मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कुठलाही आजार आपल्याला का होतो? ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? इंद्रधनुष्य ?

☆ कुठलाही आजार आपल्याला का होतो? ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

कुठलाही आजार आपल्याला का होतो? 

तर त्याचे सहज सोपे उत्तर आहे —- तुम्ही स्विकारल्यामुळे !

आपल्या शरीरात पाण्यावर तरंगण्याची नैसर्गिक शक्ती आहे. पण तरीही माणूस पाण्यात बुडून मरतो. याला काय म्हणाल ? आपल्या मनाने अतिशय स्ट्रॉंगली स्विकारलेय की मला पोहायला येत नाही आणि कोणालाही पोहायला येत नाही ही अंधश्रद्धा आहे. हत्ती किती जड आहे– तोही पोहतो. कारण त्याने ठरवलेले नाही. त्याला माहीतच आहे  तो पाण्यावर तरंगणार आहे. अहो सापाला हात पाय नसतात. तोही पाण्यात पोहतो. म्हणजे हात पाय हलवले, तरच आपण पाण्यावर तरंगू शकतो हाही गैरसमजच आहे. बघा जी माणसं पाण्यात बुडून मरतात त्यांचे शरीर काही वेळाने पाण्यावर तरंगायला लागते. याप्रमाणेच आपल्यात प्रतिकारशक्ती आहे. ती आपल्याला कसलाच आजार होऊ नये यासाठी सतत काम करत असते. तिला मनापासून स्ट्रॉंगली मान्य करा. हेच खरे शरीर शास्त्र आहे. ही शक्ती तुमच्यात नसेल तर मेडीकल सायन्स काहीच करू शकत नाही. 

तर ताप आल्यावर,सर्दी झाल्यावर, शिंक आल्यावर कसलाही आजार झाल्यावर थोडे थांबा. तुमच्यातील प्रतिकारशक्तीला काम करू द्या. अशा आजारांवर वारेमाप खर्च करणे शरीरावर अत्याचार आहेत. ही अंधश्रद्धा आहे. शरीरशास्त्रात नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजे खरे विज्ञान आहे. आपल्या शरीरातील अर्ध्याहून अधिक आजारांच्या मागे आपलं अज्ञ मन असतं. पण कित्येकदा पेशंटला याची माहिती नसते. डॉक्टरांकडे गेलं आणि उपचार घेतले की तात्पुरतं बरं वाटतं, थोड्या दिवसांनी पुन्हा दुखणं, उफाळून येतं, काय करावं, ते समजत नाही.

मन आणि शरीर यांना जोडणारी काही लक्षणे बघू या.

१) एखाद्या गोष्टीची जबरदस्त भिती किंवा चिंता वाटली की घशाला कोरड पडते. 

२) परीक्षेचा किंवा अजून कसला तणाव असेल तर पोटात गोळा येतो, 

३) समोर एखादा अपघात किंवा दुर्घटना पाहिली की हातापायातली शक्ती गळून जाते.

४) आणि याविपरीत सतत हसतमुख असणारी व्यक्ती नेहमी क्वचितच आजारी पडते.

तर हे सिद्ध झाले आहे की, आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही अज्ञात मनाची सत्ता चालते. जसं की, समोर मातीचे कण उडाले की सेकंदाच्या दहाव्या भागात लगेच पापण्या मिटतात. अज्ञात मन शक्तीशाली आहे, पण एखाद्या सेनापतीसारखं, त्याच्यावर सत्ता चालते विचारांची !— ताकतवार असला तरी तो गुलामच ! दिलेला आदेश पाळणं एवढचं त्याचं काम !

आपण जे काही बोलतो तेच आपले विचार आहेत .

१) ब्लडप्रेशर आणि हृदयविकार –  समजा एखादा माणुस, नकळत, अशी वाक्ये पुन्हा पुन्हा वापरत असेल, उदा.—

– त्याला बघितलं की माझं रक्तच खवळतं !

– ह्यांच्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं, आणि हे बदलले !

– माझी तळपायाची आग मस्तकाला जाते !

—क्वचित अशी वाक्ये वापरली गेली, तर हरकत नाही, पण पुन्हा पुन्हा हेच बोलल्यास आणि ते सुप्त मनात गेल्यास त्याचा विपरीत परिणाम रक्ताभिसरणावर नक्कीच होतो. डॉक्टरकडे गेल्यावर औषध-उपचाराने काही काळ बरं वाटतं, पण अज्ञात मन त्याचा पिच्छा सोडत नाही. ही सर्व वाक्य सतत तणावात असणार्‍या व्यक्तीच्या सवयीचा भाग बनतात आणि लवकरच तिला ब्लडप्रेशर आणि मोठ्या स्वरुपाचे हृदयाचे विकार घेरण्यास सुरुवात करतात.

—थोडक्यात सतत मानसिक तणाव, हताशपणा आणि निराशा अनुभव करणाऱ्या व्यक्तीला हृदयाचे विकार लवकर घेरतात.

२) आतड्यांचे विकार – जी व्यक्ती स्वतःलाच घालून पाडून बोलते, स्वतःची निंदा करते, स्वतःला दुबळा समजते, तिला छोट्या आतड्यांच्या विकारांची समस्या उदभवते.

३) अपचन – बहुसंख्य लोक ह्या आजाराने त्रस्त आहेत. खरं तर मलविसर्जन ही अतिसहज आणि नैसर्गिक क्रिया आहे, तरीही काही जणांना ‘धक्का देण्यासाठी’ कृत्रिम उपायांचा, जसं की एखादे चूर्ण किंवा एखादं औषध ह्यांचा आधार घ्यावा लागतो.

—आता ह्याची बरीचशी कारणं आहेत, इथे एका उदाहरणची चर्चा करुयात.—- काही वेळा ह्याचं कारण बाल्यावस्थेत दडलेलं सापडतं. कडक शिस्तीच्या नादात आईवडीलांनी मुलाला एखादी शिक्षा केलेली असते, त्याचा राग त्याच्या मनात असतो. लहान मूल आईवडीलांवर राग काढू शकत नाही, त्याला त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागते, त्यांना विरोध म्हणून ही क्रिया तो रोखून धरतो. ह्या ठिकाणी आई वडील त्याला जबरदस्ती करु शकत नाहीत. हळुहळू तो मोठा होतो, शिस्तीचा बडगाही संपतो. पण आपल्या आतड्यांवरचं नैसर्गिक नियंत्रण तो हरवून बसतो.

—असं ही बघण्यात आलं आहे की जेव्हा व्यक्ती आर्थिक संकटात सापडते, तेव्हा तिची पचनशक्ती कमजोर होते. जे लोक कंजुष वृत्तीचे असतात, त्यांच्यामध्ये मुळव्याध्याची समस्या जास्त आढळते.

४) छोट्या छोट्या गोष्टींवरही एखादी व्यक्ती वारंवार उत्तेजित होते, चिडते, अस्वस्थ होते, त्याचा परिणाम जठर आणि पित्ताशयावर पडतो.

५) डोकेदुखी – आजकाल बहुतांश भगिनीवर्गाला झंडुबाम शिवाय झोप येत नाही. कारण काय असेल बरं?—

– ह्या व्यक्तीला बघितलं की माझं डोकं दुखतं !

– त्याने माझं खूप डोकं खाल्लं !- आमच्या ह्यांच्यासमोर कितीही डोकं फोडा, काही फायदा नाही,

— निरंतर, नकळत असं बोलत राहिल्याने अज्ञ मनात संदेश पोहचतो की माझ्या डोक्याला दुखायचे आहे.

आणि मायग्रेनचा त्रास चालू!

—डोकेदुखीची अजूनही काही कारणे आहेत. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अप्रिय घटना घडलेली असतेच, पण मनातल्या मनात पुन्हा पुन्हा तिला उगाळण्याचा स्वभाव असेल तर डोकेदुखी सुरु होते—–

तेव्हा असे कटू अनुभव विसरुन जाणेच इष्ट!—कधी नकोसे वाटणारे काम, त्रासदायक काम अंगावर येऊन पडते, आणि डोके दुखते. जितके पोस्टपोन केले तेवढा त्रास होतो, तेव्हा अशी कामे तात्काळ निपटून काढावीत.

६) पाठदुखी वा कंबरदुखी – 

एखादी व्यक्ती सतत जबाबदारीच्या ओझ्याने वाकून थकून गेली असेल तेव्हा तिला पाठदुखीला वा कंबरदुखीला  सामोरं जावं लागतं. असह्य वेदना होतात. ह्यात मानेपर्यंतचे स्नायू आखडले जातात. त्यांच्यावरचा ताण जाणवतो.

चेहरा मूळ स्थानी न राहता उजवीकडे किंवा डावीकडे कलतो.

— आपापले औषधौपचार चालू ठेवा, पण हे रोग शरीरातून समूळ उपटून काढायचे असतील तर स्वयंसूचना हाच ह्यावरचा एकमेव उपाय आहे. जसं की डोकेदुखीचं उदाहरण घेऊ – तंद्रावस्थेत जाऊन आपल्या अज्ञात मनाला सुचना द्या –

—आता माझं डोकं एकदम हलकं हलकं होत आहे, 

—आता ते अजून शिथील आणि हलकं झालं आहे, 

—डोके दुखण्याचे प्रमाण कमी होत आहे, माझ्या डोक्यात जमा झालेलं अतिरिक्त रक्त आता शरीराच्या इतर    भागात सुरळीतपणे पसरत आहे.

—माझा डोकेदुखीचा त्रास नाहीसा होत आहे, काही क्षणांमध्ये ही बैचेनी दूर होईल !—-आणि डोकेदुखी गायब !

प्रत्येक रोगासाठी अशा सूचना तयार करुन त्या अज्ञ मनापर्यत पोहचवून रोगमुक्त होता येते.

सारांश काय — तर मित्रांनो, भावनांची कोंडी करुन जगू नका, रोग बनून ते शरीराला पोखरतील.  राग व्यक्त करा, आणि मोकळे व्हा !

इथे मला एका महापुरुषाचा दृष्टांत आठवतो. त्यांना राग आल्याक्षणी ते कागद घ्यायचे आणि सविस्तर लिहून काढायचे, मनातले संपूर्ण भाव ओतून रिते व्हायचे. ते कागद दोन चार दिवस तसेच टेबलावर ठेवायचे आणि नंतर जाळून किंवा फाडून टाकायचे.

—अशा प्रकारे मनातली सारी खळबळ बाहेर काढून टाकता येते. आता क्रोधाची भावना नाहीशी होते आणि हलकं हलकं वाटतं.

तुम्हा सर्वांना, निरोगी आणि ठणठणीत आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

 

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भाड्याची सायकल… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ भाड्याची सायकल… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

एक आणा तासवाली भाड्याची सायकल घेऊन, तिच्या दांड्यांच्या त्रिकोणाच्यामधून पलिकडच्या पॅडलवर पाय टाकून सायकल चालवतांना कितिदा पडलो असू त्याला काही गणतीच नाही. पडतांना शाळेच्या गणवेशाची खाकी अर्धी चड्डी चेनमध्ये अडकून किती वेळा टरकली होती, ते आता आठवतसुद्धा नाही. पण चड्डी वीतभर फाटल्याचं आईच्या लक्षात आलं की आपली हातभर फाटायची हे बरोब्बर लक्षांत आहे !! शिवाय सायकलीत अडकून वाकडं-तिकडं पडायला व्हायचं. त्या अष्टवक्रावस्थेतले सुरुवातीचे काही क्षण भ्रमिष्टावस्थेत जायचे. नेमकं काय घडलंय हेच कळत नसे. जरा भान आल्यावर आपल्या हातापायांवर खरचटलंय्, ओरखडे आलेत, डोकं आपटलंय् याचा सुगावा लागायचा !! चेनवर आणि तिच्या कांटेवाल्या चाकावर तेलाच्या बुदलीतून ओतलेल्या लिटरभर मशिन ऑइलचे रांगोळीछाप ठसे हातापायावर, कपड्यांवर उमटायचे. आणि खरंच सांगतो, त्या सगळ्याची गंमतच वाटायची आणि पडायची हौस वाढायची.

पुन्हा पुन्हा पडून सुद्धा त्या लहान वयातली सायकल शिकायची जिद्द, चिकाटी वाखाणण्यासारखी होती. पुढे पुढे टांग टाकून शिटेवर बसता यायला लागलं की दिग्विजयी आनंद व्हायचा. वेळेचं भान सुटायचं. दोन दोन तास सायकल चालवली हे भाड्याचे दोन आणे देतांना समजायचं. सुरुवातीला सायकल शिकवणारा शीट धरून मागेमागे धावत यायचा, त्याचा केवढा मोठा आधार वाटायचा. नंतर नंतर तो मधेमधे शीट सोडतो हे लक्षात यायचं आणि आपण आता आदळणार या भीतीने सायकल लटपटं लटपटं धावायला लागायची.

आणि एकदा सायकलवर प्रभुत्व मिळवलं की हात सोडून सायकल चालवणं, दांडीवर एक, शिटेवर एक आणि स्प्रिंगच्या चापामुळे बोचणार्‍या कॅरियरवर एक, असे तिब्बलशिटचे तीन तीन भिडू एकदम बसून, सर्कशीतले धाडसी प्रयोग करण्याचा आत्मविश्वास वाढीला लागायचा. त्या काळी बहुतेक सगळ्यांकडे हर्क्यूलसची सायकल असायची. काळ्या नाही तर हिरव्या रंगाची. ती विकत घेतांना तिच्यासोबत, धोतरवाल्यांसाठी धोतर पोटरीवर बांधून ठेवणार्‍या स्टेनलेस् स्टीलच्या नाही तर पितळेच्या क्लिपा मोफ़त मिळायच्या. काही तरी मोफत मिळतंय याचं आकर्षण तेव्हाही होतं ! त्या काळी, म्हणजेच १९५५-६० च्या दरम्यान , माझ्या अटकळीप्रमाणे सायकलची किंमत ३५/४० रुपयांच्या आसपास होती. सायकलला दरमहा आठ आणे – म्हणजे वर्षाचे सहा रुपये म्युनसिपाल्टीचा टॅक्स् होता. तो वर्षाच्या सुरुवातीला पहिल्याच महिन्यात भरावा लागायचा. त्याचा एक अल्युमिनियमचा बिल्ला मिळायचा. तो हॅंडलजवळच्या ब्रेकच्या ताड्यांना नटबोल्ट असायचे, त्यातल्या एका बोल्टवर फिक्स् केला जायचा. पोलिसांचं लक्ष बिल्ल्यावर असायचं. खरं म्हणजे पोलिस हे काही म्युन्सिपालटीचे नोकर नव्हेत. पण नसलेल्या बिल्ल्यात त्यांना संधी दिसायची. टॅक्स् भरायला उशीर झाला तर तीन रुपये दंड भरून तेवढ्याच पैशात – म्हणजे त्या तीन रुपयात बिल्ला मिळायचा. हे काय गणित होतं ते मला अद्यापही सुटलेलं नाही !! लोक टॅक्स् न भरता दंडच भरायचे ! त्यांना दंडात संधी दिसायची !!

संग्राहक – सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पुन्हा उभा राहिला चापेकर बंधूंचा वाडा.” ☆ सुश्री हेमा फाटक ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “पुन्हा उभा राहिला चापेकर बंधूंचा वाडा.” ☆ सुश्री हेमा फाटक ☆ 

चिंचवड, पुणे  येथील चापेकर कुटुंबातील तीन तरुणांनी स्वातंत्र्य संग्रमात स्वतःची आहुती दिली. त्यांचा जुना वाडा स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही दिमाखाने उभा होता. सन १९४८ मधील जळितात तो भस्मसात झाला. आगीतून वाचलेले वाड्याचे लाकूड घरोघरी लोकांनी सरपण म्हणून नेले. भिंतींची माती घरे लिंपण्यास, चुली सारवण्यासाठी लोक घेऊन गेले. वाड्याच्या मागे असलेल्या विहिरीची कचराकुंडी झाली आणि ती चक्क बुजवली गेली. वाड्याच्या जागेवर दारूचे  गुत्ते चालू लागले. कित्येक वर्षे त्याठिकाणी दारूचे  गुत्ते चालू होते. ज्या ठिकाणी क्रांतिवीर जन्माला आले त्या ठिकाणी दारू पिऊन लोक झिंगू लागले. गावातील लोकांना या गोष्टीची पुरेपूर जाणीव होती. पण हे सारे बंद करण्याचे धाडस दाखवणारा एकही वीर पुढे येत नव्हता. एक दिवस काही मंडळींनी एकत्र येऊन सन १९९५-९६ च्या दरम्यान उठाव केला. मारामाऱ्या झाल्या आणि दारूच्या गुत्याची त्या जागेवरून हकालपट्टी झाली.

क्रांतिवीर चापेकर बंधूंचा वाडा पुन्हा जसाच्या तसा उभा करण्याचा विचार आणि निर्धार झाला. त्यासाठी स्थानिक मान्यवरांची समिती निर्माण झाली. गिरीश प्रभुणे, डॉ. वैद्य, दत्ता दातार, कांता जाधव, अश्विनी मोकाशी अशा अनेक मंडळीनी चापेकर वाडा पुन्हा पूर्ववत उभा करण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला हजारो हात पुढे आले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सुद्धा ठराव करून या पवित्र कार्यासाठी अनुदान मंजूर केले. 

दि. २२ जून १९९७ रोजी चापेकर बंधूंच्या हौतात्म्याच्या शताब्दीदिनी कामास प्रारंभ झाला. जुन्या जाणत्या लोकांच्या मुलाखतीवरून वाड्याचा रचना-आलेख वास्तुरचनाकार संजू फणसळकर यांनी तयार केला.

काम महानगरपालिकेने टेंडरद्वारे एका ठेकेदाराला दिले. कामास प्रारंभ झाला. पाया भरला गेला. परंतु पुढील कामाचे क्लिष्ट व मोठे स्वरूप पाहून ठेकेदाराने काढता पाय घेतला. काम ठप्प झाले. त्यानंतर हे काम करण्यास कोणीही धजावत नव्हता. जुना वाडा, त्याचे जुने स्वरूप विशेषतः लाकडी काम त्यासाठी लागणारे किमती लाकूड, विशिष्ट प्रकारची तक्तपोशी, मेघडंबरी त्यावरील नक्षीकाम हे सारे पुन्हा तयार करावयाचे, या गोष्टी अत्यंत जिकिरीच्या, प्रचंड खर्चाच्या आणि कमीत कमी लाभाच्या होत्या. दगडाचे आणि विटांचे कामही तितकेच बारकाव्याचे आणि प्रमाणबद्धतेचे होते. विहीरही पुन्हा उभी करावयाची होती. सारे काही अवघड होते. राष्ट्रीय प्रेरणेनेच कोणी पुढे आला तरच हे काम पुरे होणार होते.

हे आवाहन पुण्यातील स्थपती नंदकिशोर एकबोटे यांनी स्वीकारले. त्यांनी  फायद्याचा काही विचार केला नाही. चिंचवड येथील प्रसिद्ध दैवत गजानन व संत मोरया गोसावी यांचा आशीर्वाद घेऊन सन २००४ मध्ये  नव्याने कामाला सुरुवात केली. हिरालाल व गणेश हे दोन सुतार व रोकडे नावाचा पाथरवट चालू असलेले काम पाहण्यासाठी आले. आणि  हे काम करण्याचे त्यांनी अतिशय आनंदाने स्वीकारले. 

वाडा पुन्हा उभा करण्यासाठी जुने सागवानी लाकूड मिळवून त्याचे योग्य त्या मापाचे दरवाजे, तुळया, खांब, कडीपाट इ. गोष्टी तयार करण्यासाठी स्वतंत्र मशिनरी खरेदी केली आणि जागेवरच लाकडांची कापणी करून सुताराकडून सर्व गोष्टी जशाच्या तशा बनवून घेतल्या. नेवासा या गावावरून दगड मागविला. व तेथील काही पाथरवटास बोलावण्यात आले. त्यांच्याकडून चौकातील दगडकाम, तुळशीवृंदावन, जोते, तळखडे, दगडी पायऱ्या तयार करून घेतल्या. अशी ही दगडी कामे अतिशय कष्टाची, बुद्धीची आणि नेटाची होती. 

सज्जावरील मेघडंबरी तयार करणे व ती बसविणे, त्यावरील कोरीव कामास उठावदारपणा आणणे, कडीपाटास सुबक आकार देणे, तुळई आणि खांब यामधील ब्रॅकेट्स तयार करून बसविणे, हे सारे काम फारच जिकिरीचे होते. जाड खांबावर फळ्यांचे अस्तर देऊन त्यांची जाडी प्रमाणबद्ध ठेवून त्यावर तुळया व मध्ये कडीपाट बसविणे हे साधे दिसले तरी कौशल्याचे काम होते. 

लहान आकाराच्या चपट्या विटा बाजारात उपलब्ध नव्हत्या. म्हणून ठराविक आकाराच्या विटा तयार करण्यासाठी वीटभट्टी सुद्धा जागेवरच लावण्यात आली होती. छपरासाठी लागणारी गोल नळीची कौले कोठेच मिळत नव्हती. हे सर्व साहित्य वीटभट्टीतून तयार करण्यात आले. वीटकाम इतके सुबक तयार करण्यात आले,आणि विटांचे सांधे एकमेकांस बरोबर जुळवून अशा पद्धतीने बसविण्यात आले की त्यातील सिमेंट कोठेही दिसत नाही. दर्शनी भिंतींचा रंग पिवळ्या मातीसारखा दिसणे गरजेचे होते. ही रंगसंगती साधण्यासाठी रंगांचे विविध नमुने आणून त्यांची मिश्रणे तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली. 

चौक, सोपे, आतील दालने, चौकातील वृंदावन, चौकात पूर्ण दगडी फरशी, अत्यंत रेखीव जोती, जोत्यांना ठिकठिकाणी बसवलेल्या कड्या, चापेकरांनी दुधासाठी पाळलेल्या गाई-म्हशी बांधण्यासाठीचा गोठा, सज्जा, सज्जा वरील मेघडंबरी, दरवाजा, बाजूच्या देवड्या, आतील पायऱ्या, असा तीनमजली वाडा अवघ्या काही महिन्यांत उभा राहिला. 

— चिंचवड गावात रामआळीत हा पूर्वाभिमुखी वाडा उभा आहे. वाड्यासमोरून उत्तर-दक्षिण असा गावचा हमरस्ता आहे. वाड्याच्यासमोर उभे राहिल्यावर दरवाजावरील गणेशपट्टी आणि वरील मेघडंबरीयुक्त सज्जा पाहून मन प्रसन्न होते. वाड्याच्या आत प्रवेश केल्यावर दगडी फरशीचा चौक, मधोमध असलेले तुळशीवृंदावन, चार सोपे, त्यावरील दोन मजले, सुंदर असे लाकूडकाम पाहिल्यावर खरोखरच चापेकरांचा हा वाडा नवा असला तरी जुन्या घटनांनी मात्र त्या काळातच घेऊन जातो. त्यांची त्या वेळची पितळी भांडी एका फडताळात ठेवलेली दिसतात. तर बाहेरच्या सोप्यात देव्हाऱ्यातील त्यांच्या पूजेच्या देवाचे दर्शन घडते. समोरच्या सोप्यात क्रांतिवीर दामोदर चापेकर यांचा पुतळा पाहिल्यावर क्रांतिदिन मनःचक्षू पुढे साक्षात उभा राहतो. वाड्याचे तिन्ही मजले पाहिल्यावर आणि परसातील विहीर पाहून नव्या उभ्या राहिलेल्या वाड्याचे मंगलमय प्रतिबिंब विहिरीतील पाण्यात दिसू लागते आणि त्याचक्षणी चापेकर बंधूंचा ब्रिटिशांच्या दडपशाही आणि अत्याचार यांच्या विरुद्ध दिलेला लढा आणि त्यातून प्राप्त झालेले वीरमरण याचा ज्वलंत इतिहास उभा राहतो.

संग्रहिका : सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग – ४३ – आशिया ते अमेरिका प्रवास ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग – ४३ – आशिया ते अमेरिका प्रवास ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

परिव्राजक म्हणून स्वामी विवेकानंद या आधी भारतात हवे तसे फिरले होते. पण हा प्रवास तसा नव्हता, आजही ते परिव्राजक होते, पण ही भ्रमंती ठरल्याप्रमाणेच, ठरलेल्या दिशेने आणि एका शिस्तीनेच करायची होती. तेरा हजार किलोमीटर अंतरावर जायचे होते.भारत भ्रमणात दरवेळी फिरताना त्यांच्याकडे सामान नसे. आता मात्र समान होते आणि पैसेही होते गरज म्हणून. सोय म्हणून. विवेकानंदांना याची सवय नव्हती. जहाजाचा प्रवास, सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण, वागण्या बोलण्यातले शिष्टाचार पाळणे याला ते हळूहळू सरावले.

त्यांच्या या पी अँड ओ कपंनीच्या पेनिन्शूलर जहाजातून याच वेळी मुंबईचे शेठ छबिलदास जपानला आणि भारतातील औद्योगिक युगाचे प्रवर्तक मानले जाणारे सर जमशेटजी टाटा शिकागोसाठीच प्रवास करत होते. एक आठवड्याने पहिला पडाव झाला एक दिवसाचा, सिलोन म्हणजे श्रीलंकेतील कोलंबो इथं.विवेकानंद शहरातून फिरून आले, नंतर जहाज पेनांगला थोडा वेळ थांबून, हाँगकाँगला आले. सिंगापूर, मलाया सुमात्रा यांचे दर्शन जहाजावरूनच झाले होते. हाँगकाँगला त्यांना खलाशी, कामगार, तिथले लोक यांचा व्यवहार पाहून तिथल्या दारीद्र्याची कल्पना आली. स्त्रियांची स्थिति समजली .अनेक गोष्टींची निरीक्षणे त्यांनी केली. चीनी मंदिरे आणि भारतीय मंदिरे पाहिली. कॅन्टनमध्ये चीनमधला पहिला बुद्धधर्मीय सम्राट आणि त्याचे पाचशे शिष्य यांच्या स्मरणार्थ उभे केलेले सर्वात मोठे बुद्धमंदिर पहिले. पण इथला बौद्ध मठ कसा असतो याची त्यांना उत्सुकता होती,

इथे एक मजेदार घटना घडली. गाईडने बुद्ध मठाजवळ विवेकानंदांना नेलं, पण कुणाला आत प्रवेश नव्हता. विवेकानंदांनी कसेबसे त्याला मनवून आत प्रवेश केला तेव्हाढ्यात आतून दंडुके घेऊन काही लोक आले. बरोबरचे प्रवासी बाहेर पाळले, पण विवेकानंद यांनी त्या माणसाचा हात धरून ठेवला आणि त्याला म्हटले, चीनी भाषेत ‘भारतीय योगी’ याला काय शब्द आहे? त्याने शब्द सांगितला. विवेकानंद जागचे हलले नाहीत. ठामपणे उभे राहिले आणि धावत येणार्‍या लोकांना त्या शब्दात आपण भारतीय योगी आहोत हे मोठयाने सांगितले. तसे चमत्कार झाला, सर्वांनी दंडुके खाली घेतले आणि सर्वजण नम्रपणे उभे राहिले.त्या मठवासी लोकांनी विवेकानंदांना हात जोडून विनंती केले की,भुते खेते आणि पिशाच्च यांची बाधा होऊ नये म्हणून तुम्ही ताईत द्यावेत . विवेकानंदांचा यावर अजिबात विश्वास नव्हता. पण हा विचार करण्याची ही वेळ नव्हती. त्यांचे समाधान करणे भाग होते. विवेकानंदांनी जवळचा कागद काढला, दोन तुकडे केले, त्यावर आडव्या उभ्या रेघा मारल्या, मधोमध ओम अक्षर लिहिले. आणि त्यांना दिले. त्याबरोबर त्यांनी आदराने तो घेतला आणि कपाळाला लावला. हे त्यांचे अज्ञान बघून विवेकानंदांना खूप कीव आली. याच जोडीला त्यांचे दारिद्र्य, अस्वच्छता हेही दिसले. नंतर त्या लोकांनी मठाच्या आतील भागात नेले तिथे, जुन्या हस्तलिखित पोथ्या ठेवल्या होत्या.त्या संस्कृतमध्ये होत्या आणि लिपी बंगाली होती. याचं त्यांना फार आश्चर्य वाटलं. तिथे बुद्ध मंदिरात पाचशे अनुयायांपैकी काहींचे चेहरे विवेकानंदांना बंगाली वाटले होते. मग त्यांच्या लक्षात आले की, बुद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी भारतातून जे भिक्षू गेले होते त्यापैकी अनेक बंगाल मधून गेले असले पाहिजेत. 

हाँगकाँग सोडल्यानंतर जहाज नागासकी बंदरात थांबले होते. जपान मध्ये शिरताच त्यांना चीन आणि जपान यातला प्रचंड फरक जाणवला होता. त्यांना जपान मध्ये दिसलं होतं, स्वच्छता, नीटनेटकेपणा, प्रत्येक बाबतीतली सौंदर्य दृष्टी, आधुनिक विज्ञानाचा केलेला स्वीकार, याचा त्यांच्या मनावर प्रभाव पडला होता.सरळ आणि रुंद रस्ते, शहराची नीटशी रचना, घराभोवती बगीचे, अशा शिकण्यासारख्या अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. त्यांना मनोमन वाटलं की जास्तीत जास्त भारतीय तरुणांनी जपानला एकदा तरी भेट दिली पाहिजे, इथेही त्यांना जपानी मंदिरांमध्ये भिंतीवर जुन्या बंगाली लिपीत संस्कृत मंत्र लिहिलेले आढळले. चीन आणि जपान हे दोन्ही देश भारताशी नातं सांगणारे दिसले. भारताकडे आदराने पहाणारे दिसले. पण भारताची आजची स्थिति विवेकानंदांनी पाहिली होती. याची तुलना त्यांनी लगेच केली. त्यांनी इथूनच लगेच शिष्यांना एक पत्र लिहिलं आणि परखडपणे म्हटलं की,  “जरा इकडे या, हे लोक पहा आणि शरमेने आपली तोंडे झाकून घ्या. पण परंपरेने गुलाम असलेले तुम्ही इकडे कसे येणार?तुम्ही जरा बाहेर पडलात की लगेच आपली जात गमावून बसाल. गेली कित्येक शतके आपण काय करीत आलो आहोत?. ”               

आशियामधून अजून जहाज बाहेर पडायचे होते, नव्या जगात पोहोचायला साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास अजून बाकी होता, पॅसिफिक महासागर पार व्हायचा होता. तोवरच विवेकानंदांनी मनातली ही व्यथा आपल्या शिष्यांना पत्रातून कळवली होती.

चौदा जुलैला योकोहामाला जहाज बदलून ‘एम्प्रेस ऑफ इंडिया’ या जहाजात ते बसले. आशिया खंडाला मागे टाकून, पॅसिफिक महासागरातून नव्या दिशेकडे जहाज मार्गस्थ होत होते. भारतातून निघताना त्यांची तयारी अनुयायांनी छान करून दिली होती. पण त्यात गरम कपडे नव्हते. त्यामुळे हा थंडीतला प्रवास खूप त्रासदायक ठरला.

पंचवीस जुलै १८९३ला संध्याकाळी जहाज व्हंकुव्हरला पोहोचले. इथून रेल्वेने दुसर्‍या दिवशी शिकागोला जायचे होते. इथे पहिल्यांदा विवेकानंदांनी अमेरिकेच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवले.

अमेरिकेचा भूप्रदेश, उंच उंच पर्वत, खोल दर्‍या, पांढर्‍या शुभ्र हिमनदया, घनदाट अरण्ये, अशी निसर्गाची अनेक रुपे बघून त्यांचे मन प्रसन्न झाले. शिकागोकडे जाणार्‍या, या गाडीत अनेक देशांचे प्रवासी बसले होते. त्यात केट सॅनबोर्न ही पन्नाशीची बुद्धिवंत लेखिका होती, तिच्याशी विवेकानंद यांचा संवाद झाला. त्यांचा पत्ता घेतला. ओळख झाली. त्यांनी घरी येण्याचं निमंत्रण पण दिलं. ते पुढच्या मुक्कामात कामी आले.

तीस जुलैला विवेकानंद शिकागोला उतरले. इथल्या बारा दिवसांच्या सुरुवातीच्या वास्तव्यात एकामागून एक त्यांना धक्के बसले. पहिलं म्हणजे प्रचंड महागाई, रोज पाच डॉलर खर्च, दुसर म्हणजे सर्वधर्म परिषद सुरू होण्यास अजून पाच आठवडे बाकी आहेत, तिसरं म्हणजे या परिषदेला प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहायचे असेल तर, कोणत्या तरी संस्थेचे अधिकार पत्र आवश्यक आहे, चौथं म्हणजे प्रतिनिधी म्हणून नाव नोंदविण्याची मुदतच संपली आहे. आता कोणालाही प्रतिनिधी म्हणून प्रवेश मिळणार नाही. आता पुढे काय? हे मोठे प्रश्न चिन्ह उभे होते.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अजूनही वेळ गेलेली नाही… लेखक – डॉ. नानासाहेब थोरात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ अजूनही वेळ गेलेली नाही… लेखक – डॉ. नानासाहेब थोरात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

इंग्लंडमध्ये काही वर्षांपूर्वी एका साडेतीन वर्षाच्या मुलीच्यासमोर तिची गरोदर आई घरातील जिन्यावरून पडली आणि बेशुद्ध झाली. — या तीन वर्षांच्या कोवळ्या जिवाने क्षणाचाही विलंब न करता ऍम्ब्युलन्सला फोन केला, 

आणि तिच्या या फोनमुळे फक्त आईचाच नाही तर पोटातील बाळाचाही जीव वाचला—- ऍम्ब्युलन्सला फोन करून ती मुलगी अनेक मिनिटे त्यांच्याबरोबर बोलत होती. तिचे बोलणे संपते न संपते तोपर्यंत ऍम्ब्युलन्स दारात हजर झाली होती—–जगातील अतिशय गर्दीचे शहर असलेल्या लंडनमध्येसुद्धा एखाद्या अपघातानंतर सरासरी आठव्या मिनिटाला ऍम्ब्युलन्स हजर होते. 

संपूर्ण ब्रिटनमध्ये या मुलीच्या प्रसंगावधनाचे आणि धाडसाचे कौतुक झाले आणि या एका फोनकॉलमुळे ब्रिटन सरकारने आपल्या शिक्षणपद्धतीत अनेक सुधारणा केल्या—–

—–प्रश्न हा नाही की त्या मुलीला ऍम्ब्युलन्स ऑपरेटरबरोबर बोलता कसे आले. तर प्रश्न हा आहे की त्या एवढ्या छोट्या मुलीला आपली आई पडल्यावर ऍम्ब्युलन्सला फोन करायचा असतो हे कसे समजले? ऍम्ब्युलन्सचा नंबर कुठून मिळाला?——- या प्रश्नाचे उत्तर दडले आहे गृहपाठात…..!!!  

ब्रिटनमध्ये मूल तीन वर्षाचे झाले की त्याला शाळेत प्रवेश मिळतो. आई वडील दोन्ही नोकरीला असतील तर सहा तास रोज मूल शाळेत थांबू शकते. या तीन वर्षाच्या मुलांना ना पाढे शिकवतात, ना ABCD शिकवतात, ना अभ्यासाचे ओझे देतात. याउलट या कोवळ्या जीवांना मोठ्यांशी कसे बोलायचे, रस्त्यावरून जाताना सिग्नलचे नियम कसे पाळायचे, गाडीमध्ये बसल्यावर सीटबेल्ट कसा लावायचा, आपली रूम कशी नीटनेटकी ठेवायची, खोटे बोलायचे नाही, अश्या अनेक दैनंदिन जीवनातील गोष्टी शिकवतात. आणि दररोज मुलांना शाळेत काय शिकवले जातेय ते पालकांना सांगितले जाते—-  फक्त सांगितलेच जात नाही तर संध्याकाळी घरी एकत्र जेवण करत असताना यावर चर्चा पण करायला प्रोत्साहित करतात, ज्यामुळे मुलांना शाळेत शिकवलेले व्यवस्थित लक्षात राहील. आणि हाच या मुलांचा गृहपाठ असतो. फक्त नियमच नाही, तर आपल्या रोजच्या जीवनात घरामध्ये प्लंबर, एलेक्टरिशियन, क्लीनर किंवा कचरा गोळा करणारे लोक, हॉस्पिटलमधील डॉक्टर, ऍम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, अगदी गॅरेजमध्ये जे लोक काम करतात, त्यांचा आपल्या रोजच्या जीवनात काय उपयोग असतो याचे प्रात्यक्षिक सुद्धा देतात. वर्षातील काही दिवस या लोकांना शाळेत बोलवून मुलांसमोर प्रात्यक्षिक दाखवतात. 

असेच एके दिवशी या मुलीच्या शाळेतसुद्धा ऍम्ब्युलन्सचे प्रात्यक्षिक होते. त्या बालमनांना त्यादिवशी जे काही वर्गात सांगितले आणि दाखवले त्याची चर्चा त्यांनी त्या रात्री जेवताना आपल्या आईवडिलांबरोबर गृहपाठ म्हणून केली. 

आणि तोच गृहपाठ त्या मुलीने लक्षात ठेवून आपल्या आईचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा जीव वाचवला. 

पुढे जाऊन संपूर्ण ब्रिटनभर त्याची चर्चा झाली आणि ब्रिटन सरकारने आपल्या शिक्षणपद्धतीत अजून सुधारणा करून ते अधिकाधिक प्रात्यक्षिक आणि निरीक्षण आधारित केले—- यामुळेच ब्रिटनमधील सर्वच शाळांमध्ये वर्षातील काही दिवस गॅरेज मेकॅनिकपासून, ते शेतकरी आणि त्यांची जनावरे इथपासून, ते हेलिकॉप्टर ऍम्ब्युलन्स डॉक्टरपर्यंत सर्वाना शाळेत बोलावून त्यांच्याकडून मुलांना प्रात्यक्षिक आधारित शिक्षण दिले जाते आणि त्याचा गृहपाठ रात्रीच्या जेवणावेळी पालकांकडून पक्का करून घेतला जातो. 

“आम्ही कुठेय….? “ हा प्रश्न आम्हाला कधी पडतो का? 

मुलांवर ओझे अपेक्षांचे—- 

गेले दोन दशके पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्याची चर्चा करत राहिलोय —- पण या बालकांच्या मनावरील ओझ्याचे काय?—- फक्त शाळाच या मुलांना दप्तराच्या आणि गृहपाठाच्या ओझ्यात दडपून ठेवतायत का? —-

याला पालकपण जबाबदार नाहीत का? 

माझ्या मुलाला शाळेत गेले की आकडे वाचायला आणि लिहायला आलेच पाहिजेत. मुलांना ABCD आलीच पाहिजे, सर्व खेळ आलेच पाहिजेत. याहूनही पुढे जाऊन त्यांना गाणे गायला आले पाहिजे, एखादे वाद्य वाजवायला आले पाहिजे— असा सगळा अट्टाहास का? 

ज्या बालवयात मुलांनी मातीत खेळले पाहिजे, झाडावर चढले पाहिजे, नदी-विहिरीत पोहले पाहिजे, रात्री आई वडिलांबरोबर शाळेतील गमती जमतीच्या गोष्टी केल्या पाहिजेत, त्या वयात इतरांच्या मुलांसारखे स्टेजवर नाचायला लावतोय, त्याची इच्छा नसताना शाळेचा नियम म्हणून गॅदरिंगमध्ये गाणी म्हणायला लावतोय, नाटकात भाग घ्यायला सांगतोय, हार्मोनियम, गिटार, तबल्याच्या क्लासला पण पाठवतोय, गणिताच्या- इंग्लिशच्या क्लासला पण जबरदस्तीने बसवतोय —–

—–आणि यातून काही शिल्लक असेल तर सर्रास सर्व शाळा त्या कोवळ्या जीवांवर नवनवीन प्रोजेक्टचा मारा करत आहेत. आज पर्यावरणाचा– उद्या चित्रकलेचा– परवा कॉम्पुटरचा– असे रोज नवनवीन प्रोजेक्ट त्या बालबुद्धीत अक्षरशः इंजेक्शनसारखे घुसवले जात आहेत—– त्या कोवळ्या जीवाला त्याचा त्रास होतोय हे पालकांना आणि शिक्षकांना का समजत नाही ? सात वर्षाचे मूल सकाळी सातला घरातून निघतेय ते रात्री सातला घरी येतेय. 

मनाने आणि शरीराने थकलेला तो जीव पुन्हा गृहपाठाच्या ओझ्याने आणि सकाळी पुन्हा लवकर उठण्याच्या चिंतने झोपी जातोय —– 

—-आमचे गृहपाठ नेहमी अवघड इंग्लिशचे आणि किचकट गणितांचेच का असतात? हे दोनच विषय आयुष्यात सर्व काही शिकवतात का? युरोप-अमेरिकेच्या सगळ्याच मुलांना कुठे चांगले गणित येते, जपान-जर्मनीच्या मुलांना कुठे फाडफाड इंग्लिश बोलता येते, आफ्रिकेतील सगळ्याच मुलांना कुठे वयाच्या दहा बारा वर्षात कॉम्पुटरचे कोडिंग काय असते हे माहित होते. 

—-स्पर्धांची खरंच गरज आहे का ? 

—-मग आमच्याच मुलांना हे सगळे लहान वयातच यायला हवे हा अट्टाहास का?

—-गृहपाठ नेहमी लेखनाचा आणि घोकंपट्टीचाच का असतो?—  तो आई वडिलांबरोबर, आज्जी आजोबांबरोबर चर्चा करायचा का नसतो? 

—-वर्गातील चार मुलांना एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले तर शाळेच्या मुख्याध्यापकांना त्याचे का टेन्शन येते? 

ते का पालकांना बोलावून मुलांची तक्रार करतात? 

—-माझ्या शाळेची मुलं सगळ्याच विषयात, सगळ्याच खेळात, सगळ्याच अभ्यासेतर उपक्रमात इतर शाळांमधील मुलांच्या पुढे असलीच पाहिजेत हा शाळांचा पण अट्टाहास का? आणि या अट्टहासातूनच बालमनावर गृहपाठाचे ओझे थोपवले जात आहे. 

याला शाळा जेवढ्या जबाबदार आहेत तेव्हढेच आजचे स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे पालक पण आहेत. 

शाळा आणि पालक या दोन्हीच्या संगनमताने हा गृहपाठाचा गुन्हा दररोज मुलांच्या माथी मारला जात आहे. 

एक दिवस गृहपाठ दिला नाही तर पालक अस्वस्थ होतायत, आसपासच्या दहा लोकांना विचारून खात्री करून घेतायत की खरंच आज गृहपाठ नाही ना.—- आम्ही शालेय अभ्यासक्रमात नवनवीन प्रयोग करतोय, नवीन पॉलिसीज घेऊन येतोय, पण स्पर्धेचे काय? —- खरंच  या बालमानांना एवढ्या लहान वयात या सगळ्या स्पर्धेची गरज आहे? 

माझे मूल सर्वच विषयात– सर्वच खेळात – सर्वच कलेत सर्वगुणसंपन्न असले पाहिजे हा पालकांचा अट्टाहास, आणि आमच्या शाळेची मुलं सर्वच क्षेत्रात यशस्वी झाली पाहिजेत हा शाळांचा अतिमहत्वाकांक्षीपणा, दोन्ही या कोवळ्या बालमनांना जीवघेण्या स्पर्धेत ढकलत आहेत. 

अजूनही वेळ गेली नाही, मूलभूत स्पर्धाविरहित सुधारणा करण्यासाठी ….. 

लेखक :  डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ,  मेडिकल सायन्स डिव्हिजन, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ||•• क्रिकेटचे असेही भक्त ••|| … श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

||•• क्रिकेटचे असेही भक्त ••|| श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆

क्रिकेटचे असे भक्त अनेक आहेत. दहा, बारा वर्षांपूर्वी मी एक समारंभ आयोजित केला  होता, तो समारंभ होता सुनील गावस्कर आणि विश्वनाथ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्ताने. त्यांचा सत्कार अमिताभ बच्चन ह्यांनी केला होता .. त्यावेळी अमिताभ बच्चन आल्यानंतर काही क्रिकेटपटू आणि अमिताभ बच्चन ह्यांना मी एका हॉलमध्ये नेऊन बसवलं होतं. तिथे चंदू बोर्डे आणि चंदू पाटणकर हे दोन क्रिकेटपटू सुद्धा होते. बोर्डे आणि पाटणकरांनी पाहिलं की समोर अमिताभ बच्चन आहे. त्यांची इच्छा झाली की अमिताभ बच्चनला जाऊन भेटावं. म्हणून हे दोघंजण गेले आणि चंदू बोर्डेनी अमिताभ बच्चनला हात पुढे करून सांगितलं, ‘ नमस्ते ..!! मी चंदू बोर्डे ..!! ‘ 

अमिताभ बच्चन दिलखुलास हसले, आणि चंदू बोर्डेना म्हणाले की, ‘ तुम्ही तुमचं नाव कशाला सांगता ..?? मी तुम्हाला तुमचीच एक आठवण सांगतो. तुम्हाला आठवतं का की, तुम्ही १९५८ साली दिल्लीला वेस्टीइंडिज विरुद्ध  शतक ठोकलं होतं ..?? ‘ 

बोर्डे म्हणाले की, ‘ हो. मला चांगलंच आठवतंय ..!!’ 

अमिताभ पुढे म्हणाला .. ‘ तुम्हाला हे ही आठवतंय का, की त्यावेळेला काही मंडळींनी तुम्हाला खांद्यावरून उचलून पॅव्हेलियनमध्ये नेलं होतं ..?? ‘ 

बोर्डे म्हणाले .. ‘ हो. आठवतं ..! !’ 

आणि मग अमिताभ बच्चनने त्यांना सांगितलं की, ‘ त्यातला एक खांदा माझा होता ..!! ‘ 

अमिताभने हे म्हटल्यावर चंदू पाटणकर, मी, बोर्डे, खरं तर आम्ही तिथे जे होतो, ते सर्वच शहारलो ..!! 

नंतर आणखीन एक गोष्ट आम्हाला कळली की, चंदू बोर्डेना उचलणारा तिथे आणखी एक तरुण होता, जो गोरा गोमटा होता. जो अमिताभ बच्चनचा मित्र होता. त्याचं नाव होतं राजीव गांधी ..!! 

गंमत पहा या दोन मित्रांपैकी एक ‘ वन मॅन फिल्म इंडस्ट्री ‘ झाला, आणि दुसरा देशाचा पंतप्रधान ..!! 

चंदू बोर्डे ह्यांनी १९६४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध दसऱ्याला भारताला एका छोट्या पण अफलातून खेळीने जिंकून दिलं. अत्यंत मोक्याच्या वेळेला त्यांनी अप्रतिम अशी आक्रमक फलंदाजी केली. त्यावेळेला स्टेडियममधली अनेक मंडळी स्तिमित झाली. त्यांना हर्षवायू झाला. आणि त्या आनंदाच्या भरात चंदू बोर्डेना खांद्यावरून पॅव्हेलियनमध्ये कोणी नेलं असेल ..?? 

त्या माणसाचं नाव होतं राज कपूर ..!! 

लेखक : – श्री द्वारकानाथ संझगिरी

संग्राहक : श्री सुनीत मुळे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ दावा परमार्थ… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – श्री श्रीकांत पुंडलिक ☆

डॉ निशिकांत श्रोत्री

? काव्यानंद ?

☆ दावा परमार्थ… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – श्री श्रीकांत पुंडलिक ☆

☆ दावा परमार्थ… डॉ निशिकांत श्रोत्री ☆

तुमच्या पायी आलो मजला दावा परमार्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ   ||ध्रु||

 

जीवन सारे व्यतीत केले मानव सेवेत

नव्हती कसली जाण काय आहे अध्यात्म

परउपकार न मजला ठावे अथवा ना स्वार्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ    ||१||

 

दारी आले त्यांच्या ठायी तुम्हांस देखियले

नाही आले त्यांच्यातुनिया तुम्हांस जाणीले

तुम्हाविना ना काहीच भासे जीवनात अर्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ    ||२||

 

जाणीव आता पैलतिराची शिरी असो हात

नाही कसली आंस असो द्या तुमचीच साथ

कृपा असावी उजळावे हो जीवन न हो व्यर्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ    ॥३॥

©️ डॉ. निशिकांत श्रोत्री, ९८९०११७७५४

☆ दावा परमार्थ – डाॅ. निशिकान्त श्रोत्री यांच्या कवितेचा रसास्वाद – श्री श्रीकांत पुंडलिक ☆

कविवर्य डॉ निशिकांत यांची ही एक भावपूर्ण कविता आहे. ही कविता म्हणजे कविवर्यानी आपल्या आयुष्याकडे वळून बघताना केलेले आत्मपरीक्षण आहे.जणू काही आयुष्याचा लेखाजोखाच मांडला आहे.

माणसाचं जीवनच प्रश्नमय आहे. जन्मल्याबरोबर माणसाला प्रश्न पडतो, “कोsहं?” या प्रश्नापासून सुरू झालेलं आयुष्य ‘”सोहं” या उत्तराप्रत येईपर्यंत अनेक प्रश्नांनी भारलेलं असतं. आणि माणूस त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. या जीवन प्रवासात पुष्कळ वेळा आत्मकेंद्री बनत जातो आणि तो फक्त स्वतःपुरता जगायला लागतो. मी, माझं कुटुंब, माझा उदरनिर्वाह, माझी समृद्धी याचा विचार करताना स्वार्थ काय परमार्थ काय या संबंधी तो विचार देखील करत नाही. पण जो ज्ञानी मनुष्य असतो तो मात्र या सर्व क्रियाकलापापासून अलिप्त होत स्वार्थ, परमार्थ, जीवन याचा, साकल्याने विचार करितो. प्रस्तुत  कविता म्हणजे याच विचाराचं भावपूर्ण प्रकटीकरण आहे.

कविवर्य आपल्या कवितेच्या पहिल्या कडव्यात अतिशय नम्रपणे, त्याच्या जीवनाचं अधिष्ठान असलेल्या सद्गुरू स्वामी समर्थाच्या चरणी लीन होतात आणि त्यांना आपल्या आयुष्यात केलेल्या जीवन प्रवासाची माहिती देतात.

कविवर्य स्वतः आयुःशल्य विज्ञान  स्नातक आहेत. त्यांना शारीरिक व्याधी आणि त्यातून सुटकेचा मार्ग माहिती आहे. या ज्ञानाच्या आधारे त्यांनी अनेकांना व्याधीमुक्त केलेलं आहे. त्यात त्यानी कुठलाही स्वार्थ जोपासला नाही. त्यामुळे स्वतच्याही नकळत कविवर्य अध्यात्मच जगले आहेत.

दुसऱ्या  कडव्यामध्ये कवींनी आपल्या कामागची प्रेरणा स्पष्ट केली आहे. कवींचा व्यवसाय जरी वैद्यकीचा असला तरी त्यामागची प्रेरणा मात्र, “शिव भावे जीव सेवा” हीच होती.  जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये कवींनी आपल्या आराध्य देवतेलाच पाहिले. व्यवसाय आणि जीवनातील यशाचं श्रेय मात्र विनम्रपणे कवी  स्वामी समर्थाना देतात.

मी कर्ता म्हणशी तेणे तू कष्टी होसी।

परा कर्ता म्हणस। तेणे तू पावसी। यश कीर्ती प्रताप॥”

ही समर्थ रासमदास स्वामी याची उक्ती कवी आचरणात आणतात. स्वामी समर्थाविना जीवन निरर्थक आहे हीच भावना या कडव्यात कवींनी मांडली आहे.

तिसऱ्या कडव्यात मात्र कविवर्याची भावना मात्र व्याकुळ झाली आहे. “संध्या छाया भिवविती हृदया” अशी भावना या कडव्यातून व्यक्त होते आहे. व्यासाच्या या वळणावर फक्त स्वामी समर्थाची साथ असावी आणि जीवन उजळून निघावे हीच भावना प्रकट होते आहे. आयुष्य हेच स्वामी समर्थाची पूजा, आणि आता उत्तरपूजा सुरू झाली आहे

न्यूनं संपुर्णतांयाती सद्यो वंदेतमच्युतं

ही कविता वाचत असताना शब्दांचा साधेपणा, प्रासादिकता, यामुळे कवितेमध्ये अंगभूत नादमाधुर्य निर्माण झाले आहे. कवितेतील आर्तता थेट  जगद्गुरू संत तुकारामाच्या, “तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता” या भावनेशी नाते सांगणारी आहे.

© श्री श्रीकांत पुंडलिक

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तुळस… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? विविधा ?

☆ तुळस… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

तुलसी श्रीसखी शिवे । पापहारिणी पुण्यदे |

नमो नारायणप्रिये ! नमस्ते नारदनुते ! नमो नारायणप्रिये ||

प्रत्यक्ष श्रीकृष्णांची सखी असणाऱ्या, पवित्र, पापांचे हरण करणाऱ्या, पुण्य प्रदान करणाऱ्या, नारदाकडून स्तुती केल्या गेलेल्या, नारायणाला प्रिय असलेल्या तुळशीला प्रणाम असो—- सकाळी स्नानानंतर तुळशीला पाणी देऊन प्रदक्षिणा घालण्याचे वेळी हा श्लोक म्हणण्याची प्रथा आहे. तुळशीत असलेल्या अनेक गुणांमुळे तिच्या सानिध्यात राहण्याने मिळणाऱ्या फायद्यामध्येच या प्रथेचे मूळ असावे.

तुलसी यस्य भवने प्रत्यहं परिपूज्यते | तद् गृहं नोपसर्पंति कदाचित् यमकिंकरा: ||

—-स्कंद पुराणात असा श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या घरात नेहमी तुळशीची पूजा केली जाते त्या घरातील सदस्य कमी आजारी पडतात. तुळशीची पाने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतात. तिच्या मंजिरी विष्णूला अर्पण केल्या तर मोक्ष मिळतो.

….. एका कीर्तनकाराने तिची कथा सांगितली होती ती अशी…… 

….. एका गावात तुळशी नावाची एक काळी सावळी मुलगी रहात होती. तिची आई लहानपणीच वारली. सावत्र आई तिला खूप त्रास द्यायची. म्हणायची, ” तू इतकी काळी. तुझे लग्नच होणार नाही.” तुळशी मोठी झाली आणि तिने एक दिवस आईला उत्तर दिले ,” पंढरपूरचा विठुराया माझ्यापेक्षा काळा आहे. तो करेल माझ्याशी लग्न.” 

आई म्हणाली, ” जा मग त्याच्याकडेच. नाहीतरी तू भूमीला भार आणि खायला कहार आहेस.” तुळशी देखील रागारागाने घराच्या बाहेर पडली. पंढरपूरला आली. तिथल्या बायका तिला चिडवू लागल्या. ” अग, त्याचे रुक्मिणीशी लग्न झाले आहे, तो तुझ्याशी कसा लग्न करेल? नुसता भुईला भार आहेस.” तुळशी रात्रंदिवस विठ्ठलाचे नामस्मरण करत राहिली. तिने अन्न पाणी सोडले. विठुराया काही तिच्याकडे आला नाही. तिने भूमातेला वंदन केले व आर्त विनवणी केली. ” आता माझ्याने सहन होत नाही. तू मला तुझ्या उदरात घे.” आणि खरोखरच भूमाता दुभंगली. तुळशी विठ्ठल विठ्ठल करत गडप होऊ लागली. इकडे विठुरायाला ते समजले. तो धावत धावत त्या  ठिकाणी आला. पण उशीर झाला होता. तुळशी गडप व्हायला लागली होती. त्याने तिचे फक्त केस दिसले तेवढे घट्ट धरून ठेवले. पण  तुळशी गडप झाली. आणि विठोबाच्या हातात फक्त तिचे केस राहिले. त्याने मूठ उघडली आणि त्याच्या डोळ्यांतले अश्रू त्या केसांवर पडले. त्याच्या मंजिऱ्या झाल्या. विठोबाने त्या आपल्या हृदयाशी धरल्या आणि तेथील जमिनीवर पेरल्या. तिथे एक झाड उगवले .त्याला सगळे तुळशी म्हणून लागले. रखुमाईला ते समजले. इकडे विठोबा सारखे तुळशी तुळशी म्हणून उदास होत होता. रखुमाईला राग आला. ती म्हणाली सारखं तुळशी तुळशी करताय. घ्या तिला गळ्यात बांधून. आणि विठोबाने देखील तुळशीचा हार तयार केला आणि आपल्या गळ्यात घातला. तेव्हापासून ती त्याच्या हृदयापाशी रहात आहे…

तुळस अंगणात लावल्यावर दुष्ट शक्ती घरात येत नाहीत. तिच्या बुंध्याभोवतीची काळी माती विषारी माशी, किडा वगैरे चावल्यावर लावली तर उपयोग होतो. मधमाशीने दंश केल्यास त्या जागी तुळशीतील माती लावतात. आराम पडतो. किडा, मुंगी, डास चावल्यास पानांचा रस दंशाचे जागी लावतात. आग थांबते. तिचे खोड, मूळ, फुले आणि मंजिरी अँटिबायोटिक म्हणून वापरतात. ताप आला, घसा खवखवू लागला तर तिची पाने चघळावी. चेहऱ्यावर डाग असतील तर तुळशीचा लेप लावावा. पाण्यात तुळशीची पाने टाकली तर पाणी आपोआप शुद्ध होते. फुफ्फुसे हृदय व रक्ताभिसरणाशी संबंधित असलेली अनेक औषधे तुळशीचा रस व मधाच्या अनुपानासोबत देतात. तुळशीचा रस मधाबरोबर दिला तर सर्दी पडसे नाहीसे होते. तिच्या पानांचा रस लहान मुलांना दिला तर त्यांचा खोकला बरा होतो व टॉनिकप्रमाणे उपयोग होतो. नायटा झाल्यास तिच्या पानांचा रस लावतात. तिचे बी पाण्यात पाच-सहा तास भिजवून, दूध साखर घालून खाल्ल्यास अंगातली उष्णता कमी होते.

….. देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य होते. पण देवाला वाहिलेल्या तुळशीचे निर्माल्य होत नाही. तिची पाने, फांद्या झाडापासून तोडल्या तरी तिच्यातील प्राणशक्ती जिवंत असते. तुळशीमध्ये वनस्पतीज सोने असते. धातू रूपातील सुवर्णापेक्षा वनस्पतीज सोने जास्त प्रभावी असते.

….. तुळशीला इंग्रजीत बासिल म्हणतात. हिंदीत विश्व पूजिता ,विश्व पावन, भारवी, पावनी, त्रिदशमंजिरी, पत्रपुष्पा, अमृता, श्रीमंजरी, बहुमंजरी, वृंदा ,वैष्णवी, अशी अनेक नावे आहेत. विठोबाच्या गळ्यातील तुळशीला वैजयंती म्हणतात.

….. तुळशीवरून काही वाक्प्रचार देखील आपण वापरत असतो.

१) तुळशी उचलणे म्हणजे शपथ घेणे.

२) तुळशी उपटून भांग लावणे म्हणजे चांगल्या माणसाला काढून वाईट माणसाची संगत धरणे

३) तुळशीच्या मुळात कांदा लावावा लागणे म्हणजे चांगले हेतू साध्य करण्यासाठी वाईट साधनांचा  उपयोग करण्याविषयीची सबब सांगणे.

४) तुळशीत भांग उगवणे म्हणजे चांगल्या माणसांच्या समुदायात चुकून एखादा वाईट माणूस आढळणे.

५) तुळशीत भांग व भांगेत तुळस उगवणे म्हणजे चांगल्या आणि वाईट गोष्टी एकाच ठिकाणी असणे.

६) तुळशीपत्र कानात घालून बसणे म्हणजे ऐकले न ऐकलेसे करून स्वस्थ बसणे.

७) घरादारावर तुळशीपत्र ठेवणे म्हणजे घरादाराचा त्याग करणे.

—–तिचा विवाह केल्यास कन्यादानाचे महत्त्व प्राप्त होते. विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होतात. तुळस हे लक्ष्मीचे रूप आहे. 

महाप्रसाद जननी

सर्व सौभाग्यवर्धिनी

आधिव्याधी हरा नित्यं

तुलसी त्वं नमोऽस्तुते ||

 

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दोन चित्रे – लेखक -अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ दोन चित्रे – लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

आईने तिच्यासाठी शब्दकोडे, चित्रकोडे यांचे पुस्तक आणले होते. आधी ती हरखून गेली. तिनं मग ते पुस्तक उघडले. पहिलाच खेळ होता– मांजराला माश्याकडे मार्ग दाखवा. तिनं पेन्सिलीने रेघांची वेटोळी ओलांडून क्षणात ते कोडं ओलांडलं. पुढचा खेळ होता योग्य जोड्या जुळवा– तिनं क्षणार्धात मोची आणि चप्पल, शिंपी आणि सदरा, डॉक्टर आणि औषध, सुतार आणि कपाट, असं सगळं जुळवलं. 

आई कौतुकाने ते बघत होती. पुढ़च्या शब्दखेळाला ती थबकली – थोडीशी हिरमुसली. तिनं ते पुस्तक बाजूला ठेवले. आई ते बघत होती. 

” काय झालं बाळा, तुला नाही आवडलं का पुस्तक.” 

“तसं नाही आई, मला तो पुढला चित्रखेळ नाही आवडला. ‘ दोन चित्रातील फरक ओळखा.’ –आई मला दोन चित्रातला फरक नाही ओळखता येत.”

आई म्हणाली, “अगं सोपाय. बघ ह्या चित्रात चेंडू लाल रंगाचा आहे, त्या चित्रात हिरवा. ह्या झाडावर पक्षी बसलेला आहे, त्या झाडावर नाहीये.” 

“आई मला फरक ओळखायला नाही आवडत. उलट दोन्ही चित्रात साम्य किती आहेत. ह्या मुलाकडाची बॅट आणि त्या मुलाकडची बॅट सारखी आहे. दोघांची टोपी सारखी आहे. दोन्ही मैदानावर गवत आहे, सुंदर हिरवे गार. दोन्ही चित्रात खूप खूप सुंदर, सारखी झाडं आहेत. दोन्हीकडे सूर्य सारखाच हसतोय. दोन्ही ढग सारखेच सुंदर आहेत. दोन्ही चित्रात इतकी अधिक साम्य असतांना, आपण जे थोडेसे फरक आहेत ते का शोधत बसतो.” 

आई एकदम चमकली— किती सहज सोपं तत्वज्ञान आहे हे. आपण आपला पूर्ण वेळ चित्रातला फरक शोधण्यात  घालवतो, पण हे करतांना आपण दोन चित्रातली साम्य– जी चित्रातल्या फरकांपेक्षा अधिक आहेत, ती लक्षात घेत नाही.

मुलांच्या बाबतीत सुद्धा अगदी हेच करतो. ‘ ती समोरची मुलगी आपल्या मुलीपेक्षा अधिक उंच आहे. वर्गातल्या बाजूचा मुलगा गणितात अधिक हुशार आहे, ती दुसरी मुलगी माझ्या मुलीपेक्षा छान गाते.’ —- आपण केवळ आणि केवळ फरकच शोधत बसतो आणि साम्यस्थळे अगदी आणि अगदी विसरून जातो.

आईने तो चित्रखेळ पुन्हा उघडला. त्यावर ‘ दोन चित्रातील फरक ओळखा ‘ मधील ‘फरक’ हा शब्द खोडून त्या जागी ‘साम्य’ हा शब्द लिहिला. आता तो खेळ ‘ दोन चित्रातील साम्य ओळखा ‘ असा गोमटा झाला होता. मुलीने हसुन तो खेळ सोडवायला घेतला. आईने मुलीला जवळ घेतले. 

दोन्ही चित्रे आता एक होऊन त्यातील फरक मिटला होता. आता त्यात राहिले होते ते फक्त आणि फक्त साम्य—आणि अमर्याद पॉझिटिव्हिटी.

लेखक – अनामिक.

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवाळी : एक आठवण ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

परिचय

शिक्षण- एम.ए.,एम.एस.डब्ल्यू.,डी.एल.एल.अॅन्ड एल.डब्ल्यू, एम.फिल ,पी.एच.डी.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातून प्राध्यापक पदावरून सेवानिवृत्त . कार्यकाळात अध्यापन, संशोधन व क्षेत्रकार्य केले.

प्रकाशित लेखन-

– कवितासंग्रह- हिरवी चाहूल, प्राजक्त, प्राजक्ताची चाहूल.

– पुस्तके- असंघटित कामगार, राजाज्ञा(छ.रा.शाहू महाराजांचे आदेश, आज्ञापत्रे इ.) ,साक्षरता खेळ,जोतीसंवाद, केल्याने होत आहे रे,महान महात्मा फुले.

इतर- क्रांतिरत्न

क्रांतिरत्न (इंग्रजी आवृत्तीत लेखन- आगामी),सूर्याच्या लेकी महाग्रंथात लेखन (आगामी).

याशिवाय विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांतून, दिवाळी अंकातून सतत लेखन. आकाशवाणी,दूरदर्शन व विविध वाहिन्यांवरून मुलाखती आणि विविध विषयांवर कार्यक्रम.

शैक्षणिक कार्याबरोबरच अध्यासनाच्या वेबसाईटची निर्मिती केली.

विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागात(पूर्वीचा प्रौढ, निरंतर शिक्षण आणि विस्तार विभाग) पुढील डाॅक्युमेटरीजचे संहितालेखन केले –

– विस्कळीत, disrupted, यशोगाथा प्रौढ शिक्षणाची,हा धन्य महात्मा झाला.

अनेक वृत्तपत्रे, नियतकालिकांतून विविध विषयांवर सतत लेखन.

सदस्यत्व-

– Indian Adult Education Association, New Delhi.

– Indian University Association for Continuing Education, New Delhi.

– Asian Network for Comparative Adult Education.

– Pune University Teachers Association,

Savitribai Phule Pune University, Pune.

-Dr.Babasheb Ambedkear Teachers Organization, University of Pune, Pune.

– Paragon (Organization of Teachers) .

– Vishwa Marathi Parishad,Pune.

– Mahatma Phule Samta Pratishthan .

– Kavyanand Pratishthan, Pune .

बाली व माॅरिशस येथे आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदांत सहभाग व पेपर सादरीकरण.

विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांत सतत सहभाग.

??

☆ दिवाळी : एक आठवण ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

पुणे विद्यापीठात प्रौढ शिक्षण प्रकल्प अधिकारी म्हणून मी नोकरीला लागलो. तेव्हा पुणे,अहमदनगर, नाशिक,  जळगाव आणि धुळे जिल्ह्य़ातील  काॅलेजं विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात होती. ऑफिसबरोबरच भरपूर फिल्ड वर्कचं आमचं काम होतं. महिन्यातून दहा- पंधरा दिवस आम्ही बाहेरगावी जात असू. काॅलेजमध्ये गेल्यावर विद्यार्थ्यांपुढे भाषण, प्राध्यापकांशी चर्चा, प्रौढ शिक्षणातील संघटनांबरोबर बैठक, असा दिवसभरातील व्यग्र कार्यक्रम. नंतर 

दुपारचं जेवण. थोडीशी विश्रांती झाल्यावर दूरवर कुठंतरी  गावात प्रौढ शिक्षण केंद्र पहायला जायचा कार्यक्रम असायचा.

असाच एकदा एका काॅलेजला गेलो होतो. नुकतीच दिवाळी संपली होती. हवेत गारठा होता. सायंकाळी काॅलेजच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रम अधिकारी प्राध्यापकांसोबत दूरवरच्या खेड्यातल्या एका प्रौढ शिक्षण केंद्रावर आम्ही पोहोचलो. ते महिलांचे प्रौढ शिक्षण केंद्र होते.घरातील जेवणं, भांडी धुण्याची कामं आटोपून केंद्रात महिला यायला वेळ होता. तोपर्यंत  प्राध्यापकांबरोबर गप्पा मारत बसलो. महिला आल्यावर प्राध्यापकाने माझी ओळख करून देऊन माझे स्वागत केले. 

“ पुण्याहून आलेले  हे साहेब तुम्हाला आता मार्गदर्शन करतील “– असं सांगून ते बसले. हाताची घडी घालून महिला 

मी काय बोलतो हे कान देऊन ऐकू लागल्या. ” मार्गदर्शन वगैरे नाही.आपण सगळेजण गप्पा मारू ” असं सांगून मी  ते टेन्स वातावरण हलकं केलं.

” हे बघा,नुकतीच दिवाळी संपली आहे.कुणी कुणी काय काय केलं हे सांगा. सगळ्यांनी बोलायचं बरं का “.

” आम्ही लाडू,करंज्या, शंकरपाळया केल्या, मुलांनी फटाके वाजवले,आकाशकंदील लावले इ.इ.” हे असं सगळं मला अपेक्षित होतं.—–पण महिलांनी दिलेली उत्तरं ऐकून मी बधिर झालो. काय काय म्हणाल्या महिला ?—-

” सायेब, आम्ही गावातल्या आमक्या तमक्याच्या वावरात कामाला गेलो वतो. पोरांना शाळेच्या सुट्ट्या होत्या. त्यांना

  पन घिवून गेलो वतो .”

” आवं सायेब,  आमाला कुनीच नौतं बोलौलं. घरीच वतो या दिवाळीला “.

”  पोरांचा आजा कवापासून आजारीच हाये. वरल्या आळीतल्या रामू पवाराकडून गंडा बांदून घेत्ला या दिवाळीत.     पण नौरात्राच्या चौथ्या माळेला म्हतारा ग्याला “.

खरं तर मी यांना मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा होती. मात्र झालं उलटंच. या महिलांनीच मला स्वतंत्र भारतातील करूण वास्तव शिकवलं. कुठल्याच पुस्तकात मी हे वाचलं नव्हतं.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ.

ईमेल- [email protected]
मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares