☆ विचार–पुष्प – भाग ३० परिव्राजक ८. अलवर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
‘अलवर’ हे राजस्थानातले त्या काळातले एक संस्थान. संस्थानिक तिथले राजे असत आणि सर्व प्रजा त्यांना मानत असे. परंपरागत राजसत्तेचे ऐश्वर्य आणि इंग्रजी सत्तेचा प्रभाव असे मिश्र वातावरण तिथे होते. याचा प्रभाव तिथल्या थोड्या सुशिक्षितांवर होता. पण मोठ्या प्रमाणात प्रजा अशिक्षित, उपेक्षित, दारिद्र्य असणारी, जुन्या परंपरा पाळणारी आणि मर्यादित विश्वात राहणारी अशी होती.
अलवरच्या स्थानकावर उतरून स्वामीजी रस्त्यावरून पायी चालू लागले, संस्थानच्या शासकीय रुग्णालयासमोर ते पोहोचले तेंव्हा तिथे एक बंगाली गृहस्थ गुरुचरण लष्कर उभे होते. ते त्या रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर होते. स्वामीजींनी त्यांना विचारले, इथे संन्याशांना राहण्यास एखादी जागा कोठे मिळेल? हे ऐकताच गुरुचरण स्वत: त्यांना बाजारात घेऊन गेले आणि एक खोली दाखवली. चालेल ना? स्वामीजी म्हणाले, ‘अगदी आनंदाने’. त्यांची प्राथमिक सोय करून देऊन डॉक्टर तिथून निघून थेट त्यांच्या मुस्लिम मित्राकडे गेले. ते माध्यमिक शाळेत उर्दू आणि पर्शियन शिकवणारे शिक्षक होते. डॉक्टर उत्साहाने त्यांना सांगत होते की, “मौलवीसाहेब आताच एक बंगाली साधू आला आहे. मी तर असा महात्मा आजपर्यंत पाहिला नाही. तुम्ही लगेच चला. थोडं त्यांच्याशी बोला तोवर मी काम आवरून येतोच. डॉक्टर आणि मौलवी स्वामीजींकडे आले. बोलणे सुरू झाले अर्थातच धर्म विषय निघाला. स्वामीजी म्हणाले, “ कुराणाचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे, अकराशे वर्षापूर्वी ते निर्माण झालं, तेंव्हा ते जसं होतं, त्याच स्वरुपात ते जसच्या तसं आजही आपल्या समोर आहे. त्यात कोणताही प्रक्षिप्त भाग शिरलेला नाही.” मौलवी भेटून परत गेले. डॉक्टर आणि मौलवींनी जाता येतं ज्याला त्याला स्वामिजींबद्दल सांगितले. त्याचा परिणाम असा झालं की, दोनच दिवसात अनेकजण स्वामीजींच्या भेटीला येऊ लागले.
स्वामीजींच्या अमोघ शैलीमुळे सर्वजण भारावून जात. आपले विचार मांडताना ते हिन्दी, संस्कृत,बंगाली, उर्दू या भाषांचाही उपयोग करत. गीता, उपनिषद,कधी बायबल यांचाही संदर्भ देत असत. विषयाचे विवेचन करताना ते कधी विद्यापती, चंडीदास ,रामप्रसाद ,कबीर, तुलसीदास यांची भजने सुद्धा म्हणत. गौतम बुद्ध , शंकराचार्य यांच्या चरित्रातला प्रसंग सांगत. श्रोत्यांमध्ये कुणी सुशिक्षित दिसला तर इंग्रजी किंवा पाश्चात्य तत्वज्ञान याचा आधार घेत. आणि राजस्थान मध्ये श्रीकृष्ण भक्त असल्याने तिथे विशेषता श्रीकृष्ण चरित्रातील रोमहर्षक प्रसंग सांगत, प्रेम आणि भक्ति सांगत. ते सांगताना तन्मय होत तर श्रोते ऐकताना भावुक होत. असे बरेच दिवस चालले होते. त्यानंतर, अलवर संस्थांनचे निवृत्त इंजिनीअर पंडित शंभुनाथ, स्वामीजींना आपल्या घरी घेऊन गेले. तिथे सकाळी नऊ वाजल्यापासून लोक जमायला सुरुवात होई.
हे लोक म्हणजे सर्व प्रकारचे, हिंदू, मुसलमान, शैव, वैष्णव, कुणी गाढे अभ्यासक, वेदांती, कुणी परंपरावादी, तर कुणी आधुनिक सुद्धा असत. गावातले श्रीमंत, गरीब, प्रतिष्ठित, सामान्य असे सर्वच लोक स्वामीजींकडे येत. अनेक विषयांवर संवाद चालत असे. काही वेळा नेहमीप्रमाणे भक्तीगीत होई. श्रोते धुंद होत आणि संगीताची बैठक असलेली पाहून आश्चर्य चकित होत. हे सर्व ऐकून हा तरुण संन्यासी प्रेमळ, विद्वान, विनम्र बघून काही जणांना त्यांच्या जातीबद्दल उत्सुकता असे. ते विचारत, स्वामीजी आपण कोणत्या जातीचे? पण स्वामी विवेकानंद कसलाही संकोच न करता स्पष्ट सांगत, “मी कायस्थ होतो.” आपण ब्राम्हण आहोत असा गैरसमज होऊ नये आणि तो झालाच तर विनाकारण श्रेष्ठ जातीमुळे मिळणारा आदर आपल्याला देऊ नये म्हणून ते स्पष्ट सांगत.
असे प्रश्न आले की, यावरून त्यांना आपला समाज कसा आहे, तो एखाद्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टीकोणातून पाहतो? कोणत्या जातीत त्यांच्या परांपरानुसार कोणते विचार आहेत? ते त्यांच्या वागण्यातून कसे उमटतात हे त्यांना अनुभवायला येत होते. अशा प्रकारे भारतीय समाजाचे खरेखुरे दर्शन अशा ठिकाणी त्यांना होत होते. लोकांना जसे स्वामीजींकडून मोलाचे विचार ऐकायला मिळत होते. तसेच स्वामीजींना पण त्यांचे विचार कळत. त्यांच्याही ज्ञानात भर पडे.
मौलवी तर सुरुवाती पासूनच स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले होते. त्यांना मनापासून वाटत होतं की अशा तपस्वी माणसाचे पाय आपल्या घरालाही लागले पाहिजेत. त्यांनी हे, शंभुनाथांना सांगितलं, म्हणाले, “ मी कोणातरी ब्राम्हणाकडून माझी खोली स्वच्छ करून घेईन, खुर्च्या सुद्धा पुसून घेईन, भांडीकुंडी ब्राम्हणाच्या हातून पाणी घालून शुद्ध करून घेईन. कोणीतरी ब्राह्मण शिधा घेऊन येईल, त्याच्याकडूनच स्वयंपाक करून घेईन. पण स्वामीजींनी माझ्या घरी एकदा येऊन भोजन करावं अशी माझी इच्छा आहे. मी लांब उभा राहून त्यांना जेवताना पाहीन.”
केव्हढा हा प्रभाव? शंभु नाथांनी त्यांना सांगितलं ते सन्यासी आहेत, धर्म, जात,पंथ या भेदापलीकडे आहेत. ते नक्की येतील अशी खात्रीच दिली त्यांनी. कारण शंभुनाथ पण उदार दृष्टीकोनाचे होते.
आणि खरच एकदा दोघही मौलवींकडे जेवायला गेले. त्यानंतर अनेक जणांकडे जेवायला जात होते. आसपासच्या परिसरात स्वामीजींची ख्याती वाढत चालली होती. लोकसंपर्क वाढत होता.
☆ विक्रांत..वेदकुमार ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
🇮🇳 IAC विक्रांत 🇮🇳
अलीकडेच चीनने एक नवीन विमानवाहू नौका आपल्या नौदलात समाविष्ट केली आहे. चीनकडून येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतही आपल्या नौदलाची ताकद वाढवत आहे. भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका विक्रांत ही 15 ऑगस्ट रोजी नौदलात सामील होण्यासाठी सज्ज झाली आहे..
विक्रांत म्हणजे समुद्रात तरंगणारी जणू एक विशाल 18 मजली इमारतच! त्याच्या हल च्या बांधकामात तब्बल 21 हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. इतके स्टील 3 आयफेल टॉवर बांधण्यासाठी पुरेसे आहे. विक्रांतचे फ्लाईट डेक तब्बल 2 फुटबाल स्टेडियम इतके मोठे आहे..
विक्रांतचे हँगर इतके मोठे आहे की 30 विमाने आणि हेलिकॉप्टर सामावून घेऊ शकतो. विक्रांतवर तैनातीसाठी मोदी सरकार बोईंग F/A-18 सुपर हॉर्नेट किंवा राफेल-M लढाऊ विमाने विकत घेत आहे. तोपर्यंत मिग-29K विक्रांत वर तैनात असेल. कामोव्ह-31 व MH-60R मल्टीरोल हेलिकॉप्टरही तैनात करण्यात येणार आहेत.
विक्रांतचे वजन 40000 टनांपेक्षा जास्त आहे. ते बनवण्यासाठी 23000 कोटींहून अधिक खर्च झाला आहे. त्याची लांबी 262 मीटर, रुंदी 62 मीटर आणि उंची 59 मीटर आहे. या जहाजात 2300 पेक्षा जास्त कंपार्टमेंट्स आहेत. त्यावर 1700 नौसैनिक तैनात केले जाऊ शकतात!
विक्रांत चा कमाल वेग ताशी 51.85 किलोमीटर आहे तर क्रुजिंग स्पीड 33 किलोमीटर प्रती तास आहे. विक्रांत एकाच वेळी 13890 किलोमीटर प्रवास करत जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाऊ शकतो..
कोचीन शिपयार्ड व भारतीय नौदलाने बांधलेल्या विक्रांत च्या निर्मिती मध्ये 76% पेक्षा जास्त स्वदेशी वस्तू व तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. विक्रांत ही भारतातील आजवरची सर्वात मोठी युद्धनौका आहे..!!
वेल डन भारत सरकार, भारतीय नौदलाचे अभिनंदन व ‘विक्रांत’ला शुभेच्छा..💐
☆ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यातलामुख्य फरक …☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
1) 15 ऑगस्ट ला पंतप्रधान ध्वजारोहण करतात , तर … 26 जानेवारीला राष्ट्रपती झेंडा फडकवतात कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपतीपद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.
🇮🇳
2) 15 ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो. त्याला ध्वजारोहण (flag hoisting) म्हणतात तर… 26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला जातो. त्याला (flag unfurling) म्हणतात.
🇮🇳
3) 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात. तर… 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच, पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्यावर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केल्या जातो, म्हणून त्याला झेंडा फडकवणे म्हणतात.
🇮🇳
4) 15 ऑगस्ट ला लाल किल्ल्यावर * ध्वजारोहण * होते तर, 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो.
🇮🇳
आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.
🇮🇳
संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
म्हणून ज्येष्ठ आषाढातील धुवाधार पावसामुळे समाधान पावलेला निसर्ग नंतर येणाऱ्या श्रावणात आनंदाची ऊधळण करतो .आणि माणुसही त्या आनंदात सामावून सणांची लयलूट करतो,निसर्गाप्रत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पृथ्वी,आप,तेज,वायू ,आकाश या निसर्गातील चैतन्यशक्तींचे पुजन –हीच सणावारांची बैठक .
आणि श्रावणमास म्हणजे सणांची लयलुट –उत्साहाची ,ऊल्हासाची,खाण्यापिण्याची बरसात.
श्रावणात–
सोमवार ते रविवार ,आणि प्रतिपदा ते पोर्णिमा-अमावस्या प्रत्येकाची वेगळीच कहाणी,.
कहाणीवरुन आठवले लहानपण.
माहेरचा श्रावण,–रोज रात्री त्या त्या दिवसाच्या कहाणीचे आईच्या गोड स्वरातील वाचन.हातात मोत्याच्या नसल्या तरी तांदळाच्याअक्षता घेऊन आमचे उडत उडत ऐकणे.
बालबुद्धीमुळे मनात काहीबाही शंका जरुर येत असत.पण एकंदरित तो कार्यक्रम आवडायचा.
परवाच श्रावणाच्या आधीची साफसफाई करतांना आईने दिलेले ,”सचित्र कहाणी संग्रह” पुस्तक हाती आले.अन् मनात विचारचक्र सुरु झाले. पूर्वापार ,एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे चालत आलेल्या या कहाण्या–पुर्वी कदाचित बोधप्रद असतील.पण आता कालबाह्य झाल्या.
कारण या कहाण्या म्हणजे धार्मिक रितीरिवाजांच्या ,व्रतवैकल्यांच्या सामान्य माणसाकडून त्यांचे पालन व्हावे म्हणुन सांगितलेल्या कथा—लोककथा.
सुरवातीला मौखिक प्रचार नंतर लिखित स्वरुपात आल्यावर त्यांना साहित्यिक दर्जा प्राप्त झाला.
त्या माहितीपर आहेतच पण साधे शब्द,सुटसुटीत वाक्ये,एक लयबद्धता त्यामुळे गोडवा निर्माण होऊन लोकप्रिय झाल्या.
कथेची सुरवात साधारणपणे
“आटपाट नगर होते—“
पासुन म्हणजे आठ पेठांचे- मोठे नगर.,आणि शेवट “साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपुर्ण” अपवाद गणेशाच्या कहाणीचा.ती मात्र पाचा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
दिवस कोणताही असो, कहाणी वाचनाची सुरवात ,
“ऐका गणेशा तुमची कहाणी–“
अशीच करायची,”श्रावण्या चौथी घ्यावा,माही चौथी संपुर्ण करावा” आणि वसा पुर्ण करतांना सांगितलेले दानाचे, –सत्पात्री दानाचे महत्व या कहाणीतुन आपण आजही लक्षात घेऊ शकतो.आचरणात आणु शकतो.
श्रावणाच्या आदले दिवशी—on the eve of—श्रावण -येते ती “दिव्याची अवस” — उंदरावर खाण्याचा खोटा आळ घेणाऱ्या सुनेच्या चुकीचे परिमार्जन ती नियमित करत असलेल्या प्रकाशपुजनाने कसे होते हे या कहाणीत सांगितले अज्ञानामुळे अन्याय होतो,त्यावर उपाय ज्ञानरूपी प्रकाश, त्या अर्थाने हे ज्ञानाचे च पुजन आहे.
ॠण काढुन सण साजरा करणे हा एक गैरसमज कालाच्या ओघात जनमानसात रूढ झाला होता,म्हणुन पुढेपुढे सणांविषयी नकारात्मकता वाढत गेली. पण दित्यराणुबाईची कहाणी नीट वाचली तर एखादी गोष्ट परवडत नसतांनाही ठराविक पध्दतीने,केलीच पाहिजे असे मुळीच नाही .हे लक्षात येते.,”संपुर्णास काय करावे “? “—–चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळेसरी द्यावी,आणि नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी” असे सांगितले आहे.या कहाणीतुन आणखी एक बोध घेता येतो,सासरी कितीही श्रीमंती असली,किंवा आपण कितीही उच्चपदस्थ गेलो तरी जन्मदात्याचा –पित्याचा अनादर करु नये.
श्रावणी सोमवारच्या तशा २,४ कहाण्या आहेत. पण म्हातारीची—आणि तिच्या खुलभर दुधाची कहाणी सर्वांना भावते.
शेकडो घागरी दुध ओतुनही न भरलेला महादेवाचा गाभारा तिच्या खुलभर दुधाने भरतो. यावर राजाने विचारलेल्या प्रश्नाचे तिने दिलेले उत्तर अध्यात्मिक संदेश देते. देव देवळात नाही तर प्रत्येक प्राणीमात्रांत आहे. त्यांची सेवा, त्यांना संतुष्ट ठेवणे हीच देवाची पुजा, ही एक प्रकारची कर्मपुजाच म्हणता येईल.
श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरी पुजनानंतर मंगळागौरीची कहाणी वाचलीच जाते. पतीला वाचवण्यासाठी वेळप्रसंगी पत्नी ढाल बनते, साहस करते हे या कहाणीत आहे. आजच्या स्त्रीला तर “रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग” म्हणुन लढावे लागतेच.
बुध बृहस्पती—-बुध, गुरू हे दोघेही बुध्दीचे अधिष्ठाते. नकळत चुक होऊ शकते पण झालेल्या चुकीला सद् सद् विवेकबुद्धीने सुधारता येते हे बुधबृहस्पतीच्या कहाणीतली धाकटी सुन सांगून जाते.
सत्य कितीही लपवले तरी शेवटी ते बाहेर येतेच हे शुक्रवारची जीवतीची कहाणी सांगते. तर गरीब बहिणीचे नाते झिडकारून उपरती होणाऱ्या भावाची –शुक्रवारची देवीची कहाणी आहे. लक्ष्मी चंचल आहे, आज नसेल तर उद्या उदंड वर्षाव करते –दिवस पालटणार, म्हणुन श्रीमंतीचा वृथा अभिमान बाळगु नये हा बोध या कहाणीतुन मिळतो.
शनिवारची मारुतीची कहाणी आहे. तसेच संपत शनिवारची कहाणी आहे. आपल्याकडे जे आहे त्यातले थोडे तरी गरजूंना द्यावे –हीच खरी संस्कृती, हे या कहाणीत सांगितले आहे, “अतिथी देवो भव” हा विचारही या कहाणीतुन दिसतो.
सात वारांच्या या कहाण्या प्रमाणेच इतरही सणांच्या कहाण्या श्रावणात आवर्जुन वाचल्या जातात, नागपंचमीच्या दोन्ही कहाण्यातुन पशुप्राण्यांबाबत कसे भाव असावेत हा बोध मिळतो,आपण प्रेमाने जोपासना केली तर त्यांच्यापासून भय बाळगण्याचे कारण नाही हे लांडोबा पुंडोबाच्या कहाणीत दिसुन येते..
नागपुजा प्रातिनिधिक म्हणुन केली जात असेल पण तशीच प्रेरणा घेऊन सर्पमित्र सारख्या संघटना काम करत असतात.
वर्णसटीच्या कहाणीतील ७व्या मुलीने दिलेले उत्तर “मी माझ्या नशीबाची” यावरुन व्यक्तिचे यशापयश स्वकर्तृत्वावर ठरते. पण त्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा असतो. अलिकडच्या काळात सिनेजगत, राजकारण, काही व्यवसायातील वाढते नेपोटिझम बघतांना या कहाणीची आठवण होते.
निसर्गाच्या चेतनाशक्तीतला महत्वाचा स्त्रोत “आप” “जल”. त्याचे महत्व आणि पुजन शितलासप्तमीच्या कहाणीत आहे. सध्या आपल्यापुढे “पाणी” हा ज्वलंत प्रश्न आहे भविष्यात आणखी गंभीर होणार आहे, म्हणुन जलसंधारण, जलसंवर्धन,काटकसरीने वापर, —एवढे मार्गदर्शन या कहाणीतुन घेतले पाहिजे.
पिठोरी अमावस्येची कहाणी—
मुलाबाळांचे आरोग्यसंवर्धन — म्हणजे पुढची पिढी सुदृढ बनवणे — याचे महत्व त्रिकालाबाधित आहे, हल्ली, १, २च अपत्ये असल्यामुळे, नानाविध सुविधांमुळे जागरुकता नक्कीच निर्माण झाली आहे, पण बरेचवेळा बाहेरचे, फास्टफूड, डबाबंद पदार्थ यांचे वाढते प्रमाण, तसेच बदलती जीवन शैली —यामुळे लहान वयात च गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात, अर्थात, हे सार्वत्रिक विधान नाही, तरीही जागरुकता हा बोध या कहाणीतुन घेता येईल.
अशी ही श्रावण महिन्यातील कहाण्यांमधुन घेता येणाऱ्या बोधाची — साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपुर्ण.
चैत्र वैशाखात उन्हाळ्याची काहीली होत असताना अचानक एक दिवस आभाळ भरून येते !
ढगांचा कडकडाट आणि विजांचा लखलखाट सुरू होऊन पावसाचे टपोरे थेंब येतात. गारा पडतात. जणू तुटे गारा मोत्यांचा सर… जमिनीवर ओघळून येतो ! वळीव येतो आणि हवेत थोडा गारवा निर्माण होतो. पण पुन्हा हवा गरम होते आणि आता प्रतीक्षा असते ती पावसाची ! असे दोन-चार वादळी पाऊस झाले की मग मात्र त्या ‘ नेमेची येतो मग पावसाळा ‘ ची ओढ लागते. ज्येष्ठ उजाडतो आणि अजून जर पाऊस नसेल तर ‘ पावसा, कधी रे येशील तू?’ असं म्हणत त्याची आराधना केली जाते. आंबे,करवंदे,जांभळे ,फणस हा उन्हाळ्याचा मेवा आता संपत येतो.सात जून उजाडला की साधारणपणे पावसाचे आगमन होते.पण ८/१० दिवस जरी पुढे गेला की लोकांच्या तोंडचे पाणी पळते ! लगेच पाणी नियोजन सुरू होते ! पण निसर्ग माणसाइतका लहरी नसतो. लवकरच पावसाचे आगमन होते. आषाढाचा पाऊस सुरू होतो. वर्षा गाणी ऐकू येऊ लागतात.’ ये रे ये रे पावसा..या बाल गीतापासून मंगेश पाडगावकरांच्या पाऊस गाण्यापर्यंत ! सकाळच्या अधूनमधून पडणाऱ्या सोनसळी उन्हात पावसाचे थेंब हिऱ्याप्रमाणे चमकू लागतात आणि मन कवी बनतं !’ जागून ज्याची वाट पाहिली,ते सुख आले दारी ‘ असे म्हणत आलेल्या गारव्यात मन पावसाचा आनंद घेत रहाते. ‘ रिमझिम पाऊस पडे सारखा…’ म्हणतच ज्येष्ठी पौर्णिमेला पावसात वडाची पूजा करताना सृष्टीच्या बदलत्या रूपाचा आपण आस्वाद घेत असतो. वर्षा सहली निघतात,कांदा भज्यांची आॅर्डर येते.कांदे नवमी साजरी होते.आणि आषाढाचा आनंद दरवळू लागतो. गुरू पौर्णिमा बरेचदा पावसात
भिजतच साजरी होते.आणि निसर्ग हाच गुरू हे मनावर अधिकच ठसते !
आठ पंधरा दिवसातच सृष्टी बालकवींची ‘ श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे..’ ही कविता आठवायला लावते. हिरवा शेला पांघरून श्रावणातील सणांना सामोरी जाण्यासाठी सृष्टी नटून सजून बसते ! पावसाची नक्षत्रे सर्व नक्षत्रात महत्त्वाची आणि चैतन्याला जास्त पोषक असतात. अन्न आणि पाणी दोन्ही गरजा पुरवण्यासाठी पाऊस आवश्यकच असतो, पण अधूनमधून पावसावर चिडायला होते. त्याच्या सतत कोसळण्याने आपले काही बेत पाण्यातून वाहून जातात, पण तो निसर्ग राजा त्याच्याच तालात येत असतो. त्याच्या मनाप्रमाणे तो सगळीकडे बरसत असतो. कुठे पूर तर कुठे दरडी कोसळणे, तर कुठे वाहतूक खोळंबणे असे चालूच असते, पण तरीही पाऊस आपल्याला हवासा वाटतो. बघता बघता श्रावण येतो. आणि हसरा श्रावण सणांची माला घेऊन येतो .’ रिमझिम पाऊस पडे सारखा ‘…’असा पडणारा पाऊस श्रावणामध्ये ‘ श्रावणात घन निळा बरस ना ‘ असे गाणे गात येतो. प्रेमिकांचा आवडता श्रावण, कवी लोकांचा आवडता श्रावण, उत्सवप्रेमींचा आवडता श्रावण, सणासुदीचे दिवस असलेला श्रावण गाणी गात गात येतो !’ घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ‘…’ हे आषाढाचं गाणं आता श्रावणात बदलतं– कधी ऊन तर कधी पाऊस असं निसर्गाचे मनमोहक रूप दिसू लागते. सुखाची,आनंदाची सोनपावलं उमटवत श्रावण बरसत असतो. सगळीकडे सस्यशामल भूमी डोळ्यांना आनंद देत असते. बघता बघता नारळी पौर्णिमा येते. पाऊस थोडा कमी होऊ लागतो.. रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा सण येतो. कोळी लोक समुद्रावर मासेमारीसाठी जाण्यास सुरुवात होते. सभोवतालचे वातावरण हिरवेगार, नयनरम्य होते. मग ओढ लागते ती भाद्रपदाची ! श्रावणाला निरोप देता देता गणपती बाप्पाची चाहूल लागते. पावसाचा जोर कमी होऊ लागतो. सगळीकडे आनंदीआनंद पसरू लागतो…..
…. पण तो मनात मुरलेला, भिजलेला श्रावण अजूनही आपल्याला खुणावत असतो. त्याचे ते लोभस रूप पुन्हा पुन्हा दरवर्षी आपण नव्या नव्हाळीने अनुभवतो. .’अस्सा श्रावण सुरेख बाई ‘…. .अनुभवतो…आणि मंगळागौरीच्या फेरासारखा तो मनात घुमत रहातो…
असा उपदेश देणारे आणि तो ज्या व्यक्तीला योग्य प्रकारे कळेल असे घेणारे, असे दोघेही सांप्रतकाळी लोप पावलेले आहेत ! त्याला कारणं काहीही असतील, पण हे वाक्य ऐकून घेणाऱ्याला त्या काळी या एका वाक्या मागील शब्दांचा मार इतका जिव्हारी लागायचा, की ती व्यक्ती एखाद्या फिनिक्स पक्षा प्रमाणे चांगल्या अर्थाने बंड करून उठे !
हल्ली असा शेलका उपदेश कोणी कोणाला द्यायच्या भानगडीत पडत नाही, कारण आजकाल सगळ्याच लोकांची मानसिकता वेगळ्याच पायरीवर गेल्यामुळे असं होत असावं ! मुळात वर म्हटल्या प्रमाणे असं कोणी कोणाला बोलायच्या भानगडीत हल्ली पडतच नाही, लोकं लगेच त्याच्या पुढची पायरी गाठून हात घाईवरच येतात आणि ताबडतोब मुद्द्यावरून गुद्यावर ! भांडण तंटा मिटवायची मधली कुठली तरी पायरी असते हे रागाच्या भरात विसरूनच जातात ! मग अशा वेळी त्या तंट्याचे पर्यवसान कशा प्रकारे होतं, हे आपण रोज पेपरात वाचत असतोच ! जसं की, बापाने तरण्या ताठ्या मुलावर हात उचलला, म्हणून रागाच्या भरात त्याने आत्महत्या करण्या पर्यंतची पायरी गाठली किंवा एखाद्या मुलाने, आपल्या वडिलांनी नवीन मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून स्वतःच्या जन्मदात्यावरच चाकूने हल्ला करून, नको इतकी टोकाची पायरी गाठलेली असते ! असो !
“अहो काय सांगू तुम्हांला, या वयात सुद्धा मी त्या अमुक तमुक देवळाच्या आठ हजार पायऱ्या चढलो ! अजिबात कसला त्रास म्हणून झाला नाही बघा, सगळी त्याचीच कृपा !”
आपण कुठंतरी घाई घाईत महत्वाच्या कामाला, चाळीच्या जिन्याच्या पायऱ्या उतरून जात असतो आणि आपल्याला एखाद्या पायरीवर उभं करून, चाळीतले अप्पासाहेब आपल्याला हे ऐकवत असतात ! चाळीच्या दोन जिन्याच्या फक्त चाळीस पायऱ्या चढून वर आलेल्या अप्पाना, वरील वाक्य बोलतांना खरं तर धाप लागलेली असते, पण आपण सुद्धा, “हॊ का, खरंच कमाल आहे तुमची अप्पासाहेब, या वयात सुद्धा तुम्ही बाजी मारलीत बुवा !” असं बोलून आपली सुटका करून घेतो ! देव दर्शनाला कोणी किती पायऱ्या कुठे चढाव्या अथवा कुठे उतराव्या, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न ! मी बापडा उगाच त्यांच्या श्रद्धेच्या पायऱ्यांच्या आड कशाला येऊ ? मग याच अप्पाकडून कधीतरी ऐकलेले “ईश्वर सर्वव्यापी आहे, फक्त तो बघायचा भाव मनी हवा, की त्याचे दर्शन झालेच म्हणून समजा !” हे त्यांचे वाक्य आठवते ! पण मी स्वतःची पायरी ओळखून असल्यामुळे, अप्पासाहेबांना त्यांच्या या वाक्याची आठवण करून देत नाही इतकंच ! उगाच कशाला आपण आपली पायरी सोडून बोला !
“शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये” असा उपदेश पूर्वीचे बुजुर्ग लोकं त्या काळच्या तरुण पिढीला करत ! हे सांगतांना त्यांनी स्वतः किती वेळा, किती कारणांनी कोर्टाची ती पायरी चढल्ये हे सांगण्याचे मात्र शिताफिने टाळत ! एकंदरीतच कोर्टाची पायरी चढण्या मागे कुठलाच शहाणपणा नाही, उलट वेळ आणि पैशाचा नको इतका अपव्यय ती एक पायरी चढल्या मुळे होतो, हे खरं तर त्यांना यातून सांगायचं असावं ! या सिद्धांता मागची कारणं काहीही असली तरी, काही वेळा काही भांडण तंट्यानी इतकी टोकाची पायरी गाठलेली असते, की ती सोडवण्यासाठी शेवटी दोन्ही वादी आणि प्रतिवादींना ती नको असलेली कोर्टाची पायरी चढल्या शिवाय गत्यंतरच उरत नाही ! मग स्वतःच्या सांपत्तीक पायरी प्रमाणे, ते वादी आणि प्रतिवादी दोन नामांकित वकील करून आपापली केस, कोर्टाच्या कंटाळवण्या पायरीवर सोडवायचा चंग बांधतात ! त्यांना त्यांची कोर्टाची पायरी लखलाभ ! असो !
काही थोर लोकांनी समाजाबद्दलची बांधिलकी जपतांना, स्वतः वेगळ्या अर्थाने पायरीचा दगड बनून, अनेक जणांना यशाच्या शिखरावर बसवलेल आपण पाहिलं असेलच ! अशा प्रकारचा पायरीचा दगड बनणे सर्वांनाच जमतं असं नाही ! त्यासाठी मुळात अशा दगडाची जडण घडणच वेगळ्या प्रकारची झालेली असावी लागते ! अनेक न दिसणारे, छिन्नी हातोड्याचे घाव, अशा दगडांनी आपल्या आत झेलून लपवलेले असतात, याची आपल्या सारख्या सामान्य लोकांना कल्पनाच नसते ! याच घावांना लक्षात ठेवून हे दगड, आपल्या पुढच्या पिढीला असे घाव सोसावे लागू नयेत म्हणून, अनेकांसाठी पायरीचे दगड बनून समाजऋण फेडायच कामं इमाने इतबारे, स्वतः अलिप्त राहून करत असतात ! समाजातील अशा महान व्यक्तींचा हा आदर्श, थोडया फार प्रमाणात जरी आपण डोळयांपुढे ठेवून, आपल्या कुवती प्रमाणे, समाजाच्या कल्याणासाठी छोटीशी का होई ना, पायरी बनायला कोणाला कुठलीच अडचण नसावी असं मला वाटतं ! मंडळी, मला स्वतःला असं वाटून काय उपयोग आहे म्हणा ? शेवटी, हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक, वैचारिक पातळीवरील पायरीचा प्रश्न आहे ! पण आपण सर्वांनीच, अगदी माझ्यासकट, अशी छोटीशी पायरी होण्याचा प्रयत्न करायला कोणाची हरकत नसावी, असं मला मनापासून वाटतं ! बघा विचार करून !
जे झोपेत दिसतं ते स्वप्नं नव्हे, ज्याने झोप येत नाही ते स्वप्नं….
असंच एक स्वप्न पाहिलंय, भिक्षेकऱ्यांना, आणि कष्टकऱ्यांना गावकरी बनवण्याचं….. तुमच्या सर्वांच्या साथीनं …!
भीक मागून सुद्धा पैसे मिळतात…. परंतु त्या पैशाला किंमत नसते आणि मोल सुद्धा….
कमावलेल्या पैशाला, नुसती किंमत नको….. मोल हवं मूल्य हवं ….!
“हात” न हलवता मिळालेल्या पैशाला लगेच “पाय” फुटतात… !”
हा असा मिळालेला पैसा टिकत नाही… !
तर …. एक बाबा आहेत….
त्यांना मंदिराबाहेर भाविकांना गंध लावायचं काम लावून दिलं आहे… भांडवल फक्त दोनशे रुपये सहा महिन्याला….
येणार्या जाणार्या भाविकांना हे बाबा गंध लावतात आणि भाविक लोक यांना पाच / दहा / वीस रुपये दक्षिणा म्हणून देतात…. दिवसाला पाचशे रुपये आता हे बाबा कमावतात… !
समाजातल्या रुढी-परंपरांचा आम्ही अशाप्रकारे माणसांना उभं करण्यासाठी उपयोग करतो आहोत .. !
या सहा दिवसात तीन दिव्यांग लोक भेटले….
यातील एकाला आपण व्हीलचेअर दिली आहे, या व्हीलचेअरवर बसून तो अनेक वस्तूंची विक्री करेल, दुसऱ्याला शिलाई मशिन घेऊन देत आहोत, फाटलेल्या आयुष्याला तो टाके घालेल आणि तिसऱ्याला एक छोटे शॉप घेऊन दिले आहे त्यात तो किराणा माल किंवा तत्सम वस्तू विकेल….
माझा दिव्यांग सहकारी श्री. अमोल शेरेकर यांच्या माध्यमातून समोर आलेले हे तीनही लोक….
मी काही करण्याअगोदर समदुःखी असलेल्या अमोलने या तीनही लोकांसाठी आधीच बरंच काही केलं आहे….
माझा सहकारी श्री मंगेश वाघमारे यानेही या कामी खूप कष्ट घेतले…. दोघेही बाप से बेटे सवाई निकले !
ऋणी आहे दोघांचा …. !!
“बाप” या शब्दावरून आठवलं ….
लहान असताना माझ्या बापाला वाटायचं, पोरानं शाळेत “नाव” “काढावं” …. पण माझ्यासारख्या टारगट पोराला पाहून, शाळेनेच तेव्हा माझं “नाव” पटावरून “काढलं” होतं…!
हा…हा..हा…असो !
(मी लिवलेल्या पुस्तकात आशे लई किस्से हायेत…)
एप्रिल महिन्याच्या एक तारखेपासून ते आत्ता सहा तारखेपर्यंत अनेकांनी आपले हात पाय मोडून घेतलेले आहेत…. हौसेने नाही… दुर्दैवाने…. ! असे सहा गंभीर रुग्ण रुग्णालयात दाखल केले आहेत…सर्वांची ऑपरेशन्स झालेली आहेत …. ते मस्त आता टुमटुमीत आहेत… खाऊन पिऊन गोल गरगरीत झाले आहेत पोट्टे….
परवा त्यांना गमतीने म्हणालो, ‘ ए बटाट्यानो, कायतरी काम करा बे पोट्टेहो…! काय पडून राहिला बे असे ? ‘
‘ सांगून तर पाह्यना रे डाक्टर… काय बी करू…. तू सांगून तर पहाय ना रे भौ… तुझ्यासाटी कै पण करू ना रे भौ…’
—-हे मान तर देतात…. पण अरे तुरे बोलतात…. पण तरी लय भारी वाटतं ना रे भौ….!
माझे दैवत आदरणीय श्री गाडगे बाबा…. त्यांच्याच भागातली ही वाट चुकलेली पोरं….
त्यांची शपथ घालून, काम करेन पण भीक मागणार नाही असं यांच्याकडून वचन घेतलंय….!
—-“ माझ्यासाठी काही करु नका रे भावांनो….रस्त्याने चालताना नेहमी मागे वळून पहात जा…. कारण मागे वळून न पाहणारे… पुढे कुठेतरी धडपडतात….भविष्यकाळाकडे चालत असताना, भूतकाळाकडे नेहमी लक्ष ठेवावं … म्हणजे आपले अपघात होत नाहीत… “
ते सर्व जण हसले होते…
रस्त्यावर असंच एकदा काम करत असताना याच महिन्यात पाय अक्षरशः कुजलेला एक तरुण माझ्यासमोर आला…. ! रस्त्यावरच याचे ड्रेसिंग करून त्याला ऍडमिट केला आहे…. जाताना रडत मला म्हणाला, ‘ सर, मी मागल्या आयुष्यात काहीतरी वाईट काम केलं असेल …. म्हणून या आयुष्यात मला अशी शिक्षा मिळाली असेल…. ! यातून मी कधीच उभा राहू शकणार नाही असं मला वाटतं…. मी कधीच यशस्वी होणार नाही असं मला वाटतं सर…’
त्याला सहज म्हणालो, ‘ नाही रे मित्रा, कर्माला दोष देऊ नकोस, तू जे केलंस ते तुझ्याकडून कोणीतरी करवून घेतलं आहे आणि लक्षात ठेव “कर्माला” दोष देणारा “कर्ता” कधीच होऊ शकत नाही… ! कोणालाही दोष न देता “कर्म” करत रहा…. आपोआप तू “कर्ता” होशील…. “क्रिया” करणारे “पद” होशील… !’
‘आणि हो मित्रा, तुला जर यशस्वी व्हायचं असेल, तर आधी अयशस्वी लोकांचा तुला अभ्यास करावा लागेल… ते जिथे चुकले त्या चुका तुला टाळाव्या लागतील….!’ विचार करतच तो ऍडमिट झाला…. !
रस्त्यावर अक्षरशः पडलेले एक बाबा…. यांना अवघड जागी गाठ आली होती…. ती जवळपास संत्र्याएवढी झाली… पुन्हा फुटली आणि हे विष संपूर्ण शरीरात पसरले…यांनाही ऍडमिट केले आहे…
देवीपुढे जोगवा मागणाऱ्या एका ताईला, ईदच्या निमित्ताने, मस्जिद पुढे विकण्यासाठी चादरी घेऊन दिल्या आहेत…
म्हटलं ना…. समाजातील रुढी-परंपरांचा उपयोग आम्ही लोकांना उभं करण्यासाठी करत आहोत….!
मला मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी आवडते, हे आमच्या एका भीक मागणाऱ्या आजीला माहित आहे…. एके दिवशी तिने मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी घरून तयार करून आणली….मला दिली… मी म्हणालो, ‘ पुढे वाटेत खातो कुठे तरी….’
ती म्हणाली, ‘ न्हायी माझ्यासंगट खा…,’
हात धुऊन मग तिच्याच ताटात बसलो जेवायला…. !
ती दिलखुलासपणे हसली…. ! माझ्याकडं कौतुकानं बघत बाजूच्या आया बायांना म्हणाली, ‘ बग गं कसं खातंय माजं लेकरू मटामटा, किती भुकेजलेलं हाय….’ असं म्हणून तिने चारदा डोक्यावरुन हात फिरवला, पदराने तोंड पुसलं …! मेथीची भाजी – भाकरी खाताना सहज तिच्याकडे पाहिलं…. आणि काय आश्चर्य…. मला तिथंच माजी माय दिसली….!!!
☆ डाॅ. एस्. आर. रंगनाथन् ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
विज्ञानाचे किंवा शास्त्राचे अनेक प्रकार आपल्याला माहित आहेत.पण असेही एक शास्त्र आहे की आपण त्याचा उपभोग घेतो,पण ते शास्त्र आहे हे आपल्या सहजपणे लक्षात येत नाही.हे शास्त्र म्हणजे ग्रंथालय शास्त्र.
आज 12ऑगस्ट.हा दिवस रंगनाथन यांचा जन्मदिवस.हा दिवस भारतात रंगनाथन् दिन म्हणून साजरा होतो. कारण त्यांना भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक मानले जाते.
शियाली राममृत रंगनाथन् यांचा जन्म 12/08/1892 ला तामिळनाडूत झाला. त्यांनी गणित विषयात एम्.ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. कोईमतूर, वाराणसी, उज्जैन, दिल्ली विश्वविद्यालय अशा अनेक ठिकाणी त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. 1924मध्ये त्यांना मद्रास विश्वविद्यालय पहिले ग्रंथपाल प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. 1945 ते 1947 या काळात त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात ग्रंथालय अध्यक्ष व ग्रंथालय शास्त्र अध्यापक या पदावर काम केले. 1962 साली बंगलोर येथे त्यांनी प्रलेखन अनुसंधान व प्रशिक्षण केंद्र या संस्थेची स्थापना केली व अखेरपर्यंत तेथे कार्यरत राहिले. 1965 साली भारत सरकारने त्यांना ग्रंथालय शास्त्रातील राष्ट्रीय शोध प्राध्यापक या पदवीने सन्मानित केले.
ग्रंथशास्त्राविषयी त्यांनी केलेले कार्य हे विशेष उल्लेखनीय आहे. ग्रंथांचे वर्गीकरण करणे, ते सूचीबद्ध करणे हे आज सोपे वाटत असले तरी त्याची सुरुवात रंगनाथन् यांनी केली. पुस्तक शास्त्राविषयी त्यांनी 50 कारणेअधिक पुस्तके लिहिली आहेत. शिवाय एक हजार हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. ग्रंथालय प्रशासन, ग्रंथालय शास्त्र, पुस्तकांविषयी कायदे अशा विषयांशी संबंधित पंचवीसहून अधिक समित्यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे व पदाधिकारी म्हणून काम केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या ग्रंथालयासाठी धोरण ठरवण्यातही त्यांचा सहभाग होता. या सर्व कार्याची दखल घेऊनच त्यांना ग्रंथालय शास्त्राचे जनक असे म्हटले जाते. 1957 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री ने सन्मानित केले. तसेच विद्यापीठ अनुदान मंडळाच्या सल्लागार समितीतही त्यांना स्थान देण्यात आले होते.
ग्रंथाना गुरू मानण्याची आपली परंपरा आहे. पण या गुरूची सेवा कशी करावी याचेही एक शास्त्र आहे. ते आजच्या रंगनाथन् दिनामुळे आपल्याला समजले आहे. आता हे शास्त्र समजून घेऊन ते आत्मसात करण्याने रंगनाथन् यांचा खरा गौरव होणार आहे.