंगति सदा घडो… पडो.. झडो… नावडो

 ७) अश्वघाटी: घोड्यासारखी गती असलेलं यमक. 

वाजत गाजत साजत आज तया जतन करुनि आणा हो

(वाजत गाजत साजत आजत याजत, अशी गंमत आहे.) 

मज मागे मत्स्यांचा हा रिपु-शशि-राहु-बाहु राणा हो

८) युग्मक यमक हा भन्नाट प्रकार आहे. 

पायां नमी देइन वंश सारा

पा या न मी दे इनवंशसारा

(इन म्हणजे सूर्य, इनवंशसार म्हणजे सूर्यवंशात जन्मलेल्यांचं सार म्हणजे राम!)

९) समुद्रक यमक

हेही अफाट प्रकरण आहे. – 

अनलसमीहित साधी राया, वारा महीवरा कामा

अनलस मीहि तसा धीरा यावा रामही वराका मा

(हे पृथ्वीपते धर्मा, वारा जसे अग्नीचे कार्य साधतो, तसे तुला  साह्य करण्यास मी सदैव तयार आहे. हे धीरा, बलरामही हवे तर येतील. मग वराका (बिचारी) मा (रुक्मिणी) तुझ्या साह्यास का येणार नाही?)

अशा यमकांत चमत्कृती असते. पण काव्याचा ओघ नसतो. हे काव्य कृत्रिम असलं, तरीही हे प्रतिभेचंच देणं, लेणं आहे हे निःसंशय!

मी हे सगळं प्रथमच वाचलं. आपल्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित माहीत असेल. पण नसेल तर माहिती व्हावी म्हणून पाठवत आहे.  यमक याविषयी आणखी माहिती मिळाली तर जरूर शेअर करा.

संग्राहक : श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “म्हातारपणचा आधार कोण ? ” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “म्हातारपणचा आधार कोण ? ” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

म्हातारपणाचा आधार कोण??? —- मुलगा की मुलगी??

आम्ही सर्वजण मुख्य सभागृहात बसून चर्चा करत होतो, तेव्हा माझ्या बहिणीने मला प्रश्न विचारला, “भाऊ! मला सांगा, माणसाची मुलगी आहे की त्याचा मुलगा त्याच्या म्हातारपणाचा आधार आहे?”

मी म्हणालो- “बहिणी ! हा प्रश्न न विचारलेलेच बरे. कारण काही सुखी होतील, तर काही दुःखी.

म्हणून इतर सर्व लोक आग्रह करू लागले की नाही, ही गोष्ट सविस्तर सांगावी लागेल…

मी म्हणालो तर ऐका… म्हातारपणाचा आधार मुलगा किंवा मुलगी नसून “सून” असते.

मुलगा किंवा मुलगी ही म्हातारपणाची काठी असते असे आपण अनेकदा लोकांकडून ऐकले आहे, म्हणूनच लोक आपल्या आयुष्यात “मुलगा आणि मुलगी” हवेत, जेणेकरून म्हातारपण चांगले पार पडावे.

ही गोष्ट सुद्धा खरी आहे कारण घरात फक्त मुलगाच सून आणतो. सून आल्यानंतर मुलगा आपल्या पत्नीच्या खांद्यावर जवळजवळ सर्व जबाबदारी टाकतो.

आणि मग सून ही सासरच्या म्हातारपणाची काठी बनते.

होय! माझा विश्वास आहे की ती सून आहे जिच्या पाठिंब्याने वृद्ध सासू आणि सासरे आपले आयुष्य चांगले घालवतात.

सुनेला तिच्या सासू आणि सासऱ्यांची संपूर्ण दिनचर्या माहीत असते.

कोण कधी आणि कोणता चहा प्यायचा, काय शिजवायचा, संध्याकाळी नाश्त्याला काय द्यायचे, कोणत्याही परिस्थितीत जेवण रात्री नऊच्या आधी शिजवावे लागते.

सासू-सासरे आजारी पडले, तर सून मनापासून किंवा अनिच्छेने त्यांची काळजी घेते.

सून एक दिवस आजारी पडली किंवा निघून गेली तर सगळं घर हादरून जातं. पण मुलगा पंधरा दिवसांच्या प्रवासाला गेला तरी सुनेच्या भरवशावर घर सुरळीत चालते.

सून नसताना सासू-सासरे यांना कोणीतरी आपली काठी हिसकावून घेतल्यासारखे वाटते. त्याला दुसरे कोणी विचारायचे नव्हते.

कारण मुलाकडे वेळ नाही आणि मुलाला वेळ मिळाला तरी तो काहीच करू शकणार नाही कारण त्याला सकाळपासून रात्रीपर्यंत आई बाबांना काय द्यावे हेच कळत नाही? कारण मुलाचे काही प्रश्न आहेत आणि त्याची जबाबदारी  संपली.

जसे “आई बाबांनी जेवण केले आहे का?” “चहा प्यायला?” “नाश्ता केला?” पण ते काय खातात? कोणता चहा पितात हे शोधण्याचा प्रयत्न कधीच केला नाही? ही जवळपास सगळ्या घरांची गोष्ट आहे.

सासूची मनापासून सेवा करणाऱ्या अशा सून मी बहुतेक पाहिल्या आहेत.. म्हणूनच सून हीच म्हातारपणाची खरी काठी आहे असे मी मानतो.

पण अजून एक गोष्ट खरी आहे की तुम्हाला सुद्धा बुद्धी असायला हवी की सदैव “माझ्या राजा बेटा!” “माझी राणी मुलगी!”  चा जप सोडा. “माझी चांगली सून!” सुद्धा अंतर्भूत केले पाहिजे.

म्हणून, आपल्या सुनेमध्ये फक्त दोष शोधू नका, तिच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करा.

“दिवसाचा संदेश”

सुनेचा त्याग आणि सेवा ओळखा

मुलगा आणि मुलीच्या आधी सुनेला स्वतःचे समजा

आणि “माझी मुलगी – माझा अभिमान” “माझा मुलगा – माझा अभिमान” म्हणणे थांबवा…

अभिमानाने म्हणा माझी सून, माझा अभिमान…… 

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ आयुष्याचं झाडं… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ आयुष्याचं झाडं… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

या आयुष्याच्या झाडाला बालपणीची पहिली डहाळी सर्वात उंच उंच असते .माय पित्याच्या मायेच्या ढोलीत सख्या सोबत्यांच्या संगतीत किलबिल किलबिल गुजगोष्टीने, प्रत्येकाला रंगीबेरंगी फुलाप्रमाणे स्वप्नं पाहात, पंखातले बळ अजमावत गगनाला गवसणी घालण्याची इच्छा मनात येते. वेळ येते तेव्हा काहींचे मनसुबे पूर्ण होतात तर काहींचे मृगजळाचे रूप घेऊन हुलकावणी देत राहतात.. देव भेटत नाही आणि आशा सुटत नाही याचा प्रत्यय ठायी ठायी येतो. दमछाक होते. नाद सोडून दिला जातो.. आता एकटेपणाचा उबग येतो नि जीवन साथीची गरज भासते.. शांत, सरळ, एकमार्गी धोपट जीवन जगावेसे वाटणे स्वाभाविक असते.. ती आयुष्यातली गोड गुलाबी सल्लज कुजबूज, हितगुज आपल्या प्रियतमांच्या कानात सांगाविशी वाटते. मानवी जीवनातला हा सर्वात सुंदर सुवर्णकाळ असतो.. स्वप्नांच्या पूर्ततेचा हा टप्पा असतो..या संसाराच्या फांद्यावर आता आपलचं स्वतंत्र घरटं असतं.. आणि बालपणीचे सखेसोबतीत अंतर दुरावलेलं असतं.. इथं संबंध झाड हिरवेगार तजेलदार, पानाफुलाने नि फळांनी बहरून आलेलं असतं. मग हळूहळू तो बहर ओसरू लागतो, पानं पिवळी पडत जीर्ण शीर्ण होऊन गळू पाहतात, फुलं कोमेजू लागतात, फळ झाडापासून तुटून खाली पडू पाहतात… ही वार्धक्याची डहाळी झाडाच्या बुंध्याला येऊन टेकलेली असते.. बरेच उन्हाळे पावसाळे झेलून झालेले असल्याने आता कशाचीच असोशी उरलेली नसते.. अगदी जीवन साथीची जवळिकतेची सुद्धा.. केवळ अस्तित्वाने जवळ असणं पुरेसे वाटतं. संवादाला नाहीतरी विवादाला तरी सोबत असावी असचं वाटू लागतं ,मनाप्रमाणे शारिरीक अंतर पडू पाहतं..मावळतीचे काळे करडे राखाडी रंग तनामनावर उमटले जातात.. बालपणीचा किलबिलाट, तरूपणीची गुंजन हवेत कधीच विरून गेलेली असते, आणि आता वृद्धपणी ची कलकल हुंकारत असते.. गुणापेक्षा अवगुणाची एकमेंकाची उजळणी करत करत, एक दिवस विलयाचा येतो नि जगलेल्या जीवनातील आठवणींचा सुंगध मागे दरवळत राहतो.. अशी पाखरे येती नि स्मृती ठेवूनी जाती हेच खरे असते नव्हे काय? 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 97 ⇒ प्याऊ और …… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “प्याऊ और … ।)  

? अभी अभी # 97 ⇒ प्याऊ और… ? श्री प्रदीप शर्मा  ? 

यह तब की बात है, जब मिल्टन के वॉटर कंटेनर और बिसलेरी की बॉटल का आविष्कार नहीं हुआ था, क्योंकि हमारे प्रदेश में कुएं, बावड़ी, नदी तालाब, ताल तलैया और सार्वजनिक प्याऊ की कोई कमी नहीं थी। शायद आपने भी सुना हो ;

मालव धरती गहन गंभीर,

डग डग रोटी, पग पग नीर

हम बचपन में, सरकारी स्कूल में कभी टिफिन बॉक्स और वॉटर बॉटल नहीं ले गए। कोई मध्यान्ह भोजन नहीं, बस बीच में पानी पेशाब की छुट्टी मिलती थी, जिसे बाद में इंटरवल कहा जाने लगा।

इतने बच्चे, कहां का पब्लिक टॉयलेट, मैदान की हरी घास में, किसी छायादार पेड़ की आड़ में, तो कहीं आसपास की किसी दीवार को ही निशाना बनाया जाता था। हर क्लास के बाहर, एक पानी का मटका भरा रहता था, तो कहीं कहीं, पीने के पानी की टंकी की भी व्यवस्था रहती थी। कुछ पैसे जेब खर्च के मिलते थे, चना चबैना, गोली बिस्किट से काम चल जाता था।

शहर में दानवीर सेठ साहूकारों ने कई धर्मशालाएं बनवाई और सार्वजनिक प्याऊ खुलवाई। हो सकता है, कई ने कुएं बावड़ी भी खुदवाए हों, लेकिन सार्वजनिक पेशाबघर की ओर कभी किसी का ध्यान नहीं गया। क्योंकि यह जिम्मेदारी स्थानीय प्रशासन अथवा नगर पालिका की ही रहती थी। हो सकता है, नगरपाल से ही नगर पालिका शब्द अस्तित्व में आया हो। ।

आज भी शहर में आपको कई ऐसी धर्मशालाएं और सार्वजनिक प्याऊ नजर आ जाएंगी, जिनके साथ दानवीर सेठ साहूकार का नाम जुड़ा हो, लेकिन इनमें से किसी के भी नाम पर, शहर में कोई सार्वजनिक पेशाब घर अथवा शौचालय नजर नहीं आता। इतिहास गवाह है, केवल एक व्यक्ति की इन पर निगाह गई, और परिणाम स्वच्छ भारत अभियान के तहत खुले में शौच से मुक्ति, घर घर शौचालय, और सार्वजनिक शौचालय और पेशाबघर के निर्माण ने देश का कायाकल्प ही कर दिया।

इसके पूर्व सुलभ इंटरनेशनल ने पूरे देश में सुलभ शौचालयों का जाल जरूर बिछाया, लेकिन उसमें जन चेतना का अभाव ही नज़र आया।

पानी तो एक आम आदमी कहीं भी पी लेगा, लेकिन पेशाब या तो घर में ही की जा सकती है अथवा किसी पेशाब घर में। भाषा की अपनी एक सीमा होती है, और शर्म और हया की अपनी अपनी परिभाषा होती है। कुछ लोग इसे लघुशंका कहते हैं तो कुछ को टॉयलेट लग जाती है।

मौन की भाषा सर्वश्रेष्ठ है, बस हमारी छोटी उंगली कनिष्ठा का संकेत ही काफी होता है, अभिव्यक्ति के लिए। जिन्हें अधिक अंग्रेजी आती है वे इस हेतु पी (pee) शब्द का प्रयोग करते हैं। बच्चे तो आज भी सु सु ही करते हैं। खग ही जाने खग की भाषा। ।

एक समग्र शब्द प्रसाधन सभी को अपने आपमें समेट लेता है। बोलचाल की भाषा में आज भी इन्हें पब्लिक टॉयलेट कहा जाता है, पुरुष और महिला के भेद के साथ। प्रशासन ऐप द्वारा भी आजकल आपको सूचित करने लगा है, यह सुविधा आपसे कितनी दूरी पर है।

हर समस्या का हल सुविधा से ही होता है, लेकिन कुछ आदिम प्रवृत्ति आज भी पुरुष को स्वेच्छाचारी, उन्मुक्त और उच्छृंखल बनाए रखती है। सार्वजनिक स्थान पर धूम्रपान और मल मूत्र का विसर्जन वर्जित और दंडनीय अपराध है लेकिन उद्दंडता सदैव कानून कायदे और अनुशासन का उल्लंघन ही करती आ रही है। हद तो तब होती है, जब इनके कुछ शर्मनाक कृत्य लोक लाज और मान मर्यादा की सभी हदें पार कर जाते हैं, और कुछ ऐसा कर जाते हैं, जो आम भाषा में कांड की श्रेणी में शामिल हो जाता है, कभी तेजाब कांड तो कभी पेशाब कांड ! एक जानवर कभी अपनी कौम को शर्मिंदा नहीं करता, लेकिन एक इंसान ही अक्सर इंसानियत को शर्मिंदा करते देखा गया है। हम कब सुधरेंगे। 

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “इतकं पण धावू नका…” ☆ डाॅ.धनंजय देशपांडे ☆

? विविधा ?

☆ “इतकं पण धावू नका…” ☆ डाॅ.धनंजय देशपांडे ☆

इतकं पण धावू नका…

आणि अकालीच वरती जाऊ नका !

अनेकदा आपण आपल्या कामाला झोकून देऊन इतका वेळ देत असतो की, आपल्याजवळ ‘आपल्यासाठीच’ वेळ उरत नाही. आणि मग एक दिवस असा येतो की, धाव धाव धावून आपण जे काही कमवलं, बँक बॅलन्स, फ्लॅट, गाडी…. ऐश्वर्य.. जे जे काही कमवलं ते पाहण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी आपणच जिवंत नसतो.

मित्रानो…. ही कहाणी आहे जामनगर (गुजरात) च्या अत्यंत यशस्वी अशा डॉक्टरची अचानक थांबलेली जीवनयात्रा !

आजवर १६ हजार हृदयविकार रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवनदान मिळवून दिले होते असे हे डॉ. गौरव गांधी स्वतः प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट (हृदयविकार तज्ज्ञ) होते. इतकंच नव्हे तर कमी वयात हल्ली अटॅक येत आहेत हे पाहून त्यांनी स्वतः एक मिशन सुरु करून त्याद्वारे सर्वाना जागे करत होते.

इतक्या लहान वयात १६ हजार ऑपरेशन्स त्यांनी केले म्हणजे ते रोज सुमारे सतरा ते अठरा तास काम करत असणार. तेही हृदयाचे ऑपरेशन्स म्हणजे अत्यंत नाजूक व तितकंच स्ट्रेसफुल्ल काम !

असेच एके दिवशी ते दवाखान्यात जायला निघाले अन रस्त्यातच त्यांना छातीत कळ आली आणि दवाखाण्यात पोहचेपर्यंत सगळं संपलं होतं. हजारोंचे जीव वाचवणाऱ्याचा जीव मात्र कुणालाच वाचवता आला नाही, इतका त्यांना आलेला तो अटॅक तीव्र होता.

दोन तीन कारणांसाठी मनात हळहळ दाटून येते. एक तर ४१ हे काही जायचे वयच नाही, आणि त्यातही अशा बुद्धिमान डॉक्टरचे, ज्याची समाजाला प्रचंड गरज होती. शिवाय इतरांनी गाफील राहू नये म्हणून जागे करणारे डॉ गांधी स्वतःच कसे स्वतःबद्दल गाफील राहिले ?

मला एकदम आपल्या डॉ. नितु मांडके यांची आठवण आली. तेही असेच झोकून देऊन काम करणारे हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर ! ते तर म्हणायचे की, “मला आजारी पडायला देखील वेळ नाही, इतकी ऑपरेशन्स पेंडिंग आहेत. वेटिंग लिस्ट मोठी आहे”

मात्र तेच अटॅकने तडकाफडकी गेले !

कामाचा प्रचंड ताण आणि त्यातून होणारा मानसिक ताण, आणि त्यातून मग ओघानेच येणारा अटॅक !!

खूप वाईट वाटतं अशावेळी !

अर्थात एकेकाळी ऐन चाळीशीतच असताना मलाही अटॅक आलेला. पूना हॉस्पिटल मध्ये आयसीयू मध्ये मी ऍडमिट ! मात्र डॉ. जगदीश हिरेमठ सारखा देवदूत तिथं मला लाभला अन त्यांनी मला त्या आजारातून बाहेर तर काढलेच पण त्यांनी कान टोचून जे काही सांगितलं ते मी आजवर पाळलं, त्यामुळे थेट ट्रेकिंग करू शकतोय, गडकिल्ले चढून जातोय ! नाहीतर ”चार जिने सुद्धा यापुढं चढता येणार नाहीत’ असं त्यांनी सांगितलं होतं.

थोडक्यात सांगतो, ‘वेळेत जेवण, पुरेसा आहार आणि नो जागरण’ हि त्रिसूत्री त्यांनी दिलेली. जी आजवर काटेकोर पाळतोय. कितीही अर्जंट काम असलं तरी जेवणाची वेळ कधीच चुकवत नाही, आणि झोपेचीही ! झोपताना कपभर गार दूध, सकाळी अर्धा तास चालणे, अर्धा तास योगासने किंवा व्यायाम, बास ! इतकंच पुरते !!

मनात आलं की सरळ गाडी काढून गोवा, महाबळेश्वर फिरून येतो. मनाला मस्त ठेवलं की जिंदगी पण मस्तमौला होते. चार लोक काय म्हणतील याला फाट्यावर मारा. ते मनावर घेत बसून ताण घेतला तर तुम्ही फोटोत जाऊन बसाल आणि तेच ‘चार’ लोक तुमच्या फोटोला हार घालायला येतील. त्यामुळे फोटोत जायचं नसेल तर ताण घेणे सोडा.

डॉ. डी डी क्लास : मंडळी… स्वतःला कामात इतकं पण झोकून देऊ नका, की तुम्ही कोणत्याच कामाचे राहणार नाही. किंवा मग ‘राहणारच’ नाही. स्वतःच स्वतःवर इतका अन्याय करू नका. स्वतः स्वतःला थोडासा वेळ जरूर द्या. स्वतःची काळजी घ्या ! तुम्ही फक्त तुमचे नाहीत तर समाजाचे देखील आहात. त्यांना असं वाऱ्यावर सोडून देऊन कसे चालेल ?

बिझिनेसमध्ये अप डाऊन सुरु आहे ? असू द्या. काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो !

नोकरीच्या जागी…. बॉसिंगचा त्रास आहे ? काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो !  

घरात नातेवाईकांत वादविवाद, भांडण सुरु आहे ? काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो !

विचार करा मंडळी…. वेळ अजून गेलेली नाही. सावध व्हा. काम तर केलंच पाहिजे, पण त्यात ताण निर्माण होऊ देऊ नका. कुत्रा मागे लागल्यासारखे धावू नका. शांतपणे पण दमदारपणे वाटचाल करा. मग अटॅक येणार नाही. हे नक्की ! त्यासाठी शुभेच्छा !

© डाॅ. धनंजय देशपांडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पितृदिनानिमित्त एक खास आठवण” – मूळ इंग्लिश: विवेकरंजन अग्निहोत्री ☆ मराठी रूपांतर व प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

??

☆ “पितृदिनानिमित्त एक खास आठवण” – मूळ इंग्लिश: विवेकरंजन अग्निहोत्री ☆ मराठी रूपांतर व प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

जेव्हा मी मुंबईत आलो, तेव्हा पाली हिल इथे एका अत्याधुनिक इमारतीत “सशुल्क पाहुणा” (पेईंग गेस्ट) म्हणून राहू लागलो. खरं तर माझी ऐपत नव्हती. पण मी नशिबवानच म्हणायचो, म्हणून काही हळव्या भावनेतून ही जागा मला मिळून गेली. घरमालक पती-पत्नी दोघेही वयस्कर होते आणि त्यांच्या मानाने ती जागा फारच ऐसपैस होती. त्यांना एकाकी वाटण्याचं कारण म्हणजे त्यांची मुले परदेशात होती. म्हणून त्यांना अशी मोठी भीति वाटत होती की, दोघांपैकी कुणाला काही झालं, तर त्यांना इस्पितळात कोण घेऊन जाईल?  

त्यांनी त्या सदनिकेतील एक लहानशी खोली मला भाड्याने दिली. त्या माझ्या तरूणपणाच्या काळात मी जगण्याच्या, स्थिरावण्याच्या धडपडीत होतो. जेवणाखाण्यासाठी खर्चायला फार पैसे नसायचे. मग मी लिंकिंग रोडवरील टप-या किंवा हातगाडीवर मिळणारे भेळपुरी, वडापाव असे स्वस्तातले पदार्थ आणत असे, कधी मालकांच्या मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घेत असे आणि माझ्या खोलीत बसून खात असे. 

एके दिवशी मावशींनी त्यांच्या स्वयंपाकघरात मला जेवायला बोलावलं. मग दुस-या दिवशी मी थोडी जास्तच भेळपुरी घेऊन गेलो आणि त्यांनाही खाण्याचा आग्रह केला. थोडंसं कां कूं करत त्यांनी ती खाल्ली. काका तर म्हणाले की, त्यांना वीसेक वर्षं तरी झाली असतील असं चटकमटक टपरीवरचं खाणं खाऊन ! त्यांच्या मुलांनी असं उघड्यावरचं खायला बंदी केली होती ना .

हलके हलके हा मुळी पायंडाच पडून गेला. ते दोघेही माझी घरी परतण्याची वाट पाहू लागले. मी आणत असलेल्या चटकदार खाण्यामुळे त्यांच्या आयुष्यातला आनंद वाढला होता. आता, मलाही कौटुंबिक वातावरणात असल्यासारखे वाटू लागले. मग त्यांनी माझ्याकडून वचनच घेतले की, ही गोष्ट म्हणजे आमच्यातलं गुपित राहील आणि यदाकदाचित त्यांच्या मुलांची आणि माझी गाठ पडलीच, तर हे मी त्यांना अजिबात कळू देता कामा नये. दर आठवडाअखेर नियमितपणे त्यांच्या मुलांचा चौकशीचा फोन येई, पण आमचे हे गुपित त्यांनी कधीच उघड केलं नाही.  

मग मात्र मी मुंबईतील खाऊगल्ल्यांचा धांडोळा घेऊ लागलो. लांब अंतरावरची ठिकाणे लोकलमधून, तर मैलोन् मैल चालत जाऊन मुंबईचे कानेकोपरे पालथे घालून गाजलेली खास खाऊठिकाणे शोधून काढली – क्रॉफर्ड मार्केटजवळच्या ‘गुलशन- ए-इराण’ चा खिमापाव, विलेपार्लेमधील ‘आनंद’चा डोसा, किंवा ग्रँट रोडवरच्या ‘मेरवान’चा बनमस्का आणि मावा सामोसा, किंवा शीवच्या ‘गुरूकृपा’तील छोले सामोसा, कधी स्वाती स्नॅक्समधून खिचडी, तर कधी चेंबूरच्या ‘सदगुरू पावभाजी’तील पावभाजी.

या प्रकाराने मला जगण्याचा हेतु सापडला, तर वृद्ध दांपत्याला मिळाली जगण्याची आशा.  जेवणाच्या टेबलावरच्या त्या क्षणांनी आमच्या तिघांचे एक छोटेसे घट्ट कुटुंब बनून गेले. नव्वदीच्या आसपासचे हे वृद्ध काका मला रोज काही ना काही किस्से त्या वेळी ऐकवत असत. पुढे कधी तरी एकदा मावशींशी बोलता बोलता मला कळलं की, दिवसभर ते अगदी गप्प गप्प असत, चुकूनही बोलत नसत. जेवणाच्या टेबलावरच्या या क्षणी मात्र त्यांच्यात एकदम चैतन्य संचारे.

वयोपरत्वे त्यांची तब्येत ढासळू लागली. त्यांचा विसराळूपणा वाढू लागला आणि एक दिवस विसरण्याचा कडेलोट झाला. मी त्यांचा मुलगा नाही, हे ते विसरूनच गेले. त्यांच्या वाढदिवशी, व्ही.टी. स्टेशनजवळच्या ‘पंचम पुरीवाल्या’कडून मी पु-या आणि बटाट्याची भाजी घेऊन गेलो. खूप वेळ त्यांनी स्वादाचा सुगंध घेतला आणि अचानक त्यांच्या मुलाच्या नावाने मला हाक मारली. मावशी म्हणाल्या की, त्यांचं ऑफिस ‘पंचम’जवळ असल्याने ते बरेचदा तिथे बटाटा भाजी, पुरीचं जेवण घेत असत. पण ते निवृत्त झाले, तेव्हा त्यांच्या मुलाने ‘तिथं खायचं नाही’ असं निक्षून बजावलं होतं. तासभर होऊन गेला. काकांनी मजेमजेत पुरी भाजीचा आस्वाद घेतला. मग उठले, वॉकर घेऊन सावकाश चालत त्यांच्या खोलीत गेले आणि एक खोकं घेऊन परत आले. पुन्हा एकदा त्यांनी मला त्यांच्या मुलाच्या नावाने हाक मारली आणि ते खोकं माझ्याकडे सुपूर्द केलं. म्हणाले, ” तू तुझं मुलाचं कर्तव्य बजावण्याइतका मोठा होशील, तेव्हा तुला देण्यासाठी हे राखून ठेवलं होतं. आज तू तसं वागलास. आता हे  तुझं ! “

… मी खोकं उघडलं. त्यात एक “हिरो” – शाईचे पेन होते. मग मावशींनी खुलासा केला की, त्या पेनाने त्यांनी इंजिनिअरिंगची परीक्षा दिली होती. त्यांच्या वडिलांकडून त्यांना मिळालेली ती ‘भेट’ होती.

त्या रात्री मला ‘हिरो पेन’ नव्हतं मिळालं, तर मला एक वडील मिळून गेले.  ते पेन मी जपून ठेवलं आहे. ते मलाही माझ्या मुलाकडे एक दिवस असंच सोपवायचं आहे,  जेव्हा मी म्हातारा आणि दुबळा झालेला असेन आणि माझा मुलगा मला माझं आवडतं खाणं आणून देईल ..

आपला जन्मदाता पिता एकच असतो. तरीही, आपण अनेक पित्यांचा पुत्र होऊ शकतो.

 हा पितृदिन आनंदात जावो !      

मूळ इंग्रजी लेखक – श्री. विवेक रंजन अग्निहोत्री

मराठी रूपांतर व प्रस्तुती  : सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अर्जेंटिनामधील हस्तिनापूर… – लेखक – श्री ल. ग. पटवर्धन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ अर्जेंटिनामधील हस्तिनापूर… – लेखक – श्री ल. ग. पटवर्धन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

अर्जेंटिना हा दक्षिण अमेरिकेतील एक देश, असून “ब्युनोस आयर्स” हे त्याचे राजधानीचे शहर. त्यापासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर, रम्य वनराजीमध्ये हस्तिनापूर नावाचे अर्जेंटिअन नागरिकांनी वसवलेले स्थान आहे. त्याचे क्षेत्रफळ बारा एकरांचे असून तेथे बारा हिंदू देवतांची देवळे बांधलेली आहेत. तितके अर्जेंटिअन लोक तेथे वास्तव्यास असतात.

त्यांमध्ये श्री गणेश, श्री कृष्ण, सूर्यदेव, श्री नारायण आणि शिव यांची अस्सल हिंदू पद्धतीची बारा देवळे असून, हस्तिनापूर नावाला शोभेल असे पांडवांचेही एक देऊळ आहे. हस्तिनापूर हे अक्षरश: देवांच्या राहण्यासाठीच बांधलेले स्थान वाटते. सर्वत्र स्वच्छ व आल्हाददायक वातावरण, रोजवूडची हिरवीगार झाडे, निर्मळ व शांत वातावरण. आवाज हा फक्त झाडांवरील घरट्यांत राहणार्‍या पक्षांच्या कूजनाचा ! भक्तगणांत मृदू व तालबद्ध भजनांचा आवाजही नियमित वेळी उमटत असतो. बगीच्यातील पांढर्‍या दगडांतील उभी गणेशाची मूर्ती, आपले चित्त आकृष्ट करून घेते.

देवळे अर्जेंटिअन लोकांनीच 1981चे सुमारास बांधली. ती हुबेहूब हिंदू देवळांप्रमाणे आहेत. तेथील हिंदू संप्रदायाची स्थापना ‘अल्डा अलब्रेच्ट’ (ALDA ALBRECHT) या साध्वीने केली. तिने हिंदू तत्त्वज्ञानाचा प्रसार अर्जेंटिअन लोकांमधे केला व ती त्यांची ‘गुरू’ झाली. तिने पुष्कळ लिखाण केले असून वानगीदाखल ‘हिंदू संत आणि त्यांची शिकवण’ (The Saints and Teachings of India’), ‘हिमालयातील योग्यांची शिकवण’ ही त्‍यांची पुस्‍तके होत.

‘गुस्टाव कॅनझोब्रेट’ (Gustavo Conzober) हा तिचाच शिष्य होय. सांप्रत तो हस्तिनापूर कॉलेजचा डायरेक्टर आहे. त्याला वयाच्या सतराव्या वर्षांपासून हिंदू तत्त्वज्ञानाची गोडी लागली.  ब्युनोसआयर्स येथील भारतीय वकिलातीने नोव्हेंबर 2010 मध्ये फेस्टिवल ऑफ इंडिया’चे आयोजन केले होते, त्यावेळी ‘दक्षिण भारतातील देवळांचे शिल्पशास्त्र’ या विषयावर त्याचे भाषण झाले. तो स्थानिक कंपनीचा मॅनेजर असून (चरितार्थ चालण्यापुरता) बाकी सर्व वेळ तो हस्तिनापूर संस्थेच्या कार्यास देतो. त्याला हिंदू वेद-उपनिषदे यांचे चौफेर ज्ञान असून तो ऑगस्ट 2011 मध्ये भारत भेटीवर आला होता. ती त्याची दुसरी भारतभेट होती.

देवळांची निगा राखणार्‍या आणि करणार्‍या बारा अर्जेंटिअन पुजार्‍यांव्यतिरिक्त दर आठवड्याच्या शेवटी जवजवळ शंभर तरी अर्जेंटिअन लोक निव्वळ ज्ञानप्राप्तीसाठी येतात. म्हणूनच हस्तिनापूरला ‘आध्यात्मिक ज्ञानकेंद्रा’चे स्थान प्राप्त झाले आहे. लोक तेथे तत्त्वज्ञान शिकतात, ग्रंथालयात बसून विविध पुस्तकांचे वाचन करतात. ‘योगा’चे धडे देतात, ध्यानाचे धडे गिरवतात आणि भजने म्हणतात.

देवळांच्या आवारापलीकडे गायी चरत असतात. त्या अर्जेंटिनामध्ये असूनही निर्भय वाटतात; येवढेच नव्हे तर त्या मधून मधून देवळांकडे न्याहाळून पाहत आहेत असेही भासते ! त्यांचे चित्त शांत, स्थिर व भीतीमुक्त वाटते, कारण त्यांना आपणास कोणी धरून नेऊन आपण कापले जाऊ व लोकांचे भक्ष होऊ अशी भीती नसते. हस्तिनापूरमध्ये फक्त ‘शाकाहारा’चे पालन केले जाते. तेथे कोणी ‘स्वामी’, ‘गुरू’ नसून संस्थेत ज्ञान, शांतता आणि ब्रह्मज्ञान यांचा सतत अभ्यास सुरू असतो. प्रसिद्धी पराड.गमुख असे हे लोक आहेत ! वास्तविक त्यांच्यामध्ये इंजिनीयर्स, प्रोफेसर्स आहेत, पण ते फावल्या वेळात संस्थेत येऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतात.

तेथे गौतम बुद्धाचे, कुमारी मेरीचे, डिमेटर (Demeter ) या ग्रीक देवाचे, आणि एक देऊळ ‘सर्व पंथांचे’ आहे. तेथे कोणत्याही विवक्षित धर्माचा प्रसार करण्यात येत नाही. येणार्‍या ‘भक्तांना स्वत:चा मार्ग’ निवडण्याची मुभा आहे. तेथे विविध कार्यशाळांचे, सेमिनार्सचे आयोजन करून एकांतवासाचे महत्त्व समजावले जाते. ‘गणेशचतुर्थी’ व ‘वैशाखी’ हे उत्सव साजरे केले जातात. रेडिओद्वारे येथील कार्यक्रमांचा प्रसार करण्याची योजना आहे.

हस्तिनापुरातील देवळात पुजारी (बडवे), दानाची पेटी इत्यादी गोष्टी नाहीत ! भक्त लोक येतात, मंत्रपठण करतात, भक्तिगीते गातात, ध्यान करतात. मेडिटेशन हॉल आहे. योगविद्येसाठी तीन वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स असून, दर आठवड्यातून एकदाच शिकवले जाते. तेथे अडीच हजार विद्यार्थ्यांची सोय असून, शंभर शिक्षक भारतीय तत्त्वज्ञान आणि एकशेवीस शिक्षक ‘योग’साधना शिकवतात.

‘हस्तिनापूर फाऊंडेशन’ तर्फे हिंदू तत्त्वज्ञानावर बरीच पुस्तके प्रकाशित करण्यात आली असून, भगवदगीता , योगसूत्रे , उपनिषदे, श्रीभागवत, भक्तिसूत्रे यांची भाषांतरे पण केली गेली आहेत.

अगदी अलिकडे ‘स्पॅनिश’ भाषेत ‘श्रीमहाभारता’ चे भाषांतर प्रसिद्ध झाले आहे. तीन भाग प्रसिद्ध झाले असून एकूण बारा भाग प्रसिद्ध करायचे ठरले आहे. प्रत्येक भाग अंदाजे पाचशे पृष्ठांचा असेल.

ब्युनोस आयर्स मध्ये ‘हस्तिनापूर फाऊंडेशन’ची सोळा केंद्रे असून तीन इतरत्र आहेत. खेरीज उरुग्वे, बोलिव्हिया आणि कोलंबिया येथेही केंद्रे स्थापन केली गेली आहेत. (http://en.hastinapura.org.ar ) या वेबसाईटवर आधिक माहिती उपलब्ध होऊ शकेल.

लेखक : ल. ग. पटवर्धन

पुणे 

दूरभाष – (020) 25384859,  इमेल : – [email protected]

माहिती संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी आहे आनंदी कावळा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ मी आहे आनंदी कावळा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

एका राज्यात एक कावळा असतो. नेहमी आनंदी , हसत ! कुठल्याच प्रकारचे दु:ख, कष्ट त्याच्या चेह-यावरचा आनंद हिरावून घेवू शकत नसतात. एकदा त्या राज्याच्या राजाला ही बातमी कळते .त्याला खूप आश्चर्य वाटते, हे अशक्य आहे, त्याचे मन खात्री देते. मग तो आपल्या शिपायांना त्या कावळ्याला पकडून आणण्याची आज्ञा देतो . कैदेत ठेवल्यावर कसा आनंदी राहील पठ्ठ्या ! राजा मनोमन आपल्या विचारावर खूश होतो …..  कावळ्याला कैद करून महीना लोटतो तरी तो हसतच ! 

राजा बेचैन होतो. ” प्रधानजी, त्या कावळ्याला दु:खी करण्यासाठी काय करता येईल?” 

” महाराज, आपण त्याला काट्यात टाकू या” प्रधान तत्परतेने उपाय सुचवतो.

लगेच राजाच्या आदेशाप्रमाणे शिपाई त्याला काट्यात टाकतात . तिथेही हा आपला आनंदाने शीळ घालतोय….. 

“महाराज, आपण त्याला तापलेल्या तव्यावर टाकू या” राणी दुसरा मार्ग  सुचवते.

दुस-या दिवशी त्याला तापलेल्या तव्यावर टाकले जाते ,पण कितीही चटके बसले तरी त्याच्या चेह-यावरचे हसू काही मावळत नाही….. 

“ते काही नाही महाराज, आपण त्याला उकळत्या तेलात टाकू ” सेनापती पुढची शिक्षा सुचवतात. . 

दुस-या दिवशी भल्यामोठ्या कढईत तेल उकळवून त्यात त्याला टाकले जाते. तरीही कावळा हसतोच आहे.

राजाला भयंकरच राग येतो. मग तो शेवटचा जालीम उपाय करायचे ठरवतो आणि त्या कावळ्याचे पंखच छाटून टाकतो. पंख छाटलेला कावळा क्षीण हसतो आणि कायमचे डोळे मिटतो …

— लहानपणी ही गोष्ट वाचताना खूप गंमत वाटायची. पण आता तिच्यातले मर्म काय ते कळते. आपण आनंदी आहोत , सुखी आहोत, हसत आहोत ही बाबच् नापसंत असणारे किती ‘राजे’ आपल्या अवतीभोवती असतात ना ! कधी आपले जवळचे आप्त, स्वकीय, तर कधी परकीय. तुम्हाला कोणत्या गोष्टीनी त्रास होईल, कशाने यातना होतील, दु:ख होईल ? या गोष्टींचा विचार करण्यात आपली स्वत:ची शक्ती अकारण खर्ची पाडणारे आणि त्यासाठी  विविध युक्त्या योजून त्या अमलात आणणारे  ‘ प्रधान’, ‘सेनापती’ यांची कमतरता नाही. गंमत म्हणजे या अशा योजना अंमलात आणण्यासाठी आवश्यक शिपायांची भाऊगर्दीही कमी नाही आणि अशाही सगळ्या परिस्थितीतही आपल्या चेह-यावरचे हसू टवटवीत ठेवणारे ‘आनंदी कावळे’ ही आहेतच !

वास्तविक या जगात प्रत्येकचजण सुखाच्या, आनंदाच्या मागे धावत असतो. जगण्याची ही सगळी धडपड तो एक ‘सुखी माणसाचा’ सदरा मिळवण्यासाठीच चालू असते. तरीही दुस-याचा आनंद का सहन होत नाही आपल्याला ? आनंदाची इतकी संकुचित संकल्पना घेवून जगत असतो आपण की, फक्त मला स्वत:ला मिळाला तरच तो ‘आनंद’; नाही तर नाही. त्या दुस-या व्यक्तीनेही तो क्षणिक आनंद, ते यश मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतलेले असतात, अनेक त्रास सहन केलेले असतात, दु:ख भोगलेलं असतं; तेव्हा कुठे त्याच्या वाट्याला तो आनंदाचा छोटासा ‘कवडसा’ आलेला असतो, हा विचारच आपल्या मनाला शिवत नाही. 

इतरांच्या आयुष्यातील असे अनेक छोटे छोटे कवडसे आपणही तितक्याच आनंदाने उपभोगू शकलो तर आपल्या मनाच्या अंगणभर सुखाचे ऊन सदा हसत राहील, तिथे दु:खाच्या सावलीला जागाच राहणार नाही. सगळ्या जगाचं सोडा हो, आपल्या जवळच्या माणसांच्या बाबतीत तरी हे करून बघायला काय हरकत आहे ?

कोणाचा आनंद कसा हिरावून घेता येईल याचा विचार करत बसण्यापेक्षा त्याच्यासोबत आपल्यालाही आनंदी होता येतंय का, हसता येतंय का ते पहायला काय हरकत आहे ?

सुदैवाने भेटलाच एखादा ‘आनंदी कावळा’ तर त्याच्यासोबत चार मुक्त गिरक्या घेऊन बघूया आकाशात.. 

त्याचे पंख छाटून त्याला संपवण्यापेक्षा आपल्या हृदयाच्या खोल खोल कप्प्यात त्याला कायमचा जपून ठेवू या !

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “नावात काय आहे?…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “नावात काय आहे?…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

हे वाक्य कोणाचं या बद्दल मी बोलणार नाही. पण आपल्याकडे नावातच सगळं काही आहे. मग त्या नावाचा संबंध कुठेही आणि कसाही असो. अगदी व्यक्ती, वस्तू, प्राणी, अन्न काहीही.

घरात मुल जन्माला आलं की पहिला आणि त्यातल्यात्यात मोठा सोहळा हा नांव ठेवण्याचाच असतो. मग नंतर भलेही घरातले लाडाने त्याला सोन्या, बाळा, छोट्या म्हणत असतील. किंवा वयस्कर त्याला तु रमेशचा का? तु प्रकाशचा का? असं विचारात असतील. पण नंतर तुझं नांव काय? असंच विचारतात.

पीटरसन, सॅमसन असं वडीलांच्या नावावरुनच मुलांचं नांव ठेवण्याची रीत काही ठिकाणी असेल. आपल्याकडे मात्र तसं नाही.

नांव ठेवण्याबद्दल आपला हात आणि काही वेळा तोंड कोणी धरणार नाही. आपल्याकडे मुलांच नांव ठेवण्याचा कार्यक्रम होतोच. पण काही कार्यक्रमांना नांवं ठेवायला सुद्धा आपण मागे नसतो. भलेही मागून म्हणजे कार्यक्रम झाल्यावर नावं ठेवत असलो तरी नांवं ठेवतांना मात्र मागे नसतो‌.

लग्नात सुध्दा नवरीमुलीचे नांव बदलण्याची पद्धत काही प्रमाणात आहे. यावेळी नांव काय ठेवलं हे कौतुकाने विचारतातच, पण ते घेण्याचा आग्रह देखील होतो. नांव ठेऊन नांव घेण्याची, किंवा नांव घेउन नावं ठेवण्याची सुरुवात इथूनच होत असावी. ठिक आहे आपल्याला आत्ता त्याबद्दल नांव ठेवायचं नाही.

मुलांचीच काय…… आपल्या कडच्या पाळीव प्राण्यांना सुद्धा आपण ठेवलेलं नांव असतं. मग कुत्रा, बैल, गाय, घोडा, मांजर, पोपट यांचा टायगर, सर्जा, कपीला, चेतक असं होतं. आणि त्या ठेवलेल्या नावानेच त्यांना प्रेमाने हाक मारली जाते.

तसच आजुबाजूच्या काही जणांना त्यांच्या दिसण्यावरुन, वागण्यावरून, राहण्यावरुन सुध्दा नावं ठेवतो‌‌. पण बऱ्याचदा अशी आपण ठेवलेली नांव प्राण्यांचीच असतात. म्हैस, पाल, बोकड, मांजर, गाढव इ…. या सारख्या नावांनी आपण त्यांचा प्रेमळपणे उल्लेख करतो. जाड्या, बारक्या, काळ्या अशी सुध्दा काही नावं आपण ठेवतो. म्हणजे प्राण्यांची चांगल्या नांवाने आणि माणसांची प्राण्यांच्या नांवाने ओळख आपल्याकडेच असावी.

एकाच देवाला अनेक नांवं आपल्याकडेच असतील. सुर्य, गणपती, विष्णू, हनुमान या सारख्या अनेक देवांना अनेक नावं आहेत. देव कशाला… झाड, तरु, वृक्ष… फुलं, सुमन… जल, पाणी. आभाळ, गगन, आकाश, नभ….. अशी एकाच गोष्टीला अनेक नावं असणारी अनेक उदाहरणं आहेत.

लहानपणी तर समानअर्थी शब्द लिहा…… असा प्रश्न सुद्धा परिक्षेत असायचा.

आपल्या नावामुळे त्या क्षेत्राचं आणि देशाचं नांव मोठं करणाऱ्यांची संख्या आपल्याकडे इतकी आहे की सांगतासुध्दा येणार नाही. आणि अशी असंख्य नांवं प्रत्येक क्षेत्रात आहेत. यात व्यक्ती, वस्तू, निसर्ग, वनौषधी, स्थळ या सगळ्यांचा हातभार आहे. पण ओळखले जातात सगळे नावानेच‌‌.

नावाचा प्रभाव आपल्या कडे इतका आहे की आजही काही ठिकाणी काही काम करुन घ्यायचे असेल तर आपण कोणाच्या तरी नावाचा आधार घेतोच.

पण… अरे तो कोपऱ्यावर पानवाला आहे ना…… त्याला माझं नांव सांग तो बरोबर माझं पान देईल……… इतका विश्वास नावात असतो..

ठेवलेलं नांव उच्चारतांना झालेली चूक आपल्याकडे काही वेळा चालते. जसं प्रवीण ला परवीन, प्रमोद ला परमोद, लक्ष्मी ला लक्शमी अशी हाक मारणारे सापडतील. पण कागदोपत्री नावाची अशी चूक चालत नाही. पण तरीही नावाच्या बाबतीत काही वेळा तशी चूक  होतेच. आणि नांवातली चूक बदलण्यासाठी खटाटोप करावा लागतो. शुद्ध नावाच्या बाबतीत असलेला हा अशुद्ध पणा सुध्दा आपल्याकडेच असेल.

राजकारणात तर नावाचं महत्त्व विचारु नका. नांव आहे म्हणून गोंधळ, नांव नाही म्हणून नाराजी, नांव बदललं तर विरोध, नावात बदल करण्यासाठी गदारोळ. काही नांव तर फक्त घराण्यामुळे ओळखली जातात. तर काही नावामुळे घराण्याचा मोठेपणा आजही शाबूत आहे. हे सगळं फक्त नावामुळेच होतं.

देश आणि त्यातले भाग यांना नांव बहुतेक सगळ्याच ठिकाणी असतील. पण आपल्याकडे खाद्यपदार्थ सुद्धा भागानुसार ओळखले जातात. जसं पंजाबी डिश, गुजराती थाळी, महाराष्ट्रीयन जेवण, साऊथ इंडियन डिश आणि हे सगळीकडे मिळतात. आज असंख्य पदार्थ नावामुळेच ओळखले, मागवले, आणि खाल्ले जातात. फक्त पदार्थांच्या नावामुळेच बऱ्याच ठिकाणी मेनू कार्ड गरजेपेक्षा जास्त मोठी, लांबलचक वाटतात. या बाबतीत आपण आपल्या सीमा खूप वाढवल्या आहेत. म्हणजे आज छोट्या छोट्या गावात सुद्धा चायनीज सहज मिळतं.

फक्त रोटी या नावाखाली पाच सहा प्रकार, डोसा या नावाखाली पंधरा विविध प्रकारचे डोसे मेनू कार्ड वर पाहिले आहेत. तांदूळ, गहू, आंबा यात चिनोर, कोलम, बासमती, चंदूसी, लोकवन, हापूस, लंगडा, केशर, बदाम अशी अनेक नांवं आहेत.

आंबा यात केशर, बदाम हा प्रकार आहे. पण केशर आणि बदाम यात आंबा हा प्रकार नाही.

जसं खाण्याच आहे तसंच कपड्यांच, वस्तूंचं, दागिन्यांच सुद्धा आहे. पंजाबी ड्रेस, गुजराती साडी, जोधपुरी, पुणेरी पगडी, कोल्हापुरी फेटा, साज, चप्पल.

असं किती आणि काय काय सांगणार. आणि हे सगळे प्रकार नावावरुच ओळखले जातात.

आजही नावावरुन भविष्य सांगणारे, आणि भविष्यात आपले नांव उज्वल करणारे अनेक जण आहेत, आणि होतील.

देशापासून वेशा पर्यंत, खाण्यापासून नटण्यापर्यंत, आणि वस्तू पासून व्यक्ती पर्यंत नावातच खूप काही आहे.

हे तर फक्त नावाचेच आहे. आडनावाचा भाग अजून वेगळाच आहे. पण त्याच्या आड बऱ्याच गोष्टी येत असल्याने त्याचे नाव आत्ता नको………

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares