झालं असं की, एकजण घरी आले होते. ते बोलता बोलता म्हणाले ” वास्तू प्रसन्न आहे हं तुमची ” – आणि तुझी प्रथमच प्रकर्षाने आठवण झाली. तुझी वास्तुशांती करून, काही वस्तु जमिनीत पुरून, जेवणावळी केल्या, की तुला विसरूनच जातो रे आम्ही… मग उरतं ते फक्त घर… तुझ्या खंबीर पाठिंब्याकडे अगदी पूर्ण कानाडोळा केला जातो !!—- अगदी अपराधी वाटलं… मग काय तुझ्याशी पत्र संवाद करण्याचं ठरवलं... म्हणून आज हे पत्र !
तुझ्याविषयी विचार करताना कितीतरी गोष्टी प्रथमच लक्षात आल्या… जिथे तू प्रसन्नपणे वावरतोस ते घरकुल खरंच सोडवत नाही…
घरात बसून कंटाळा येतो म्हणून प्रवासाला म्हणजे पर्यटनाला गेलो, तर चार दिवस मजेत जातात. पण नव्याची नवलाई संपते आणि घराची ओढ लागते…
आजारपणात डॉक्टर म्हणतात–” आराम पडावा म्हणून ऍडमिट करा “– पण तुझ्या कुशीत परतल्याशिवाय कोणाच्याही प्रकृतीला आराम पडत नाही हेच खरं… !
तुझ्या निवाऱ्यातच अपरिमित सुख आहे —
अंगणातील छोटीशी रांगोळी स्वागत करते,
दारावरचं तोरण हसतमुखाने सामोरं येतं,
तर उंबरा म्हणतो ‘ थांब लिंबलोण उतरू दे…’
बैठकीत विश्वास मिळतो, तर माजघरात आपुलकी !
स्वयंपाकघरातील प्रेम तर दुधाच्या मायेनं ऊतू जातं !
तुझ्या आतल्या देव्हाऱ्यात बसलेली मूर्ती मनातील भीती पळवून लावते,
—–खरंच वास्तुदेवते या सगळ्यामुळे तुझी ओढ लागते.
तुझी शिकवण तरी किती बहुअंगी —
खिडकी म्हणते ‘ दूरवर बघायला शिक,’
दार म्हणतं ‘ येणाऱ्याचं खुल्या मनाने स्वागत कर,’
भिंती म्हणतात ‘ मलाही कान आहेत परनिंदा करू नकोस,’
छत म्हणतं ‘ माझ्यासारखा उंचीवर येऊन विचार कर,’
जमीन म्हणते ‘ कितीही मोठा झालास तरी पाय माझ्यावरच असू देत ‘
तर बाहेरचं कौलारू छप्पर सांगतं ‘ स्नेहाच्या पंखाखाली सगळ्यांना असं काही शाकारून घे, की बाहेरची शोभा आतून दिसेल आणि कुणालाही ऊन, वारा, पाऊस लागणार नाही ! ‘
इतकंच नाही तर तू घरातील मुंग्या, झुरळं, पाली, कोळी, यांचाही आश्रयदाता आहेस. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्थाही तूच तर बघतोस आणि निसर्गाच्या अन्नसाखळीला हातभार लावतोस…
— इतकं मोठं मन आमचंही व्हावं असा आशीर्वाद आम्हाला दे…
तुझ्या वाटणीसाठी दोन भाऊ कोर्टात जातात आणि वकिलांची घरं उभी रहातात याचं खरंच वाईट वाटतं…
एकत्र कुटुंब पद्धतीकडून एकल कुटुंब पद्धतीकडे वेगाने निघालोय आम्ही……. पण तरीही शेवटी ‘ घर देता का कोणी घर ‘ ही नटसम्राटाची घरघर काही संपली नाही रे ! कारण जिथे तुझ्या प्रसन्नतेच्या खाणाखुणा नाहीत ते घर नसतं… ते बांधकाम असतं रे… विटा-मातीचं.
वास्तू देवते, पूर्वी आई-आजी सांगायची…’ नेहमी शुभ बोलावं म्हणजे आपल्या बोलण्याला वास्तूपुरूष नेहमी तथास्तु म्हणत असतो ‘ —– मग आज इतकंच म्हणतो की —
” तुला वस्तू समजून विकायचा अट्टहास कमी होऊन, तुझ्या वास्तूत वर्षातून काही क्षण तरी सगळी भावंडं, मित्रमैत्रिणी, सगेसोयरे, आप्तेष्टं एकत्र वास्तव्यास येऊ दे…”
—” आणि या माझ्या मागण्याला तू तथास्तु असं म्हणच… हा माझा आग्रह आहे.”
ll वास्तूदेवताभ्यो नम: ll
संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…3 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆
द्रौपदी
महाभारतातील एक महत्वपूर्ण पात्र म्हणजे द्रौपदी! वास्तविक संपूर्ण महाभारताचा विचार करता कथेची नायिका द्रौपदी व नायक श्रीकृष्ण आहे असे म्हणावे लागेल.
द्रौपदीच्या चरित्राचा अभ्यास करताना असे लक्षात येते की तिच्या स्वभावाचे अनेक चांगले- वाईट कंगोरे होते. स्वयंवराचा ‛पण’ अर्जुनाने जिंकला असला तरी कुंतीच्या सांगण्यावरून ती पाचही पांडवांचा पती म्हणून स्वीकार करते. यातून तिच्यातील आज्ञाधारक सून जाणवते. पण ज्यावेळी पांडवांवर संकट येते आणि कोणताही निर्णय घेण्यास ते असमर्थ ठरत त्यावेळी योग्य सल्ला द्यायचे काम तीच खंबीरपणे करत असे. प्रसंगी त्यांच्या चुका दाखवण्यातही ती मागेपुढे पाहत नसे. द्युतात हरल्यावर पांडवांना जेव्हा वनवासात जावे लागले तेव्हाही तिने त्यांच्या मनात प्रतिशोधाची ज्योत सतत जागी ठेवण्याचा प्रयत्न केला. एका प्रसंगात ती युधिष्ठिराला म्हणते,“ पूर्वी सकाळी ज्या सुंदर भूपाळी आणि वाद्यवादनाने तुम्हाला जाग येत असे तेच तुम्ही सर्व राजे आता सकाळच्या कोल्हेकुईने जागे होता. जिथे तुम्ही पंचपक्वान्नांचा आस्वाद घेत होता तेच तुम्ही आता कंदमुळांवर गुजराण करत आहात. ज्या भीमाच्या गदेच्या प्रहाराची सर्वाना भीती वाटते तो भीम जंगलातील झाडांवर कुऱ्हाडीचा प्रहार करून लाकडे गोळा करत आहे….” अशाप्रकारे आपल्या कर्तव्याची आपल्या पतींना जाणीव करून देणारी ती कर्तव्यदक्ष आणि महत्वाकांक्षी स्त्री वाटते.
आजच्या काळातही अजूनही स्त्री- पुरुष यांच्या मैत्रीच्या निखळ नात्यावर फारसा विश्वास ठेवला जात नाही. पण त्या काळात द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांची मैत्री अनोखी होती. त्यांच्यात खऱ्या अर्थाने सखा, भाऊ आणि सवंगड्याचे नाते होते. म्हणूनच तिला ‛कृष्णा’ या नावानेही ओळखले जात असे. ज्यावेळी भर दरबारात तिला डावावर लावण्यात आले आणि तिला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा तिला केवळ कृष्णाचीच आठवण झाली. तिने स्वतःच्या रक्षणासाठी कृष्णाचा धावा करताना म्हटले,“ माझा कोणी पती नाही, माझा कोणी पुत्र नाही, माझा कोणी पिता नाही. हे मधुसूदन, तुझे माझे तर कोणतेच नाते नाही. पण तू माझा सच्चा मित्र- सखा आहेस. म्हणून तू माझे रक्षण करावेस.” असे म्हणून तिने केवळ त्यांच्यातील मैत्रभावनेलाच हात घातला नाही तर त्याला आपल्या कर्तव्याचीही जाणीव करून दिली. इतकेच नव्हे तर त्याचवेळी कुरुवंशातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींना दूषण देण्यासही ती कचरली नाही. वास्तविक द्रोणाचार्य, कृपाचार्य, धृतराष्ट्र यांनी ही सर्व विपरीत घटना घडत असताना ते थांबवणे गरजेचे होते. त्यामुळे अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि आपला अधिकार हक्काने मागणारी द्रौपदी निश्चितच सर्व स्त्रियांसाठी आदर्श ठरावी.
जोपर्यंत तिच्या या अपमानाचा बदला घेतला जात नाही तोपर्यंत तिने आपले केस मोकळे सोडले होते. दुर्योधनाच्या रक्तानेच वेणी बांधण्याची तिने प्रतिज्ञा केली होती. आणि जोपर्यंत तिचे ते मोकळे केस दिसत होते तोपर्यंत तिच्या पतींना तिच्या अपमानाचा आणि त्याचा बदला घेण्याचा विसर पडू नये हीच तिची त्यामागची भावना असावी. यातून तिच्यामधील निश्चयी आणि तितकीच आपल्या मताशी ठाम असणारी स्त्री दिसून येते.
जितकी ती प्रसंगी कठोर होत असे तितकीच ती मनाने कोमल होती. जयद्रथ म्हणजे खरे तर तिच्या नणंदेचा पती! पण तो तिचे अपहरण करतो आणि नंतर त्याच्या या अपराधासाठी त्याला ठार मारण्याची युधिष्ठिराकडे मागणी होत असताना ती आपल्या नणंदेला वैधव्य प्राप्त होऊ नये म्हणून सर्वाना त्यापासून परावृत्त करते. मात्र जयद्रथाला आपल्या या दुष्कृत्याची सतत जाणीव राहावी म्हणून त्याचा चेहरा विद्रुप करण्याची आज्ञा देते.
ती पाच पतींची पत्नी असली तरी वारंवार असे जाणवत राहते की ती भीमावर मनापासून प्रेम करत होती. कारण ज्या ज्या वेळी तिच्यावर संकट आले त्या त्या वेळी तो पती म्हणून तिच्या पाठीशी उभा राहिला. वस्त्रहरणाच्या वेळी पण त्याने एकट्यानेच त्याविरुद्ध आवाज उठवला होता. त्यामुळे जेव्हा द्रौपदीचा अंतिम काळ आला त्यावेळी ती भीमाला म्हणाली,“ जर पुन्हा जन्म मिळालाच तर तुझीच पत्नी व्हायला मला आवडेल.” द्रौपदीमधील ही प्रेमिका मनाला मोहवून जाते.
अशी ही महाभारताची नायिका असणारी द्रौपदी अनेक आयामातून संस्कृत साहित्यात भेटत जाते. काहीजणांच्या मते केवळ द्रौपदीच्या अहंकारी स्वभावाने आणि रागामुळे संपूर्ण महाभारत घडले. पण माझ्या मते या संपूर्ण कथेत द्रौपदीवर जितका अन्याय झालेला दिसतो तितका इतर कोणत्याही स्त्रीवर झालेला दिसत नाही. राजघराण्यातील असूनही संपूर्ण जीवन संघर्ष आणि दुःखात गेले. मुले असूनही मातृत्व नीट उपभोगता आले नाही. सौंदर्यवती असूनही नेहमीच पाच पतींमध्ये विभागली गेली. ज्याच्यावर तिचे खऱ्या अर्थाने प्रेम होते त्याला पूर्णपणे समर्पित होऊ शकत नव्हती. आणि या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही ती तितकीच खंबीर होती. पण तरीही शेवटी ती एक सामान्य स्त्री होती. म्हणूनच काही वेळा प्रेम, ईर्षा, राग या सहज भावना तिच्यात उफाळून येत असाव्यात. त्यामुळे हे सामान्यत्वच उराशी बाळगून तिने आपले असामान्यत्व सिद्ध केले होते असेच म्हणावे लागेल.
खरंतर या इंग्लिश शब्दाला मराठीत खूप छान अर्थ आहेत—- लाड , कोड, कौतुक , जपणूक, सांभाळणे , गोंजारणे ……अर्थातच या सगळ्या क्रिया किंवा इतिकर्तव्य ही आपल्या आसपास असणाऱ्या लोकांनी एकमेकांसोबत करायची असतात. आपले कुटुंबिय किंवा आपले वडिलधारे लोक आपलं कौतुक करत असताना आपण लहानपणापासून पहात आलोय. तद्वतच आपणही आपल्या जवळच्या लोकांचं यथायोग्य कौतुक आणि लाड करतोच.
कौतुक आणि लाड हे समोरच्याने केले की त्याचा गोडवा वाढतो.
पण …पण…पण धावत्या जगाबरोबर आत्मकेंद्रित होत चाललेली माणसं, संकुचित आणि इर्षेखोर मनं , कामाच्या व्यापाच्या नावाखाली मी भोवती आखून घेतलेली नेणीवेची आवर्तनं, यांच्या वावटळात या पॅंपरिंगचाचा अक्षऱश: पाचोळा होतोय … मी आणि माझं काम हे सगळ्यात मोठं, दुसरा माझ्यापेक्षा मोठा होऊच नये ही भावना, किंवा मी माझ्या व्यापातून इतरांना वेळ देऊच शकत नाही, आता ज्याने त्याने स्वावलंबी व्हावं ही जाणीवेची धग, नात्यांच्या आणि भावभावनांच्या बंधांना एकटेपणाचे चटके देत राहतीय ..
बाहेरचे, परके, नातेवाईक वगैरे ठीक आहे. पण कधी कधी आपल्या घरच्या रक्ताच्या नात्यांकडूनही असाच अनुभव तरळून जातो, आणि मग येते एक विषण्णता, वैराग्य, किंवा चीड आणि क्रोध.
पण खरं सांगायचं तर हे सगळं आता इतकं पुढं गेलंय ना, की आपण ठरवलं तरीही यात बदल करु शकत नाही. सोशल लाईफ , सोशल मीडिया आणि सोशल एडिक्शनच्या तिकडीवर सोशल अवेयरनेसचं मात्र वाटोळं होत चाललंय ..
मी , माझा , माझं , मला , या ‘ म ‘ च्या आवर्तनात गुरफटलेला प्रत्येक माणूस समोरच्यापासून दूर आणि मग्रूर होत चाललाय. यात सगळेच आले– अगदी तुम्ही आणि मी सुद्धा …..
पण हे झालं समोरच्यासाठी. जेव्हा अशा पॅंपरींगची गरज मला स्वत:ला असते तेव्हा काय करावं बरं … आली का पंचाईत– म्हणजे दुसऱ्यासाठी विणलेल्या जाळ्यात आता आपणही अडकणार तर ?—– आज आता मला कुणाच्या तरी खंबीर खांद्याची, कुरवाळणाऱ्या हातांची आणि मायेच्या कुशीची गरज आहे, पण कुणीच नाहीये सोबत किंवा ते कुणी करत नाहीये ….
अशा वेळी तडक उठावं– मस्त आवडीचे कपडे घालावे– मोठा प्लान असेल तर बॅगच भरावी —–
आणि कर्तव्य, जाणीवा, व्याप, जबाबदारीची सगळी लक्तरं आपल्याच अंगणातल्या झाडाखाली ठेवून … सरळ स्टार्टर मारावा आणि आपल्या आवडीच्या ठिकाणी जाऊन बसावं —- अगदी एकटं —-डोंगराच्या कड्यावर , नदीच्या काठावर , मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा निर्जन बेटावर — आपल्याला आवडेल अशा ठिकाणी जावं , आपल्याला आवडतं ते खावं , आपल्याला आवडतं ते संगीत लावावं, आवडेल तसं हसावं, आवडेल तसं रडावं , आवडेल तसं बागडावं, आवडेल ते……ते सगळं करावं —–
—–उघड्या माळावर बसून आपणच आपल्या कौतुकाचं एक छानसं भाषण करावं— आपणच त्यावर टाळ्या वाजवाव्या— आपल्याला आवडती फुलं आपणच गिफ्ट करावी—- रोमॅंटिक साँग लावून अगदी मध्यरात्री वाईनच्या ग्लाससोबत सोलो डान्स करावा —- आपणच आरशात बघून आपल्यालाच कॉम्प्लीमेंट द्यावी —- आपणच आपल्या फोटोला करकचून मिठी मारावी —- खळखळून हसावं, देखणं दिसावं, आणि स्वत:च्या मिठीत स्वत:च विसावावं …….. मस्त समुद्रावर जावून त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याची खोली मोजावी – आव्हान द्यावं सागराला — चल मोजून पाहू कोण जास्त गहिरं आहे – तुझं अंतरंग, की मी — माझ्या मनाचे तरंग.
—– मस्त मनसोक्त वागावं, मनसोक्त जगावं आणि दुःख, तणाव, व्याप, एकटेपणाची खेटरं भिरकावून द्यावीत खोल दरीत आणि शांत झोपी जावं ………
—– कारण सकाळी उठायचं असतं— पुन्हा एकदा त्याच आपमतलबी जगाशी सामना करायला —- नव्या उमेदीने आणि नव्या ताकदीने ——
लेखिका : सुश्री शितल
प्रस्तुती : सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ तो कल्याण करी — तो मुरारी वनचरी — तो रामकृष्णहरी… सौ.प्रिया श्रीनिवास जोग ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
आज गर्भरेशमी लाल रंगाचा शालू सीतामाईंच्या अंगावर अगदी खुलून दिसत होता. साक्षात लक्ष्मीचे तेज, तिचे ऐश्वर्य त्यांच्या मुखावर विलसत होते. पण कधी आपल्या रुपाचा त्यांना गर्व नाही झाला. अत्यंत सालस अन् सोज्ज्वळ अशी ती सीतामाई ! दाशरथी रामाची जनकनंदिनी सीता !
खरंतर देवळात आवळी पूजनाची चाललेली तयारी पाहून सीतामाई खुलल्या होत्या. वनवासातले भोग भोगून त्या मानवी जीवन खूप जवळून समजल्या होत्या. म्हणून तर माणसांच्यात घटकाभर त्यांनाही रमायला आवडत असावे. तितक्यात कुणीतरी एका कुंडीत लावलेले आवळीचे झाड तिथे आणून ठेवले. पाठोपाठ भगवान विष्णूंचा ध्यानस्थ फोटोही तिथे मांडण्यात आला. कुंडीभोवती फुलांची रांगोळी काय, फुलांचे तुळशीचे हार काय !! ती कुंडीतली छोटीशी आमलकी अर्थात आवळीच हो, लाजून चूर होतेय असा सीतामाईंना भास झाला. तिची इवली इवलाली नाजूक पाने तिने जणू लाजबावरी होऊन मिटून घेतली होती असंच वाटत होतं. खरंतर किती साधंसच तिचं रुप, पण श्रीविष्णूंच्या सान्निध्यात ते अधिकच खुललं होतं. ती अधिकच सौंदर्यवती भासत होती. नववधूचे भाव तिच्यावर विलसत होते. खरंतर नववधू तर सध्या वृंदादेवी आहेत. पण तरीही ही आमलकी किती आनंदात दिसत होती. औटघटकेचे तिचे हे सुख, हे सान्निध्य, पण ती अत्यंत समाधानी होती. सीतामाई एकटक तिच्याकडे पहात होत्या. ते रामरायांच्या चतुर नजरेने बरोबर टिपलं. थोडीशी थट्टा करायची लहर त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी एकवार लक्ष्मणाकडेही पाहिलं. पण तो काय बोलणार अशावेळी. तो बिचारा आपले धनुष्य सावरीत स्वस्थ उभा !!
श्रीराम— सीते, हे सीते , अशा एकटक कुठे पाहताय नक्की ? तुमच्याहून रुपाने कुणी सरस आहे की काय ?
सीतामाई – लटके हसत मान वेळावत, “अहो तसंच काही नाही. पण आज ती आमलकी पहा ना कशी अनुपम दिसतेय. आजचा दिवस तिच्या भाग्याचा. हेवा नाही हो आमच्या मनी. आपले एकपत्नी व्रत आम्ही जाणत नाही का ? पण तिचे उजळलेले रुप नेत्रात साठवावे वाटते हो. आज तिला विष्णूंचे सान्निध्य लाभलंय. त्यांचा परीस स्पर्श तिला मिळतोय. त्यांची कृपादृष्टी आज तिच्यावर आहे. समाधान मिळतंय हो ते पाहून.
श्रीराम— सीते हे वैभव तर तिच्या ओटीत तुम्हीच घातलंत ना. तिच्या झाडाखाली विष्णूरुपात पूजा करुन–तेही तुमच्या लक्ष्मीरुपात. आपण उभयतांनी तिथेच वास केला म्हणून तर तिचे माहात्म्य थोर झाले.
सीतामाई— ते सारं स्मरणात आहे हो. पण मी आता वेगळाच विचार करतेय. आपण राम अवतारात १४ वर्षे वनांतरी काढली. आणि त्या गोकुळातल्या कृष्णाने गाईगुरांबरोबर गोपगोपींबरोबर वनविहार केला. दोन्ही अवतारात वनात वास होताच. पण किती फरक पडला ना दोहोंत. कृष्ण अवतारात आपला एकमेकांचा सहवास किती ते जरा आठवावंच लागेल. तुमचा सहवास लाभला तो राधेला आणि वृंदेलाच.
श्रीराम— अवतारलीला होत्या त्या सर्व. पण हा राम मात्र सीतारामच किंवा सीताकांत म्हणून स्मरला जातो हेही सत्य आहे ना–
“ सीताकांत स्मरण जयजयराम “ — लक्ष्मणाने हळूच जयजयकार करत श्रीरामांना आपले अनुमोदन दर्शवले.
आता यावर सीतामाई निरुत्तर. पण रामांना कोपरखळी मारायचीच होती. त्यांचे लक्ष तितक्यात समोर गेलं. लाडू, पेढे, पोहे, चित्रान्ना, केळी, फुटाणे,- भगवंतासमोर किती ते भोग मांडले जात होते. पाणी फिरवून नैवेद्य दाखवला जात होता. रामराया आशिर्वाद मुद्रेत होते. स्मित हास्य चेहेऱ्यावर उमटत होते. ते पाहून सीतामाई चटकन म्हणाल्या,
“ अहो ऐकलंत का, तो नैवेद्य कृष्णार्पण आहे बरं. रामराय काय वनवासी, कंदमुळं खाऊन राहिलेले. तुम्हाला कुठला नैवेद्य दाखवायचा हा भक्तांना कायम प्रश्न पडत असावा. त्यामुळे सगळा नैवेद्य कृष्णार्पणच !! आणि हो, इथे श्रीविष्णूसहस्रनाम आवर्तन होणार आहे हे पण ध्यानात असू दे. “
श्रीराम — “ होय सीते जाणून आहोत ते आम्ही. ‘ सहस्र नाम तत्तुल्य रामनाम वरानने ‘ – ठाऊक आहे ना.
रामकृष्णहरी हा या युगासाठी अत्यंत सोपा मंत्र आहे. जो हा मंत्र जपेल त्याचे कल्याण होईल. आवर्तन श्रीविष्णूसहस्रनामाचे पण साक्षीला राम आहे हे महत्त्वाचे !!”
सीतामाई — एकवचनी रामाचे कुठलेही वचन कसे हो उणे पडावे. आम्ही निरुत्तर आहोत. तुमच्या बाणांप्रमाणे तुमचे वाक्बाणही अमोघ आहेत हे मान्य आहे आम्हाला.”
श्रीराम -राम अवतारात वनवासी राहिलो. पण कृष्ण अवतारात खरे निसर्ग सान्निध्य मोकळेपणाने अनुभवले. गोपांचा जीवनाधार तो गोवर्धन, त्यावरील वृक्ष राजी, यमुनेचा तो खळाळ अन् तिचे ते धीरगंभीर डोह, यमुना तटावरचा तो कदंब, आवळी, ते वृंदावन, गोधन, वेणूनादाने नादावलेले इतरही पशुपक्षी, हे सारे तर सृष्टीचे भाग. ही विपुल सृष्टी आहे. म्हणून मानवी जीवन समृद्ध आहे. म्हणूनच फक्त गोवर्धन नव्हे तर सर्व सृष्टीचे वर्धन व्हावे आणि अर्थातच पुढील पिढीसाठी संवर्धनही तितकेच महत्वाचे हे जाणून तशा लिला रचल्या. तशा कथा रचल्या आणि त्यातून कालातीत असे संदेश मानव जातीला दिले.”
सीतामाई— होय त्यासाठी गीतेची निर्मिती झाली. विभूतीयोगाद्वारे आपली विभूती निसर्गाच्या कोणकोणत्या रुपात आहे हे सांगितलंत. तेच मुख्य सूत्र धरुन आपल्या ऋषीमुनींनी सणवारांची रचना केली, असंच म्हणायचं आहे ना ?”
लक्ष्मण — “ मध्येच बोलतोय श्रीरामा. शेषरुपात या पृथ्वीचा भार आम्ही तोलतोय म्हणून जे वाटतंय ते बोलू का–”
सीतामाई— “ अहो भाऊजी, परवानगी काय हो मागताय? अहो बोलू शकता तुम्ही. तुमचे आमच्यात शाश्वत स्थान आहेच.”
लक्ष्मण — “ मानवाने त्याच्या कल्याणाकरता घालून दिलेल्या परंपरांचे पालन करावे यासाठी खरेतर मीच मनोभावे प्रार्थना करेन. कारण मानवाची चुकीची पावले धरणीला भारभूत होतात. आणि पर्यायाने मलाही.”
श्रीराम– “ अगदी योग्य बोललास लक्ष्मणा ! धर्माचे पालन व रक्षण करण्यासाठी परंपरांचे आणि पर्यावरणाचेही समजून उमजून जतन हेही महत्त्वाचे. काळाची बदलती पावले ओळखण्याइतका माणूस सूज्ञ आहेच. त्याने फक्त हितकारी मार्गावर पावले टाकत समस्त मानव जातीचे कल्याण साधावे.”
रामराया कल्याण करायला उत्सुक आहेतच. ते सर्वांच्या हृदयातच स्थित आहेत. ते फक्त ओळखावे आणि ज्याने त्याने आपले कल्याण साधावे.
लेखिका : सौ.प्रिया श्रीनिवास जोग, चिंचवड पुणे
संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…2 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆
सीता
रामायण हा आपल्या संस्कृतीतील एक आदर्श ग्रंथ मानला जातो. आदर्श माता- पती- पत्नी- पिता अशी अनेक नाती येथे आदर्श म्हणून बघितली जातात. आपल्यासमोर सीता म्हणजे केवळ एक आदर्श पत्नी, सून अशाच रुपात उभी केली गेली आहे. पण रामायण आणि संस्कृत साहित्याचा बारकाईने अभ्यास केला तर असे लक्षात येते की सीता तेवढीच कणखर आणि निश्चयी स्त्री होती.
रावणाचा पराभव करून जेव्हा राम सीतेला सोडवतो आणि तिच्यापुढे अग्निदिव्य करण्याचा प्रस्ताव मांडतो त्यावेळी सीता तो प्रस्ताव स्वीकारते पण रामाला सुनावते,“ प्रभू, माझ्यात जे स्त्रीत्व म्हणजे निर्बलत्व आहे त्यावर तुम्ही एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे संशय घेत आहात. पण माझ्यातील सशक्त अशा पत्नीत्वावर तुमचा विश्वास नाही. माझा स्वभाव आणि हृदय नेहमीच स्थिर आहे आणि तिथे फक्त तुम्हालाच स्थान आहे. भलेही रावणाने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न जरी केला असता तरी माझी तुमच्यावरची भक्ती आणि प्रेम यत्किंचितही कमी झाले नसते. त्यामुळे मनाने मी नेहमीच पवित्र आहे.”
आज समाजामध्ये विनयभंगाची अनेक उदाहरणे दिसत असताना केवळ शारीरिक पवित्र्यावर स्त्रीचे चारित्र्य ठरवले जाते. अशावेळी हजारो वर्षांपूर्वी जन्माला आलेली ही स्त्री सहजपणे एक शाश्वत सत्य सांगून जाते.
अयोध्येत परत आल्यावर काही काळ सुखात घालवल्यावर केवळ एका सामान्य नागरिकाच्या बोलण्यामुळे राम सीतेचा त्याग करतो. आणि तेही अशावेळी जेव्हा तिच्या पोटात त्याचा अंश वाढत असतो. अरण्यात पोहोचेपर्यंत सीतेला याची कल्पनाही नसते. जेव्हा तिला ते समजते त्यावेळी अपमानाने क्रोधीत झालेली सीता तत्क्षणी लक्ष्मणाला विचारते,“ माझ्या अशा अवस्थेत माझा त्याग करणे योग्य आहे? हीच का तुमच्या इक्ष्वाकु वंशाची परंपरा?” त्यानंतर शांत झाल्यावर “हेच आपले प्राक्तन आहे. कदाचित गेल्या जन्मीचे पाप मी या जन्मी फेडत असेन ” असे स्वतःच्या मनाला समजावत ती आलेल्या परिस्थितीला खंबीर मनाने सामोरी जाते.
यातली अन्यायाला विरोध करणारी सीता पदोपदी प्रत्ययास येतेच. पण त्याचबरोबरच समोर आलेल्या संकटाला तितक्याच सक्षमतेने तोंड देणारी सीता तितकीच सामर्थ्यवान वाटते.
सर्वात शेवटी जेव्हा रामाची आणि लव-कुश- सीतेची गाठ पडते आणि राम तिला पुन्हा अयोध्येस नेण्यास उत्सुक असतो तेव्हा ती येण्यास नकार देते. ज्या ठिकाणी ती राणी म्हणून मानाने वावरलेली असते. ज्या प्रजेवर तिने मनापासून प्रेम केलेले असते. तिच प्रजा तिच्यावर अन्याय होत असताना तिच्या बाजूने उभी रहात नाही. ज्या पतीसाठी, त्याच्यावरील प्रेमासाठी तिनेही चौदा वर्षे वनवासात घालवली त्यानेही तिची उपेक्षाच केली ही खंत कुठेतरी तिच्या मनात असतेच. जिथे तिच्या आत्मसन्मानाला डावलले गेले तिथे ती पुन्हा पाऊल ठेवत नाही. त्यातून तिचा स्वाभिमान दिसून येतो.
अशाप्रकारे आदर्श सून, आदर्श पत्नी, आदर्श माता असणारी सीता तितकीच निग्रही, स्वाभिमानी आणि अन्यायाविरुद्ध लढणारी सशक्त स्त्री होती.
☆ ‘नमस्कार मित्रांनो —- TMT’ – डॉ. स्मिता दातार ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
नवरात्रात माझ्या वहिनीकडे गेले होते. तिच्याकडे घटस्थापना झाली होती. दरवर्षी देवीचं नवरात्र निगुतीने करणार्या माझ्या वहिनीला एका आठवड्यापूर्वी रिक्षाचा अपघात होऊन तिचा पाय दुखावला होता. तिच्या सचिनचं सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. नव्या सुनेचं हे पहिलं नवरात्र होतं. दरवर्षी नवरात्रीत सवाष्णपूजन , कन्यापूजन करणारी , साग्रसंगीत स्वयंपाक– हो अगदी ‘स्वयं’ पाकसिद्धी करणारी वहिनी .. आता या वर्षी काय करेल ,याची मला काळजी वाटली. काळजीपेक्षा परंपरांच्या बाबतीत आग्रही मतं असणार्या वहिनीच्या नव्या सुनेची मला जास्त काळजी वाटली. जरा धास्तावूनच जरीच्या साडीचा घोळ सावरत मी वहिनीच्या घरी पोचले. वहिनीच्या सुनेनं हसून माझं स्वागत केलं. रंगवलेल्या सोनेरी ब्लॉन्ड केसांचा सैलसर बुचडा, आधुनिक फॅशनच्या स्लीव्हलेस ब्लाऊज, वर चापून चोपून नेसलेली नऊवारी साडी आणि साडीच्या सोग्याजवळ खणाच्या पर्समध्ये अडकवलेला मोबाईल फोन—-स्मार्ट आणि आत्मविश्वासपूर्ण आधुनिक तरुणीचं रुप. ती अध्येमध्ये फोनवरून तिच्या स्टाफला सूचना देत होती. तिने नुकतीच एक स्टार्टअप कंपनी सुरु केली होती. जुन्या नव्याची सांगड जणू तिने पेहरावातच घातली होती. तिने जमलेल्या आम्हा नातेवाईक बायकांची चौकशी केली. ‘आईंना बोलवते हं .’. असं सांगून ती तिच्या सासूबाईंना बोलवायला आत गेली.
वहिनी चार पायांची स्टीलची काठी टेकत बाहेर आली. सगळ्या बायकांच्या नजरा गरकन वहिनीच्या दिशेनं वळल्या. वहिनीने चक्क गुडघ्याखाली येईल असा खणाच्या कापडाचा फ्रॉक घातला होता. तिच्या पायाला अजून बॅंडेज होतं. वहिनी अवघडलेली मुळीच दिसत नव्हती. उलट कौतुकाने सगळ्यांना सांगत होती, अपघात झाला तरी सुनेनं कार्यक्रम करुया म्हटलं. तिच्या सुनेनं हौसेनं दोन पदार्थ रांधले होते. वहिनीनं बसल्या बसल्या कोशिंबीर केली होती. बाकीचे पदार्थ बाहेरून मागवले होते. वहिनी उत्साहानं सांगत होती. प्रधानांच्या घरात क्रांतीच झाली म्हणायची, माझ्या मनात आलंच. देवीची आरती झाली. सवाष्णींच्या ओट्या सूनबाईनं छान पॅक केलेल्या होत्या. देणारीला आणि घेणारीलाही सुटसुटीत . सांडलवंड नाही की काही राहिलं- विसरलं नाही. छान गप्पा चालू होत्या. मध्येच अर्धा तास वहिनीची सून लॅपटॉपवरुन एक ऑनलाईन मीटिंग करायला आतल्या खोलीत गेली.
सूनबाई आत गेलीये, हे पाहून न राहवून बायकांनी विषय काढलाच. “ सुमनताई ,रूढीपरंपरांच्या बाबतीत तुम्ही एवढ्या आग्रही असता. तुम्ही एवढ्या कश्या बदललात ?”
वहिनी हसून म्हणाली , “ मला एक मंत्र मिळालाय. मला या मंत्राचे खूप फायदे जाणवले. लेकाचं लग्न झाल्यापासून मी या मंत्राचा जप करते.”
“ कुठला मंत्र ?” बायका उत्सुक होत्या.
वहिनी म्हणाली , “ मन:शांतीचा मंत्र.”
“ कुठल्या आध्यात्मिक गुरूकडे जायला लागलात की काय ? “ शेजारच्या काकींनी विचारलं .
“ नाही हो .. स्वत:च स्वत:चा गुरु झाले आणि जवळच्यांना गुरु मानलं.” वहिनी अजूनही सस्पेन्स राखून होत्या.
“— कसंय नं .. आपल्यासाठी घर खूप महत्वाचं असतं. मुलं आणि आपण सोयीसाठी वेगवेगळ्या घरात राहिलो तरी मनानं सगळ्यांनी एकत्र येणं, एकमेकांना सोबत देणं गरजेचं असतं. मात्र नवीन सून आली की सासूचा मानसिक गोंधळ सुरु होतो. घराची सत्ता, मुलावरचा अधिकार आणि माझ्यावाचून अडलं पाहिजे.. हा अहंकार— यामुळे आपल्या जवळच्या प्रिय माणसांशीच वाद सुरु होतात. मीसुद्धा यातून जायला लागले होते. पण थोड्याच वेळात भानावर आले. घर आणि घरपण अबाधित ठेवायचं असेल तर बदलायला हवं होतं. अनेक वर्ष साचलेलं पाणी स्वच्छ होण्यासाठी त्याखालचे नैसर्गिक झरे पुन्हा वाहते करावे लागतात, हा तर निसर्गनियम आहे . घरातल्या कर्त्या बाईने आणि पुरुषाने देखील सत्तेचं सिंहासन वेळीच मोकळं केलं तर पुढच्या पिढीला जबाबदारी लवकर कळते. म्हणून माझा मीच मंत्र ठरवला … TMT .. ‘ तू म्हणशील तसं ‘
“TMT? तू म्हणशील तसं … किती छान आहे हा मंत्र . “ पस्तीशीची कनका उत्साहाने म्हणाली.
“ छान काय ? मला नाही पटत .. सुनेनं आधी तिचा वकूब सिद्ध करायला नको का ? उगीच आधीच डोक्यावर घेऊन नाचलं तर उद्या या आपल्याच डोक्यावर मिरी वाटायच्या. त्यातून या आजकालच्या मुली .. “ वहिनींची जाऊ करवादली .
“ जाऊबाई , नात्यांना आधीच चुकीची लेबलं का लावायची . आणि वकूब सिद्ध करायला, सुनेला संधी तर दिली पाहिजे ना . उलट ‘ तू म्हणशील तसं ‘ म्हटलं की नवी पिढी आपल्याशी चर्चा करायला येते, असा माझा अनुभव आहे. आता आधुनिकता म्हटलं, तर प्रत्येक बाबतीत त्यांचं चुकतं असंही नसतं हो . या पिढीला परंपरांमधलं विज्ञान समजावून सांगितलं तर त्यांना ते नक्की पटतं. आपणही काही चुकीच्या गोष्टी आंधळेपणी पुढे चालवत असू तर आपल्यालाही त्यातल्या चुका उमगतात. माझी सूनबाई देव देव करणारी नाही. पण तिला माणसं आवडतात, नवीन नाती जोडायला आणि जपायला आवडतात. माणसातच देव शोधावा, असं म्हणते ती. आता हेच बघा ना, माझा पाय जायबंदी झालाय, साडी पायात येऊन मी पडू नये, म्हणून सूनबाईनेच हा खणाचा ड्रेस माझ्यासाठी शिवून घेतला. माझा संकोच दूर केला . आजचा कार्यक्रम आणि मेन्यू ठरवताना ही मी हाच मंत्र ओठांवर ठेवला होता तू म्हणशील तसं— पण त्यामुळे आमच्यात छान चर्चा झाली. अनावश्यक गोष्टींना मी ही फाटा दिला . थोडा तुम चलो, थोडा हम चले .. “
“ वहिनी , खरच छान आहे हे.. TMT.. “ मी भलतीच इम्प्रेस झाले होते.
“ आणि बरं का ..सूनबाई आता येऊन कानात सांगून गेली, की तिला देवीची आरती करायला खूप आवडलं . मेडिटेशन झालं म्हणाली. तुम्ही सगळे आलात, सगळ्यांशी ओळख झाली म्हणून देखील खूश आहे स्वारी. कुणास ठाऊक, आपल्या पूर्वजांनी नाती दृढ करण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठीच या आरत्या , श्लोक म्हणायला आणि सण साजरे करायला सांगितलं असेल . “
वहिनी काठी टेकत स्वयंपाकघरात गेली. तिच्या सूनबाईंची मीटिंग संपली होती. “ आई , पानं आधी घेऊया की आधी फन गेम्स घेऊ,” असं सूनबाई वहिनीला विचारत होती.
वहिनी म्हणाली , “ बायका भुकेजल्या असतील तर आधी वाढूया , मग खेळ घे. तरी तू म्हणशील तसं करूया.”
“ ओके . मी आधी वाढायलाच घेते. सचिन आज वर्क फ्रॉम होम आहे, त्याला हाक मारते. तो करेल मदत . तुम्ही बसा बरं .. पायावर प्रेशर येईल. “
त्यांच्या मदतीला आत आलेल्या माझ्या कानावर पुन्हा एकदा TMT मंत्र पडला आणि मला खुद्कन हसू आलं. लेकाच्या लग्नाचं घोडामैदान जवळंच आलय. त्याआधीच एक छान मंत्र मला सापडला होता. TMT—
लेखिका : डॉ. स्मिता दातार
संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पाश्चिमात्य संशोधकांनी उलगडले की संस्कृत मंत्र लक्षात ठेवणारी मुले मोठी झाल्यावर अति हुशार का होतात ?
कठोरपणे लक्षात ठेवणे मेंदूला किती मदत करू शकते हे न्यूरोसायन्स दाखवते. ‘संस्कृत इफेक्ट’ ही संज्ञा न्यूरोसायंटिस्ट जेम्स हार्टझेल यांनी तयार केली होती, ज्यांनी व्यावसायिक पात्रता असलेल्या २१ संस्कृत पंडितांचा अभ्यास केला होता. त्यांनी शोधून काढले की वैदिक मंत्रांचे स्मरण केल्याने अल्प आणि दीर्घकालीन स्मृतीसह संज्ञानात्मक कार्याशी संबंधित मेंदूच्या क्षेत्रांचा आकार वाढतो. हा शोध भारतीय परंपरेच्या श्रद्धेला पुष्टी देतो, ज्यामध्ये असे मानले जाते की मंत्रांचे स्मरण करणे आणि पाठ करणे स्मरणशक्ती आणि विचार वाढवते.
डॉ. हार्टझेलच्या अलिकडील अभ्यासात असा प्रश्न निर्माण झाला आहे की अशाप्रकारच्या प्राचीन ग्रंथांचे स्मरण अल्झायमर आणि इतर स्मरणशक्तीवर परिणाम करणाऱ्या रोगांचे विनाशकारी आजार कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते का? वरवर पाहता, भारतातील आयुर्वेदिक डॉक्टर असे सुचवतात, आणि संस्कृतमध्ये अधिक संशोधनासह भविष्यातील अभ्यास नक्कीच केले जातील.
आपल्या सर्वांना सजगता आणि ध्यान पद्धतींचे फायदे माहित असताना, डॉ हार्टझेलचे निष्कर्ष खरोखरच नाट्यमय आहेत. कमी होत चाललेल्या लक्षांच्या जगात, जिथे आपल्याला दररोज माहितीचा पूर येतो आणि मुले लक्ष वेधून घेणारे अनेक विकार दाखवतात, तिथे प्राचीन भारतीय शहाणपणामध्ये पश्चिमेला (आणि पूर्वेकडील त्यांच्या ‘आधुनिक’ बौद्धिक सेवकांना) शिकवण्यासारखे बरेच काही आहे.
गायत्री मंत्रासारख्या सामान्य संस्कृत मंत्रांचे थोडय़ा प्रमाणात जप आणि पठण करूनही आपल्या सर्व मेंदूवर आश्चर्यकारक परिणाम होऊ शकतो.
आपण उत्सवप्रिय आहोत. श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक या महिन्यात विविध व्रतवैकल्ये, धार्मिक सण, उत्सव यांची रेलचेल असते. या काळात संपूर्ण निसर्ग बहरलेला असतो. वर्षाऋतुनं अवघ्या अवनीवरती जलाभिषेक केलेला असतो. सृष्टी सौंदर्यानं नटलेली असते. प्राणी पक्षी आनंदी असतात. झाडं,वेली पानाफुलांनी नटलेली असतात. आपले सण उत्सव आपल्या संस्कृतीची ओळख सांगतात. तसेच ते निसर्गाशी नातं सांगतात, निसर्गाशी जवळीक साधतात. निसर्गातल्या बदलांचं निरिक्षण करून त्यांचं आपल्या जीवनाशी असलेलं नातं शोधणं म्हणजे सण, उत्सव साजरे करणं , हो ना? सणांच्या निमित्तानं माणसं एकत्र येतात, सुसंवाद घडतात. वैयक्तिक, सामाजिक ताणतणाव कमी होतात. याबरोबरच सण, नैसर्गिक बांधिलकीची जाणीव देखील करून देतात. सृष्टीतील प्रत्येक सजीवांप्रती प्रेम, आदर, व्यक्त करण्याचा मार्ग म्हणून या सणांच्याकडं, बघायला हवं.
आपल्या चालीरीती, परंपरा आपल्याला निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करायला शिकवतात. आपल्या परिसरातील झाडं, वेली, शेती, प्राणी, पक्षी या सर्वांना मानाचं स्थान देण्यासाठी सण निर्माण केले आहेत. असा विचार केला तर परंपरा जपल्या जातीलच, पण त्याशिवाय निसर्गाचं जतन करायला, संवर्धन करायला, परिसंस्था टिकवायला हातभार लागेल.
वटपौर्णिमा, नागपंचमी, ऋषीपंचमी साजरी करायची असेल तर घरातून बाहेर जावं लागतं. निसर्गाशी संवाद साधावा लागतो.गणेशाला लाल फुले, दुर्वा, आघाडा प्रिय. अर्जुन, रुई, पिंपळ, कण्हेर, शमी, डाळिंब,शंखपुष्पी अशी एकवीस प्रकारची पत्री पूजेसाठी लागते. बाप्पासाठी हे सर्व लागते म्हणून या वनस्पतींची लागवड केली जाते. त्यांची काळजी घेतली जाते, संवर्धन केले जाते. पर्यायानं आपण आपल्या सभोवती असलेल्या निसर्गाचं संवर्धन करतो, जतन करतो. त्यामुळंच तर पर्यावरणाचा समतोल राखला जातो. शहरात पूजेसाठी लागणारी फुलं, फळं,पत्री विकत मिळते. परंतु खरेतर या वनस्पती आपल्या परिसरात आपण स्वतः लावणं अपेक्षित आहे. देवपूजेचं निमित्त करून, पूजेसाठी लागणारी सामग्री गोळा करण्यासाठी आपण त्यांच्या जवळ, त्यांच्या सान्निध्यात काही काळ व्यतीत केला पाहिजे. मोकळी हवा, भरपूर ऑक्सिजन मिळवण्यासाठी परिसरात फिरलं पाहिजे. सृजनातला आनंद मिळवला पाहिजे.सर्जनशीलता वाढली पाहिजे. या वनस्पतींच्या औषधी गुणधर्मांची माहिती करून घेतली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्या त्या ऋतूत मिळणाऱ्या भाज्या,फळं यांचं सेवन केलं पाहिजे.
आपली संस्कृती रोजच दारात रांगोळी काढायला सांगते. यामुळे घरासमोरील अंगण, घराचा बाह्य भाग, यांची स्वच्छता होते. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश मिळतो. ताजा प्राणवायू उत्साह द्विगुणित करतो. थोडासा व्यायाम होतो. शेजाऱ्यांची खुशाली समजते. कलागुणांना वाव मिळतो. मन प्रसन्न होतं. अनेक आजार दाराबाहेर रोखले जातात.
सणासुदीच्या काळात म्हंटल्या जाणाऱ्या आरत्या, स्तोत्र पठण, यांनी सात्विक वातावरण निर्माण होतं. आरती गाताना आपण टाळ्या वाजवतो. यामुळं जशी गेयता येते, तालाचं, चालीचं भान राहतं तसंच रक्ताभिसरण सुधारतं. ओवी, श्लोक, ऋचा, आरत्या जिभेला वळण लावतात, स्मरणशक्ती वाढवतात. विचार करावा तेवढे फायदे आहेत. आपल्या पूर्वजांनी अभ्यास करून रितीरिवाज, परंपरा, सणसमारंभ यांची आखणी केली आहे. आधुनिक काळात पाश्चिमात्य देशांमधील विचार, पद्धती, खाद्यसंस्कृती, वेषभूषा आपण स्वीकारतो. ती वाईट नाही. पण आपल्या हवामानाला पूरक नाही हे मात्र नक्की. निसर्गाचा समतोल राखत, मानवी जीवन आरोग्यपूर्ण, आनंदी आणि समाधानी करण्यासाठी परंपरा जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्न,वस्त्र, निवारा देणारी अवनी जपली पाहिजे.
‘सहनाववतु, सहनोभुनोक्तु सहवीर्यं करवावहै’ ची अनुभूती घेतली पाहिजे.
तरुणपणात कुणाची तरी येते ती आठवण…. म्हातारपणात होतं ते स्मरण…. यानंतरही जिवाभावात उरतात त्या मात्र स्मृती…. !
ऑक्टोबर महिन्यामध्ये घडलेल्या प्रत्येक घटना, स्मृती म्हणून माझ्या मनामध्ये कागदावर शिक्का मारावा त्याप्रमाणे उमटल्या आहेत…!
काल घडलेल्या सुखद घटना, शिक्का मारलेल्या या स्मृती, आज घरी येऊन घरातल्या आपल्या लोकांना चौखूर बसवून पुन्हा रंगवून सांगण्यात मजा असते… मी त्यालाच लेखा जोखा म्हणतो !!!
आमच्या खेडेगावात पूर्वी बुधवारी बाजार भरत असे (आताही तो बुधवारीच भरतो)…. लहानपणी आजीच्या बोटाला धरून मी तिच्या मागे मागे फिरून बाजार करत असे…सगळ्यात शेवटी ती माझ्यासाठी चार आण्याची भजी विकत घेत असे…. कळकट्ट पेपराच्या पुरचुंडीत बांधलेले हे सहा भजी मी जपून घरी आणत असे … बाजारातून घरी चालत जायला किमान एक तास लागे… तोवर मी साठ वेळा आजीच्या पिशवीतून भज्यांचा पुडा नीट आहे की नाही हे तपासात असे…. त्याचा वास घेत असे…. ! —- भजी खाण्यात जो आनंद आहे…. त्यापेक्षा त्याचा सुगंध नाकात भरून घेण्यात जास्त मजा असते…. !
एखादं ध्येय प्राप्त करण्यापेक्षा त्या ध्येयप्राप्तीपर्यंतचा प्रवास कधीकधी आनंददायी असतो….!!!
तर…. घरी जाईपर्यंत त्या कळकट पेपरला भज्यांचं तेल लागलेलं असे…. खून दरोडे बलात्कार आणि राजकारण याच बातम्या त्याही वेळी होत्या… आजही त्याच आहेत…. या बातम्यांची शाई माझ्या भजाला आपसूक चिटकत असे…. पण मला त्याचं काही सोयर सुतक नव्हतं !
आज वयाने मोठा झाल्यानंतर “भजी” म्हणतो…. लहानपणी “भजं” म्हणत होतो…!
वर्तमानपत्राचा कागद आज जरी बदलला असला तरी बातम्या मात्र त्याच आहेत….
वयाने कितीही मोठा झालो असलो, तरीसुद्धा सामाजिक परिस्थिती विशेष बदललेली नाही……. असो…
फरक फक्त इतकाच पडला आहे….. भजी विकणारे, पटका बांधणारे…. आजोबा जाऊन, त्यांच्या जागी त्यांचा मुलगा आला आहे…
आजोबा भजी विक्री करून “व्यवसाय” करायचे, घराचा उदरनिर्वाह भागवयाचे, मुलगा आता “धंदा” करतो….!
मातीची घरं जाऊन सिमेंट ची पक्की घरं झाली आहेत….
घरं पक्की झाली पण नाती भुसभूशीत झाली….!
घरा समोरचं अंगण जाऊन, तिथे पार्किंग ची जागा झाली आहे….
पूर्वी पाऊस पडल्यानंतर अंगणातल्या मातीला “सुगंध” यायचा… हल्ली नुसताच चिखल होतो…. या चिखलात घरापासून दूर गेलेल्या कारच्या खुणा फक्त ठळक दिसतात……..
गेलेली मुलं, नातवंडे परत घरी येतील या आशेवर दोन म्हातारे डोळे लुकलुकत असतात…. विझत चाललेल्या दिव्यासारखे !
माझी आजी गेली त्याला कित्येक वर्ष झाली… परंतु पडक्या त्या वाड्याला तिच्या स्मृतीचा सुगंध आहे… !
चार आण्याला हल्ली भजी मिळत नाहीत…. ते चार आणे भूतकाळात मी हरवून आलो आहे… तेलाचा डाग पडलेला तो वितभर पेपर…. पटका घालणारे ते बाबा… अन् वर दोन भजी जास्त घाल म्हणून वाद घालणारी ती माझी
आजी… ! —– आज जरी मी हे सगळं हरवलं आहे, तरीसुद्धा….तेलाचा डाग पडलेल्या, त्या कळकट पेपरमधल्या भज्यांच्या सुगंधासारख्या…. या सर्व स्मृती अजूनही मनात दरवळत आहेत… खमंग… खमंग !!!
या महिन्यात दिवाळी होती….!
मोठ्या हौसेने आम्हीसुद्धा पणत्या घेतल्या. पण आमच्या घरात त्या लावल्या नाहीत…. आम्ही त्या चार जणांना विकायला लावल्या…. ! …. विकलेल्या पणत्यांनी एका बाजूचं घर उजळेल…. तर दुसऱ्या बाजूला असणाऱ्या घराची भूक शमेल…!
आम्ही घरीच उटणं केलं …. रस्त्यावरील याचकाकडून त्याचं पॅकिंग करून घेतलं…. त्या बदल्यात त्यांना पगार दिला… या उटण्यात आम्ही चंदनाचे चूर्ण घातले होते…….. या उटण्याला चंदनाचा सुगंध येतोय की नाही माहित नाही, पण कष्टाचा सुगंध नक्कीच आहे !
आमच्या खेडेगावात पूर्वी प्रथा होती… घरामध्ये फराळ तयार झाला की, ताटंच्या ताटं भरून ती गल्लीतल्या शेजार पाजारच्या लोकांना द्यायची…… जणू शेजारच्यासाठीच घरी फराळ तयार करत आहोत….. आम्ही पोरं सोरं ही ताटं लोकांच्या घरी पोहोचते करत असू…. त्यावर एक फडकं झाकलेलं असे…. वाटेत जाताना हे फडकं हळूच बाजूला करून चिवड्यातल्या खमंग तळलेल्या खोबऱ्याच्या चकत्या आणि शेंगदाणे खायला मिळत, म्हणून हे ताट पोहोचवण्याचं काम अंगावर घ्यायला आम्ही प्रत्येक जण उत्सुक असत असू … घरातून भरलेलं ताट दुसरीकडे घेऊन जाईपर्यंत निम्मं व्हायचं… यात खूप “मज्जा” यायची….! सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की खेड्यातली ही प्रथा आताच्या आपल्या समाजातल्या अनेकांनी आजही जपली आहे…….
…. ताटंच्या ताटं भरून यावेळी समाजातल्या अनेक दानशूरांनी आमच्याकडे फराळ पाठवला… किमान ३० हजार लोकांना पुरेल इतका हा फराळ होता…
गावाकडल्या स्मृतीचा गंध पुन्हा मनात दरवळला…. लहानपणीप्रमाणेच याहीवेळी आम्ही फडकं झाकून फराळाचं ताट घेऊन रस्त्यावर गेलो…….
…. पण यावेळी तळलेल्या खोबऱ्याच्या खमंग चकत्या आणि शेंगदाणे आम्ही खाण्याऐवजी पोराबाळांची वाट बघणाऱ्या…. लुकलूकणारे डोळे आणि थरथरते हात घेऊन जगणाऱ्या जीवांना भरवल्या …….
…. आपण घेण्यापेक्षा, दुसऱ्याला देण्यामध्ये जास्त “मज्जा” येते हे आता कळलं…!
वैद्यकीय उपक्रमांतर्गत या महिन्यात जवळपास ९०० रुग्णांवर रस्त्यावरच उपचार केले. आणि १६ गंभीर रुग्णांना विविध हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून उपचार करून घेतले आहेत. गरजूंना वैद्यकीय साधने (व्हीलचेअर, कमरेचे पट्टे, कुबड्या, मास्क, sanitizer, स्टिक, गुडघ्याचे तथा मानेचे पट्टे,) दिले आहेत.
वृद्ध लोक ज्यांना बिलकुल ऐकायला येत नाही, वृद्धापकाळाने डोळ्यांना दिसत नाही आणि त्यामुळे रस्ता ओलांडताना एक्सीडेंट होऊन मृत्यू होतात, अशा सर्वांना कानाची मशीन दिले आहेत, डोळ्यांची ऑपरेशन्स केली आहेत….. या सर्व वृद्धांच्या, आवश्यक त्या सर्व तपासण्या आपण रस्त्यावरच केल्या आहेत.
शैक्षणिक उपक्रमांतर्गत ज्या मुलांनी शिक्षणाची वाट धरली आहे अशा सर्वांना काय हवं नको ते पाहून गरजेच्या शैक्षणिक बाबी पुरवल्या आहेत.
या महिन्यात अनेक गोरगरिबांना शिधाही दिला…
आमच्या परीनं आम्ही दिवाळी साजरी केली….
या अल्लाह…. दर्गाह मे हमने कोई चादर नही चढाई…. मगर रस्ते पे जो बुजुर्ग थंड मे मुरझाये पडे थे…. उनके शरीर पे चादर चढाई है ….
Dear Jejus, we have not offered a single candle to you in this Diwali …. But we have enlightened the houses of many poor people….!
वाहेगुरूजी का खालसा वाहेगुरूजी की फतह…
इस बार हमने गुरुद्वारेपे नही….रस्तेपेही लंगर आयोजित किया था…… पंजाबी या गुरुमुखी भाषा तो आती नही मुझे… लेकिन बिना शब्दोंकी बोली जो हमने बोली ….क्या वो आपकी भाषा से अलग है ?
देवी माते … नवरात्रात तुला साडी चोळी अर्पण करण्यापेक्षा, फुटपाथवरच्या मातेला आम्ही साडी चोळी अर्पण केली गं … ! त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले…. ते तुझेच तर होते…..
हे शंकर भगवान…. भोलेनाथा…. लोक तुम्हाला दुधाचा अभिषेक करतात…. तुम्हाला अभिषेक करण्याऐवजी उपाशी आणि नागड्या पोरांना मांडीवर घेऊन, आम्ही त्यांना दूध पाजले आहे… यानंतर तुमच्या मुद्रेवर जे प्रसन्न हास्य उमटलं…. ते मी दिवाळीचा दिवा म्हणून मनात साठवून ठेवलंय…..
हे गजानना…. चतुर्थीला तुला मोदकाचा “नैवेद्य” दाखवण्याऐवजी रस्त्यावर भुकेचा महोत्सव मांडून…. भुकेल्यांना मोदक भरवून त्यांचा आनंद “प्रसाद” म्हणून आम्ही मिळवला आहे… !
आणि हो… हे सारं करण्याबद्दल मी तुमची मुळीच माफी मागणार नाही…. !
नुकतीच दिवाळी संपली आहे, पण तरी परवापासून सुरु झालेल्या तुळशीच्या लग्नामुळे अजूनही मस्त सणाचे वातावरण आहे, नुसते आजुबाजुला नाही तर फेसबुक वर पण….
आज असंच दिरांशी बोलता बोलता, तुळशीच्या लग्नाचा विषय झाला … आम्ही सांगलीत असताना दिरांकडे धडाक्यात लग्न साजरे करायचो.. तेव्हा माझ्या मनात लहानपणापासून पाहिलेली तुळशीची लग्नं आठवायला
लागली !—– खरंच आपण का करतो तुळशी चे लग्न ?–हे आताच्या पिढीला समजेल अशा पध्दतीने सांगायला पाहिजे, म्हणून हा लेखनप्रपंच !
आम्ही ही लहानपणापासून तुळशीचे लग्न पाहिलंय,पण आता मुलींना त्याची कारणमीमांसा पण लागते. त्यामुळे मी लगेच त्याबद्दलची माहिती शोधायला सुरुवात केली !
— या मागची पौराणिक कथा आहे ती अशी — जालंदर नावाचा असुर देवांना अजिंक्य झाला होता. त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता होती. विष्णूने जालंदरचे रूप घेऊन वृंदेचे सत्वहरण केले. तेव्हा जालंदराने तिला शाप देऊन
दगड केले. तेव्हा ती सती वृंदावनात प्रकट झाली. हीच ती तुळस ! विष्णूने याचे प्रायश्चित्त म्हणून तिच्याशी विवाह केला. विष्णूच्या कृष्णावतारात हे लग्न झाले. त्यामुळे आपण विष्णू आणि कृष्णाला तुळस वहातो.—-
या सर्व पुराणकथा झाल्या ! पण आताही आपण तुलसी विवाह का करतो? आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्ट निसर्गाशी निगडीत केलेली आहे. निसर्गातील प्राणी,पशूपक्षी, वनस्पती ,वृक्षवेली हे आपले सगेसोयरे आहेत. त्यामुळे माणूस या सर्वांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्सव करतो. जसे वटपौर्णिमा, नागपंचमी, नारळी पौर्णिमा….. पंचमहाभूतांचे त्या निमित्ताने स्मरण केले जाते.
तुलसी विवाहाची प्रथाही अशीच आली असावी. तुळस ह्या वनस्पतीचे शास्त्रीय महत्व आहे. तुळशीचे झाड हे चोवीस तास ऑक्सिजन देणारे आहे. तिच्या मंजि-यांपासून असंख्य रोपे तयार होतात. सर्वांना ऑक्सिजन मिळावा म्हणून पूर्वी घराभोवती तुळशीची झाडे वाढवली जात. तुळशीमुळे कीटक येत नाहीत, इतकंच काय डासही कमी होतात. तुळशीचा रस अंगाला लावला की डास चावत नाहीत. तुळशीची पाने औषधी आहेत. तुळशीच्या पानांचा रस खोकल्यासाठी उपयुक्त आहे. तसेच त्वचेच्या रोगांवरही तुळशीचा रस उपयोगी असतो. अशी ही बहुगुणी तुळस पूजेसाठी योग्य ठरली !
पूर्वीच्या काळी स्त्रियांचे घराबाहेर पडणे समाजात मान्य नव्हते. त्यामुळे त्यांना घराबाहेरची मोकळी हवा मिळत नसे. अशा विचाराने बहुतेक तुळशीला रोज स्त्रियांनी पाणी घालण्याची पध्दत आली असावी. पूर्वी वाडा संस्कृती होती, तेव्हा वाड्यात शिरले की मधोमध तुळशी वृंदावन असे. ती एक पवित्र जागा असे, जिथे संध्याकाळी घरातील स्त्रिया, मुलेबाळे बसून शुभंकरोती,परवचा म्हणत असत. तुळशीसमोरच्या पणतीच्या शांत उजेडात मनही शांत होऊन जाई !
या दिवसात चिंचा,बोरे,आवळे यायला सुरुवात होते. ही फळे म्हणजे व्हिटॅमिन ‘सी’ चा साठाच जणू ! त्यामुळे तुळशी विवाहाच्या वेळी ही सर्व फळे पूजेसाठी असत. आपोआपच घरातील मुलांना ती खायला मिळत. उसाची मोठी झाडे आणून ती तुळशीला मांडव म्हणून वापरली जात. दिवाळी झाल्यानंतर मुलांसाठी तुळशीचे लग्न हा एक आनंददायी कार्यक्रम असे. दिवाळीत राहिलेले फटाके तुळशीच्या लग्नात उडवून संपवायचे. दिवाळी फराळ संपत आला असला तरी नवीन लाडू,करंजी लग्नासाठी बनवली जात असे. तुळशीचे लग्न झाले की विवाह मुहूर्त सुरू होत असत. आणि वातावरण सणांकडून लग्न समारंभाकडे वळत असे.
तुळशीचे लग्न ही गोष्ट आता जरी कालबाह्य वाटत असली तरी तुळशीचे गुणधर्म काही नाहीसे होत नाहीत ! निसर्ग आणि ईश्वर यांची सांगड आपल्या संस्कृतीत अशा पध्दतीने घातली गेली आहे. शिक्षणामुळे ज्ञान वाढले, सुबत्ता आली पण अशांतता ही वाढली. एकत्र कुटुंब पद्धती कमी झाली. प्रत्येक कुटुंब म्हणजे एक बेट बनले आहे ! हे असे प्रसंग लोकांना जोडून ठेवायला मदत करतात.. हल्ली लोकांना एकटेपणा मुळे बऱ्याच मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते…… नुसती भौतिक प्रगतीच नाही तर मन:स्वास्थ्य जपणे हे तितकेच महत्वाचे आहे. —आणि आपल्या संस्कृतीतून हे आपसूकच घडून येत असे.
दुसऱ्याच दिवशी, तुळशीचे लग्न करून मुलीने पण तुळशी लग्नाचे फोटो पाठवले. स्वत: छान साडी नेसलेला,नातीने परकर पोलके घातलेला, आणि नातवाने तुळशीसाठी अंतरपाट धरलेला आणि हे सर्व कौतुकाने जावई बघत आहेत…..असे फोटो मोबाइलवरून आले. आणि क्षणार्धात माझे मन विमानाच्या वेगाने दुबईला पोचले…तुलसी विवाह कसा साजरा झाला हे बघण्यासाठी !