मराठी साहित्य – विविधा ☆ थोडं मनातलं… सावळ्या रंगाची बाधा ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

? विविधा ?

☆ थोडं मनातलं… सावळ्या रंगाची बाधा ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

‘सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ‘ असं ग दि माडगूळकरांचं माणिक वर्मा यांनी गायिलेलं एक गीत आहे. साधारणपणे सावळा रंग म्हटला की प्रथम आपल्या डोळ्यासमोर येतो तो कान्हा, कृष्ण. मग लक्षात येतं की अरेच्या ! केवळ कान्हाच कुठे आहे सावळा ? राम, विष्णू, शंकर, विठ्ठल असे आपले सगळे महत्वाचे देव तर निळ्या किंवा सावळ्या रंगातच दाखवले जातात. निळा किंवा सावळा रंग. सावळा म्हणजे थोडासा काळा आणि थोडासा निळा देखील. या रंगांमध्ये खरं तर एक जादू, एक गूढ लपलं आहे बरं का ! जे जे अफाट आहे, अगणित आहे, आपल्या नजरेत न मावणारं आहे, ते ते सगळं आहे काळं किंवा निळं. नाही पटत का ? बघा, आपल्या डोक्यावर हे अनंत पसरलेलं आकाश निळ्या रंगाचं आहे. समुद्र ! अथांग पसरलेला. जिकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी. तोही निळा. हातात थोडंसं पाणी घ्या. त्याला कुठलाही रंग नाही. पण त्याच पाण्याच्या थेंबांनी बनलेला सागर मात्र निळाईची गूढ शाल ओढून आहे. रात्री मात्र हे पाणी गूढगर्भ काळं दिसतं. आणि निळं दिसणारं आकाश ? खरं तर तेही निळं नसतं. उंच अवकाशात गेलो की निळा रंग नाहीसा होऊन सर्वत्र काळ्या रंगाचं साम्राज्य आढळतं. आहे की नाही गंमत ! मग हाच निळा, सावळा आणि काळा रंग आम्हाला शतकानुशतके मोहित करत आला आहे. अगदी ऋषीमुनींपासून तो आजच्या अगदी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जनांना.

या सावळ्या रंगाची बाधा भल्या भल्या लोकांना झाली हो ! पण ज्याला ज्याला ती झाली, तो तो त्यात रंगून गेला. तो त्याच रंगाचा झाला. त्याला दुसरा रंगच उरला नाही. आणि दुसरा रंगच नको आहे. अगदी मीराबाईंचं उदाहरण घ्या ना ! त्या तर कृष्णभक्तीत आरपार रंगून गेलेल्या. एका कृष्णाशिवाय त्यांना काही दिसतच नाही. ‘ श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया.. ‘ असं म्हणताना त्या म्हणतात, ‘ लाल ना रंगाऊ , हरी ना रंगाऊ ‘. दुसरा कोणता रंग त्यांना नकोच आहे. त्या म्हणतात, ‘ अपने ही रंग में रंग दे चुनरिया…’ बस, एकदा त्या हरीच्या सावळ्या रंगात रंगले की झाले. एकदा जो कोणी या सावळ्या रंगात रंगला,त्याला अवघे विश्वच सावळे दिसू लागते. ‘ झुलतो बाई रासझुला… ‘ या सुंदर गीतात त्या अभिसारिकेला सगळेच निळे दिसायला लागते. ती म्हणते, ‘ नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा…’

तर ‘ सांज ये गोकुळी ‘ या सुंदर गीतात संध्याकाळचे वर्णन करताना कवीला सर्वत्र सगळ्याच गोष्टी सावळ्या किंवा श्याम रंगात बुडालेल्या दिसतात.

सांज ये गोकुळी सावळी सावळी अशी सुरुवात करून कवी म्हणतो. ही सांज कशी आहे तर, ‘ सावळ्याची जणू सावली. ‘

धूळ  उडवीत गायी निघाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या …. तर पुढे तो म्हणतो

पर्वतांची दिसे दूर रांग, काजळाची जणू दाट रेघ

होई डोहातले चांदणे सावळे, भोवती सावळ्या चाहुली.

संध्यासमयी दिसणाऱ्या पर्वतरांगेला एखाद्या काजळाची रेघ म्हणून कवीने तिचे सौंदर्य आणखी वाढवले आहे. आणि कवितेचा शेवट तर काय वर्णावा ! कवी म्हणतो

माऊली सांज अंधार पान्हा

विश्व सारे जणू होई कान्हा

मंद वाऱ्यावरी वाहते बासरी

अमृताच्या जणू ओंजळी

प्रसिद्ध कवी सुधीर मोघे यांचं हे अप्रतिम गीत. आशा भोसलेंनी अजरामर केलंय. शेवटच्या कडव्यात कवी म्हणतो सांज म्हणजे संध्याकाळची वेळ जणू माऊली. सगळीकडे आता अंधाराचं साम्राज्य पसरू लागलंय. अशा या संध्यासमयी अवघे विश्व जणू कान्ह्याचे रूप घेते ! संध्यासमयीचा मंद, शीतल वारा वाहतो आहे. असा हा वायू आपल्या लहरींबरोबर जणू कान्ह्याच्या बासरीचे सूर दूरवर वाहून नेतो आहे. श्रीकृष्णाची ही बासरी इतकी गोड आहे की काय सांगावं ? कवी म्हणतो, ‘ या बासरीच्या स्वर लहरी नाहीतच तर जणू अमृताच्या ओंजळी आहेत ! ‘जेव्हा सावळ्या रंगात आपण रंगून जातो, तेव्हा आपल्याला कान्हा, बासरी, त्याचा श्यामल वर्ण सगळीकडे दिसतो.

अशीच एक अभिसारिका. रात्रीच्या वेळी यमुनेवर पाणी आणायला निघालेली. रात्रीचा अंधार सगळीकडे पसरला आहे. ही सुंदर भक्तिरचना आहे विष्णुदास नामा यांची. विष्णुदास नामा हे संत एकनाथांचे समकालीन. बरेच लोक संत नामदेव आणि विष्णुदास नामा यांच्यात गल्लत करतात. पण हे दोघेही वेगळे. तर विष्णुदास नामा आपल्या सुंदर रचनेत म्हणतात

रात्र काळी घागर काळी

यमुनाजळेही काळे वो माय

रात्र काळ्या रंगात रंगलेली आहे. पाण्याला निघालेल्या या अभिसारिकेची घागरही काळ्या रंगाची आहे आणि यमुनेचे पाणीही रात्रीच्या अंधारात काळेच दिसते आहे. पुढे कवी म्हणतो

बुंथ काळी बिलवर काळी

गळा मोती एकावळी काळी वो माय

बुंथ म्हणजे अंगावर आच्छादण्याचे वस्त्र, ओढणी वगैरे. तेही काळ्या रंगाचेच आहे. तिच्या अंगावरचे सगळे दागिने एवढेच काय पण गळ्यात असणारी मोत्यांची माळ देखील काळीच आहे. ती पुढे म्हणते

मी काळी काचोळी काळी

कांस कासिली ती काळी वो माय

तिच्या अंगावरची सगळी वस्त्रे देखील काळ्या रंगाचीच आहेत. खरं तर ती गोरी आहे पण सावळ्याच्या रंगात एवढी रंगली आहे की स्वतःला ती काळीच म्हणवून घेते एवढी या काळ्या रंगाची जादू आहे. या अशा रात्रीच्या समयी अंधारात सगळीकडे जिथे काळ्या रंगाचेच साम्राज्य आहे, तेव्हा मी एकटी कशी जाऊ ? मग ती आपल्या सख्याना म्हणते

एकली पाण्याला नवजाय साजणी

सवे पाठवा मूर्ती सावळी.

अशा वेळी मला प्रिय असलेली सावळी मूर्ती म्हणजेच श्रीकृष्णाला माझ्याबरोबर पाठवा म्हणजे भय उरणार नाही. शेवटी कवी म्हणतो

विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी

कृष्णमूर्ती बहू काळी वो माय

विष्णुदासांचा ज्या मूर्तीने ताबा घेतला आहे ती मूर्तीही काळीच आहे. म्हणजेच ते म्हणतात माझा स्वामी सावळा असा श्रीकृष्ण आहे.

अशी ही सावळ्या रंगाची बाधा. गोपींपासून राधेपर्यंत सर्वांना झालेली. ऋषीमुनी, कवी देखील यातून सुटले नाही. एकदा जो या रंगात रंगला, त्याचे वेगळे अस्तित्व राहतेच कुठे? आणि वेगळे अस्तित्व हवे आहे कुणाला ? म्हणून तर मीराबाईच्या शब्दात त्याला , त्या श्याम पियाला अशी विनंती करू या की माझ्या जीवनाचे वस्त्र तुझ्या रंगात असं रंगवून टाक की

ऐसी रंग दे के रंग नाही नाही छुटे

धोबीया धोये चाहे सारी उमरिया…

बाबारे, तुझ्या रंगात मला असे रंगून जाऊ दे की संसारात येणारे व्याप, ताप या कशानेच तो रंग जाणार नाही.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

१६/०९/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हिंदू धर्मातील एक ते दहा अंकांचे महत्त्व  ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

☆ हिंदू धर्मातील एक ते दहा अंकांचे महत्त्व  ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

०१ —-

एक जननी ( मूळ माया ) :   जगदंबा

०२—-

दोन लिंग: नर आणि नारी / दोन पक्ष : शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष

दोन पूजा: वैदिकी आणि तांत्रिकी (पुराणोक्त) / दोन आयन :  उत्तरायण आणि दक्षिणायन

०३ —-

तीन देव :  ब्रह्मा, विष्णु, शंकर / तीन देवी : महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली

तीन लोक ;  पृथ्वी, आकाश, पाताळ / तीन गुण : सत्वगुण, रजोगुण, तमोगुण

तीन स्थिति :  ठोस, द्रव, ग्यास / तीन स्तर :  प्रारंभ, मध्य, अंत / तीन पडाव :  लहान, किशोर, वृद्ध 

तीन रचना : देव, दानव, मानव / तीन अवस्था : जागृत, मृत, बेशुद्ध / तीन काळ ; भूत, भविष्य, वर्तमान

तीन नाडी ;  इडा, पिंगला, सुषुम्ना / तीन संध्या ;  प्रात:, मध्याह्न, सायं / 

तीन शक्ती :  इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती

०४ —-

चार धाम ;  बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी, रामेश्वरम्, द्वारका / चार मुनी : सनत, सनातन, सनंद, सनत कुमार

चार वर्ण : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र / चार नीती : साम, दाम, दंड, भेद

चार वेद ;  सामवेद, ॠग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद / चार स्त्री :  माता, पत्नी, बहीण, मुलगी 

चार युग : सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग / चार वेळा : सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र

चार अप्सरा : उर्वशी, रंभा, मेनका, तिलोत्तमा / चार गुरु : आई, वडील, शिक्षक, आध्यात्मिक गुरु

चार प्राणी : जलचर, थलचर, नभचर, उभयचर / चार जीव : अण्डज, पिंडज, स्वेदज, उद्भिज

चार वाणी : ओंकार, आकार्, उकार, मकार /  चार आश्रम : ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास

चार भोज : खाद्य, पेय, लेह्य, चोष्य / चार पुरुषार्थ : धर्म, अर्थ, काम, मोक्ष

चार वाद्य : तत्, सुषिर, अवनद्ध, घन

०५ —-

पाच तत्व : पृथ्वी, आकाश, अग्नि, जल, वायु / पाच देवता : गणेश, दुर्गा, विष्णु, शंकर, सूर्य

पाच ज्ञानेन्द्रिय ;  डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा / पाच कर्मेन्द्रिय : रस, रुप, गंध, स्पर्श, ध्वनि

पाच बोटे : अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका, कनिष्ठा / पाच पूजा उपचार :  गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य

पाच अमृत : दूध, दही, तूप, मध, साखर / पाच प्रेतं : भूत, पिशाच, वैताळ, कुष्मांड, ब्रह्मराक्षस

पाच स्वाद : गोड, तिखट, आंबट, खारट, कडू / पाच वायू  :  प्राण, अपान, व्यान, उदान, समान

पाच इन्द्रिये : डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा / पाच पाने : आंबा, पिंपळ, बरगद, गुलेर, अशोक

पाच वटवृक्ष : सिद्धवट (उज्जैन), अक्षयवट (प्रयागराज), बोधिवट (बोधगया), वंशीवट (वृंदावन), साक्षीवट (गया)

पाच कन्या : अहिल्या, तारा, मंदोदरी, कुंती, द्रौपदी

०६ —-

सहा ॠतू : ग्रीष्म, वर्षा, शरद, वसंत, शिशिर / सहा ज्ञानाचे प्रकार: शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छन्द, ज्योतिष

सहा कर्म : देवपूजा, गुरु उपासना, स्वाध्याय, संयम, तप, दान

सहा दोष : काम, क्रोध, मद (घमंड), लोभ, मोह, आलस्य

०७ —-

सात छंद :गायत्री, उष्णिक, अनुष्टुप, वृहती, पंक्ति, त्रिष्टुप, जगती

सात स्वर : सा, रे, ग, म, प, ध, नि / सात सूर : षडज्, ॠषभ्, गांधार, मध्यम, पंचम, धैवत, निषाद

सात चक्र : सहस्त्रार, आज्ञा, विशुद्ध, अनाहत, मणिपुर, स्वाधिष्ठान, मूलाधार

सात वार : रवि, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि.. 

सात माती:   गौशाळा, घुड़साल, हाथीसाल, राजद्वार, बाम्बी ची माती, नदी संगम, ताळ

सात महाद्वीप : जम्बुद्वीप (एशिया), लक्षद्वीप, शाल्मलीद्वीप, कुशद्वीप, क्रौंचद्वीप, शाकद्वीप, पुष्करद्वीप

सात ॠषी : वशिष्ठ, कश्यप, अत्रि, जमदग्नि, गौतम, विश्वामित्र, भारद्वाज

सात धातु (शारीरिक) : रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, वीर्य

सात रंग : तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा,

सात पाताळ : अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताळ

सात पुरी : मथुरा, हरिद्वार, काशी, अयोध्या, उज्जैन, द्वारका, काञ्ची

सात धान्य :  गहू, चणे, तांदूळ, जव, मूग,उडिद, बाजरी

०८ —-

आठ मातृका :  ब्राह्मी, वैष्णवी, माहेश्वरी, कौमारी, ऐन्द्री, वाराही, नारसिंही, चामुंडा

आठ लक्ष्मी : आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी

आठ वसु : अप (अह:/अयज), ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्युष, प्रभास

आठ सिद्धि : अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व

आठ धातू :  सोने, चांदी, तांबे, शिसे, जस्त, टिन, लोह, पारा

०९—-

नवदुर्गा :शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चन्द्रघंटा, कुष्मांडा, स्कन्दमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी, सिद्धिदात्री

नवग्रह : सूर्य, चन्द्रमा, मंगल, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु, केतु

नवरत्न : हिरा, पाचू (पन्ना ), मोती, माणिक, मूंगा, पुखराज, नीलम, गोमेद, लसण्या

नवनिधि : पद्मनिधि, महापद्मनिधि, नीलनिधि, मुकुंदनिधि, नंदनिधि, मकरनिधि, कच्छपनिधि, शंखनिधि, खर्व/मिश्र निधि

१0 —-

दहा महाविद्या: काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्तिका, धूमावती, बगलामुखी, मातंगी, कमला

दहा दिशा: पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैॠत्य, वायव्य, ईशान, खाली, वर

दहा दिक्पाल : इन्द्र, अग्नि, यमराज, नैॠिति, वरुण, वायुदेव, कुबेर, ईशान, ब्रह्मा, अनंत

दहा अवतार (विष्णुजी):  मत्स्य, कच्छप, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्कि

दहा सती :  सावित्री, अनसूया, मंदोदरी, तुलसी, द्रौपदी, गांधारी, सीता, दमयंती, सुलक्षणा, अरुंधती. 

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ महाश्वेता… सुश्री सुधा मुर्ती ☆ प्रस्तुती – सुश्री भावना राजेंद्र मेथा ☆

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ महाश्वेता… सुश्री सुधा मुर्ती ☆ प्रस्तुती – सुश्री भावना राजेंद्र मेथा ☆

इन्फोसिस फौंडेशनची विश्वस्त या नात्याने मला रोज ढिगाने पत्रे येतात. येथे आम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी लोकांना आर्थिक मदत देत असतो. स्वाभाविकच गरजू आणि मदतीची फारशी गरज नसलेले, असे दोन्ही प्रकारचे लोक आम्हांला पत्रे लिहितात. या दोन्ही प्रकारच्या लोकांमधून नेमके खरे गरजवंत ओळखून काढणं, हे खरं तर फार कठीण काम आहे.

अशीच एक सोमवारची सकाळ. त्या दिवशी पत्रांचा नुसता पाऊस पडला होता. मी एकेक पत्र वाचत होते. माझ्या सेक्रेटरीने मला सांगितलं, “मॅडम एक लग्नपत्रिका आली आहे व त्यासोबत एक हस्तलिखित खाजगी चिठ्ठी पण जोडली आहे. तुम्ही त्या लग्नाला जाणार आहात ?”

मी कॉलेजात अध्यापनाचं काम करत असल्याने मला माझ्या विद्यार्थ्यांकडून नेहमीच लग्नाची बोलावणी येत असतात. त्यामुळे ही पत्रिका माझ्या एखाद्या विद्यार्थ्यांचीच असेल असं मला वाटलं. पण पत्रिका उघडून वाचल्यावर मात्र वधू-वरांच्या नावांवरूनही काहीच बोध होईना.

सोबतच्या चिठ्ठीत हस्ताक्षरात लिहिलं होतं, “मॅडम, तुम्ही जर लग्नाला आला नाहीत, तर ते आम्ही आमचं दुर्भाग्य समजू.”

मुलाचं वा मुलीचं नाव काही केल्या मला आठवत नव्हतं. पण उत्सुकतेपोटी मी त्या लग्नाला जायचं ठरवलं.

पावसाळ्याचे दिवस होते. लग्नस्थळ शहराच्या पार दुसऱ्या टोकाला होतं. एकदा क्षणभर तर असंही वाटलं, “कुठल्यातरी अनोळखी व्यक्तीच्या लग्नाला इतक्या दूर जाण्यात काही अर्थ आहे का ?”

लग्नसमारंभाच्या जागी पोचले, तर ते अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातील लग्न दिसत होतं. स्टेजवर फुलांची भरगच्च आरास केली होती. सिनेसंगीत मोठ्यांदा वाजत होतं. त्याकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. पावसामुळे मुलांना बाहेर अंगणात खेळता येत नव्हतं. त्यामुळे बरीच मुलं हॉलच्या आतच लपंडाव खेळून धुमाकूळ घालत होती. स्त्रियांच्या अंगावर बंगलोर सिल्क, म्हैसूर क्रेप सिल्क अशा साड्या होत्या.

व्यासपीठावर उभ्या असलेल्या वधू-वरांकडे मी निरखून पाहिलं. कदाचित त्यांच्यातील कोणी माझा विद्यार्थी असेल, नाही तर एखादे वेळी दोघेसुद्धा असतील. तिथे त्या गर्दीत मी उभी होते. कुणाची ओळख नाही, पाळख नाही. काय करावं ते मला समजेना.

इतक्यात एक वयोवृद्ध गृहस्थ माझ्यापाशी आले आणि म्हणाले, “तुम्हाला वधू-वरांना भेटायचंय का ?”

मग मी त्यांच्यापाठोपाठ स्टेजवर गेले, स्वत:ची ओळख करून दिली आणि त्यांना ‘वैवाहिक जीवन सुखाचे जावो’, अशा शुभेच्छा दिल्या. ते दोघे खूप आनंदात होते. ‘यांची नीट विचारपूस करा’, असं नवऱ्यामुलाने त्या वृद्ध गृहस्थांना सांगितलं. तरीही माझ्या मनात तो प्रश्न वारंवार डोके काढतच होता. ‘हे लोक कोण आहेत ? त्यांनी ही अशी चिठ्ठी मला का पाठवली असेल ?’

ते गृहस्थ मला जेवणाच्या हॉलमधे घेऊन गेले व त्यांनी मला खाण्यासाठी फराळाचे आणले. आता मात्र फार झालं. हे लोक नक्की कोण, हे जाणून घेतल्याशिवाय मी काहीही खाणार नाही, असं मी ठरवलं.

माझ्या मनाची चलबिचल पाहून ते गृहस्थ हसले आणि म्हणाले, “मॅडम,मी नवऱ्यामुलाचा पिता. ही जी मुलगी आहे ना मालती, हिच्या प्रेमात माझा मुलगा पडला. आम्ही दोघांचं लग्न ठरवलं. साखरपुडा झाल्यानंतर मालतीच्या अंगावर कोड उठलं. माझ्या मुलानं लग्न करण्यास नकार दिला. आम्हांला सर्वांनाच खूप वाईट वाटलं. तिच्या घरच्या लोकांना तिच्या भविष्याची चिंता वाटू लागली. कुटुंबातील वातावरणच सगळं बिघडून गेलं. घरातील ताणतणाव सहन होईना, म्हणून माझा मुलगा वारंवार लायब्ररीत जाऊन बसे. एक महिन्याने तो माझ्यापाशी आला, आणि म्हणाला, मी मालतीशी लग्न करण्यास तयार आहे. आम्हांला सर्वांनाच आश्चर्य वाटलं व आनंदही झाला. आज आता लग्न आहे.”

पण तरीही माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालंच नव्हतं. या सगळ्यात माझा संबंध कुठे आला ? पण त्या प्रश्नाचं उत्तर वरपित्याने लगेच दिलं.

“मॅडम, या काळात त्यानं तुमची ‘महाश्वेता’ ही कादंबरी वाचली होती, असं आम्हांला मागाहून समजलं.” ते म्हणाले,  “माझ्या मुलाची परिस्थिती पण अगदी त्या पुस्तकातल्या गोष्टीसारखीच होती. त्याने ती कादंबरी किमान दहा वेळा वाचली व त्यातील मुलीचं दुःख त्याला जाणवलं. त्याने एक महिनाभर विचार केला आणि ठरवलं- आपण त्या कादंबरीतल्या माणसाप्रमाणे आता आपली जबाबदारी झटकून टाकून नंतर त्याबद्दल पश्चात्ताप करत बसायचं नाही. तुमच्या कादंबरीनं त्याच्या विचारांमधे परिवर्तन घडवून आणलं. “

आता काय घडलं ते माझ्या लक्षात आलं.

त्यानंतर मुलाच्या वडिलांनी एक पार्सल आणलं व अत्यंत आग्रहाने मला या भेटीचा स्वीकार करायला लावला. मी जरा घुटमळले. पण त्यांनी ते जबरदस्तीने माझ्या हातात ठेवलं आणि म्हणाले, “ही साडी मालतीने खास तुमच्यासाठी आणली आहे. ती तुमच्याशी नंतर बोलणार आहे.”

पाऊस जोराने कोसळू लागला. हॉलमधे पाणीच पाणी झालं. माझी सिल्कची साडी भिजत होती. पण मला त्याचं काही वाटलं नाही. मला खूप खूप आनंद झाला होता. माझ्यासारख्या एखाद्या सामान्य व्यक्तीच्या योगाने कोणाचं आयुष्यच बदलून जाईल, असं मला स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं.

मी जेव्हा कधी ती साडी नेसते, तेव्हा मला मालतीचा आनंदाने उत्फुल्लित झालेला चेहरा आणि महाश्वेता पुस्तकाचं मुखपृष्ठ डोळ्यासमोर तरळतं. माझ्याकडे असलेली ती सर्वात मौल्यवान साडी आहे.

लेखिका :सुधा मूर्ती.

अनुवाद :लीना सोहनी

संग्राहिका :भावना राजेंद्र मेथा, महाड, रायगड.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नाती जुळण्याआधीच सूर बिघडतांना… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? मनमंजुषेतून ?

☆ नाती जुळण्याआधीच सूर बिघडतांना… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

मध्यंतरी एका वाचनप्रेमी व्यक्तीने एक विषय  दिला. त्यांना ह्या विषयावर एका कार्यक्रमात बोलायचे होते. तेव्हा काही मुद्दे सुचतं असतील तर सांगा असा त्यांचा मेसेज आला. विषय होता, -” नाती जुळण्याआधीच सूर बिघडतांना “…    

विषय खूप गहन होता पण आजच्या काळात हा अनुभव सर्रास दिसायला लागणं हे एक सुदृढ कौटुंबिक स्वास्थ्यासाठी हानिकारक लक्षण होतं. हा विषय मनात आल्यावर तऱ्हेतऱ्हेचे विचार मनात उमटायला लागले.

लहानपणी आपल्या खूप भन्नाट कल्पना असतात. तेव्हा वाटायचं.. आज बी पेरली वा रोप लावले तर लगेचच त्याचा वृक्ष तयार होतो. तेव्हा आजोबांनी खूप छान समजावलं होतं. बी रुजल्यानंतर कोंब फुटून वाढीला सुरुवात होते. ही प्रक्रिया नैसर्गिक असली तरी काळजी घेऊन, वेळ देऊन मगच कुठे ते रोपटं बाळसं धरायला लागतं आणि त्याचा वृक्ष होईपर्यंत बराच काळ, खूप सा-या संकटांचा सामना करून, टक्केटोणपे  खाल्यानंतर कुठे तो वृक्ष तयार होतो.

सगळ्यांचं आता हळूहळू वयं वाढलं तसे अनुभव गाठीशी जमा झालेत, उन्हाळे पावसाळे बघून झालेत व बहुतेक सगळ्यांनाच अनेक दिव्य कसोट्यांना पार करावं लागलं आहे, तेव्हा कुठे ही प्रत्येकाची संसाराची नौका जरा स्थिरस्थावर झालीयं हे प्रत्येकाला जाणवलं. नात्यांचंही पण वृक्षासारखचं असतं. ते नातं रुजू द्यावं लागतं, फुलू,बहरू द्यावं लागतं,ते जपावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परस्परांना समजून घ्यावं लागतं,काही मिळवितांना काही सोडावं सुद्धा लागतं, तेव्हा कुठे ते नातं चांगलं टिकलं, मुरलं असं आपण म्हणू शकतो.

दुर्दैवाने आजच्या नवीन पिढीजवळ वाट बघण्यासाठी वेळ नसतो, संयम नसतो, त्याग हा शब्द डिक्शनरीमधून खोडून टाकलेला असतो आणि त्यामुळे हे रुजण्याच्या उद्देशाने निर्माण झालेलं नवीन नातं बहरण्याऐवजी कोमेजत जातं. आणि वेळीच सावरलं नाही तर पार निर्माल्य होतं. अर्थात हे आजकाल वाढत्या घटस्फोटाच्या प्रमाणावरूनच लक्षात येतं.

नवीन नात्यांना आकार देतांना एक गोष्ट पक्की…  कुठल्याही दोन व्यक्तींचे शंभर टक्के सूर जुळणं शक्यच नसतं. कारण प्रत्येक जीव हा वेगवेगळी अनुवंशिकता, परिस्थिती, दृष्टिकोन व मानसिकता ह्यातून घडलेला असतो. वैवाहिक सूर जुळवितांना दोघांनाही स्वतःचे सूर जुळविण्यासोबतच बाकी इतर नातीसुद्धा सांभाळावीच लागतात. नवीन पिढी खरोखरच खूप हुशार, जिद्दी आणि ठाम मतांची आहे. त्यामुळे त्यांनी थोडी तडजोड केली, थोडासा स्वार्थ बाजूला सारला, तर हे संकट संपूर्ण नेस्तनाबूत होऊन नवीन मुलं आपल्या बौद्धिक प्रगतीच्या जोरावर जास्त उत्तम प्रकारे संसार करु शकतील. त्यामुळे लग्न करतांना प्रत्येकाने हे वैवाहिक शिवधनुष्य योग्य रितीने कसे पेलता येईल ह्याचा आधी जरूर विचार करून, आपली स्वतःची मानसिकता बदलवून, एक निराळा दृष्टिकोन समोर ठेऊन, ह्या संसारात पडण्याची तयारी करावी. प्रत्येकाने दुसऱ्याकडे टक लावून बघण्याआधी वा परीक्षा बघण्याआधी स्वतःकडे पारखून बघून पहिल्यांदा स्वपरीक्षण करणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्याची क्षमता जाणण्याआधी स्वतःची कुवत प्रामाणिकपणे अभ्यासावी. एक नक्की… खरोखरच सहजीवन  जगून त्याचा आनंद लुटायचा असेल तर मग प्रत्येकाने दोन पावलं स्वतः आधी मागे यायला शिकावचं लागेल.

एक सगळ्यातं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले सूर नीट जुळण्याआधीच नवीन जीव जन्माला घालण्याची घाई अथवा धाडस करुच नये. नाहीतर येणाऱ्या जीवावर तो एक मोठा अन्याय ठरेल हे नक्की. नवीन जीवाची परवड करण्याचा प्रमाद तरी आपल्या हातून घडणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

कदाचित ब-याच जणांच्या मते तडजोड हा मूर्खपणा असेल. तरीही एक नक्की की, तडजोडीने कदाचित आपल्याला सुख नाही लाभत, पण आपण न केलेल्या तडजोडीमुळे कित्येक आपल्याशी जोडलेल्या व्यक्ती ह्या दुःखी होऊ शकतात. म्हणून सुखी जरी नाही म्हणता आलं, तरी साध्यासरळ संसारासाठी ” तडजोड ” हा एक उत्तम मार्ग ठरु शकतो. आणि वारंवार कराव्या लागणाऱ्या तडजोडीनंतर एक दिवस हा तुमचाच असतो आणि त्या दिवसानंतर हसतमुखाने  घरच्यांनी मान्य केलेले बाकीचे उर्वरित पण दिवस तुमचेच येतात हे नक्की…. असो हा विषयच न संपणारा विषय आहे. तेव्हा तूर्तास आजच्यासाठी येथेच थांबते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘बसणे’ शब्दाचे विविध अर्थ ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ बसणे’ शब्दाचे विविध अर्थ ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

वसंत सबनीस मुलाखत घेत होते.

त्यांनी पु लं ना विचारले –

“तुम्ही प्रत्यक्षात लिहिलेले नाटक रंगभूमीवर उभं करता – असं असताना आम्ही ते ‘बसवले’ असे का म्हणता?”

पु ल :- “त्याचं असं आहे, लिहिलेले नाटक नीट ‘बसवलं’ नाही, तर प्रेक्षक उभे राहून चालायला लागतात आणि नीट ‘बसवलं’ तर नाटक उभं राहून चालतं आणि प्रेक्षक शेवटपर्यंत ‘बसून’ राहतात.

त्यातून मला प्रेक्षकांसाठी नाटक लिहायची खोड आहे. त्यामुळे चालणारे नाटक आणि ‘बसणारे’ प्रेक्षक असे गणित जमवायचे असेल, तर त्या नाटकाला आधी नीट ‘बसवावं’ लागतं.

बाकी मराठीतील, ‘बसणे’ हे क्रियापद जरा अवखळच आहे. धंदा चालेनासा झाला, तरी धंदा ‘बसला,’ असं आपण म्हणतो आणि चालला तर जमदेखील ‘बसतोच’.

धंदा जमला तर धंदा ‘बसला’ असं म्हणत नाही. पण प्रेम जमलं तर प्रेम ‘बसलं’ असं म्हणतो, आणि नाटक चाललं की चांगलं ‘बसलं’ आहे म्हणतो आणि नाही चाललं तरी नाटक ‘बसलं’ म्हणतो.

मला वाटतं ‘बसण्या’ विषयी इतकं ‘बस’ झालं!”

— ह्याला म्हणतात भाषेवरील प्रभुत्व.

लेखक :अज्ञात

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३८ परिव्राजक १६. बेळगांव ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३८ परिव्राजक १६. बेळगांव ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

स्वामीजी १६ ते २७ऑक्टोबर १८९२ मध्ये बेळगांवमुक्कामी आले. महाराष्ट् म्हणजे तेव्हाचा मुंबई प्रांत ! तेव्हा बेळगांव मुंबई प्रांतात होते. कोल्हापूरहून भाटे यांचे नावाने गोळवलकर यांनी परिचय पत्र दिलं होतंच.  श्री. सदाशिवराव भाटे वकिलांकडे स्वामीजींचं अत्यंत अगत्यपूर्वक स्वागत झालं. त्यांना पाहताक्षणीच हा नेहमीप्रमाणे एक सामान्य संन्यासी आहे अशी समजूत इथेही झाली असली तरी त्यांचं काहीतरी वेगळेपण आहे हे ही त्यांना जाणवत होतंच. भाटे कुटुंबीय आणि बेळगावातले इतर लोक यांना कधी वाटलं नव्हतं की काही दिवसांनी ही व्यक्ती जगप्रसिद्ध होईल. बेळगावचे हे श्री भाटे वकिल यांचे घर म्हणजे विदुषी रोहिणी ताई भाटे यांच्या वडिलांचे घर होय.

मराठी येत नसल्यामुळे भाटे कुटुंबीय स्वामीजींशी इंग्रजीतच संवाद साधत. त्यांच्या काही सवयी भाटेंना वेगळ्याच वाटल्या म्हणजे खटकल्या. पहिल्याच दिवशी स्वामीजींनी जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून विडा मागितला. त्याबरोबर थोडी तंबाखू असेल तरी चालेल म्हणाले. संन्याशाची पानसुपारी खाण्याची सवय पाहून भाटेंकडील मंडळी अचंबित झाली. आणखी एक प्रश्न भाटे यांना सतावत होता तो म्हणजे, स्वामीजी शाकाहारी आहेत मांसाहारी? शेवटी न राहवून त्यांनी स्वामीजींना विचारलंच की आपण संन्यासी असून मुखशुद्धी कशी काय चालते? स्वामीजी मोकळेपणाने म्हणाले, “मी कलकत्ता विद्यापीठाचा पदवीधर आहे. माझे गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांच्यामुळे माझे जीवन जरी संपूर्ण बदलले असले तरी, त्याधीचे माझे आयुष्य मजेत राहणार्‍या चारचौघा तरुणांप्रमाणेच गेले आहे. संन्यास घेतल्यावर इतर सर्व गोष्टी सोडल्या असल्या तरी या एक दोन सवयी राहिल्या आहेत. पण त्या फारशा गंभीर स्वरुपाच्या नाहीत. म्हणून राहू दिल्या आहेत. पण आपोआपच सुटतील”. आणि शाकाहारीचं उत्तर पण भाटेंना मिळालं. “ आम्ही परमहंस वर्गातील संन्यासी. जे समोर येईल त्याचा स्वीकार करायचा. काहीही मिळालं नाही तर उपाशी राहायचं”.

खरच असं व्रत पाळणं ही कठीण गोष्ट होती. मनाचा निश्चय इथे दिसतो. स्वामीजी सलग पाच दिवस अन्नावाचून उपाशी राहण्याच्या प्रसंगातून गेले होते. भुकेमुळे एकदा चक्कर येऊन पडलेही होते. तर कधी राजेरजवाडे यांच्या उत्तम व्यवस्थेत सुद्धा राहिले होते. पण त्यांना कशाचाही मोह झाला नव्हता हे अनेक प्रसंगातून आपल्याला दिसलं आहे. जातीपातीच्या निर्बंधाबद्दल ही शंका विचारली तेंव्हा, आपण मुसलमानांच्या घरीही राहिलो आहोत आणि त्यांच्याकडे जेवलोही आहोत असे सांगितल्यावर, हे संन्यासी एका वेगळ्या कोटीतले आहेत हे समजायला वेळ लागला नाही.

आज लॉकडाउनच्या  काळात दारूची दुकाने उघडली तर परमोच्च आनंद झाला लोकांना. जणू उपाशी होते ते. १०ला उघडणार्‍या दुकानांसमोर सकाळी सातपासूनच उभे होते लोक ! दुकानांसमोर दारू घ्यायला रांगाच रांगा लागल्या होत्या. यात स्त्रिया सुद्धा मागे नव्हत्या. खांद्याला खांदा देऊन लढत होत्या !  हे दृश्य पाहिल्यावर स्वामी विवेकानंदांच्या शिकवणुकीची किती आवश्यकता आहे हे जाणवून मन खिन्न होते. 

एकदा भाटेंचा मुलगा संस्कृत भाषेचा अभ्यास करताना पाणीनीच्या अष्टाध्यायीतील सूत्र म्हणत होता. त्यातल्या चुका स्वामीजींनी दुरुस्त करून सांगितल्या तेव्हा या अवघड विषयाचे ज्ञान असणे ही सामान्य गोष्ट नाही असे भाटे यांना वाटले. एक दिवस काही परिचित व्यक्तींना एकत्र करून त्यांनी स्वामीजींबरोबर संभाषण घडवून आणले. त्यात एक इंजिनियर होते. ‘धर्म हे केवळ थोतांड आहे, शेकडो वर्षांच्या रूढी चालीरीती यांच्या बळावर समाजमनावर त्याचे प्रभूत्त्व टिकून राहिले आहे किंबहुना लोक केवळ एक सवय म्हणून धार्मिक आचार पाळत असतात’, असं त्यांचं मत होतं. पण स्वामीजींनी बोलणे सुरू केल्यावर त्यांना ह्या युक्तिवादाला तोंड देणं अवघड जाऊ लागलं. आणि अखेर शिष्टाचाराच्या मर्यादेचा  भंग झाल्यावर भाटेंनी त्यांना (म्हणजे एंजिनियर साहेबांना) थांबवलं. पण स्वामीजींनी अतिशय शांतपणे परामर्श घेतला. ते प्रक्षुब्ध झाले नाहीत. कोणाच्याही वेड्यावाकड्या बोलण्याने सुद्धा स्वामीजी अविचल राहिले होते. याचा उपस्थित सर्वांवर परिणाम झाला.या चर्चेचा समारोप करताना स्वामीजी म्हणाले, “ हिंदुधर्म मृत्युपंथाला लागलेला नाही हे आपल्या देशातील लोकांना समजावून सांगण्याची वेळ आली आहे. एव्हढच नाही तर, सार्‍या जगाला आपल्या धर्मातील अमोल विचारांचा परिचय करून देण्याची आवश्यकता आहे. वेदान्त विचाराकडे एक संप्रदाय म्हणून पहिले जाते हे बरोबर नाही. सार्‍या विश्वाला प्रेरणा देण्याचे सामर्थ्य त्या विचारात आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे”. स्वामीजींची ही संभाषणे आणि विचार ऐकून बेळगावचा सर्व सुशिक्षित वर्ग भारावून गेला होता.                                                         

बेळगावातील मुक्कामात रोज सभा होऊ लागल्या. शहरात स्वामीजींच्या नावाची चर्चा होऊ लागली. वेगवेगळ्या विषयांवर सभांमध्ये वादविवाद व चर्चा झडत असत. स्वामीजी न चिडता शांतपणे प्रश्नांची उत्तरे देत. कोपरखळ्या मारत विनोद करत स्वामीजी समाचार घेत असत.

या बेळगावच्या आठवणी वकील सदाशिवराव भाटे यांचे पुत्र गणेश भाटे यांनी लिहून ठेवल्या आहेत. स्वामीजी त्यांच्याकडे आले तेंव्हा ते (गणेश)  बारा-तेरा वर्षांचे होते. स्वामीजीच्या वास्तव्याने पावन झालेली त्यांची ही वास्तू भाटे यांनी रामकृष्ण मिशनला दान केली आहे. स्वामी विवेकानंदांनी या मुक्कामात वापरलेल्या काठी, पलंग, आरसा या वस्तू ते राहिले त्या खोलीत आठवण म्हणून जपून  ठेवल्या आहेत, त्या आपल्याला आजही  पाहायला मिळतात.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्त्रीची निर्मिती ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्त्रीची निर्मिती ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

देवाधिपती ज्यावेळी स्त्रीची  निर्मिती करत होते त्यावेळी  त्यांना खूप वेळ लागला…

सहावा दिवस होता,..  आणि स्त्रीची निर्मिती अद्याप बाकी होती, म्हणून देवदूताने विचारले…

“ देवा….. आपणांस इतका वेळ का लागत आहे ?? “

देवाने उत्तर  दिले…

“ ह्या निर्मितीत इतके सारे गुणधर्म आहेत की जे अनंत काळासाठी जरूरी आहेत…..

— ही प्रत्येक प्रकारच्या  परिस्थितीला सामोरी जाते….!!

—-ही आपल्या सर्व मुलांना सारखेच वाढवते, आणि आनंदी ठेवते….!!

—आपल्याच प्रेमाने, पायाला झालेल्या जखमेपासून विव्हळणा-या हृदयापर्यंत सगळे घाव भरून टाकते…..!!

—तिच्यामध्ये सर्वात मोठा गुणधर्म असा आहे की, ती आजारी पडली तरी स्वतःची काळजी स्वतःच घेते, 

    आणि तरीही अखंड कार्यरत राहू शकते…!! “

देवदूत चकित झाला, आणि आश्चर्याने त्याने विचारले…..  “ देवा,…हे सर्व दोन हातांनी करणे शक्य आहे ???”

देवाधिपती बोलले… “ म्हणूनच ही एक खास निर्मिती आहे….!!”

देवदूत जवळ जातो….स्त्रीला हात लावून म्हणतो…. “ देवा….ही खूप नाजूक आहे…!! “

देवाधिपती ~ “ हो… ही खूप नाजूक आहे..,पण हिला  खूप शक्तिशाली बनविले आहे….!! तिच्यामध्ये प्रत्येक  परिस्थितीत सामोरे जाण्याची ताकद आहे….!!

देवदूताने विचारले ~”  ही विचार सुद्धा करू शकते का…??”

देवाने उत्तर दिले. ~ “ ती विचार करू शकते, आणि मजबूत होऊन धैर्याने ‘लढा’ ही करू शकते..!! “ 

देवदूताने  जवळ जाऊन स्त्रीच्या  गालाला हात लावला, आणि म्हणाला …” देवा  गाल तर ओले आहेत….!!

 कदाचित ह्यामध्ये चुक झाली असेल…..!!” 

देवाधिपती बोलले….. “ ह्यात काहीही चुक नाही….!! हे तिचे अश्रू आहेत….!! “

देवदूत ~ “ अश्रू कशासाठी ??”

देव  बोलले ~ “ ही सुद्धा तिची ताकद आहे…!!…. अश्रू…..तिला  तक्रार  करायची आहे, प्रेम दाखवायचे आहे, आपले एकटेपण दूर करायचा हा एक मार्ग आहे….!!

देवदूत ~ “ देवा, ही आपली निर्मिती अद्भुत आहे….! आपण सर्व विचार करून ही निर्मिती केली आहे. आपण महान आहात….!!” 

देवाधिपती  बोलले ~ “ ही स्त्रीरूपी अद्भुत निर्मिती प्रत्येक पुरुषाची ताकद आहे, जी त्याला प्रोत्साहित करते, सर्वांना आनंदित पाहून ही सुद्धा आनंदी राहते…!! सगळ्याच परिस्थितीत कायम हसत राहते…..!! तिला जे पाहिजे ते ती लढून सुद्धा घेऊ शकते…!! तिच्या प्रेमात काही अटी नसतात…!! तिचे हृदय तेव्हाच विव्हळते जेव्हा आपलेच तिला धोका देतात…!! परंतु प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्याची तिची तयारी असते….!! “

देवदूत ~ “ देवाधिपती आपली निर्मिती अद्वितीय आहे, संपूर्ण आहे..!!” 

देवाधिपती बोलले ~ “ अद्वितीय नाही……तिच्यातही एक त्रुटी आहे……… ती आपली महत्ता विसरून  जाते…..” . 

लेखक – अज्ञात 

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘आधार आणि सोबत’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

 

? विविधा ?

☆ ‘आधार आणि सोबत’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

एखादा शब्द माणसाला आधार देत असतो सतत सोबत करीत असतो असं कुणी म्हंटलं तर ते खरं नाहीच वाटणार पण असा एक शब्द आहे.देहबोली!

जन्माला आल्यापासून एखाद्याला शब्दांनी जर झिडकारुनच टाकलेलं असेल तर  त्याला कायमस्वरूपी सोबत करते ती त्याच्या देहाशीच एकरूप असलेली देहबोली! आणि याचा ‘याची देही याची डोळा’ मला साक्षात्कार झाला तो जगाचा फारसा अनुभव नसलेल्या आणि नोकरीनिमित्ताने पहिल्यांदाच मुंबईत वास्तव्यास जायला लागलेल्या माझ्या नुकतीच विशी ओलांडलेल्या वयात. तेव्हा भयंकर गर्दीतला लोकलचा प्रवास म्हणजे मला एक अतिशय कठोर शिक्षाच वाटायची. पण तोही हळूहळू अंगवळणी पडत असताना त्या लोकलच्या प्रवासानेच मला अतिशय अनपेक्षित असा तो ‘दृष्टांत’ घडवलेला होता!

त्यादिवशी लोकलमधे माझ्या समोरच्या सीटस् वर पाच-सहा मुलांचा एक ग्रूप बसलेला होता. स्वतःशी अगदी हसतखेळत गप्पा मारताना एकमेकाला उत्स्फुर्त टाळ्या देणे, एखाद्याच्या पाठीत धपाटा मारणे, कुणी एखादा विनोद केला असेल तर त्याला हसून दाद देणे, त्यातल्याच कुणी एखाद्याने खोडी काढली असेल तर रुसल्याच्या अविर्भावात त्याबद्दल हसरा निषेध नोंदवणे, हे सगळं त्यांचं एकही शब्द न बोलता सुरू होतं. त्या वयापर्यंत मूकबधिरांचे प्रश्न आणि त्यांचं भावविश्व याबाबत मी पूर्णत: अनभिज्ञच होतो.त्या दिवशी मनाला झालेला अस्वस्थतेचा स्पर्श इतक्या वर्षांनंतर आजही मी विसरलेलो नाहीय!

संजीवकुमार आणि जया भादुरी यांचा ‘कोशिश’ मी मुंबईत तेव्हा पाहिला होता तो या पार्श्वभूमीवर. तो बघताना त्या दोघांच्यातल्या संवादाची विशिष्ट खूणांची देहबोली माझ्या मनाला अधिक उत्कटतेने स्पर्शून गेली ती त्याआधी मी घेतलेल्या लोकलमधील त्या अस्वस्थ अनुभवामुळेच! त्यादिवशी लोकलमधल्या प्रवासात माझी त्या विशिष्ट देहबोलीशी ओझरती ओळख झाली होती फक्त आणि आता ‘कोशिश’ने मूकबधिरांच्या त्या देहबोलीच्या मुळाशी असणाऱ्या अंतरंगाचीही मला ओळख करून दिली होती!

कोशिशचा अनुभव उत्कट होताच पण त्याहीपेक्षा मला जास्त अस्वस्थ करून गेला तो नाना पाटेकर आणि सीमा विश्वास अभिनित ‘खामोशी! ते दोघेही मूकबधिर. कनिष्ठ आर्थिक स्तरातले. त्यांच्या संसारात जेव्हा त्यांच्या लेकीचा जन्म होतो तेव्हा ती आपल्यासारखी नाहीय ना या आशंकेने ते अस्वस्थ. पण ती आपल्या चुटक्या, टाळ्यांना तात्काळ प्रतिसाद देतेय हे लक्षात येताच त्या दोघांच्या भरून आलेल्या तुडुंब नजरेतून पूर्ण चेहऱ्यावर पसरलेला अत्यानंद..! हा प्रसंग खरोखरंच सर्वच प्रेक्षकांना हेलावून सोडणारा होता.त्याच चित्रपटात आपल्या आई-बाबांची सावली बनून त्यांना आधार देणाऱ्या त्या मुलीची मोठेपणीची भूमिका केली होती मनीषा कोईरालाने. ती शिकते, यश मिळवते.आपल्या मूकबधिर आई-वडिलांनी शारीरिकदृष्ट्या हतबल असूनही प्रचंड कष्ट करुन, प्रसंगी स्वतः अर्धपोटी राहून, आपल्याला लहानाचं मोठं केलंय ही जाणीव ती विसरलेली नसते. तिच्या सत्काराच्या प्रसंगी तिचे ते मूकबधिर आई-वडील अर्थातच पहिल्या रांगेतील खुर्च्यांवरच बसलेले असतात. सत्कार स्वीकारल्यानंतर ती भाषण करायला उभी रहाते तेव्हा समोरच्या सर्व उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट थांबल्याचे समजणे शक्यच नसणारे ते दोघे अश्रूभरल्या अवस्थेत देहभान हरपून पुढे टाळ्या वाजवतच रहातात ते मोजके क्षण त्या दोघा मूकबधिरांचे दु:ख आणि अगतिकता अतिशय हळुवारपणे अधोरेखित करून जातात. या सगळ्यामुळे मनोमन अस्वस्थ झालेली त्यांची मुलगी आपलं भाषण सुरु करते तेव्हा ती काय बोलतेय हे आपल्यापर्यंत पोहोचत नसल्याची खंत आई-बाबांच्या डोळ्यांत तरळून जाते आणि ती त्याचक्षणी  त्यांच्या मुलीपर्यंत पोचतेही. त्यानंतरचं तिचं पुढचं संपूर्ण भाषण म्हणजे समोरच्या इतर सर्व श्रोत्यांसाठी शब्द आणि त्या शब्दांच्या उच्चारांबरोबरच त्या शब्दांचा अर्थ आपल्या कर्णबधिर आई-वडिलांपर्यंत पोचावा ‌ यासाठीच्या त्या शब्दांच्या अर्थाच्या मूकबधिरांच्या विशिष्ट देहबोलीतल्या अनुरुप खूणा यांच्या एकत्रित प्रवासासारखे सुरु रहाते.याद्वारे तिने व्यक्त केलेली आपल्या आई-वडिलांबाबतची कृतज्ञता त्या देहबोलीतून त्या दोघांच्या हृदयाला भिडताच आवाज भरुन आलेल्या मुलीच्या आवाजातील थरथर आणि त्या दोघांचेही भावनातिरेकाने नस न् नस हलणारे  चेहरे म्हणजे बोलीभाषा आणि देहबोली यांनी परस्पर सहकार्याने घेतलेला संबंधितांच्या मनातील भावनांचा ठावच ! आणि त्या क्षणांचा तो पूर्ण ऐवज त्याला साक्षीभूत असणाऱ्या प्रेक्षकांच्या काळजाचाही ठाव घेत असे !

इथे मूकबधिरांच्या देहबोलीचा इतका सविस्तर आढावा घेण्याचं एकमेव प्रयोजन म्हणजे माणसाच्या आयुष्यातली देहबोलीची भूमिका समजावी हेच. इथे श्रवणशक्तीच्या अभावी जन्मतःच वाचाशक्तीही मूक होऊन राहिलेल्या वंचितांना जन्मभराचा ‘आधार’ देते ती देहबोलीच ! त्यांच्यासाठी ही देहबोली खंबीर आधार देणारी तर ठरतेच आणि निशब्द राहूनसुद्धा संपर्क-संवादातलं सुख काय असतं याची प्रचितीही त्यांना देते.

आपल्या शरीराच्या अंगांगामधे देहाची ही बोलीभाषा अतिशय बारकाव्यांसह निसर्गतःच पेरली गेलेली असते. त्यामुळेच नैसर्गिक प्रेरणेनेच त्या देहबोलीतल्या  नि:शब्द भावना अगदी तान्ह्या बाळालाही उमजत असतात. म्हणूनच एखाद्या रडक्या बाळाला झोपवतानाचं त्याच्या आईचं ‘थोपटणं’ बाळ रडणं थांबवत नाहीय हे लक्षात येताच जेव्हा ‘धोपटण्या’त परावर्तित होतं तेव्हा ते त्या तान्हुल्याला आपसूक समजतं. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून ते एकतर घाबरुन रडणं थांबवतं तरी नाहीतर चिडून रडण्याची पट्टी वाढवतं तरी !

जन्मतःच असलेली ही देहबोलीची जाण मग पुढे आयुष्यभर आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दात लपलेल्या भावनांना सावली सारखी ‘सोबत’ करतच असते. किंबहुना आधी देहबोली आणि मग त्या देहबोलीचे बोट धरूनच आल्यासारखे शब्दांचे उच्चार असंच आपल्या संवादाचं स्वरूप असतं.’नाही’ या नकारात्मक उच्चाराआधी मान नकारसदृश आधी हलते न् मग ‘नाही’ या शब्दाचा उच्चार होतो. ‘होs नक्कीच’ हा होकार आधी होकारार्थी हललेली मान देते आणि नंतर त्याचे शब्दोच्चारण होत असते. देहबोलीचा मूकबधिरांना जसा ‘आधार’ तशीच आपल्यासारख्या अस्खलित बोलणाऱ्यांच्या    शब्दांनाही देहबोलीचीच ‘सोबत’!

‘नाटक’ म्हटलं की देहबोलीसंबंधी मला सर्वप्रथम आठवतो तो ‘माईम’ हा नाट्यप्रकार! केवळ हावभाव,अविर्भाव आणि हालचालीतून आकाराला आलेलं कथानाट्य म्हणजेच ‘माईम! चित्रपटातील मुकाभिनय म्हटलं की ठळकपणे नजरेसमोर येतो तो ‘चार्ली  चॅप्लीन’! या संदर्भात विशेषत्त्वाने उल्लेख करायलाच हवा तो कांही दशकांपूर्वीच्या ‘पुष्पक’  या चित्रपटातील कमल हसनच्या मुकाभिनयाचा!

चित्रपट असो वा नाटक बोलीभाषेला अनुरुप देहबोलीची जोड नसेल तर अभिनय परिणामकारक होऊच शकणार नाही.

भरतमुनींनी त्यांच्या अतिशय प्राचीन अशा ‘नाट्यशास्त्र’ या ग्रंथात अभिनयकलेच्या शास्त्रशुद्ध व्याकरणाचे सविस्तर वर्णन केलेले आहे.’देहबोली’च्या विवेचनात भरतमुनींनी सांगितलेल्या चार अभिनय प्रकारांपैकी ‘आंगिक अभिनय’ या अभिनयप्रकाराचा उल्लेख       अपरिहार्यच.मुखज, शरीर आणि चेष्टाकृत हे ‘आंगिक अभिनयाचे’  तीन उपप्रकार म्हणजे अनुक्रमे १)चेहरा, २)शरीराची खांदे,मान, हात, पाय यासारखी मुख्य अंगे, आणि ३)शरीरावयवांच्या विविध हालचाली. या खेरीज विशिष्ट भूमिका साकारताना त्या पात्रानुसार(तरुण,प्रौढ,वृध्द इत्यादी) नटाने कसे चालावे, उठावे, बसावे, याबाबतचे नियमही नाट्यशास्त्रात सांगितलेले आहेत.

अतिशय परिपूर्ण आंगिक अभिनय कसा उत्कट नाट्यानुभव देऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून मी स्वतः प्रेक्षक म्हणून अनुभवलेल्या भूमिकांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात खालील भूमिकांचा आवर्जून उल्लेख करेन.

हत्तीरोगाची सुरुवात झाल्याने जडावलेला आपला एक पाय ओढत चालणारी ‘संध्याछाया’ या नाटकातील म्हातारी (विजया मेहता), अर्धांगाचा झटका आल्याने संपूर्ण शरीराची हळूहळू वाढत जाणारी वृध्द प्रो.भानूंच्या उभ्या शरीराची थरथर आणि अखेरचे त्यांचे उभेच्या उभे खाली कोसळणे! प्रेक्षकांच्या मनाचा थरकाप उडवणारे हे दृश्य अभिनित

केले होते डाॅ. श्रीराम लागू यांनी ‘हिमालयाची सावली’ या नाटकात! पुढे दिग्दर्शक आणि प्रकाशयोजनाकार म्हणून नावारूपाला आलेले ‘दिलीप कोल्हटकर’ आणि नुक्कड या हिंदी मालिकेमुळे वेगळी ओळख मिळालेले ‘सुरेश भागवत’ यांच्या ‘जास्वंदी’ या नाटकातल्या केवळ देहबोलीतून जिवंत केलेल्या दोन बोक्यांच्या अविस्मरणीय भूमिकाही खासच.आंगिक अभिनयातील देहबोलीचे महत्त्व अधोरेखित करणारे हे प्रातिनिधिक भूमिकांचे संदर्भ  पुरेसे बोलके ठरतील !

अशी ही देहबोली! नि:शब्द,अबोल.. तरीही खूप कांही सांगू पहाणारी मूकभाषा! शब्द हरवून बसलेल्या वंचितांना भक्कम आधार देणारी जशी तशीच आपल्यासारख्या सर्वांनाही जन्मक्षणापासून अखेरच्या श्वासापर्यंत सोबत करणारीही..!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्री बालाजीची सासू… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

??

☆ श्री बालाजीची सासू… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆

श्री बालाजीची सासू, मग सासरा, नवरा, मग दीर, नणंद, आई, बाबा, भाऊ ,बहीण, मैत्रिणी, सखा , मामा, मामी, मावशी, आजी, आजोबा, पणजी, पणजोबा, खापर पणजी, खापरपणजोबा….. 

कसले लाडू, कसल्या वड्या, कसल्या भाज्या, कसल्या उसळी, कसले मुरंबे, कसले चिवडे, कसल्या चकल्या, कसली शेव ,कसले वेफर्स? 

….. हादग्याची खिरापत ओळखण्यासाठी असा शॉर्टकट आम्ही मांडत असू. पण एखादी सुगरण सांगे नाऽऽऽऽही.

मग गोड की तिखट?… तळलेले की भाजलेले?… कुठली फळं आहेत का?…. बेकरीचे पदार्थ आहेत का?…  

अशा तहाच्या वाटाघाटी सुरू व्हायच्या. चुळबुळ चुळबुळ सुरु व्हायची. पण आता उत्कंठा शिगेला पोचल्यानंतर सगळ्याजणी हार मानायच्या.

“हरलो म्हणा, हरलो म्हणा”. विजयी मुद्रेने आणि उत्फुल्ल चेहऱ्याने यजमानीणबाई डबा घेऊन उभी असे. पण डब्याचं झाकण उघडण्यापूर्वी पुन्हा एकदा कन्फर्म करत असे.

१) लाह्याच्या पिठाचा उपमा कुणी म्हटलंय का?

२) फुटाणे कुणी म्हटलंय का?

३) गुलगुले कुणी म्हटलंय का?

४) शेंगोळी कुणी म्हटलंय का?

५) ढोकळा कुणी म्हटलंय का? 

किंवा एखादी गाणं म्हणायची….. ” हरलीस काय तू बाळे? गणगाची उसळ ही खुळे.”

मग आम्ही सगळ्या “खुळ्या”आनंदाने त्या खिरापतीला न्याय द्यायचो. डबा उघडला जायचा. सर्वांना खिरापत मिळायची. त्यावेळेला द्रोण, वाट्या, चमचे, डिश यांचे फॅड नव्हते. प्रत्येकीच्या तळहातावर चमचाभर खिरापत घातली जायची. तेवढ्यानेही आमचे समाधान व्हायचे. सगळेच मध्यमवर्गीय. घरात एकटा मिळवता आणि सात आठ  खाणारी तोंडे. तुटपुंज्या पगारात भागवताना नाकी नऊ येत. पण तरीही हादग्याची खिरापत केली जायचीच. सगळीकडे खिरापत ” परवडणेबलच  ” असायची. 

श्री बालाजीची सासू याचा अर्थ खालील प्रमाणे….. 

श्री = श्रीखंड,

बा = बासुंदी, बालुशाही

ला = लाडू, लापशी, लाह्या

जी = जिलेबी

चि = चिवडा, चिरोटे

सा = साटोरी, सांजा, साळीच्या लाह्या

सू = सुतरफेणी, सुधारस, सुकामेवा … वगैरे 

त्याचप्रमाणे श्री बालाजीच्या इतर नात्यांवरून पदार्थ ओळखायचे….. 

उदा. भाऊ.. भा= भातवड्या (तळलेल्या किंवा भाजलेल्या),भात, भाकरी…… अक्षरशः फोडणीचा भात ,भाकरी यांना सुद्धा खिरापतीचा मान असायचा. कुणीच कुणाला नावं ठेवत नसे. ओळखण्याचा आनंद आणि हादग्याचा प्रसाद म्हणून गट्टम करायचा.

ऊ = उंडे, उपासाचे पदार्थ. एका केळ्याचे, रताळ्याचे, काकडीचे, छोट्या पेरूचे दहा तुकडे करून एक एक तुकडा हातावर ठेवला जायचा…….. खिरापत कोणतीही असो.  ओळखण्याच्या आनंदानेच पोट भरून जात असे.

मग आमचा घोळका पुढच्या घराकडे निघायचा.

उगारला आम्ही चाळीतले सगळे मध्यमवर्गीय..  घरोघरी असा हादगा साजरा करत असू. भिंतीवर एक खिळा मारून हादग्याचा कागद लावत असू. त्या रंगीत चित्रात समोरासमोर तोंड करून दोन हत्ती उभे असायचे. दोघांच्या सोंडेत माळा धरलेल्या असायच्या. त्याला सोळा फळांची माळ घातली जायची, त्यात भाज्या देखील असायच्या.  

१६ फळं उगारसारख्या खेडेगावात मिळणं मुश्किल. बंगल्यातल्या मुलींच्या घरात फळझाडे भरपूर असायची. बिन दिक्कत आम्ही तोडून आणत असू. हातातली काचेची फुटकी बांगडी विस्तवावर धरून ठेवली की ती वाकडी व्हायची. मग त्यात शेतातली ताजी भाजी म्हणजे वांगी, दोडका, कारली, मिरची, काकडी, भेंडी, ढबू मिरची अशा काही भाज्या  त्यात बसवायच्या. हत्तींना रोज ताज्या फुलांचा हार घातला जायचा. त्यासाठी दोन्ही बाजूला खिळे मारलेले असायचे. घरोघरी हादगा रंगायचा. आमंत्रणाची गरजच नसायची. सगळ्यांनी सगळ्यांकडे जायचेच. फेर धरायचा. मध्ये एक पाट ठेवून त्यावर हत्तीचे चित्र अंबारीसकट काढायचे. हळद, कुंकू, फुलं वाहून सगळ्यांनी पारंपारिक गाणी म्हणायची. पहिले दिवशी एक ,दुसरे दिवशी दोन अशा चढत्या क्रमाने १६ व्या दिवशी १६ गाणी म्हणायची. मग खिरापत ओळखायची. हादगा समाप्तीचा मोठा समारंभ असायचा. हादग्याच्या सगळ्या मुली, शिवाय त्यांच्या आयांना देखील आमंत्रण असायचे. घागरीत  पातेल्यात खिरापत केली जायची. सर्वांनी पोटभर खावे अशा इच्छेने आग्रह करून वाढले जायचे. ती चव, ती तृप्ती वर्षभर पुरायची. मग पुढच्या वर्षी पुन्हा नव्याने सगळा खेळ रंगायचा.

आता सर्वत्र आर्थिक सुबत्ता आली. पण वेळेअभावी एकच दिवस हादगा किंवा भोंडला खेळला जातो. पण खिरापत ओळखण्याची मजा आजही वेगळा आनंद देऊन जाते. आता घरोघरी चढाओढीने पदार्थ केले जातात. गुगलवर एका क्लिकवर अनेक अनोख्या खिरापतींची रेसिपी मिळते.  लहानपणीची “श्री बालाजीची सासू” आता सुधारक पद्धतीने आकर्षक डिशमध्ये मिळते. आम्हा महिलांना तोच आनंद पुन्हा मिळतो.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कलियुगातील राम सीता… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ कलियुगातील राम सीता… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ⭐

आज करंजाड येथून जात असताना रस्त्याच्या  कडेनं एक म्हातारं जोडपं जाताना दिसलं. माझी नेहमीची सवय असल्यामुळं, मी त्या भिकार्‍यासारख्या दिसणाऱ्या जोडप्याला, दुपार असल्यामुळं सहजच जेवणाचं विचारलं, तर ते ‘नको’ म्हणाले. मग मी त्यांना 100 रुपये देऊ केले, तर ते सुद्धा ‘नको’ म्हणाले. मग पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही असे का हिंडताय ? मग उलगडत गेला  त्यांचा जीवनपट  : 

ते 6000 कि.मी.चा प्रवास करून आता द्वारकेला स्वतःच्या घरी चालले होते. त्यांनी सांगितले, ” माझे दोन्ही डोळे 1 वर्षांपूर्वी गेले होते आणि डॉक्टरनी सांगितले की ऑपरेशन करून उपयोग नाही ; मग माझ्या आईने डॉक्टरला भेटून ऑपरेशन करायला भाग पाडलं व तिने द्वारकेच्या श्रीकृष्ण मंदिरात जाऊन देवाजवळ नवस केला की, डोळे परत आले तर माझा मुलगा पदयात्रा करत बालाजी व पंढरपूरला जाऊन परत द्वारकेला पायी येईल. म्हणून मी आईच्या शब्दासाठी पदयात्रा करतोय.” मग  मी त्यांच्या बायको विषयी विचारलं तर ” ती पण मला एकटं सोडायला तयार नव्हती ;  रस्त्याने मी तुम्हाला जेवण तयार करुन द्यायला येते   म्हणून निघाली “.  

मग मी ते 25%हिन्दी, 75%इंग्रजी बोलत असल्यामुळे शिक्षणाबद्दल विचारलं तर ऐकून माझी बुद्धी सुन्न झाली. त्यांनी लंडन येथे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 7 वर्षे खगोलशास्त्र यावर पी एच डी केलीय, तर त्यांच्या बायकोने मनोविकार  शास्त्र या विषयावर लंडन येथेच पी एच डी केलीय. एवढं शिकून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर गर्व नव्हता.   नाहीतर आपल्याकडे 10वी नापासवाला छाती ताणून   हिंडतो. एवढंच नाहीतर  सी. रंगराजन (रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर) यांच्याबरोबर ,तसेच अंतराळवीर कल्पना चावला  ह्यांच्याबरोबर काम  व मैत्रीचे संबंध होते.   तसेच त्यांना मिळणारे मासिक पेन्शन ते एका अंधांच्या ट्रस्टला  देऊन टाकतात.त्यांना दोन मुलगे व एक मुलगी असून ते लंडन येथे उच्च पदावर कार्यरत आहेत.

दोघे पती पत्नी आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटी व डाॅनबाॅस्कोचे गोल्ड मेडॅलिस्ट आहेत.असे असूनही ते गुजरात येथील द्वारका येथे कुठलीही फी न घेता गरजू विद्यार्थ्यांसाठी केमिस्टी आणि मॅथेमॅटीक्सचे क्लास घेतात.. सध्या ते सोशल मिडियापासून लांब राहतात.  रोडच्या कडेनं जाणारं प्रत्येक  जोडपं भिकारी असतंच असं काही नाही. एखादी व्यक्ती आपल्या आईच्या शब्दासाठी प्रभू राम व्हायला तयार होते आणि आपल्या पतीसोबत कोणी पत्नी सीता सुद्धा होते; म्हणूनच  भेटलेली अशी माणसे आपण कलीयुगातील राम-सीताच समजायला पाहिजेत.

आम्ही जवळ जवळ 1 तास त्यांच्याशी गप्पा मारल्या. रस्त्यावर उभे राहूनच. त्यांचे प्रगल्भ विचार ऐकून मन सुन्न झाले. अहंकार गळून गेला आणि वाटलं, की आपण  उगाचच खोट्या फुशारकीवर जगतो. त्या व्यक्तीच्या बोलण्यातील सहजपणा बघून असं वाटलं की आपण या जगात शून्य आहोत. हा  पायी प्रवास बघून थक्क झालो. प्रवासाला निघून तीन महिने झाले आणि अजून घरी पोचायला एक महिना लागेल.

त्यांचं नांव : डाॅ. देव उपाध्याय व डाॅ.सरोज उपाध्याय.

लेखका : अज्ञात

संग्राहिका : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares