मराठी साहित्य – विविधा ☆ तुम्ही श्रीमंत आहात की गरीब? ☆ मेघःशाम सोनवणे ☆

? विविधा ? 

☆  तुम्ही श्रीमंत आहात की गरीब? ☆ मेघःशाम सोनवणे ☆ 

तुम्ही श्रीमंत आहात की गरीब!

माझी मुलगी गरीब माणसाशी लग्न का करू शकत नाही? -एलोन मस्क.

एलोन मस्क सांगतात की त्यांची मुलगी गरीब माणसाशी लग्न का करू शकत नाही.

काही वर्षांपूर्वी अमेरिकेत ‘वित्त आणि गुंतवणूक’ या विषयावर एक परिषद झाली होती. वक्त्यांपैकी एक होते एलोन मस्क आणि प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की सर्वजण हसले. प्रश्न होता, “तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात, तुमच्या मुलीने गरीब किंवा शामळू पुरुषाशी लग्न केले तर तुम्ही ते मान्य कराल का?.”

त्यांनी दिलेले उत्तर आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी बदल घडवू शकते.

एलोन मस्क म्हणाले, “सर्वप्रथम हे समजून घ्या की, ‘संपत्ती’ म्हणजे आपल्या बँकेच्या खात्यात खूप पैसे असणे नव्हे. संपत्ती ही प्रामुख्याने संपत्ती निर्माण करण्याचे एक साधन असते.

उदाहरणार्थ लॉटरी किंवा जुगार जिंकणारी व्यक्ती. जरी त्याने शंभर कोटी जिंकले तरी तो श्रीमंत माणूस होत नाही: तो खूप पैसा असलेला गरीब माणूस आहे. कारण लॉटरी चे बक्षीस मिळाल्याने करोडपती झालेले नव्वद टक्के लोक पाच वर्षांनंतर पुन्हा गरीब झालेले आढळून आले आहे.

आपल्याकडे पैसे नसूनही श्रीमंत असलेल्या अनेक व्यक्तीही आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर बहुतेक उद्योजकांचे देता येईल. त्यांच्याकडे पैसा नसतानाही ते संपत्तीच्या मार्गावर अग्रेसर आहेत, कारण ते त्यांची आर्थिक बुद्धिमत्ता विकसित करत आहेत आणि ती म्हणजे संपत्ती होय.

श्रीमंत आणि गरीब कसे वेगळे आहेत? सोप्या भाषेत सांगायचे तर: श्रीमंत अजून श्रीमंत होण्यासाठी मरतात, तर गरीब हे श्रीमंत होण्यासाठी मारू शकतात.

जर तुम्हाला एखादी तरुण व्यक्ती प्रशिक्षण घेण्याचा, नवीन गोष्टी शिकण्याचा निर्णय घेतांना, जो सतत स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो, तर समजून घ्या की तो/ती एक श्रीमंत व्यक्ती आहे.

जर तुम्ही एखादी तरुण व्यक्ती बघाल जी सतत सरकार ला दोष देते, आणि श्रीमंत असलेले सगळे चोर आहेत असे समजणारा आणि सतत टीका करत रहाणारा तरुण दिसला तर तो गरीब माणूस आहे हे समजून चला.

श्रीमंतांना खात्री आहे की त्यांना उड्डाण भरण्यासाठी फक्त माहिती आणि प्रशिक्षण आवश्यक आहे, गरीबांना वाटते की प्रगती साधण्यासाठी इतरांनी त्यांना पैसे दिले पाहिजेत.

शेवटी, जेव्हा मी म्हणतो की माझी मुलगी गरीब माणसाशी लग्न करणार नाही, तेव्हा मी पैशांबद्दल बोलत नाही. मी त्या माणसामधील संपत्ती निर्माण करण्याच्या क्षमतेबद्दल बोलत आहे.

हे बोलल्याबद्दल मला माफ करा, पण बहुतेक गुन्हेगार हे गरीब लोक असतात. जेव्हा त्यांना समोर पैसे दिसतात तेव्हा त्यांचे डोके फिरते, म्हणूनच ते लुटतात, चोरी वगैरे करतात … ते याच्याकडे एक संधी म्हणून बघतात कारण ते स्वतःहून पैसे कसे कमवू शकतील हे त्यांना माहित नसते.

एके दिवशी एका बँकेच्या सुरक्षा रक्षकाला (गार्ड) पैशांनी भरलेली बॅग सापडली, ती बॅग घेऊन तो बँक मॅनेजरकडे द्यायला गेला.

लोक या माणसाला मूर्खशिरोमणी म्हणाले, पण प्रत्यक्षात हा स्वतःकडे पैसे नसलेला असा एक श्रीमंत माणूस होता.

एका वर्षानंतर, बँकेने त्याला स्वागतकक्षात रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीची संधी दिली, तीन वर्षांनंतर तो ग्राहक व्यवस्थापक (कस्टमर मॅनेजर) झाला होता आणि दहा वर्षांनंतर तो या बँकेचा प्रादेशिक व्यवस्थापक (रिजनल मॅनेजर) म्हणून काम पहात आहे. त्याच्या हाताखाली शेकडो कर्मचारी आहेत आणि ती सापडलेली बॅग त्याने चोरली असती तर त्यातील रकमेपेक्षा त्याच्या वार्षिक बोनसची रक्कम जास्त आहे.

‘संपत्ती’ ही सर्वप्रथम मनाची एक अवस्था मात्र असते!

तर…  तुम्ही श्रीमंत आहात की गरीब? स्वतःच ठरवा.

मुळ इंग्रजी लेखाचा स्वैर मराठी अनुवाद करून मी हा लेख तयार केला आहे. आवडल्यास शेअर करतांना लेखात बदल न करता नावासह शेअर करा ही विनंती.

-मेघःशाम सोनवणे

इंग्रजी लेखाचे लेखक – अनामिक.

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आंतरराष्ट्रीय योगा दिन – भाग – 1 ☆ डॉ मनीषा आणि डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आंतरराष्ट्रीय योगा दिन – भाग – 1 ☆ डॉ मनीषा आणि डॉ अभिजीत सोनवणे

नमस्कार.  मी डॉक्टर मनीषा अभिजीत सोनवणे…. 

रस्त्यावर नाईलाजाने भीक मागणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाचा आम्ही प्रयत्न करत आहोत…. Doctor for Beggars म्हणून…. 

दरवर्षी आम्ही आमच्या भीक मागणाऱ्या लोकांसमवेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतच असतो…. 

यावेळीही आम्हाला प्रश्न विचारला, यंदा भीक मागणाऱ्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार का ? 

होय …. नक्कीच करणार आणि आमच्या भीक मागणाऱ्या लोकांच्या समवेतच तो साजरा करणार…. 

यावर्षीची आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे “Yoga for Humanity”—-

हल्लीच्या महागाईच्या काळात ह्युमॅनिटी…. “माणुसकी” सुद्धा खूप महाग झाली आहे. 

तुम्ही ज्यांना भिकारी म्हणता ते असतात तरी कोण…? आपल्याकडे युज अँड थ्रो ची पद्धत आहे…. म्हणजे एखाद्या गोष्टीचा वापर करून झाला की ती फेकून द्यायची…. मुलं बाळं, सुना नातवंडं, हे सुद्धा आपल्या आई बापाचा, आजी आजोबाचा ‘Use’ करून झाला की त्यांना ‘Throw करतात… ` It’s a new fashion….Yoooo !!! `

आई बापाला कुष्ठरोग, टीबी यासारखे रोग झाले की, हे रोग आमच्या ‘Kids’ ना होवू नयेत यासाठी सध्याचे  जागरूक Mom and Dad आपल्या आई बाप आणि आजी-आजोबांना रस्त्यावर फेकून देतात— अक्षरशः तुटलेल्या चपलेगत…. 

आणि मग जगण्यासाठी या आई बाप आणि आजी-आजोबांना नाईलाजाने भीक मागावी लागते… 

अशा नाईलाजाने भीक मागणाऱ्या…लोकांनी टाकलेल्या आईबाबांसाठी आम्ही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहोत…पोरांनी टाकून दिलेल्या …. तुटलेल्या या चपला “पादुका” म्हणून आम्ही डोक्यावर घेणार आहोत…. 

`योग` हा शब्द मूळ संस्कृतातील  “ युज “ या धातूपासून तयार झाला आहे. आणि याचा अर्थ “जोडणे….” 

येणारा हा आंतरराष्ट्रीय दिन भीक मागणाऱ्या लोकांसमवेत साजरा करून, गावकरी आणि भिक्षेकरी ही समाजातली iदोन टोकं जोडण्याचा प्रयत्न  आम्ही यानिमित्ताने करणार आहोत…. 

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने…” आई बाबा तुम्ही आम्हाला हवे आहात..” हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत…. 

चितेवर जाण्याआधी त्यांच्यात चेतना निर्माण करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करणार आहोत…. 

नळ दुरुस्त करणारा कारागीर कितीही कुशल असला तरीसुद्धा डोळ्यातलं पाणी थांबवायला आपल्या माणसाचीच  गरज असते…. 

 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने…. “युज अँड थ्रो” केलेल्या या आई-बाबांचा हात हातात घेऊन…..  त्यांचं “आपलं माणूस” होण्याचा यानिमित्ताने प्रयत्न करणार आहोत….. 

Yoga for humanity…. ! 

ह्युमॅनिटी चा अर्थ जर “ माणुसकी “ असा असेल तर त्यातला एक अंश आम्ही जगण्याचा प्रयत्न करणार आहोत…. 

21 तारखेला शनिवारवाड्याशेजारील फुटपाथवर आम्ही हा सोहळा सकाळी ११ वाजता आयोजित करत आहोत…. 

आमच्या या सोहळ्यामध्ये कसलाही डामडौल नसेल …येथे कोणी सेलिब्रिटी नसतील…

इथे फक्त असतील समाजाने फेकलेले…थकलेले ….आयुष्याच्या अंताला लागलेले आई आणि बाप !

आमच्या या सोहळ्यात आपणही सहभागी झालात तर त्यांना आणि आम्हाला नक्कीच आनंद होईल…. 

या निमित्ताने आपण उद्या  गोरगरिबांना शिधा देत आहोत…. !!! 

या शिध्याने त्यांचं ८ दिवसच पोट भरेल…. पण आम्ही मात्र कायमचे तृप्त होवू….! 

निसर्गाची किमयाच अशी की ….घेऊन मिळतो तो “आनंद” आणि देऊन मिळतं ते “समाधान“…! 

—क्रमशः भाग पहिला 

© डॉ मनीषा आणि डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पेडगावचे शहाणे… ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ पेडगावचे शहाणे… ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

बऱ्याच वेळा आपण पेडगावचे शहाणे किंवा वेड पांघरून पेडगावला जाणे. असे वाक्प्रचार वापरतो. पण असा कधी विचार केला आहे का ? की पेडगावच का ?  दुसरे कुठले गाव का नाही ? पाहू या तर मग :-            

६ जून १६७४ला शिवराज्याभिषेक संपन्न झाला. ह्या अद्वितीय सोहळ्यासाठी एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च आला. हा खर्च राजांनी मुघलांकडून कसा वसूल केला ? त्याची ही गमतीशीर हकीकत आणि गनिमी काव्याचे एक उत्कृष्ट उदाहरण :-        

अहमदनगर जिल्ह्यात ‘पेडगाव’ नावाचं एक गाव आहे. तिथे बहादूरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा महामुजोर सुभेदार होता. आपल्या शिवाजी महाराजांना अशी खबर मिळाली की २०० उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि साधारण १ कोटी रुपये (तेव्हा होन ही मुद्रा होती, रुपये नव्हते) बहादुरगडावर आले आहेत. आणि तिच्या रक्षणासाठी मोठी फौजही तैनात आहे. ही सगळी मालमत्ता लवकरच दिल्लीस रवाना होणार आहे. आता महाराजांनी आज्ञा दिली की २००० चं सैन्य बहादुरगडावर चढाई करेल आणि ही सर्व लूट लुटून आणेल (बलाढ्य ऐवज आणि ते २०० उमदा अरबी घोडे). 

कोणास ठाऊक कशी पण खानाला ही बातमी समजली , तेव्हा तो माजोरडा चेष्टेने हसत  म्हणाला, ” सिर्फ २००० मराठा मावळे ! उनके लिये तो किलेके दरवाजे खोल दो. अंदर आतेही खदेड देंगे,काट देंगे.”

तारीख १६ जुलै १६७४, पेडगावच्या त्या बहादूरगडातून मुघल सैन्याला दूरवर धूळ उडताना दिसली. घोडदौड येत आहे हे त्यांच्या लक्षात आले.  धोक्याच्या तुताऱ्या वाजल्या आणि गडावर आधीच तयार असलेली खानाची प्रचंड सेना सज्ज झाली. त्यांनी किल्ल्याचे दरवाजेही उघडले. जसे गाफील मावळे जवळ आले, तसा लगेच खानाच्या सेनापतीने चढाईचा हुकूम दिला. अनपेक्षितपणे झालेल्या या प्रतिकाराने सगळे २००० मावळे बिथरले आणि जीव वाचवायला ते मागे फिरले. पण त्यांचे घोडे जोरच पकडत नव्हते. मात्र खानाची संपूर्ण फौज जशी जवळ येऊ लागली–खूप जवळ आली– तशी त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून घोड्यांनी वेग पकडला आणि मावळ्यांनी पाठ दाखवून मागे धूम ठोकली. बहादूरखान स्वतः त्यांच्या समाचारासाठी मुघल सैन्याच्या पुढे होता. अनेक कोस ही घोडदौड चालत राहिली.  कारण मावळ्यांच्या घोडदौडीतली भीती बहादूरखानास चेव आणीत होती. शेवटी मावळे पार पसार झाले, संपूर्ण २०००ची फौज वाचली खरी, पण आपले शिवबा हरले रे !

खानाच्या फौजेत  एकच जल्लोष झाला. शिवाजीच्या फौजेला हरवून पळायला लावणे हे काही छोटे काम नाहीच.` शिवबांची फौज हरली, पळ काढला ! ` ही जीत औरंगजेबास कळल्यावर आपल्याला केवढे इनाम मिळेल ? ह्या आनंदात बहादूरखान छाती फुगवून घोड्यावरून डौलत डौलत परतत होता. तितक्यात सगळं सैन्य एकदम शांत झालं आणि डोळे विस्फारून दूरवर असलेल्या बहादूरगडाकडे बघू लागलं. धुराचे मोठ मोठे लोट किल्ल्यातून बाहेर पडताना दिसत होते. खानाने भीतीने आवंढा गिळत किल्लेदाराला विचारलं, “अगर हम सब यहाँ हैं, तो किलेपर कौन है?”  “कोई नही जहापन्हा. आपकाही हुकुम था की सबने मिलकर शिवाजी के उन २००० मावलों पर चढ़ाई करनी है “. आता किल्लेदार, सेनापती, आणि स्वतः खानाचे धाबे दणाणले. कारण काय आक्रित झालं असणार ह्याचा त्यांना अंदाज  आला.  आणि त्याच सोबत छत्रपती शिवाजीराजे ही काय चीज आहे हे ही ध्यानात आलं. आणि त्यांची भीती खरी ठरली. एक घोडेस्वार दौडत आला, आणि , “हुज़ूर, गज़ब हो गया, हम सब लुट गए, बर्बाद हो गए. आप सब वहां २०००  मराठाओं के पीछे दौड़े, और यहाँ किलेपर ७००० मराठाओंने हमला करके  सब लूट लेके चले गए हुज़ूर !”.                            

अशा प्रकारे  राज्याभिषेकाचा खर्च एक कोटीही वसूल, शिवाय २०० उच्चप्रतीचे अरबी घोडे छत्रपतींच्या ताफ्यात— आणि हे सगळ नाट्य घडलं एकही मावळा न गमावता, रक्ताचा एक थेंबही न सांडता.                       

आता लक्षात आलं का ? की हे सगळं नाट्य घडलं कुठे, तर पेडगावला. खानाला वेड बनवलं ते त्या पेडगावात. आणि म्हणून,

 पेडगावचे शहाणे

 आणि                             

वेड पांघरून पेडगावला जाणे

हे दोन वाक्प्रचार मराठी भाषेला लाभले.

 

छत्रपति शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

 

माहिती संग्राहक : माधव केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एकवीस जून… ☆ सौ अश्विनी संजीव कुलकर्णी ☆

? विविधा ? 

☆ एकवीस जून… ☆ सौ अश्विनी संजीव कुलकर्णी ☆ 

एकवीस जून च्या निमित्ताने

21 जून—-वर्षातील सर्वात मोठा दिवस…जवळपास 14 तासांचा दिवस आज…आज सूर्यास्त जरा उशिराच होतो…आजच्या दिवसाला सोल्सटाइस (Solstice)असहि म्हणतात.

सर्वानाच माहीत आहे कि, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आणि पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे दिवस मोठा असतो.पृथ्वीच्या अक्षाच्या सूर्याशी असलेल्या कोनानुसार , संपूर्ण उत्तर गोलार्धात 21 जून हा वर्षातील मोठा नी दक्षिण गोलार्धात सगळ्यात लहान दिवस असतो.

उत्तरायणात,सूर्याचा हळूहळू उत्तरेकडे प्रवास सुरु होतो…तो उत्तरेकडे सरकत असता,दिवसाचा कालावधी वाढतो. उत्तरेकडच्या सूर्याचा हा प्रवास 21 जून पर्यंत चालतो. सूर्य या दिवशी विश्वववृत्ताच्या जास्त उत्तरेकडे असतो म्हणून ह्या दिवसाचा कालावधी अधिक असतो.

आता योग:-

योग माझ्या गुरूंनी सांगितलेला…माझ्या  वाचनातला,आचरणातला आणि जाणिवेतला!!!

योग हि साधना आहे…हे शास्त्र आहे…हा अभ्यास आहे! भगवान श्रीकृष्णांनी शिकवलेला मूळ योग आहे. हा श्रद्धेचा सर्वोच्च दिव्य मार्ग आहे.शास्त्रीय,नियमित आणि भावनापूर्ण परमेश्वर ध्यानाचा मार्ग आहे.

मानवाला अज्ञानातून मुक्त करून, शारीरिक,मानसिक नी अध्यात्मिक संतुलन राखण्यासाठी महत्वपूर्ण असा हा योग!!!💐

योग साधनेत, त्यातील अभ्यासाच्या प्रकारांमध्ये योग किंवा योगा प्रकार करणेअसाच विचार माणसाना येतो. किंवा तसाच विचार लोक करतातही.

पण नुसत्याच व्यायाम प्रकारांनी आपल्या शरीरात ऊर्जा हवी तेवढी निर्माण होत नाही. ते प्रकार शास्त्र शुद्ध हवेत.शरीराला प्राण शक्तीची गरज असते.

शरीराच्या पेशींना,अधिकाधिक क्रियाशील बनवण्यासाठी सुर्यप्रकाश,शुद्ध हवा, सात्विक व शुद्ध तरल पदार्थ,पाणी आणि फळाची आवश्यकता असते.

शरीरातील स्नायू,पेशी,हाडं, मज्जासंस्था, रक्त या सर्वांमध्ये ऊर्जा साठवलेली असते. हि ऊर्जा दैनंदिन जीवनात सतत वापरली जाते,पण अशीच आणि अधिकाधिक ऊर्जा आपण आपल्या इच्छाशक्तीच्या वापराने व्यायामाच्या शास्त्र शुद्ध पद्धतीतून साधनेतून निर्माण जर शकतो.आणि आपली प्राणशक्ती अधिकाधिक चैतन्यमय बनवू शकतो.

हा योग म्हणजे आपल्याला वाटणारा नुसताच शरीराचा व्यायाम नसून, त्याद्वारे आपल्या देहात,अंतरात प्राणशक्ती निर्माण करणे आणि शरीर हे प्रत्यक्ष ऊर्जेचे स्रोत बनवणे .

यातील विशिष्ट व्यायाम, प्राणायाम,श्वासावर नियंत्रण या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे शरीरात निर्माण होणारी शक्ती(ऊर्जा) आणि त्याद्वारे राखले जाणारे शारीरिक,मानसिक संतुलन!!!

यात ध्यान साधना खूप महत्वाची आहे.ध्यानाने मन शांत होते. चंचल मन एकाग्र होते. ध्यानाचेही शुद्ध शास्त्र आहे. ध्यानाचा शास्त्रोक्त अभ्यास करणे महत्वाचे आहे. ध्यान म्हणजे आपल्या प्राणशक्तीला – इच्छा शक्तीच्या अधिन आणणारी शक्ती!

ध्यानाच्या विज्ञानाला राजयोग म्हणूनही ओळखले जाते.. म्हणजेच ईश्वर प्राप्तीचा राजमार्ग!!!💐

आजचा 21 जून सर्वात मोठा दिवस,  हा भौगोलिक दृष्ट्या आहे. आणि आपले पंतप्रधान मोदीजींनी 21 जून 2015 मध्ये जाहीर केलेला व तेव्हा पासून सुरु असलेला, योग दिवस याचा तसा काही सबंध नाही…

पण आजच्या योग दिवसाचा व सर्वात मोठ्या दिवसाचा योगायोग म्हणजे अगदी दुग्ध शर्करा योग म्हणावयास हरकत नाही. आणि हे लक्षात घेता मला आलेले विचार….

नेहमीच सूर्योदयाच्या नव्या किरणांना आकर्षित होणारी मी… नव्या दिवसाचे नवे स्वप्न उराशी बाळगणारी मी…नव्या अरुणोदयला साक्ष ठेऊन इच्छा आकांक्षा नी आव्हानांना सामोरी जाणारी मी…आज खूप आनंदाने आपण सर्वाना ह्या मोठ्या दिवसाच्या शुभेच्छा देते!💐

नेहमीपेक्षा आज मोठा दिवस, म्हणचे जास्त वेळ प्रकाश,तेज,सूर्याच्या किरणांचा तेजाचा जास्त वेळ संपर्क!

वेळ तीच, घड्याळहि तेज,रोजचे दैनंदिन कामकाजहि तेच! पण तो सूर्य संपूर्ण त्रिलोक्याला तेजाळणारा… आज सूर्योदय नवी कांती देणारा… नुसते आपल्यालाच नव्हे, तर पर्वताना, नद्यांना,झाडांना,पक्षांना,प्राण्यांना,साऱ्या चराचराला एका दिव्या प्रमाणे मिळालेले तेज… दिवसभरात अगदी सूर्यास्तापर्यंत विविध रंगांनी, ढंगानी मिळेल… सकाळ, दुपार व संध्याकाळच्या विविधरंगी छटा सर्वाना सुखी करोत… दिवसभरातील विविध रंगी छटांनी केलेले नृत्य प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधःकार नष्ट करून, नव दिशा दाखवू देत…

सूर्याचा हा प्रकाश…हे तेज…नी तेजाळणे सर्वांचे रक्षण करो!💐👍

आज धकाधकीच्या , धावपळीच्या योगात आपल्याला आपल्या मनाकडे लक्ष द्यायला अजिबात फुरसत नसते…पण आजच्या दिवशी मनाकडे आवर्जून लक्ष द्यावं… आणि ते सुदृढ व्हावं यासाठी करावा योग!!💐

योग दिवसाच्या व सर्वात मोठ्या दिवसाच्या सानिध्यात ध्यानस्थ होऊन सूर्याच्या सोनेरी किरणांच्या स्नानाने, आपल्या मनातील राग, लोभ, मोह, मत्सर, असूया, घृणा, भेदभाव, जातीयवाद यांचा नाश होवो. तन मन निरामय होऊन अंतःकरण व चित्त शुद्धी होवो ….सायंकाळच्या ध्यानाच्या  तेजाने म्हणजेच संधिप्रकाशाची लाली जणू  गुलाल उधळलाय असे वाटावे… 

आजच्या दिवशी सुर्याचे तेज जास्त असणार! त्यामुळे दिवसभरात त्या तेजाचे , कुटस्थाकडे (दोन भुवयांमधील स्थान) न पाहताही ‘अद्वितीय चक्षु’ म्हणून सतत दर्शन होणार… त्याचे दर्शन किती घ्यायचे हे आपली हाती आहे!👍💐

आजचा योग  दिवस नी  मोठा  दिवस म्हणून हि योग साधना!  हि रोजचीच का होऊ नये??  हा योग दिवस सर्वांचाच रोजचा असावा… कारण रोजच्या नियमित  योगाने, रोजच्या ध्यानाने आपल्या अंतरातील तेज वाढून, आपल्याला एक अनामिक आत्मिक आनंद मिळणार आहे, मग तो दिवस मोठा असो किंवा लहान…आपल्याच कुटस्थातील तेज, शांती, आणि ब्रह्मानंद 🙏🏻 … काय वर्णावा!!!!👍💐 

© सौ अश्विनी संजीव कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हयातीचा दाखला… ☆ श्री सुरेश नावडकर ☆

श्री सुरेश नावडकर

? मनमंजुषेतून ?

☆ हयातीचा दाखला.. ☆ प्रस्तुती – श्री सुरेश नावडकर ☆

ज्यांना दरमहा पेन्शन मिळते, त्यांना प्रत्येक वर्षअखेरीस ‘हयातीचा दाखला’ सादर करावा लागतो.. जेणेकरून त्यांना आपण जिवंत असून, पेन्शन बंद न करता चालू रहावी हे संबंधित खात्याला लक्षात आणून द्यावं लागतं..

काळ बदलला.. आता मात्र आपण ‘हयात’ आहोत, हे आपल्या फेसबुकवरील आप्तस्वकीयांना समजण्यासाठी, त्यावर कार्यरत रहावं लागतं…  

आता एखाद्या मित्राचा शोध घेणं फेसबुकमुळे, सहज शक्य आहे.. त्याचं नाव ‘सर्च’ करायला टाकल्यानंतर त्याने जर आपला फोटो टाकलेला असेल तर तो लगेच सापडू शकतो.. 

गेले दहा वर्षे मी फेसबुकवर आहे.. या कालावधीत कित्येक फेसबुकफ्रेण्ड, फेसबुकवर आले आणि गेले.. सुरुवातीला माझ्याकडून फेसबुकचा वापर जास्त प्रमाणात नव्हता.. कोरोना सुरु झाला आणि गेल्या दोन वर्षांत माझी फेसबुक फ्रेण्ड्सची संख्या शेकड्यांमध्ये वाढली.. 

मला त्या दोन वर्षांत घरी बसून राहिल्याने, लेखन करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला.. मी रोजच वेगवेगळ्या विषयांवर लिहित राहिलो.. ते लेख वाचून असंख्य वाचक माझे मित्र झाले.. कधी आवर्जून ते फोन करुन बोलू लागले.. मित्र परिवार वाढत गेला. 

आता जर मी कधी कामाच्या गडबडीत काही दिवस पोस्ट टाकू शकलो नाही तर, मला काहीजण विचारतात.. ‘बरेच दिवस झाले, आपण पोस्ट टाकलेली नाही..’ ‘काय सुट्टी घेतली का!’ ‘बाहेरगावी गेला होता का?’ इत्यादी..

याला कारण म्हणजे, फेसबुकवर रोजच भेटायची आपल्याला सवय लागलेली असते.‌. जर ती व्यक्ती दोन चार दिवस, फेसबुकवर दिसली नाही तर मनात नाही नाही त्या शंका येतात.. काळजी वाटू लागते.. अलीकडे कामाशिवाय कोणीही कुणाला फोन करीत नाही.. काही विचारायचं असेल तर व्हाॅटसअपवर विचारलं जातं.. ती व्यक्ती रोजच व्हाॅटसअप पहात असेल तर उत्तर लगेच मिळू शकतं. काहीजण आवर्जून सांगतात की, ‘मला व्हाॅटसअप केलं की फोन करुन सांगत जा.. मी ‘व्हाॅटसअपवेडा’ नाहीये..’ असे ‘सेलिब्रिटी’ फेसबुकवर मात्र सतत कार्यरत असतात.. 

माझे एक मित्र आहेत, ते रोजच माहितीपूर्ण अशा पोस्ट नेहमी टाकत असतात. त्यांच्या पोस्ट वाचण्याची मला सवय लागलेली आहे.. कधी चार दिवस ते फेसबुकवर दिसले नाहीत तर मी त्यांना फोन करतो. मग समजतं, की ते आजारी होते..

फेसबुकच्या या आभासी जीवनात जगताना आपण, कळत नकळत त्यात सहभागी झालेलो असतो.. विविध छंद, कला, साहित्य, मनोरंजन क्षेत्रातील मोठी माणसं आपल्या संपर्कात असतात.. आपण त्यांना कधी प्रत्यक्ष भेटलेलो नसलो तरी त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर व आपुलकी असते.. कधी त्यांची पोस्ट आवडल्याचे त्यांना लिहिल्यास, मैत्री अधिक दृढ होते.. त्यांच्या मनोगतातून, फेसबुक वाॅलवरुन त्यांचा जीवनप्रवास कळतो.. त्यांच्या जीवन संघर्षापुढे आपले प्रश्न अगदी सामान्य वाटू लागतात.. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन, जगण्यासाठी उमेद मिळते.. 

आताच्या जमान्यात पत्रव्यवहार, हा लुप्त झालेला आहे. कुणासाठी दोन ओळी लिहून, आठ दिवस उत्तराची वाट पहाण्यापेक्षा व्हाॅटसअप किंवा मेसेंजरवर त्वरीत संपर्क साधता येतो.. 

पाच हजारांची फ्रेण्डलिस्ट असणाराही, फेसबुकवर एकटा पडू शकतो.. तो फेसबुकवर कसा व्यक्त होतो, हे महत्त्वाचे असते.. काहीजण सतत टिका करीत असतात.. काहीजण एखाद्या पक्षाचे समन्वयक म्हणून कार्यरत असतात.. काही उपदेशाचे ‘रेडिमेड’ डोस पाजत असतात.. इथं जर तुम्ही जसे आहात तसेच राहिलात, तर अधिक लोकमान्यता मिळते.. 

मला माझं फेसबुक समृद्ध असल्याचा सार्थ अभिमान आहे.. कारण माझ्याकडे दिग्गज कवी, लेखक, चित्रकार, सिने-नाट्य कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, प्रकाशक, प्रिंटर्स इत्यादी क्षेत्रातील असंख्य स्त्री-पुरुष संपर्कात आहेत.. त्यातील कित्येकांनी साहित्य व कला प्रांतातील उच्चतम पुरस्कार मिळविलेले आहेत..

मी तर फेसबुकवर कार्यरत आहेच, माझेही हे सर्व मित्र असेच ‘हयात’ असल्याची जाणीव करुन देत कार्यरत रहावेत, एवढंच माझं परमेश्वराकडे ‘मागणं’ आहे!!

© सुरेश नावडकर

१२-६-२२

मोबाईल ९७३००३४२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तक्रारी थांबव कर्णा! ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ तक्रारी थांबव कर्णा! ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

कर्ण कृष्णाला विचारतो – “माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती?

मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं, कारण मी क्षत्रिय नव्हतो.

परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईन . कारण मी क्षत्रिय नव्हतो!

एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला.

द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला.

कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले.

मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले.—-तर मग मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?”

कृष्णाने उत्तर दिले:

“कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला.

जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होता.

रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले.

तुम्ही तलवारी, रथ, घोडे, धनुष्यबाण, यांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात.

मला गौशाला, शेणमाती मिळाली.  आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले.

ना कोणती सेना, ना शिक्षण.

मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे, असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे.

तुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे, तेव्हा मला साधे शिक्षण पण मिळाले नाही.

सांदिपनी मुनींच्या गुरुकुलात प्रवेश झाला तेव्हा मी 16 वर्षाचा होतो.

तुम्ही तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले. माझं जिच्यावर प्रेम होते ती मला मिळाली नाही, तर ज्यांची मी राक्षसांच्या तावडीतून सुटका केली त्या माझ्या पदरी पडल्या.

मला माझ्या सर्व समाजबांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी (द्वारका) वसवावे लागले.—–मला पळपुटा (रणछोडदास) म्हणतात.

जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल. धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल… फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष.

एक गोष्ट लक्षात घे कर्णा…

प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत. 

आयुष्य कोणासाठीही कधीही सोपे नाही. 

दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण.

परंतु काय योग्य (धर्म) आहे हे तुझ्या अंतरात्माला पण कळते…

कितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या,

कितीही वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला, 

कितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले,

तरीही—

त्यावेळी आपण त्याला कसा प्रतिसाद देतो याला महत्व आहे.

तक्रारी थांबव कर्णा!

आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही.

म्हणून, तुमच्या आयुष्यात आलेल्या कठीण व अतिवाईट प्रसंगीदेखील तुम्ही चांगलाच विचार करा, भगवंताचे नामस्मरण करा, कृतज्ञता व्यक्त करा, चांगलंच वागा आणि प्रत्येक माणसाला आणि प्राण्याला सहकार्य करा. स्वच्छंदी व्हा आणि हे विसरून जा कुणी तुम्हाला वेदना दिली की आनंद…!

—— पायातून काटा निघाला की चालायला मजा येते, तसा मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला मजा येते…

जय श्रीकृष्ण   

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्गायन – खेड्यामधले घर कौलारू ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

? विविधा ?

☆ निसर्गायन – खेड्यामधले घर कौलारू ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

निसर्ग जेवढा आपल्या डोळ्यांनी आपल्याला बाहेर दिसतो, तेवढाच तो मनामनात खोलवर रुजलेला असतो. आपलं बालपण  गेलं, त्या ठिकाणच्या आठवणी या बहुतांशी निसर्गाशी निगडित असतात. कोणाला आपल्या गावातली नदी आठवते, कोणाला आपली शेत, त्या शेतातली झाडं , त्या झाडांशी निगडित असलेल्या अनेक आठवणी असं हे निसर्गचित्र तुमच्या आमच्या मनात पक्कं रुजलेलं असतं . ती  झाडं , ते पशुपक्षी तुमच्या आमच्या मनाच्या आठवणींचा एक कप्पा व्यापून असतात. आपल्याकडे निरनिराळ्या समारंभाचे फोटो काढलेले असतात. त्याचे विविध अल्बम आपण आठवणी म्हणून जपून ठेवतो. पण कधी कधी या फोटोंमधले रंग फिके होऊ लागतात. चित्र धूसर होतात. पण मनामधला निसर्ग मात्र पक्का असतो. त्याचे रंग कधीही फिके होत नाहीत. उलट जसजसे वय वाढत जाते,  तसतसे ते रंग गडद, अधिक गहिरे होत जातात. त्याचा हिरवा रंग मनाला मोहवीत असतो. 

तुम्ही कामानिमित्त शहरात राहायला गेलेले असा, लॉकडाऊन मुळे घरात अडकलेले असा, तुमचा फ्लॅट, तुमचं घर छोटं असो की मोठं, तुमच्या मनात बालपणाचा तो निसर्ग ठाण मांडून बसलेला असतो. कोकणातून मुंबईत कामानिमित्त येणारे चाकरमानी, खेड्यापाड्यातून कामानिमित्त मुंबई पुण्याला स्थायिक झालेली माणसं ही सगळी वर्षातून एकदा तरी आपल्या गावी जायला मिळावं म्हणून केवढी आसुसलेली असतात. त्यांचं गाव, त्या गावातला निसर्ग त्यांना बोलावत असतो. त्याची ओढ असते. आणि तिथे गेल्यावर काय होतं  ? जणू जादू होते. शहरामध्ये दररोजच्या कामाने त्रासलेला तो जीव, तिथे गेल्यानंतर ताजातवाना होतो. जणू जादूची कांडी फिरते. काय विशेष असते त्या गावात असे ? पण ते विशेष त्यालाच माहिती असते, ज्याने तिथे आपले बालपण घालवलेले असते.   कवी अनिल भारती यांची ‘ खेड्यामधले घर कौलारू ..’ ही रचना पहा. किती साधे आणि सोपे शब्द.. ! पण त्यातला गोडवा किती कमालीचा…! मालती पांडे यांनी गायीलेलं हे गीत आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलंही असेल. 

आज अचानक एकाएकी 

मानस तेथे लागे विहरू 

खेड्यामधले घर कौलारू. 

पूर्व दिशेला नदी वाहते 

त्यात बालपण वाहत येते 

उंबरठ्याशी येऊन मिळते 

यौवन लागे उगा बावरू 

माहेरची प्रेमळ माती 

त्या मातीतून पिकते प्रीती 

कणसावरची माणिक मोती 

तिथे भिरभिरे स्मृती पाखरू 

आयुष्याच्या पाऊलवाटा 

किती तुडविल्या येता-जाता 

परि आईची आठवण येता 

मनी वादळे होती सुरु. 

अगदी साधे सोपे शब्द. पण त्या शब्दात ताकद केवढी ! जणू तुम्हाला त्या वातावरणात घेऊन जातात ते शब्द.

शब्द आपल्याला वाटतात तेवढे साधे नसतात. त्यांना आठवणींचा गंध असतो. पहिल्या पावसाने माती ओली होते. एक अनामिक पण हवाहवासा वाटणारा गंध आपल्यापर्यंत पोहचवते. जसं आपण म्हणतो, फुलाला सुगंध मातीचा, तसाच मातीलाही स्वतःचा एक सुगंध असतो. तो सुगंध आणतात त्या पावसाच्या धारा. जसा मातीला गंध असतो, तसाच शब्दांनाही गंध असतो. आणि तो गंध अनेक आठवणी आपल्यासोबत घेऊन येतो. 

वरच्या कवितेतलं दुसरं कडवं नदीशी संबंधित आहे. कुणीतरी असं म्हटलंय की ज्याच्या गावात नदी असते, त्याचं बालपण समृद्ध असतं . आणि ते खरंच आहे. नद्यांना केवढं मोठं स्थान आपल्या जीवनात आहे ! प्रत्येकाच्या गावातली नदी छोटी असेल किंवा मोठी, पण तिच्याशी त्याच्या अनेक आठवणी निगडित असतात. गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांची नुसती नावं घेतली तरी त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी आपल्याला आठवतात. कुठेतरी लग्नात गुरुजींनी म्हटलेले मंगलाष्टक आठवते. कुठे अलाहाबादचा त्रिवेणी संगम आठवतो. तसंही ज्याच्या त्याच्या गावातली नदी ही त्याच्यासाठी गंगेसारखीच पवित्र असते. जेव्हा लोक नासिकला जातात आणि गोदावरीत स्नान करतात, किंवा तिथे जाऊन येतात, तेव्हा मी गोदावरीवर गेलो होतो असं म्हणत नाहीत. मी गंगेवर गेलो होतो असंच म्हटलं जातं . 

या कवितेचं तिसरं कडवं बघा. गावाकडची ओढ का असते लोकांना ? तर ‘ माहेरची प्रेमळ माती..’ ही माती केवळ अन्नधान्य पिकवीत नाही. त्या मातीतून प्रीती म्हणजेच प्रेमही पिकतं. शेतातल्या कणसांना जे दाणे लागतात, ते माणिक मोत्यांसारखे मौल्यवान आहेत. आणि त्याच्याशी कवीच्या स्मृती निगडित आहेत. स्मृतींचं पाखरू जणू तिथं घिरट्या घालत असतं . आणि शेवटचं कडवं तर अप्रतिमच. आयुष्यात आपण सुख दुःखाच्या, संकटांच्या अनेक पाऊलवाटा तुडवतो. पण त्याचं फार काही वाटत नाही आपल्याला. पण जेव्हा आईची आठवण होते, मग ती आपली आई असो वा काळी आई म्हणजे शेती, तिची आठवण आली की मनात वादळे सुरु होतात. मन तिच्या आठवणीने आणि ओढीने बेचैन होते. 

असा हा निसर्ग आपल्याला समृद्ध करीत असतो. त्याच्यात आणि आपल्यात एक अतूट नातं असतं . खरं म्हणजे आपणही निसर्गाचाच एक भाग असतो. पण आपलं अलीकडंच जीवनच असं काही झालं आहे, की ते नातं तुटायची वेळ जणू काही येते. आणि माणसाच्या जीवनातून निसर्ग वजा केला तर, काहीच शिल्लक राहणार नाही.

मला कधी कधी भीती वाटते ती पुढच्या पिढीची. जी शहरातून राहते आहे. आणि निसर्गाच्या या सुंदर वातावरणाला आणि अनुभवाला पारखी होते आहे. याचा बराचसा दोष आमच्याकडेही जातो. आम्ही लहानपणी जी नदी पाहिली , अनुभवली ती आता आम्ही आमच्या मुलांना, भावी पिढीला अनुभवायला देऊ शकू का ? आम्हाला जसा निसर्गाचा लळा लागला, तसा त्यांना लावता येईल का ? त्यांच्या चार भिंतीच्या पुस्तकी शिक्षणात निसर्ग शिक्षणाला स्थान असेल का ? पुस्तकातल्या माहितीवर जशी आम्ही त्यांची परीक्षा घेतो, तशी त्यांना निसर्गज्ञान, निसर्ग अनुभव देऊन घेता येईल का ? त्यांना जंगलं , प्राणी, पक्षी हे अनुभवायला देता येतील का ?  मोबाईल, टीव्ही, सिनेमे, पुस्तके यांच्यापलीकडेही एक वेगळे जग अस्तित्वात आहे याची जाणीव आम्हाला त्यांना करून देता येईल का ? सध्या तरी या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. त्यासाठी वेगळे स्वतंत्र प्रयत्न करावे लागतील. अन्यथा पर्यावरण दिवस, वसुंधरा दिन इ साजरे करून आपण आपल्या मनाचे समाधान फक्त करून घेऊ. 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ One liner Geeta ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?इंद्रधनुष्य?

One liner Geeta ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

One liner Geeta.

हिंदू धर्मात मुलांना लहानपणापासून आपला धर्मग्रंथ गीता शिकवला जात नाही हे सत्य आहे.

त्यावर एका काकांनी लिहिले आहे. पण नुसतीच टीका न करता त्यांनी एक सोल्युशनही देण्याचा प्रयत्न केला आहे.

फक्त हे सोल्युशनच पुरेसे नाही हे मला मान्य आहे. पण आताच्या इंग्रजी मिडीयमच्या मुलांना गीतेत नक्की आहे तरी काय हे प्रत्येक चॅप्टरचे सार इंग्रजीत एका वाक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे. गीता तत्वज्ञानाची तोंडओळख म्हणा ना.

☆ ☆ ☆ ☆ 

मला सांगा, दूरदर्शन मालिका सर्वसामान्य कुटुंबाकडून बघितल्या जातात. त्या मालिकेत गीतेचे नाव सुद्धा नसते . शाळेत गीता शिकवली जात नाही . कॉलेजात अर्थ समजावला जात नाही. खाजगी क्लासेस मध्ये गीतेचा अंतर्भाव नाही. 

तरुणपणी संसाराची सुरुवात करण्यापूर्वी गीता अभ्यासणार नाही . वयाच्या ४०/५० व्या वर्षी भविष्याच्या तरतुदीमध्ये व्यस्त .

संपूर्ण आयुष्य असेच निघून जाते . 

वाचकहो, मी तुम्हाला कसे समजावून सांगू ? गीतेशिवाय पर्याय नाही. आपणच आपल्या पायावर दगड मारून घेत आहे .

आजच्या ४०  वय असलेल्या मुलाला/ मुलीला विचारा , त्याला गीतेतील एका तरी श्लोकाचा अर्थ माहित आहे का ?

मी तुम्हाला  १८ अध्यायांचे सार सांगणारी १८ वाक्ये देतो  – इंग्रजी मध्ये देतो – One liner Geeta. 

करताय त्याचा प्रसार ?

प्रत्येकानी ४  दिवसात त्याला

किमान १०० फॉरवर्ड करा .

सगळ्या महाराष्ट्रात काय पण सर्व भारतभर पसरवा.

☆ One liner Geeta.

Chapter 1 – Wrong thinking is the only problem in life .

(चुकीचा विचार ही जीवनातील एकमात्र समस्या आहे)

Chapter 2 – Right knowledge is the ultimate solution to all our problems .

(सार्थ आणि पूर्ण ज्ञान हा सर्व समस्ये वरील अंतिम उपाय आहे)

Chapter 3 – Selflessness is the only way to progress and prosperity .

(निस्वार्थ हा प्रगती आणि उन्नतीचा उत्तम मार्ग आहे)

Chapter 4 – Every act can be an act of prayer .

(प्रत्येक कर्म ही एक प्रार्थना समजून करा)

Chapter 5 – Renounce the ego of individuality and rejoice the bliss of infinity .

(आत्मगौरवामधील अहम् चा त्याग करून अनंतातील अमर्याद आनंदात सहभागी व्हा)

Chapter 6 – Connect to the higher consciousness daily.

(नेहमी उच्च चेतनेशी एकरूप रहा)

Chapter 7 – Live what you learn .

(जे शिकाल त्याचे तसेच आचरण करा)

Chapter 8 – Never give up on yourself .

( स्वतः माघार घेऊन हार मानू नका)

Chapter 9 – Value your blessings .

(तुम्हाला लाभलेल्या आशिर्वादाची कदर करा)

Chapter 10 – See divinity all around .

(तुमच्या सभोवतालच्या देवत्वाची प्रचिती घ्या)

Chapter 11 – Have enough surrender to see the truth as it is.

(सत्याच्या प्रचितीसाठी स्वतःला समर्पित करा)

Chapter 12 – Absorb your mind in the higher.

(उच्च विचारसरणीत अंतर्भूत रहा)

Chapter 13 – Detach from Maya and attach to divine .

(मायावी जालापासून दूर रहा आणि देवत्वाशी जवळीक साधा)

Chapter 14 – Live a life- style that matches your vision.

(तुमच्या विचारांशी जुळेल अशीच जीवनशैली आचरणात आणा)

Chapter 15 – Give priority to Divinity .

(देवत्वाला अग्रक्रम द्या)

Chapter 16 – Being good is a reward in itself .

(सृजनशीलता हे एक वरदान आहे)

Chapter 17 – Choosing the right over the pleasant is a sign of power .

(आनंदाचा हक्क हे एकप्रकारे शक्तीचे दर्शक आहे)

Chapter 18 – Let go, let us move to union with God .

(ईश्वराशी तद्रुप होण्यासाठी पुढाकार घ्या)

(Introspect on each one of this principle)

(वरील सर्व विचारांचा परिचय करून घ्या)

|| ॐ तत् सत् ||0

संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पाऊस – ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ पाऊस – ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

गोव्याचा पाऊस गोव्याच्या दारू सारखा आहे. 

जशी गोव्याची दारू भरपूर पितात पण चढतच नाही. 

तसा पाऊस भरपूर पडतो पण  दिसतच नाही 

🤪😃

 

कोल्हापूरचा पाऊस…..घरजावयासारखा..

घुसला की…मुक्कामच..

रहा म्हणायची पंचायत…आणि 

जा म्हणायची पण पंचायत…

😃😃

 

अन मुंबईचा पाऊस 

प्रेयसीच्या बापा व भावा सारखा ..

कधी येऊन टपकेल 

धो धो आपल्याला धुउन 🤛🏻🤛🏻 निघून जाईल सांगता येत नाही 

🤣😂😅

 

पुण्याचा पाऊस बायकांसारखा. 

त्या चिडल्या की धड स्पष्ट बोलत नाहीत. 

नुसती दिवसभर पिरपिर चालू . 

पाऊस पण धड रपरपा पडत नाही. दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालू असते. नुसता वैताग !

😂 ☔

 

कोकणचा पाऊस ……..

लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा 

एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो …

☔ 💦

 

नी

  खान्देशातील पाऊस म्हणजे लफडं…! 

जमलं तर जमलं नाहीतर सारंच  हुकलं …!!      

☔ 💦

 

बेळगावचा पाऊस सात जन्म मिळालेल्या अनुभविक बायकोसारखा…!

प्रेमाची रिमझिम,आपुलकीच्या धारा 💦

व वरून वर्षाव करत असतात मायेच्या गारा..

️️️

पावसाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

तुम्हाला अजून कुठला कुठला पाऊस आठवत असेल तर सांगा.

 

संग्राहक : – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! नळ आणि बादली ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 नळ आणि बादली ! 😅  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“अगं ऐकलंस का, जरा घोटभर आल्याचा चहा देतेस का ? घसा अगदी सुखून गेलाय !”

“पाणी नाहीये !”

“म्हणजे ? आज पाणी आलंच नाही नळाला ?”

“मी असं कुठे म्हटलं ?”

“अगं पण तू आत्ताच म्हणालीस ना की पाणी नाहीये म्हणून !”

“हजारदा सांगितलं कान तपासून घ्या, कान तपासून घ्या, पण माझं मेलीच कोण ऐकतोय ?”

“आता यात माझे कान तपासायच काय मधेच ? मला नीट ऐकू येतंय आणि तूच म्हणालीस की पाणी नाहीये म्हणून, हॊ की नाही ?”

“हॊ मी म्हणाले तसं, पण नळाला पाणी नाहीये असं कुठं म्हणाले ?”

“बरं बाई, चुकलं माझं !”

“नेहमीप्रमाणे !”

“कबूल ! नेहमीप्रमाणे चुकलं ! तू नुसतंच पाणी नाहीये असं म्हणालीस ! पण चहा पुरतं तरी पाणी असेल ना घरात ?”

“अहो यंदा पावसाने सगळ्यांच्या तोंडच पाणी पळवलंय आणि तुम्हांला आल्याचा चहा प्यायची हौस आल्ये ?”

“अगं येईल तो त्याच्या कला कलाने, त्यात काय एवढं ? आता तरी मला जरा घोटभर चहा देशील का ?”

“अजिबात नाही, आधी मला पाच हजार द्या, नवीन साडी घ्यायला मग करते तुमच्यासाठी आल्याचा चहा !”

“आता हे काय मधेच साडीच काढलयस तू ? अजून कपाटातल्या 10-12 साडया एकदा तरी तुझ्या अंगाला लागल्येत का सांग बरं मला ? आणि त्यात ही आणखी एक नवीन साडी घेणार आहेस आणि ती सुद्धा पाच हजाराची ?”

“अहो कालच आमच्या ‘ढालगज महिला मंडळाने’ एक ठराव पास केलाय आणि त्या नुसारच आम्ही सगळयांजणी ही विशिष्ट डिझाईनची नवीन साडी घालून लग्नाला जाणार आहोत !”

“सध्या तरी लग्नाचा कुठलाच मुहूर्त नाही, मग ही पाच हजाराची विशिष्ट डिझाईनची साडी नेसून तुमचं महिला मंडळ कुणाच लग्न अटेंड करणार आहे, हे कळेल का मला ?”

“अहो मी मगाशी म्हटलं नाही का ? या मेल्या पावसाने गडप होऊन सगळ्यांच्या तोंडच पाणी पळवलं आहे म्हणून ?”

“हॊ, पण त्या मेल्या पावसाचा आणि तुम्ही जाणार असलेल्या लग्नाचा काय संबंध ?”

“सांगते नां, तुम्हांला माहितच आहे आपल्याकडे गावा गावातून, जर पाऊस पडला नाही तर तो पडावा म्हणून, भावला भावलीच किंवा बेडूक बेडकीच लग्न लावतात !”

“हॊ, वाचलंय खरं तसं मी पेपरात, पण अशी अनोखी लग्न लावून खरंच पाऊस पडतो यावर माझा अजिबात विश्वास नाही हं !”

“पण आमच्या महिला मंडळाचा आहे नां !”

“म्हणजे आता तुम्ही पाऊस पडावा म्हणून तुमच्या मंडळात असं बेडका बेडकीच किंवा भावला भावलीच लग्न लावणार की काय ? आणि त्या साठी पाच हजाराची नवीन साडी ?”

“अहो आपल्या मुंबईत कुठे मिळणार बेडूक आणि बेडकी लग्न लावायला ?”

“का नाही मिळणार ? अगं तुम्ही क्रॉफर्ड मार्केटला गेलात तर बेडूक आणि बेडकीच काय, मगर किंवा सुसरीची जिवंत जोडी सुद्धा मिळेल त्यांच लग्न लावायला !”

“मिळेल हॊ पण काही प्राणी प्रेमी बायकांचा त्याला विरोध आहे म्हणून….”

“मग भावला भावलीच लग्न लावा की ?”

“अहो आता आम्ही सगळ्याजणी दिसत नसलो, तरी आज्या झालोय म्हटलं ! मग आम्ही भावला भावलीच लग्न लावलं तर लोकं हसतील नाही का आम्हांला !”

“आता भावला भावली नाही, बेडूक बेडकी नाही म्हणतेस, मग तुमच्या लग्नात नवरा नवरी कोण असणार आहेत ते तरी सांग मला ?”

“नळ आणि बादली !”

“का ssss य ssss ?”

“अहो केवढ्यानं ओरडताय ?”

“नळाच आणि बादलीच लग्न लावणार आहे तुमचं ढालगज महिला मंडळ ?”

“मग, त्याला काय झालं ? आपण शहरात राहातो आणि या दोन गोष्टींचा पाण्याशी अत्यंत जवळचा संबंध आहे हे विसरू नका तुम्ही ! आणि पाऊस जर चांगला झाला तरच आपल्या घरात नळाला पाणी येतं हे पण तितकंच खरं आहे नां ?”

“हॊ खरं आहे तू म्हणतेस ते !”

“नेहमीप्रमाणे !”

“हॊ नेहमीप्रमाणे, पण म्हणून या लग्नाला पाच हजाराची साडी ?”

“अहो मी सुरवातीलाच म्हटलं नाही का, आम्ही सगळ्याजणी या लग्नात विशिष्ट डिझाईन केलेली साडी नेसणार आहोत म्हणून !”

“हॊ, पण म्हणून या अशा लग्नाला पाच हजारची साडी घ्यायची म्हणजे….. !”

“अहो आमची प्रत्येक साडी, प्रोफेशनल साडी डिझाईनर कडून स्पेशली बनवून घेतल्यामुळे त्याची किंमत तेवढी असणारच ना आता ?”

“एवढं कसलं डिझाईन असणार आहे त्या साड्यांवर ?”

“अहो मी आत्ताच म्हटलं नां तुम्हांला, की पाऊस पडावा म्हणून आम्ही आमच्या मंडळात नळाच आणि बादलीच लग्न लावणार आहोत म्हणून ?”

“हॊ ! “

“अहो म्हणूनच आमच्या प्रत्येकीच्या साडीचा रंग जरी वेगळा असला, तरी या लग्नाचा पावसावर इम्पॅक्ट पडण्यासाठी आमच्या सगळ्या साड्यांवर वेगवेगळ्या साईझचे व डिझाईनचे नळ असणार आहेत आणि त्याच्या जोडीला वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगाच्या बादल्या पण असणार आहेत !”

“धन्य आहे तुमच्या मंडळाच्या ढालगजपणाची !”

© प्रमोद वामन वर्तक

१९-०६-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares