मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हीच शुभेच्छा… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ हीच शुभेच्छा… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

बाहेर दिवाळीची धामधूम सुरु असताना  वेटिंग रूम मध्ये बसून ICU मध्ये ऍडमिट असलेल्या नातेवाईकांच्या टेन्शनमध्ये जे कोणी बसलेत, त्यांचा नातेवाईक लवकर पूर्ण बरा होऊन घरी सुखरूप यावा ही शुभेच्छा….!

फटाक्यांच्या दुकानातली गर्दी  पाहूनही जे बालगोपाळ आपल्या बाबांच्या बजेटमुळे मनसोक्त खरेदी करू शकत नाहीत त्यांना भरपूर फटाके खरेदी करता यावेत ही शुभेच्छा…..!

शेजारणीच्या घरचा भरगच्च दिवाळी फराळ नुसता पाहून घरी परत आलेल्या गरीब गृहिणीला मनासारख्या लाडू, करंज्या, चिवडा करून आपल्या कुटुंबाला तृप्त करता यावं ही शुभेच्छा…..!

काचेमागच्या मिठाईला नुसता डोळ्यांनी स्पर्श करून सुखवणाऱ्या गरीब डोळ्यांना आता चवीचं सुखही जिभेला मिळावं ही शुभेच्छा…..!

बायकोला एखादा सोन्याचा दागिना करावा ही अनेकांची अनेक वर्षाची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण व्हावी ही शुभेच्छा…..!

गेली दोन वर्ष एकही नवा ड्रेस न शिवलेल्यांना यंदा मनासारखा ड्रेस शिवता यावा ही शुभेच्छा…..!

आपल्या खिशाला कात्री लावून आपल्या कुटुंबाची आनंदाची दिवाळी साजरी व्हावी यासाठी स्वतःकरता काही न घेता मन मारुन दिवाळी  साजरी करतात अशा वडलांना मन न मारून दिवाळी साजरी करता  यावी त्याबद्दल शुभेच्छा..!

सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊ दे आई जगदंबे—-  हीच इच्छा…

संग्राहक –  श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ काव्य भास्कर ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ काव्य भास्कर ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

वाचनाचे विविध फायदे आहेत. ह्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती होऊन ज्ञानात भर पडते. वाचनामुळे वाडःमय, साहित्य अशा नानाविध प्रकारांची गोडी लागून एक प्रकारची समृद्धी येते. आणि ही लाभलेली श्रीमंती वा लाभलेलं समाधान पण काही ओरच असतं बरं का.

वाचनाच्या साहित्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत.त्यापैकी कमी शब्दांत उच्च कोटीच्या भावना जागवणारं माध्यम म्हणजे काव्य , कविता. कविता करतांना आपल्या मनातील वा आपल्याला अपेक्षित असणारा संपूर्ण आशय हा अगदी मोजक्या शब्दांत रसिकांपर्यंत पोहोचवायचा असतो.ही कामगिरी खरोखरीच कसोटीची बरं.त्यामुळे गीत रचयितांना,कविंना मानाचा मुजरा.

आपल्याकडे एकसे बढकर एक काव्य रचयिते होऊन गेलेत आणि सध्या सुद्धा आहेत. ह्या होऊन गेलेल्या कविंमध्ये एक अजरामर नाव म्हणजे भा.रा.तांबे ह्यांचं. तिन्ही सांजा सखे मिळाल्या’, ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’, ‘कशी काळनागिणी, सखे ग, वैरीण झाली नदी’, ‘कळा ज्या लागल्या जिवा’, ‘मावळत्या दिनकरा’, ‘जन पळभर म्हणतील’ यांसारखी एकाहून एक सुमधुर भावगीतं रचून मराठी काव्य समृद्ध आणि श्रीमंत करणारे राजकवी भा. रा. तांबे यांचा २७ ऑक्टोबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने हा आठवणींचा कप्पा परत एकदा उलगडतोयं.

खरतरं काव्य करणारे हातं,मनं,डोळे हे सरसकट  फक्त आणि फक्त भावनिक क्षेत्रात आढळतात. पण ही समजूत कशी चूकीची आहे हेच जणू ह्या राजकवींनी सिद्ध केलयं. ह्यांची कामकाजाची ठिकाणं आणि हुद्दे म्हणजे हे  संस्थानी वकील, दिवाण, न्यायाधीश, सुपरिटेंडंट अशा रुक्ष नोकऱ्या करीत होते आणि ह्या रूक्ष क्षेत्रात एकीकडे कार्यरत राहून एकीकडे मात्र स्वत्ःमधील कोवळं मनं,कविमनं ह्यांनी निगुतीने जपलं.आणि एकाहून एक सरस अशा गोड कविता आणि गाणी ह्यांनी सहजतेने रचल्यात. त्यांनी एकीकडे ‘पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, वारा नेई सोने वाटे वाहुनिया दूर’ ह्यासारखी  निसर्गकविता, ‘तुझ्या गळा माझ्या गळा’सारखं बहीणभावाचं खेळीमेळीचं नातं वर्णन करणारं गीत, ‘या बालांनो सारे या, लवकर भरभर सारे या’सारखी बालकविता आणि त्याच सहजतेने ‘डोळे हे जुल्मी गडे रोखून मज पाहू नका’ अशी एका प्रेयसीची लोभस विनवणीही त्यांचीच देणं. ‘नववधू प्रिया मी बावरते’ अशी नवपरिणित तरुणीची घालमेलही ते एकीकडे मांडतात आणि दुसरीकडे ‘जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय?’सारखं जीवनातलं कटू सत्य सांगणारं गीतसुद्धा लिहून जातात.

भा.रा.तांबे यांनी १९२६ सालच्या मध्य भारतीय कविसंमेलनाचं आणि १९३२ सालच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या कविसंमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. प्रणयप्रभा, तांबे यांची समग्र कविता अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सात डिसेंबर १९४१ रोजी ग्वाल्हेरमध्ये त्यांचं निधन झालं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझ्या नजरेतून बदलती दुबई – भाग – १ ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ माझ्या नजरेतून बदलती दुबई – भाग – १ ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

दुबईसंबंधी लिहिताना मला काही त्या देशाचा राजकीय, ऐतिहासिक किंवा सामाजिक विषय डोळ्यासमोर नाहीये, पण गेल्या दहा बारा वर्षात मी जशी बदलत गेलेली दुबई बघितली आहे, त्यासंबंधी थोडक्यात लिहावसं वाटतंय !

२००६ मध्ये माझ्या जावयांनी जेव्हा दुबईमध्ये एमिराईट्स एअरवेज जॉईन करायचे ठरवले तेव्हा ‘अरेच्चा, दुबई?’ अशी प्रश्नचिन्हांकित झाले होते मी ! कारण तोपर्यंत बरेच तरुण शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी अमेरिका, इंग्लंड, युरोप किंवा फार तर ऑस्ट्रेलियात जातात हेच माहिती ! पण अमेरिका, सिंगापूर खालोखाल ‘ एमिराईट्स एअरवेज’ अतिशय चांगली एअरवेज कंपनी आहे हे तेव्हा मला कळलं, आणि लगेचच त्यानंतर २००७ मध्ये आमची पहिली दुबई ट्रिप झाली !

तेव्हाचे दुबईचे वर्णन ‘दुबई मुंबई सारखीच आहे’ इतपतच माहीत होते. पण दुबईच्या एअरपोर्टवर प्रथम उतरल्यावर मनाला भावले ते येथील स्वच्छ, मोठे रस्ते आणि जागोजागी दिसणारे फुलांचे ताटवे, कारंजी ! इथे पाणी नाही अशी एक कल्पना होती, पण इथे तर पाण्याचा काहीच दुष्काळ नव्हता ! माझी मुलगी रहात होती तो ‘बर् दुबई’ भाग मुंबईसारखाच मध्यम उंचीच्या इमारतीने भरलेला असा होता. पहिल्या फेरीतच आम्ही दुबईचे मंदिर आणि म्युझियम पाहिले. दुबईमध्ये फिरताना लक्षात आले की  दुबईमध्ये शीख, गुजराथी, उत्तर प्रदेशी, तमिळ आणि केरळ या भागातील लोकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. म्युझियममध्ये दुबईचा इतिहास कळला. साधारणपणे १९७० सालानंतर दुबई पृथ्वीच्या गोलावर ठळकपणे दिसू लागले. प्रथम टोळ्याटोळ्यांनी राहणाऱ्या लोकांनी कुवेत, शारजा, अबुधाबी, सौदी अशी छोटी छोटी मुस्लिम राज्य निर्माण केली ! तसेच हे दुबई ! दुबई,अबुधाबी,शारजा,अजमान,फुजेराह,रस् अल् खैमा,उमल् क्वेन, असे संयुक्त अमिरातीचे सात भाग आहेत. 

खाडी किनाऱ्यावर फिरल्यावर असे लक्षात आले की इथला व्यापार मोठ्या जहाजामार्फत चालत असे. मोती, मासे आणि मुख्य म्हणजे सोन्याची मुक्त बाजारपेठ यामुळे दुबई हे मोक्याचे ठिकाण होते. अनेक कन्स्ट्रक्शन कंपन्या येत असल्याने इंजिनियर्स आणि वर्कर्स दोन्हींचे येणे वाढले होते.

दुबईमध्ये पाणी मुबलक होते. लाईट कधी जात नसत. इन्फ्रास्ट्रक्चर चांगले होते आणि शिस्तबद्ध, सर्व सुख सोयींनी युक्त असे तेथील जीवन होते. अमेरिकेसारख्याच सुखसोई! पण येथे सर्वात विशेष काय होते तर कामाला, स्वयंपाकाला माणसे मिळत असत ! ते सौख्य अमेरिकेत महाग असते !

२००७ ते २०१० ही  तीन वर्षे आम्ही दुबईमध्ये दरवर्षी येत होतो, कारण माझा नातू तेव्हा लहान होता. मुलीचा जॉब होता, घरी कामाची बाई होती, तरीही घरचं माणूस आवश्यक वाटत असे.

त्यावेळी ‘ बुर्ज अल् अरब ‘ ही मोठ्या जहाजाच्या आकाराची बिल्डिंग समुद्रातच नव्याने बांधलेली होती. ती आम्हाला अर्थातच खूप आकर्षक वाटली. एस्केलेटर्स,मोठमोठे मॉल फिरताना खूप मजा वाटत होती.

२००८ च्या मुक्कामात मेट्रोचे काम जोरात चालू होते.९-९-२००९– मेट्रो चालू करण्याचा संकल्प खरोखरच त्यावर्षी पूर्ण झाला ! डिसेंबर ते फेब्रुवारी दुबई शॉपिंग फेस्टिवल असे. बऱ्याच जवळच्या देशातील लोक फिरायला, खरेदी करायला येथे येत असतात. त्या काळात रात्री साडेआठ वाजता क्रिकवर फायर फेस्टिवल होई. दिवाळीप्रमाणे तऱ्हेतऱ्हेचे, रंग रूपाचे फटाके साधारणपणे दोन तीन मिनिटं सलगपणे उडवले जात. त्यांचे रंग आणि पाण्यात पडणारे प्रतिबिंब दोन्हीही विलोभनीय दिसत असे !

तिथे असणाऱ्या काही मराठी कुटुंबांबरोबर मैत्री झाल्यामुळे आम्ही सर्वजण मिळून  ‘अलेन’ची ट्रीप केली. तेथील झू फारच प्रेक्षणीय होते. वाघ,सिंह,जिराफ,यासारखे प्राणीही, वाळवंटी प्रदेशात असूनही खूपच चांगले राखले होते.जबेल हफित अलेन मधील एक उंच डोंगर ! खूप उंच नव्हता, पण सपाट पसरलेल्या वाळवंटात तो  जास्त उंच वाटत होता.   एक दिवस ‘ गोल्ड सुक् ‘ पहायला गेलो. ते पहाणे म्हणजे डोळ्यांना सुख देणे असे वाटले !– तुळशीबागेसारखा मोठा बाजार ! दुतर्फा सोन्याने भरलेली दुकाने, सोन्याच्या माळा, मोठमोठे दागिने, आणि दारात उभे राहून बोलावणारे दुकानदार लोक! बघूनच डोळे तृप्त झाले. एवढे सोने तिथे दिसत होते पण आपल्या खिशातले पैसे तिथले काय खरेदी करू शकणार या विचारानेच आम्ही दृष्टी सुख घेऊन परत आलो. तिथून जवळच खास मसाल्याचा (स्पाइस सुक्) बाजार होता. तिथे मात्र लवंग, दालचिनी, मिरे, तमालपत्र  यासारख्या पदार्थांचे ढीग लागलेले होते. तसेच केशरही बऱ्यापैकी स्वस्त होते. आम्ही या पदार्थांची थोडीफार खरेदी केली.

— भाग पहिला 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मिसाईल वुमन”— “टेसी थॉमस”… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ “मिसाईल वुमन”— “टेसी थॉमस”… ☆  प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर 

दिसायला अगदी साध्या वाटत असल्या तरी या कुणी सामान्य गृहिणी नाहीत. अफाट आणि अचाट कर्तृत्व असलेल्या ह्या महिलेचे नाव आहे टेसी थॉमस– एक असे नाव जे बऱ्याच जणांनी बहुतेक ऐकले नसणार. 

डॉक्टर अब्दुल जे कलामना आपण ” मिसाईलमॅन ” म्हणून ओळखतो. तर आपल्या देशातील हजारो शास्त्रज्ञ टेसी थॉमसना ” मिसाईल वुमन ” म्हणून ओळखतात. टेसी थॉमस ” भारतीय अंतराळ संशोधन संस्थे ” ( इस्रो ) च्या अधिपत्याखालील डिफेन्स रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनायजेशनमध्ये कार्यरत आहेत. आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या बळावर तब्बल दोन हजार शास्त्रज्ञांच्या प्रमुखपदी असलेल्या त्या देशातील एक महान शास्त्रज्ञ, ज्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात देशाने ” अग्नी ” क्षेपणास्त्राचा पल्ला चार हजार ते पाच हजार किलोमीटर इतका गाठून देशाच्या शत्रूंच्या हृदयात धडकी भरवली आणि देश अधिक सुरक्षित करण्यात मोलाचा वाटा उचलला. टेसी थॉमस यांच्या त्या अफाट कर्तुत्वाला त्रिवार सलाम !

केरळमधे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या टेसीचे नाव टेसी पडले ते मदर तेरेसा यांना आदर्श मानणाऱ्या तिच्या आई वडिलांमुळे. लहानपणापासूनच जवळून अवकाशात झेप घेणाऱ्या क्षेपणास्त्राना, उपग्रहांना पाहून तिला त्या क्षेत्राविषयी कुतूहलमिश्रित ओढ लागून राहिली होती. अभ्यासात हुशार असल्यामुळे आयपीएस अधिकारी व्हायचं तिचं स्वप्न होतं. पण ती वळली अंतराळ संशोधन संस्थेकडे. पुण्यामधे राहून तिने एम.टेकची पदवी घेतली. तिच्यातील अफाट बुद्धिमत्ता हेरून डॉक्टर अब्दुल जे. कलाम यांनी तिचा समावेश अग्नी क्षेपणास्त्र प्रोजेक्टमधे केला. आणि स्वतःच्या अफाट बुद्धीमत्तेच्या बळावर त्या तडक अग्नी क्षेपणास्त्र ५ च्या प्रोजेक्ट डायरेक्टर पदावर जाऊन पोहोचल्या. तेव्हा त्यांनी एक इतिहासच घडवला. तेव्हापासून त्यांची ओळख ” अग्निपुत्री ” म्हणूनही झाली.

आज ४९ वर्षे वय असलेल्या टेसी थॉमस एक आदर्श गृहिणीही आहेत. करिअर आणि संसार अशी कसरत त्यांनाही रोजच करावी लागते. २४ तासामधे कोणत्याही क्षणी कामावर हजार रहावे लागत असूनही आपल्या हाताने बनवलेला स्वयंपाक कुटुंबातील सदस्यांना देण्यातील आनंद त्या भरभरून घेत असतात. देश अधिक सुरक्षित करण्यासाठी अधिकाधिक लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करण्याच्या नवनवीन कल्पना राबविताना, त्यांना आपण हे सारे जागतिक शांततेसाठीच करतोय ह्याचे चांगलेच भान असते. दुर्दैवाने आपल्या देशाने त्यांना कधी पद्मश्री, पद्मभूषण किताबाने सन्मानित केले नाही हे आपल्या देशाचे दुर्दैव. 

टेसी थॉमस यांची ही कहाणी देशातील करोडो स्त्रियांना प्रेरणा देणारी ठरावी. आज इस्रोमध्ये  तब्बल बाराशे महिला ‘शास्त्रज्ञ’ म्हणून कार्यरत आहेत. देशातील करोडो महिलांची मान गर्वाने उंचावणारी टेसी थॉमस यांची ही अफाट कामगिरी येत्या काळात महिलांना प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घ्यायला प्रेरित करेल याविषयी शंकाच नाही.

संग्राहिका: सौ उज्ज्वला केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वर आले… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ स्वर आले… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

” नवकिरणांचे दूत निघाले पूर्व दिशेहुन नाचत नाचत

नवीन गाणी ओठावरती किलबिलते पक्षांची पंगत

सोनेरी स्वप्नांची झालर पहाटवा-यावरती विहरत

नवी चेतना भरून घ्यावी जाने त्याने हृदयागारी

उल्हासाचे रंग भरले  नभांतरी दशदिशांतरी “🌅

दिवाळी सुट्टीचा शेवटचा रविवार, उद्यापासून परत रोजचा दिनक्रम सुरु होणार. मस्त पडलेल्या  या थंडीत नव-उत्साहात ,नव्या चेतना नवीन स्वप्ने घेऊन सुरवात करायची.

” स्वप्नचूर लोचनात एक रम्य आकृती

सूर सूर होता सर्व भावना निनादती 🎼

वाजतात पायीची बघ अजून नुपूरे

तेच स्वप्न लोचनात रोज रोज अंकुरे”

“दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी” म्हणता म्हणता दिवाळी येऊन केंव्हा गेली हे कळलच नाही. मात्र प्रत्येकाच्याच आनंदाची ‘जीवनातली घडी अशीच राहू दे, प्रितीच्या फुलावरी वसंत नाचू दे “

आता फूल घ्यायचे तर काट्यांचा सामना करायलाच पाहिजे का दरवेळेला? तरीपण

” हे फूल तू  दिलेले मजला पसंत आहे

आहे फुलात काटा तो ही पसंत आहे

कधी सांगता न आल्या शब्दात प्रेमगोष्टी

श्रीमंत अक्षरांची इतुकीच खंत आहे “

ही देव गाणी आठवत, मनात गुंजन करत पुढे जात रहायचे

कवी यशवंत देव यांचा ३० आँक्टोबर स्मृतीदिन तर १ नोव्हेंबर जन्मदिन त्यांच्या स्मृतीस विनम्र 🙏🙏

“पडसाद कसा आला न कळे,अवसेत कधी का तम उजळे

संजीवन मिळता आशेचे निमिषात पुन्हा जग सावरले

किमया असली का केली कुणी

🎤🎼🎹

उरल्या सगळ्या आठवणी. “

(देवांचा चाहता)  अमोल 📝

लेखक :अज्ञात

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या आयुष्यातील आनंदाचे क्षण… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

??

☆ माझ्या आयुष्यातील आनंदाचे क्षण… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

….. काल 19 ऑक्टोबर 22 हा अख्खा दिवस फारच आनंदात गेला. कोथरूडला कमिन्स कंपनी समोर, मुलींच्या अंधशाळेच्या शेजारी क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान आहे. त्यांच्यातर्फे २१ तारखेला धन्वंतरी पूजनाचा मोठा कार्यक्रम असतो. त्यासाठी त्यांनी हा संपूर्ण आठवडा दिनांक २३ पर्यंत तेथील जंगल पाहण्यासाठी आवाहन केले होते. आम्ही मैत्रिणी काल सकाळी नऊ वाजताच घरातून उत्साहाने निघालो. खूप लांबून लांबून कोणी कोणी आल्या होत्या. साडेदहापर्यंत तिथे सगळ्या एकत्र जमलो. सौ पल्लवी जमदग्नी ही माझी मैत्रीण आहे. तिने उत्साहाने आमचे स्वागत केले .त्यानंतर संपूर्ण जंगल पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी सुसज्ज आधुनिक कॅमेरा देऊन एक पुरुष आणि एक महिला आमच्याबरोबर दिली. त्या ठिकाणी खूप मोठे जंगल आहे. त्याला “ मियावाकी जंगल “ म्हणतात. 

मियावाकी हा जपानी शास्त्रज्ञ आहे. त्याने पडीक जमीन जिथे असेल तिथे औषधी वनस्पती लागवड करावी अशी सूचना केली. त्याप्रमाणे या संस्थानने या ठिकाणी भरपूर आयुर्वेदिक झाडे लावली. काही आपोआप देखील आली. पण अनेक वैशिष्ट्यपूर्ण झाडांची त्या ठिकाणी रेलचेल आहे. सुदैवाने काल वरुणराजाची कृपा झाली. चक्क ऊन पडले होते. त्यांनी आम्हाला मोठ्या मोठ्या छत्र्या दिल्या, ऊन लागू नये म्हणून. पण जंगलात शिरताच खूप सावली होती. तेथील सेवक अतिशय उत्साहाने प्रत्येक झाडाची माहिती देत होते. आम्ही त्यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले पण त्यांनी न कंटाळता आमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. तेथील आवळ्यांनी डवरलेले झाड पाहताच किती वय झाले तरी आमच्या महिला एकदम हरकून गेल्या आणि आम्हाला आवळी भोजनाला इथे परवानगी द्याल का असे बिनधास्त विचारले. त्यांनी देखील हसून परवानगी दिली. ते सारे जंगल, त्यातील पायवाटा, त्यातील अनोखे वृक्ष, त्यांना लगडलेल्या वेली, त्यावर आलेली फळे, फुले पाहून आम्ही देहभान हरपून गेलो. 

दोन तास त्या ठिकाणी हिंडत होतो .अधून मधून त्यांचे सेवक ट्रेमधून ग्लासातून स्वच्छ थंडगार पाणी आणून आम्हाला देत होते. अखेर त्यांनी एकच बाजू दाखवली आणि हॉलमध्ये आम्हाला येण्यास सांगितले. तिथे प्रत्येकाला स्वतंत्र बेंच, समोर खूप मोठे डेस्क होते . एकदम शाळेत गेल्यासारखे वाटले. तिथे गेल्या गेल्या अमृततुल्य चहा मिळाला. त्यानंतर काही भाषणे झाली. तेथील एका डॉक्टर महिलेने आयुर्वेदाविषयी अतिशय सुंदर माहिती दिली. आमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देखील दिली. त्यानंतर सर्वांना राजगिरा लाडू, केळी असा पौष्टिक खाऊ दिला. खूप सुंदर वाटले. खाली धन्वंतरीची सुबक मूर्ती होती. त्याची सुंदर पूजा ,रांगोळी मांडली होती. तो सगळा परिसर भारावून टाकणारा होता. अगदी “आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे ” अशी अवस्था झाली होती . त्यानंतर आम्ही घरी परतलो पण येताना पल्लवी म्हणाली, तुम्ही जंगल निम्मेच पाहिले आहे पुन्हा याल तेव्हा उरलेले निम्मे दाखवते. 

हे सारे जंगल त्यांनी अवघ्या तीन वर्षात उभे केले आहे. कमाल आहे की नाही? आम्ही तर फोटो काढलेच पण तेथील सेविकेने भरपूर सुंदर फोटो काढून आज आम्हाला पाठवले. अगदी तृप्त तृप्त वाटले. ज्यांना हे जंगल पहायचे आहे त्यांनी खालील नंबर वर कृपया संपर्क साधून हा आनंद जरूर घ्यावा.

सुश्री पल्लवी जमदग्नी

8668514969

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प, भाग -४१  परिव्राजक १९.  कन्याकुमारी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प, भाग -४१  परिव्राजक १९.  कन्याकुमारी डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

स्वामीजी धारवाड, बंगलोर करत करत म्हैसूरला आले. म्हैसूर संस्थांचे दिवाण सर के. शेषाद्री अय्यर यांच्याकडे स्वामीजी राहिले होते. त्यांनी म्हैसूर संस्थानचे महाराज चामराजेंद्र वडियार यांचा परिचय करून दिल्यानंतर त्यांनी स्वामीजींना संस्थानचे खास अतिथि म्हणून राजवाड्यावर ठेऊन घेतले. एव्हढी सत्ता आणि वैभव असलेल्या या तरुण महाराजांना धर्म व तत्वज्ञान याविषयी आस्था होती. म्हैसूर हे भारतातील सर्वात मोठ्या संस्थांनांपैकी एक होते. इथे अनेक विषयांवर स्वामीजी बरोबर चर्चा आणि संवाद घडून येत.

महाराजांशी स्वामीजींचे चांगले निकटचे संबंध निर्माण झाले होते. त्यांनी एकदा स्वामीजींना विचारलं स्वामीजी मी आपल्यासाठी काय करावं ? त्यावर तासभर झालेल्या चर्चेत स्वामीजी म्हणाले, “भारताचा अध्यात्म विचार पाश्चात्य देशात पोहोचला पाहिजे आणि भारताने पाश्चात्यांकडून त्यांचे विज्ञान घेतले पाहिजे. आपल्या समजतील सर्वात खालच्या थरापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे आणि धर्माची खरी तत्वे सामान्य माणसाला समजून सांगितली पाहिजेत. शिकागोला जाण्याचा विचार ही त्यांनी बोलून दाखवला होता, यावर महाराजांनी आवश्यक ती सर्व मदत तत्काळ करण्याची तयारी दाखवली होती पण, स्वामीजींनी प्रत्येक वेळेसारखा इथेही नकार दिलेला दिसतो. तरीही महाराजांनी स्वामीजींनी त्यांच्या आवडीची भेटवस्तू आमच्या कडून घ्यावी याचा खूप आग्रह केला आणि बाजारात कारकूनाबरोबर एक हजार रुपये देऊन स्वामीजींबरोबर पाठविले. त्यामुळे स्वामीजी त्यांच्या कौतुकासाठी सर्व बाजार फिरले आणि त्यांना बरं वाटावं म्हणून एक सर्वात उत्तम सिगारेट घेतली. ती एक रुपयाची होती. ती तिथेच ओढून संपवली. असे हे निरिच्छ वृत्तीचे स्वामीजी राजेरजवाड्यात पाहुणचार घेत ठिकठिकाणी राहिले होते पण, तेंव्हाही त्यांच्या डोळ्यासमोर खेडोपाड्यातली दरिद्री जनता आणि राज्यकर्त्याकडून दीन दुबळ्या प्रजेचे काहीतरी कल्याण होईल एव्हढाच विचार असायचा. क्वचित एखादाच राजा हे करू शकतो असा त्यांचा अनुभव होता. त्यातलेच हे म्हैसूरचे महाराज होते.

त्यांना स्वामीजींनी शिकागोहून पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे “हे उदार महाराजा, मानवाचे जीवन फार अल्पकालीन आहे आणि या जगात हव्याशा वाटणार्‍या सुखाच्या गोष्टी केवळ क्षणभंगुर आहेत. पण जे इतरांसाठी जगतात तेच खर्‍या अर्थाने जगतात. भारतातील तुमच्यासारखा एखादा सत्ताधीश जर मनात आणेल, तर तो या देशाला आपल्या पायावर उभे करण्यासाठी महान कार्य करू शकेल. त्याचे नाव पुढच्या पिढ्यांत पोहोचेल आणि जनता अशा राजाबद्दल पूज्यभाव धरण करेल”. यावरून स्वामीजीं स्वत:साठी काहीही मागत नसत. महाराजांनी स्वामीजींची पाद्यपूजा कराची इच्छा व्यक्त केली तर त्यांनी स्पष्ट नकार दिला. शेवटी त्यांनी स्वामीजींचा आवाज एखादी आठवण म्हणून ध्वनीमुद्रित करून द्यावा अशी कल्पक मागणी केली. त्याला होकार दिला आणि त्या वेळच्या फोनोग्रामच्या तबकडीवर चार पाच मिनिटांचे बोलणे रेकॉर्ड करून घेतले. बर्‍याच वर्षांनंतर तो पुसट झाला. मग महाराजांचा निरोप घेऊन स्वामीजी केरळ प्रदेशात गेले.

त्रिचुर, कोडंगल्लूर,एर्नाकुलम, कोचीन इथे फिरले. केरळ, मलबार या भागातल्या जुनाट चालीरीती आणि ख्रिस्त धर्मी मिशनर्‍यांचा तिथे चाललेला धर्मप्रचार या गोष्टी स्वामीजींच्या लक्षात आल्या होत्या. त्यामुळे त्यांना वाटलं की हिंदू धर्माच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली नाही. स्वामीजींना उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात आलेले अनुभव वेगळे होते. त्यांच्या लक्षात आले की, दक्षिणेत पाद्री लोक खालच्या वर्गातील लाखो हिंदूंना ख्रिस्त धर्मात घेत आहेत. जवळ जवळ एक चतुर्थांश लोक ख्रिस्त धर्मात गेले आहेत.

(असा स्पष्ट उल्लेख स्वामीजींच्या चरित्र ग्रंथात आहे).

कोचीनहून स्वामीजी त्रिवेंद्रमला आले. एर्नाकुलम पासून त्रिवेंद्रम सव्वा दोनशे किलोमीटर अंतरावर, बैलगाडी आणि पायी प्रवास करताना केरळचं निसर्ग वैभव त्यांना साथ करत होतं. आंबा, फणस, नारळ यांची घनदाट झाडी, लहान मोठ्या खाड्या, पक्षांचे मधुर आवाज असा रमणीय रस्ता स्वामीजी चालत होते.

त्रिवेंद्रमला स्वामीजी सुंदरराम यांच्याकडे राहत असताना घरातील लहान, मोठे, नोकर, चाकर यांच्याशी पण मनमोकळे बोलत असत. एकदा, सुंदरराम यांचा चौदा वर्षांचा मुलगा रामस्वामी याला स्वामीजी म्हणाले, “तू अगदी तरुण आहेस,लहान आहेस. माझी फार इच्छा आहे की तू कधीतरी उपनिषदं, ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता यांचा निष्ठापूर्वक अभ्यास कर. या तिन्हीना मिळून प्रस्थानत्रयी म्हणतात. त्याच बरोबर इतिहास पुराणाचा पण अभ्यास कर. या तोलामोलाचे ग्रंथ तुला सार्‍या जगात दुसरीकडे कुठेही मिळणार नाहीत. कोणतीही गोष्ट कशामुळे निर्माण झाली, तिचं पर्यवसान कशात होणार, ती का अस्तित्वात आली आणि तिची दिशा कोणती? हे जाणून घेण्याची जिज्ञासा केवळ मानवप्राण्यातच असू शकते तिचा पूर्ण उपयोग करून घे”.

कन्याकुमारी भारत वर्षाच्या दक्षिणेचे शेवटचे टोक. त्रिवेंद्रम हून नव्वद किलोमीटर. डिसेंबरला त्रिवेंद्रमहून स्वामीजी निघाले आणि कन्याकुमारीला पोहोचले. संपूर्ण वंदेमातरम  या गीतातलं मातृभूमीचं वर्णन स्वामीजींनी ऐन तारुण्यात ऐकलं होतं. याच वर्णनाचा भारत देश स्वामीजींनी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे हजारो किलोमीटर प्रवास करून पालथा घातला होता. डोळ्यात साठवून ठेवला होता. अशी ही स्वदेशाची आगळीवेगळी यात्रा  करायला त्यांना अडीच वर्ष लागली होती. कन्याकुमारीच्या आपल्या मातृभूमीच्या दक्षिण टोकावरच्या खळाळत्या लाटांच्या हिंदुमहासागराला ते भेटणार होते आणि या अथांग सागराला वंदन करून आपल्या विराट भ्रमणाची पूर्तता करणार होते.

स्वामीजींनी दक्षिणेश्वरच्या मंदिरातील कालीमातेचं/जगन्मातेचं दर्शन घेऊन परिव्राजक म्हणून प्रवास सुरू केला तो आता कन्याकुमारी मंदिराच्या दर्शनाने संपणार होता.

या मंदिरात स्वामीजी गेले आणि कन्यारूपातील जगन्मातेचं दर्शन घेऊन बाहेर आले. तशी समोर लांबवर नजर गेली, दीड फर्लांग अंतरावर दोन प्रचंड शिलाखंड दिसले. आपल्याच भूमीवरच्या या शिलाखंडावर जायची त्यांना मनोमन इच्छा झाली. तिथे गेलो तर खर्‍या अर्थाने मातृभूमीचे दक्षिण टोक आपण गाठले असा अर्थ होईल. म्हणून कसही करून त्या खडकांवर आपण जाव असं वाटून ते किनार्‍यावर आले. जवळच होड्या होत्या. काही कोळी पण उभे होते. स्वामीजींनी चौकशी केली. त्या नावेतून खडकापर्यंत पोहोचविण्यास नावाडी तयार होते, फक्त पैसे द्यावे लागणार होते. स्वामीजी तर निष्कांचन होते. एक पैसा सुद्धा जवळ नव्हता. झळ त्यांनी त्या उंच लाटांमध्ये उडी घेतली पोहत पोहत जाऊन ते खडक गाठले. समुद्राला रोजचे सरावलेले असतांनाही नावाडी स्तब्धच झाले. लाटा उसळणार्‍या तर होत्याच पण तिथे शार्क माशांपासून पण धोका होता हे त्यांना माहिती होतं. हे पाहून दोन तीन नावाडी पाठोपाठ गेले. सुखरूप पोहोचले हे बघून, त्यांना काही हवे का विचारले. आम्ही आणून देऊ असे सांगीतल्यावर थोडे दूध आणि काही शहाळी पुरेशी आहेत असे स्वामीजींनी सांगितले. स्वामीजी या शिलाखंडावर तीन दिवस, तीन रात्र राहिले.ते दिवस होते 25,26,27 डिसेंबर 1892

लाटांच्या अखंड गंभीर नादाबरोबर स्वामीजींचे चिंतन सुरू झाले. कलकत्त्यातून बाहेर पडल्यापासुनचे सर्व दिवस, त्यात आलेले अनुभव, सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं होतं. जगन्मातेचं ध्यान आणि भारत मातेचं चिंतन तीन दिवसात झालं.

प्रश्नचिन्ह – प्राचीन इतिहास असलेला हा विशाल देश, इतिहासाचे केव्हढे चढउतार, सार्‍या जगाला हेवा वाटेल असे प्राचीन काळातील द्रष्ट्या ऋषीमुनींनी दिलेले आध्यात्मिक धन. पण तरीही आज भारत कसा आहे? त्याची अस्मिताच हरवलेली दिसत आहे. सगळ्या मानव जातीने स्वीकारावीत अशी शाश्वत मूल्यं पूर्वजांकडून लाभली आहेत तरीही त्यातल्या तत्वांचा त्याला विसर पडला आहे. अभिमान वाटावा असं भूतकाळाचा वारसा आहे पण वर्तमानात मात्र घोर दुर्दशा आहे. यातून समाजाचं तेज पुनः कसं प्रकाशात आणता येईल?  अशा प्रश्नांची उत्तरे त्यांना शोधायची होती. उपाय शोधायचे होते.

आपल्या समाजातील अज्ञान आणि दारिद्र्य दूर कसे होईल आणि भारताचे पुनरुत्थान कसे होईल?त्याच्या आत्म्याला जाग कशी येणार? याच प्रश्नावर जास्त वेळ चिंतन करत होते.

प्राचीन ऋषीमुनींनी दिलेले उदात्त आध्यात्मिक विचार आणि जीवनाची श्रेष्ठ मूल्ये खालच्या थरातील माणसांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे असे त्यांना तीव्रतेने वाटत होते. सामान्य माणसाच्या सेवेसाठी आणी उन्नतीसाठी आपण प्रयत्न करायचा असा स्वामीजींचा निर्णय झाला. हे करण्यासाठी पाच दहा माणसं आणि पैसा हवाच. पण या दरिद्री देशात पैसे कुठून मिळणार? त्यांना आलेल्या अनुभवा नुसार धनवान मंडळी उदार नव्हती. आता अमेरिकेत सर्वधर्म परिषद भरते आहे. तिथे जाऊन त्यांना भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीचा परिचय करून द्यावा आणि तिकडून पैसा गोळा करून आणून इथे आपल्या कामाची ऊभारणी करावी. आता उरलेले आयुष्य भारतातल्या दीन दलितांच्या सेवेसाठी घालवायचे असा संकल्प स्वामीजींनी केला आणि शिलाखंडावरून  ते परतले. तीन दिवस तीन रात्रीच्या चिंतनातून प्रश्नाचं उत्तर स्वामीजींना मिळालं होतं.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिना अखेरचे पान – 10 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिना अखेरचे पान – 10 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

सांगावसं वाटलं म्हणून….10

अश्विन शुद्ध एक म्हणजे घटस्थापना!कधी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीला सुरू होणारा तर कधी ऑक्टोबर महिन्यात सुरू होणारा अश्विन महिना घेऊन येतो नवरात्रोत्सव आणि जाता जाता दीपोत्सव देऊन जातो.

घटस्थापनेला घटांची स्थापना केली जाते. शारदीय नवरात्रीला प्रारंभ होतो. ललितापंचमी, दुर्गाष्टमी, खंडेनवमी असे एक एक दिवस साजरे होत असतात. नऊ दिवसांचे, नव्हे नव्हे नऊ रात्रींचे, नवरात्र संपते आणि विजयादशमीचा दिवस उजाडतो.विजयादशमी म्हणजेच दसरा,दशहरा!असूरीय वृत्तींचा वध करून सत्प्रवृत्तींचा विजय साजरा करण्याचा दिवस.पारंपारिक सीमोलंघनाबरोबरच वैचारिक सीमोलंघन करण्याचा दिवस. अन्यायाचा प्रतिकार करून मानवतेचा संदेश पसरवण्यासाठी मानवी मनाचे परिवर्तन करण्याचा दिवस!नवरात्रीतील लक्ष लक्ष दीपज्योतीच सांगत असतात आता तमाचा नाश फार दूर नाही. या दीपाप्रमाणेच आकाशातील पूर्णचंद्राचा दीपही उजाळून निघतो आणि को जागरती,कोण कोण जागे आहे हे पाहण्यासाठी अश्विन पौर्णिमेला सहस्त्ररश्मी तेजाने उजळून निघालेला असतो.आकाशाचा तो नीलमंडप जणू काही मोग-याच्या फुलांनी बहरून जावा असा फुललेला असतो. चांदण्याची ही फुले प्रत्येक क्षण उल्हसित करत असतात. जणू काही ही पुढच्या आनंदमयी दिवसांची सुरूवातच असते.

अश्विनातील अमावस्येचा अंधःकार विरत जातो आणि कार्तिकातील पहिल्या पहाटेच घरोघरी दारापुढे पणत्यांच्या मंद ज्योती प्रकाशाचा निरोप घेऊन येतात. कधी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात तर कधी नोव्हेंबरच्या सुरूवातीला सुरू होणारा हा प्रकाशोत्सव म्हणजेच दीपावली! दिवाळी. आनंद, उत्साह, तेज घेऊन येणारा हा सण. गोवत्स द्वादशी म्हणजेच वसूबारस, गुरूद्वादशी, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशीला अभ्यंगस्नान,  लक्ष्मीचे पूजन करून समृद्धी आणि संपन्नता मिळावी म्हणून प्रार्थना करण्याचा लक्ष्मीपूजनाचा दिवस!. त्यानंतर येणारा, नवे व्यावसायिक वर्ष सुरू करणारा  आणि पती पत्नीतील प्रेम आणि विश्वास दृढ करणारा दिवाळी पाडव्याचा दिवस. दिवाळीतील पाडव्यालाच विक्रम संवत व महावीर जैन संवत या नववर्षांचा प्रारंभ होत असतो. 

भाऊ आणि बहिण यांच्यातील स्नेहाच्या मोत्यांच्या माळा गुंफणारी भाऊबीज. दीपांच्या मालिकांप्रमाणे एका मागोमाग एक  येणा-या या मंगलमयी दिवसांमुळे दीपावलीचे हे  पर्व सर्वत्र चैतन्य पसरवित जाते. नवे कपडे, भेट वस्तू, नवी खरेदी, फराळाच्या पदार्थांनी भरलेली ताटे, आतषबाजी, रोषणाई या सगळ्याची लयलूट करणारा हा दिवाळीचा सण मनाला एक वेगळीच उर्जा देऊन जातो.

हा ऑक्टोबर महिना अन्य काही कारणांसाठी लक्षात राहणारा असतो. महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती असते.तर हाच दिवस अर्थशास्त्रज्ञ, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर, पहिले अर्थमंत्री व साहित्यिक श्री.चिंतामणराव देशमुख यांचा हा स्मृतीदिन. याच ऑक्टोबर महिन्यातील दसरा  हा क्रांतीकारक सीमोलंघन करणारा ठरला तो धम्मचक्र प्रवर्तनामुळे. तर दुसरीकडे ईद-ए-मिलाद मुळे मुस्लिम धर्मियांसाठीही हा महिना तितकाच महत्त्वाचा.

जागतिक स्तरावर एक ऑक्टोबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून पाळला जातोच पण त्याशिवाय तो काॅफी दिन, संगीत दिन आणि रक्तदान दिनही आहे. पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन व सात ऑक्टोबर हा जागतिक वन्य पशू दिन आहे. आठ ऑक्टोबर हा भारतीय हवाई दल दिन म्हणून साजरा केला जातो.जागतिक टपाल दिन नऊ ऑक्टोबरला तर दहा ऑक्टोबरला राष्ट्रीय टपाल दिन पाळून टपाल खाते व कर्मचारी यांच्या कार्याची दखल घेतली जाते. अंधांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून त्यांना मदत करण्यासाठी पंधरा ऑक्टोबर हा अंध सहायता दिन म्हणून पाळला जातो.जागतिक पोलिओ दिन चोवीस ऑक्टोबरला असतो तर तीस ऑक्टोबरला  बचत दिन साजरा करून बचतीकडे लक्ष वेधले जाते. एकतीस ऑक्टोबर या दिवशी भारतात राष्ट्रीय एकता दिवस  पाळला जातो.

याच महिन्यात महर्षि वाल्मिकी, श्री जलाराम तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते; तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राजे यशवंतराव होळकर यांची पुण्यतिथि ऑक्टोबर महिन्यातच येते.

सामाजिक, राजकीय, धार्मिक अशा विविध कारणांनी गजबजलेल्या या ऑक्टोबरच्या शेवटी शेवटी हवेतही बदल होत जातो. थंडीची चाहुल लागते. दिवाळीच्या सुट्ट्या संपत आलेल्या असतात. त्या संपण्यापूर्वी पर्यटनाला उत्सुक असणारे पर्यटक घराबाहेर पडत असतात. त्याच वेळेस निसर्ग एक पाऊल पुढे टाकून आपला प्रवास चालूच ठेवत असतो.व र्षा ऋतुला पूर्ण निरोप देऊन शरद आणि हेमंत ऋतुचा आल्हाददायक अनुभव घेण्यासाठी काळ पुढे पुढे सरकत असतो.एका नव्या महिन्यात प्रवेश करण्यासाठी !

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ टर्निंग पाॅइंट…लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ टर्निंग पाॅइंट…लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆ 

“ १० वर्षापूर्वी नुकत्याच लागलेल्या नवीन नोकरीवरून घरी परत येताना तो भयानक ॲक्सीडेंट झाला. डॉक्टरांनी दोन्ही हात कोपरापासून काढण्याशिवाय पर्यायच नाही हे सांगितले.फार मोठा धक्का होता तो घरच्यांसाठी.

वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ही घटना घडल्याने भविष्याचा विचार केला की फक्त अंधार दिसायचा.

किती मेहनतीने, हुशारीने प्रतिष्ठीत आय आय टी मधे कॉम्प्युटर इंजिनीरिंग मिळवून मी सर्वोत्तम संस्थेत शिरलो होतो.. खूप सारी स्वप्न घेऊन !

ही घटना माझं पूर्ण आयुष्यं हादरवून टाकणारी होती.

अनेक शस्रक्रियांनंतर शेवटी दोन्ही हात कृत्रिम बसवायचा सल्ला दिला डॉक्टरांनी.. घरात एकच भयाण वातावरण पसरलं होतं पण दुसरा पर्यायच नसल्याने कृत्रिम हात रोपण शस्त्रक्क्रिया करावीच लागली.

रोज स्वत:चे असे हात बघून आयुष्यं खरंच जगायचं का ?हाच विचार मनात येऊन जायचा. 

मनातून  तर जवळजवळ संपलो होतो मी. दोन महिने झाले आणि त्या सततच्या परावलंबित्वाची, त्या सहानभूती भरलेल्या नजरांची अक्षरशः किळस यायला लागली होती. अनेक मित्र,नातेवाईक समजवायला यायचे.आयुष्यं असं थांबवून चालत नाही, जगावंच लागतं वगैरे सगळं. दुसऱ्याला सांगणं सोपं असतं. पण वेळ स्वतःवर आली की कळतं, हे मला पूर्ण समजलं होतं.आता त्या सूचनांचा रागही येणं बंद झालं होतं.आयुष्यं संपवण्याचा विचार हजारदा मनात येऊन गेला. पण आईबाबांकडे बघितलं की वाटायचं माझे हात गेले तर माझी अशी अवस्था झाली, मी तर त्यांचं  सर्वस्व आहे. मी त्यांना आयुष्यातून उठवू शकत नाही.

कुठलाही संकटकाळ असो जग पुढे जातंच राहतं….तसंच आषाढ संपून श्रावण महिना आला आणि घरोघरी सणाचे वेध लागले होते…

घरात कोणालाच काही साजरं करायची आतून पूर्ण इच्छा संपली होती. पण बाकी काही असलं तरी गौरी गणपती आले की त्यात काही हयगय आईला चालायची नाही. देवावर प्रचंड श्रद्धा आईची. ‘आपलं काहीतरी चुकलं असणार मागच्या वेळेस म्हणून आपल्या शेखरच्या बाबतीत असं झालं’ हीच चुटपुट तिचं मन खात होती. त्यामुळे ह्यावर्षी श्रद्धेचं रूपांतर थोड्या भीतीत झालं होतं.घराची साफसफाई करण्यापासून आईने सगळं करायला घेतलं. बघता बघता श्रावण संपत आला. घरी बाप्पा येण्याची सर्व तयारी झाली.

आज बाप्पा घ्यायला जायचं होतं….आम्ही ३,४ कुटुंब एकत्रच जायचो. मोठमोठ्या दुकानात न जाता थेट मूर्तिकारांकडून गणपतीची मूर्ती घ्यायचा आमचा नियम होता. मला मुळीच जायची इच्छा नव्हती, मनातल्या मनात त्या देवाशी रोज भांडायचो मी. ज्या हातांनी इतके वर्ष पूजा करून घेतली होती आईने, तेच हात देवाने माझ्यापासून  नेले होते. ‘गणपती आणायला म्हणून नाही निदान चक्कर मारून होईल म्हणून चल’ असे म्हणून सगळ्या मित्रांनी,आईबाबांनी बळजबरी गाडीत घातलं. मी जगतच माझ्या घरच्यांसाठी होतो, त्यामुळे झापडं लावल्यासारखा खिन्न मनाने त्यांच्याबरोबर निघालो.. 

दरवर्षी प्रमाणे मूर्तीकार शंकर काकांकडे पोहोचलो आम्ही. शंकर काका हे नाव लोकांनी खास दिलेलं होतं त्यांना त्यांचं मूळ नाव काय हे आता बहुदा त्यांनाही आठवत नसावं. गणपती बाप्पाची जन्मदात्री देवी पार्वती असली तरी त्याला गणपतीरूप देणारे भगवान शंकर होते.त्यामुळे गावातले सगळ्यात उत्तम गणपती कारागीर म्हणून गावातल्या लोकांनी त्यांना शंकरकाका म्हणायला सुरुवात केली.

माझ्या अपघातानंतर ते पहिल्यांदाच मला बघणार होते. मला परत एकदा अनेक प्रश्नांना सामोरं जायचं होतं. मी बाजूला पडलेली एक खुर्ची घेऊन तिथे बसलो होतो. बाकीचे सगळे गणपती बघत होते. तेवढ्यात काका आले आणि शिल्पकाराची नजर ती- ताबडतोब माझ्या कृत्रिम हातावर गेली. ते काही विचारणार तेवढ्यात मी म्हणालो, “ ज्या हातांनी इतके वर्ष गणपती उचलून नेले ते हातच बाप्पा घेऊन गेला काका माझ्याकडून.आता हे उसने हात घेऊन जमेल तसं जगायचं ”

” शेखरभाऊ नशीबवान आहात तुम्ही बाप्पाच्या पंक्तीतले झाले आता… बाप्पाकडेपण त्यांचा मूळ चेहरा नाहीच की,

तो काळ असा होता की रागाच्या भरात शंकराने शीर धडावेगळं केलं त्यामुळे हत्तीचं तोंड बसवावं लागलं गणपती बाप्पाला .पण आजच्या काळात किती प्रगती झाली बघा. तुम्हाला कृत्रिम का होईना हाताच्या जागी हात बसवले आहेत. गणपती बाप्पाची सगळं जग आज बुद्धीची देवता म्हणून पूजा करतं कारण आपल्यात निर्माण झालेलं व्यंग त्यांनी वैशिठ्य असल्यासारखं जगासमोर ठेवलं. सगळे देव मानव साच्यात असतांना फक्त गणपती गजमुखात आहे पण जगात सगळ्यात जास्त घरांमधे सापडणार लाडकं आराध्य दैवत आहे.. दादा बघा, तुम्ही तुमच्यावर आलेली ही आपत्ती संधी म्हणून वापरायचं ठरवलं तर तुम्हीसुद्धा घरोघरी पोहोचाल. तुमचे फक्त हात कृत्रिम आहेत माणूस अजूनही तुम्ही तोच आहात.”

माझ्या अपंगत्वावर इतकी सकारात्मक प्रतिक्रिया त्या दिवशी मी पहिल्यांदा ऐकली.. मूर्ती घडवताना अवयवांना आकार देणाऱ्या त्या हातांनी माझ्या मनावर संजीवनी फिरवली होती. अचानक मला माझे हात न दिसता बाकीचं शरीर जाणवायला लागलं होतं. त्या जीवघेण्या अपघातात वाचलेलं ते अख्ख शरीर मला गेलं वर्षभर जाणवलंच 

नव्हतं .दोन हात सोडले तर मी बाकी पूर्णपणे धडधाकट होतो हे अचानक माझ्या लक्षात आलं होतं. इतके दिवस रोज उठून नसलेल्या हातांकडे बघण्यात मी माझ्या बाकी वाचलेल्या शरीराकडे दुर्लक्ष करत आलो होतो.

कृत्रिम का होईना आज हाताच्या जागी हात होते. बाप्पाला तर गजमुख असूनही ते साजरं होतं, हा विचार कोणी शिकलेल्या माणसाने मला दिला नव्हता. तर असंख्य गणपतींना मूर्तरूप देणाऱ्या शंकर काकांनी दिला होता.

त्या विचारांनी जागी झालेली ही सकारात्मक ऊर्जा,आयुष्य जगायची इच्छा घरोघरी पोहोचवायचा प्रण केला मी.

दोन कृत्रिम हात आणि कॉम्पुटरचं  घेतलेलं ज्ञान ह्याच्या मदतीने वेगवेगळे कार्यक्रम बनवायला सुरुवात केली. आज १० वर्ष झाली, साडेअकराशेच्यावर शोज मी इन्फ्लुएन्सर म्हणून केले आणि आज ज्या नामांकित शिक्षण संस्थेत मी माझं शिक्षण घेतलं त्या संस्थेने मला सन्मानाने इथे तुमच्यासमोर बोलावलं आहे. करोडो लोकं त्यांच्या अपंगत्वावर मात करण्यासाठी आवर्जून माझ्या कार्यक्रमांना येतात. प्रत्येकात बाप्पाचा अंश आहे. गरज असते ती त्याची जाणीव व्हायची….. ‘ एखादी गोष्ट वेगळी असणं आपलं व्यंग नसून वैशिष्ठ्य आहे ! ’ ह्या विचाराने सुरुवात केली तर आयुष्यात खूप मोठी झेप घेणं अशक्यं नाही. माझा तो अपघात झाला नसता तर एखाद्या कंपनीत नोकरी करत कुठेतरी पोहोचलो असतोच .पण आज जी उंची मला मिळाली ती त्या घटनेनंतरच. घरोघरी पोहोचायचं माझं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झालं.

मित्रमैत्रिणीनो कुठलंही काम अशक्य नाही आयुष्याला दिशा देणारा टर्निंग पाॅईंट कधीही येऊ शकतो. एकदा गणपती बाप्पा मोरया म्हणा आणि श्रीगणेशा करा.. ! 

धन्यवाद ! “ 

प्रिंसिपल सरांनी शेखरला कडकडून मिठीच मारली ! हे सर्व ऐकून संपूर्ण सभागृह जागीच उभे राहिले आपल्या दोन हातांनी टाळ्यांच्या कडकडाटात शेखरच्या कृत्रिम हातांची प्रेरणादायी कथा प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्शून गेली होती.. एका वेगळ्या उर्जेचा संचार झाला होता सगळ्यांच्या मनात..

आयुष्याला कुठल्या दिशेने घेऊन जायचं हे एकदा मनाशी पक्क ठरवावं लागतं. चमत्काराला नमस्कार होणारच 

—- मग तो ईश्वराने घडवलेला असो किंवा सामान्य माणसाने.. नाही का ? 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ वचन देई मला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

अल्प परिचय 

बॅंकेतून रिटायर झाल्यावर काही वर्षे एका खाजगी कंपनीत काम केले.

कामाच्या व्यस्ततेमुळे मागे पडलेली वाचनाची आवड परत सुरू केली. कविता लेखनाची सुरुवात झाली. कवितेचे रसग्रहण हा प्रांत ही आवडू लागला आहे.

? काव्यानंद ?

☆ वचन देई मला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या निशिगंध या काव्यसंग्रहात कवीने प्रेम विषयक विविध भाव वेगवेगळ्या कवितांतून वाचकांसमोर उलगडले आहेत. उदात्त ,शाश्वत ,समर्पित प्रेम तर कधी विरहाग्नीत होरपळणारे तनमन ,प्रतारणेतून अनुभवाला येणारे दुःख ,कधी प्रेमाच्या अतूटपणाबद्दल असलेला गाढ विश्वास आणि त्या विश्वासातून एकमेकांकडे मागितलेले वचन अशा विविध प्रेमभावना अत्यंत तरल पणे व तितक्याच बारकाव्याने आणि समर्थपणे काव्य रसिकांसमोर प्रस्तुत केल्या आहेत. या संग्रहातील वचन देई मला ही कविता अशीच प्रेमात गुंतलेल्या, रमलेल्या, प्रेमावर विश्वास असलेल्या प्रियकराचे भावविश्व आपल्यासमोर साकारते.

साधारणतः प्रियकर प्रेयसीला विसरतो अशी मनोधारणा असते.या कवितेचे वैशिष्ट्य असे की येथे प्रेयसी विसरेल अशी शंका प्रियकराच्या मनात आहे.रुढ मनोभावनेला छेद देणारी ही कविता लक्षवेधी ठरते.

कवितेतील प्रेयसी जर  कवितेतील प्रियकराला विसरली तर त्याच्या स्मृतीत तिने एक तरी अश्रू ढाळावा एवढी माफक अपेक्षा करणारा प्रियकर कवीने काव्य रसिकांसमोर शब्दांतून उभा केला आहे .

☆ वचन देई मला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆

 विसरलीस जर कधी जीवनी एक वचन तू देइ मला

कधी झाकलो स्मृतीत तुझिया अश्रू एक तू ढाळ भला ।।ध्रु।।

 

प्रीत तरल ना देहवासना ही आत्म्याची साद तुला

एकरूप मी तव  हृदयाशी क्षण न साहवे द्वैत मला

पवित्र असता प्रेम चिरंतन विसरणार मी कसे तुला

कधी झाकलो स्मृतीत तुझिया अश्रू एक तू ढाळ भला ।।१।।

 

जगायचे ते तुला आठवत मरणही यावे तुज साठी

कधी न सुटाव्या शाश्वत अपुल्या प्रेमाच्या रेशिमगाठी

मृत्यूनंतर येउ परतुनि प्रेमपूर्तीची आंस मला

कधी झाकलो स्मृतीत तुझिया अश्रू एक तू ढाळ भला ।।२।।

 डॉ निशिकांत श्रोत्री

निशिगंध – रसग्रहण

प्रेम विश्वात रममाण असणाऱ्या प्रियकराच्या मनात उगीच शंका येते आणि तो प्रेयसीला म्हणतो की जर कधी जीवनात तू मला विसरलीस तरी एक वचन मात्र तू मला दे .ती विसरणार नाही याची खात्री विसरलीस जर या शब्दातून व्यक्त होते. तसेच पुढे तो म्हणतो की तू विसरलीस आणि जर कधी मी तुझ्या स्मृतीत डोकावलो म्हणजे त्याचा आठव जरी तिच्या मनात आला तर एक अश्रू मात्र तू ढाळ. भला हा शब्द अश्रूशी  निगडीत करताना तिच्या मनात त्याच्याविषयी कुठलाही गैरभाव ,गैरसमज नसावा हे सूचित केले आहे. विरह किंवा वियोग जर का झाला तर तो केवळ परिस्थितीमुळे होईल त्याच्या वर्तनाने नाही असा विश्वास या कवितेतून आपल्यासमोर व्यक्त केला गेला आहे .विसरली तरी प्रेयसी कडून वचन मागणारा, कधी तरी तिच्या स्मृतीत डोकावण्याची ,झाकण्याची मनोमन खात्री बाळगणारा हा प्रियकर मनाला मोहवून जातो.

ध्रुवपदामध्ये विसरलीस जर कधी ,तरी एक वचन दे, हा विरोधाभास मनाला भावतो.तसेच अश्रूला भला हे अत्यंत वेगळे विशेषण वापरले आहे.प्रियकराच्या सात्विक प्रेमाची साक्ष पटवणारा हा समर्पक शब्द कवितेतील आशयाला पुष्टी देतो.

 पहिल्या कडव्यात तो म्हणतो माझी प्रीत ही तरल निष्कलंक आहे .त्या भावनेत देहवासना,कामवासना नाही. तर ही आत्म्याची आत्म्याला साद आहे .तो खात्रीपूर्वक म्हणतो की तो तिच्या हृदयाशी एकरूप झाला आहे. ही समरसता, हे तादात्म्य आहे ते मनोमन झालेले आहे. त्यात अंतर नाही. त्यातले बंधन अनाठायी नाही.त्यामुळे कुठलेही ,कसलेही द्वैत अगदी क्षणा पुरते ही त्याला सहन होणार नाही.त्यांच्यातले प्रेम हे पवित्र तसेच चिरंतन आहे याची ग्वाही त्याच्या मनाला आहे त्यामुळे तो तिला कधीच विसरणार नाही हे ही तो स्पष्ट करतो. आणि असे असूनही जर कधी ती विसरली तर तो तिच्याकडून एकच वचन मागतो त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक भला अश्रू तिने ढाळावा.

देह व आत्मा यांचा उल्लेख प्रीतिला आध्यात्मिक उंची देतो.द्वैत व अद्वैत यांचा सुस्पष्ट व सुसंस्कृत विचार प्रेमाचा अर्थपूर्ण आविष्कार घडवतो.जे पवित्र ते चिरंतन हा साक्षात्कार प्रीतीच्या भावनेला पटणारा. एकरूप व द्वैत या विरोधाभासातून प्रीतिचे खरे स्वरूप प्रकटते. तुला, मला, भला अशा यमक सिध्दीने कवितेला सुंदर गेयता लाभली आहे.त्यामुळे कवितेतील भावार्थ सहजपणे लक्षात येतो.कवितेशी वाचकांची समरसता प्रस्थापित होते.

दुसऱ्या कडव्यात  प्रेयसीच्या केवळ एका अश्रूची  माफक अपेक्षा ठेवणारा तो म्हणतो की जे जगायचं ते तिला आठवत जगायचं आणि जर मरण आलं तर तेही तिच्यासाठी यावं असं त्याला वाटतं. सर्वस्व ,आपले जीवन तिच्यावर ओवाळून टाकण्याची त्याची मानसिक तयारी आहे. त्याच वेळी शाश्वत असलेल्या प्रेमाच्या रेशीमगाठी कधी न सुटाव्यात अशी योग्य व रास्त अपेक्षा तो बाळगून आहे .त्यांच्या प्रेमावर त्याची अढळ श्रद्धा आहे. त्यामुळे त्याला खात्री आहे जर कधी मृत्यू आला तर परत येऊन म्हणजे जणू काही पुनर्जन्म घेऊन आपण या इहलोकी परतू .कारण त्याला या प्रेमपूर्तीची आस आहे.स्वतः चे प्रेयसी वरील पवित्र,शाश्वत,निरंतर प्रेम याची कल्पना,जाण तिला देता देता प्राक्तनी कदाचित येईल अशा विरहाचा विचार त्याला सर्वथैव बैचेन करतो. त्यामुळे व्यथित तो प्रेयसीच्या प्रेमाविषयी खात्री असूनही साशंकता व्यक्त करतो.पण ती व्यक्त करताना ही त्यात तिच्या शाश्वत प्रेमाचा अर्थपूर्ण उल्लेख करतो.एकमेकांच्या सान्निध्यात जगत असताना चिरंतन प्रेमभावनेची जाण असूनही शाश्वत मरणाचे भान त्याला आहे.मृत्युने वियोग घडला तरी पुनर्जन्मी पुन्हा भेट होईल असा आशावाद व्यक्त केला आहे.तुजसाठी, रेशिमगाठी हे यमक साधले आहे.रेशिमगाठी शब्द वापरून प्रीतिची मुलायमता अधोरेखित केली आहे.

 संपूर्ण कवितेत प्रीत भावनेला सुयोग्य पणे व्यक्त करताना समर्पक व सुलभ शब्द योजना कवीने केली आहे.त्यामुळे प्रीतिचा तरल, पवित्र शाश्वत भाव मनाला स्पर्शून जातो.भावनेचा खरेपणा व त्यातली आर्तता मनाला भिडते.साहित्यिक अलंकारांचा अट्टाहास न ठेवता भावनेचा प्रांजळ पणा जपण्याचे भान कवीने ठेवले आहे. कवीची साहित्यविषयक, भाषाविषयक व काव्य विषयक सजगता यातून प्रतीत होते.साधी पण भावुकतेत न्हालेली ही कविता सर्वांना आवडेल अशीच आहे.

© सुश्री नीलिमा खरे

३-१०-२०२२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares