पर्यटन हा बहुतेकांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. मात्र पर्यटन ह्या विषयाकडे वळतांना प्रत्येक जण वेगवेगळ्या अँगलने विचार करुन त्याची दिशा ठरवितात. काही व्यक्ती निसर्गसौंदर्याचा विचार करुन तशी स्थळं निवडतात. तर काही द-याख़ो-या,गड किल्ले ह्यामध्ये रमतात. काही देवदर्शनासाठी नवसाला पावणा-या सुप्रसिद्ध देवस्थानांची निवड करतात, तर काही आपापल्या गावी असलेल्या कुलदेवतांकडे आपला मोर्चा वळवितात.
पर्यटनाला कुठेही जावं पण जेथे जाऊ तिथली इत्यंभूत माहिती, तिथला इतिहास, हवामान, भौगोलिक परिस्थिती, त्या स्थानाचे वैशिष्ट्य हे सगळं माहितीपूर्ण अभ्यासून घ्यावं… खेदाची बाब अशी की हल्ली त्या फ़ोटो व सेल्फी ह्यांच्या अतिरेकी आवडीने आपण त्या निसर्गसौंदर्याचे, त्या स्थानाचे महत्त्व ना धड डोळ्याने टिपत, ना मनावर बिंबवत, ना मेंदूत ठसवत… आपल्या इंद्रियांना निकामी करुन फक्त तंत्रज्ञानावर अवलंबून असण्याची ही सवय तशी घातकच.
ह्या बाबतीत आम्ही उभयता दोघेही आणि आमचा लेक आधी सगळे डोळ्या़ंनी बघणार, हिंडून सगळं अभ्यासणार, संपूर्ण माहिती गोळा करणार आणि मग जसा वेळ उरेल तसे फोटो काढणार. आजकाल सर्रास एखाद्या स्थळी लोक पोहोचल्या पोहोचल्या आधी सेल्फी व फोटोसेशन नी मग लगेच त्या फोटोंचे सोशल मिडियावर अपलोडींग. आजकाल सोशल मीडियावर कुटुंबाचे वा मित्रमैत्रीणींचे फोटो टाकले तरच प्रेम वा मैत्री असं नसतं, कारण सोशल मीडियावरील फेसबुक, व्हाँटसअप हे सगळं आभासी जग असतं. असो
पण एक नक्की .. अभ्यासपूर्ण पर्यटन करायचे असेल तर त्यासाठी आपलं जाणतं वयं, आधी करुन ठेवलेला माहितीपूर्ण अभ्यास, एक व्यवस्थित खरीखुरी माहिती देणारा गाईड, ह्या बाबी अत्यावश्यक. मला आठवतं माझी शाळेत असतांना ट्रीप गेलेली. शैक्षणिक सहल नाव तिचं. अजिंठा, वेरूळ. पण ना त्या ट्रीप बरोबर त्याचा अभ्यास ,आवड असलेले शिक्षक ना कुणी चांगले गाईड. ह्यामुळे अशा सहलींना शैक्षणिक सहल नाव जरी असलं तरी त्यापासून कुठलेही आऊटपुट मिळत नाही हे नक्की.
खूप व्यक्तींमध्ये खूप सारे सद्गुण एकवटलेले असतात. त्यापैकी काही सुप्त रुपात तर काही प्रकट रुपात दिसतात. शनिवारी चतुरंगच्या पुरवणीत सुप्रिया सुळे यांनी कलावंतांचे आनंद पर्यटन ह्या सदरात लिहिलेला ” दगडांच्या आणि फुलांच्याही देशा ” हा एक छान लेख वाचनात आला. सुप्रिया सुळे ह्यांना राजकारणात सक्रिय असलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखत असलो तरी एक अभ्यासपूर्ण लेखन करणारी त्यांच्यातील व्यक्ती मला प्रथमच दिसली. ह्या लेखातील अंजिठा, वेरूळ येथील लेण्यांची माहिती, देवगिरी किल्ला, ताडोबा अभयारण्य वाचल्यानंतर एकदा ह्या स्थळांना आवर्जून भेट देण्याचा मोह हा होतोच.
असेच काहीसे माहितीपूर्ण लेख वाचनात आल्यानंतर काहीसं आगळंवेगळं समाधान हे मिळतंच.
☆ ती ‘गुलाबी’ नोट !… लेखक – श्री रवी वालेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
काल ICICI मध्ये पैसे काढायला गेले होतो. फार नाही पण बऱ्यापैकी गर्दी होती. पैसे जमा करायला आणि काढायला अशा दोन वेगवेगळ्या रांगा होत्या. सगळ्यांनाच लगीनघाई ! २०-२२ वर्षांच्या दोन-तीन चुणचुणीत मुली हा सगळा पसारा हसतमुखाने सांभाळत होत्या. रांगेत मोदी हा एक आणि मागच्या आठवड्यात पैसे नसल्याने झालेली तारांबळ हा दुसरा, हेच विषय सगळे चघळत होते. गुलाबी नोटेवरून हमखास होणारे विनोद होतेच. एकंदरीत झकास चालले होते.
सत्तरीच्या आत बाहेर असणारे ५-६ जण घाबरतच आत आले. बँकांमध्ये असणाऱ्या गर्दीविषयी टीव्हीवर येणाऱ्या बातम्या बघून धास्तावलेले असावेत (बहुतेक NDTV जास्तच बघतं असावेत !).
ह्या नव्या बँका त्यांच्या त्या भव्यतेने, इंटिरियरने अगोदरच कोणालाही बिचकाउन सोडतात. त्यात ते मधाळ इंग्रजीतले अगत्य ! जुन्या बँका कशा ‘आपल्या’ वाटायच्या ! टेबलाटेबलांच्या गर्दीतुन आपला-आपला ‘साहेब’ हुडकायचा आणि डायरेक्ट काम सांगायचं ! नमस्कार करायचीही गरज नसायची. एकदम घरगुती वातावरण अन् रोखठोक बोलणे !
‘ ऊद्या या ‘
‘ ह्याच नोटा मिळतील ‘
‘आम्ही काय गोट्या खेळतोय का? ‘
‘ घरी नाही छापत आम्ही ‘
‘ जा,हो, कमिशनरला जाऊन सांगा, असले छप्पन पायलेत ‘
— असा कसा स्वच्छ, आरस्पानी कारभार ! या नव्या बँका एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखेच नव्या पिढीलाही दबकुन वागायला लावतात, तिथे जुन्या पिढीचं काय !
मी लांबून त्या सगळ्या ग्रुपकडे बघत होतो. एकमेकांत चर्चा करून त्यांच्यातल्या एकाने धीर करून फॉर्म भरत असलेल्या एकाला काही विचारले, त्यानेही त्याचे हातातले काम थांबवून त्यांना एक फॉर्म आणून दिला. त्या फॉर्मचे सामुदायिक वाचन झाल्यावर ग्रूपमध्ये पुन्हा चर्चा झडली. मी अंदाज बांधला की या प्रत्येकाचे काम वेगवेगळे असावे. कोणाला पैसे भरायचे होते, कोणास नोटा बदलून हव्या होत्या, तर कोणाला पैसे काढायचे असावे. त्यांच्यातला जीन्स- टी शर्ट घातलेला एकजण धीटपणे सर्वांना सांभाळत होता. ( हे काका बहुधा बँकेतूनच रिटायर झालेले असावे ) तरीपण त्यांच्याही चेह-यावरचा गोंधळ काही लपत नव्हता ! सिनीयर सिटिझन्ससाठी वेगळी रांग असावी, अशा अंदाजाने आलेले ते, रंगीबेरंगी हाफपँटी न घालणाऱ्यांची तिसरी रांग चष्म्याआडून शोधत होते आणि ती काही सापडत नव्हती !
लोक येतच होते, रांग वाढतच होती. त्याचवेळी अजून २-३ वरिष्ठ नागरीक बँकेत आले ! पहिल्या ग्रूपमधल्या दोन चतुर काकांनी लगेच एका रांगेत उभे राहून घेतले ! (फॉर्मचं काय ते नंतर बघू, नंबर तर लाऊन ठेऊ !)
गर्दी वाढलेली बघून, काचेच्या केबिनमधून ब्रँच मॅनजेर बाहेर आल्या. त्या सुद्धा पंचविशीच्या आत बाहेर ! (या नव्या बँका तिशीतच VRS देतात का?) त्या गेल्या त्या डायरेक्ट या ग्रुपकडे ! २ मिनीटे बोलल्या असतील नसतील, सारी सिनीयर मंडळी निवांत सोफ्यावर बसली ! त्या ब्रँच मँनेजरने हाक मारून स्टाफमधल्या एका मुलीला बोलावले. ती आली. एकदम उत्साही आणि तरतरीत ! (या नव्या बँका बायोडेटात ‘चुणचुणीत’ आणि ‘तरतरीत’ हे शब्द असतील, तरच नोकऱ्या देत असावेत !)
त्या विशीतल्या पोरीने तिथेच त्यांच्या बरोेबर सोफ्यावरच बसुन कोणाला फॉर्म देे, कोणाला चेक लिहून दे, कोणाची आयडी प्रूफवर सही घे, पेईंग स्लिप चेक कर असा झपाटा लावला ! एवढच नाही, मध्ये उठून ती खुद्द ‘रोकड’ सुद्धा या काका लोकांना सोफ्यावरच हातात आणून देत होती, कोणाच्या नोटा बदलून आणत होती !
१५ ते वीस मिनीटात तिने सगळ्या कामाचा फडशा पाडला ! सारे अवाक होऊन बघत राहिले !
१५-२० मिनीटात सगळ्या वरिष्ठांना वाटी लाऊन,जवळ जवळ २-४ लाखांची ऊलाढाल करून, २-४ कोटींचे पुण्य कमवून, ती कन्यका आपल्या स्वत:च्या जागेवर जाऊन कामाला भिडलीसुद्धा !.. रांगेतल्या कनिष्ठांचे माहित नाही, पण आम्ही (ना कनिष्ठ ना वरिष्ठ असे मधल्यामधले ) आदराने तिच्याकडे आणि असूयेने वरिष्ठांकडे बघतच राहिलो!
माझा नंबर आला, नोटा मिळाल्या. नवी दोन हजाराची नोट पहिल्यांदाच हातात आली होती ! नोट अपेक्षेपेक्षा छोटी होती, आणि खरं सांगू? खोटी वाटतं होती ! पण काहीही असो, पाकिटात व्यवस्थित बसली. छान वाटले ! पूर्वीची हजाराची नोट उनाडपणे पाकिटाबाहेर डोकवायची. ही नवी नोट निव्वळ दिसायलाच देखणी नव्हती, तर घरंदाज- शालिनही होती, तरतरीतही होती !
मला एकदमं त्या ओरीजनल ‘तरतरीत’ मुलीला भेटावसं वाटलं.
‘स्सर?’ मोठ्ठे डोळे माझ्यावर रोखत तिने प्रश्नार्थक चेहरा केला. तिटकारा किंवा तुसडेपणाचा भावही त्या निर्मळ चेहऱ्यावर नव्हता ! मी तिला वरिष्ठांसाठी तिने जे केलं आणि जी धावपळ केली, ते सगळ्यांना कसे आवडले, ते सांगितले. (आणि हो, थोडेसे अस्पष्ट असे आभार ही मानले !)
‘अरे स्सरं! सालभर थोडी ऐसा करना पडता है? ये तो बस, हप्ता दस दिन की बात है ! और ऐसे समय पर सबको मदद करना अच्छा लगता है !’
घरी येईपर्यंत तिचे ते ‘अच्छा लगता है ‘ कानात, मनात घुमत होतं !
मोदीजींनी भारताची सर्वात जास्त किंमतीची नोट ‘गुलाबी’ का बनवली, याचा लख्ख उलगडा झाला !
या नव्या पिढीने आणि या असल्या ‘अच्छा लगता है!’ म्हणण्याऱ्या मुलीनेच त्यांना २०००ची नोट ‘Pink’ बनवायला भाग पाडले असणार !
जगलो-वाचलो तर एक दिवस मी पण ‘सिनीयर सिटिझन’ होईन, पण तेव्हा सुद्धा जेव्हा-जेव्हा दोन हजाराची नोट बघेन तेव्हा-तेव्हा हे ‘अच्छा लगता है’ आठवेल आणि मी माझ्या नातवांना विचारेन, ‘ ही नोट ‘गुलाबी’च का आहे, माहितीये?
लेखक : रवि वाळेकर
(ही नोट कधीकाळी रद्द होईल, असे हा लेख लिहिताना वाटलेही नव्हते!)
संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मंदिरांचं विज्ञान — जगन्नाथ मंदिर, पुरी…” ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆
भारतातील अनेक मंदिरांना खूप मोठा इतिहास आहे. काही मंदिरांचा इतिहास तर त्यांच्या निर्मितीच्याही आधीचा आहे. मंदिर कुठे उभारायचं ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना अनेक बाबींचा सखोल विचार आणि अभ्यास केला गेला. ज्या ठिकाणी मंदिर बांधायचं तिथलं वातावरण, तिथल्या नैसर्गिक गोष्टी तसेच पुढे येणाऱ्या अनेक ज्ञात अज्ञात गोष्टींचा अभ्यास केला गेल्यावर ज्या ठिकाणी ह्या गोष्टी जुळून येतील अशा ठिकाणी भव्य दिव्य मंदिरांची निर्मिती केली गेली. ही निर्मिती करताना कळलेल्या तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड देऊन अशा ठिकाणांचं महत्त्व धार्मिक दृष्टीने वाढवलं गेलं. खंत एकच की ह्यातलं तंत्रज्ञान ह्या श्रद्धेमुळे येणाऱ्या पुढच्या काळात लुप्त झालं आणि परकीय आक्रमणांनी भारताच्या अनेक पिढ्यांच्या तंत्रज्ञानातील समृद्धीची वाट लावली.
श्रीकृष्णाला आणि त्याच्या भावंडांना वाहिलेलं एक मंदिर भारतात गेल्या ९०० वर्षांहून जास्ती काळ उभं आहे. जगन्नाथ, बलराम, सुभद्रा ह्या तीन देवतांना समर्पित असलेलं पुरी, ओरिसा इथलं जगन्नाथ मंदिर !
आपल्या रथयात्रेसाठी जगभर प्रसिद्ध असणारं हे मंदिर अनेक रहस्यमय गोष्टींनी वेढलेलं आहे. आत्ता जे मंदिर उभं आहे त्याची निर्मिती साधारण १२ व्या शतकात इ.स. १११२ च्या आसपास झाली असावी असा अंदाज आहे. हे मंदिर आत्तापर्यंत १८ वेळा लुटलं गेलं आहे. इतकं लुटूनसुद्धा आजही ह्याच्या खजिन्यामध्ये जवळपास १२० किलोग्राम सोनं तर २२० किलोग्रॅमपेक्षा जास्त चांदी आहे. ज्याची किंमत कित्येक कोटी रुपयांमध्ये आहे. ह्याशिवाय अनेक अमूल्य रत्नेही त्याच्या खजिन्याचा भाग आहेत.
ह्या पूर्ण मंदिराचं क्षेत्र जवळपास ४००,००० चौरस फूटात सामावलेलं आहे. मुख्य मंदिर हे कर्व्हीलिनियर आकारात असून त्याची उंची जवळपास २१४ फूट (६५ मीटर ) आहे. ह्याच्या शिखरावर एक चक्र ज्याला नील चक्र असंही बोललं जाते, ते बसवलेलं आहे. हे नील चक्र अष्टधातूंनी बनवलेलं आहे. ११ मीटर चा घेर आणि ३.५ मीटरची उंची असलेलं हे चक्र जवळपास वजनाने १००० किलोग्रॅमपेक्षा जास्त आहे. हे चक्र ९०० वर्षांपूर्वी ६५ मीटर उंचीवर कसं नेलं गेलं असेल हे अजूनही एक रहस्य आहे.
आधी म्हटलं त्याप्रमाणे मंदिराची जागा निवडताना अनेक गोष्टींचा अभ्यास त्या काळी केला गेला होता. भारताच्या ज्या भागात पुरी मधलं जगन्नाथ मंदिर आहे तो भाग शंखाच्या आकाराचा आहे. शंख आणि चक्र ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी विष्णूच्या मूर्तीत आपल्याला नेहमीच बघायला मिळतात. म्हणूनच ह्या भागाला शंख क्षेत्र म्हटलं जातं. ह्याशिवाय ह्या जागेची निवड करताना इथल्या काही नैसर्गिक गोष्टींवर खूप अभ्यास केला गेला आहे. जगात कुठेही दिवसा हवा समुद्रावरून जमिनीच्या दिशेने वाहते तर रात्री ह्याविरुद्ध म्हणजे जमिनीवरून समुद्राकडे वहाते. पण ज्या ठिकाणी हे मंदिर आहे तिकडे नेमकं उलट घडतं. जगन्नाथ मंदिराच्या इथे दिवसा हवा जमिनीवरून समुद्राकडे वाहते तर रात्री उलट्या दिशेने म्हणजे समुद्राकडून जमिनीकडे वाहते.
जगन्नाथ मंदिराच्या भोवती अनेक रहस्यं गुंफली आहेत. त्यातली काही महत्त्वाची आहेत ती म्हणजे इकडे देवळाचा फडकणारा झेंडा हा वाऱ्याच्या उलट्या दिशेला फडकतो. ज्या दिशेला वारा वाहतो त्या दिशेला झेंडा फडकायला हवा पण इकडे नेमका तो उलट दिशेला फडकतो. तसेच ह्या मंदिरावरून काहीच उडत नाही. ह्या मंदिरावरून कोणतेच पक्षी उडत नाहीत किंवा मंदिराच्या शिखराचा आसरा घेत नाहीत. तसेच ह्या मंदिराची सावली कधीच जमिनीवर पडत नाही. दिवसाची कोणतीही वेळ घेतली तरी ह्याच्या शिखराची सावली जमिनीवर पडत नाही. ह्यामागे श्रद्धा आणि चमत्कार लोकांनी म्हटलं असलं तरी मंदिराच्या जागेची निवड आणि मंदिर बांधण्यामागील तंत्रज्ञान ह्या सगळ्याला कारणीभूत आहे.
भारतातल्या मंदिरांची शिखरं ही वर निमुळती होतं जाणारी आणि साधारण चपटी असलेली बांधली जातात. पण जगन्नाथ मंदिर ह्याला अपवाद आहे. हे मंदिराचं शिखर थोडफार गोलाकार स्वरूपात बनवलं गेलं आहे. देवळाच्या शिखरावर फडकणारा झेंडा उलट दिशेला फडकण्यामागे ह्या मंदिराचा आकार कारणीभूत आहे. ह्या मंदिराच्या आकारामुळे इथे ‘कर्मन व्हॉरटेक्स्ट इफेक्ट’ बघायला मिळतो. एकसंध वाहणाऱ्या एखाद्या गोष्टीच्या प्रवाहात जर आपण टोकेरी नसलेली साधारण गोलाकार एखादी गोष्ट आणली तर त्याच्या प्रवाहात त्या वस्तूमुळे बदल होतो आणि हा बदल अगदी विरुद्ध दिशेने असतो. त्यामुळे हवा वाहताना मंदिराच्या साधारण गोलाकार असणाऱ्या शिखराला आदळून ‘कर्मन व्हॉर्टेक्स्ट इफेक्ट’ तयार करते. ज्यामुळे काही भागात हवा उलट्या दिशेचा प्रवाह निर्माण करते. हाच विरुद्ध दिशेचा प्रवाह झेंड्याला हवेच्या अगदी विरुद्ध दिशेला फडकवतो.
a Kármán vortex street (or a vonKármán vortex street) is a repeating pattern of swirling vortices, caused by a process known as vortex shedding, which is responsible for the unsteady separation of flow of a fluid around blunt bodies. Vortex shedding happens when wind hits a structure, causing alternating vorticies to form at a certain frequency. This in turn causes the system to excite and produce a vibrational load.
ह्या मंदिरामुळे निर्माण होणाऱ्या कर्मन व्हॉर्टेक्स्ट इफेक्टमुळे कदाचित पक्षी सुद्धा उडण्यास कचरत असावेत असा एक अंदाज आहे. कारण प्रत्येक पक्षी हा हवेच्या प्रवाहाच्या बदलांबाबत अतिशय ज्ञानी असतो. कदाचित ह्या शिखराच्या आजूबाजूला हवेत होणाऱ्या बदलांमुळे उडण्याची क्रिया करण्यासाठी त्यांना अडचण येत असावी. त्यामुळेच ह्या शिखराच्या आसपास पक्षी उडताना दिसत नाहीत. ह्या मंदिराच्या शिखरावर जे नील चक्र आहे ते पूर्ण पुरी मधून बघताना कुठूनही तुम्हाला ते समोरून बघत आहात असेच दिसून येते. ह्या मागे कारण आहे ते पुरी शहराची रचना आणि त्याला अनुसरून मंदिराचं केलेलं बांधकाम. ज्या भागातून ह्या चक्राचा बाजूचा भाग दिसण्याची शक्यता आहे. त्या सर्व भागात एकतर तुरळक वस्ती आहे किंवा मंदिराच्या आसपास असणाऱ्या इतर इमारतींमुळे मंदिराचं शिखर दिसत नाही. त्यामुळेच जिथे लोकवस्ती अथवा जिथून मंदिराच्या शिखराचं दर्शन होतं त्या सर्व भागातून चक्र आपण समोर बघत आहोत असा भास होतो.
नील चक्र जे मंदिराच्या शिखरावर बसवलं गेलं आहे, ते अष्टधातूंच्या संयुगातून बनवलं गेलं आहे. त्यामुळे आज ९०० वर्षांनंतरही समुद्रावरून येणाऱ्या खाऱ्या हवेला मात देत टिकून आहे. मंदिराच्या सिंघ दारातून प्रवेश करताच कानावर आदळणारा लाटांचा आवाज अचानक नाहीसा होतो. जेव्हा आपण पुन्हा बाहेर पडू तेव्हा लाटांचा आवाज आपल्या कानावर पडतो. असं होण्यामागे मंदिराच्या निर्माणात वापर केलेल्या दगडी तंत्रज्ञानांचा समावेश आहे. इकडे दगड असे वापरले गेले आहेत की ज्यामुळे बाहेरून येणाऱ्या ध्वनीलहरी आतमध्ये शिरत नाहीत. त्यामुळे मंदिराच्या आत शिरताच आपल्याला अचानक आवाज नाहीसा झाल्याचा अनुभव येतो.
कर्मन व्हॉरटेक्स्ट इफेक्ट असो वा पुरीच्या कोणत्याही भागातून दर्शनी दिसणारं नील चक्र असो. ह्या मंदिराची निर्मिती करताना त्याच्या बांधकामाची सावली ही त्याच्या बांधकामावर पडते. त्यामुळे जमिनीवर सावली दिसणार नाही अश्या पद्धतीने केलेलं बांधकाम. प्रत्येक गोष्टीची निवड ही पूर्ण विचारांती मंदिर निर्माण करताना केली गेली आहे. ह्या गोष्टींना जगन्नाथाच्या शक्तीचं रूप दिलं असलं तरी मंदिर उभारताना वापरल्या गेलेल्या उच्च तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालेलं आहे. जागेची निवड ते मंदिराचा आकार आणि ते उभारताना वापरल्या गेलेल्या विज्ञानामुळे आजही इतके वर्षांनंतर हे मंदिर आपल्या सोबत अनेक रहस्यं घेऊन दिमाखात उभं आहे. रथयात्रेसारखी जवळपास १८०० वर्षांची परंपरा असलेली यात्रा जितकी जगभरात ‘जगन्नाथ पुरी’ ची शान आहे, तितकंच ह्या मंदिराच्या निर्मितीमागचं विज्ञान आणि तंत्रज्ञान !!!
शब्दांकन : विनीत वर्तक
संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ स्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆
आयुष्यातील प्रत्येक स्टेजचा आपण आनंद घ्यायला हवा. आयुष्य तसं म्हटलं तर खूप सोपं आहे, आपणच विनाकारण किचकट करून ठेवतो. लोक काय म्हणतील या विचाराने आपणच आपल्या मार्गात आपणच स्पीड ब्रेकर घालून घेतो.
कोणाला भेटावेसे वाटले तर भेटा, बोलावेसे वाटले तर बोला. एखाद्या विषयी काही आवडले तर स्तुती करा, नाही आवडले तर स्पष्टपणे पण न दुखावता सांगा. हेच दिसण्याच्याही बाबतीत लागू होते.
पिकले केस आवडत नाहीत, कलर करावेसे वाटतात?
– तर करा. वाढलेली ढेरी कमी करायची आहे?
– जिम सुरू करा, नसेल जमत तर रोज किमान तासभर चाला.
नव्या पिढी सोबत स्वतःला अपग्रेड करायचंय?
– तर लोकांचा विचार न करता खुश्शाल नव्या स्टाईलचे कपडे घाला.
लहान मुलांमध्ये मूल होऊन आपले शैषव पुन्हा जगावेसे वाटतंय?
-तर जागा ना ! कुणी अडवलंय?
सर्वात आधी आरश्यात दिसणाऱ्या स्वतःला आहे तसे स्वीकारायला शिका…
वय वाढत चाललंय, हे स्वीकारलं तरच आपण तणावमुक्त जीवनाचा आनंद मनमुराद लुटू शकतो. वाढत्या वयासोबत येणारी वेगवेगळी फेज स्वतःसोबत नवनवीन क्षण घेऊन येते त्या त्या फेजचा मनसोक्त आनंद घेता आला पाहिजे. कुमार वयातील आठवणीत हरवून बसलात तर प्रौढ वयात येणाऱ्या क्षणांना आणि आनंदाला मुकाल,
कोणतही क्रिम किंवा फेसपॅक तुम्हाला गोरं करणार नाही
कोणताही शॅम्पू तुमची केस गळती रोखू ० शकणार नाही
कोणतेही तेल टकलावर केस उगवु शकणार नाही
कोणताही साबण बच्चों जैसी कोमल स्कीन देणार नाही.
लक्षात ठेवा, कोणत्याही टुथ पेस्टमध्ये नमक नसतं, व कोणत्याही साबणामध्ये निम नसतो.
सगळेच जण आपआपली दुकानं थाटुन तुम्हाला मूर्ख बनवायला बसलेत. तेव्हा दिखावे पर न जाओ, अपनी अक्ल लगाओ.
तुम्ही विसाव्या वर्षी जसे दिसत होतात तसेच चाळीशीत आणि साठीत दिसाल अशी अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचे आहे. कोणत्याही वयात फिट राहणे मात्र महत्वाचे आहे.
पोट सुटलंय तर सुटू दे, त्यासाठी लाज वाटून घेऊ नका, आपलं शरीर वयोमानानुसार बदलत राहातं. वजन पण त्याप्रमाणे कमी जास्त होत राहतं. हे सगळे नैसर्गिक आहे.
आलेली परिस्थिती सर्वप्रथम स्विकारा आणि ती बदलण्यासाठी स्वतःला तयार करा.
जन्म, बालपण, तारुण्य, म्हातारपण आणि मृत्यू हा तर निसर्गाचा नियमच आहे. आजपर्यंत कोणीही हे टाळू शकले नाही, हे स्वतःला आधी पटवून द्या.
जुन्या मशीनचा मेन्टेनन्स करून अपटुडेट करता येते, पण नवीन नाही करता येत. आपल्या शरीराचेही तसेच आहे. ऑरगॅनिक धान्य, एलोविरा, कारले, मेथी, जिरे,ओवा वगैरेचे घरगुती उपाय यावरील व्हिडीओ यु ट्यूबवर धुमाकूळ घालत आहेत. इंटरनेट, सोशल मीडियावर वेगवेगळ्या उपदेशांनी नुसता उच्छाद मांडलाय…..
… “अमुक खा, तमुक खा, हे खाऊ नका, ते खाऊ नका, गरम खा. थंड पिऊ नका, कपाल भारती करा, सकाळी निंबुपाणी, दुपारी ताक आणि रात्री गाईचं दुध घ्या. दिर्घ श्वास घ्या, डाव्या कुशीवर झोपा, ऊजव्या कुशीवरून ऊठा, हिरव्या पालेभाज्या खा, डाळीत प्रोटीन असतात. ज्वारी खा, नाचणी खा, वगैरे वगैरे…”
वरील सारे उपदेश वाचले की, डोके गरगरू लागते, काय योग्य काय अयोग्य तेच कळत नाही. डिप्रेशनची भर पडते ती वेगळी….
पतंजली, प्रॉक्टर अँड गॅम्बल, आशीर्वाद, नेस्ले, हिंदुस्तान लिव्हर, आई.टी.सी. अशा अनेक देशी विदेशी कंपन्या जाहिरातींचा भडिमार करून डोक्याचा नुसता भुगा करतात. कोणते उत्पादन चांगले हेच कळत नाही.
आपण सर्वचजण कधीतरी मरणार आहोत. पण मरण्याआधी खऱ्या अर्थाने जगणंच विसरून चाललो आहोत असं तुम्हाला नाही वाटत का? खरं सांगा..
सर्वात महत्वाचे म्हणजे मजेत रहा. कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप करू नका. चुका सर्वांकडून होतात, तुम्ही काही देव नाही. स्वतःवर प्रेम करा. दोष देण्याचे काम करण्यासाठी आसपास भरपूर लोक आहेत. नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करा. सकारात्मक विचारसरणीची लोकं जोडा, त्रासदायक लोकांपासून दूर राहा. आवडेल ते खा, पण प्रमाणात. थोडा का होईना पण रोज नियमित व्यायाम करा. आनंदात रहा. शरीराला त्याचं कार्य करू द्या…
संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सरत्या मे महिन्याचे दिवस ! आभाळात हळूहळू ढगांचे येणे सुरू झाले आहे. घामाच्या धारा वाहत आहेत ! असं वाटतंय, यावी एकदा पावसाची मोठी सर आणि भिजून जावे अंगभर ! पण अजून थोडी कळ काढायला हवी ! मृगाच्या आधीची ही तृषार्तता ! ग्रीष्माच्या झळांनी तप्त झालेल्या सृष्टीला आता ओढ लागली आहे ती नवचैतन्य देणाऱ्या वर्षेची ! कायम आठवतात ते बालपणापासूनचे दिवस ! एप्रिलमध्ये कधी एकदा परीक्षा संपते आणि मोकळे होतोय याची वाट पहायची ! आणि मग दोन महिने नुसता आनंदाचा जल्लोष ! सुट्टीत कधी मामाच्या घरी जायचं तर कधी काकाच्या घरी जायचं ! कधी आत्याकडे मुक्काम ठोकायचा ! उन्हाच्या वेळी घरात पंखा गरगर फिरत असायचा,उकाडा असायचा, पण तरीही खेळण्या कुदण्यात बाकीचं भान नसायचं ! आंबे, फणस, काजू, कलिंगडं, खरबूज, जांभळे अशा फळांची लयलूट सगळीकडे त्या त्या प्रदेशानुसार असे ! सगळ्याचा आनंद घ्यायचा ! अगदी आईस्क्रीमच्या गाडीवरील आईसकांडीचा सुद्धा ! उसाचा थंड रस प्यायचा, भेळ खायची..असे ते उडा- बागडायचे दिवस कधी सरायचे कळायचे सुद्धा नाही ! नेमेची येतो मग पावसाळा, तो जसा येतो तशीच शाळा सुरू व्हायची वेळ येते..
आमच्या वेळची सुट्टी अशी जात असे आणि जून महिना येत असे. त्याकाळी अगदी नवी पुस्तकं मिळायची नाहीत. सेकंड हॅन्ड पुस्तके गोळा करायची .काही पुस्तकांना बाइंडिंग करून घ्यायचं, जुन्या वहीचे उरलेले कोरे कागद काढून त्या पानांची वही करायची. दप्तर धुऊन पुन्हा नव्यासारखं करायचं आणि शाळेच्या दिवसाची वाट पाहायची ! नवीन वर्ग, नवीन वर्ष असले तरी मैत्रिणी मात्र आधीच्या वर्गातल्याच असायच्या !
कधी एकदा सर्वांच्या भेटी गाठी घेतो असं वाटे.
गेले ते दिवस म्हणता म्हणता आमची लग्न होऊन मुले बाळे झाली. काळ थोडा बदलला. मुलांसाठी नवीन पुस्तके, नव्या वह्या, दप्तर, वॉटर बॅग अशा खरेद्या होऊ लागल्या. आणि जून महिन्यात छत्र्या, रेनकोट यांनी पावसाचे स्वागत होऊ लागले…… अशा या सर्व संधीकालाचे आम्ही साक्षी. स्वतःचं बालपण आठवताना मुलांचं बालपण कसे गेले ते आठवते. आणि आता नातवंडांचे आधुनिक काळातील बालपणही अनुभवतो आहोत !
काळ फार झपाट्याने बदलला.. मजेच्या संकल्पना बदलल्या. हवा तीच ! सुट्टी तशीच ! पण ती घालवण्याचे मार्ग बदलले. बऱ्याच मुलांना आजोळी जाणे माहित नाही. स्वतःच्या गावी जात नाहीत, जिथे आठ पंधरा दिवस विसावा घ्यायला जाता येईल असं ठिकाण उरले नाही.. उद्योग धंदा, नोकरी यात आई-वडील बिझी, त्यातून काढलेले सुट्टीचे चार दिवस मुलांना घेऊन जातात थंड हवेच्या ठिकाणी ! भरपूर पैसा असतो, खर्च करून येतात आणि मुलांना विकतचं मामाचं गाव दाखवून येतात. आईस्क्रीम, पिझ्झाच्या पार्ट्या होत असतात. हॉटेलिंग, खरेदीची मजा चालू असते. कारण प्रत्येकाला आपली स्पेस जपायची असते. संकुचित झाली का मनं असं वाटतं ! पण तरुण पिढीच्या मर्यादाही कळतात. त्यांचं वेळेचं भान वेगळं असतं .आल्या गेलेल्यांच्या स्वयंपाकाची सरबराई करणारी गृहिणी आता सगळा दिवस घराबाहेर असते. त्यामुळे कशी करणार ती आदरातिथ्य ! यंत्रवत् जीवनाचा एक भाग बनतात जणू सगळे ! असं असलं तरी मुलांचा सुट्टीचा मूड थोडा वेगळा असतो. त्यांना दिलासा देणाऱ्या काही गोष्टी आता आहेत. मुलांना वेगवेगळ्या क्लासेसना नेणं- आणणं हा एक आधुनिक काळातील बदल आहे .संस्कार वर्ग, स्विमिंग, नाट्य, गायन असे वेगवेगळे वर्ग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उघडलेले असतात ! जमेल त्या पद्धतीने मुलांचा विकास व्हावा म्हणून हे क्लासेस जॉईन करण्याचा पालकांचा उत्साह असतो. काहीतरी नवीन शिकवण्याचा अट्टाहास असतो. पुन्हा एकदा शाळेच्या चाकोरीला जुंपण्याआधीचे हे मे अखेरचे आणि जूनचे पहिले काही दिवस असतात !
आता आगमन होणार असते ते पावसाचे ! नव्याच्या निर्मितीसाठी आतूर सृष्टी आणि होणार असते पावसाची वृष्टी ! छत्री, रेनकोट घेऊन चालणार माणसांची दुनिया ! मग कधी पाऊस करतो सर्वांची दाणादाण ! कुठे पाणी साचते तर कुठे झाडे पडतात. सृष्टीची किमया तिच्या तालात चालू असते. माणसाची पुन्हा एकदा ऋतुचक्रातील महत्वाच्या ऋतूला- पावसाला तोंड देण्याची तयारी झालेली असते. मेच्या अखेरचे आणि जूनच्या सुरुवातीचे दिवस विविध अंगाने आणि वेगळ्या ढंगात येत असतात. परमेश्वरा ! तुझ्या अनंत रुपातील हे सृजनाचे रूप मला नेहमीच भुरळ घालते. आकाशातून वर्षणाऱ्या पहिल्या पावसाच्या सरीची मी चातकासारखी वाट पाहत राहते. तन शांत, मन शांत अशी ती अनुभूती मनाला घ्यायची असते. सरता मे आणि उगवता जून यांच्या संधीकालातील ही तगमग आता वर्षेच्या आगमनाने शांत होणार असते !
अभिजात संगीत आणि काव्याच्या अभ्यासात मला नेहमीच प्रोत्साहन देणार्या पितृतुल्य, गुरूतुल्य अशा नाशिकच्या बाबा दातार आणि परिवाराने माझ्या पहिल्यावहिल्या स्वतंत्र ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ कॅसेटची आणि नंतर ‘रंग बावरा श्रावण’ अशा अनेक कॅसेट्सची निर्मिती केली. स्वतःच ‘शुभ्र फुलांची ज्वाला’ असलेल्या दुर्गाबाईंच्या पवित्र हस्ते या कॅसेटचं उद्घाटन झालं. योगायोग म्हणजे आणीबाणीच्या काळी, नाशिकमधले माझे ‘निमंत्रक’ म्हणून बाईंनी, दातार परिवाराचा उल्लेख केला. गंमत म्हणजे दिलखुलासपणे बोलताना त्या एवढ्या रंगून गेल्या की, त्यांनी दीक्षित मास्तरांनी शिकवलेल्या ‘ सुखवी बहु केदार जनमन…’ या केदार रागातल्या बंदिशीत, शुद्ध निषाद आणि कोमल निषाद एकमेकांवर रेललेले असताना किती सुंदर सुरावट होते, ती गाऊनही दाखवली.
आदरणीय कुसुमाग्रजांच्या सांगण्यावरून, दातार कुटुंबियांनी, इंदिराबाईंच्या बेळगांवी, ‘रंग बावरा श्रावण’ – निवड कुसुमाग्रजांची– भाग १ या कॅसेट – सीडीचा सोहळा प्रचंड उत्साहाने, इंदिराबाईंच्याच शब्दांत ‘कुबेरालाही लाजवेल’ अशा थाटात संपन्न केला. त्यादिवशी अक्कांच्या वक्तव्याची सुरुवात ‘आज माझ्या आयुष्यातला सोन्याचा दिवस…’ अशी अत्यानंदाने झाली. या कार्यक्रमासाठी मुंबईहून बेळगांवला निघताना, अक्कांच्या सख्ख्या मैत्रिणीने, दुर्गाबाईंनी माझ्याजवळ इंदिराबाईंसाठी पत्रातून शुभेच्छा दिल्या…
… “ लाडके इंदिरे, तुझा सोहळा शानदार होणार आहे आणि तो अनुपम व्हावा हीच माझी इच्छा आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गौरवण्यापेक्षा हा खऱ्या रसिक चाहत्यांचा मेळावा, कितीतरी भव्य आणि तुझ्या काव्यावर लुब्ध असलेला आहे. मी शरीराने त्यात नसले तरी मनाने त्यात आहे बरं का !” अक्कांचे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कुणाच्या तरी करंटेपणाने हुकले असले तरी, धीर देताना दुर्गाबाईंचे हे शब्द, थोरल्या बहिणीने पाठीवरून मायेचा हात फिरवल्यासारखे वाटतात आणि डोळ्यांत पाणी तरळते. मी बेळगांवहून परतताना माझ्या हाती दुर्गाबाईंसाठी पत्रोत्तर पाठवताना अक्का म्हणतात, “ मी पद्मजाला म्हटले, खरे म्हणजे साहित्यसृष्टीत दुर्गाबाईच माझा आधार आहेत. तो आधार त्यांच्या साहित्यावर आहे. तो नकळत मला कित्येक गोष्टी देतो. सूर्याचा प्रकाश किरणांतून आला तरी, तो जसा सर्व बाजूला एकदम फाकतो – तेजाळतो तसे तुमच्या बुद्धीचे आहे. तुमच्या प्रत्येक लेखनात हे दिसून येते.”
— अशाप्रकारे या ‘गार्गी – मैत्रेयी’च्या पत्रांचे पोस्टमन होण्याचे भाग्य मला लाभले !
दुर्गा आणि इंदिरा ही देवीची दोन रूपंच ! एका दुर्गेने आणीबाणीच्या वेळी जो प्रखर दुर्गावतार धारण केला, त्याला तोड नाही. एकटं असूनही तिला कुणाचंही भय वाटत नसे. कुणालाही हार जाणे, शरण जाणे हे तिच्या स्वभावात नव्हतेच. शरीर जर्जर झाले, तरी अगदी मृत्यूलाही त्यांच्या ‘देहोपनिषदात’ त्या ठणकावून सांगतात…
‘आयुष्याची झाली रात, मनी पेटे अंतर्ज्योत
भय गेले मरणाचे, कोंब फुटले सुखाचे..।।
अवयवांचे बळ गेले, काय कुणाचे अडले
फुटले जीवनाला डोळे, सुखवेड त्यात लोळे… ।।
मरणा तुझ्या स्वागतास, आत्मा माझा आहे सज्ज
पायघडी देहाची ही घालूनी मी पाही वाट…
सुखवेडी मी जाहले, ‘देहोपनिषद’ सिद्ध झाले…।।’
…. बाई गेल्यानंतरही त्यांच्या शांत, तेजस्वी चेहर्यावर ‘ देहोपनिषद सिद्ध झाले ’ हाच भाव होता.
इंदिराबाईंनी पती निधनानंतर अपार हाल सोसले, दुःख भोगलं. एकटेपणा जगतानाही, दैवाला दोष न देता, रडत न बसता, त्या ‘प्रारब्धाला’ही ठणकावून सांगतात….
‘प्रारब्धा रे तुझे माझे, नाते अटीचे तटीचे,
हार जीत तोलण्याचे, पारध्याचे – सावजाचे.
जिद्द माझीही अशीच, नाही लवलेली मान,
जरी फाटला पदर, तुझे झेलते मी दान,
काळोखते भोवताली, जीव येतो उन्मळून,
तरी ओठातून नाही तुला शरण शरण….’
मला तर वाटतं, इंदिरा अक्कांची सात्त्विक, सोज्वळ कविता हा माझा ‘प्राण’ आहे, तर मला वेळोवेळी साहित्यतुषारात चिंब भिजवणाऱ्या आणि ‘देहोपनिषद’सारखा अपूर्व अभंग देऊन प्रथमच मला ‘संगीतकार’ म्हणून घडवणार्या दुर्गाबाईंचे दृढनिश्चयी, ओजस्वी विचार हा माझा ‘कणा’! दोघीही माझ्या जीवनातील मोठे आधारस्तंभ ! त्यांची आठवण जरी झाली तरी त्याचा सुगंध, चंदनी अगरबत्तीसारखा कितीतरी वेळ माझ्या मनात दरवळत राहतो. दोघींच्या नितांत सुंदर लेखनाने, माझ्या आयुष्याला सुंदर वळण दिलं. गर्भरेशमी कवितेचा ‘ध्यास’ आणि ‘नाद’ दिला. सृजनाचा उत्कट आनंद घ्यायला आणि आयुष्य कसं जगावं, यातलं ‘अध्यात्म’ अनुभवायला शिकवलं…
☆ दिया जलाना कहाँ मना है ?… ☆ श्री संभाजी बबन गायके☆
—’हा अग्निदाहो न संभवे !‘
कफी तिचं नाव….तिच्या वडीलांचं त्या तिघांशी काही कारणांनी भांडण झालं होतं. ती अवघ्या तीन वर्षांची होती तेंव्हा. ते तिघे तिच्या घरापाशी आले….ती अंगणात खेळत होती आपल्या मैत्रिणींसोबत..होळीचा सण होता…रंगांची उधळण सुरू होती….या रंगांमध्ये अचानक रक्ताचा लाल भडक रंग मिसळला गेला….त्या तिघांपैकी कुणीतरी एकानं तिच्या चेह-यावर कसला तरी द्र्वपदार्थ फेकला आणि ते पळून गेले…अॅसिड होतं ते! एखाद्या सुंदर गुलाबपुष्पावर निखारे पडावेत तसं झालं क्षणार्धात. या नाजूक फुलावरच्या दोन नेत्रपाकळ्या जळून गेल्या. मुखकमल काळवंडून गेले होतेच. जीव मात्र बचावला. पण हे असं जिवंत राहणं किती वेदनादायी असतं हे ज्याचं जळतं त्यालाच कळतं!
सामान्य दुकानदार असणा-या तिच्या बापानं कंबर कसली. भारतातल्या सर्व मोठ्या इस्पितळांत तिला उपचारांसाठी दाखल करताना त्याच्याजवळची होती नव्हती ती सर्व पुंजी समाप्त झाली. त्यानं मग तिला जिल्ह्याच्या गावी आणलं….पोटाची खळगी भरण्यासाठी तिथल्या न्यायालयात झाडू मारण्याचं काम स्विकारलं. न्यायालयाचं आवार साफ करणा-या या बापाला त्या न्यायालयात न्याय मात्र मिळू शकला नाही. पोलिसी यंत्रणांच्या मर्यादांमुळे आणि कायद्यातील नागमोडी पळवाटांमुळे तिचे दुश्मन दोनच वर्षांत तुरूंगाबाहेर आले…..ती मात्र अंधाराच्या कोठडीत जेरबंद होऊन खितपत पडली. जिंदगी थांबत नाही. या धावपळीत ती आठ वर्षांची झाली. तिला पहिलीच्या वर्गात शाळेत दाखल केलं गेलं तिला पण अभ्यासाचं गणित काही जमेना. कारण ती बघू शकणा-या मुलांची शाळा होती. तोपर्यंत बापाचे वीस लाख खर्च झाले होते. कफी आठ वर्षांची झाली होती. राक्षसी दुनियेत काही देवदूतही लपून बसलेले आहेत….त्यांनी साहाय्य केले त्यांच्यापरीने. बापाने मग तिला मोठ्या शहरात आणलं. डोळ्यांविनाही तिचं काळीज जगण्याची आशा घट्ट धरून होतं! तिची स्मरणशक्ती पाहून तिला थेट सहावीच्या वर्गात दाखल केलं गेलं. लुई ब्रेलचे उपकार तिच्याही कामी आले….तिची बोटं शाबूत होती…हात जळाला होता तरी. तिची बोटं एखाद्या निष्णात संवादिनी वादकाच्या सराईत बोटांसारखी ब्रेल लिपीच्या कागदावर उठावाने उमटवलेल्या खडबडीत अक्षरांवरून भराभर फिरू लागली…बोटांतून स्पर्श शब्दरूप घेऊन मेंदूत विसावू लागले. तिथल्या अंधांसाठीच्या डोळस शाळेने सर्व सहकार्य केलं….अंधांनाही वापरता येऊ शकेल असा संगणक उपलब्ध करून दिला. आधुनिक काळात उपलब्ध असलेली काही साधनं तिच्या मदतीला आली. सीबीएसईचा अभ्यासक्रम इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेत काहीसा अवघड मानला जातो. भाषेचं ठीक आहे, पण विज्ञान,गणितातल्या संकल्पना समजून घेणं किती जिकीरीचे झाले असेल कफीला! पण तिने हार मानली नाही…दिवसरात्र अभ्यास केला….आईबाप, शिक्षक पाठीशी होते….तिचे गुणांचे शतक अवघ्या पाच टक्क्यांनी हुकले! ९५.०६ टक्के दहावी बोर्ड परीक्षेत! अवघे पाच टक्के मिळवले असते या पोरीने तरी ते शंभर टक्क्यांच्या तोडीचे ठरले असते!
‘ नैनं दहति पावक:’ अर्थात ‘ हा अग्निदाहो न संभवे ’ असं ज्ञानोबाराय म्हणून गेलेत….आत्मा अग्निने जाळला जाऊ शकत नाही…कफीचा अंतरात्मा अॅसिडनेही जाळला जाऊ शकला नाही. मी निरूपयोगी नाही, दृष्टी नसली तरी माझ्याकडे दृष्टीकोन आहे हे दाखवून देणा-या कफीने मिळवलेलं हे यश म्हणूनच अलौकिक ठरते. तिला आय.ए.एस. व्हायचं आहे भविष्यात. खरं तर ती आताच झाली आहे आय.ए.एस (I.A.S….I AM STRONG!). तिच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या….माना की अंधेरा घना है…लेकीन दिया जलाना कहाँ मना है? कफी ! तू प्रज्वलीत केलेली ही ज्योत अनेकांच्या अंधा-या मनात उजेड प्रक्षेपित करेल….हे सूर्यप्रकाशाएवढं ठळक आहे.
चला…कफीला शुभेच्छा,आशीर्वाद देऊयात…तिच्या चेह-यावर नसलेल्या डोळ्यांतील आशा आणखी पल्लवीत करुयात….तिच्यासाठी प्रार्थना करूयात ! तू देखणी आहेस कफी….लव यू कफी !
(दैनिक सकाळ,पुणे, इंटरनेटवरील बातम्या यांवर हे लिखाण बेतलेले आहे.)
☆ पिंपळ आणि आंबा…लेखक – श्री सतीश मोघे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
आपले दु:ख, तेवढ्या मोठ्या मात्रेचे नसतांना अचानक कुणीतरी मोठ्या मात्रेने सांत्वन करायला पुढे आले की, थोडे गोंधळायला होते. हे सात्वंन झिडकारावे की त्यामागचा आपलेपणा पाहून नम्रपणे स्वीकारावे ? अशा संभ्रमात पडायला होते खरे… बागेतल्या पिंपळाला असेच काहीसे त्यादिवशी झाले.
बागेतले आंब्याचे झाड त्याला सांगत होते, “बघवत नाही रे तुला पिंपळा.. शिशिर ऋतूने तुला अगदीच पर्णहीन, निस्तेज करून टाकलय. पण धीर धर. काही दिवसाच वसंत सुरू होईल आणि येईल पुन्हा पालवी…. होईल पुन्हा पूर्वीसारख रूप … होशील माझ्यासारखा…”
शिशिरात पर्णहीन अवस्थेत नीरव शांततेतली आनंददायी ध्यानावस्था अनुभवणाऱ्या पिंपळाला यावर काय बोलावे, हे क्षणभर समजेना. अनेकदा दुसऱ्याचे सांत्वन करतांना त्याचा दुःखभार हलका करण्याच्या हेतुपेक्षा, आपण खूप सुखात आहोत याचा काकणभर का होईना अभिमान दाखविण्याचा हेतू सांत्वन करणाऱ्याच्या मुखावर झळकत असतो. पण हा हेतू दिसला तरी त्यावेळी तसे बोलता येत नाही, याची समज आणि उमज पिंपळाला होती.
मंद स्मित करून पिंपळ आब्यांला म्हणाला, “तुझ्या प्रेमळ शब्दांसाठी खूप आभार. पण एक सांगू.. मी अजिबात दु:खात नाही. सृष्टीने सहाही ऋतूत आपले प्रारब्ध आधीच लिहून ठेवले आहे. कोणत्या झाडाने केव्हा फुलावे, बहरावे, कोमजावे सगळे सगळे. आपल्या हातात फक्त मूळं आहेत आणि त्यांच्या व्दारे जमिनीतून जीवनरस घेणे आहे.हे एकदा उमगले की दुःखाचा लवलेश नाही”
“आपली मूळं आत सारखीच आहेत. फरक दिसतो, तो फक्त बाहेर.. जमिनीवर… पाने, फळे, फुले, खोड, उंची यात फक्त फरक. विविधता आणि सौंदयासाठी केलेला… हे एकदा कळलं की, आहे त्यात आनंद.
सुखदुःखापलीकडील समाधानाचा, आनंदाचा अनुभव. आपल्या बाहयरूपातल्या बदलांकडे पहाण्याची एक वेगळीच दृष्टी येते… एक समाधानी अवस्था येते. जिथे कुणाशीही तुलना नाही, तक्रार नाही. ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्ती असो द्यावे समाधान।”
पिंपळाच्या या बोलण्याने आंब्याचे समाधान झाले नाही. त्याने पिंपळाला विचारले, “खरे खरे सांग! पर्णहीन झाल्याने तुझं रूप कुरूप झालय, पक्षी येईनासे झालेत, पानांची सळसळ नाही… याचे खरेच तुला दुःख नाही?”
धीरगंभीर आवाजात पिंपळ उत्तरला, ” नाही. अजिबात नाही. बाहेरच्या बदलणाऱ्या गोष्टींशी आपल्या सुखाला जोडून घ्यायचं आणि त्या गोष्टी बदलल्या की दुःखी व्हायचं, ही माणूसं करीत असलेली चूक आपण का करायची! माझं सद्भाग्य की, तथागताचा सहवास मला लाभला आणि पानं, फुलं, फळ
यापलीकडे जाऊन कायम मूळाकडेच पाहण्याची खोड मला जागली. ‘घट्ट मूळ’ आणि ही ‘खोड’ असली की आनंदाला बाधा नाही. बाह्य बदलांकडे पाहण्याची दुष्टीच बदलून जाते”
“‘तू म्हणतोस पाने नाहीत त्याचं दुःख. पण खरं सांगू शिशिर ऋतू माझा ५-६ हजार पानांचा भार हलका करतो. ते २-३ महिने खुप हलकं हलकं वाटत! तू हे सुख नाही अनुभवू शकत.. पानांचा भार नाही.
सळसळ नाही, पक्षांचे आवाज नाही. त्यामुळे ध्यान समाधीही दीर्घकाळ लावता येते. अधिक मूळाकडे जाऊन चैतन्याचा स्रोत देहभर भरून घेता येतो. वसंताला सामोरे जाण्याची ही पूर्व तयारी असते. म्हणूनच वसंत आला रे आला की अवघ्या सात दिवसात माझ्या देहभर पालवी फुललेली दिसते “
आंब्याला हळूहळू पिंपळाचे विचार पटत होते. पिंपळ पुढे बोलू लागला.” कुणाला आपण किती प्रिय आहोत, यावर आपण आपली प्रियता ठरवू नये. तुझाही मोहोर कधी जळतो.. कधी गळतो.. फळं नाही येत तेवढी… लोकं नाराज होतात.. फळांच्या अपेक्षेने प्रियता, जवळीकता असली की ती कधीतरी लोप पावते. पण फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष प्रेम केलं की प्रियता कायम रहाते. अशा निरपेक्ष प्रेम करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या प्रेमाची आठवण म्हणून त्यांच्या वहीत, पुस्तकात पिंपळपान कायमचं ठेवतात. शिशिरात देहावरची पाने गळाली तरी ती वह्या-पुस्तकातील पाने तशीच असतात. त्यांना बघून मी धन्य होत असतो.”
आपल्या फळाला बाजारात मोठा भाव / प्रसिध्दी आहे, अशा समजूतीत असणाऱ्या आंब्याला पिंपळ आपल्याहून जाणीवेने, विचाराने खूप मोठा आहे, हे एव्हाना जाणवले होते. पिंपळाप्रती आदरभाव, कौतुक व्यक्त करावं म्हणून आंबा पिंपळाकडे वळला तर काय? पिंपळ डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. पर्णहीन पिंपळाचं झाड आंब्याला त्याच्याहून सुंदर दिसलं..समाधानी जाणवलं…आणि मूळाकडे जायची खोड लावून घेण्याचा निश्चय त्याने मनोमन केला.
लेखक – श्री सतीश मोघे
संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे
पुणे, भ्रमणध्वनी:- 9860006595
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
नेहमीच्या सवयीने इस्त्री करणाऱ्या माणसाला फोन करून कपडे घ्यायला येऊ का? कार्यक्रमाला जायचे आहे. कपडे हवे आहेत. असे विचारले. तो त्याच्या नेहमीच्या सवयीने म्हणाला, तयार नाहीत.. अर्ध्या तासात होतील.
फोन बंद करून ठेवला, आणि लगेचच फोन वाजला. नंबरच होता. कोण आहे…….. या विचारातच फोन घेतला……. सध्या मी फोनमध्ये सेव्ह केलेल्या नावापेक्षा इतर नंबरचेच फोन जास्त येतात……… आपले नंबर यांना मिळतात कसे? हा प्रश्न असतोच……
फोनवर मी काही बोलण्याच्या आधीच एका छान आवाजात माहिती देण्याची प्रक्रिया सुरू देखील झाली..………(आता आवाज छान होता म्हटल्यावर ती माहिती नको असताना देखील मी फोन सुरू ठेवला होता हे ओळखले असेलच. त्या आवाजाला उगाचच गोड, मंजुळ अशी विशेषणे लावण्याच्या भानगडीत पडलो नाही.)
सध्या प्रचारात असलेली आणि प्रचलित होणारी ती E जाहिरात होती. या E प्रणालीची सुरुवात कुठून आणि कशी झाली ते सांगता येणार नाही. पण सध्या बऱ्याचशा जाहिराती या अशा E प्रकाराबाबतच असतात, आणि त्यात बहुतांश स्त्रीचाच आवाज असतो. म्हणून ही E स्त्री. कपड्यांच्या इस्त्री चा आणि या E स्त्री चा काहीही संबंध नाही किंवा नव्हता हे आता लक्षात आले असेलच.
साधारणपणे कर्जाने घेतलेले घर, वस्तू यांचा जो एक ठराविक हप्ता असतो त्याला हप्ता ऐवजी E M I म्हणायची सुरुवात झाली आणि तेथूनच पुढे E चा प्रवास आणि प्रसार वाढला असावा.
E पेमेंट, E शिक्षण, यापासून सुरुवात होत E गेम, E सिगारेट, E व्हिकल, E न्यूज पेपर, E बुक्स असे त्यांचे जाळे वाढतच चालले आहे. आणि इंटरनेट वापरत आपणही त्या जाळ्यात पुढे पुढे सरकत आहोत.
प्रत्येक पिढीने काही वाक्ये हमखास ऐकली असतील. ती वाक्ये म्हणजे, सगळं बदलत चालले आहे. किंवा, आमच्या वेळी असले काही नव्हते. इ…… तीच वाक्यं परत आठवली.
अगदी जुन्या काळातील वाक्यांचा संदर्भ आठवला, त्यात (इ)कडून काही निरोप नाही, (इ)कडून काही बोलणे नाही असे इ ने सुरु होणारे शब्द आणि वाक्ये स्त्रियांच्या तोंडी असत. पण त्या इ चा संबंध घरच्या माणसाबद्दल असे. पण आता E स्त्री चा आवाज आला की त्याचा संबंध जाहिरातीशी असतो हे समजले. आणि अशी जाहिरात पैशांच्या गुंतवणूकी पासून वैयक्तिक गुंतागुंत सोडवण्यासाठी सगळ्या बाबतीत असते.
फक्त इस्त्रीच्या कपड्यांवरून नंतर लगेचच आलेल्या फोनमुळे ही जाहिरात करणारी E स्त्री देखील आहे हे लक्षात आले. बाकी काही नाही………
कविश्रेष्ठ इंदिरा संत आणि विदुषी दुर्गाबाई भागवत ही साहित्य क्षेत्रातली दोन उत्तुंग शिखरं ! या दोघींना पाहिलं, की मला नेहमी डॉ. आनंदी गोपाळ जोशी आणि पंडिता रमाबाई यांची आठवण होई. दोघीही तेजस्विनी, प्रखर स्वाभिमानी, ज्ञानी, मनस्वी आणि कर्तृत्ववान स्त्रिया ! परंतु दोघींनाही एकमेकींविषयी प्रचंड प्रेम आणि आदर ! दोघी एकमेकींपासून शरीराने दूर, पण मनाने एकमेकींना भेटण्याची असीम
ओढ ! जीवनाविषयी या दोघींना अपार कुतूहल, उत्सुकता आणि प्रेम !
इंदिराबाई आणि दुर्गाबाई या खरंतर माझ्या आजी शोभतील, अशा वयाच्या. पण या दोघींचा मला स्नेह, सौहार्द, आशीर्वाद लाभला आणि माझं भाग्य मला ऐश्वर्यवंत करून गेलं! इंदिरा आणि दुर्गा लक्ष्मीचीच नावं. दोघी सात्त्विक आणि निर्मळ मनाच्या. साधं असणं, साधं वागणं, साधं बोलणं दोघींची सहजप्रवृत्ती ! या द्वयींच्या सहवासात वाटायचं, जणू प्राजक्ताच्या झाडाखाली मी बसलेय आणि धुंद गंधाच्या प्राजक्ताचा माझ्यावर अभिषेक होतोय ! यांच्याकडून किती टिपू आणि काय काय टिपू असं व्हायचं. ज्ञान टिपून घ्यायच्या बाबतीत दोघींचीही हीच अवस्था….
‘मी भुकेला सर्वदाचा, भूक माझी फार मोठी,
मंदिरी या बैसलो मी, घेऊनिया ताट वाटी
ज्ञानमेवा रोज खातो, भूक माझी वाढताहे
सेवितो आकंठ तरीही, मी भुकेला राहताहे…’
वयाच्या नव्वदीतही, दुर्गाबाई त्यांच्या शरीराला न पेलवणाऱ्या वजनाच्या ग्रंथाचे भाषांतर करण्यात गर्क ! ‘मला अजून भरपूर काम करायचंय’ ही प्रचंड उमेद ! जगातली सर्वांत ‘आनंदयात्री मीच’ ही भावना ! दुर्गाबाई म्हणजे अखंड ज्ञानयज्ञ ! जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा वाढदिवसासारखाच साजरा करावा आणि ‘रिकामा अर्धघडी राहू नको रे’ हे जीवनाचं तत्त्व ! ९०व्या वर्षीही बाईंची बुद्धी तल्लख ! आणीबाणीविरुद्ध जनजागृती करताना, त्यांनी दुर्गेचा अवतार धारण केला होता, हे सर्वश्रुत आहेच. प्रखर सूर्याचं तेज त्यांच्या वाणीत होतं, तर मृदुभाषी इंदिरेच्या लेखनात चंद्रकिरणांकुरांची ‘शांताकार शीतलता’ होती. दोघींच्या नात्याची वीण मात्र जाईजुईच्या गुंफलेल्या गजऱ्यासारखी घट्ट होती !
‘ प्रत्येक साहित्यकृतीच्या निर्मितीत वाचकाचा, मूळ निर्मात्याइतकाच सहभाग असतो,’ अशी दुर्गाबाईंची श्रद्धा होती. ‘ खरी डोळस मेहनत वाया जात नाही. प्रत्येक अभ्यासकाने किंवा संग्राहकाने आपली कुशाग्र बुद्धी पणाला लावून, स्वतःच्या दृष्टिकोनातून आपली कृती साध्य करावी. प्रत्येकाची कुवत मर्यादित असते. पण एखाद्याने ती सीमारेषेपर्यंत ताणली तर स्वतंत्र कृती निर्माण होते आणि कर्त्याला अपार मानसिक समाधान देते;’ असे त्यांना वाटे. दुर्गाबाईंच्या अशा अनुभवांचा मला कविता गायनात खूप उपयोग झाला..
दुर्गाबाईंना कर्मकांडापेक्षा ‘कर्मयोग’ महत्त्वाचा वाटे. ध्यासी हे प्यासी, पर्यायाने कर्मयोगीच असतात. त्यांची पिपासा जगाला कल्याणकारीच असते. आपलं काम निष्ठेनं, भक्तीनं केलं तरी खूप झालं. परखड तसेच विचारपरिप्लुत व लालित्यपूर्ण लेखन करणार्या दुर्गाबाईंनी, आपल्या लेखनात अगदी पाककृतींपासून ते साहित्यसंस्कृती, समाजकारण, वैचारिक लेखन, राजकारण, प्राचीन इतिहास, अशा अनेक प्रांतांत लीलया संचार केला.
दुर्गाबाईंचे स्त्रीविषयक तर्कशुद्ध विचार आजच्या आणि उद्याच्या पिढीलाही मार्गदर्शक ठरू शकतील. त्यांना ‘स्त्रीमुक्ती’ चळवळीचे अतिरेकीपण मान्य नव्हते. एकदा तर त्या मला म्हणाल्या, “अगं पद्मजा, रात्री अपरात्री दार वाजलं तर प्रथम आपण घरातल्या पुरुषासच पुढे पाठवतो ना?” पण स्वतःच्या हिंमतीवर जगणार्या कर्तृत्ववान स्त्रियांबद्दल त्यांना प्रचंड आदर होता. कामाठीपुऱ्यातल्या स्त्रियांसाठी काम करताना अनेकदा त्यांना शिव्याशापांनाही सामोरे जावे लागले. स्त्रीच्या आयुष्यातील निराशा, अडचणी, त्यांनी अचूक हेरल्या होत्या.
इंदिराबाईंनाही स्त्रीची ही व्यथा व्याकूळ करते. एका अल्पाक्षरी कवितेत हे ‘वैश्विक सत्य’ त्या अगदी सहजपणे मांडतात…
‘काय बाई सांगू कथा, क्षण विसावा भेटतो,
गुलबाशीच्या फुलासंगे, पुन्हा दीस उगवतो…
काय बाई सांगू कथा, पाणी आणून डोळ्यांत
एवढेच बोलली ती, घागरीला हात देत….’
इंदिराबाईंच्या मते कविता वाचन म्हणजे पुनःप्रत्ययाचा आनंद लुटणे नव्हे. कविता वाचनात वाचकही निर्मितीक्षम असतो, असायला हवा. तरच त्या कवितेतील सूक्ष्म असलेले, मोलाचे काही उलगडता येईल.
इंदिराबाईंच्या काव्याविषयी कविवर्य ग्रेस यांनी मला एकदा पत्रात लिहिले होते,
‘दिन डूबा, तारे मुरझाए,
झिसक झिसक गई रैन,
बैठी सूना पंथ निहारूँ,
झरझर बरसत नैन…’
मीरेची एकट एकाकी विरही वेदना, मराठीत अस्सल आत्मतत्त्वाच्या करांगुलीवर जर कोणी तोलून धरली असेल तर ती इंदिराबाईंनीच !
‘दुखियारी प्रेमरी, दुखड़ा रो मूल,
हिलमिल बात बनावत मोसो,
हिवडवा (हृदयात) में लगता है सूल.’
“इंदिराबाईंच्या वेदनेचा हा काटा, पद्मजाबाई तुमच्या गळ्याला गायिका म्हणून नक्कीच झोंबला असणार….” — ग्रेस.
“चाकूने किंवा सुरीच्या टोकाने मनगटावर घाव करावेत आणि त्यातून आलेल्या रक्ताच्या थेंबाकडे बघत रहावं, तशा या माझ्या कविता आहेत..” अशी प्रतिक्रिया स्वतःच्या कवितेकडे पाहताना फक्त इंदिराबाईच लिहू शकतात. त्यांची कविता आत्मस्पर्शी व आत्मभान असलेली आहे. ती वाचतानासुद्धा दुर्गाबाईंच्या लेखनासारखी चित्ररूपच कायम डोळ्यांसमोर येते.
इंदिरा अक्कांचं खास वैशिष्ट्य म्हणजे, निसर्गातील कुठल्याही ‘अजीव’ गोष्टीतही त्यांना ‘चैतन्य’ दिसतं. निसर्गावर तर दोघींचंही प्रचंड प्रेम ! दुर्गाबाईंच्या ‘ऋतुचक्र’, ‘निसर्गोत्सव’, ‘दुपानी’ किंवा इतर लेखनातही हा निसर्ग जिवंत उभा राहतो. अक्कांच्या संवेदनशील मनानं ‘वंशकुसुम’ हा संग्रह तर चक्क पारिजातकाच्या फुलाला वाहिलाय. फुलपाखरू जसं अलगद फुलावर बसावं, तशी त्यांची कविता एखाद्या दवबिंदूप्रमाणे तरल आहे. ‘ दवबिंदूला स्पर्श करताच तो फुटून जाईल की काय या भीतीनं कवितेतील ‘कवितापण’ जपायचा मी प्रयत्न करते, कारण प्रत्येक कविता हे कवीचं बाळच असतं.’.. ही त्यांची हळुवार तरल भावना.
पती ना. मा. संत निवर्तल्यावर अक्कांनी व्रतस्थपणे लिहिलेली एक कविता…
‘कसे केव्हा कलंडते, माझ्या मनाचे आभाळ
आणि चंद्र चांदण्यांचा दूर पोचतो ओहळ…
पेट घेई मध्यरात्र, पेटे काळोखाचे जळ
दिवसाच्या राखेमध्ये, उभी तुळस वेल्हाळ….’
यातील ‘तुळस वेल्हाळ’ हे शब्द म्हणजे अक्कांचा ऑटोग्राफच जणू ! अशा या सत्त्वशील योगिनींचा मला सुगंधी सहवास लाभला, हे माझे महत्भाग्यच !