मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रकाश भाऊजी – एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ प्रकाश भाऊजी – एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

शनिवार २१/१/२३ .. प्रकाश भाऊजींना जाऊन बरोबर पंधरा दिवस झाले ! कै. प्रकाश विनायक सहस्रबुद्धे, माझे धाकटे दीर ! आठ डिसेंबरला त्यांना पहिला हार्ट अटॅक आला. एक महिना त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. आणि सात जानेवारीला हे वादळ संपुष्टात आले. बरोब्बर एक महिना अस्वस्थतेत गेला !

गेल्या 45 वर्षाचे आमचे दीर-भावजयीचे नाते ! १९७६साली लग्न होऊन सहस्त्रबुध्द्यांच्या घरात प्रवेश केला तेव्हा पाहिलेले हसतमुख, उमदे, खेळकर, खोडकर स्वभावाचे प्रकाशभावजी डोळ्यासमोर उभे राहतात ! आम्ही दोघेही तसे बरोबरचे, मी एक वर्षाने लहानच, त्यामुळे आमचे दिर- भावजयीचे नाते अगदी हसत खेळत निभावले जात होते.

पुढे १९८१ मध्ये आम्ही सांगलीला आलो. प्लॉटवर शेजारी शेजारी जवळपास बत्तीस वर्षे राहिलो ! एकमेकांची मुले- बाळे खेळवली. एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र आलो. माझी मुले त्यांच्या मुलींपेक्षा दहा-अकरा वर्षांनी मोठी, त्यामुळे प्रथम माझ्या मुलांचं बालपण आणि पुढे त्यांच्या मुलींचे बालपण  जोपासण्यात आमचेही बालपण, तरूणपण टिकून राहिलं !

बी.कॉम. झाल्यावर नोकरी न करता १९७८ साली मार्चमध्ये चैत्र पाडव्याला त्यांनी दुकान सुरू केले… तेव्हा ” केदार जनरल स्टोअर्स ” असं दुकानाला त्यांनी नाव दिलं, तेव्हापासूनच त्यांची केदारबद्दलची आत्मीयता प्रकट झाली ! फारसं भांडवल नसतानाही प्रथम पत्र्याची शेड दुकानासाठी उभारली. तयार घराच्या दोन खोल्यात आईसह राहिले. सायकलवरून सामान आणत. दुकानाची सुरुवात झाली. भरपूर कष्ट घेत दुकानाचे बस्तान बसवले. गोड बोलून गिऱ्हाईकांचा विश्वास संपादन करून, गव्हर्मेंट कॉलनीमध्ये त्यांनी चांगले नाव मिळवले. लग्न झाल्यावर दीप्तीची साथ मिळाली आणि संसाराची गाडी रुळाला लागली. प्रथम मोपेड, नंतर स्कूटर आणि मग मोटरसायकल असा गाड्यांचा प्रवास सुरू झाला !

“उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी” या उक्तीप्रमाणे दीप्ती आणि प्रकाश भाऊजींनी लक्ष्मी घरात आणली. किराणा दुकान आणि कापड दुकान दोन्हीही छान सुरू होते. प्राजक्ता, प्रज्ञाच्या जन्माने घरात आनंदी आनंद झाला. मुली हुशार ! आई-बाबांच्या कष्टाचं चीज करणाऱ्या ! दोघी इंजिनियर झाल्या, नोकरीला लागल्या. दोघींनीही आपापले जीवनसाथी चांगले शोधले ! प्राजक्ता- ओंकार जर्मनीला काही वर्षे राहून परत भारतात आले. प्रज्ञाने निखिलसह संसार थाटला ! २०१९ च्या दिवाळीनंतर मुलींनी आई-बाबांना पुण्यात आणले आणि तीनही कुटुंबांचे एक संकुल  वाकडला तयार झाले. त्यातच प्रज्ञाला मुलगा झाला आणि शर्विलच्या आगमनाने प्रकाशभावजींचा आनंद आणखीनच खुलला ! लहान मुलांची त्यांना खूप आवड ! निवृत्तीचे आयुष्य असे आनंदात चालले होते.

प्रकाशभावजींना लोकसंग्रह करण्याची फार आवड ! वाकडला नव्याने आले तरी शाखेच्या गोतावळ्यात रमून गेले. इतरही अनेक ओळखी करून घेतल्या. बोलका स्वभाव, खेळकरपणे प्रसंग हाताळणे, व्यायाम, खेळाचे महत्व मुलांना पटवणे यासाठी संस्कार वर्ग सुरू केले. त्यात ते इतके रममाण झाले की सांगलीचे आयुष्य बदलून वाकड मध्येही ते तितकेच रमले ! गुलाब फुलांची आवड असल्याने विविध रंगांचे कलमी गुलाब त्यांच्याकडे पाहायला मिळत. फुले आणि मुले दोन्हीची आवड जोपासली. एकंदरीत ते इथे आल्यावर वाकडच्या त्यांच्या घरी हा सर्व आनंद पाहून आम्ही खुश झालो.

सांगलीच्या त्यांच्या आठवणी तर असंख्य आहेत ! पण त्यांची खवैयेगिरी तर जास्तच लक्षात आहे. कोणत्याही आवडलेल्या पदार्थाचे तोंड भरून कौतुक करून खात असत, मग तो कोणी बनवला याच्याशी त्यांना कर्तव्य नसे. गुलाबजाम जास्त आवडत असत. पैज लावून जेवायला आवडत असे. एकदा संपूर्ण जेवणाबरोबर उकडीचे मोठमोठे २१ मोदक त्यांनी संपवले. एका बैठकीला सात आठ पुरणपोळ्या आरामात खात असत! आम्ही सांगलीत असताना छोट्या छोट्या ट्रिप खूप होत असत. बरेच वेळी पाहुणेमंडळी आली की सर्व कार्यक्रम एकत्रच होत असत. शुकाचार्य, ब्रम्हनाळ, नरसोबाची वाडी, कागवाड, हरिपूर, कोल्हापूर अशा ठिकाणी आम्ही ट्रीपला जात असू. सुट्टीत मुलांना पोहायला नेणे, भरपूर सायकलींग करणे, उसाचा रस, भेळ तर कधी खास भाकरी, ठेचा, दही धपाटे असे बेत होत असत. यामुळे सगळ्यांचे एकत्रीकरण तर होईच आणि मुलांना सांघिक कामाचे वळणही लागत असे.

शाखा हा त्यांचा वीक पॉईंट होता.” संघावाचून कोण पेलणार काळाचे आव्हान ” हा संघ मंत्र सतत त्यांच्या तोंडात असे. आमच्या सांगलीच्या घरात मुलांना त्यांचा खूप आधार वाटत असे. काकाने काही सांगितले की ते प्राचीला लगेच पटणार ! लहानपणी प्राची थोडी अशक्त होती. बाबांनी औषध दिले , पण तिचे मानसिक टॉनिक काकाच होता ! केदार तर काकांची काॅपीच ! केदार, प्राची, प्राजक्ता, प्रज्ञा ही चारी मुले सांगलीच्या घराच्या सावलीत वाढली आणि पुण्यात सर्वांचे कर्तृत्व बहरले !

२०१९ साली दिवाळीनंतर मुलींनी आई-बाबांना दुकान बंद करून पुण्यात आणण्याचा निर्णय घेतला. आता सर्व छान सुखात चालू होते. पण काही वेळा नियतीला हे बघवत नाही की काय असे वाटते ! डायबेटीस, बीपी असा कोणताही आजार नसलेल्या प्रकाशकाकांना अचानक हार्ट अटॅक येतो, हेच मनाला पटत नव्हते ! त्यानंतर झालेली बायपास सर्जरी, त्यातच वरचेवर होणाऱ्या खोकल्याचा, कफाचा त्रास आणि न्युमोनिया पॅच या सर्वांमुळे त्यांची तब्येत खालावत गेली. मुली- जावई आणि सर्वांनी जीव ओतून त्यांचा जीव वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. चार जानेवारीला त्यांचा वाढदिवस होता. ७० वर्षे पूर्ण झाली. तो मनाप्रमाणे साजरा करून त्यांनी जगण्याची आशा दाखवली पण….. काळापुढे इलाज नाही.. शेवटच्या एक-दोन दिवसात तब्येतीने साथ दिली नाही. आणि अखेर “आई, काका गेला गं ” हे केदारचे शब्द फोनवरून सात जानेवारीला सकाळी नऊ पंचेचाळीस वाजता माझ्या कानावर आले. डोकं बधीर झालं ! तब्येत खालावली आहे हे ऐकणं वेगळं आणि प्रकाश काका आता पुन्हा दिसणारच नाही हे सत्य पचवणं फार अवघड आहे. तरीही कालाय तस्मै  नमः! 

त्यांच्या स्मृती तर आम्ही ठेवूच, पण जाणीव होते की आपलीही सत्तरी आली.  ” मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे…” हे मनात ठेवून येणारा प्रत्येक क्षण आपण चांगला जगू या असे वाटते, एवढे मात्र खरे ! कै. प्रकाश भाऊजींना माझी मनःपूर्वक श्रद्धांजली !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शिक्षण महर्षी, कृषीरत्न डॉ. पंजाबराव देशमुख… – माहिती संकलन – श्री सुनिल हटवार ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ शिक्षण महर्षी, कृषीरत्न डॉ. पंजाबराव देशमुख… – माहिती संकलन – श्री सुनिल हटवार ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

शिक्षण महर्षी, कृषीरत्न डॉ. पंजाबराव देशमुख..

(जन्म : २७ डिसेंबर १८९८- पापळ, अमरावती, महाराष्ट्र. मृत्यू : १० एप्रिल १९६५– दिल्ली) 

‘भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा ‘ हे ब्रीदवाक्य असणारे डॉ.पंजाबराव  ऊर्फ भाऊसाहेब देशमुख यांचे चरित्र आणि कार्य हिमालयापेक्षा उत्तुंग आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. देशातील शेतकरी आणि महाराष्ट्रातील शिक्षणाची अवस्था भाऊसाहेबांनी अनुभवली होती.

शेतकरी कुटुंबात जन्मास आलेल्या पंजाबरावांचे इयत्ता ३ री पर्यंतचे शिक्षण पापड या गावीच झाले. ४था वर्ग नसल्याने एक वर्ष पुन्हा ३ ऱ्याच वर्गात शिक्षण घ्यावे लागले. पुढे चांदूर रेल्वेच्या प्राथमिक शाळेत चौथा वर्ग पूर्ण केला.

माध्यमिक शिक्षण (कारंजा) लाड येथे तर matric चे शिक्षण अमरावतीच्या हिंदू हायस्कूल मधून पूर्ण केले.

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मधून इंटरमिडीएटचे शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी भाऊसाहेब इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी ‘वेद वाड:मयातील धर्माचा उद्गम आणि विकास’ (१९२०) मध्ये OXFORD विद्यापीठाची डॉक्टरेट (पी.एच.डी.)  ही पदवी संपादन केली. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रकांड पांडित्य संपादन करणारे भाऊसाहेब कधीच पोथीनिष्ठ नव्हते, तर ते होते कृतीनिष्ठ. बहुजनांचे दु:ख दूर करणारे डॉक्टर व अन्याय दूर करण्यासाठी झगडणारे ते Barrister होते.

महाराष्ट्राच्या शिक्षणाचे शिल्पकार म्हणजे दोन भाऊ– भाऊसाहेब पंजाबराव देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील.  देशातील सर्वात मोठ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना भाऊसाहेबांनी १९३१ मध्ये अमरावती येथे केली.  यानंतर विदर्भाचा ‘शैक्षणिक विकास– भारतीय शेती– शेतकरी– आणि बहुजन उद्धाराची चळवळ’ हे भाऊसाहेबांच्या जीवनाचे ध्येय ठरले. बहुजनांच्या शिक्षणातील अडचण ही प्रतिगाम्यांची मनुवादी विचारधारा आहे. ही मनुवादी विचारधारा नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. शोषितांचे उद्धारकर्ते आणि कृषकांचे कैवारी असलेल्या भाऊसाहेबांनी “जगातील शेतकऱ्यांनो संघटीत व्हा” हा मंत्र दिला. देशाचे कृषिमंत्री असताना १९५९ ला त्यांनी शेतकऱ्यांसाठी “जागतिक कृषि प्रदर्शनाचे” आयोजन केले. तसेच जपानी भातशेतीचा त्यांचा प्रयोग उल्लेखनीय आहे. ते कृषि विद्यापीठाच्या कल्पनेचे जनक आहेत.

बहुजनांच्या शिक्षणाचे शिल्पकार आणि कृषिक्रांतीचे अग्रदूत म्हणून ओळखले जाणारे डॉ. पंजाबराव देशमुख उच्च शिक्षण घेऊन  स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. इ.स. १९३६ च्या निवडणुकीपश्चात ते शिक्षणमंत्री झाले. स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषी मंत्री होते. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,०००च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये सुरू करून त्या संस्था शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहेत.

शिक्षण, शेती, सहकार, अस्पृश्यांचा उद्धार, जातीभेद निर्मूलन, धर्म इ. विविध क्षेत्रात त्यांनी अवाढव्य कार्य केले. ग्रामीण समाज पोथीनिष्ठ आणि परंपरानिष्ठ असल्याने त्यांच्यात अज्ञान, अंधश्रद्धा, दैववाद, अवैज्ञानिकता, देवभोळेपणा खच्चून भरल्यामुळेच हा समाज शिक्षणापासून वंचित राहिला हे त्यांना ठाऊक होते. वर्णवर्चस्ववाद हा ग्रामीण बहुजन समाजाला पद्धतशीरपणे शिक्षणापासून दूर ठेवण्यासाठीचा प्रयत्न होता असे त्यांचे मत होते. 

जुलै १९२६ नंतर भारतात परत आल्यावर चातुर्वर्णप्रणीत जातीव्यवस्था , अश्पृश्यता, अज्ञान, दारिद्र्य, पारतंत्र्य यासाठी त्यांनी स्वत:ला पूर्णत: वाहून घेतले. १९२७ सालच्या मोशीच्या हिंदुसभेच्या अधिवेशनाचा डॉ.पंजाबराव देशमुखांनी ताबा घेतला व आपल्या ओजस्वी भाषणातून सबंध श्रोतावर्ग काबीज केला. चातुर्वर्ण, अश्पृश्यता,जातीभेद याचा 

निषेध-ठराव वामनराव घोरपडे यांनी मांडला व भाऊसाहेब याला अनुमोदन देताना म्हणाले, “आमची गुलामगिरी नष्ट करण्याकरिता अस्पृशता निवारणासारख्या सुधारणांच्या चिठ्ठ्या हिंदूधर्माला जोडून आम्ही त्याची भोके बुजविण्याचा प्रयत्न करीत आहोत. चातुर्वर्ण व्यवस्थेचा रांजण दुरुस्त झाला नाही तर तो रांजणच फोडून टाकण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही.” — 

डॉ.पंजाबराव देशमुखांच्या बहुजन उद्धाराच्या कार्यावर चिडलेल्या मनुवाद्यांनी त्यांच्या खुनाचाही प्रयत्न केला. पण भाऊसाहेब डगमगले नाहीत, पुढे त्यांनी २६ नोव्हेम्बर १९२७ रोजी सोनार कुटुंबात जन्मलेल्या कु. विमल वैद्य या युवतीशी आंतरजातीय विवाह करून मराठा-सुवर्णकार नातेसंबंध जुळवून आणले. १९३२ मध्ये त्यांनी  हिंदू देवस्थान संपत्ती बिल आणले. भाऊसाहेबांनी डॉ. बाबासाहेबांसोबत १९२७ मध्ये अमरावती येथील अंबादेवी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला. मंदिर प्रवेशामागे ईश्वर भक्तीचा त्यांचा उद्देश नव्हता. भाऊसाहेबांचा देवावर विश्वासच नव्हता. ते म्हणत ,” मूर्तीत देव असेल तर मूर्तीत देव घडविणारा कारागीर हा देवाचा बापच ठरेल.”

त्यांचे कार्य —-

खरोखरच आजही डॉ. भाऊसाहेबांचे कार्य शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षक, संस्थाचालक, शिक्षणतज्ञाना तसेच बहुजन समाजाला प्रेरणादायी आहे.

१९२७- शेतकरी संघाच्या प्रचारासाठी ‘महाराष्ट्र केसरी’ हे वर्तमानपत्र चालविले.

— वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास’ या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट.

१९३३ – शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारiत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.

१९२६ – मुष्टिफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.

१९२७ – शेतकरी संघाची स्थापना.

१८ ऑगस्ट १९२८ – अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह .

१९३० – प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री

१९३२ – श्री. ए. डब्ल्यू. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना.

 – ग्रामोद्धार मंडळाची स्थापना.

१९५० – लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रूपांतर झाले.

१९५५ – भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने ‘राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.

१९५६ – अखिल भारतीय दलित संघाची स्थापना.

— लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड.

१९५२ ते ६२ केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री. भारताचे पहिले कृषिमंत्री.

— देवस्थानची संपत्ती सरकारने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देशाने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले.

— प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.

१९६० – दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले.

पंजाबराव देशमुखांच्या जीवनावर आधारित  “ सूर्यावर वादळे उठतात “ हे नाटक, बाळकृष्ण द. महात्मे यांनी लिहिले आहे. 

माहिती संकलन : श्री सुनिल हटवार

.. ब्रम्हपुरी, चंद्रपूर – मो 9403183828    

संग्राहक : विनय मोहन गोखले    

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ या झोपडीत माझ्या… कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆ रसग्रहण – सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

? काव्यानंद ?

☆ या झोपडीत माझ्या… कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆ रसग्रहण – सौ. सुचित्रा पवार

☆ या झोपडीत माझ्या… कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆

राजास जी महाली

   सौख्ये कधी मिळाली

   ती सर्व प्राप्त झाली

   या झोपडीत माझ्या….

 

भूमीवरी पडावे

ताऱ्यांकडे पहावे

प्रभूनाम नित्य गावे

या झोपडीत माझ्या..

 

पहारे आणि तिजोऱ्या

त्यातून होती चोऱ्या

दारास नाही दोऱ्या

या झोपडीत माझ्या

 

  जाता तया महाला

    ‘मज्जाव’शब्द आला

    भीती न यावयाला

     या झोपडीत माझ्या.

 

   महाली मऊ बिछाने

   कंदील श्यामदाने

    आम्हा जमीन माने

     या झोपडीत माझ्या..

 

   येता तरी सुखे या

    जाता तरी सुखे जा

    कोणावरी ना बोजा

     या झोपडीत माझ्या

 

  पाहून सौख्य माझे

       देवेन्द्र तो ही लाजे

        शांती सदा विराजे

         या झोपडीत माझ्या..

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

 – कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

☆ या झोपडीत माझ्या… कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆ रसग्रहण – सौ. सुचित्रा पवार

झोपडी म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती झोपडपट्टी,झोपड्यांची गळकी वस्ती,दुःख, दैन्य,दारिद्र्य,बकाल वस्ती आणि तिथली व्यसनाधीनता,अस्वच्छता,

गुन्हेगारी.थोडक्यात जिवंतपणी नरक.

मोठमोठ्या शहरात अशाच प्रकारचे चित्र असते.आणि बऱ्याचदा झोपड्या हटत नाहीत त्याला झोपडपट्टीचे एक राजकारण असते.बऱ्याचदा बेरकी माणसांच्या  परिस्थितीची ती एक ढाल असते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी  त्यांच्या एका कवितेत वर्णन केलेली झोपडी मात्र खूपच आगळी वेगळी आहे.प्राप्त परिस्थितीत सुखी राहण्याचा जणू आनंदी मंत्र!

  राजास जी महाली

   सौख्ये कधी मिळाली

   ती सर्व प्राप्त झाली

   या झोपडीत माझ्या….

राजाचा महालसुद्धा माझ्या झोपडीपुढं फिका आहे कारण त्याला इतका खर्च करून बांधलेल्या महालात जी सुख समृद्धी लाभल्या ती माझ्या चंद्रमौळी झोपडीमध्ये काहीच खर्च न करता अनुभवतो आहे.कोणती सौख्ये कवी अनुभवत आहे?

भूमीवरी पडावे

ताऱ्यांकडे पहावे

प्रभूनाम नित्य गावे

या झोपडीत माझ्या..

साधी गोष्ट आहे!तुम्ही सहजच माझ्या झोपडीतल्या जमिनिवर झोपलात तर आकाशात नजर जाईल आणि असंख्य लुकलुकत्या चांदण्या तुमचं मन वेधून घेतील.ते चांदण्याचे आभाळ दिलासा देत असतानाच मुखात मात्र प्रभूचे नाव नित्य असते  कारण त्याचीच तर सर्व कृपा आहे.हे चांदण्यांचे आकाश,ही हवा, हा स्वच्छ सूर्यप्रकाश त्याचीच तर रूपे आहेत!त्याच्याच कृपेने आपण हे सारे अनुभवतो आणि श्वासदेखील घेतो.या माझ्या झोपडीत फक्त इतकेच करायचेआहे.

महालात हे काहीच तुम्हाला अनुभवता येणार नाही.

पहारे आणि तिजोऱ्या

त्यातून होती चोऱ्या

दारास नाही दोऱ्या

या झोपडीत माझ्या

महालात रात्रंदिवस पहारेकरी दाराशी असतात, गस्त घालतात.संपत्तीचे रक्षण करण्यासाठी मोठमोठ्या अवजड तिजोऱ्या असतात तरीही तिथं चोरी होतेच पण झोपडीत माझ्या ही भीती मुळीच नाही.माझ्या झोपडीला दरवाजा नाही,पहारेकरी नाहीत की लुटारूनी चोरून नेण्यासाठी ऐहिक संपत्तीदेखील ;त्यामुळं चोरी होऊच शकत नाही. अष्टौप्रहर माझी झोपडी कुणालाही सामावून घेण्यास सज्ज असते.असे असूनही चोर मात्र कधीच चोरी करत नाहीत.(कारण ऐहिक असते त्यालाच लोक मौल्यवान म्हणतात आणि आत्मिक अदृश्य चिरंतन असते त्याला मात्र सोडून देतात)

      जाता तया महाला

    ‘मज्जाव’शब्द आला

    भीती न यावयाला

     या झोपडीत माझ्या..

महालात तुम्ही सहज जावयाचे म्हणले तर पहारेकरी लगेच अडवतात,आत जायला मज्जाव अर्थात बंदी असते पण इकडं माझ्या झोपडीच्या शब्दकोशात मज्जाव हा शब्दच नाही.ती कुणालाही सहजच आत सामावून घेते.कुठलाही पहारेकरी तुम्हाला दरडावणार नाही की भीतीही घालणार नाही.सहजच कुणीही यावे न माझ्या झोपडीत विसावावे.

       महाली मऊ बिछाने

   कंदील श्यामदाने

    आम्हा जमीन माने

     या झोपडीत माझ्या..

महालात सर्वांना झोपायला मऊ मऊ बिछाने असतात.परांच्या गाद्या,मऊ उश्या डोक्याखाली, पांघरायला ऊबदार पांघरुण असतात.वर छताला छान छान ,आकर्षक झुंबरे,प्रकाशासाठी कंदील- शामदाने लटकवलेली असतात.छान,शांत झोपेसाठी सर्वप्रकारच्या सोयी सुविधा केलेल्या असतात पण तरीही सुखाच्या झोपेची शाश्वती नसते; मात्र आमच्या झोपडीत जमीन अंथरायला, आभाळ पांघरायला असते,जमिनीला पाठ लागताच शांत सुखाची झोप लागते.

      येता तरी सुखे या

    जाता तरी सुखे जा

    कोणावरी ना बोजा

     या झोपडीत माझ्या..

महालात जाताना सर्वसामान्य माणसाला एक अनामिक भीती,दडपण असते.तिथल्या भव्य -दिव्यपणाने उर दडपतो; पण झोपडीत तुम्हाला असे काही वाटणार नाही.माझ्या या झोपडीत प्रत्येकाने कधीही केंव्हाही आनंदाने यावे-जावे,इथं कुठलंच भय नाही की अवघडलेपण वाटणार नाही.

      पाहून सौख्य माझे

       देवेन्द्र तो ही लाजे

        शांती सदा विराजे

         या झोपडीत माझ्या..

असं हे झोपडीतलं वैभव आणि सौख्य पाहून प्रत्यक्षात इंद्राला सुद्धा लाज वाटते,इंद्रसुद्धा माझ्या झोपडीचा आणि तेथील सौख्याचा हेवा करतो,यापेक्षा झोपडीतली महानता मी काय वर्णावी?माझ्या या झोपडीत नेहमीच शांतता वसते.आणि जिथे शांती तिथेच सौख्य आणि समाधानही.

अगदी साध्या सोप्या शब्दात तुकडोजी आपल्या झोपडीचे वर्णन करतात.माणसाचे चित्त समाधानी असेल तर त्याला कोणत्याही भौतिक ऐश्वर्याची गरज नसते हेच यातून सूचित होते.माणूस भौतिक सुखांच्या मागे लागतो आणि चिरंतन,शाश्वत मनाची शांती हरवून बसतो.कितीही सुख मिळाले तरी त्याचे मन भरत नाही आणि हाव सुटत राहते.यातच त्याचे मानसिक स्वास्थ्य हरवते आणि सुखाची निद्रा देखील.

एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावरील खोपसुद्धा अशीच असते ना?खोपीत सुद्धा हेच सुख असते.

काय नसते या झोपडीत?

समोरील शेत शिवार,नाना पाखरांचे नाना आवाज,भिरभिरता मोकळा वारा,काम करून भूक लागल्यावर खाल्लेली अमृताहून रुचकर खर्डा भाकरी महालातील पंच पक्वान्नाला मागे सारते.

सुखाचे परिमाण आपल्या मनातच असते.म्हणूनच महालात सर्व सुखे असून तिथली माणसे सुखी असतीलच असे नाही आणि झोपडीत काही नाही म्हणून तिथली माणसे दुःखी असतीलच असेही नाही.

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नातवंडांचे दादाजी… ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

??

 ☆ नातवंडांचे दादाजी… ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

बारा वर्षांपूर्वीची गोष्ट… त्यावेळी आम्ही मुलाकडे बेंगलोरला गेलो होतो. दीड एक वर्षाचा मोठा नातू  बोलायला लागला होता. समोर राहणाऱ्या सिंधी परिवारात तो खूप रमायचा. त्यांच्यात जे आजोबा (दादाजी) होते, त्यांना तो ‘दाद्दाजी’ म्हणायला लागला होता. मग काय त्याने ‘ह्यांना’ही दाद्दाजी म्हणायला सुरुवात केली. आबा,आजोबाऐवजी ह्यांचे दादाजी हेच संबोधन रुढ झाले.. आणि त्यांना ते आवडले ही !

२०१९ मध्ये आम्ही ऑक्टोबर महिन्यात बेंगलोरला गेलो होतो. परत यायची काही गडबड नव्हती. तिथे नेहमीप्रमाणेच आमचं छानपैकी  रुटीन सुरू झालं होतं. दादाजींचं मॉर्निंग वॉकला जाणं, कूक अम्मा घरात किती चांगला नाश्ता बनवत असली तरी बाहेरून इडली- वडे, उपीट, सेट डोसा असं काहीतरी खाऊन येणं, घरात कुठली भाजी आहे कुठली भाजी नाही हे न बघता खूप सगळी भाजी घेऊन येणं, वेळ मिळेल तेव्हा नातवंडांना शिस्त लावणं, त्यांच्याकडून योगाभ्यास करून घेणं  इत्यादी!

एक फरक मला यावेळी जाणवला तो म्हणजे आपल्या पाच आणि नऊ वर्षाच्या नातवंडांबरोबर ते त्यांच्या वयाचे होऊन खेळू लागले होते. आपलं  वय वर्षं 78 विसरून!

एक दिवशी मला ग्राउंड फ्लोअर मधूनच मुलांच्या आयाचा फोन आला, ” मॉंजी, दादाजी ध्रुव, मिहीर के साथ फुटबॉल खेल रहे है .” मी दचकले. ताबडतोब तिथे पोहोचले. एक बेंचवर दादाजी आपले दोन्ही गुडघे चोळत बसलेले दिसले. “आजी, दादाजीनं जोरात किक् मारली” ध्रुवनं माहिती पुरवली. ” ते ना पळत जाऊन फुटबॉल पण पकडत होते.” त्याचं गुडघ्याचे दुखणे, चालतानाही होणारा त्रास. याची सगळी आठवण मला करून द्यावी लागली. त्यानंतर त्यांचे फुटबॉल खेळणे थांबले. पण दिवसेंदिवस मी पाहत होते, त्यांचं मुलांच्या वयाचं होऊन खेळणं वाढतच होतं. कॅरम खेळताना, पत्ते खेळताना जरा मुलांना जिंकून द्यायचं…. जसं मी करते… हे माझं म्हणणं त्यांच्या कानापर्यंत पोहोचायचंच नाही. हळूहळू मी पण दुर्लक्ष करायला सुरुवात केली. ‘ चालू दे दादाजी आणि नातवंडांच्या दंगा ‘ असा विचार करून !

मग एक दिवस त्यांचं लहान मुलांबरोबर छोट्या सायकलवरून अपार्टमेंटला चकरा मारणं, ही तक्रार माझ्या कानावर पडली. ग्राउंड फ्लोअरवरून  शाळेतून आलेल्या नातवांबरोबर लिफ्ट सोडून जिन्यावरून सातव्या मजल्यापर्यंत जिने चढून येणं…. ही त्या तक्रारीत पडलेली भर. एकदा तर छोटा नातू सांगू लागला, “आजी आज तिकदे कोणीही बघायला नव्हतं ना तल दादाजी माझ्याबलोबल घसलगुंदीवल चधला. आणि अगं खूप जोलात खाली आपतला, पदला.. मी खलं सांगतोय.. विचाल त्याला बाऊ झालाय का ते.”

हे मोठ्या मजेत हसत उभे होते. मी कपाळाला हात लावला.. त्या क्षणी एकदमच माझ्या मनात विचार आला,

‘लहानपणी कधी घसरगुंडीवर बसायला मिळालेच नसेल. तेव्हा कुठे होते असले चिल्ड्रनपार्क.. घसरगुंडी… झोपाळे.. सिसॉ… आणखी काय काय! मनात खूप खोलवर दडलेल्या सुप्त इच्छेनेच त्यांना असं करायला भाग पाडलं असेल.

तीन महिने असेच दादाजींनी त्यांचे बालपण जपण्यात व्यतीत  केले. आम्हाला माधवनगरला परत यायला चार-पाच दिवसच उरले होते. एक दिवस दादाजींनी स्वतःबरोबरच ‘विटामिन सी’ ची एक एक टॅब्लेट मुलांच्या हातात ठेवलेली मी पाहिली.” अरे मिहीर, ते औषध आहे .नका खाऊ. कडू कडू आहे.” मी जरा जोरातच ओरडत तिथे जाऊन पोहोचले. तोपर्यंत दोघांनी गोळ्या चोखायला सुरुवात केली होती. ” नाही आजी, गोली कदू नाहीय.. गोली आंबत गोद आंबत गोद.. छान छान आहे, ए दादाजी आजीला पण दे एक गोली ” धाकटं मापटं खूप खुशीत येऊन बोललं.” ‘विटामिन सी’ ची गोळी खाऊन नातवंडं खूप खुश झाली होती.

काही बोलायला मला जागाच राहिली नव्हती. नेहमीच एक गोष्ट मी मार्क केली होती की हल्ली जे  सुना-मुलींचे नवऱ्याला नावाने हाक मारणे, किंवा मुलांचे वडिलांना” ए बाबा,ए डॅडी”म्हणणे हे ह्यांना अजिबात पसंत नव्हते. पण नातवंडे पहिल्यापासून ए दादाजी म्हणायची. त्यावर त्यांचा अजिबात आक्षेप नव्हता. उलट खूप समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेले असायचे.

मुलगा डॉक्टर… मी लगेच विटामिन सी बाबतची गोष्ट त्याला सांगितली .”जाऊ दे आता, चार-पाच दिवसांचा प्रश्न आहे ना? ते काही ऐकणार नाहीत. तू काळजी करू नको. पाहिल्यात मी त्यांच्याकडच्या टॅब्लेट्स. जास्त स्ट्राँग नाहीत.” मुलाने मला समजावले.

माधव नगरला परत जाण्यासाठी आम्ही स्टेशनवर पोहोचलो.तेव्हा माझ्या लक्षात आलं की बेंगलोरला येताना दादाजींच्या हातात काठी होती. गुडघेदुखीमुळे चालताना सपोर्ट म्हणून ते हातात नेहमी काठी बाळगायचे .पण या तीन महिन्याच्या मुदतीत त्यांच्या हातून काठी कधी सुटून गेली कळलेच नाही. नातवंडांबरोबर खेळून एक वेगळीच शक्ती त्यांच्यात आली होती. त्यांना एक छान टॉनिक मिळालं होतं.

यथावकाश फेब्रुवारी 20 मधे आम्ही माधवनगरला येऊन पोहोचलो .करोनाची थोडीशी सुगबुगाहट सुरू झाली होती. नंतर पुढे 2020 साल आणि अर्धे 21साल करोनामय झाले.  आम्हीही बेंगलोरला जाऊ शकलो नाही …आणि ते लोकही इकडे येऊ शकले नाहीत. दादाजी आणि नातवंडांची गाठ भेटही झाली नाही.

कधी कधी माझ्या मनात यायचं की खरेच सत्तरी पार केलेले आम्ही सगळेजण आणि ऐशी गाठलेले ते …. सर्वजणच आपापल्या घसरगुंड्यांवर बसलो आहोत. काही घसरगुंड्या कमी उताराच्या… काही जास्त उताराच्या… काही खूप उंच.. काही घुमावदार, प्रत्येक जणाला उतारावरुन घसरत जायचेच आहे. पण कोणी मुंगीच्या वेगाने,कोणी रखडत रखडत ,कोणी वेग आला की रडतडत, तर कोणी क्षणार्धात घसरून जाणार आहे.      

दादाजींनी जोरात घसरत जाण्याचा मार्ग स्वीकारला. 14 सप्टेंबर 2021 ला हसत बोलत चहा पिता पिता ते क्षणार्धात त्या अदृश्य घसरगुंडी वरून सरकन् घसरत आमच्यापासून दूर गेले.. पुन्हा परत न येण्यासाठी ! आम्हा सर्वांसाठी तो अविश्वासनीय असा खूप मोठा धक्का होता. पण काय करणार…. रिवाजाप्रमाणे सगळे धार्मिक क्रियाकर्मं पार पडले. आणि मुलांबरोबर मी ही बेंगलोरला गेले.     

एके दिवशी संध्याकाळची वेळ… अंधार पडू लागला होता. हळवं मन कावरं बावरं झालं होतं .”आजी ही बघ दादाजीची काठी”. नातवंडे मला म्हणाली .वस्तुस्थिती समजून ती दोघेपण आता नॉर्मल झाली होती .”आजी लोकं डाईड झाली की ती स्काय मध्ये जातात नां.  आणि मग देवबाप्पा त्यांना स्टार बनवतो नां!…मी नकळत मान हलवली. “आजी आम्ही दादाजीची काठी खेळायला घेऊ शकतो?” ते दोघं विचारत होते……. आणि काहीच न बोलता बधिर मनाने मी एकदा त्या काठीकडे आणि एकदा आकाशातल्या एका.. इतरांपासून दूर एकट्याच मंदपणे चमकणाऱ्या ताऱ्याकडे विमनस्कपणे पाहत राहिले होते.

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सेवा परमो धर्म: – लेखक – श्री विनीत वर्तक ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ सेवा परमो धर्म: – लेखक – श्री विनीत वर्तक ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

१४ जानेवारी २०२३ चा दिवस होता. एकीकडे देश मकरसंक्रांती साजरी करण्याची तयारी करत होता. तर तिकडे मेघा इंजिनिअरिंग इंडस्ट्री लिमिटेडचे कामगार झोझीला बोगद्याचे काम करत होते. संध्याकाळी साधारण ५:४० च्या सुमारास अचानक हिमस्खलन झालं, त्यासोबत तिकडे काम करणारे तब्बल १७२ कामगार त्यात अडकले. त्यांचा संपूर्ण जगाशी संपर्क तुटला. 

हे हिमस्खलन इतकं भीषण होतं की सुटकेचा कोणताच मार्ग दिसत नव्हता. परिस्थितीचं गांभीर्य आणि तब्बल १७२ लोकांच्या जीवाची जबाबदारी ओळखून मेघा इंजिनिअरिंग इंडस्ट्री लिमिटेडच्या प्रोजेक्ट इंजिनिअरने तात्काळ भारतीय सेनेशी संपर्क साधला. समोर आलेल्या प्रसंगाची व्याप्ती लक्षात घेऊन भारतीय सेनेने तात्काळ प्रशिक्षित सैनिकांची एक तुकडी रवाना केली. त्या भीषण परिस्थितीत संपूर्ण बर्फातून आपल्या जीवाची तमा न बाळगता त्यांनी रात्रीच्या अंधारात त्या १७२ लोकांना बर्फातून शोधून काढलं. त्यांना शांत करून भारतीय सेना आपल्या  ‘सेवा परमो धर्म:’ या आपल्या कर्तव्यात कुठेही कमी पडणार नाही, असं सांगून आश्वस्त केलं. 

१५ जानेवारीचा सूर्य उगवताच भारतीय सेनेच्या आसाम रायफल्स रेजिमेंटने त्या अडकलेल्या कामगारांना सोडवण्यासाठी युद्ध पातळीवर मिशन हाती घेतलं. अश्या वातावरणाची सवय असलेले प्रशिक्षित स्पेशल कमांडो, हत्यारे आणि प्रशिक्षित कुत्रे त्यांनी या मिशनसाठी रवाना केले. त्याशिवाय यात अडकलेल्या लोकांच्या तब्यतेची काळजी घेण्यासाठी मेडिकल टीमही पाठवण्यात आली. 

भारतीय सेनेने एकाही कामगाराला इजा न होऊ देता तब्बल १७२ कामगारांची त्या भीषण परिस्थितीतून सुखरूप सुटका केली. एकीकडे देश जिकडे संक्रांतीचा सण साजरा करत होता, तिकडे दुसरीकडे भारतीय सेनेने १७२ जणांच्या जीवावर आलेल संकट दूर केलं होतं. 

भारतीय सेनेच्या त्या अनाम वीर सैनिकांना माझा कडक सॅल्यूट… 

जय हिंद!!!

लेखक – श्री विनीत वर्तक

( फोटो शोध सौजन्य :- गुगल )

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ATM बद्दल थोडंसं — ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ATM बद्दल थोडंसं — ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

प्लीज हे वाचा…

तुम्हाला माहित आहे का?

जर का तुमच्या एटीएम (ATM) कार्डासहीत तुमचं कोणी अपहरण केलं, तर काही काळजी करू नका !

 तुम्ही त्यांना अजिबात विरोध करू नका,

अपहरणकर्त्याच्या सांगण्यानुसार ATM मशीनमध्ये तुमचं ATM कार्ड टाका. तुम्ही काळजी करण्याचं

काहीही कारण नाहीये .फक्त तुम्ही अपहरणकर्ते सांगतील, त्याप्रमाणे पैसे काढण्याचे काम करा !

—-पण तेव्हा, आपल्या ATMचा PIN उलटा टाईप करा—

समजा, जर का आपला PIN १२३४ असेल, तर त्या जागी ४३२१ असा टाईप करा.

आणि मग त्यानंतर पाहा काय होतं ते. तुम्ही PIN क्रमांक उलटा टाईप केल्याने ATM मशीनला कळेल की,

तुम्ही काही तरी अडचणीत आहात. त्यामुळे तुम्ही फारच अडचणीत आहात हे जाणवल्याने ATM मशीन तुमच्या बँकेला आणि जवळच्या पोलीस स्टेशनलाही सूचना देईल. आणि त्याचबरोबर ATM चा बँकेचा दरवाजा देखील लगेचच बंद होईल.—- आणि अपहरणकर्त्याला काहीही न कळता तुम्ही सुरक्षितरित्या वाचू शकता.

 

ATM मध्येपहिल्यापासूनच सिक्युरिटीबाबत अशी सोय करण्यात आली आहे. याबाबत फारच थोड्या लोकांना माहिती आहे — तर तुम्ही अपहरणकर्त्याला सहजपणे पकडून देऊ शकता.

तुमच्या मित्रांना पण ह्याबद्दल सांगा…

From…Mumbai Police, Maharashtra Police

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ झाकोळ… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ झाकोळ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

बरेचदा आपण छोट्या छोट्या कारणामुळं नाराज होतो ,निराश होतो व हातातील काम बाजूला पडते .

कोणत्याही स्थितीत आपण आपले मनःस्वास्थ्य बिघडू देऊ नये, कारण कोणतेच दिवस घर करून जीवनात रहात नाहीत तसेच सुदृढ मन एव्हढ्या तेव्हढ्या कारणावरून विचलित होत नसते .

आपले मनःस्वास्थ्य बिघडले तर सभोवतालची परिस्थिती बदलत नाही. उलट परस्थिती आपल्यावर हवी होते व आपण त्या स्थितीचे गुलाम होतो. दिवस पुढे सरकतात अन मग बरेच काही यात निसटून जाते– आणि फक्त न फक्त पश्चाताप शिल्लक रहातो .जीवन पुन्हा पुन्हा मिळत नाही. म्हणून परिस्थितीवर आपल्याला स्वार होता आलं पाहिजे,  त्याचे लगाम आपल्या हाती खेचता आले पाहिजेत. अगदीच काळोखात चांदण्या नसल्या तरी काजवा तरी असतोच ! कधी काजवा, कधी चांदणी तर कधी चंद्र जीवनात प्रकाश देतोच !

आपण स्वयं सूर्य आहोत, फक्त झाकोळले आहोत. तो झाकोळ दुसरे कुणी दूर करणार नाही, आपली आभा तेज पसरायला तो झाकोळ आपणच दूर करायचाय, किंवा त्या झाकोळातून पुढे जायचंय .

जो काटा पायात रुतून बसलाय तो कुरूप करतो. तो काटा हळुवारपणे काढून टाकता आला पाहिजे, किंवा तो तसाच पायात ठेवून त्याची टोकदार बोच मोडता आली पाहिजे.

निराशेच्या या अंध:कारात आपले खूप काही हरवते जे कधीच परत येणार नसते. बरेचदा आपली म्हणणारी 

माणसे ,कामाच्या ठिकाणची, आसपासची माणसे, मित्र, मैत्रिणी, नैराश्य, दुःख, मानसिक यातनेचे झाकोळ पसरतात आपल्या जीवनावर.

ज्या गोष्टीपासून त्रास होतोय ती गोष्ट महत्वाची असली तरी डिलीट करता यायला पाहिजे ….. 

” झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा ” असं मनाला बजावून झाकोळातून  सूर्य होऊन तळपायला हवे .

 …… Be happy be positive. 🌹

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बाण स्तंभ ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ बाण स्तंभ ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

इतिहास हा फार चकवणारा विषय आहे. आणि इतिहासाचा मागोवा घेता घेता आपण एखाद्या अश्या जागी येऊन उभे राहतो की मन अक्षरशः थक्क होऊन जाते. हे असं शक्य आहे का, या विषयी मनात गोंधळ उडतो. दीड हजार वर्षांपूर्वी हे इतकं प्रगत ज्ञान आपल्यापाशी होतं यावर विश्वासच बसत नाही.

गुजराथच्या सोमनाथ मंदिरापाशी येऊन आपली अशीच परिस्थिती होते. मुळात सोमनाथ मंदिराचा इतिहासच विलक्षण. बारा ज्योतिर्लिंगातील हे एक देखणं, वैभवशाली शिवलिंग. इतकं समृध्द की उत्तर पश्चिमेतून येणाऱ्या प्रत्येक आक्रमकाचं लक्ष सोमनाथकडे गेलं आणि अनेकवार सोमनाथ लुटल्या गेलं. सोनं, नाणं, चांदी, हिरे, माणकं, रत्न.  सर्व गाडे भरभरून नेलं. आणि इतकी संपत्ती लुटल्या जाऊनही दर वेळी सोमनाथचं शिवालय परत तश्याच वैभवानं उभं राहायचं.

मात्र फक्त ह्या वैभवासाठी सोमनाथ महत्वाचं नाही. सोमनाथचं मंदिर भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर आहे. विशाल पसरलेला अरबी समुद्र रोज सोमनाथाचे पादप्रक्षालन करत असतो. आणि गेल्या हजारो वर्षांच्या ज्ञात इतिहासात ह्या सागराने कधीही सोमनाथाचा उपमर्द केलेला नाही. कोणत्याही वादळामुळे सोमनाथाचे गौरवशाली मंदिर कधी उध्वस्त झाले नाही. 

मंदिराशी संबंधित सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यात स्थित असलेला बाण स्तंभ. हा स्तंभ मंदिराच्या आवारातच बसवला असून त्यावर संस्कृतमध्ये श्लोक लिहिलेला आहे. अबाधित ज्योतिमार्ग, म्हणजे स्तंभ आणि समुद्राच्या पलीकडे थेट दक्षिण ध्रुव, यांच्यामध्ये जमिनीचा एक तुकडाही नाही. या स्तंभापासून ते अंटार्क्टिकापर्यंत अधे-मधे जमिनीचा थोडाही भाग नाही, असा या श्लोकाचा सोप्या शब्दात अर्थ आहे. 

संग्राहक – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आळस हा शोधाचा पिता… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

 

? वाचताना वेचलेले ?

☆ आळस हा शोधाचा पिता… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

मी फक्त एक उदाहरण देणार आहे.कारण मोठी पोस्ट वाचण्याचा लोक आळस करतात.

मानवाला कच्चे अन्न खाण्याचा ( शक्तिनिशी तोडण्याचा आणि तासनतास चावण्याचा ) आळस आला, म्हणून चूल आली.

चूल पेटवण्याचा आळस, म्हणून त्याने स्टोव्ह आणला.

 सतत रॉकेल भरण्याचा आळस,म्हणून गॅस आणला.

सिलेंडर संपल्यावर नवीन आणा.जुना काढा . नवीन लावा.या कामाचा आळस आला म्हणून नळीने गॅस आणला.

गॅसवर पदार्थ गरम होईपर्यंत लक्ष ठेवण्याचा आळस येतो, म्हणून  ओव्हन आला.

आता सगळ्याच सोयी सुविधांचा वापर करण्याचा आळस आला, म्हणून तो निघाला नाविन्याच्या शोधात.

तो आता पांचशे रुपयाचे पेट्रोल आणि चार तास खर्च करुन चुलीवरचे जेवण जेवायला घरापासून वीस किलोमीटर दूर जातो.दोन हजार रुपये बील पे करुन घरी परत येतो.

सुरुवातीलाच चूल वापरायचा आळस केला नसता तर आज त्याला तिन्ही त्रिकाळ चुलीवरचे जेवण, चुलीवरचा चहा,चुलीवरची मिसळ मिळाली असती.

 मला टाईप करण्याचा आळस आला आहे,नाहीतर मी अशाच अनेक विषयावर लिहिले असते.

कसे लिहिले आहे हे  सांगण्याचा आळस मात्र करू नका.

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भारताचा प्रजासत्ताक दिन व महत्व… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? विविधा ?

☆ भारताचा प्रजासत्ताक दिन व महत्व… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

आला आला दिन सोनियांचा

प्रजासत्ताक दिन बहुमोलाचा

खरेच भारताच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा दिन हा दिन म्हणजे भारतीय इतिहासाचे एक सुवर्ण दालन.

दिडशे वर्षांच्या गुलामगिरी नंतर आमच्या भारत मातेच्या पायातील परदास्याच्या श्रुखंला देशभक्तांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन तोडल्या.भारत मातेच्या म्लान मुखावर चे करूण अश्रू त्यांना पाहवले गेले नाही. ते देशभक्त भारत मातेला म्हणाले.  कुसुमाग्रजांच्या शब्दात

“कशास आई भिजविली डोळे

उजळ तुझे भाल

रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल”

खरोखरच देशभक्तांच्या अविरत व भगिरथ प्रयत्नांनी 15 आगस्ट 1947 ला भारतमाता स्वतंत्र झाली. स्वातंत्र्याच्या तेजाने तिचे मुख मंडल उजळले.

बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार केली. व  26 जानेवारी जा 1950 पासून तिची अंमलबजावणी झाली. 26  जानेवारी हाच आपला प्रजासत्ताक दिन होय. हयाला गणराज्य दिन व इंग्रजीत  Republic day असे म्हणतात. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता.

एकाधिकार नाही, हुकूमशाही नाही, राजेशाही नाही. हा दिन स्वतंत्र भारताचा मानबिंदू तर आहेच पण राष्ट्रीय सण आहे. मोठया उत्साहाने, जोमाने, दिव्यांची रोषणाई  करण्यात येते. तिरंगा मोठ्या दिमाखात डोलत असतो. प्रेसिडेंटचे भारत वासियांना उद्येशून भाषण होते.देशभक्तीपर गीतांनी आसमंत भारावला जातो.

स्वतंत्र भारताचा प्रजासत्ताक दिन आज 74वर्षाचा झाला आहे. आजपर्यंत च्या कालावधीचा विचार केल्यास, सिंहावलोकन केल्यास आपल्या ला कळेल खरेच आपला देश प्रगत देशात का समर्थ नाही?

देशापुढै आज निरनिराळ्या समस्या मगरी सारख्या मागे लागल्या आहे. अंतस्थ व बाह्य शत्रूंची चुरस लागली आहे.देशाची एकता भंग पावली जणू. स्वार्थ, भ्रष्टाचार, देशद्रोही वृत्ती सतत वाढत आहे.

भौतिक समस्या, नैसर्गिक समस्या, वैज्ञानिक समस्या, आरोग्यविषयक समस्यांचे डोंगर वाढत आहे.

पूर्वजांनी कमावलेल्या स्वातंत्र्याची व देशभक्तांची जाण असणे हे स्वतंत्र भारताच्या नागरिकांचे व मतदारांचे मुख्य कर्तव्य आहे. घटनेने आपल्याला हक्क दिले म्हणजे कर्तव्य आलीच.

प्रो.लाॉस्की यांच्या मताप्रमाणे हक्क व कर्तव्ये एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

आजचे तरुण हे उद्याचे देश निर्माते आहेत. प्रकर्षाने त्यांनी प्रजासत्ताक दिनाचा मतितार्थ समजून वागल्यास पुढला अनर्थ टळला जाईल. मला देशाने काय दिले हे म्हणण्यापेक्षा मी देशाला काय दिले हे महत्त्वाचे नव्हे काय?

प्रजासत्ताक दिन योग्य अर्थाने साजरा करायचा असेल तर मतदार व सुजाण नागरिकांनी देशहिताचा विचार केला पाहिजे. poverty in the land of plenty हे अजुनहीआहे‌. याचा विचार केला पाहिजे. सेतू बांधायला एक एक दगड लागला.

दुसऱ्या महायुध्दात हिरोशिमा व नागासाकी ह्यांची काय गत झाली हे सर्व श्रृत आहे.हा देशभक्तीचा विजय आहे.

भारताचे प्रजासत्ताक यशस्वी होण्यासाठी जाज्वल्य देशाभिमान जागृत असण्याची गरज आहे.

“साथी हाथ बढाना” या गीताची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

सरतेशेवटी

चमका बनकर अमन का तारा

प्रेम की धरती देश हमारा

जय जय हिंदुस्थान, जय जय गणराज्य दिन

स्वतंत्र भारताची नागरिक म्हणून शुभेच्छा व्यक्त करते प्रजासत्ताक दिन चिरायू होवो या अपेक्षेत लिखाणाला विराम देते.🌷

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares