तपासणी झाली. नवऱ्याला आत बोलवायला सांगितलं. दहा बारा महिन्याचं बाळ अगदी काळजीपूर्वक सांभाळत तो आत आला.
खूपदा दिसणारं हे चित्र. कुटुंबनियोजनाची काळजी घेण्यात अजूनही बरीच जनता उदासीन असते. काही हजार मोजले की मोकळं ! हा सोप्पा पण चुकीचा समज.
“अडीच महिने झालेत.”
“हो, पाडायचं.”
“आधी काळजी घ्यायची की मग.”
“ ….”
“आधीचं काय?”
“मोठा मुलगा पाच वर्षांचा, अन् ही मुलगी दहा महिन्यांची !”
“ॲापरेशन करून टाकायचं असतं… किमान लवकर तरी यायचं, मोठा गर्भ पाडायचा म्हणजे तिला त्रास होणारच की !”
“आम्हाला ठेवायचंच होतं, म्हणून इतकं लांबलं.”
“इतकं लहान बाळ असून ठेवायचं होतं?” आता आईच्या कडेवर विसावलेल्या गुटगुटीत मुलीकडे पहात विचारलं.
“हे भावाचं आहे. भाऊ चार महिन्यांपूर्वी ॲक्सिडेंटमधे गेला. त्याची बायको दोन महिन्यापूर्वी बाळाला टाकून गेली, त्यामुळे हे आता आमचंच. म्हणून आता तिसरं नको.” नवरा बाळाच्या केसात हात फिरवत म्हणाला.
“आताचा भावनेच्या भरात केलेला विचार कायम राहील का नंतरही?” सर्वसाधारण प्रश्न आणि शंका!
“विचार बदलू नये अन् बारकीवर अन्याय होऊ नये म्हणूनच हे पाडायचं अन् लगेच ॲापरेशन करायचंय. कारण तीन तीन लेकरं पोसण्याइतकी ऐपत नाही आमची.” तिचं पोरीचा गालगुच्चा घेत ठाम उत्तर !
आपल्या आजूबाजूलाच कितीतरी अगदी साधीसुधी दिसणारी, पण खूप मोठ्या उंचीवरची माणसं आपल्याला पहायला मिळतात ! देव फक्त मंदिरातच विराजमान असतो असं थोडंच आहे !! देवत्व असं कितीतरी लोकांच्या मनात आणि वागणुकीतही दिसतं कधीकधी आणि आपल्या मनाचं मोरपीस करतं !!!
लेखिका : सुश्री रश्मी लाहोटी
प्रस्तुती : मेघ:शाम सोनावणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आज अनिताकडे पार्टी आहे . तिच्या आणि अजयच्या ओळखीच्या पाच फॅमिलीज् येणार आहेत . त्यामुळे सकाळपासून तयारी सुरू आहे .
पहिल्यांदाच सर्वांना घरी बोलविण्याचा बेत तिने ठरविला . नाहीतर महिन्यातून एकदा सर्व मित्र बाहेर हॉटेलमध्ये भेटतात. गप्पा टप्पा मारतात , आणि रिचार्ज होऊन घरी येतात . हॉटेल असेच शोधतात जेथे मुलांना मस्ती करायला भरपूर जागा असेल.••••
या सर्व कार्यक्रमात आजी-आजोबा घरीच राहतात , त्यांना रात्रीचे बाहेर जाणं , उशीरा जेवणं तेवढं झेपत नाही .. यावेळेस अनिता-अजयने घरीच बोलविण्याचा प्लान ठरविला. ज्या परिवारात आजी आजोबा आहेत त्यांनाही आमंत्रण दिले .
सर्वांच्या सोयीनुसार दुपारच्या जेवणाचा बेत ठरविला. आपल्या मनोरंजनाची पद्धत थोडी बदलावी ,असं तिच्या मनात होतं .
घरचे जेष्ठ ,Retired from work जरी असले तरी They are not retired from fun,
असं तिचं मत आहे . नेहमी आपण बाहेर जातो ,ते काहीही तक्रार न करता घरी राहतात . येताना आपण त्यांच्या आवडीचे आइस्क्रीम आणले, तरी अगदी आनंदाने ते त्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी खातात .
त्यांचे बाहेर जाणं कमी झालेलं आहे . बदल, change प्रत्येकाला आवडतोच .
आपण आपल्या पद्धतीत थोडा बदल केला तर त्यांना पण आपल्यात सामावून घेता येईल .हा विचार अनिताच्या मनात होताच.
खरंतर दोन चार दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेनं हा बदल करण्याचा विचार तिच्या मनात आलेला अजून दृढ झाला.
परवा आजोबांचे चार मित्र त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला म्हणून घरी आले, तर अनिताच्या मुलीने म्हणजे प्रियाने खाडकन आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला . हे अस वागणं बरोबर नाही. खरंतर पंधरा वर्षांच्या प्रियाने सर्व आजोबांना हसून नमस्कार करणे आणि त्यांना पाणी आणून देणे एवढ करणं तरी नक्कीच अपेक्षित होतं .
बरं ! आजच्या मुलांना लेक्चर देऊन चालत नाही .ऐकतील की अजून बिथरतील सांगता येत नाही .
मुलांना आपल्यापेक्षा लहान मोठे सर्वांबरोबर व्यवस्थित वागता आलं पाहिजे . थोडं बहुत काम करायची सवयही असलीच पाहिजे. आज समोर दिसणाऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .
तेव्हा घरी गेटटूगेदर करायचे तिने ठरविले .
जेव्हा तिने हा विचार आपल्या मैत्रिणींमध्ये मांडला ,तेव्हा सगळ्यांना तो एकदम पटला असं झालं नाही . वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या .•••••
“अग ! ते खूप बोलतात . आपल्याला फ्रीली बोलता येणार नाही .” “त्यांच्या कडे लक्ष द्यावे लागते . आपला अर्धा वेळ त्यातच जाईल .” “मग रोजच्या सारखंच होणार ना , बदल कुठे झाला ?” “त्यांना लवकर जेवायचे असते . रात्रीचे झेपत नाही” वगैरे वगैरे .
अनिता म्हणाली “अग! आपण थोडा बदल करून तर बघू . माझ्या घरी सुरुवात करू .अग! जमेल सर्व .मी करते तयारी . त्यांना ही बरं वाटेल . मुलांनाही मदतीला घेऊ.”
रश्मी कशीबशी या प्लॅनसाठी तयार झाली.
आज देशपांडे आजी आजोबा , कुलकर्णी आजी आजोबा ,जाधव आजोबा, आणि देशमुख आजी आनंदात होते .आणि आश्चर्य चकितही होते.
मुलांबरोबर लग्नाला जाणे , एखाद्या कार्यक्रमात जाणे, यांची त्यांना सवय आहे. पण मुलांबरोबर त्यांच्या मित्रांच्या पार्टीला जायचे होते . उत्साह तर होता, बरोबर थोडं टेंशन ही होतं.
पार्टी छान झाली . सर्वांनी enjoy केलं . लहान मुलांनी खूप धमाल केली. बरोबर त्यांची मदतही झाली .आजी आजोबांकडे लक्ष द्यायचे काम त्यांनी छान केले .
सिनीयर्सची आपापसात छान ओळख झाली . गप्पा झाल्या .यंग जनरेशनच्या मनसोक्त गप्पा रंगल्या . हॉटेलपेक्षा हे option छान आहे . छान हातपाय पसरून गप्पा मारता येतात, हे सर्वांना पटलं .
फॅमिली गेटटूगेदर छान रंगलं.
दुपारच्या चहानंतर अंताक्षरीचा कार्यक्रम झाला. तरुण वर्ग, बच्चा पार्टी आणि आजीआजोबा ग्रुप असे तीन गट होते . सर्वांनी धमाल केली .आजी आजोबांनी जुनी गाणी छान म्हटली .
अगदी अंगाई गीत ,मंगलाष्टक तर
*जा मूली जा दिल्या घरी तू सुखी रहा .
*केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर
*घट डोईवर ,घट कमरेवर •••
शेवटचं देशपांडे आजींचे गाणं ऐकून तर सर्वांच्या डोळ्यात पाणीच आले .गाणं होतं ••••
*घरात हसरे तारे असता ,मी पाहू कशाला नभाकडे.•••*
शेवटी देशपांडे आजोबा म्हणाले ,”धन्यवाद मुलांनो, आज तुमच्यात सामील केल्याबद्दल. आज खूप दिवसांनी नवीन गाणी ऐकायला मिळाली . आम्ही दहा वर्षांनी लहान झालो.
Hope ,We have not troubled you.”
प्रियाने सर्वांसाठी चहा केला. त्याचं तर खूपच कौतुक झालं .
अनिताने ज्या उद्देशाने हे पाऊल उचलले , त्याची सुरुवात योग्य दिशेने झाली आहे हे तिच्या लक्षात आले.
म्हणतात ना •••
समज आणि समजूत यापैकी एक गोष्ट जरी माणसाजवळ असली तरी प्रश्न सहज सोडविता येतात.
माणसाने वेळेसोबत चालावे. काळाप्रमाणे बदलावे,परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबत ठेवावे.
लेखिका :सुश्री.संध्या बेडेकर
संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
… असं म्हणतात की जो इथं जन्माला आला त्याच्या अन्नाची सोय झालेली असतेच. अर्थात चोच आहे तिथे चाराही असतो.. फक्त ज्याला त्याला तो शोधावा लागतो.. त्यासाठी त्याला जन्मताच मिळालेले हातपाय योग्य वेळ येताच हलवावे लागतात.. असेल माझा हरी देई खाटल्यावरी असे भाग्यवंत खूप विरळे असतात.. अदरवाईज जिथे जिथे दाणा पाणी असेल तिथवर यातायात हि करावीच लागते.. बरं पोटाची व्याप्ती पण एकच एक दिवसाची असते.. होय नाही तर ते एकदा ओतप्रोत.. नव्हे नव्हे तट्ट ( फुटेपर्यंत) भरले एकदा आता पुढे चिंता मिटली असं का होतं. तुमचा आमचा अनुभव असा तर अजिबात नाही ना हे सर्व मान्य अक्षय सत्य आहे. दुसरं त्यात पहाना आपलं एकटयाचंच उदरभरणाची गोष्ट असती तर एकवेळ थोडा पोटाला चिमटा घेऊन रोजची हि दगदग न करता एक दोन दिवसाच्या फरकाने चाऱ्याचा शोधात हिंडता आले असते. पण तसं नशिबात नसतं. आपल्या बरोबर आपलीच रक्तामासाची, आपुलकीच्या वीणेने बांधलेली नाती यांची जबाबदारी …घरटयातला कर्त्याला कर्तव्य चुकत नसतं.. अन मग रोज मिळालेला चारा सर्वांना पुरणारा नसेल तर स्वताच्या पोटाला चिमटा घ्यावा लागतो तो खऱ्या अर्थाने. तैल बुद्धीच्या माणसांसारखा हा अन्नाचा साठा करून ठेवण्याची क्षमता आमच्या पक्ष्यांच्या घरटयात नाही.. त्यामुळे फार काळ साठवलेले अन्नधान्य नाहक नाशवंत होण्याचा धोकाही होत नाही…उन्हाळ्या असो वा पावसाळा, वा हिवाळयाचा कडाका , दाण्याच्या शोधात गावात करावा लागतोच फेरफटका… हि आम्हाला पक्ष्यांना नैसर्गिक शिकवण दिलीयं.. गरजेपुरते आजचे घ्या आणि इतर भुकेलेल्यांना शिल्लक ठेवा निस्वार्थ बुद्धीने.. त्यामुळे कधीही कमतरता पडलीच नाही, भुकबळी झालाच नाही, ना चाऱ्यासाठी आपापसांत भांडण तंटे, चोऱ्यामाऱ्या झाल्या नाहीत.. जे आम्हाला माणसांच्या जगात नेहमी दिसत आलयं.. जे मिळालयं त्यात तृप्तता आमच्या अंगाखांद्यावर दिसून येते..निसर्गत: सामाजिक बांधिलकीची समज असते ती आपल्या सर्वप्राणीमात्रात फक्त आम्हाला उमजलीय .. नि तुम्हा मानवांना स्वार्थाचा तण जो असतो तो मात्र उमजून घेण्याची तसदी घेत नाही… ती लवकरच उमजून यावी हि त्या जगनियंत्याला प्रार्थना..
“विरंगुळा” या शब्दाचा अर्थ काही कालावधीसाठी दैनंदिन दिनक्रमात केलेला बदल. अर्थात हा बदल मुख्यत्वे मनाशी निगडीत असतो. विरंगुळा म्हणून पूर्वी महिला वर्ग थोड्या वेळासाठी एकत्र येऊन गप्पागोष्टी करीत. एखाद्या आवडीच्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी थोडा वेळ काढणे हा विरंगुळा च ठरतो. काही लोक हख विरंगुळा म्हणून एखाद्या नृत्याच्या किंवा करमणुकीच्या कार्यक्रमाला जायचा बेत आखतील. तर काहीजच मित्र-मैत्रिणींसमवेत खाण्याचा कार्यक्रम ठरवितील. विरंगुळा म्हणजेवेळ चांगल्या प्रकारे घालविण्याचे विसावा घेण्याचे “क्षण.” स्नान, गृहकृत्ये, स्वयंपाकपाणी, बाजारहाट या रोजच्या बाबी आहेत च पण मन प्रसन्न, ताजे, टवटवीत ठेवण्यासाठी विरंगुळ्याची गरज असते. म्हणूनच तर अलिकडे. शहरात निरनिराळ्या ठिकाणी विरंगुळा केंद्रे उभारलेली दिसतात.
यापैकी बरीचशी “विरंगुळा केंद्रे ,”ज्येष्ठांसाठी विविध कार्मक्रमांचे आयोजन करतात. या केंद्रात महिन्यातील एखाद्या विशिष्ट दिवशी कधी व्याख्यान तर कधी गाण्याचे/नृत्याचे कार्यक्रम ठरविले जातात.. ज्येष्ठांना तरी याची विशेष गरज असते. महिन्यातून एखाद्या दिवशी सहभोजन आयोजित केलं जातं. त्यामुळे समवयस्क मित्र-मैत्रिणींसोबत आंनंदाने भोजनाचा आस्वाद घेतला जातो. इतकच नव्हे तर अनेक सणांच औचित्य साधून त्यानुसार विरंगुळा केंद्रत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. सरत्या वर्षाला निरोप किंवा नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी नियोजन केले जाते.
अलिकडे फ्लॅट संस्कृतीत हादगा जणू हद्दपार झाला आहे. मुलींनाही शाळा, क्लासेस यातून वेळ नसतो. मग ज्येष्ठ महिला सामुहिक हादगा आयोजित करतात नि वेळ आनंदाने घालवितात.
आजी-आजोबांनी नातवंडांना गोष्टी सांगणे हा दोघांसाठी विरंगुळा च. विरंगुळा म्हणूंन आवडीचे छंद जोपासण्याची संधी मिळते.
मृहणजेच निष्कर्ष काय तर “विरंगुळा ” ही प्रत्येकाचीच गरज आहे जी व्यक्ती आपापल्या आवडीनुसार ठरविते नि त्यातून आनंद लुटते.
☆ नृसिंह अवतार प्रकट झालेला खांब… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
नृसिंह अवतार प्रकट झालेला खांब पाकिस्तानात आहे …. पुण्याच्या सदाशिव पेठेतील जोशी वाड्यात श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर आहे. या जोश्यांपैकी श्री अनंत जोशी यांना पाकिस्तानने त्यांच्या देशात येण्यास परवानगी दिली म्हणजेच व्हिसा दिला आणि हे जोशी मार्च २००४ मध्ये पाकिस्तानात गेले.
जिथे भगवान नरसिंह अवतरीत झाले, श्रीविष्णू यांचा हा अवतार ज्या ठिकाणी प्रकट झाला ती जागा त्यांना बघायची होती आणि ही त्यांची इच्छा पूर्ण झाली. श्री जोशी पाकिस्तानी पंजाबच्या मुल्तान भागात आले. येथील प्रल्हादपुरी मंदिरात ही पावन जागा आहे. या फोटोत जो स्तंभ दिसत आहे, तो तोच स्तंभ आहे ज्यातून श्रीनरसिंह, श्रीविष्णू यांचा पाचवा अवतार प्रकट झाला होता.
बर्याच जोशी कुळांचं श्रीनरसिंह हे कुलदैवत असतं. कदाचित या जोश्यांचंही असेल आणि आपल्या कुळाच्या ईष्ट दैवताचं मूळ स्थान बघण्याची यांची इच्छा असेल. फोटोत बहुतेक ते कुलदैवताच्या मूळ स्थानी जिथे हा स्तंभ फाकलेला आहे, म्हणजेच जिथून श्री नरसिंह स्तंभ फाडून बाहेर आले तिथे जलाभिषेक करत असावेत.
या जोश्यांचे अनेक आभार कारण त्यांच्यामुळेच हा खांब फोटोत का होईना बघता येत आहे. त्यांच्या या मुल्तान भेटीत त्यांच्यासमोर मुन्शी अब्दुल रहमान खान यांनी लिहिलेलं आणि उलूम-इस्लामिया-चाहलक यांनी प्रकाशित केलेलं “तारीख-ए-मुल्तान” नावाचं एक उर्दू पुस्तक प्रस्तुत करण्यात आलं. यातील थोडी अनुवादित माहिती मध्यंतरी वाचनात आली होती.
सप्तपुरी म्हणजेच काशी, अयोध्या, उज्जैन, मथुरा, हरिद्वार, द्वारका, कांची अशी अतिशय पावन ठिकाणं आज आपल्या देशात आहेत, असंच एक ठिकाण होतं मूलस्थान म्हणजेच मुल्तान. श्रीविष्णू आणि सूर्यदेव यांची भूमी असलेल्या या आद्यस्थानाचा (आद्यस्थान हे या मुल्तानचं कितीतरी नावांपैकी एक नाव) इतिहास खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. आज श्रीमंत देवस्थानांमध्ये तिरुपती बालाजी, पद्मनाभ स्वामी मंदिर यांची नावे घेतली जातात. पण यांच्यापेक्षाही संपन्न देवस्थान जर कुठलं होतं, तर ते हिंदूंसाठी सर्वात महत्त्वाचं असणारं आदित्याचं देवालय – मुल्तानचं सूर्य मंदिर.
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
दोन दिवसांनी तो घरी आलेला. दहा बाय बाराचं त्याचं घर. बायको, लेक आणि तो.
त्याच्या खोलीबाहेरची ती गॅलरी. दरवाजाला लागून गॅलरीत आडवी पडलेली कॉट. कॉटवरचा त्याचा म्हातारा बाप. आयुष्यभर हातगाडी खेचत रस्ता मागे ढकलला त्यानं. थकला तो आता.. पायातलं त्राणच गेलंय त्याच्या आता. खुरडत खुरडत रांगत जातो तो.. अगदीच परावलंबी नाही तो… जरी असता तरी काळजी नव्हती. त्याचा खूप जीव होता बापावर.
त्याच्यासाठी वाट्टेल ते केलं असतं त्यानं.
त्याची बायकोही त्याच्यासारखीच.
सासरा नाही माझा बापच आहे असं समजणारी.
म्हातारा बिचारा कॉटवर बसलेला असायचा दिवसभर.
नातीला गोष्ट सांगायचा..
बापानं काबाडकष्ट केले म्हणून..
तो बारावी सायन्स तरी झाला.
पुढचं शिक्षण नाही झेपलं त्याला. आणि
तसा डोक्यानं मध्यम.
नोकरी नाही म्हणून घरी बसला नाही. पेपरची लाईन टाकायला सुरवात केली.
साहेब….
खरं तर साहेब त्याच्यापेक्षा वयानं फार मोठे नाहीत. फार फार चाळीस. पण प्रचंड हुश्शार. फार्माचा धंदा.जोरात चाललेला. फार्मा लेनमधे भलंमोठ्ठं ऑफीस.
एक दिवस साहेबांनी थांबवलं त्याला.
‘किती दिवस पेपर टाकणार आहेस अजून ?
ड्रायव्हिंग शिकून घे. मी पैसे देतो. गाडी चालवायला लागलास की, माझ्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचं. उपकार वगैरे करत नाहीये मी.
तुझ्या पगारातून कापून घेईन मी.”
जमलं.अगदी सहज.
सहज गाडी चालवायला शिकला.
साहेबांकडे कामालाही लागला.
साहेबांना माणसाची चांगली पारख.
साहेब सांगतील तसं…
तो कधीच नाही म्हणायचा नाही.
साहेबांचे दौरे असायचे.
सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, बेळगाव…
चार चार दिवस टूर चालायची.
त्याची काहीच तक्रार नसायची.
हातगाडीवाल्याचा पोरगा
आता ड्रायव्हर..
प्रमोशनच की….. आता बऱ्यापैकी पैसा मिळू लागला. झोपडपट्टीतून चाळीची एक खोली. पक्क्या भिंती, पक्कं छत. छान संसार सुरू झाला.
काही महिन्यांनी साहेबांनी एक दिवस पुन्हा बोलावलं.
“किती दिवस ड्रायव्हरची नोकरी करणार आहेस ?
यापुढे तुझी ड्युटी फक्त सकाळी आणि संध्याकाळी.
सहा ते दहा.
मधल्या वेळेत कॉलेज करायचं.
डी फार्मसी करून टाक.
फी मी भरीन. पण हे बघ… पुढच्या पगारातून कापून घेईन..”
साहेबांनी सांगितलं ना..
मग करायचंच.
तीन वर्ष फार ओढाताणीची गेली..
अभ्यास, नोकरी आणि संसार…..
जमवलं कसंबसं.
आणि तो “डी फार्म” झाला.
साहेबांकडची ड्रायव्हरची नोकरी चालू होतीच. रिझल्ट लागला. साहेबांना पेढे नेऊन दिले. साहेब खूष.
“गाडीची किल्ली दे इकडे. उद्यापासून मला ड्रायव्हरची गरज नाही. सिटी हॉस्पीटलमधलं मेडीकल आपण चालवायला घेतलंय. आपला माणूस आहे तिथं..
दोन तीन महिन्यात सगळं शिकून घे. नंतर मात्र तुलाच सगळं सांभाळायचंय..
तीन महिन्यानंतर तुला चांगले पैसे मिळायला लागतील.
आजच सुप्रभा बिल्डरकडे जायचं.
गंगापुररोडला स्कीम होत्येय त्यांची.
मी बोललोय त्यांच्याशी. तिथं एक वन बीएचके बुक करायचा.
असे किती दिवस भाड्याच्या घरात रहायचं ?
हफ्ता तुझ्या पगारातून कट होईल.”
ठरलं तर.
साहेबांनी सांगितलं तसंच होणार.
‘बरं..’
नेहमी तो एवढंच म्हणायचा. आणि चालू लागायचा. आज मात्र तिथंच घुटमळला.
“साहेब,
मी तुमची गाडी चालवली.
तुमी माझ्या जीवनाच्या गाडीला, चांगल्या रस्त्याला लावली.
मी कसं आभार मानू तुमचं ?”
साहेब पहिल्यांदा दिलखुलास हसले…
“म्हणजे मला पण तू ड्रायव्हर करून टाकलंस की.
हरकत नाही..
अरे सगळ्यात मोठा ड्रायव्हर तो श्रीकृष्ण.
मी आपली त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न करतो.
ते जाऊ दे. उपकाराची परतफेड कशी करणार ?
तू पण कुणाचा तरी ‘ड्रायव्हर’ हो.
तूही चांगला प्रामाणिक माणूस शोध.
त्याला योग्य रस्ता दाखव.
त्याची गाडी मार्गी लाव.
आणि आपल्या कंपनीच्या परिवारात सामील करून घे.”
हे अनमोल मार्गदर्शन ऐकून, सागरापेक्षा मोठा धबधबा डोळ्यात अडवून, तो घरी निघून गेला.
साहेबही निघाले. आज एका सेमिनारला जायचं होतं त्यांना. नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करणार होते साहेब. विषय होता…
“धंद्यासाठी चांगली विश्वासू माणसं कशी जोडावीत ?”
साहेब नुसतेच हसले आणि निघाले.
इतकी वर्ष साहेबांनी तेच तर केलं होतं…
“धंदे का राज” साहेब आज बिनदिक्कत सांगणार होते…
जीवनात सारथी व्हा …!!!
… कुणाचे तरी..!!
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ दिलो दिमाग की बात है… डाॅ.राजेंद्र बर्वे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆
हिंदी सिनेमातला तद्दन फिल्मीपणा सोडला, कमालीची भावविवशता सोडली ,तर खरं म्हणजे खूप काही ऐकण्यासारखं व क्वचित पाहण्यासारखं असतं.अखेर, दौलत- इज्जत, खानदान की आबरु, जमीन जायदाद यांपेक्षा मोहब्बत, प्यार आणि इश्क नक्कीच श्रेष्ठ असतं.माणसांना जोडणाऱ्या या प्यारच्या पुलाची भिस्त असते हृदयावर आणि कमानीअसतात त्यागाच्या! पण या ‘प्यार’चा डोस जरा अति आणि नाटकी होतो व तो विश्वासार्ह वाटेल अशा रीतीने पेश केला जात नाही, एवढाच त्यातला दोष. अमेरिकेत ‘इमोशनल इंटेलिजन्स’ या संकल्पनेनं धुमाकूळ घालण्यापूर्वीच हिंदी सिनेमाच्या संवाद लेखकांनी दिल आणि दिमाग यातील फरक पचनी पाडला होता. दिल क्या चाहता है और दिमाग क्या सोचता है, अशा टाईपचे संवाद नेहमी ऐकायला मिळतील. विशेषतः शम्मी कपूर आणि दिलीप कुमारच्या सिनेमात.
गोष्ट साधी आहे. दिल म्हणजे जजबात म्हणजेच भावना. भावना म्हणजे तरल संवेदना. कधी हलक्या कधी जजबात का तुफान किंवा सैलाब .तर दिमाग म्हणजे बुद्धीचातुर्य, तर्कनिष्ठ विचार, परिस्थितीचं सुसंगत, सुसूत्रित विश्लेषण व त्यानुसार काढलेले अनुमान आणि घेतलेले निर्णय.
दिल की बाते दिल ही जाने…. भावनांच्या मागे तसं लॉजिक नसतं. सिर्फ एहसास है ये, जो ‘रुह’नेच मेहसूस करायचा असतो. भावना समजून घ्यायच्या, त्या तशा का? असा विचार करायचा नाही. तशा असतात झालं! त्याच्याशी युक्तिवाद न करता त्यांच्याशी एकरूप व्हायचं.
दिल व दिमाग यातील फरक विशेषत: आपण व दुसरे यांच्याबाबत लक्षात घ्यायला हवा.
दुसऱ्याचा विचार करताना आपला दिमाग वापरायचा नाही; दिल वापरायचं. दुसऱ्या व्यक्तीशी संवाद करताना त्याच्या भावना जाणून घ्यायच्या. त्या व्यक्तीबरोबर सहानुभूतीनं (एम्पथी) वागायचं!
स्वतःचा विचार करताना मात्र दिलाऐवजी दिमाग वापरायचा. स्वतःविषयी निर्णय घेताना दिल के बजाय दिमागपर जोर दो बरखुरदार!
आपण प्रत्यक्षात नेमकं उलटं करतो. आपल्याला वाटतं दुसऱ्यानं दिमाग लढवावा आणि आपल्या दिलाला आपण कुरवाळावं!
** समाप्त**
लेखक डॉ.राजेंद्र बर्वे
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध दशमी पर्यंत गंङ्गा नदीचा जो उत्सव करतात, त्याला दशहरा किंवा गङ्गोत्सव म्हणतात.
भगीरथांच्या प्रदीर्घ प्रयत्नांती , ज्येष्ठ शुद्ध दशमीस, मंगळवारी, हस्त नक्षत्रावर गङ्गा नदीचे पृथ्वीवर अवतरण झाले.
या १० दिवसांमधील, गङ्गा- स्नानाच्या योगाने 10 पातकांचे, रोज एक याप्रमाणे क्षालन होते, म्हणून याला “दश-हरा” म्हणतात.
यालाच “गङ्गावतरण” असेही म्हणतात. गङ्गेचे अवतरण, हिंदू लोक, हा “दशहरा-काल” एक सण म्हणून साजरा करतात. गङ्गेचे, स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले. हा सण दहा दिवस साजरा केला जातो. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी.
माँ गङ्गा नदीला, संपूर्ण विश्वात सर्वात पवित्र नदी मानले जाते.
सर्व नद्यांचे , मनुष्य जातीवर खूपच उपकार आहेत. सर्व नद्या पवित्र व साक्षात जलदेवता आहेत. त्यांचे प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी, नद्यांची पूजा केली जाते.
गङ्गा नदीने आपल्या पिताश्रींना, म्हणजे श्री शिवजींना विचारले, की सर्व लोक माझ्या मध्ये येऊन स्नान करून आपली पापे धुवून टाकतात. माझ्याकडे, साठलेल्या या सर्व पापांचे, निर्मूलन करण्यासाठी, मी काय करू? तेव्हा श्रीशिवजींनी सांगितले, की तू श्रीनर्मदा- मैया मध्ये जाऊन स्नान कर. व त्यायोगे, तू , स्वतःला शुद्ध करून घेऊ शकशील; कारण श्रीनर्ममदा ही स्वतःच पापनाशिनी आहे. त्यामुळेच या दशहराच्या कालखंडात श्री नर्मदा मैया मध्ये स्नान केल्यामुळे गङ्गास्नानाचेही पुण्य लाभते.
काही ऋषींनी असेही पाहिले आहे की, श्री श्रीगङ्गा- मैय्या ही काळ्या गाईच्या रुपाने, श्री नर्मदा मैया मध्ये स्नानासाठी येते व परत जाताना ती शुभ्र रंगाची होऊन जाते. म्हणून या गङ्गा दशहराच्या काळात, गङ्गामैया, नर्मदा मैया किंवा त्यांच्या किनारी जाणे शक्य नसेल, तर कोणत्याही नदीमध्ये त्या दोघींचे नाव घेऊन स्वतःच्या पापनाशनासाठी स्नान करावे. पुण्यशालिनी अशा सप्त नद्यांचे स्मरण करावे.
आपल्या निवासाच्या ठिकाणी जी नदी आहे, तिचेसुद्धा आपल्यावर खूप मोठे ऋण असते. तिची पूजा करावी. मैय्याला खस (वाळा), कापूर, सुगंधी द्रव्ये अर्पण करावीत. ओटी भरावी. नैवेद्य दाखवावा. ऋतुकालोद्भव अंबा अर्पण करावा. मैय्याला भरवावे. काठावर दिवे लावावे. त्यांची स्तोत्रे म्हणावीत.
गावातील सांडपाणी नदीत जाणार नाही यासाठी प्रयत्न करावेत.
आद्य श्री शंकराचार्यांनी गङ्गाष्टक, गङ्गा स्तोत्र, यमुनाष्टक, नर्मदाष्टक, मणिकर्णिकाष्टक अशा स्तोत्रांची रचना केलेली आहे. नद्यांवरती इतरही बरीच काही स्तोत्रे आहेत. त्यांचे पठण करावे. श्री जगन्नाथ पंडित यांनी गङ्गालहरी स्तोत्र याची सुंदर रचना केलेली आहे. श्री शंकराचार्य व श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी नर्मदा लहरींची रचना केलेली आहे. श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी कृष्णा लहरींची पण रचना केलेली आहे. या स्तोत्रांमध्ये या नद्यांची स्तुती केलेली आहे, महती सांगितलेली आहे व फलश्रुती पण सांगितलेली आहे. तरी या दहा दिवसात अशा प्रकारे उपासना करून स्वतःचा उद्धार करून घ्यावा. श्री जगन्नाथ पंडितांनी गङ्गा लहरी रचताना गङ्गास्तुतीच्या सहाय्याने स्वतःचा उद्धार करून घेतलेला आहेच. ज्या लोकांना, योग मार्गाने आपल्या शरीरातील नाड्यांची शुद्धता करून घेता येणे जवळ जवळ अशक्य असते, त्यांना या नद्यांच्या उपासनेमुळे, स्तवनामुळे, त्या प्रकारची नाडी शुद्धी प्राप्त करून घेता येत असते, असे शास्त्र वचन आहे, भागवत पुराणात याचा उल्लेख आहे. या काळामध्ये नदीमध्ये स्नान, जप जाप्य उपासना व दान करणे या गोष्टींमुळे उच्च दर्जाची अध्यात्मिकता प्राप्त होते.
पूर्वीचे काळी, म्हणजे सुमारे 60-70 वर्षांपूर्वी, मंदिरांमधून, जसे आपण नवरात्र साजरे करतो, तसे गङ्गा दशहरा काळांत, दहा दिवस कीर्तन, जागरण, भागवत श्रवण, भगवत्कथा, जप जाप्य, अभिषेक होत असत.
माझी आई “मंगला कुलकर्णी” ही, कीर्तनकार असल्याने या दशहराच्या काळात लहानपणी, तिची कीर्तने अनेक वेळा ऐकण्याचे भाग्य मला लाभले होते. कारण मी तिला पेटीची साथ करत असे. ती उच्च विद्या विभूषित असल्याने व प्रोफेसर असल्याने तिचे अर्थार्जन बऱ्यापैकी उच्च प्रतीचे होते. कीर्तनातून मिळालेले पैसे, स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी वापरायचे नाहीत, असे तिने ठरवले असल्याने, त्या संपत्तीचा, तिने विविध प्रकारच्या दानांसाठी विनियोग केला होता.
अशा दशहराच्या काळात, एक प्रकारचे वाचिक तप म्हणून, कोणाचीही निंदा तसेच चहाडी, न करणे यांसारखी बंधने, स्वतःवर लादून घेणारी बरीच मंडळी असतात.
या दहा दिवसांच्या काळात प्रामुख्याने श्री गङ्गामैया, श्री नर्मदा मैया, श्री शिवशंभू व भगवान श्री विष्णू यांची उपासना जास्तीत जास्त प्रमाणात करण्याचा प्रघात आहे. अशाप्रकारे या पवित्र कालावधीमध्ये जास्तीत जास्त उपासना करून आपण आपला अध्यात्मिक उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करू या.
या काळात ज्या सोप्या मंत्रांचा जप करावा ते असे…
१) हरगङ्गे भागीरथी।।
२) नर्मदे हर।।
३) नमः शिवाय।।
४) राम कृष्ण हरी गोविंद।।
ज्यांना येते त्यांनी इतर विविध प्रकारची गीते, स्तोत्रे, मंत्र यांचे पठण करावे.
या काळात गंगाकिनारी किंवा नर्मदा किनारी स्थित असलेल्या तीर्थस्नानांचे दर्शन घ्यावे.
तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एखाद्या ज्योतिर्लिंगाचे आणि श्री महाविष्णूंच्या एखाद्या प्रसिद्ध मंदिराचे दर्शन घ्यावे.
ज्यांना यज्ञयाग इ. पुण्यकर्मे करणे, कोणत्याही कारणांमुळे करणे अशक्य असेल त्यांनी निदान अशी कर्मे जिथे नेहमी/ मोठ्या प्रमाणात केली जातात, अशा ठिकाणी स्वतःच्या आर्थिक कुवतीनुसार त्या हवनासाठी ज्या वस्तू लागतात, त्यांचे दान अवश्य करावे.
तेही खूप पुण्यवर्धक असते.
२० मे ते ३० मे पर्यंत या वर्षीचा गंगा दशहराचा पुण्यकाल आहे.