मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भावाचे माहेरपण… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ भावाचे माहेरपण… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

 “हे काय,चक्क स्वतःचा शर्ट स्वतः इस्त्री करतोयस, यावेळी इस्त्रीवाल्याला नाही का द्यायचा..?” अनुने पर्स टेबलावर ठेवत विचारलं आणि ती पाणी पिण्यासाठी किचनकडे वळली देखील,…

अभी जाम मूडमध्ये ओरडला, ” मै मायके चला जाऊंगा तुम देखती रहीयो,..” पाणी पिताना येणारं हसू दाबत..अनुने हातानेच खुणावलं,..आणि घोट गिळत विचारलं, ” नक्की बरा आहेस ना..?”– अभी अगदी फुल मूड मध्ये,..” हम तो चले परदेस,…हम परदेसी हो गये,..”

आता अनु त्याच्याजवळ जात त्याला दटावत म्हणाली,” अभ्या नाटकं नको हं, पटकन सांग काही दौरा आहे का कम्पनीचा,..?”

“ नाही मॅडम मी खरंच माहेरी चाललोय,..पुण्याला..” अनुने लाडाने त्याला पाठीत हलकी चापट देत म्हटलं,..

” ताईंकडे चाललास ना, मग असं सांग ना,.. हे काय नवीन,.. म्हणे माहेरी चाललो,..”

अभिने शर्टची घडी केली, इस्त्री बंद केली आणि तो वळला अनुकडे, तिचा हात हातात घेऊन म्हणाला..” म्हणू दे मला, हा शब्द छान वाटतोय,..यंदा तू माहेरी गेलीस दिवाळीत,.. मग तायडी आणि माझंच राज्य होतं,.. भाऊबीजेला ओवाळलं तिने मला आणि माझ्या हातात तिने हे तिकिटाचं पाकीट ठेवलं,..” मी म्हटलं, ” अग, मला ओवाळणी देतेस काय,.?”

तर ताई म्हणाली,..” ओवाळणी नाही रे, तुला माहेरपणाला बोलावतीये,..”

मी जोरजोरात हसायला लागलो,.. तसं तिने मला जवळ घेतलं..खूप रडली गळ्यात पडून. म्हणाली, ” आई बाबा गेले आणि तू किती मोठा होऊन गेलास अभ्या,..त्यांची उणीव आम्हाला भासू न देता आमचं माहेर जपत राहिलास,..तुझ्या बायकोचं श्रेय आहे त्यात. पण तिला माहेर तरी आहे,..तुला कुठे रे माहेर,..? कधीतरी मनात खोल दडलेल्या आपल्या लहानपणीच्या आठवणी आपण ज्याच्यासोबत जगलो, त्या उजळवण्याची जागा, माहेर असते,..आई बाबा गेले की पुरुषाची ती जागा नक्कीच हरवते ना..मग मला वाटलं आपण माहेरी जाऊन आलं की तुला माहेरी बोलवायचं- म्हणजे माझ्याकडे.. अनु आली की तू निघणार आहेस..तिकीट मुद्दाम बुक करून दिलंय म्हणजे उगाचच म्हणायला नको,..गाड्यांना गर्दी आहे,..मी वाट बघेन तुझी, “ एवढं सांगून तायडी गेली,..

“ आता मी चाललो माहेरी,.. जाऊ ना राणीसरकार,..?”

अनु म्हणाली, “आता मी तुला इमोशनल ब्लॅकमेल करते,..” नको जाऊस ना माहेरी,मला करमत नाही,..प्लिज, आपण मज्जा करू,..थांब ना,..” एवढं बोलून अनु खळखळून हसायला लागली,..तसं अभिने तिला जवळ ओढलं,.. कुजबुजत्या स्वरात म्हणाला, ” खरंच नको जाऊ का ग..?” अनु म्हणाली, ” जा बाबा जा, जिले तेरी जिंदगी,..तुलाही कळेल काय असतं क्षणभर तरी माहेरी जाणं,.. आपल्या विषयी फक्त प्रेम असणाऱ्या कुशीत शिरून येणं,.. मायेचा हात, आठवणींचा पाट सतत गप्पांमधून वाहणं… सगळी भौतिक सुख एकीकडे आणि हे अनमोल सुख एकीकडे असतं,..”

अभि म्हणाला, ” अस्सं….. मग येतोच हे सुख उपभोगून,..”

अनु त्याला बसमध्ये बसवून आली,.. तिला वाटलं, खरंच भारी कल्पना आहे ही, भावाला माहेरपण करायचं,….तिने लगेच स्वतःच्या भावाला फोन लावला,.. “ ये ना दोन दिवस, अभि गावाला गेलाय, मला सोबत होईल तुझी,..” दुसऱ्या दिवशी भाऊ हजर,..

दोन्हीकडे माहेरपण रंगलं,..बहिणीच्या मांडीवर डोकं ठेवून आठवणींच्या गप्पांना ऊत आला,..कधी झरझर डोळे वाहिले तर कधी खळखळाटाने डोळे गच्च भरून आले,..एक नातं घट्ट होतं, ते आणखी विश्वासाने घट्ट झालं,..भावाचं माहेरपण बहिणीच्या अंगणी फुलून आलं.

संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जगातील पहिले प्रेमपत्र… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

? विविधा ?

☆ जगातील पहिले प्रेमपत्र… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

आजकाल मोबाईलच्या वापरामुळे पत्रलेखन जवळपास थांबल्यासारखेच झाले आहे. पण काही वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीच्या पत्राची वाट पाहण्याचा काळ होता. पत्र लिहिणाऱ्याच्या भावना पत्रात उतरत आणि ते ज्याला लिहिले आहे त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचत. म्हणून तर प्रिय व्यक्तीची पत्रे जपून ठेवली जात. त्यांची पुन्हा पुन्हा पारायणे होत असत. हिंदी चित्रपटात तर या गोष्टीचा उपयोग करून गीतलेखकांनी अनेक गाणी लिहिली आहेत. आणि ती कमालीची लोकप्रिय होऊन लोकांच्या ओठांवर आली. नायिकेने नायकाला प्रेमपत्र लिहावे, पोस्टमन हा त्यांच्यामधला पत्र पोहोचवणारा दूत. कधी कधी नायिकेला पत्र लिहिता येत नाही. मग ती पोस्टमनलाच सांगते

खत लिख दे सावरियाके के नाम बाबू

कोरे कागज पे लिख दे सलाम बाबू

वो जान जायेंगे, पहचान जायेंगे.

त्या नायिकेला एवढा विश्वास आहे की आपले फक्त नाव असलेले पत्र त्या प्रियकराला मिळाले की बाकी सगळं तो समजून जाईल.

पण तुम्हाला माहित आहे का की रुख्मिणीने श्रीकृष्णाला लिहिलेले पत्र हे जगातील पहिले प्रेमपत्र असावे. किती बुद्धिमान म्हणावी रुख्मिणी ! आणि तिच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमीच. मी असे का म्हणतो त्याला कारण म्हणजे त्या वेळची परिस्थिती. रुख्मिणी ही विदर्भराजा भीमकाची सुंदर आणि बुद्धिमान कन्या. लहानपणापासूनच श्रीकृष्णाच्या पराक्रमाच्या कथा तिच्या कानावर आल्या होत्या. आणि त्या ‘ सावळ्या सुंदरास ‘ तिने मनानेच वरले होते. पण तिचा भाऊ रुख्मी हा श्रीकृष्णाचा द्वेष करणारा होता. त्याच्या मनात तिचा विवाह शिशुपालाशी व्हावा अशी इच्छा होती. शिशुपाल हा सुद्धा श्रीकृष्णाचा द्वेष करणारा होता. रुख्मीने आपल्या बहिणीवर म्हणजे रुख्मिणीवर अनेक बंधने लादली होती. ती तिच्या स्वतःच्या मर्जीने कोठेही जाऊ शकत नव्हती. अशा वेळी तिच्या हातात काहीही नव्हते. तिचे आईवडील सुद्धा रुख्मीपुढे हतबल झाले होते.

त्यामुळे अशा परिस्थितीत तिच्या डोक्यात श्रीकृष्णाला पत्र लिहिण्याचा विचार येणे ही गोष्टच तिच्या बुद्धिमत्तेची निदर्शक आहे. पत्र लिहिणे आणि ते श्रीकृष्णाला पाठवणे आणि नंतर त्याच्यासोबत पळून जाऊन विवाह करण्याचे धाडस दाखवणे या तिच्या कृतीचे, गुणांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

आपल्या पत्रात  ती श्रीकृष्णाला म्हणते

” हे भुवनसुंदरा, जेव्हापासून मी तुझे गुण ऐकले आहेत, तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडले आहे. आणि तुला समर्पित झाले आहे. तू माझे हरण करून घेऊन जा. तुझ्यासारख्या सिंहाचा भाग शिशुपालरूपी कोल्हा नेतो आहे असे कदापि होऊ नये.

साधना, संस्कार, प्रीती, भक्ती इत्यादि धन घेऊन मी येईन. मी सतत तुझी पूजा करून काही पुण्यकृत्ये केली आहेत, आणि मनाने तुला वरले आहे. आता प्रत्यक्षात माझा स्वीकार कर.

अंबेच्या देवळात मी गौरीपूजेसाठी जाईन, तेव्हा तू माझे मंदिरातून हरण कर. आणि पराक्रमाने शिशुपालादिकांना हरवून राक्षसविधीने माझे पाणिग्रहण कर.

तू आला नाहीस तर मी समजेन की माझ्या साधनेत काही कमतरता राहिली असेल. तू मला या जन्मी लाभला नाहीस तर मी प्राणत्याग करीन, पण जन्मोजन्मी तुझी वाट पाहीन, आणि अंती तुझीच होईन !!”

या पत्रातला मला आवडलेले वाक्य म्हणजे ती श्रीकृष्णाला म्हणते , ” साधना, संस्कार, प्रीती, भक्ती इ धन घेऊन मी येईन. ” किती सुंदर विचार. आणि लाख मोलाचे धन. पैसा नाही, हुंडा नाही, वस्तू नाही. तर साधना, संस्कार, प्रीती आणि भक्ती या सुंदर भावना हेच धन. आणि तेच ती घेऊन येते. आणि श्रीकृष्ण जिचा सखा आहे, पती आहे तिला आणखी काय हवे ? आणि त्या श्यामसुंदराला सुद्धा कशाची अपेक्षा असते ? तुमची साधना महत्वाची. संस्कार महत्वाचे. प्रीती आणि भक्ती महत्वाची. तुम्ही भक्तिभावाने आपले हृदय त्याला अर्पण करा, म्हणजे तो रुख्मिणीप्रमाणे तुमचेही हरण करील. तुम्ही त्याचे होऊन जाल. हाच तर या पत्रातला आपल्या सगळ्यांसाठी संदेश आहे,  नाही का?

©️ विश्वास देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भगवंताने हे जग तुम्हाला खेळायला दिलंय… श्री श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ भगवंताने हे जग तुम्हाला खेळायला दिलंय… श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

१९८७ साल असेल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु करून ३-४ वर्षं झाली होती. आम्हा तीन पार्टनरपैकी एक पार्टनर विलास भावे छोट्याश्या ऑपरेशनचे निमित्त होऊन गेला. मोठा धक्का होता. पण शो मस्ट गो ऑन. मी आणि माझा पार्टनर श्रीहरी ह्या धक्क्यातून सावरलो. एक वर्षात नवीन जागा घेतली आणि तिथे स्थलांतर करून व्यवसाय वाढवायला सुरवात केली. नव्या जागेत जाताना, आज विलास हवा होता ही खंत होतीच. पण परमेश्वरी इच्छा वेगळीच होती. व्यवसाय वाढत होता. कामगार आणि स्टाफ वाढला, १८-२० पर्यत गेला. संख्या वाढली तशी दर महिन्याच्या ओव्हरहेडचे गणित आणि बँकेचे हप्ते जुळवणे सुरु झाले. ऑर्डर होत्या, पण त्या वेळेत पूर्ण व्हाव्यात म्हणून व्यवसायाला शिस्त आणि सिस्टीम लावणे सुरु होते. आम्हा दोघांचे वय तिशीचे आणि बहुतांश नोकर आमच्यापेक्षा २-३ वर्षेच लहान. दोघे-तिघे तर वयाने मोठेच होते. कधी कधी ताण येत असे. त्या काळात फोनचा नंबर लागायला १०-१० वर्षे लागत. नव्या जागेत OYT special कॅटेगोरीत तब्बल १०हजार रुपये भरून फोन कनेक्शन घेतले. या दहा हजाराची जुळवाजुळव अनेक महिने चालू होती. एकंदर घडी बसत होती. कॉम्प्यूटर नव्याने येऊ लागले होते. त्यासाठी लागणारे UPS आम्ही बनवत होतो. डिमांड होती. डीलर नेटवर्क होते. महिना सधारण ४०-५० UPS विकले जात. इतरही काही प्रॉडक्ट होती. electronic product असल्याने आवश्यक components सहज मिळत नसत. इम्पोर्ट करण्यास बंदी असल्याने अनेक गोष्टी राजरोसपणे स्मगल करून येत. कोणास ठाऊक कसे? पण 

लघुउद्योगांना त्या मिळत. अर्थात विक्रेते सांगतील त्या किमतीत. सभोवताली उद्योगास अनुकूल असे कोणतेच वातावरण नव्हते. पण तरुण वय, काहीतरी करायची जिद्द त्यामुळे जाणवायचं नाही. उद्योग हा अशाच प्रतिकूलतेत करायचा असतो, अशीच ठाम धारणा. त्यामुळे ठीक चालले होते. कधी कधी ताण यायचा पण पुन्हा सर्व विसरून काम सुरू व्हायचे.

नव्या ऑफिसच्या केबिनमध्ये आम्हा दोघा पार्टनरांची टेबले शेजारी होती. दोन खुर्च्यांमध्ये एका स्टुलावर फोन असे. फोनचे मध्ये असणे ही दोघांची सोय होती. एक दिवस सकाळी १०चा सुमार असेल, मी फोनवर कोणाशी तरी बोलत होतो. माझे बोलणे काहीसे लांबत चालले होते. श्रीहरीला देखील कोणाशी तरी बोलायचे असल्याने माझे संपण्याची वाट बघत होता. तेवढ्यात समोर एक भगवी कफनी घातलेले साधारण पन्नाशीचे गृहस्थ येऊन उभे राहिले. ‘कुलकर्णी आहेत का?’ असे विचारते झाले. त्यांना मी हाताने खूण करून थोडे थांबण्यास सांगितले व फोनवरचे बोलणे सुरूच ठेवले. त्यांनी मला उलटी खूण केली- ‘तुमचे चालू द्यात, मी थांबतो. काही घाई नाही.’ कदाचित मी कुणावर तरी रागावलो होतो, आवाज जास्तच चढत होता. फोनवर एका सप्लायरवर उशिरा मटेरियल देण्याबद्दल बहुदा रेशन घेत होतो. बोलता बोलता ५ मिनिटे झाली, १० झाली, १५ मिनिटे झाली. आमची नजरानजर झाल्यावर गृहस्थ शांतपणे ‘असूद्या असूद्या तुमचं चालू द्यात’ अशी खूण करत. मी बोलता बोलता मनात विचार करत होतो- ‘भगवे कपडे घातलेले माझ्याकडे कशाला आले असतील? काही देणगी वगैरे मागायला असतील बहुदा. देणगी मागितली तर यांना कसे कटवता येईल?’ आत येताना त्यांनी माझे नाव घेतल्याने श्रीहरीनेदेखील त्यांना कशासाठी आलात? काही मदत करू का? असे विचारले नाही. त्याच्या डोक्यातही भगव्या कफनीमुळे असाच काहीसा संभ्रम झाला असावा. माझे बोलणे संपले. मी फोन ठेवला, तर श्रीहरीने झडप घालूनच उचलला कारण तो फोनसाठी फार काळ ताटकळला होता. फोनवर मी तावातावाने बोलताना का कुणास ठाऊक उगाचच उभा राहून बोलत होतो. माझा बोलणे झाले, तोच त्या गृहस्थांनी मलाच बसायला सुचवले. ‘माझ्याच केबिनमध्ये मला बसायला सांगणारे हे कोण?’ असा मनात मी विचार करत होतो. तोच ते म्हणाले “नमस्कार कुलकर्णी, शांत झालात का?” मी थोड्या गुर्मीतच “होय” असे म्हटले. त्यानंतर ते गृहस्थ म्हणाले.  “कुलकर्णी आपण व्यवसायाचं नंतर बोलूयात का? मी बराच वेळ तुम्हाला फोनवर कोणाशीतरी बोलताना ऐकतोय. तुम्हाला एक सांगू का? अहो गरज नाहीये एवढे रागावण्याची. तुम्ही कोणाशी बोलत होतात हे तुम्ही मला सांगू नका. त्याची गरजही नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, असा विचार करा की तुमच्या सभोवतालची सर्व माणसे तुम्हाला परमेश्वराने खेळायला दिली आहेत. खेळताना आपण रागावतो का? खेळताना आपण खिलाडूवृत्तीने खेळायचं. इतकं रागवायची गरज नसते.” मी एका सप्लायरबरोबर बोलत होतो, त्याने माल वेळेत न दिल्याने आमची डिलिव्हरी वेळेत होणार नव्हती. मी त्यांना म्हणालो “ अहो यांना Advance देऊनही  वेळेत माल देत नाहीत. मी कस्टमरला काय सांगू. तुम्ही माझ्या जागी असाल तर काय कराल.”

बाबा शांतपणे म्हणाले “ तुम्ही रागावलात. आता ते वेळेत माल देणार का?”

“अहो नाही ना. वेळेविषयी बोलतच नाहीत”…मी

“ हे बघा तुमच्या रागाने ते डिस्टर्ब झाले. त्याचीही काही मजबुरी असेल. तुमचा राग ते दुसऱ्यावर काढतील. बाकी वेगळे काय घडेल? मी तुम्हाला सांगतो. तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे खिलाडूवृत्तीने बघा. अहो हे तुमचे शेजारी बसलेले पार्टनर, बाहेर काम करत असलेला तुमचा स्टाफ, तुमची बायको, मुलं, आई-वडील, सप्लायर, कस्टमर, सरकारी अधिकारी, आता तुमच्याशी बोलत असलेला मी– हे सगळंसगळं खेळायला दिलंय अशा दृष्टीकोनातून जीवनाकडे बघा. बघा कशी मजा येते ते. या खेळात जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे भिडू मिळतील. गीता हेच सांगते. ”

महाराज बोलत होते त्यात तथ्य वाटत होते. कुठेतरी मी आतून हललो होतो. कुठेतरी प्रकाश पडत होता.  

“बरं आता मी माझ्या येण्याचे प्रयोजन सांगू का? मला माझ्या मुलासाठी एक UPS घ्यायचाय. मला तुमचे नाव श्री. अमुक यांनी सांगितले. ते म्हणाले कुलकर्णीचा UPS घ्या. मी २ वर्षे वापरतोय उत्तम आहे.”

“ बापरे, बसा ना. सर सॉरी मी तुम्हाला बसा देखील म्हटले नाही.” …मी. समोर उभे असलेले गृहस्थ देणगी मागायला आलेले साधू नसून माझे कस्टमर आहेत हे कळल्यावर माझी होणारी सहाजिक प्रतिक्रिया.

“ असू देत. मी माझी ओळख करून देतो. मी शितोळे. पुण्यातले प्रसिद्ध सरदार शितोळे तुम्हाला माहित असतील तर त्यांच्यापैकी. कसब्यात एकमेव उत्तम स्थितीत असलेला दगडी वाडा आमचाच. मोठे ऐतिहासिक घराणे आहे आमचे. पेशव्याचे सरदार होतो आम्ही. अर्थात आजची ती ओळख नाही. मी अमेरिकेत योग शिकवतो. गेली अनेक वर्षे देशात परदेशात योगाचा प्रसार करतो. माझे बहुतांशी वास्तव्य अमेरिकेत असते. या भगव्या कपड्यांवर जाऊ नका. तो माझा व्यावसायिक युनिफार्म आहे. तसा मी सांसारिक आहे. मुलाला कॉम्पुटर इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला, त्याच्या कॉम्पुटरसाठी UPS हवा, हे आपल्या भेटीचे प्रयोजन. मला घाई नाही. UPSची किंमत सांगा. तुमचे सर्व पैसे आत्ताच देऊन टाकतो. तुम्ही म्हणाल तेव्हा मुलगा येऊन UPS घेऊन जाईल. तुमच्या बोलण्यावरून थोडा उशीर होणार असे दिसतेच आहे. हरकत नाही. पण उत्तम वस्तू द्या.”

मी अवाक होऊन बघत होतो. माझ्यासमोर एक योगी गुरुस्वरूप होऊन उभा होता. माझ्या करंटेपणामुळे त्यांना ओळखले नाही. माझे हे गुरु जाताजाता मला मंत्र देऊन गेले “ कुलकर्णी भगवंताने हे सर्व जग तुम्हाला खेळायला दिलं आहे. अनेक भिडू तुम्हाला मिळतील, येतील आणि जातील सुद्धा. तुमचा डाव आहे तोपर्यंत खेळायचं. आणि आनंदी राहायचं, आनंद द्यायचा आणि घ्यायचा देखील. बघा जमतंय का? जमलं तर मिळणारा आनंद तुमचाच. कोणी हिरावून घेणार नाही.”

शितोळेगुरूंना मी नंतर आजतागायत भेटलो नाही.  पण “ कुलकर्णी, भगवंताने हे जग तुम्हाला खेळायला दिलंय ” 

हे शब्द मात्र कायम कानात घुमतात. आयुष्यातले अनेक प्रसंग मी ह्या मंत्राने निभावून नेले आहेत.  आज गुरुपौर्णिमेनिमित्त सहज या गुरूंची आठवण झाली म्हटलं लिहून काढावं. जगण्याचा साधा मंत्र आहे- सर्वाना सांगावा.  

लेखक : श्री श्रीकांत कुलकर्णी

९८५००३५०३७

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शोध स्वतःचा… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ शोध स्वतःचा… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

दोन माणसे प्रवासाला निघाली. दोघांचेही स्थान एकच असल्याने त्यांनी एकत्र प्रवास केला.

सात दिवसांनंतर त्यांना वेगळे होण्याची वेळ आली.

पहिला प्रवासी : “ भाऊ, आपण आठवडाभर एकत्र राहिलो. तुम्ही मला ओळखलंत का?”

दुसरा प्रवासी : “ नाही, मी तुम्हाला ओळखत नाही, परंतु आपण एकत्रच प्रवासात होतो, एवढं मात्र खरं…”.

पहिला प्रवासी : “ सर, मी एक प्रसिद्ध ठग आहे पण तुम्ही नक्कीच महान ठग आहात… तुम्ही तर माझे गुरु   निघालात….!” 

दुसरा प्रवासी : “ कसे काय?” 

पहिला प्रवासी : “ काहीतरी चोरी होईल या आशेने मी सतत सात दिवस तुमच्या वस्तूंचा शोध घेतला, पण काहीच सापडले नाही. तुम्ही एवढ्या लांबच्या प्रवासाला निघालात आणि तुमच्याकडे काहीच नाही ! तुम्ही पूर्णपणे रिकाम्या हाताने आला होतात काय ?” 

दुसरा प्रवासी : “ माझ्याकडे एक मौल्यवान हिरा आणि काही सोन्याची नाणी आणि खर्चापाण्यासाठी काही पैसे होते.” 

पहिला प्रवासी : “ मग खूप प्रयत्न करूनही मला ते का सापडले नाहीत?” 

दुसरा प्रवासी : “ मी जेव्हा कधी बाहेर जायचो, तेव्हा मी हिरे, नाणी आणि पैसे तुमच्या पिशवीत ठेवत असे, इतके दिवस तुम्ही माझी पिशवी शोधत राहिलात ! तुम्ही  तुमचं स्वतःचं गाठोडं शोधण्याची तसदी घेतली नाही, तर मग तुम्हाला काहीही सापडेल, अशी अपेक्षा कशी करायची ?

तात्पर्य : ईश्वर नेहमी आपल्या झोळीत आनंद ठेवतो, पण आपल्या गाठोड्याकडं बघायला आपल्याला वेळच नाही !  ज्या दिवशी आपण इतरत्र सुख शोधणे बंद करू, तेव्हाच आपण आपले सर्व प्रश्न सोडवू.

जीवनातील सर्वात मोठा गूढ मंत्र म्हणजे स्वतःचा शोध घेणे आणि जीवनाच्या मार्गावर पुढे पुढे जाणे !

संग्राहक –  श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ सात सुरांची साथ नव्यांची… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ सात सुरांची साथ नव्यांची… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… तू जो मेरे सुर मे सुर मिलाके, संग गाले, तो  जिंदगी हो जाए सफल… सा रे ग म प ध..नी सा… ये म्हणा कि गं तुम्ही पण माझ्या बरोबर.सात सुरांची साथ नव्याची ऑडिशनला आपल्याला उदया जायचयं! आहेना लक्षात? आपल्या सातही जणींची  फायनला निवड पक्की होणारच.केशरबाई तू काळी दोन मधे सुरु करशील.पिवळाक्का तुम्ही काळी चार घ्या बरं. उदयाचा विठूचा गजर टिपेला न्या. तुम्ही दोघी करडू दिदी  यमनचा षड्ज द्रुतलयीत लावाल. मी आणि ग्रे ताई मालकंस नि भैरवी ने मंद्र सप्तकात सांगता करू.

…परिक्षक कोणी असले तरी आपण घाबरायचं नाही. घाबरायचं त्यांनी आपल्याला. एक सुरात म्याँव म्याँव करून त्यांना सळो कि पळो करु.पायात घुटमळत राहू.तोंड पुसत पुसत त्यांना आपली निवड करायला भाग पाडू.नाहीतर अंगावर फिस्कारुन येउ म्हणावं हि धमकी देऊ.आमच्या शिवाय स्पर्धा होणे नाही!आम्ही नसलो तर स्पर्धा उधळून लावू. इतकंच नाही तर विजेते आमच्यातलेच असतील.बाहेरचा कुणी दिसलाच तर स्पर्धेत फिक्सिंग झाले असण्याचा संशयाचा धुरळा मेडियात उडवू देउ अशी तंबीच त्यांना देउ या; आणि आपले सगळेच नंबर आले तर स्पर्धा खेळी मेळीत निकोप वातावरणात झाली,उदयाच्या नव्या गायकांना प्रोत्साहन प्रेरणा अश्या स्पर्धेतून मिळते,म्हणून अश्या स्पर्धा सतत होणं गरजेचे आहे असं मेडियाला मुलाखत देताना तोंड फुगवून सांगूया.यातूनच जे आयोजक, ठेकेदार यांचे उखळ कायम पांढरे होत जाईल. टीआरपी वाढला कि स्पर्धेचे एपिसोड वाढतील.चॅनेल वाल्यांची चांदी आणि नव्या गायकांची एक्सपोजरची नांदी होईल.तेव्हा उदया

“… सारे के सारे गा मा के लेकर गाते चले….”  कोरस हम साथ साथ मे म्हणू या… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक संवाद… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? मनमंजुषेतून ?

☆ एक संवाद… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

“अगं,अगं, किती ग त्रास देतीयेस ! अतीच करतीस बाई! तुला भूक लागलीय का? काय हवंय खायला? तुला भात आवडत नाही .पोळी आवडत नाही. सारखा खाऊ दे म्हणतीस, छोट्या छोट्या गोळ्या हो ना ? दूध दिलं तर नाटकं किती करतीस गं ! एकदम थंड असलं तरी चालत नाही. जरासं गरम असलं तरी चालत नाही. शिळं आवडत नाही. ताजंच हवं. तेही वारणा पिशवीचं असलं की मग कसं भराभर जातं बरं पोटात.

सकाळी, सकाळी उठल्याउठल्या तुला खेळायची हुक्की येते. माझी साडी धरून, ओढून खेळायला चल म्हणतीस. पण मला वेळ असतो का ग तेव्हा? आणि काय गं, तुला खेळायला दोन छोटे बॉल आणून दिले होते ना, एक पांढरा- एक लाल, ते कुठं घालवलेस बरं? नुसती माझ्याकडे बघत राहिलीयेस.

अगं तो रोज सकाळी गोरा, गोरा, गब्बू ,गब्बू राजकुमार येतो ना, त्यालाही भूक लागते. त्यालाही खाऊ हवा असतो म्हणून तो येतो. तुला तो आवडत का नाही बरं ?आणि त्याचा राग का येतो बरं? किती छान आहे दिसायला. आणि किती गरीब आहे ना ! घरात आला की, त्याला हाकलून लावतेस. तो पण मग म्हणतो, बाहेर ये- मग तुला दाखवतो बरोबर. अगं त्याची ताकद तुझ्यापेक्षा जास्त आहे ना ! बाहेर गेलीस की तुझ्याशी भांडतो ना ? मग कशी घाबरून घरात पळून येतीस गं.

तुझी झोपायची पण किती तंत्रं. गादीवर सुद्धा काहीतरी मऊ मऊ, म्हणजे माझी कॉटन साडी तुला लागते. मग महाराणी निवांत झोपणार. झोपायच्या अगोदर सगळ्यांच्याकडून “अंग चेपून द्या, लाड करा,” म्हणून मागे लागतेस, हो ना ? आणि मग घरातलं प्रत्येकजण तुझी कौतुकं करत बसतात. प्रत्येकजण तुला मांडीवर खांद्यावर घ्यायला बघतात. पण तुला ना, कोणी उचललेलंच आवडत नाही. कोणी पापे घेतलेले आवडत नाही. असं का ग ? किती गोड आहेस ग ! म्हणून तर तुझं नाव ‘ रंभा ‘ ठेवलंय ना ! तुला कपाळाला टिकली लावली की, किती सुंदर दिसतेस .अगदी तुझी दृष्ट काढावीशी वाटते बघ.

तुझी आई किती शांत आहे ना ! ती बाहेरून, दुसरीकडून आलेली, म्हणून ती घरातली सून. आणि तू तिची मुलगी. याच घरात जन्माला आलीस ना? तू नात म्हणून सगळ्यांची जरा जास्तच लाडूबाई. म्हणशील ते लाड पुरवतो आम्ही  सगळेजण. तरीपण जराही अंग धरत नाहीस. बारीक ती बारीकच राहिलीस बाई !.सारखी इकडून तिकडे धावत असतीस ना. चालताना सुद्धा, शांतपणे आणि सावकाशपणे चालणं कसं  ते तुला माहीतच नाही. मी तर तुला तुडतुडीच म्हणते.

अगं रंभा ,मी एकटीच बडबडत राहिलेय.  तू काहीच बोलत नाहीयेस. रागावलीस का ? कशी ग माझी मुलगी ! बोल ना काहीतरी .बोल की ग.  बोल. बोल.” — 

“ म्याव, म्याव,  मियाव  मियाव, म्याऊ, म्याऊ…….”  

(आमच्या घरातील तीन मांजरांपैकी एकीशी केलेला संवाद.) 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘Admiral’ कान्होजी राजे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘Admiral’ कान्होजी राजे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

काल, ट्विटर वर कोणीतरी पोस्ट केलं होतं की सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे नाव गुगल सर्च केल्यावर ‘Pirate’ म्हणजे ‘ समुद्री डाकू ‘ म्हणून येत आहे. याची शहानिशा करून घ्यावी म्हणून मी सुद्धा सर्च केलं आणि खरंच गुगल वर दुर्दैवाने सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या नावाच्या description खाली pirate लिहिलेले होते.

मुळात, या गोष्टीवर आक्षेप का घ्यावा, याचं संक्षिप्त रुपात उत्तर देतो. ज्या वेळेला पोर्तुगीज, ब्रिटीश, डच आणि इतर काही परकीय हल्लेखोर भारताच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या ठिकाणांवर हल्ला करीत होते, लुटत होते, तेव्हा कान्होजी राजांनी त्यांना चांगला ‘सडकवून’ काढला होता. 

कान्होजी राजांच्या भयामुळे अनेक हल्लेखोर त्यांच्या भागात यायचा विचार सुद्धा करत नव्हते ! कान्होजींच्या शौर्याच्या कथा खूप आहेत. कालांतराने, १९५१ साली मराठा नौदलाचे ‘Admiral’ कान्होजी राजे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘INS ANGRE’ या नावाने एका ‘Stone Frigate’ ला नाव देण्यात आले.

कान्होजी राजांचे योगदान अतुलनीय आहे ! पण दुर्भाग्य बघा, इतक्या शूर वीर नौका-नायकाला ‘Pirate’ म्हणून संबोधले गेले आहे ! ही गोष्ट वेळीच सुधारणे गरजेचे आहे. याकरिता आपण एक काम करू शकतो.

  1. गुगल वर जाऊन ‘कान्होजी आंग्रे’ सर्च करा !
  2. नावापुढे दिसणारे तीन डॉटवर क्लीक करून ‘send feedback’ वर क्लिक करा ! आणि ‘Pirate’ या शब्दाच्या बाजूच्या एडिट बटणावर क्लिक करा.
  3. नवीन Window Open झाल्यावर तिथे ‘Inappropriate’ किंवा ‘Incorrect’ वर क्लिक करून ‘फीडबॅक’ मध्ये ‘Maratha Navy Admiral’ असे लिहून सेंड करा !

जास्ती जास्त संख्येने ही गोष्ट करा ! आणि लोकांना देखील असे करण्यासाठी आव्हान करा ! कारण हा इतिहास लोकांना माहित असायलाच हवा. सन्मान क्वचित होतो, पण बदनामी मात्र सहज केली जाते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. 

लेखक : अज्ञात

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फक्त एक फोन कॉल…” ☆ सुश्री हेमा फाटक ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “फक्त एक फोन कॉल…” ☆ सुश्री हेमा फाटक ☆ 

पंचाऐंशी वर्षाच्या आईला पन्नाशी पार लेक फोन करते. खरंतर भरपूर वाचन वगैरे करणारी आई, तरीही वय बोलायचं ते बोलणारच. फोन केला आणि काय म्हणतेस विचारलं, तर आई फक्त “चाललंय चाललंय” असं उदास स्वरात म्हणत राहते. क्वचित काही तब्येतीचं छोटंमोठं.

कधीतरी अचानक फोन करत लेक विचारते, “अगं कोकणात केळीच्या पानावर दशम्या करायचे बघ किंवा मेथांबा केला पण तुझ्यासारखा नाही झाला….. त्याची रेसिपी सांग ना जरा , आज फार आठवण आली त्या चुलीची आणि चुलीवरच्या दशम्यांची , ‘ तुझ्यावाल्या ‘ मेथांब्याची.”  इथे ‘ तुझावाला ‘ या शब्दाला वेगळंच वजन मिळतं. 

वास्तविक लेकीचा मेथांबा अप्रतिम झालेला असतो. 

तर…. तिकडे आईच्या डोळ्यात आलेली चमक इकडे लेकीला आतून जाणवते. दिसत नसतं तरी लेकीला जाणवतं आई उदासपणा टाकत सरसावून बसलेली….. 

आई तिच्या सवयीप्रमाणे अगदी बेसिक पासून सुरु करते— ” तांदूळ धुवून स्वच्छ फडक्यावर, घरातल्या घरात सावलीत वाळवायचे ……. ” 

” तुला सांगते ….अमूक स्वच्छ, तमुक एकसारखं,  ढमूक कडकडीत वाळवून…! !”

— रेसिपी चालूच राहते. ठाऊक असलेल्या गोष्टी, लेक हं हंss , अच्छा अच्छा म्हणत ऐकत राहते. ओठांवर मंद हसू खेळत राहतं. मेथांब्याच्या भांड्याकडे बोट दाखवत नवरा खूणेनं विचारतो, ” मेथांबा झालाय ना, मग हा फोन कशाला?” ती त्याला खूणेनं गप्प करते. फोन चालू असतो.

चुलाण्याचा सुगंध आणि दशम्यांची चव , मेथांब्याचा जमून आलेला पिवळट काळसर केशरी रंग तन मन भरून व्यापून राहतात. 

लेकीला स्वतःच्या घरात पडलेली पन्नास कामं दिसत असतात, पण हे एक्कावनावं त्याहून फार मोठं, मोलाचं. 

— आई बोलते …. आई बोलत राहते. 

— लेक शांत झालेली असते. 

लेक आईची आई होऊन जाते. फार मोठ्ठं चमकदार काहीच घडलेलं नसतं.. फक्त एक फोनकॉलच तर असतो. 

छोट्या गोष्टीही अशा आभाळ भरून टाकतात —– 

संग्रहिका : सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दत्त दर्शना जायाचं,जायाचं… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ दत्त दर्शना जायाचं,जायाचं… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

हवीहवीशी वाटणारी थंडी आणि उत्साहवर्धक वातावरण ही डिसेंबर ची खास वैशिष्ट्य. डिसेंबर मध्ये रानमेव्याची सुद्धा लयलूट असते . त्यामुळे भाजीपाला आणि  फळफळावळ ह्यांची पण चंगळ असल्याने हा काळ खूप संपन्न वाटतो. बोरं,गाजरं,हरबरा, ऊस,वाटाणा, वाल,अंबाडीची बोंड,भरताची वांगी ह्यांनी जेवणाचे चार घास जरा जास्तच जातात आणि मग ह्या अशा सकस घरी केलेल्या पदार्थांवर ताव मारल्याने जरा थोडसं वजन हे वाढतंच आणि त्या वाढत्या वजनाचा   दोष मात्र आपल्या माथी येतो.बरं एकदा हिवाळ्यात वाढलेलं वजन उन्हाळ्यात कमी होईल अस म्हणता का, तर अजिबात तसूभरही वजन कमी होण्याचं मुळी नावच घेत नाही.

डिसेंबर महिना अजून एका गोष्टीसाठी आवडतो.  दत्तजयंती ! उत्साहात साजरा होणारा एक उत्सव. जसजसं आयुष्य पुढेपुढे जातं तसतसे नवनवीन अनुभव गाठीशी लागत असतात. काही भले तर काही बुरे. भले अनुभव लक्षात ठेवावे आणि बुरे अनुभव तेथेच विसरून सोडून द्यावे. दरवर्षी संपूर्ण सप्ताह दत्तमंदिरात जाणे व्हायचे नाही फक्त दत्तजयंती ला मात्र न चुकता मंदिरात जायचे. ह्यावर्षी मात्र हा संपूर्ण सप्ताह दत्तमंदिरात जावसं आपणहून वाटलं. त्यामुळे रात्री बँकेतून आल्यावर दत्तगुरुंच्या दर्शनासाठी दररोज झिरी येथील दत्तमंदिरात जायचे. दिवसभराचा सगळा शीण,मरगळ ह्या दर्शनाने कुठल्याकुठे गायब व्हायची.त्या मंदिराच्या शांत,पवित्र वातावरणाच्या परिसरात रात्री भक्तीसंगीताचे सुमधुर सूर कानात साठवत दोन घटका तेथे टेकल्यानंतर एका अतीव शांत, समाधानी वृत्तीची अनुभूती मिळायची. 

ह्यावेळी दररोज झिरी येथील दत्तमंदिरात काही काळ घालवतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. दत्ततत्वाने भारलेल्या परिसरात आपण वास्तव्य करतांना आपोआप एक प्रकारचा  अलिप्तपणा,निर्मोही वृत्ती मनात ठसायला लागते. मोह,लालसा काही क्षण का होईना मनातून हद्दपार झाल्यागत वाटतं.जणू कमळाच्या पानावरील दवबिंदू आपल्यात वास करीत असल्याचा अनुभव येतो. जसं कमळा च्या पानावरील थेंबाच अस्तित्व तर असतं पण तो थेंब मात्र कुठल्याही गोष्टी ला न चिकटता अलिप्त होऊन जगतो.

ह्या  महिन्यात बहुतेकांचे आराध्य दैवत, श्रद्धास्थान असलेल्या श्री.दत्तगुरुंची जयंती.मार्गशीर्ष पोर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर श्री दत्तगुरुंचा जन्म झाला. आपले प्रमुख चार अवतारी दैवत असलेल्या दैवतांपैकी श्री दत्तगुरुंचा जन्म संध्याकाळी सहाचा तर शक्तीचे दैवत मारुतीरायांचा जन्म पहाटे सहाचा, श्रीरामचंद्रांचा जन्म दुपारी बारा तर कृष्ण जन्म रात्री बाराला साजरा केल्या जातो.

दत्तजयंती ला “दत्ततत्व”हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने अधिक कार्यरत असते.म्हणून ह्या दिवशी दत्तगुरुंची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्वाचा अधिकाधिक लाभ मिळतो अशी आख्यायिका आहे.दत्तात्रयांच्या हातातील जपमाळ ब्रम्हदेवाचे शंखचक्र श्री विष्णूंचे,तर त्रिशूळ डमरू हे भगवान शंकराचे प्रतीक समजल्या जातं.दत्तजन्माच्या सात दिवस आधीपासूनच गुरुचरीत्राचे पारायण करायला सुरवात केली जाते.

श्री दत्तगुरुंच्या प्रमुख अवतारांपैकी पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ,दुसरा अवतार नृसिंह सरस्वती तर तिसरा अवतार श्री स्वामी समर्थांचा मानला जातो.

आपल्या भागातील जागृत देवस्थांनां विषयी आपल्या मनात काकणभर श्रद्धा जरा जास्तच असते त्यामुळे मला अमरावती जवळील कारंजा आणि झिरी ही दोन्ही ठिकाणं जरा जास्तच जवळची आपली वाटतात.

बडने-या जवळच दोन किमी. वर “झिरी”नावाचे दत्तगुरुंचे जागृत देवस्थान आहे. काही ठिकाणं,काही स्थानचं अशी असतात की प्रत्यक्ष परमेश्वर तेथे वास करीत असतील असं आपल्याला मनोमन जाणवतं.झिरी येथील पवित्रता परमेश्वराच्या अस्तित्वाची ग्वाही देत निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं झिरीचे दत्तमंदिर हे मानसिक स्वस्थता, शांतता,तृप्ती, व समाधान देणा-या स्थानांपैकीच एक.ह्या मंदिरातील शांत,हसरी,तेजस्वी मुर्ती आपल्याला सकारात्मक ऊर्जा, संकटातही तारुन नेणारे पाठबळ आणि कितीही संपन्नता असली तरी जमिनीवर दोन पाय घट्ट रोवण्यासाठी आवश्यक असलेली थोडी विरक्ती शिकविते.ह्या मंदिराजवळच एक भव्य असे श्रीराममंदिरही आहे.दोन्ही मंदिरांचा परिसर हा जवळपास सव्वाशे ते दिडशे वयाच्या वटवृक्षांनी घेरलेला आहे. हे धीरगंभीर वटवृक्ष आणि त्याच्या पारंब्या आपल्याला चांगल्या सकारात्मक गोष्टी ह्या चिरंतर वा शाश्वत असतात हे शिकवून जातात.

मन ओढ घेऊन दर्शनासाठी जावे असे उद्मेगून वाटणारे दुसरे ठिकाण म्हणजे अमरावती जवळ चाळीस किमीवर असलेले श्री नृसिंह सरस्वतींचे कारजांलाड येथील जागृत देवस्थान. ह्या मंदिरातील प्रसन्न, मानसिक स्थैर्य सकारात्मक ऊर्जा देणारे. ते स्वामींचा प्रत्यक्ष वास असल्याची जाणीव देणारे ते सभागृह.ह्या मंदिरात उपनयन संस्कार करण्यासाठी शुभवेळ

शुभदिवस, शुभघडी हे काहीही बघण्याची गरजच नसते असा समज,अशी श्रद्धा आहे.स्वामींच्या नजरेच्या समोर झालेले उपनयन संस्कार आयुष्यात खूपकाही देऊन जातात असा ब-याच भक्तांचा अनुभव आणि श्रद्धा आहे.

दत्तजयंती च्या निमीत्ताने झिरीला दर्शनासाठी गेल्यावर मंदिराच्या पवित्र वातावरणात आपल्याला आलेले अनुभव आठवतात, आस्तिकता जागृत होते आणि आपोआपच त्याची महती आपल्याला अजून पटायला लागते.आणि ह्या सगळ्याचा परिणाम आपली कार्यक्षमता, सकारात्मकता, उत्साह वाढून आपल्यात चुकून शिरलेल्या नकारात्मकतेला पिटाळून लावण्यात होतो.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक वादळ —-जमादार बापू लक्ष्मण लामखडे ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

? इंद्रधनुष्य ?

☆ एक वादळ —-जमादार बापू लक्ष्मण लामखडे ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆ 

नुकतंच मी एका वादळाविषयी वाचलंय…

अनेक हिंदी चित्रपटांतून देशातील, विशेषतः विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या मुंबईतील अंडरवर्ल्ड जगतातील अनेक पैलू दाखवले जातात. अनेक स्मगलर्स ,गॅन्गस्टर्स – त्यांच्या कामाच्या पध्दती, डावपेच दाखवून कुणीतरी हिरो किंवा प्रामाणिक पोलीस ऑफिसर ते कसे उधळून लावतो हे दाखवले जाते.अर्थात यात रंजकतेचा भाग मोठा असतो. यातील कथानक काल्पनिक असते. असे चित्रपट लोकप्रिय झाले. पण मुंबईतील गँगस्टर्स,स्मगलर्स यांना सळो की पळो करून सोडणारा एक खंदा वीर आपल्या देशात होऊन गेला,आणि त्याने एकेकाळी दैदिप्यमान इतिहास निर्माण केला होता. हा वीर आणि त्याने घडवलेला इतिहास आज कुणाला फारसा माहीत नाही.

२०२२ हे या वीराचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने व्हाट्सअप वर एक पोस्ट वाचली आणि त्यातून या  कर्तृत्वाची माहिती झाली, आणि माझ्या शब्दात ती सर्वांपर्यंत पोहोचवावीशी वाटते आहे.  

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा या वीराचे नाव आहे- जमादार बापू लक्ष्मण लामखडे. २ जुलै १९२२  रोजी जुन्नर तालुक्यातील (जि.पुणे) मंगरूळ पारगाव इथं एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्लेगच्या साथीत  वडिलांचे निधन झाले होते. मोठा भाऊ मुंबईतील गोदीत कामाला होता. गावी आपल्या आईची करडी शिस्त, आणि रानात शेळया चारताना आजूबाजूच्या निसर्ग यांच्या सान्निध्यात बापू लहानाचा मोठा झाला. त्याची शरीरयष्टी मजबूत बनली. पुढे त्याने चरितार्थासाठी मुंबईच्या गोदीत कामाला सुरुवात केली. 

१९४४ मध्ये मुंबई कस्टममध्ये शिपाई म्हणून तो रूजू झाला. कसलेले शरीर, धाडसी स्वभाव, तीक्ष्ण नजर या जोरावर बापूने कस्टममध्ये अजोड काम केले. १९६०-७० हे दशक हा मुंबई अंडरवर्ल्डचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. या काळात अनेक स्मगलर्स आणि गॅन्गस्टर्सनी देशात धुमाकूळ घातला होता. सामाजिक अशांतता आणि अस्थैर्याचे वातावरण निर्माण केले होते. दारू,मटका, स्मगलिंग, यामधून देशाला वेठीस धरले होते.अशा अनेकांवर बापूंनी वचक बसवला होता. अनेक तस्करांना पकडून त्यांच्याकडून त्यांनी त्यावेळी लाखो रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. आपले असेच कर्तृत्ववान, धाडसी सहकारी आणि वरिष्ठांच्या सहाय्याने बापूंनी त्याकाळी अनेक गुन्हेगारांवर वचक बसवला होता. त्यांच्या कर्तृत्वाच्या आणि धाडसी यशाच्या अनेक कहाण्या मुंबई कस्टमच्या इतिहासात नोंदल्या गेल्या आहेत.

बापूंना पुढे जमादार पदावर बढती देण्यात आली. त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल  १९६४ मध्ये त्यांना राष्ट्रपतीपदाने गौरविण्यात आले. बापू लामखडे यांचे जीवनकार्य हा देशप्रेमाचा धगधगता आविष्कार होता. सततची जागरणं आणि  धावपळीचा परिणाम बापूंच्या शारीरिक स्थितीवर होऊन ते आजारी पडले आणि त्यांचे निधन झाले. ‘ बापूंनी आपल्या धाडसाने मुंबई कस्टमच्या इतिहासात एका कर्तृत्ववान पाठ कायमचा लिहून ठेवला आहे,’ असा उल्लेख मुंबई कस्टमने केला. त्यांना दुसर्‍यांदा मरणोत्तर राष्ट्रपती पदक बहाल करण्यात आले. मुंबईतील कस्टम ऑफिसच्या चौकाला, ” जमादार लक्ष्मण बापू चौक ”  असे नाव देण्यात आले. तसेच त्यांच्या जन्मगावी त्यांचा ब्राॅन्झचा पुतळा उभारण्यात आला आहे.

जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांचे जीवनकार्य हे साऱ्या भारतीयांसाठी देशाभिमानाचे जाज्वल्य प्रेरणास्रोत आहे.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ.

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares