मराठी साहित्य – विविधा ☆ “जागतिक ग्राहक दिन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “जागतिक ग्राहक दिन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

(15 मार्च- निमित्ताने)

आपल्या रोजच्या जीवनात अनेक व्यवहारिक गोष्टींना सामोरे जावे लागते. तो व्यवहार बघतांना कधी आपला आर्थिक संबंध येतो तर कधीकधी परिचयातून व्यवहारात भावनिकता पण येते. कधी आपण ग्राहक असतो तर कधी विक्रेता. अर्थातच प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या व्यवहारात ग्राहकाची भुमिका निभावतेच.

आपल्याला आपल्या मुलभूत हक्काच्या गोष्टी आपसूकच मिळाल्या तर आपण नशीबवान ह्या सदरात मोडतो असं समजावं परंतु जर आपल्याला आपल्या हक्काच्या मुलभूत, जीवनावश्यक, अर्थातच नियमांना धरून जर पुरवठा झाला नाही तर प्रत्येकाने त्यासाठी लढायची,आपले हक्क मिळवायची तयारी ही ठेवलीच पाहिजे. कारण अन्याय करणाऱ्या इतकाच तो सहन करणाराही दोषी असतो हे विसरून चालणार नाही.

त्यामुळे आपल्याला आपल्याच हक्काच्या गोष्टी मिळतांना वा गरजेनुसार गोष्टी विकत घेतांना आपली कुठे फसगत तर होत नाही नां ह्याकडे अत्यंत डोळसपणे,जागरुकतेने प्रत्येकाने बघण्याचीच खरी गरज आहे म्हणून “जागो ग्राहक जागो” ह्या घोषवाक्याची आज 15 मार्च ह्या आंतरराष्ट्रीय ग्राहक दिनाच्या दिवशी हटकून आठवण ही येतेच.

15 मार्च हा दिवस “आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन”म्हणून ओळखल्या जातो.15 मार्च 1962 साली अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष केनेडी ह्यांनी ग्राहकांसाठीच्या हक्कांची सनद त्यांच्या भाषणात मांडली.ते हक्क पुढीलप्रमाणे आहेत.

1 सुरक्षेचा हक्क,2 माहिती मिळविण्याचा हक्क,3 निवड करण्याचा हक्क,4 मत मांडण्याचा हक्क,5 तक्रार आणि निवारण करण्याचा हक्क,6 ग्राहक हक्काच्या शिक्षणाचा हक्क.

दुर्दैवाने आपल्याकडील ग्राहकच अनभिज्ञ राहून ह्या विषयाची माहिती करून घेण्याच्या बाबतीत उदासीन असतो.कितीही जाहीरातीत “जागो ग्राहक जागो”हे घसा फोडून सांगितल्या गेले तरी शेवटी “पालथ्या घड्यावर पाणी”असो.

अनेकदा खरेदी करतांना किंवा सेवेच्या बाबतीत त्याचा वापर करतांना ग्राहकांचे अनेक गोष्टींकडे असलेले दुर्लक्ष, माहितीचा अभाव हे विक्रेत्यांच्या पथ्थ्यावर पडते.ग्राहक ह्या नात्यानं मिळालेल्या अधिकारांचा वापर आपण अतिशय जागरूकतेनं केला तर हे अधिकारच आपल्याला जागरूक ग्राहक म्हणून तयार करतील. सरकार कडूनही ग्राहकांच्या जनजागृती साठी वेळोवेळी आवश्यक ती माहिती पुरविली जाते.उदा.फसवणूक झाली तर तक्रार कोठे करावी, फसवणूक करणाऱ्या संबंधित व्यक्तीला आपण धडा कसा शिकवू शकतो,त्यानंतर नुकसानभरपाई कशी मिळवू शकतो ह्याची माहिती ग्राहक सेवेअंतर्गत आपल्याला मिळते.ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार ग्राहकांना वस्तू निवडणे, वस्तुचे गुणवत्ता प्रमाण आणि दर्जा तपासून घेण्याचा अधिकार आहे.ग्याहकांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच,ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण प्रणाली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्य करते.

ग्राहक आणि विक्रेते ह्यांच नातं खरतरं पोळपाट आणि लाटण्यासारखं असतं.दोन्हीही व्यवस्थित असल्यासच पोळी नीट लाटली जाणार बघा.

आमच्या बँकींग सेक्टर मध्ये तर “ग्राहक देवो भवः “हे वाक्य जणू आमचे ब्रीदवाक्य समजल्या जातं.सध्या तर बँकींग सेक्टर मधील वाढत्या स्पर्धेमुळे आणि कोरोनाने आलेल्या आर्थिक गंडांतरामुळे आम्हाला एक एक ग्राहक जोडून ठेवावा लागतो.सध्याच्या बँकींग सेक्टर वरील विश्वास नाहीसा होण्याच्या काळात आपल्या ग्राहकांचा विश्वास ढळू न देण्याचं आव्हानात्मक काम आम्हाला जिकरीनं करावं लागतं.

तर अशा ह्या ” जागतिक ग्राहक दिनी” ग्राहकांच्या हक्कांची,सुरक्षेची,अधिकारांची पायमल्ली  कधीच होऊ नये हीच मनोकामना.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रामदासांची पत्नी ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ रामदासांची पत्नी ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

समर्थ रामदासांना  आठवताना  त्यांच्याशी संबंधित अजून एका व्यक्तीला आठवणं ही क्रमप्राप्त ठरते, ती व्यक्ती म्हणजे त्यांची पत्नी ! होय मी समर्थांनी ज्या मुलीला लग्नमंडपात अर्धवट सोडलं होतं त्या मुलीला , त्यांची पत्नीच म्हणेन मी . आज तिला आठवणं हे संयुक्तिक ठरेल, कारण त्या स्त्रीने  समर्थांची आठवण आपल्या हृदयात शेवटपर्यंत जागृत ठेवली. त्या मुलीची बरीच लोक कीव  करतात. काही लोक तर समर्थांना हे शोभलं नाही असाही  समर्थांना उपदेश  करतात. आपल्या भारतीय लोकांना स्वत: पेक्षा इतरांच्या घरात काय चाललंय याचीच जास्त चिंता असते. एकाने आचार्य अत्रेंना हाच प्रश्न विचारला होता, “त्या मुलीचं पुढे काय झालं हो समर्थांनी लग्नमंडपात सोडलेल्या ?” – तेव्हा आचार्य अत्रेंनी मार्मिकपणे उत्तर दिलं, ” मला माहीत नाही, कारण मी त्यावेळी त्या लग्नाला हजर नव्हताे.” पण  पुढे जाऊन त्या मुलीचं काय झालं याचा शोध घेणे  हे खूपच कमी लोक करतात.  इतिहासाने काही व्यक्तींवर खूप अन्याय केला आहे, त्यातीलच रामदासस्वामींच्या पत्नी या एक होत. आज त्यांना आठवणं त्यामुळेच क्रमप्राप्त ठरते. 

रामदासस्वामी निघून गेल्यावर मुलीचे वडील मुलीला म्हणाले,” बाळ घरी चल.” तर ती मुलगी बाणेदारपणे म्हणाली,” बाबा तुम्ही कन्यादान केले आहे, आता मी त्या घरात येणार नाही.” गंगाधरपंत, समर्थांचे वडीलबंधू, मुलीला म्हणाले,” मुली तू आपल्या घरी चल, मुलीप्रमाणे तुला सांभाळेन.” त्या वेळी ती मुलगी म्हणाली, ” दादा पाणिग्रहण झालेले नाही, मी तुमच्याकडे येऊ शकत नाही.” 

मग त्या मुलीने  काय केले? ती चालत राहिली. गावे मागे पडली, नगरं मागे पडली, आणि तिला एक जंगल  लागले. तिथे तिला झुडूपात एक मंदिर दिसलं. त्या मंदिरातच राहण्याचा तिने निश्चय केला. तिने आजूबाजूची झुडपं साफ केली. एक अंगण त्या मंदिराभोवती बनवलं आणि ती तिथेच राहू लागली. त्या अंगणात मुले खेळायला येत, त्यांच्यावर तिने संस्कार करायला सुरूवात केली. त्यांना तलवारबाजीचे, भालाफेकीचे, दांडपट्ट्याचे शिक्षण दिले आणि ती  फौजच्या फौज शिवाजी महाराजांच्या  सैन्याकडे पाठवू लागली… सैन्यात भरती होण्यासाठी. आणि शिवाजी महाराजांच्या सेनापतीलाही प्रश्न पडला की आपलीही  फौज इतकी निष्णात नाही, या लायकीची नाही…. कोण पाठवतंय ही फौज? त्याने ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या कानी घातली आणि शिवाजी महाराजांना चिंता वाटली. त्यांना वाटलं गनीम तर करत नसावा असं काही? आपल्या फौजेची गुपिते हस्तगत करण्यासाठी! त्यांनी आपल्या हेरखात्याला शोध घ्यायला सांगितलं.

हेरखात्याने बातमी आणली की इथून खूप लांब राहणारी एक बाई हे काम करते  आहे.  शिवाजी महाराज मग वेष पालटून त्या माऊलीस भेटायला गेले. त्या माऊलीने शिवाजी महाराजांना सतरंजी दिली बसायला , गुळपाणी दिलं. तेव्हा तशी रीत होती.आजकालसारखे लोक कुणी आलं की तोंड वेडेवाकडे करत नसत.  शिवाजी महाराजांनी मुद्दामच तिची परीक्षा घ्यायला, शिवाजी महाराजांना नावं ठेवण्यास सुरुवात केली…  “काय तुमचा तो राजा ! का करता त्याच्यासाठी  हे सगळं? ” असं खूप भलतेसलते शिवाजी महाराज बोलू लागले स्वत :विरुद्धच ! ते ऐकलं मात्र आणि  त्या माऊलीने एकदम तलवार काढली  आणि शिवाजी महाराजांच्या गळ्यावर टेकवली ,”खबरदार” ती गरजली, ” शिवाजी महाराज आमचे राजे आहेत, त्यांच्याबद्दल काही भलतंसलतं बोललात तर.” शिवाजी महाराजांनी ओळखलं ,काय पाणी आहे ते !आणि ते निघून गेले. दुसर्‍या दिवशी शिवाजी महाराज  पूर्ण इतमामात  त्या स्त्रीला भेटायला आले आणि आपला जिरेटोप काढून त्यांनी त्या माऊलीच्या पायावर ठेवला….  म्हणजे काय माहितीय का? तुम्ही गादीवर बसा मी तुमचा प्रतिनिधी म्हणून राज्य चालवतो असेच जणू  शिवरायांना सांगायचं होतं . पण त्या माऊलीने तो जिरेटोप परत एकदा शिवाजी महाराजांच्या डोक्यावर ठेवला आणि ती म्हणाली,” हा तुम्हालाच शोभतो.”   

समर्थांचे दर्शन तिला त्यानंतर फक्त एकदाच आणि तेही फक्त पाचच मिनिटं झालं. तिला खबर लागली की समर्थ कृष्णेच्या काठी येताहेत. ती बघायला गेली त्यांना. समर्थ कृष्णा नदीच्या एका काठावरून चालत गेले आणि ती त्यांना समांतर अशी दुसर्‍या काठावरून चालत गेली. एवढ्या लांबून फक्त पाच मिनिटं  तिने समर्थांचा चेहरा बघितला. काय पातिव्रत्य  होतं तिचं ! म्हणतो ना इतिहासाने  काही लोकांवर खूप अन्याय केले..  त्यातीलच ही एक ! 

आजकालच्या युगात जेव्हा मुलींच्या खूप  अपेक्षा वाढल्या आहेत आपल्या जोडीदाराबद्दल, मुंबईला तर चाळीत राहणार्‍या मुलांची लग्नच होत नाहीत कारण मुलींना फ्लॅट हवा असतो. कशाला फ्लॅट हवा असतो कुणास  ठावूक?   जीवनात फ्लॅट व्हायला ? मुंबई कोर्टात रोज शंभर विवाह रजिस्टर होतात, पण त्याच वेळी पन्नास अर्जही घटस्फोटासाठी आलेले असतात. म्हणजे कुटुंबव्यवस्था आपल्याकडेही पन्नास टक्के तुटत आहे.  अशावेळी असे आदर्श समाजात प्रस्तुत करणे उचित ठरेल.  रशिया तुटला, झेकोस्लोवाकिया तुटला. इतरही खूप  देशांचे तुकडे झाले. पण भारताला तोडणं शक्य नाही हे अमेरिकेला माहिती आहे. कारण  इथली कुटुंबव्यवस्था ! इथला शेजारपाजार !! माणसामाणसात असलेले संबंध. बघा एखाद्या शेजार्‍याची बायको गावी गेली असेल तर त्याचा शेजारी त्याचं सगळं बघतो ,त्याला जेवण देतो ,सगळं काही पुरवतो. हे  अजूनही आपल्याकडे अस्तित्वात आहे म्हणून भारताला तोडणे शक्य नाही हे अमेरिकेला माहिती आहे.  हल्ली स्त्रीमुक्तीच्या वादळात जेव्हा अनेक घरे वाहून चालली आहेत तेव्हा असे आदर्श प्रस्तुत करणे हे उचितच ठरेल. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणतात त्याप्रमाणे, त्या काळात स्त्रीमुक्तीवादी संस्था नव्हत्या हे एका अर्थी बरं आहे . नाहीतर त्या….  त्या उर्मिलाला भेटल्या असत्या आणि नक्की सांगितलं असतं,’ घटस्फोट घे.’ लक्ष्मण आणि ऊर्मिलेचा चौदा वर्षांचा  वियोग आहे .चेहरासुद्धा पाहिला नाही चौदा वर्षात ! म्हणून त्यांनी नक्की सांगितलं असतं,” तुला त्यांनी टाकली चौदा वर्ष, घटस्फोट घे .” पातिव्रत्य ज्यांना कळत नाही, आदर्श जीवनमूल्यं काय आहेत हे ज्यांना कळत नाहीत ते असं काहीतरी बोलत असतात. पण असं झालं नाही . म्हणून तर रामायण, महाभारत अजूनही सगळीकडे वाचली जातात. तोच आदर्श आपल्याला रामदासस्वामींच्या पत्नीतही दिसतो.  त्यामुळे आज  रामदास स्वामींना आठवताना  त्या माऊलीला आठवणं ही उचित ठरेल.

संग्राहिका :  स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘क’ची कुरकुरीत करामत… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ ‘क’ची कुरकुरीत करामत… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये ‘कजरारे-कजरारे’ कवितेवर कोळीनृत्य केले.

काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय  रताहेत, काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला.

काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेल्या कागदांचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.

कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी ‘कोलाज’ करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच  काकांनी काट्यानेच काटा काढला.

काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.

कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.

केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.

कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले . कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला ‘कबड्डीतल्या किचकट कसरतपटू.’

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक विनंती… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ एक विनंती… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

कधी काळी सुवर्णभुमी म्हणून प्रख्यात असणारा आपला भारत देश जगाला संस्कारांचे , संस्कृतीचे, मानवतेचे विश्वबंधुत्वाचे , आदर्श राजकारणाचे, मार्गदर्शन करण्यात आघाडीवर होता. आपली भरतीय संकृती अति पुरातन आहे. रोम, ग्रीक, संस्कृतीपेक्षाही श्रेष्ठ तर आहे . हे जगन्मान्य आहे. आपल्या पुरातन  वैभवशाली मात्रृभुमीने भारतीय स्त्रियांच्या अतिउच्च संस्कारांचे महान आदर्श संपूर्ण जगाला दिले आहेत . जगाने ते वंदनीय व सर्वश्रेष्ठ असल्याचे मान्य केले आहे.  त्याना अनुकरणीय मानले आहे . आपल्या देशाने पारतंत्र्य ही अनुभवले आणि त्यातून प्राणपणाने लढून स्वातंत्र्यही मिळवले . या लढ्यात अनेक विरांगणानी परमोच्या त्यागाचे , औदार्याचे ,स्वसंरक्षणाचे  वस्तूपाठ समाजाला दिले आहेत.  आजच्या काळातही ते आदर्श असून समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत.  भारतीय मातांनी अनेक तेजःपुंज आपत्याना जन्मदेउन त्यांना उत्तम प्रकारे घडवून त्याच्याकडून सामाजिक , सांस्कृतिक, धार्मीक,क्रांती घडवून आणली आहे. आज तगायत ती तशीच घडतेय . मातृसत्ताक, किंवा पितृसत्ताक  पध्दतीत स्रियांची कुटुंबावरची पकड कधीच कमी झालेली नाही . म्हणूनच “जिच्या हाती पळण्याची दोरी ती जगा उद्धारी” असे म्हटले जाते.

पुरातन, ऐतिहासिक, आणि वर्तमान काळातही स्त्री शक्तीची धगधगती मशाल सातत्याने तेवतरहून समाजहिताचे समर्थपणे संरक्षण करत आहे.

पाश्यात्य संस्कारांच्या आणि संस्कृतीच्या मोहजालाच्या आहारी जावून काही नवी स्थित्यंतरे घडत आहेत. ती सारीच तकलादू व असमर्थनीय आहेत असे नाही. पण आपले आदर्श बाजूला ठेवून त्यांचेच अनुकरण करावे इतकी ती प्रतिष्ठीत आहेत असेही नाही. आपण आपल्या सदसद्विवेकबुद्धी ने त्यातील श्रेष्ठ कनिष्ठ निवडून घेवूनच त्यांची अंमलबजावणी  करावी हेच हितकारक ठरेल.

काही बदल झाला तरी तो वरपांगी असेल. आपली मुळातली आणि तळागाळातील संस्कृती कायम टिकून राहील यात शंकाच नाही. भारतीय महिला संघटनांच्या माध्यमातून या निवडीला योग्य दिशा देण्याचे कार्य सुरू आहे . त्याला बळ दिले जावे आणि आपल्या भारतमातेच्या पुरातन पण परिवर्तनीय जलजाज्वल संस्कृतीला मानाचे स्थान प्राप्त व्हावे हीच अपेक्षा.  आपले आदर्श आपलेच आहेत. त्याना सुरक्षीत ठेवून पुढची सांस्कृतिक वाटचाल आदर्श करण्यासाठी  . आता महिलांनीच पुढाकार घेण्याचे नियोजन करावे. ही आग्रही विनंती

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अस्तित्व आणि अधिकारासाठी दिलेला लढा… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

☆ अस्तित्व आणि अधिकारासाठी दिलेला लढा… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन . स्त्रीचे अस्तित्व आणि अधिकार यासाठी दिलेल्या लढ्याचे स्मरण म्हणून जगभर साजरा केला जाणारा दिवस. Clara Zenth या जर्मन स्त्रीच्या पुढाकाराने हा जगभर पसरला आणि यशस्वी झाला..याची सुरुवात १९१० मध्ये झाली.

असं म्हणतात भरपूर वेळ घेऊन ईश्वराने निर्माण केलेली एक नितांत सुंदर, भावपूर्ण, प्रेमळ, प्रसंगी कणखर अशी कलाकृती म्हणजे स्त्री. “जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती या जगाते उध्दारी “, “क्षणाची पत्नी अनंत काळाची माता ”, “ देवी, राक्षसांचा, दुर्जनांचा संहार करणारी “ वगैरे भारदस्त विधानं जरी तिच्याबद्दल केली गेली असली,  तरी समाजात तिला सहसा कायमच दुय्यम स्थान मिळालेले आपण पाहतो.

एक निर्बल भोगवस्तू म्हणून तिच्यावर अधिकार गाजवण्यासाठी झालेल्या लढाया आणि त्यात  तिने केलेले  आत्मदहन, जोहार हे जसे सर्वश्रुत आहे, तसेच एकीकडे हेही सर्वश्रुत आहे की इतिहासात अनेक शूर स्त्रिया होऊन गेल्या. स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्त्रियांचे योगदान आहे. आणि आता स्त्रियांच्याच प्रयत्नांनी स्त्रियांना  स्वातंत्र्य आणि समानता मिळत आहे हेही महत्वाचे आहे. अशा सगळ्याच स्त्रियांची आठवण म्हणून हा महिला दिन. 

फक्त अतिशय समजूतदारपणा, प्रेमळपणा, सहनशीलता हे सहज दिसणारे गुणविशेषच नाहीत, तर बुद्धी, कल्पकता, चातुर्य, साहस ,जिद्द, हेही गुणविशेष  पुरुषांइतकेच तिच्यामध्येही आहेत हे स्त्रीने आता वेळोवेळी आणि अनेक क्षेत्रात सिद्ध केले आहे. मी तर म्हणेन की ती multi taskerआहे, आणि हा विशेष गुण पुरुषांमध्ये बराचसा अभावानेच आढळतो हेही आता उघड सत्य ठरले आहे.  म्हणूनच जगाला आवर्जून स्त्रियांची जाहीर दखल घ्यावीशी वाटते. कारण समाजात स्त्रीचे अस्तित्व पुरुषांइतकेच महत्त्वाचे आहे हे सत्य आता विवाद्य राहिलेले नाही. स्त्रीच्या अस्तित्वासाठी आणि अधिकारासाठी सुरु झालेल्या लढ्याचं पहिलं पाऊल आता जणू एक मैलाचा दगड म्हणून इतिहासात कायमचं नोंदलं गेलं आहे. 

मुळातच स्त्री ही पुरुषापेक्षा शक्तीने कमी असते हा निसर्ग नियम आहे. पण काही स्त्रिया यावरही मात करतांना आता वरचेवर दिसून येते. थोडक्यात काय, तर लिंगभेद, रिप्रॉडक्टिव्ह राईट, व्हायलेन्स अब्युज या विरुद्ध तिला द्यावी लागणारी लढाई आता खूपच मिळमिळीत झाली आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. 

विविध संशोधन क्षेत्रे, राजकारण ,सायन्स, मेडिसिन,अर्थ ,खेळ, सैन्यदल, यामध्ये तर ती आता सर्रास आहेच. शिवाय वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्येही तिचा दमदार सहभाग आहे. पोलीसदल, रिक्षा किंवा चारचाकी वाहनचालक, शिक्षणक्षेत्रात लक्षवेधी वाटचाल अशा विविध प्रांतात, आणि अध्यात्मासारख्या सहजसाध्य नसलेल्या प्रांतातही ती यशस्वीपणे मिळवत असलेले ज्ञान…..सगळंच अतिशय कौतुकास्पद. खरंतर आता असे एकही महत्वपूर्ण क्षेत्र उरलेले नाही, जिथे स्त्रीने आपले कर्तृत्व सिद्ध केलेले नाही.  अगदी अवकाशातही भरारी घेण्यात, त्यासाठीच्या अतिशय गुंतागुंतीच्या महत्वपूर्ण संशोधनात  पुरुषांच्या बरोबरीने तिचा सहभाग आहे…. स्त्री आता खरोखरच ‘ स्वयंसिद्धा ‘ ठरलेली आहे. सिंगल मदर म्हणून एकटीने मुलांचे उत्तम संगोपन करण्यात देखील ती यशस्वी झालेली आहे – होते आहे. 

इथे एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी. शहरवासीयांसाठी अनेक मार्ग खुले असतात. पण विपरीत परिस्थितीतून, आडगावातून पुढे आलेल्या अशाही स्त्रिया आहेत, ज्या “पद्मश्री” पुरस्काराच्या मानकरी आहेत. अशा स्त्रियांबद्दल मला विशेष आदर वाटतो. असे पुरस्कार मिळवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील काही जणींचा उल्लेख करायचा तर —

१) मध्यप्रदेशातील काटक्या गोळा करणारी दगडफोड करणारी दुधीयाबाई– एक चित्रकार– पद्मश्री मानकरी

२) कलकत्ता येथील प्रीती कोना–कांथा वर्क

३) छत्तीसगडची कलाकार उषा बारले– नाच

४) झाबुवा ,मध्य प्रदेश, मधील दाम्पत्य शांती आणि रमेश पवार— आदिवासी गुडिया

५) हिमोफेलियावर संशोधन करणाऱ्या डॉक्टर नलिनी पार्थसारथी

६) गणित प्रेमी सुजाता— अनेक पुरस्कार आणि पद्मश्री. 

अर्थात या सगळ्याच्या जोडीने एक वेदनादायक सत्य अजूनही काही ठिकाणी आपले नकोसे अस्तित्व दाखवून देत असते. ठराविक पद्धतीनेच आयुष्य व्यक्तीत केले पाहिजे हा विचार अडाणी अशिक्षित वर्गातच फक्त नसतो, तर तो शिक्षित उच्चभ्रू समाजात देखील दिसतो हेही असेच एक सत्य. छत्तीसगडच्या आदिवासी समाजात जन्मलेली एक लहानशी मुलगी… तिला नाचाची अत्यंत आवड… पण नाच म्हणजे समाजात मान खाली घालायला लावणारी कला… म्हणून बापाने त्या मुलीला विहिरीत फेकून मारण्याचा प्रयत्न केला आणि कोणीही त्याला प्रतिकार केला नाही.  पण ही मुलगी केवळ स्वतःच्या मनोबलावर जिद्दीने त्या परिस्थितीतून आपला मार्ग शोधते आणि स्वतःला सिद्ध करते हे आवर्जून लक्षात घेण्यासारखे. अशा अनेक स्त्रिया. अगदी सुधा मूर्ती यांच्यासारख्या प्रचंड बुद्धिवान स्त्रीला देखील जेंडर डिस्क्रिमिनेशनला तोंड द्यावं लागलं. पण त्यांनी खंबीरपणे आणि चिकाटीने सगळ्या अडथळ्यांना यशस्वीरीत्या पार केले आणि   आपली योग्यता सिद्ध करून दाखवली. आज ‘ सुधा मूर्ती ‘ हे नाव कुणाला माहित नाही ? अशी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कर्तबगारी दाखवणाऱ्या किती जणींची नावं घ्यावीत … ज्या सगळ्या पद्म पुरस्कारांच्या मानकरी आहेत …. सर्वांच्या मनात आदराचे स्थान मिळवलेल्या आहेत . 

अर्थात जसे यशस्वी पुरुषामागे स्त्री असते म्हणतात, तसेच यशस्वी स्त्रीच्या मागेही पुरुष असतो हे तर खरेच. पण ही गोष्टही स्त्री जास्त दिलखुलासपणे मान्य करते हेही तितकेच खरे.  

८ मार्च प्रमाणेच १३ फेब्रुवारी हा दिवसही श्रीमती सरोजिनी नायडूंच्या स्मरणार्थ ‘ नॅशनल वूमन्स डे ‘ म्हणून साजरा केला जातो. देशबांधणीत हातभार लावलेल्या स्त्रियांचा हा गौरव दिन असतो. कदाचित याची माहिती फारशी सर्वश्रुत नसेल म्हणून इथे आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करायलाच हवा. 

या सगळ्या ज्ञात-अज्ञात स्त्रियांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लढ्याला… कार्याला आणि… त्यांनी मिळवलेल्या गौरवास्पद यशाला माझं मनःपूर्वक अभिवादन…

संग्राहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कथा शनिवारवाड्याच्या उजव्या चौकाची… श्री बाजीराव सुधाकर जांभेकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ कथा शनिवारवाड्याच्या उजव्या चौकाची… श्री बाजीराव सुधाकर जांभेकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

शिवछत्रपतींनी उभारलेल्या स्वराज्याचे रुपांतर मराठ्यांनी साम्राज्यात केले…मराठ्यांच्या पराक्रमाचा दबदबा पुर्‍या हिंदोस्तानात गाजत होता.अशाच वेळी अहमदशाहा अब्दाली दिल्लीवर चालून आला .दिल्ली हादरली होती. मग मात्र दिल्ली रक्षणाची जबाबदारी घेतलेल्या मराठ्यांनी आव्हान स्विकारुन दिल्ली गाठली…नेतृत्व करीत होते सदाशिवराव भाऊ पेशवे….भाऊंच्या हाताखाली होळकर,  शिंदे,पटवर्धन, मेहेंदळे असे कसलेले आणि पराक्रमी सरदार होते…

दोन्ही सैन्य समोरासमोर उभी ठाकली होती.एकमेकांच्या सेना एकमेकांची ताकद अजमावत होते.याचवेळी भाऊची सेनाप्रमुखांशी खलबते चालू होती…अशाच एका खलबतात जनकोजी शिंदे या अठरा वर्षाच्या सरदाराच्या स्वाभिमानाला धक्का लागला…तसा जनकोजी पेटून उठला छावणीतून बाहेर पडला आणि सैन्यासहित गिलच्यांच्या सैन्यावर कोसळला…बघताबघता १००००सैन्य गारद केले.पण जनकोजी शिंदेच्या पाठराखणीला भाऊंनी पराक्रमी सरदार बळवंतराव मेहेंदळेना सैन्यासह पाठविले..पण अंतर्गत वादामुळे बळवंराव मात्र लढणार्‍या जनकोजीला लांबून पहात होते…शेवटी भीम पराक्रम करत जनकोजी सदाशीवभाऊंकडे परत आला.भाऊंनी त्याचा सत्कार केला.तसा जनकोजीनी भाऊंना प्रश्न विचारला माझ्या मागे बळवंतरावांना का पाठवला होता.?आणि बळवंतराव काय करत होते विचारा त्यांना..त्यावरुन शब्दाला शब्द झाला.दरबार संपला….सगळे सरदार आपआपल्या छावणीत पोहचले…पण बळवंतरावांच्या बायकोला घडला दरबारातील प्रसंग कोणीतरी लगबगीने कळवलाच….आणि त्या आर्यपत्नीचा स्वाभिमान दुखावला…तीने आरतीच्या तबकातील निरांजन पेटविले..आरती घेऊन ती छावणीच्या दरवाजातच उभी राहिली..एव्हढ्यात बळवंतराव जवळ आले…आर्यपत्नी म्हणाली ,”या पराक्रम करुन आलात ओवाळते पंचारतीने” आपण रक्ताचा थेंबही आपल्या अंगावर न उडविता गिलचे कापलात…..बळवंतरावांनी मान खाली घातली..तसा पत्नीच्या तोंडाचा सुटला…ती म्हणाली उद्या माझ्या पोराने लोकांना कोणाचा पोर म्हणून सांगाव?एका नामर्दाचा? की पळपुट्याचा?लाज कशी वाटली नाही तुम्हाला?

पत्नी ताडताड बोलत होती…आणि बोलता बोलता म्हणाली ,जा परत गिलच्यांना ठेचा त्याशिवाय तोंडही मला दाखवू नका..जिंकून आलात ओवाळीन आणि लढताना स्वर्गवाशी झालात तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्या शवासोबत स्वर्गात असेन….

गरम शिश्याचा रस कानात ओतावा तसे ते शब्द बळवंतरावांच्या कानात पेटले….सरदशी हात तलवारीवर निघाला..बळवंतरावांनी घोड्यावर मांड ठोकळी…बळवंतरावांचे बाहू स्पुरण पावले…हर हर महादेव ..जय भवानी..जय शिवाजी आरोळी घुमली….अफाट कापाकापी सूरु झाली….गिलचे पाठीला पाय लावून मागे हटत होते..बळवंराव त्वेशाने दांडपट्टे फिरवत होते…त्यांचे कान फक्त आकडे एकत होते…हजार…पाचहजार…आठहजार….एकच कापाकापी…रक्ताचा चिखल अन प्रेतांचा ढीग…दिसू लागला…एव्हढ्यात पाठीमागच्या बाजूने शिंगाचा हलगीचा नाद घुमला…फिरणारा दांडपट्याला स्वल्पविराम देत बळवंतरावांनी मागे पाहिल…साक्षात सदाशिवराव पेशवे लढण्यासाठी आणि बळवंतरावाच्या प्रेमासाठी रणांगणात….बळवंतरावांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले…प्रत्यक्ष स्वामी….फक्त माझ्यासाठी…खरच धन्य झालो मी आज…एव्हढ्यात बळवंतरावांवर काळाने झडप घातली…एक दोन तीन चार गोळ्या बळवंतरांवाच्या छातीची चाळण करुन मोकळ्या झाल्या…भीमाच्या ताकदीचा बळवंतरावाचा देह धरणीवर कोसळला….सदाशीवभाऊनी त्या  अचेतन देहाला मिठीच मारली…आदर्श प्रेमाच हे उदाहरण….

भाऊंनी तो देह मागे आणला.पानपताजवळ अग्नी देण्यासाठी चिता रचली..बळवंतरावांची पत्नी सती जायला निघाली…त्या सती जाणार्‍या पत्नीला सदाशीवराव भाऊ सांगत होते…बाई तुला दोन वर्षाचा मुलगा आहे किमान त्याच्यासाठी तरी सती जाऊ नको…पण बाई आपल्या निश्चयावर ठाम राहिली…तिने ते पोर उचलून भाऊंच्या पदरात घातले आणि भाऊंना म्हणाली की याचा सांभाळ आपण करा…आणि मोठा झाला की फक्त एव्हडच सांगा त्याला “”तुझे आई वडील का मेले”हीच आठवण द्या…बाकी करण्यास तो नक्कीच समर्थ होईल कारण तो वीराचा पुत्र आहे…..पुढे १४ जानेवारी १७६१ ला पानिपतचा रणसंग्राम झाला….मराठे तळहातावर शीर घेऊन लढले…देशासाठी ..धर्मासाठी….महाराष्ट्राची एक तरुण पीढी एका दिवसात पराक्रम करीत मावळली …

पण, पानिपतात जय मिळवूनही अहमदशहा अब्दालीने हाय खाल्ली मराठ्यांची…अब्दालीने काही दिवसातच हिंदोस्तान सोडला….

पण महाराष्ट्राने मात्र पुन्हा यज्ञकुंड पेटवला आपल्या स्वाभिमानाचा….राष्ट्रभक्तीचा आणि १७७५-७६च्या वर्षात मराठ्या पुन्हा दिल्लीला धडक दिली…पार सिंधूपर्यत भगवा रोवला….यात एक १६/१७ वर्षाचा पोर भीमथडी पराक्रम करत होता…पानपतावरच्या युद्धाचे उट्टे फेडत होता…आपल्या तलवारीचे पाणी त्याने हजारोंना पाजले….तो पोर म्हणजेच…लढवय्या बळवंतराव मेहेंदळेचाच मुलगा…आप्पा बळवंत मेहेंदळे….आपल्या आई वडीलांच्या हौतात्म्याची आठवण जिवंत करणारा…..

त्याच्या पराक्रमावर बेहोत खूश होऊन पेशव्यांनी त्याची आपल्या शनिवारवाड्याजवळ राहण्याची हवेली उभी करुन दिली….आणि त्याची आठवण म्हणूनच शनिवारवाड्याच्या कडेच्या चौकाचे नाव ठेवले गेले “आप्पा बळवंत चौक (ABC)…”

या चौकाच्या नावाच्या निम्मित्ताने स्मरण त्या बळवंतराव आणि आर्यपत्नीचे, स्मरण त्या सैन्यावर पोटच्या पोरासारखे प्रेम करणार्‍या सदाशिवरांवांचे आणि आई वडीलांचा शब्द साकार करणार्‍या त्या आप्पा बळवंतांचे….राष्ट्रासाठी स्वतःची आहूती देणार्‍या या सार्‍या वीरपुरुषांना दंडवत

शब्दांकन : श्री बाजीराव सुधाकर जांभेकर

मु.पो.पोंभुर्ले,ता.देवगड जि.सिंधुदुर्ग

9405829669/9075385256

संग्राहक : माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कृष्ण : गूढ गुरू… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ कृष्ण : गूढ गुरू…  ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆ 

कृष्ण अंधारात जन्मला.त्याचा प्रवास जसा गूढ आहे, तशी त्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर सावधचित्त राहायला हवं.

कृष्ण खोडकर आहे. केव्हा आधार काढून पळून जाईल भरवसा नाही…!

अभिमन्यू चक्रव्यूहात फसला. कशामुळे, तर श्रीकृष्णामुळेच…

चक्रव्यूह कसा भेदायचा हे कृष्णाने सांगितलं होतं. पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे कृष्णाने सांगितलं नाही.

कृष्ण आहेच असा अजब. आपल्याला फसवतो. गंमत बघतो. फुकटात काही देत नाही. अर्धा मार्ग दाखवतो. रस्ता थोडासा उघडतो. पण पोहोचायचे कष्ट आपल्यालाच घ्यायला लावतो. मोफत काही नाही.

चक्रव्यूहात उतरणार असाल तर उतरा, पण जिंकून बाहेर पडायची माहिती तुम्हालाच घ्यावी लागेल. ते कष्ट तुम्हीच घ्यायचे. चक्रव्यूहातून श्रीकृष्ण अलगद उचलून बाहेर काढत नाही. काढू शकतो, पण काढत नाही. फार चलाख आहे. ”चालू” आहे, असंच म्हणा हवं तर… चक्रव्यूहात सोडतो आणि गंमत बघतो. सुटायचं तर तुमच्या बळावर सुटा, नाहीतर फसलात. फसल्यावर त्याच्याकडे अपेक्षेने पहात बसाल तर फक्त सौम्य हसतो.

फार अर्थ आहे ह्या हसण्यामागे…

तो फक्त एक नाजूक स्मितहास्य करून सांगतो, जे करायचे स्वतःच्या बळावर करा. शिकून घ्या, समजून घ्या. आत्मसात करा…

अर्जुनाला असंच अडकवलं. आपलं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः एकटाच अर्जुनाच्या पक्षात आला. ज्यामुळे दुर्योधनाला पक्के कळले की अर्जुन जिंकणार नाही, पांडव जिंकणार नाहीत. युद्धाचा निकाल तिथेच लागला होता.

श्रीकृष्ण “न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार” अशी शप्पथ घेऊन रथावर चढला. काम केलं फक्त रथ हाकण्याचं. अर्जुनही घाबरला. साक्षात महायोद्धा कृष्ण रथावर सोबतीला होता, पण निशस्त्र ! वरून अर्जुनाला ताकीद दिली की तुझं धनुष्य तू उचल आणि लढ. लढत असशील तर मी रथ चालवीन, दिशा दाखवीन…

विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था

कर्तव्याने घडतो माणुस जाणुन पुरुषार्था

भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था

कृष्ण भर रणांगणात वेदार्थ सांगतो. कर्मयोग पटवून देतो. आपण तो नाही पटवून घेतला, नाही आचरणात आणला तर कृष्णाचा काही भरवसा नाही. मैदान सोडून पळून जाईल. अर्जुनाला बजावले की धनुष्य खाली टाकशील तर मी रथ सोडलाच म्हणून समज…

अर्जुन भर रणांगणात फसला. अखेरीस त्याचा तोच लढला आणि शेवटी जिंकला. अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे. कृष्णाला हे पक्के ठाऊक होते. आपल्यातही ही क्षमता असते, पण आपण आत्मविश्वास गमावून बसतो. कोणीतरी मदत करेल ही अपेक्षा ठेवतो. आपली लढाई दुसऱ्याने लढून द्यावी असे वाटते. अशावेळी कृष्ण मदत करत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढायला लावतो…

यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: ।

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥

जिथे योगेश्वर आहे, श्रीकृष्ण आहे तिथे विजय निश्चित आहे. का नसणार…? तो सोबतीला उभा राहतो. थोडी फार दिशा दाखवतो. लढायचं आपल्यालाच आहे. जो लढेल, तो निश्चितच जिंकेल…

असं म्हणतात की कृष्ण जिथे नसावा तिथेही आहे. दारूचा गुत्ता, जुगारचा अड्डा इथे लपून बसला आहे. माझ्याकडे कोण कोण आकर्षित होतो, कोण येतो हे तो बघत बसतो…

रंगहीन मी, या विश्वाच्या रंगाने रंगलो

कौरवांत मी, पांडवांत मी,अणुरेणुत भरलो

तो पांडवांमध्ये आहे आणि कौरवातही आहे. नीतीच्या पक्षात बसला आहे आणि अनीतीच्याही. त्याला नीती – अनीतीच्या तराजूत तोलता येत नाही. कारण तो कुठेही गेला तरी रंगहीन आहे. पण तो रंगपंचमी खेळतो. आपल्याला रंगवून सोडतो. त्याचा काही भरवसा नाही. आपल्यासमोर अनेक रंग पसरवून ठेवतो आणि पाहतो, की आपण कोणत्या रंगात रंगतो.

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

तो म्हणतो की धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात येत राहीन…

म्हणजे तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. तो आपल्या सोबतही राहणार आहे. फक्त त्याचे म्हणणे ऐकावे लागेल.

कृष्ण सरळ नाही, पण चांगला आहे. समजून घेतलं तर फारच उपयोगाचा आहे.

श्रीकृष्णाने आयुष्यात जितक्या गोष्टी सोडल्या, तितक्या त्या इतर कोणालाही सोडता आल्या नाहीत.

श्रीकृष्णाने आपली आई, वडील सोडले, त्यानंतर नंद-यशोदाला. मित्र निघून गेले. राधा निघून गेली. गोकुळ सोडले आणि मथुराही सोडली.

आयुष्यभर कृष्ण काही ना काही सोडतच गेला. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला. आपली आजची पिढी, जी एखाद्या गोष्टीच्या विरहाने कोसळून पडते, त्याने कृष्णाला गुरु बनवावे. ज्याला कृष्ण समजला तो कधीच औदासिन्यात (depression) जात नाही.

कृष्ण आनंदाचा देव आहे. एखादी गोष्ट हातातून निसटून गेल्यावरही सुखी कसे रहावे हे कृष्णापेक्षा कोणीही उत्तम शिकवू शकत नाही….!

।।जय श्रीकृष्ण।।

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फाल्गुनातील चैत्रविलास… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? विविधा  

☆ फाल्गुनातील चैत्रविलास… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

निसर्गात ऋतूंचा रंगलेला बहारदार खेळ पाहिला कि अचंबित व्हायला होतं. तसेच बाराही महिने एकामेकात एखादा गोफ विणावा तसे ते अलगद एकत्र गुंफलेले असतात. एक महिना या निसर्गातून आपला निरोप घेण्यापूर्वीच नवीन  महिन्याला आमंत्रित करतो. खुलेआम त्याचे स्वागत करतो.

तसाच फाल्गुनही याला अपवाद कसा असेल? या महिन्यात उन्हाळ्याची तलखी असतेच पण मधूनच वाऱ्याच्या सुखदशा लहरी स्पर्शतात आणि मनाला आनंद देतात. या महिन्यात सृष्टीला प्रणयाची बाधा झालेली असते. पक्षीवर्गात ही प्रणयातूरता जाणवते. पक्ष्यांच्या स्वरातील माधुर्य अधिकच गहिरे होते. त्यांचे स्वर अधिक मंजूळ होतात. चिमण्या, कावळे, साळुंख्या अशा सर्व पक्ष्यांच्या सूरांत ही मधुरता असते. एक उत्कटता साऱ्या निसर्गात असते. मधूनच मृगजळांचे भास होतात. प्रणयार्त पक्षीही किती संयमी असतात. हा गुण घेण्यासारखा आहे मानवाने. शांत दुपार हे फाल्गुनाचे आणि एक वैशिष्ट्य आहे. यावेळी आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी मनात रुंजी घालत असतात.  बाहेर उन्हाचा तडाखा वाढत असतो. पण बाहेर पक्ष्यांच्या मधुरवाने मनात आनंद निर्मिती होते. उन्हाचा ताव, मनी आठव पिंगा आणि पक्ष्यांचा मधुरव अशी ही सरमिसळ या फाल्गून दुपारी असते.

फाल्गुन पौर्णिमेच्या दरम्यान निसर्गातील रंगपंचमी अगदी भराला आलेली असते. पळस तर फुलून लालकेशरी साज लेवून नटलेला आहे. त्यात मोहरी च्या फुलांचा गर्दपिवळा रंग, झाडावेलींवरील पालवीच्या अनेकविध छटा हा रंगोत्सवच ना? म्हणूनच श्रीहरी गोपगोपींसह, राधेसह होलिकोत्सव साजरा करून रंगांमध्ये न्हाऊन निघत असेल. साऱ्या जगताला समानतेची शिकवण अशाच कृतीतून भगवंत देत असतो. अथांग प्रेम देणारा हा फाल्गुन मास आहे. आत्यंतिक प्रणय आणि आत्यंतिक विरह असा दुर्मिळ संगम फाल्गुन मासातअसतो. वातावरणात तरुवेलींची सुकलेली पाने गळतात. पानगळ हाच शिशिराचा स्थायीभाव असतो. पण फाल्गुनातच साऱ्या वृक्ष वेलींवर नाजूक पालवी फुटू लागते. असं वाटतं कि फाल्गुन मास आतुरतेने आपल्या चैत्र सख्याची वाट पहात असतो.

उन्हाने भाजणाऱ्या झाडा-वेलींना मायेने कुरवाळत हा हसरा फाल्गुन नवपालवीची शुभवार्ता सांगत असतो. फाल्गुन सख्याच्या अंतरीची हाक चैत्रसख्याला ऐकू येते. मग अलगद निसर्गात, इथेतिथे पानोपानी चैत्राच्या चाहूल खुणा खुणावू लागतात. वनराणी जणु आपल्या जवळील हिरव्या रंगाच्या हिरवट, पोपटी गर्द शेवाळी, पिवळसर सोनेरी राजवर्खी रंगाची मुक्तहस्ते उधळण करू लागते. मग तरु-लतांवर ही रंगल्याली नाजूक  पालवी वाऱ्यावर लवलव करु लागते. शिरीष, पिंपळ आदि वृक्ष ही नाजूक पालवीचे सजतात.       

फाल्गुन महिन्यात खऱ्या अर्थाने चैत्रही धरेवर अवतरतो. यावेळी फाल्गुन आणि चैत्र अगदी हातात हात घालून सज्ज असतात कारण ऋतूराजाच्या आगमनाची जय्यत तयारी त्यांना करायची असते. कळ्याफुलांना, तरुवेलींना, नभातील चंद्र तारकांना,अगदी वातलहरींना ही हा सांगावा द्यायचा असतो. आंब्याच्या मोहोराचा, कडुलिंबाच्या फुलोऱ्याचा मस्त गंध वातावरणात दरवळत असतो. पक्षीही पंख फडफडत आनंदाने गगनात उंच भऱ्याऱ्या घेतात आणि त्याबरोबरच नरपक्षी माद्यांना आमंत्रित करण्यात मशगुल असतात. फाल्गुनाचा चैत्रविलास असा रंगलेला असतो.

हळूहळू फाल्गुनाची निरोपाची घडी जवळ आलेली असते. पण आपला उत्साह, आपले चिरतारुण्य तो हसतमुखाने आपल्या चैत्रसख्याकडे सुपूर्द करतो. ह्या निरोपावेळी करुण वातावरणात सुध्दा फाल्गुनाचे निर्मळ हास्य मिसळते आणि चैत्रही आनंदी बनतो. दोघांच्या गळामिठीची साक्षीदार ही सारी सृष्टी असते. आता फाल्गुन तर निरोप घेतो पण चैत्र मास मन घट्ट करून निसर्गाशी एकरूप होऊन जातो. या मधुमासाचा गोडवा किती वर्णावा! चैत्रमास हा ‘वसंताचा आत्मा’च. त्यामुळे या महिन्यात कोकिळ  मदमस्त ताना घेतो. आम्रतरुवर आता मोहोरातून बाळकैऱ्या डोकावू लागतात. सोनचाफा, पांढरा चाफा, लाल चाफा फुलतात. त्यांच्या सुगंधात जाई, जुई, मोगरा, मदनबाण यांचे गंध मिसळून साऱ्या परिसरात गंधमळे फुलल्याची जाणीव वातलहरी करून देतात. कमलिनीच्या मिठीत भ्रमर मत्त होतात. पळसाबरोबर पांगारा, सावरी, फुलतात. वनराई पुष्पवैभव दिमाखात मिरवत असते. चैत्रपालवी नी फुले यांची रानभूल पडते. पक्षी मीलनोत्सुक असतात. कुठे घरटीही दिसू लागतात व लांबट, वाटोळी, चपटी … साऱ्या निसर्गात वासंतिक सोहळा रंगलला पाहून चैत्र खुलतो, गाली हसतो…

फाल्गुनाच्या रंगोत्सवी

चैत्रविलास हा रंगला

पानोपानी, पक्षांच्या कंठी

चैत्र  रुणझुण नादावला|

 

सांज क्षितीजावर असे

चित्रशिल्प भुलवितसे

अवनीवर वासंतिक

उत्सव गंधभरा सजलासे|

 

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जगावेगळी ही सबला– जगावेगळी वनराई… लेखिका : सुश्री योगिनी पाळंदे ☆ डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

? मनमंजुषेतून ?

जगावेगळी ही सबला– जगावेगळी वनराईलेखिका : सुश्री योगिनी पाळंदे ☆ डाॅ. शुभा गोखले

महिलादिनाबद्दल लिहायला घेतलं आणि ती आठवली !!!!!

मी तिला सांगितलं,तुझ्याबद्दल लिहायचं आहे. तर अंगभूत स्थितप्रज्ञतेने म्हणाली …… 

“ इतकं कौतुक आवश्यक आहे का? आणि जर करायचंच असेल तर माझ्या कामात मी एकटी नाही.  माझ्यासोबत माझा नवरा,शेखर आहे आणि या कामात आम्हा उभयतांचे विचार आणि कृती आहेत.”

तर….तिची आणि त्याची गोष्ट ऐका………

ती किलबिलीने उठते… तिनेच जपून वाढवलेला, मोठ्या केलेल्या झाडांवरचे पक्षी तिला उठवतात

कमीतकमी पाणी वापरून ती आन्हिक उरकते .. संततधारी नळ चालू न ठेवता. ती नेमक्या वेळी नेमकेच पाणी वापरते.

आंघोळीच्या वेळी ती साबण लावत नाही. वर्षानुवर्ष ती पाण्याचे रासायनिक प्रदूषण टाळून फक्त हळद-चणापीठ-तांदूळपीठ-मीठ वापरते आहे.

भांडी घासायचे,कपडे धुवायचे साबणही ती रसायनविरहित वापरते.

ती तशीच आहे…. अस्सल आणि  निर्विष. तिच्या घरातून बाहेर जाणारे सांडपाणीसुद्धा तसेच आहे …. 

अस्सल आणि निर्विष. तिचे सांडपाणी मुठेला अशुद्ध करत नाही. 

ती प्लास्टिक वापरत नाही आणि जर वापरलंच तर त्याचा पुनर्वापर आवर्जून करते.

तिच्या घरच्या ओल्या कचऱ्याचं काळ सोनं होतं…. काही काळाने त्या काळ्याचं-हिरवं होतं.

म्हणून तर तिच्या गच्चीत आणि परसात जादुई-हिरवी उधळण आहे, आणि हिरव्याने परिधान केलेली लाल, गुलाबी, पिवळी, जांभळी, केशरी रंगबरसात आहे. 

तिथेच फुलपाखरांच्या जन्मकहाण्या लिहिल्या जातात. मधमाश्या,भुंगे,चतुर आणि असंख्य पक्षी प्रणयाराधन करतात .. आणि तिच्या ऋणमुक्तीसाठी सकाळी गीत गातात. तिच्या गच्चीत मधमाश्यांच्या पेट्या तर असतातच, पण क्वचित बागेत सापही सापडतात. आलाच एखादा आगंतुक साप घरात, तर ती अविचल राहून situation handle करते …. झुरळ पाहून किंचाळणाऱ्या मला ती क्षणोक्षणी प्रभावित करते. 

कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्या तिच्या घरात उन्हाळ्यातही पंखा लागत नाही. प्रशस्त खिडक्या आणि भोवतालची झाडं हीच तिची वातानुकूलित यंत्रणा असते.

स्त्री-मुक्तीच्या दांभिक कल्पनांना, ही मुक्ताई फाटा देते. उन्हाळ्यात ती पारंपारिक वाळवणं घालते

आणि घरच्या गच्चीतून मिळालेल्या हळदीचं लोणचंही घालते. लोणच्यापासून ते थेट जिलबीपर्यंत सगळं घरी करते. जुन्या साड्यांच्या गोधड्या शिवते….. बागेतल्या वाळलेल्या फूलपाकळ्यांनी रांगोळीचे रंग बनवते.

गणपती उत्सवात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळासुद्धा घेते…..  

… आणि हे सारे काही करताना ती स्थितप्रज्ञ असते. आपण काही विशेष करतोय असा तिचा अभिनिवेश नसतो. तिचे श्वास, तिचे उच्छ्वास, तिचे शब्द, तिचं वावरणं… हे सगळं एखाद्या सुखदुःखापल्याड पोचलेल्या अभोगी योगिनीसारखे असते. ज्या निसर्गाच्या घरी आपण साठ-सत्तर वर्षांसाठी पाहुणे म्हणून आलोय त्याला आपण माघारी जाताना काय काय देऊन जायचे ह्याचा तिचा सशक्त-विचार तयार आहे.

… म्हणून तर निवृत्तीपूर्वीच निवृत्त होऊन तिने च..क्क….चाळीस एकरांचं एक जंगल विकत घेतलं आहे..

जं..ग..ल….

त्या जंगलाला तिने प्राणपणाने जपलंय, वाढवलंय. तिथे आंबा-काजू अशी कोकण-स्पेशल लागवड नाही.

तिथे तिने निसर्गाला हवं-तसं,हवं-तेवढं वाढू दिलंय. छोट्या-मध्यम-महाकाय वेली, छोटी-मोठी झुडुपे,

छोटे-मध्यम-महाकाय वृक्ष …… 

सूक्ष्मकिड्यापासून ते फुलपाखरापर्यंत आणि  साळिंदरापासून ते गव्यापर्यंतचे सगळे प्राणी त्या जंगलाला आपलं-घर मानतात….. तो हिरवा-जंगल-सुगंध मी घेतलाय. तिथली ती शाश्वत शांतता.. तिथे साधलेला स्व-संवाद.. सृष्टीची खोल गाभ्यापर्यंत पोचलेली हाक मी ऐकली आहे.

तिने निसर्गाला घातलेल्या सादेला त्याने भरभरून दिलेलं हिरवगच्च प्रतीउत्तर मी त्या जंगलात पाहिलं आहे.

हे सगळं कल्पनेपलीकडचं आहे असं म्हणत आपण आपलंच खुजेपण कुरवाळत राहायचं का? ह्यातलं थोडतरी आपण करू शकतो का???

… शहरात राहणारी, उच्चविद्याविभूषित असलेली, कॉर्पोरेट महिला, एका जीवावर बेतलेल्या अपघातानंतर पुन्हा उभी राहून हे सगळ करत असेल तर आपण ‘आम्हाला नाही बुवा असलं काही जमणार’  हा मंत्र जपणार का? …. आपण तिच्यासारखा शाश्वत-वसा घेऊ शकतो का?? …. घ्यायची इच्छा तरी आहे का?? …. एखादी तरी कृती त्यादिशेने होईल का?…. 

… तिने चाळीस एकर जंगल जपलंय !!! मी दहा स्क्वेअरफुटात काही हिरवं लावेन का??

… मी प्लास्टिक वापरण सोडीन का??

… जर वापरलंच तर त्याचा पुनर्वापर करीन का??

…. पाणी कमीत कमी वापरून बघेन का???

… आठवड्यात दोन दिवस बिनासाबणाची आंघोळ नाक न मुरडता करेन का???

… मी निसर्गाचे देणे मानेन का???

… त्याची ऋणजाण पावलोपावली ठेवेन का???

… प्रश्नांची घुसळण मनात येते आणि… ते प्रश्न-काहूर माझ्या मनात आठ मार्च जवळ आला की जास्तच उधळतं. कारण तेव्हा मी शोधत असते…. ऑफिसच्या महिला-दिनाची पाहुणी.  पण ते कुठेही शोधायची गरज नसतेच.  

… कारण…ती जी कुणी आहे ना….  ती कायमच असते…….. माझ्या मनातल्या महिला-दिनाची पाहुणी..

जिचं नाव असतं …….. शिवांगी चंद्रशेखर दातार !!!!!!

लेखिका : सुश्री योगिनी पाळंदे

प्रस्तुती :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रेमाची अभिव्यक्ती… ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रेमाची अभिव्यक्ती… ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

परदेशी नोकरी करणाऱ्या माझ्या मुलाचा व्हॅाट्सॲप मेसेज :

‘प्रिय बाबा,

आज आम्ही दोघेही बाहेर जेवणार आहोत. त्यासाठी ह्या हॅाटेलात मी आम्हा दोघांसाठी टेबल बुक करुन ठेवलं आहे. मला इथं येऊन अर्धा तास झाला आहे, तरी अजूनही सुनीता आलेली नाही. बहुतेक तिला ॲाफिसमध्ये अचानक काम लागलं असेल. मला वेळ कसा घालवायचा, हा प्रश्न आहे, म्हणून मी तुम्हाला मेसेज लिहित बसलोय…

बाबा, दरवर्षी आम्हाला ह्या दिवशी वेगळं काहीतरी करावंच लागतं. पत्नीवर आपलं ‘प्रेम’ आहे, हे पुन्हा पुन्हा सिद्ध करावं लागतं. व्यक्त व्हावं लागतं. तुम्हाला हे नाही कळणार,  कारण तुम्हाला खात्री होती की, आई तुम्हाला सोडून कधीही कुठे जाणार नाही. कधीतरी ती थकलेली दिसली की, तुम्ही कोपऱ्यावर जाऊन चटकदार ओली भेळ सर्वांसाठी घेऊन यायचा. तेवढ्यानेच ती खुश होऊन जायची. तुम्ही कधी तिला ‘आय लव्ह यू’ म्हटलं होतं का?  की तुमच्या भावना न बोलताच तिच्यापर्यंत पोहचत होत्या?

तुम्ही दरवर्षी गौरी गणपतीला, गौरीला नेसवायला दोन भारी साड्या घेऊन यायचे. आई त्याच साड्या पुढे वर्षभर वापरत असे. त्या साड्या आणल्यावर आई त्यावरुन हात फिरवत म्हणायची, ‘साडीचा पोत किती छान आहे, रंग किती खुलून दिसतोय.’ हीच तिची ‘थॅन्क्यू’ची भाषा होती का? की यातून ती तुम्हाला ‘आय लव्ह यू’ सूचित करीत होती, जे तुमच्यापर्यंत सहज पोहचत होते?

तुम्ही कधी आईसाठी ‘गिफ्ट’ आणल्याचं मला आठवत नाही. मात्र दरवर्षी अक्षय्य तृतीयेला जमेल तशी सोन्याची वेढणी न चुकता आणत होतात. खरंच ती मुहूर्ताची खरेदी होती की एक प्रकारची गुंतवणूक की आईवरील तुमचं ‘प्रेम’, हे मला कधीच कळलं नाही…

बाबा, मला सांगा..तुमच्या भावना न बोलताच आईला कशा कळायच्या? आज सुनीता, मला एक छानसा शर्ट भेट देणार आहे. तुम्हाला कधी आईनं भेट दिल्याचं मला आठवत नाही. मात्र गरम गरम पुरणपोळ्या खाऊन झाल्यावर तुम्हाला आलेला तृप्तीचा ढेकर, हीच तिच्याकडून छान भेट मिळाल्याची पोचपावती असायची का?

काहीच न बोलता, ‘स्पेशल’ काहीच न करता तुम्ही एकमेकांना कसे समजून घेत होतात? की काही अपेक्षाच नव्हत्या कधी तुम्हाला एकमेकांकडून. की फक्त बघूनच सारं कळत होतं? बरोबर राहूनच न बोलता सर्व उमजत होतं?

बाबा, मला इथं येऊन एक तास होऊन गेला. अजूनही सुनीता आली नाही. तिची वाट पाहून मी देखील कंटाळून गेलो आहे. ॲाफिसच्या कामातून तिला बाहेर पडायला जमत नसावं, असं दिसतंय.

आज आमच्याकडे प्रेम आहे, पैसा आहे, मात्र वेळच नाहीये, ते प्रेम व्यक्त करायला…त्यामानानं तुम्ही खरंच भाग्यवान होता… आयुष्यभर आईवर अव्यक्त प्रेम करीत राहिलात आणि ती देखील तुम्हाला सावलीसारखी साथ देत राहिली…

बाबा, मी आता आटोपतं घेतो. मेसेज खूपच मोठा झालाय. वेळ आहे ना, तुम्हाला वाचायला?

तुमचाच,

अजय

मी मोबाईल बाजूला ठेवला व भाजी आणायला गेलेल्या हिची वाट पाहत बसलो. खरंच आम्ही आमच्या सहजीवनात कोणतेही ‘डे’ साजरे केले नाहीत, नव्हे तसे करण्याची कधी गरजही वाटली नाही…

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares