मराठी साहित्य – विविधा ☆ “असाही एक उपास…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “असाही एक उपास…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

तारीख होती 2 मे. त्यामुळे बहुतेक सगळ्या वर्तमानपत्रांना सुट्टी होती. मग मनात विचार आला आपणही सुट्टी घेऊन बघूया कां ? मग ठरवलं आजच्या दिवशी लिखाणाला सुट्टी. आता कुणी ह्याला आळस म्हणू शकता किंवा कुणी रोजच्या रुटीन मध्ये केलेला हलकासा बदल. आज सोशलमिडीया मग व्हाटस्अँप वा फेसबुक ह्यावर पोस्ट लिहायला सुट्टी, त्यामुळे काल ह्यावर इतरांनी लिहीलेल्या  पोस्ट चं भरभरून वाचन केले. मस्त आलेल्या आँडीओ,व्हिडीओ क्लिप्स चा मस्त आस्वाद घेतला. काल सगळ्यांचे आलेले गुडमाँर्निंग वाफाळत्या आलं,गवतीचहा टाकून केलेल्या वाफाळत्या चहाबरोबर आस्वाद घेतला. काल अगदी समरसून ह्याचा स्वाद घेतांना जिभेवर स्वाद घोळवत तोंडून आपोआप उस्फुर्तपणे निघालं ,”वाह आज”.

काल मनोमन एक उपास करायचं ठरविले होते,खरतरं माझ्यासाठी अशक्यप्राय वाटणारा उपास होता,पण स्वतःवर श्रद्धा असली की उपास पण सहज निभावता येतो ही खात्री पटली.

त्यामुळे कालचा दिवस कुणालाही कोणतीही पोस्ट न पाठवणे ह्या निश्चयाने सुफळ संपूर्ण झाला. ह्याचा फायदा म्हणजे काल भरपूर वाचन करता आलं. आणि भरपूर लोकांनी पोस्ट नसल्याची दखल घेऊन मेसेजेस केले.त्यांच काळजी करणं,पोस्टची ओढ ही मला नक्कीच सुखावून गेली.असो

कालच्या सुट्टी मुळे असे सुखद अनुभव आले. ह्या सगळ्यांचे धन्यवाद मानून औपचारिकता दर्शविणार नाही आणि त्यांना परकंही करणार नाही.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सायकलवाली आई… ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

??

 ☆ सायकलवाली आई ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

तिला मी गेली चार वर्षे रोजच पहातेय … ओळख अशी खास नाही पण ‘ ती ‘ साऱ्यांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू! आम्ही सगळ्या आपापल्या मुलांना शाळेत सोडायला- आणायला जाणाऱ्या आई गॅंग मध्ये ‘ ती ‘ एकदम वेगळी … एकमेव सायकलवर येणारी आई.   

आजकाल status symbol म्हणून भारीचे ब्रॅंडेड कपडे घालून सायकल चालविण्याचे फॅड बोकाळले आहे … ही त्यापैकी नव्हे. ‘सायकल चालविणे,’ हा  कदाचित तिचा नाईलाज असावा .  आमच्या स्कूटी किंवा कार मधून येणाऱ्या पोरांना हे अनपेक्षित होत . कुणाकडे गाडी नसते किंवा TV / Fridge नसतो , हे त्यांना पटतच नाही. 

ती सावळी आरस्पानी … आनंद, समाधान ,आत्मविश्वासाने अक्षरशः ओथंबलेली…. साधीशी सिंथेटिक फुलांची साडी असायची . गळ्यात चार मणी, हातात दोनच  काचेच्या बांगड्या.  माझ्या गाडीच्या शेजारीच तिची सायकल पार्क करायची. मागच्या सीटवर तिचा मुलगा …. त्याला सायकलचे कॅरीयर टोचू नये, म्हणून, मस्त मऊ ब्लॅंकेटची घडी घातलेली…. लहान असतांना ती त्याला पाठीशी बांधून आणत असे. 

लेक नीटनेटका … स्वच्छ कपडे … बूटांना पॉलिश…. तो पार वर्गात पोचेपर्यंत ती अनिमिष नेत्रांनी पहात असायची …. जणू त्याचं शाळेत जाणं ती अनुभवतेय … जगतेय.

हळूहळू काहीबाही कळायचं तिच्या बद्दल….! ती पोळ्या करायची लोकांकडे… फारतर दहावी शिकलेली असावी. नवरा हयात होता, की नव्हता, कोण जाणे…? पण,ती तिच्या आईसोबत राहायची असे कळले . RTE ( right to education ) कोट्यातून तिच्या मुलाची admission झालीये एव्हढीच काय ती माहिती मिळाली. 

एकदा माझ्या लेकीचा कुठल्याश्या स्पर्धेत दुसरा क्रमांक आला. तिला मी यथेच्छ झापत असतांना , पार्किंगमध्ये सायकलवालीचा लेक दिसताच माझी कन्यका किंचाळली …” अग तो बघ तो ! तो first आला ना, so मी  second आले …”  आणि मोठ्यांदा भोकाड पसरलं. मी त्याची paper sheet पाहिली … 

मोत्यासारखं सुंदर अक्षर …! अभावितपणे माझ्या लेकीला दाखवत म्हणाले , ” बघ बघ … याला म्हणतात अक्षर ! किती मेहनत घेते मी तुझ्यासाठी .. आणि तू ??? ”  माझे डोळे संताप ओकत होते. 

त्याची आई शांतपणे म्हणाली , ” कुणीतरी दुसरं पहिलं आलंय म्हणून, तुमची लेक दुसरी आल्याचा आनंद तुम्ही गमवताय ना ! ”  ….. सणसणीत चपराक…. मी निरुत्तर. 

मी खोचकपणे विचारलं,  “कोणत्या क्लासला पाठवता याला?”

ती म्हणाली, ” मी घरीच घेते करून मला जमेल तसं… ..! मुलांना नेमकं काय शिकवतात, ते कळायला हवे ना, आपल्याला. ” तेव्हाच कळलं ..  ‘हे रसायन काहीतरी वेगळंच आहे !’

हळूहळू ,तिच्याबद्दल माहिती कधी मिळू लागली, तर कधी मीच मिळवू लागले. ती पाथर्डी गावातून यायची…. सकाळी सात तर संध्याकाळी आठ अश्या एकूण पंधरा घरी पोळ्या करायची. तिने स्वतः एका teacher कडे क्लास लावला होता ..बदल्यात ती त्यांच्या पोळ्यांचे पैसे घेत नसे. मी नतमस्तक झाले. मनोमन तिच्या जिद्दीला आणि मातृत्वाला सलाम केला .

पहिल्या वर्गाचा result होता. ती खूपच आनंदात दिसली. चेहऱ्यावर भाव जणू पाच तोळ्याच्या पाटल्या केल्या असाव्यात .. मी अभिनंदन केले … तेव्हा भरभरून म्हणाली…” टिचरने खूप कौतुक केले  त्याचं ! फार सुंदर पेपर लिहिलेत म्हणाल्या.. फक्त थोडे बोलता येत नाही म्हणाल्या ….  त्याच्याशी घरी इंग्रजीत बोल म्हणाल्या. ”  मी तिचं बोलणं मनापासून ऐकू लागले… 

…” छोट्या गावात वाढले ताई.. वडील लहानपणी गेले … अकरावीत असताना मामाने लग्न लावले… शिकायचं राहूनच गेलं .. फार इच्छा होती हो ! “… डोळ्यातलं पाणी प्रयासाने रोखून म्हणाली… ” आता याची आई म्हणून कुठेच कमी पडणार नाही मी… एका teacher शी बोलणं झालंय ,त्या मला इंग्रजी बोलायला शिकवणार म्हणाल्यात …. बारावीचा फॉर्म भरलाय … उद्या याला मोठा झाल्यावर कमी शिकलेली आई म्हणून लाज वाटायला नको .” म्हणत खळखळून हसली. त्याला आज पोटभर पाणीपुरी खाऊ घालणार असल्याचे सांगून, ती निघाली.

मुलांना रेसचा घोडा समजणारी “रेस कोर्स मम्मा”,  सकाळी सातच्या शाळेलाही मुलांना सोडताना  नुकतीच पार्लरमधून आलेली वाटणारी “मेकअप मम्मा” , दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर केवळ बारीक होण्यावर बोलणारी, “फिटनेस मम्मा “, स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट असूनही, नर्सरीतच मुलांना हजारो रुपयांचे क्लासेस लावून मला कसा याचा अभ्यास घ्यायला वेळ नाही हे सांगणारी “बिझी मम्मा” , किंवा मुले allrounder होण्यासाठी त्यांना मी कशी हिरा बनवून तासते हे सांगणारी ” जोहरी मम्मा ” …..  ह्या आणि अश्याच अनेक मम्मी रोज भेटतात मला………या मम्मी आणि मॉमच्या जंगलात आज खूप दिवसांनी मला एक ” आई ” भेटली. अशी आई ,जी एक स्त्री म्हणून,…. माणूस म्हणून… आणि एक आई म्हणून खूप खंबीर आहे… कणखर आहे….. 

… फारच थोड्या नशीबवान स्त्रिया असतात ,ज्यांना जिजाऊ आणि सावित्रीबाई खऱ्या अर्थाने कळतात…! सायकलवाली आई त्यातलीच एक… 

लेखिका : अज्ञात

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “हसरा बुध्द…” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “हसरा बुध्द…” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

पोखरण येथे १९७४ आणि १९९८ ला भारताने अणुचाचणी घेतली, त्या दोन्ही दिवशी बुध्दपौर्णिमा होती.

१९७४, इंदिरा गांधींच्या कार्यकाळात भारताने सर्वप्रथम अणुचाचणी घेतली, त्या संपूर्ण प्रकल्पाला *’Operation Smiling Buddha’ (‘हसरा बुध्द’) असं नाव देण्यात आलं होतं.

अणुचाचणी यशस्वी झाली आहे, हे सांकेतिक भाषेत पंतप्रधानांना कळवण्यासाठी ‘The Buddha Has Smiled’ (‘बुध्द हसला आहे’) हा कोड वापरण्यात आला होता.

१९९८ ला अटलजींच्या कार्यकाळात झालेल्या अणुचाचणीचे वैज्ञानिक सल्लागार होते – एपीजे अब्दुल कलाम. यशस्वीतेनंतर त्यांना सर्व शास्त्रज्ञांच्या चमूने ‘बोधीवृक्षाखालील ध्यानस्थ बुध्दा’ची प्रतिमा भेट म्हणून दिली होती.

१९९८ च्या प्रकल्पावर काम केलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीशी पूर्वी माझी भेट झाली. खूप माहिती मिळवल्यावर, वरील बाबींवर आधारलेली मी एक शंका सरांना विचारली,

— “सर, बुध्द हे तर अहिंसेचे प्रणेते आणि अण्वस्त्र हे तर महाविनाशक, हिंसेचं सगळ्यात विक्राळ स्वरूप जगाने हिरोशिमा-नागासाकीच्या अणुहल्ल्यात बघितलं. मग अण्वस्त्रसज्ज होताना, भारताने ‘बुध्द’ या प्रतीकाचा वापर का केला? हे विसंगत नाही का?”

सर हसले आणि त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली —

एका गावाकडे जाणारे दोन रस्ते होते. एक जवळची वाट आणि एक वळणाने गेलेली लांबची वाट.

जवळच्या वाटेवर नागाचं मोठं वारूळ होतं. नाग क्रूर होता. वाटेवर कुणी दिसलं की तो दंश करत असे. माणसं जागीच मरत. नागाने अशी अनेक माणसं मारली होती. लोकांनी अखेर ती वाट वापरणंच बंद केलं. गावकरी, गावाला येणारे जाणारे प्रवासी, सर्वजण लांबच्या वाटेने जात.

एकदा त्या गावात एक योगी आला. मोठा सिद्धपुरूष होता. गावक-यांनी योग्याकडून ज्ञान-उपदेश घेतला, त्याचं आतिथ्य केलं. योगी निघाला, तेव्हा गावक-यांनी त्याला जवळच्या वाटेने न जाण्याचा, लांबचा रस्ता पकडण्याचा सल्ला दिला. योग्याने कारण विचारलं, तेव्हा गावक-यांनी नागाची हकीकत सांगितली.

योगी म्हणाला, “मला मृत्यूची भीती नाही. मी नागाला वठणीवर आणतो. चला माझ्या मागोमाग.”

गावक-यांना वाटलं, हा भलताच सिद्धपुरूष दिसतोय. काही चमत्कार पहायला मिळणार, म्हणून गावकरी त्याच्या पाठोपाठ गेले.— योगी वारुळापुढे जाऊन उभा राहिला, गावकरी भयाने जरा दूर थांबले.

आपल्या वाटेवर कुणी आलंय हे बघून नागाचा संताप झाला. नागाने चवताळून फणा काढला, योग्याला डसणार तोच योगी म्हणाला – “मला मारून तुझा फायदा काहीच होणार नाही. उलट तुझ्या भक्ष्यासाठी जमवलेलं तुझं हे बहुमोल विष मात्र वाया जाईल. नुकसान माझं नाही, तुझंच आहे.”

नागाला आश्चर्य वाटलं. पहिल्यांदा त्याला कुणीतरी न भिणारा भेटला होता.

नाग म्हणाला, ” ही वाट माझी आहे. इथे कुणालाही येण्याची परवानगी नाही.”

योगी म्हणाला, “हा तुझा अहंकार आहे. तुझ्या जन्माच्या आधीही हे गाव आणि ही वाट अस्तित्वात होती. उलट तुझ्या भीतीने लहान मुलं, म्हातारे, रुग्ण, या सर्वांना दूरच्या वाटेनं जावं लागतं. किती लोकांचा जीव घेतलायस तू. सोडून दे ही हिंसा. अहिंसेचा मार्ग धर. लोकांना दंश करणं सोडून दे. ते तुझं भक्ष्य नाहीत.”

नागाला हे पटलं. त्याने अहिंसेचा मार्ग पत्करला. गावकरी आनंदले. योगी तिथून निघून गेला. ती वाट पुन्हा वापरात आली.

काही महिने गेले. योगी परिव्रजा करत परतीच्या मार्गावर होता. पुन्हा ते गाव लागलं. नागाशी भेट होईल म्हणून योगी त्या मार्गाने गेला, वारुळापाशी पोचला.

नाग वारूळाजवळ रक्तबंबाळ अवस्थेत, विव्हळत पडलेला दिसला. योग्याने त्याच्या या अवस्थेचं कारण विचारलं, तेव्हा नाग रडत म्हणाला — 

“तुमचं ऐकून मी दंश करणं सोडून दिलं आणि लोक हा रस्ता वापरू लागले. मी त्यांना कुठलाही त्रास देत नाही. पण टवाळखोर लोक मला काटे टोचतात. मला लाथाडून निघून जातात. लहान मुलंसुध्दा मला बोचकून गंमत बघतात.”

योगी म्हणाला, ” तू इतक्यांचे जीव घेतलेस, त्या कर्माचं फळ तुला मिळतंय. बघ, लोकांच्या मनात किती घृणा निर्माण केली होतीस तू स्वतःबद्दल.”

नाग वैतागत म्हणाला, “असंच सुरू राहिलं तर हे लोक जीव घेतील माझा. काय रुबाब होता माझा पूर्वी, तुमच्या अहिंसेच्या उपदेशाने वाटोळं केलं माझं.”

मग योगी म्हणाला— 

“बाबा रे, दंश करू नकोस असं मी सांगितलं होतं. पण फुत्कार करण्यापासून तुला कोणी रोखलं होतं? कुणी त्रास देऊ लागल्यावर, तू केवळ फणा उभारून फुस्स केलं तरी समोरचा भीतीने दहा पावलं मागे सरकला असता. तुझी ही अवस्था अहिंसेमुळे नाही, तर अहिंसेचा तू चुकीचा अर्थ लावल्यामुळे आहे.”

गोष्ट संपली. सर म्हणाले, ” भारताने घेतलेली अणुचाचणी हा स्वसंरक्षणासाठी केलेला फुत्कार होता असं समज. कारण दुबळ्या लोकांच्या अहिंसेला किंमत नसते. तिबेट अहिंसावादी राष्ट्र. दुबळे राहिल्यामुळे चीनने गिळंकृत केलं. अखेर दलाई लामांना आश्रय दिला तो भारताने…..                     

…. स्वतः बलशाली असल्यामुळेच भारत अहिंसेच्या पुजा-यांना आश्रय, संरक्षण देऊ शकतो.”

त्या नागाला कितपत कळलं होतं ठाऊक नाही. मला मात्र पुरेपूर कळलं.

।। बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ।।

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पॉझिटिव्ह थिंकिंग — ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ पॉझिटिव्ह थिंकिंग — ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

शाळेत असताना  टीचरकडून हातावर छडी पडल्यावर मी नेहमी माझ्या हाफ पँटला हात पुसून दुसरा हात पुढे करत असे….

कारण मी हातावरील छडीची घाण पुसायचो..

तसा साफसफाईच्या बाबतीत मी खूपच जागरूक होतो!

माझ्या शालेय दिवसांमध्ये माझे शिक्षक बर्‍याचदा माझ्या आई वडिलांना घेऊन यायला सांगत. कदाचित ते मला काहीही  direct सांगायला मला घाबरत असावेत…

मी जे काही लिहायचो ते वाचायला माझ्या शिक्षकांना खूप आवडत असावं,  माझ हस्ताक्षरच त्याला कारणीभूत असणार.. म्हणूनच बऱ्याच वेळा ते मला एकच उत्तर 10 वेळा लिहून आणायला सांगत असत…

कितीतरी वेळेला शिक्षक मला न विचारता त्यांचा chalk माझ्या दिशेने फेकत असत…

उद्देश एकच होता की मी नेहमीच अतिशय दक्ष असावं.. 

परीक्षेच्या वेळी नेहमीच 3-4 शिक्षक मला सुरक्षा देण्यासाठी माझ्या बेंचच्या आजुबाजूलाच पूर्ण exam संपेपर्यंत उभे राहत असत..

अगदी Z security च असायची!

कितीतरी वेळा मला बेंचवर उभं करून माझा सन्मान करण्यात येत असे.. 

म्हणजे मी इतर सर्व मुलांना व्यवस्थित दिसून त्यांनी माझ्याकडून प्रेरणा घ्यावी, हाच प्रमुख उद्देश असावा…

शिक्षकांना माझ्या आरोग्याची विशेष काळजी होती..माझ्या शरीराला vitamin D आणि भरपूर ऑक्सिजन असलेली  मोकळी हवा मिळावी, ह्यासाठी मला बर्‍याच वेळा सकाळच्या कोवळ्या उन्हात बाहेर उभा करत असत. आणि मैदानाला रोज ५-५ फेर्‍या पण मारायला सांगितल्या जात असत…. हु:! तेव्हा बाकीची मुलं मात्र वर्गात घामाघूम होऊन त्या कोंडलेल्या,  गुदमरलेल्या वातावरणात शिकत असत.. 

तसा मी इतर मुलांपेक्षा खूपच हुशार असल्यामुळे माझे बहुतेक शिक्षक मला नेहमीच म्हणत असत…. 

“ तू शाळेत का येतोस? …खरं तर तुला ह्याची काहीच गरज नाहीये…” 

वा !!! काय सोनेरी दिवस होते ते ….  अजूनही आठवतात मला !

— यापेक्षा पॉझिटिव्ह थिंकिंग वेगळं असूच शकत नाही —–

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ढवळी…” ☆ सौ. अमृता मनोज केळकर ☆

? विविधा ?

☆ “ढवळी…” ☆ सौ. अमृता मनोज केळकर ☆

“कोजागरी पौर्णिमेच्या रात्रीचा जन्म आहे म्हणून अमृता इतकी गोरी आहे!” हे माझ्या आईचं लोकांनी विचारलेल्या “इतकी कशी गोरी हो तुमची पोर?” या प्रश्नाला ठरलेलं उत्तर होतं.😅 लहानपणी काहीही वाटत नव्हतं. पण जसजशी समज येत गेली तसतशी गोऱ्या रंगाच्या तोट्यांची कल्पना यायला लागली.😐

जरा मोठी झाल्यावर तर फारच भयानक अनुभव यायला लागले… एका बाईनं चक्क मला विचारलं “तुला कोड आहे का गं?” मला तर त्या वयात कोड म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. 😂 आणि हो, हे विचारणारी ती एकटीच नव्हती… अनेकांनी अनेकदा मला हाच प्रश्न विचारलेला आहे…🤣 अगदी लहान असताना माझ्या अंगी असलेल्या रेसिस्टपणाचं हे फळ आहे असं मला नेहमी वाटत आलंय. ते कारण म्हणजे माझे बाबा मला माझ्या लहानपणीचा एक किस्सा सांगतात… बाबांना भेटायला त्यांचा एक पोलिस मित्र येणार होता. नेहमीप्रमाणे आईने मला बाबांच्या कडेवर पार्सल केलेलं त्यामुळे ते आणि त्यांच्या कडेवर मी असे आम्ही दोघे त्यांच्या मित्राला भेटायला गेलो. त्यावेळेस मी दोन वर्षांची  असेन… मला बघून बाबांच्या मित्राला आनंद झाला… “प्रमोद किती गोड आहे रे तुझी पोर!” असं म्हणून त्या सावळ्या माणसाने माझ्या गालाला स्पर्श केला. मला ते आवडलं नसावं कदाचित म्हणून मी माझ्या हाताने माझा गाल पुसला आणि बाबांना म्हंटले, “बाबा त्याला सांगा हात नको लावू त्याचा रंग लागेल…” बाबा हसून बेजार झाले… तो इन्स्पेक्टर अगदी ओशाळला… “प्रमोद अरे माझ्यासमोर मान वर करायची हिम्मत होत नाही लोकांची आणि तुझ्या पोरीने पार लाजच काढली माझी एका वाक्यात…”😂

शाळेत गेल्यावर तर आणखी वेगळी तऱ्हा… मी कधीच बॅकबेंचर नव्हते. अगदी पहिल्या बेंचवर बसायला आवडायचं म्हणून वर्गात सगळ्यात आधी येऊन बसायचे. मी बसायचे तिथे नेमकी वर्गाच्या दारातून उन्हाची तिरीप माझ्या चेहऱ्यावर पडायची. एकदा शिकवता शिकवता मध्येच बाईंनी मला उठून मागच्या बेंचवर जाऊन बसायला सांगितलं… मला कळलं नाही की काय झालं… बाई म्हणाल्या, “तुझा चेहरा आणि घारे डोळे मांजरीसारखे चमकतात उन्हात ते बघून शिकवण्यात लक्ष लागत नाहीय.”🤣 काय बोलणार यापुढे? बिच्चारी मी बसले गपचुप मागच्या बेंचवर!😅

अजून एक अनुभव आला तो लग्न ठरल्यावर. लग्न ठरलं की ब्युटी पार्लर हा पर्याय अपरिहार्य असतो हे माझ्या मनावर ठसविण्यात माझी मोठी बहीण यशस्वी झाली होती. त्यामुळे पैसे देऊन भुवया बिघडवून घ्यायला मी पार्लर मध्ये गेलेली असताना माझ्या सोबतच एक बाई तिच्या आठ – नऊ वर्षांच्या मुलाला घेऊन आलेली होती.  तिने पार्लर मधल्या काकुंना विचारलं “मी चेहऱ्याचा काळपटपणा जाण्यासाठी कोणत्या ब्रँडचं क्रीम वापरू?” काकू म्हणाल्या, ” हर्बल क्रीम वापरा एखादं” बाई म्हणाली”मी फेअर अँड लव्हली वापरू का?” काकू म्हणाल्या, “अजिबात नको! चांगलं नाहीये ते स्किन साठी.”  हा सुखसंवाद चाललेला असताना त्या बाईचा मुलगा एकाएकी माझ्याकडे बोट दाखवून तिला म्हणाला, “आई तू कोणतंही क्रीम लावलंस तरी या ताईसारखी गोरी नाही होणार!” हा घरचा आहेर मिळाल्यावर बाई पेटलीच एकदम… माझ्यावरच घसरली… “काही कामधंदे नसतील त्या ताईला… आम्ही उन्हा तान्हात काम करून रापतो!” माझं हसू मी दाबून ठेवण्याच्या नादात तिला प्रत्युत्तर द्यायचं राहूनच गेलं…🤣 तात्पर्य: मुलांना पार्लर मध्ये आणू नये ती खूप खरं बोलतात.😬

माझ्या लग्नात पण “कशी दिसतेय जोडी, अगदी ब्लॅक अँड व्हाईट!” असं चिडवणारी भावंड मागल्याजन्मीचं उट्टं काढायला आलेली पितरं असावीत असा विचार मनात येऊन गेला…😅 नवऱ्याचे मित्र देखील कमी नव्हते त्यात – “पार्लरचा खर्च वाचवलास लेका!” असं म्हणणारे!

एकदा आईसोबत पुण्यात तिच्या एका मैत्रिणीकडे जायचं होतं. एक रात्र मुक्काम करावा लागणार होता. गप्पा, जेवणं वगैरे उरकल्यावर मी माझं अंथरूण आईच्या बेडशेजारी जमिनीवर अंथरलं. झोपून गेले. रात्री तहान लागली म्हणून पाणी प्यायला उठले तर लक्षात आलं की आईची मैत्रीण पण उठून बसली आहे आणि आपल्याकडे विस्मयाने एकटक पाहत आहे! माझी घाबरगुंडी उडाली! हे काय आता… या बाईला वेड – बीड लागलं आहे की काय? पाणी न पिता तशीच गपचुप झोपून गेले. सकाळी उठल्यावर घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने तिला विचारलं का बघत होतीस रात्री अमृताकडे? तर ती म्हणाली, “अगो नीलांबरी, तुझ्या मुलीचा चेहरा रात्री चमकत होता. खूप तेज दिसत होतं तिच्या चेहऱ्यावर! रुक्मिणीस्वयंवरात जसं वर्णन आहे अगदी तसंच!” मग मी “नाही हो, तो बाहेरचा प्रकाश शोकेसच्या काचेवर पडून माझ्या तोंडावर रिफ्लेक्ट होत होता.” असं सांगून समजावण्याचा निष्फळ प्रयत्न केला. दुपारपर्यंत माझ्या चेहऱ्यावरचं ‘ तेज ‘ पहायला त्यांच्या आणखी काही अध्यात्मिक मैत्रिणी जमल्या. आई मात्र माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होती…😂

आमच्याकडे सैरंध्री नावाची एक आजी धुणी- भांडी करायला येत होती. माझी आणि तिची चांगली गट्टी होती… खूप प्रेमळ होती ती… सैरंध्री लांबूनच मला पहायची. मी दिसले नाही अंगणात तर लगेच आजीला विचारायची “तुमची ढवळी कुठाय वैनी?” तिने केलेलं माझं ‘ ढवळी ‘ हे नामकरण मला अजिबात आवडत नव्हतं. मी आईला विचारलं, आई ढवळी म्हणजे काय गं? आई म्हणाली, “खूप गोरी”…

ढवळी! खरंच कितीतरी रंग आणि अंतरंग पहायला मिळाले या एका गोऱ्या रंगामुळे! कधी अगदी डांबरट तर अगदी साधीभोळी रंगाने कितीही सावळी असली तरी मनाने अगदी शुभ्र, निर्मळ. काय भुललासी वरलिया रंगा… या अभंगासारखी अभंग! त्यामुळे परमेश्वराच्या कृपेने कधीही गोऱ्या रंगाबद्दल अहं मनात डोकावला नाही. तसंच मिळालेल्या वर्णाबाबत कधी वैषम्य सुद्धा वाटलं नाही. कधीकधी सैरंध्रीची हाक आठवते… “ढवळे, चुलिपाशी जाऊ नको बाय अंगाला काळं लागेल गो!” मी मोठी झाल्यावर मला कळलं की सैरंध्रीची नात साथीच्या रोगात वारली होती. ती माझ्याइतक्याच वयाची होती. मला बघून डोळ्यांत पाणी यायचं तिच्या! अनेक वेळा वाटलं असेल तिला मला उचलून कडेवर घ्यावंसं माझ्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवावा असं… पण परत नाही अडकली ती त्या मायेच्या स्पर्शात… आता वाटतं चुलिपाशी जाऊन अंग राखेने माखून घेतलं असतं तर कदाचित सैरंध्रीने मला उचलून घेतलं असतं… माझा ढवळा रंग तिला नक्की लागला असता…

✍️ सौ. अमृता मनोज केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कुठेतरी थांबलं पाहिजे !!… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ कुठेतरी थांबलं पाहिजे !!… अज्ञात☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

ठराविक वयाच्या टप्प्यावर नाही म्हटले तरी…तीच ती घरकामे करून करून,नकोशी वाटू शकतात…. सर्वांनाच नाही लागू पडणार….पण मला तरी वाटत…..कुठे थांबावं हे समजणे आवश्यक….पूर्णपणे नाहीच.. अडीअडचणीला आपण निभावून नेलंच पाहिजे….

पण काही जणींचा अट्टाहास असेच पाहिजे तसेच पाहिजे.माझ्याच हाताला चव…माझे मलाच आवडते…

कामे,घरातील टापटीप मलाच त्यातच  रस वाटतो…. त्यानिमित्ताने व्यायाम होतो….

पण घरासाठी कितीही करा कमीच..पण खरच आपण घरासाठी की घर आपल्यासाठी….किती जीवापाड जपावं….स्वतःला मात्र गुंतवून त्याच त्या कामात कितपत योग्य आहे….स्वतःसाठी जगणे होते का? बरे खूप वर्ष मनलावून कामे केली…कुणी घरातील व्यक्ती शाब्बास,तरी म्हटलेले आठवत नाही…की घरकामासाठी  पुरस्कार पण देण्यात येत नाही….का करावी मनाची ओढाताण का घ्यावं इतके टापटीप , स्वच्छ्ता ह्यांचे वेड…जे मनास पटले नाही तरी करीत राहणार…कधीतरी ह्यावर विचार करण्याची गरज आहे….

काय बाई दोन तीन पोळ्या तर करायच्या म्हणून स्वतःच करतात….तीच ती कामे डोक्यात आज काय स्वयंपाक करायचा…पुन्हा रात्री भाजी काय करायची….

दुसऱ्या कुणाच्या कामाला नावे ठेवणे….काय बाई लगेच भांडी घासली कि हाता सरशी लगेच साफ होऊन जातात…तीच ती कामे त्यातच अडकून पडतात….

कितीतरी अजून जगण्याला वाव द्यायचा असतो इकडे लक्षच नसतं….. सार आयुष्य ह्यातच घालून पुन्हा वर म्हणायचं आता बाई होत नाही,पूर्वीसारखं…. शरीर पण कुरकुर करत असत…मन पण नको म्हणून सांगत असत…..पण सरळ दुर्लक्ष करत करण्याची तयारी दाखवतात….पण कुठेतरी थांबले पाहिजे हे कळतच नाही….मीच राबराब राहते …..माझी कदर नाही कुणाला.तूच कर ना तुझीच कदर….घे मोकळा श्वास कधीतरी….दे सोडून मनातील विचार  माझ्याशिवाय घराचे कसे होईल……मस्त चालत आपण नसलो तरी ,हा विश्वास हवा…..

किती  करणार तीच ती कामे…..नकोच गुंतवून घेऊ ना…केलीत की आतापर्यंत …  तूच वाहिलीस घरकामाची धुरा….. मान नाही का दुखत, दे झुगारून आता तरी…..हो घरकामातून रिक्त…..असेल आर्थिक स्थिती संपन्न तर मोलानी करवून घे ना.की त्यातही मला नाही आवडत बाई.कस ग सोड ना आता हट्ट… 

कर वेगळे हट्ट जगेन तर मस्तच… माझ्यावर नितांत प्रेम करणार…….मस्तच वेगळे काहीतरी जगणार नकोच तीच ती चाकोरी…..म्हण स्वतःला थांब ग बाई आतातरी….

जीवन जगायचं कसं तर भरभरून स्वतःला वेळ राखून ठेवला की मग स्वतः खरच जगलो म्हणून भारी वाटतं…..घरकामे करावीत ज्यांना आवड आहे त्यांनी…पण कामाचे योग्य नियोजन केले की त्यात अडकून न पडता…..अजून बरेचसे आवडीचे जगणे होते….फिरणे….मस्त रमतगमत, मैत्रिणी – त्यांच्यात रमणे….गप्पागोष्टी हक्काचे स्थान मन मोकळे मनमुराद जगणे होते…..

मैत्रिणी जमवणे ती मैत्री जोपासणे, टिकवणे ही सुध्दा कलाच आहे….ती अवगत करून, मस्त जीवन जगण्याचा आनंद मिळतो….मस्त आयोजन, नियोजन केले की स्वतः आनंदी असलो की घरदार पण आनंदी राहणार यात वादच नाही…..चला तर मस्त स्वतःसाठी वेळ राखून ठेवू आणि मस्त आनंदी आनंद घेत राहू….. 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आनंदमूर्ती स्वामी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ आनंदमूर्ती स्वामी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

मला दिनांक 31 मार्च२३ रोजी ब्रह्मनाळला व्याख्यानाला जाण्याचा योग आला. त्यानिमित्ताने आनंदमूर्ति स्वामींची माहिती मिळाली .ती येथे देत आहे

आनंदमूर्ती स्वामींचे मूळ नाव अनंतभट होते. रघुनाथ स्वामी हे त्यांचे गुरु. रघुनाथ स्वामी एकदा परगावी गेले.आनंदमूर्तींना त्यांचा शोध घेण्यासाठी तीन वर्षे लागली. तीन वर्षानंतर ते भेटले तेव्हा दोघांना खूप आनंद झाला.  स्वामी म्हणाले, अनंता, तीन वर्षे बायको मुले एकटी सोडून माझे स्वतःसाठी तू वणवण फिरलास ही एक तुझी तपसाधना झाली. माझ्यावरची तुझी निष्ठा पाहून मला खूप आनंद झाला तू माझ्या अंतर्यामीच्या आनंदाची मूर्ती आहे. आज पासून आम्ही तुला आनंदभट न म्हणता आनंदमूर्ती असेच नाव ठेवत आहोत. आम्ही तीन वर्षे जी साधना केली त्याचे पुण्यफल तुझे पुढील सात पिढ्यांचे  योगक्षेम सुव्यवस्थित चालावेत म्हणून आशीर्वाद पूर्वक तुला अर्पण करीत आहे. यापुढे तुझ्या तोंडून जे शब्द निघतील ते सत्य होतील. आणि तसेच झाले. चिकोडीत सौ. कुलकर्णी बाई त्यांच्या दर्शनास आल्या. स्वामींनी आशीर्वाद दिला .”पुत्रवती भव”. बाई  म्हणाल्या स्वामी माझे वय 60 आहे.  स्वामी म्हणाले मी आशीर्वाद दिला तो सहजस्फूर्त होता.

अंतर्यामीच्या आत्म्याचे बोल आहेत. हे सत्य  होणारच. दुसरे असे की एखाद्याने शाप दिला तर त्याला उ:शापाचा उतारा देऊन मुक्त करता येते. परंतु दिलेला शुभाशीर्वाद परत घेता येत नाही .तुम्हाला एक वर्षाचे आत मुलगा होऊन वंश वाढेल हे निश्चित. त्याप्रमाणे त्या बाईंना मुलगा झाला. त्यांचा वंश पुढे वाढत गेला. 

रघुनाथ स्वामी आणि आनंदमूर्ती तीन वर्षांनी वसगडे येथे परत आले. अनेक भक्त स्वामींना गाई भेट देत. संध्याकाळचे स्नान संध्या करण्यासाठी स्वामी नदीवर जात. येताना दान मिळालेल्या गाई ,दुपारी रानात चरायला सोडलेल्या गाई स्वामी परत आणून गोठ्यात बांधीत.गाईंचे गोठ्याजवळ एक मोठी चतुष्कोनी शिळा होती. त्यावर बसून स्वामी ध्यानधारणा करत. पुढे त्या शिळेवर मारुतीची मूर्ती स्पष्ट दिसू लागली. स्वामींचे समाधीनंतर त्या स्वयंभू मारुतीची शिळा ग्रामस्थानी आजच्या श्री लक्ष्मी मंदिरात स्थापन केली. त्या शिळेला श्री रघुनाथ स्वामी असे संबोधतात. त्या मूर्तीची नित्य पूजाअर्चा करतात.रघुनाथ स्वामी आनंदमूर्तीना घेऊन संगमावर आले. स्वामी म्हणाले हे संगमस्थान पवित्रांमध्ये पवित्र आहे. देह त्यागास हे स्थळ उत्तम आहे.

स्वामी म्हणाले एका व्यक्तीने कितीही कार्य केले तरी ते अपुरेच असते .पुढच्या लोकांनी ते कार्य पुढे चालू ठेवले पाहिजे. जगदोध्दाराचे जे कार्य अपुरे राहिले ते तू पुढे चालू ठेव. जनता जनार्दनाला जप ,तप, भक्ती मार्गाचा उपदेश करून आत्मोद्धाराचा मार्ग दाखव. स्वराष्ट्र आणि स्वधर्म याची जाणीव देऊन त्याच्या रक्षणाची त्यांच्या मनात प्रेरणा उत्पन्न कर. आनंदमूर्तीना उपदेश करून स्वामींनी देहत्याग केला. त्यांच्या इच्छेप्रमाणे देह दहनाकरता संगमावर आणला. पण ब्रह्मनाळचे ग्रामस्थांनी परगावचे प्रेत म्हणून आपल्या गावी दहन करण्यास नकार दिला. मग आनंदमूर्तिनी संगमाकाठी ४० हात लांब रुंद जागा पंधरा होन देऊन विकत घेतली. त्या ठिकाणी स्वामींच्या पार्थिव देहाचे यथाविधी  दहन केले. दहनस्थानी उत्तर कार्य करून स्वामींच्या पादुका स्थापन केल्या. पादुकांवर आच्छादन म्हणून त्यावर वृंदावन बांधले. बांधकाम वरच्या थरापर्यंत येताच वृंदावन थरारले आणि वृंदावनाचा थर पूर्णपणे पडला. असे चार वेळा झाले. आनंदमूर्ती पादुकांसमोर एक दिवस एक रात्र निर्जली उपोषण करीत बसले. स्वामी, वृंदावन बांधण्याची आमची मनोमनीची इच्छा आहे. कृपावंता, कृपा करून बांधकाम पूर्ण होऊ द्या. लाडक्याची इच्छा जाणून स्वामींनी पहाटे स्वप्नात दृष्टांत दिला. यापुढे बांधकामात व्यक्त येणार नाही. वृंदावनाचे बांधकाम सुरू झाले. रंग दिला. एका बाजूस शिवपंचायतन  आणि दुसऱ्या बाजूस रामपंचायतनाची चित्रे रेखाटली. वास्तु्पूजा केली. आरती झाली. कीर्तन सुरू झाले आणि वृंदावन डोलले. फुलांचे हार हालले. वृंदावनाचा हा पहिला डोल.रघुनाथ स्वामींनी आनंदमूर्तींना निर्याणापूर्वी संगमस्थानी आश्वासन दिल्याप्रमाणे आपल्या जागृत अस्तित्वाची जाणीव दिली. श्री समर्थ रामदास स्वामींना हे कळले. ते ब्रह्मनाळला आले. पादुकांची पूजा केली आणि वृंदावनाचा डोल झाला. स्वामींना खूप आनंद झाला. ते म्हणाले

जळघी गिरिशिळांनी सेतु बांधी तयाचे |

नवल नच शिवाही  ध्यान ते योगियाचे ||

अभिनव जगी तुझी कीर्ती आनंदमूर्ती |

 अचळ दगड प्रेमे डोलती थोर ख्याती ||

रघुनाथ स्वामींच्या पहिल्या वर्षाची पुण्यतिथी होती. त्यादिवशी चाफळहून रामदास स्वामी, वडगाहून जयराम स्वामी, निगडीहून रंगनाथ स्वामी, कराडचे निरंजन स्वामी, अनेक अन्य  साधुसंत, स्वामी ,वैदिक ब्राह्मण ,कथा- कीर्तनकार, भक्त मंडळी आली. सर्वांनी शिधा आणला होता. तो एकत्र करून भात व वरण फळे करून तो दिवस “फळ पाडवा” म्हणून साजरा केला .भाद्रपद शुद्ध द्वितीयेचा पुण्यतिथीचा दिवस उत्साहात संपन्न झाला. तिसरे दिवशी रामदास स्वामींच्या सांगण्यावरून गोपाळकाला केला. त्या दिवशी स्वतः रामदासांनी कीर्तन करून पहिला पुण्यतिथी उत्सव पूर्ण केला.

आनंदमूर्तींनी कांही आरत्या रचल्या. त्यातून बरीच माहिती मिळते. सध्या तिथे पाडवा ते दशमी उत्सव असतो. रहायला खोल्या बांधल्या आहेत. अनेक लोक त्या ठिकाणी येऊन रहातात. सेवा करतात. दहा दिवस सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. राम जन्माचे कीर्तन झाले की तिथे डोल होत असे. दगड चुन्यात बांधलेल्या वृंदावनाचा डोल हे लोकांना पटत नव्हते. अनेकांनी  प्रत्यक्ष पाहूनच खात्री केली होती. आनंदमूर्तींना खूप परीक्षा द्याव्या लागल्या. एकदा चोर त्यांच्या मागे लागले पण त्या चोरांना यांच्याबरोबर दोन धनुर्धारी तरुण दिसले. त्यामुळे त्यांना चोरी करता आली नाही. त्यांनी सांगलीत पोचल्यावर आनंदमूर्तींना ते धनुर्धारी कोण असे विचारले. तेव्हा आनंदमूर्तींना काहीच कल्पना नव्हती. ते म्हणाले आमचे गुरु रघुनाथ स्वामींनी ही अघटित घटना घडवून आणली. धनुर्धारी रूपात तुम्हास त्यांचे दर्शन झाले. तुम्ही पुण्यवान आहात. आता हा व्यवसाय सोडा आणि चांगले आयुष्य जगा. चोरांनी ते ऐकले.

स्वामींना आपल्या अवतार समाप्तीची जाणीव होऊ लागली. थोरला मुलगा कृष्णाप्पा याला बोलावून त्यांनी माझ्यामागे गुरु रघुनाथ स्वामींच्या पादुकांची पूजा, ब्रम्हनाळ गावचे इनाम, मठ, शेती, स्थावर जंगम मालमत्तेची व्यवस्था, वार्षिक उत्सव, आल्या गेल्या भक्तांची वास्तव्य व भोजनाची कायम व्यवस्था करण्यास सांगितले. त्याला समोर बसवून कानात तत्वमसी-“सोऽहं”मंत्राचा उपदेश केला. भूमध्यावर अंगठ्याने दाब देताच त्याची समाधी लागली. काही वेळानंतर त्याच्या डोळ्यास पाणी लावून त्यांनी समाधी उतरवली‌. व सांगितले तू दिवसा संसार व देवस्थानचा व्यवहार व ब्राह्ममुहूर्ती जप ,तप, ध्यान  करत रहा. 

आनंदमूर्तींनी पूजा आटोपली. बाहेर भक्तमंडळींना सांगितले आज वैकुंठ चतुर्दशीचा दिवस. या पुण्यदिवशी आम्ही देह त्याग करणार. देह त्यागानंतर सत्वर ब्रम्हनाळ येथे श्री गुरु  रघुनाथ स्वामींचे वृंदावनासमोर आमचा देह दहन करा. नरसोबाच्या वाडीचे नारायण स्वामी दर्शनास आले असता ते दोघांच्या वृंदावनामध्ये बसून ध्यान करू लागले आणि दोन्हीही वृंदावने डोलू लागली.

ब्रम्हनाळ मठाची उपासना श्रीरामाची. इथे रामनवमी ,महाशिवरात्र, रघुनाथ स्वामी व  आनंदमूर्तींचे पुण्यतिथी उत्सव व अन्य काही लहान उत्सव कार्यक्रम होतात. सज्जनगडचे श्रीधर स्वामी सुद्धा ब्रह्मनाळला आले होते . त्यावेळी डोल पाहून सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ज्या ज्या वेळी वृंदावन समाधीसमोर वेद घोष होतो व भक्तिभावाने भजन, कीर्तन, नाम संकीर्तन,   प्रवचने, साधुसंत करतात व ब्रह्मनिष्ठ योगी ,तपस्वी पुरुष दर्शनास येतात त्यावेळी  वृंदावन डोलते असा अनुभव आहे.

 नरसोबाच्या वाडीचे नारायण स्वामी दर्शनास आले असता ते दोघांच्या वृंदावनामध्ये बसून ध्यान करू लागले आणि दोन्हीही वृंदावने डोलू लागली.

परम कठीण शीला- डोलवी वृक्ष जैसा |

जननी जठर कोषी जन्मला कोण ऐसा ||

हरिभजन प्रतापे ख्याती झाली दिगंती |

अनुदिनु स्मरचित्ता श्री आनंदमूर्ती ||

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पत्त्यांचा खेळ… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ पत्त्यांचा खेळ… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

५२ पत्ते याबद्दल आजवर वाईट किंवा फारतर टाईमपास एवढेच आपण सर्वांनी ऐकले किंवा पाहिले असेल पण ही खालील माहिती नक्की वाचा. पत्त्यांचा खेळ म्हटला की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो- ह्या पलीकडे आपल्याकडे माहिती नाही. पत्त्यांविषयी जाणून घेऊ.

पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुठ्ठ्याचे  किंवा प्लास्टिकचे बनविलेले असतात. 

बदाम, इस्पिक, किलवर (किल्वर) आणि चौकट. या चार प्रकारात प्रत्येकी १३ पत्ते मिळून ५२ पत्त्याचा संच होतो.     

—  पत्त्याची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दश्शीपर्यन्त, गुलाम, राणी, राजा, याशिवाय 2 जोकर असतात.

१) ५२ पत्ते म्हणजे ५२ आठवडे

२) ४ प्रकारचे पत्ते म्हणजे ४ ऋतु. 

प्रत्येक ऋतूचे १३ आठवडे.

३) या सर्व पत्त्याची बेरीज ३६४

४) एक जोकर धरला तर ३६५ म्हणजे १ वर्ष.

५) २ जोकर धरले तर ३६६ म्हणजे लीप वर्ष.

६) ५२ पत्यातील १२ चित्रपत्ते म्हणजे १२ महिने

७) लाल आणि काळा रंग म्हणजे दिवस आणि रात्र.

पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ

१) दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश

२) तिर्री म्हणजे ब्रम्हा,विष्णू आणि  महेश

३) चौकी म्हणजे चार वेद —  (अथर्ववेद, सामवेद,ऋग्वेद, यजुर्वेद)

४) पंजी म्हणजे पंचप्राण —  (प्राण, अपान, व्यान, उदान ,समान)

५) छक्की म्हणजे षडरिपू —  (काम ,क्रोध,मद,मोह, मत्सर, लोभ)

६) सत्ती- सात सागर

७) अठ्ठी – आठ सिद्धी

८) नववी- नऊ ग्रह

९) दश्शी – दहा इंद्रिये 

१०) गुलाम- मनातील वासना 

११) राणी- माया

१२) राजा-सर्वांचा शासक

१३) एक्का- मनुष्याचा विवेक

१४) समोरचा भिडू – प्रारब्ध

मित्रांनो, लहानपणापासून पत्ते बघितले. असतील काहींनी खेळले असतील.  परंतू त्या पत्त्यांच्या संचाबद्दल अशा प्रकारची माहिती होती का ? 

त्याचे उत्तर बहुदा नाहीच असेल. आहे ना गंमतीशीर आणि ज्ञानदायी.?

पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला, तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते !!!

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मराठी राजभाषा दिन…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “मराठी राजभाषा दिन…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

घड्याळाचे काटे घड्याळात आडवे झाल्याचे दिसले (सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटे.) आणि मी माझा अंथरुणावर पडलेला आडवा देह उभा केला. (सहा वाजता काटे असतात तसा उभा केला. खरेतर सकाळी सहा वाजता असतात तसा. असे म्हणणार होतो पण मी संध्याकाळचेच सहा वाजल्याचे बघतो. सकाळची सहाची वेळ घड्याळात बघायला वेळ कुठे असतो.)

ब्रश काढला. त्यावर पेस्ट पसरवली. तोपर्यंत लगेच माझ्या मोबाईलवर मॅसेज येण्याचे टोन ऐकू येऊ लागले.

आज सकाळी सकाळी इतके मेसेज कसे काय? हा प्रश्न पडला. कोणाचा तरी Birthday असावा अशा विचारात मी मोबाईल हातात घेतला. कारण Birthday wishes चे विशेष सांभाळायचे होते.पण तोंडातला ब्रश, आणि मोबाइलवर बोटे एकाचवेळी फिरवण्याची कसरत जमली नाही.

मग मोबाईल बाजूला ठेवला, आणि ब्रश केला. फ्रेश झालो. न्यूज पेपर हातात घेत सावकाश चहा घेता घेता परत एकदा मोबाईल हातात घेतला. परत तेच. कपबशी, न्यूज पेपर, आणि मोबाईल यांचा हाताशी ताळमेळ बसला नाही. परत मोबाईल बाजूला ठेवला. पण मॅसेज चे टोन सुरुच होते. आज काय विशेष आहे याचा विचार करता करताच अगोदर चहा संपवला.

आणि मग शांतपणे खुर्चीवर बसून अधिरतेने मोबाईल ओपन केला. थोडावेळ सगळे मॅसेज बघितले. एक लक्षात आले.

गुलाब, मोगरा, प्राजक्त, कमळ, बकुळी, चाफा अशा अनेक  छानशा पण टवटवीत दिसणाऱ्या फुलांच्या सुरेख चित्रांसोबत Hi, Hello, Good morning, Have a nice day असे Pop corn सारखे टणाटण फुटणाऱ्या सगळ्या मॅसेजेस् च्या जागी चक्क नमस्कार मंडळी, सुप्रभात, काय म्हणता…, कसे आहात, आजचा दिवस सुखाचा जावो असे चक्क मराठीत लिहिलेले बरेच मॅसेजेस् मोबाईलवर आले होते.

आणि लक्षात आले. आज मराठी राजभाषा दिन. मग काय?…..

मी कसा काय मागे राहणार. भ्रमराने फुलाफुलांवर जाऊन त्यातील मधुकण गोळा करावेत तद्वतच मी देखील माझ्या भ्रमणध्वनीवर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या समुहात पाठवलेले वेगवेगळे पण त्यातल्यात्यात काही वेचक संदेश टिपले. आणि कापा व चिकटवा अथवा नक्कल करा व चिकटवा या मार्गाचा अवलंब करत एकाचे दुसऱ्याला पुढे पाठवायला सुरुवात केली.

सध्या परिक्षेचे दिवस सुरू आहेत. नक्कलमुक्त अभियान राबवले जात असल्याचा भास निर्माण केला जातोय. पण तिथे जसा नक्कल करण्याचा सुळसुळाट असल्याचे वृत्त येते, तसेच मी देखील नक्कल करतोय याचे भान मला राहिले नाही.

निदान आज परत अंथरुणावर आडवे पर्यंत तरी शुभरात्री, शुभरजनी असे मराठीतलेच संदेश येतील.

हे ही नसे थोडके…….

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ताटी लावता आली पाहिजे..! – लेखक : श्री प्रवीण ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ ताटी लावता आली पाहिजे..! ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

प्रत्येकाला हे करता आलं पाहिजे. स्वतःला आतून काहीकाळ तरी बंद करून घेता आलं पाहिजे.

मनाला आतून थांबवायचं.! विचारांना आतून थांबवायचं..! चक्क कडी घालायची..!

— विरक्तपणाची कडी..! माउलींना हे सहज शक्य झालं..! कारण त्यांनी विचारांची झेप  त्यांच्या नियंत्रणात ठेवली होती.

 

आपलं तसं नाही.– आपल्याला स्वतःला आवरणं अवघड आहे.– पण जमलं पाहिजे.

समाजाला काही काळ नाकारता आल पाहिजे.— नात्यांना काही काळ लांब ठेवता आल पाहिजे.

अगदी तो विश्वंभरही शक्य तेवढा बाजूला ठेवावा.– श्वास सुद्धा सखा नाही याची जाणीव व्हावी.

— ताटी लावून घ्यावी..!

 

कुणाशी वैर नाही..– दुस्वास नाही..

स्पर्धा नाही..— पण अंतर ठेवावं.!

ताटी घट्ट करावी..!

 

ताटीबाहेरच्या जगाला त्यांच्याप्रमाणे वागू द्यावं.!

तो कोलाहल, त्या हाका ऐकूनही न ऐकल्यासारख्या कराव्या.

आणि आतल्या आत्मारामाचा आक्रोश ऐकावा.! आतली हाक समजून घ्यावी.

— आणि स्वतःला समजावून द्यावी.!

 

— न जाणो ती हाक जेव्हा आपल्याला कळेल, तेव्हा आपल्या आयुष्यात ही मुक्ताई आपल्या झोपडी बाहेर अवतरेल..!

ताटीची गरजच पडणार नाही.— तीच हाका देईल..! जोहार मांडेल..!

अशा वेळी ताटी उघडून तिच्या कुशीत जाणं म्हणजे आयुष्याचं सार्थक..! हे झालं पाहिजे.

या जन्मात नाहीतर पुढच्या जन्मी..! पण केव्हातरी..—– 

— ताटी लावता आली पाहिजे..!!!!

लेखक : श्री प्रवीण 

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares