मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ टाईम पास… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ टाईम पास… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

जोशीकाका पुणे महानगरपालिकेतून निवृत्त झाले त्याला चार पाच वर्षे होऊन गेली होती. काकांना ना चित्रपटांची आवड ना टीव्हीवरच्या मालिकांची. त्यामुळे निवृत्तीनंतर ते टाईमपास कसा करतात हा त्यांच्या मित्राला पडलेला यक्षप्रश्न.

“जोशा, लेका तुला ना काही छंद , ना वाचनाची आवड, ना अध्यात्माची. रिटायर झाल्यावर टाईमपास तरी कसा करतोस तू ?”

जोशी काकांना आपल्या मित्राच्या भोचकपणाची आणि नसत्या चौकशा करण्याच्या वृत्तीची चांगली कल्पना होती. त्याच्या डोक्यात एकदा हा कीडा वळवळला आहे म्हणजे त्या शंकेचं निरसन होईस्तोवर तो आपल्याला काही सुखाने जगू देणार नाही हेही त्यांना ठाऊक होतं. 

“तुला कालचीच गोष्ट सांगतो,” काकांनी शंकासमाधानाला सुरुवात केली. “मी आणि बायको गेलो होतो पु ना गाडगीळमध्ये. पाचच मिनिटे दुकानात डोकावलो. बाहेर येऊन बघतो, तर दुकानासमोर पार्क केलेल्या गाडीशी ट्रॅफिक पोलीस येऊन ऊभा – हातात पावतीपुस्तक. आम्ही दोघेही कावरेबावरे होत त्याच्याकडे गेलो आणि अजीजीने त्याला सांगू लागलो – “बाबा रे, मोजून पाचच मिनिटे गेलो होतो रे. एक वेळ सोडून दे.” 

तशी तो म्हणू लागला, “सगळेजण दर वेळी असंच म्हणतात. आपली चूक कबूल कोणीच करत नाही. हजार रुपयांची पावती फाडावी लागेल. एकदा पावती फाडली म्हणजे पुढच्या वेळी चूक होणार नाही.”

“तसे नाही, आमची चूक समजली आम्हाला. पुन्हा नाही होणार असं. आणि हजार रुपये म्हणजे फार होतात हो. आम्ही निवृत्त कर्मचारी आहोत हो. आमच्या पांढऱ्या केसांकडे तरी बघा.”

“लाखांच्या गाड्या फिरवता, पु ना गाडगीळमध्ये खरेद्या करता,  कायदा मोडता आणि तुम्हाला हजार रुपये जड होतात होय ? बरं चला, तुम्ही वयस्कर आहात, म्हणून तुमच्याकडून फक्त दोनशे रुपये घेतो आणि देतो सोडून तुम्हाला या वेळी.”

” ‘त्या दोनशे रुपयांची पावती मिळेल ना ?’ माझा निरागस प्रश्न” – जोशी काका सांगत होते. तशी वस्सकन अंगावरच आला तो हवालदार. 

“ओ, पावती हवी असेल तर हजारचीच होईल हो. दोनशेची काही पावती बिवती मिळणार नाही.”

“असं कसं ? पैसे दिल्यावर पावती नको ? सगळं कसं नियमानुसार व्हायला नको का ?  सरळ सांग ना, तुला लाच खायची आहे म्हणून.”

माझ्या या बोलण्याने तो एकदम भडकलाच. आणि मग माझंच वाक्य धरून बसला. 

“अस्सं म्हणताय काय ? सगळं नियमानुसार व्हायला पाहिजेल काय ? मग होऊनच जाऊ दे. मी म्हटलं म्हातारी माणसं आहेत, जरा सबुरीने घेऊ, तर तुम्ही मलाच अक्कल आणि कायदे शिकवताय ! चला, सगळे नियमच काढतो तुमचे आता.” हवालदाराने रौद्र रूप धारण केले.

… आणि मग तो हात धुऊन गाडीच्या मागे लागला. एक आरसाच तुटलेला आहे, मागची नंबर प्लेटच नीट नाहीये, PUC संपलेलं आहे – तीन चार हजार रुपयांपर्यंत मामला गेला.

हे फारच वाढतंय म्हटल्यावर मी बायकोला म्हटलं – “ तू सांगून बघ, तुझं ऐकतोय का तो ते.”

ती त्याला म्हणाली, “अरे बाळा, तू असं रागावू नकोस. हे काय बोलले ते मनाला लावून घेऊ नकोस. सोडून दे. त्यांच्याकडे लक्ष नको देऊस तू. हे घे दोनशे रुपये.”

पण आता तो हवालदार काही ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. 

“नको मला तुमचे ते दोनशे रुपये. आता पावतीच फाडणार मी.”

मग पुढे पाच दहा मिनिटे हे असंच चाललं, ती त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती आणि दुखावला गेलेला तो, पावत्या फाडल्याशिवाय थांबणार नव्हता.” जोशी काका सांगत होते.

“अरे बाप रे ! दोनशे रुपये वाचवायला गेलास आणि हे भलतंच होऊन बसलं. मग काय केलं काय तुम्ही शेवटी ?” – मित्राची पृच्छा.

“मग काही नाही, आमची बस आली, आम्ही त्यात चढलो आणि घरी आलो.” 

“आं ? मग गाडी ? तिच्या पावत्या ? दंड ? आणि तो हवालदार ?” मित्राला काहीच उमगेना.

“काय संबंध ? ती गाडी आमची नव्हतीच रे. आम्ही तर बसने आलेलो.…. तू मला विचारलंस – मी टाईमपास कसा करतो, ते मी तुला सांगत होतो. आणि आम्ही बसमध्ये चढलो तेव्हा त्या हवालदाराच्या तोंडावरचे भाव मात्र पहाण्यासारखे होते – आत्ता तुझ्या चेहऱ्यावर आहेत ना, तसेच होते अगदी !”

— जोशी काका निर्विकारपणे म्हणाले आणि आणखी टाईमपास करायला नवीन गिऱ्हाईक शोधू लागले.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इस्रोची “आदित्य एल -१” मोहीम – भाग-२ ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ इस्रोची “आदित्य एल -१” मोहीम – भाग-२ ☆ श्री राजीव गजानन पुजारी

७. आदित्य एल-१ वरील वैज्ञानिक अभिभार

सूर्याचा सांगोपांग अभ्यास करण्यासाठी या मोहिमेत सात अभिभारांच्या संचाचा समावेश करण्यात आला आहे.

अ )दृश्यमान उत्सर्जन रेषा किरिटालेख (Visible Emission Line Coronagraph- VELC) हा अभिभार प्रभामंडल आणि प्रभामंडलामधील वस्तूमान उत्सर्जनाच्या (Coronal Mass Ejection- CME) गतीशीलतेचा अभ्यास करणार आहे.

ब ) सौर अतिनील प्रतिमाग्राहक दुर्बीण ( Solar Ultra-violet Imaging Telescope – SUIT)

हा अभिभार निकट अतिनील (near infra-red) वर्णपटात सूर्याच्या दीप्तीमंडल (photosphere) व वर्णमंडल (chromosphere) यांच्या प्रतिमा घेईल व निकट अतिनील वर्णपटातच सौर विकिरणाच्या  (solar irradiance)  फेरबदलांची मोजणी करेल.

क,ड ) आदित्य सौरवारे कण प्रयोग (Aditya Solar-wind Particle Experiment- ASPEX) आणि आदित्यसाठीचा प्लाविका विश्लेषक संच (Plasma Analyser Packge for Aditya- PAPA)

हे अभिभार सौर वारे व ऊर्जावान आयन्स (energetic ions) व त्यांचे वितरण (distribution) यांचा अभ्यास करतील.

इ, फ ) सौर निम्न ऊर्जा क्ष किरण वर्णपटमापक (Solar Low Energy X-ray Spectrometer – SoLEXS) आणि उच्च ऊर्जा एल-१ परिभ्रमणीय क्ष-किरण वर्णपटमापक (High Energy L1 Orbiting X-ray Spectroscope अर्थात HEL1OS)

हे अभिभार सूर्यापासून निघणाऱ्या क्ष किरणांच्या उद्रेकांचा विस्तृत क्ष-किरण ऊर्जा श्रेणीत अभ्यास करतील.

ग ) चुंबकीयक्षेत्रमापक (Magnetometer)

 हा अभिभार L-१ बिंदूच्या ठिकाणी अंतर्ग्रहीय चुंबकीय क्षेत्र मोजेल.

आदित्य एल – १ वरील सर्व अभिभार संपूर्णपणे स्वदेशी असून ते देशभरातील विविध प्रयोगशाळांद्वारा विकसित केले गेले आहेत. बेंगलोर स्थित भारतीय खगोल भौतिकी संस्थेने VELC उपकरण विकसित केले आहे. पुणे स्थित आंतर विद्यापीठ खागोलशास्त्र व खगोल भौतिकी केंद्राने SUIT हे उपकरण विकसित केले आहे. अहमदाबाद स्थित भौतिक संशोधन प्रयोगशाळेने ASPEX हे उपकरण विकसित केले आहे. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, तिरुअनंतपुरमच्या अंतराळ भौतिकी प्रयोगशाळेने PAPA हा अभिभार विकसित केला आहे. बेंगलोर स्थित यू. आर. राव उपग्रह केंद्राने SoLEXS व HEL1OS हे अभिभार विकसित केले आहेत. तर बेंगलोर स्थित इलेक्ट्रो ऑप्टिक्स प्रणाली प्रयोगशाळेने Magnetometer हा अभिभार विकसित केला आहे. हे सर्व अभिभार इस्रोच्या विविध केंद्राच्या निकट सहकार्याने विकसित करण्यात आले आहेत.

लॅगरेंज बिंदू – 

दोन पिंडांच्या गुरुत्वाकर्षणीय प्रणालीसाठी लॅगरेंजबिंदू असे बिंदू आहेत जेथे एखादी लहान वस्तू ठेवल्यास ती तेथे स्थिर राहते. दोन पिंडांच्या प्रणालीसाठी, जसे की सूर्य व पृथ्वी, अंतराळातील हे बिंदू अंतराळयानाद्वारा कमीत कमी इंधन वापरून ते स्थिर ठेवण्यासाठी वापरले जाऊ शकतात. तांत्रिकदृष्ट्या लॅगरेंज बिंदूला दोन मोठ्या वस्तूंमधील गुरुत्वाकर्षणीय बल हे लहान वस्तूला त्यांच्याबरोबर जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अपकेंद्रीय बलाशी तुल्यबळ असते. द्विपिंड गुरुत्वाकर्षणीय प्रणालीसाठी एकंदर पाच लॅगरेंज बिंदू असतात व ते एल १, एल २,एल ३, एल ४, एल ५ असे ओळखले जातात. एल १ हा लॅगरेंज बिंदू सूर्य पृथ्वी यांच्यामध्ये, त्यांना जोडणाऱ्या रेषेवर असतो व त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर सूर्य व पृथ्वी यांच्यामधील अंतराच्या एक टक्का एवढे असते. 

९.आदित्य एल-१ चे प्रक्षेपण व त्याचे एल-१ पर्यंतचे मार्गक्रमण :

इस्त्रोद्वारा आदित्य एल -१ मोहिमेचे प्रक्षेपण पीएसएलव्ही प्रक्षेपका द्वारा सतीश धवन अंतरिक्ष केंद्र -शार (SDSC-SHAR) श्रीहरीकोटा येथून ऑगस्ट २०२३ मध्ये केले जाईल. सुरुवातीला अंतराळयान पृथ्वी समीप कक्षेमध्ये (Low Earth Orbit-LEO) स्थित केले जाईल. नंतर कक्षा जास्त लंबवर्तुळाकार (elliptical) केली जाईल. त्यानंतर यानावर असणाऱ्या प्रणोदन प्रणालीचा (propulsion system) उपयोग करून त्याला एल-१ कडे प्रक्षेपत केले जाईल. जसजसे यान एल -१ कडे जात जाईल तसतसे ते पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षेत्राच्या प्रभावातून (Gravitational Sphere Of Influence) बाहेर पडेल. गुरुत्वीय क्षेत्राच्या प्रभावा बाहेर पडल्यावर पर्यटन टप्पा (cruse stage) सुरू होईल व सरते शेवटी यान एल-१ भोवतालच्या मोठ्या आभासी कक्षेत अंत:क्षेपित केले जाईल प्रक्षेपणापासून ते एल-१ मध्ये अंत:क्षेपित केला जाण्याचा काळ हा चार महिन्यांचा असेल.

१०)अंतराळातून सूर्याचा अभ्यास का करायचा? 

सूर्य विविध तरंग लहरींमध्ये प्रकाश उत्सर्जित करीत असतो. त्याबरोबरच तो अनेक ऊर्जा भरीत कण व चुंबकीय क्षेत्र यांचेही उत्सर्जन करीत असतो. पृथ्वी भोवतालचे वातावरण त्याचप्रमाणे तिचे चुंबकीय क्षेत्र सूर्यापासून उत्सर्जित झालेल्या हानिकारक लांबींच्या तरंग लहरी, सौरकण व सौरचुंबकीय क्षेत्र यांसाठी ढाल म्हणून काम करतात. सूर्यापासून निघणारी प्रारणे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे पृथ्वीवरील उपकरणांद्वारे त्या प्रारणांचा शोध घेता येणार नाही आणि या प्रारणांच्या मदतीने केला जाणारा सूर्याचा अभ्यास करता येणार नाही. परंतु पृथ्वीपासून दूर म्हणजे अंतराळातून निरीक्षण करून या प्रारणांच्या मदतीने सूर्याचा अभ्यास करता येतो. त्याचप्रमाणे सौरवाऱ्याचे कण आणि सूर्यापासून प्रसारित होणारे चुंबकीय क्षेत्र आंतर्ग्रहीय अवकाशातून प्रसारित होताना त्याचे मोजमाप करण्यासाठी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होणार नाही अशा जागेची आवश्यकता भासते. यासाठी सूर्याचा अभ्यास अंतराळातून करणे श्रेयस्कर असते.

११)आदित्य एल-१ मोहीम सूर्याचा अभ्यास करण्यासाठीची परिपूर्ण मोहीम आहे का?

या प्रश्नाचे स्वाभाविक उत्तर ‘नाही’ असेच आहे. हे उत्तर फक्त आदित्य एल-१ साठीच खरे नाही तर इतर कोणत्याही अंतराळ मोहिमेसाठी ते तितकेच खरे आहे. याचे कारण अवकाशात वैज्ञानिक अभिभार वाहून नेणाऱ्या यानाला वस्तुमान, ऊर्जा व आकारमान यांच्या मर्यादा असतात. त्यामुळे यानावर मर्यादित क्षमतेच्या मर्यादित उपकरणांचा संच पाठवता येतो. आदित्य एल-१ च्या बाबतीत सर्व निरीक्षणे लॅगरेंज बिंदू एल-१ या ठिकाणाहूनच केली जाणार आहेत. उदाहरणार्थ सूर्यापासून निघणारी प्रारणे, चुंबकीय क्षेत्र, सौरवारे आदि गोष्टी बहुदैशीक असतात.  त्यामुळे यांपासून सर्व बाजूंनी वितरित होणाऱ्या ऊर्जेचे मोजमाप आदित्य एल-१ द्वारा करता येणार नाही.  आणखी एक लॅगरेंज बिंदू जो एल-५ म्हणून ओळखला जातो तो पृथ्वीकडे येणाऱ्या  प्रभामंडलीय वस्तुमान उत्सर्जन आणि अंतरिक्ष वातावरणाच्या अभ्यासासाठी सुयोग्य बिंदू आहे. तसेच सूर्याच्या ध्रुवबिंदूंचा अभ्यास आपल्या तंत्रज्ञानातील मर्यादांमुळे म्हणावा तेवढा झालेला नाही. सूर्याच्या ध्रुव प्रदेशातील गतिशीलता व चुंबकीय क्षेत्र हे सौरघटनाचक्रे निर्माण होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात असे मानले जाते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्याच्या अंतरंगात व त्याच्याभोवती घडणाऱ्या विविध घटनांचा अभ्यास करण्यासाठी विविध तरंगलांबींमध्ये बाहेर पडणाऱ्या सौर प्रारणांच्या ध्रुवीकरणांची निरीक्षणे करणे आवश्यक आहे, जे आदित्य एल-१ करू शकणार नाही.

– समाप्त – 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पक्ष्यांपासून शिकण्यासारखे… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

📖 वाचताना वेचलेले 📖

🦜 पक्ष्यांपासून शिकण्यासारखे…🦜 ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

(पक्षी आणि मानव यांच्यातील महत्वाचे विषय आणि फरक ???) 

  १. पक्षी रात्री काही खात नाहीत.

  २. रात्री फिरत नाहीत

  ३. आपल्या पिलांना स्वतः  ट्रेनिंग देतात, 

             दुसऱ्या ठिकाणी पाठवत नाहीत. 

 ४. हावरटासारखे  ठोसून कधी खात नाहीत.

             तुम्ही त्यांच्यापुढे मूठभर दाणे टाका,

             ते थोडे खाऊन उडून जातात 

             बरोबर घेऊन जात नाहीत …

 ५. अंधार पडल्यावर झोपून जातात,

             आणि पहाटेच उठून, गाणी  गात उठतात.

  ६. ते आपला आहार कधीही बदलत नाहीत.

  ७.आपल्या प्रजातीतच सोबती निवडतात ( एकत्र राहतात )

              बदक आणि हंसाची जोडी कधी होत नाही. 

  ८.आपल्या शरीराकडून सतत काम करवून घेतात, 

             स्वतःला ऍक्टिव्ह ठेवतात,

             रात्रीशिवाय विश्रांती करत नाहीत.

  ९.आजारी पडले तर काही खात नाहीत, 

             बरे झाल्यावरच खातात.

   १०. आपल्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात व काळजी घेतात.

   ११. आपापसात मिळून मिसळून राहतात.

              अन्नावरून भांडणे झाली, तरी परत एकत्र येतात.

   १२. निसर्ग नियमांचे न कुरकुरता शांतपणे पालन करतात.

   १३. आपलं घर इको फ्रेंडलीच बनवतात.

   १४. मुलं स्वतःच्या कष्टाने पोटभरण्याइतके झाले की 

               त्यांच्या जीवनात हस्तक्षेप करीत नाहीत.

…… खरोखर त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे की नाही..??!! 

       त्यांच्या या सवयी अंगिकरून आपल्याला आपलं जीवन पण सुखी व निरोगी ठेवता येईल…

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 42 – देश-परदेश – सेवानिवृत्ति: सुविधाएं ☆ श्री राकेश कुमार ☆

श्री राकेश कुमार

(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ  की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” ज प्रस्तुत है आलेख की शृंखला – “देश -परदेश ” की अगली कड़ी।)

☆ आलेख # 42 ☆ देश-परदेश – सेवानिवृत्ति: सुविधाएं ☆ श्री राकेश कुमार ☆

गुलाबी नगर (जयपुर) के गुलाब बाग (Rose Garden) में गुलाबी मौसम की शाम हमेशा की तरफ सेवानिवृत्त हो चुके हमारे जैसे फुरसतिये किसी भी विषय को लेकर यदा कदा अदरक वाली चाय की चुस्कियों पर चर्चा कर ही लेते हैं।

कल का विषय सेवानिवृत्त हो चुके व्यक्तियों को उनकी संस्था द्वारा उपलब्ध कराए जानी वाली सुविधाओं पर केंद्रित था। चूंकि विषय का चयन हमारे द्वारा हुआ था, तो चर्चा का आग़ाज़ भी हमें करना पड़ा। वैसे पंजाबी भाषा में भी एक कहावत है कि “जेड़ा बोले वो ही दरवाज़ा खोले” अर्थात जब घर के द्वार पर दस्तक होने के समय जो सबसे पहले बोलेगा उसी को उठ कर आगंतुक के लिए द्वार खोलना होगा।

बैंक कर्मी की कलम/ कंप्यूटर हमेशा करोड़ों पर चलती हैं। जीवन के करीब करीब चार दशक ब्याज देन/लेन करते रहने के कारण बैंक कर्मी को सामान्य ब्याज दर से एक प्रतिशत अतिरिक्त ब्याज मिलता है। बैंक के अतिथि ग्रह और अवकाश ग्रह में उपलब्ध होने की स्थिति में कुछ दिन रहने की सुविधा भी मिल जाती है।

वहां बैठे हुए अन्य संस्थाओं से सेवा निवृत्त मित्र मज़ाक में बोले बस इतना सा में ही प्रसन्न रहते हो। एक सुरक्षा प्रहरी ने सैन्य हॉस्पिटल और कैंटीन की सुविधा का वर्णन किया, हालांकि सस्ती दर पर मदिरा की सुविधा को उन्होंने खुले आम उजागर नहीं किया,परंतु सर्वज्ञात है।

एयर इंडिया से सेवानिवृत्त मित्र बोले उनके स्वयं, पत्नी के अलावा भी पिता और माता के साथ-साथ सभी भाई और बहनों को भी किसी एक स्थान जिसमें विदेश भी शामिल है कि मुफ्त हवाई यात्रा सुविधा मिलती है। रेलवे से सेवानिवृत्त मित्र ने भी मुफ्त रेल यात्रा सुविधा का जिक्र किया।

उच्च न्यायालय में न्यायाधीश से सेवानिवृत्त साथी बोले उनको नगर से बाहर आने जाने के समय स्टेशन/ विमान तल तक निशुल्क कार की व्यवस्था उपलब्ध करवाई जाती हैं।

दिन छोटे होने के कारण,शाम अब जल्दी ढल जाती है, इसलिए चर्चा को भी विराम दे दिया गया। आप की जानकारी में यदि किसी अन्य विभाग द्वारा दी जाने वाली सुविधाओं की जानकारी हो अवश्य साझा करें।

© श्री राकेश कुमार

संपर्क – B 508 शिवज्ञान एनक्लेव, निर्माण नगर AB ब्लॉक, जयपुर-302 019 (राजस्थान) 

मोबाईल 9920832096

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झाडपण… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ झाडपण… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

जिवे मारणार्‍याला फाशी, झाड उखडणार्‍याला दंड असे कायदे आले.

कोणी म्हणे बरे झाले ; हत्येचे प्रमाण कमी झाले.

पण हाऽऽय!!

लोक अती शहाणे झाले आणि हाफ मर्डरचे प्रमाण वाढले.

मग काय? कायद्यात राहून माणूस माणसाचा एक प्रकारे बळीच घेऊ लागला.

तोच नियम त्याने झाडालाही लावला. रस्ता रुंदीकरण, अतिरिक्त बांधकाम, क्षेत्राचा विकास या नावाखाली मोठमोठी झाडे भुंडी करून टाकली तर काही उखडूनच टाकली.

झाडांनाही जीव असतो हे माहित असूनही का एवढी क्रूरता?

प्राणवायू दात्याचे प्राण हरण केले म्हणून फक्त काही पैशांचा दंड एवढीच शिक्षा?

मुके झाड•••• बोलता येत नसले तरी कृती करणे सोडत नाही.

झाडाला भुंडे केले तरी संकटांवर मात करण्याची शिकवण ते देत रहाते.

पाऊस पडला की जीव जगवते. पालवी फुटून चैतन्य जागवते आणि शक्य असेल तर फळा फुलांनी याच माणसाचे मन पोटही भरते••••

आता तरी जागे व्हायला पाहिजे. या उपयुक्त झाडांची कत्तल थांबवायला पाहिजे.

मरणासन्न झाड झाले

तरी दातृत्व त्याचे न मेले

शिकवण घे रे माणसा तू

पाहिजेस तुझ्यात झाडपण जपले

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुहास्य तुझे मनास मोही… भाग -2 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

?मनमंजुषेतून ?

☆ सुहास्य तुझे मनास मोही… भाग -2 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

(— म्हणून ‘एखादी तरी स्मितरेषा…’ असे म्हणावे लागते.) इथून पुढे —-

पण आपण जर खळखळून हसलो तर त्याचे अनेक फायदे होतात. चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळून चेहरा प्रसन्न दिसतो. हृदय, फुफ्फुसानाही अधिक प्राणवायू मिळतो, व्यायाम होतो. असं म्हणतात की चालणाऱ्याचं नशीब चालतं, बसणाऱ्याचं नशीब बसून राहतं. त्याच धर्तीवर हसणाऱ्याचं नशीबही हसतं, रडणाऱ्याचं नशीबही रडतं असं म्हणायला हरकत नाही. हसतमुख असणारी माणसं संकटांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतात. 

नॉर्मन कझिन्स या नावाचा एक पत्रकार होता. तो एका दुर्धर आजाराने बिछान्याला खिळून होता. रुग्णालयात त्याच्यावर अनेक प्रकारचे उपचार सुरु होते. अनेक प्रकारची वेदनाशामक औषधें घ्यावी लागत होती. त्याशिवाय त्याला झोप लागत नव्हती. एक दिवस त्याने चार्ली चॅप्लिनचा चित्रपट बघितला. तो खळखळून हसला. त्याला असे आढळून आले की त्या दिवशी त्याला वेदनाशामक औषधांशिवाय झोप लागली. मग त्याने विनोदी साहित्य वाचायला सुरुवात केली. औषधोपचारांच्या जोडीला रोज तो खळखळून हसू लागला आणि काय आश्चर्य ! काही दिवसांनी तो पूर्ववत बरा झाला. त्याची वेदनाशामक औषधे थांबली. तो पूर्ववत सगळी कामे करू लागला. आपल्या अनाटॉमी ऑफ इलनेस या पुस्तकात त्याने ही सगळी माहिती लिहून ठेवली आहे. त्याला असे आढळून आले की आपण जेव्हा हसतो तेव्हा आपल्या शरीरात एन्डॉर्फिन नावाचा एक स्त्राव स्त्रवतो. हे एन्डॉर्फिन वेदना शांत करण्याचे कार्य करते. मनाची मरगळ दूर करते आणि आपल्याला ताजेतवाने वाटते. खळखळून हसण्याने रक्तदाब आणि रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. शरीरातील अँटीबॉडीजचे प्रमाण वाढते. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ सिगमंड फ्राईड यांनीही हसण्याचे फायदे सांगताना हसण्यामुळे मनातील राग, द्वेष, ताण तणाव यासारख्या नकारात्मक भावना नष्ट होतात असे म्हटले आहे. हसण्याबद्दल लिहिताना नॉर्मन कझिन्स म्हणतो, ‘ हसणं हे एखाद्या ब्लॉकिंग एजंटसारखं आहे. ते जणू बुलेटप्रूफ जाकीट आहे. नकारात्मक भावनांपासून ते तुमचं रक्षण करतं. ‘ 

विनोदी चित्रपट, विनोदी नाटके यांना लोकांची कायमच पसंती असते ती यामुळेच. तास दोन तास खळखळून हसल्याने मनातली मरगळ निघून जाते, नकारात्मक भावनांचा निचरा होतॊ आणि आपल्याला प्रसन्न वाटू लागते. पु ल देशपांडे, आचार्य अत्रे, मार्क ट्वेन यांच्यासारख्या लेखकांचे विनोदी साहित्य म्हणजे अक्षय आनंदाचा ठेवा आहे. मधुकर तोरडमल हे विलक्षण ताकदीचे कलाकार होते. त्यांच्या ‘ तरुण तुर्क म्हातारे अर्क ‘ या नाटकातील ‘ ह हा हि ही ‘ ची बाराखडी कमालीची मजा आणते. त्यातून वेगळा विनोद, वेगळा अर्थ निर्माण होतो. प्रत्यक्ष जीवनातही आपल्याला या ‘ ह ‘ च्या बाराखडीचा वापर करणारे पुष्कळ लोक भेटतात. त्यांचं बोलणं ऐकताना मोठी मजा येते. प्रसंगी स्वतःच्या चुकांवरही हसता आले पाहिजे. अशी माणसे मनाने निर्मळ असतात. 

पूर्वी आमच्याकडे एक दूधवाला दूध घालण्यासाठी यायचा. तो ‘ दूध घ्या ‘ म्हणायच्या ऐवजी त्याच्या खर्जातल्या आवाजात  ‘ चला, भांडं घ्या ‘ असं म्हणायचा. मला त्याची खूप गंमत वाटायची. आमच्याकडे भांड्याधुण्यासाठी येणाऱ्या बाई बाहेरच उभ्या राहून फक्त ‘ ताईsss ‘ असा आवाज देतात. मग आपण समजून घ्यायचं की त्यांना भांडीधुणी करायची आहेत. कधी कधी एखाद्या ठिकाणी स्फोटक किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आणि अशा वेळी कोणी एखादा हलकाफुलका विनोद केला तर वातावरणातील तणाव लगेच निवळायला मदत होते. आमच्या शाळेत घडलेला एक किस्सा आहे. एकदा वार्षिक परीक्षा सुरु असताना झालेल्या पेपर्सचे गट्ठे तपासण्यासाठी शिक्षकांना वाटप करण्यात येत होते. विद्यार्थी आणि वर्गसंख्या वाढल्याने एका शिक्षिकेला तपासण्यासाठी जास्त पेपर्स दिले गेले. साहजिकच त्या चिडल्या. तेथे असणाऱ्या अधिकाऱ्यांचे आणि त्यांचे दोन दोन शब्द झाले. वातावरण तापले. त्या शिक्षिका रागाने त्या अधिकाऱ्याला विचारू लागल्या, एवढे पेपर्स मी कसे तपासायचे ? ‘ एक ज्येष्ठ पण मिश्किल शिक्षक तिथे हजर होते. ते म्हणाले, ‘ लाल पेनने तपासा…’ आणि एकदम हास्याचा स्फोट झाला. तणावपूर्ण वातावरण क्षणात निवळले आणि गंमत म्हणजे त्या शिक्षिकाही हास्यात सामील झाल्या. 

हसण्याची क्रिया ही अशी एक क्रिया आहे की ज्यामध्ये आपल्या मेंदूचा डावा आणि उजवा भाग एकाच वेळी काम करतात. आपण ऐकलेली गोष्ट किंवा वाचलेली गोष्ट मेंदूचा डावा भाग समजून घेतो. उजवा भाग ती गोष्ट गंभीर आहे की विनोदी याची छाननी करतो. विनोदी गोष्ट असेल तर आपल्याला हसू येते. अशा रीतीने शरीराचे सर्व अवयव जेव्हा एकत्र येऊन काम करतात तेव्हा ते काम उत्तम होते. व्यायाम, हसणे, चालणे यासारख्या गोष्टीत आपल्या शरीरातील सर्व अवयवांचा सुरेख समन्वय घडतो. आरोग्यासाठी जसा उत्तम आहार आणि व्यायाम महत्वाचा तसाच निरोगी मनासाठी हास्योपचारही महत्वाचा. 

सखी शेजारिणी तू हसत राहा या गीतात ते सखी शेजारणीला उद्देशून म्हटले असले तरी ते आपल्या सगळ्यांसाठी पण आहे असे समजायला हरकत नाही. ‘ प्रकाशातले तारे तुम्ही ‘ या कवितेत कवी उमाकांत काणेकर म्हणतात, ‘ रडणे हा ना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला. ‘ पुढे ते म्हणतात, ‘ सर्व मागचा विसरा गुंता, अरे उद्याच्या नकोत चिंता…’ खरंच मागचा सगळा गुंता, समस्या टाकून देऊन हसता आले पाहिजे म्हणजे ‘ आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा ‘ अशी स्थिती प्राप्त होईल. 

– समाप्त – 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इस्रोची “आदित्य एल -१” मोहीम – भाग-1 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ इस्रोची “आदित्य एल -१” मोहीम – भाग-1 ☆ श्री राजीव गजानन पुजारी

 १. सूर्य 

सूर्य हा आपल्या सर्वात जवळचा तारा आणि सौरमंडलातील सर्वात मोठा गोलक आहे. त्याच्या अनेक नावांपैकी आदित्य हे एक नांव आहे. सूर्याचे वय ४.५ अब्ज वर्षे आहे. हा हायड्रोजन व हेलियम वायूंचा अति उष्ण व तेजस्वी अंतरिक्ष गोलक आहे. तो पृथ्वीपासून १५० दशलक्ष किलोमीटर अंतरावर असून तो आपल्या सौरमंडळाचा ऊर्जा स्त्रोत आहे. आपणास माहीतच आहे की सौरशक्ती शिवाय पृथ्वीवर सजीवांचे अस्तित्व शक्य नाही. सूर्याचे गुरुत्वाकर्षण सूर्यमालेतील सर्व वस्तूंना एकत्र ठेवते. सूर्याच्या मध्यवर्ती भागाला गाभा (core) म्हणतात. तेथील तापमान अगदी १५ दशलक्ष अंश सेंटीग्रेड पर्यंत पोहोचू शकते. या तापमानाला तेथे अण्विक संमिलन (nuclear fusion) नावाची प्रक्रिया घडते. या प्रक्रियेमुळे सूर्याला अव्याहत ऊर्जा मिळत असते. आपणास दिसणाऱ्या सूर्याच्या पृष्ठभागाला दीप्तीमंडल (photosphere) म्हणतात हा सापेक्षरित्या ‘थंड’ असतो. येथील तापमान ५५०० अंश सेंटीग्रेड एवढे असते.

.सूर्याचा अभ्यास कशासाठी?

सूर्य हा आपला सर्वात जवळचा तारा आहे. त्यामुळे इतर ताऱ्यांच्या तुलनेत त्याचा अभ्यास आपणास सांगोपांगपणे करता येतो. सूर्याच्या अभ्यासामुळे आपल्याला आपल्या आकाशगंगेतील इतर ताऱ्यांविषयी तसेच इतर विविध दीर्घिकांमधील  ताऱ्यांविषयी खूप अधिक माहिती मिळू शकते. सूर्य हा खूप चैतन्यशील तारा आहे. आपण पाहतो त्यापेक्षा त्याचा विस्तार खूप मोठा आहे. त्याच्यावर सतत उद्रेक होत असतात, तसेच तो सौरमंडळात अमाप ऊर्जा उत्सर्जित करीत असतो. जर असे उद्रेक पृथ्वीच्या दिशेने घडत असतील तर त्यामुळे आपल्या भूमंडळावर (पृथ्वी जवळचे अंतरिक्ष) दुष्परिणाम होतात. अंतराळयाने आणि दूरसंवाद प्रणालींवर त्यांचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अशा उद्रेकांविषयी आगाऊ सूचना मिळणे श्रेयसस्कर असते. याशिवाय एखादा अंतराळवीर जर थेटपणे या उद्रेकात सापडला तर त्याच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. सूर्यावर घडणाऱ्या औष्णिक व चुंबकीय घटना अगदी टोकाच्या असतात. त्यामुळे ज्या गोष्टी आपण प्रयोगशाळेत शिकू शकत नाही त्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी सूर्य ही एक नैसर्गिक प्रयोगशाळा आहे.

.अंतरिक्ष वातावरण

आपल्या पृथ्वीवर सूर्य उत्सर्जन, उष्णता, सौरकण आणि चुंबकीय क्षेत्र यांद्वारे सतत परिणाम करत असतो. सूर्याकडून सातत्याने येणाऱ्या सौरकणांना सौर वारे म्हणतात व ते प्रामुख्याने उच्च उर्जायुक्त प्रकाशकणांनी (photons) बनलेले असतात. आपल्या संपूर्ण सौरमंडळावर सौर वाऱ्यांचा परिणाम होतो. सौरवाऱ्यांबरोबरच सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा पण पूर्ण सौरमंडळावर परिणाम होतो. सौरवाऱ्यांसोबतच सूर्यावर होणाऱ्या उद्रेकांचाही सूर्याभोवतालच्या अंतराळावर परिणाम होतो. अशा घटनांच्या वेळी ग्रहांजवळील चुंबकीय क्षेत्र व भारीतकण यांच्या वातावरणात बदल घडतो. पृथ्वीचा विचार केला तर पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र व अशा उद्रेकांनी वाहून आणलेले चुंबकीय क्षेत्र यांच्यातील अन्योन्यक्रियेमुळे पृथ्वीजवळ चुंबकीय अस्वस्थता (magnetic disturbance) निर्माण होते, त्यामुळे अंतरिक्ष मालमत्तांच्या (space assets) कामात विघ्न येऊ शकते.

पृथ्वी व इतर ग्रह यांच्या भोवतालच्या अंतरिक्षतील पर्यावरणाच्या स्थितीमधील सतत होणारे बदल म्हणजे अंतरिक्ष वातावरण होय. अंतरिक्ष वातावरण जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण अंतराळात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करीत आहोत. पृथ्वीनजीकच्या अंतरिक्ष वातावरणाच्या अभ्यासामुळे आपणास इतर ग्रहांनाजीकच्या अंतरिक्ष वातावरणाच्या वर्तनाचा अंदाज येईल. 

.आदित्य एल-१ संबंधी माहिती

आदित्य एल-१ ही सूर्याचा अभ्यास करण्यासाठी योजलेली अंतराळस्थित वेधशाळा वर्गाची पहिली भारतीय मोहीम आहे. हे अंतराळयान सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या  लँग्रेजीयन बिंदू १ (एल-१) च्या आभासी कक्षेत (halo orbit) स्थित करण्यात येणार आहे.  हा बिंदू पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. एल-१ भोवतालच्या आभासी कक्षेत यान स्थिर केल्यामुळे ते कोणतेही पिधान (occultation)  किंवा ग्रहण (eclips) यांचा अडथळा न येता सतत सूर्याभिमुख राहून  सातत्याने सूर्यावरील घडामोडींवर लक्ष ठेवू शकेल. या यानावर सात अभिभार आहेत. हे अभिभार विद्युतचुंबकीय आणि कणशोधक (electromagnetic and particle detectors) वापरून सूर्याचे दीप्तीमंडल (photophere), वर्णमंडल (chromosphere) आणि प्रभामंडल किंवा किरीट (corona) यांचा अभ्यास करतील. एल -१ या सोयस्कर बिंदूचा फायदा घेऊन चार अभिभार थेट सूर्याचा वेध घेतील व उरलेले तीन अभिभार एल -१ या लँग्रेज बिंदू जवळील सौरकण आणि चुंबकीय क्षेत्र यांचा अभ्यास करतील. आदित्य एल-१ वरील अभिभारांमुळे आपणास सूर्याच्या वातावरणाच्या सर्वात बाहेरच्या थराचे म्हणजेच प्रभामंडल किंवा किरीट याचे (corona) अति तप्त होणे, प्रभामंडलामधील वस्तूमानाचे उत्सर्जन (Coronal Mass Ejection- CME), सौरज्वालांपूर्वीच्या व सौरज्वालांवेळच्या घडामोडी व त्यांची वैशिष्ट्ये , सूर्याभोवतालच्या वातावरणाची गतिशीलता (dynamics), सौर कणांचे व चुंबकीय क्षेत्रांचे ग्रहांदरम्यानच्या माध्यमातून प्रसारण (propagation)आदि गोष्टींची अत्यंत महत्त्वाची माहिती मिळेल.

आदित्य एल-१ ची महत्वाची वैज्ञानिक उद्दिष्टे

अ ) सूर्याचा सर्वांत बाहेरचा थर (प्रभामंडल) अतीतप्त का होतो (coronal heating) याचा अभ्यास करणे.

ब ) सौर वाऱ्यांच्या (solar winds) प्रवेगाचा अभ्यास करणे.

क ) प्रभामंडलामधील वस्तुमानाचे उत्सर्जन (Coronal Mass Ejection-CME), सौर ज्वाला (solar flares) आणि पृथ्वीसमीप हवामानाचा (near earth space weather) अभ्यास करणे.

ड ) सौर वातावरणाची जोडणी (coupling) व गतीशीलता (dynamics) यांचा अभ्यास करणे.

इ ) सौर वाऱ्यांचे वितरण (distribution) आणि तापमानातील दिक् विषमता (anisotropy) यांचा अभ्यास करणे.

६. या मोहिमेची अनन्यसाधारण वैशिष्ट्ये

अ ) यावेळी प्रथमच संपूर्ण सौर तबकडीचे अतिनील समीप (near ultra violate) वर्णपटात निरीक्षण.

ब ) सौर तबकडीच्या अगदी समीप जाऊन (साधारण १.०५ सौर त्रिज्या) प्रभामंडला मधील वस्तूमान उत्सर्जनाच्या (Coronal Mass Ejection-CME) गतीशीलतेचा अभ्यास करणे व त्यावरून CME च्या प्रवेगीय भागातील माहिती मिळविणे.

क ) यानावरील कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा सूर्याचे इष्टतम (optimised) वेध घेऊन व इष्टतम विदासाठा (data volume) वापरून प्रभामंडलामधील वस्तूमान उत्सर्जन व सौरज्वाला यांचा शोध घेणे.

ड ) विविध दिशांना केलेल्या निरीक्षणांद्वारे सौर वाऱ्याच्या ऊर्जा दिक् -विषमतेचा अभ्यास करणे.

— क्रमशः भाग पहिला 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पैंजण…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “पैंजण” ☆ सौ राधिका भांडारकर

पैंजण या शब्दाच्या उच्चारातच एक मधुर छुमछुम जाणवते.  या शब्दाबरोबर मनात जणू अमृतधाराच बरसतात.

पैंजण हा एक तीन अक्षरी अनुनासिक शब्द.  पण तो ओठावर येता क्षणीच निसर्गातली संपूर्ण रसमय रुणझुण घेऊनच अवतरतो.  पैंजण या शब्दात लाडीक भाव आहेत. लडिवाळपणा आहे,  वात्सल्य आहे,  गुलाबासारखा बाल पावलांचा स्पर्श आहे,  एक मधुर ठेका आहे.  पैंजण या शब्दात गुलकंदाचा रस आहे.  आणि एक लाजरा बुजरा, हळुवार, गुदगुल्या करणारा, गोड शृंगारही आहे. त्या शृंगारात भक्ती आहे आणि कामातुरताही आहे.

मराठी भाषेत शब्दांचे भांडार अथांग आहे.  त्यातलाच हा एक तीन अक्षरी शब्द, पैंजण.  मधुर रसात घोळूनच तो ओठावर येतो.  पैजण या शब्दात जसा नाद आहे तसाच त्यात अंतरातला  लपलेला साजणही  आहे. त्याला प्रीतीची ही रुणझुणाती चाहूल कळावी म्हणूनच हे पैंजण.

पैंजण हा एक स्त्रियांचा अलंकार.  भारतीय स्त्री ही नखशिखांत अलंकारांनी मढलेली असते.  तसे गोठ, पाटल्या, चपलाहार,ठुशी,वज्रटीक, बाजूबंद,  एकदाणी,  या काहीशा अहंकारी, रुबाबदार,प्रदर्शनीय अलंकारात तसे पाहिले तर पैंजण हा पायातला अगदीच चतुर्थ श्रेणीतला अलंकार म्हणावा लागेल.  एकतर पायातला म्हणून चांदीचा. हलका, जरासा नाजूकच.  चांदीच्या नक्षीदार साखळीत लटकवलेले चांदीचे छोटे किणकिणणारे नूपुर.  पण पावलावर हे घुंगुरवाळे चढवले की त्या पावलांचं  रूपच पालटतं.  नुसतं रूपच नव्हे तर चालही  बदलते.  या चालीलाही एक खट्याळ, लडिवाळ, गोडवा प्राप्त होतो.अलौकिक सौंदर्य देतात हे पैंजण. आणि मग कुणा प्रेमिकाच्या तोंडून सहज उद्गार येतात,

” आपके पाव देखे, बहुत हसीन है, इन्हे जमीन पर मत उतारिएगा, मैले हो जायेंगे”… क्या बात है!

पैंजण हा शब्द इतका गोजिरा आहे की तो लहान बाळाच्या पावलांशी एक निरागस नातं जोडतो.  नुकतंच पावलं उचलायला लागलेलं बाळ पायात पैंजण घालून दुडदुड चालू लागतं तेव्हा ती हलकी छुमछुम इतकी कर्णमधुर वाटते की कितीही कामात गुंतलेली माय असो, ती नाजूक छुमछुम ऐकून धावत आपल्या बाळाला उचलून घेते आणि त्याचे वात्सल्याने असंख्य पापे घेते.  या मायेच्या दृश्यात त्या पैंजणांची छम छम एका  लडिवाळ भूमिकेत असते.  त्यावेळी ती माय कौसल्या असते आणि ते बाळ पायी पैंजण घालून राजवाड्यात दुडदुडणार्‍या रामा सारखंच असतं.

पैंजण हा शब्द कधीकधी  पार यमुना तिरी घेऊन जातो. नटखट कान्हा आणि बावरी राधा यांच्या प्रणयात पैंजणांची एक कोमल भूमिका आहे.  प्रेमाचं ते पार्श्वसंगीतच म्हणा ना.

। पायी पैंजण पैंजण वाजती।

 ।ही  राधा गौळण हरीला लाजती।।

एका अद्वैत प्रेमाचं आणि भक्तीचं दर्शनच जणू या राधेच्या पायातले पैंजण करून देतात.  या शब्दाबरोबर राधा— कृष्णाची प्रणय रंगात दंग झालेली  मूर्तीच डोळ्यासमोर येते.  त्या रुणझुण नादाबरोबर कृष्णाच्या बासरीचे सूरही कानात घुमायला लागतात.

कधी कधी प्रेमाचे काही उडते भाव या पैंजणात जाणवतात.

“चाळ माझ्या पायात

पाय माझे तालात

नाचते मी तोऱ्यात मोरा वाणी रे

काय तुझ्या मनात

सांग माझ्या कानात

गोड गोड गुपित तुझ्या मनी रे ..”

किती बोलतात हे  पैंजण!  किती भाव किती रस ते व्यक्त करतात!

वास्तविक पैंजण, नूपुर, चाळ, घुंगुर, हे सारेच एकधर्मीय पद आभूषणे.  पदालंकार.  त्यांचे संबंध पदन्यासाशी.त्यांचे नाद जरी वेगळे असले,  त्यांच्या रुणझुणतेची,  छन-छनीची पट्टी जरी वेगळी असली तरी नातं पदन्यासाशीच,  पावलांच्या तालाशीच.  पण तरीही त्यांची घराणी वेगळी आहेत.  घुंगुर म्हटले की ते थेट आपल्याला मैफलित घेऊन जातात.

” राजसा जवळी जरा बसा” किंवा “पाडाला पिकलाय आंबा” नाहीतर,

“ठाडे रहियो ओ बाँके यार” अशा गाण्यांची आठवण करून देतात.त्यांचं सख्य ढोलकीशी किंवा सारंगीशी. पण पैंजण कसे अंगणातले वाटतात.  प्राजक्ताच्या फुलासारखे ते हळुवार टपटपतात.  हरित पर्णातून एखादी हलकी झुळूक यावी तसा त्यांचा नाद भासतो.  पैंजण नादात  एक स्निग्धता जाणवते, मार्दव आणि माधुर्याचा अनुभव येतो. पैंजण झुळझुळणाऱ्या नदीची आठवण देतात.  किनाऱ्यावर हलकेच चुबकणाऱ्या लाटेसारखे ते असतात. पैंजणात तांडव नसते, क्रोध नसतो, थयथयाट  नसतो,  वादळ नसते.  पैंजणांची रुणझुण केतकीच्या बनात नेते.  अलगद हळुवार मोरपिसासारखी ती कानाशी हुळहुळते.

भराभर डोंगर चढून जाणारी, नाभीच्या खाली गुडघ्यापर्यंत घट्ट वस्त्र लपेटलेली एखादी आदिवासी शिसवी कांती असलेली कातकरीण दिसली की माझी नजर तिच्या भेगाळलेल्या पावलांवर जाते आणि तशातही त्या रापलेल्या,तुकतुकीत, काळ्याभोर पावलांवरचे छुम छुमणारे पैंजण कसे एखाद्या प्रेमळ सखी सारखे मला भासतात.  पायातलं ते बंधन न वाटता प्रेमाने गोंजारणारं  ते साधन वाटतं.  शिवाय पैंजणाला धनवान, श्रीमंत, गरीब, गळीत असा भेदभाव नसतो.  ते कुणाचीही पावलं खुलवतात.

हे सगळं लिहीत असताना मी माझ्या पावलांकडे सहजच पाहिलं, आता तिथे थंडीपासून रक्षण करणारे लोकरीचे मोजे होते.  आणि मग सहज मनात आलं, खरंच पैंजण म्हणजे मूर्तिमंत बालपण.  पैंजण म्हणजे हिरवाईचे तारुण्य. एक सुरेल छन छना छन, सप्तसूरातला लटका शृंगारच जणू!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुहास्य तुझे मनास मोही… भाग -1☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

?मनमंजुषेतून ?

☆ सुहास्य तुझे मनास मोही… भाग -1 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

अशी कल्पना करू या की बाजारात आपण फेरफटका मारायला गेलो आहोत. एका दुकानात तऱ्हेतऱ्हेचे मुखवटे विक्रीस ठेवले आहेत. काहींचा चेहरा हसरा आहे, काही रागट आहेत, काही रडके आहेत, काही उदास दीनवाणे आहेत तर काही भयंकर किंवा भेसूर वाटताहेत. असे वेगवेगळे भाव त्यांच्या चेहऱ्यावर आहेत. आपल्याला सांगितले की तुम्ही यातून तुम्हाला जो आवडेल तो चेहरा निवडा. आपण सगळे कोणता चेहरा किंवा मुखवटा पसंत करू ? तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. हसतमुख असलेला मुखवटा कोणीही हसत हसत पसंत करील. आपल्या जीवनातही असेच आहे. हसतमुख, सुहास्य मुखावर विलसत असलेली व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते. काही काही लोक अगदी प्रतिकूल परिस्थितीतही आनंदी राहतात तर सगळे काही अनुकूल असूनही काहींच्या चेहऱ्यावर कायम बारा वाजलेले असतात. 

आमचे एक नातेवाईक होते. त्यांचा चेहरा नेहमी गंभीर असे. त्यांच्या शेतात आमचाही वाटा असणारी काही आंब्याची सामाईक झाडे होती. वर्षातून एकदा आंबे आल्यानंतर ते माणसं लावून उतरवावे लागत. असे आंबे उतरवून ते त्यांच्या घरी बैलगाडीने घेऊन येत. मग आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना उतरवण्याचा आणि आणण्याचा जो काही खर्च आला असेल तो देऊन आंबे घरी आणत असू. आंबे कधी येतात आणि काकांचा निरोप कधी येतो याची आम्ही वाटच पाहत असू. तर आंबे उतरवले की काका आमच्या घरी ते सांगायला येत असत. अर्थात ते कशासाठी आले आहेत याची आम्हाला अजिबात कल्पना नसायची. ते माझ्या वडिलांपेक्षा वयाने मोठे असल्याने त्यांना नावाने हाक मारत. हाश हुश्श करीत घरात प्रवेश करीत. आधी मला हाक मारून, ‘ विश्वास, पाणी आण. ‘ असे म्हणत. मी पाणी दिले की, ‘ विष्णू कुठे आहे ? ‘ अशी माझ्या बाबांच्या संदर्भात विचारणा करीत असत. मग वडील समोर आले की, ‘ विष्णू, अरे आंबे आले आहेत खेड्यावरून. ते घेऊन जा बाबा. ‘ तोपर्यंत आम्ही सगळे मानसिक तणावात असायचो. आम्हाला वाटायचे की काका काहीतरी गंभीर बातमी घेऊन आले आहेत. पण आंबे आले आहेत ही तर आनंदाची बातमी असायची. पण एवढी आनंदाची बातमी देखील ते अत्यंत गंभीरपणे सांगायचे. मग लक्षात आले की अरे हा तर यांचा स्वभावच आहे. मग मनातल्या मनात त्यांचे नाव गंभीरराव ठेवले होते. 

Smile and the world smiles with you असे एक छान इंग्रजी वाक्य आहे. तुम्ही हसलात तर जग हसेल. तुम्ही जसे असाल तसेच जग तुम्हाला वाटेल. लहान मुलं किती आनंदी असतात ! त्यांच्याकडे पाहिले की आपल्यालाही आनंद वाटतो. आनंदही एखाद्या व्हायरस सारखा असतो. तो सभोवताली पसरत जातो. भोवतालच्या माणसांना आपल्या आनंदात सामील करून घेतो. अशा वेळी चेहऱ्यावर गंभीरतेचा मास्क लावायचा नसतो. त्यात सामील व्हायचे असते. लहान मुलं खूप आनंदी का असतात यामागील कारणाचा आपण कधी विचार केला आहे का ? त्याचे कारण आहे ती दिवसातून अनेक वेळा खळखळून हसतात. त्यांना काही कारण लागत नाही. ते हसतात म्हणून आनंदी असतात. आणि आनंदी असतात म्हणून हसत राहतात. 

जसजसे आपले वय वाढते तसतसे आपले हसणे कमी होत जाते. पण हे तितकेसे खरे नाही. आपले हसणे कमी होत जाते म्हणून आपले वय वाढत जाते. सदैव हसतमुख असणारी माणसे वयाला पराभूत करतात. वय ही त्यांच्यासाठी फक्त एक संख्या असते. आपण जेव्हा एखाद्या मंदिरात जातो तेव्हा तेथील देवाच्या मुद्रेवरचे प्रसन्न भाव पाहून आपलेही मन आनंदित होते. परमेश्वर आनंदस्वरूप आहे. म्हणूनच परमेश्वराच्या मूर्ती कायम प्रसन्न असतात. श्रीकृष्णाचे वागणे बोलणे कसे होते हे आपण प्रत्यक्ष तर पाहिले नाही पण आतापर्यंत त्याच्याबद्दल जे काही वाचले, मालिकांमध्ये पाहिले, त्या सगळ्यात त्याच्या प्रसन्न आणि हसतमुख व्यक्तिमत्वाचा प्रभाव आपल्यावर पडतो. संकटांना सुद्धा हसतमुखाने सामोरे जा ही आपल्या राम कृष्ण आदी देवांनी दिलेली आपल्याला शिकवण आहे. आपण नेमकी तीच विसरतो. 

साधना, तपश्चर्या करणाऱ्या मंडळींच्या, साधू संतांच्या मुखावर एक विलक्षण तेज आणि प्रसन्नता विलसत असते. त्यांची मुद्रा कायम आनंदी असते. कारण हा आनंद आतून एखाद्या फुलासारखा उमलून आलेला असतो. वृत्ती आनंदी असली की आपला चेहरा ती आपोआपच दर्शवतो. चेहरा हा मनाचा आरसा आहे. मन स्वच्छ तर चेहरा स्वच्छ. चेहऱ्यावर मुखवटे लावून फिरणारांची गोष्टच वेगळी. त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. पण शरीराच्या स्वच्छतेसाठी जसा साबण आवश्यक तसाच मनाच्या निर्मळतेसाठी हास्ययोग आवश्यक. परमेश्वराने हास्य ही मानवाला बहाल केलेली देणगी आहे. इतर कोणत्याही प्राण्याला ती नाही. गोष्टीतले प्राणीच फक्त हसतात. 

समोरच्या ओळखीच्या व्यक्तीला पाहून तर आपण स्मितहास्य करतोच पण अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतरही आपण जर सुहास्य मुद्रेने त्यांना सामोरे जाऊ शकलो तर संबंधात एक मोकळेपणा, नैसर्गिकपणा येतो. काही व्यक्ती हसण्यातही काटकसर करतात. मोजून मापून हसतात. कोणी कोणी तर चेहऱ्यावरची गंभीरतेची इस्त्री मोडू देत नाहीत.

— म्हणून ‘ एखादी तरी स्मितरेषा…’ असे म्हणावे लागते. 

– क्रमशः भाग पहिला. 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अर्वाचीन काळातील पंचकन्या… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

? इंद्रधनुष्य ?

☆ अर्वाचीन  काळातील पंचकन्या… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

आपण प्रातःकालीन प्रार्थनेमध्ये पंचकन्यांचा उल्लेख करतो. त्यामध्ये अहिल्या, तारा, द्रौपदी, सीता, मंदोदरी, या पुराणकालीन  स्त्रियांना वंदन करतो. या सर्वांचे ऐतिहासिक पौराणिक महत्त्व आपण जाणतो. इतिहासाचा विचार केला की अर्वाचीन काळातील जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चन्नम्मा तसेच ताराराणी या पंचकन्या- पंचराण्या- मला आठवतात. या आदर्श असणाऱ्या स्त्रियांविषयी लिहावं असं मनात आलं, ते आज जिजाऊंची पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने !

आपल्या महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला ललामभूत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिजाऊ या मातोश्री–आई कशी असावी याचे उत्तम उदाहरण इतिहासाने दिले आहे. शौर्य, धैर्य, सहनशीलता, मातृप्रेम या सर्व गुणांचा समुच्चय जिच्यात आढळतो ती जिजाऊ माउली ! तिने शिवबाला घडवलं ! रामायण, महाभारत डोळसपणे समजावून सांगितले. स्वधर्म, स्वराज्याचे बीज मनात रुजवले आणि सर्व संकटांना तोंड देऊन तिने आपल्या लाडक्या शिवबाला वाढवले. शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर काही दिवसातच जिजाऊ आईसाहेबांचे निधन झाले. त्यांच्या मनातील इप्सित कार्य पूर्ण झाले होते. शांतपणे त्या मृत्यूच्या स्वाधीन झाल्या. शिवरायांची आई ही महाराष्ट्राची कन्या, शहाजीराजांची पत्नी अशी लोकोत्तर स्त्री  इतिहासात अमर झाली !

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ही दुसरी आदर्श राणी  अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावा- -जवळील लहानशा खेड्यात शिंदे घराण्यात त्यांचा जन्म १७२५ साली झाला. मल्हारराव होळकरांनी त्यांना सून म्हणून पसंत केले आणि त्यांच्या मुलाशी, खंडेरावांशी त्यांचे लग्न करून दिले. परंतु लग्नानंतर काही काळातच  खंडेरावांचा  मृत्यू झाला. त्यावेळी अहिल्याबाई सती जाण्यास निघाल्या. परंतु मल्हाररावांनी त्यांना  सती जाण्यापासून परावृत्त केले. त्यानंतर अहिल्याबाई लष्करी, मुलकी शिक्षण शिकल्या. मल्हाररावांचा विश्वास त्यांनी सार्थ करून दाखवला. पूर्व माळव्यातील जिल्हे त्यांच्या ताब्यात होते. पती, सासरे आणि मुलगा यांच्या निधनानंतर इंदोर सोडून त्यांनी महेश्वर येथे राजधानी हलवली. माळवा प्रांत सुखी समृद्ध कसा होईल याकडे लक्ष दिले. त्यांची न्यायव्यवस्था चोख होती. त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली.  मोठ्या नद्यांवर घाट बांधले. धर्मशाळा उभ्या केल्या. पाण्याचे हौद, विहिरी यांची कामे तीर्थस्थळी करून दिली. होळकरांची दौलत सांभाळली.अशा ह्या पुण्यवान अहिल्याबाई होळकर यांचा १३ ऑगस्ट १७९५ रोजी  मृत्यू झाला..

पुण्यवान राणी म्हणून गणली जाणारी तिसरी राणी म्हणजे राणी लक्ष्मीबाई ! एकोणिसाव्या शतकातील झाशी या संस्थानची लक्ष्मीबाई राणी होती. १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्धच्या उठावात ती सहभागी होती. क्रांतिकारकांची स्फूर्ती देवता होती ! सातारा जिल्ह्यातील मोरोपंत तांबे यांची लाडकी मुलगी मनकर्णिका ही राणी लक्ष्मीबाई म्हणून आपल्याला  माहित आहे ! घोडेस्वारी करणे ही तिची आवड होती. युद्धशास्त्रामध्ये निपुण होती. थोर कर्तृत्व व नेतृत्व असणारी होती झाशीची राणी. पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने दुर्लक्षित करू नये म्हणून ती पुरुषी पोशाखात वावरत असे. दामोदर हा लक्ष्मीबाईंचा दत्तक मुलगा होता. त्याच्यासह प्रशासन, सैन्य, कल्याणकारी कामे यांची राणीने चांगली व्यवस्था लावली. तात्या टोपे, नानासाहेब पेशवे यांच्या सहकार्याने इंग्रजांशी युद्ध केले. अशी ही झाशीची राणी इंग्रजांशी युद्ध करताना मृत्युमुखी पडली.

स्वराज्य सौदामिनी ताराराणी ही या पंचराण्यांमधील चौथी राणी ! ही हंबीरराव मोहिते यांची कन्या होती. घोडे स्वारी, तलवारबाजी यामध्ये कुशल, असामान्य व्यक्तिमत्व असणारी,अशी ताराराणी ही   राजाराम महाराजांची पत्नी होती ! संभाजीच्या वधानंतर राजाराम महाराजांनी कर्नाटकात जाताना महाराष्ट्राचा कारभार ताराराणीच्या हाती सोपवला. काही काळ बंद असणारी वतनदारी पद्धत ताराराणी यांनी सुरू केली.लोकोपयोगी कामे केली. राजाराम महाराजांच्या आज्ञेनुसार त्या गुप्तपणे जिंजीला पोहोचल्या आणि राजारामांसह  महाराष्ट्रात आल्या. सततची दगदग, प्रवास यामुळे सिंहगडावर असताना राजारामाचा मृत्यू झाला. त्यानंतर ताराबाईंनी स्वतःच्या मुलाला- शिवाजीला राज्याभिषेक करवला. सरदारांच्या मदतीने औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले. शत्रूच्या कैदेतून सुटून आल्यावर शाहू राजांनी सातारा येथे स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर ची गादी सांभाळली.. माणसे जपली, नव्याने जोडली. ताराबाईंचे कार्य खूप महान होते ! दहा डिसेंबर १७६१ रोजी ताराबाईंचा मृत्यू झाला. कवी परमानंद यांचे पुत्र देवदत्त म्हणतात….. 

दिल्ली झाली दीनवाणी ! दिल्लीशाचे गेले पाणी , 

ताराबाई रामराणी, भद्रकाली कोपली !

अशी ही ताराराणी !

पंचराण्यांच्या मालिकेतील पाचवी राणी म्हणजे कित्तूरची राणी चन्नम्मा….

२३ ऑक्टोबर १७७८ रोजी बेळगाव जिल्ह्यातील कापशी गावी, राणी चन्नम्मांचा जन्म झाला. लहानपणापासून तिरंदाजी, अश्वारोहण, तलवारबाजी या मर्दानी खेळांची त्यांना आवड होती.. कित्तूरचे राजा मल्ल सज्जा देसाई यांच्याशी तिचा विवाह झाला. राजा आणि राजपुत्राच्या अकाली निधनानंतर तिच्या दत्तक पुत्राला तिने गादीवर बसवले. परंतु ब्रिटिशांनी हे  दत्तक पुत्र नामंजूर केले व कित्तूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या राणीने स्वतःचे मोठे सैन्य उभे केले आणि कित्तूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंग्रज कलेक्टर थॅकरला तिच्या सैन्याने मारले. पण हा लढा फार काळ चालला नाही. इंग्रजांनी तीन डिसेंबर १८२४ रोजी राणी चन्नम्माला  पकडले. ब्रिटिशांविरुद्ध आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या या राणीचा २१ फेब्रुवारी १८२८ रोजी मृत्यू झाला. आपल्या इतिहासातील ही एक महत्त्वाची राणी होती, जिने  इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचा प्रयत्न केला !

अर्वाचीन काळाच्या इतिहासातील या पाच राण्या म्हणजे ‘ पंचकन्या ‘ आपल्याला नक्कीच गौरवास्पद आहेत !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

मो. 8087974168 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares