☆ प्रतिमेच्या पलिकडले : काय भुललासी वरलिया रंगा… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
“साहेब रागावणार नसाल तर एक सांगु का तुमास्नी ! ह्यो तुमच्या पायातल्या बुटाची जोडी बघा अस्सल चामड्याची हायं बघा… त्येला नुसतं साधं पालीस करत जा..ते जेव्हढं नरम राहिलं तेवढा बुट चांगला टिकंल नि चालताना पायाला बी लै आराम वाटंल… ते चमकणारं पालीस याला बिलकुल वापरू नगा… ते काय वरच्या वर चमकत राहतयं त्येचं काय खरं नस्तया…म्या बी साधंच पालीस करून देतू.. चालंल नव्हं तुमास्नी?.. “
.. ” मालक , पण तो बुट आधीच तसला, त्यातं तुम्ही त्याला साधं पालीस करायला सांगताय… मग तो चमकदार दिसणार कधी? चारचौघात माझी इमेज उठून कशी दिसेल? मालक तुमचा तो पूर्वीचा जमाना गेला, आता सारं काही दिसण्यावर जगरहाटी चाललेय !.. फॅशनबाज कपडा, चेहऱ्याला रंगरंगोटीचा मुलामा, डोक्यावरचे केसांचं कलप केलेलं टोपलं, डोळ्यावर काळा निळा चष्माची झापडं नि पायात भारी किंमतीचे ब्रॅंडेड बुट असा जामानिमा असल्याशिवाय माणूस जगात आपली छाप उमटवू शकत नाही… असा जो नाही तो आजच्या जमान्यात पुवर चॅप, मागासलेला ठरतो.. कुणीच त्याला विचारत नाही.. मग त्याची उपासमार होणार कि नाही… मालक एक वेळ घरात जेवायला नसलं तरी चालतं पण माणसानं दिसायला अगदी भारी असलं पाहिजे..आणि तुम्हाला कसं काय कळलं या बुटाचं चामडं अस्सल आहे ते? “
“साहेब तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे.. आजचा जमाना वरच्या दिखाव्यालाच भुलतो बघा.. त्याला आतला माणूस ओळखता येत नाही…दिखाव्यातचं सारं आयुष्य घालवून आपून काय मिळविलं तर मोठं शुन्य…उगा आपला खायला कार नि भुईला भार होऊन राहण्यात काय मतलब… काही विचारानं चाललं आचारानं वागलं तरचं आपल्या बरोबर समाजाचं बी भलं होईल.. ते जिणं बघा कसं सोन्यावाणी चमचमणारं असतयं… अन जे चमकतयं ते समधं सोनं कुठं असतया… हि ओळखण्याची पारख माणसात असायला हवी… तुमच्या पायातला बुटाचा जोड हा अस्सल चामड्याचा आहे हे म्या वळखणार नाही तर कोण वळखणार .. तिथं पाहिजे जातीचे ते येरागबाळयाचं काम नोहे… आणि अस्सल असतं तेची किंमत असते… त्येला बाहेरची कशाची जोड लागत नसते.. माणूस दिसायला साधा असला तरी विचारानं भारी असल्यावर चारचौघात चमकल्याबिगर राहत नसतो… ते चोखोबा सांगुन गेलं नव्हं का……
आज रविवार…… रोज घडाळ्याच्या काट्यानुसार होणारी कामे दर रविवारी जरा हळू हळू होतात. पण आजचा रविवार वेगळाच होता.
खूप घाईने नसली तरी सकाळपासूनच घरात आवराआवर सुरू झाल्याचे लक्षात आले. प्लास्टिक बरण्यांमध्ये भरलेले कडधान्य, दाणे, तिखट, मीठ हे बरणी उलट सुलट करून बारकाईने बघितले जात होते. डाळ, तांदूळ, रवा इत्यादी वस्तुंच्या डब्यात हात खोलवर घालून हात व्यवस्थित फिरवून पाहिले जात होते. गव्हाच्या छोट्या कोठीत कापडात गुंडाळून टाकलेल्या पाऱ्याच्या गोळ्या चाचपून बघितल्या जात होत्या. शंका आल्यास ती कापडी पुरचुंडी उघडून बघितली जात होती.
कशातही आपल्याला हवे ते सापडते का? यांची चेहऱ्यावर असणारी उत्सुकता, काहीच मिळाले नाही तर नाराजीचा सूर निघत बदलत होती. रॅक मध्ये डब्यांच्या खाली घातलेले पेपर देखील काढून पाहिले जात होते. त्या पेपरच्या घडीत चुकून नाही ना याची खात्री केली जात होती.
कशाला हवी दर रविवारी अशी आवराआवर…….. असा कधी कधी निघणारा नाराजीचा सूर अजिबात निघाला नाही. दोघींचे सुर आज चांगलेच जमले होते. तसे जमतेच. पण आज एकदमच छान जमले होते. सुरसंगम…….
पुर्वी घरात पोत्यांमध्ये धान्य असायचे. आता धान्य पाच सात किलोच्या डब्यात आणि पोत्यांमध्ये जास्तीची (केव्हातरी लागतील म्हणून घेतलेली) भांडी आढळतात. स्वयंपाक घरात अपेक्षित असे हाताला फारसे काही लागले नाही. फक्त डब्यात हात घालतांना जरा घाई झाल्यामुळे हाताला थोडेसे लागले इतकेच. हाताला लागणे याचे दोन्ही अर्थ मला चांगले समजले. पण ज्या अर्थासाठी (पैशांसाठी) ही आवराआवर सुरू होती ते व्यर्थ ठरले होते.
आता मोर्चा कपड्यांच्या कपाटाकडे वळणार होता. त्यांच्या मोर्चात मला सामील करून घेतले. (मोर्चा असल्याने तुम आगे बढ़ो…. हम तुम्हारे साथ है| अशा घोषणा मी दबक्या आवाजात दिल्या.) कपाटातील खालचे कपडे वर, वरचे खाली. मागचे पुढे, पुढचे मागे. असे सगळे करुन झाले.
काही साड्यांच्या घड्या त्या साड्या घेतल्यापासून मोडल्या नव्हत्या. (हे त्यांच्या बोलण्यावरुनच समजलं) या निमित्ताने त्या साड्यांच्या घड्या (जागेवरच बसल्या बसल्या) मोडून तर झाल्याच. पण साड्या झटकून देखील झाल्या. त्यातही अपेक्षित असे काही मिळाले नाही. फक्त चार पाच डांबरच्या गोळ्या तेवढ्या घरंगळत बाहेर पडल्या…. माझे सगळे शर्ट, पॅन्ट झटकून तर झालेच. पण त्यांचे खिसे देखील तपासून झाले. (नोटा मिळाल्या नाहीत, पण दुसरेही आक्षेपार्ह असे काही मिळाले नाही. यावर दोघांचा समाधानाचा सुस्कारा तेवढा एकाचवेळी बाहेर पडला.) घेतलेले, मिळालेले शर्टपीस, पॅंटपीस, जास्तीचे टाॅवेल हे देखील मोकळे करून झाले.
घरात असणाऱ्या सात आठ प्रकारच्या वेगवेगळ्या पर्स, पर्स मध्ये ठेवलेल्या पर्स यांच्या प्रत्येक कप्यांची कसून तपासणी झाली. त्यात एक दोन टाकल्याची पाकिटे, दोन चार चॉकलेट, सोन्याचे दागिने घेतांना त्या माणसाने केलेले आकडेमोडीचे चार पाच छोटे कागद, काही चिल्लर, पाच सहा औषधांच्या गोळ्या सोडल्या, तर हव्या त्या नोटा औषधालाही सापडल्या नाहीत.
दिवाणावरील गाद्यांची उलथापालथ झाली. येवढीच उलथापालथ पाचशेच्या नोटा बंद झाल्यावर देखील झाली होती. चादरी सरळ होत्या त्या विस्कटून झाल्या. दोन चार किरकोळ बिलं, लाईट बिल, कधीतरी काढलेल्या (जास्तीच्या) आधार कार्डच्या झेराॅक्स काॅपीज, एक दोन पुस्तके, बॅंकेचे चेकबुक, पासबुक या शिवाय गादीखाली काहीच पसारा नव्हता. घर आवरण्याऐवजी पसाराच जास्त झाल्याचे लक्षात आले.
शेवटी आपल्याकडे दोन हजारांची नोट नाही आणि त्यामुळे ती बदलण्याची गरज नाही यावर शिक्कामोर्तब झाले. आणि आता थोडी विश्रांती घ्यावी म्हणून गादीवर पडणार तोच…
अय्या… खरंच… अहो ते देवघरातील पोथ्यांमध्ये तीन चार नोटा ठेवल्याचे मला चांगले आठवतेय…… असे म्हणत दोघींचा (गृहमंत्री आणि राष्ट्रपती, बायको आणि आई) मोर्चा पोथी ठेवलेल्या जागेवर गेला…….
दोघापैकी पैकी एकीचा आवाज… ‘ कुठेतरी ठेवल्यासारखे मला सारखे आठवत होते…’ दुसरा आवाज .. ‘ कुठेतरी नाही…… कुठेतरीच ठेवल्या होत्या. ही काही जागा आहे का ठेवायची…’. (घरापरत्वे हे आवाज आपसात बदलू शकतात.) हाताला लागणे याचे वेगळे अर्थ मला समजले, तसे कुठेतरी याचेही वेगळे अर्थ समजले.
अशा रीतीने आवराआवर झाल्यावर दोन चार दोन हजारांच्या नोटा मिळाल्या. सुवर्ण पदक मिळाल्यावर विजेता जसे त्या पदकाला निरखून पाहतो आणि कपाळाला लावतो तसेच या नोटांच्या बाबतीत देखील झाले.
मी १९७३ ला अकरावी पास झाले, या वर्षी आम्ही एस.एस.सी.होऊन पन्नास वर्षे होत आहेत म्हणून शाळेत गेटटुगेदर करायचं ठरवतोय ! त्या निमित्ताने चार तुकड्यातील मिळून १७३ विद्यार्थी /विद्यार्थिनींची यादी शाळेत मिळाली ! त्यातील आम्ही पन्नासजण आधीच एका what’s app group वर २०१५ पासून एकत्र आहोत ! आम्ही विद्याधाम प्रशाला -शिरूर जि.पुणे चे विद्यार्थी !
आत्ता या १७३ पैकी सुमारे शंभरजण एका what’s app group वर एकत्र आलोय ! मुलांपैकी सुभाष जैन, डॉ. मारूती ढवळे, ऍडव्होकेट ओमप्रकाश सतिजा हे शालांत परीक्षेत अनुक्रमे पहिले ,दुसरे, तिसरे आलेले ! बँकेत ऑफिसर–नंतर वकिली आणि इतर स्वतंत्र व्यवसाय ! दुसरा एम.बी.बी.एस.डॉक्टर , तिसरा वकील आणि इतरही स्वतःची स्वतंत्र ओळख असणारे तिघे !`
आज मी लिहिणार आहे ते आमच्या बॅचच्या हुशार मुलींबद्दल ! त्या अकरावी अ मधल्या… माधुरी तिळवणकर, निर्मला गुंदेचा, शारदा मुसळे, शशी जोशी आणि फैमिदा शेख, या मुळातच हुशार,बुद्धिमान मुलींबद्दल !
वरील पंचकन्याही हुशार विद्यार्थिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ! माधुरी तिळवणकर ही नेहमीच गणितात शंभर पैकी शंभर मार्कस् मिळविणारी म्हणून माझ्या लक्षात राहिलेली ! निर्मला गुंदेचा पण खूप हुशार,या दोघींचा नेहमीच आमच्या अ तुकडीत पहिला दुसरा नंबर असायचा. चढाओढ या दोघींच्यातच पण त्या अगदी सख्ख्या मैत्रीणी, आजही त्यांची मैत्री टिकून आहे ! निर्मल अहमदनगरला असते ! माधुरी पुण्यात. एस.पी.काॅलेजमधून ग्रॅज्युएट झाल्यावर लगेचच तिला सरकारी नोकरी लागली ! खरंतर ती आयएएस वगैरे होण्याच्या गुणवत्तेची. पण लग्नानंतर पतीच्या सांगण्यावरून नोकरी सोडली !
आत्ता माधुरी स्वतःबद्दल म्हणते – ” शाळेत बरी होते. पण.घरासाठी सरकारी नोकरी सोडली. नंतर आयुष्य बरे गेले पण फारसे यश मिळाले नाही. हा आपल्या नशिबाचा भागआहे ..जीवनात समस्याना तोंड देत जगावे लागते. आयुष्यात नियोजन कमी पडले, त्यात आजारपणाचे कारण झाले.असो…..”
इतकी विनयशीलता पाहून मन भरून आलं म्हटलं, ” माधुरी तू शाळेत बरी नाही उत्कृष्ट होतीस !”
आमच्या प्रगती पुस्तकावर “बरा” तर तिच्या प्रगतिपुस्तकावर “उत्कृष्ट” शेरा असायचा
निर्मल गुंदेचाचंही लवकरच लग्न झालं पण तिने लग्नानंतर बी.काॅम. एम.काॅम. केले. टेलिफोन एक्सचेंजमधे नोकरी केली, आता सेवानिवृत्त ! शशी आणि शारदा या सुद्धा क तुकडीतल्या हुशार, स्कॉलरशिप मिळविणा-या ! अकरावीत अ तुकडीत गेलेल्या ! अकरावी अ मध्ये “फिजिक्स केमिस्ट्री” हा विषय घेणारे सगळेच हुशार विद्यार्थी ! या पंचकन्या अकरावीत अ तुकडीत असलेल्या ! दहावी पर्यंत अ तुकडीत असणारी मी अकरावीत अ तुकडीत नव्हते ! आम्ही “शरीरशास्त्र आरोग्यशास्त्र” वाले सामान्य विद्यार्थी!
शशी बी.काॅम. झाली. तिनं तिचा चित्रकलेचा छंद जोपासला आहे. तिच्या पेंटिग्जची प्रदर्शने भरत असतात ! शारदा एम.काॅम. झाली. लग्नानंतर मुंबईत असते ! फैमिदा शेख उर्दू शाळेतून विद्याधाममधे आलेली ! आठवीत असताना ती संस्कृतमधे पहिली आलेली, इंग्लिश/ गणितही चांगलं ! हिंदीच्या सरांना आडलेला ” परहेज” या शब्दाचा अर्थ तिने वर्गात स्पष्ट करून सांगितला होता ! “पथ्य” !
ती परवा म्हणाली “मला टीचर व्हायचं होतं…!” मी तिला म्हणाले,.. ” होय, पण तुझ्या वडिलांनी तुला Rich & Handsome नवरा बघून दिला ” …अकरावी नंतर लगेचच तिचं लग्न झालं ! काही वर्षे ती आबुधाबीला होती,आता मुंबईत आहे !
या पाच मैत्रीणींनी सुखाचे संसार केले ! त्या आदर्श गृहिणी, आदर्श माता आहेत ! पन्नास वर्षानंतर एकमेकींना नव्याने जाणून घेताना हे विशेष जाणवलं की हुशार मुलींच्या बाबतीतही…शिक्षण..करियर पेक्षा लग्नालाच अधिक महत्त्व दिलं जात होतं आमच्या काळात !
माधुरी एकदा मला म्हणाली होती, “राणी तू मराठीची प्राध्यापक झाली असतीस”! तिच्यासारख्या हुशार मुलीकडून असं काही ऐकून मी भरून पावले होते ! मी कधीच हुशार किंवा अभ्यासू नव्हते, अकरावी नंतर लगेचच माझंही लग्न होईल असं मला वाटत होतं, कारण नववीत असल्यापासून मला “स्थळं” येत होती ! मी अजिबातच महत्वाकांक्षी नव्हते/ नाही. तरीही कुठल्या प्रेरणेतून मी पुणे विद्यापीठाच्या मास्टर डिग्रीपर्यत पोहचले माझं मलाच कळत नाही ! असो…..
आमच्या बॅचच्या या हुशार मुलींचं हे कौतुक आणि अभिनंदनही ! या पाचही जणी शाळेत असताना दिसायच्याही छान ! आजही छान दिसतात ! सलाम तुम्हाला पंचकन्यानो !
☆ “कोदंड राम मंदिर”… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
पूर्व गोदावरी जिल्हा, आंध्रप्रदेश येथील हे कोदंड राम मंदिर…
भारतात सुई सुद्धा बनत नव्हती असं ज्या देशद्रोहीना वाटतं, त्यांनी नीट बघावं म्हणून ही पोस्ट.
कागदावरही जे रेखाटणे अवघड आहे ते दगडात कोरलेले आहे. आपल्या पूर्वजांच्या हातातून जणू काही देवाने घडवून आणलेले शिल्प आहे हे.
कोदंडराम मंदिर हे भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील काकीनाडा जिल्ह्यातील गोल्लाला ममिदादा येथे स्थित एक हिंदू मंदिर आहे . हे मंदिर विष्णूचा सातवा अवतार रामाला समर्पित आहे . हे गोदावरीची उपनदी तुळयभागाच्या (अंतरवाहिनी) काठावर बांधले गेले .
हे मंदिर त्याच्या अद्वितीय स्थापत्यकलेसाठी आणि दोन विशाल गोपुरमसाठी प्रसिद्ध आहे जे १६० – १७० फूट ( ४९ – ५२ मीटर) आणि २०० – २१० फूट (६१ – ६४ मीटर) उंच आहेत. मंदिरातील गोपुरम रामायण , महाभारत आणि भागवतातील दृश्ये दर्शविणाऱ्या गुंतागुंतीच्या कोरीव मूर्तींनी सुशोभित केलेले आहेत . मंदिराचे बांधकाम १८८९ मध्ये सुरू झाले, जेव्हा द्वारमपुडी सुब्बी रेड्डी आणि रामी रेड्डी या भावांनी जमीन दान केली आणि राम आणि सीतेच्या लाकडी मूर्ती असलेले छोटे मंदिर बांधले . एक मोठे मंदिर १९३९ मध्ये बांधले गेले. दोन गोपुरम १९४८ – ५० आणि १९५६ -५८ मध्ये बांधले गेले.
मंदिराला ‘चिन्ना भद्राडी’ किंवा ‘छोटे भद्राचलम ‘ असेही म्हणतात. हे आंध्र प्रदेशातील वोंटीमिट्टा येथील कोडंडराम मंदिरासह दोन सर्वात लोकप्रिय राम मंदिरांपैकी एक आहे. श्री राम नवमी हा मंदिरात साजरा केला जाणारा सर्वात प्रमुख सण आहे आणि त्यात राम आणि सीता यांचा वार्षिक विवाह सोहळा असतो. मंदिरात साजरे होणारे इतर महत्त्वाचे सण म्हणजे वैकुंठ एकादशी आणि विजयादशमी.
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘महापौर’ शब्दाचा जन्म… भाग – 2 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन☆
(सावरकरांची अजोड तत्वनिष्ठा आणि साक्षात बृहस्पतीलाही लाजवेल अशी बुद्धिमत्ता.)
(शिपाई मान डोलावत अदबीने निघून गेला. ‘आपल्याला केवढा मोठ्ठा मान दिला जातोय’ असं वाटून जगतापचीही छाती फुगली! त्या आनंदातच तोही परतला.) इथून पुढे —
दोघेही गेल्यावर गणपतरावांनी अक्षरश: झडप घालून ते पत्र हातात घेतलं. आपल्या गुरूंचं पत्र ! आपल्या देवाचं पत्र !! साक्षात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पत्र !!! — गेले चार दिवस या-त्या सगळ्या लोकांच्या आणि सगळ्या नेत्यांच्या शुभेच्छा येत होत्या. पण आपली नजर लागली होती ती केवळ याच पत्राकडे. कित्येकदा वाटलं होतं की धावत जावं तात्यारावांकडं आणि सांगावं.. —
– ‘तात्याराव… तात्याराव बघा ! मी मेयर झालोय तात्याराव ! या विद्वज्जनांच्या पुणे नगरीने हिंदूमहासभेच्या बाजूने कौल दिलाय ! तात्याराव, तुमचे हिंदूराष्ट्राचे स्वप्न साकारण्याच्या मार्गात आज अजून एक पाऊल पुढे टाकलंय आपण ! आणि त्या पावलात कणभर का होईना पण तुमच्या या शिष्याचा वाटा आहे … या गणपत नलावड्याचा वाटा आहे, तात्याराव !’
— आणि ज्यावेळी येणाऱ्या संदेशांपैकी एकही संदेश तात्यारावांचा निघत नव्हता, तेव्हा कसे खट्टू झालो होतो आपण ! नुसत्या आठवणीनेच गणपतरावांना एखाद्या लहान बालकासारखे हसू फुटले !
त्याभरातच थरथरत्या हातांनी त्यांनी ते पत्र एकवार भाळी लावले. मग हलक्या हातांनी त्यांनी ते फोडले. आत सावरकरांनी स्वहस्ते लिहिलेला कागद ! पत्राच्या सुरुवातीस सावरकरांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे लिहिलेल्या ‘श्रीराम’ कडे त्यांनी किंचित काळ डोळे भरून पाहिले. सावरकरांची छबी दिसली असावी बहुतेक गणपतरावांना त्यात ! ते अधीर होऊन वाचू लागले —
“प्रति श्री. गणपत महादेव नलावडे यांस,
सप्रेम नमस्कार.
पुण्याची धुरा आता समर्थ हातात आलीये म्हणायची ! तुम्ही ही नवस्वीकृत भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडालच, यात मला किंचितही शंका वाटत नाही. तुम्हाला या जबाबदारीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा !
खरं म्हणजे मी तुमची क्षमाच मागायला हवी. पत्र पाठवायला अंमळ, नव्हे बराचसा उशीरच झालाय. पण काय करू ! तुम्हाला माझे हे भाषाशुद्धीचे धोरण तर ठाऊकच आहे. ज्यांच्याशी भांडायचं त्याच इंग्रजीला आपल्या देशी भाषांचा भ्रतार बनवायचं? तेही आपल्या देशी भाषा स्वत:च अतिशय संपन्न आणि सामर्थ्यवान असताना? आपणच परकीय शब्द घुसडून आपल्या वैज्ञानिक आणि अर्थवाही भाषेचे व शब्दांचे मूल्य का म्हणून उणावून घ्यायचे? …. जिथं स्वकीय भाषांतील प्रतिशब्द उपलब्ध आहेत, तिथे ते योजायलाच हवेत. तिथे इंग्रजीचे वा ऊर्दू-फारसीसुद्धा अन्य कुणाही परकीय भाषेचे भलते लाड नकोतच ! मात्र जिथे शब्दांना प्रतिशब्द उपलब्ध नाहीत, तिथेही देववाणी संस्कृतला शरण जात सोपे, सुटसुटीत आणि अर्थवाही शब्द शोधणे व ते बोलीभाषेत रुळवणे, हे देखील आपले तितकेच महत्वाचे असे राष्ट्रीय कर्तव्य आहे !
उदाहरणार्थ – ते ‘स्कूल’ म्हणतात, मला त्यासाठी ‘शाळा’ हा पर्याय सुचतो.
ते ‘हायस्कुल’ म्हणतात – त्याला आपण ‘प्रशाला’ म्हणू शकतो.
ते ज्याला ‘टॉकीज’ अथवा ‘सिनेमा’ म्हणतात, त्यासाठी ‘बोलपट’ अथवा ‘चित्रपट’ असे दोन शब्द सुचताहेत मला – यातला कोणता शब्द वापरायचा ते तेवढे ठरवायचे.
‘अप-टु-डेट’ला ‘अद्ययावत’ म्हणता येईल,
‘ऍटमॉस्फिअर’ला ‘वायुमान’ म्हणता येईल,
‘पोलिस’ला ‘आरक्षी’ म्हणता येईल.
‘तारीख’ला ‘दिनांक’ म्हणता येईल. असे बरेच काही…
मात्र माझे घोडे या ‘मेयर’ शब्दाच्या तटावर अडले होते. त्यासाठी पर्यायी शब्द काही सुचत नव्हता आणि तुम्हाला ‘मेयर’ म्हणून शुभेच्छा देणे मनाला पटत नव्हते. आता काहीच सुचणार नाही, असे वाटत असतानाच एक शब्द स्फुरला — ‘महापौर‘.
साधारण मोठ्या गावाच्या प्रमुखास ‘मेयर’ म्हणतात. अश्या मोठ्या गावांच्या मागे ‘पूर’ लावायची आपल्याकडे पद्धत आहे. अगदी वैदिक काळापासून आहे. आणि अश्या ‘पुरा’त राहाणाऱ्या रहिवाश्यांना म्हणतात, ‘पौरजन’. तुम्ही या पुणे नामक ‘पुरा’चे प्रमुख आहात… प्रथम नागरिक. त्याअर्थी तुम्ही झालात – महापौरजन ! आणि त्याचेच सुटसुटीत रूप आहे – ‘महापौर’!
असा अर्थपूर्ण शब्द सापडल्या-सापडल्या ताबडतोब पत्र लिहावयास घेतले आणि ताबडतोब धाडलेसुद्धा ! तेव्हा, महापौर गणपतराव नलावडे, तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!”
खाली दिनांक आणि सावरकरांची घुमावदार स्वाक्षरी होती!
— पत्र वाचत असतानाच गणपतरावांचे मन सावरकरांची अजोड तत्वनिष्ठा आणि साक्षात बृहस्पतीलाही लाजवेल अशी बुद्धिमत्ता, यांच्यासमोर नत झाले होते. भानावर येताच गणपतराव धावत-धावत आपल्या कार्यालयाबाहेर आले. त्यांना असे आलेले पाहून बाहेर उभे असलेले लोक चमकलेच. शिपाई बिचारा गोंधळून उभा राहिला. तिकडे कुठेच लक्ष न देता त्यांनी दारावर लावलेली पाटी उतरवण्याची खटपट चालू केली.
“काय झालं सायेब”, शिपायाने बावरून विचारले.
“तू लागलीच पळ आणि नवी पाटी बनवायला टाक. अश्शीच नक्षी हवीये अगदी ! फक्त त्यावर लिहिलेलं हवंय — “ गणपत महादेव नलावडे, महापौर “! — समजलं? जा लवकर ”, असे म्हणून त्याच्याकडे वळूनदेखील न पाहाता गणपतरावांनी पाटी उतरवण्याचे काम सुरूच ठेवले !
शिपाई बिचारा काहीच न समजून जागीच उभा होता. बेट्याला काय कल्पना की, तो एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाला होता !
हो, सावरकरांनी मराठी भाषेला अजून एक चिरंतन टिकणारी आणि लवकरच सर्वमान्य होणारी देणगी दिली होती ! आज एका शब्दाचा जन्म झाला होता !!
— समाप्त —
संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
विद्यार्थी समुपदेशक — पद्मभुषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नाॅलाॅजी. इथे महिन्याला ३५ ते ४० विद्यार्थ्यांचं समुपदेशन केलं जातं.
प्रकाशित साहित्य: राज्यातील विविध वृत्तपत्रे, नियतकालिक, मासिक यामध्ये लेख व कवितांना प्रसिध्दी. दै. लोकसत्ता मधून काही लेखाना प्रसिध्दी.
पणती – काव्यसंग्रह प्रकाशित.
वयात येताना – पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर
विविधा
☆ क – क करियर… ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे☆
हजारो पालकांना, मुलांशी संवाद साधत असताना अनेकवेळा असं वाटत राहतं की, भारतात बाळांचा जन्म होतंच नाही. इथे जन्मतात इंजिनियर्स, डाॅक्टर्स, वकील, मार्केटिंग गुरू, सरकारी नोकर, खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी, एच आर, एम आर म्हणजे पैसे मिळवणारी जिवंत मशिन्स. कारण गर्भात असताना बाळाच्या कानावर आई वडिलांची स्वप्नंच पडतात. आपलं बाळ मोठं झाल्यावर प्रथितयश डाॅक्टर होणार. तो आय टी कंपनीत नोकरी करणार. यु एस मधे शिक्षण घेऊन तिकडेच स्थायिक होणार. बाळाच्या चाहुली बरोबरच त्याच्या करियरसाठीचं नियोजन सुरू होतं. बाळाचे डोळे आकाराला येण्यापूर्वीच त्याला स्वप्नं दाखवली जातात. जेंव्हा मुलगा क – क कमळ हाताने गिरवत असतो. त्याचवेळी पालकांच्या डोक्यात मुलाचं क – क करियर एखाद्या वादळासारखं चकरा मारत असतं.
भारतात स्वत:चं करियर पणाला लावून मुलांचं करियर घडवू पाहणारे पालक मोठ्या प्रमाणात आहेत. पोटाला चिमटा काढून मुलांचं करियर घडवण्याचा प्रयत्न करणारे, मुलांना शिक्षणात काहीही कमी पडू नये म्हणून मुलांच्या सर्व मागण्या पुरवणारे, मुलांच्या मुलभूत शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी जिद्दीने कष्ट करणारे, वडिलोपार्जित संपत्ती मुलांवर खर्ची घालणारे असे अनेकविध प्रकारातील पालक दररोज भेटतात. आपल्याकडील जवळजवळ सर्वच पालकांना ठराविक क्षेत्रातील उच्च शिक्षण हे पैसे मिळवण्यासाठी, भविष्यात स्थिरस्थावर होण्यासाठी महत्वाचा आणि खात्रीचा मार्ग आहे असंच वाटत असतं. परंतु करियर हे मुलांच्या आवडीच्या क्षेत्रातही होऊ शकतं. त्या क्षेत्रातील उच्च शिक्षण घेता येऊ शकतं. अशा क्षेत्रावर आणि आपल्या मुलांवरही पालकांचा विश्वास नसतो. त्यानी सुचवलेल्या क्षेत्रातच मुलानी करियर करावं असा अट्टाहास बर्याच पालकांचा असतो.
मुलांना हव्या त्या क्षेत्रात स्थिर होऊ दिलं तर कदाचीत पैसे कमी मिळतील पण आनंद केवढा मिळेल. समाधान किती मिळेल. या सुखाच्या कल्पनांना कोणत्या पॅकेजमधे कसं बसवता येईल. याचा थोडातरी विचार पालकांनी करायला हवा. तसेच करियरच्या मागे धावणार्या तरूणांनी क क करियर व्यवस्थित समजून घ्यायला हवं. तरच तरुणांमधले मानसिक घोटाळे संपुष्टात येण्यासाठी मदत होईल.
काही क्षेत्रात मिळणार्या एखाद्या पॅकेजचा तुलनेने गाजावाजा होत नाही म्हणून त्या पर्यायांकडे दुर्लक्ष केलं जातं. भारतात असे कितीतरी चित्रकार आहेत ज्यांचं एक चित्र लाखाची कमाई करून देतं. अॅनिमेशन पदवीधारक असणारे कितीतरी तरुण वीस बावीस लाखाचं पॅकेज घेत आहेत. फोटोग्राफर्सची कमाई सुध्दा काही कमी नसते. वाईल्ड फोटोग्राफर्स तरी एक वेगळाच थरार अनुभवण्यात यश मानतात. चित्रपट सृष्टीमधे तर विविध तर्हेचं कौशल्य असणार्यांना अनेक संधी आहेत. करियरची संधी अजमावण्यासाठी हजारो क्षेत्र उपलब्ध आहेत. परंतु विद्यार्थी पालकांची नजर ठराविक क्षेत्रावरुन हलतंच नाही. मुलाना वेगळं काहीतरी करायचं असतं परंतु ते वेगळं काय हे शोधता येत नाही. पालकांचा संकुचित दृष्टिकोन मुलाना त्यांची स्वत:ची पायवाट तयार करु देत नाही. मुलांना करियर निवडीचं स्वातंत्र्य दिलं जात नाही.
एका महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकणार्या एका मुलाने माझं भाषण होईपर्यंत माझंच स्केच काढलं. नंतर मला ते गिफ्ट दिलं.तेंव्हा म्हणाला,”स्केच काढणं ही माझी आवड आहे.आतापर्यंत मी १५० पेक्षा जास्त स्केचीस काढल्या आहेत. वडिलांची इच्छा म्हणून मी इकडे आलोय.”
दुसरा एक मुलगा भाषण होईपर्यंत रडत होता. नंतर जवळ बोलावून विचारलं. तेव्हा म्हणाला,” मला बेस्ट कोरिओग्राफर व्हायचंय.इथे माझा जीव गुदमरतोय. अभ्यासात लक्ष लागत नाही. फेल झालो तरी आई बाबा नाराज होणार पण मला हे करायचंच नाही. आई बाबा माझं काहीही ऐकून घेत नाहीत.”
एका मुलीला प्राण्यांचं मानसशास्त्र शिकायचं होतं. तिने पालकाना सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकलं नाही. किती वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण विषय आहे.पण पालकांच्या इच्छेपुढे तिचं काही चाललं नाही.
आज घडीला अशी शेकडो उदाहरणं देता येतील. अशा पालकाना मुलांच्या भविष्याची चिंता असते. परंतु त्यांचा वर्तमान चितेवर ठेवून कसलं भविष्य घडवण्याची भाषा हे पालक करत असतात तेच कळत नाही. शिक्षण घेतल्यानंतरची आपल्याकडे नोकरीसाठी काय परिस्थिती आहे हे लक्षात यावं याकरता एक उदाहरण पाहूया. तमिळनाडू विधानसभेत १४ सफाई कामगार हवे होते. त्या नोकरीसाठी ४६०० इंजिनियर्स आणि एम बी ए पदवी प्राप्त मुलानी अर्ज केले होते… असं अनेक ठिकाणी घडतंय.
चांगलं शिक्षण घेऊनही जेंव्हा नोकरी मिळत नाही तेंव्हा करियर म्हणायचं तरी कशाला आणि शिक्षण घेऊन करायचं तरी काय असा प्रश्न सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आणि पालकांना पडणं साहजिकच आहे. खरंतर शिक्षण घेत असतानाच करियरचा विचार व्हायला हवा. मार्कांवरती अवलंबून न राहता आपल्या आवडी निवडी वरही थोडा विश्वास ठेवायला हवा.
यशाची व्याख्येतील विविधता- प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी असते. भरपूर पैसै मिळवण्यात एखाद्याला यश वाटत असेल. तर कुणाला प्रसिध्दीमधे यश वाटत असेल. एखादा रोजची कामं नीट झाली यातच यश समजत असेल. एखाद्याला आज पोटभर खायला मिळालं यातच यश वाटत असेल. आपलं यश आपण कशात मोजतो हे समजणं महत्वाचं आहे. त्यानुसार यशप्राप्तीसाठी नियोजन करणं आवश्यक आहे.
वेगळी वाट शोधलीच पाहिजे – इतरांनी शोधलेल्या मार्गावर जाणे सहज सोपे असले तरी त्याच मार्गावरून हजारो आधीच पोहोचलेले असतात. त्या गर्दीत हरवून जाण्यापेक्षा वेगळी पायवाट निर्माण करणं कधीही खडतरच असतं. परंतु त्या मार्गावरून हजारो आपल्या मागे येतात. आणि काहीच दिवसात या पायवाटेचा महामार्ग होऊ शकतो. हा विश्वास तरुणांमध्ये निर्माण करायला हवा.
अपयशातही साथ देणारेच खरे पालक- शिक्षणानंतरही मुलांना जेव्हा नोकरी मिळत नाही तेव्हा मुलांपेक्षा जास्त पालकच खचून जातात. चिडचिड करतात. मुलांना अपशब्द बोलतात. मुलांच्या भावना समजून घेण्यापेक्षा स्वत:च्या अनियंत्रित भावना मुलांवर लादतात. मुलांना अपयशाचा सामना करायचा असतो. तिथे पालक साथ देत नाहीत.
‘स्व’ चा शोध घेता आला पाहिजे – स्वत: मधील क्षमता आणि कमतरता माहित असल्या पाहिजेत. कोणतंही व्यावसायिक क्षेत्र निवडताना आपण हे का निवडत आहोत याची स्पष्टता असायला हवी. कोणत्याही कारणास्तव हे क्षेत्र जबरदस्तीने निवडले गेले असेल तर त्यात जाणीवपुर्वक आवड निर्माण करता येऊ शकते.
भविष्याचा वेध- पैसा,नोकरी, छोकरी सगळं हवंय पण त्यापलीकडे जाऊन आपल्याला आपलं काम मनापासून स्विकारता येतंय का याचा वेध घ्यायला हवा. तर भविष्य सुरळीत होतं.
कौशल्याधिष्ठीत शिक्षण – नोकरीसाठी शिक्षण, त्यासाठीच अभ्यास ही संकल्पना बदलली पाहिजे. व्यवसाय, छोटा उद्योग करण्यासाठीचं शिक्षण उपलब्ध व्हायला हवं. आयटीआय, नर्सिंग, आॅटोमोबाईल्स सारख्या शिक्षण संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायला हव्यात.
अशा संधींचा विचार करायचा झाला तर फॅशन डिझाईनर,चामड्याच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधन, घड्याळं, दागिने, फरफ्युम्स, गाड्या, मयक्रोसाॅफ्ट, गुगल, फेसबुक, वाॅल मार्ट, फार्मास्युटिकल, इव्हेंट मॅनेजमेंट, फाॅरेन्सिक सायन्स, इंटिरियर डिझाईन, फिजिओथेरपी, नर्सिंग, पत्रकारिता, फोटो पत्रकार, अॅनिमेटर, गुन्हेगारी शास्त्र, मानसशास्त्र, लेखक, खेळाडू, शुज डिझाईनर, चित्रपट, नाट्य,नृत्य, संगीत, खेळातील पंच,ओशियनग्राफी, डिजिटल मार्केटर,ग्राफिक डिझाईनर,आय टी आय अशी अनेक क्षेत्रं लाखो रुपयांची कमाई करुन देऊ शकतात. त्यासाठी आपल्या आवडीचं क्षेत्र निवडण्याचं धाडस करायला हवं. नेमकं करियर शोधायला हवं. स्वत:चं निरीक्षण केलं तर निश्चितंच करियर सापडू शकतं.त्याला पालकांची साथ असेल तर मुलांची प्रगती होतंच असते.
क -क करियर म्हणजे फक्त रोजगार मिळवणं नाही तर कोणतंही काम करताना जगण्याचा आनंद घेणं होय. करियर शोधताना योग्य मार्गदर्शन करुन तरुणांची ऊर्जा टिकवून ठेवणं हे आव्हान पालकांनी स्वीकारायला हवं. काॅलेजमधून बाहेर पडल्याबरोबर सर्वोच्च पद, मान सन्मान लगेचच मिळत नाही हे लक्षात घ्यायला हवं. त्यासाठी कष्ट करणं, नविन गोष्टी शिकून घेणं, संबंधित कामाचं ज्ञान आत्मसात करणं, प्रश्न समजून घेण्याच्या क्षमतेचा विकास करणं अशा गोष्टी जमायला हव्यात. आपले विचार मुक्तपणे आणि ठामपणे मांडता यायला हवेत. भावनांक चांगला असायला हवा. तरुणांचा देश असणार्या भारतात तरुणांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी सर्वानी मिळून घ्यायला हवी नाहीतर त्यांच्या हातात व्यसनाधिनतेचे पेले असतील. आणि त्यांचं डोकं मानसिकतेनं खचलेलं, अनेक छिद्र पडलेलं मडकं असेल.
४ जून ची संध्याकाळ. मावळत्या सूर्या बरोबर मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील एक तळपतं व्यक्तिमत्व अनंतात विलिन झालं. आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रत्येकाच्या मनात आपुलकीची, जिव्हाळ्याची जागा निर्माण करणारे एक सोज्वळ, शांत, हसरं व्यक्तिमत्व हरपलं ते म्हणजे सुलोचनादीदी.
त्यांचं मूळ नाव ‘रंगू’. पण त्यांचे बोलके डोळे बघून भालजी पेंढारकरांनी त्यांचं नाव ठेवलं ‘सुलोचना’. तेच खूप लोकप्रिय झालं. त्या सर्वांच्या ‘दीदी’ झाल्या.
त्यांनी असंख्य मराठी हिंदी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका केल्या. आपल्या अकृत्रिम अभिनयाने प्रत्येक भूमिका त्या जगल्या आणि आई, वहिनी, बहीण आजी ही त्यांची नाती प्रेक्षकांच्या मनात दृढ झाली. त्यांनी साकारलेली आई म्हणजे साक्षात वात्सल्यमूर्तीच होती. त्यांच्या ऐतिहासिक भूमिका रूबाबदार, भारदस्त, करारी होत्या. त्यांचं शांत, सोज्वळ, प्रसन्न रूप आणि प्रेमाची वत्सल नजर कायम मनात कोरली गेली आहे.
कितीतरी गाणी ऐकली की नजरेसमोर त्यांचे सात्विक रूप तरळून जाते. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम, पडला पदर खांदा तुझा दिसतो, माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं, रे उठ रानराजा झाली भली पहाट ही गाणी त्यांच्या अभिनयाने मनात ठसली आहेत.
प्रत्यक्ष जीवनातही त्यांच्या मायाळू, सात्विक, सौहार्दपूर्ण वागणुकीने सर्वांशी त्यांचे जवळचे नाते जुळले होते. त्यांचे जाणे आज प्रत्येकाला हेलावून गेले. आपल्याच घरातली कुणी जिव्हाळ्याची व्यक्ती गेली अशीच प्रत्येकाची भावना आहे. ज्यांच्या जाण्याने चटका लागतो, एक पोकळी निर्माण होते अशांपैकीच त्या एक होत्या. त्यांच्या जाण्याने एक सात्विक पर्व संपले आहे.
☆ मला आलेला विचित्र अनुभव… – लेखिका – सुश्री वैदेही मुळये ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
‘द केरला स्टोरी ‘ च्या पार्श्वभूमीवर मला आलेला अनुभव share करावासा वाटतोय, म्हणून हा लेख.
नक्की वाचा.
ही घटना कुठल्या दुसर्या शहरातील नाही तर मुंबईतली. मी शक्यतो कितीही घाईत असले तरीही काही गोष्टींची पडताळणी करते आणि मगच रिक्षा किंवा टॅक्सी यातून प्रवास करते.
ही गोष्ट आहे एप्रिल महिन्यातली. मी रिक्षेने प्रवास करत होते. (सर्व पडताळणी करूनच.) त्यातला रिक्षावाला- ‘ कुठून आलात, कुठे राहता, रोज याच वेळेत येता का,’ असे प्रश्न विचारायला लागला. मी स्पष्टपणे त्याला खडे बोल सुनावले. तो काही वेळ शांत बसला. परत थोड्यावेळाने ” या भागात ना मॅडम बस जात नाहीत. इतर रिक्षावाले पण जास्त पैसे घेतात.” अशी माहिती द्यायला त्याने सुरवात केली.
माझं उतरायचं ठिकाण आलं. मी मीटरप्रमाणे त्याला पैसे द्यायला गेले. तर त्याने चक्क 20 रुपये कमी घेतले. मी त्याला त्याचं कारण विचारलं तर म्हणाला, “आम्हाला पैसे नाही.. तुम्ही महत्त्वाचे आहात.” मला हे खटकलं.
पुढे तो म्हणाला “ तुम्हाला साधारण किती वेळ लागणारे, मी थांबतो तुमच्यासाठी.” मी म्हंटलं “ कशाला, मला 3 तास तरी लागतील.” हे सांगितल्यावर देखील त्याची थांबायची तयारी होती. मी नको म्हंटलं तर म्हणाला “ मग तुमचा नंबर मला द्या मी फोन करतो.” आत्तापर्यंत हळू हळू सर्व प्रकार माझ्या लक्षात आला होता. त्यामुळे मी माझा नंबर न देता त्याचाच नंबर घेतला आणि नाव विचारलं. नाव माझ्या अपेक्षेप्रमाणेच निघालं- “हुसेन”
तो पुढे काही बोलणार तेव्हाच मी नमस्कार करत म्हंटलं, “ दादा हे प्रकार थांबवा. श्रीराम तुमचं भलं करो.”
हे म्हंटल्यावर अचानक त्याची खरी आपुलकी त्याच्या चेहर्यावर उमटली आणि तो निघून गेला.
घटना साधी वाटते पण विचार केला आणि बुद्धी आणि डोळे उघडे ठेवले, तर किती गंभीर होती याचा अंदाज येईल.
आणखी काही मुद्दे मी नमूद करू इच्छिते …
– त्याचे दोन्ही कान टोचलेले होते.
– त्याचं नाव आणि त्याचा पेहेराव, भाषा, यांचा ताळमेळ कुठेच जाणवत नव्हता.
– तो सगळे कामधंदे सोडून तीन तास थांबणार होता.(का???) याचा विचार तुम्ही करा.
– मीटरपेक्षा 20 रुपये कमी.(पैसे वाचविण्यासाठी देखील एखादी मुलगी सहज फसू शकते.)
– नको तितकी आपुलकी.
… या प्रत्येक मुद्द्यात मोठं कारस्थान आहे. मी सावध होते म्हणून वाचले. प्रत्येक स्त्रीने सावध राहणं गरजेचं आहे.
या प्रसंगानंतर मी सेक्युलर नाही, तर सनातनी आहे याचा मला अधिक अभिमान वाटू लागला हे निश्चित.
काळजी घ्या आणि ‘केरला स्टोरी’ नक्की पहा.
धन्यवाद.
लेखिका : सुश्री वैदेही मुळ्ये
संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अबुल मुजफ्फर मुहउद्दीन मुहमद हे नाव वाचून फार बोध होणार नाही कदाचित. पण औरंगजेब हे नाव हा देश आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र कसा विसरू शकेल? औरंगजेब म्हणजे सिंहासनरत्न. आणि यालाच आलमगीर अशी उपाधी होती… म्हणजे जगज्जेता! छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूरायांच्या महाराष्ट्राच्या मातीतच या औरंगजेबाला मूठमाती द्यावी लागली. पण आपल्या स्मरणात हा धर्मांध,पाषाणहृदयी आणि सत्तापिपासु औरंगजेबही ठाण मांडून बसला आहे.
पण हेच नाव धारण करणारा आणखी एक भारतीय आपण पुन्हा आठवला पाहिजे… आणि स्मरणातही ठेवला पाहिजे… औरंगजेब महम्म्द खान असे या वीराचे नाव…रायफलमॅन औरंगजेब खान… भारतीय सेना !
रायफलमॅन औरंगजेब यांचे वडील मोहम्मद हनीफ भारतीय लष्करात जम्मू अॅन्ड कश्मीर लाईट इन्फंट्री मध्ये सैनिकी सेवा करून निवृत्त झाले आहेत. एक भाऊ आधीच सैन्यात आहे. रायफलमॅन औरंगजेब खान यांच्या एका काकांनी दहशतवादी विरोधी कारवाईत आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. यांचे आणखी दोन भाऊ मोहम्मद तारीख आणि मोहम्मद शब्बीर प्रादेशिक सेनेत भरती होऊन देशसेवा करत आहेत.
हे औरंगजेब खान जम्मू-कश्मीरच्या ४४व्या राष्ट्रीय रायफल्स जम्मू अॅन्ड कश्मिर लाईट इन्फंट्रीमधील वीर शिपाईगडी…तरणेबांड,नीडर नौजवान..२०१२ मध्ये भरती झालेले. सैनिकी संस्कार रक्तात भिनलेले औरंगजेब सैनिक सोडून दुसरे काहीही होण्यासाठी जन्मालाच आलेले नव्हतेच मुळात. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून औरंगजेब यांनी फौजी वर्दी अंगावर चढवली. भारतात घुसलेले परकीय दहशतवादी आणि देशाशी बेईमान असलेले स्थानिक माथेफिरू यांच्याविरुद्ध भारतीय सेनेच्या सुरू असलेल्या अनेक कारवायांमध्ये रायफलमॅन औरंगजेब खान आघाडीवर होते.
२०१८ हे वर्ष भारतीय सैन्य आणि अतिरेकी यांच्या संघर्षात भारताच्या बाजूने झुकते माप टाकणारे सिद्ध झाले होते. ४४,राष्ट्रीय रायफल्सच्या युनिटने या वर्षी थोड्या-थोडक्या नव्हे तर तब्बल १९ अतिरेक्यांना त्यांच्या ‘आखरी अंजाम तक’ जाण्यात मोठी मदतच केली होती. ह्या युनिटच्या प्रवेशद्वाराबाहेर एक वाक्य लिहिलेला फलक आहे…त्यावर लिहिलेलं आहे…’ आज कॉन्टॅक्ट होगा ! म्हणजे आज आपली आणि अतिरेक्यांची समोरासमोर भेट होणारच आहे…तयारीत रहा गड्यांनो ! ….. ‘
अतिरेकीविरोधी कारवाई धडाक्यात सुरू होती…अनेक अतिरेकी मारले जात होते…त्यात एक मोठे नाव होते… समीर अहमद भट उर्फ टायगर ! हा हिजबुल मुजाहिद्दीनचा स्वयंघोषित कमांडर होता. यानेच मेजर मोहित शुक्ल यांना ‘मला मारून दाखव’ असे आव्हान विडीओद्वारे दिले होते. मेजर शुक्लसाहेबांनी त्याला त्याची विडीओ-धमकी चोवीस तास जुनी व्हायच्या आतच यमसदनी धाडला !
स्थानिक भागाची, इथल्या तरुणांच्या मानसिकतेची, त्यांच्या शक्ती आणि मर्मस्थळांची उत्तम माहिती असलेले औरंगजेब म्हणजे भारतीय सेनेच्या हातात असलेले अमोघ अस्त्रच बनले होते. अनेक धाडसी कारवायांमध्ये औरंगजेब सहभागी होते. अशाच एका कारवाईत बारामुल्ला मध्ये औरंगजेब यांनी एका जखमी सैनिकाचे प्राण वाचवताना तीन अतिरेक्याना ठार केले होते.
ईद जवळ आली होती. रायफलमॅन औरंगजेब ईद साजरी करण्यासाठी सुट्टी घेऊन घरी निघाले होते. सैनिकांना सुट्टीवर जाताना शस्त्रे सोबत घेऊन जाण्याची अनुमती नसते. म्हणून औरंगजेब नि:शस्त्र होते. आपल्या युनिटच्या जवळूनच त्यांनी एका खाजगी कार चालकाकडे बसस्टॅन्डपर्यंत जाण्यासाठी लिफ्ट घेतली. परंतु दुर्दैवाने त्यांच्या हालाचालींवर शत्रूची नजर होती. कुणी तरी फितुरही झाले असावे बहुदा ! कार युनिटपासून दूर गेल्यावर लगेच त्यांच्यावर हल्ला केला गेला. कारमधून ओढून घेऊन शस्त्राचा धाक दाखवून त्यांचे अपहरण करण्यात आले. दूर जंगलात नेऊन त्यांच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले. काश्मीर खो-यातील जे तरुण देशाच्या बाजूने उभे आहेत, त्यांना धाक दाखवण्यासाठी, मनोधैर्य खच्ची करण्यासाठी त्या अतिरेक्यांनी औरंगजेब यांचा विडीओ बनवून प्रसारित करण्याचा घाट घातला होता. त्यांना वाटले असावे…हा गडी घाबरेल..प्राणांची भीक मागेल ! पण यातले काहीही झाले नाही. रायफलमॅन औरंगजेब यांनी त्यांच्या डोळ्यांत डोळे घालून सांगितले…” फौजी हूं….मौत से कैसा डर? मै अपना फर्ज निभा रहा हूं….तुम्हे जो करना है कर सकते हो !” आणि हे सांगताना औरंगजेब यांच्या चेह-यावर भीती नावाच्या भावनेचा लवलेशही नव्हता. आणि अर्थातच याचा त्या अतिरेक्यांना प्रचंड संताप आला असावा….त्यांनी तब्बल दहा दिवस त्यांना अमानुषपणे छळले आणि दहाव्या दिवशी रायफलच्या गोळ्यांनी छिन्न विछीन्न झालेला औरंगजेब यांचा देह रस्त्यावर टाकून ते अतिरेकी जंगलात पळून गेले ! दिवस होता १४ जून २०१८.
रायफलमॅन औरंगजेब खान यांच्या अंत्ययात्रेस हजारोंचा जनसमुदाय लोटला होता… अतिरेक्यांच्या अंत्ययात्रांना जमतो त्यापेक्षा कितीतरी जास्त ! भारतीय सैन्याने पूर्ण सैनिकी सन्मानाने त्यांना अंतिम निरोप दिला. या अलौकिक त्यागाची दखल घेत भारतीय सेनेने औरंगजेब यांना १४ ऑगस्ट २०१८ या दिवशी मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर केले. त्यांच्या जन्मगावातील काही तरुण गल्फ देशांमध्ये नोकरीस होते. त्यांनी भारतीय लष्करी दलांत सामील होऊन औरंगजेब यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्या नोक-या सोडून भारतात परतण्याचा निर्णय जाहीर केला… या बलिदानाच्या काहीच महिन्यानंतर औरंगजेब यांना मारण्यात सहभागी असलेला एक अतिरेकी आपल्या सैन्याने ठार केला. दुस-या वर्षीच औरंगजेब यांचे दोन धाकटे भाऊ प्रादेशिक सेनेत भरती झाले ! एका बलिदानाने देशाला आणखी काही सैनिक मिळवून दिले होते…ही बलिदानाची किमया… हुतात्म्यांच्या रक्ताच्या एक-एका थेंबातून एक एक सैनिक तयार होऊ शकतो… म्हणून बलिदाने सातत्याने तरुणांच्या नजरेसमोर असायला पाहिजेत !
१० मे २०२३ रोजी भारताच्या महामहीम राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांनी एका विशेष समारंभात या शूर हुतात्मा सैनिकाच्या माता-पित्याकडे, महमद हनीफ आणि राजबेगम यांच्याकडे त्यांच्या बहादूर मुलाने मिळवलेले शौर्यचक्र सुपूर्द केले ! या कार्यक्रमात मेजर आदित्य कुमार (10,गढवाल रायफल्स) मुदस्सीर अहमद शेख (जम्मू-कश्मिर पोलिस) यांना मरणोत्तर शौर्य चक्र, कॉन्स्टेबल रोहित कुमार (जम्मू-कश्मिर पोलिस) यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांने अत्यंत दु:खद अंत:करणाने हे पुरस्कार स्विकारले. या प्रसंगी महामहिम राष्ट्रपती महोदयांनी शिष्टाचार बाजूला सारत वीरपत्नी आणि वीरमातांना स्वत: पुढे होऊन आलिंगन दिले… त्यांचे अश्रू पुसले… आणि सारा भारत देश तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे… असा संदेश दिला.
या भावपूर्ण समारंभात महामहिम राष्ट्रपती महोदयांनी विविध संरक्षण सेवांमधील शूरांना एकूण आठ कीर्ती चक्र (यात पाच मरणोत्तर), एकोणतीस शौर्य चक्र (यातील पाच मरणोत्तर) प्रदान केली. डिफेन्स इनव्हेस्टीचर नावाने ओळखला जाणारा हा पुरस्कार वितरण समारंभ वर्षातून एकदा आयोजित केला जातो. याचे चित्रण दूरचित्रवाणी बातम्यांमध्ये दाखवले जाते. असे समारंभ खरे तर राष्ट्रीय महत्त्वाचे ठरावेत, शाळांतून-महाविद्यालयांतून याची माहिती दिली गेली पाहिजे.
या लेखातील सर्व छायाचित्रे नीट पहावीत, अशी विनंती आहे. हुतात्मा औरंगजेब यांना अखेरची सलामी दिली जात आहे आणि त्याच छायाचित्रात अतिरेक्यांच्या मगरमिठीत असतानाही नीडर राहिलेले औरंगजेब, त्यांच्या आई-वडीलांनी शौर्यचक्र स्विकारल्यानंतर मा.राष्ट्रपती महोदयांनी त्यांना हात जोडून केलेले अभिवादन, औरंगजेब यांचे दोन्ही भाऊ सैन्यात सामील झाले तेंव्हा त्यांच्या आईच्या चेह-यावरील अभिमान,मा.राष्ट्रपती महोदयांनी वीरमातेला दिलेले सांत्वन-आलिंगन ! हर तस्वीर कुछ कहना चाहती है ! यह देश कब सुनेगा उनकी बाते? सत्ता-संघर्ष, ख-या ख-या पैशांची क्रिकेट-सर्कस, राजकीय-सामाजिक आंदोलनं, मौज-मज्जा यांच्या गदारोळात हे असे महान समारंभ एका बाजूला राहतात….हे खेदजनक आहे, हे कुणीही मान्यच करेल !
… कोण जाणे, हे वाचून कुणी औरंगजेब सेनेची वर्दी शरीरावर परिधान करून देशरक्षणार्थ पुढे सरसावेलही ! जयहिंद !!!
☆ ‘महापौर’ शब्दाचा जन्म… भाग – 1 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन☆
(सावरकरांची अजोड तत्वनिष्ठा आणि साक्षात बृहस्पतीलाही लाजवेल अशी बुद्धिमत्ता.)
दारावर मोठ्ठ्या, सोनेरी अक्षरात पाटी डकवलेली होती –
— “गणपत महादेव नलावडे, मेयर“!
गणपतरावांनी एकवार पाटीकडे नजर टाकली आणि आत, कार्यालयात प्रवेश करते झाले. गेले चार दिवस रोज ही पाटी पाहात होते ते. पुण्याचे मेयर होऊन बरोब्बर चारच दिवस तर झाले होते त्यांना ! बरं कार्यालयात टेबल-खुर्च्या आणि इतर साधनं आहेत, म्हणून त्याला कार्यालय म्हणायचं फक्त. नाहीतर गेल्या चार दिवसांपासून अक्षरशः पुष्पभांडार झालंय त्याचं. हाऽऽ पुष्पगुच्छांचा ढीग ! हार-तुरे, शुभेच्छापत्रे, भेटवस्तू तर वेगळ्याच !
जागेवर बसल्या-बसल्या न राहावून त्यांनी शिपायाला हाक मारली. तोही धावतच आला.
“जी…?”
“ही एवढीच पत्रं आलीयेत का रे…?”
“व्हय जी!”
“नीट आठवून सांग… एखादं पत्र म्हणा, पाकीट म्हणा वा गुच्छासोबत येते तशी चिठ्ठी म्हणा; नजरेतून सुटली तर नाही ना तुझ्या?”
“न्हाई जी. म्या सोत्ताच तर डाकवाल्याकडनं सारी घेऊन लावून ठेवली हितं!”
यावर गणपतरावांचा चेहरा पडला असावा. कारण, शिपायाने ताबडतोब विचारले–
“कोन्ता खास सांगावा यायचा हुता का?”
“नाही नाही… काही नाही. जा तू.”
“सायेब, माज्याकडनं काई चूक झाली का?”
“नाही नाही… अरे खरंच तसं काही नाही. जा तू.”
गणपतराव चांगलेच वरमले. ‘ आपण जरा अतीच तर करत नाही ना,’ असंही क्षणभर वाटून गेलं त्यांना.
शिपाई बावळटासारखा चेहरा करून जायला लागला. तशी गणपतरावांनी त्याला थांबवलं. म्हणाले,
“अरे ऐक… आता मी जरा काम करत बसणार आहे. आज काही कुणाच्या भेटी-गाठी ठरलेल्या नाहीत ना…? ठीक आहे तर ! आता कुणालाच आत सोडू नकोस.”
“जी” म्हणून शिपाई निघून गेला.
‘आपण स्वत:च करावी का चौकशी?’, गणपतरावांच्या मनात येऊन गेलं. पण ‘नको नको. ते बरं दिसणार नाही’, असं म्हणून त्यांनी तो विचार झटकला आणि समोरच्या कामाकडे लक्ष द्यायला लागले.
हळूहळू तो विचार मागे पडला. त्यानंतर चांगले दोन-एक तास गणपतरावांनी स्वत:ला कामातच बुडवून घेतलं. समाधीच लागली होती जणू त्यांची.
गणपतरावांची समाधी भंगली ती कसल्याश्या कोलाहलाने. सुरुवातीचे एक-दोन क्षण काही समजलंच नाही. नीट लक्ष देऊन ऐकायला लागले तेव्हा जाणवलं की, त्यांच्या कार्यालयाच्या दाराशीच दोन व्यक्ती वाद घालतायत. गणपतरावांनी जागेवरूनच, “काय चाललंय रे? कोण आहे?” असं विचारलं. त्याबरोबर शिपाई धावतच आत आला. मागोमाग एक कार्यकर्त्यासारखा दिसणारा मनुष्यही आत शिरला. ते पाहून शिपायाच्या कपाळाला नकळतच आठ्या पडल्या. पण साहेबांसमोर चिडणं बरं दिसणार नाही म्हणून तो काही बोलला नाही. गणपतरावांनी इशाऱ्यानेच ‘काय झालं?’ असं विचारलं. त्यावर शिपाई सांगू लागला,
“सायेब पाहा ना, तुमीच म्हनले होते ना कुनालाच आत सोडू नको म्हनून. तर ह्ये सायेब ऐकेचनात. काय तर म्हने, टपाल द्यायचंय. म्या म्हनलं, टपालच हाय नव्हं, मंग द्या की माझ्यापाशी मी द्येतो सायबास्नी नंतर. तर म्हनले की, न्हाय, म्हासभेच्या हापिसातून आलोय न् म्हत्वाचा सांगावा हाय. तुमालाच द्यायचा म्हंत्यात…”
गणपतरावांनी आलेल्या व्यक्तीला एकवार आपादमस्तक न्याहाळलं. हिंदूमहासभेच्या कार्यालयातून आल्याचं सांगतोय हा माणूस, पण मग आपण कधी पाहिल्यासारखं का वाटत नाहीये याला?
त्यांचे भाव ओळखून तो समोरचा तरुण मघाशीच्या भांडणाचा लवलेशही न दाखवता उत्साही स्वरात सांगू लागला,— “ मी रविंद्र जगताप. राजापूरला असतो. नुकताच मुंबईला आलोय शिकायला. राजापूरला असल्यापासून महासभेचं काम करतो मी. आज कामानिमित्त पुण्यात येणार होतो. तर काल संध्याकाळीच तात्यारावांनी बोलावून घेतलं..”
— ‘तात्याराव? बॅ. सावरकर?’ हा उल्लेख होताच गणपतरावांनी कान टवकारले ! जगतापच्या ते यत्किंचितही लक्षात आलं नाही. त्याचा ओघ चालूच होता,
“…मी म्हटलं, देईन की त्यात काय ! आता साक्षात स्वा. सावरकरांनी काम सांगितलेलं. त्यांची सेवा करण्याची संधी म्हणजे साक्षात स्वातंत्र्यलक्ष्मीचीच सेवा करण्याची संधी की ! घेतलं पत्र आणि आलो इकडे ! तर हे महाशय आत सोडेचनात ! साहेब कामात आहेत म्हणे ! आता मला सांगा, सावरकरांच्या निरोपापेक्षा अजून कोणतं काम महत्वाचं असणार आहे? घ्या…!!!” – असं म्हणून जगतापने पत्र गणपतरावांच्या दिशेने सरकावले.
गणपतरावांच्या हाताला हलकासा कंप सुटला होता. परंतु तसं जाणवू न देता त्यांनी ते पत्र हातात घेऊन एका बाजूला ठेवले आणि जगतापकडे वळून म्हणाले,
“जगतापसाहेब, चहा घेता ना?”
“छे छे साहेब, चहा नको. घाईत आहे मी जरा. बाहेर मित्र वाट पहात थांबलेयत. ते काय… ते पुण्यात नवा आहे ना मी. कार्यालय माहिती नव्हतं मला.”
यावर गणपतराव म्हणाले, “हरकत नाही. पुढच्यावेळी आलात तर चहाला जरुर या !” मग शिपायाकडे मान वळवून म्हणाले, “ पुढच्यावेळी हे आले तर अडवू नकोस रे यांना. पाहुणे आहेत आपले !”
शिपाई मान डोलावत अदबीने निघून गेला. ‘आपल्याला केवढा मोठ्ठा मान दिला जातोय ’ असं वाटून जगतापचीही छाती फुगली ! त्या आनंदातच तोही परतला.
– क्रमशः भाग पहिला
संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈