मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महाभारतातील  “नऊ सार सूत्रे” ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ महाभारतातील नऊ सार सुत्रे… – लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

महाभारतातील  ” नऊ सार सूत्रे  “

१) ” जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर शेवटी आपण असहाय्य व्हाल ” – कौरव.

२) ” तुम्ही कितीही बलवान असा, परंतु अनीतिने तुमचे ज्ञान, अस्त्र, शस्त्र, सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील.”- कर्ण.

३) ” मुलांना इतके महत्वाकांक्षी बनवू नका की, विद्येचा दुरुपयोग करीत स्वत:चा नाश करुन घेऊन सर्वनाशाला आमंत्रण देईल.”-  अश्वत्थामा.

४) ” कोणाला असे वचन कधीही देऊ नका, की तुम्हाला अधर्मासमोर शरण जावे लागेल.” – भीष्म पितामह.

५) ” संपत्ती, सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरूपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्म-विनाशाचे दर्शन घडविते ” – दुर्योधन.

६) ” विचाराने अंध व्यक्ती म्हणजे मद्य, अज्ञान, मोह, काम आणि सत्ता देखील  विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते.”- धृतराष्ट्र.

७) ” मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाशी घातली असेल तर विजयाची खात्री पक्की आहे.”  – अर्जुन.

८) ” प्रत्येक कामात छल व कपट निर्माण केल्याने आपण नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही.”-  शकुनी.

९) ” नीति, धर्म आणि नियत या कर्माचे नियम पाळल्यास जगातील कोणतीही शक्ती आपल्याला पराभूत करू शकत नाही.”   – युधिष्ठिर.

या नऊ सूत्रांकडून धडा घ्या, अन्यथा महाभारत होणे निश्चित आहे.

जो इतरांना संपविण्याची तयारी करतो, तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो व संपतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे.

दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा त्याला चांगली वाट दाखवण्याचे कार्य करा.अन्यथा आपली केव्हा वाट  लागेल हे कळत नाही. 

“माणसाचा दर्जा हा जात, धर्म व मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो माणुसकीच्या विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो—- शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही.”

लेखक : अनामिक 

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३५ परिव्राजक १३.गुजरातचे दिवस ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३५ परिव्राजक १३.गुजरातचे दिवस ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

खेत्री म्हणजेच खेतडीहून स्वामीजी पुन्हा अजमेरला आले. श्री हरविलास सारडा यांच्याकडून तीन चार दिवसांनी ते बेबार इथं गेले असता, शामजी कृष्ण वर्मा अजमेरहून कामानिमित्त बेबारला आले होते, तेंव्हा ते स्वामीजींना बरोबर घेऊनच आले. हरविलास यांनी शामजींना स्वामीजींचं व्यक्तिमत्व, त्यांचे विचार आणि त्यांची देशभक्ती याबद्दल सर्व सांगितलं होतं. शामजींच्या घरी स्वामीजी पंधरा दिवस राहिले होते. तिथे स्वामीजींचा शामजींबरोबर धार्मिक आणि तत्वज्ञानवर संवाद होत असे. हरविलास यांचे राजस्थानमध्ये समाज सुधारणेचे मोठे काम होते तर, राजकीय क्षेत्रातल्या सर्वात जहाल क्रांतिकारकांच्या चळवळीला मदत करणारे पंडित शामजी कृष्ण वर्मा. (आपल्याला शामजी कृष्ण वर्मा हे व्यक्तिमत्व  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्रात आपल्याला भेटले आहे.) या दोघांची भेट आणि झालेली वैचारिक देवाण घेवाण आश्चर्यकारकच आहे.

यानंतर स्वामीजी अबुच्या मार्गाने निघाले असता त्यांना तिथे ब्रम्हानंद आणि तुरीयानंद भेटले. यावेळी स्वामीजी फार उदास होऊन त्यांना म्हणाले, “ राजस्थान मधले लोकांचे दारिद्र्य पाहून माझे अंतकरण फाटून गेले आहे. त्यामुळे मला धड रात्री नीट झोप पण लागत नाही”. आणि त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रु वाहू लागले. ते जरी खेत्रीला राजवाड्यात राहिले होते, तरी त्यांचा गावातील लोकांचा संपर्क आला होता. रोज कुठे ना कुठे खेडेगावात पण प्रवास झाला होता. तेंव्हा ग्रामीण भागातल्या लोकांचे दर्शन झाले होते. शेतकरी आणि झोपड्यातून राहणारी मुलेबाळे त्यांनी पहिली होती. अंगावर पुरेसे कपडे नाहीत, पोट खपाटीला गेलेलं, चेहरे निस्तेज हे दारिद्र्याचं दृश्य त्यांच्या अंतकरणाला भिडलं होतच. राजा अजीतसिंग यांच्याशी बोलताना सामान्य माणसापर्यंत शिक्षण कसं पोहोचवता येईल. शिक्षण हे दारिद्र्य कमी करण्यास कसं उपयोगी पडेल यावर चर्चा होत असत आणि एखादा छोटासा संस्थानिक आपल्या प्रजेचा कल्याणकारी विचार करेल तर हजारो माणसांचं जीवन तरी सुखी होईल हे स्वामीजींना समजत होतं म्हणून ते तशी दृष्टी देण्याचा प्रयत्न संस्थांनीकांच्या भेटीत सगळीकडेच करत होते.

राजस्थान मधला प्रवास आटोपता घेऊन स्वामीजी आता गुजरातेत अहमदाबादला आले. काही दिवस भिक्षा मागून मिळेल तिथे राहिले नंतर, उपन्यायाधीश श्री बालशंकर उमियाशंकर यांच्याकडे राहिले, जैन साधूंची भेट घेतली. त्यांच्या बरोबर जैन तत्वज्ञानवर चर्चा केली. पुढे लिमडी संस्थानला ते आले. लिमडीचे राजे, श्री ठाकुर जसवंतसिंग स्वामीजींच्या दर्शनाने प्रसन्न झाले. स्वामीजींना त्यांनी राजवाड्यातच काही दिवस ठेऊन घेतलं, ठाकुर जसवंतसिंग इंग्लंड आणि अमेरिकेचा प्रवास करून आले होते. त्यामुळे त्यांच्या विचारांना आधुनिकतेचा स्पर्श झाला होताच. पण तरी सुद्धा भारताच्या सनातन धर्माचा त्यांना अभिमान होता. त्यामुळे स्वामीजींचे विचार त्यांना पटले होते. वेदान्त विचारांचा प्रसार करण्यासाठी स्वामीजींनी पाश्चात्य देशात जावे ही कल्पना त्यांनीच प्रथम स्वामीजींना सुचवली असं म्हणतात. लिमडीहून जुनागडला जाताना ठाकुरांनी स्वामीजींना परिचय पत्र दिले.

भावनगर व सिहोरला राहून ते जुनागड इथं आले. इथल्या वास्तव्यात ते जुनागड संस्थानचे दिवाण श्री हरीदास बिहारीदास देसाई यांच्याकडे राहिले होते. इथला परिसर स्वामीजींच्या विचारांना अनुकूल होता. काही शतकांपूर्वी नरसी मेहता हे संत इथे होऊन गेले होते. शहरापासून जवळच गिरनार पर्वताचा पायथा इथं होता. तिथे जाण्याच्या मार्गावरच अनेक टेकड्यांवर पसरलेली हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांची मंदिरे होती. गिरनार पर्वताच्या पायथ्याशी सम्राट अशोकाने लिहिलेला प्राचीन शिलालेख दोन हजार वर्षापूर्वीच्या इतिहासाची साक्ष देत होता. त्यावर, प्रजेला सन्मार्गाने जाण्याचे आवाहन करणारी वचने कोरली होती. धर्म वचनांचा असा नम्रतेने पुरस्कार करणारा सम्राट अशोक खरं तर भारताचा एक वारसाच होता आणि हा इतिहास आपण कसा विसरून गेलो आहोत याची तिथल्या लोकांना स्वामीजींनी आपल्या विवेचनातून जाणीव करून दिली होती.

दिवाण साहेब स्वामीजींबरोबर अनेकांच्या भेटी आणि चर्चा घडवून आणत होतेच. हे संवाद मध्यरात्री पर्यन्त रंगत. स्वामीजींनी इथे, येशू ख्रिस्ताचे जीवन, त्याचा युरोप वर झालेला परिणाम तिथली संस्कृती राफेलची चित्रकला, धर्मोपदेशक, त्यांच्या संघटना, यामागे कशी येशू ख्रिस्ताची प्रेरणा आहे हे लोकांना समजून संगितले. युरोपमध्ये झालेली धर्मयुद्धे सांगितली. त्याच बरोबर भारतीय संस्कृतीतली तत्वे कशी युरोप मध्ये पोहोचली आहेत हे सांगीतले. मध्य आणि पश्चिम आशियाचा इतिहास सांगितला आणि जगत अध्यात्म विचारात आपल्या भारतीय संस्कृतीचा कसा महत्वाचा आणि फार मोठा वाटा आहे हे पण सांगीतले. स्वदेशीचा अभिमान आणि श्रीरामकृष्ण यांचा परिचयही तिथल्या सुशिक्षित लोकांना करून दिला. सर्वंकष विचार करणार्‍या अशा व्यक्तीचा सहवास लाभला आणि भेट झाली यात जुनागड च्या लोकांना धन्यता न वाटली तरच नवल होतं.

इथून स्वामीजी वेगवेगळ्या स्थळांना भेटी देऊन आले. भूज, कच्छ, वेरावळ आणि वेरावळ पासून जवळच असलेला, प्राचीन इतिहासाशी नातं सांगणारं प्रभासपट्टण इथे गेले. तेंव्हा त्यांनी गझनीच्या महंमदाने उध्वस्त केलेले सोमनाथचे भग्न मंदिर पाहिले. अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले छोटे मंदिर पाहिले.  भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार पटेल यांनी खंबीर धोरण स्वीकारून उभं केलेलं सोमनाथ मंदिर आज आपल्याला दिसतं.

प्रभास पट्टणहून स्वामीजी पोरबंदरला आले. हे ही एक संस्थान होते. तिथले प्रशासक श्री शंकर पांडुरंग पंडित यांच्या नावाने स्वामीजींना जुनागडहून परिचय पत्र दिल्याने स्वामीजी त्यांच्याकडे उतरले होते. हे पंडित वेदवाङ्ग्मयाचे अधिकारी व्यक्ति होते. त्यावेळी त्यांचे वेदांचे भाषांतराचे काम चालू होते. स्वामीजींची ओळख झाल्यावर सुरूवातीला त्यांनी स्वामीजींची कठीण भागाचे भाषांतर करण्यासाठी मदत घेतली. पण  नंतर स्वामीजी या कामात खूप रमले. भाषांतरासाठी मदत म्हणून ते तिथे राहिले.

शंकर पांडुरंग पंडित हे मोठे विद्वान होते. युरोपातील अनेक देशात ते प्रवास करून आले होते. त्यांना फ्रेंच आणि जर्मन भाषा येत होत्या. त्यांचं स्वतच मोठं ग्रंथालय होतं. याचं आकर्षण स्वामीजींना वाटलं होतं. पंडितांनी स्वामीजींना पहिल्या भेटीत सांगितलं होतं की, कितीही दिवस रहा आणि ग्रंथालयाचा हवा तेव्हढा वापर करा. या ओढीने स्वामीजी पुन्हा पोरबंदरला येऊन भाषांतरा साठी राहिले आणि त्यांची वेदांचा अभ्यास करण्याची फार दिवसांची इच्छा पण पूर्ण झाली.

स्वामीजींचे विचार अनेक वेळा ऐकल्यानंतर पंडित त्यांना म्हणाले होते, “स्वामीजी, आपल्या देशात तुमच्या विचारांचं चीज होणार नाही. तुम्ही पाश्चात्य देशात गेलं पाहिजे. भारतीय परंपरा आणि संस्कृती जाणण्याची जिज्ञासा असणारी माणसं तिकडं आहेत. तुम्ही तिथं जाऊन आपल्या धर्मातली सनातन तत्व स्पष्ट केलीत तर, त्याचा प्रभाव पाश्चात्यांवर झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फ्रेंच भाषेचा अभ्यास केलात तर युरोप मध्येही खूप उपयोग होईल. यावर स्वामीजी म्हणाले, “मी एक संन्यासी आहे, माझ्या दृष्टीनं पूर्व काय आणि पश्चिम काय दोन्ही सारखी आहेत. तशी वेळ आली तर मी पश्चिमेकडे जाईन”. 

आधुनिक दृष्टी असलेल्या, जग पाहिलेल्या आणि हिंदुधर्माचा उत्तम व्यासंग असणार्‍या पंडितांची ओळख आणि भेट आणि वेदांचं भाषांतर करण्याची कष्टाची का असेना मिळालेली संधी यामुळे इथला स्वामीजींचा प्रवास फलदायी झालेला दिसतो. 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाबा…अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? मनमंजुषेतून ?

☆ बाबा…अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

हाफ चड्डीत सायकलच्या पुढच्या दांडीवर एका बाजूला दोन पाय टाकून तिरका बसायचो आणि बाबा अंगातला सगळा जोर लावून पायडल मारत सायकल पुढे न्यायचे. त्यावेळी मला फक्त सायकलला झूम करून येणारा वेगच समजायचा आणि मन सुखावून जायचं.. त्यामागे बाबांनी दातओठ खाऊन लावलेला तो जोर कधी जाणवलाच नाही! संसाराचा सगळा गाडा त्यांनी आणि आईनी असाच जोर लावून पुढे नेला. मला समजला तो माझ्या आयुष्याला मिळत राहिलेला वेग… समजली ती फक्त माझी होत असलेली प्रगती – शारीरिक वाढीतली, खेळातली, स्पर्धांमधली,  शिक्षणातली, व्यवहारज्ञानातली… आणि मी अभिमानानं सुखावत गेलो… त्यामागे आई-बाबांनी लावलेला जोर त्यांनी कुठून आणि कसा आणला हे समजलंच नाही.

ते वयच नव्हतं बहुदा, हे असलं काही समजून घेण्याचं. पण कालचक्राला सगळं समजतही असतं आणि उमजतही! प्रत्येक गोष्टीत बाबांना गृहीत धरणारा, ते आहेत, ते बघतील, ते करतील असं म्हणणारा मी अलगद स्वतः बाबांच्या भूमिकेत कधी शिरलो, समजलंच नाही.

तेव्हा आम्ही फरशीवरच्या बाजारात गणपती बाप्पा आणायला जायचो. ही मूर्ती घेऊ की ती घेऊ असं व्हायचं. वेगवेगळ्या मूर्ती बघत असताना त्यातून आपल्या घरी कुठली  न्यायची याची निवड माझं ‘वय’ करायचं तर बाबांचा अनुभव आणि सुजाणपणा ती निवड करायचा. ” पण बाबा ती कित्ती मस्त आहे? ती मूर्ती का नको? ” असा हट्ट करणारा, प्रसंगी रडणारा मी, ” अरे! ही बघ ही घेऊया. ती छान आहे, पण ती नाही चालणार आपल्याकडे.” हे उत्तर ठामपणे कधी देऊ लागलो समजलंच नाही.

” बाबा आज मी करू देवपूजा ?” ” बाबा आज मी करू बाप्पांची आरती? ” अशी हट्टपूर्वक विनंती करणारा मी कधी या सगळ्या गोष्टींना सरावलो समजलंच नाही.

–आणि “अजून थोडा मोठा झालास की कर “, “अरे हात दुखतील तुझे ताम्हन धरून, थोडा मोठा झालास की करायचीच आहे आरती,” असं म्हणणारे बाबा, अलगद आरतीच्या वेळी गर्दीत सगळ्यात मागे जाऊन कधी उभे राहू लागले तेही समजलंच नाही.

आज वयाच्या अशा नेमक्या टप्प्यावर आलोय की सगळा पट उलगडल्यासारखा वाटतोय. मला पडणारे प्रश्न माझ्या मुलाला पडू लागलेत, मी करायचो तो हट्ट मुलगी करू लागलीये. आणि त्यावेळी  बाबा द्यायचे तशी उत्तरं माझ्या तोंडी आलीयेत.

आजही बाप्पा आणायला आम्ही एकत्र जातो. ‘ सायकल ‘ची जागा आता ‘ फोर व्हीलर ‘ नं घेतलीये. पण ” तुम्ही या घेऊन, मी हिच्याबरोबर घरी थांबून स्वागताची तयारी करतो,” असं बाबा कधी म्हणायला लागले समजलंच नाही.

आरतीचं ताम्हन मला जड होईल, असा विचार करणाऱ्या बाबांना, आज चार आरत्या पूर्ण होईपर्यंत सलग उभं राहणं जड होऊ लागलंय. त्यांचा तो जोर कधी, कसा निघून गेला समजलंच नाही.. 

बाबा …  मला सायकलच्या दांडीवर बसवून वेगात पायडल मारण्याचा तो जोर तुम्ही कुठून, कसा आणला होतात, आणि तो कधी, कसा निघून गेला समजलंच नाही. पण तो जोर गेला कुठे?– याचा उलगडा झालाय मला..

तो सगळा जोर तुम्ही माझ्या मनगटात भरलाय आणि ती सगळी जिद्द मला वारसा म्हणून दिलीये हे आता मला नक्की समजलं आहे!

आजही मला तुम्ही खूप आवडता…. अगदी गणपती बाप्पांइतकेच !!!!

{सर्व बाबा लोकांना समर्पित.}

लेखक –  अज्ञात

संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “भारतीय संगीताची आवश्यकता…” ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? इंद्रधनुष्य ?
☆ “भारतीय संगीताची आवश्यकता…” ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित 

आपल्या मेंदूचे उजवा आणि डावा असे दोन भाग असतात. उजव्या मेंदूचे काम सर्जनशीलता,  कला, अंतर्ज्ञान. डाव्या मेंदूचे काम कारणमिमांसा, निर्णयक्षमता, गणित, शास्त्र, पृथक्करण, भाषा, तर्क, आणि रोजचे पूर्ण रुटीन. 

फक्त लहानपणीची काही वर्षे आपला उजवा मेंदू काम करतो, नंतर त्याचे काम करणे हळूहळू बंद होते.संगीत ऐकल्यामुळे उजव्या मेंदूतील १७ केंद्रे ऍक्टिव्हेट होतात. संगीतोपचार म्हणजे ” उजव्या मेंदूचे अभ्यंगस्नान “. 

संगीत उपचारांमध्ये संगीत हे माध्यम असते.

आपल्या शरीरातील एकूण एनर्जीच्या २५ टक्के एनर्जी मेंदूला आवश्यक असते. बाकी  शरीरासाठी आपण पौष्टिक आहार घेतो, व्यायाम करतो, परंतु शरीराच्या प्रत्येक क्रियेसाठी जबाबदार असलेल्या मेंदूसाठी अक्षरशः काहीच करत नाही. 

संगीत उपचाराचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. आपण कमी जास्त प्रमाणात डाव्या मेंदूच्या अधिपत्याखाली असतो. संगीतोपचारामुळे मेंदूच्या उजव्या भागातील केंद्र ऍक्टिव्हेट केली जातात जे खूप जरुरी आहे. म्हणून रोज वीस मिनिटे तरी संगीत ऐकावे. संगीताच्या माध्यमातून ब्रेन प्रोग्रामिंग होते, त्याप्रमाणे भावना बनतात.

संगीताचे फायदे… 

१) संप्रेषण कौशल्य (कम्युनिकेशन स्किल) सुधारते. 

२)  स्मरणशक्तीमध्ये वाढ होते. संगीतामुळे मेमरी स्ट्रॉंग होते, विशिष्ट संगीताच्या साह्याने त्या वेळची परिस्थिती     आठवते.

३) एकाग्रता वाढते. 

४) रागावर नियंत्रण ठेवता येते. 

५) शारीरिक वेदनांवर नियंत्रण ठेवता येते. 

६) ताण तणावावर नियंत्रण ठेवता येते. 

७) स्ट्रेस हार्मोनची पातळी योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते…. वाद्य वाजवताना बोटांच्या हालचाली मेंदूसाठी उत्तम असतात.

गाणे म्हणणे का जरुरी आहे —- संगीताचा उगम कला म्हणून झाला नसून, भावनांचे प्रकटीकरण करण्यासाठी झाला आहे. ५ टक्के लोक संगीत तयार करतात व ९५ टक्के लोक त्याचा आनंद घेतात. हे कला म्हणून ठीक आहे. आपल्याला लोक नावे ठेवतील ही गोष्ट मनातून काढून टाकून प्रत्येकाने फ्रीली येईल तसे गायले पाहिजे. 

ओरिजिनल गाणे ऐकून तेच गाणे स्वतः म्हणण्याचा प्रयत्न करणे, या प्रयत्नाला आपला मेंदू सर्वात जास्त सकारात्मक प्रतिसाद देतो. मोठ्यांनी गाण्याचा प्रयत्न केला, तर लहान मुले व तरुण मंडळी सुध्दा गाण्याचा प्रयत्न करतील व त्याचा सकारात्मक परिणाम सर्वांनाच होईल.. पटकन मूड चेंज होण्यासाठी तरुण वयात आपण जी गाणी ऐकत होतो, त्याच पद्धतीची किंवा तीच गाणी ऐकावीत. संगीताचा कोणताही साईड इफेक्ट नाही. 

संगीत हे मानवासाठी वरदानच आहे…

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ १५  सप्टेंबर अभियंता दिन / १७ सप्टेंबर विश्वकर्मा दिन ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ १५  सप्टेंबर अभियंता दिन / १७ सप्टेंबर विश्वकर्मा दिन ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

15 सप्टेंबर. ! अभियंतादिन. तमाम इंजिनिअर्सनां शुभेच्छा. अभियंतादिन ज्या व्यक्तीच्या अफाट, अचाट कर्तृत्वामुळे अस्तित्वात आला त्या व्यक्तीला आपण विसरुच शकणार नाही.

हे आदर्श अभियंता म्हणजे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या, ज्यांना”‘नाईट कमांडर” म्हणून ओळखल्या जातं. त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 चा.

त्यांचे वडिल हे एक संस्कृत विद्वान होते व हिंदू ग्रंथांचे भाष्यकार असून आयुर्वेदिक वैद्य होते. मात्र हे पंधरा वर्षांचे असतानांच वडीलांचे निधन झाल्याने ह्यांच्यावर संकटाचा डोंगरच कोसळला होता. वडील खूप हुषार होते परंतु तेव्हाचा काळ हा सरस्वती व लक्ष्मी एकत्र नांदत नसते ह्या पध्दतीचा होता. त्यामुळे त्यांचे वडील बुध्दीमान असूनही पैसा गाठीशी न जोडून ठेवल्याने त्यांच्या पश्चात ह्यांच्या कुटूंबाला परिस्थीतीचे चटके खूप सोसावे लागले.

त्यांचे प्राथमिक शिक्षण चिकबळ्ळापूर येथे तर उच्चमाध्यमिक शिक्षण बंगलोर येथे झाले. ते १८८१ साली मद्रास येथुन बी. ए. ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रीकीचे पुढील शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींग, पुणे मध्ये पुणे येथे घेतले. १८८३ मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.

अभियांत्रिकीमध्ये स्नातक झाल्यावर, त्यांनी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली. नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून एका कामगिरीचा श्रीगणेशा करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले त्यांनी, दख्खन क्षेत्रात पाटबंधाऱ्यांची एक अतिशय क्लिष्ट योजना राबविली. त्यांनी ‘सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण द्वार प्रणाली’ विकसीत केली व त्याचे पेटेंट घेतले जी सन १९०३ मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील  खडकवासला धरणास लावण्यात आली. ही द्वारे, धरणातील साठ्याची पूरपातळी, पूर आल्यावर धरणास कोणताही धोका न होता, उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात आलीत. या द्वारांच्या कामात मिळालेल्या यशामुळे, ती दारं ग्वाल्हेर व म्हैसूर येथील धरणांवर बसविण्यात आली.

सर विश्वेश्वरैया ह्यांनी हैदराबाद शहराचे पूरापासुन संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्याने त्यांना सत्कार मुर्ती च्या रांगेत बसविण्यात आले. विशाखापट्टणम  बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. सर मो. विश्वेश्वरैया ह्यांनी कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरण बांधण्याच्या प्रस्तावापासुन ते उदघाटनापर्यंत सर्व कामांची संपूर्ण जबाबदारी स्विकारुन देखरेख केली. या धरणाचे बांधकामाने तेव्हाच्या काळातील हे आशियातील सर्वात मोठे सरोवर ठरले. ह्यामुळेच ते  ‘म्हैसूर राज्याचे पिता’ म्हणून ओळखले जावू लागले.

त्यांचे म्हैसूर राज्याचे नोकरीदरम्यान, त्यांनी सरकारच्या नियंत्रणा खालील म्हैसूर सोप फॅक्टरी, , किटकनाशक प्रयोगशाळा, भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्, श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट, बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, स्टेट बॅंक ऑफ मैसुर, सेंचुरी क्लब, मैसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अनेक औद्योगीक प्रकल्प सुरु केलेत. त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला. त्यांचे वेळेचे नियोजन, प्रामाणिकपणा आणि झोकून देऊन समोरील काम यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेणे हीच त्यांची शेवटपर्यंत ओळख बनली. तिरुमला-  तिरुपती दरम्यानच्या रस्तेबांधणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले.

सर विश्वेश्वरय्या ह्यांची सुरत येथून  पुण्याच्या सेन्ट्रल डिव्हिजनमध्ये असिस्टन्ट  चीफ इंजिनिअर या पदावर बदली झाली. पुणे विभाग हा मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये मोडत असे. या पुणे विभागातच मुंबई प्रेसिडेन्सीमधील सर्वात मोठे असे दोन साठवण जलाशय होते. खडकी क्यानटोन्मेंट विभागाला गाळलेल्या पाण्याचा पुरवठा केला जात असे. मुळा नदीच्या एका कालव्यातून हे पाणी फिफे जलाशयात येत असे. मुळा नदी उन्हाळ्यात कोरडी पडायची तर पावसाळ्यात पूर येउन दगडी बंधाऱ्यावरून पाणी वाहून फुकट जात असे. अस्तित्वात असलेले दगडी धरण उंच करायचे तर पायाच्या भिंतीना अधिक  जलस्तंभामुळे धोका संभवला असत. मग अधिक पाणी साठवण्यासाठी काय मार्ग काढावयाचा ?हा सगळ्यांसमोर यक्ष प्रश्न पडला. श्री विश्वेश्वरय्या यांच्यावर मोठीच जबाबदारी पडलेली होती. परंतु अशा स्थितीत न डगमगता खंबीरपणे त्यांनी या सांडव्यावर ७ ते ८ फूट अधिक पाणी साठवू शकतील असे दरवाजे बनवण्याचे ठरवले आणि स्वतःच्या तल्लख बुद्धीने त्यांनी स्वयंचलित दरवाज्यांचे डिझाईन तयार केले. धरणाच्या  सांडव्यावर आणखी ८ फूट जलस्तंभ अडवतील असे ऑटोमाटिक दरवाजे त्यांनी बनवले. पावसाळ्यात या दरवाज्यांमुळे ८ फूट पाणी अडल्यानंतर जर आणखी अधिक पाणी वाढू लागले तर हे दरवाजे ऑटोमॅटिकली उघडत आणि जादाचे पाणी वाहून जात असे. एकदा का जादा पाणी येण्याचे थांबले की ते दरवाजे बंद होत. हा एक महान आणि क्रांतिकारी शोध त्यांनी लावला. सरकारने त्यांच्या नावाने ह्या  ऑटोमाटिक दरवाजांचे पेटंट त्यांना करून दिले. हे दरवाजे ग्वाल्हेरच्या   आणि कृष्णाराज सागर या धरणांवर बसवले गेले. तसे पाहता  ते  पूर्ण संशोधन श्री  विश्वेश्वरय्या यांचे होते. त्यामुळे त्याच्या पेटंट पोटी  सरकारने त्यांना पेटंट मनी देऊ केला परंतु अतिशय नम्रपणे त्यांनी ते नाकारले. मी ब्रिटीश सरकारच्या नोकरीत असताना हे डिझाईन केले आहे त्यामुळे  त्या पेटंटचे पैसे  घेणे माझ्या नीतिमत्तेला धरून नाही असे त्यांनी सरकारला सांगितले. स्वयंचलित दरवाज्यांचे हे डिझाईन इतके चांगले होते  की हे जलाशयावर बसवलेले हे दरवाजे पाहण्यास ते पन्नास वर्षांनी स्वतः गेले तरी ते दरवाजे उत्तम रीतीने काम करीत होते. पुण्याचा जलसिंचन विभाग पाण्याच्या मोठ्या साठ्यांमुळे आणि धरणांमुळे सन १९०० च्या सुमारास प्रसिद्ध होता. परंतु ज्या भागाला कालव्यांद्वारे पाणी पुरवठा होतो ते प्रांत सुबत्ता प्राप्त करत आणि धरणांच्या खालील भागांना किंवा कालव्याच्या उप शाखांना कमी पाणी पोचत असल्यामुळे तिथे पाणी कमी पडत असे. मोठे व धनवान शेतकरी मुख्य कालव्यातून जास्त पाणी घेत आणि दूरवर वसलेल्या कालव्याबाजूच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी अपुरे पडत असे. ही विषमता दूर करण्यासाठी श्री विश्वेश्वरय्या यांनी पाळीपाळीने किंवा चक्राकार पद्धतीने पिकांना पाणी देण्याची विशेष योजना आखली. कालव्याच्या वरील भागातील श्रीमंत शेतकऱ्यांना या योजनेमुळे मन मानेल तसे पाणी घेता येणार नव्हतेह त्यामुळे त्यांनी आपले म्हणणे केसरीचे तत्कालीन संपादक लोकमान्य टिळक यांच्याकडे मांडले आणि केसरीतून दर आठवड्याला  या चक्राकार पद्धती विरुद्ध लिखाण छापून येऊ  लागले. विश्वेश्वरय्यानी आपली ही योजना सरकारला विशद केली आणि विरोध करणाऱ्या जमीनदार शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून ही योजना प्रत्यक्ष कार्यवाहीत आणली. ब्लॉक सिस्टीम या नावाने  ही योजना प्रसिद्ध आहे आणि अजूनही भारतभर हीच पद्धत अवलंबिली जाते.

सर विश्वेश्वरय्या ह्यांच्या बुद्धीमत्तेचे  भारतीयांबरोबरच इंग्रज लोकसुद्धा कौतुक करू लागले. ब्लॉक पद्धतीनुसार वर्षातून तीन पिके वर्तुळाकार क्रमाने घ्यायची आणि उपलब्ध पाणी वापरूनच अधिक लाभ क्षेत्रात पिके काढायची अशी पद्धत आहे. तीन पिकातील एक भात किंवा उस हे सर्वाधिक पाणी लागणारे पीक असावे आणि आणि दुसरे मध्यम पाण्यावर तयार होईल असे असावे तर तिसरे पीक कमीतकमी पाणी लागेल असे असावे असे विश्वेश्वरय्या यांनी निश्चित केले.  एकाच जमिनीत वेगवेगळी पिके पाळीपाळीने घेतल्यास मातीचा कस कमी होत नाही. सगळया  रयतेला हे पटण्यासाठी त्यांनी मोठ्या जमीनदारांना असा प्रयोग निदान एकदा तरी करून पाहण्याची सूचना केली. मोठ्या जमीनदारांनी ते मानले आणि हा प्रयोग कल्पनातीत यशस्वी झाला. सामान्य शेतकरीसुद्धा ब्लॉक सिस्टीमच्या जलसिंचनासाठी तयार झाला. मुंबई सरकारचे ज्येष्ठ सदस्य सर जोन  मूर माकेंझी यांनी या पद्धतीसाठी श्री.  विश्वेश्वरय्या यांचे तोंड भरून कौतुक केले. पाण्याच्या संयमित वापरामुळे डासांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होउन मलेरिया सारख्या  रोगालाही आळा  बसला.

सन १९०८ मध्ये स्वेच्छानिवृत्ती नंतर म्हैसूर या भारतातील मोठ्या व महत्त्वाच्या राज्याचे दिवाण म्हणून त्यांना नियुक्त केले गेले. कृष्णराज वोडेयार चतुर्थ या म्हैसूरच्या महाराजांच्या पाठिंब्यामुळे सर विश्वेश्वरया यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. इतर अनेक कामांसोबत, सन १९१७ मध्ये बंगळूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली. ही भारतातील पहिली अभियांत्रिकी संस्था होती, जी अद्यापही कर्नाटकातील एक प्रतिष्ठित संस्था आहे.

म्हैसूर येथे असतांना त्यांनी जनतेसाठी केलेल्या कामांमुळे, त्यांना’नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर’ या सन्मानाने गौरविले गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केल्या गेल.

सर मो. विश्वेश्वरैया यांना आंतरराष्ट्रीय इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स ह्या लंडन स्थित संस्थेने सन्माननिय सदस्यत्व तर इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स च्या बंगलोर शाखेने फेलोशिप देऊन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापिठांनी त्यांना ‘डॉक्टर’ ही अनेक विद्याशाखातली पदवी देऊन गौरविले. ते सन १९२३ च्या इंडियन सायन्स कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.

अशी अद्वितीय, असामान्य माणसं आपल्या देशाची खरी संपत्ती असतात. वयाच्या 101 व्या वर्षी दिनांक 14 एप्रिल 1962 रोजी ह्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि जगातील तमाम इंजिनिअर्स ना ह्या अभियंता दिनाच्या शुभेच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉ. रॉबर्ट्स— आमचा शेजारी ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ डॉ. रॉबर्ट्स— आमचा शेजारी ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

सातआठ वर्षांपूर्वी अमेरिकेला लेकीकडे गेले होते तेव्हाची गोष्ट.

मुलीच्या शेजारी नवीन झालेल्या घरात  एक नवीन  कुटुंब खूप सामान उतरवताना दिसले. आफ्रिकन अमेरिकन कुटुंब दिसत होते ते. खूप मोठा ट्रक भरून सामान येत होते. ३ लागोपाठची मुले, आईवडील असे दिसले. 

इकडे लगेच शेजाऱ्याच्या घरात घुसून चौकश्या करायची अजिबात पद्वत नाही. पण चार दिवसानी तो तरुण शेजारीच आमच्या घरी आला. अतिशय अदबीने बोलत होता आणि मी डॉक्टर आहे म्हटल्यावर सहज त्याने सांगितले की तो  oncologist म्हणजे कॅन्सर तज्ञ आहे आणि त्याची बायको आहे स्त्रीरोगतज्ञ. हे ऐकून तर आमचे डोळेच मोठे झाले. आधीच अमेरिकेत डॉक्टर तुफान पैसा मिळवतात, आणि त्यात हा कॅन्सर तज्ञ म्हणजे विचारूच नका.

हळूहळू त्यांची मुले बॅकयार्डमध्ये खेळताना दिसली. मुलगी मोठी होती आणि दोन मुलगे लहान. एक माझ्या नातीएव्हढाच असेल.डॉमिनिक त्याचे नाव. बोलता बोलता डॉ. रॉबर्ट्सने सांगितले, की हे लोक मूळ जमैकाचे.

त्याच्या आई वडिलांनी अतिशय कष्ट करून या मुलांना न्यूयॉर्कमध्ये आणले. हा डॉ.रॉबर्टस खूप हुशार होता म्हणून तो शाळेत तरी जाऊ शकला. अफाट कष्ट आणि फार उत्तम  ग्रेडस मिळवून तो डॉक्टर झाला. तिथेच त्याला ही  सिंथिया भेटली. तीही अशीच हैतीहून आलेली गरीब मुलगी. पण जिद्दीने डॉक्टर झाली आणि पुढे स्त्रीरोगतज्ञ सुद्धा.

मला फार कौतुक वाटायचे या डॉक्टरचे. दिवसभर राबून घरी आला,की कपडे बदलून लागलाच बागेत कामाला. खूप छान छान झाडे आणली त्याने आणि राबराबून स्वतः लावली देखील. त्याला  बाहेरची माणसे बोलावून बाग करणे अशक्य होते का?– मी त्याच्याशी  बोलताना आमच्या कंपाऊंड मधून विचारायची हे. तो हसून म्हणाला,” ग्रँडमा, हा माझा आनंद आहे. माझा  स्ट्रेस रिलीव्हर आहे ही बाग. मला खूप आनंद मिळतो चिखलात हात भरले की.”   

हळूहळू डॉ.रॉबर्ट्सची बाग सुंदर रूप घेऊ लागली. त्याने लावलेल्या गुलाबांना अक्षरशः शंभर शंभर कळ्या आल्या. त्या उमलल्यावर तर  त्या झाडाचे देखणे रूप नजर ठरेना इतके सुरेख दिसू लागले. मला या तरुण मुलाचे फार  कौतुक वाटायचे.

या उलट त्याची बायको ! सिंथिया कधीही बागेत काम करताना दिसली नाही. तिला मी एकदा विचारले तर हसून म्हणाली,”ओह। तिकडे हॉस्पिटलमध्ये कामाने दमून जाते मी आणि घरी ही तीन पोरे कमी देतात का त्रास. मला नाही आवड बागेची . रॉबर्ट्स करतोय ते बास झाले.” 

तो  रॉबर्ट्स असा सज्जन की कधीही मदतीला बायकोला बोलवायचा नाही .तीही पठ्ठी खुशाल त्याला बोलवायची आणि म्हणायची,” डिअर, जरा पिझा लावतोस का ओव्हनला? मी जरा  वाचणारे उद्याच्या पेपर  प्रेझेंटेशनचे.” 

बिचारा निमूट हात धुवून आत जायचा – अदिती  म्हणायची, “ बघ बघ, .किती गुणी कामसू नवरा आहे. मनात आणले तर आपल्यालाही विकत घेईल तो. काय भारी पगार असेल ना त्याला? पण किती नम्र आहे बघ.” 

सिंथिया बाई जरा आळशीच होत्या. या तीन मुलांसाठी त्यांनी घरी २४ तास राहणारी गोरी मेड ठेवली होती. तिला वेगळी स्वतंत्र कार दिली होती. बघा तरी, एक काळा माणूस चक्क गोऱ्या लोकांना नोकर म्हणून ठेवू शकत होता.

खूप पगार तो सहज देऊ शकत  होता तिला.. ही गोष्ट पण कौतुकाचीच होती ना? मला हेही भारी कौतुक वाटले. 

पूर्वी वाचलेले ‘ एक होता कार्व्हर ‘ पुस्तक आठवले ,आणि त्या गरीब बिचाऱ्या बुकर टी.वॉशिंग्टनने अफाट सोसलेले कष्ट आठवून डोळ्यात पाणीच आले माझ्या. आज त्यांच्याच  वंशातला एक मुलगा, एक गोरी बाई सहज  नोकर म्हणून ठेवू शकतो हे केवढे कौतुक… आम्हाला या कुटुंबाचे नेहमीच कौतुक वाटायचे.

सिंथिया एकदा आमच्या घरी केक घेऊन आली होती. वर म्हणते, “ मी नाही हं केला.मला तितकीशी आवड नाही स्वयंपाकाची. डॉ.रॉबर्ट्सने केलाय. “— मनात म्हटले,’ बायो,अग किती ग गुणी नवरा मिळालाय तुला.” 

मग आम्ही तिच्या बाउलमध्ये साबुदाण्याची खिचडी पाठवली. लेक म्हणत होती, “ आई,कमालच आहे तुझी बाई. हे खिचडी बिचडी त्यांना आवडेल का तरी? आपण देऊ  कुकीज. उगीच काय तुझे काहीही.” 

मी म्हटले “ देऊ या ग.नाही आवडले तर न का खाईनात.”—  दोन दिवसानी हातात एक वही पेन्सिल घेऊन डॉ सिंथिया घरी आली.–“ ते काय होते केलेले ?ते डॉ.रॉबर्ट्स आणि माझ्या डॉमिनिकला खूप आवडले. काय आहे त्याचे नाव? त्याची रेसिपी सांगा ना प्लीज. मी करीन घरी.” 

मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. आता हिला मी साबुदाणा कुठे मिळतो इथपासून तो कसा भिजवायचा हे कसे काय सांगू .मी तिला म्हटले “ सिंथिया,बाई,ही रेसिपी इंडियन आहे,तुला जमणार नाही ग. जेव्हा केव्हा खावीशी वाटेल तेव्हा मला सांग.मी देईन करून.”

सिंथिया हसली आणि म्हणाली,” ओह! Seems difficult hmm।  ग्रँडमा, please u do it for me hmm.”

लाघवी होती खरी पोरगी. नंतरही आम्ही अनेकवेळा खिचडी करून दिली, आणि डॉमिनिक आणि त्याचा डॅडी  आम्हाला,’वावा’ असे हात करून दाद द्यायचे.

अदिती नेहमी म्हणायची, ‘ डॉ.रॉबर्टस इथे नक्की राहणार नाही. तो खूप मोठ्या आलिशान,४ गराज असलेल्या घरात शिफ्ट होईल बघ लवकरच. तो नक्की त्यांच्या हॉस्पिटलजवळ असलेल्या खूप  भारी आणि रिच कम्युनिटीमधेच घर घेणार एक दिवस. आमचीही कम्युनिटी आहेच भारी आणि उच्चभ्रू, पण हा याहूनही खूपच श्रीमंत वस्तीत जाणार बघ.” – अगदी तसेच झाले . मी भारतात परत आल्यावर काहीच महिन्यात रॉबर्ट्स कुटुंब  तिथून हलले.

त्यांनी अदितीच्या कुटुंबाला त्यांचे नवे घर बघायला बोलावले होते. अदिती म्हणाली, “ काय सुंदर आहे घर त्यांचे.

केवढेच्या केवढे प्रचंड. लेक साईडजवळचे, राजवाड्यासारखेच—इथे असली घरे प्रचंड किमतीलाच मिळतात.

डॉ.रॉबर्ट्स ने अतिशय हौशीने सजवलेही आहे फार सुरेख. तू आलीस की तुला घेऊन ये असे नक्की स्पेशल आमंत्रण आहे बरं तुला. “ 

कधी मी जाईन का नाही हे मला माहीत नाही, पण जमैकासारख्या ठिकाणाहून आलेल्या एका जिद्दी डॉक्टरची ही  झेप मला खरोखर फार कौतुकास्पदच वाटली.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काय रे गजानना ?☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ काय रे गजानना ? ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

काय रे गजानना?

आता कुठं आरत्यांचा क्रम नक्की व्हायला लागला होता,

आता कुठं ‘ ओवाळू आरत्या ‘ नंतर ‘ चंद्रभागे मधे सोडोनीया देती ‘ जमायला लागलं होतं,

आता कुठं आरतीच्या वेळेत घरी पोचायची सवय लागत होती,

एरव्ही स्वयंपाकघर न सोडणाऱ्या घरच्या बायका आरतीच्या निमित्तानं लवकर आवरून बाहेर यायला लागल्या होत्या,

रिमोटसाठी भांडणाऱ्या आमचं, टिव्ही बंद करून तुझ्यासमोर बसण्यावर एकमत व्हायला लागलं होतं,

भाजीच्या पेंढीला न लागणारे हात दूर्वा निवडायला शिकत होते.

साधं दूध आणायला रखडणारे पाय प्रसादाला काय आणू म्हणत धावायला लागले होते.. 

आणि एवढ्यात…?

एवढ्यात हा दिवस आणलास पण?

काल तर आलास आणि आज निघालास पण….?

….कठोरपणाने सृष्टीचे नियम शिकवणारा तू आदिगुरू… 

जिथं सृजन आहे तिथं विसर्जन अपरिहार्य असते असं म्हणत निघालास….

तुझ्या जाण्याच्या विषयाने पावले जड होऊन मन भरून येतं रे….

पुढच्या वर्षीही लवकरच येशील या आशेने तुला निरोप तर द्यावाच लागणार….

पण गजानना जाताना एवढं कर —

फक्त तुझ्याच नाही, तर कुणाही अतिथीच्या येण्यानं सुखावणारं आणि विरहानं कातर होणारं साधं सरळ मन सर्वांना दे‌ —

भाजी भाकरी असो वा पुरणपोळी, सारख्याच आनंदाने खाण्याची स्थिर बुद्धी दे —

प्रत्येकाचं  घर आणि ताट नेहमी भरलेलं असू दे —

आणि त्या भरल्या ताटातलं अन्न पोटात जाण्याची सहजता दे —

लोकांचं दुःख कळण्याची संवेदना दे —

अडचणीला धावून जाणारे तुझे पाय दे —

अपराध क्षमा करून पोटात घेणारे तुझे लंबोदर दे —

सूक्ष्मदृष्टीने पाहणारे बारीक डोळे दे —

सार स्विकारून फोल नाकारणारे सुपासारखे कान दे—

भलंबुरं लांबूनच ओळखणारी सोंड दे —

शत्रूला न मारता त्याला आपला दास करणारा पराक्रम दे —

सगळ्यात महत्त्वाचं— सर्वांचं मंगल करणारी बुद्धी दे—

बहुत काय मागू गणेशा..? 🙏🏻

🌸 गणपती बाप्पा मोरया 🌸

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवरंगी वसंत ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा  ?

☆ नवरंगी वसंत ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

मराठीत कविता लोकप्रिय करण्याचं आणि काव्यरसिक घडवण्याचं काम विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकार आणि वसंत बापट या त्रिमूर्तीनं केलं. त्यांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर जागोजागी कविता वाचनाचे कार्यक्रम केले. श्रोत्यांना ते आवडू लागले. त्यांना दादही मिळत गेली. या त्रिमूर्तीत शोमन होते, वसंत बापट. पाडगावकार म्हणायचे, ‘वसंत बापट म्हणजे सळसळणारं चैतन्याचं झाड, तर विंदा म्हणायचे, वसंत बापट यांच्या व्यक्तिमत्वाचे ९ रंग आहेत. प्राध्यापक, कवी, गीतकार, शहीर, समीक्षक, सापादक, कार्यकर्ता, वक्ता, शोमन हे ते ९ रंग.

वसंत बापट, म्हणजे विश्वनाथ वामन बापट तथापि ते वसंत या नावानेच सर्वपरिचित आहेत. त्यांचा जन्म २५ जुलै १९२२ला कर्‍हाड इथे झाला. नुकतीच त्यांची जन्मशताब्दी पूर्ण झाली. 

प्राध्यापक – उत्कृष्ट अध्यापन हा त्यांच्या कवितेचा पाहिला रंग. नॅशनल कॉलेज वांद्रा इथे १५ वर्षे, नंतर रुईया कॉलेज माटुंगा इथे १५ वर्षे त्यांनी अध्यापन केले. त्यानंतर ७४मध्ये मुंबई विद्यापीठातील गुरुदेव रविंद्रनाथ टागोर अध्यासनाचे ते प्राध्यापक होते. ते मराठी आणि संस्कृत विषय शिकवायचे. ते कुशल आणि विद्यार्थीप्रिय अध्यापक होते. मराठी, संस्कृत, इंग्रजी, हिन्दी, बंगाली इ. भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.  

कवी – वयाच्या २०व्या वर्षी वसंतरावांनी कविता लिहायला सुरुवात केली. ३०व्या वर्षी ‘बिजली’ हा कविता संग्रह प्रकाशित झाला. या संग्रहावर त्यांचे सेवादलाचे आणि सानेगुरुजींचे संस्कार स्पष्ट दिसतात. त्यानंतर पुढे ६० वर्षे त्यांनी कविता लिहिल्या. अकरावी दिशा, तेजसी, मानसी, रसिया, राजसी इ. त्यांचे २५ कवितासंग्रह प्रकाशित झाले. त्यांनी १०००च्या वर कविता लिहिल्या. बिजलीनंतर त्यांचे अनुभवाचे क्षेत्र अधीक विस्तृत व जाणीवा अधिक सखोल होत गेल्या. त्यांच्या कवितेवर संस्कृत, इंग्रजी, बंगाली कवितेचा प्रभाव होता. संस्कृतमधील अभिजात आणि नादवती शब्दकला त्यांच्या कवितेत दिसून येते. गुरुदेव टागोरांचा मानवतावाद आणि इंग्रजी कवितेतील स्वच्छंद प्रवृत्ती यांचे ठळक संस्कार त्यांच्या कवितेवर दिसून येतात.

निसर्गातील लावण्य विभ्रम, यौवनाचा अभिजात डौल , खट्याळ शृंगार याबरोबरच वसंतरावांची कविता सामाजिक विषमता आणि अन्याय यांच्या जाणीवाही व्यक्त करते. जनजागृती करणे हेही कवितेचे एक मोठे काम आहे, असे ते मानत. राष्ट्र संकटाच्या, दु:खाच्या वा देशातील विविध जन आंदोलनाच्या प्रसंगी त्यांची संवेदनाशीलता त्यांच्या काव्यातून प्रगट झाली आहे. उत्तुंग आमची उत्तर सीमा… महाराष्ट्राचा पोवाडा, गांधींची जीवनयात्रा, नव्या युगाचे पोवाडे, (भाग १ ते ३) , सैन्य चालले पुढे इ. कविता याची साक्ष देतील. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी ‘मेघहृदया’च्या रूपाने मराठीत आणली, तर ‘सकीना’तील कवितांना खास उर्दू लहेजा आहे. 

वसंतरावांनी अनेक बालकविताही लिहिल्या. अबडक तबडक, चंगा मंगा, परीच्या राज्यात, फिरकी, फुलराणीच्या कविता असे त्यांचे अनेक बालकविता संग्रह प्रसिद्ध आहेत. 

युगोस्लावियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात ते भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. इ.स. १९७७ व १९९३ मध्ये अमेरिकेत आणि १९९२ मध्ये आखाती देशात त्यांचा काव्यदर्शन हा कार्यक्रम झाला. ते श्रेष्ठ आणि लौकिकसंपन्न कवी होते.

गीतकार – वसंतराव उत्तम गीतकार होते. गीत म्हणजे कविताच. फक्त ही कविता वृत्त, छंद, मात्रा, यमक इ. बंधने पाळून लिहिली जाते. आणखीही सूक्ष्म फरक सांगितला जातो. कविता या अंत:स्फूर्तीने लिहिल्या जातात तर गीताची प्रेरणा बाह्य असते. चालीमुळेही गीत लोकप्रिय होते. उत्तम गीत ही उत्तम कविता असेलच असे नाही. पण ग.दि. माडगूळकर, शांता शेळके यांच्याप्रमाणेच वसंतरावांची गीते या उत्तम कविताही आहेत. ‘उत्तुंग आमची उत्तर सीमा’, ‘गगन सदन तेजोमय’, ‘देह मंदीर चित्त मंदीर’, ‘सदैव सैनिका’, ही त्यांची गीते लोकांना खूप आवडतात. असेच ‘दख्खन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिल्लेही चालली खुशीत’ हे       तालकाव्यही ऐकताना खूप मजा वाटते.

शाहीर – शाहिरी हा वसंतरावांच्या व्यक्तिमत्वाचा तिसरा पैलू. वीरश्रीयुक्त ओजस्वी रचना आणि नजाकतीचा वा धीट शृंगार ही शाहिरी काव्याची वैशिष्ट्ये. पोवाडा आणि लावणी हे शाहिरी काव्याचे गीतप्रकार. वसंतरावांनी राष्ट्र सेवादलाच्या  कलापथकासाठी अनेक पोवाडे आणि लावण्या लिहिल्या. ‘शूर मर्दाचा पोवाडा’, ‘संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा’ असे त्यांचे पोवाडे गाजले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी त्यांनी कलापथकाद्वारे अनेक कार्यक्रम बसवून सादर केले. त्यांनी ‘महाराष्ट्र दर्शन’, ‘भारत दर्शन’, हे कार्यक्रम लिहिले. बसवले आणि कलापथकाद्वारे ते सादरही केले. ते उत्तम दिग्दर्शक होते. पौराणिक, ऐतिहासिक कथानकांवर त्यांनी नृत्यनाट्ये लिहिली. ‘शिवदर्शन’ हा नृत्यनाटकात्मक कार्यक्रम चांगला गाजला. कलापथकासाठी त्यांनी, तमाशा, लोकनाट्य, पथनाट्य, नृत्य, नाट्य याबरोबरच लोककलेचे अन्य प्रकारही वापरले. त्यांच्या कलापथकाच्या कार्यक्रमांनी समाजाची आणि जाणकारांची खूप दाद मिळवली.

समीक्षक – वसंतरावांनी समीक्षात्मक लेखन तूलनेने थोडं केलय, पण जे केलय ते लक्षणीय आहे. आधुनिक मराठीचे शतक १९०० ते २००० संपले, तेव्हा त्यांनी या कलखडातील साहित्यावर २४ लेख लिहीले. ‘शतकाच्या सुवर्णमुद्रा’ या पुस्तकात ते समाविष्ट आहेत. तौलनिक साहित्याभ्यास- मूलतत्त्वे आणि दिशा हे त्यांचे आणखी एक समीक्षणात्मक पुस्तक. त्यातून त्यांच्या विचारांचा आणि अभ्यासाचा आवाका स्पष्ट होतो. समीक्षा या शब्दाची व्याप्ती थोडी वाढवली आणि त्यात सामाजिक व राजकीय जीवनाची समीक्षा असा अर्थ घेतला, तर त्यांच्या आणखी काही पुस्तकांचा समावेश इथे करता येईल. प्राचीन बखर वाङ्मयाच्या शैलीत त्यांनी लिहिलेलं ‘विसाजीपंतांची बखर’ हे पुस्तक म्हणजे राजकीय समीक्षाच आहे. ‘बारा गावचं पाणी’, ‘अहा देश कसा छान’, ‘गोष्टी देशांतरीच्या ही त्यांची प्रवासवर्णने एका अर्थाने सामाजिक जीवनाची समीक्षाच आहे.

संपादक – साधनाच्या पहिल्या अंकापासून ते साधनाशी निगडीत आहेत. १९८३ ते १९८८ ते साधना नियतकालिकाचे संपादक होते. 

कार्यकर्ता – वसंतरावांची लहानपणापासून राष्ट्र सेवादलाशी जवळिक होती. तरुणपणी ते सेवादलाचे निष्ठावान कार्यकर्ते झाले. त्यांनी तरुणपणी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. ४२च्या ‘चले जाव’ चळवळीत त्यांचा सहभाग होता. त्यासाठी त्यांना काही काळ तुरूंगवासही भोगावा लागला होता. राष्ट्र सेवादलाच्या कलापथकाचे ते अध्वर्यू होते. कलापथकासाठी त्यांनी कार्यक्रम लिहिले. बसवले आणि सादरही केले. या कलपथकाने लोकजागृतीचे मोठेच काम केले होते.

वक्ता – सामाजिक, वाङ्मयीन, संस्कृतिक क्षेत्रातील विविध विषयांवर त्यांनी भाषणे दिली. त्यांची भाषणे ऐकताना लोक मंत्रमुग्ध होऊन जात. कुमार गंधर्वांनी माळव्यात निर्गुणी भजनाचा कार्यक्रम सुरू केला, त्यावेळी निरुपणासाठी त्यांनी वसंतरावांना बोलावले. अतिशय सुरेख आणि प्रभावी असं त्यांचं निरूपण असे.

शोमन-  वसंतरावांचं व्यक्तिमत्व आकर्षक होतं. उंच-निंच शरीरयष्टी , गोरापान रंग, सोनेरी काड्यांचा चष्मा, प्रसंगाला अनुसरून केलेली अभिरुचीपूर्ण वेशभूषा, कधी सिल्कचा कुर्ता-पायजमा, वर जाकीट, कधी पूर्ण सुटाबुटात आणि एरवी पॅंट व हाफ बुशशर्ट असा त्यांचा पेहेराव असे. ‘आपल्या अस्तित्वाने वातावरणात चैतन्य निर्माण करणारे ते चैतन्यामूर्ती होते’, असं त्यांची विद्यार्थिनी मृदुला जोशी म्हणते. 

तर असे हे नवरंगात रंगून गेलेले वसंत बापट. त्यांच्या ‘सेतू’ या कविता संग्रहास आणि मुलांसाठी लिहीलेल्या बाल-गोविंद’ या नाटकास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला. ७२व्या अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. या मंचावरून त्यांनी अत्यंत प्रभावी आणि सर्वंकश असे भाषण केले होते. 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

मो. 9403310170,   e-id – [email protected]  

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विश्वस्त  – लेखक – श्रीरंग खटावकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

विश्वस्त  – लेखक – श्रीरंग खटावकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

आमच्या सोसायटीतले जोशी आजी आजोबा, खाऊन पिऊन सुखी, दोन्ही मुलं अमेरिकेत. इथे आजी आजोबा मजेत. परवा काही कामानिमित्त त्यांच्याकडे गेलो तर आज्जी चक्क लॅपटॉपच्या समोर बसलेल्या ! 

म्हंटलं “आजी काय करताय !”

” काही नाही रे फेसबुकवर फोटो अपलोड करतेय, भजनी मंडळाचे !”

मी तीनताड उडालो. ” आजी तुम्ही फेसबुकला आहात? “

“ मग ! वाटलं काय तुला ! व्हाट्सप पण वापरते मी. आणि हे आजी काय रे?  ग्रॅनी म्हण! “

मी अवाक–आं !! म्हंटलं, आजोबा– sorry, ग्रॅंडपा कुठे गेलेत ? “

” गेलेत मार्केटला, बरमुडा का काय आणायला.”

माझा चेहरा बघून आजी हसल्या म्हणाल्या, ” बस जरा गम्मत दाखवते !”

डुलत डुलत आत गेल्या आणि एक पिशवी घेऊन आल्या. “आमच्या सुशनी पाठवलंय! ” बघितलं तर आत एक पंजाबी ड्रेस ! “अरे पुढच्या महिन्यात जायचंय ना यु एस ला! तयारी हो, तिथे नऊवारीत थंडी वाजते हो, ह्याच्या आत कसे ते थर्मल वेअर की काय ते घालता येतं ना ! “

” काय हो आजी, सॉरी ग्रॅनी तुम्हाला करमतं का हो तिकडे? “

” न करमायला काय झालंय, मला आवडते तिथे, तिथे भारतीय लोकांचा आमच्याच वयाचा एक ग्रुप केलाय. सगळे दर वीकएंडला भेटतो आणि धम्माल करतो. पॉटलक करतो, बर्थडे साजरे करतो, साठी, पंच्याहत्तरी, सहस्त्रचंद्रदर्शन अगदी सगळं करतो.  काही तिथेच स्थायिक झालेले, काही आमच्या सारखे……. वारकरी.”

” तिथे भेटताना अट एकच ! घरची गाऱ्हाणी कोणी सांगायची नाहीत. मग काय मज्जा मस्तीला तर उत येतो. तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नकोस हो, नाहीतर धपाटा घालीन.”

“बोला ना “

खुसपुसत म्हणाल्या, ” अरे गेल्या वेळी एकीचं बेबी शॉवर होतं, म्हणजे डोहाळजेवण. असा बावळटासारखा बघू नकोस. तर तिथे एका म्हातारीने मला टकीला की काय म्हणतात ना ती पाजली. आणि मी लागले ना झिंगायला ! 

बरं झालं तिने मला आत नेऊन झोपवलं, नाहीतर काय धिंगाणा केला कोणास ठाऊक? तरी हे दुसऱ्या दिवशी 

माझ्याकडे संशयाने बघत होते, मी आपलं तोंड लपवले.” असं म्हणताना त्या गोडश्या लाजल्या. आणि इथे हे ऐकताना माझी हसून हसून पुरेवाट!

” काय हो आजी हल्ली सकाळी तुम्ही फिरायला जाताना दिसत नाही?”

“अरे नाही उठवत रे, रोज रात्री आमच्या नातवंडांशी चॅटिंग फिटिंग करतो दोघं आणि मग झोपायला उशीर होतो.  आणि जाऊन तरी करायचंय काय तिथे, सुनेच्या, जावयाच्या कागाळ्याच ऐकायच्या ना ! नाहीतर तब्बेतीची रडगाणी ! अरे आता त्या गुप्तेआजी ! सून इतकी चांगली आहे. डॉक्टरेट केलंय, पण ह्या म्हणतात की ती घरी पोळीभाजी करत नाही. आता ती तिच्या कंपनीत मोठमोठ्या फाईली उपसत बसेल की पोळ्या लाटेल?” 

” दुसरी ती परांजपीण, सारखं मेलीला काही न काही होत असतं. आज काय अर्धशिशी, उद्या काय बद्धकोष्ठ, तर परवा काय जुलाब. कुठला रोग झाला नाही असे नाही. तरी बरं मुलगाच डॉक्टर आहे. पण हिला वाटतं की माझ्या उशापायथ्याशी सगळ्यांनी बसावं. गेल्या महिन्यात आली होती तेव्हा रडत होती की सारखं पाठीत दुखतंय. अस्सा राग आला. म्हंटलं उडी मार तळ्यात ज्या काठावर बसलोय तिथून, नाहीतर मी ढकलते तुला. तशी घाबरली आणि पळाली घरी. तेव्हापासून मला आजी कट्ट्यावर हिटलर म्हणतात.  मी सांगू का एक गोष्ट तुला, मला नाही आवडत हे सगळं. आपणच मुलांना शिकवलं ना? आणि ती मुलं शिकल्यावर त्याचा उपयोग नको का करायला? सारखं आपलं उणंदुणं काढायचं. आमच्या ह्यांची नोकरी होती फिरतीची, दर पाच वर्षांनी बदली, सारखं संसार मांडा- परत बदला, मुलांचीपण फरफट आमच्याबरोबर, तेव्हा मुलांनी तक्रार केली का? नाही ना? मग आता त्यांच्यामागे आपण गेलो तर कशाला रडायचं. माझी सून तर तिकडचीच आहे. पण तिथे गेले की सगळं छान करते, सुरवातीला पूर्ण अमेरिका फिरवलं आम्हाला, अगदी युरोप टूर पण केली. आणखी काय हवं म्हणते मी. “

” मी तर म्हणते मुलं मार्गी लागली, त्यांची लग्न झाली की आपण ज्येष्ठांनी विश्वस्त व्हावं घराचं,आपल्याला सल्ला विचारला तरच द्यावा, आणि सल्ला दिल्यावर तोच मानला जाईल असा अट्टहास करू नये. त्यामुळे भांडणं कमी होतात. आणि अपेक्षाभंगाचं दुःखही होत नाही. आणि आताच्या जमान्यात, ना आम्ही त्यांच्यावर अवलंबून, ना ते आमच्यावर ! आताच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात या मुलांना खूप माहिती असते, आणि त्यांच्या परीने ते आपली काळजी घेतातच की. आयुष्यात तक्रार न करता आणि दुसऱ्याचं कौतुक करत राहिलं ना की खूपसे प्रश्न चुटकीसरशी सुटतात. “

” चल आवरते आता ! तुझ्याशी बोलत बसले तर कामं कोण उरकणार, आमचा म्हसोबा येईलच एवढ्यात.

चल पळ तू पण!!”

मी निघालो खरा तिथून, पण त्यांचा ‘ विश्वस्त ‘ हा शब्द मनात कुठेतरी खोल जाऊन बसला. किती छान विचारसरणी ना ? 

— असे जर विचार आपल्या सगळ्याच ज्येष्ठांनी केले तर त्यांचे कितीतरी प्रश्न हे प्रश्नच राहणार नाहीत.

लेखक – श्रीरंग खटावकर

संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हट्ट… अट्टाहास… आणि दुराग्रह… भाग -2… डाॅ. श्रीराम गीत ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ हट्ट… अट्टाहास… आणि दुराग्रह… भाग -2… डाॅ. श्रीराम गीत ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

( यातून मनात असूयेचा प्रवेश होतो.) इथून पुढे —- 

मी का नाही? मला का नाही? मला नाही तर कोणालाच नाही ! असा हा सारा अट्टाहास असतो.

मर्चंट नेव्हीमध्ये खूप पैसे असतात. पहिला पगार दीड लाख रुपयांचा असतो. पायलट बनले तर जगभर हिंडता येते. त्यासाठीचा खर्च मोठा असला तरी दोनतीन वर्षात फेडता येतील इतके पैसे मिळतात. मालिका आणि मॉडेलिंगमध्ये एकदा शिरकाव झाला की मजाच मजा. कॉम्प्युटर इंजिनिअर झाल्यावर अमेरिका तर नक्कीच. गेम खेळून आणि युट्युबवर व्हिडिओ टाकून लाखो रुपये मिळतात. क्रिकेट खेळणे हा मुलांचा, तर कथ्थकचा क्लास लावणे हा मुलींचा आवडीचा विषय, पाहता-पाहता करियरच्या अट्टाहासात बदलतो. परदेशी भाषा शिकली म्हणजे आपण त्या देशाचे नागरिकच बनलो हा गैरसमज  आठवी-नववीत घेतलेल्या परदेशी भाषेपासून सुरू होतो. अशा रंजनाला दिवास्वप्नाचे स्वरूप कधी येते ते कळेनासे होते.

मम्मी-पप्पांची सुद्धा अशीच अट्टाहासाची विविध रूपे पाहायला मिळतात. मुलाला फायनान्स मध्ये घालूयात, पदवीसाठीच परदेशात शिकायला पाठवू, डॉक्टर बनवायला हरकत काय आहे, शिकेल कॉम्प्युटर आणि जाईल आयटीत, एनडीए मध्येच घालून टाकू, असे म्हणता म्हणता ही गाडी पगारावर येते. म्हणजे इतके शिकून लाखभर रुपये सुद्धा नाहीत मिळणार? या अट्टाहासाला यथावकाश पूर्णविराम मिळणार असतो. पण निराशेचे सावट ओढवून घेतलेले असते हे नक्की.

दुराग्रहाचे बळी कसे असतात? पस्तिशीतला एखादा भकास चेहरा पाहिला, हरकाम्याची नोकरी करत जेमतेम मिळवणारी एखादी व्यक्ती पाहिली, निवृत्त आईवडिलांच्या पेन्शनच्या आधारावर राहणारा बेकार मुलगा पाहिला, किंवा तीन पदव्या हाती असूनही नोकरी न मिळालेली तीस-बत्तीसची मुलगी पाहिली तर माझी उत्सुकता करिअर कौन्सेलर म्हणून जरा चाळवते. बहुदा थक्क करणारी माहिती मला मिळते. खऱ्या अर्थाने ज्याला हुशार म्हणावे अशा वाटचालीतून यांचे शालेय शिक्षण झालेले असते. आई-वडील, नाहीतर स्वतः च्या  दुराग्रहातून नकोशा शाखेची, नकोशा पदवीची, भरपूर खर्चून घेतलेल्या पदव्युत्तर शिक्षणाची बाजार नियमानुसार किंमत शून्य असते. हे कळेपर्यंत वेळ गेलेली असते. उमेद संपलेली असते. हातातील पदवीतून मिळणारी नोकरी व पगार अत्यंत क्षुल्लक वाटल्याने नाकारले जाते.

पीडब्ल्यूडीतील वरिष्ठ सिव्हिल इंजिनियरने अट्टाहासाने मुलाला सिव्हिल इंजिनिअरिंगला  घातले. त्याला कला शाखेतून मास कम्युनिकेशन करण्याची खूप इच्छा होती. वडिलांच्या दुराग्रहापुढे त्याचे काहीच चालले नाही. आईने वडिलांच्या नोकरीतील सुबत्ता पाहिली असल्यामुळे तिचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता. मुलगा सिव्हिल इंजिनिअर झाला.  नोकरी मिळेना, मिळाली तर बिल्डर दहा हजार रुपये पगार द्यायला तयार. तेवढाच पॉकेटमनी घेणारा मुलगा नोकरीला नकार देत गेला. आई युपीएससीची परीक्षा दे म्हणून त्याच्या मागे लागली. मुलाने होकार दिला. पण ते मिळाले नाही. ना युपीएससी ना सिव्हिल इंजीनियरिंगमधली नोकरी. आता वडील व मुलगा दिवसभर समोरासमोर पेपर वाचत बसतात.

मोठ्या बँकेतील अधिकाऱ्याची मुलगी बी.कॉम. झाली. तिची इच्छा एम.बी.ए. करण्याची होती. आई-वडिलांनी नकार दिला व एम. काॅम. करताना बँकांच्या परीक्षा द्यायला भाग पाडले. एम.कॉम. झाली पण बँकेत नोकरी लागलीच नाही. माझ्या मुलीने किरकोळ अकाउंटंटची कामे करायची नाहीत, कारकुनी कामात तिने जायचे नाही हा पालकांचा अट्टाहास नडल्याने वयाच्या 32 व्या वर्षी ती आता आईला घरकामात मदत करते. 

साऊंड इंजिनियरिंगचा महागडा अभ्यासक्रम बारावीनंतर  पूर्ण करून मुलगा, त्यात काम नाही व अन्य काही करता येत नाही म्हणून नोकरीविना घरी बसून आहे. मी काम केले तर फक्त साऊंडमध्येच करणार हा त्याचा दुराग्रह.

घरातील एकाचा दुराग्रह दुसऱ्याच्या साऱ्या आयुष्यावर परिणाम करू शकतो. अशी प्रत्येक क्षेत्रातील अनेक उदाहरणे आहेत. 

म्हणूनच हट्ट, अट्टाहास व दुराग्रह बाजूला ठेवून करियरचा विचार करा …. 

— समाप्त —

लेखक – डॉ. श्रीराम गीत

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares