‘चला, उठा, मोती साबणाच्या स्नानाची वेळ झाली’ म्हणत येणाऱ्या छोट्या मुलाची जाहिरात टीव्हीवर दिसू लागली की दिवाळी जवळ आल्याची जाणीव होते. आणि तऱ्हेतऱ्हेचे सुगंध परिसरात दरवळू लागतात. सुगंधी तेल, साबण, उटणे, अत्तर यांचे वास नाकाला येऊ लागतात.
पंचंद्रियात गंधाचे इंद्रिय हे फार तीक्ष्ण असते. कोणत्या वासामुळे आपण कुठे आहोत हे डोळ्यांनी न पाहता सुद्धा समजते. त्यावरून सहज आठवले ते पदार्थांचे वास!
यांच्या एका स्नेहांकडे रविवारी सकाळी नऊच्या सुमारास जावे की कांदे पोह्याचा वास अगदी बाहेरच्या दारापर्यंत यायचा! तसे कांदे पोहे तेच पदार्थ घालून केले तरी त्यांच्या इतके छान जमतील असं वाटायचं नाही. तो कांदे पोह्याचा वास अजूनही स्मरणात आहे!
उन्हाळ्यातील संध्याकाळी अंगणात पाणी मारले की येणारा मातीचा वास- मृद्गंध, संध्याकाळी उमलणारी जुई, मोगरा, रात राणीची फुले यांचे सुगंध हे काही कुपित भरून ठेवायचे गंधच नाहीत मुळी! ते फक्त मनाच्या कुपीतच भरून राहतात आणि आपले आपल्याला अनुभवता येतात. असाच एक गंध माझ्या आजोळ च्या घरात मी मनात भरलेला! माझ्या मामाच्या घरी म्हैसूर सँडल्स वापरला जाई.तो येणारा चंदनी वास मला आजोळच्या घरी घेऊन जातो. आम्ही ‘हमाम’ साबण वापरणारे त्यामुळे त्या चंदनी सोपचा वास आमच्यासाठी दुर्मिळच होता!
सुगंध हा असा सांगता तरी येतो पण माझ्या मुलीला आजीची गोधडी पांघरली, की आजीचा वास त्या गोधडीला येतो आणि तसाच वास आईच्या गोधडीलाही येतो असं ती म्हणायची तेव्हा मी बघतच राहायची! पण ते आजीचं आईचं ते पांघरूण तिला मायेच्या सुगंधात ओढून घ्यायचं!
कितीतरी वेगळे वास दिवस भरात घेतो. किराणा मालाच्या दुकानात तेल, डाळी, धान्य, साबण इत्यादींचा एकत्रित वास भरलेला असतो. पॅकिंगच्या जमान्यात दुकानात येणारे हे वास आता कमी झाले आहेत. कापडाच्या दुकानातील कोऱ्या कापडाचा गंध हाही वेगळाच! तो कॉटन ला येणारा वास आता सिंथेटिक कपड्यांना नाही!
कामावर जाताना येताना लोकल, बस प्रवास यातील गंध, घामाचा कुबट वास नको म्हणून मारलेले विविध प्रकारचे स्प्रे यामुळे होणारे वासाचे मिश्रण नाकाला झोंबणारेच वाटते काही वेळा तर ते ऍलर्जीकही असते.
गंध सुगंधांच्या या दुनियेत देवघरात येणारा वास काही वेगळाच असतो वातावरणाचा परिणाम असेल किंवा काही असेल पण तिथे येणारा धूप, कापूर, उदबत्ती, अत्तर यांचा सुगंध मनाला पवित्रतेचा आनंद देतो. वेगवेगळे गंध आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी मिळत असतात आणि कळत नकळत ते आपण घेत असतो.कोळीणीला माशांच्या गंधाइतके काहीच प्रिय नसते. तिच्या उशाशी वासाच्या फुलांपेक्षा मासळीचा गंधच तिला अधिक आनंद देतो! बालगंधर्व अत्तराचे खूप शौकीन होते. त्यांच्या रोजच्या स्नानाच्या पाण्यात विविध प्रकारची अत्तरे वापरली जायची. त्यांच्यासाठी कनोजहून अत्तरे मागवली जायची.पूर्वीच्या काळी राजे रजवाडे अशा सुगंधी अत्तराचे मोठे खरेदीदार असतं.तो जमाना गेला! गंधांचे महत्त्व बदलले.सेंटची कृत्रिम दुनिया जन्माला आली आणि पाश्चात्य संस्कृतीचे सुगंध दरवळू लागले.
गंधाच्या दुनियेत एकदा शिरल्यावर बरेच काही सुगंध आणि आठवणी मनात दरवळू लागल्या. अंगणातल्या वेलीवर उमलणारी जुईची नाजूक फुले तोडून गजरे ओवणारी माझीच मी मला आठवली. सोनचाफ्याची फुले दप्तरात ठेवून वह्या पुस्तकांना सुगंधित करणारी आणि मोगऱ्याच्या वासावर अजूनही जीव टाकणारी मी, सुगंधाच्या बद्दल किती किती लिहू?
‘जे आहे ते सत्य आहे; शब्दरूप घेऊन आले की ते असत्य होते’.
आपल्या शिष्याला गीतेतील जीवनाचे तत्वज्ञान समजावून सांगतानाच्या वेळेचे हे साईबाबांचे उद्गार ! यातून बाबा केवळ भगवद्गीतेतील श्लोकाचेच विवरण करतात असे नाही, तर ते त्याबरोबरच संभाषण शास्त्र आणि कला यांचे मूलतत्व सांगतात.
संभाषण हे मूलतः आपण व्यक्त होण्याचे, दुसऱ्याशी संपर्क साधण्याचे एक साधन आहे. आपण दुसऱ्यापाशी व्यक्त होतो म्हणजे काय करतो? आपण आपल्या मनातील काहीतरी समोरच्याला सांगतो. कसे? त्या बाबीवरील आपले ज्ञान दुसऱ्याच्या विश्वातील अनुभवांच्या जवळातजवळ जाऊन सांगायचा प्रयत्न करतो. जेव्हा बोलणाऱ्या व्यक्तीचे आणि ऐकणाऱ्याचे अनुभव विश्व एकच असते (जे फारच क्वचित घडते) तेव्हा हे अतिशय सुलभ होते. मात्र या दोघांच्या अनुभव विश्वात जितकी तफावत अधिक तितके हे कठीण होत जाते—आपण एका साध्या उदाहरणातून पाहू या—
माझ्या समोर गुळाचा खडा आहे. समोरच्याला हे काय आहे ते माहिती नाही. आता होणारे संभाषण कसे असेल?
‘ हे काय आहे?’
‘ गूळ ’
‘ याचं काय करायचं? ’
‘ हा खायचा.’
‘ कसा लागतो तो?’
‘ गोड ’
‘ गोड म्हणजे? ’
‘ तू साखर खाल्ली आहेस ना? साखर गोड असते.’
‘ म्हणजे गूळ साखरेसारखा लागतो? ’
(पाहिले ना सत्याचे शब्दरूपात कसे असत्य झाले!)
‘ तसे नाही रे. करंजी गोड असते.’
‘ म्हणजे हा करंजीसारखा लागतो?’ (आणखी एक असत्य!)
आता कितीही पदार्थांची नावे सांगितली तरी गुळाची चव त्यांचापेक्षा वेगळीच असणार ना ! मग किती असत्य सांगायचे?
‘आपल्या जिभेवर जे विशिष्ट रससंवेदक असतात ते जेव्हा चेतविले जातात ती चव,’– मी शास्त्राचा आधार घेतला आणि तो माझ्याकडे मोठा आ वासून भूत बघितल्यासारखा पाहू लागला. आता कशी समजावून सांगू मी त्याला गुळाची चव? त्याच्या अनुभवविश्वातून सगळ्या पदार्थांची यादी सांगूनही मला गुळाची चव सांगता येत नव्हती.
अखेरीस मी त्याला म्हटले, ‘ तू खाऊन बघ ना, म्हणजे तुला समजेल याची चव.’
किती सोपा मार्ग ! पण इथे शब्द कुचकामी ठरले, कारण मी त्याला त्याची निश्चित अनुभूती देऊ शकत नव्हतो. म्हणजेच जे अनुभूतीजन्य असते ते सत्य असते आणि त्याला शब्दरूप द्यायचा प्रयत्न केला की ते असत्य होते. अध्यात्मिक भाषेत सांगायचे तर हा ‘ संप्रज्ञात आत्मसाक्षात्कार ‘ आणि ‘ असंप्रज्ञात आत्मसाक्षात्कार ‘ यांच्यातील फरक आहे. प्रज्ञेच्या आधाराने झालेले ज्ञान हे कधीच निर्भेळ असू शकत नाही – संपूर्ण सत्य असू शकत नाही; ते अनुभूतीजन्यच असले पाहिजे.
म्हणूनच संभाषणात शाब्दिक संभाषणापेक्षा चेहेऱ्यावरील आणि नजरेतील भाव व देहबोली अधिक परिणामकारक ठरतात. अन्यथा ‘ मला असे म्हणायचे होते की ….’ किंवा ‘ पण मला असं नव्हतं म्हणायचं ….’ असे सांगायची वेळ येते.
संपूर्ण सत्य हे केवळ अनुभवजन्यच असते. ते शब्दरूप घेऊन आले की भेसळीने त्याचे असत्य होते.
‘जे आहे ते सत्य आहे; शब्दरूप घेऊन आले की ते असत्य होते’.
☆ हट्ट… अट्टाहास… आणि दुराग्रह… भाग -1… डाॅ. श्रीराम गीत☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
करियर हा शब्द रुळला तेव्हापासून त्याला तीन शब्द चिकटले आहेत. हट्ट, अट्टाहास आणि दुराग्रह!
यात प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका असते. मम्मीची भूमिका नवर्याच्या कारकिर्दीवर अवलंबून असते. पप्पांची भूमिका ‘ हम करे सो कायदा ‘ अशी असते किंवा ताटाखालचे मांजर कायमच म्यावम्याव करते. मुला-मुलींच्या भूमिका पक्क्या कधीच असत नाहीत. कधी बाल हट्ट असतो, कधी स्वप्नांचा अट्टाहास असतो, तर ऐकीव गोष्टींचा दुराग्रह करणारे काही निघतातच.
नेहमीच्या उदाहरणातून या गोष्टी मी स्पष्ट करतो. प्रथम या तीन शब्दांचा अर्थ मला अभिप्रेत काय आहे त्याबद्दल. हट्ट प्रत्येकाच्या(अपवाद संतमहंतांचाच)मनात असतो. पण यथावकाश तो पुरा होणे शक्य नाही हे समजून घेणारा त्या हट्टाचा नाद सोडतो. सुंदरच बायको, श्रीमंतच बंगलेवाला नवरा, मुला-मुलींचे पायलट बनण्याचे किंवा सिनेस्टार बनण्याचे स्वप्न ही झाली हट्टाच्या संदर्भातील काही नेहमीची उदाहरणे. नोकरीच्या सुरुवातीला किंवा वयाच्या गद्धेपंचविशीपर्यंत हे हट्ट संपत जातात.
सुंदर बायको किंवा श्रीमंत नवरा मिळेपर्यंत तिशी गाठणे, लग्न न करणे हा झाला अट्टाहास. कर्ज काढून एखादा अभ्यासक्रम पूर्ण करून पायलट किंवा सिनेस्टार बनता येत नाही हेही तिशीत कळते. मग हे सारे पुढची तीस वर्ष मिळेल ते गोड मानून मार्गाला लागतात. आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणे सहज ओळखू येतात.
दुराग्रह मात्र वाईटच. स्वतःबरोबर संपूर्ण कुटुंबाची फरपट करण्यामध्ये दुराग्रही मुलगा, मुलगी, आई, वडील खलनायकाची भूमिका बजावत राहतात.दुराग्रहाची विविध रूपे मला दर वर्षी दर महिन्याला सामोरी येत असतात. काहीवेळा दुराग्रह समजावून देणारा भेटला तर फरक पडतो. याउलट काही जणांनी कान व मेंदू बंद केल्यामुळे ऐकायचा संबंधच नसतो. करीयरची निवड करण्याचे निकष, त्यातील ठोकताळे, हातातील खर्चायची रक्कम, शिकण्यासाठीची वर्षे, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिकण्यासाठी लागणाऱ्या क्षमता, या साऱ्या ताळेबंदाची नीट माहिती घेतल्यावर काहींचा दुराग्रह दूर होऊ शकतो.
दहावीला जेमतेम 64 टक्के मार्क असलेली मुलगी डॉक्टर व्हायचंय म्हणते, चित्रकलेत अजिबात रस नसलेला मुलगा ॲनिमेशन किंवा गेमिंगमध्येच जायचे सांगतो, बारावीला 57 टक्के व जेईईला 50/300 मार्क पडलेला मुलगा आयआयटी रिपीट करायला मला कोट्याला वडील पाठवत नाहीत म्हणून अडून बसतो. ही आहेत दुराग्रहाची ठळक उदाहरणे. शिकणे सोपे पण हट्ट, अट्टाहास, दुराग्रह सोडणे कठीणच.
लहानपणी चॉकलेट खावेसे वाटते. पावसात वडापाव आणि कांदाभज्याची आठवण होते. तसे वयाच्या 14 ते 19 दरम्यानचे हट्ट असतात. समोर येईल ते करावेसे वाटते. बरे वाईटाचे भान नसते. सिगरेटचा झुरका, चोरून पाहिलेला सिनेमा, बुडवलेली परीक्षा,अर्थातच कोणाच्यातरी प्रेमात पडणे, यातून सुखरूप बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी असते. ऐकीव करियरचा हट्ट इयत्ता बारावीपर्यंत हळू हळू कमी होतो. नववी दहावी– स्वप्नाळूपणा या दोन वर्षात जातो. संशोधक बनायचं असं म्हणणारा, फिजिक्स किती जड जातं हे कळते अन् हट्ट सोडतो. गणित कठीण जाणारा इंजिनीअरिंगवर विचार करतो. पंधरा वीस टक्के मार्क अकरावीलाच कमी झाल्यावर मेडिकल मिळणार नाही याचा अंदाज येतो. कविता करणारी, त्यातच रमणारी मुलगी, भाषा शिकताना त्यातील छटा कळल्यावर भानावर येते. लेखक, पत्रकार, सिनेमासाठी लेखन करायचे असे म्हणणारेही थोडे जागे होतात. यांचे हट्ट हळूहळू कमी होतात.
मात्र इयत्ता बारावीनंतर अट्टाहासाची अनेक उदाहरणे दिसतात. रात्र रात्र जागून इंटरनेटवर विविध संस्था, नवीन अभ्यासक्रमांची न ऐकलेली नावे, एखाद्या गडगंज श्रीमंत मित्राने कुठे तरी विकत घेतलेला प्रवेश, यातून मनात असूयेचा प्रवेश होतो.
— क्रमशः भाग पहिला
लेखक – डॉ. श्रीराम गीत
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ पुण्यातली यंदाची विसर्जन मिरवणूक … लेखक श्री विक्रम रजपूत ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
कालची गणपती मिरवणूक म्हणजे आजवरचा कहर होता. टिळक रोड, अलका टॉकीज चौक, बेलबाग चौक इथे लोकांचा अक्षरशः महापूर आला होता.
मागच्या दोन वर्षांपासून तुंबलेले खास चेंगरून घेण्यासाठी बाहेर पडलेत असं वाटत होतं. निम्म्याहून जास्त लोक दारू प्यायलेले होते, तर काही जण रस्त्यावरच उभे राहून पीत होते. या पिणाऱ्यांमध्ये मुलीदेखील मागे नव्हत्या. दारू पिऊन बेभान नाचणे, नाचून नाचून रस्त्यावरच उलट्या करणे, आणि उलट्या करून झाल्या की पुन्हा नाचणे.
स्पीकर्सच्या आवाजाबद्दल तर न बोललेलं बरं. त्या बेसमुळे अक्षरशः छाती फुटून हृदय बाहेर येईल की काय असं वाटत होतं आणि ह्या सगळ्यात हाईट म्हणजे त्या मरणाच्या गर्दीत काही पालकांसोबत त्यांच्या कडेवरची लहान मुलं देखील रेटली जात होती. ती मुलं जीवाच्या आकांताने रडत होती.
कोरोनात घरटी एक माणूस दगावल्यासारखा दगावला आहे. त्या दुःखातून बरेच जण अजून नीट सावरले नाहीयेत आणि त्यांच्याच घरासमोर ‘ पोरी जरा जपून दांडा धर ‘ वगैरे सारखी गाणी कर्कश्श आवाजात लावून विचित्र हावभाव आणि ओंगळवाणे हातवारे करत नाचणारे, एकमेकांना रेटणारे आणि असा नाच पहायला गर्दीत चेंगरत वाहत जाणारे लोक बघून कोणत्याही स्थिर मानसिकतेच्या माणसाला मळमळल्याखेरीज राहणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती होती.
‘ बाप्पाच्या आगमनाची चाहूल ‘, ‘ बाप्पा गेला की घरात पोकळी जाणवते ‘ हे सगळं त्यांनाच होतं ज्यांच्या घराजवळ एखादं सार्वजनिक मंडळ नसतं. बाकी जे मुख्य शहरात किंवा मिरवणूक मार्गावर राहणारी मंडळी आहेत त्यांना, म्हाताऱ्या माणसांना, सलग तीस-छत्तीस तास त्या गर्दीत उभे राहून ड्युटी करणाऱ्या पोलिसांना, ज्यांना खरंच सामान्य माणूस म्हणता येईल अशा सर्व स्थिर मानसिकतेच्या लोकांना, आणि स्वतः गणपतीला देखील गणेशोत्सव संपला की हायसं वाटत असावं.
‘ पुढच्या वर्षी लवकर या ‘, ‘ पुढच्या वर्षी लवकर या ‘ म्हणत असे घाणेरडे प्रकार करणारे भक्त बघूनच गणपती बाप्पाने मागची दोन वर्षे ब्रेक घेतला असणार आहे …
लेखक : श्री विक्रम रजपूत, पोलीस उपनिरीक्षक
संग्राहिका : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
नेत्रदानामुळे दृष्टी लाभ घडलेल्या एका छोट्या मुलीचा निरागस आनंदी चेहरा आणि बाजूला असंख्य रंगांची सरमिसळ अशा एका चित्राला समर्पक अशा या दोन ओळी मी लिहिल्या आणि मनात विचार आला, खरंच त्या मुलीच्या आयुष्यातील हा केवढा आनंदाचा, भाग्याचा, क्रांतिकारी क्षण आहे ! त्याने तिचे आयुष्य पूर्ण बदलून गेले. तिला दृष्टी लाभली. ती स्वतःच्या डोळ्यांनी हे जग पाहू लागली. कल्पना करा मीट्ट काळोखात चार पावले चालताना सुद्धा भीतीने आपल्याला धडकी भरते. इथे तर अवघ्या आयुष्याचा प्रश्न आहे.
अंधत्व ही आजकालच्या अनेक समस्यांपैकी एक गंभीर समस्या आहे. अंधत्व येण्याची वेगवेगळी कारणे आहेत. डोळ्याच्या बुबुळांच्या आजारामुळे येणारे अंधत्व ( कॉर्निया ब्लाइंडनेस ) हा यातीलच एक प्रकार. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने यावर इलाज करता येतो. बुबुळ रोपण शस्त्रक्रिया करून या अंधत्वावर मात करता येते. या शस्त्रक्रियेने खराब झालेले बुबुळ ( कॉर्निया )काढून तिथे चांगले बसवितात.
पण यासाठी माणसाच्या शरीरातील नैसर्गिक बुबुळांची गरज असते. कारण अजून पर्यंत कृत्रिम बुबुळ बनविणे शक्य झालेले नाही. मृत व्यक्तीच्या नेत्रदानामुळे अशी निरोगी नैसर्गिक बुबुळे उपलब्ध होतात. यासाठी नेत्रदात्याच्या मृत्यूनंतर चार ते सहा तासापर्यंत त्याचे नेत्रदान करावे लागते. त्यामुळे मृत्यूनंतर लगेचच नेत्रपेढीला कळवावे लागते. नेत्रतज्ञ येईपर्यंत मृत व्यक्तीचे डोळे बंद करून त्यावर थंड पाण्याच्या घड्या ठेवाव्यात. डोक्याखाली उशी ठेवावी. खोलीतील पंखा बंद करावा. ए.सी असेल तर सुरू ठेवावा. डोळे कोरडे पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच मृत्यूचे प्रमाणपत्र तयार ठेवावे.
डॉक्टर मृत व्यक्तीच्या डोळ्यातील फक्त बुबुळाचा (नेत्रपटल) आवश्यक भाग काढून घेतात. त्याजागी कृत्रिम भिंग ठेवून डोळे व्यवस्थित बंद करतात. नेत्रदान केल्याचे लक्षातही येत नाही. चेहरा अजिबात विद्रुप होत नाही. काढून घेतलेली नेत्रपटले पुढील ७२ तासात उपयोगात आणता येतात. बुबुळ रोपणाने ज्यांना दृष्टी येऊ शकते अशा व्यक्तींना त्याचे रोपण केले जाते. हे नेत्रदानीत डोळे कुणाला बसवले ही माहिती गुप्त ठेवली जाते.
एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन जणांना दृष्टी येऊ शकते. कारण एका व्यक्तीस एकच बुबुळ बसवितात. तेव्हा मृत्यूनंतरही अत्यंत अनमोल असणारे डोळे शरीराबरोबर नष्ट न करता त्यांच्या दानाने दोघांची अंधारी आयुष्य प्रकाशमान होतात व जाता जाता एक मोठे पुण्यकर्म घडते. यासाठी कोणीही व्यक्ती कोणत्याही नेत्रपेढीकडे नेत्रदानासाठी आपले संमती पत्र/ इच्छापत्र भरून देऊ शकतात व या तपशिलाची नोंद केलेले कार्ड घरातल्यांच्या माहितीसाठी ठेवता येते. असे संमतीपत्र भरलेले नसले तरी चालते. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या संमतीने सुद्धा नेत्रदान करता येते. कारण हे काम तर नातेवाईकांनी करावयाचे असते.
दरवर्षी साधारणपणे दोन लाखांच्या जवळपास नेत्र पटलांची आवश्यकता असताना केवळ चाळीस हजारांच्या आसपास नेत्र पटले उपलब्ध होतात. ही जी प्रचंड तफावत आहे ती दूर करण्यासाठी समाजाचे फार मोठे प्रबोधन होणे गरजेचे आहे. आपल्याकडे केवळ दीड टक्का लोक नेत्रदान करतात तर शेजारील श्रीलंकेत हे प्रमाण शंभर टक्के आहे. ‘नेत्र ही राष्ट्रीय संपत्ती आहे’ या दृष्टीने बघण्याची मानसिकता त्यांनी स्वीकारली आहे. म्हणूनच स्वतःच्या देशाची गरज भागवून ते आपल्यासह अनेक देशांना काॅर्निया पुरवतात.
नेत्रदानाच्या बाबतीत बरेच गैरसमज आहेत. शिवाय याविषयीचे अज्ञान किंवा अपुऱ्या माहितीमुळेही नेत्रदान केले जात नाही. ज्यांच्या घरातली व्यक्ती गेली असेल त्यांच्या जवळच्या व्यक्तींची मानसिक अवस्था अशी असते की, त्यांना त्यावेळी या इतर गोष्टी सुचणे शक्य नसते. अशावेळी इतर कोणीतरी सांत्वन करून त्यांना नेत्रदानाची आठवण करून देणे आवश्यक असते. यातूनच एक सत्कर्म घडून येते. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी नेत्रमित्र बनून अशावेळी नेत्रदानासाठी आवाहन करायला हवे.
आम्ही या संदर्भात काम करायला सुरूवात केल्यावर अनेकांनी सांगितले,” नेत्रदान इतके सोपे असते याची कल्पनाच नव्हती. पुरेशी माहिती नव्हती नाहीतर यापूर्वीही घरातल्यांचे नेत्रदान केले असते. इथून पुढे आम्ही तर करूच पण इतरांनाही सुचवू.” यातूनच ही चळवळ व्यापक बनून अंधांची संख्या घटू शकेल. कोणतेही वय, लिंग, रक्तगट, धर्माची तसेच ब्लड प्रेशर, मधुमेह, अस्थमा, मोतीबिंदू, काचबिंदू झालेली व्यक्ती नेत्रदान करू शकते.
‘अ’ जीवनसत्वाचा अभाव, डोळ्याला मार लागणे, जंतुसंसर्ग, ॲसिड किंवा चुना डोळ्यात जाणे अशा कारणांनी बुबुळ पांढरे होते. यालाच ‘फुल पडणे’ असे म्हणतात. यामुळे अंधत्व येते. अशा लोकांना नेत्रदानामुळे दृष्टी परत मिळू शकते. तेव्हा समाजात अशी कोणी अंध व्यक्ती आढळल्यास त्यांना ही माहिती देऊन डॉक्टरांकडे पाठविणेही तितकेच आवश्यक आहे. ज्यांना नेत्रदानामुळे नजर येऊ शकते अशांची नाव नोंदणी केली जाते व नेत्रदान मिळाले की त्यांना बोलावले जाते.
नेत्रदान जागृतीसाठी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर असा ‘राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा’ पाळला जातो. यावेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही चळवळ पोहोचावी हे प्रयत्न केले जातात.
यासाठी प्रत्येकाने नेत्रदानाविषयी पूर्ण माहिती घ्यावी, शंका दूर कराव्यात, इतरांना आवाहन करावे. आपण समाजाचा एक घटक असल्याने समाज स्वास्थ्यासाठी शक्य तितके योगदान देऊन प्रत्येकाने आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. यामुळे नेत्रदानाच्या या चळवळीस बळ मिळेल. यातूनच अनेक बांधवांना ‘अंधारातून प्रकाश वाट’ सापडेल.
आज उद्या सुट्टी. नुकतचं मोठं मंगलकार्य पार पडल्यानंतचा शीण आलाय. गणपतीगौरी विसर्जनानंतर आलेला हा मानसिक आणि शारीरिक थकवा असतो.
घरच्या गौरीगणपतींचं विसर्जन झालं आणि घर सुनं सुनं वाटायला लागलं. घरं जरी सुनं सुनं झालं तरी जरा बाहेर पडलं की चौकाचौकात बसलेले गणपती, त्या भोवतालची आरास, स्पिकरवरील भक्तीगीतं आणि आरत्या ह्यामुळे उत्साहवर्धक मंगलमय वातावरण होतं.
काल अनंतचतुर्दशी झाली. गावातील बाप्पांच्या मुर्तींचं पण विसर्जन झालं आणि मग खरोखरच सगळं शहर निस्तेज, शांत भासायला लागलं. सणसमारंभ आटोपले की एक प्रकारचं चैतन्यच नाहीसं होतं, एक मरगळ आल्याचा फील येतो.
हा सण सुखरूप, निर्विघ्न पार पडल्यानंतर सर्वप्रथम आभार मानायचे तर त्या पोलीस खात्याचे आणि रहदारी वर नियंत्रण ठेवणा-या ट्रॅफिक पोलिसांचे मानावे लागतील. खरंच किती ताण येतं असेलं नं ह्या दोन्ही खात्यांवर. गणपतीच्या मिरवणूकीतील गर्दीवर नियंत्रण ठेवणे, नागरिकांच्या सुरक्षेबाबत सतर्क असणे, ह्या प्रकारची अनेक महत्त्वाची कामे अक्षरशः तहानभूक विसरून पण पार पाडावी लागतात. ही कर्तव्ये पार पाडतांना बरेचदा त्यांना वैयक्तिक अडचणींकडे कानाडोळा करावा लागतो.
अमरावतीमध्ये गणपती आणि नवरात्रात चिक्कार गर्दी असते. गणपती बघायला आणि नवरात्रात देवींच्या दर्शनासाठी आजुबाजुच्या कित्येक गावागावांतून कुटूंबासहित लोक येतात. या सगळ्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष ताण हा पोलीस खातं, वाहतूक नियंत्रण खातं आणि आरोग्य खातं ह्यावर येतोच. कितीतरी पोलीस पुरुष व महिला कर्मचारी सुध्दा ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी तैनात असतात. ह्या कालावधीत ह्या खात्यातील कर्मचाऱ्यांना अजिबात रजाही मिळत नाही. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची कामे ह्या खात्यातील कर्मचाऱ्यांवर सोपवलेली असतात. गर्दीला आटोक्यात ठेऊन भक्तांची नीट रांगेत व्यवस्था करणे, कुणी लहान मूल चुकून त्या गर्दीत हरविले तर त्याला सुखरूप त्याच्या पालकांपर्यंत पोहोचविणे, वयोवृद्ध मंडळींकडे जातीने काळजीपूर्वक लक्ष पुरविणे, गर्दीचा फायदा घेऊन घुसलेल्या भुरट्या चोरांचा मागोवा घेणे, एकाच जागी जास्त व्यक्तींना वा वाहनांना थारा न देणे, आणि ही सगळी व्यवस्था त्यांना लगातार आठ दहा घंटे सतत फिरस्ती राहून चोख बघावी लागते. खरंच सलग इतके घंटे उभ्याने काम करुन अक्षरशः पायाचे तुकडेच पडत असतील त्यांच्या .
गणपतीत दहा दिवस, आणि मध्ये जेमतेम पंधरा दिवस तीन आठवडे उलटले की परत नवरात्रात सलग नऊ दिवस पुन्हा तीच व्यवस्था बघणे हे अतिशय अवघड, कष्टाचंच काम आहे. ही व्यवस्था बघतांना ते कर्मचारी तहानभूक विसरून ऊन,पाऊस ह्याची पर्वा न करता इमानेइतबारे आपले कर्तव्य बजावीत असतात. शिवाय वेगवेगळ्या निवडणूकांच्या काळात देखील ह्यांच्या संयमाची कसोटीच लागत असते.
शेवटी काय प्रत्येक ठिकाणी व्यक्ती तितक्या प्रकृती .एखाद्या वाईट अनुभवाने सगळ्या खात्यालाच त्या पँरामीटर मध्ये तोलणे योग्य नव्हे. शेवटी ती पण आपल्यासारखीच हाडामाणसाची माणसे हो. त्यांना पण त्यांच्या आरोग्याच्या, वैयक्तिक, कौटुंबिक विवंचना ह्या असतातच.पण तरीही मनापासून सेवा देणा-या ह्या खात्यातील समस्त कर्मचाऱ्यांना मानाचा सँल्युट.
माझं बालपण सदाशिव पेठेत गेलं. तेव्हा गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत, मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम असत. पाचवीत असताना, शिवाजी मंदिरमध्ये मी जादूगार रघुवीर भिकाजी भोपळे यांचे जादूचे प्रयोग पाहिले.
त्या कार्यक्रमात, जादूचा प्रत्येक प्रयोग झाल्यानंतर रघुवीर, गंगेची प्रार्थना म्हणून एका रिकाम्या कळशीतून बादलीमध्ये पाणी ओतायचे.. कार्यक्रम संपेपर्यंत बादली पूर्ण भरुन जात असे.. कळशी मात्र रिकामीच असे.. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहे!
२४ मे १९२४ रोजी रघुवीर यांचा जन्म पुण्याजवळील एका खेड्यात, सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. शिक्षणासाठी ते पुणे विद्यार्थी गृहात, आश्रमवासी म्हणून आले. माधुकरी मागून त्यांनी मॅट्रीकची परीक्षा दिली.
त्याकाळी मदारी रस्त्यावर हातचलाखीचे प्रयोग करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असत. असाच एका राजस्थानी जादूगाराचा खेळ, रघुवीर यांनी रस्त्यावर पाहिला. त्यांनी त्या ‘राणा’ नावाच्या जादूगाराला, ‘ मला जादू शिकवशील का?’ असे विचारले.. राणा तयार झाला. रघुवीर यांनी त्याच्याकडून जादू शिकल्यानंतर ८० वर्षांपूर्वी, पहिला जादूचा प्रयोग केला.
गानहिरा हिराबाई बडोदेकर यांनी जादूगार रघुवीर यांचे जादूचे प्रयोग पाहून, त्यांना आपल्या सोबत आफ्रिकेच्या दौऱ्यावर नेले. तिथे त्यांनी जादूचे प्रयोग केले व तिकडील नवीन जादू, आत्मसात केल्या. असेच दौरे त्यांनी रशिया व जपानचेही केले. या परदेशी प्रवासाच्या अनुभवांचे, जादूगार रघुवीर यांनी ‘ प्रवासी जादूगार ‘ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला व त्याच्या हजारों प्रतींची विक्रमी विक्री झाली…
जादूगार रघुवीर यांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त होतं. त्यांची उंची सहा फूट दोन इंच होती. डोळे निळसर रंगाचे होते. प्रथमदर्शनीच त्यांची प्रेक्षकांवर छाप पडत असे. त्याकाळी पुण्यातील रस्त्यावरुन ते डोळ्यांवर काळी पट्टी बांधून, मोटरसायकल चालवायचे. वाटेत कुणी त्यांना हार घालण्यासाठी थांबला असेल तर तिथे थांबून त्याच्याकडून गळ्यात हार घालून घ्यायचे. पुलं, राजा गोसावी, बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. आचार्य अत्रे यांनी, त्यांच्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकातील राधेश्याम महाराजांची भूमिका करणाऱ्या प्रभाकर पणशीकर यांना जादूगार रघुवीर यांचेकडे जाऊन जादू शिकून घ्यायला पाठवले होते. जेणेकरून त्यांची ‘तोतया राधेश्याम’ची भूमिका सरस होईल..
जादूगार रघुवीर यांनी, त्यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये ७,०२३ जादूचे कार्यक्रम केल्यानंतर १९७७ साली निवृत्ती स्वीकारली. त्याआधी त्यांनी १९६७ साली, भिकारदास मारुतीजवळ ‘जादूची शाळा’ नावाचा, वरती जपानी पॅगोडा असलेला तीन मजली बंगला बांधला. तिथे जादूचे प्रयोग शिकविणारी संस्था सुरु केली. देशातील व परदेशातील कित्येकांनी इथे जादू शिकून घेतली.
२० आॅगस्ट १९८४ साली, भारतातील या पहिल्या व्यावसायिक मराठी जादूगाराचं निधन झालं.. आज त्यांची चौथी पिढी जादूच्या प्रयोगांचा वारसा अविरतपणे चालविते आहे..
मी नशीबवान, की जादूगार रघुवीर यांचे जादूचे प्रयोग अनेकदा पाहू शकलो.. आजही जादूगार रघुवीर हे नाव निघाल्यावर, त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहतं..
त्यांना जाऊन अडतीस वर्ष झाली. त्यांच्यानंतर पी. सी. सरकार यांनी, देशभरातील थिएटरमध्ये जादूचे प्रयोग केले. कोल्हापूर येथील जादूगार भैरव यांनी टिळक स्मारक मंदिरात अनेकदा जादूचे प्रयोग केले. नंतर हळूहळू जादूचे प्रयोगातील ‘जादू’ कमी होऊ लागली. चोवीस तास टीव्ही सुरु झाल्यावर माणसं बाहेर पडेनाशी झाली.. काही परदेशी वाहिनींवर जादूचे प्रयोग घरात बसून पाहाता येऊ लागले..
आता माणूसच ‘जादूगार’ झालेला आहे.. आपल्या जवळच्या माणसांवर, तोच प्रयोग करु लागला आहे.. समाजात, राजकारणात ‘वन टू का फोर करणं’ त्याला सहज जमू लागलंय.. कुठेही जा, प्रत्येकाची ‘जादू’ चालूच आहे.. हातचलाखीपेक्षाही, चतुराईनं बोलण्याचं प्रमाण अधिक आहे..
चार दिवसांपूर्वी जादूगार रघुवीर यांची जयंती होती.. अशी थोर माणसं शतकांतून क्वचितच जन्माला येतात. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी अनेक संस्थांसाठी प्रयोग केले. त्यामुळेच आज त्यांना कोणीही विसरु शकत नाही.. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !!!
पंचमहाभूतांपैकी एक ‘प्रकाश’ हा अखंड उर्जास्त्रोत आहे. चैतन्याचा झरा आहे. ज्ञानाचा दीपक आहे. आपल्या सभोवतीचा प्रकाश हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भागच असतो. त्यामुळे त्याचे वेगळे अस्तित्व जाणवतही नाही. पण प्रकाशाशिवाय जगण्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही.
आपल्याला सहसा अंधाराचा सामना करायची वेळच येत नाही. कधीतरी वीज गेली तर थोडीशी जाणीव होते. पण मुद्दामच डोळे मिटून काही काम करून बघा. कधी एकदा डोळे उघडतो असे होते आपल्याला. अंधारात चाचपडणे सहनच होत नाही. त्यामुळे संध्याकाळी प्रकाश कमी झाला की आपण उदास होतो. ती वेळ ‘कातरवेळ’ असते. तसेच ढगाने सूर्य झाकला गेला की अंधारते. आपण बेचैन होतो. मळभ दाटून आले म्हणतो. त्यामुळे पूर्ण अंधाराची आपण कल्पनाच करू शकत नाही.
आम्ही दोघे पती-पत्नी १३-१४ वर्षे एका नेत्रपेढीसाठी ‘नेत्रमित्र’ म्हणून काम करत होतो. त्यावेळी अंधत्वाचे विविध पैलू लक्षात आले. दृष्टिदान संकल्पनेविषयी अज्ञान, गैरसमज, अपुरी माहिती या गोष्टी विशेषत्वाने लक्षात आल्या. ‘हा आपला विषय नाही. आपल्याला काय करायचे ह्या चळवळीशी ‘ अशी अलिप्तता पण दिसली. पण आम्हाला प्रकाशाचे महत्त्व जास्ती लक्षात आले ते या नेत्रपेढीच्या एका विशेष कार्यक्रमात.
एका वर्षी जागतिक दृष्टिदान दिवसाच्या निमित्ताने नेत्रदानातून दृष्टीलाभ झालेल्या तीन जणांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली. त्यांना समक्ष भेटल्यावर त्यांच्या चेहर्यावरील आनंदच त्यांच्या भावना सांगत होता. एक पंचविशीची विवाहित मुलगी. बाळ झाल्यावर दृष्टी गेली होती. आता दृष्टी आल्यावर स्वतःच्या मुलाला डोळ्यांनी प्रत्यक्ष बघता येते हीच सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे हे सांगताना रडू आवरू शकत नव्हती.
एक पन्नाशीच्या बाई आणि ६५ वर्षांचे आजोबा हेही खूप भारावले होते. त्या बाई घरातून फारशा बाहेर न गेलेल्या. मग घर हेच विश्व आणि घरातली कामे करणे हेच एकमेव उद्दिष्ट. पण नजर गेली आणि चुलीवर स्वयंपाक करणे, विहिरीकडे जाणे थांबले. परावलंबित्वाने नैराश्य आले. ते आजोबा पण घरात डांबले गेले. बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला आणि एकटेपणाने घेरले.
ण दोघांनाही दृष्टीदानामुळे पुन्हा जगण्याच्या प्रवाहात सामील झाल्याने अत्यानंद झाला होता. स्वयंपाकपाणी, घरातली कामे, एकटे फिरायला जाणे, बाजारहाट, बँकेतली कामे या सर्व गरजेच्या गोष्टी स्वतः करताना मिळणारा आनंद शब्दांबरोबर त्यांच्या चेहर्यावरून ओसंडत होता. आपल्या दृष्टीने ही किती क्षुल्लक कामे आहेत ना. पण त्यांना त्यासाठी परावलंबित्व आले होते. अशा लोकांना इतरांकडून दुर्लक्षित होते पण शक्य आहे ना. थोडक्यात निरुपयोगीपणाची जी अगतिक भावना त्यांच्या मनाला घेरून होती ती आता दूर झाली होती.
त्यांच्याबरोबर आम्हाला सर्वांना पण समाधानाचा आनंद मिळाला होता आणि मन वेगळ्याच प्रकाशाने भरून गेले होते. आपण करत असलेल्या कामाची ही अतिशय सुंदर फलश्रुती बघून मन भरून आले.
नेत्रदान जागृतीच्या कामामुळे खूप अनुभव आले. अनेक लोकांशी जोडले गेलो. हे काम करताना आम्ही आमच्या कुटुंबातील पाच जणांचे नेत्रदान करवून त्यांच्या जगण्याची सफल सांगता केली. तसेच ओळखीच्या इतर ८-१० जणांचे नेत्रदान करवून या कार्यात आपला खारीचा वाटा उचललेला आहे आणि अमूल्य समाधानाचे वाटेकरी झालो आहोत.
☆ सौर शिडाचे अंतराळजहाज – भाग- 2 ☆ श्री राजीव ग पुजारी☆
(या प्रकारच्या मोहिमांद्वारा अशनी व लघुग्रह यांचेवरील खनिजद्रव्ये पृथ्वीवर आणणे आणि पृथ्वीच्या निकटतम अशनी व लघुग्रहांपासून पृथ्वीचे रक्षण करणे या विषयी ज्ञान मिळेल.) इथून पुढे —-
NEA स्काऊट सारख्या मोहिमांतून मिळालेल्या विदेच्या ( डाटाच्या ) सहाय्याने नासाने ‘ Eyes on asteroid ‘ हे ऍप तयार केले आहे. या ऍपद्वारे आपणास नासाला ज्ञात असलेल्या कोणत्याही निकटतम अशनी, लघुग्रह आणि
धूमकेतूची सूर्याभोवती फिरत असतानाची सद्य:स्थिती बघता येते. हे ऍप पूर्णपणे वापरकर्तामित्र (user friendly)आणि परस्परसंवादी (interactive) आहे. तुम्हाला तुमच्या आवडत्या अंतराळयानासह पृथ्वीचा समीपतम लघुग्रह अथवा अशनीचा आभासी ( virtual ) प्रवास करता येईल आणि हे यान या अंतरिक्ष गोलकाचे परीक्षण करतांना virtually च अनुभवताही येईल.
कॅस्टिलो – रॉगेज म्हणतात, ” ग्रहीय संरक्षणाच्या दृष्टीकोनातून मोठे लघुग्रह जरी चिंतेचा विषय असले तरी 2020GE सारखे अंतरिक्ष गोलक अंतराळात प्रामुख्याने आढळतात आणि ते जरी लहान असले तरी आपल्या ग्रहासाठी धोकादायक ठरू शकतात. १५ फेब्रुवारी २०१३ ला रशियाच्या दक्षिण पश्चिम भागातील चेलियाबिन्क्स शहरावर झालेला उल्कावर्षाव एका ६५ फूट व्यासाच्या अशनीच्या स्फोटामुळे झाला होता. त्यावेळी निर्माण झालेल्या धक्का लहरींमुळे (shock waves) पूर्ण शहरातील खिडक्यांची तावदाने फुटली होती व १६००० लोक जखमी झाले होते. हा अशनी 2020GE वर्गातीलच होता.
2020GE विषयी उच्च दर्जाचे अध्ययन करणे हा NEA स्काऊटच्या कामाचा केवळ एक भाग आहे. सुदूर अंतराळ प्रवासासाठी सौर शीड तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकही याद्वारे अनायासे होणार आहे. आर्टिमिस -१ च्या प्रक्षेपणानंतर जेव्हा हे सौर जहाज त्याच्या डिस्पेन्सरपासून विलग होईल तेव्हा पोलादी स्तंभांच्या (boom) सहाय्याने सौर शीड उलगडले जाईल व त्याचा आकार एका लहान पुडीपासून रॅकेट बॉलच्या मैदानाएव्हढा किंवा ९२५ चौरस फूट होईल.
माणसाच्या केसापेक्षाही पातळ, हलके व आरशासारखे असे हे शीड प्लास्टिकचा थर दिलेल्या ऍल्यूमिनियमपासून बनविलेले आहे. सूर्यकिरणांमध्ये असणाऱ्या फोटॉन्स कणांच्या आदळण्यामुळे निर्माण होणाऱ्या बळाच्या जोरावर हे यान मार्गक्रमण करेल. NEA स्काऊटच्या मार्गक्रमणासाठी लागणारी जास्तीत जास्त ऊर्जा सौर शीडच देईल, पण यानाची अभिमुखता (orientation) आणि योजनाबद्ध हालचाली (manuever) यासाठी शीत वायूधारित अग्निबाणांचा वापर केला जाईल.
या मोहिमेचे मार्शल स्पेस सेंटर मधील मुख्य तंत्रज्ञान-अन्वेषक लेस जॉन्सन म्हणतात, ” या मोहिमेच्या प्रारंभी एक प्रश्न होता तो म्हणजे, ‘ एक लहानसे अंतराळयान सुदूर अंतरिक्ष मोहिमांसाठी खरोखर वापरता येईल का आणि ते अल्प किंमतीत उपयुक्त संशोधन करेल का ?’ हे खरोखर फार मोठे आव्हान होते. कारण अशनी व लघुग्रहांची सर्वार्थाने माहिती गोळा करण्यासाठी या क्यूबसेटसारख्या लहानशा यानावर मोठी प्रणोदन प्रणाली बसविण्यासाठी जागा नसते.”—- पण वैज्ञानिक जाणत होते की, मोठे शीड बसविलेले एक लहानसे अंतराळयान सूर्यप्रकाशाच्या सातत्यपूर्ण जोराच्या बळावर एका सेकंदाला अनेक मैल या वेगाने प्रवास करू शकते. जॉन्सन यांच्या मतानुसार आकाराने व वजनाने लहान अंतराळयानासाठी सौर शिडे ही उत्कृष्ठ कामगिरी करणारी प्रणोदन प्रणाली ठरू शकते. NEA स्काऊट त्याची शिडे कलती करून व झुकवून सूर्यप्रकाश ग्रहण करण्याचा कोन बदलेल व त्याला मिळणाऱ्या दाबात बदल घडवून आणेल, आणि प्रवासाची दिशा बदलेल. हे सर्व एक जहाज वाऱ्याचा वापर करून कसे मार्गक्रमण करते तसेच असेल. सप्टेंबर २०२३ ला 2020GE हा अशनी पृथ्वीच्या अगदी जवळ येईल. त्याचवेळेस NEA स्काऊट चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने आवश्यक वेग धारण करून त्याची गाठ घेईल. अंतराळयान अशनीपासून एक मैल अंतरावर येण्याच्या काही वेळ आधी मोहिमेचे मार्गनिर्देशक (navigators) त्याच्या विक्षेपमार्गाचे सूक्ष्म समक्रमण (fine tuning) करतील.
कास्टीलो – रॉगेज म्हणाल्या, ” सेकंदाला १००फूट या सापेक्ष वेगाने एखाद्या अशनीजवळून जाणारे NEA स्काऊट हे सर्वात धिमे अंतराळयान असेल. यामुळे आम्हाला अमूल्य माहिती गोळा करण्यासाठी आणि या वर्गातले अशनी जवळून कसे दिसतात हे पाहण्यासाठी काही तास मिळतील. “
NEA स्काऊटमुळे भविष्यात सौर शिडे वापरून अंतराळ प्रवास करण्यासाठी नक्कीच एक व्यासपीठ मिळणार आहे. यानंतर सन २०२५ मध्ये १८००० चौरस फूट सौर शीड असणारे वेगवान सौर जहाज सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे.