मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 9 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 9 ☆ सौ. अमृता देशपांडे  

सध्याच्या digital युगाच्या झपाट्याने बदलत असलेल्या वेगानं पुढे जाणा-या जगात धावताना माणसाच्या संवेदना बोथट झाल्या आहेत की काय असे वाटू लागले आहे. जे नैसर्गिक होतं ते कृत्रिम झाले आहे. हल्ली रडावंसं वाटतं असताना रडलं तर लोक हसतील किंवा आपण कमकुवत ठरू म्हणून लोक रडण्याचं टाळतात, डोळ्यातलं पाणी परतवून लावतात. तेव्हा ते रडणारं ह्रदय घाबरतं आणि आपलं काम करताना त्याचाही तोल ढळतो. ह्रदयाच्या आजाराचं आणि अकार्यक्षमतेचं हे सुद्धा एक कारण असू शकतं. मन व शरीर यांची एकरूपता म्हणजे तंदुरुस्ती. अशी निरामय तंदुरुस्ती हवी असेल तर संवेदना बोथट होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. शारिरीक व मानसिक सुदृढतेसाठी आचार-विचार, आहार-विहार या सह हसू आणि आसू दोन्ही आवश्यक आहेत.

देवाने सृष्टी निर्माण करताना डोळ्यात पाण्याची देणगी दिली आहे. 

गाई म्हशी, कुत्रे घोडे, याकडे, हत्ती असे पशू रडून आपल्या भावना व्यक्त करतात. त्यांना अश्रू आवरण्याची बुद्धी नाही म्हणून ह्रदयाचे दुखणे नाही. या दैवी देणगी चा प्रसंगी अडवणूक  करून,  नाकारून आपण अपमान तर करत नाही ना असा विचार मनात येतो.

थोडक्यात काय तर आपल्या भावना आणि मन खुलेपणाने योग्य वेळी योग्य प्रकारे व्यक्त होणे महत्वाचे. सुख-दुःख, हसू-आसू, ऊन- सावली यांचं कुळ एकच. नैसर्गिकता. दुःख न मागता येतंच, सावली आपल्याला हवीच असते. मग आसू का नाकारायचे? ते सकारात्मतेने अंगिकारून व्यक्त करावेत. मन हलकं होतं……..

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आपलं माणूस…!!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आपलं माणूस…!!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

नुकत्याच भिकेच्या डोहातून बाहेर काढलेल्या एका आजीचं आता कसं करावं ? काय करावं ? हा विचार डोक्यात सुरू होता… ! अशातच वाढदिवसानिमित्त गौरी धुमाळ या ताईंचा मला शुभेच्छा देण्यासाठी फोन आला. 

गौरीताई पौड भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वृद्धाश्रम चालवतात. 

सहजच मी या आजीबद्दल गौरीताईंशी बोललो. त्या सहजपणे म्हणाल्या “ द्या माझ्याकडे पाठवून दादा त्यांना…! “

…. त्या जितक्या सहजपणे आणि दिलदारपणे हे वाक्य बोलल्या, तितक्या सहजपणे सध्या हा वृद्धाश्रम त्या चालवू शकत नाहीत याची मला पूर्ण कल्पना आहे. 

गौरीताई रस्त्यावर फिरत असतात…. निराधार आणि बेवारस पडलेल्या आजी-आजोबांना त्या रस्त्यावर आधी जेवू घालतात आणि त्यांना आपल्या आश्रमात कायमचा आसरा देतात. असे साधारण वीस ते बावीस आजी आजोबा सध्या त्या सांभाळत आहेत. 

एका फोटोमध्ये गरीब लोकांना भरपेट खाऊ घालताना त्या मला दिसल्या… मी त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं…. यावर त्या डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, “ दोन-तीन वर्षांपूर्वीचा फोटो आहे तो …. या दोन-तीन वर्षांत माझे हे आजी आजोबा असे भरपेट जेवल्याचे मला आठवत नाही. रोजचं दोन वेळचं जेवण हीच आमच्यासाठी चैन आहे. अनेक बिलं थकली आहेत… कधी कधी वाटतं जग सोडून जावं… पण पुन्हा या आजी-आजोबांचा विचार येतो…. त्यांच्या चेहऱ्यावरचं करुण हास्य बघून दरवेळी मी माघारी फिरते….” —- हे बोलताना गौरी ताईंचा बांध फुटतो…! 

या ताईंना हा वृद्धाश्रम चालवण्यासाठी खरं तर कोणाचीच साथ नाही, सरकारी अनुदान नाही, जे काही थोडेफार डोनेशन मिळत आहे, त्यावर इतक्या लोकांचा संसार चालणं केवळ अशक्य आहे. 

आंबा खाऊन झाल्यावर त्याची कोय जितक्या सहजपणे रस्त्यावर फेकून देतात …. तितक्या सहजपणे आपल्या आई आणि बापाला रस्त्यावर सोडणारी मुले- मुली -सुना – नातवंड आम्ही रोज पाहतो…. 

दुसऱ्याच्या आईबापाला स्वतःच्या मायेच्या पदराखाली घेणारी ही ताई मला खरोखरी “माऊली” वाटते. 

परंतु आज हीच माऊली व्याकूळ झाली आहे…. परिस्थितीपुढे हरली नाही…. पण हतबल नक्कीच झाली आहे… ! 

अशा आई-वडील, आजी – आजोबा यांना आपला मदतीचा हात गौरीताईच्या माध्यमातून देता येईल. 

नळ दुरुस्त करणारा कितीही कुशल असला तरी डोळ्यातले अश्रू थांबवायला आपलं माणूसच असावं लागतं… 

गौरीताई यांच्या माध्यमातून आपणही या अंताला पोहोचलेल्या आजी-आजोबांचं ” आपलं माणूस ” होऊया का ? 

गौरीताई धुमाळ  यांच्याशी 74988 09495 या नंबरवर संपर्क साधता येईल…!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सीट बेल्ट… श्री दिवाकर बुरसे ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ सीट बेल्ट… श्री दिवाकर बुरसे ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर  ☆ 

कार चालविताना सुरक्षिततेचे नियम पाळा. 

काल टाटा सन्सचे माजी अध्यक्ष श्री सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची वार्ता सर्वांनी वाचली असेल. ते कारच्या मागच्या आसनावर सीट बेल्ट धारण न करता बसले होते.

मित्रहो, कारच्या मागच्या सीटवर बसणारासाठीही सीट बेल्टची सुविधा उपलब्ध करून देणे कार उत्पादकांना अनिवार्य आहे. ते देतातही. कार विकत घेताना आपण त्याचे पैसे देतो. तरीही हे बेल्ट मागे बसणारे सहसा वापरतच नाहीत असे निरीक्षण आहे.

अपघाताच्या वेळी मागे बसणारा ग्रॅव्हिटीच्या ४० पट वजनाने पुढे फेकला जातो. म्हणजे ८० किलो वजन असलेला माणूस ८०x४०=३२०० किलो वजनाने पुढील चालकावर कोसळतो. मागे बसणारे आणि  कार चालक यात गंभीरपणे दुखावले जातात. कदाचित त्यांचा मृत्यू ओढवतो. केवढा हा निष्काळजीपणा !  

म्हणून मित्रांनो, कारमधून प्रवास करताना ड्रायव्हर आणि मागे बसणाराने कटाक्षाने सीट बेल्ट लावले पाहिजेत. त्यात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा करणे सर्व प्रवाश्यांच्या जिवावर बेतू शकते.

सीट बेल्ट वापरा, सुरक्षित प्रवास करा, ही ‘ यंत्रदासा ‘ची सर्व प्रवाशांना कळकळीची विनंती.

लेखक – श्री दिवाकर बुरसे, पुणे.

संग्राहक –  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार – पुष्प – भाग ३६ – परिव्राजक १४ – मध्यभारत ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार – पुष्प – भाग ३६ – परिव्राजक १४ – मध्यभारत ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

जुनागडहून स्वामीजी पालिताणा, नडियाद, बडोदा इथे फिरले. जुनागडच्या दिवाण साहेबांनी बडोद्याला जाताना ज्यांच्या नावे परिचय पत्र दिलं होतं ते बहादुर मणीभाई यांनी बडोद्याला स्वामीजींची व्यवस्था केली होती. तिथून स्वामीजी लिमडीच्या ठाकूर साहेबांखातर महाबळेश्वरला गेले. ठाकुर साहेबांनी स्वामीजींकडून दीक्षा घेतली होती. तिथे ते एक दीड महिना राहिले. त्या काळात महाबळेश्वर हे एक श्रीमंत व्यापारी आणि धनवंत संस्थानिक यांचं, दिवस आरामात घालवण्याचं एक ठिकाण मानलं जात होतं. इथला मुक्काम आणि ठाकूर यांची भेट आटोपून, ते पुण्याहून ते खांडवा इथं गेले आणि तिथले वकील हरीदास चटर्जी यांच्याकडे उतरले. दोन दिवसातच त्यांना स्वामीजी एक केवळ सामान्य बंगाली साधू नसून, ते असाधारण असं श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे हे कळलं. तिथे अनेक बंगाली लोक राहत होते, त्यांचीही स्वामीजींची ओळख झाली. काही वकील, न्यायाधीश, संस्कृतचे अभ्यासक असे लोक भेटल्यानंतर स्वामीजींचे उपनिषदातील वचनांवर भाष्य, संगीतावरील प्रभुत्व, आणि एकूणच त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व यामुळे हे लोक भारावून गेले होते.(खांडवा म्हटलं की आठवण झाली ती अशोक कुमार, अनुप कुमार आणि किशोर कुमार गांगुली यांची, हे सिनेसृष्टीतले गाजलेले कलावंत सुद्धा या खांडव्याचेच राहणारे.)

खांडव्याहून स्वामीजींनी इन्दौर, उज्जैन, महेश्वर, ओंकारेश्वर या ठिकाणी भेटी दिल्या. भारतातल्या  बारा ज्योतिर्लिंगापैकी एक शिवाचे स्थान असलेले उज्जैन शहर, महाकवी कालीदासांचे उज्जैन, दानशूर आणि कर्तृत्ववान असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचे  इन्दौर आणि महेश्वर, अशी पवित्र आणि प्रसिद्ध ठिकाणं पाह्यला मिळाल्याने स्वामीजींना खूप आनंद झाला. ही ठिकाणं फिरताना स्वामीजींना खेडोपाड्यातली गरीबी दिसली. पण त्या माणसांच्या मनाची सात्विकता आणि स्वभावातला गोडवा पण दिसला. हीच आपली खरी संस्कृती आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. याच्याच बळावर आपल्या देशाचं पुनरुत्थान घडवून आणता येईल असा विश्वास त्यांना वाटला होता. कारण त्यांना भारतातील सामान्य जनतेचं प्रत्यक्ष दर्शन झालं होतं.

या भागात त्यांनी जे पाहिलं आणि त्यांना जाणवलं ते वर्णन आपल्या दिवाण साहेबांच्या प्रवास वार्तापत्रात ते करतात. ते म्हणतात, “एक गोष्ट मला अतिशय खेदकारक वाटली ती म्हणजे, या भागातील सामान्य माणसांना संस्कृत वा अन्य कशाचेही ज्ञान नाही. काही आंधळ्या श्रद्धा आणि रूढी यांचे गाठोडे हाच काय तो सारा यांचा धर्म आहे आणि त्यातील सर्व कल्पना, काय खावे, काय प्यावे, किंवा स्नान कसे करावे एव्हढ्या मर्यादेत सामावल्या आहेत. धर्माच्या नावाखाली काहीही सांगत राहणारे आणि वेदातील खर्‍या तत्वांचा गंध नसलेले स्वार्थी व आप्पलपोटे लोक समाजाच्या अवनतीला जबाबदार आहेत”.

हा प्रवास संपवून स्वामीजी पुन्हा खांडव्याला हरीदास चटर्जी यांच्याकडे आले. हरीदास पण स्वामीजींच्या व्यक्तिमत्वावर भारावून गेले होते. त्यातच शिकागो इथं जागतिक सर्वधर्म परिषद भरणार आहे ही बातमी त्यांना समजली होती. हरीदास बाबू स्वामीजींना म्हणाले, आपण शिकागोला जाऊन हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करावे. हा विषय स्वामीजींच्या समोर याआधी पण मांडला गेला होता. धर्मपरिषद म्हणजे, विचार मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ. पण स्वामीजी म्हणाले, प्रवास खर्चाची व्यवस्था होईल तर मी जाईन. धर्म परिषदेला जायला तयार असल्याची इच्छा स्वामीजींनी पहिल्यांदाच व्यक्त केली होती.

हरीदास बाबूंचे भाऊ मुंबईत राहत होते. हरीदास बाबूंनी स्वामीजींना परिचय पत्र दिलं आणि सांगितलं की, माझे बंधू तुमची मुंबईत, बॅरिस्टर शेठ रामदास छबिलदास यांची ओळख करून देतील. त्यांची यासाठी काही मदत होऊ शकते. मध्यप्रदेशातली भ्रमंती संपवून स्वामीजी मुंबईला आले. हरीदास बाबूंच्या भावाने ठरल्याप्रमाणे स्वामीजींचा छबिलदास यांच्याशी परिचय करून दिला. छबिलदास यांनी तर स्वामीजींना आपल्या घरीच आस्थेने ठेऊन घेतले. छबिलदास आर्यसमाजी होते. स्वामीजी जवळ जवळ दोन महीने मुंबईत होते. छबिलदासांकडे स्वामीजींना काही संस्कृत ग्रंथ वाचायला मिळाले त्यामुळे ते खुश होते. छबिलदास एकदा स्वामीजींना म्हणाले, “अवतार कल्पना आणि ईश्वराचे साकार रूप यांना वेदांतात काहीही आधार नाही. तुम्ही तो काढून दाखवा मी आर्य समाज सोडून देईन”. आश्चर्य म्हणजे स्वामीजींनी त्यांना ते पटवून दिलं आणि छबिलदास यांनी आर्यसमाज खरंच सोडला. यामुळे त्यांच्या मनात स्वामीजींबद्दल खूप आदर निर्माण झाला हे ओघाने आलेच.

आता स्वामीजी मुंबईहून पुण्याला जायला निघणार होते. छबिलदास त्यांना सोडायला स्टेशनवर आले होते. रेल्वेच्या ज्या डब्यात स्वामीजी चढले त्याच डब्यात योगायोगाने बाळ गंगाधर टिळक चढले होते. ते छबिलदास यांच्या जवळचे परिचयाचे असल्याने त्यांनी स्वामीजींचा परिचय करून दिला आणि यांची व्यवस्था आपल्या घरी करावी असे टिळकांना सांगीतले. बाळ गंगाधर टिळक नुकतेच राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले होते. तर स्वामीजींना राजकारणाशी काहीही कर्तव्य नव्हते पण, हिंदूधर्माविषयी प्रेम, संस्कृत धर्म ग्रंथांचा अभ्यास, भारतीय संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान, अद्वैतवेदांताचा पुरस्कार या गोष्टी दोघांमध्ये समान होत्या. तसच भगवद्गीते विषयी प्रेम हा एक समान धागा होता. देशप्रेमाचे दोघांचे मार्ग फक्त वेगळे होते. दोघांचा रेल्वेच्या एकाच डब्यातून मुंबई–पुणे प्रवास सुरू झाला.

 © डॉ.नयना कासखेडीकर

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवरात्रोत्सव : देवीच्या मातृरूपाची उपासना ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा  ?

☆ नवरात्रोत्सव : देवीच्या मातृरूपाची उपासना ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

भाद्रपद सरत येतो, तशी पाऊसही ओसरू लागतो. मग घरोघरी सुरू होते लगबग नवरात्रोत्सवाची. कृषी संस्कृतीतून आलेला हा उत्सव. नवं धान्य शेतात तयार झालेलं असतं. वेगवेगळ्या पालेभाज्या, फळभाज्या, वेल-भाज्या यांनी शिवार डोलत असतं. सगळीकडे आनंदी – आनंद असतो. हा आनंद नवरात्रोत्सवातून प्रगट होतो. नवरात्रातील प्रथा, परंपरा बघितल्या, तर लक्षात येतं, ही देवीच्या मातृरूपाची उपासना आहे. तिच्या सृजनशक्तीचा गौरव आहे.

वर्षातून तीन वेळा आपण देवीचा उत्सव साजरा करतो. चैत्रगौर ही वैभवाची, समृद्धीची देवता आहे. तिचे सालंकृत रूप आपण मखरात बसवतो. तिच्यापुढे आरास केली जाते. गृहिणी क्ल्पकतेने नाना रूपात तिची सजावट करते. गृहिणी तिच्या त्या रूपात स्वत:ला बघते. तृप्त होते. समाधान पावते. यात सहभागी करून घेण्यासाठी नातेवाईक, शेजारणी-पाजारणी, मैत्रिणी-गडणी यांना हळदीकुंकवाला बोलावलं जातं.

भाद्रपदात येणार्याल गौरीकडे कन्यारूपात बघितलं जातं. माहेरवाशीणीसारखं तिचं कौतुक केलं जातं. तिला नटवलं, सजवलं जातं. भाजी-भाकरी, पुराणा-वरणाचं जेवण होतं. रात्री झिम्मा-फुगड्या, फेर-गाणी यांची धमाल उडते. तीन दिवसांचं माहेरपण उपभोगून गौर परत जाते.

नवरात्रात ती मातृरूपत घरोघरी अवतरते. आईच्या स्वागतासाठी घरोघरी धांदल उडते. घराचा काना-कोपरा झाडून-पुसून लख्ख केला जातो. हांतरूण-पांघरूण, जास्तीचे कपडे-लत्ते, गोधड्या-चिरगुटे धुवून स्वच्छ केली जातात. आईने म्हणायला हवे ना, लेक गुणवती आहे. घरोघरी थाळीत पत्रावळ घेऊन त्यावर माती पसरतात. त्यात गहू, ज्वारी, बाजारी, मूग, मटकी, चवळी अशी नऊ प्रकारची बी-बियाणे रुजत घालतात. या मातीच्या मधोमध असतो, मातीचा सच्छिद्र घट. त्यावर विड्याची पाने आणि त्यावर नारळ. त्यावर फुलांची माळ सोडली जाते. शेजारी अखंड तेवणारी समई किंवा निरंजन ठेवले जाते.  मातीचा घट हे पावसाची देवता, वरूणदेव याचे प्रतीक आहे तर तेवणारा दीप हे सूर्याचे. धान्य रुजण्यासाठी माती, पाणी, आणि सूर्यप्रकाशाची गरज असते. घरात असं प्रतिकात्मक शेत तयार केलं जातं. त्यातलं बियाणं हळू हळू रुजू-वाढू लागतं. अंकूर येतात आणि आई धनलक्ष्मी त्यातून प्रगट होते. नवमीपर्यंत हे अंकूर चांगले बोट-दोन बोट उंच होतात. नंतर शेजारच्या पाच मुलांना बोलावून त्याची कापणी केली जाते. ते अंकूर कानात, टोपीत खोवायचे, देवाला अर्पण करायचे, शेजारी पाजारी द्यायचे ( जशी काही आपण नव्या धान्याचा वानोळा शेजारी-पाजारी देत आहोत. ), अशी पद्धत आहे.

नवरात्राला ‘देव बसले’ असंही म्हणण्याची पद्धत आहे. या उत्सवाला आणखीही एक प्रथा जोडली आहे. त्याची मुळे पुराणकथेत आहेत. महिषासूर या उन्मत्त दैत्याने देव-मानवांना हैराण करून सोडले होते. जगणे मुश्कील केले होते. देवीने नवरात्राचे नऊ दिवस त्याच्याशी युद्ध करून, त्याचा दसर्यातच्या दिवशी वध केला. या काळात देव तपश्चर्येला बसले आणि त्यांनी त्याचे पुण्य देवीच्या पाठीशी उभे केले. देव तपश्चर्येला बसले, तेव्हा त्यांना हलवून त्यांच्या तपश्चर्येत व्यत्यय आणायचा नाही, म्हणून या काळात एरवी देवांची पूजा केली जाते, तशी पूजा केली जात नाही. आदल्या दिवशी पूजा करून एका डब्यात देव घातले जातात. याला म्हणायचं ‘देव बसले’  म्हणजे देव तपश्चर्येला बसले. दसर्या च्या दिवशी या बसलेल्या देवांना उठवतात व नेहमीप्रमाणे पूजा-अर्चा करून त्यांची देव्हार्यासत प्रतिष्ठापना केली जाते.

आई जन्म देते. पालन-पोषण करते. रक्षणही करते. तिचं जन्मदेचं रूप घरात शेत तयार करून साकार केलं जातं. देवीच्या नैवेद्याच्या रूपाने घरात वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. यातून भरण – पोषण अधीकच रूचीसंपन्न होतं.  पण पोषण केवळ शरीराचं होऊन भागणार नाही. ते मनाचंही व्हायला हवं. नवरात्रीच्या निमित्ताने, भजन, कीर्तन, प्रवचन, भाषणे होतात. गीत-नृत्य, नकला, नाटुकल्या इ. संस्कृतिक कार्यक्रम होतात. या सार्यारतून मनाचे पोषण होते. व्यक्तिमत्वाचा विकास होतो.

आई रक्षणकर्तीही असते. शत्रू नेहमी बाहेरचेच असतात, असं नाही. आपले स्वभावदोष हेही आपले शत्रूच. खोटे बोलणे, अहंकार, द्वेष, मत्सर, असे किती तरी स्वभावदोष आपलं व्यक्तिमत्व काजळून टाकतात. आपल्या मुलात हे दोष वाढू  नयेत, म्हणून आई प्रयत्नशील असते. मुलांना प्रसंगी रागावूनसुद्धा त्यांच्यातील असले दोष दूर करण्याचा ती प्रयत्न करते. नवरात्रातील, भजन, कीर्तन, प्रवचन, व्याख्याने इ. मधून याची शिकवण दिली जाते. सुसंस्कार केले जातात.

आशा तर्हे ने जन्मदात्री, पालनकर्ती, रक्षणकर्ती या तीनही दृष्टीने नवरात्रातील देवीची उपासना ही तिच्या मातृरूपाची उपासना असते. नवरात्रात अनेक घरातून पिठा-मिठाचा जोगवा मागायची चाल आहे. एकनाथांनी या प्रथेवर एक अतिशय सुंदर ‘जोगवा’ लिहिला आहे. नि:संग होऊन वारीला निघालेली ही देवीची उपासक वरील स्वभाव दोष त्यजून वारीला कशी जाते, हे बघण्यासारखे आहे. ते लिहितात,

‘अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोहमहिषासूर मर्दनालागुनी ।

त्रिविध तापाची कारवाया झाडणी । भक्तालागी तू पावसी निर्वाणी ।

आईचा जोगवा जोगवा मागेन । आईचा जोगवा जोगवा मागेन ।

द्वैत सारुनी माळ मी घालीन । हाती बोधाचा झेंडा मी घेईन ।

भेदरहित वारिसी जाईन ॥ आईचा जोगवा जोगवा मागेन ।

नवविध भक्तीचं भक्तीचं नवरात्र । धरोनी सद्भाव अंतरीचा मित्र।

ओटी भरोनी मागेन ज्ञानपुत्र। दंभ सासरा सांडेन कुपात्र ।

आता मी साजणी झाले गे नि:संग। विकल्प नवर्या्चा सोडीयेला संग ।

केला मोकळा मारग सुरंग।  आईचा जोगवा जोगवा मागेन ।

नि:संग होऊन वारीला निघालेली ही देवीची उपासिका दंभ, सासरा, विकल्प नवरा असे  सर्व  स्वभाव दोष त्यजून, पोटी ज्ञानपुत्र मागते. भेदरहित होऊन वारीला जाते. त्या उपासिकेइतके नाही, तरी काही प्रमाणात आपल्याला आपल्या स्वभाव दोषांवर नियंत्रण मिळवता आलं तर? तर आपण खर्यान अर्थाने नवरात्रोत्सव साजरा केला, असे म्हणता येईल, होय ना?

© श्रीमती उज्ज्वला केळकर

मो. 9403310170 email-id – [email protected]  

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अर्ध्यावरचा डाव जोडला…. भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अर्ध्यावरचा डाव जोडला…. भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी…. अर्ध्यावरचा डाव जोडला… अशी ही गोड कहाणी ! ) इथून पुढे 

यानंतर पुढच्या दोन दिवसात मला आणखी चार दिव्यांग तरुण भेटले….

यापैकी दोघांचे टेलरिंगचे व्यवसाय होते…. परंतु कोविड  काळात व्यवसाय थांबला… रोजच्या घरखर्चासाठी शिलाई मशीन सुद्धा मातीमोल किमतीने विकाव्या लागल्या…. दोन्ही कुटुंबे उघड्यावर पडली…! 

माणसाने नेहमी झऱ्यासारखं वहात रहावं…. कारण हे वाहणे थांबलं की याच झऱ्याचं डबकं तयार होतं…. झऱ्यावर नेहमी राजहंस येतात…. परंतु डबक्यावर मात्र येतात ते डास आणि घाणेरडे किडे…! …. यांच्याही आयुष्याचं वाहणं थांबलं…. मनामध्ये डबकं साठलं….पुढे अंधार दिसायला लागला…. आणि मग वाईट-साईट विचार या साचलेल्या डबक्यावर घोंघावायला लागले…!

या दोघांनाही शिलाई मशीन द्यायचं आम्ही ठरवलं…! 

श्री. जिगरकुमार शहा सर Upleap Social Welfare Foundation या सामाजिक संस्थेत सक्रिय – सन्माननीय सभासद आहेत.  या संस्थेमार्फत त्यांनी एक शिलाई मशीन आम्हास मिळवून दिले. …… “अर्ध्यावर फाटलेला डाव या मशीनवर शिवायचं आपण आता ठरवलं आहे …!”

उरलेले इतर दोघे…. एका चाळीत राहतात….घरासमोरच्या बोळातच काही न काही वस्तूंची विक्री करून आपलं कुटुंब चालवत होते…! कोविडच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेने दोघांचीही घरं हळूहळू लुटून नेली…! 

“आमच्या वाईट काळात आमच्याच नातेवाइकांनी आमचे पाय खेचले…. आम्हाला गाळात घातलं “  यातला एक जण डोळ्यातून येणारे अश्रू, पालथ्या मुठीने पुसत म्हणाला होता…

“ दुसऱ्याचं घर लुटायला “पोती” घेऊन येतात ती कसली “नाती” मित्रा ? अशा नात्यांचा विचार करू नकोस इथून पुढे….आणि कायम लक्षात ठेव…. आपले पाय खाली खेचणारे लोक नेहमी आपल्या पायाशीच असतात….  असे लोक फक्त आपल्या पायाशीच घुटमळतात ; परंतु ते कधीही आपल्या हातापर्यंत पोहोचू शकत नाहीत….कारण त्यांची “उंची” तितकी नसते…हातात दम आहे तोवर कुणी पाय खेचले तर विचार करू नकोस…!”

या दोघांनाही विक्रीयोग्य सर्व साहित्य देऊन ” पुन्हा त्यांना पायावर उभं करण्याचं ” आपण ठरवलं आहे…!

…. “अर्ध्यावर मोडलेले संसार पुन्हा जोडण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत…!”

यानंतर माझे सहकारी श्री मंगेश वाघमारे आणि श्री अमोल शेरेकर यांना झटपट आवश्यक त्या सर्व सूचना देऊन …. आम्ही सर्वांनी आपापसात कामे वाटून घेतली…. करावयाची कामे आणि हातात असलेला वेळ यांची सांगड घालता; सर्व बाबी एकाच दिवशी, एकाच ठिकाणी १४ एप्रिलला करण्याचे आम्ही ठरवले. माझ्या दोन्ही सहकार्‍यांनी जीवतोड मेहनत घेऊन दोन दिवसात सर्व घडामोडी जुळवून आणल्या. 

१४ एप्रिल रोजी साईबाबा मंदिर, तोफखाना, शिवाजीनगर कोर्ट पुणे जवळ, या सर्वांना एकत्र बोलावलं…. आणि या सर्व गोष्टी श्री. जिगरकुमार शहा साहेब यांच्या हस्ते या सर्व दिव्यांग व्यक्तींना अर्पण केल्या…! 

श्री जिगरकुमार शहा साहेब आणि Upleap Social Welfare Foundation दोहोंचे आम्ही ऋणी आहोत…! 

कोणताही समारंभ नाही, कसलाही गाजावाजा नाही …. रस्त्यावर मी, डॉ मनीषा, श्री जिगर कुमार आणि आमची याचक मंडळी…. यांच्या सहवासात हा हृद्य सोहळा पार पडला…! … नाही म्हणायला दुपारचं कडकडीत ऊन पडलं होतं…. सूर्य आग ओतत होता….पण खरं “तेज” मला या पाचही जणांच्या चेहऱ्यावर झळकत असलेलं दिसत होतं….! जाताना त्यातला एक जण हात जोडत म्हणाला, “ मनापासून आभारी आहे सर…. आम्ही शून्य झालो होतो….तुम्ही आम्हाला जगण्याची…. उभं राहण्याची परत संधी दिलीत…”

त्याने बोललेल्या या वाक्यावर सहज मनात विचार आला… 

प्रत्येक जण शून्यच असतो… पण प्रत्येक शून्याला त्याची स्वतःची एक किंमत असते… या शून्याची किंमत जर आणखी वाढवायची असेल…. तर “कुणीतरी” त्या शून्याच्या शेजारी जाऊन फक्त उभं राहायचं असतं “एक” होऊन…! अशाने त्या शून्याची किंमत तर वाढतेच…. पण किंमत वाढते त्या शेजारी उभ्या राहणाऱ्या “कुणातरी एकची” सुद्धा !!!

या विचारात असतानाच फोन वाजला…. पलीकडून आवाज आला, “अहो सर येताय ना ? आम्ही वाट पाहत आहोत….” मी गोंधळलो…. “कुठे यायचं आहे मी ?“

“अहो सर, आज भारतरत्न श्री बाबासाहेब आंबेडकर सरांच्या नावे पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आहे ना ? तिथे आम्ही आपली वाट पाहत आहोत, तुम्हाला आणि डॉ मनीषा दोघांनाही आज पुरस्कार आहे, विसरलात काय, मागे मी फोन केला होता …!”

— ओह…. मी या सर्व गडबडीत हे पूर्ण विसरून गेलो होतो…मी संयोजकांची मनापासून माफी मागून….

सकाळ पासून  घडलेल्या सर्व बाबी सांगितल्या…!

संयोजक मनापासून माफ करत म्हणाले…., “ आज खुद्द आदरणीय बाबासाहेब जरी इथे असते, तर ते म्हणाले असते…. ‘ इथे येवून पुरस्कार स्विकारण्यापेक्षा, तिथल्या गोरगरिबांच्या सुख-दुःखात समरस हो…. मला ते जास्त आवडेल….!’  आदरणीय बाबासाहेबांना जे आवडलं असतं…. असेच आज तुम्ही त्यांच्या जयंतीनिमित्त वागला आहात…. आम्ही तुम्हाला इथे एक पुरस्कार देणार होतो … पण तुम्ही तिथे राहून ५-५ पुरस्कार मिळवले…. अभिनंदन डॉक्टर…!!! “ हे ऐकून, माझ्या डोळ्यात पाणी तरळलं….! आदरणीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या…. या “महावीरांच्या” चरणांशी  मनोमन आम्ही नतमस्तक झालो…! 

यानंतर मग हसणारे पाच चेहरे मनात साठवत…. मी आणि डॉ मनीषा आम्ही गाणं गात निघालो ….

“अर्ध्यावरचा डाव जोडला…. अशी ही गोड कहाणी …!”

— समाप्त —

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शास्त्रीय सत्य… ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ शास्त्रीय सत्य… ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆

 १. बायका पंचेंद्रियांचा वापर करताना डावा आणि उजवा या दोन्ही मेंदूंचा वापर एकाच वेळी करतात. पुरुष फक्त डावा मेंदू वापरतात. त्यामुळे एकाच वेळेस अनेकविध काम करण्याची क्षमता पुरुषांपेक्षा बायकांकडे जास्त आहे.

२. पूर्वीच्या काळी बायका घर संभाळणे, मुले, संकटांपासून संरक्षण अशी अनेक कामे एकाच वेळेस करायच्या. त्यामुळे उत्क्रांतीच्या टप्प्यात त्यांची peripheral vision तयार झाली. कारण सगळीकडे एकाच वेळी लक्ष द्यायचे असल्याने त्यांच्या डोळ्यातील बुब्बुळे जलद हालचाल करतात . पुरूषांच्या तुलनेत बायकांची बुब्बुळेआकाराने  लहान आणि डोळ्यांतील पांढरा भाग मोठा असतो. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत बायकांची नजर जास्तीत जास्त गोष्टी झटक्यात निरीक्षित करते. याउलट पुरुषांनी पूर्वी शिकारीचे काम केले आहे. त्यामुळे त्यांची tunnel vision तयार झाली. त्यांच्या बूब्बुळ्ळांची वेगाने हालचाल होत नाही. बायकांच्या तुलनेत हं ! driving साठी अशी  tunnel vision चांगली. तर जबाबदारीच्या किंवा मोठ्या कामांकरता बायकी नजर चांगली. 

३. बायकांच्या शरीरात अँक्सिटोसिनचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते. त्यामुळे पुरुषांपेक्षा त्यांचे स्पर्शज्ञान चांगले असते.

४. पुरुषांचा मेंदू विश्रांती घेतो तेव्हा मेंदूचे 70% कार्य बंद असते. बायकांच्या मेंदूने विश्रांती घेतली तरी 90% कार्य सुरू असते. बोला आता, कोणाचा मेंदू किती active आहे ! दरवर्षी परीक्षांमध्ये बाजी मारणाऱ्या मुलींचे इथे उदाहरण देते. ……..

अजून काय सांगू ? गांधीजींनी म्हटले आहे, ‘ सत्याग्रहाच्या काळात पुरुषांपेक्षा जास्त सहनशक्ती स्त्रियांच्यात दिसून आली आहे.‘ — “रंग आणि नक्षीकाम यापलिकडेही आम्ही बरेच काही आहोत !!!! “ 

संग्राहिका : आनंदी केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अर्ध्यावरचा डाव जोडला…. भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अर्ध्यावरचा डाव जोडला…. भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

असाच एक सोमवार… पंधरा दिवसातल्या एका सोमवारी मी इथे येत असतो. इथं चौकात समोर जे मंदिर दिसतंय ना? बरोबर त्याच्या समोर एक दृष्टीहीन जोडपं रस्त्यात भीक मागत उभं असतं… या जोडप्याला लॉक डाऊन मध्ये आपण मास्क आणि सॅनिटायझर तथा तत्सम वस्तू विक्रीसाठी दिल्या होत्या. 

हे दोघेही लहानपणापासून शंभर टक्के अंध…. त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी की, यांना जी दोन मुलं आहेत ती पूर्णतः व्यवस्थित आहेत…एक लहान मुलगा आणि एक तरुण मुलगी….आणि हे दोघे…. इतकाच चौकोनी संसार !

“ती” आणि “तो” एकमेकांना सांभाळून घेत आयुष्य जगत आहेत… “ती” कधी शक्ती होते तर “तो” कधी सहनशक्ती ! 

त्याच्या लहानपणी आई-वडिलांनी दगड मातीचं घर अर्थात एक निवारा उभारला होता…. इतक्या वर्षात हा निवारा हळूहळू पडत गेला….. एक दिवस तर असा आला की, हे दोघे आपल्या मुलांना घेऊन उघड्यावरच झोपायचे. या दोघांना आणि मुलांना पाहून आसपासच्या अनेक दयाळू लोकांनी यांना पुन्हा निवारा बांधून देण्याचा प्रयत्न केला… तरीही हा निवारा पूर्ण झालाच नाही…. एके दिवशी गोळ्या-औषधं घेता घेता बिचकत तो मला म्हणाला, “डॉक्टर साहेब थोडं काम राहिलंय घराचं… तुम्हाला काही मदत करता येईल का ? मला मदत करा हो….”  तो अत्यंत कळवळून बोलत होता. …. 

कळकळ, तळमळ आणि वेदना या नेहमी डोळ्यात दिसतात … याच्याकडे तर डोळेच नव्हते…

पण ही वेदना आणि तळमळ त्याच्या आक्रसलेल्या चेहऱ्यावरून ओघळून वाहत होती अश्रू सारखी… ! 

तसा हा नेहमी हसत मुख असतो…….. पण म्हणतात ना टेबल जर स्वच्छ आणि टापटीप दिसत असेल तर समजावं, त्याचा ड्रॉवर खचाखच भरला आहे नको असलेल्या गोष्टींनी …! यानेही सर्व वेदना नक्कीच मनातल्या ड्रॉवरमध्ये    लपवून ठेवल्या असतील…. 

मी पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी गाडीवर बसलो….. समोर रस्त्याऐवजी त्याचा तो आक्रसलेला चेहरा आणि रात्री रस्त्यावर तरुण मुलगी, एक लहान मुलगा  आणि पत्नीसह असुरक्षित जागी राहणारा त्याचा संसार दिसत होता….!

त्याला खरी काळजी होती त्याच्या तरुण मुलीची….!!! 

या कुटुंबाचं नेमकं काय आणि कसं करावं? हा विचार करतच गाडी चालवत असताना एका ज्येष्ठ स्नेह्यांचा मला फोन आला. ते म्हणाले, “ अभिनंदन डॉक्टर, 14 एप्रिल रोजी आदरणीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या जयंती निमित्त आपणास ” भारतरत्न श्री बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार” जाहीर झाला आहे…नक्की या. “

“ होय होय…. धन्यवाद सर “ म्हणत मी फोन ठेवला. 

मनात पुन्हा विचार आला…. आदरणीय बाबासाहेबांना अपेक्षित असणारं गाव / राज्य / देश अजून तरी निर्माण झालंय का ? माझा त्यात हातभार कितीसा आहे ?  इतक्या मोठ्या माणसाच्या नावे पुरस्कार घेण्याची माझी खरंच पात्रता आहे का ? ……. हा विचार सुरू असताना उघड्यावर राहणाऱ्या त्या  कुटुंबातील व्यक्तींचे चेहरे पुन्हा माझ्यासमोर फेर धरून नाचू लागले…. काय करता येईल या विचाराने मी अस्वस्थ झालो…! 

या अस्वस्थतेत पुन्हा फोन वाजला…. मी अनिच्छेने फोन उचलला…. पलीकडे माझे मित्र श्री जिगरकुमार शहा होते. सच्चा दिलदार माणूस ! 

“ काम कसे सुरू आहे ? काय चाललंय ? माझ्याकडून काही मदत हवी आहे का ? “ अशा प्रकारची चर्चा सुरू असताना, फोन ठेवते वेळी ते मला म्हणाले, “ डॉक्टर तुम्हाला तर मदत करतोच आहे…. पण त्यासोबत तुम्हाला जर कोणी अत्यंत अडचणीत असलेली, मदतीची नितांत आवश्यकता असलेली कुणी अंध / अपंग व्यक्ती सापडली, तर मला नक्की कळवा…..  या वर्षात मला अशा एखाद्या व्यक्तीला डायरेक्ट मदत करायची आहे…! “

….. माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना…. मला वाटलं गाडी चालवत असताना, गोंगाटामुळे मला चुकीचं काहीतरी ऐकू आलं असावं…..जवळपास किंचाळत मी त्यांना पुन्हा विचारलं, “ सर गाडीवर आहे, नीट आवाज आला नाही,  आवाज ब्रेक होतोय…. पुन्हा एकदा बोला शेवटची वाक्ये प्लीज …! “…. मी ऐकलं ते खरं होतं…. त्यांना तेच म्हणायचं होतं ! 

मी गाडी बाजूला घेऊन थांबलो….नुकत्याच भेटलेल्या दृष्टिहीन दाम्पत्याची कर्मकहाणी मी त्यांना सांगितली…. त्यांना डायरेक्ट मदत करण्याविषयी विनंती केली…. अगदी सहजपणे ते म्हणाले…., “ Okk Doc, I don’t have any problem…. तुम्ही सांगताय म्हणजे ती व्यक्ती आणि कुटुंब Genuine असणार याची मला खात्री आहे. आजपासून या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझी.”

जिगरकुमार शहा साहेब नुसतं एवढं बोलून थांबले नाहीत…. तर त्यांनी या दृष्टिहीन दाम्पत्याच्या घराच्या खर्चासह, त्यांच्या मुलामुलीच्या शिक्षणाची आणि त्यांच्या इतर सर्वांगीण विकासाची जबाबदारी स्वतःच्या डोक्यावर घेतली आहे… !… हे सर्व करायला नुसता पैसा असून चालत नाही…. मनामध्ये दुसऱ्यासाठी काहीतरी करायची “जिगर” असावी लागते…! 

आपल्याला लागतं आणि आपल्या डोळ्यातून पाणी येतं तेव्हा होते ती “वेदना”…. परंतु जेव्हा दुसऱ्याला लागतं आणि आपल्या डोळ्यातून पाणी येतं तेव्हा जी होते ती “संवेदना”…!

….. अशा या संवेदनशील माणसाला मी मनातूनच साष्टांग नमस्कार घातला…. ! हरखून त्यांना म्हटलं, “ सर कधी करूया हे सर्व ? “

ते म्हणाले, “ १४ एप्रिलला मला सुट्टी आहे त्या दिवशी सर्व आटोपून टाकू…चलेगा ??? “ 

“ दौडेगा सर…” म्हणत मी गाडी मागे वळवली आणि त्या कुटुंबाला ही बातमी सांगायला परत निघालो…. 

यानंतर “तिच्या” आणि “त्याच्या” चेहऱ्यावर पसरलेल्या आनंदाचे चित्र रेखाटण्यास, माझी लेखणी असमर्थ आहे… ! 

उन्हानं…. घामानं आपला जीव कासावीस व्हावा …. घशाला कोरड पडावी…. आणि तेवढ्यात समोर आंब्याचं झाड दिसावं…. या झाडाच्या थंडगार सावलीत आपण टेकावं आणि इतक्यात कुणीतरी येऊन वाळा घातलेल्या माठातल्या थंडगार पाण्याने भरलेला तांब्या आपल्यासमोर धरावा…. घट घट करून, पाणी पीत आपण आपला जीव शमवावा आणि उरलेलं पाणी ओंजळीत घेऊन, चेहऱ्यावर त्याचे शिपकारे मारावेत…. यासारखी तृप्तता नाही…. ! 

…… “त्या “दोघांचे समाधानाने भरलेले चेहरे आणि जिगर साहेबांचा दिलदारपणा याने हीच तृप्तता मला लाभली… ! 

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी…. अर्ध्यावरचा डाव जोडला… अशी ही गोड कहाणी ! 

—–क्रमशः भाग पहिला… 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ म्हातारपणी भारतातच का रहावं ? ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ म्हातारपणी भारतातच का रहावं ? ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

अमेरिकेला पाच महिने राहिल्यानंतर मनात आलेले विचार सहज पणे लिहावे असं वाटलं—- यात कोणाला काही सल्ले देण्याचा हेतू नाही. आमचे पाच महीने मजेत गेले पण कायम परदेशात रहायची वेळ आली तर काय? या संबंधी विचारांच वादळ उठलं.

आमच्या किटी गृपमधे ” म्हातारपणी मुलांकडे जाऊन रहावं” असा विचार मांडला गेला. मग परत नटसम्राट हे संपूर्ण नाटक आठवलं. हे नाटक म्हणजे काही फक्त  कल्पना विलास नव्हता. नटसम्राट या नाटकाचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. या नाटकात तरूण आणि वृद्ध असं द्वंद्व आहे. हे नाटक मी तरूणपणी पाहिलं तेव्हा मला तरूणांचंच बरोबर असतं असं वाटलं, आणि आता मी लवकरच 58 होईन तेव्हा पण मला तरूणांचंच बरोबर असतं असं आजही वाटतंय. त्यामुळे असा प्रश्न मनात येतो की म्हातारपण काढण्यासाठी कोणता देश चांगला? मी जरी अजून ” तसा ” म्हातारा झालो नसलो, तरी विचार करून ठेवायला काय हरकत आहे? 

तरूणपणी परदेशात जरूर रहावं. भरपूर पैसे कमवावेत. पण साठी सत्तरीनंतर कुठे रहावं ?

” ते  ८० वर्षाचे गृहस्थ अमेरिकेत असतात सध्या त्यांच्या मुलीकडे ” हे भारतात ऐकलं की ऐकणाऱ्या भारतीयाला, ते मरण्यापूर्वीच जणू स्वर्गात गेलेत असा फील येतो. ” मोठा माणूस ! ” असं तो मनात म्हणतो. पण असं खरंच राहिलंय का ?——

एक जमाना होता की भारतात लाल गहू मिळायचा आणि मुंबई पुणे एवढ्या अंतरासाठी कधी कधी दहा तास लागायचे. नर्गीसला उपचारासाठी अमेरिकेत जावं लागायचं. आणि पाऊस पडला की अख्ख्या मुंबईत खड्डे पडायचे.

जुन्या काळात या दुर्व्यवस्थेमुळे म्हातारे काय…. तरुणांना पण भारत नकोसा वाटायचा.

पण आता नाही तसं….भारत बदललाय—-

म्हातारा माणूस म्हणून लागणाऱ्या आणि भारतात असणाऱ्या सुविधांकडे आता आपण बघू या.—-

दैनंदिन सुविधा

जमाना बदलला. Express ways आले. Foreign च्या गाड्या आल्या. Superspeciality hospitals आली

ओला उबर झोमॅटो स्विगी डंझो अमेझाॅन झेप्टो गीपे अरबन कंपनी वगैरेनी भारताचा स्वर्ग बनवला आहे. बटन दाबलं की काही क्षणात तुम्हाला आपण ठाकूर असल्याचा भास होतो, आणि गाववाले तुमची सेवा करून लुप्त होतात. अगदी माफक दरात. वस्तू नाही आवडली की परत घ्यायला दारात हजर.

अमेरिकेत अजूनही Door delivery नाही. असलीच तर फारच महाग असते. वस्तू आणायला जावी लागते. फर्नीचर स्वतः assemble करावं लागतं. शिवाय वस्तू परत करायची असेल तर गाडी काढून एका विशिष्ट पत्यावर वस्तू देऊन यावी लागते. तुमची गाडी तुम्हालाच धुवावी लागते, कपडयांना  इस्त्री स्वतःच करावी लागते. घराची साफसफाई, स्वैपाकानंतरची भांडी तुम्हालाच घासावी लागतात. अगदी एक कप चहासुद्धा आयता मिळत नाही. तरूणपणी हे ठीक आहे. पण म्हातारपणी असं काम होईल का ? तरूणपणी आपण काम करतो कारण म्हातारपणी आराम करता यावा म्हणून. मग आता म्हातारपणी सुद्धा काम काम आणि काम ?

प्रवासी सुविधा 

अमेरिकेची थंडी बघितली, आणि वसंत ग्रीष्म हे ॠतू पण बघितले. भारतात ३६५ दिवसांपैकी ३६० दिवस तरी हवा उबदार असते. बाहेर जाण्यासाठी कोणतीही नैसर्गिक विपदा वगैरे नसते. Occasional driver मागवून, ओला, उबर, रिक्षा वगैरेने सहज प्रवास करता येतो. हे मी खूप वय झालेल्या किंवा  driving न येणाऱ्यांसाठी लिहीत आहे. परदेशात हीच गोष्ट dependency निर्माण करते. बऱ्याच ठिकाणी public transport नसतो. मग घरात अडकून राहिल्यासारखं वाटू शकतं. प्रचंड थंडी असल्यामुळे घरात कपड्यांचा एक लेयर, घराबाहेर पडताना चार लेयर, परत गाडीत दोन लेयर आणि उतरताना चार लेयर असे सोपस्कार करत बसावं लागत. तरूणपणी याची चटकन सवय होते, पण म्हातारपणी movement स्लो होतात. आणि त्याचा त्रास होतो. थंडीचे सात महिने बाहेर वाॅक वगैरे करता येत नाही.  घरात सोय नसेल तर शरीराला चालतं ठेवण्यासाठी असलेला किमान व्यायाम कसा करणार ? भारतात धुळीने भरलेले रस्ते आहेत, किचाट आहे, गर्दी आहे, घाणेरड्या सवयी असलेले लोक आहेत. पण सगळा भारत काही घाणेरडा नाही…हे सहन करणं शक्य नाही का ? तेवढे एरियाज टाळणं शक्य नाही का ?

आरोग्याच्या तक्रारी 

भारतात X ray, sonography वगैरे OPD सुविधा सहज accessible असतात. त्यासाठी Dr वगैरेचं prescription लागत नाही.  पुन्हा त्याचे result normal असतील तर ते लगेच कळतं. “सगळं काही नाॅर्मल आहे” असं तो Technician च आपल्याला सांगतो. रिपोर्ट हातात ठेवतो. अमेरिकेत Specialist च्या उरावर परत डाॅलर घालून तुम्हाला तुम्ही नाॅर्मल असल्याचं ऐकाव लागतं.

भारतात दर तीन वर्षानी माफक दरात Full check up करता येतो. अमेरिकेत दाढ भरायला कमीत कमी हजार डाॅलर खर्च येतो—–यावरून इतर रोगांचा अंदाज करा. कॅनडा यूकेत वगैरे फ्री मेडिकल system आहे, पण आपल्याच भारतीयांनी ती abuse केली आहे त्यामुळे आता ती अतिशय निकृष्ठ आहे.

साठीनंतर अशी बरीच औषधं जी OTC नसतात, पण भारतात ती फार्मसीमधे ओळखीवर मिळतात. भारतात पुन्हा पुन्हा त्याच निदानासाठी आणि prescription साठी स्पेशालिस्टच्या उरावर शेकडो डाॅलर घालावे लागत नाही. त्यामुळे जीवन सुसह्य होतं. कधी कधी आपल्यालाच माहीत असतं की आपल्याला विशेष काही झालेलं नाही. काही औषधं केमिस्टकडून आणून पटकन बरं होता येतं. याउलट अमेरिकेत तुम्हाला तडफडत रहावं लागतं. कारण 

US मधे Prescription शिवाय औषधं मिळत नाहीत—Appointment शिवाय डाॅक्टर भेटत नाही— आणि Appointment लगेच मिळत नाही.—-आणि अगदी मरायला टेकल्याशिवाय emergency मधे घेत नाहीत. औषधं तर प्रचंड महाग. अगदी डाॅलरला रुपया समजलात तरी. परावलंबी झाल्यावर भारतात माणूस ठेवणं जास्त स्वस्त नाही का ?

उदरभरण

भारतात मनुष्यबळ सहज उपलब्ध आहे. एकटं असणाऱ्या म्हाताऱ्यांसाठी वेगवेगळे फूड options आहेत. स्वैपाकाला माणूस ठेवण्यापासून डबा आणण्यापर्यंत सोई आहेत. एखाद्या बाईला जरी स्वैपाकाची खूप आवड असली, तरी कधीतरी आयतं जेवायला द्यावं असं वाटतं. अमेरिकेत ते कसं करणार ? घरपोच काही मिळत नाही. घरगुती अन्न आणायचं तरी स्वतः गाडी काढून घ्यायला जावं लागतं. 

अर्थार्जन

कोणी कितीही उच्च पदस्थ म्हणून रिटायर झाला तरी जर developed country मधे उर्वरीत आयुष्य काढायचं असेल तर नोकरी ही करावीच लागते. डबोल्यावर दिवस काढता येत नाहीत. परदेशातील बहुसंख्य देशात आता retirement age 67 ते 69 आहे. त्याशिवाय पेन्शन मिळत नाही—मला वाटतं हा एक अमानुष प्रकार आहे. नोकरीमुळे माणसाला जीवनात मोकळा वेळ मिळालेला नसतो, जो रिटायरमेंट नंतर मिळतो. काही माणसं मुश्किलीने सत्तरी गाठतात आणि लुडकतात. मग या लोकानी काय नोकरी करताकरताच देह ठेवायचा का ?

एकटेपणा

अमेरिकेत पाचपाचशे घरं असलेल्या कम्युनिटींमधे चिटपाखरू रस्त्यावर दिसत नाही. आज माझ्या नातीला मी खिडकीत उभं राहिलो तरी चालणारी पंपं दाखवू शकत नाही, पक्षी दाखवू शकत नाही. अर्ध्या तासाने एक गाडी येते. एखादा पक्षी दिसतो. अशा ठिकाणी म्हातारा माणूस बोअर होणार नाही का?. माझे सत्तरीपूर्वी खूप अबोल असलेले आजोबा, सत्तरीनंतर खूप बोलू लागले होते. त्यांच्या तरूणपणच्या खूप गोष्टी ते परत परत सांगत असत. पण परदेशात म्हाताऱ्यांना श्रोता कोण ? आणि केवळ मुलं जवळ आहेत म्हणून हा एकटेपणा सहन करायचा का ?

स्पेशल assistance साठी किती डाॅलर मोजायचे ?

बघा विचार करा. तुमचे विचार तुम्ही मांडाल अशी अपेक्षा आहे.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गरजेचे नियम… ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ गरजेचे नियम ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

जग हे गरजेच्या नियमानुसार चालत असतं—–

थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो.

तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल!

हवेची पण गंमत असते, चाकातून गेली की चाक पळत नाही.

डोक्यात गेली की, चांगलं-वाईट कळत नाही.

आणि श्वासोच्छवास सोडून गेली की, घरात कोणी ठेवत नाही!

माणसाचे दोन गुरू असतात एक अनुभव आणि दुसरे कर्म– हे दोघेही सोबत राहतात.

कर्म हे लढायला शिकवत असते आणि अनुभव हा जिंकायला शिकवत असतो! 

या जगात जो तो आपल्याकरिता जगतो हेच खरे. वृक्षवेलींची मुळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात, तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात. याला जग कधी प्रेम म्हणते, कधी प्रीती म्हणते, तर कधी मैत्री—पण खरोखरच हे आत्मप्रेम असते! 

जबाबदारी घेताना “मी”, आणि श्रेय घेताना “आपण” हा शब्द जर केंद्रस्थानी असेल, तर कुठलेही काम सहज निःसंशय पूर्ण होतॆ!

थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते, पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही. म्हणूनच शरीर थकले तरी चालेल, परंतू मनाला कधीही थकू देऊ  नका!

जगण्याचा तोल हा असा असतो. कुणाला क्षणभराचे रंग मिळतात, कुणाला सुंदर क्षण मिळतात, कुणाकडे जग सहज मान उंचावून पाहते, तर कुणाला मिळते फक्त जगण्याचं बीज. त्यातून आपापलं फुलायची जादू मात्र शिकून घ्यायची असते. एकदा ती जादू आली की रंग कुणाकडे मागावे लागत नाहीत. ते उमलत राहतात…… बहरत राहतात ‼️

संग्राहक : विनय गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares