दिवे लागणीची वेळ होती. मी गॅलरीत उभे राहून समोर अथांग पसरलेली वनराई पहात होते. बर्यापैकी अंधारून आले होते. पानगळ झालेल्या झाडांतून पलिकडे कैगा धरणावरील (कर्नाटक) दिवे लुकलुकताना दिसत होते. डोंगराआडून चंद्राची स्वारी डोकवत येत होती. आकाशात एक एक चांदणी उगवत आपली हजेरी लावत होती. दोन दिवसातच पौर्णिमा असल्यामुळे चंद्राची, टपोऱ्या चांदण्यांची रूपेरी चादर हिरव्या झाडांवर पसरली होती.
दिवसभराची किलबिल घरट्यात विसावून शांत झाली होती. नाहीतरी विविध पक्षांचे वेगवेगळे आवाज ऐकून कान तृप्त होतातच. आपल्या गावापासून, माणसांपासून दूर असल्यामुळे मनात निर्माण झालेली हुरहूर, त्यांच्या दूर असण्यामुळे मनाला जाणवणारी उणीवेची भावना पक्षी, प्राणी, घनदाट पसरलेली ही हिरवीगार वनराई यांच्यामुळे काहीशी कमी होते हे ही तितकेच खरे .
कैगा धरणापासून दोन कि.मी. अंतरावर आमची छावणी होती. एका डोंगराच्या पायथ्याला वसलेली. समोर दूरवर पसरलेला निसर्ग म्हणजे ‘देवाने सढळ हाताने रेखाटलेली अतिसुंदर चित्रकृतीच. उंच उंच डोंगर, दऱ्या-खोऱ्यातून पसरलेली हिरवाई पाहून मन सुखावते, तृप्त होऊन जाते.
आजही मी अशीच टपोऱ्या चांदण्यात उजळलेला निसर्ग पहात उभी होते. गॅलरीतून पहाता पहाता समोरून अनशी घाटातून उतरत असलेल्या वाहनांच्या दिव्यांचे प्रकाश झोत दिसले आणि गावाकडे जाणारा रस्ता डोळ्यांसमोर उभा राहिला. एकदम मन उदास झाले. या घाटातूनच आम्ही आमच्या गावाकडे ये जा करत असतो..
आमचे छावणीतले जीवन आणि गाव यात किती फरक असतो नाही, या विचाराने मन हेलावून गेले. माझे पती पंधरा दिवसांसाठी आऊट ड्युटीवर गेले होते. मी आणि माझी मुलगी, आम्ही दोघीच होतो. मनात आले आपल्या गावापासून दूरवर प्रत्येक जवान असे कितीतरी डोंगर ओलांडून जात, येत असतो. देशासाठी प्रवास करत असतो. छावणीत आपला परिवार आणतो, आपला संसार थाटतो. कधी येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर, परिस्थितीवर मात करत परिवार सांभाळतो. कधी तर अशी परिस्थिती येते की , नोकरी एकीकडे असते तर परिवार दुसरीकडे असतो. पण तो येणाऱ्या प्रत्येक संकटास धैर्याने तोंड देतोच. ना कधी देशसेवेत कमी पडतो ना कुंटुबाच्या कर्तव्यात कमी पडतो.. प्रत्येक जवान देश आणि आपला परिवार अशी दोन्ही कर्तव्ये अगदी व्यवस्थित पार पाडत असतो..
कधी आउट ड्युटीवर परिवार सोडून बाहेर जावे लागले तर जवानाच्या अर्धांगिनीला आपल्या मुलांसाठी हिरकणी व्हावेच लागते.
छावणी हा मात्र जवानाचा विसावा असतो. देशाच्या विविध राज्यांतून, कित्येक गावातून येणारे जवान आणि त्यांचे परिवार मिळून आमची छावणी होते. वेगळी भाषा, वेगळे पेहराव , वेगवेगळे खाणे-पिणे, आचार,विचार अशी कितीतरी गोष्टींत विविधता असते. हीच आमची विविधतेतून एकता दर्शवणारी आमची भावकी. छावणीच्या गेटमधून आत येताच इथे प्रत्येकांत आपलेपणाची भावना असते. घर सरकारीच असते पण ते’ माझे घर ‘ आहे अशी आपलेपणाची भावना छावणीत येताच प्रत्येकाच्या मनात निर्माण होते. नाती रक्ताची नसतात, पण अडी-अडचणीत एकमेकांना साथ देणारी, एकमेकांसाठी धावून जाणारी असतात. सण, उत्सव सगळे मिळून साजरे करतात. एकमेकांच्या विविध सण उत्सवात सर्वजण एकत्र येतात, मिळून सण साजरे करतात. असे विविधतेतही एकोप्याचे , एकात्मतेचे वातावरण छावणीच निर्माण करू शकते. आपण गावाकडे एका गावात एका भावकीत सुद्धा असे मिळून-मिसळून, एकोप्याने रहात नाही . मनात इर्षा, वैरभाव ठेवून रहातो, तसेच वागतो . पण छावणीत येताच छावणी एकीने रहायची शिकवण देते. तीन – चार वर्षांत बदली होते. जिवाभावाचे नाते निर्माण झालेले लोक दूर जातात. एकमेकांचे निरोप घेता-देताना कुणी आपलेच जवळचे दूर जातेय या भावनेने मने कष्टी होतात, प्रत्येकाचे काळीज पिळवटून जाते. . निरोपाच्या वेळी खोलवर मनात रुतून बसणारे दुःख होते. तीन- चार वर्षांनी येणाऱ्या बदल्या, पुन्हा नवीन राज्य, नवा प्रदेश, नवा गाव, हवा, पाणी, संस्कृती, भाषा सगळे काही नवं, निराळे. छावणी जाणाऱ्याला जड अंतःकरणाने निरोप देते. येणाऱ्याचे आनंदाने स्वागत करते. पण प्रत्येक जवानाला या सगळ्यांशी जुळवून घेत नवी छावणी शोधावीच लागते.
प्रत्येक जवान या छावणीत रूळत असला तरी एक स्पष्ट करावे वाटते. देशासाठी लढणारा जवान हा आपल्यामागे आपले आई-वडील, भाऊ, बहिण, कितीतरी जिवाभावाची माणसं सोडून आलेला असतो. पण आपल्या घरापासून ते गल्लोगल्लीतला आख्खा गाव, दूर आलेल्या जवानाच्या डोळ्यांत सदा उभा असतो, दाटून राहिलेला असतो हे ही खरे आहे. मायभूसाठी लढण्याचे बळ, जन्मभूमीकडे परत येण्याच्या सुखद हिंदोळ्यातूनच मिळते. आख्खा गाव नजरेत भरून छावणीत राहणाऱ्या जवानाला, त्याचा गाव किती आठवणीत ठेवत असतो हे गावच जाणत असेल.
किती वेळ मी छावणीच्या विचारचक्रात गॅलरीतच उभी होते. समोरच्या घाटातून गावाकडे जाणारा रस्ता पहात माझाही गाव आठवणीच्या हिंदोळ्यात मनात रुंजी घालत होता. इतक्यात रात्रपाळीला जाणाऱ्या एका जवानाला खिडकीतून “बाय बाय “केलेला आवाज कानावर आला आणि मी विचारातून भानावर आले.
मनाला मात्र एक सत्य स्पर्शून जाते की ही छावणी हेच आपले गाव, इथले सदस्य, इथले परिवार हेच सगे-सोयरे, आणि हीच नातीगोती. या घनगर्द जंगलातील प्राणी, उंच उंच गगनाशी भिडणाऱ्या झाडे- वेली, आनंदाने बागडणारे पक्षी हेच आपले जीवन. कधी इथली छावणी आपली होऊन गेलेली असते तर कधी दुसर्या ठिकाणची छावणी.……
☆ जुन्या मैत्रिणी, नवीन आठवणी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
दोन दिवसापूर्वी अचानक जवळच्या मैत्रिणीचा फोन आला. ‘आपल्याला ८ फेब्रुवारी २०२३ बुधवारी जायचे आहे.’ पाठोपाठ दुसऱ्याही मैत्रिणीशी बोलणे झाले. कधी,कुठे अशा प्रश्नांना वावच नव्हता. इतकी वर्षे सहल, खेळ, शाळा या सर्वांचे नियोजन करणे चालूच होते. मग मी ठरवले होते आता आपण सहलीला मैत्रिणी नेतील तिकडे जायचे.आणि बुधवार सकाळपासूनच आश्चर्याचे सुखद धक्के मिळू लागले. अगदी रिक्षा,बस हे सर्व अगदी वेळेवर आणि उत्तम स्थितीत असणारे हजर झाले.आणि जसजसे एकेक मैत्रीण गाडीत चढत होती तसतसे आश्चर्य वाढतच होते. कारण जुन्या (खूप वर्षापूर्वीच्या) मैत्रिणी नव्याने भेटत होत्या. एकमेकींची विचारपूस करत, गळाभेट घेत असताना सगळ्या आनंदात ठिकाण कधी आले कळलेच नाही.
मग तर अगदी बालपणच गवसले. एकमेकींची थट्टा, मस्करी, विनोद सुरू झाले. झोके खेळणे, नाचणे, गाणी म्हणणे, ट्रॅक्टर राईड, बोटिंग, सुग्रास जेवण, उत्तम नाश्ता… सगळेच खूप एन्जॉय केले. अगदी सगळे आयते पुढ्यात येत होते. आणि साऱ्याजणी वय, दुखणी, केसातील चांदी, जबाबदारी, नातवंडे, सगळे विसरून मस्त हसत, खिदळत होत्या.
आजच्या १० तासांच्या मैत्रिणींच्या सहवासाने अगदी सगळ्यांनाच नवीन ऊर्जा नक्कीच मिळाली. आणि जुन्या मैत्रिणींची नवीन परिपक्व ओळख झाली.
त्या सर्व मैत्रिणींना, सर्वांना घरापासून घरापर्यंत पोहोचवणारे उत्कृष्ट नियोजन, सुखरूप नेऊन घरापर्यंत आणणारे चक्रधर ( ड्रायव्हर ) आणि दगदग धावपळ यातून निवृत्त होऊन सेवानिवृत्तीचे आयुष्य नव्याने सुरू करणाऱ्या माझ्या परिपक्व मैत्रिणी ….या सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद !
अल्बर्ट आईन्स्टाईन!— आज त्यांचा स्मृतीदिन ग्रॅंड सॅल्युट!
(जन्म : मार्च १४, १८७९–मृत्यू : एप्रिल १८, १९५५)
तो बायकोसोबत खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेला…
सतत संशोधनात गुंतलेला आणि व्याख्यानाच्या निमित्तानं जगभर हिंडणारा नवरा आज शाॅपिंगला सोबत आलाय म्हटल्यावर बायकोनं जरा ढिल्या हातानंच खरेदी करायला सुरुवात केली…
बिल द्यायची वेळ आली तेव्हा ह्या नवऱ्यानं दुकानदाराला चेक दिला.
बायकोच्या मनात शंकेची पाल चुकचुकली… त्याच्या दंडाला धरून बाजूला घेत ती कानात कुजबुजली,
“अहो! मोठ्या ऐटीत चेक दिलात… पण तुमच्या अकाऊंटमध्ये तेवढे पैसे आहेत का?”
अगोदरच पिंजारलेल्या केसांत हात फिरवत, डोळे विस्फारत तिच्याकडे बघत तो गोड हसला…
…पण ‘पैसे आहेत की नाहीत’, याचं उत्तर काही दिलं नाही !
घरी येत असताना बायकोच्या डोक्यात शंकांचं जाळं विणलं जात होतं…
‘आपला नवरा आपला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ असला तरी कधी कधी हा घरी यायचा रस्ताही विसरतो…
असल्या विसरभोळ्या नवऱ्याच्या अकाउंटला खरंच पैसे असतील का?’…. ‘नसतील, तर दुकानदार याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करेल का?’ …… ‘बरं… पैसे असतील, तर यानं आजपर्यंत
माझ्यापासून का बरं लपवले असतील?’
—एक ना अनेक विचार करत ती बाई आपल्या नवऱ्याला प्रश्न विचारून भंडावून सोडत होती…
शेवटी तो म्हणाला, ….
“अगं! माझ्या अकाउंटला पैसे असले काय अन् नसले काय, काही फरक नाही पडणार…
कारण तो दुकानदार तो चेक बॅंकेत टाकणारच नाही…!!!”
आता मात्र तिला चक्कर यायची तेवढी बाकी राहीली होती. ती ‘आ’ वासून नवऱ्याकडे बघत राहिली…
तेव्हा तो म्हणाला, ……
“अगं! वेडे त्या चेकवर ‘माझी’ सही आहे…
आणि माझी सही असलेला चेक दुकानदार बॅंकेत तर टाकणार नाहीच, पण फ्रेम करून दुकानात मात्र नक्की लावेल !”
— आणि खरोखर तस्संच घडलं…!
अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला हा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ होता…
अल्बर्ट आईन्स्टाईन!— आज त्यांचा स्मृतीदिन ग्रॅंड सॅल्युट!
संग्राहिका : डॉ. शुभा गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
सर्व धर्म परिषदेला विवेकानंद येण्यापूर्वी भारतात ते परिव्राजक म्हणून फिरले होते आणि आता अमेरिकेत सगळीकडे परिव्राजक म्हणूनच फिरत होते. पण दोन्ही कडचे परिव्राजकत्व खूप वेगळे होते. दोन्हीकडील लोक, शिक्षण, परंपरा, तत्वज्ञान, धर्म, अध्यात्म ,विचार व मूल्य ,आर्थिक परिस्थिति सगळच वेगळं. इथे वैयक्तिक भेटीतून त्यांनी तळागाळातील भारत समजून घेतला तसा आता दीड वर्षापासून ते अमेरिकेत फिरत होते तेथेही भेटी घेणे,विविध चर्चा, भाषणे, सार्वजनिक ठिकाणची व्याख्याने, तिकडच्या विद्वान लोकांच्या भेटी ,नामवंतांशी झालेल्या चर्चा यामुळे तिकडची संस्कृती, ते लोक याचा जवळून परिचय होत होता. अनेक कुटुंबे विवेकानंद यांच्याशी पर्यायाने हिंदू तत्वज्ञानशी जोडले गेले होते. तिथल्या वृत्तपत्रातून विवेकानंद यांच्या विषयी अनेक वर्णने छापून आल्यामुळे लोकांना परिचय व्हायचा. त्यांच्या भेटीनंतर आणि ओळख पटल्यानंतर पाश्चात्य संस्कृतीतल्या स्त्रिया सुद्धा विवेकानंद यांच्याकडे मातृभावाने बघू लागल्या होत्या. भारतात जसे त्यांचे शिष्यगण तयार झाले होते तसे आता अमेरिकेत सुद्धा लोकांचा यातला रस वाढू लागला होता.त्यातून अनेक शिष्य ही तयार झाले.
सुरूवातीला सर्व धर्म परिषदेपर्यंत त्यांना कोणी ओळखतही नव्हते, नंतर मात्र ते तेंव्हापासून आणि नंतरही विद्वानात सुद्धा चांगलेच परिचित झाले. एक मानाचे स्थान त्यांना प्राप्त झाले होते. सुरूवातीचे विषय सुद्धा हिंदू धर्माचे प्रतींनिधी याच नात्याने असत. खरा हिंदू धर्म समजून सांगणे, गैरसमज दूर करणे, हेच त्यांनी उद्दिष्ट्य ठेवलेले दिसते.
स्वामीजींनी अमेरिकेचा आता निरोप घेऊन पुढच्या कार्याला लागायचे ठरवले होते, अनेक जणांना पत्र लिहून निरोप दिला. पंधरा एप्रिलला न्यूयोर्क हून लिव्हरपुल ला निघाले. बरेच जण जहाजावर निरोप द्यायला आले होते. आधी भारतात अडीच वर्षे परिव्राजक म्हणून ते फिरले, तसे अमेरिकेत सुधा जवळ जवळ ते अडीच वर्षे फिरले. आता ते इथून इंग्लंड ला निघाले होते. एस.एस. जर्मनीक जहाजणे किनारा सोडून अमेरिकेचा भूप्रदेश दिसेनासा होई पर्यन्त ते बाहेर उभे होते. या अमेरिकेच्या भूमिने आपल्याला काय काय दिले याचा लेखा जोखा मांडत.
स्वामीजी इंग्लंड ला पोहोचले. इथे एक आनंदाच प्रसंग स्वामीजींनी अनुभवला तो म्हणजे पाच वर्षांनंतर सारदानंद यांची इंग्लंड मध्ये भेट. भारत भ्रमण सुरू होताना ते भेटले त्यानंतर स्वामीजींनिना अमेरिकेतील वास्तव्यात आलेले अनुभव, मिळालेले यश आणि किर्ती हे सारे बघून सारदानंद केव्हढे आनंदी झाले असतील याची कल्पना आपण करू शकतो. स्वामीजींना खूप वर्षानी आपल्या मातृभाषेत बंगालीत बोलायला मिळाले याचाही आनंद होता, पत्रव्यवहार होत असला तरी अनेक गोष्टी आता प्रत्यक्षात एकमेकांशी बोलायला मिळत होत्या त्याचे एक समाधान होते दोघांना. ही भेट झाल्यानंतर स्वामीजींनी आपल्या सर्व गुरु बंधूंना उद्देशून सविस्तर पत्र लिहिले ,त्यात मठातील दैनंदिन व्यवहार कसं असावा, त्याचे नियम काय असावेत, मी भारतात परत आल्यानंतर आपल्याला एक संस्था उभी करायची आहे ती कशी असेल, त्याचे ध्येय काय असेल, ती कशी चालवायची, याचे चिंतन यात होते. ही संस्था म्हणजेच रामकृष्ण मिशन ची तयारी होय.रामकृष्ण मिशन चे काम पुढे कसे वाढले आणि त्याचा प्रसार कसं झाला हे आज आपण रामकृष्ण मठ आणि मिशन चे कार्य बघितले की कळते.
इंग्लंडला जशी सारदा नंदांची भेट झाली तशीच अचानक स्वामीजींचे लहान भाऊ महेंद्रनाथ यांची पण अनपेक्षित भेट झाली, ही बंधुभेट फार फार महत्वाची होती, कारण संन्यास घेतल्यापासून नरेंद्र ने घर सोडले होते ,त्यानंतरची घरातली परिस्थिति, आर्थिक विवंचना, त्यांच्या आईना झालेला अत्यंत क्लेश, आणि आलेले सर्व वाईट अनुभवाचे महेंद्रनाथ दत्त साक्षीदार होते. म्हणून अनेक स्थित्यंतरांनंतर ही दोन भावांची भेट याला महत्व होते.महेंद्र नाथ वकिलीचा अभ्यास करायला इंग्लंडला आले होते. महेंद्र नाथांनी लिहीलेल्या ‘लंडने स्वामी विवेकानंद’या पुस्तकात या बंधुभेटीचा वृत्तान्त लिहिला आहे, महेंद्रनाथ दत्त हे पुढे ग्रंथकार म्हणून ओळखले जाऊ लागले. नरेंद्रचे (स्वामीजींचे) सर्वात धाकटे भाऊ भुपेंद्रनाथ दत्त बंगाल मधील सशत्र क्रांतिकारक चळवळीत सहभागी झाले. युगांतर मासिकाचे ते संपादक होते. अमेरिकेत ते पी एच डी झाले. त्यांनीही अनेक ग्रंथ लिहिले. नंतर ते साम्यवादी विचारांचे खंदे कार्यकर्ते आले, स्वामीजींचे चरित्र पण त्यांनी लिहिले आहे आणि द्रष्टा देशभक्त म्हणून स्वामीजींची प्रतिमा त्यातून त्यांनी उभी केली आहे. भुवनेश्वरी देवी आणि विश्वनाथ दत्त यांची तीन मुले एक अन्यासी, एक ग्रंथकार, आणि एक साम्यवादी असे तीन दिशांनी कार्य करणारे कीर्तीवंत पुत्र होऊन गेले.
लंडन मध्ये स्वामीजींनी वर्ग सुरु केला होता. तिथे सीसेम क्लब नुकताच वर्षभरापूर्वी स्थापन झाला होता. बुद्धिजीवी आणि विचारवंत स्त्रिया आणि पुरुष असा दोघांचा हा क्लब होता. शिक्षणाचा सर्वांगीण विचार असा त्याचा उद्देश होता. आठवड्यातून एक दिवस साहित्य विषयक चर्चा होत असे. ठरलेले वक्ते येऊ शकणार नव्हते म्हणून स्वामी विवेकानंद यांना व्याख्यानासाठी अचानक बोलवण्यात आले. तिथे त्यांनी मांडलेले विचार फार महत्वचे होते. ‘शाळेत दिले जाणारे भौतिक विद्येच्या क्षेत्रातील शिक्षण शेवटपर्यंत थेट पोहोचले पाहिजे. कारण स्वामीजींच्या मते समाजातील अज्ञान दूर करण्याची ही पहिली पायरी होती. आणि मानवामध्ये सुप्त असलेले पूर्णत्व प्रकाशात आणणे ही शिक्षणाची फलश्रुति होती. धर्माईतकेच शिक्षणाला महत्व आहे आणि धर्माचा जसा व्यापार होता कामा नये तसाच, शिक्षणाचा बाजार होता कामा नये,असा स्वामी विवेकानंद यांचा दृष्टीकोण होता. भारतातील प्राचीन गुरुकुल पद्धती त्यांना आदर्श वाटत होती.
युरोप मध्ये प्रवास चालू होता, आता टीआर अभेदानंद हे गुरुबंधु पण स्वामिजिना भेटले. मुलर यांच्या कडे विवेकानंद राहत होते तिथे अभेदानंद आलेले पाहताच स्वामीजींना कोण आनंद झाला होता. जूनलाच स्वामीजींचा भारतात निरोप गेला होता की “कालीला ताबडतोब पाठवून द्या”. एमजी काय स्वामीजी आणि काली पुढचे पंधरा दिवस वेदान्त विचाराच्या प्रसाराचे कार्य आणि फक्त त्याचीच चर्चा, असे आनंदात दिवस गेले. अभेदानंद सर्व वेद ग्रंथ, शतपथ ब्राह्मण, काही सूत्र ग्रंथ, असे अनेक ग्रंथ घेऊन आले होते. ही सर्व पुढच्या कामाची तयारी होती. सार्या मानव जातीला एक नवी दिशा द्यायची आहे असे स्वप्न स्वामीजींनी बघितले होते.आता विवेकानंद यांचे परदेशातील वास्तव्य संपत आले होते.इंग्लंड मध्ये अभेदानंद आणि अमेरिकेत सारदानंद पुढचे काम बघणार होते. स्वामी विवेकानंद आता आपल्या मातृभूमिकाडे परत येणार होते ते जवळ जवळ साडे तीन वर्षांनंतर, त्यांना निरोप द्यायला सगळे जमले होते. १६ डिसेंबर १८९६ रोजी स्वामीजींनी इंग्लंड चा किनारा सोडला. मातृभूमी त्यांना बोलवत होती.
उन्हाळ्याचे दिवस ! काही दिवस अशा कडक उन्हाचे संपल्यावर वळिवाची चाहूल लागली. एकदम अंधारूनच आले, आणि ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला ! आला आला तो पाऊस म्हणेपर्यंत बाहेर टप टप गारांची बरसात होऊ लागली. पांढऱ्या शुभ्र गारांनी अंगण भरले. किती वेचू असं मनाला झालं !
उन्हाळ्यातला पहिला पाऊस ! तापलेली तृषार्त जमीन पाणी पिऊन घेत होती ! मातीचा सुगंध सगळीकडे दरवळला होता. अंगणात छोटी मुले मस्त भिजून गारा वेचत आनंदाने बागडत होती. ते पाहून आपण उगीचच मोठे झालो असं वाटत होतं ! हवेतला लोभस गारवा खूपच सुखद होता. अर्ध्या पाऊण तासात सगळं वातावरण बदलून गेले. अशी हवा पडली की, मला गच्चीत जाऊन त्या निसर्गाकडे बघत राहावं असं वाटे !
आकाशाकडे पाहिलं आणि मस्तपैकी इंद्रधनुष्य डोळ्यासमोर दिसू लागले ! सहज मनात आलं आणि आयुष्य हे इंद्रधनुष्यासारखे दिसू लागले. आयुष्याचा प्रत्येक टप्पा म्हणजे इंद्रधनुचा एक एक रंग आहे. पावसाच्या थेंबावर सूर्याचे किरण पडले की आकाशाच्या पटलावर आपल्याला इंद्रधनुष्य दिसते ,तसेच आयुष्याच्या या टप्प्यावर मला भूतकाळ इंद्रधनुष्यातील रंगांसारखा दिसतो. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या आपल्या अवस्था इंद्रधनुष्यातील रंगांसारख्या वाटतात…
ता –तान्हेपण, जन्माला आलेल्या बाळाचा तांबूस वर्ण आयुष्याची सुरुवात दाखवतो.
ना – नेणतेपण, छोटे बाळ आपल्या पायावर उभे राहते.. बोबडे बोल बोलू लागते पण ते अजाण असते. नुकत्याच उगवलेल्या बाल रवी सारखे त्याचे दिसणे असते!
पि – पौगंडावस्था, साधारणपणे आठ ते पंधरा वयातील मुले जी तारुण्याच्या उंबरठ्यावर असतात.. अजून कळीचे फुल व्हायचे असते. जीवनाविषयी प्रचंड कुतूहल दाखवणारी जिज्ञासू वृत्ती या वयात असते..
हि – हिरवेपणा, हे तर सुजनाचे, तारुण्याचे प्रतीक! प्रत्येकाचा हा काळ नवनिर्मितीचा, पूर्णत्वाकडे नेणारा काळ असतो. आयुष्यातील कर्तृत्वाचा हा काळ माणसाला सर्वात जास्त आवडतो.
नि – तारुण्याचा जोश उतरू लागतो आणि जाणीव होते ती निवृत्तीची! एकंदर आयुष्याचा विचार केला तर हा प्रवास उतारा कडे नेणारा असतो..
पा – वाढत्या वयाची दृश्य खूण म्हणजे पांढरे केस! ते आपल्याला जाणवून देतात की किती पावसाळे पाहिले आपण! अनुभवाच्या संचिताची शिदोरी घेऊन ही वृद्धत्वाकडे वाटचाल चालू असते.
जा – जाता जीव शेवटी शिवाकडे विलीन होणार या सत्याची जाणीव होते आणि तो खऱ्या अर्थाने जन्म ते मृत्यूपर्यंतच्या दीर्घ प्रवासाचा आढावा घेतो.
अशा या इंद्रधनुष्यी जीवनात आपण कालक्रमणा करीत असतो. प्रत्येक अवस्था तितकीच महत्त्वाची आणि मोहक असते. जीवनाचा आस्वाद घेत हा मनुष्य जन्म चांगल्या कामासाठी व्यतीत करून पुन्हा अनंतात विलीन करणे हेच त्या इंद्रधनुष्याचे काम ! त्याची वक्रता जीवन क्रम दाखवते. लहानपणापासून ते मध्यापर्यंत वाढत जाणारी ही कमान उतरत्या क्रमाने जाते, ती जीवा शिवाची भेट होण्याची उतरती रंगसंगती दाखवत !
पहिल्या पावसाच्या मातीच्या गंधाने भरलेल्या त्या वातावरणात माझं मन इंद्रधनुष्यी बनलं होतं ! विविध विचारांच्या रंगात गंधात न्हाऊन गेलं होतं !
☆ मला पावसात जाऊ दे… कै. वंदना विटणकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆
काव्यानंद:
☆ मला पावसात जाऊ दे… कै. वंदना विटणकर ☆
ए आई मला पावसात जाऊ दे
एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे..
मेघ कसे बघ गडगड करिती
विजा नभातून मला खुणविती
त्यांच्या संगे अंगणात मज खूप खूप नाचू दे..
बदकांचा बघ थवा नाचतो
बेडूक दादा हाक मारतो
पाण्यामधून त्यांचा मजला पाठलाग करू दे .
धारे खाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे
ए आई मला पावसात जाऊ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे…
रसग्रहण:
हे बालगीत सुप्रसिद्ध कवियत्री कै. वंदना विटणकर यांचे आहे. वंदना विटणकर यांनी प्रेम गीते, भक्ती गीते, कोळी गीते, बालगीते लिहिली. जवळजवळ ७०० गाणी त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या बालकथा, बालनाट्ये आणि बालगीते खूप गाजली आहेत. त्यापैकीच “ए ! आई मला पावसात जाऊ दे..” हे आठवणीतले बालगीत.
या बालगीतात ध्रुव पद आणि नंतर तीन तीन ओळीचे चरण आहेत. प्रत्येक चरणात, पहिल्या दोन ओळीत यमक साधलेले आहे. जसे की करिती— खुणाविती, नाचतो —मारतो, राहुनी— पाणी. आणि प्रत्येक चरणातील शेवटच्या ओळीतील, शेवटचा शब्द ध्रुवपदातल्या दुसऱ्या ओळीच्या शेवटच्या शब्दाशी यमक साधते,.
मला चिंब चिंब होऊ दे— या ध्रुवपदातल्या दुसऱ्या ओळीशी, खूप खूप नाचू दे, पाठलाग करू दे ,वाटेल ते होऊ दे, या प्रत्येक चरणातल्या शेवटच्या पंक्ती छान यमक जुळवतात. त्यामुळे या गीताला एक सहज लय आणि ठेका मिळतो.
हे संपूर्ण गीत वाचताना, ऐकताना आईपाशी हट्ट करणारा एक अवखळ लहान मुलगा दिसतो. आणि त्याचा हट्ट डावलणारी त्याची आई सुद्धा अदृष्यपणे नजरेसमोर येते. पावसात भिजायला उत्सुक झालेला हा मुलगा त्याच्या बाल शब्दात पावसाचे किती सुंदर वर्णन करतोय! मेघ गडगडत आहेत, विजा चमकत आहेत, आणि त्यांच्या संगे खेळण्यासाठी मला अंगणात बोलवत आहेत. या लहान मुलाला पावसात खेळण्याची जी उत्सुकता लागलेली आहे ती त्याच्या भावनांसकट या शब्दांतून अक्षरशः दृश्यमान झाली आहे.
साचलेल्या पाण्यात बदके पोहतात, बेडूक डराव डराव करतात ,त्या पाण्यामधून त्यांचा पाठलाग या बालकाला करायचा आहे.हा त्याचा बाल्यानंद आहे. आणि तो त्याने का उपभोगू नये याचे काही कारणच नाही. या साऱ्या बालभावनांची आतुरता, उतावीळ वंदनाताईंच्या या सहज, साध्या शब्दातून निखळपणे सजीव झाली आहे. स्वभावोक्ती अलंकाराचा या गीतात छान अनुभव येतो.
“पावसाच्या धारात मी उभा राहीन, पायांनी पाणी उडवेन, ताप, खोकला, शिंका, सर्दी काहीही होऊ दे पण आई मला पावसात जाऊ दे…”.हा बालहट्ट अगदी लडीवाळपणे या गीतातून समोर येतो.यातला खेळकरपणा,आई परवानगी देईल की नाही याची शंका,शंकेतून डोकावणारा रुसवा सारे काही आपण शब्दांमधून पाहतो.अनुभवतो.आठवणीतही हरवतो या गीतात सुंदर बालसुलभ भावरंग आहेत.
खरोखरच ही कविता, हे गीत वाचणाऱ्याला, ऐकणाऱ्याला आपले वयच विसरायला लावते. आपण आपल्या बालपणात जातो. या काव्यपटावरचा हा पाऊस, ढग, विजा, बदके, बेडूक, तो मुलगा सारे एक दृश्य रूप घेऊनच आपल्यासमोर अवतरतात. एकअवखळ बाल्य घेउन येणारे,आनंददायी रसातले हे रसाळ गीत आहे.
वंदना विटणकर यांचे शब्द आणि मीना खडीकर यांचा सूर यांनी बालसाहित्याला दिलेली ही अनमोल देणगीच आहे. सदैव आठवणीत राहणारी सदाबहार.
☆ ..आणि पदार्थ वाफाळू लागला भाग -2… शेफ शंकर विष्णू मनोहर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
( मग मी काय केलं त्या लिंबाच्या अर्ध्या भागावर पाणी घातलं आणि पिळल्याची अॅक्टिंग केली.. वेळ साधली गेली.) इथून पुढे —
रेसिपीज् हाताळणं हा माझा डाव्या हातचा मळ. त्यामुळे त्यातले काहीही प्रश्न समोर आले तरी मी लीलया सोडवतो. पण माणसाला कसं हाताळायचं आणि त्यातूनही ते जर सेलेब्रिटी असतील तर झालंच! या लढाईला तोंड देताना मात्र खरंच माझ्या तोंडचं पाणी पळालेलं असतं! कित्येक सेलेब्रिटींना अक्षरश: चमच्यानंसुद्धा ढवळता येत नाही. त्यांच्याकडून कॅमेऱ्यासमोर पदार्थ करून घेणं मुश्कीलच नाही कित्येकदा अशक्य असतं! त्यांना साहित्यातला मसाला कुठला आणि धणे-जिरे पावडर कोणती हेही समजत नाही. अशा वेळी मी तुम्हाला मदत करतो, असं म्हणत मलाच कॅमेऱ्यासमोर सगळं साहित्य सांगावं लागतं, पदार्थात घालावं लागतं. हे कमी काय म्हणून काही वेळा या सेलेब्रिटींना लगेच जायचं असतं. आता पदार्थ शिजून होईपर्यंत तर वाट बघायलाच हवी ना! कॅमेरा बंद केला की लगेच त्यांचं मोबाइलवर बोलणं, घडय़ाळ्यात बघणं सुरू होतं. मग एकदा आम्ही शक्कल लढवली चक्क बंद कॅमेरा त्यांच्यापुढे उभा करून शूटिंग सुरू असल्याचा आभास निर्माण केला म्हणजे त्यांना घडय़ाळ्यात बघायला फुरसतच मिळाली नाही किंवा मग शो सुरू असताना ते भान सुटल्यासारखे नुसतेच बोलत राहतात, तेही कोणत्याही विषयावर. अशा वेळी त्यांना परत मुख्य विषयाकडे वळवून गप्पा सुरू करायच्या हेही कसबच असतं!
एकदा तर एका हास्य अभिनेत्याने कमालच केली होती. तो येणार म्हणून सेटवरचं वातावरण एकदम उत्साही होतं. पण तो आलाच मुळी मरगळलेल्या चेहऱ्यानं. त्याला बघून क्षणभर मीच गोंधळलो की, आपण ज्याची वाट बघत होतो तो हाच का नक्की? पण विचार केला, दमला असेल म्हणून त्याला चहा दिला, जरा निवांत बसू दिलं आणि मग मेकअपला सुरवात केली. पण त्याची कळी खुलेना. शेवटी तसंच शूटिंग सुरू केलं. पदार्थ मीच दाखवला. तो चांगला झाला पण वातावरण जसं रंगायला पाहिजे ना तसं रंगलंच नाही. का तर म्हणे त्याला टेन्शन आलं होतं! अशा वेळी त्याला सतत बोलतं ठेवून, एकीकडे रेसिपी सांभाळून, सगळं कसं छान आहे, असंच शूटिंगच्या वेळी चेहऱ्यावर दाखवणारा शेफ एक उत्तम अभिनेताही असतो हे मान्य कराल ना!
कधी-कधी मात्र खरंच परीक्षा असते. सगळं शूटिंग संपल्यावर लक्षात येतं की एक पदार्थ कमी झाला आहे! आता? अजून एक पदार्थ तर दाखवायलाच हवा. शूटिंग संपलं म्हणून बॅक किचन आवरलं जातं. त्यामुळे हाताशी ना रसद असते ना कोणी मदतनीस. असंच एकदा दिवाळी रेसिपी शूटिंगच्या वेळी घडलं होतं. पॅकअप झाल्यावर कळलं की एक पदार्थ कमी पडतो आहे. बॅक किचन बंद झालं होतं. सेटवर तेल, मसाला, कणिक, मीठ वगरे दोन/चार आधीच्या रेसिपीमधले पदार्थ होते तितकेच. रात्रही इतकी झाली होती की दुकानं उघडी असण्याची शक्यताही नव्हती. इतकं टेन्शन आलं की विचारू नका. त्याच टेन्शनमध्ये कणिक आणि रवा भिजवला तो चांगलाच घट्ट झाला. आता पुढे काय करायचं या विचारानं हाताशीच असलेल्या किसणीवर तो गोळा किसू लागलो. बघितलं तर त्याचा चुरमुऱ्याच्या आकाराचा मस्त कीस पडत होता. गंमत तर पुढेच आहे.. तो कीस छान तळला गेला, तरतरून फुलला. मग मलाही हुरूप आला. सेटवर जितके मसाल्याचे पदार्थ होते ते सगळे एकत्र केले आणि त्या तळलेल्या चिवडय़ावर टाकले. तो माझा रव्याचा चिवडा इतका फेमस झाला की एका नामांकित कंपनीने तो माझ्याकडून विकत घेऊन बाजारात देखील आणला!
शूटिंगप्रमाणेच माझा कॅटिरगचा व्यवसाय होता तेव्हा किंवा मी फूड फेस्टिव्हल किंवा लाइव्ह शोज् करतो तेव्हाही, काही वेळा अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं की वाटतं इथे आपलं सगळं कसब पणाला लागलंय. जर यातून नाही तरलो तर कायमची नामुष्की. अशाच एका भीषण परिस्थितीला तोंड द्यावं लागलं होतं ते महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या खाद्य महोत्सवाच्या वेळी. मी पाच फूट बाय पाच फूटचा पराठा केला होता हे त्यांना समजल्यावर त्यांनी अशीच मोठय़ा आकाराची पुरणपोळी करा, असं फर्मान काढलं. पण पराठा करणं वेगळं आणि पुरणपोळी करणं वेगळं. पुरणपोळी तव्यावर पडली की पुरण पातळ होऊ लागतं आणि ती उलटणं जड होतं. शिवाय पराठा पुरणपोळीच्या तुलनेत हलकाही असतो. तरीही मी पोळी केली. तव्यावरही टाकली. पण आता ती उलटायची कशी? तवा तर एकदम तापलेला होता तसंच आजूबाजूचं वातावरणंही उत्साहानं तापलेलं होतं, राज ठाकरेंसह सगळे टक लावून बघत होते. पोळी उलटता नाही आली आणि जळली तरी नामुष्की आणि उलटताना पडून तुटली तरी नामुष्की. पोटात गोळा येणं..घशाला कोरड पडणं..जे जे काही म्हणून होतं ते सगळं माझं झालं होतं. तरीही चेहऱ्यावर काही दिसू द्यायचं नव्हतं. पण इथे माझी, माझ्या आई-वडिलांची पुण्याईच कामी आली आणि पोळी न जळता, न तुटता उलटली जाऊन मस्त खमंग पुरणपोळीचा रेकॉर्ड मला पूर्ण करता आला! ही खरी दृष्टिआड सृष्टी!
खरं तर यापुढे काही सांगण्यासारखं नाहीच पण पुरणपोळीच्या गंभीर किश्शानंतर एक गमतीदार किस्सा सांगतो. आम्ही केटरिंगची काम घ्यायचो तेव्हा एका लग्नाच्या वेळी जेवणखाण सगळं उरकलं. भांडी, उरलेला शिधा वगरे सगळं टेम्पोमध्ये लोड झालं आणि टेम्पो गेला सुद्धा. फक्त आमच्या चहासाठी एक स्टोव्ह दोन भांडी, थोडं दूध, चहा पावडर, थोडीशी साखर इतकंच सामान मागे होतं. इतक्यात वधूमाय धावत आली, काय तर म्हणे वरमायेला चहा हवाय. झालं लेकीच्या सासूचं मागणं म्हणजे पूर्ण करायलाच हवं! आम्ही चहा करून दिला. तो कप घेऊन त्या बाई तशाच परत माघारी. का तर म्हणे त्यांना चहा अगोड लागतोय, आणखी साखर हवी. गंमत म्हणजे साखर सगळी संपलेली. मग मी तो कप हातात घेतला. त्यात एक चमचा घातला. तो कप घेऊन वरमायेकडे गेलो आणि म्हणालो, ‘बघा चव, साखर पुरेशी आहे का?’ आणि त्या बाईंनाही चक्क साखर पुरेशी वाटली!
या अशा अनुभवांनी मला खूप शिकवलंय. मात्र यापुढे माझा शो बघताना प्रत्येक वेळी मी मीठच टाकतोय ना किंवा साखरच घालतोय ना, असे प्रश्न मनात येऊ देऊ नका! आणि घरी असले प्रयोगही करू नका! हे असं ‘चिटिंग’ प्रत्येक वेळी नाही करावं लागत आणि कुणाला खायला द्यायच्या पदार्थात तर ते करणं कुठल्याच शेफला कधीच शक्य नाही ! तेव्हा एन्जॉय खाद्यायात्रा !
– समाप्त –
लेखक : शेफ विष्णू मनोहर
संग्रहिका : मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈