मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सगळंच वाईट नाही, पण — सुश्री विद्या बाळ ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे   

? मनमंजुषेतून ?

☆ सगळंच वाईट नाही, पण — सुश्री विद्या बाळ ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

संक्रांतीनिमित्त पुढचे काही दिवस महाराष्ट्रात सगळीकडे हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरे केले जातीत. पण हळदीकुंकू समारंभाच्या या दुसऱ्या बाजूचा विचार कधी केलाय का? ‘हळदीकुंकू हे स्त्रियांमध्ये जातीपाती आणि भेदाभेद निर्माण करणारं पुरुषप्रधान व्यवस्थेने चालवलेलं एक षडयंत्र आहे, असं मला वाटतं. काळानुरूप विचारही बदलला पाहिजे’, हे सांगत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ — 

माझा हळदीकुंकू या संकल्पनेला विरोध आहे. विचार करायला लागल्यानंतर मी हळदीकुंकू बंद केलं. अनेकदा विचारलं जातं की, ही परंपरा स्त्रिया का चालू ठेवतात?

पुरुषांच्या व्यवस्थेने जे जे सांगितलं ते ते सर्व माझ्यासकट सगळ्यांनी पूर्वीपासून स्वीकारलेलं आहे. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर हळदीकुंकू हा पुरुषांसाठीच स्त्रियांनी केलेला पारंपरिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी पुरुष आहेत. हे म्हणजे चोराच्या हाती जामदारखानाच्या किल्ल्या देण्यासारखा प्रकार आहे. हळदीकुंकू करायचं स्त्रियांनी आणि समाजातलं स्थान बळकट होणार ते पुरुषांचं.

हळदीकुंकवाच्या सणात फक्त सौभाग्यवतीला मान असतो. काही भारतीय संस्कारांमध्ये किंवा कर्मकांडांमध्ये स्त्री ही सौभाग्यवती आणि अपत्यवती असणं आवश्यक असतं. त्यातही मुलगा असेल तर ती तिथे सर्वांत श्रेष्ठ असते.

स्त्री सौभाग्यवती आणि अपत्यवती असण्याचे जे काही रूढ निकष आहेत त्यात तिचं ‘अस्तित्व’ महत्त्वाचं नाही. तिचं अस्तित्व दुसऱ्याच्या स्वाधीन आहे. तिला नवरा असला पाहिजे, तो जिवंत असला पाहिजे आणि त्याच्यापासून मूल असलं पाहिजे. हे हळदीकुंकू परंपरेचे निकष आहेत.

नवऱ्याशिवाय ओळख का नाही?

हळदीकुंकवात कोण सौभाग्यवती, कोण विधवा, कोण परित्यक्ता, कोण ‘टाकलेली’, कोण अविवाहित असे जे भेद केले जातात त्याला माझा विरोध आहे. त्यातही अविवाहितांमध्ये दोन प्रकारच्या स्त्रिया मोडतात. ज्यांना स्वखुशीने लग्न करायचं नाही अशा आणि ज्यांना लग्न करायचं आहे पण अजून झालं नाही अशा. या सर्वांना हळदीकुंकू परंपरा नाकारते.

ज्या स्त्रियांच्या आयुष्यात ‘नवरा’ नावाचा पुरुष नाही त्यांची काहीच ओळख नाही का? हळदीकुंकू या परंपरेच्या व्याख्येत तिची स्वतंत्र ओळख नाही. नवऱ्याच्या ओळखीवरून आणि नवरा असल्यानेच ती ओळखली जाणार, हे अयोग्य आहे. स्त्रियांना न्याय देणारं नाही.

अनेकदा स्त्रियांची ओळख करून देताना अमूक अमूक यांच्या सौभाग्यवती किंवा श्रीमती अशी ओळख करून देतात. याविषयी मी अनेकदा व्यासपीठावर बोलले आहे. एखाद्या स्त्रिला व्यासपीठावर बोलावताना तिचं म्हणणं ऐकायचं म्हणून बोलवता मग ती सौभाग्यवती, श्रीमती किंवा कुमारी असली तर काय फरक पडतो? तुम्ही माझ्यासोबतच्या पुरुषांना विचारता का? तुम्ही विवाहित आहात का, मुलं आहेत का? हे प्रश्न पुरुषांना विचारले जात नसतील तर स्त्रीला का विचारावेत?

बाईची ओळख नवऱ्याच्या ओळखीपलीकडेही असावी.

मी पूर्वी हळदीकुंकवाला जात असे. वयाच्या साधारण पस्तीशीपर्यंत मी व्रतवैकल्यं, पूजा, मंगळागौर या सगळ्या रूढी परंपरा पाळल्या आहेत. मध्यमवर्गीय पारंपरिक चौकटीत जगत असताना मीही त्यात चक्क रमले आणि डुंबले होते. पण मी जसजशी विचार करायला लागले, तसं त्यातली व्यर्थता आणि निरर्थकता माझ्या लक्षात आली. आणि मी हळदीकुंकू करायचं बंद केलं.

बदलाचं पाऊल

मी तसा विचार करणारा ‘माणूस’ कधीच नव्हते. म्हणूनच जरा उशीर झाला. बाहेरच्या जगाची ओळख झाली. वाचायला लागले. मित्रमैत्रिणींशी संवाद व्हायला लागला. आणि मग प्रश्न पडायला लागले. आपण काय करतोय याचं भानही आलं. असा विचार जेव्हा मनात येतो तेव्हाच आपण बदलाचं एक पाऊल पुढे टाकतो.

मला एक हळदीकुंकू पक्क आठवतंय. पन्नास वर्षं झाली असतील. तेव्हा माझी मुलगी लहान होती. मुलीच्या शाळेतल्या मैत्रिणींच्या आईची ओळख होण्यासाठी मी त्यांना घरी बोलावलं होतं. पण रूढार्थाने ते हळदीकुंकू नव्हतं. तर तिळगुळ समारंभ होता.

हळदीकुंकवाऐवजी तिळगुळ समारंभ

तरीही मला वाटतं हळदीकुंकवाऐवजी तीळगूळ समारंभाचा उत्सव झाला पाहिजे. पण त्यातलं कर्मकांड बाजूला काढू या. स्त्रियांच्या मनात रूढ झालेली कर्मकांडाची प्रथा म्हणून असलेलं त्याचं स्वरूप बदललं पाहिजे.

मकरसंक्रांतीचं जसं हळदीकुंकू असतं तसं चैत्रगौरी, वटसावित्री, मंगळागौरीच्या निमित्ताने स्त्रिया एकत्र येतात. किती छान संधी आहे ही. मला असं वाटतं की, सणाच्या निमित्ताने स्त्रियांशी संवाद साधला पाहिजे.

सगळंच वाईट नाही, पण…

आपल्या संस्कृतीतलं सगळंच वाईट आहे, असं मला म्हणायचं नाही. ऋतूबदलाप्रमाणे सण योजणं ही निसर्गाच्या अधिक जवळ जाणारी आणि कल्पक अशी गोष्ट आपल्या संस्कृतीत आहे. त्यामुळे सणाला, परंपरांना नावं ठेऊन चालत नाही तर त्यातील पर्याय शोधावे लागतात.

ज्येष्ठागौरीचं नवं रूप – वसंतोत्सव

गेली दहा बारा वर्षं मी वसंतोत्सवाचं बोलावणं करते. माझ्या काही मित्र-मैत्रिणींसाठी अगदी छोट्या स्वरूपात एक समारंभ करते. जेष्ठागौरीला दिलेलं हे वेगळं रूप आहे. या मोसमात कैऱ्या आलेल्या असतात. त्यामुळे पन्हं देता येतं. आंब्याची डाळ करते. फळं, फुलं सोबतीला असतात. बदलत्या ऋतूचा आस्वाद घेत वसंतोत्सवाच्या निमित्ताने गप्पाही रंगतात. मग हळदीकुंकवाचा प्रश्नच राहात नाही.

जुन्या धाग्याला नवं रूप

अशा प्रकारे लोकांना भेटण्याचं माध्यम तयार केलं, तर आपण संस्कृतीचा धागाही पुढे नेतो आणि सण अधिक व्यापक स्वरूपात करतो. लोकामंध्ये बदल करण्याच्या दृष्टीने सर्वांत आवश्यक गोष्ट असते ती- संस्कृतीतला जुना धागा घ्यायचा आणि त्याला नवं रूप द्यायचं. याच दृष्टीने हळदीकुंकवाकडे बघावं, असं मला वाटतं आणि या निमित्ताने स्त्रियांशी बोललं जावं.

लग्न झाल्यावर मुली हल्ली नावं बदलत नाहीत, हे स्वागतार्ह आहे. पण हळदीकुंकू का करायचं, हे त्या स्वतःला विचारत नाहीत. टिकल्या आणि कुंकवाला माझा विरोध नाही. त्यामागे विचार दिसत नाहीत.

आधुनिक विचार फार कमी लोकांच्या मनात रुजतो. मला माहीत आहे की, विचार करणारी माणसं कमी असतात आणि बहुसंख्य समाजाचा चालत आलेल्या परंपरा पुढे चालू ठेवण्याकडेच कल असतो. कारण त्यात त्यांना सुरक्षितता वाटत असते.

जुन्या मूल्यांचा देखावा

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हळदीकुंकवासारख्या सणाच्या निमित्ताने अधिक जाणवतो. जागतिकीकरणानंतर लोकांची मानसिक अवस्था आणि मूल्यव्यवस्था बदलून गेली आहे. सगळीकडे बाह्य आवरणामधली अस्थिरता आहे. त्यामुळे जुनी जी मूल्य होती ती देखाव्याच्या स्वरूपात जाणवतात.

उदाहरणार्थ, लग्न एकदाच करतो असं म्हणत आई-वडील, मुलं- मुली वारेमाप खर्चाचा आग्रह धरतात. 25 हजारांची शेरवानी, पैठणी खरेदी करतात. भपकेबाजपणाचं त्यांना आकर्षण वाटत असतं. थोडक्यात काय तर गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या मूल्यसंस्कृतीला धक्का बसलाय. संस्कृतीचा जो गाभा होता त्याला स्पर्शही करायचा नाही, पण वरवर दिसेल अशी संस्कृती जपायची, देखावा करायचा. हा विरोधाभास आहे.

हळदीकुकवाचं राजकारण

त्यात राजकीय प्रचारासाठी स्त्रियांचा वापर होणं, यात नवल नाही. हळदीकुंकवाचे कार्यक्रम आज राजकीय अजेंडा राबवताना दिसतात. या राजकीय पुढाऱ्यांना फुले-आंबेडकरांचा समतेचा विचार पचणारा नाही.

मंदिरप्रवेशावर गेल्या वर्षी चर्चा होत असताना एक राजकीय महिला पुढारी म्हणाली, ‘महिलांना मंदिरात प्रवेश नसेल तर ती जुनी परंपरा आहे आणि ती पाळली गेली पाहिजे.’ तेव्हा मी जाहीरपण म्हटलं होतं- कित्येक वर्षं स्त्रियांना राजकारणात प्रवेश नाकारला गेला होता. पण तुम्ही परंपरा मोडलीच ना.

भेदाभेद नसणारा सण हवा

याचाच अर्थ असा की काही परंपरा लोकानुनयासाठी दाखवायच्या आणि काही सोयीने मोडायच्या. हा परंपरांच्या बाबतीतला विरोधाभासच आहे.

समतेचा विचार मानणाऱ्यांनी महिलांचा मेळावा घ्यावा. त्यात विधवांनाही सहभागी करून घ्यावं. हा विचार सोपा नाही. पंरपरेच्या विरोधातला आहे. मी अनेक मंडळांमध्ये भेदाभेद नको म्हणून आवाहन करते. पारंपरिक हळदीकुंकू नको पण मकरसंक्रांतीचा भेदाभेद नसणारा सण-समारंभ हवा.

लेखिका : सुश्री विद्या बाळ. 

(विद्या बाळ या ज्येष्ठ पत्रकार, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी बीबीसी  मराठीसाठी हा लेख लिहिला होता.) 

संग्राहिका : डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9767812692/9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लोकमान्य टिळक, चिमण्या आणि मंडाले तुरुंग… ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ लोकमान्य टिळक, चिमण्या आणि मंडाले तुरुंग… ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

लोकमान्य टिळकांची राजद्रोहाच्या दुसऱ्या शिक्षेत मंडाले तुरुंगात रवानगी झाली आणि काही महिन्यातच त्यांच्या सहृदयी स्वभावाचा अनुभव तुरुंगातील कैदी, तुरुंग अधिकारी आणि चक्क चिमण्यांनी सुद्धा घेतला.

लोकमान्य, त्यांना तुरुंगातून मिळणाऱ्या शिध्यातील धान्य, म्हणजे कधी डाळ तर कधी तांदूळ चिमण्यांना खायला घालत असत आणि किती तरी वेळ त्यांच्याकडे बघत असत. काही दिवसातच चिमण्यांना त्यांचा इतका लळा लागला की त्या थेट या सिंहाच्या अंगाखांद्यावर खेळत कलकलाट करू लागल्या !!!!  असे काही दिवस सुरू राहिल्यावर त्या धीट झाल्या आणि खोलीत येऊन पुस्तकांवर व टेबलावर बसू लागल्या. कधी लोकमान्य जेवत असताना त्यांच्या ताटाभोवती देखील त्या गोळा होत.  एकदा या चिमण्या टिळकांच्या खोलीत असताना तुरुंग अधीक्षक तेथे आला आणि हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाला. लोकमान्य त्याला म्हणाले – “ आम्ही त्यांना खात नाही, आम्ही त्यांना घाबरवत नाही. उलट त्यांना खायला धान्य देतो, त्यामुळे त्या आम्हाला घाबरत नाहीत. “ . तुरुंग अधीक्षकाला या प्रसंगाची मोठी गम्मत व आश्चर्य वाटले.

काही वर्ष हा क्रम सुरु होता, टिळकांची आणि चिमण्यांची आता गट्टी जमली होती.  लोकमान्यांसाठी, नियुक्त केलेला स्वयंपाकी  (वासुदेव रामराव कुलकर्णी ) सातारा जिल्ह्यातील – कलेढोण गावचा राहणारा होता. 

चिमण्यांच्या थव्याच्या मध्यभागी ध्यानस्थ बसलेले टिळक एखाद्या तपस्व्यासारखे वाटू लागले. सहा वर्षाची शिक्षा आता संपत आली होती, लोकमान्य टिळकांना आता घरचे वेध लागले होते. काहीशा परकेपणाने ते आपल्या कोठडीकडे पाहत होते. ठरलेली वेळ झाल्यावर चिमण्या किलबिलाट करू लागल्या. त्यांच्या खाण्याची वेळ झाली होती. टिळक उठले आणि ममतेने त्यांनी चिमण्यांना दाणे घातले आणि म्हणाले – 

— “ यापुढे इतक्या विश्वासाने इथे येऊ नका, कारण इथला नवा रहिवासी कदाचित तुम्हालाच गट्ट करून टाकणारा असेल. “ 

संग्राहक : श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवरसांपैकी एक शांत रस ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे

सौ.मंजुषा सुधीर आफळे

?  विविधा ?

☆ नवरसांपैकी एक शांत रस ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆ 

आपल्या मनातील भावभावना व्यक्त करणारे नवरस म्हणजे एक “अनमोल देणगी” रूपांत आपणास देवाने देऊ केलेला खजिनाच आहे. त्यातील कोणता रस कोठे आहे, व तो कसा जाणावा हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार, आवडीनुसार, जो तो आपले कर्म आनंद मिळवण्यासाठी करीत असतो. मनात ज्या प्रकारचे विचार निर्माण होतात, त्याप्रमाणेच भावभावनांमध्ये हे विविध रस दिसून येतात.”भूप रूप गंभीर शांत रस” हे भूप रागाची ओळख सांगणारे गीत शिकताना शांत रस याचा अर्थ बालवयात नीटसा कळलाच नव्हता. पण जसजसे आयुष्य पुढे पुढे सरकू लागले, तेव्हा  मिळणाऱ्या एकांतात शांत रस समजू लागला. मला वाटते शांत रस व एकांत यांचे एकमेकांशी एक घट्ट नाते आहे. एकांतात नेहमीच तुम्ही हा शांत रसाचे अनुभूती घेऊ शकता. मग कुठेही मिळणारा एकांत असो, अगदी आनंदाच्या प्रसंगी व दुःखाच्या प्रसंगी दोन्ही वेळेत शांत रसाची भेट होतेच होते. विशेषतः निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही गेलात, तर कुठेही एकांतात मिळणारी शांत रसातील शक्ती तुम्हाला खूप काही देऊन जाते. अगदी जंगल भटकंती करत असाल, तर एखाद्या ठिकाणी थोडे शांत व स्तब्ध उभे रहा. जंगलातील ती निरव शांतता तुम्हाला विश्वरूप दर्शनासाठी नक्की सहाय्य करेल. नदीकिनारी शांत बसून नुसते पाण्यावर उठणारे तरंग पाहताना देखील, शांत रस अनुभवता येईल. किंवा एखाद्या डोंगर माथ्यावर थोडा विसावा घेताना, एकांतात शांत रसाचे अनुभूती आल्या वाचून राहणार नाही. देवाच्या गाभाऱ्यात समईतील ज्योत शांत रसाची जाणीव करून देते. उत्कट प्रेमळ क्षणांत ही, शांत रस अनुभवता येतो. मनातील व्याकुळता, विरह, दुःख हे सुद्धा कित्येकदा शांत रसामुळे निभावता येते. तन्मयतेने चैतन्य अनुभवता येते. तेथेही शांत रस उपयोगी ठरतो. शांत रसामुळे एकरूपता साधता येते. अहंकार गळून पडतो. व पुढे जाण्याचा मार्ग सुकर होतो. निर्मळता आवडू लागते. शांत रसात सर्व संकटे, दुःख, नष्ट करण्याची ताकद मिळवता येते. परमेश्वराशी अनुसंधान साधता येते. म्हणूनच ध्यान धारणेचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. ती अंगिकारता आली तर, आपली सद्सत विवेक बुद्धी नेहमीच जागृत राहते. आणि नकळत होणाऱ्या चुका टाळता येणं शक्य होते. म्हणूनच हे जीवन समृद्ध होताना, शांत रसाची अनुभूती घेणे गरजेचे होईल.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

विश्रामबाग, सांगली.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “घड्याळ …” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? मनमंजुषेतून ?

☆ “घड्याळ …” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

जेवतांना सहज घड्याळाकडे लक्ष गेले. आजपर्यंतच्या आयुष्यात घड्याळ किती वेळा पाहिले हे मोजताही येणार नाही. पण आज पाहिले आणि घड्याळयाच्या तीन काट्यात आणि परिवारात काहीतरी साम्य जाणवले.

घड्याळ्यात तास काटा, मिनिट काटा, आणि सेकंद काटा असतो, तसेच परिवारातील तास काटा म्हणजे वडील, मिनिट काटा म्हणजे आई, व सेकंद काटा मुलं असल्याचे जाणवले. या प्रत्येक काट्याला फिरण्याची आपली गती आहे, प्रत्येकाची गती वेगळी आहे, पण दिशा मात्र एकच आहे. पण प्रत्येकाच्या गतीचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याशिवाय सेकंद, मिनिटे, आणि तास पूर्णत्वास येवू शकत नाही.

परिवारात वडील म्हणजे तास काटा, याची गती सगळ्यात कमी असली तरीही तो एका ठाम गतीने व उद्देशाने पुढील तासाच्या आकड्याकडे सरकत असतो. पण तास पूर्ण झाल्याशिवाय त्याची गती लक्षातच येत नाही. त्याच प्रमाणे वडिलांचे काम असते. ते एक एक ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ठामपणे आपला प्रवास करीत असतात. पण ते घरातल्या कोणालाच लक्षात नसते. ध्येय पुर्ण झाल्यावरच त्यांची गती लक्षात येते.

— वडिलांचे महत्व लक्षात येत नाही.

आई म्हणजे मिनिट काटा असते. प्रत्येक मिनिटाला (अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत) तिची गती जाणवत असते. ती सतत चालत, विचारमग्न, आणि कार्यमग्न असते. मिनिट काटा जसा घड्याळ्यात फिरतांना कधी तास काट्याच्या मागे असतो, थोड्या वेळाने थोडा काळ तो तासकाट्याबरोबर थांबतो, व नंतर परत तास काट्याला मागे टाकून त्याची ओढ सेकंद काट्याकडे असते. अगदी तसेच आईचे असते. सतत कामात असतांना नवऱ्याच्या मागे पडल्यावर ती पुढे येऊन नवऱ्याला गाठून काही काळ नवऱ्याच्या बरोबरीने काम करते व नंतर परत मुलांचे सगळे करायचे आहे या प्रेमापोटी मुलांच्या (सेकंद काट्याच्या) मागे जाऊन त्यांच्या बरोबरीने राहण्याचा प्रयत्न करते.

आणि सेकंद काटा म्हणजे लहान मुलं. ती कितीही मोठी झाली तरीही आईवडीलांच्या मागे पुढे कायम उत्साहाने तुरुतुरु पळतांना, खेळतांना, बागडतांना दिसतात. ती सतत तास काटा आणि मिनीट काटा (वडील, आई) यांच्या मधेच धडपडतांना दिसतात. त्यांचा पुढे पुढे सरकण्याचा वेगही वडील आणि आई यांच्या पेक्षा जास्त असतो.

जसे घड्याळाला तीन काटे व त्यांच्या एकाच दिशेच्या गतीशिवाय पूर्णत्व येत नाही, तसेच अगदी आपल्या कुटुंबाचे आहे. या तीन काट्याप्रमाणे आपल्या कुटुंबातील वडील, आई,आणि मुलं या़ची गती एकाच दिशेनं असल्याशिवाय घराला पूर्णत्व येत नाही.

पण हे लक्षात ठेवा की सेकंद, मिनिटे, तास,  यामुळे दिवस, आठवडे, महिने, वर्षे,  हे पूर्ण झाले तरी यासाठी काटे आपली चौकट (घड्याळाची तबकडी) सोडत नाहीत —- तशीच आपण आपल्या कुटुंबाची चौकट सांभाळायला पाहिजे…..  एक जरी काटा चुकला तरी वेळ चुकते, तसेच कुटुंबातील एक जरी सदस्य (काटा) चुकला तर कुटुंबाचे घड्याळ बिघडून गोंधळ उडेल. 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ – स्वा. सावरकरांची दहशत ! — ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ – स्वा. सावरकरांची दहशत ! — ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित  

(— कोणाला व किती वाटायची —)

दिल्लीचे पालम विमानतळ ! 

विमानप्रवास फार दुर्लभ वाटावा असा तो काळ ! विमानतळावर एक केंद्र सरकारचा टपाल खात्याचा मोठा अधिकारी आपल्या विमानाची वाट बघत होता. भोपाळ येथील टपाल विभागाचा तो मुख्य अधिकारी होता. 

त्याच्या शेजारीच एक माणूस येऊन बसला. हे वयोवृद्ध गृहस्थ होते. हा माणूस फार फार मोठा होता. इंग्लंडमधून रँग्लर ही पदवी त्याने गणितात मिळवली होती. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे ते प्राचार्य होते, भारताचे ऑस्ट्रेलियामधील आयुक्त होते. स्त्रियांच्या शिक्षणासाठी ज्यांनी आयुष्य खर्चले त्या महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांचे भाऊ होते. त्यांची मुलगी ही कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात त्याकाळी काम करत होती.

ह्या माणसाने त्या अधिकाऱ्याला पाहिले आणि मराठीतून विचारले…

“तुम्ही श्री ***** ना ?”

त्या अधिकाऱ्याने सांगितले…”हो”.– ” पण मी आपणास ओळखले नाही !”

त्या प्राचार्यांनी सांगितले… ” तुम्ही जेव्हा ICS ची परीक्षा दिली तेव्हा मी तुमचा परीक्षक होतो इंग्लंडमध्ये “

क्षणार्धात ओळख पटली.

प्राचार्यांनी विचारले…  *”ICS च्या लेखी परीक्षेत तुम्ही पहिले आला होतात, दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी आणि तुम्ही ह्यात दीडशे गुणांचा फरक होता. आणि तरीही इंग्रज सरकारने तुम्हाला अनुत्तीर्ण घोषित केले होते. बरोबर ?”*

ते अधिकारी उत्तरले “हो.”

“कारण माहीत आहे?”, प्राचार्यांनी विचारले.

“नाही” .. ते अधिकारी उत्तरले.

“जाणून घ्यायचंय ?” .. प्राचार्य.

“हो”, .. अधिकारी.

“सांगतो…”, प्राचार्य.

त्या प्राचार्यांनी दिलेले उत्तर पुढीलप्रमाणे —–

ह्या अधिकाऱ्याने ICS चा अर्ज भरतांना आपल्या गावाचे नाव दिले होते “रत्नागिरी” ! रत्नागिरी हे नाव वाचताच ब्रिटिशांनी आपल्या भारतातल्या गुप्तचर खात्याला तपासणी करण्याचा आदेश दिला .

त्या तपासात असे आढळून आले की हा अधिकारी माणूस, शाळकरी असतांना, वीर सावरकरांच्या सम्पर्कात आला होता. सावरकर तेव्हा दररोज संध्याकाळी आजूबाजूच्या मुलांना गोष्टी सांगत असत. तेव्हा हा मुलगा त्या गोष्टी ऐकण्यासाठी सावरकरांच्या घरी जात असे.—-  “आणि म्हणून लेखी परीक्षेत अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही आम्ही तुम्हाला नागरी सेवा परीक्षेसाठी अनुत्तीर्ण घोषित करून तुम्हाला भारतीय टपाल सेवेत प्रवेश दिला…. ह्या परीक्षेत मी तुमचा एक परीक्षक असल्याने मला सर्व माहीत आहे.”

—सावरकरांशी कोणत्याही प्रकारे संबंध आलेला माणूस ब्रिटिशांना आपल्या नागरी सेवेत नको होता.

जी सावरकरांची परीक्षा ब्रिटिश सरकार करू शकले, ती भारतीय सरकार मात्र कधीच करू शकले नाहीत.

— हे प्राचार्य होते रँग्लर रघुनाथराव परांजपे …

— आणि हा विद्यार्थी होता श्रीराम भि.वेलणकर ! संस्कृत भाषेचे तज्ञ ! —- *आपली, भारताची पोस्टाची पिनकोड पद्धती ज्यांनी शोधून काढली ते….*

संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पुरुषांचं आयुष्य सुखी असण्याची ७ कारणं… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ पुरुषांचं आयुष्य सुखी असण्याची ७ कारणं… 😎☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

१. त्यांचं आडनाव आयुष्यभर एकच असतं.

२. त्याचं फोनवरचं संभाषण ३० सेकंदात संपतं.

३. ५/६ दिवसांच्या सहलीसाठी त्यांना एक जीन्स पुरेशी असते.

४. कोणी त्यांना आमंत्रण द्यायला विसरलं तरीही त्यांची मैत्री टिकून राहते.

५. आयुष्यभरासाठी त्यांची एकच hair style टिकून राहते.

६. २५ नातेवाईकांसाठी खरेदी करायची असेल तर त्यांना २५ मिनिटे पुरतात.

७. एखाद्या पार्टीला गेल्यावर दुसऱ्या माणसाने same शर्ट घातलेला बघून त्यांना मत्सर वाटत नाही. उलट ते त्या पार्टीत चांगले मित्र बनून जास्त एन्जॉय करतात.

थोडक्यात काय तर  ……

पुरुष हे बटाटयाप्रमाणे असतात — कोणत्याही भाजीबरोबर एडजेस्ट होतात. 

बटाटे कुठले !!!!!!

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पिंपळ एकटा उभा… ☆ श्री सुनील यावलीकर ☆

? विविधा ?

☆ पिंपळ एकटा उभा… ☆ श्री सुनील यावलीकर 

पिंपळ एकटा उभा

आप्पाजी गेले तेव्हा मी आठ नऊ वर्षांचा असेल ..त्यांच्या जाण्याच्या स्मृती अजूनही कायम आहेत. त्यांनी मातीच्या मोठ्या भांड्यात लावलेला पिंपळ त्यांच्याशिवाय पोरका उभा होता. दर दिवशी मध्यान्ही ते त्याची तांब्याच्या छोट्या गडूतून बुडाशी पाणी ओतून पूजा करायचे.आप्पाजी गेल्यानंतर त्याला पोरकेपणाचे चटके बसायला लागले. त्याचा पुरुष भरा पेक्षाही उंच असलेला देह मलूलपणे उभा होता. मातीच्या भांड्यातील माती सुकत चालली होती. शेवटी वडिलांनी त्याला घराबाहेर लावायचे ठरवले. घराच्या मागच्या भागात असलेल्या मारुतीच्या देवळा समोर लावावे असे मी सुचवले. देवळाच्या बाजूला विहीर होती विहिरीच्या खालच्या बाजूला थोड्या अंतरावर दोन तीन हात खोल खड्डा खणला. मातीच्या भांड्यासह पिंपळाचे झाड उचलून त्या खड्ड्याजवळ आणले. भोवतालचे मातीचे भांडे फोडताच मातीत एकजीव झालेली एकमेकांना घट्ट धरून गुंतून असणारी त्याची मुळे मोकळी झाली. त्याला तसेच त्या खड्ड्यात सोडले आणि स्थानांतर होऊन एका जागी तो स्थिर झाला .

खड्ड्यात अजून थोडी माती ढकलली. त्याच्या खोडाभोवती वर्तुळाकृती छोटी नाली खोदली. विहिरीवर बाया सकाळ-संध्याकाळ पाणी भरायच्या. विहिरी भोवती पाणी सांडायचे .

विहिरीच्या उतारावरून एक छोटी नाली काढून पिंपळाच्या आळाशी जोडली. विहिरीच्या काठावर सांडलं उबडलं पाणी नालीतून थेट पिंपळाच्या आळ्यात पोहोचायचं.  पिंपळाचे खोड हाताच्या मुठीत मावेल एवढे होते. त्याला गाय-बैल या कोणत्याही प्राण्याने अंग घासले तर मोडून जाईल या चिंतेनं त्याच्याभोवती बोराटीच्या काट्यांचे कुंपण केले. आता जोमाने वाढेल. आपल्यासोबत त्याची वाढही अनुभवता येईल…

 त्याची वाढ अनुभवताना आपल्या बालवयाची किती वर्षे उलटून गेली कळलंच नाही.

आता त्याचे खोड दोन्ही हातांच्या पंजात मावण्यापेक्षाही मोठे झाले होते .त्याने आपली जागा कोणत्याही संरक्षणाशिवाय पक्की केली होती. काट्यांच्या बाह्य कुंपणाची गरजच नव्हती .

या आठ वर्षात विहिरही खोल  गेली होती. आटत चालली होती .तिथे पाणी भरणाऱ्या बाया हातपंपा कडे वळल्या होत्या …त्याची मुळे खोलखोल गेली होती. आता त्याला बाहेरून मिळणाऱ्या पाण्याची गरज नव्हती. तो खऱ्या अर्थाने स्वावलंबी झाला होता. त्यामुळे मीही निश्चिंत झालो होतो. तो सर्वांगानं फुलत होता .त्याच्या या फुलत्या वयात आपलेही फुलते वय मिसळत होते. त्याच्या उमलत्या तांबूस कोवळ्या पानांची लव वात्सल्य जाणीव फुलवत होती. कालांतराने पाने पोपटी होत गडद हिरवी होऊन सळसळत होती .त्या सळसळण्यातून आपण कितीदा मावळणारा चंद्र अनुभवला,कितीदा सूर्यास्त  अनुभवला..त्याच्यापाठीमागे उमटलेले

 सूर्यास्ताची फिके केशरी रंग गडद होई पर्यंत त्याचे सळसळणे अनुभवलेले.. बाल रंगात रंगविलेल्या चित्रांच्या जीर्ण कागदी स्मृतींच्या रंगछटा अजूनही जपून ठेवल्या आहेत.. आपण त्याच्यासोबत एकांत घालवलेले कितीतरी क्षण अंतर्मनाच्या तळ कप्प्यात साठवून ठेवले आहेत…..

…शेती माती जगवण्यास असमर्थ ठरली.. त्यामुळे पोटापाण्यासाठी गाव सोडावे लागले ..

दररोजची त्याची भेट दोन तीन महिन्यांवर गेली. गावाला आलो की त्याला भेटल्याशिवाय आपली भेटच पूर्ण व्हायची नाही.  घरासमोरच बाभूळबन, वाहणारी  रायघोळ माय आणि आपला पिंपळ हेच खऱ्या अर्थाने आपलं जैव कुटुंब होतं बालपणात .त्यांची उराउरी भेट झाल्याशिवाय समाधान होत नव्हतं .त्यांच्या भेटीचा गंध उरात भरून पुढचे दोन-तीन महिने काढता यायचे .

पुढे पुढे बाभूळबन ,नदी यांच्या भेटीत त्रयस्थता जाणवायला लागली ..

त्यांच्या देहबोलीत एक प्रकारची उदासीनता दिसायला लागली ..

ते पहिल्यासारखं मन उघडे करून वागत नव्हते. घर ही आपले खांदे पाडून बसलं होतं. त्याला कितीही डागडुजी केली तरी पहिल्यासारखं खुलत नव्हतं. पिंपळाचे मात्र तसे नव्हते, तो नव्या झळाळीने सळाळत होता. त्याची सळसळती  भेट आपलं बालवय जागवून तीच सळसळ निर्माण करीत होती. आता त्याच्या खोडाने हाताच्या मिठी इतका आकार धारण केला होता. एका हाताच्या मुठीत मावणारा त्याचा आकार आणि आताचा ही त्याची वाढ स्तिमित करणारी होती .आपण त्याला घट्ट मिठी मारून कितीतरी वेळ बिलगलेलो.. त्याच्या खोडावर डोकं टेकवून त्याची सळसळ अनुभवलेली. पश्चिमेचे क्षितीज तेच आणि मावळणारा चंद्रही तोच .बाकी सर्व बदलत गेले. पिंपळ ,क्षितिज आणि चंद्र मात्र आपल्या अवस्थेत कायम असलेले .काहीही न बोलता त्याचा माझा संवाद सुरू व्हायचा …

……..गावावरून कोणी आलं की,आपली पिंपळाची चौकशी ठरलेली…

 नेहमीप्रमाणे भावाकडे पिंपळा बद्दल बोलायला लागलो.. तेव्हा तो काही वेळ स्तब्ध राहिला. तो काहीच बोलत नाही हे पाहून त्याला पुन्हा विचारलं, त्यांनं जे सांगितलं ते ऐकून खूपच हादरलो ..शक्तिपात झाल्यासारखं वाटायला लागलं. पिंपळा शेजारी राहणाऱ्याने पिंपळाला मुळापासून तोडले होते. बालपणापासूनचा माझा जीवसखा एका मूर्ख माणसाच्या क्रूर कुर्‍हाडीचे घाव झेलून उन्मळला होता …..

आता गावात कसे जावे.. असे किती दिवस सुन्न गेले आपले ..

मोठा धीर धरून आपण गावात गेलेलो… घरा मागचे दार उघडून  पिंपळाच्या जागेकडे पाहिले .बुडापाशी बुंध्याची  निर्जीव खूण शिल्लक फक्त.. दार बंद केले डोळे डबडबले ..

 

त्याने पिंपळावर नाही घाव घातला.. आपल्या बालपणावर घातला….

ही तीव्र भळभळती जाणीव ओघळायला लागली..

आता गावात काय उरले..

बाभुळबनाची अनोळखी तिसरी पिढी  म्हातारपण भोगत उभी आहे ,ती आपल्याला ओळखत नाही. वाहणार्‍या रायघोळ नदीमायचे  रूप स्मृतिभ्रंश झालेल्या म्हातारी सारखे झालेले आहे ..

भावकीत घर ही हरवलं . गावात आता आपल्यासाठी उरलंच काय ही जाणीव देह मनाला कुरतडत राहते.

 

© श्री सुनील यावलीकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पालवी… ☆ श्री संजय आवटे ☆

? मनमंजुषेतून ?

☆  पालवी… ☆ श्री संजय आवटे ☆

वसंताचा सांगावा घेऊन येणा-या चैत्राच्या पालवीचा धर्म कोणता? रणरणत्या वणव्यात बहरणा-या झाडांचा धर्म कोणता? ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ त्वेषाने फुलून येणा-या गुलमोहराचा धर्म कोणता?  

तरीही नववर्षाला धर्माशी जोडणारे जोडोत बापडे, आपला धर्म मात्र पालवीचा. आपला धर्म बहरण्याचा. आपला धर्म फुलून येण्याचा. हा धर्म ज्याला कळतो, त्यालाच झाडांची हिरवाई खुणावते, त्यालाच निळं आकाश समजतं. आणि, 

“चंद्रोदय नव्हता झाला, आकाश केशरी होते”, हा केशरी रंगही त्यालाच मोह घालतो ! 

परवा असंच तळेगावला जायचं होतं. ड्रायव्हर म्हणाला, ” सर, मामुर्डीचं जे चर्च आहे ना, तिथून पुढं गेलं की बुद्ध विहार आहे. तिथून सरळ पुढं जाऊ. तसे आलो, तर आयोजकांचा फोन आला- तळेगाव स्टेशनच्या जैन मंदिराकडं या. मग आपण पुढं जाऊ. आयोजक तिथं भेटले. गेलो, तर प्रत्यक्ष कार्यक्रम गणपती मंदिरात. तिथं शेजारीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा टुमदार बंगला. बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचा त्यांचा विचार इथंच अंतिम झाला, असं म्हणतात. अवघ्या दहा किलोमीटरच्या प्रवासात कुठं कुठं जाऊन आलो!  

हा भारत आहे. 

उद्यापासून रमजान सुरू होईल. 

पुण्याजवळच्या खेड शिवापूरला दर्गा आहे. हजरत कमर अली दुर्वेश रह दर्गा. रमजान आला की या गावातले सगळे कोंडे-देशमुख रोझे ठेवतात. एवढेच नाही, रमजानमध्ये, तिथल्या उरूसात देशमुखांचा मान असतो.

अशी कैक उदाहरणं देता येतील. 

भारताची ही गंमत आहे. 

हिंदुत्वाचं राजकारण करून थकलेल्या नेत्याला अखेर जावेद अख्तरांचा आदर्श जाहीरपणे सांगून नववर्ष साजरं करावं लागतं, ही खरी मजा आहे. जावेद यांनी पाकिस्तानात जाऊन बरंच सुनावलं, हे भारी आहेच. पण, भारतात राहून ते रोज काही सुनावत असतात. तेही ऐकावं लागेल मग ! कारण काहीही असो, पण हिंदू मतपेटीचं राजकारण करणा-यांना जावेद अख्तर सांगायला लागणं, असा ‘क्लायमॅक्स’ सलीम-जावेद जोडीला सुद्धा कधी सुचला नसता. 

पण, तीच भारताची पटकथा आहे ! 

साळुंब्र्याच्या प्राथमिक शाळेपर्यंत चालत चालत आलो. तर, पोरं ‘ खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ‘, ही साने गुरूजींची प्रार्थना म्हणत होती. 

वाटलं, हे वेगळं सांगण्याची गरजही भासू नये, इतकं भिनलेलं आहे ते आपल्या मनामनात. इतकं नैसर्गिक आहे हे. अर्थात, उगाच नाही उगवलेलं हे. त्यासाठी मशागत केलीय आमच्या देहूच्या तुकारामानं. आळंदीच्या ज्ञानेश्वरानं. कबीरानं. त्याहीपूर्वी बुद्धानं. म्हणून तो वारसा सांगत आज ही पोरं प्रेमाचा धर्म सांगू शकताहेत. 

या प्रेमाच्या धर्मावर आक्रमण करणारे मूठभर प्रत्येक काळात असतात. त्यांचा विजय झाला, असं काही काळ वाटतंही. पण, युद्ध संपतं. बुद्ध मात्र उरतो. मंबाजी संपतो, तुकोबा उरतो. शेणगोळे विरतात, सावित्री-ज्योतिबा उरतात. 

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। 

भेदाभेद-भ्रम अमंगळ॥ 

हाच धर्म अखेरीस जगज्जेता ठरतो. 

आपण चालत राहायला हवं, या पोपटी पालवीकडं पाहात. जोवर ही पालवी येते आहे, तोवर निसर्गानं आशा अद्याप सोडलेली नाही, हे नक्की आहे ! 

तुम्ही का सोडता? 

© श्री संजय आवटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सत्राणे उड्डाणे… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ सत्राणे उड्डाणे… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

समर्थ रामदासजींनी दासबोध, आत्माराम, मनोबोध इत्यादी ग्रंथ रचले आहेत, तसेच शेकडो ‘अभंग’ही लिहिलेले आहेत. यासोबतच समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या ९० पेक्षा अधिक आरत्या महाराष्ट्रातील घरा- घरात म्हटल्या जातात.

समर्थांचा गायनीकलेचा अभ्यास होता. ‘धन्य ते गायनी कला’ असे म्हणून समर्थांनी गायनीकलेचा गौरव केला आहे. त्यामुळे त्यांच्या रचनेत लयीचा गोडवा अनुभवता येतो. पारमार्थिक विचार असो, आत्मनिष्ठ, अभ्यासपूर्ण चिंतन असो, ते लयीत मांडण्याची खुबी रामदास स्वामींजवळ आहे. याचा प्रत्यय त्यांनी रचलेल्या आरत्यांतून घेता येतो. 

गणपती उत्सवात रामदासांनी रचलेल्या आरत्या म्हटल्या जातात. त्या आबालवृद्धांच्या तोंडी सहजपणे येतात. त्या आरत्यांची लोकप्रियताही वर्षानुवर्षे टिकून राहिली आहे. याला कारण म्हणजे त्या आरत्यांतील गेयता, चपखल शब्दरचना, लयबद्धता, शब्दांचे माधुर्य, आघात, भाषेतील ठसका..!

वीररसाने युक्त अश्या हनुमंताची ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी’ ही आरती समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे. ‘सनातन’चा भाव असलेल्या, म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केला असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे. 

आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत, हेही यातून कळेल. ही आरती ऐकण्याने अन् तशा पद्धतीने म्हणण्याने आपल्यातही जलद भावजागृती होण्यास साहाय्य होईल.

हनुमंताच्या ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी’ या आरतीतील शब्दरचना मारुतीची प्रचंड शक्ती, अद्भुत कार्य नजरेसमोर उभे करतात. त्यातील शब्द हृदयावर आघात करीत आपले बल वाढवतात. समर्थ भाषाप्रभू होते. गेयता, लय, उचित शब्दयोजना त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहतात.

हनुमंताचे कार्य जेवढे अफाट, तेवढेच त्याचे कार्य शब्दबद्ध करणारे समर्थ रामदास स्वामी यांचे शब्दही अफाट. म्हणूनच हनुमंताची आरती म्हणताना अनेकदा बोबडी वळते आणि नुसते जयदेव जयदेव म्हणत आरती पूर्ण केली जाते. परंतू , या आरतीतील अवघ्या दोन कडव्यांचा भावार्थ नीट समजून घेतला, तर ती पाठ होणे अवघड नाही.  

समर्थ रामदास रचित, म्हणायला अवघड परंतू आशयघन अशी हनुमंताची आरती आणि भावार्थ —- 

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।

कडाडिलें ब्रह्मांड धोका त्रिभुवनीं । सुरवर, नर, निशाचर, त्या झाल्या पळणी ।। १ ।।

(आरतीमधील कठीण शब्दांचा अर्थ समजून घेऊ या. ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं ।’ यामधील ‘सत्राणे’ म्हणजे आवेशाने.)

भावार्थ :-समर्थ रामदास वर्णन करतात- मारुती स्वत:च्या सामर्थ्यानिशी लोकांचे रक्षण करण्यासाठी झेप घेत असताना त्याच्या तोंडातून हुंकार बाहेर पडला. त्यामुळे संपूर्ण पृथ्वी दोलायमान झाली. सागराच्या पाण्यावर उत्तुंग लाटा उसळल्या आणि त्या आकाशापर्यंत पोचून तिथेही खळबळ माजली. संपूर्ण ब्रह्मांड थरथरू लागले आणि तीनही लोकांमध्ये भीती उत्पन्न झाली. पंचमहाभूतांमध्ये खळबळ उडाली. देव, मानव, राक्षस या सर्वांना पळता भुई थोडी झाली. ।।१।।

जयदेव जयदेव जय श्रीहनुमंता, 

तुमचेनि प्रसादे न भिये कृतांता।। धृ।।

(कठीण शब्दांचा अर्थ:- ‘तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता’ यामधील ‘कृतान्त’ याचा अर्थ मृत्यू.)

भावार्थ :- अशा भीमकाय हनुमंता तुझा जयजयकार असो. तुझी कृपा असली, की कोणीही यमाला सुद्धा घाबरणार नाही. ।।धृ।।

 दुमदुमिले पाताळ उठला पडशब्द । धगधगिला धरणीधर मानिला खेद ।

कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद । रामीं रामदासा शक्तीचा शोध ।। २ ।।

(कठीण शब्दांचा अर्थ –  ‘धगधगिला धरणीधर मानिला खेद’ याचा अर्थ हनुमानाचे सामर्थ्य पाहून शेषनागही मनात चरफडला आणि खेद पावला. ‘कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद ।’ या ओळीतील ‘उडुगण’ म्हणजे नक्षत्रलोक. ‘रामीं रामदासा शक्तीचा शोध ।’ याचा अर्थ रामाशी एकरूप झालेल्या, अशा मारुतीच्या ठिकाणी समर्थ रामदासस्वामींना शक्तीचा स्रोत सापडला.)

भावार्थ :– सप्त पाताळांमध्ये प्रचंड आवाज झाला. त्याचा प्रतिध्वनी इथे भूमीवर पोहोचला. त्याचा त्रास होऊन पर्वताचा सुद्धा थरकाप झाला. पर्वत कोलमडू लागले आणि सर्व प्राणीमात्रांवर मोठी आपत्ती आली. पक्ष्यांचा विनाशकाळ आला की काय अशी स्थिती उत्पन्न झाली. तुझ्याठायी असलेल्या अफाट शक्तीचे सर्व चराचराला आकलन झाले. परंतू, या शक्तीचा तू गैरवापर केला नाहीस हे महत्त्वाचे ! ती सर्व शक्ती रामचरणी अर्पण केलीस आणि रामकार्यार्थ वापरलीस, यातच तुझ्या भक्ती आणि शक्तीचा गौरव आहे. 

— ‘दुमदुमले पाताळ’ किंवा ‘थरथरला धरणीधर’, ‘कडकडिले पर्वत’ या शब्दांतून वीररसाचा आविर्भाव होतो. हा वीरमारुती होय.

— ‘अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो अन् भावजागृतीचा आनंद मिळो’, अशी श्रीरामचरणी प्रार्थना.

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एक वेगळं ज्ञान” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “एक वेगळं ज्ञान ” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

कामानिमित्त लोहाराकडे गेलो असता,

काम झालं, आणि त्याला सहज विचारलं की 

“बाबा, ऐरण व हातोडी ही तुमची साधने ! तर किती वर्ष झाली हातोडी व ऐरणीला?”

*

लोहार म्हणाला, “हातोड्या अनेक तुटल्या पण ऐरण कायम टिकून आहे”

मी विचारलं, “असं का ?”

त्यावर लोहाराने जे उत्तर दिले ते जणू मला जगण्याचा अर्थच सांगून गेले. 

लोहार म्हणाला—  

“जे घाव घालतात ते त्यांच्या कर्मामुळे तुटतात, पण जे घाव सहन करतात ते कायम अभंग राहतात !”

*

मनोमन त्याला राम राम करून निघालो — 

— एक वेगळं ज्ञान घेऊन !

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares