मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नाच रे मित्रा नाच —” ☆ श्री कचरू चांभारे ☆

श्री कचरू चांभारे

? इंद्रधनुष्य ?

☆ “नाच रे मित्रा नाच —” ☆ श्री कचरू चांभारे ☆

जगण्याचा पायाच नाच आहे. नृत्य हा शब्द कानावर पडताच नृत्याचे अनेक दृश्य लगेच डोळ्यासमोर येतात. आपल्या संस्कृतीत नृत्याला खूप महत्व आहे. नाच रे मोरा आंब्याच्या बनात हे गाणं ऐकूनच आपण वयाने मोठे झालो आहोत. आज नृत्य पुराण आठवण्याचे कारण म्हणजे आज 29 एप्रिल आहे. हा दिवस जागतिक स्तरावर नृत्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बॕले नृत्याचे आद्य संस्थापक जीन जॉर्जेस नोव्हेर यांचा हा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ युनेस्कोच्या भागीदार असलेल्या  आंतरराष्ट्रीय नृत्य संस्था या स्वायत्त संस्थेकडून आजचा दिवस जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

नृत्य कलेला आणि नृत्य कलावंतांना जगमान्यता मिळावी, या कलेचा उत्कर्ष आणि प्रसार व्हावा हा उद्देश या दिनामागे आहे.

हर्ष, भीती, नाच या मानवाच्या मूलभूत भावना आहेत. वर्ण, प्रांत, देश, भाषा, वंश इत्यादी अनेक प्रकाराने मानव परस्परांपासून भेदित झाला असला तरी आनंद, भीती, हातवा-यांच्या खुणेची भाषा भूतलावरच्या समस्त मानवजातीसाठी एकच आहे. उदा. भूक लागली, तहान लागली, इकडे ये, तिकडे, जा, नको अशा अनेक क्रिया आपण खाणाखुणांनी दाखवू शकतो. नृत्य ही पण अशीच एक सर्वव्यापी नैसर्गिक भावना आहे. मनासारखं घडलं की माणुस मनातून डोलतो.

आपल्या भारतात दहा नृत्य शैली प्रसिध्द आहेत. भरतमुनींचा नाट्यशास्त्र हा नृत्याशी संंबंधित अति प्राचिन ग्रंथ मानला जातो. कुचिपुडी, भरतनाट्यम, मणिपुरी, ओडिशी, कथकली, मोहिनीअट्टम या भारतातील अतिप्राचिन नाट्यपद्धती आहेत. भगवान शंकराचे तांडव नृत्य हा ही एक नृत्य प्रकारच. लावणी हा नृत्य प्रकार महाराष्ट्राच्या लोककलेचे अविभाज्य अंग आहे. पंजाबच्या भांगड्यावर व गुजरातच्या गरब्यावर ठेका धरणारेही खूपजन आहेतच.

नृत्य व नाचणे हे जरी समान अर्थाचे शब्द असले तरी आपल्याकडे नृत्य शब्द प्रतिष्ठेचा आब राखून आहे. नाचण्याच्या वाट्याला ती प्रतिष्ठा नाही. नृत्य हा प्रकार कला म्हणून मानला जाऊ लागला तेव्हापासून नृत्याची प्रकारानुसार नियमावली तयार झाली व त्यातली नैसर्गिक भावना लोप पावली. नाचता येईना अंगण वाकडे हे तेव्हापासून सुरु झाले. खरं म्हणजे नाचण्याचा व अंगणाचा काही संबंधच नाही. नाचणे ही पूर्णतः मानसिक क्रिया आहे. मनातारखा ताल मिळताच आपोआपच शरीर त्या तालाला प्रतिसाद देते हा नाच कलेचा अभिजात नैसर्गिक पुरावा आहे.

दुःख विसरुन पूर्णपणे वर्तमान आयुष्य जगायला शिकवणारी नृत्य ही सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे. आंतरिक सुख भावनेशी शरीराचे पूर्ण मिलन हे नृत्याविष्कारतच घडते. आपली भारतीय सिनेसृष्टी तर नृत्यावरच उभी आहे. ताल, दिल तो पागल है, एबीसीडी, तेजाब, हम आपके है कौन, रबने बना दी जोडी अशा कितीतरी चित्रपटांना लाजवाब नृत्याने घराघरात पोहोचवलं. माधुरी, ऐश्वर्या, हेमामालिनी यांच्या पदन्यासाला न भुरळणारा माणूस भेटेल का ? तेरी मेहरबानियाँ मधला प्रामाणिक कुत्रा व त्याच्यावरचं टायटल साँग डोळ्यात पाणी आणतं. जय हो, सैराटची गाणी लागताच संपूर्ण तरुणाई थिरकायला लागते. ते यामुळेच. शांताबाई व शांताराम, आईची शपथ, चिमणी उडाली भूर्र या गाण्यांना तर लग्नापूर्वीचा एक अत्यावश्यक विधी अशी मान्यताच मिळाली आहे.

नृत्य हा एक सर्वोत्कृष्ट व्यायाम प्रकार आहे. जगाची चिंता न करता, लाज या भावनेला मुरड घालून स्वतःसोबतच ताल धरणे हा आनंद निर्मितीचा सहजभाव आहे. संगिताचा कुठलाही अभ्यासक्रम माहीत नसताना लहान मूल स्वताःच्या तालातच नाचतं डुलतं ते सहजभावनेमुळेच. पण माणुस वयाने मोठा होत चालला की लाजेचा प्रभाव वाढत जातो व माणसं नाचणं सोडून देतात. जगातला एकच खुला रंगमंच असा आहे की जिथं माणूस नाचायला लाजत नाही, तो रंगमंच म्हणजे स्वतःचा पाळणा व लहाणपणीचं अंगण. अन् एकच मालिक आहे असा आहे की जो आपल्या नृत्याचं भरभरून कौतुक करतो तो म्हणजे आपली आई. एकदा हा काळ संपला की वरातीतलं मुक्त नाचणं सोडलं तर सगळेच नृत्यप्रकार नियमाधिन झालेले, त्यामुळे बंधनं येतात. शोलेमधला धर्मेंद्र (वीरू) बसंतीला (हेमा)  इन कुत्तोंके सामने मत नाच असं ओरडून ओरडून सांगतो. त्याच्या उलट गंगा जमुना सरस्वतीमधली सरस्वती आपल्या गंगासाठी(अमिताभ बच्चन) चालत्या ट्रकवरच नृत्य करते. गाण्यांच्या मैफलीत खलनायकांना रंगवून नायकाची सुटका करणं वा इप्सित साध्य, साध्य करणं हे प्रकार आपण सिनेमात पाहिलेले आहेतच. म्हणजेच नृत्य ही दिल लुभानेकी बात है, तशी ती शस्त्र म्हणूनही वापरता येणारी बाब आहे.

शास्त्रीय नियमावलीत नृत्याला अडकवून तालासुरात जगण्याचा एक सोपा मार्ग आपण ठराविक लोकांच्या हाती दिला आहे. नृत्याची सोपी व्याख्या म्हणजे मनात उठलेल्या तरंगांना लयबद्ध अंगविक्षेपाची जोड देणे होय. नृत्य कलेची प्रतिष्ठा जपून तिचा प्रसार करणाऱ्या सर्व नृत्य शिक्षकांना सलामच. दीर्घ, निरोगी व सहज सुंदर आयुष्यासाठी नाच मित्रा नाच.

© श्री कचरू चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “चरित्रकार वीणा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “चरित्रकार वीणा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काही व्यक्तींची ओळख त्यांनी केलेल्या कार्यावरुन होते.बरेचदा त्या व्यक्ती आणि त्यांनी केलेले कार्य हे जणू समीकरणच बनतं.असच एक समीकरण म्हणजे वीणा गवाणकर आणि “एक होता कार्व्हर”.

हे जग खूप म़ोठ आहे. ह्या जगाच्या कानाकोपऱ्यात सुध्दा कर्तृत्ववान,हुशार मंडळी वास करीत असतात. त्यांच्या कर्तृत्वाची महती संपूर्ण जगासमोर आणण्याचे काम काही व्यक्ती आपल्या लिखाणातून करीत असतात. कोणाचेही सद्गुण हेरून ते मनोमन कबूल करून ,जाहीररीत्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणे हे तसे कठीण काम. कारण मानवी वृत्तीने आधी दुसऱ्या चे सद्गुण हेरून त्याची महती मान्य करणं हे खरंच एक अफलातून कामं.पण अशाही काही व्यक्ती असतात त्या हा घेतलेला वसा लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आपल्या चरित्रासम लिखाणातून पार पाडीत असतात ,ते ही निःस्पृह भावनेने.

अशाच काही लेखनकार्यात भरीव कामगिरी करून ते आपल्या लेखनाद्वारे लोकांपर्यंत सातत्याने पोह़चविणा-या लेखकांपैकी प्रामुख्याने वीणा गवाणकर ह्यांचे नाव चटकन नजरेसमोर येतं. वीणा गवाणकर ह्यांनी लिहीलेली खूप सारी चरित्रे प्रसिद्ध आहेत . पण कसं असतं नं आपली एखादी कलाकृतीच खूप स्पेशल ठरुन जणू तीच आपली ओळख बनून जाते.वीणा गवाणकर म्हंटलं की चटकन आठवतं “एक होता कार्व्हर”.

त्यांचा जन्म 6 मे 1943 चा. स्वतः ग्रंथपाल, उत्तम चरित्रकार असलेल्या वीणाताईंनी लिहीलेली अनेक नावाजलेल्या व्यक्तींची चरित्र लोकप्रिय आहेत.”एक होता कार्व्हर”ह्या अफाट गाजलेल्या चरित्राने त्यांना घराघरांत पोहोचविले.ह्या पुस्तकाची मोहिनीच तशी विलक्षण आहे.

“एक होता कार्व्हर”,”आयुष्याचा सांगाती”,  “डॉ. आयडा स्कडर”,सर्पतज्ञ डॉ रिमांड डिटमार्स,शाश्वती भगिरथाचे वारस,डॉ खानखोजे,नाही चिरा नाही पणती,डॉ सलीम अली,लीझ माईटनर,राँबी डिसील्व्हा,रोझलिंड फ्रँक्वीन,इ.अनेक उत्तमोत्तम चरित्रपर लेखन प्रसिद्ध आहे.

ह्यांचा जन्म लोणी काळभोरचा व पुढील शिक्षण चौल,मनमाड, इंदापूर येथील मराठी शाळेतून झाले. थोडक्यात काय तर माणसाला सुसंस्कृत, उच्चशिक्षित व्हायचं असेल तर लहान गावातून,मराठी शाळांतूनही होता येत हे ह्यांनी सिद्ध केलयं.पुढे फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी, पुणे विद्यापीठातून ग्रंथपाल ही पदवी घेतली.1964 पासून औरंगाबादच्या महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्याची सुरवात केली.

…वाचनाची आवड, शिक्षकांचे प्रोत्साहन ह्याने अनेक उत्तमोत्तम साहित्य त्यांच्या वाचनात आले, फूटपाथवर अर्ध्या किमतीत मिळणाऱ्या पुतकामध्ये त्यांना कार्व्हर चे पुस्तक हाती लागले.त्यांनी ते झपाटल्यागत वाचून त्यांचे हे चरित्र खास मराठी लोकांसाठी “एक होता कार्व्हर” ह्या पुस्तकाच्या रुपात आणले आणि ह्या पुस्तकाने एक इतिहासाच घडविला.

जन्माने गुलाम असलेल्या अनाथ, कृष्णवर्णीय,अमेरिकन कृषीशास्त्राच्या धडपडीची, मानवी जीवनाचे मोल वाढविणा-या प्रयत्नांनी वेध घेणारी,चरित्र कहाणी”एक होता कार्व्हर”,मानवी जीवनाची सेवा करण्यासाठी, भारतातील ग्रामीण आरोग्याच्या स्तर उंचावण्यासाठी आपले ज्ञान वापरणा-या कर्तव्यनिष्ठ अमेरिकन महिला डॉक्टर ची जीवनकथा “डॉ आयडा स्कडर”,सर्पतज्ञ डॉ रेमंड डिटमार्स ह्यांची साप पाळण्याच्या छंदातून जागतिक किर्तीचे सर्पतज्ञ होण्यापर्यंत चा प्रवास, डॉ सलीम अली ह्या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या पक्षीतज्ञाच्या जीवनकार्याचा वेध, महान क्रांतिकारक ते श्रेष्ठ कृषीतज्ञ हा प्रवास, आँस्ट्रीयन अणूशास्त्रज्ञ स्त्री “लीझ मायटनर”, भडीरथाचे वारस विलास साळुंखे हा पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे हे ठणकावून सांगणारा अभियंता, इ.वीणाताईंनी ह्यांची चरित्रे आपल्या प्रभावी लेखणीद्वारे लोकांसमोर आणलीयं. त्यांनी जवळपास 30 चरित्रंलेखन दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध केलयं. तरी  “एक होता कार्व्हर” हे पुस्तक म्हणजे जणू त्यांची ओळखच बनली.

नुकत्याच  झालेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप सा-या शुभेच्छा देऊन आजच्या पोस्टची सांगता करते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दुखावणारी माणसं ! – सुश्री यशश्री भिडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

??

☆  दुखावणारी माणसं ! – सुश्री यशश्री भिडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

काल एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम संपल्यावर बाहेर पडताना थोडा अंधार होता. प्रत्येकजण आपापलं जेवण आटपून बाहेर पडत होता. तेवढ्यात एका व्यक्तीला एका प्रथितयश डॉक्टरांनी हाक मारून म्हटलं “अरे बाहेर अंधार आहे रे, सांभाळून ! बाहेरच्या काळोखासारखा असलेला तुझा चेहरा कुणाला दिसला नाही, तर आपटेल कुणीतरी तुझ्यावर !”

त्या व्यक्तीचा चेहरा एकदम पडला. चारचौघात त्याच्या रंगावरून बोलल्यामुळे मनातून खूप दुखावला गेला असावा ! काय मिळतं अशा कॉमेंट्स करून लोकांना काय माहित!!

एखाद्याच्या व्यंगावर हसणारे लोक पहिले की कीव येते अगदी त्यांची ! बरं, ही माणसे स्वतः अगदी सर्वगुणसंपन्न असतात असंही नाही. पण ते ज्या पद्धतीने दुसऱ्याच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवतात ना ते पाहिलं कि चिडचिड होते अगदी !!

ही अश्या प्रकारची माणसं. समोरच्याच्या मनाचा कधीही विचार करत नाहीत, आणि बोलून झालं की आपण काहीतरी फारच भारी काम केल्यासारखं स्वतःवर खुश होऊन हसत असतात, आणि ज्याला ऐकावं लागतं तो मात्र बिचारा खजील होतोच आणि स्वतःचा आत्मविश्वासही गमावून बसतो.

लहान मुलांना पटकन त्यांच्यातला दोष दाखवण्यात ह्या प्रकारची माणसं अगदी पटाईत असतात. एकदा मी आणि माझी लेक एका ठिकाणी गेले होते. एक ओळखीच्या बाई आपल्या नातीला घेऊन आलेल्या तिथे…. ‘कुठे असतेस, काय करतेस’ अशा जुजबी चौकश्या झाल्यावर माझ्या लेकीकडे बघून म्हणाल्या “अगंबाई, दातांची वेडीवाकडी ठेवण अगदी आईची घेतलेली दिसत्ये !” 

त्या बाई सावळ्या होत्या तशीच त्यांची नातही सावळी दिसत होती. म्हणून मी लगेच म्हटलं “होय, खरंय तुमचं, काही मुलं आईची वाकड्या दातांची ठेवण घेतात आणि काही मुलं थेट आजीचाच रंग घेतात हो !” माझ्या बोलण्याचा रोख कळला त्या बाईंना ! राग येऊन निघून गेल्या तिथून!! बहुतेक परत कुणाला बोलणार नाहीत!!

ह्या वृत्तीची माणसं फक्त दुसऱ्याच्या व्यंगावरच बोट ठेवतात असं नाही, तर त्याची एखादी दुखरी नस माहित असेल तर अगदी आठवणीने तो विषय काढून बोलणारच. माहित असतं बरं का ह्या लोकांना कि, समोरच्या माणसाचा मुलगा काहीही न करता घरी बसलेला आहे, तरी विचारणार, “असतो कुठे हल्ली ? दिसला नाही बरेच दिवसात ! म्हटलं मोठ्ठी नोकरी लागलेली दिसत्ये !” हे ऐकून आधीच काळजीत असलेली ती माउली अजूनच दुःखी होते.

लग्न लवकर न ठरलेल्या, मूल लवकर न होणाऱ्या, परीक्षेत, व्यवसायात सतत अपयश येणाऱ्यांना तर ह्या विशिष्ट प्रकारची माणसं अगदी नको करून सोडतात !

रस्त्यात, समारंभात अगदी भाजी घेताना भेटलो आणि वेळ मिळाला तर तिथेसुद्धा तुम्हाला दुखावल्याशिवाय  ही माणसं सोडत नाहीत !! आणि सगळ्यात जास्त वेळा टोमण्यांचा, चेष्टेचा सामना करावा लागतो तो माझ्यासारख्या जाडजूड माणसांना !!

फिट असावं आणि दिसावं असं कुणाला वाटत नाही? कुणालाही आपण बेगडी, कुरूप दिसावं असं वाटत नसतंच मुळी ! प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. पण शेवटी सगळंच काही आपल्या हातात नसतं ना! 

माझ्यासारख्या जाड व्यक्तींना ऐकवले जाणारे कॉमन डायलॉग कोणते माहित्ये ? “हळू, हळू, खुर्ची मोडेल, बापरे भूकंप झाला कि काय, समोर बघून चाल, तुला काही नाही होणार ती गाडी मोडेल, घसरू नको, रस्त्यात खड्डा पडेल मोठा, जरा कमी जेव किंवा खा एखादी पुरी, काही नाही होणार १०० ग्रॅम वाढून सागराला काय फरक पडेल ?…” इ.इ.

कुणी अति बारीक असेल तर “फु केलं तरी उडशील, नुसती काठी असून काय उपयोग ! ताकद नको ?” इ इ. 

हे सगळं जे बोलत असतात त्यांच्या आरोग्याची खरं तर बोंब असते. फिगर छान असते, पण गुढघे दुखत असतात, मणके दुखत असतात, जराशा कामाने दमायला होत असतं, पण हे सगळं दिसत नसतं. 

दुसऱ्याला मूल होत नाही म्हणून त्यांना बोलणाऱ्यांची मुले जे दिवे लावत असतात, त्याचा प्रकाश त्यांना नंतर दिसणार असतो. परीक्षेत अपयश मिळणाऱ्या मुलांना बोलणाऱ्यांची स्वतः कधी शाळेत सुद्धा विशेष प्राविण्य मिळवलेलं नसतं. पण… बोलायचं… टोचायचं काम ही माणसं मनापासून करत असतात आणि त्यात त्यांना आनंद मिळत असतो हे विशेष !!

माझी चिपळूणची आजी (आईची आई ) नेहमी दासबोधातले दाखले द्यायची. तिचं वाचन आणि अभ्यास प्रचंड होता ह्या विषयावरचा. आमच्या एकदा गप्पा चालू होत्या तेव्हा ती म्हणाली “समर्थानी सांगितलेलं आहे, तसं वागावं म्हणजे काय तर ‘नाठाळाचे माथी हाणू काठी’ स्वतःहून कुणाला व्यंग दाखवून दुखावू नये, पण आपलं व्यंग काढून आपल्याला कुणी दुखावलं तर त्याचं व्यंग दाखवल्याशिवाय त्याला सोडू नये. ज्याचं त्याचं माप त्याच्या पदरात घालायचं. आपलं व्यंग दाखवलं म्हणून दुःखी व्हायचं नाही, उलट समोरच्याची कीव करून त्याला देव सद्बुद्धी देवो म्हणायचं…!

लेखिका : सुश्री यशश्री भिडे

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ : ऋचा : ६ ते १० ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ : ऋचा : ६ ते १० ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ (अनेक देवतासूक्त)

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : ऋचा ६-१०  : देवता वरुण 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील चोविसाव्या  सूक्तात शुनःशेप आजीगर्ती  या ऋषींनी अनेक देवतांना आवाहन केलेले  असल्याने हे अनेक देवता सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिली ऋचा प्रजापतीला, दुसरी ऋचा अग्नीला, तीन ते पाच या ऋचा सवितृ देवतेला आणि सहा ते पंधरा या ऋचा वरुण देवतेला  आवाहन करतात. आज मी आपल्यासाठी वरुण देवतेला उद्देशून रचलेल्या सहा ते दहा या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे. 

मराठी भावानुवाद : 

न॒हि ते॑ क्ष॒त्रं न सहो॒ न म॒न्युं वय॑श्च॒नामी प॒तय॑न्त आ॒पुः ।

नेमा आपो॑ अनिमि॒षं चर॑न्ती॒र्न ये वात॑स्य प्रमि॒नन्त्यभ्व॑म् ॥ ६ ॥

अविरत वाहत स्रोत जलाचा पक्षीराज  व्योमीचे

देवांनी जे दूर सारले कुदर्प वायूंचे

पासंगा तुमच्या ना कोणी तुम्ही बहुथोर

शौर्य तुमचे सामर्थ्य तसे कोप तुझा अति घोर ||६||

अ॒बु॒ध्ने राजा॒ वरु॑णो॒ वन॑स्यो॒र्ध्वं स्तूपं॑ ददते पू॒तद॑क्षः ।

नी॒चीनाः॑ स्थुरु॒परि॑ बु॒ध्न ए॑षाम॒स्मे अ॒न्तर्निहि॑ताः के॒तवः॑ स्युः ॥ ७ ॥

अमर्याद विस्तीर्ण व्योमा नाही आधार

पराक्रमी वरुणाने दिधला तरुस्तंभ आधार

विचित्र त्याचे रूप आगळे बुंधा त्याचा वर

अंतर्यामी त्याच्या आहे वसले अमुचे घर ||७||

उ॒रुं हि राजा॒ वरु॑णश्च॒कार॒ सूर्या॑य॒ पन्था॒मन्वे॑त॒वा उ॑ ।

अ॒पदे॒ पादा॒ प्रति॑धातवेऽकरु॒ताप॑व॒क्ता हृ॑दया॒विध॑श्चित् ॥ ८ ॥

सूर्याच्या मार्गक्रमणास्तव वरूणे विस्तृत केला 

अतिचिंचोळ्या वाटेचा तो राजमार्ग  बनविला 

क्लेशकारी जे असते अप्रिय दुसऱ्यासी बोला ना 

वरुणदेव करी अति आवेगे त्याची निर्भत्सना ||८ ||

श॒तं ते॑ राजन्भि॒षजः॑ स॒हस्र॑मु॒र्वी ग॑भी॒रा सु॑म॒तिष्टे॑ अस्तु ।

बाध॑स्व दू॒रे निर्‍ऋ॑तिं परा॒चैः कृ॒तं चि॒देन॒ः प्र मु॑मुग्ध्य॒स्मत् ॥ ९ ॥

वरूण राजा तुमच्या जवळी ओखदे अनंत

अखंड दैवी तुझ्या कृपेने व्याधींचा हो अंत

गृहपीडेचे अमुच्या, देवा  निर्मूलन हो करा

हातून घडल्या पापांपासून आम्हा मुक्त करा ||९||

अ॒मीय ऋक्षा॒ निहि॑तास उ॒च्चा नक्तं॒ ददृ॑श्रे॒ कुह॑ चि॒द्दिवे॑युः ।

अद॑ब्धानि॒ वरु॑णस्य व्र॒तानि॑ वि॒चाक॑शच्च॒न्द्रमा॒ नक्त॑मेति ॥ १० ॥

उंच नभांगणी ही नक्षत्रे चमचमती रात्री

तारकाधिपती चंद्रही उजळुन झळकतसे रात्री

अहोसमयी ना दर्शन त्यांचे कुठे लुप्त होती

आज्ञा या तर वरुणाच्या ना उल्लंघुन जाती ||१०|| 

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu.be/j3hYU5Nri74

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 24 Rucha 6 – 10

Rugved Mandal 1 Sukta 24 Rucha 6 – 10

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विठूमाऊलीचा प्रसाद ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

विठूमाऊलीचा प्रसाद ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

आर्मी सर्व्हिसेस कोरचे कॅप्टन प्रकाश कदम पंढरपूरला विठूमाऊलीच्या दर्शनाला आले होते. आज त्यांची सुट्टी संपत होती. दर्शन झालं की इथून मुंबई आणि मग तिथून पोस्टिंगवर – ड्युटीवर रुजू व्हायचं म्हणून कॅप्टनसाहेब लष्करी गणवेषातच दर्शनाला आले होते.

दर्शन झालं, आता बाहेर पडणार एवढ्यात एका छोट्या मुलीनं त्यांना हटकलं – काका, तुम्हीपण सैन्यात आहात ना ? इथून आता शत्रूशी ढिशूम ढिशूम करायला तुम्ही काश्मीरला जाणार ना ? माझे बाबाही तिथेच आहेत. त्यांच्यासाठी हा विठोबाचा प्रसाद घेऊन जाल ? आई म्हणते बाबा आता कधीच परत येणार नाहीत, त्यांना एवढा प्रसाद तर द्या.

आणि कदमांचा पंढरपूरचा मित्र त्यांच्या कानात कुजबुजत सांगत होता – ही उमंग. शहीद मेजर कुणाल गोसावींची मुलगी. मेजरसाहेब २०१६ साली काश्मीरमध्ये नग्रोटा इथे अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले, तेव्हा ही फक्त ४ वर्षांची होती….

कदमांच्या डोळ्यात पाणी तरारलं आणि त्यांना पुढचं काही ऐकूच आलं नाही.

लेखक : मकरंद पिंपुटकर 

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ दूर राहूनी पाहू नको रे… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ दूर राहूनी पाहू नको रे… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

.. दूर राहूनी पाहू नको रे, प्रीतीची शपथ तुला जाऊ नको रे ,प्रिया जाऊ नको रे!..आकाशीच्या चांदण्या वसुंधेरवर उतरल्या आणि आपल्या प्रियतमाला साद देऊ लागल्या. आकाशी चंद्र आता एकाकी पडला.चांदण्याच्या विरहाची काळी चंद्रकला उदासीचे अस्तर लेवून आभाळभर पसरली.चंद्र अचंबित झाला. त्याला कळेना आज अशा अचानक मला सोडून वसुंधेरवर कुणाच्या मोहात या चांदण्या पडल्या!माझ्याहून सुंदर प्रेमाचा कारक असा वसुंधेरवर कोण भेटला?कालपर्यंत तर माझ्या अवतीभवती राहून आपल्या प्रेमाने रुंजी घालत असणाऱ्यांना, प्रत्येकीला मनातून आपला स्व:ताचाच चंद्र मालकीचा हवा असा वाटत होते.. मी त्यांचे मन केव्हाच ओळखले होते. प्रेमाच्या चंदेरी रूपेरी प्रकाशी त्या सगळयांना मी सामावून घेतलेही होते. कुठेही राग रुसवा, तक्रारीला जागा नव्हती. अगदी दृष्ट लागण्यासारखीच आमची अशी अक्षर प्रीती होती कालपर्यंत. पण आज पाहतो त्या प्रेमाचा माझ्या नकळत त्यांनी ब्रेक अप करावा.. ना भांडण, ना धुसफूस ना शिकवा ना गिलवा. हम से क्या भुल हुई जो हम को ये सजा मिली…एक, दोन गेल्या असत्या तर समजून गेलो असतो.. पण इथं तर एकजात सगळ्याच मला सोडून गेल्या .आपापल्या मालकीचा स्वतंत्र चंद्राबरोबर बसून मलाही त्या दूर राहूनी पाहू नको रे, प्रीतीची शपथ तुला जाऊ नको रे प्रिया जाऊ नको रे.. करून साद देत सांगू लागल्या ये रे ये रे तू देखिल इथं खाली वसुंधेरवर ये आणि तुला आवडणारी एखादी चांदणीशी सुत जुळव . आणि आता आपण सगळेच या वसुंधेरवर प्रीतीचं नंदंनवन करुया… म्हणजे पुन्हा गोकुळात रासलिला.. छे छे किती अनर्थ माजेल… नको नकोच ते. 

.. मी त्यांना म्हटलं हा काय वेडेपणा मांडलाय तुम्ही.. त्या वसुंधेरवरची लबाड प्रेमी जन मंडळी आप आपल्या प्रियतमेला हवा तर तुला आकाशीचा चंद्र, चांदण्या आणून देतो असं आभासमय ,फसवं आश्वासन देऊन आपल्या प्रीतीची याचना करतात.. ते आपण इथून दररोज वरून पाहात आलोय कि.. कुणाचं सच्च प्रेम आहे आणि कोण भुलवतयं हे आपल्याला इथं बसून बघताना आपलं किती मनोरंजन व्हायचं.. आणि आणि ते सगळं पाहता पाहता आपण सगळे मात्र नकळत मिठीत बांधले जात असताना, त्या प्रेमाचे टिपूर चांदणे वसुंधेरवर सांडले जात असे… मग असं असताना आज अचानक तुमची मिठी रेशमाची सैल होऊन गळून का जावी.. अगं वेड्या बायांनो दूरून डोंगर.. आपलं वसुंधरा.. साजरे दिसतात हे काय वेगळं सांगायला हवं का मी तुम्हांला… आज तुम्ही ज्याला भुलालय तो जरी तुम्हाला मालकीचा स्वतःचा चंद्र गवसला असलाना तर तो तुमचा भ्रम आहे बरं.. अगं ते चंद्र नाहीत तर चमचमणारा काचेचा चंद्र आहेत.. तुमच्या सौंदर्यावर भाळलेला..भ्रमरालाही लाज वाटेल अशी चंचल वृत्तीची प्रिती असते त्यांची.. मग तुम्हाला ही आकाशीचा तो चंद्र आणून देतो हया फसव्या थापा मारतील.. आणि आणि त्यानंतर हळूहळू जसं जसं तुमचं सौंदर्य अस्तंगत होत जाईल ना तसा तसा तुमच्यातला त्याचा इंटरेस्ट कमी कमी होत जाऊन तो नव्या सौंदर्यवतीच्या शोधात राहिल.. मग तुमची काय गत होईल?..इथं निदान कालगती ने तुम्हाला उल्का होउन खाली तरी जाता येत होतं पण तिथं वसुंधेरवर तुम्हाला उल्का सुद्धा होता येणार नाही… 

तेव्हा सख्यांनो हा वेडेपणा सोडा या बरं परत आपल्या ठिकाणी . दिल पुकारे आरे आरे… सुलगते साइनेसे धुवाॅं सा उठता है लो अब चले आओ के दम घुटता है…. 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पसारा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “पसारा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

मध्यंतरी काँलनीत शेजारी एक नवीन बि-हाड आलं.अतिशय आटोपशीर, मोजकं सामान आलं.नेहमीच्या उत्सुकतेने आपल्या नेहमीच्या कुवतीनुसार मनात आलं अजून मागून बाकीचे सामान येणार असेल.पण नंतर कळलं त्या कुटुंबात मोजकं आणि आटोपशीर सामान आहे. कळल्यावर ,बघितल्यावर खूप जास्त कौतुक वाटलं,आणि थोडी स्वतःच्या हव्यास म्हणा सोस म्हणा त्याची लाजचं वाटली.

मग कुठे जरा डोळे उघडून माझी स्वतःची स्वारी आवरासावरीकडे वळली. भसाभसा कपाट उपसली. आधी नंबर लावला कपड्यांच्या कपाटाचा. ते साड्यांचं,ड्रेसेस चं कलेक्शन बघितल्यावर क्षणभरासाठी का होईना स्वतःची स्वतःलाच लाज वाटली. किती हव्यासासारखे जमवितो आपण. मनात आल जवळपास थ्रीफोर्थ आयुष्य निघून गेलं.उर्वरित आता जे काही दिवस असतील ते नोकरीतील निवृत्तीनंतर घरीच राहण्याचे. त्यामुळे आपण ह्या सगळ्याचा विनीयोग कसा करणार ?

त्याक्षणी प्रकर्षांने जाणवून गेलं प्रत्येक व्यक्तीने पसारा हा घालावा पण त्याचा त्याला आवरता येईल इतपतच घालावा. मनात आल हा पसारा मला आवडतोय म्हणून मी मांडून ठेवला हे खरयं पण हा पसारा आपल्यापश्चात घरच्यांना आवरतांना नाकी नऊ आणेल हे पण नक्की. म्हणजेच आपण दुस-याचा त्रास कमी करण्याऐवजी वाढवतोयच की.

खरंच  ज्या माणसाला कुठेतरी थांबायचं, आवरत घ्यायचं,आटोपत़ घ्यायचं हे नीट वेळेवर उमगलं तो शहाणा,सुज्ञ माणूस समजावा. पूर्वी जी वानप्रस्थाश्रम नावाची संकल्पना होती ती किती यथार्थ होती नाही कां ?

जी गोष्ट कपड्यांची तीच वस्तु वा भांडी ह्यांचीपण. थोडक्यात काय तर प्रश्न हा किती संग्रह, साठवणूक करतो आणि तो संग्रह वा साठवणूक खरंच आपल्या पुढील पिढीसाठी फायद्याची वा आवश्यक असणार आहे ह्याचा पण आपल्याला  गांभीर्याने विचार करावाच लागणार आहे.दिवसेंदिवस हा काळ धावपळीचा दगदगीचा येतोय तेव्हा जातांना तरी पुढील पिढीच्या समस्या वाढवून जाऊ नये ही मला प्रकर्षाने जाणीव झाली.

आता आपला हा पसारा आवरता घेऊन नवीन पिढीला त्यांच्या मनाने पसारा घालायला वाव द्यावा हा नवीन विचार ह्या वर्षात सुचला हा प्लसपाँईंटच म्हणावा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अवघे ८५ वयमान… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

??

☆ अवघे ८५ वयमान… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी

मला अजूनही आठवतोय आईंचा त्या दिवशीचा चेहेरा ! चेहऱ्यावरील प्रसन्नता आणि मनात न मावणारा आनंद !!

आई, म्हणजे माझ्या  सासूबाई, “विद्यावती गजानन जोशी.”आणि सासरे म्हणजेच आप्पा,मला पहायला (वधुपरिक्षा) आमच्या घरी आले होते .जेवढी भीती कुणाही मुलीला वाटेल, त्यापेक्षा कितीतरी अधिक मला वाटत होती. कारण लग्न करण्याचं आमच्या दोघांचं पक्क ठरलं होत. पण जर सासू सासऱ्यांनी नकार दिला तर…? हा विचारच भयंकर होता. पण आईंच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यातली पसंती यामुळं मन थोडं सुखावलं होतं. भीतीचा भार कमी झाला होता.

सासऱ्यांची मात्र नखशिखांत भीती वाटत होती. ते खूप कसून आणि कठोर परीक्षा घेण्याचा नजरेने बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील रेषही हलत नव्हती. उसासा कधी टाकावा,असा जीव टांगणीला लागला होता.

तशात आई सहजपणे बोलून गेल्या, ” पहिली लक्ष्मी पाहिली, तिला नाट नाही लावायचा “. 

त्या माझ्याबद्दलच बोलत होत्या हे कळलं. कारण ह्यांनी माझ्या आधी कुठलीच मुलगी पाहिली नव्हती. सासऱ्यांचं मन कळत नसलं तरी एक मार्ग तर खुला झाला होता. त्यामुळे दुसरा मार्ग खुला होण्याची आशा होती….. तर अशा आई !

साध्या, सरळ, सहज पण ठामपणे आपलं म्हणणं मांडणाऱ्या. नजरेने, शब्दाने, आपली पसंती आणि नापसंतीही दर्शविणाऱ्या.

लग्न ठरल्यानंतर ते होईपर्यंत सहा महिन्यांचा अवधी होता. त्या दरम्यान आईंनी मला पत्रही लिहिलं होतं. अगदी प्रेमानं ओथंबलेलं. लाडू वगैरे खाऊ पण पाठवायच्या माझ्यासाठी. अजून काय हवं?

मी दोन अडीच वर्षांची असताना माझी आई गेली. ती उणीव भरून निघाली आईंच्या रूपाने.

जुन्या काळाप्रमाणे आईंचं आयुष्यही कष्टाचंच होत. रोज सोवळ्यात स्वयंपाक, देवदर्शन, रूढी परंपरा, कर्मकांड सारं नेकीनं करणाऱ्या. माहेरी आमच्या घरी सुधारकी वळण. आईंनी त्यांच्या परीने सासरच्या रीतीभाती मला समजावून सांगितल्या. पण कधी जाच जबरदस्ती नाही केली कशाची.

साऱ्या आयुष्यभर घरादारासाठी, शेजाऱ्या पाजाऱ्यांसाठी, नातेवाईकांसाठी अपार कष्ट केले. पण कधी तक्रार म्हणून नाही. ‘ स्वत:साठी काही हवं ‘ हे तर अगदी जाणीवेपलीकडेच असायचं त्यांच्या. पण सतत करत रहाणं हे मात्र कर्तव्य बुध्दीत घट्ट रोवलेले.

तशा मितभाषी असल्या तरी, प्रसंगी “सौ सुनारकी,एक लोहारकी. ” असं असायचं त्यांचं कधीकधी. बोलता बोलता काही म्हणी सडेतोड वापरायच्या. उदा. पोळी केलेली असताना कोणी भाकरी मागितली तर “.असेल ते नासवा नसेल ते भेटवा “. किंवा खूप कपडे असून कोणी वाईट कपडे घातले तर “ सतरा लुगडे,भागुबाई तुझे ….. उघडे.”

बाहेरच्या कोणासमोर खायला दिलेलं त्यांना अजिबात आवडत नसे. म्हणत, *पदरच खावं, नजरचं नाही.* 

“ दिवस सरला की मागचं मागं टाकून आल्या दिवसाला सामोरे जायचं. ” असं जगण्याचं त्यांचं रोकडं तत्वज्ञान होत. जे बोलायच्या तसंच वागायच्या.

अत्यंत संयमी, कर्तव्यतत्पर निर्धारित जीवन त्या जगल्या. अनेक दुःख झेलली, पचवली, पण मोडून पडल्या नाहीत. कोणाच्याच दुःखावरची खपली न काढता आयुष्यात सामावून जाणं हाच त्यांचा वसा होता.

आप्पांच्या निधनाचं दुःखही त्यांनी खंबीरपणे पचवलं. आपलं दुःख उगाळून इतरांच्या आनंदावर कधी विरजण घातलं नाही. वयाची ८५ वर्ष झाली तरी सहासहा, सातसात तास वाचन करायच्या. रोज गीतेचे अठरा अध्याय वाचायच्या.

८५ वर्षांचं अवघं जीवन असं कष्टातून वेचलं. वयोमानपरत्वे डोळ्यासमोर नसणाऱ्या मुलांच्या, नातवंडांच्या आठवणीने सैरभैर होतं. कातर होतं. तरी पुन्हा स्वत:च स्वत:चं बोट धरून समजावल्यासारखं  गीता वाचनात स्वत:ला मग्न ठेवत.

त्यांचं जीवन म्हणजे आदर्श स्त्री-जीवनाचा  वस्तुपाठच होता.

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रणरागिणी संजुक्ता पराशर ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ ☆

? इंद्रधनुष्य ?

रणरागिणी संजुक्ता पराशर ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

हातात एके 47 घेऊन घनदाट जंगलात शिरल्यावर तब्बल १६ अतिरेक्यांना यम सदनाला पाठवून आणखी ६४ अतिरेक्यांना अटक करणाऱ्या संजुक्ता पराशरची कहाणी स्वतःला अबला समजणाऱ्या देशातील प्रत्येक स्त्रीला माहिती व्हायला पाहिजे।

दिसायला गोरीपान आणि सुंदर अशी संजुक्ता जर कधी आपल्या समोरून गेली, तर तिच्या अफाट कर्तृत्वाची आपण कल्पनाही करू शकणार नाही। एक सामान्य स्त्री लाखो सामान्य पुरुषांनाही जमणार नाही असं काम करते, तेव्हा तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे सोशल मीडियावर गायले जायला हवेत, पण आम्हाला राजकारण आणि जात, धर्मापलीकडेही आणखी दुनिया आहे हेच मान्य नसतं। त्यामुळे संजुक्ता पराशरच्या फेसबुक पेजला लाखभरही लाईक मिळत नाहीत आणि राजकारणी, सिनेनट मात्र करोडोंनी लाईक मिळवतात। असो. 

आसामसारख्या मागासलेल्या राज्यात शाळेत शिकून, नंतर दिल्लीच्या जे एन यु मधून डिग्री घेणारी संजुक्ता २००६ मध्ये आयपीएस परीक्षा देशात ८५ वा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली। यु. एस. फॉरेन पॉलिसी विषयात तिने पीएचडी केल्यामुळे ती ‘ डॉक्टर संजुक्ता पराशर ‘ म्हणूनओळखली जाते। तिचं लग्न झालं तेही आयएएस अधिकारी पुरू गुप्तांशी। त्यांना ६ वर्षाचा मुलगा आहे। संजुक्ता आई त्याला सांभाळते।

संजुक्ताची पोस्टिंग २०१४ मध्ये आसाममधील सोनीतपुर जिल्ह्यात सुप्रिंटेंडंट ऑफ  पोलीस म्हणून झाली आणि अग्निदिव्य म्हणजे काय ह्याची प्रचिती तिला रोजच घ्यावी लागली। बोडो अतिरेक्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता। शेकडो लोकांचे बळी गेले होते। आसामच्या घनदाट जंगलात शिरून त्यांच्याशी मुकाबला करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण। हातात एके 47 घेऊन संजुक्ता सीआर पी एफ च्या जवानांना घेऊन जेव्हा घनदाट जंगलात शिरायची, तेव्हा जवानांनाही दहा हत्तीचं बळ मिळायचं। अनेक मोहिमा यशस्वी झाल्यामुळे अतिरेकीही संजुक्ताच्या नावाने कापू लागले होते। तिला पत्राद्वारे आणि फोनद्वारे धमक्या येऊ लागल्या होत्या। परंतु शीर तळहातावर घेऊन फिरणाऱ्या संजुक्तावर कसलाच परिणाम झाला नाही। तब्बल १६ अतिरेकी मारले गेले आणि ६४ अटक झाले, तेही तिच्या अवघ्या १८ महिन्यांच्या कारकीर्दीमध्ये। 

आज संजुक्ता पराशर दिल्लीमध्ये कार्यरत आहे। देशातील दहशतवाद पूर्णपणे निपटून काढणं हेच तिचं ध्येय आहे। अशा ह्या खऱ्या खुऱ्या रणरागिणीच्या अफाट कर्तुत्वाला आपण सर्वांनीच मानाचा मुजरा करायला हवा। सलाम करायला हवा !

माहिती संग्रहिका : सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ असेही… तसेही… ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ असेही… तसेही… ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

पास होण्या पुरते ३५% मिळवूनही खूश होऊन पार्ट्या  देणारे आणि ९५% मिळवूनही २% कमीच पडले म्हणून रडत बसणारेही बघितले.

जॉब अचानक गेल्यामुळे आता तसंही दुसरा जॉब मिळेपर्यंत अनायसे सुट्टीच आहे तर मस्त फिरुन येऊ म्हणणारे आणि अपेक्षित Increment मिळालं नाही म्हणून करुन ठेवलेले Flight Bookings कॅन्सल करुन घरात उदास बसून राहणारेही बघितले आहेत.

जिभेच्या कॅन्सरमुळे नाकात नळी असतांनाही उत्साहाने गर्दीत जाऊन पहिल्या रांगेत बसून नाटक एन्जॉय करणारा आणि नको त्या गर्दीत नाटक बिटक..  उगीच कशाला आजाराला निमंत्रण म्हणून घरात बसून राहणाराही बघितला आहे.

बाल्कनीतून किती छान दिसतोय इंद्रधनुष्य म्हणून दोन्ही काखेत crutches लावून तरातरा बाल्कनीत बघायला जाणारा आणि कितीदा बघितलाय यार फोटोत, त्यात काय बघायचं..  म्हणत लोळत पडून राहणारा त्याचा रुम पार्टनरही बघितला आहे

फर्निश्ड थ्री बीएचके फ्लॅटमधे,  तेव्हाच थोडे पैसे अजून टाकून फोर बीएचके घेऊन टाकायला हवा होता म्हणून हळहळत बसणारे नवरा बायको..  आणि एकाच खोलीत काहीच पुरेसं नसूनही हसतखेळत आनंदात राहणारं पाच जणांचं एक कुटुंबही बघितलं आहे.

हे नको खायला ..  असं होईल, ते नको प्यायला .. तसं होईल..  ह्या टेंशनमधे ठराविक मोजकं मिळमिळीत खाऊन पिऊनही अटॅकची चिंता डोक्यात ठेवणारे,  आणि जातील त्या ठिकाणी मिळेल ते झणझणीत चटपटीत  बिनधास्त खाऊनही ‘ काही नाही होत यार ‘ म्हणत मजेत असणारे खवय्येही बघितले आहेत.

आयुष्य सगळ्यांना सारखंच मिळालेलं असतं ..  पण काही ते फुलवत जगतात , काही सुकवत जगतात

आता त्याला कोण काय करणार —-  जगा की बिनधास्त…….. 

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares