मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रशियन कलाकारांची रामलीला… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ रशियन कलाकारांची रामलीला… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

1960 मध्ये रशियन कलाकार गेनाडी मिखाईलोविच पेचिन्कोव याने पहिल्यांदा प्रभू रामचंद्र साकारला आणि पुढे चाळीस वर्षं त्याने श्रीराम म्हणून रशिया व युरोपातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. रशियात आणि जवळपासच्या देशांत रामायण पोचवण्याचं काम त्यांनी चोख बजावलं. भारत सरकारकडून २००६ मध्ये त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केलं गेलं. २०१८ मध्ये वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

गेली काही वर्षं योगींचं भाजप सरकार सत्तेत आल्यापासून अयोध्येतील दीपोत्सव आपल्या डोळ्यांचं पारणं फेडत आहे.  २०१८ मध्ये अयोध्येत पहिल्यांदाच रशियन कलाकारांनी रामलीला सादर केलेली आणि नंतर २०१९ च्या प्रयागराज येथील कुंभमेळ्यात.

यंदाच्या दिवाळीत पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी २३ ऑक्टोबरला अयोध्येतील दीपोत्सवात भाग घेतला आणि रशियन कलाकारांनी साकारलेली रामलीला पाहिली.

मर्यादा पुरुषोत्तम राम साकारला आहे इल्दार खुस्नुलिस याने, तर सुकुमार सीतामाई आहे मिलाना बायचोनेक. अलेक्सेई फ्लेयिन्कव बंधुप्रेमामुळे रामचंद्राबरोबर गेलेला लक्ष्मण झाला आहे, ज्यांचा फोटो आपण येथे पहात आहोत. 

लेखक – अज्ञात 

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आरसा… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? विविधा ?

☆ आरसा… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

आरसा ज्याला दर्पण’असेही म्हणतात,तो आरसा सर्वांचाच एक आपुलकीचा-जिव्हाळ्याचा विषय आहे.’

सांग दर्पणा दिसे मी कशी?असं गुणगुणत दर्पणात पाहणार्या या फक्त युवतीच असतात असं नाही बरं का!

तर अगदी दुडुदुडु चालायला शिकलेली बालके, जगातील अनेक किंवा अगदी सर्व ठिकाणच्या सर्व वयोगटातील लोकांसाठी अर्थातच आबालवृद्धांसाठी आरसा ही एक आवश्यक बाब ठरते.

तयार होऊन शाळेला जाण्यापूर्वी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी आपली केशभूषा, पआपली वेशभूषा ठीकठाक आहे कि नाही हे आरसाच सांगतो.कांही शाळात अगदी दर्शनी भागात आरसा टांगलेला असतो कारण विद्यार्थ्यांने गणवेश, केस वर्गात प्रवेश करण्यापूर्वी व्यवस्थित आहेत कि नाहीत हे पाहिल्यानंतरच पुढे व्हावे,नसेल तर व्यवस्थित हो असे आरसा सांगतो.सण-समारंभ,लग्नकार्य अशावेळी तरी या आरशाची खूपच मदत होते.

पण मित्र हो,आपले बाह्यांग,आपले बाह्यव्यक्तिमत्व जसे आरशात पाहून कळते तसा आणखीहीएक आरसा आपल्या जवळ सतत असतो .तो आरसा म्हणजे मनाचा आरसा.ज्या मनाचा तळ लागत नाही असे म्हणतात त्या मनातील भाव-भावनांचे प्रगटीकरण चेहरारुपी आरशाद्वारे प्रगट होते. मनातील आनंदी, दुःखी, प्रसन्न, काळजीपूर्ण ,रागीट,भयभीत असे सर्व भाव चेहरारुपी आरसा स्पष्ट करतो.म्हणूनच म्हंटले जाते. चित्तं प्रसन्नं भुवनं प्रसन्नं चित्तं विषण्णं भुवनं विषण्णं.

आपलं आपल्या मनावर नियंत्रण असणं गरजेचं असतं कारण त्यामुळेच आपण व्यक्तिगत भावना लपवून बाहेर ील व्यवहार सुरळीतपणे पार पाडू शकतो.पण याउलट काही वेळा मनाचा आरसा जर चेहर्यावर प्रगट झाला तर त्याचा फायदाही होतो.म्हणजे चेहर्यावर दुःख दिसल्यानंतर जवळच्या व्यक्तीने आपली विचारपूस केली तर दुःख निम्मे  हलके होते.

ब्युटीपार्लर, केशकर्तनालय या ठिकाणी तरी आरसा पाहिजेच.याखेरीज सपाट आरसे आणि गोलीय आरसे प्रकाशाच्या अभ्यासात ,प्रतिमा मिळविण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात.गोलीय आरशांचा उपयोग काही ठिकाणी प्रदर्शनात अशा प्रकारे केला जातो कि आपली छबी कधी जाड व बुटकी दाखविली जाते तर कधी उभट व लांब दिसते. त्यामुळे आपली करमणुक होते.

म्हणूनच आरसा हा आपला एक जवळचा मित्र आहे असे म्हंटले तर ते वावगे ठरणार नाही. उभा, आडवा, चौकोनी, गोल, षटकोनी असे सर्व प्रकारचे आरसे आपण पाहतो. पर्समध्ये किंवा अगदी पावडरच्या डबीत मावणार्या छोट्या आरशापासून मोठ्यात मोठे,प्रचंड आरसे असतात.मोठे आरसे आपण राजवाड्यात, आरसेमहालात किंवावस्तुसंग्रहालयात आपण पाहू शकतो.

गावाकडील आमच्या जुन्या घरात मी भिंतीत बसविलेले आरसे पाहिले। आहेत.चित्रपट स्रुष्टीतही आरशांचा उपयोग अगदी लाजवाब पणे केलेला दिसतो.

चला तर, आपणही आरसा बाळगुया नि व्यवस्थित, नीटनेटके राहू या.

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गॉडविट…– लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ गॉडविट…– लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

काल हा फोटो बघितला आणि पुन्हा एकदा निसर्गाच्या पुढे आपण काहीच नाही याची जाणीव झाली. 

गॉडविट (Godwit) जातीच्या पक्षाने नुकताच एक जागतिक विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला. ५ महिन्यांच्या या पक्षाने १३ ऑक्टोबर २०२२ ला अलास्का इकडून उड्डाण भरलं. तब्बल ११ दिवस १ तासात त्याने १३५६० किलोमीटर अंतर कापून ऑस्ट्रेलियातील टास्मानिया इथे तो उतरला. या ११ दिवसात त्याचा सरासरी वेग होता ५१ किलोमीटर / तास. 

या संपूर्ण प्रवासात तो एकदाही झोपला नाही, त्याने काही खाल्लं नाही, त्याने पाणी प्यायलं नाही. तो फक्त उडत होता आपल्या लक्ष्याकडे. अलास्कामध्ये त्याच्या पाठीवर बसवण्यात आलेल्या ५ ग्रॅमच्या सॅटलाईट चिपने त्याच्या या संपूर्ण प्रवासाची नोंद केली आहे. त्याच्या नावावर हा जागतिक विक्रम नोंदला गेला आहे. 

गॉडविट नावाचे पक्षी स्थलांतर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हे हवेतून तब्बल ८० किलोमीटर / तास वेगाने उडू शकतात. (उड्डाण करतात ग्लाइड न करता). तळ्याकाठी, मॅन्ग्रूव्हच्या जंगलात यांचं अस्तित्व दिसून येते. 

निसर्गाच्या या अदाकारीपुढे पुन्हा एकदा नतमस्तक झालो. सलग ११ दिवस असा पृथ्वीच्या दोन टोकांचा प्रवास महासागरावरून करणं ही नक्कीच अविश्वसनीय अशी घटना आहे. आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अश्या घटना उजेडात येत असल्या तरी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी केलेला हा हजारो किलोमीटरचा प्रवास मला स्वतःला खूप शिकवून गेला.

लेखक – अज्ञात 

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनुष्य इंगळी, अति दारूण…लेखक – श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ मनुष्य इंगळी, अति दारूण…लेखक – श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆ 

“ पणत्या कशा दिल्या काकू? ”

“ नक्षीच्या ६० रूपये डझन आणि साध्या ४० रूपये डझन ”

“ मला ६ हव्यात.”

“ ६ नं कुठं दिवाळी होत असती का दादा? दोन्ही घ्या की एकेक डझन.. नव्वद ला देते मी..”

हो-नाही, हो-नाही करत करत शेवटी एक डझन पणत्या घ्याव्यात असा निर्णय झाला. ‘वैशाली’त उत्तप्पा मागवताना एवढा विचार नाही करत कुणी. पण पणत्या सहा घ्याव्या की बारा? याचा निर्णय घेण्यासाठी पाच मिनिटं घेतो आपण. माणसाची तऱ्हाच निराळी.

लग्न ठरवण्यासाठी भेटताना बरिस्ता किंवा सीसीडी मध्ये भेटून बिलासाठी पाचशे रूपयांच्या दोन नोटा देणाऱ्या तरूणाचं रूपांतर, लग्नानंतर एक किलोच्या भावात घासाघीस करून पाव किलो भाजी घेणाऱ्यात कसं होतं, ते आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल. याला दुटप्पीपणा म्हणता येणार नाही, ही स्वाभाविक वृत्ती आहे. कोणत्या गोष्टी गृहीत धराव्यात, कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावं, कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात, याच्या धोरणांमध्ये गडबड झाली की जगण्या-वागण्याची पुढची सगळी समीकरणं चुकतच जातात आणि आपल्याच चुकांमुळं हे घडतंय, हे बहुतांश लोकांच्या लक्षातही येत नाही.

“ हव्यात कशाला ढीगभर पणत्या? दारात लावायला दोन पणत्या पुरे झाल्या.” असं म्हणणाऱ्या गृहलक्ष्मीनं स्वत:चा चारखणी वाॅर्डरोब उघडून त्याचं ऑडीट करावं आणि मग पुढची प्रत्येक साडी खरेदी करताना “ हवेत कशाला ढीगभर कपडे? ” असं म्हणावं. जमेल का?

एका ग्राहकरूपातल्या गृहलक्ष्मीला समोरच्या विक्रेतीमधली गृहलक्ष्मी दिसू नये, हे स्वत:च्याच कोषात गुरफटून गेलेल्या कमालीच्या असंवेदनशील व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे.

मंडई- तुळशीबागेपासून खरेदी सुरू होते, तेव्हा पाकीट लहान असतं, तिथल्या वस्तू महागड्या वाटतात. पुढं बेलबाग चौकातून डावीकडे वळलं की, तेच पाकीट प्रत्येक पावलागणिक आकारानं मोठं-मोठं व्हायला लागतं आणि खरोखरच्या महागड्या गोष्टीसुद्धा स्वस्त वाटायला लागतात. हा केवळ वस्तूंच्या खरेदी-विक्रीतला खेळ नाही, हा माणसांच्या जगण्याविषयीच्या अस्पष्ट आणि अंधुक कल्पनांचा खेळ आहे.

एक जुना प्रसंग सांगतो. जोगेश्वरीच्या बोळात एक विक्रेता मेणाच्या उष्णतेवर चालणाऱ्या पत्र्याच्या बोटी विकत होता. मला त्या बोटी हव्या होत्याच. मी त्या निवडून घेत होतो. एक तरूण वडील आपल्या मुलाला घेऊन आले. त्यांना एक बोट हवी होती.

“ केवढ्याला दिली रे? ”

“ साठ रूपये साहेब.”

“ साठ? अरे, खेळणं विकतोस की खरी बोट विकतोस? ”

“ खेळणंच आहे.”

“ साधी पत्र्याची तर आहे. माझ्या लहानपणी पाच रूपयांना मिळायची. आता साठ रूपये? वीसला दे.”

“ साहेब, माझी खरेदीच चाळीस रूपयाची आहे. वीसला कशी देऊ?”

तेवढ्यात त्यांच्या लहान मुलानं सूर लावला. “ पप्पा, मला प्ले स्टेशन देणार होतात तुम्ही. मला हे नकोय. हे एकदम थर्ड क्लास आहे.”

“ चल. देतो तुला प्ले स्टेशन.”

बाप-लेक निघून गेले. तीस हजार रूपयांचं प्ले स्टेशन घेताना त्यानं पाचशे रूपयांत मागितलं असेल का? “आमच्या वेळी तर असलं काहीच नव्हतं. म्हणून दे आता फुकट.” असं म्हटलं असेल का त्यानं? नक्कीच नाही. तो काय, कुणीच असं म्हणणार नाही.

“ दादा, हे गिऱ्हाईक दुसऱ्यांदा येऊन गेलं बघा. नुसतंच बघून भाव करून जातो. खरेदी तर करत नाही.” मी निरूत्तर होऊन त्याचा निरोप घेतला. पण तो मुद्दा मनात राहिला तो राहिलाच.

डाॅ. कलामांनी एकदा प्रश्न विचारला होता, “ जगातली सगळ्यात मोठी समस्या कोणती? ” त्यावर एका लहान मुलीनं उत्तर दिलं होतं, “ गरिबी.” त्या मुलीचं उत्तर किती खरं होतं, याचा प्रत्यय दरवर्षी दिवाळी आली की येतो. सणासुदीच्या वस्तू, ज्याला आजकाल ‘सिझनल्स’ म्हणायची पद्धत आहे, ती बाजारपेठ ही खरं तर आपल्या देशातली एक प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. पण अन्य व्यवसायांच्या चकचकाटात तिची गर्भश्रीमंती आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही. या बाजारपेठेचे विक्रेते शालेय शिक्षणाच्या दृष्टीनं अडाणी असतीलही पण भारतीय मनांचं आणि सश्रद्धतेचं मर्म त्यांना अचूक उमगलेलं आहे. त्यांना या गोष्टींना ब्रॅन्डचं रूप देता आलेलं नाही, ही गोष्ट खरी आहे, पण त्याचं कारण कदाचित या बाजारपेठेचं असंघटित असणं हेही असू शकेल. त्यामुळे तो दोष माणसांचा नाही, असलाच तर तो चुकीच्या धोरणांचा आहे आणि कोरोनाच्या सावटाखालच्या या दिवाळीत तर त्याचा रंग अधिकच ठळकपणे दिसतो आहे.

वडापाव विकणारा, चहा विकणारा आणि झेंडूची फुलं विकणारा असे तीन विक्रेते एकाच रस्त्यावर शेजारी शेजारी उभे राहून व्यवसाय करतायत. त्यात वडापावच्या भावाची घासाघीस होत नाही आणि चहाचीही होत नाही. पण झेंडूची फुलं विकणाऱ्याशी मात्र जवळपास प्रत्येकजण घासाघीस करतो, हुज्जत घालतो. गजरे विकणाऱ्यानं दहा रूपये असं म्हटलं की, ‘ पन्नासला सहा देतोस का? ’ असं दहापैकी नऊ जण विचारतातच. पण वीस-पंचवीस वडापाव खरेदी करूनही ते वडापाव विक्रेत्याला हा प्रश्न अजिबात विचारत नाहीत, पैसे देतात. तसं पाहिलं तर, दोघेही रस्त्यावरचेच विक्रेते. मग हा फरक का?

फरक विक्रेत्यात नाही, फरक आपल्या दृष्टिकोनात आहे. आपल्याला स्वत:ला बदलावंच लागेल..!

लेखक : श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर,पुणे.

प्रस्तुती – श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मला तुमचा चेहरा आठवायचा आहे ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

🌼 मला तुमचा चेहरा आठवायचा आहे  🌼 सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

“ मला तुमचा चेहरा आठवायचा आहे, जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन.”

जेव्हा भारतीय अब्जाधीश रतनजी टाटा यांना एका रेडिओ प्रेजेंटरने टेलिफोन मुलाखतीत विचारले: ” सर, तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद झाला, ती आठवण सांगाल का?”

रतनजी टाटा म्हणाले: ” मी जीवनात आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला.—

पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही.

मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे मला जाणवलं.

त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला. तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील ९५%डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो. पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.

चौथा टप्पा होता, जेव्हा माझ्या एका मित्राने मला काही अपंग मुलांसाठी व्हीलचेअर विकत घेण्यास सांगितले. सुमारे २०० मुले होती. मित्राच्या सांगण्यावरून मी लगेच व्हीलचेअर घेतल्या.—

—पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हीलचेअर स्वहस्ते द्याव्या . मी त्यांच्यासोबत गेलो. तिथे सर्व पात्र मुलांना मी स्वतःच्या हाताने व्हीलचेअर दिल्या. या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची विचित्र चमक दिसली. मी त्या सगळ्यांना व्हीलचेअरवर बसून इकडे तिकडे फिरताना आणि मजा करताना पाहत होतो..जणू ती सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर पोहोचली होती, जणू काही कसलातरी विजयोत्सवच होता तो. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो तेव्हा त्या मुलांपैकी एकाने माझा पाय धरला. मी हळूवारपणे माझा पाय सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाने सोडले नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि माझे पाय घट्ट धरले. मी झुकलो आणि मुलाला विचारले: “ तुला आणखी काही हवे आहे का?”

—- तेव्हा त्या मुलाने मला जे उत्तर दिले, त्याने मला धक्काच दिला नाही, तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला—-

—मुलाने म्हटले: ” मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन.”—- “ 

वरील विस्मयकारक कथेचे सार हे आहे की आपण सर्वांनी आपल्या अंतरंगात डोकावून विचार केला पाहिजे की, हे जीवन, संसार आणि सर्व ऐहिक कार्ये सोडल्यानंतर आपली आठवण राहील का?

कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे, ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी असते.

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जान है तो जहाँ है ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ जान है तो जहाँ है ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सहसा कुठलाही आजार हा अकस्मात येत नाही. आपलं शरीर वेळोवेळी आपल्याला तसे संकेत देत असतं ,आपण मात्र त्याकडे विशेष गंभीरपणे न बघता तसंच दामटायला वा रेटायला बघतो. सध्या सगळीकडे व्हायरल इंफेक्शनचा सामना जनताजनार्दनाला करावा लागतोयं. सध्याच्या असमतोल हवामानामुळे हे चढउतार आपल्याला अनुभवावे लागतात.

इकडे लगातार तीन दिवस तीन वेगवेगळ्या टोकाच्या हवामानाचा अनुभव सगळ्यांनी घेतला. पहिल्या दिवशी ढगाळ वातावरण,कुंद हवा, पाऊस तर दुसऱ्या दिवशी थंडी, बोचरे वारे,आणि तिस-या दिवशी अचानक सर्वत्र ऊन. ह्या अचानक बदलत्या हवामानाने सगळीकडे सर्दी, ताप,घसा खवखवणे आणि खोकला ह्यांच्या मा-याला आपल्याला तोंड द्यावं लागतयं.

खरतरं एकादिवसाच्या मुलाचं देखील कोणावाचून काहीही अडत नाही. जो जन्माला घालतो तोच सोय करतो ही म्हण खरी असली तरी अशा संकटाच्या काळात मानसिक, शारीरिक भक्कम राहतांना  शेवटी माणसाला माणसाचीच गरज लागते.मग ती कोठल्याही रूपात का असेना,कधी ती गरज आपली जवळची घरची माणसं भागवतात तर कधी आपली जोडून ठेवलेली मित्रमंडळी वा स्नेही भागवतात.

त्यामुळे ह्या आजारपणाच्या काळात मात्र माणसाला माणसाची खरी किंमत कळायला लागते.सध्या ह्या आजारपणात घरात वा नोकरीच्या जागी तीन गट पडलेतं.पहिल्या गटात  संपूर्णपणे आजारी असलेल्या व्यक्ती, दुसऱ्या गटात थोडफार बरं वाटत नसलेल्या व्यक्ती आणि तिस-या गटात एकदम ठणठणीत व्यक्ती. ह्यापैकी तिसऱ्या गटातील व्यक्तींचे संख्याबळ अगदी कमी आहे.

काल परवापर्यंत ह्या आजारपणात मी दुसऱ्या गटात मोडत होते.नंतर मात्र अंगावर काढल्याने शेवटी तिसऱ्या फेज मध्ये प्रवेशकर्ती झालीय. आता दोन दिवस सक्तीची विश्रांती घेतल्या शिवाय पर्यायच नाही.

त्यामुळे आता दोन दिवस सक्तिची विश्रांती घेऊन झाल्यावर ह्या आजारपणात आलेल्या चांगल्या अनुभवांविषयीची पोस्ट काही दिवसात लिहीनच.

औषधांपेक्षाही सर्वांगीण आराम,शांत स्वस्थ झोप,डोळ्यांना डोक्याला त्रास होणाऱ्या मोबाईल चा अत्यंत कमी वापर ह्याने लौकर बरं वाटायला लागतं. असो शेवटी काय तर “जान है तो जहाँ है”.,”सर सलामत तो पगडी पचास” ही मोलाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवी.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवाळीनंतरचा मऊ भात..आणि मेतकूट !… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ दिवाळीनंतरचा मऊ भात..आणि मेतकूट !… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित☆

आज चिवडा करू…. उद्या लाडू…. असं म्हणत दिवाळीआधीच फराळाचं वेळापत्रक बनतं खरं… पण ते सोयीनुसार बदलतही राहतं.  म्हणजे असं, दाणे भाजून झाले नाहीत म्हणून आजचा चिवडा उद्यावर ढकलला जातो आणि भाजणी लवकरच आणली म्हणून परवाची चकली आज होऊनही गेलेली असते. थोडक्यात, हे ‘सवडीचं’ वेळापत्रक असतं… आणि ते सवडीनुसार पाळलं किंवा बदललं जातं!

आता…’आवडीचं’ वेळापत्रक सुरु होतं…. आवडीचे पदार्थ संपण्याचं वेळापत्रक !

सवडीने दिवाळीचा फराळ कोणत्याही क्रमाने बनवला जावो… आवडीने संपण्याचा क्रम आमच्या घरात अगदी निश्चित ठरलेला असतो…. या वेळापत्रकात बदल नाही म्हणजे नाहीच!—-

सर्वात पहिला मान चकलीला ! त्यामुळे, सगळ्यात आधी ती संपलेली असते. “नेहमीपेक्षा जरा जास्तच खुसखुशीत झालीय नै चकली ” असं नेहमीपेक्षा जास्त कौतुक ऐकू आलं की समजावं… चकल्या संपत आल्यात  !

तिच्या पाठोपाठ करंज्या…. !! करतांना सर्वात शेवटी; पण संपताना मात्र या आघाडीवर असतात ! अर्थात, चूक त्यांची नाहीच… चार खाऊन एक आकडा मोजायचा असं ठरवल्यावर दुसरं काय होणार म्हणा..!!

चकल्या आणि करंज्या ही पहिली आघाडी संपल्यानंतरची दुसरी आघाडी बेसन लाडू आणि कडबोळी एकत्रितपणे पार पाडतात. दोनच दिवसात कडबोळ्यांच्या डब्याच्या तळाशी  तेलकट झालेला केविलवाणा टिश्यू पेपर उरलेला असतो आणि बेसन लाडवांच्या डब्यात लाडू वळतांना टोचलेले बेदाणे, दाताखाली खडा आल्यावर जसा बाजूला केला जातो, तशी उपेक्षा झाल्याने निपचित पडून असतात.– थोडक्यात, बिनीचे सर्व शिलेदार गारद झालेले असतात. चिवड्यातले काजू चाणाक्ष नजरांनी टिपलेले असतात. मग शेव-चिवडा, चहा-शंकरपाळे अशा जोड्या, किल्ला काही काळ लढवत ठेवतात.

मानाचे पाच गणपती यात्रेत आपापल्या क्रमाने गेल्यानंतर या आळीचा, त्या गल्लीचा असं करत सगळे सामील होतात तसं .. या क्रमाने फराळाचे मानाचे डबे संपल्यानंतर कुण्या काकूकडचे अनारसे, ताईकडून आलेले चिरोटे वगैरे सर्वांचा यथायोग्य समाचार घेतला जातो…

फराळाची ही भाऊगर्दी कमीच होती की काय !!! म्हणून अगदी ठरवून दिवाळीच्या या चार दिवसात, पहिल्या दिवशी नैवेद्याला बासुंदी, पाडव्याला छोले-भटुरे, घरातच एक वाढदिवस म्हणून गुलाबजाम आणि भाऊबीजेला भाऊ कित्येक दिवसांनी येणार म्हणून सूप, स्टार्टर्स, स्वीट, मेन कोर्स आणि डेझर्ट्स असं फाईव्ह कोर्स डिनर झालेलं असतं — आणि ……. 

हा अस्सा रविवार उजाडतो….अस्सा म्हणजे… आजच्यासारखा !!!

“आज मी फक्त मऊभात करणारे ” अशी घोषणा माझ्याकडून केली जाते… आणि सगळ्यांचे चेहेरे गेल्या चार दिवसांपेक्षा जास्त उजळतात ! 

पदार्थांच्या भाऊगर्दीत त्या गरमगरम मऊभाताला आणि त्यावर घेतलेल्या तूप-मेतकुटाला अमृताची चव येते. अगदी सकाळीच विरजलेलं दही आणि डावीकडचं लोणचं या आजच्या मेन्यूला फाईव्ह कोर्स डिनरच्या फाईव्ह स्टार मेन्यूपेक्षा जास्त स्टार दिले जातात… तळलेल्या पदार्थाचा खमंगपणा, मसालेदार फोडणीचा झणझणीत स्वाद, चीझ-बटर-क्रीमचा श्रीमंती थाट, तुपात तळलेल्या आणि साखरेत घोळलेल्या मिष्टान्नाची गोडी, काचेच्या प्लेट मधून आलेल्या डेझर्टची नजाकत… यातलं काही – काही नसतं त्या मऊभातात….. पण आजच्या दिवशी ‘तोच’ हवा असतो.. ‘ फक्त आणि फक्त तोच ‘ हवा असतो…… आणि हवं असतं त्याच्या साधेपणातलं समाधान….. 

–कित्येक दिवस परदेशातल्या झगमगाटात फिरून परत येतांना आपला देश दिसू लागल्यावर मनात असतं ते समाधान…… 

ब्रँडेड कपड्यांच्या दिखाऊपणानंतर एक जुनाच, पण मऊसूत कुर्ता घातल्यावर मिळतं ते समाधान….. 

पुस्तकांचं कपाट आवरतांना अचानक जुनी कवितांची वही मिळाल्यावर मिळतं ते समाधान….. 

सिल्कच्या गर्भरेशमी साड्यांच्या कपाटात आजीच्या साडीची गोधडी दिसल्यावर मिळतं ते समाधान…. 

महागड्या भेटवस्तूंच्या तळाशी आपल्यासाठी कुणीतरी हाती लिहिलेलं शुभेच्छापत्र सापडतं… त्यावेळचं समाधान…

आणि ……. आणि दिवाळीच्या पंचतारांकित मेजवान्यांनंतर रविवारच्या दुपारच्या मऊभाताचं समाधान……. 

खरं तर समाधान शोधावंच लागत नाही… ते आपल्या जवळपासच असतं !—– 

******

लेखक  . : अज्ञात. 

संग्रहिका : सुश्री स्मिता पंडित . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मोठे व्हाल तसतसे अधिक बोला… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆  मोठे व्हाल तसतसे अधिक बोला… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆

तुम्ही वयानं जसजसे मोठे व्हाल तसतसे अधिक बोला— असे डॉक्टर्स म्हणताहेत.. 

ज्येष्ठ नागरिकांनी अधिक बोलले पाहिजे कारण स्मरणशक्ती कमी होण्यापासून रोखण्याचा कोणताही इतर मार्ग नाही.  अधिक बोलणे हा त्यातल्यात्यात प्रभावी मार्ग आहे. 

ज्येष्ठ नागरिकांनी अधिक बोलण्याचे किमान तीन फायदे आहेत—-

१) बोलण्याने मेंदू सक्रिय होतो आणि सक्रिय राहतो, कारण भाषा आणि विचार एकमेकांशी संवाद साधतात,   विशेषत: पटकन बोलत असताना, ज्यामुळे नैसर्गिकरित्या विचारांचे प्रतिबिंब जलद होते आणि स्मरणशक्ती देखील वाढते. जे ज्येष्ठ नागरिक अबोल असतात, कमी बोलतात, त्यांची स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता जास्त असते.

२) बोलल्याने मनावरचा बराचसा ताण दूर होऊ शकतो, मानसिक आजार टळू शकतात. आपण बरेचदा काही बोलत नाही, पण आपल्या मनात मात्र असतं. अश्यानं आपला भावनिक कोंडमारा होऊ शकतो आणि आपण गुदमरतो. कुणी वयस्कर व्यक्ती बोलत असेल तर बोलू द्या.. 

३) बोलण्याने चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम होतो, घशाचाही व्यायाम होतो आणि फुफ्फुसाची क्षमता देखील वाढते. तसेच डोळे आणि कान खराब होण्याचा धोका, चक्कर वगैरे येण्यासारखे सुप्त धोकेही कमी होतात. 

थोडक्यात, ज्येष्ठ नागरिक – सेवानिवृत्त व्यक्तींना अल्झायमरसारख्या विकारांपासून स्वतःचा बचाव करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे बोलणे – शक्य तितके बोलणे, इतरांशी संवाद साधणे.

म्हणून, आपण सारे अधिक बोलूया आणि इतर ज्येष्ठांनाही नातेवाईक अन  मित्रमंडळीसोबत अधिक बोलण्यास प्रवृत्त करूया…

संग्राहक : सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ४२ – सर्वधर्म परिषदेची तयारी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ४२ – सर्वधर्म परिषदेची तयारी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

संपूर्ण भारत भ्रमण करताना स्वामी विवेकानंद यांनी सत्ताधीशांपासून अगदी गरीब माणसापर्यंतचा भारत उघड्या डोळ्यांनी पाहिला. कान उघडे ठेऊन, त्यासर्वांशी त्यांच्या पातळीवरून संवाद साधला. हे सर्व अनुभव यायला वराहनगर मठ सोडून तीन साडेतीन वर्षाचा काळ मध्ये गेला होता. उघड्या आकाशाखाली आणि भव्य समुद्राने घेरलेल्या शिला खंडावर तीन दिवस तीन रात्री राहून चौथ्या दिवशी सकाळी नावेतून काही लोकांबरोबर स्वामीजी किनार्‍यावर परत आले. त्यांच्या भोवती गोळा झालेल्या लोकांनी त्यांना विचारलं, “तीन दिवस आपण त्या खडकावर कशासाठी ध्यानस्थ बसला होता? स्वामीजींनी त्यांना, आपण श्रीरामकृष्ण यांचे शिष्य आहोत हे सांगून, “गेली दोन अडीच वर्षे देशभर फिरत होतो, माझं मनही अनेक विषयांचा विचार करीत होतं. ज्या प्रश्नाचा शोध या सार्‍या भ्रमंतीत मी घेत होतो, त्याचं उत्तर मला त्या खडकावर मिळालं”. हे सांगितलं. स्वामीजींच्या जीवनातली ही सर्वात मोठी घटना होती. आज कन्याकुमारीच्या समुद्रातल्या त्या शिलाखंडाहून चिंतन करून उठलेले स्वामीजी आणि कलकत्त्याहून बाहेर पडलेले स्वामीजी ही दोन रूपं वेगळी होती. हे आतापर्यंतच्या प्रसंगावरून आपल्याला जाणवतेच.

अध्यात्माबरोबरच त्यांच्यातल्या देशभक्तीचा विचार भ्रमण काळात पक्का होत गेला. खरं तर भारत देश पारतंत्र्यात होता, अन्याय अत्याचारांचा सामना करत होता. त्यासाठी अनेक चळवळी सुरू होत्या. पण स्वामीजींच्या मते ही अवस्था तात्पुरती असून आज ना उद्या संपेलच. पण, सर्वसामान्य जनतेची झालेली आजपर्यंतची उपेक्षा थांबवणं हे जास्त महत्वाचं वाटत होतं. त्यांच्या दृष्टीने इंग्रजी सत्ता हे याचं कारण नव्हतं. या उपेक्षेला त्यांच्या दृष्टीने समाजच जबाबदार होता.

बेळगावच्या भेटीपासून त्यांचा रामेश्वर इथं जायचा विचार होता तो त्यांनी वेळोवेळी सांगितला होता. कन्याकुमारीहून ते रामेश्वर इथं जाऊन भगवान शिवाचं दर्शन घेऊन मनाशी केलेला संकल्प पूर्ण केला. तिथून ते पॉन्डिचरीला गेले. तिथे मन्मथनाथ भट्टाचार्य कामानिमित्त आलेले होते. त्यांच्याकडे स्वामीजी थांबले. त्यानंतर काम आटोपून दोघेही मद्रासला परतले, त्यांना घ्यायला मद्रास स्टेशनवर अलसिंगा पेरूमाल आणि त्यांचे मित्र आणि मन्मथनाथांच्या ओळखीचे  काही उच्चशिक्षित स्वागतासाठी हजर होते. दीड महिना स्वामीजी मद्रासला राहिले पण हे वास्तव्य त्यांना भविष्यातल्या कार्यारंभासाठी खूप महत्वाचे ठरले. त्यांना ह्या कामाला मदत करणारी माणसे प्रथम मद्रासलाच मिळाली. ती झोकून देऊन काम करणारी होती.

मद्रासला अनेक ठिकाणी त्यांची व्याख्याने होत होती, भेटी होत होत्या. श्रोत्यांवर त्याचा प्रभाव पडून तरुण वर्ग आकर्षित होत होता. प्रौढ आणि उच्च शिक्षित वर्ग ही आकृष्ट होत होता. तिथल्या एका साप्ताहिकात स्वामीजीन बद्दल लिहून आले. अशी प्रसिद्धी पहिल्यांदाच त्यांना मिळाली होती. एका ठिकाणी त्यांची प्रकट मुलाखत झाली त्यात तर त्यांना, वैदिक धर्माचे स्वरूप, हिंदुधर्मानुसार आदर्श मानवी जीवन, स्त्रीशिक्षण, श्राद्धासारखे धार्मिक विधी, यावरही प्रश्न विचारले लोकांनी. त्यांच्या कडून ऐकलेल्या विचारांच्या प्रकाशात पुढचे आयुष्य चालत राहण्याची जिद्द असणारे तरुण स्वामीजींना मद्रासला भेटले. त्यांना इथे अनुयायी मिळाले. केलेला संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठीचे पहिले पाऊल मद्रासला पडले होते. त्याला निमित्त झाले होते मन्मथबाबू भट्टाचार्य आणि आलसिंगा पेरूमाल. मंडम चक्रवर्ती आळसिंगा पेरूमाल हे त्यांचं नाव .

म्हैसूरचे असलेले आलसिंगा पेरूमाल मद्रासला एका शाळेचे मुख्याध्यापक होते. वेदांताचे अनुयायी आणि कट्टर वैष्णवपंथी. गरीबी असली तरी ध्येयवादा मध्ये ती आली नाही. त्यांनी मुख्याध्यापक असूनसुद्धा स्वामीजींना अमेरिकेत जाता यावे म्हणून दारोदार फिरून पंचवीस पैशांपासून सामान्य लोकांकडून वर्गणी गोळा केली होती, आयुष्यात काहीतरी करावे असे त्यांना वाटत होते, ते स्वामीजींची भेट झाल्यावर त्याला दिशा मिळाली होती. अलसिंगांनी घेतलेल्या कष्टामुळे स्वामीजी अमेरिकेत जाऊ शकले.

स्वामीजींचा मद्रासला असा मोठा जनसंपर्क झाला होता. ही ख्याती हैदराबादला जाऊन पोहोचली होती. आणि स्वामीजींनी हैदराबादला भेट द्यावी असे एक पत्र आल्याने स्वामीजींनी ते निमंत्रण स्वीकारलं. कमी वेळात इतकी सूत्र हलली, की हैदराबाद स्टेशन वर स्वामीजींना घ्यायला पाचशे माणसे आली होती. दुसर्‍या दिवशी सिकंद्राबादहून शंभर जण भेटायला आली आणि “आमच्या कॉलेज मध्ये एक प्रकट व्याख्यान द्यावे” असा आग्रह केला. विषय होता, ‘पाश्चात्य देशात जाण्यातील माझा उद्देश’. या व्याख्यानाला हजार श्रोते उपस्थित होते. स्वामीजींच्या विवेचनात उदात्तता होती, तात्विक चिंतन होते, देशप्रेम होते, आपल्या मातृभूमीचं पुनरुत्थान आणि वेदवेदांन्तातील उत्कृष्ट तत्वे पाश्चात्य जगासमोर ठेवावीत अशी एक भारतीय धर्मप्रवक्ता म्हणून अमेरिकेला जाण्याची आपली भूमिका आहे, असे या व्याख्यानात स्वामीजींनी सांगितले. इथे दहा बारा दिवस ते राहिले. नुकतीच ते वयाची तिशी पूर्ण करत होते. हैद्राबादला पण सार्वजनिक व्यासपीठावर ते पहिल्यांदाच बोलले होते. सर्वा क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी त्यांना आदराची वागणूक दिली. त्यांच्या विचारांचे स्वागत केले. ते पुन्हा मद्रासला परतले.

अमेरिकेला जाण्याच्या संकल्पाला अजून श्री रामकृष्णांचा आदेश मिळत नव्हता, तोपर्यंत त्यांचे निश्चित होत नव्हते. त्यातच एक घटना घडली. त्यांना एकदा रात्री स्वप्न पडलं की आपल्या आईचं निधन झालं. त्यांना आईबद्दल खूप आदर आणि प्रेम होतं. पण घरदार सोडून आल्यामुळे आणि प्रपंचाच्या गोष्टीत अडकू नये म्हणून ते संपर्क ठेवत नसत. पत्रही पाठवत नसत. मन दोलायमान झाले, कलकत्त्याहून काहीतरी कळणे आवश्यक होते. हे त्यांनी मन्मथबाबूंना सांगितलं. मन्मथबाबूंनी मनाचे समाधान व्हावे म्हणून स्वामीजींना एका भविष्य सांगणार्‍या व्यक्तीकडे नेले. त्या सिद्ध माणसाने स्वामीजीची पूर्ण माहिती सांगीतली, धर्मोपदेशाच्या कामासाठी तुम्ही लवकरच कुठेतरी दूरदेशी जाल, तुमच्या बरोबर सतत तुमचे गुरु असतील आणि आई बद्दल विचारले आई कुशल आहे हे ही सांगीतले आणि स्वामीजींचा जीव भांड्यात पडला. मन हलक झालं. थोड्याच वेळात कलकत्त्याहून तार आली, भुवनेश्वरीदेवी कुशल आहेत. मनाचा वारू कसा धावत असतो. संवेदनशील मनात किती आणि कसे विचार येत असतात. त्याचा परिणाम कसा होतो हे स्वामीजींच्या या घटनेवरून दिसतो. हा एव्हढा उद्योग ते देशातील लोकांसाठी करत होते पण आई, जन्मदात्री माता, तिचं स्थान हृदयामध्ये कायम असतं. तिचा विसर जराही पडला नव्हता. हीच ती भारतीय मूल्यं. आज याची पण शिकवण गरजेची आहे.    

आता मन निश्चिंत झालं होतं. दूर जायचे तर गुरुमाता श्री सारदादेवींचा आशीर्वाद घेणं पण आवश्यक होतं. माताजींना पत्र लिहून आशीर्वाद मागितला. अमेरिकेला जाण्याचा संकल्प कळवला. त्यांनी आशीर्वादाचे पत्र पाठवले. हे पत्र मिळाले आणि स्वामीजीचे मन हर्षभरीत झाले. डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. कोणाला कळू नये म्हणून स्वामीजी समुद्रावर एकटेच गेले आणि मन शांत झाल्यावर परत आले. तोवर सर्व भक्तगण जमा झाले होते. “माताजींनी आशीर्वाद दिला आहे, आता कोणतीही अडचण नाही. निर्णय ठरला. मी सर्वधर्म परिषदेला अमेरिकेस जाणार”हे जाहीर केले. अनुयायी तर खूप खुश झाले. निधि संकलन कामाला जोरात सुरुवात झाली. आता एकदम दिशाच बदलून गेली. उत्साहाचे वातावरण तयार झाले. पैसे गोळा करण्याचा प्रयत्न अलसिंगा यांच्या पुढाकाराने जोरदार सुरू झाला.

एक दिवस अचानक खेतडीचे महाराज राजा अजितसिंग आणि त्यांचे सचिव जगमोहनलाल स्वामीजींना भेटायला दत्त म्हणून हजर.अजितसिंग यांना मुलगा झाला होता आणि त्याप्रीत्यर्थ त्यांनी एक समारंभ ठेवला होता. त्यासाठी स्वामीजींना आमंत्रण द्यायला स्वत: आले होते.पण आपण ३१ मेला अमेरिकेला जाण्याच्या गडबडीत आहोत त्यामुळे शक्य नाही होणार असे स्वामीजींनी सांगीतले,  जगमोहनलाल यांनी आपण एक दिवस तरी यावे असा आग्रह केला आणि आपण पश्चिमेकडे जाणार आहात हे महाराजांना खूप आवडले आहे . जो काही पैसा लागेल तो महाराज व्यवस्था करतील, आपण फक्त चलावे असे म्हटले.

आतपर्यंत म्हैसूर बंगलोर, हैद्राबाद इथून काही पैसे गोळा झाले होते.म्हैसूरच्या राजांनी पण मोठी रक्कम दिली. स्वामीजींचा खेतडीला जाण्याचं बेत ठरला आता पैसे गोळा करण्याचे प्रयत्न कराची आवश्यकता नव्हती. अलसिंगा आनंदित झाले, स्वामीजींची आर्थिक सोय पूर्ण होणार होती. स्वामीजी सर्वांचा निरोप घेऊन जगमोहनलाल यांच्या बरोबर खेतडीला निघाले. मुंबईहून जहाजाने अमेरिकेला निघण्याचे आधीच ठरले होते. त्यासाठी मुंबईत काही तयारीसाठी स्वामीजी थांबले. तिथे ब्रम्हानंद, तुरीयानंद यांची भेट झाली.स्वामीजींच्या जाण्याची बातमी सगळीकडे पोहोचली.

स्वामीजी खेतडीला समारंभाला पोहोचले. समारंभ थाटामाटात पार पडला. स्वामीजींनी नव्या युवराजांना  आशीर्वाद दिले. या मुक्कामात आणि याआधीही स्वामीजींच्या महाराजांशी घरगुती गप्पा पण व्हायच्या. श्रीरामकृष्ण यांची समाधी घरदारचे पाश तोडून बाहेर पडणे हा इतिहास महाराजांना माहिती होतं. संन्यास घेतला तरी मनाच्या कोपर्‍यात भावंडांची काळजी, आईची मनाची चिंता आणि त्यांचे कसे चालले आहे याचं शल्य त्यांना बोचत होतं हे महाराजांना माहिती होतं. बोलता बोलता मद्रासला आताच पडलेल स्वप्न कदाचित महाराजांना स्वामीजींनी संगितले असेल, महाराज अजितसिंग यांचं मनही द्रवलं. स्वामीजींचे मन किती पोळत असेल या विचारांनी असं अजितसिंग यांच्याही मनात आलं. त्यांनी स्वामीजींना आश्वस्त केलं, “मी तुमच्या मातोश्रींना दरमहा शंभर रुपये पाठवत जाईन. आपण ही चिंता मनातून काढून टाका”. हे उत्स्फूर्त बोलणे ऐकून क्षणभर स्वामीजी आनंदित झाले. नरेंद्रने घर सोडल्यावर सात वर्षानी ही अडचण दूर होणार होती.तेही अजितसिंग यांच्या औदार्यामुळे. पुढे स्वामीजींनी त्यांना पत्र पाठवून म्हटले आहे की, ‘मी जो काही आज या जगत आहे तो तुम्ही केलेल्या सहाय्यामुळे आहे. एका घोर चिंतेतून मुक्त होणं हे मला तुमच्यामुळे शक्य झाले. त्यामुळे मी जगाला सामोरे जाऊ शकलो’. ही मदत अजितसिंग यांच्याकडून १९०१ पर्यन्त त्यांचे निधन होईपर्यंत शंभर रुपये दरमहा मिळत होते. त्यामुळे स्वामीजींची खेतडीची ही भेट महत्वाचीच ठरली होती. 

स्वामीजींची सर्व व्यवस्था करण्यासाठी महाराजांनी जगमोहनलाला यांना त्यांच्या बरोबर मुंबईला पाठवले होते. अमेरिकेला जाताना, अंगावर गुढग्यापर्यन्त पोहोचणारा रेशमी झुळझुळीत भगव्या रंगाचा झगा, कमरेभोवती गुंडाळलेला तशाच रंगाच्या कापडाचा आडवा पट्टा, आणि मस्तकावर केशरी रंगाचा फेटा, हा विवेकानंदांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाला शोभून दिसणारा वेष, ही राजा अजितसिंग यांनी दिलेली एक राजेशाही देणगी होती आणि विविदिशानंद चे स्वामी विवेकानंद हे नाव सुद्धा खेतडीच्या अजितसिंगानीच अमेरिकेला जाताना बदलायला लावले होतं.  

मुंबईला मद्रासहून अलसिंगा आले होते, मुंबईला जगमोहनलाल यांनी बाजारात नेऊन स्वामीजींना झगा आणि फेटा यासाठी उत्तम भारीपैकी रेशमी कापड घेतले ,तसेच तुम्ही महाराजांचे गुरु आहात महाराजांना शोभेल अशा राजेशाही थाटात तुमचा प्रवास झाला पाहिजे.म्हणून जहाजाचे आधीचे दुसर्‍या वर्गाचे तिकीट बदलून त्यांनी पहिल्या वर्गाचे तिकीट काढून दिले. आपल्या गुरुच्या व्यवस्थेत काहीही कमी पडू दिले नाही महाराजांनी .

३१ मे या दिवशी विवेकानंद यांनी मुंबई सोडली.पी अँड ओ कंपनीच्या पेनिन्शूलर जहाजातून ते जाणार होते. थेट जहाजपर्यंत सोडायला अलसिंगा आणि जगमोहनलाल गेले होते. भोंगा वाजला, दोघांनी स्वामीजींना साष्टांग नमस्कार केला. दोघांच्याही डोळ्यात आसवं तरळली. स्वामीजी अखेर अमेरिकेला निघाले हे पाहून अलसिंगांना आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान झाले. जहाजाने किनारा सोडला. विवेकानंदांच्या जीवनातला एक महत्वाचा टप्पा मागे पडला होता आणि जीवनाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली होती.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आहोत आम्ही पुण्यवान … लेखिका- सुश्री मृदुला बर्वे आणि डाॅ.अपर्णा कल्याणी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ आहोत आम्ही पुण्यवान … लेखिका- सुश्री मृदुला बर्वे आणि डाॅ.अपर्णा कल्याणी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

एका बातमीवर नजर पडली – आपल्या सर्वांच्याच आवडत्या – the most famous – Switzerland – स्वित्झर्लंड मध्ये आत्महत्येला सहाय्य करणारे – suicide pods बनवले गेले आहेत आणि त्या पॉडमध्ये जाऊन आत्महत्या करण्यासाठी म्हणे “waiting list” आहे. ज्या वेस्टर्न जगाची, तिथल्या राहणीमानाची भूल पाडून आपल्याला आपल्या धर्मापासून दूर केले गेले, तिथे ही अवस्था?आत्महत्या करायला रांग? आणि कुपन्स? आपसूक उद्गार निघाले – मी भारतात जन्मले, हो आहेच मी भाग्यवान ! In this land, every birth and every death counts! 

त्याच आठवड्यात एका लग्नाच्या मीटिंगसाठी ओपंडित (म्हणजे ओव्हर्सिज भटजी/पंडित) कडून गेले होते. मुलगी मराठी आणि मुलगा अमेरिकन. लग्न विधी समजावून सांगताना त्याला मी विचारले – तुझे पालक? म्हणतो – “ I have no idea, I haven’t spoken with my parents for 12 odd years :O” 

मी त्याला विचारले – “ don’t you feel lonely? “  त्याने प्रामाणिकपणे उत्तर दिले – “  I do… I miss them. Then I drink and then I am okay. I want to change this and hence I decided to get married to an Indian woman. I envy you guys…”  मी कसंनुसं जराशी हसले – मनात तेच शब्द, तेच वाक्य – ‘ होय, होय आहोतच आम्ही भाग्यवान, पुण्यवान…’

न मागता मिळालेले सुख म्हणजे भारतात जन्म ! त्यातही हिंदू कुटुंबात जन्म ! त्यातही धार्मिक, भगवंतावर विश्वास असणाऱ्या कुटुंबात जन्म !

“सर्वेपि सुखिन: सन्तु |” अशी मागणी करणारा आपला धर्म ! —

“Hindus seek out life, not destroy it. Hindus are the only people who have never invaded any land. We live in perfect harmony with nature.”

आपले अकरावे इंद्रिय – मन. हे मन जे आपल्या सर्व आयुष्याला आकार देते, त्यावर सर्वात जास्त संस्कार करणारी संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती आणि हिंदु धर्म.

” मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव|” – ह्या मूल्यांवर आधारित आपली संस्कृती व धर्म !

प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जर कुठली संस्कृती देऊ शकते तर ती आहे ‘ वैदिक सनातन आर्य हिंदु संस्कृती!’

‘ जीवन तर धन्य कराच पण मृत्यूही धन्य करा,’ अशी शिकवण देणारी आपली संस्कृती!

प्रत्येक प्रदेशात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक पंथात – मनाला बळकटी देणारे अध्यात्मिक ज्ञान, संत वाङ्मय, उपासना – म्हणजे भारत देश !

” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ” – असे सांगणारे स्वामी समर्थ…

” समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे?”, किंवा “आम्ही काय कोणाचे खातो तो राम आम्हाला देतो “- असे मनोबल वाढवणारे समर्थ रामदास स्वामी…

” शिवछत्रपती राजा महाराष्ट्राचा, अवतार महादेवाचा ” – हिंदु साम्राज्य प्रस्थापित करणारे राजे… 

—अगणित उदाहरणे, अगणित संदेश, पण उद्देश्य एकच –- “ बाबारे, ८४  लाख योनिंमधून प्रवास करून मिळालेला मनुष्य जन्म धन्य कर—- तू कुठल्याही वर्णात असशील, तू कुठल्याही आश्रमात असशील, तू श्रीमंत असशील, गरीब असशील, तू आंधळा असशील, पांगळा असशील, तरी हा मनुष्य जन्म धन्य कर. अध्यात्मिक व पारमार्थिक प्रगती कर !”— अशी शिकवण देणारी आपली संस्कृती, अशा भारत देशात आम्ही जन्मलो… एक अख्खा जन्म कमी पडेल एवढे ज्ञान ह्या भूमीने आम्हाला दिले…

होय ! आहोतच आम्ही पुण्यवान, आहोतच आम्ही भाग्यवान ! 

 – सुश्री मृदुला बर्वे. 

(डॉ.अपर्णाताई कल्याणी यांच्या FB Wall वरुन साभार) 

https://www.facebook.com/aparna.kalyani.58

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares