मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बोलता बोलता भाग 5 ☆ श्री सुधीर गाडगीळ

? मनमंजुषेतून ?

☆ बोलता बोलता भाग 5 ☆ श्री सुधीर गाडगीळ ☆

मुळात मुंबईचं राजकारण- सिनेमा- जाहिरातींचं विश्व मला जवळून अनुभवता आलं ते एका वेगळ्याच साप्ताहिकामुळे. आज बऱ्याच नव्या पत्रकारांना ते साप्ताहिक माहीतही नसेल. ते साप्ताहिक म्हणजे ‘तेजस्वी’. चौगुले आणि किर्लोस्कर या दोन उद्योगपतींनी निर्मिलेले. विविध दैनिकांतून ज्येष्ठ नामवंत पत्रकार (सुमारे चाळीस) या नव्या साप्ताहिकांत रुजू झालेले होते.

 किर्लोस्करांचे जनसंपर्क अधिकारी नारायण पुराणिक सूत्रधार संपादक होते. ‘इंडिया टुडे’ येण्यापूर्वीच तसं वृत्त- साप्ताहिक मराठीत आणण्याचा हा ‘तेजस्वी’ प्रयत्न होता. त्याचं ऑफिस पुण्यात मोदी बागेत होतं. मला आठवतंय, त्या वेळी राजकारणाची जाण असलेल्या वरुणराज भिडेला पुराणिकांकडे इंटरव्ह्य़ूला घेऊन मीच गेलो होतो. त्या ‘तेजस्वी’चा मुंबई मुख्य प्रतिनिधी म्हणून माझी त्या माझ्या उमेदवारी काळात नेमणूक झाली होती. माझी निवड होण्याचं कारण फक्त मी मुंबईत जायला तयार असणं एवढंच होतं. त्यावेळी मी उल्हास पवारांच्या जुन्या आमदार निवासातल्या रुम नं. ६०२ मध्ये बऱ्याचदा असायचो. मधू शेटय़े, गोगल मला त्या वेळी खूप मदत करत. पदच असं होतं की, वसंतराव नाईक, अंतुलेंसह सर्व राजकीय नेते, उद्योजक तर सहजतेनं भेटत. मला आठवतंय की, वडखळ नाकाप्रकरणी बॅ. ए.आर.अंतुले, रामभाऊ म्हाळगी, प्रमोद नवलकर, मृणाल गोरे यांच्या मुलाखती मी घेतल्या होत्या. १९७१-७२ सालातले सारे ‘तेजस्वी’चे अंक माझ्याकडे आहेत.

मुलाखतींच्या राज्यातही अनेक गमती घडल्या आहेत. मी आणि वरुण भिडे ‘अर्न अ‍ॅण्ड लर्न’ स्कीमखाली कॉलेजात शिकत असतानाच्या काळात रेस्टॉरंट नसलेल्या ‘श्रेयस’ हॉटेलात अटलबिहारी वाजपेयीसाहेबांबरोबर सहज गप्पा झाल्यात. तर राजकीय नेत्यांमध्ये सर्वाधिक मुलाखती बाळासाहेब ठाकरे आणि शरदराव पवार यांच्याबरोबर झाल्या आहेत. २४ एप्रिल २०१२ षण्मुखानंद हॉलमध्ये दीदींच्या उपस्थितीत बाळासाहेब शेवटचे भेटले. ७, सफदरजंग रोड, दिल्ली या प्रमोद महाजनांच्या तत्कालीन निवासस्थानी सलग सात तास चित्रबद्ध केलेली महाजनांची मुलाखत शेवटची ठरेल, असं वाटलं नव्हतं. राज ठाकरे- उद्धव ठाकरे यांनी आपलं पद- ग्लॅमर विसरून मुक्त गप्पा मारल्या आहेत.

यशवंतराव चव्हाणसाहेबांशी पुस्तकांवर त्यांच्या निवृत्ती काळात चतु:शृंगी पायथ्याशी बोललोय तर पृथ्वीराज बाबांशी अगदी अलीकडे सॅटर्डे क्लबमध्ये धावत्या गर्दीत बोललोय. हे दोन ‘चव्हाण’ आणि कन्नमवार सोडल्यास वसंतराव नाईक ते देवेन्द्र फडणवीस सर्व मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती झाल्या आहेत. विलासराव देशमुख आणि सुशीलकुमारजी तर आमच्या कट्टय़ावरच्या गप्पाष्टकातही सहभागी झालेत.

नवी गाडी ‘मनोहर’ साप्ताहिकाच्या कचेरीत दाखवायला आलेला आणि बिनधास्त बोलणारा ‘नामदेव ढसाळ’ तर त्या काळात दोस्तच झाला होता. आळंदीच्या साहित्य संमेलनात अक्षरश: रस्त्यावरच्या धुळीत बसून, दया पवार मुक्तपणे जीवन कहाणी ऐकवताना मी एकटय़ाने अनुभवले आहेत. नितीन गडकरी- गोपीनाथ मुंडे यांनी खासगी विमान प्रवासातही स्टुडिओत बसल्याप्रमाणे सहज मुलाखती दिलेल्या आहेत.

क्रमशः….

© श्री सुधीर गाडगीळ 

पत्रकार,  निवेदक 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख ☆ वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया: अंबिका आणि अंबालिका ☆ सौ कुंदा कुलकर्णी

सौ कुंदा कुलकर्णी

 ? वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया ?

☆ अंबिका आणि अंबालिका  ☆ सौ कुंदा कुलकर्णी 

अंबिका आणि अंबालिका

खरं तर आपल्याकडे स्त्रीमुक्तीचे वारे बऱ्याच दिवसांपासून वाहू लागले आहेत. पण अजुनही बऱ्याच स्त्रियांना खूप अन्याय सहन करावे लागत आहेत पण महाभारतातील स्त्रियांकडे पाहिले तर आपण किती सुखी आहोत असे वाटू लागते. अशा दोन स्त्रिया म्हणजे अंबिका आणि अंबालिका.

महाभारतात काशी नरेश इंद्रद्युम्न याची कथा आहे. त्याला तीन मुली. अंबा, अंबिका आणि अंबालिका. तिघीही सुस्वरूप आणि सद्गुणी होत्या. त्या उपवर होताच राजाने त्यांचे स्वयंवर मांडले. सर्व राजाना आमंत्रणे दिली पण भीष्म ब्रह्मचारी व त्याचा सावत्र भाऊ विचित्रवीर्य नावाप्रमाणेच दुबळा होता म्हणून त्या दोघांना आमंत्रण दिले नाही. भीष्माला खूप राग आला आणि तो अगंतुकपणे सभामंडपात दाखल झाला. तिथे सर्वांनी त्याची चेष्टा सुरू केली.” विना आमंत्रण का आला? , भिष्मप्रतिज्ञा  मोडली का? ब्रह्मचर्य सोडले वाटते.” भीष्माला खूप राग आला .त्याने आव्हान दिले मी सर्वांसमक्ष या तिघींना हस्तिनापूरला घेऊन जाणार आहे. सर्व राजांनी त्याच्यावर हल्ला केला. पण भीष्माने सर्वांना पराभूत करून या तिघींचे अपहरण केले व रथात घालून हस्तिनापूरला आणले. माता सत्यवती खुश झाली व तिने तिघींना सांगितले की तुम्ही माझा मुलगा विचित्रवीर्य याच्याशी विवाह करा. अंबे ने नकार दिला व ती शाल्व राजाकडे परत गेली. पण या दोघींना दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी निमूटपणे विचित्रविर्याशी विवाह केला. विचित्रविर्याचा अकाली मृत्यु झाला . सत्यवतीने  भीष्माला आग्रह केला की तू प्रतिज्ञा मोडून या दोघींशी विवाह कर आणि कुरूवंशाला वारस दे. त्याने सांगितले मी प्रतिज्ञा भंग करणार नाही पण माते तुझाच पुत्र आपला वंश पुढे चालवील. सत्यवतीला आपल्या पहिल्या मुलाची आठवण झाली आणि तिने व्यासांना आवाहन केले. मातेच्या आज्ञेनुसार व्यास नियोग पद्धतीने राज्याला वारस देण्यास तयार झाले. एखाद्या स्त्रीचा पती जेव्हा वंश निर्माण करण्यास असमर्थ असतो तेव्हा ती दुसऱ्या पुरुषाकडून पुत्रप्राप्ती करून घेऊ शकते. पण होणाऱ्या पुत्रावर पतीचाच पिता म्हणून अधिकार राहतो याला नियोग पद्धती म्हणतात .सत्य वतीने अंबिकेला व्यासांकडे जाण्यास सांगितले. नाइलाजाने ती गेली पण व्यासांचे उग्र रूप पाहून घाबरली आणि तिने डोळे मिटून घेतले. व्यासाने सत्यवतीला सांगितले तिला अत्यंत तेजस्वी पुत्र होईल पण तो आंधळा असणार आहे. आणि जन्मांध धृतराष्ट्राचा जन्म झाला. सत्य वतीने अंबालिकाला व्यासांकडे पाठवले. तिने डोळे उघडे ठेवले पण ती लाजेने पिवळी पडली. तिच्या पोटी पंडु रोगग्रस्त पांडू चा जन्म झाला. सत्यवती ने पुन्हा अंबिकेला डोळे उघडे ठेवून व्यासांकडे जा असे सांगितले. ती स्वतः जाण्यास धजावली नाही . तिने आपल्या रूपात  एका दासीला सजवले आणि व्यासांकडे पाठवले. व्यासांनी सत्यवतीला सांगितले हिला होणारा पुत्र वेद विद्या पारंगत आणि नीतिवान निपजेल. मातेला दिलेले वचन पूर्ण करून व्यास तपश्चर्येला निघून गेले.

अंबिका आंधळ्या पुत्राची आई बनली. अंबिका शब्दाचा अर्थ देवी पार्वती , दुर्गा असा आहे पण  असहाय अंबिका काही करू शकली नाही. राजमातेचा मान तिला मिळाला पण त्याचे अंधत्व तिला आयुष्यभर छळत राहिले. अंबालिका दुबळ्या पांडू कडे पाहून आयुष्यभर जळत राहिली. दासी पुत्र विदुर सर्वगुणसंपन्न असुनही व्यासांचा पुत्र म्हणून त्याला मान मिळाला नाही दासीपुत्र म्हणूनच सगळ्यांनी त्याची हेटाळणी केली आणि त्याची आई  आयुष्यभर खंतावत राहिली. आजची कुठलीच स्त्री हे सहन करणार नाही कारण आपल्याला शिकवले आहे,”मुकी बिचारी कुणीहका, अशी मेंढरे बनू नका.”

अंबिका आणि अंबालिका त्यांचा कुठलाही दोष नसताना मूक अश्रू ढाळत बसल्या त्याचे काय?

 

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कैकयी, रामायणातील एक महत्त्वाची व्यक्ती…. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ कैकयी, रामायणातील एक महत्त्वाची व्यक्ती…. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

रामायण, महाभारत ही महाकाव्ये आपल्या हिंदू संस्कृतीचे भूषण आहेत. लहानपणापासून रामायण-महाभारतातील कथा वाचून आपल्या मनात त्यातील व्यक्तिरेखा विषयी एक विशिष्ट प्रतिमा डोळ्यापुढे उभी राहते. रामायण वाचताना रामाचे आदर्श जीवन, सीतेचे पातिव्रत्य,  लक्ष्मणाचा बंधुभाव तसेच त्या अनुरोधाने येणाऱ्या इतर अनेक व्यक्तिरेखांचे चित्रण आपल्या मनामध्ये ठसले गेलेले असते. कैकयी  ही अशीच रामायणातील महत्त्वाची व्यक्तिरेखा! कैकयी आणि मंथरा या दोघी आपल्या दृष्टीने  रामायणातील खलनायिका, ज्यांच्यामुळे रामाला बारा वर्षे वनवास भोगावा लागला. प्रत्यक्षात कैकयी रामावर नितांत प्रेम करणारी, मनाने अतिशय चांगली अशी आई होती.

  कैकेय देशाचा राजा अश्वपती आणि राणी शुभलक्षणा यांची कन्या म्हणजे कैकयी!  रघुकुल वंशातील राजा दशरथाच्या तीन राण्यांपैकी ही एक! दिसायला अत्यंत देखणी आणि हुशार अशी ही राणी होती! दशरथाची ही प्रिय राणी युद्धावरही त्याच्याबरोबर जात असे. देवदानवांच्या युद्धात देवांच्या सहाय्यासाठी ती दशरथा बरोबर गेली होती, तेव्हा दशरथाच्या रथाचा दांडा तुटला असताना त्या दांड्याला हाताने तोलून धरून तिने रथ तुटण्या-कोसळण्यापासून  वाचवला. युध्द झाल्यावर जेव्हा दशरथाला हे कळले तेव्हा त्याने आनंदित होऊन तिला दोन वर मागण्यास सांगितले. तेव्हा कैकयी ने  ते वर मी योग्य वेळी मागेन असे राजाला सांगितले.

मंथरेच्या बहकावण्यामुळे तिने ते वर मागितले खरे पण त्यातही तिला सुप्त साध्य करायचे होते. दशरथाला पुत्र शोकामुळे मरण येईल, असा श्रावण बाळाच्या वडिलांनी शाप दिला होता. दशरथाला राम किंवा इतर मुलांच्या मृत्यूमुळे शोक होऊ नये यासाठी श्रीरामालाच दूर पाठवायचा निर्णय घेतला, ज्यामुळे श्रीराम ही वाचणार होते व श्रीराम वनवासाला जाणार या दुःखातच दशरथाचे मरण होते.

अशा तऱ्हेने कैकयी ने एक वर मागितला.

 दुसरा हेतू असा होता की त्या काळी ऋषीमुनींना त्रास देणाऱे

अनेक राक्षस, राक्षसी भरत वर्षात होत्या. त्यांचा राम-लक्ष्मण यांच्या हातून मृत्यू व्हावा, आणि सर्व प्रजा राक्षसांच्या त्रासातून मुक्त व्हावी असाही हेतू रामाला वनवासात पाठविण्यामागे होता.

यामुळेच शुर्पणखेसारखी राक्षशीण मारली गेली.कैकयीचे रामा वर खूप प्रेम होते, किंबहुना भरतापेक्षा जास्तच!  संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी राक्षस वध, लंकेचा राजा रावण याचा वध या सर्व गोष्टी श्रीरामांच्या वनवासा मुळेच घडून येणार होत्या. त्यामुळे मंथरेने दिलेला सल्ला मानून कैकयीने रामाला वनवासाला पाठवले व मोठे कार्य करवून घेतले. भरता बरोबर रामाला परत आणण्यासाठी कैकयी स्वतः वनवासात पण गेली होती. ती दुष्ट नव्हती. तो काळच असा होता की या सर्व घटना तिच्या एका वरामुळे घडून गेल्या. श्रीराम परत अयोध्येला आल्यानंतर कौसल्या सुमित्रेबरोबरच कैकयी ने त्यांचे स्वागतच केले!

रामायणातील कैकयीची व्यक्ती रेखा या माहिती मुळे उजळून निघते!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बोलता बोलता भाग 4 ☆ श्री सुधीर गाडगीळ

? मनमंजुषेतून ?

☆ बोलता बोलता भाग 4 ☆ श्री सुधीर गाडगीळ ☆

बृहन्महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजात शिकत असतानाच पत्रकारिता केल्याने, विविध क्षेत्रीच्या थोरा-मोठय़ांकडे सहजतेनं जाता आलं आणि त्यातून नव्यानं सुरू झालेल्या ‘दूरदर्शन’ साठी नव-नवे विषय सुचवू शकलो. व्यंकटेश माडगूळकर, ना. ग. गोरे, लालचंद हिराचंद, आबासाहेब गरवारे, शकुंतला परांजपे, बाळासाहेब ठाकरे अशा ५० नामवंतांच्या तरुणपणीचे अनुभव, त्यांचं करिअर घडणं, पत्रकारितेच्या निमित्ताने ऐकता ऐकता, ‘दूरदर्शन’साठी ‘आमची पंचविशी’ ही मुलाखत मालिका वर्षभर केली. तर नामवंतांच्या घरातील मुलांशी बोलण्यातून जान्हवी प्रभाकर पणशीकर, कीर्ती जयराम शिलेदार, जयंत भीमसेन जोशी, रमेश स्नेहल भाटकर, श्रीधर सुधीर फडके अशा कित्येक मुलांची मानसिकता समजून घेणारा, ‘वलयांकित’ हा कार्यक्रम ‘दूरदर्शन’वर करू शकलो. डेक्कन क्वीननं प्रवास करताना पुणे स्टेशनवर डेक्कन क्वीनच्या डब्यावर हात ठेवणारा उंच मुलगा पाहून वर्षभरात वेगळी वाटणारी पन्नास माणसं ‘ मुलुखावेगळी माणसे ’मध्ये आणू शकलो.

जितेन्द्र अभिषेकीबुवांशी गप्पा मारत, गाणं समजून घेत, ‘मत्स्यगंधा ते महानंदा ’ हा अभिषेकी संगीताचा कार्यक्रम (कामत, आशाताई, राजा काळे आदींसह) जयराम, जयमाला- कीर्ती- लता- किरण भोगलेशी बोलत, ‘गंधर्व सुरांची शिलेदारी’, गोव्याच्या समुद्रावर काकतकरच्या साथीनं जाऊन, बाकीबाबांशी गप्पा मारत, ‘कांचनसंध्या’ असे गाण्यांचे कार्यक्रम करू शकलो. हे सारं ‘नक्षत्रांचं देणे’ संकल्पना येण्यापूर्वी ! फक्त ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ कार्यक्रमात अडकून न पडता, ‘स्मरणयात्रे’च्या कोषात न थांबता, दगडूशेठ गणपतीच्या शतकोत्सवात सारसबागेच्या मैदानावर गजानन वाटवे, ज्योत्स्ना भोळे, मालती पांडे, पं. हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते, श्रीधर फडके अशा भावगीतकारांच्या तीन पिढय़ा सादर करू शकलो. अरुणभय्या आणि बाळासाहेब मंगेशकर यांचे स्वतंत्र कार्यक्रमही सूत्रबद्ध केले. अरुण काकतकरांमुळे भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, उषाताई, मीनाताई, हृदयनाथजी, अशा पाचही मंगेशकर भावंडांच्या मुलाखती आणि गाणी ‘दूरदर्शन’वर प्रथम सादर करण्याची संधी मला मिळाली. आणि आशा भोसलेंच्या मुलाखती- गाण्यांचे कार्यक्रम तर गेली २७ वर्षे करत आलोय. भेटलेल्या माणसांच्या गप्पांच्या नोंदी रोज रात्री रोजनिशीत नोंदवायची सवय असल्याने, संदर्भाच्या साडेतीन हजार फायली (माझ्या आरंभकाळात कॉम्प्युटर सोय नव्हती) सांभाळून आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातल्या किमान दोन पिढय़ांशी रंगमंचावरून, कॅमेऱ्यासमोर मुलाखतवजा- संवाद सहजतेनं जमवू शकलोय.

मॉरिशसला व्यासपीठावर माणिकबाई वर्माना घेऊन आलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या (माझी फिरकी घेणाऱ्या) उत्स्फूर्त वक्तव्यानं अस्वस्थ न होता, सभ्य प्रतिउत्तर देऊ शकलोय ते माहितीचे संदर्भ सतत ताजे ठेवण्यामुळे ! माणिकताईंच्या गाण्यातून अनेकांची प्रेमं फुलली असल्याने मी त्यांना विचारलं की, ‘‘माणिकताई, माणिक दादरकरची माणिक वर्मा होताना तुम्हाला तुमचं कुठलं भावगीत उपयोगी पडलं?’’ यावर माणिकताईंनी काही उत्तर द्यायच्या आधीच, त्यांच्या बाजूला उभे असलेले पु. ल. देशपांडे म्हणाले, ‘‘अरे सुधीर, तिच्या वर्मावर कशाला घाला घालतोयस?’’ यावर पु.लं.कडे बघत मी पटकन उत्तरलो, ‘‘मी कोण त्यांच्या वर्मावर घाला घालणार? त्यांचा ‘वर्मा’ ‘अमर’ आहे.’’ या उत्स्फूर्ततेला पु.लं.नीही ‘दाद’ दिली.

मला नामवंतांशी संवाद साधण्याच्या संधी खूप मिळाल्या. हिंदी अभिनेते-अभिनेत्रींच्या जवळ जाता आलं ते देवयानी चौबळ नामक सत्तरच्या दशकात फिल्म जर्नालिझममध्ये टेरर असलेल्या ‘स्टार अ‍ॅण्ड स्टाइल’च्या संपादक ज्येष्ठ मैत्रिणीमुळे. ‘मनोहर’ साप्ताहिकात मी काम करत असताना, आमच्याकडे त्या ‘चंदेरी च्युइंगम’ सदर लिहायच्या. दत्ता सराफांनी चौबळसंपर्काची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. त्या हाजीअलीसमोर एनएससीआय क्लबवर राहायच्या. दर बुधवारी मी मुंबईला त्यांच्याकडे जायचो. त्या मला घेऊन थेट हिंदी ग्लॅमरस पाटर्य़ाना, नटांच्या घरी घेऊन जायच्या. त्यामुळे इंग्रजी फिल्मी मासिकांची भाषांतरं न करता थेट बातम्या मिळायच्या. राजेश खन्नाच्या साखरपुडय़ाला, धर्मेद्रच्या मारहाणीला मी साक्षी होतो.

© श्री सुधीर गाडगीळ 

पत्रकार,  निवेदक 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भेट…डाॅ.शुभा साठे ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले

सौ. अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ भेट…डाॅ.शुभा साठे ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

(स्वा सावरकर आणि CDS जनरल बिपीन रावत यांच्यातील काल्पनिक संवाद)

बिपीन – तात्या, तुम्ही इथे बसलाय होय…. कुठे कुठे शोधलं तुम्हाला ! गेले चोवीस तास मी तुम्हालाच शोधत फिरतोय सगळीकडे. तात्या… तात्या… मी तुमच्याशी बोलतोय… तुम्हाला भेटायला आलोय… मी बिपीन… भारतमातेचा सुपुत्र !… तात्या, खरं सांगतो, तुम्ही आखून दिलेल्या मार्गावरून चालतांना मला माझाच खूप अभिमान वाटत होता. तुमचे विचारशिल्प मनात घोळवत चिंतन, मनन केलं की आपोआप समस्येचा उलगडा होऊन मार्ग दिसायचा. तेव्हा प्रत्येकवेळेस मी मनाने तुमच्यासमोर नतमस्तक होत होतो. आज प्रत्यक्ष तुम्हाला भेटण्याचा योग्य आला. तात्या… तात्या…. ऐकताय नं तुम्ही? माझ्याकडे बघत का नाही? मी कुठे चुकलो का? चुकलो असेल तर माझा कान धरा… तुम्हालाच तो अधिकार आहे. पण, खरं सांगतो… मातेच्या रक्षणात मी कणभरही कधीच कसूर केली नाही आणि लेफ्ट जनरल लक्ष्मणसिह रावतांनी म्हणजे बाबांनी पण नाही. १९७८ मध्ये गोरखा रायफलच्या पाचव्या बटालीयनमध्ये रुजू झाल्यापासून माझं एकच स्वप्न होतं….

तात्या – मग ते स्वप्न पूर्ण होण्याच्या आधीच इथे का आलास? कुणी आमंत्रण दिलं होतं तुला इथे येण्याचं? इथे कुणी तुझी वाट पाहत होतं? की इथे कुणाला तुझी खूप गरज होती?

बिपीन – नाही तात्या, तसं नाही… पण…

तात्या – पण काय? अं …. पण काय??? जिथे कुणालाही आपली गरज नाही किंवा जिथे कुणी आपल्याला बोलावलं नाही, तिथे आपण जाऊ नये, इतकंही तुला कळत नाही? जिला तुझी खरी गरज आहे… आपली माता… तिला तू असं एकटं सोडून आलास? अरे, शास्त्रीजी, सुभाष, मी… आमचा गप्पांचा फड जमला की आम्ही तिघंही तुझ्याविषयी खूप अभिमानाने बोलायचो. परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक…. अशी पदके तुझ्या छातीवर विराजमान होताना पाहून आमच्याच अंगावर मूठ मूठ मास चढत होतं. जेव्हा भारतमातेचं रक्षाप्रमुखपद तू स्वीकारलस तेव्हा तर माझा आनंद गगनात मावेना… चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ !!…. वाटलं, आता मानसच्या काठावर पुन्हा मंत्रघोष होणार !!…

बिपीन – तात्या, याचं खरं श्रेय तुम्हालाच आहे. तुम्ही मार्ग दाखवला तसं तसं मी वागत गेलो. तुम्ही म्हंटल होतं न..” आपलं भूदल, वायुदल, नौदल सुसज्ज बनवा. लढाऊ विमानांनी, आकाशयानांनी नि जेट विमानांनी आकाश आच्छादित होऊ द्या…” आता तर सुपरसोनिक, हायपरसोनिक क्षेपणास्त्र आपल्या जवळ आहेत. पृथ्वी, अग्नी, धनुष या क्षेपणास्त्रांनी आपण सुसज्ज आहोत. ब्राह्मोसला पाहून तर चीनला घाम फुटलाय. आणि हो.. “शत्रूच्या भूमीत घुसून युद्ध चालविणे हा युद्ध जिंकण्याचा प्रभावी मार्ग आहे”… हे तुमचं वाक्य सतत मनात घोळत होतं. म्हणूनच तर उरी सर्जिकल स्ट्राईक करून तुमचे शब्द कृतीत उतरवले.

तात्या – शाब्बास माझ्या वाघा !…

बिपीन – तात्या, तुमच्या डोळ्यात पाणी?

तात्या – एक डोळा हसतोय, एक डोळा रडतोय…. १९६२ मध्ये आपल्या सैन्यदलाची जी स्थिती होती, ती आता नाही याचा आनंद आहे. पण, जेव्हा मातेला तुझी नितांत गरज आहे तेव्हा तू तिला सोडून इथे आलास याचे अतीव दुःख आहे. शौर्य आणि साहस या शब्दांना समानार्थी शब्द म्हणजे ‘बिपीन रावत’ हे समीकरण इतक्यातच मिटायला नको होतं. भारतीय सेनेला एक नवीन वैश्विक ताकद मिळवून देणारा तू…. ५/६ वर्षांपूर्वी पण तू माझ्या काळजाचा ठोका चुकवला होतास.. आठवतंय तुला?

बिपीन – हो तात्या, चांगलंच आठवतंय. तेव्हा नागालँडमध्ये माझं पोस्टिंग होतं.

तात्या – तेव्हा वरची पायरी चढताचढता थांबलास… मातेच्या प्रेमापोटी परत फिरलास.. मग आताही तसं का नाही केलं?

तात्या – तात्या, तुमच्यासारखी मृत्यूला थोपवून धरण्याची शक्ती माझ्यात नव्हती. मृत्युंजयी तुम्ही एकच ! मला तर बोलावणे आल्यावर काहीही कारण न देता निघावंच लागलं. अजून खूप काम करायचं होतं, योजना आखून तयार होत्या आणि सिंधू पण भारतात आणायचीच असा कृतनिश्चयही केला होता… पण, हरकत नाही… तुम्हाला भेटून, तुमच्याकडून अक्षय ऊर्जा घेऊन परत जातो आणि राहिलेलं कार्य पूर्ण करतो की नाही बघाच…! मी पण भारतमातेला शब्द देऊन आलोय..   भेटेन नऊ महिन्यांनी…..

लेखिका– @ डॉ शुभा साठे 

संग्राहक : – सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणींचे ठसे ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ आठवणींचे ठसे ☆ श्री अरविंद लिमये ☆

परखडपणा हा शब्द बोलण्याची पध्दत, वैशिष्ट्य म्हणून सर्रास वापरला जातो.पण त्याचं नेमकेपण एवढ्या मर्यादित अर्थात सामावणारे नाही.

फक्त स्वतःची मते कुणाचाही मुलाहिजा न ठेवता स्पष्ट शब्दात मांडणे हा स्पष्टवक्तेपणा होईल, परखडपणा नाही.

परखडपणा मुख्यतः स्वभाववैशिष्ट्य आणि पर्यायाने व्यक्तिमत्त्वविशेष म्हणूनच ओळखला जातो.स्वभाव या शब्दात विशिष्ट ‘भाव’ अंतर्भूत आहे.’भाव’ म्हणजे मनातील विचारांची, प्रतिक्रियांची व्यक्त होण्यापूर्वीची अव्यक्त अवस्था असे म्हणता येईल. याचाच अर्थ एखाद्या व्यक्तीचा स्वभाव त्याच्या मनोधारणेशी निगडीत असतो हे ओघानेच आले.त्यामुळेच व्यक्तिपरत्त्वे प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत,व्यक्त व्हायची पद्धत वेगवेगळी असते.

परखडपणाला स्पष्ट आणि स्वच्छ विचार अपेक्षित असतात. परखड म्हणजे खरा, सच्चा. अंतर्बाह्य प्रामाणिक.अतिशय प्रांजळ, सरळ आणि मुख्य म्हणजे पूर्वग्रहविरहित. या सारख्या अनेक गुणवैशिष्ट्यांपैकी एखाद्या गुणविशेषाची कमतरतातुध्दा परखडपणाची गुणवत्ता, निखळपणा कमी करणारी ठरत असते.

परखड व्यक्तींसाठी प्रत्येक क्षणच कसोटी पहाणारा असतो. आणि त्या कसोटीला उतरणाऱ्या व्यक्तिंना समाजमनात अत्यंत आदराचे अढळ स्थानही प्राप्त होत असते.

अशा अढळ स्थान प्राप्त झालेल्या अनेक परखड व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाच्या आठवणींचे अमीट ठसे समाज मनावर उमटून राहिलेले आहेत. अशा व्यक्ती सत्याची कास धरून कोणत्याही दबावाला बळी न पडता कर्तव्यपूर्तीला सर्वाधिक प्राधान्य देत योग्य निर्णय घ्यायचे धाडस करु धजावायचे. त्या आचार, विचार, साधनशुचिता कर्तव्यकठोरता, सद्सद्विवेक या सर्वांची चाड बाळगणाऱ्या असत.

इतिहासाचा धांडोळा घेताना अशा अनेक व्यक्तींची नावे मनात गर्दी करताहेत. सर्वात प्रथम   उल्लेख करावासा वाटतो तो रामशास्त्री प्रभुणे यांचा. त्यांची निर्भीड न्यायनिष्ठुरता ‘रामशास्त्री बाणा’ म्हणूनच अजरामर झाली ती त्यांच्या परखडपणामुळेच. राजकारणासारख्या दलदलीच्या क्षेत्रातही स्वतःच्या परखडपणामुळे अजरामर ठरलेले नाव म्हणजे तत्कालीन रिझर्व बँकेचे गव्हर्नर आणि नंतर पं. नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीपद भूषवणाऱ्या मा.सी.डी.देशमुख यांचे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला पं.नेहरूंचा ठाम विरोध असूनही, सत्याची कास धरून सद्सद्विवेक बुद्धीशी प्रामाणिक रहात त्यांनी संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीमागची न्याय्य बाजू परखडपणे पं. नेहरूंपुढे तर मांडलीच,पण त्यांचे मतपरिवर्तन करण्यात यश मिळाले नाही तेव्हा कसोटीची वेळ येताच अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पाठीशी ते ठामपणे उभेही राहिले. परखडपणाला तत्कालिक क्षणिक फायदा तोट्याचा विचार कधीच भुरळ घालू शकत नाही ते त्यांनी स्वतःच्या कृतीने असे सिद्ध केले होते. प्रशासनात काम करणाऱ्या परखड व्यक्ती म्हणून गो.रा. खैरनार,टी. एन. शेषन, किरण बेदी, अलिकडच्या काळातले तुकाराम मुंढे यांची नावे सहजपणे आठवतात. पत्रकारितेच्या क्षेत्रात तर न.चि. केळकर, टिळक- आगरकर, नानासाहेब परुळेकर यांच्यासारख्या व्यक्तिंनी त्यांच्या परखडपणामुळेच जनमानसातही आदराचे स्थान मिळवलेले आहे. 

साहित्यक्षेत्रातल्या नामवंत लेखिका कै.दुर्गाबाई भागवत यांचाही इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.आणिबाणीच्या काळात व्यवस्थेविरुध्द ब्र ही उच्चारण्याचे धाडस करायला अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल एरवी असोशीने बोलणाऱ्या तत्कालीन नामवंतांपैकी कुणीही धजावत नसताना परिणामांची पर्वा न करता त्यांनी जाहीरपणे आणिबाणीचा निषेध करण्याचे धारिष्ट्य दाखवले होते. त्यावर्षीच्या कराड येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.करवीर नगर वाचनमंदिर कोल्हापूरतर्फे झालेल्या त्यांच्या सत्कारप्रसंगी झालेले त्यांचे भाषण हे परखडपणाचे नेमके उदाहरण होते.विशेषत:   साहित्य-संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ‘समाजमनातील खदखद व्यक्त करणे हे साहित्यिकांचे मुलभूत कर्तव्य आहे ‘ अशी ठाम भूमिका घेऊन मा.यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीतही आणिबाणीवर परखडपणे कडाडून जाहीर टीका करताना त्या डगमगल्या नव्हत्या.

साहित्यिक म्हणून त्या लोकप्रिय होत्याच पण त्यांच्या या परखड,निर्भीड भूमिकेमुळे त्या आदरणीयही ठरल्या होत्या!

परखडपणाला सामान्य- असामान्य,गरीब-श्रीमंत,साक्षर-निरक्षर असा भेदभाव नसतो. सामान्य,गरीब,निरक्षर माणसांचा जगण्याचा परीघ लहान असला तरी त्यांचा निखळ परखडपणा प्रसिध्द व्यक्तींच्या परखडपणाच्या तुलनेत तेवढाच महत्त्वाचा असतो.त्यांच्या मर्यादित वर्तुळात त्यांना आदराचे स्थान असतेच.

आयुष्याच्या वाटचालीत परखडपणाच्या प्रत्येक कसोटीला उतरणाऱ्या अशा व्यक्तीच सुवर्णझळाळी असणारे समाधान प्राप्त करू शकतात. आणि अशाच व्यक्तींच्या आठवणींचे क्षण समाजमनावर  उमटणारे ठसेही कधीच न पुसले जाणारे असतात.

 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बोलता बोलता भाग 3 ☆ श्री सुधीर गाडगीळ

? मनमंजुषेतून ?

☆ बोलता बोलता भाग 3 ☆ श्री सुधीर गाडगीळ ☆

दृष्टीआडच्या अशा असंख्य कहाण्या मी अनुभवल्या आहेत. साऱ्याच सांगणं वर्तमानपत्राच्या मर्यादेत शक्य नाही. पुस्तकंच होतील, कारण राजकारण, सिनेमा, साहित्य, नाटक, खेळ, सामाजिक क्षेत्र, गायक-संगीतकार, चित्रकार, शास्त्रज्ञ, इतिहासकार, अशा सुमारे तीन-साडेतीन हजार व्यक्तींच्या प्रकट वा कॅमेऱ्यापुढे मुलाखती मी घेतलेल्या आहेत. आजही वीज न वापरता अंधारात राहून पंधरा-वीस विद्यार्थिनींना डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापिका सानेबाईंपासून, बिझिनेस समजून देणाऱ्या रस्त्यावरच्या भंगारवालीपर्यंत अनेक ‘मुद्रा’ मी ‘बोलक्या’ केलेल्या आहेत. पत्रकारितेची नोकरी नि कॉस्टिंगचा अभ्यास अर्धवट सोडून देऊन, पूर्णवेळ निवेदन आणि मुलाखतींचे ‘टॉक शो’ करायला लागून आता चाळीस वर्षे होतील. मराठीत पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून निवेदन करायला लागून माझी २५ वर्षं झाली तेव्हा २००० मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: पुण्यात येऊन ‘बालगंधर्व’मध्ये माझ्या आगळ्या करिअरच्या रौप्यमहोत्सवात मला ‘दाद’ दिलीय. फक्त गाणं किंवा गझल कार्यक्रमाचं ‘निवेदन’ मर्यादित न ठेवता, गाण्याच्या कार्यक्रमाच्या नवनव्या संकल्पना मी रंगमंचावर साकारल्या आणि निवेदन- मुलाखतीत फक्त भाषांचं वैविध्य आणण्याचा अट्टहास न करता, विषयांचं, माणसांचं वैविध्य आणून, मुलाखतीचे तीन हजार आणि गाण्यांचे दोन हजार कार्यक्रम केले म्हणून या वेगळ्या प्रयोजनासाठी, शरद पवार, आशा भोसले यांच्या उपस्थितीत, अमिन सयानीच्या आवाजात, सतीश देसाईंनी मला ‘पुण्यभूषण पुरस्कार’ही दिला हे मी माझं परमभाग्य समजतो.

नोकरी सोडून देऊन हे आगळं करिअर करायला उद्युक्त करणारी माझी पत्नी शैला ऊर्फ अनघा या गौरवसोहळ्यांच्या वेळी या जगातच नव्हती, एवढीच खेदाची बाब ! पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वी आताचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि मी, दोघेही मध्यमवर्गीय घरातले– आम्ही दोघांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याकरिता, एकाच दिवशी नोकरी सोडली. तेव्हा संपादकीय नोकरीचा राजीनामा देऊन घरी आल्यावर माझी पत्नी अनघा ऊर्फ शैला मला म्हणाली होती, ‘‘ बरं झालं नोकरी सोडलीत. तुमचा तो पिंडच नाही. आता मनाप्रमाणे कलेचं करिअर करा. जर काही आर्थिक अडचण आली तर आपण आपल्या गरजा कमी करू.’’ एखाद्या बाईनं ‘गरजा’ कमी करू म्हणून प्रोत्साहित करणं फारच मोलाचं होतं. मिळालेल्या यशामागे, कुटुंबाची साथ, मित्रांचं पाठबळ, जोडलेल्या माणसांचं सहकार्य, एकाच वेळी पहाटे बातम्या देणं, दुपारी जाहिरातींची भाषांतरं करणं, संध्याकाळी ‘दूरदर्शन’वर नव्या संकल्पनांतून कार्यक्रम करणं (अरुण काकतकर, विनय आपटे, विजया जोगळेकर यांच्या साथीनं) रात्री गाण्याच्या कार्यक्रमाच्या निवेदनाला जाणं, असं व्यस्त वेळापत्रक अखंड, न कुरकुरता, न आळस करता केलं हा भाग आहेच. सतत माणसांना भेटणं, माणसांचं वाचन आणि पुस्तकांचं वाचन यातून सतर्कता कायम ठेवत, पत्रकारितेच्या पार्श्वभूमीमुळे मिळालेल्या दिशेतून संदर्भ साहित्याचा साठा जमा करत, तो स्मरणात ठेवत, क्वचित उत्स्फूर्तपणातून विनोद साधत, वातावरण जिवंत ठेवत, असंख्य कार्यक्रम रंगवू शकलोय. उत्स्फूर्त गंमत सहज सुचत नाही. त्यासाठी उत्तम वक्त्यांच्या शब्दखेळीचे ऐकण्याचे संस्कार व्हावे लागतात. बाळशास्त्री हरदास, आफळेबुवा, कोल्हटकरबुवा यांच्या प्रवचन-कीर्तनातून, दत्तो वामन पोतदार ते पु. ल. देशपांडे यांच्यासारख्यांच्या उत्स्फूर्त बोलीतून, ऐकता ऐकता बोलीभाषेचे नि उत्स्फूर्त शैलीचे संस्कार माझ्यावर घडलेले आहेत.

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून निवृत्त झालेले दत्तो वामन पोतदार एका सायंकाळी साहित्य परिषदेत व्याख्यानाला आले. ते बोलायला उभे राहणार, एवढय़ात शेजारी बसलेले कथाकार श्री. ज. जोशी त्यांना म्हणाले, ‘‘दादा, आज तरी तुम्ही शिवचरित्र कधी लिहिणार ते सांगून टाका.’’ दत्तो वामन उपरणं सरसावत उभे राहिले, म्हणाले, ‘‘मी विद्यापीठातून निवृत्त झालो. मोकळा होतो. काही तरी बरं ऐकायला मिळेल म्हणून इथे आलो, पण काहीही नवं ऐकायला मिळालं नाही. आता बोलणार तर जोशीबुवांनी शिवचरित्राचे वक्तव्य केले. मी त्यांना सांगू इच्छितो की, जोशीबुवा, शिवचरित्र लिहिणं हे भाषांतरित कथा-कादंबरी लिहिण्याइतकं सोप्पं नाही. त्यासाठी चिंतन लागतं. विचार लागतो.. वेळ लागतो..’’ अशा बौद्धिक जुगलबंदी ऐकल्याने, मी बोलण्याचा व्यवसाय सुरू केल्यावर, वाटेला जाणाऱ्यांना अपमान होऊ न देता, शब्दातून टोलवत ‘दाद’ मिळवू शकलो.

 

© श्री सुधीर गाडगीळ 

पत्रकार,  निवेदक 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बातमीचा समाचार ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐ बातमीचा समाचार ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

पहाटे पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी रेडियोवर सुरु होणाऱ्या, “मंगल प्रभात” या कार्यक्रमात, बिस्मिल्लाखान यांच्या शहनाईवादना नंतर, सहा वाजता दिल्लीच्या आकाशवाणी केंद्रावरून एक, एक मिनिटाचे, प्रथम हिंदी व नंतर इंग्रजी बातमीपत्र प्रसारित होत असे ! तसेच, संध्याकाळी सात वाजता,

“नमस्कार, आकाशवाणीच हे  पुणे केंद्र आहे ! सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत. आजच्या ठळक…..”

मंडळी, टीव्ही नामक इडियट बॉक्स आजच्या सारखा झोपडपट्टी पासून बंगल्या, बंगल्यात आणि आता तर मोबाईलमधे सुद्धा घुसायच्या आधीची ही गोष्ट ! त्या काळी या दोन “ऑथेँटिक बातमी पत्रावर” अवलंबून असणारी आमची पिढी, रेडियोवरची ही दोन बातमी पत्र ऐकत, ऐकत मोठी झाली ! त्या काळी रेडियो घरात असणं, हे थोडं श्रीमंतीचच लक्षण मानलं जात होतं ! सगळ्याच मध्यमावर्गी्यांना परवडण्या सारखी ती गोष्ट नव्हती ! आमच्या चाळीच्या पंचेचाळीस बिऱ्हाडात जेमतेम दोन ते तीन “मरफीचे” रेडियो होते, यावरून त्याची कल्पना यावी ! या रेडियोच्या बाबतीतल्या गमती जमती सांगण्यासाठी वेगळा लेख, पुढे मागे लिहायचा विचार आहे ! आजचा विषय “बातमी” असल्यामुळे, माझ्या पुढील लेखाच्या विषयाची आगाऊ बातमी देणं, हे मी माझं कर्तव्य समजतो !

पुराण काळात राजाचा एखादा हुकूम अथवा फर्मान रयतेला (तेव्हा सामान्य लोकं रयत म्हणून ओळखले जात, त्यांची जनता नंतरच्या काळात झाली ! ) कळण्यासाठी वेगळी सोय होती ! एक दवंडीवाला, त्याच्या ढोल वाजवणाऱ्या साथीदारासह गांवभर फिरून, तो राजाचा नवीन हुकूम अथवा फर्मान सर्वात शेवटी प्रत्येक गावच्या चावडीवर मोठ्याने वाचून दाखवत असे !

काही राजांनी त्या काळी विशिष्ट पक्षांचा उपयोग, अतिदूर असलेल्या कोणासाठी संदेश (बातमी) देण्यासाठी वापरल्याच, आपल्या वाचनात आलं असेलच ! नसेल तर, “कबुतर जां जां जां” हे गाणं आठवून बघा, म्हणजे मी काय म्हणतो ते लगेच आठवेल ! हल्ली सगळ्यांनाच स्पून फिडींग करायला लागतं, त्याला तुम्ही तरी कसे अवपाद असणार म्हणा ! असो !

काही आफ्रीकन देशात लोकं फार पूर्वी ड्रम सारखे वाद्य विशिष्ट तालात मोठयाने वाजवून एखादी बातमी पुढच्या गावात पोहचवत असत ! नंतर नंतर त्याच काळात “रनर” ची परंपरा सुरु झाली ! रनर म्हणजे गावातला एखादा सगळ्यात जलद धावणारा तरुण, स्वतः दुसऱ्या गावात जाऊन एखादी बातमी तिथल्या प्रमुखाला सांगत असे ! मग त्या गावातला “रनर” तीच बातमी पुढच्या गावात पोहचवत असे !

मराठी वृतपत्रांचा उदय सर्वप्रथम मुंबईत झाला ! मराठीतील पहिले वृतपत्र “दर्पण” या नावाने बाळशास्त्री जांभेकरांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरु केले ! हे वृतपत्र मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत होते जे जेमतेम ८ वर्ष चालून १८४० मधे बंद पडले ! मराठीतील ही दोन्ही वृतपत्रे सुरु करण्याचा मान बाळशास्त्री जांभेकरांना जातो, त्यामुळेच त्यांना ‘मराठी वृतपत्राचे जनक’ मानले जाते !

आता वृत्तपत्राचा उल्लेख आलाच आहे, तर पुढे जाता जाता, मी मागे वाचलेल्या एका इंग्रजी कादंबरीची आठवण झाली ! स्वतः मालक, संपादक असलेला माणूस, “बातमी सम्राट” होण्यासाठी आणि आपल्या पेपरचा खप सगळ्यात जास्त होण्यासाठी  कोणत्या थराला जातो, हे आयरविंग वॉल्लास  या लेखकाने आपल्या “Almighty” (1982) या कादंबरीत कथन केले आहे ! सध्याच्या पत्रकारितेतली, “आपण सर्व प्रथम ही exclusive बातमी आमच्याच चॅनेलवर बघत आहात” अशी खरी, खोटी फुशारकी, त्या काळी त्याने आपल्या वर्तवलेल्या त्याच्या कादंबरीच्या, वेगळ्या अर्थाने जवळ जाणारी आहे, असं आता हल्लीचं पत्रकारितेच रूप बघता मला वाटायला लागलं आहे !

पुढे जसं जसा मानव प्रगत होतं गेला तसं तशी, संपर्काची नव नवीन साधन त्याने आपल्या बुद्धीने विकसित केली ! उदाहरणं द्यायच झालं तर पोस्ट कार्ड अथवा अंतर्देशीय पत्र, जी त्या काळी आपल्या ख्याली खुशालीची बातमी आपल्या दूरच्या नातेवाईकांना कळवण्यासाठी वापरात येवू लागली ! पण नंतर नंतर त्यातील उणीवा कळल्यावर आणि “तार” नामक बातमी पोचवण्याचा जलद उपाय उपलब्ध झाल्यावर(१८५०), त्या दोघांचा वापर कमी कमी होत गेला ! मग टेलिफोनचा शोध लागल्यावर तर जगाच्या एका कोपऱ्यातली बातमी जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात क्षणार्धात पोहचू लागली !

नंतर “दूरदर्शनने” घरात प्रवेश केल्यावर त्यावरील त्या काळात असलेल्या एकाच चॅनेलवर, वेगवेगळ्या बहारदार कार्यक्रमा बरोबरच दिल्या जाणाऱ्या बातम्या लोकं बघायला लागले आणि त्यावर खात्रीने विश्वास ठेवू लागले ! बातम्या कशा द्याव्यात आणि कशा देवू नयेत याच आज सुद्धा उत्तम उदाहरण म्हणजे, दूरदर्शनच्या बातम्या आणि सध्या इतर कुठल्याही पेव फुटलेल्या न्यूज चॅनेलवरील बातम्या ! या बाबतीत जास्त न बोललेच बरं ! आणि आता तर काय मोबाईल नामक यंत्राने सारे जगच, सगळे लोकं आपापल्या खिशात घेऊनच आज काल वावरत असतात !  त्यामुळे जगाच्या एखाद्या टोकाला घडतं असणाऱ्या घटनेची बातमी आपण बसल्या जागी नुसती ऐकूच नाही, तर प्रत्यक्ष पाहूही शकतो !

पण विज्ञानाच्या कुठल्याही शोधाला, एक चांगली आणि एक वाईट बाजू असतेच असते ! जसं ऍटोमिक एनर्जीचा शोध लागल्यावर काहींनी त्या पासून सर्वनाश करणारा ऍटोम बॉम्ब बनवला तर काहींनी त्याचाच उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी केला ! आता मोबाईल मध्ये वेगवेगळे ऍपस, अल्लाउदिनच्या जादूच्या दिव्या सारखे शिरल्यावर, त्याच्या कडून चांगली काम करून घेणाऱ्या लोकां पेक्षा त्याच्या कडून वाईट कामंच लोकं जास्त करून घेवू लागलेत ! काही जण स्वतःच एखादी बातमी क्रिएट करून ती पोस्ट करू लागलेत ! आणि त्या बातमीची कुठलीच शहानिशा न करता त्यांचे मित्र ती आपापल्या मित्रांना पुढे पाठवून मोकळे होऊ लागलेत ! असो, व्यक्ती तितक्या प्रकृती !

मंडळी, आपल्याला एखादी बातमी कुणाकडूनही (अगदी माझ्याकडून देखील!) कळली तरी ती पुढे ढकलतांना, कृपया त्याची शहानिशा करूनच पुढे ढकला ही विनंती !

शुभं भवतु !

© श्री प्रमोद वामन वर्तक

ता. क. – वर उल्लेख केलेल्या बातमी पत्राच्या निवेदिका, श्रीमती सुधा नरवणे या, ज्यांची नुकतीच CDS म्हणून नेमणूक झाली त्या  मनोज मुकुंद नरवणे यांच्या मातोश्री !

 

संपर्क – (सिंगापूर) +6594708959, मो – 9892561086, ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बोलता बोलता भाग 2 ☆ श्री सुधीर गाडगीळ

? मनमंजुषेतून ?

☆ बोलता बोलता भाग 2 ☆ श्री सुधीर गाडगीळ ☆

 १९९९ मध्ये सॅनहोजेजवळ (अमेरिकेत) बृहन्महाराष्ट्र अधिवेशनात मी आदल्या रात्री माधुरी दीक्षितची पाच हजार रसिकांसमोर प्रकट मुलाखत घेतली आणि पाठोपाठ दुसऱ्या दिवशी त्याच व्यासपीठावर आशा भोसले यांच्याशी गप्पा आणि त्यांचं गाणं होतं. कार्यक्रम सुरू करत असताना, अचानक आशाताई माझ्या दंडाला धरून स्टेजपुढे नेत, प्रेक्षकांना म्हणाल्या, ‘काल यानं (सुधीरनं) तुमच्या डोळ्यांना आनंद दिला. आज मी तुमच्या ‘कानांना’ आनंद देणार आहे.’ नमनालाच तुफान हशा. आशाताईंची उत्तम गाण्यापलीकडची ही बोलण्यातली उत्स्फूर्तता ‘शो’ रंगणार याची ग्वाहीच देऊन गेली.

ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार मुंबईचा बाडबिस्तारा गुंडाळून, पुण्याच्या बाणेर रस्त्यावर, सर्जा हॉटेलच्या पुढच्या बाजूला एका कॉलनीतल्या फ्लॅटमध्ये राहायला आल्या. एकटय़ाच होत्या. मी गप्पा मारायला गेलो. त्यांचं एकाकीपण पाहून मी त्यांना गप्पांच्या ओघात विचारलं, ‘‘बाई, लोकांच्या वयाची होत नाहीत एवढी वर्षे, म्हणजे साठ वर्षे तुमची अभिनय करण्यात गेली. कॅमेरा.. टेक टू.. स्टार्ट.. असं इतकी वर्षे सातत्याने ऐकत आलात. इथे या फ्लॅटमध्ये एकटं मूक बसून राहण्यानं तुम्हाला गुदमरल्यासारखं होत नाही का? त्यावर ललिताबाई हसत म्हणाल्या, ‘‘अरे इथे मी दांडीवर कपडा वाळत घालते, स्वयंपाक करते, तेव्हा या घरात माझ्यापाठी कॅमेराच लागलाय, असं मी समजते. हा स्वयंपाकघराचा सेट लागलाय, असंच गृहीत धरते. मनाच्या या खेळामुळे मी इथेही शूटिंगच्या-कॅमेऱ्याच्या जगापासून दूर गेलेलेच नसते. म्हणून इथंही एकटी रमते.’’ दुर्दैवानं त्याच फ्लॅटमध्ये त्या गेल्या, पण तीन दिवस कुणालाही त्याचा पत्ता लागला नव्हता.

एका चित्रकला प्रदर्शनाचं उद्घाटन होतं. पु. ल. देशपांडे आणि बासुदा प्रमुख पाहुणे होते. उद्घाटन सोहळ्याच्या नमनाला आयोजक आगाऊपणे म्हणाले की, प्रदर्शन चित्रकलेचं आहे. पण यातला एक पाहुणा सिनेमातला, एक नाटकातला. दोघांनी कधी हाती ब्रश धरलेला नसेल. त्याचं वाक्य ऐकताक्षणी, पुलं प्रेक्षकांकडे बघत, हातात ब्रश धरून दाढी करत असल्याची अ‍ॅक्शन घेत, उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘‘हे काय रोज ब्रश हाती धरतो की.’’ हशा उसळला आणि नमनाचं आगाऊ बोलणाऱ्याचा चेहरा उतरला. पुढची कडी म्हणजे त्या तिथे पुलंनी भाषण करण्याऐवजी हाती ब्रश घेऊन, समोरच्या बोर्डावरच्या कोऱ्या कागदावर, तीन मिनिटांत, चार फटकारे मारत ‘महात्मा गांधी’ चितारले. टाळ्यांचा कडकडाट झाला. वर म्हणतात कसे? ‘‘मित्रहो, मी काही चित्रकार नाही. शिकलेलो नाही. तेव्हा चित्र चुकलं तरी कुणी नाव ठेवू नये, म्हणून मुद्दामच ‘गांधी’ चितारले.’’  पुन्हा हशा. माझं भाग्य असं की, त्या समारंभात नंतर बोलायला मी होतो म्हणून, ‘गांधीं’चं ते चित्र त्यांनी मला जाण्यापूर्वी भेट दिलं. १९७८ मध्ये ‘पुलं’नी काढलेले ते ‘महात्मा गांधी’ माझ्या दर्शनी हॉलमधल्या भिंतीवर आजही आहेत.

‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’ चित्रपटाच्या सेटवर आम्हा त्या काळच्या चित्रपट स्तंभलेखकांना दादा कोंडके यांनी कुटुंबीयांसह सेटवर आमंत्रित केलं होतं. आम्ही गेलो. सेटवर माझ्या बायकोची मी दादांना ओळख करून देत होतो. म्हटलं, ‘ दादा, ही माझी बायको ’. माझा शब्द संपताक्षणी, दादा म्हणाले, ‘आयला, मग काल कोण होत्या?’ सेटवर हशा. असंख्य मुलाखतीतून भल्याभल्यांना निरुत्तर करणाऱ्या माझीच ‘बोलती’ दादांनी ‘बंद’ करून टाकली होती.

पुण्यात वानवडीला अपंग साहाय्यकारी संस्थेच्या कार्यक्रमात तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम भाषणाला उभे राहिले. मी निवेदक होतो. राष्ट्रपती- प्रोटोकॉलनुसार मी त्यांच्या विरुद्ध बाजूला एक पायरी खाली उभा होतो. कलामसाहेबांनी भाषण सुरू करण्यापूर्वी अचानक मला जवळ बोलावले. माझी ओळखही नाही. मला कळेना का बोलावतायत. मला म्हणाले, ‘‘ही अपंग मुलं पाहून मला एक कविता सुचतीय. भाषणापूर्वी मी कविता म्हणणार आहे. तुम्ही इथेच शेजारी उभं राहून ती ऐका. आणि लगेच तिचं मराठीत भाषांतर करा.’’ त्यांनी कविता म्हटली. मी भावानुवाद केला. म्हणजे ‘चिल्ड्रेन्स ऑफ गॉड’ला ‘परमेश्वराची मुलं’ नं म्हणता ‘ईश्वराची लेकरं’ असा अनुवाद ऐकवला. टाळ्या पडल्या. त्यामुळे कलामसाहेबांना वाटलं आपली कविता नीट पोहोचली. त्यामुळे भाषण संपल्यावर त्यांनी मला पुन्हा बोलावलं. प्रोटोकॉल बाजूला ठेवून, मला घेऊन स्टेजखाली उतरले. सिक्युरिटीला दोन खुर्च्या शेजारी ठेवायला सांगितल्या. मला म्हणाले, ‘‘बसा आणि त्या अपंग मुलांना पुढय़ात बोलवा. त्यांना सांगा की, आजोबांना काहीही प्रश्न विचारा. मुलं जे विचारतील ते मला इंग्रजीत सांगा आणि मी जी उत्तर देईन, ती मुलांना मराठीत ऐकवा.’’ पडद्यामागे घडलेल्या पण प्रेक्षकांच्या पुढय़ात प्रत्यक्षात आलेल्या या घटनेमुळे प्रोटोकॉल बाजूला सारून मला कलामसाहेबांसारख्या राष्ट्रपतींच्या शेजारी बसून, राष्ट्रपती आणि अपंग मुलं यांच्यात ‘दुभाषी’ म्हणून काम करण्याचं भाग्य मिळालं.

© श्री सुधीर गाडगीळ 

पत्रकार,  निवेदक 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बोलता बोलता भाग 1 ☆ श्री सुधीर गाडगीळ

? मनमंजुषेतून ?

☆ बोलता बोलता भाग 1 ☆ श्री सुधीर गाडगीळ ☆

पत्रकारितेची नोकरी नि कॉस्टिंगचा अभ्यास अर्धवट सोडून देऊन, पूर्णवेळ निवेदन आणि मुलाखतींचे ‘टॉक शो’ करायला लागून आता चाळीस वर्षे होतील. मराठीत पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून निवेदन करायला लागून माझी २५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा, २००० मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: पुण्यात येऊन ‘बालगंधर्व’मध्ये माझ्या आगळ्या करिअरच्या रौप्यमहोत्सवात मला ‘दाद’ दिलीय. फक्त गाणं किंवा गझल कार्यक्रमाचं ‘निवेदन’ मर्यादित न ठेवता, गाण्याच्या कार्यक्रमाच्या नवनव्या संकल्पना रंगमंचावर साकारल्या. आणि निवेदन- मुलाखतीत फक्त भाषांचं वैविध्य आणण्याचा अट्टहास न करता, विषयांचं, माणसांचं  वैविध्य आणून, मुलाखतीचे तीन हजार आणि गाण्यांचे दोन हजार कार्यक्रम केले म्हणून या वेगळ्या प्रयोजनासाठी, शरद पवार, आशा भोसले यांच्या उपस्थितीत, अमिन सयानीच्या ‘आवाजात’ सतीश देसाईंनी मला ‘पुण्यभूषण पुरस्कार’ही दिला हे मी माझं परमभाग्य समजतो.

ज्येष्ठ उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर ‘मुलाखत’ द्यायला फारसे उत्सुक नसत. त्यामागे त्यांचं  लॉजिकल कारण होतं. ते म्हणत, ‘आम्ही बनवतो काय, तर शेतात चालणारी इंजिनं. त्यांच्या आवाजातून ‘किर्लोस्कर’च बोलत असतात. वेगळं कशाला बोलायचं?’ पण चरित्रकार सविता भावे यांच्यामुळे माझी थेट शंतनुरावांशी भेट झाली. ‘लकाकी’ या पुण्याच्या मॉडेल कॉलनीतल्या बंगल्यावर हिरवळीवर दोन खुर्च्या समोरासमोर टाकून आम्ही मुलाखतीसाठी बसलो. पण ते त्यांच्या स्वभावानुसार खुलत नव्हते. त्यांचा एक वीकपॉइंट मला माहीत होता. त्यांना जगभरचे ‘ऑपेरे’ खूप आवडत. ‘ऑपेरा शो’ दाखवायला आणि तो कसा पाहावा, हे शिकवायला शंतनुरावांना आवडत असे. ते मुलाखतीत फार मोकळेपणाने बोलत नाहीयत, हे लक्षात आल्यावर मी त्यांना म्हटलं, ‘‘बाबा, मुलाखत राहू दे बाजूला. तुमच्याकडे सिडनीचा ऑपेरा आहे का हो !’’ ते एकदम खुलले. हिरवळीवरून ते मला आत बंगल्यात घेऊन गेले. दृकश्राव्य पडद्याची व्यवस्था केली आणि मला सिडनीचा ऑपेरा दाखवायला खुशीत सुरुवात केली. ते मूडमध्ये आले आहेत, हे ध्यानात घेऊन माझ्यातला मूळ पत्रकार जागा झाला आणि मी मनातले नियोजित प्रश्न, ऑपेरा पाहता पाहता, त्यांना विचारत गेलो. ते उत्तरं देत गेले. मी खूश. मुलाखतीच्या साफ नकाराकडून वीकपॉइंट काढताच, खुलून सगळी उत्तरं त्यांच्याकडून काढून घेतली. या आनंदात मी त्यांच्या बंगल्यातून बाहेर पडत असताना, किर्लोस्कर साहेबांनी मला पुन्हा बोलावलं आणि म्हणाले, ‘‘माझा वीकपॉइंट काढून, माझ्याकडून साऱ्या प्रश्नांची उत्तरं काढून घेतली, हे मला कळलंच नाही असं समजू नका. तुमचा अ‍ॅप्रोच आवडला म्हणून उत्तर दिलं. पुन्हा असं कुणाला गृहीत मात्र धरू नका.’’ माझ्यासाठी हा धडाच होता.

प्रत्यक्ष मुलाखतीपेक्षा अशा पडद्याआडच्या गोष्टीच या विविध क्षेत्रांतल्या अनेक मुलाखतींमधून शिकत गेलो. समोरच्याचा अंदाज, आवाका बांधण्याइतपत ही माणसं हुशार असल्यानेच, आपल्या क्षेत्रात क्रमांक एकच्या पदावर असतात, हे या ‘दृष्टीआडच्या सृष्टी’चा अनुभव घेताना मला कळत गेलं. गायकांच्या मुलाखती, गाण्यांचे कार्यक्रमही मी खूप केले. श्रेष्ठ गायकांच्या गाण्याचा आनंद तर मिळालाच, पण दौऱ्यांमध्ये गायक-गायिकांचा सहवास घडला. व्यक्तित्त्वाचे पदर उलगडले. गाण्यापलीकडचे पैलूही उलगडले..

पं. भीमसेन जोशीसाहेबांच्या ‘संतवाणी’ कार्यक्रमाचं ‘निरूपण’ मी काही काळ करत होतो. त्या काळी रात्री दहा वाजता कार्यक्रम थांबवण्याचं बंधन नव्हतं. पंडितजी मंडईमागच्या बांबूआळीत रस्त्यावर एकदा ‘संतवाणी’ सादर करत होते. रात्री दीड वाजता मैफल संपली. रस्ता निर्मनुष्य झाला. वादकांनी वाद्य मिटवली. बुवांनी मांडीवरची शाल काढली. आम्ही उठणार, एवढय़ात त्या उत्तररात्री निर्मनुष्य रस्त्यावरून एक हमाल गुरुजींकडे आला. बुवा त्याला म्हणाले, ‘ काय आवडलं का गाणं? ’ यावर तो वृद्ध हमाल उत्तरला, ‘‘आवडलं. पण ते ‘जो भजे..’ घ्यायला हवं होते.’’ यावर भीमसेनबुवा म्हणाले, ‘‘अस्सं. बरं..’’ त्यांनी पुन्हा वाद्यं लावायला लावली आणि मध्यरात्री पावणेदोन वाजता, त्या एकटय़ा हमालासाठी ‘जो भजे..’ म्हटलं. मला आजही त्या वृद्ध हमालाचे कृतज्ञतेने पाणावलेले डोळे आठवतात. अशा गोष्टींमुळेच, ‘भीमसेनअण्णा’ हे बंदिस्त मैफलीतल्या जाणकाराइतकेच, रस्त्यावरच्या कष्टकऱ्याच्या मनात रुजले. असे अनेक प्रसंग मनात घट्ट रुतून आहेत.

क्रमशः ….

© श्री सुधीर गाडगीळ 

पत्रकार,  निवेदक 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares