मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दत्त जन्माची कथा… लेखिका – सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ दत्त जन्माची कथा… लेखिका – सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

राजा रविवर्मा प्रेसचे ‘श्री दत्त जन्मा’चे दुर्मिळ चित्र नजरेस पडले. एका चित्रात संपूर्ण दत्त जन्माची कथा सामावली आहे.  कशी ते बघा ! ——

अनसूयेच्या सत्त्वाची परीक्षा पाहायला त्रिदेवींनी आपले नवरे पाठवले. तिने आपल्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यावर तीनही देवांना बाळं करून इच्छाभोजन दिले. त्यामुळे अनसूयेचे सत्त्व राखले गेले, अतिथी धर्म पाळला गेला आणि मातृत्व लाभले. मात्र आपली खेळी आपल्यावर उलटल्याचे पाहून त्रिदेवी अनसूयेला शरण आल्या आणि ‘आमचे पती आम्हाला परत कर ‘ म्हणाल्या. तेव्हा, ‘ घेऊन जा तुम्ही तुमचा पती ‘, हे अनसूया माता सांगत असतानाचा हा चितारलेला क्षण !

असूया शून्य अनसूया, अशी सत्त्वशील अनसूयेचे देहबोली. ऋषीपत्नी म्हणून श्वेत वस्त्र नेसलेल्या अनसूयेच्या चेहऱ्यावर तीनही बाळांना जोजवून झाल्यानंतरचा मातृत्वाचा संतुष्ट भाव खुलून दिसतोय. जगाचा ताप हरण करणारे त्रिदेव बालरुपात आल्यावर निश्चिन्तपणे झोपी गेलेत. आई जवळ असताना कसली काळजी? बरीच वर्षं वाट पाहूनही जे सुख हुलकावणी देत होते, ते सुख तिपटीने पदरात पडल्याचा सोहळा अनसूयेने सुंदर पाळणा बांधून आणि सजावट करून साजरा केला आहे. अत्री ऋषींचा आश्रम असल्याने पायाशी व्याघ्रजीन अंथरले आहे आणि या तीन विश्वसुंदऱ्या आपल्या फजितीने खजील होऊन, आपला नवरा कोणता, हे ओळखण्यात मग्न आहेत. 

पाठमोरी उभी असलेली भरजरी वस्त्र परिधान केलेली अलंकारमंडित लक्ष्मी असावी. बाजूने डोकावणारी लाल साडीतली सावित्री आणि हात दुमडून कुतूहलाने पाहणारी पार्वती असावी. सुखी संसाराचे तेज, सौष्ठव तिघींच्या हातावरून आणि गौरवर्णावरून दिसतेय. एवढे सगळे सुख असूनही अनसूया मातेसमोर तिघी निस्तेज झाल्या आहेत.

तिघी आपापल्या जागी श्रेष्ठ, तरी त्यांना आपल्यापेक्षा कोणी वरचढ असेल ही कल्पना सहन न झाल्याने त्यांनी पतीला तिचे शीलहरण करण्यासाठी पाठवले. त्रिदेवांना अनुसूयेचे सामर्थ्य माहीत होते, पण या तिघींचे गर्वहरण करण्यासाठी तिघांनी जोखीम पत्करली आणि अत्री ऋषी स्नानाला गेल्याची वेळ साधून, वेषांतर करून, ‘आई, इच्छाभोजन  दे, पण विवस्त्र होऊन !  अशी मागणी केली. ‘आई’ अशी हाक ऐकल्याने अनुसूयेला वात्सल्याचा पान्हा फुटला. तिघांना बालरूप केले. भोजन दिले आणि पाळण्यात जोजवले. 

बाळं सगळीच गोड, गोंडस आणि एकसारखी. आपला पती नक्की कोणता, हे ओळखता न आल्याने तिघींनी शरणागती पत्करली आणि अनुसयामातेने तीनही देवांना पूर्ववत केले. तिचा पाळणा मात्र रिकामा झाला. अत्री ऋषी परत आल्यावर त्यांना हकीकत कळली. त्रिदेवांनी सपत्नीक उभयतांची क्षमा मागितली आणि आम्ही तुमच्याच पोटी जन्माला येऊ असे आश्वासन दिले. तो आशीर्वाद फळास आला आणि मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हे त्रिदेव दुर्वास ऋषी, दत्त गुरु आणि चंद्र अशा त्रिगुणात्मक रुपात प्रगट झाले. 

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!

फोटो सौजन्य : श्री दीनानाथ दलाल

लेखिका  – सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ 

संग्राहक – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆☆ (आपण) लोक सिरियल्स का बघतात (बघतो)? – भाग 2 ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? विविधा ?

(आपण) लोक सिरियल्स का बघतात (बघतो)? – भाग 2 ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

(आणि हल्ली परत परत नव्याने त्यांच्या नवीन आवृत्त्या निघत असतात. पण त्या नव्या बघितल्यावर मात्र त्या जुन्या कितीतरी चांगल्या होत्या, असं म्हणायची वेळ येते!  पुढे चालू…)

आता आणखी नवीन प्रकार म्हणजे, वेब सिरियल्स आणि ओटीटी यांचीही भर पडलेली आहे, करमणूक क्षेत्रात. बहुतेक तरुण पिढीतले लोक यातल्या इंग्लिश, हिंदी सिरियल्स बघत असतात. या तरुण पिढीला रहस्यमय, थरारक काहीतरी बघायला आवडते. रोजच्या रुटीनमुळे वैतागून गेलेले असताना त्यांना या मालिका बघायला आवडणं स्वाभाविक आहे. आणि टी. व्ही. वरच्यासारखा जाहिरातींचा व्यत्यय पण नसतो ओटीटी वर. आम्ही पण मध्यंतरी ओटीटी वर ‘बंदिश बॅन्डीट’ ही सिरीयल पाहिली होती. खरोखरच सुरेख होती, आणि दहाच भागात संपवल्यामुळे शेवटपर्यंत उत्सुकता टिकून होती. शास्त्रीय संगीताच्या एका घराण्याची कहाणी दाखवलेली होती यात. सध्या ‘God Freinded Me’ ही मालिका बघतोय. अर्थातच, अमेरिकेत घडणारी. त्यात एका तरुण आफ्रिकन अमेरिकन मुलाला फेसबुक वर देवाची फ्रेंड रिक्वेस्ट येते, हा मुलगा असतो नास्तिक, त्याचे वडील एका चर्चमधे रेव्हरंड असतात. तो ही रिक्वेस्ट बघून गडबडून जातो, ती स्वीकारावी की नाही, अशा गोंधळात पडतो. पण त्याचा मित्र असतो एक भारतीय मुलगा. तो त्याला ती स्विकारायला तयार करतो. आणि मग या ‘गॉड अकाउंट’ वरून त्याला एकेक फ्रेंड रिक्वेस्ट येत रहातात. आणि कर्म धर्म संयोगाने ते लोक याला भेटतात, आणि त्या प्रत्येकाच्या आयुष्यातले काहीतरी प्रॉब्लेम सोडवायला हे दोघे मित्र त्यांना मदत करतात. याच प्रवासात त्याला एक मैत्रीण पण मिळते. प्रत्येक गोष्ट वेगळी. प्रत्येक एपिसोडमधे एकेक गोष्ट. प्रत्येकाचा वेगळा प्रॉब्लेम. बघताना आपण रंगून जातो अगदी! अजिबात कंटाळा येत नाही. अशा काही वेगळ्या थीमवर आपल्याकडच्या लोकांना का मालिका बनवता येऊ नयेत? आपले काही मराठी तरुण हल्ली खूप वेगळे विषय घेऊन चित्रपट काढतात. मग मालिका का नाही?

सध्या चालू असलेल्या काही मराठी मालिका, उदा. ‘राजा राणीची गं जोडी’ आणि ‘सुंदरा मनामधे भरली’ यात थोडा वेगळा विषय जोडलेला आहे, नेहमीच्या कौटुंबिक मालिकेला, पण यातही नायक नायिकेची अती छळणूक चालूच आहे! काय होतं, एका ठराविक वेळेला ते बघायची आपल्याला सवय लागलेली असते, आणि मग, ‘धरलं तर चावतं, आणि सोडलं तर पळतं’ अशी गत झाल्यामुळे आपल्याला ते बघवतही नाही, आणि सोडवतही नाही! असे आपण त्या मालिकेच्या जाळ्यात अडकतो आणि त्यांना TRP मिळत राहिल्याने, तेही मालिका बंद न करता, कथानकात पाणी घालून वाढवत रहातात! असं हे एक दुष्टचक्र आहे!  अशीच एक हिंदी मालिका, ‘बॅरिस्टर बाबू’ नावाची. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातली. बंगालमधे घडणारी, त्यात इंग्लंड मधे शिकून, बॅरिस्टर बनून आलेला एक तरुण एका सात आठ वर्षाच्या मुलीला, म्हाताऱ्या माणसाशी होत असलेल्या लग्नातून वाचवायला जातो आणि त्याच्यावर नाईलाजाने तिच्याशी लग्न करायची वेळ येते. आणि मग त्याच्या जमीनदार कुटुंबातून त्या लग्नाला विरोध, त्या छोट्या मुलीला येणाऱ्या अडचणींमधून तिला वाचवण्याची त्याची धडपड अशी खूप छान सुरुवात केली होती. पण ही पण मालिका भरकटत जाऊन आजही तिचं दळण चालूच आहे!

या मालिकांशिवाय वेगवेगळ्या चॅनल्सवर ‘रिअॅलिटी शो’ पण चालू असतात अधून मधून. हे शो पण जेंव्हा चालू झाले, तेंव्हा खरे वाटायचे. गाण्याच्या कार्यक्रमात गाण्यालाच महत्व असायचं. परीक्षक नामवंत गायक, संगीतकार आणि स्पर्धकही चांगले गाणारे असायचे. खूप चांगली जुनी, क्लासिकल गाणी ऐकायला मिळायची. हे कार्यक्रम खूप आनंद द्यायचे. नृत्याचे असे स्पर्धात्मक कार्यक्रमही चांगले असायचे. पण आताशा गायनाच्या परिक्षकात सिनेमात कोरिओग्राफी करणारे, काव्य लिहिणारे, आणि नृत्याचे परीक्षक म्हणून लेखक असा सगळा विचित्र मामला सुरु झालेला आहे! आणि स्पर्धकांच्या गाण्यापेक्षा, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर जास्त फोकस, स्पर्धकांच्या किंवा परीक्षकांच्या खोट्या नाट्या प्रेमकहाण्या रंगवणं यातच अधिक वेळ घालवणं, एखाद्या स्पर्धकाच्या गरिबीचा तमाशा मांडणं हेच सुरु झालेलं आहे. या मागे त्यांची काय कारणं असतात, ते त्याचं त्यांना माहीत! पण गाण्याची आवड असलेल्यांचा मात्र रसभंग होतो आणि त्या कार्यक्रमातला इंटरेस्ट कमी होतो, हे कळत नाही का या लोकांना? पूर्वी या कार्यक्रमात परीक्षकांकडून स्पर्धकांना त्यांच्या काय चुका होताहेत, काय सुधारणा करता येतील, हे सांगितलं जायचं. आणि काही परीक्षक तर त्या स्पर्धकांचा आत्मविश्वासच खच्ची होईल, इतकी नावं ठेवत असत त्यांच्या गाण्याला. हे अर्थात चुकीचंच होतं, पण हल्ली त्याच्या उलट, प्रत्येक स्पर्धकाची वारेमाप स्तुती करत असतात परीक्षक! आणि त्या स्पर्धकांपुढे काही आव्हानं ठेवण्याची पद्धतही बंदच केलेली आहे. प्रत्येक जण आपला जो ठराविक प्रकार किंवा शैली हातखंडा आहे, त्यातलीच गाणी प्रत्येक वेळी सदर करून वाहवा मिळवत असतो. सगळ्यांनी सगळे प्रकार सादर करावेत म्हणजे त्यांची खरी गुणवत्ता पारखली जाऊ शकते. या सगळ्या गोष्टींमुळे एखादा सवंग मनोरंजनाचा प्रकार असं स्वरुप आलेलं आहे या कार्यक्रमांना! 

त्याचमुळे हल्ली टी. व्ही. पेक्षा OTT वरचे कार्यक्रमच अधिक पहावेसे वाटतात. अजून तरी ते दर्जेदार असतात आणि भरकटण्याआधीच संपवले जातात. टी. व्ही. वाल्यांनी याची दखल घेतली नाही, तर त्यांची अधोगती आणि विनाश अटळ आहे!

– समाप्त –

© सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नात्यांचा प्राजक्त…” – सुश्री सुधा मूर्ती ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ “नात्यांचा प्राजक्त…” – सुश्री सुधा मूर्ती ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

दिवसातून एकदा तरी आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोलत जा  .. माध्यम कोणतेही असो doesn’t matter..संवाद महत्वाचा जो तुमच्यातली ओढ कायम ठेवतो.. आपण नाकारले तरी fact ही आहे की आपण सतत कोणावर तरी विसंबून असतो, आपल्याही नकळत.

आम्ही खूप घरे बदलली. एका घराच्या अंगणात प्राजक्ताचे झाड होते..रात्री त्याची फुले ओघळायला सुरवात व्हायची ती अगदी पहाटेपर्यंत तो सोहळा चालायचा. परीक्षेचे दिवस असले की मी रात्री जागून अभ्यास करायचे..दिवसा कॉलेज आणि नोकरीमुळे अभ्यास करणे शक्य नव्हते.. रात्री मी अभ्यासाला बसले की खिडकीजवळ बसायचे. खिडकीतून तो प्राजक्त मला दिसायचा, त्याची एक फांदी त्या खिडकीजवळ आली होती. त्याच्या फुलांच्या मंद सुवासाने मन एकदम फ्रेश व्हायचे आणि अभ्यासाला मूड लागायचा. हळूहळू मला त्या झाडाची सोबत वाटायला लागली. कधीकधी ते माझ्याशी काही बोलू पाहते आहे असे मला वाटायचे.. मग मी खिडकीत आलेल्या त्याच्या फांदीवरून हात फिरवायचे तेव्हा तो सळसळायचा. मी त्याची फुले गोळा करायचे. देवातल्या कृष्णाला वाहायचे. कधी कानातल्यासारखे कानातही घालायचे. त्याची माझी छान दोस्ती जमली आणि हळूहळू आमच्या गप्पा सुरू झाल्या..मी रोज खिडकीत उभी राहून त्याच्याशी बोलायचे. त्याला किती कळत होते नाही माहीत, पण तो आपल्या फांद्या हलवून, कधी पाने नाचवून, तर कधी सतत फुले ओघळवून प्रतिसाद द्यायचा. एखाद्या दिवशी मला बोलायला नाही जमले तर त्या दिवशी त्याचा फुलांचा सडा कमी दिसायचा.. माझे डोळे भरून यायचे..शेवटी आम्ही भाडेकरू होतो..कधी न कधी आम्हाला तिथून दुसरीकडे राहायला जावे लागणार होते..तेव्हा काय होईल त्याचे आणि माझेही ? असा मला प्रश्न पडायचा. मलाही त्याची, त्याच्याशी बोलायची सवय झाली होती. …. 

काही दिवसानी आम्हाला ते घर सोडावे लागले. मी त्याला सांगितले त्यानंतरचे दोन दिवस तोही मलूल वाटत होता..ना त्याने मला पाहून फुले बरसवली..ना पानांची सळसळ केली .. काही दिवसानी अखेर तिथून दुसरीकडे जाण्याचा दिवस उजाडला.. मला तर त्याच्याकडे बघवेना.. तरी मनाचा हिय्या करून मी त्याच्याजवळ गेले, त्याच्या खोडाला मिठी मारली आणि ओक्साबोक्षी रडून घेतलं.. डोळे उघडले तेव्हा माझ्या आजूबाजूला फुलांचा सडा पडला होता..मी त्यातली काही फुलं ओंजळीत घेतली. त्यांचा हलका वास घेऊन माझ्या रुमालात ठेवली..आणि नकळत त्याला हात जोडून मी तिथून निघाले.. 

काही दिवसांनी कळले..तो प्राजक्त आहे.. पण ती खिडकीजवळची फांदी मात्र सुकून गेली.. 

आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोलत रहा.. माहिती नाही कधी नात्याचा प्राजक्त सुकेल..

काय ? पटतयं का ?

लेखिका : सुश्री सुधा मूर्ती  

संग्राहक – श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ऐब —(षडरिपु)☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ऐब —(षडरिपु)☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सहा दोष….. यांनाच षडरिपु म्हणतात. 

—-फार्सी भाषेत यांना ऐब म्हणतात.

 

हे सहा ऐब ज्याच्या अंगी ठासून भरलेले असतात, त्याला साहेब म्हणतात…..  

या सहा दोषांना सहज धारण करणाऱ्यास साधारण म्हणतात….  

या सहांना मान्य करणाऱ्यास सामान्य म्हणतात…..  

या सहांना आपल्या धाकात ठेवणाऱ्यास साधक म्हणतात….  

या सहांना अधू करणाऱ्यास साधू म्हणतात…..  

या सहांचा संपूर्ण अंत करणाऱ्यास संत म्हणतात…..  

आणि या सहांचा अर्थ नीट समजून घेऊन जो स्वतःची आत्मोन्नती करतो त्याला समर्थ म्हणतात….  

संग्राहक –  श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ एक कटिंग चाय… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ एक कटिंग चाय… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… सन 1957चं राजकमल स्टुडिओत गुरूदत्तचं प्यासा चित्रपटातलं… ‘सर तेरा जो चकराये, या दिल डूबा जाये… आजा प्यारे पास हमारे.. काहे घबराए, काहे घबराए… गाण्याचं शुटींगची तयारी होत असताना त्या गाण्यासाठी एक डोक्याला टक्कल असलेल्या  माणसाची गरज भासली… शुटींगचं सगळं  युनीट त्याचा शोध घेण्यास सरसावलं… अख्खा स्टुडिओ पिंजून काढला पण हवा तसा नैसर्गिक टक्कलाचा माणूस मिळेना… त्या वेळेस एक्स्ट्रा सप्लायर्स टूम नसल्याने शुटींगचं बराच वेळ खोळंबून राहिलं… गुरुदत्त नां तो माणूस त्या गाण्यात हवाच होता… तो मिळे पर्यंत त्यांच्या जिवाला चैन नव्हती… जाॅनी वाॅकर आणि गुरूदत्त  फ्लोवर बसून एक कटिंग चहाचे प्याले  घोट घोटाने घेतं…  पहिला दुसरा, तिसरा रिचवत राहिले.. स्पाॅट बाॅय, चायवाला, गाडीचे ड्रायव्हर यांना सुध्दा  राजकमल स्टुडिओच्या बाहेर पिटाळणयात आलं… ‘और जो ऐसे शख्स से धुंड के लायेगा उसे बडा इनाम मिलेगा’ असही सांगण्यात आलं… सगळेच झटून कामाला लागले… आणि आणि तासाभरातच आत्माराम गावकर नावाचा टक्कल असलेला माणूस कुणा सोबत तिथे आणला गेला… लगेचच एक चाय का प्याला त्यांच्या आणि ज्यांनी त्यांना आणलं त्यांना स्वता गुरूदत्त नि जाॅनी वाॅकर यांनी दिला… चहा पान झालं.. . कायं करायचं याची कल्पना गावकरांना दिली… एकदा दोनदा रिहर्सल्स झाली… शुटींग सुरू झाले, लाईट , कॅमेरा, साऊंड ऑन आता अक्शन म्हटले… एव्हढ्या त्या प्रचंड गोंधळात आत्माराम घाबरून गेले… काय करायचं कसं करायचं हे त्यांना सुचेना… आपलं हे काम नव्हे आपण आताच येथून बाहेर गेलेलं बरं म्हणून पळ काढावा.. असं त्यांच्यात मनात आलं आणि तिथून ते बाहेर पडले.. पुन्हा शुटींग थांबवलं… गुरूदत्त नि जाॅनी वाॅकर नी त्यांना धीर दिला..एक कटिंग चहा दिला… घाबरून जाऊ नका काहीही होणार नाही… फक्त मी तुम्हांला बसवून मालिश करणार आहे ते तुम्ही करून घायचं ईतकचं… गाणं संपले कि झालं… फिरून गावकरा़ंची मानसिक तयारी झाली…लाईट कॅमेरा.. ॲक्शन पुन्हा तेच घडलं… मग परत परत तसचं घडत गेलं… दरवेळेला कटिंग चहा दिला जायचा.. तरतरी यायची भीती कमी झाली असं वाटायचं … असे बरेच टेक झाले शेवटी निदान एका कडव्या पुरता का होईना  पण शाॅट घेण्याचा ठरला आणि तोही त्यांच्या नकळत… थोडे लाईट अंधूक लावले गेले… आता गावकरांनी पण मनाचा हिय्या केला… आता हिथं न थांबता ताबडतोब बाहेर निघून जायचं… जाॅनी वाॅकरनीं गाण्यात त्यांच्या हाताला धरलं होतं तो हात सोडून तिथून धावतच ते निघाले… ते आपल्या घराकडे येईपर्यंत मागेसुद्धा जरा वळून न बघता… घरात येताच त्यांची बायकोने विचारले, “खयं गेला व्हतास? चाय कधीची करून वाट बघत रव्हली मी…”

“आनं तो चाय हडे नि ओत तो माज्या टकलावर.. ” गावकर चिडले… आज त्यांना एक कटिंग चाय आपली पाठ सोडत नाही हेच समजले…

… प्यासा थेटरला लागला गावकरांनी बायको सोबत पाहिला… विषेश ते गाणं बघून दोघांना आनंद वाटला…

सिनेमा संपला नि सौ. गावकर  म्हणाल्या “गाणं संपे पर्यंत तरी फुकटची  तेल मालिश तरी करुन घ्यायची व्हती… निदान शेवटाक बिदागी तरी मिळाली असती… हया कामाचे तुमका काय मिळाला?”

“एक कटिंग चाय…” गावकर  कसनुसं तोंड करत म्हणाले…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆☆ (आपण) लोक सिरियल्स का बघतात (बघतो)? – भाग 1 ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? विविधा ?

(आपण) लोक सिरियल्स का बघतात (बघतो)? – भाग 1 ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

विचार करा बरं एकदा! का बघतो आपण टी. व्ही. वरच्या सिरियल्स?  टाईम पास, मनोरंजन हे तर आहेच. करोनाच्या काळात तर घराबाहेर पडणंसुद्धा काहीजणांसाठी अवघडच झालेलं होतं, त्यामुळे टी. व्ही. वरच्या मालिका बघणं हा या काहीजणांसाठी, आणि ज्यांना एरवीही घराबाहेर जाणं अशक्य आहे, अशांसाठीही जीवनावश्यक विधी झालेला आहे! अर्थात, काही लोक तर व्यसन लागल्यासारखे टी. व्ही.बघत असतात!

 पूर्वी जेंव्हा फक्त दूरदर्शनच दिसत असे, तेंव्हा आठवड्यातून एकदाच ठराविक वेळेला ठराविक मालिका दिसत असत. तेंव्हा त्या मालिकांना काहीतरी स्टॅन्डर्ड असायचं, पुढच्या भागाबद्दल उत्सुकता असायची. आणि आठवड्यातून एकदाच बघायला मिळत असल्यामुळे, त्यांचं अप्रूपही असायचं. पण आता टी. व्ही. वर चॅनल्सचा इतका सुळसुळाट झालेला आहे, की विचारायची सोय नाही! आणि वेळकाळ याचंही काही बंधन नाही! 24 तास टी. व्ही. सुरूच! आणि मग आलटून पालटून त्याच त्याच मालिकांचे ‘रिपीट एपिसोड’! बघा लेको, केंव्हाही!

या मालिकांची काही वैशिष्ट्यं आहेत बरं का! मालिकेत खलनायिका असलीच पाहिजे, त्या शिवाय, बहुतेक मालिका दाखवायला परवानगी मिळत नसावी! तिचे एकदोन जोडीदार तर हवेतच! आणि हे सगळे नायक-नायिकेच्या घरातले लोकच असतात बरं! आपल्याच घरातल्या लोकांना असा त्रास देताना या लोकांना अगदी आंनदाच्या उकळ्या फुटत असताना पण दाखवतात! आणखी श्रीमंती तर दाखवलीच पाहिजे मालिकांमधे! हिंदी मालिका बघितल्या, तर भारतात कुठे दारिद्र्य आहे, हे खरंच वाटणार नाही! त्या मानाने मराठी मालिकांमधली श्रीमंती मर्यादित प्रमाणात दाखवली जाते! आणखी एक, त्या नायक-नायिकांना सुखानं जगू द्यायचंच नाही, असा विडा खलनायिकेनं आणि मालिकेच्या दिग्दर्शकानंही मिळून उचललेला असतो! याच्या मागे काय कारण असावं, हे काही माझ्यासारख्या पामराला तरी कळत नाही बुवा! खलनायिकेचं एक ठीक आहे, पण दिग्दर्शकाचं काय घोडं मारलेलं असतंय नायक-नायिकेनं देवच जाणे! आणखी एक मज्जा म्हणजे, खलनायक, तिचे जोडीदार अत्यंत हुशार आणि जितके म्हणून चांगले लोक असतील मालिकेत, ते, अगदी नायक-नायिका धरून, ते सगळे बिनडोक! सतत खलनायिका या लोकांवर मात करत रहाणार आणि ह्यांना कळतच नाही, कोण सगळं वाईट घडवतंय आपल्या आयुष्यात ते! अगदी मालिका संपेपर्यंत हा लपंडाव चालूच! शिवाय, हे नायक-नायिका, विशेषतः नायिका तर संत महंतच जणू! आसपासच्या सगळ्या लोकांशी इतकं चांगलं वागणार, की त्या चांगुलपणाचं अजीर्ण व्हावं! सगळ्यांसाठी सतत त्याग करत रहाणार, कशाचा ना कशाचा. असे दोन प्रकार माणसांचे, एक पूर्णतः काळी छटा असलेला, आणि एक पूर्ण, पवित्र शुभ्र रंगाचा! सामान्यतः प्रत्येक माणसात दोन्ही छटा मिसळलेल्या असतात. कोणीच पूर्णतः वाईट किंवा पूर्णतः, म्हणजे, अती चांगला नसतो. खरोखरचे संत-महात्मे सोडून! पण नायिका गुणांची पुतळीच दाखवली पाहिजे असाही नियम असावा, मालिका बनवण्यासाठी.

बरं, एखादी मालिका आधी विनोदी म्हणून जाहिराती करतात, आपल्याला वाटतं, चला, त्या सासवा-सुनांच्या मालिकांपेक्षा काहीतरी वेगळं बघायला मिळेल, म्हणून आपण ती मालिका बघायला सुरुवात करतो, पण थोड्याच दिवसात आपला भ्रमनिरास करून त्या मालिकेत खलनायिका घुसवली जाते आणि सुरु होतं परत तेच दळण! क्वचित काही मालिका या सगळ्याला अपवाद ठरतात आणि बघायला आवडतात.  उदा. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ सारखी निखळ विनोदी मालिका. आजही त्या मालिकेच्या नुसत्या आठवणीने सुद्धा हसू येतं. ही हिंदी मालिका होती. पण अशा निखळ विनोदी मालिका फार दिवस चालू ठेवणं अवघड असतं. कारण सातत्त्यानं निखळ विनोदी लिहिणं ही खूप अवघड गोष्ट आहे. पु. लं. सारखे जीनियस या क्षेत्रात कमीच असतात.

मराठीतही सुरुवातीच्या काळात चांगल्या मालिका असायच्या. पूर्वीच्या, फक्त दूरदर्शन होतं, त्या काळातल्या ‘बुनियाद’ आणि ‘हम लोग’ या मालिकांनी लोकप्रियतेचा कळस गाठलेला होता. तसेच ‘तमस’ ही देशाच्या फाळणीबद्दलची मालिका, सई परांजपे यांची ‘अडोस-पडोस’ या काही दर्जेदार मालिका आजही लक्षात आहेत.  ‘झोका’, ‘अग्निहोत्र’, ‘असंभव’, ‘आनंद भुवन’ इ. मी बघितलेल्या काही मराठी मालिकाही आजही आठवतात. पण हळूहळू रोजच्या मालिकांचा रतीब जसा सुरु झाला, तसतसा मालिकांचा दर्जा घसरत गेला. आणि पूर्वी मालिकांना तेरा भागांचं बंधन असायचं, आता तशी काही मर्यादाच नसल्यामुळे प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अंत बघत आणि वाट्टेल तशा भरकटत मालिका वर्ष नु वर्षे चालूच रहातात.

या मालिकांमधून न पटणाऱ्या, वर्तमान जगाशी सुसंगत नसलेल्या गोष्टीही इतक्या घुसडलेल्या असतात, की विचारायची सोय नाही! हल्ली कोणत्या तरुण मुली साड्या नेसतात? तरुण जाऊ दे, सासू, आई, आज्जी या स्त्रियाही हल्ली फक्त सणा-समारंभातच साडी नेसतात. ही अगदी सामान्य गोष्ट झालेली आहे. पण या मालिकांमधल्या मुली लग्नाआधी ड्रेस वगैरे घालत असल्या तरी लग्न झाल्या क्षणापासून साड्याच नेसायला लागतात. नाहीतर त्या मग वाईट चालीच्या असतात! आता या कर्माला काय म्हणावं? दुष्ट, खलनायिका यांनाच ड्रेस घालायची परवानगी असते मालिकांमधे! आणि सासू, सुना, आत्या, मावशी जी काही स्त्री पात्रं असतील, त्या दिवसरात्र झगमगीत भारी साड्या आणि भरपूर दागदागिने घालून सदैव लग्न समारंभासाठी तयार असल्यासारख्या वावरत असतात मालिकेत! आणि तरीही कुठे बाहेर जायचं असेल तर “मैं तयार हो के आती हूं”, अरे काय! हे हिंदी मालिकांचं जग आहे. हल्ली मराठीमध्ये बहुतेक इतका भडक प्रकार नसतो, पण लग्नानंतर साडी कम्पल्सरी! आणखी एक गम्मत! आपल्यासारख्या सामान्य माणसांचा पोलिसांशी असा कितीकसा संबंध येतो? फार फार तर एखादे वेळी सिग्नल तोडला, किंवा वन वे मधून उलटं जाताना पकडलं गेल्यास दंड भरण्यापुरता! हो की नाही? पण या प्रत्येक मालिकेत या सामान्य घरातला एक तरी माणूस तुरुंगात गेलेला  दाखवलाच पाहिजे, असाही नियम असावा! साध्या-सरळ, सज्जन लोकांचा अतोनात छळ झालेला दाखवला, की या लेखक -दिग्दर्शकांना कसला आसुरी आनंद मिळतो, कोणजाणे!

ऐतिहासिक मालिका बघणं तर मी कधीच सोडून दिलंय. त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासाची एवढी मोडतोड करतात, की जे लोक अगदी थोडंफार जाणतात, वाचतात त्यांनाही ते बघवू नये! काही अपवाद असतीलही, पण सर्वसाधारण अनुभव काही चांगला नाही! पौराणिक मालिकांमधे, किंवा देव देवतांवर काढलेल्या मालिकांमधे तर काहीही दाखवायची प्रचंड मुभाच मिळालेली असते, या लोकांना. कारण, त्यात खरं खोटं कसं आणि कोण सांगणार? पहिल्या ‘महाभारत’ आणि ‘रामायणा’ मधील चमत्कारांनीच त्याची सुरुवात करून दिलेली आहे. पण ते आपले टी. व्ही. बघण्याचेच सुरुवातीचे दिवस होते, म्हणून त्या मालिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. आणि हल्ली परत परत नव्याने त्यांच्या नवीन आवृत्त्या निघत असतात. पण त्या नव्या बघितल्यावर मात्र त्या जुन्या कितीतरी चांगल्या होत्या, असं म्हणायची वेळ येते! 

क्रमशः…

© सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘टाहो…’ – भाग – 2 – सुश्री सई परांजपे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘टाहो…’ – भाग – 2 – सुश्री सई परांजपे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(विनाकारण इंग्लिश, रोमन लिपी यांचा वापर इतका अतिरेकी वाढलाय की बोलून सोय नाही. सई परांजप्यांसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या ज्येष्ठ स्त्रीलाही काळजी वाटावी अशी परिस्थिती खरंच आहे भोवती.)

(… तर त्या ऑइंटमेंटने डोळ्याखालच्या ब्लॅक सर्कल्सना गुडबाय करता येते.. तर मंडळी, आता स्पीक !) — इथून पुढे —

करमणुकीच्या क्षेत्रातदेखील आपल्या मातृभाषेबद्दल विलक्षण उदासीनता आहे. नाटकांची नावे पाहिली की, मराठी शब्द सगळे झिजून गेले की काय अशी शंका वाटते. ऑल द बेस्ट, फायनल ड्राफ्ट, लूज कंट्रोल, बॅलन्सिंग अ‍ॅक्ट, गेट वेल सून, प्लेझंट सरप्राइझ, ऑल लाइन क्लियर आणि अशी किती तरी. चित्रपटांची तीच गत आहे. पोस्टर बॉयज, शुगर, सॉल्ट आणि प्रेम, पोस्टर गर्ल, फॅमिली कट्टा, हंटर, चीटर, लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड, सुपर स्टार, बाइकर्स अड्डा, हे झाले काही नमुने. आकाशवाणी आणि प्रकाशवाणीवर तर सर्व मंडळी आपली खास गंगाजमनी भेसळ भाषाच बोलतात. निवेदक, वक्ते, नट, बातमीदार, तज्ज्ञ, स्पर्धक आणि पंच, झाडून सगळे जण. उदाहरणं देत बसत नाही (किती देणार?) पण आपल्या टी.व्ही. सेटचं बटण दाबलं तर प्रचीती येईल. मी चुकूनही मराठी कार्यक्रम पहात नाही. आपल्या भाषेच्या चिंधड्या उडताना नाही बघवत. मुलं म्हणतात, ‘‘काही तरीच तुझं. जमाना बदलतो आहे. भाषा बदलणारच.’’ कबूल, पण दुर्दैव असं की, मी नाही बदलले. माझ्या या आग्रही वृत्तीमुळे घरात मराठी वृत्तपत्रदेखील मी घेत नाही. ‘आजची यंग जनरेशन फ्रस्ट्रेटेड का?’, ‘दबावांच्या टेरर टॅक्टिक्स’, ‘तरुण जोडप्याचा सुइसाइड पॅक्ट’ असे मथळे; आणि लाइफ स्टाइल, हेल्थ इज वेल्थ, स्टार गॉसिप, हार्ट टु हार्ट, अशी सदरं पाहिली की वाटतं, सरळ इंग्रजी वृत्तपत्रच का घेऊ नये? ‘तुम्हाला आपल्या भाषेचं प्रेम नाही?’ मला विचारतात. प्रेम आहे म्हणून तर हा कठोर नियम मी लागू केला आहे. माझा स्वत:चा असा खासगी निषेध म्हणून मी इंग्रजी बिरुदं मिरवणारी नाटकं आणि सिनेमे पहात नाही. दृष्टीआड भ्रष्टी.

इतका वेळ मी इंग्रजी शब्दांच्या आगंतुकीवर आग पाखडून, आपले शब्द नाहीसे होत आहेत याबद्दल खेद व्यक्त केला; पण शब्दच काय- अवघी भाषाच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आज आपल्या असंख्य लहान मुलांना मराठी नीट लिहिता- वाचता- बोलता येत नाही. ‘मम्मी, व्हॉट इज प्रतिबिंब?’ असं आमचा मिहिर विचारीत होता, अशी लाडाची तक्रार अलीकडेच कानी आली; पण त्याबद्दल खेद वाटण्याऐवजी मम्मीला खोल कुठे तरी अभिमानच वाटत होता. इंग्रजी येणं, हे आजच्या काळाची नितांत गरज आहे, याबद्दल दुमत नाही. सद्य युगामधली ती प्रगतीची भाषा आहे, हे कुणीही मान्य करील; पण इंग्रजी अथवा मराठी, या दोन भाषांमधून एकीची निवड करा, असा प्रश्नच नाही आहे. इथे निवड नव्हे तर सांगड घालण्याबद्दलची ही किफायत आहे. आजच्या जमान्यात मुलांना तीन भाषा यायला हव्यात- मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि आंतरराष्ट्रीय भाषा- इंग्रजी. दुर्दैव असं की, या तिन्हीपैकी एकही भाषा उत्तम येते असं कुणी क्वचितच आठवतं. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनी विशेष दक्ष राहिलं पाहिजे. हे अशक्य नाही, हे मी स्वानुभवाने सांगते. सात ते अकरा वर्षांमधल्या माझ्या बालपणीचा काळ ऑस्ट्रेलियात गेला, कॅनबेरा शहरात. साहजिकच शाळा इंग्रजी होती आणि झाडून सगळ्या मित्रमैत्रिणी इंग्रजी बोलणाऱ्या, पण घरात मात्र कटाक्षाने शुद्ध मराठी बोलले जाई.

– मी मराठी पुस्तकं वाचीत असे आणि दिवसाकाठी दोन-तीन पानं काहीबाही मराठीतून लिहिण्याची मला सक्ती असे. दुर्दैवाने मला मिळालेला हा वसा पुढे चालू ठेवण्यात मी अपयशी ठरले. माझ्या मुलीची मुलं मराठीमधून विचारलेल्या प्रश्नांना इंग्रजीतून उत्तरं देतात. सुरुवातीला मी अन्शुनीला माझ्याबरोबर मराठीतून बोलायची सक्ती करीत असे; पण मग पुढे मी येणार आहे हे कळताच, आता मराठी बोलावं लागणार म्हणून ती धास्तावते, असं विनीने मला सांगितलं. तेव्हा मी तो नाद सोडून दिला. एका व्यक्तिगत पराभवाची नोंद झाली.

उद्याच्या मराठी भाषादिनी, या भाषेवर मनापासून प्रेम करणाऱ्या दोन व्यक्तींची आवर्जून आठवण करावीशी वाटते.

सुमारे चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी मॅक्सीन (आडनाव आठवत नाही) नावाची तरुण अमेरिकन विद्यार्थिनी मराठी भाषा शिकण्यासाठी महाराष्ट्रात येऊन राहिली होती. पाहता पाहता ती उत्तम मराठी बोलू लागली. एवढंच नव्हे तर पुढे तिने फलटणला चक्क मराठी शाळा काढली. फलटणला एका पार्टीत ती मला भेटली. ती काठापदराचं लुगडं नेसली होती. ‘छान साडी आहे तुमची,’ मी तिला म्हटलं. मॅक्सीन हसून म्हणाली, ‘मळखाऊ आहे.’ तिचा हा शब्द मी आजतागायत विसरले नाही. दुसरा उल्लेख आहे माजी तुरुंगाधिकारी उद्धव कांबळे यांचा. बिकट परिस्थितीला तोंड देऊन, उत्तम प्रकारे आपलं शिक्षण पूर्ण करत कांबळे यांनी पुढे यूपीएससीची परीक्षा दिली. ही परीक्षा मराठीमधून देणारे ते पहिले विद्यार्थी. पुढे त्यांच्या क्षेत्रात एक अतिशय सक्षम अधिकारी म्हणून त्यांनी नाव कमावलं. मराठी भाषेवर त्यांचं निस्सीम प्रेम असून समर्पक सुंदर प्रतिशब्दांची त्यांनी एक सुंदर यादी बनवली आहे. माझ्या ‘आलबेल’ नाटकाच्या आणि पुढे ‘सुई’ या एड्सवरच्या लघुपटाच्या तुरुंगाबाबतच्या प्रवेशांसाठी त्यांची बहुमोल मदत झाली.

काही वर्षांपूर्वी मराठी भाषा तारण्यासाठी शिवसेनेनं झेंडा फडकावला होता. कुरकुरत का होईना, पण जनतेनं- आणि विशेष करून दुकानदारांनी तिची दखल घेतली; पण पुढे हा संग्राम मंदावला आणि परकीय पाहुणीचं- इंग्रजीचं फावलं. खरं तर, मराठी माणूस त्याच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो. मग या भाषा आक्रमणाच्या बाबतीत तो नांगी टाकून स्वस्थ का बसून राहतो? या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का? इमारतीला सदन, हवेली किंवा महाल म्हणण्याऐवजी ‘हाइट्स’ किंवा ‘टॉवर्स’ म्हटलं की तिची उंची वाढते का? कुण्या समाजशास्त्रज्ञाने अथवा भाषातज्ज्ञाने या गौडबंगालाचा छडा लावावा आणि आपल्या न्यूनगंडावर काही इलाज करता येतो का, हे अवश्य पाहावं. त्यासाठी जागतिक मराठी परिषदेचं अधिवेशन भरण्याची वाट पाहू नये.

लहानपणी केलेले एक अवलोकन मला छान आठवतं. सभोवतालची वडीलधारी मंडळी बदलत्या चालीरीती, पुसट होत चाललेले रीतिरिवाज आणि तरुण पिढीचे एकूण रंगढंग, यावर सतत तोंडसुख घेत असत. त्याचं मला फार वैषम्य वाटायचं. आपण मोठं झाल्यावर चुकूनसुद्धा असं काही करायचं नाही, असा मी ठाम निश्चय केला होता; पण काळ लोटला तसा तो निर्धार शिथिल झाला असावा. मीही आता जनरूढीच्या बदलत्या आलेखाबद्दल तक्रारीचा सूर आळवू लागले आहे, याची मला कल्पना आहे. तसंच तळमळीचे हे माझे चार शब्द म्हणजे निव्वळ अरण्यरुदन ठरणार आहे याचीही मला पूर्ण जाणीव आहे. पण काय करू? मामलाच तसा गंभीर आहे. प्रसंग बांका आहे. आपली मायबोली काळाच्या पडद्यामागे खेचली जात आहे आणि ‘कुणी मला वाचवा होऽ’ असा टाहो फोडते आहे; पण ही हाक कुणाला ऐकूच जात नाही, कारण तिची लेकरं बहिरी झाली आहेत. डेफ्  स्टोन डेफ्!

— समाप्त —

लेखिका : सुश्री सई परांजपे

(मी मराठीप्रेमी)

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ असाही एक विश्वविक्रम – श्री अभय भंडारी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ असाही एक विश्वविक्रम – श्री अभय भंडारी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

गीता जयंती निमित्त एका विश्वविक्रमी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा अपूर्व योग नुकताच आला.

शिक्षण मंडळ, कराड यांच्या वतीने लो.टिळक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी हा विश्वविक्रम साकारला.

सातशे विद्यार्थ्यांनी अवघ्या तीन मिनिटांत श्रीमद् भगवत् गीतेचे सातशे श्लोक सुवाच्य हस्ताक्षरात लिहून काढले.प्रत्येकाने एक श्लोक लिहिला, व नंतर क्रमाने अठरा अध्याय आणि सातशे श्लोकांचे हे हस्तलिखित एकत्र करून अवघ्या पाच मिनिटांत श्रीमद् भगवत् गीतेचा हस्तलिखित ग्रंथ शिक्षकांना प्रदान करण्यात आला.

हा अत्यल्प वेळेत पूर्ण गीता लिहून काढण्याचा विश्वविक्रम आहे.

हा उपक्रम प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणं हा माझ्या जीवनातील एक अत्यंत रोमांचकारक अनुभव होता.

या विद्यार्थ्यांनी गेले दोन महिने यासाठी भरपूर सराव केला होता. त्यांच्या इतकेच कष्ट शाळेच्या शिक्षकांनी, पालकांनी घेतले होते.

‘ इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ ने या एकमेवाद्वितीय उपक्रमाची नोंद घेतली.

या अभिनव उपक्रमासाठी शिक्षण मंडळ, कराडच्या सर्व विश्वस्त, पदाधिकारी,शिक्षक/ शिक्षिका,व सर्व कर्मचारी यांनी अपार परिश्रम घेतले, व त्याला विद्यार्थी आणि पालकांनी सक्रीय साथ दिली, त्यामुळे हा विश्वविक्रम अत्यंत सुनियोजित पद्धतीने साकारला.

— शिक्षण मंडळ कराडच्या सर्व परिवाराचे हार्दिक अभिनंदन. या निमित्ताने सातशे कुटुंबात श्रीमद् भगवत् गीतेचा संस्कार पोहोचला.

— अशा उपक्रमांनी समाजमन संस्कारित होते. सत्य, न्याय, नीति या दैवी गुणसंपदेचा परिचय होऊन समाज सन्मार्गावर वाटचाल करतो.

लेखक : श्री अभय भंडारी, विटा.

संग्राहक : श्री सुहास रघुनाथ पंडित. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले  ☆ आयुष्य म्हणजे काय आहे ? ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ आयुष्य म्हणजे काय आहे ? ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

आयुष्य म्हणजे काय..

एक धुंद संध्याकाळ, ४ मैत्रिणी , ४ कप चहा, १ टेबल … 

आयुष्य म्हणजे काय..

१ इनोव्हा कार, ७ मैत्रिणी , आणि एक मोकळा पहाडी रस्ता ….

आयुष्य म्हणजे काय….

१ मैत्रिणीचे घर, हलकासा पाऊस, आणि खूप खूप गप्पा …

आयुष्य म्हणजे काय…

शाळेच्या मैत्रिणीसह, बुडवलेला तास, १ कचोरी, २ सामोसे,  आणि बिलावरून झालेला वाद …

आयुष्य म्हणजे काय…

फोन उचलताच पडणारी मैत्रिणीची  गोड शिवी, आणि सॉरी म्हटल्यावर अजून एक शिवी … 

आयुष्य म्हणजे काय … 

काही वर्षानंतर, अचानक जुन्या मैत्रिणीचा एक मेसेज, अंधुक झालेल्‍या काही ओल्या आठवणी, आणि डोळ्यातले पाणी …

 

आपण खूप मैत्रिणी  जमवतो…

काही खूप जवळच्या मैत्रिणी बनतात …

काही खास मैत्रीणी  होतात …

काहींच्या आपण प्रेमात पडतो…

काही परदेशात जातात…

काही शहर बदलतात …

काही आपल्याला सोडून जातात…

 

आपण काहींना सोडतो …

काही संपर्कात राहतात …

 

काहींचा संपर्क तुटतो …

 

काही संपर्क करत नाहीत … त्यांच्या अहंकारामुळे …

कधी आपण संपर्क करत नाही … आपल्या अहंकारामुळे  …

त्या कुठेही असोत… कशाही असोत… आपल्याला त्यांची आठवण असतेच … 

आपलं प्रेमही असतं…आपल्याला त्यांची उणीव भासते…आपल्याला त्यांची काळजीही असते ..

— कारण आपल्या आयुष्यात त्यांचं असं एक स्थान असतंच…

तुम्ही किती वेळा भेटता,  बोलता,  किंवा किती जवळचे आहात  ते महत्वाचे नाही …

 

जुन्या मैत्रिणींना कळू दे, की तुम्ही त्यांना विसरला नाहीत …

 

आणि नवीन मैत्रिणींना  सांगा, की तुम्ही त्यांना विसरणार नाही…

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “श्रीकृष्ण आणि सूरदास…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “श्रीकृष्ण आणि सूरदास…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट☆

श्रीकृष्ण म्हणजे युगाचा महानायक, युगंधर ,.ह्याची अनंत रुपे,आणि वेगवेगळी नावे.त्याचं सगळ्यांना भावलेलं नाव म्हणजे कान्हा.कान्हा म्हंटला की आठवतो आपल्या जवळचा,आपल्याला समजून घेणारा सखा.

श्रीकृष्ण जितका जितका आपण जाणायला,समजायला पुढेपुढे जावं तितका तितका तो मारुतीच्या शेपटीसारखा वाढतच जातो.पण तरीही कान्हाला जाणून घ्यायची ओढ पण स्वस्थ बसू देत नाही हे खरे.

आजपासून एकवीस वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार साली श्रीकृष्णाच्याच कृपेने श्रीकृष्ण कळायला सुरवात झाली. प्रख्यात लेखक मा.श्री. शिवाजी सावंत ह्यांनी हळुहळू माझ्यासारख्या वाचकांच्या बुद्धीस झेपेल,पचेल,आकलन होईल असा माझा कान्हा माझ्यासमोर उलगडायला सुरवात केली.तेव्हा प्रकर्षाने जाणवले की आपल्याला आपला हा मधुसूदन कितीतरी कमी कळलायं.हिमनगाच्या टोकाप्रमाणं.जेवढा कळलायं त्यापेक्षाही त्याच्या कितीतरी पट जास्त कळायचा राहिलायं.खूप सुंदर रितीने कृष्णाची विविध रुपे ह्यामध्ये उलगडून दाखविली आहेत.मध्ये महाभारतात घडलेल्या कित्येक घटकांचा उलगडा संदर्भासहित कळतो.

या पुस्तकातून कळतं श्रीकृष्णाला,गुरू दोन,भगिनी तीन,माता पिता दोन,तसेच बहुपत्नी,कन्या,पुत्र होते.सख्या मात्र दोनच.एक राधा आणि दुसरी द्रौपदी. राधा ह्या शब्दाचा नव्यानेच अर्थ कळला युगंधर मधून.”रा” म्हणजे लाभो किंवा मिळो आणि धा म्हणजे मोक्ष किंवा जीवनमुक्ती.

आज कृष्ण हा शब्द उच्चारल्याबरोबर आठवतात ते सगळे कृष्णावर अलौकिक प्रेम , भक्ती करणारे समस्त कृष्णप्रेमी. त्यापैकी एक पराकोटीचे कृष्णप्रेमी म्हणून ज्यांची हमखास आठवण येते ते संत सूरदास. ज्यांना आपण  आध्यात्मिक क्षेत्रातील सूर्य पण म्हणतो. त्यांची जयंती नुकतीच झाली. त्यांना विनम्र अभिवादन.

सूरदास हे नाव उच्चारल्या बरोबर “मै नही माँखन खायो”ही रचना आठवते.अशा कित्येक लोकप्रिय रचना सूरदासांच्याच. ह्या कर्तृत्वात त्यांच अंधत्व कुठेही आड आलं नाही.

सूरदासांची एक मला अत्यंत भावलेला गुण म्हणजे त्यांचे “एका देवा केशवा” अशी परमोच्च भक्ती.हिंदीच्या ब्रज 

बोलीभाषेत लिहिणारे एक भक्तकवी होते.हे त्यांच्या सूरसागर या ग्रंथासाठी  ते प्रसिद्ध आहेत.

सूरदासांचा जन्म दिल्लीजवळील एका लहान गावात ,एका सारस्वत ब्राम्हण कुटूंबात झाला. त्यांचे आयुष्य आग्र्याजवळच्या गऊघाट व मथुरेजवळच्या गोवर्धन या गावांत गेले.  वल्लभाचार्यांनी त्यांना 

श्रीकृष्णभक्तीचा उपदेश दिला. सूरसागर ह्या त्यांच्या ग्रंथात श्रीकृष्णाच्या जीवनाचे वर्णन आहे. त्यातील काव्य व गानसौंदर्यामुळे ते तत्कालीन समाजात प्रसिद्ध झाले. सूरदासांची प्रसिद्धी ऐकून  तानसेनाच्या  मध्यस्थीने अकबर बादशहा त्यांना भेटायला आला. तेव्हा अकबराच्या आज्ञेनंतर सुद्धा  सूरदासांनी त्याची स्तुतीकवने लिहीण्यास नकार दिला अशी आख्यायिका आहे.  सूरसागरा शिवाय सूरदासांनी  सूरसारावली, साहित्यलहरी नलदमयन्ती अशा इतर ग्रंथांचेही लिखाण केले.

साक्षात भगवान श्रीकृष्णांनी ह्यांना दर्शन देऊन त्यांचे अंधत्व दूर केले होते. परंतू त्यांनी भगवंताकडे मागणे मागितले की मला पुन्हा अंध कर.मला फक्त तू दिसायला हवा आहेस आणि तू तर मला अंध असतांनाही दिसतो. किती अपरंपार भक्ती ही.

अशा ह्या अलोट भक्ती असणाऱ्या कृष्णप्रेमी सुरदासांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. त्यांना आणि त्यांच्या अतूट भक्ती ला मनोमन प्रणाम.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares