☆ मार्गशीर्ष…. श्री अनंत जोशी ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
श्री कृष्णाने भगवदगीतेत “मासानाम मार्गशीर्षम” असे संबोधून ,या नक्षत्राचे मोठेपण वर्णन केले आहे. संस्कृतमध्ये मृग म्हणजे हरीण व हरणाचे डोके(शीर्ष) म्हणजे मृगशीर्ष. या मृगशीर्षाजवळ या महिन्यात पौर्णिमेचा चंद्र असतो म्हणून या महिन्याचे नाव मार्गशीर्ष महिना. याच मृग नक्षत्रात जून मध्ये जेव्हा सूर्य असतो तेव्हा मान्सूनची सुरुवात होते (मृगाचा पाऊस). आकाशातील हे अतिशय सुंदर व ठळक नक्षत्र एकदा बघितले की आपण कधीच विसरू शकत नाही (फोटो जोडला आहे), भारतीयांना यात हरणाचे ४ पाय ,त्याचे डोके आणि व्याधाने (sirius / hunter star) पोटात मारलेला बाण (सरळ रेषेतील 3 तारे)असा आकार दिसतो. तर ग्रीक लोकांच्या समजुतीप्रमाणे त्यांना या नक्षत्राचा आकार म्हणजे योद्धा(warrior) दिसतो. त्यांनी याला नाव दिले (The orion) प्रगत शास्त्रीय अभ्यासाप्रमाणे आपल्या आकाशगंगेत ताऱ्यांचे पट्टे(spiral) आहेत , यातील एक पट्टा म्हणजे Orion-Cygnus Arm . आपला सूर्य व सूर्यमाला याच पट्ट्यात येतात.
तर याच मृग नक्षत्राचा आधार घेऊन लोकमान्य टिळकांनी The Orion हे इंग्रजीत पुस्तक लिहून, मृग नक्षत्राच्या पुराणातील उल्लेखांवरून व गणितीय पद्धतीने भारतीय संस्कृतीची प्राचीनता व कालखंड सांगितला आहे ( पुस्तकाचा मराठी अनुवाद “मृगशीर्ष”)
असे हे सांस्कृतिक , ऐतिहासिक, पौराणिक व भौगोलिक महत्व असलेले मृग किंवा मार्गशीर्ष नक्षत्र.
सोबत मृग नक्षत्राचा फोटो जोडला आहे. पुन्हा भेटू अवकाशातील नवीन विषय घेऊन.—
चार खुंट्या ठोकून दोन पाटल्या टाकून अख्ख्या कुटुंबाचं आणि पाहुण्या रावण्यांचं पण मस्त भागत होतं . तर कुठून ही श्रीमंती आली न मॉड्युलर kitchen चा घाट घराघरात पोचला देव जाणे. अख्खा दिवस जरी राबलं तरी स्वैपाकघर काही स्वच्छ वाटत नाही, काही ना काही उरलेलच असतं, बरं, बाई ची मदत असेल तर ठीक चालू होतं, पण कोविड पासून तोही मदतीचा मार्ग बंद झाला. मागच्या अंगणात टोपलभर भांडी राखेने अन नारळाच्या शेंड्यानी कचाकच घासून व्हायची, खरकटं पाणी अंगणातल्या झाडात पडायचं, आणि कडकडीत उन्हात भांडी मस्त पैकी निर्जंतुक होऊन जायची. आता सिंक च्या टिचभर ओलसर जागेत घासायची अन नुसती पाणी निथळत स्वैपाकघरातच ठेवायची, भांडीच काय पण कपड्यांना पण ऊन लागत नाही, निर्जंतुकीकरण तर दूरच राहिलं.
दिवाळीत सगळ्या गाद्या,उशा दुलया कड कड वाळून व्हायच्या, उन्हात न्हाऊन निघायच्या, आता पापड, मूग वड्या तर सोडाच, धान्यांना उन्हं लागत नाहीत तिथे अंथरूण पांघरूण दूरच राहिले.
सकाळ संध्याकाळ घर झाडून कचरा अंगणातून जरा बाहेर फेकला की सगळं कसं लख्ख व्हायचं, आता त्या पांढऱ्या चकचकीत फरशीवर चार वेळा झाडले अन तीन वेळा पुसले तरी केसांचे भ्रमण मंडळ तर कधी एकटा दुकटां केस, आरामात लोळत पडून असतात घरभर.
न्हाणीघर वेगळं तर टॉयलेट वेगळं, तेही घरापासून जरा ८ पावलं दूर मागच्या वाड्यात… उंचावर… आणि आता असते किचन च्या भिंतीला लागून ,तेही दोन्ही विधी एकत्र करायची ‘सोय?’ त्यातही एका कुटुंबात २, ३ असे बाथरूम्स … आपण प्रगतीकडे चाललोय का अधोगती कडे?
मोठ्या हौशीने अवन (ओव्हन) घ्यायचं अन फक्त शिळं अन्न गरम करायला वापरायचं, कुणी बरं एवढी दुर्बुद्धी दिली असेल आपल्याला.. काही बोटावर मोजण्याइतके असतीलही हुशार पण उरलेली मेजॉरिटी अशीच.. रीहीटींग वाली…
त्यातही झुरळे जागोजागी, त्या मॉड्युलर किचनच्या कानाकोपऱ्यात, सिंक, अन फ्रिज काय काय म्हणू नवे घ्यावीत… कितीही नायनाट करायचा म्हटलं तरी ह्यांची जनसंख्या नाहीच येत आटोक्यात.. कधी कधी वाटतंय घराचे छप्पर कापून काढावे अन सूर्याला म्हणावं ओत तुझी आग बाबा, होऊ दे सगळं लख्ख..
चार गज लावून अर्धा साडीचा पडदा लावलेली खिडकी पण कमी प्रकाश अन हवा देत नव्हतीच तेव्हाही आणि आता भल्या मोठ्या स्लाईडिंग खिडक्या… म्हणजे बस घासत काच अन खालची सगळी न निघणारी धूळ माती, दात घासायच्या ब्रश नी … सगळाच गोंधळ..
दिवाळीत एखादा ड्रेस मिळायचा ! मोजून २,४ कपडे… आता ४ कपाटं पण पुरत नाहीत कपडे ठेवायला, वरतून काही प्रसंग आला म्हणजे घालायला काही सापडत नाही हे वेगळेच…एकुलती एक परदेशात वारी करायची म्हटली तरी थर्मल चे २ , ३ सेट माणशी अन त्या महागड्या मोठ्याच्या मोठ्या ब्यागा पण… वैताग नुसता…
पोरांचा वाढदिवस म्हणजे तर विचारूच नका… इतके म्हणून ते बिनकामाचे गिफ्ट जमा होतात जणू गिफ्ट शॉप्सच्या पालन पोषणाची जबाबदारी आपणच घेतलीये… त्यात ते रिटर्न गिफ्ट चे फॅड… हजारोंच्या वर पेन पेन्सिल शार्पनेर अन खोडरबर अन पाऊच अन रंगीत पेंसिल्स … चित्रांची अन रंग भरायची बुक्स… सगळा कचरा… बरं इतकी सुबत्ता पाहून आपल्या सारखी एका पेनावर जीव लावून वर्षानुवर्षे काढणारी पिढी कशी निपजेल… मग अजूनच चिडचिड! आपलीच घुसमट…एका पिढीत प्रचंड काटकसर तर दुसऱ्या पिढीत प्रचंड सुब्बत्ता, उधळ माधळ… कसे करायचे सहन… बरं थोडं जुनं थोडं नवं करता करता नाकी नऊ आलेत आता ..
आपण बदलू या का थोडं ?
जेवढं जमेल तेवढं ?
ते, निदान बर्थडेला पैसे देऊ या, गिफ्ट्स नकोत.. रिटर्न गिफ्ट मध्ये लगेच वापरल्या जातील अशा वस्तू देऊ या, जसे दिवाळी असेल तर ५ दिवे, उन्हाळा असेल तर कॅप, काहीतरी कल्पकता… छोटसं झाड वगैरे… ते प्लास्टिक चे डबे अन अभ्यासाचं साहित्य नको ना आता.. ते पुढच्या ७ पिढ्याना पुरेल इतके झालेत आता सर्वांच्या घरी… अजून काय काय बदलता येऊ शकेल… सुचवा बरं जरा, अन पाळूया आपण सर्वच तसे ..खूप झालं हे आता
दरवर्षी हा थंडीचा सीझन संपता-संपता येणाऱ्या उन्हाळ्यात मला शिरपूरची आठवण येते. साधारणपणे चाळीस वर्षे झाली आम्हाला शिरपूर सोडून, पण तिथे राहिलेले एक-दीड वर्ष अजूनही मनाच्या कोपऱ्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रात राहणारे आम्ही बदलीच्या निमित्ताने खानदेशात शिरपूर येथे गेलो. एकदम नवखा भाग, बरोबर दोन लहान मुले आणि आपल्या गावापासून खूप लांब त्यामुळे मनात टेन्शन होतेच! पण बघूया, जसं होईल तसं, म्हणून सामानासह शिरपूरला गेलो.
सरकारी दवाखान्याच्या आवारात असलेला मोठ्ठा ब्रिटिशकालीन बंगला आम्हाला राहायला होता. घरात सहा-सात खोल्या, वर कौलारू छप्पर, मोठ्या खिडक्या आणि दोन-तीन घराबाहेर जाता येणारी दारे ! प्रथमदर्शनीच मन एकदम प्रसन्न झाले. बंगल्याच्या भोवतीच्या जागेत मोठे लिंबोणीचं झाड, गाडी लावायला गॅरेज, बसायला प्रशस्त अंगण आणि काय पाहिजे! हा दवाखाना गावापासून थोडा लांब एका टेकाडावर होता. दवाखान्याभोवती डॉक्टरांचा बंगला आणि कंपाउंडर, नर्स, क्लार्क वगैरे लोकांची घरे होती. त्यामुळे हा परिसर खास आपल्यासाठी होता ! आम्ही आल्याबरोबर सकाळी आसपासची सर्व मंडळी हजर झाली. कोणी चहाची, तर कोणी नाश्त्याची व्यवस्था केली. नंतर जेवणाची व्यवस्थाही झाली. घरातील सामान लावायला चार हात पुढे आले, त्यामुळे दोन छोट्या मुलांबरोबर सामान लावण्याच्या माझ्या कसरतीला मदत झाली. लवकरच आम्ही तिथे रुळून गेलो.
एक दीड वर्षाचा कालावधी, पण मला खानदेशी जीवनाचा त्यानिमित्ताने झालेला परिचय यात लिहावासा वाटतोय! आम्ही तिथे गेलो तेव्हा प्रथम जानेवारीची थंडी होती. सकाळी खूप गारठा असे आणि नंतर दिवसभर ऊन तापत असे. इतक्या गरम आणि विषम हवामानाची आम्हाला सवय नव्हती, पण थोड्याच दिवसात तेथील रुटीन चालू झाले. सगळेजण मला आणि ह्यांना ताई, दादा म्हणत असत. बोलणे गोड आणि वागणूकही मान, आदर दाखवणारी!
रोज सकाळी लिंबोणी खालचा कचरा काढायला शिपाई आला की त्याच्या झाडूच्या आवाजाने जाग येई. अंगणात सडा मारून रांगोळी काढणे इतकेच काम असे ! नंतर येणारी लता, भिल्ल समाजाची होती. सतरा-अठरा वर्षांची ती मुलगी स्वभावाने गोड आणि कामसू होती. ताई,ताई करून ती घराचा आणि मुलीचा ताबा घेत असे. केरवारा, भांडी करता करता मला सगळ्या गावाची माहिती देत असे.
माझी छोटी मुलगी जेमतेम तीन महिन्याची होती, त्यामुळे तिला आंघोळ घालण्यासाठी लताची आई येत असे. गॅस नसल्यामुळे एका वातीच्या आणि पंपाच्या स्टोव्हवरच स्वयंपाक करावा लागत असे. दवाखान्यातील एक शिपाई भाजीपाला किंवा इतर सामान आणून देत असे, तर दुसरा एक शिक्षित होता, तो माझ्यासाठी लायब्ररीची पुस्तके बदलून आणत असे. असं राजेशाही आयुष्य चालू होतं आमचं !
त्यावेळी संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी लाईट जाणं हे नेहमीच असे. लहान मुलांना त्याचा खूपच त्रास होई. उकाडा खूप ! लाईट नाही,पंखा नाही, त्यामुळे तिकडच्या लोकांप्रमाणे आम्ही विणलेली बाज खरेदी केली होती. ती अंगणात टाकून त्यावर संध्याकाळी गप्पा मारत बसायचे. तिथल्या बायकांना आपल्याकडील पदार्थ, राहणीमान याविषयी मी सांगत असे, तर त्यांच्याकडून तिकडचे पदार्थ शिकत असे. दादरचे पापड, मूग, मठाचे(मटकीचे) सांडगे तोडणे, कलिंगड, खरबुजाच्या बिया भाजून खाणे अशा बऱ्याच गोष्टी मला तिथे कळल्या ! बऱ्याच घरातून संध्याकाळी फक्त खिचडी बनवली जाई. त्या सर्वांना आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांसाठी मी रोज संध्याकाळी पण पोळ्या, भाकरी करते याचे आश्चर्य वाटे ! दवाखान्यातल्या सिस्टर खूप चांगल्या होत्या. उन्हाळी पदार्थ करताना त्या मला मुद्दाम बोलवत, आणि गव्हाचा शिजवलेला चीक खाऊ घालत!
सगळीच माणसे सरळ आणि प्रेमळ मनाची होती.
तो दवाखाना विशेष करून बाळंतिणीचा होता. त्यामुळे रोज जवळपास एक दोन तरी डिलिव्हरी असायच्याच ! खाण्यापिण्याची सुबत्ता असल्याने एकंदर तब्येती छानच असायच्या ! एकदा तर एका बाईचं अकरा पौड वजनाचे बाळ डिलिव्हरी झाल्याझाल्या दुपट्यात गुंडाळून आणून सिस्टरनी मला दाखवले.ते पाहून मीच आश्चर्यचकित झाले !
खाण्यापिण्याच्या बाबतीत शिरपूर एकदम छान होते. छान दूध, तूप, खव्याचे पदार्थ मिळायचे. कलिंगडं, खरबूज यासारखी फळफळावळ मुबलक प्रमाणात असायची. शिरपूरच्या जवळून तापी नदी वाहते. त्यामुळे सर्व भाग सुपीक होता. शिरपूर जवळ ‘ प्रकाशे’ नावाचे तीर्थक्षेत्र आहे. तिथे तापी आणि गोमती नद्यांचा संगम आहे.’ प्रती काशी ‘ म्हणतात त्या तीर्थक्षेत्राला !
गव्हाची शेती खूपच असल्याने उत्तम प्रतीचा गहू मिळत असे. शिरपूर मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांना जवळ असल्याने तिथल्या भाषेवर हिंदी आणि गुजराथी भाषांचा प्रभाव दिसून येई. आणि अहिराणी भाषा ही तेथील आदिवासींची खास बोली ! ती आम्हाला फारच थोडी समजत असे. शैक्षणिक दृष्ट्या हा भाग थोडा मागास असला तरी काळाबरोबर हळूहळू सुधारणा होत आहेत. येथील सर्वांना सिनेमाचे वेड भारी होते. गावात तीन सिनेमा टाॅकीज होती. दर आठवड्याला पिक्चर बदलत असे. आम्हाला सिनेमाची फारशी आवड नव्हती आणि आमची मुले लहान म्हणून आम्ही कधीच सिनेमाला जात नसू. पूर्ण वर्षभरात सिनेमा न बघणारे आम्हीच ! माझी कामवाली सखी- लता, प्रत्येक पिक्चर बघून यायची आणि मला स्टोरी सांगत काम करायची !तीच माझी करमणूक होती. शिरपूर लांब असल्यामुळे नातेवाईक ही फारसे येऊ शकत नसत. पण शिरपूरचा तो काळ खूप आनंदात गेला तो तिथल्या लोकांमुळे! शिरपूरची खास तुरीची डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी आणि कढी विसरणार नाही. दादरचे पापड,सांडग्यांचे कालवण,डाल बाटी, तऱ्हेतऱ्हेची लोणची ,खास खव्याचे मोठे मोठे पेढे आणि आमरस-पुरणपोळी हे पक्वान्न अजून आठवते ! तिथले तीनही ऋतू अनुभवले ! उन्हाळा, हिवाळा पुन्हा पावसाळा ! आणि पुन्हा आपल्या गावाकडे परतलो. पण अजूनही शिरपूरचा खास पाहुणचार आम्ही विसरलो नाही. बहिणाबाईंच्या लोकगीतातून दिसणारे खास खान्देशी समाज जीवन, तेथील प्रेमळ आदरातिथ्य आणि तेथील मातीची ओढ हे सगळं दृश्यरूप होऊन डोळ्यासमोर आले ! इतक्या वर्षांनंतरही शिरपूरचे ते थोड्या काळाचे वास्तव्य मनाच्या कोपऱ्यात तिथल्या साजूक, रवाळ तुपासारखे स्निग्धता राखून ठेवलं आहे !
(डॉ विजय तिवारी ‘ किसलय’ जी संस्कारधानी जबलपुर में साहित्य की बहुआयामी विधाओं में सृजनरत हैं । आपकी छंदबद्ध कवितायें, गजलें, नवगीत, छंदमुक्त कवितायें, क्षणिकाएँ, दोहे, कहानियाँ, लघुकथाएँ, समीक्षायें, आलेख, संस्कृति, कला, पर्यटन, इतिहास विषयक सृजन सामग्री यत्र-तत्र प्रकाशित/प्रसारित होती रहती है। आप साहित्य की लगभग सभी विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आपकी सर्वप्रिय विधा काव्य लेखन है। आप कई विशिष्ट पुरस्कारों /अलंकरणों से पुरस्कृत /अलंकृत हैं। आप सर्वोत्कृट साहित्यकार ही नहीं अपितु निःस्वार्थ समाजसेवी भी हैं।आप प्रति शुक्रवार साहित्यिक स्तम्भ – किसलय की कलम से आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आपका एक अत्यंत विचारणीय एवं सार्थक आलेख “लोक एवं निजी संपत्ति के नुकसान पर अंकुश”।)
☆ किसलय की कलम से # 65 ☆
☆ लोक एवं निजी संपत्ति के नुकसान पर अंकुश ☆
अपना हक लेना यह सब का अधिकार है। हमें व्यक्तिगत रूप में और सामूहिक रूप में सरकार तथा निजी संस्थानों से हक प्राप्त करने की कानूनी पात्रता है। कानून, पद, योग्यता, पैतृक संपत्ति हस्तांतरण आदि के आधार पर प्राप्त शक्ति अथवा अधिकार से हमें कोई वंचित नहीं कर सकता। युगों-युगों से मानव अधिकार के लिए लड़ता आया है। हक की ही लड़ाई पांडवों ने लड़ी थी। यही कारण है कि आज भी समाज में न्यायालयों का सम्मान किया जाता है।
एक समय था जब धरने, हड़तालें, अनशन, प्रदर्शन, आंदोलन अथवा विरोध बड़ी शांति पूर्वक किए जाते थे। पहले लोगों के व्यक्तिगत, शासकीय अथवा निजी मामले आपसी वार्तालाप, मोहल्ले, पंचायतों अथवा न्यायालयों के माध्यम से निपट जाया करते थे। लोग इन पर विश्वास भी करते थे, लेकिन धीरे-धीरे शिक्षा, स्वतंत्रता, मूल अधिकारों के गलत प्रयोग, राजनैतिक वर्चस्व के चलते हक और अधिकारों की लड़ाई में निजी तथा शासकीय संपत्तियों को क्षति पहुँचाने, तोड़फोड़ करने, इमारतों, वाहनों, कार्यालयों में आग लगा देने जैसी घटनाओं को लोग अंजाम देने लगे। स्वार्थवश, संप्रदाय, स्थानीय, प्रदेशीय, देशीय, धार्मिक अथवा अन्य घोषित माँगों के लिए भी अधिकारों व स्वतंत्रता का हवाला देकर ये विरोध, प्रदर्शन, आंदोलन आदि होने लगे। इनके नारे भी जोशीले हुआ करते हैं-
‘चाहे जो मजबूरी हो, माँग हमारी पूरी हो’
‘तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी’ अथवा ‘जो हमसे टकराएगा, चूर-चूर हो जाएगा”
इन परिस्थितियों में भीड़ का फायदा उठाकर, आक्रोश अथवा जोश में आकर आंदोलनकारी असंवैधानिक तरीके से तोड़-फोड़ व आगजनी भी करने लगे। हत्याएँ, दुर्घटनाएँ, गोली चालन जैसी वारदातें होने लगीं, जो निश्चित रूप से हक या अधिकार की लड़ाई में कदापि उचित नहीं है। जब अधिकार माँगने वाला या अधिकार देने वाला ही दुनिया में नहीं रहेगा तो, ऐसे आंदोलनों अथवा प्रदर्शनों का कोई औचित्य नहीं है।
निसंदेह स्वतंत्रता के पश्चात हमें अपना देश और अधिकार की सौगात मिली है। इसका लाभ भी सभी को मिला है, लेकिन इन कृत्यों से हुई अकूत सरकारी क्षति क्या निंदनीय नहीं है? हमारे ही पैसों से बनी संपत्ति को हम ही नष्ट करें, यह कितनी दुःखद बात है। सरकारें आती-जाती रहेंगी, लेकिन चाहे जब लाखों-करोड़ों की संपत्ति नष्ट होते रहना तो सबके लिए कष्टप्रद होगी ही।
देर आयद, दुरुस्त आयद कहावत को चरितार्थ करते हुए भला हो उन कानूनविदों और कुछ सरकारी नुमाइंदों का, जिनकी सक्रियता से हम ऐसे नुकसान की रोक-थाम हेतु ऐसा सकारात्मक कदम आगे बढ़ा पाए। इसे अभी हम शुरुआत ही मानें क्योंकि देश में हमारे मध्यप्रदेश को मिलाकर अभी मात्र छह ही ऐसे राज्य हैं जिन्होंने इन असंवैधानिक कार्यों के विरुद्ध यह विधेयक बनाया है। इस विधेयक के अन्य प्रदेशों में सुखद परिणाम भी दिखाई देने लगे हैं। मध्यप्रदेश की विधानसभा ने दिसंबर 2021 में इस विधेयक को पारित कर दिया है, जो ‘मध्यप्रदेश लोक एवं निजी संपत्ति को नुकसान का निवारण व नुकसानी की वसूली विधेयक 2021’ के नाम से जाना जाएगा।
इस कानून के अंतर्गत धरना, जुलूस, हड़ताल, बंद, दंगा या व्यक्तियों के समूह द्वारा पत्थरबाजी, आग लगाने या तोड़फोड़ से सरकारी या निजी संपत्ति को नुकसान पहुँचाने पर अब उनसे इसकी क्षतिपूर्ति कराई जाएगी। इसके अतिरिक्त उन लोगों को भी इस कानून के दायरे में लिया गया है जो उक्त कृत्य करने के लिए उकसाने या ऐसे कार्यों को करने हेतु प्रेरित करते हैं। इस विधेयक में नुकसान हुई राशि की दोगुनी रकम तक वसूले जाने का प्रावधान है। राशि के भुगतान न हो सकने की स्थिति में ऐसे लोगों की चल-अचल संपत्ति की नीलामी करने का अधिकार भी सरकार के पास होगा।
इस तरह हम कह सकते हैं कि अब उपरोक्त होने वाले नुकसान में रोक संभव हो सकेगी। ऐसे उन सभी कृत्यों में भी लगाम लगेगी, जिनसे निजी अथवा शासकीय संपत्तियों को नुकसान होता है।
अब बदले हुए परिवेश में अधिकार माँगने वालों के बदले-स्वर कितने प्रभावी होंगे? यह भी देखना होगा कि उक्त प्रदर्शनों, धरना विरोधी आंदोलनों का स्वरूप क्या होता है? विचारणीय बिंदु यह भी है कि अब निजी संस्थानों और सरकारी नुमाइंदों की सोच में भी बदलाव आता है अथवा नहीं। शांतिप्रिय आंदोलनों अथवा विरोध की गतिविधियों पर अब त्वरित निर्णय लेने हेतु ऊपर बैठे लोगों की नैतिक जवाबदेही बन गई है। वहीं जनता और भीड़ के संयम की पराकाष्ठा न चाहते हुए भी कुछ अप्रिय करने पर बाध्य न हो जाए, इसलिए अब दोनों पक्षों के मध्य संवादहीनता अथवा असहमति के बचाव हेतु एक समन्वय मंडल की भी आवश्यकता है जो उभय पक्षों के तथ्यों की जानकारी लेकर समन्वय स्थापित करा सके।
देश हमारा है। सरकार हमारी है और लोग भी अपने हैं। इसलिए जनता, प्रशासन और निजी संस्थानों को आपसी सौहार्दपूर्वक सबके अधिकारों और हक का ध्यान रखते हुए उक्त विधेयक के अनुरूप आगे बढ़ना चाहिए।
मराठी इतिहासाचे अत्यंत प्रतिभावान, व्यासंगी, दृढनिश्चयी, निष्ठावान इतिहास संशोधक म्हणजे विश्वनाथ काशिनाथ राजवाडे. महाराष्ट्रातील इतिहास संशोधनाचे ते पहिले पुरस्कर्ते होत. एवढ्या प्रचंड मोठ्या कार्यामुळे ‘इतिहासाचार्य’ म्हणूनच ते ओळखले जातात. महाराष्ट्राच्या विचार विश्वात त्यांचा मोठा दरारा, दबदबा होता.
विविध विषयांवर त्यांनी संशोधन केले. इतिहास, गणित, मानववंशशास्त्र, विज्ञान, भौतिकशास्त्र, संस्कृत, भाषाशास्त्र अशा अनेक विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते. इतिहास हा भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन असते. त्यासाठी अस्सल कागदपत्रांच्या आधारे आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे ही त्यांची स्पष्ट विचारधारा होती. ऐतिहासिक साधनांच्या आणि प्राचीन साहित्याच्या शोधासाठी त्यांनी अखंड भ्रमंती केली. प्राचीन अवशेष आणि जुनी दप्तरे गोळा केली. त्यांच्या अभ्यासातून, संशोधनातून इतिहास लेखन केले. संशोधन, संकलन, संपादन आणि समीक्षा या इतिहासाच्या सर्व टप्प्यात ते शेवटपर्यंत कार्यरत होते. त्यांचे लिखाण नवीन विचारांचे खाद्य पुरवणारे आणि लोकविलक्षण निष्कर्षांचे असायचे. संशोधनाचा अफाट व्यासंग होता.
‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या ग्रंथाचे बावीस खंड प्रसिद्ध आहेत.ते मराठा साम्राज्याच्या इतिहास अभ्यासासाठी महत्त्वाचे साधन बनलेले आहेत. त्यातील काही खंडांना त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना संपादनापेक्षा जास्त गाजल्या.संशोधनात ज्ञानेश्वरीची जुनी प्रत मिळाल्यावर तिला शंभर पानांची प्रस्तावना लिहिली. ‘ज्ञानेश्वरीतील व्याकरण’ हा ग्रंथ लिहिला.
महाराष्ट्राचा वसाहत काळ’, ‘राधा माधव’, ‘विलास चंपू’, ‘महिकावतीची बखर’ इत्यादी लेखन त्यांच्या प्रतिभा संपन्नतेची साक्ष देते. प्रसिद्ध वा अप्रसिद्ध कोणत्याच ग्रंथसंपदेवर त्यांनी हक्क राखून ठेवले नाहीत. ही त्यांची निस्पृहता अतुलनीय आहे. संपूर्ण वाङमय संशोधनात्मक असून त्यातून बुद्धिवादी व शास्त्रीय पद्धतीचे धडे दिले.
मराठी भाषा व मराठी वाङमय या विषयी त्यांची जिज्ञासुवृत्ती होती. मातृभाषेतच लिहिण्याचा बाणा त्यांनी आयुष्यभर पाळला. ते म्हणत, “ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील. माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेलो नाही.”
मराठीतून इतिहास, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इत्यादी बहुविध विषयांवर व्यासंगी संशोधन आणि लेखन केले. भाषा ही संस्कृतीचे प्रतीक आणि भाषेतील शब्द इतिहासाचे विश्वसनीय साधन वाटे.मराठीचे विवेचनात्मक व्याकरण आणि ऐतिहासिक व्याकरण यांच्या त्यांनी व्याख्या केल्या. ऐतिहासिक व्याकरणाच्या सहाय्याने शब्दांची प्राकृत, संस्कृत, वेदकालीन, पूर्ववैदिक, पूर्वपूर्ववैदिक भाषेतील रूपांचे संशोधन केले. समाजशास्त्राचा ही अभ्यास केला.
स्वभाषेच्या, स्वदेशाच्या इतिहासातून स्वाभिमान जागृत करणे आणि सर्वसामान्यांना संघर्षास प्रवृत्त करणे हे त्यांनी आपल्या कामाचे ध्येय ठरवले होते. असे हे कीर्ती, संपत्ती, अधिकार यांचा हा मोह टाळून अखंड ज्ञानोपासना करणारे, प्रचंड व्यासंग असणारे प्रतिभाशाली व्यक्तिमत्व ३१ डिसेंबर १९२६ रोजी निवर्तले.
अशा अनेक बाबींची स्मरण यादी म्हणजे कालनिर्णय— वर्षभर तो दिनविशेष सांगतो. शुभअशुभाचे ‘ सावधान ’ इशारेही देतो. “माझा नाही बुवा विश्वास..”” असं म्हणत, कालनिर्णयमधील राशीभविष्य गंमत म्हणून का होईना वाचलं जातंच. पाककृतीसाठी विविध माध्यमे उपलब्ध असली तरीही कालनिर्णयच्या महिन्यामागचं पान वाचणं हा गृहिणींचा आनंदच…!!
संपूर्ण साहित्यमित्र— ३६५ व्या दिवशी या मित्राचा सहवास संपतो….
भिंतीवरच्या खिळ्यातून कालनिर्णय काढलं, नव्या कोर्या ,नववर्षाच्या कालनिर्णयाची घट्ट गुंडाळी उलगडली आणि त्याच जागी ही नवी दिनदर्शिका लावली—-
जुनं काढतांना मनात आलं, “या वर्षानं खूप सतावलं—शिकवणही दिली….नवं लावताना मनांत आशा पालवली—’ सारी इडा पीडा जुन्याबरोबर जाऊदे…’
हातातल्या जुन्याची पानं फडफडली.. क्षणांत अनेक चौकोनात केलेले शाईचे गोल दिसले. स्वअक्षरांतील टिपणे दिसली. खरं म्हणजे सारं काही होऊन गेलेलं होतं !! आता होती ती रद्दी !! —उगीच भास झाला—-चुरगळलेली पानं म्हणत होती—” गरज सरो वैद्य मरो..!! हेच ना शेवटी—
वर्षभर तुझ्या पावलांबरोबर चाललो—साधं धन्यवादही नाही? कचर्याच्या टोपलीतला पुढचा गलिच्छ प्रवास सुरू होण्यापूर्वी थोडं मनांतल.!– वाईट नक्की कसलं वाटतंय् ? या घरातलं वास्तव्य संपल्याचं, की खड्यासारखं दूर भिरकावून दिल्याचं…? “
पण शेवटचं पान धीर गंभीर होतं. अधिक परिपक्व ,गंभीर ,विचारी —-त्यानं दिलासा दिला—-
“ आग!मी कालनिर्णय आहे. कालाचे निर्णय ठरलेलेच असतात. कुठलीही स्थिती स्थिर नसते.जुनं जातं—
नवं त्या जागेवर येतं..झाडावरची पानं नाही का गळत? तेव्हांच नवी पालवी फुटते. अन् जीवन
पुन्हा बहरतं !! नव्या आशा – नवी उमेद – जुन्याला निरोप ,नव्याचे स्वागत..!!
तुझी भिंत सोडून जाताना मीही उदास आहेच ! All partings in life are sad indeed—
पण मी तुझ्या स्मृतीत असेनच—निरोपाचा हात हलवताना इतकंच म्हणेन,” नव वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!
आपल्याच देशातल्या एका सुप्रसिद्ध उद्योगपतींची ही कहाणी आहे. एक दिवस हे उद्योगपती सकाळी तयार होऊन कामाला जाण्यासाठी निघाले होते. तेवढ्यात त्यांच्यासमोर घरमालक येऊन उभा राहिला. “आज कसं येणं झालं..?” उद्योगपतींनी त्या माणसाला विचारले. कामाच्या नादात ते विसरून गेले होते की, समोर त्यांचा घरमालक उभा आहे. घरमालक विनम्रपणे म्हणाला,” मी भाडं वसूल करायला आलो आहे. दर महिन्याला तुम्ही पाठवता. यावेळेला कामाच्या गडबडीत राहून गेलेलं दिसतं.”
उद्योगपती वरमले आणि म्हणाले, ” हे घ्या तुमचं घरभाडं. उशीर झाल्याबद्दल क्षमा करा.” एवढे बोलून उद्योगपतींनी खिशात हात घालून पैसे काढले व घरमालकाला दिले. घरमालक उद्योगपतींना म्हणाला,” तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून भाड्याच्या घरात राहता, याचे मला आश्चर्य वाटते.” यावर उद्योगपती हसले व म्हणाले, ” मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे याला महत्त्व आहे. माझ्या काही तत्त्वांमुळे मी भाड्याच्या घरात राहतो.” घरमालक काही समजला नाही. तो भाडे घेऊन निघून गेला.
प्रसंग त्या उद्योगपतींचा ड्रायव्हर पाहत होता. उद्योगपती गाडीत बसले व आपल्या परदेश प्रवासासाठी तिकीट काढायला एका एअरलाईनच्या ऑफिसात गेले. तिथे बरीच गर्दी होती. उद्योगपती एखाद्या सामान्य माणसासारखे रांगेमध्ये उभे राहिले.. तेवढयात एअरलाईनच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले, ते घाईने पुढे आले आणि म्हणाले,” सर, तुम्ही रांगेत का उभे आहात..? आम्ही तुमचे तिकीट काढून तुम्हाला आणून देतो. तुम्ही समोरच्या सोफ्यावर आरामात बसा. तुम्ही रांगेत उभे राहून आम्हाला लाजवू नका.”
उद्योगपती म्हणाले, ” आत्ता मी उद्योगपती म्हणून इथे उभा नाही, तुम्ही एवढी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. ‘ उद्योगपती ‘ हे माझ्या नावासमोर लावलेले विशेषण आहे. मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे? हे अधिक महत्त्वाचे आहे. ” एअरलाईनचा स्टाफ हे उत्तर ऐकून चकित झाला.
तिकीट काढून उद्योगपती आपल्या ऑफिसकडे निघाले. रस्त्यात त्यांना अनेक माणसे धावतपळत आपापल्या कार्यालयाकडे जाताना दिसली. त्यांना लाज वाटली की, आपण एवढ्या आलिशान गाडीमधून एकटे प्रवास करीत आहोत. सामान्य माणसे मात्र किती कष्टाने ऑफिसला पोहोचतात. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या गाडीत लोकांना लिफ्ट द्यायला सुरुवात केली. लिफ्ट मिळालेल्या लोकांचा आनंद पाहून उद्योगपतींना समाधान वाटायचे.
एके दिवशी हे उद्योगपती परदेश प्रवासासाठी निघाले होते. त्या दिवशी एक प्रसंग घडला. हवाई सुंदरीच्या हातून त्यांच्या अंगावर चुकून पेय पडले. त्यामुळे ती घाबरली. तिने पाणी व कपडा आणून त्यांचा ड्रेस स्वच्छ केला. ती त्यांना ओळखत असल्याने तिने शतदा त्यांची क्षमा मागितली. तिला भीती वाटत होती की, या चुकीबद्दल तिला शिक्षा घडणार.. उद्योगपतींनी तिच्याकडे पाहिले व तिला विचारले, ” तू माझ्या अंगावर काय सांडलेस ?” हवाई सुंदरी भीत भीत म्हणाली, “माझ्या हातून तुमच्या कपड्यांवर फळांचा रस सांडला, मला क्षमा करा.” उद्योगपती हसले व म्हणाले, ” पुढच्या वेळेला माझ्या अंगावर सोडा, व्हिस्की सांड “. उद्योगपतींचे बोलणे ऐकून हवाई सुंदरी खुदुकन हसली. तिच्या मनावरचा सगळा ताण एका क्षणात उतरला.
असे अनेक प्रसंग उद्योगपतींच्या ड्रायव्हरने पाहिले होते. त्याची उत्सुकता चाळवली गेली. तो उद्योगपतींना म्हणाला, ” साहेब, तुम्हाला इतके साधे राहणे व वागणे कसे काय जमते..? आम्ही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो. तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून तुम्ही किती साधे जगता ??”
उद्योगपती म्हणाले, ” अरे, मी लहान असताना फार उद्दाम होतो. मला सांभाळायला एक दाई होती. एकदा माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडली तेव्हा मी तिला चक्क लाथ मारली होती. ते पाहून माझे वडील एवढे संतापले होते की, त्यांनी मला बदडून काढले. ते मला म्हणाले होते, ” तू कोण आहेस हे बिलकूल महत्त्वाचे नाही; पण.. ‘ तू कसा आहेस ‘ हे फार महत्त्वाचे आहे. आयुष्यभर माझे हे वाक्य स्मरत राहा .”—–
—” तेव्हापासून मी वडिलांचे शब्द स्मरत आलो आहे. मला हे पटले आहे की, ‘ खरोखरच आपण कोण आहोत ‘ हे महत्त्वाचे नसतेच. ‘आपण कसे आहोत ‘ यावर आपली किंमत ठरते. जगात जेवढे थोर पुरुष होऊन गेले, सगळे साधेच होते.”
या उत्तुंग उद्योगपतीचे नाव—–‘ रतन टाटा…‘
खरंच, जगात जेवढी उत्तुंग माणसे होऊन गेली ती सगळी बोलायला, वागायला अत्यंत साधी—कुठलीही गुंतागुंत नसलेली— अशीच होती. .
खरेतर—-साधे राहणे हेच कठीण असते. अशा व्यक्तींच्या जीवनाचे आपण अनुकरण करायला हवे…
म्हणूनच, ” तुम्ही कोण आहात . ” हे महत्वाचे नाही—- ” तुम्ही कसे आहात ” हे महत्वाचे आहे—-
विचार जरूर करा—
संग्राहक :- श्री सुनीत मुळे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
“सुप्रभात, सुप्रभात, अग ऐकलंस का, जरा दोन कप चहा कर मस्त आलं वगैरे टाकून, मोऱ्या आलाय !”
“नको पंत, आत्ताच घरी घेवून आलोय. तुमचा पेपर देण्यासाठी आलो होतो.”
“तो देशील रे, पण आज तुझं थोडं बौद्धिक घेणार आहे, म्हणून म्हटलं जरा आल्याचा चहा घेतलास तर मेंदूला तरतरी येईल तुझ्या !”
“बौद्धिक कसलं पंत ?”
“अरे तुम्ही लोक आजकाल ते PJ वगैरे करता ना, तसलाच एक PJ मी तुला….”
“विचारा ना विचारा पंत, आपल्या चाळीत मला PJ एक्स्पर्ट म्हणूनच ओळखतात, हे ठाऊक असेलच तुम्हांला ?”
“अस्स, मग मला सांग ‘कनवटीच्या पैशाला’ काय म्हणतात ?”
“कनवट म्हणजे…. “
“भले, इथपासूनच बोंब आहे सगळी तुझी मोऱ्या, मग तू काय उत्तर देणार कप्पाळ !”
“तस नाही पंत, पण कनवट हा शब्द तसा कानावरून गेला नाही म्हणून… “
“बर, तुला सांगतो कनवट म्हणजे कंबर.”
“ओके, मग सोप आहे पंत. कनवट म्हणजे कंबर आणि सम म्हणजे पैसा, म्हणजे उत्तर ‘कंबरसम’ काय बरोबर ना ?”
“मानलं बुवा तुला, खरच एक्सपर्ट दिसतोयस तू या पीजेच्या गेम मधे.”
“पण पंत आज एकदम सकाळी सकाळी पैशाच्या गोष्टी? “
“अरे या जगात पैशा पेक्षा अनेक चांगल्या गोष्टी आहेत पण त्या घेण्यासाठी पण पैसाच लागतो रे !”
“वा पंत व्वा, काय बोललात ? जरा परत सांगता, म्हणजे नीट लिहून घेतो.”
“अरे, असे मी कुठंतरी वाचल होत मोऱ्या, ते आठवलं म्हणून तुला सांगितले इतकंच.”
“असं होय, मला वाटले हे तुमचंच वाक्य आहे की काय !”
“अरे मोऱ्या असं बघ आमची पिढीच निराळी. दुसऱ्याचे काही आपल्या नावांवर खपवण्या इतपत आमचे मन, तुमच्या तरुण पिढी इतके अजून तरी निर्ढावलेले नाही.”
“तेही खरच म्हणा, पण आज एकदम पैशाच्या गोष्टी आणि ह्या सगळ्या रिसिटस कसल्या दिसतायत ? “
“अरे ह्या सगळ्या इन्शुरन्सचे प्रीमियम भरल्याच्या रिसिटस आहेत.”
“पण पंत, ह्या सगळ्या LIC च्याच रिसिटस दिसतायत.”
“अरे आमच्या वेळेस आजच्या सारखे तुमचे पॉलिसी बाझार नव्हते बर. तेव्हा इन्व्हेस्टमेंट करायला फक्त PF आणि एकच एक विश्वासार्ह LIC काय ती होती. तेव्हा PF ला चांगला इंटरेस्ट रेट मिळायचा. तुला एक गंमत सांगू ?”
“सांगा ना पंत !”
“अरे आमच्या बँकेत जर का नवरा बायको दोघेही कामाला असतील नां, तर एकाचा 90% पगार PF मधे ठेवणारी अनेक जोडपी होती त्या काळी आमच्या बँकेत.”
“काय सांगता काय पंत? पण मग संसार कसा चालायचा त्यांचा ?”
“अरे एकाचा पगार होताच ना पुरेसा त्यासाठी, मग.”
“पंत तुम्ही पण PF मधे…”
“अजिबात नाही, रिटायर होई पर्यंत माझी मिनिमम काँट्रीब्युशन होती PF मधे 10% ची.”
“काय सांगता काय पंत, मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशात करत होतात त्या वेळेस ?”
“माझ गणित थोडं वेगळं होत.”
“ते कसं काय ?”
“मी LIC च्या मनी बॅक पॉलिसी घेत होतो, त्यात पण टॅक्स बेनिफिट PF एवढाच मिळायचा.”
“बरोबर ! “
“आणि ३ किंवा ५ वर्षांनीं पैसे मिळाले की त्याची NSC घ्यायचो तेव्हा! मग काय 6 वर्षात पैसे डबल आणि वर त्याचा पण टॅक्स रिबेट मिळायचा. पण त्यात दुसरी एक महत्वाची जमेची बाजू पण होती मोऱ्या.”
“ती कोणती ? “
“अरे असं बघ, मी जरी 90% PF काँट्रीब्युट केला असता आणि जर का माझे काही बरे वाईट झाले असते तर हिला माझे PF चे पैसे आणि त्यावरचे व्याजच मिळाले असते, पण इन्शुरन्स काढल्यामुळे जर का तसा प्रसंग आला असता तर त्याच्या कितीतरी पट…. “
“हो, कळलं मला, पण तेव्हा शेअर मार्केट हा सुद्धा पर्याय उपलब्ध….. “
“अब्रम्हण्यम्, अब्रम्हण्यम् ! अरे त्या वेळेस शेअर मार्केट म्हणजे सट्टा, जुगार अशी आमच्या भटा ब्राम्हणांची समजूत, त्याच्या वाऱ्याला सुद्धा फिरकायला बंदी होती घरून !”
“काय सांगता काय पंत, मार्केट म्हणजे सट्टा… “
“अरे अशी त्या वेळेस मध्यमवर्गीय लोकात समजूत होती खरी आणि तुला सांगतो, अरे फोर्टला बँकेत असतांना मी “लिधा – बेचा”चा कलकलाट या कानांनी ऐकलाय बर. तुमचा तो मार्केटचा टॉवर आणि ऑनलाईन ट्रेडिंग आत्ता आत्ता सुरु झाले. आताच्या सारखे घर बसल्या बोल्टवर तेव्हा लाखोंचे व्यवहार होत नव्हते ! तुम्हाला शेअर विकायचे असतील किंवा विकत घ्यायचे असतील तर तो व्यवहार सटोडिया मार्फतच करावा लागायचा.”
“अरे बापरे, मग कठीणच होता तो काळ इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने.”
“अरे म्हणून तर मी LIC मधेच जास्तीत जास्त पैसे गुंतवले तेव्हा आणि लोकांनाही तसेच सांगत होतो. पण आता हल्लीच्या LIC बद्दलच्या उलट सुलट बातम्या ऐकून तसे करण्याचे धाडस होत नाही एव्हढे मात्र खरे.”
“हो मी पण ऐकून आहे त्याबद्दल, बघूया काय काय होते ते. पण पंत एक सांगा, आजच्या ललाटी इथे चिंता ! या मथळ्याचा काय संबंध ते नाही लक्षात आलं.”
“अरे स्वतःला एव्हढा PJ एक्स्पर्ट म्हणवतोस ना मग सांग बर या मथळ्यात काय गुपित दडले आहे ते.”
“नाही पंत, हरलो, आता तुम्हीच ते सांगून माझी सुटका करा म्हणजे झालं.”
“अरे सध्या, ‘योग क्षेमं वहाम्यहंच’ काही क्षेम दिसत नाही म्हणून तसा मथळा दिलाय.”
“असं, असं !”
“आणि दुसरं म्हणजे Llati Ithe Chinta ! असे जर इंग्रजीमधे लिहिलेस तर त्यांच्या अद्याक्षरा पासून काय तयार होते, L I C !”
“कमाल झाली तुमची पंत ! आजपासून आपल्या चाळीचे नवे PJ एक्स्पर्ट म्हणून मी तुमचं नांव घोषित करतो !”
प्रवीण भारती नावाचे एक शिक्षक होते. ते प्राथमिक शाळेतील मुलांना शिकवत असत. त्यांची शाळा गावापासून सात किलोमीटर दूर होती. शाळेच्या आसपासची जागा ही पूर्णपणे निर्जन होती.
त्यांच्या गावातून शाळेपर्यंत जाण्यासाठी क्वचितच वाहन मिळत असे, त्यामुळे ते बरेचदा कुणाकडून तरी लिफ्ट मागत असत. कधी जर लिफ्ट मिळाली नाही, तर असा विचार करत पायीच जात असत की, “देवाने मला दोन पाय दिले आहेत, तर त्यांचा उपयोग कधी होणार.”
जेव्हा प्रवीणजी रोज लिफ्ट मागण्यासाठी उभे राहत तेव्हा विचार करत की, “सरकारने कुठल्या निर्जन ठिकाणी शाळा उघडली आहे, त्यापेक्षा गावातच मी किराणा मालाचं दुकान उघडलं असतं तर बरं झालं असतं.”
रोजच्या कटकटीतून सुटका मिळण्यासाठी प्रवीणजीनी थोडे थोडे पैसे जमा करून, चेतक कंपनीची एक नवीन कोरी करकरीत स्कूटर विकत घेतली. स्वतःचे वाहन नसल्यामुळे जो त्रास प्रवीणजींनी सहन केला होता, त्यामुळे त्यांनी मनाशी एक खूणगाठ बांधली की कोणालाही लिफ्टसाठी नाही म्हणायचं नाही.—
—-कारण, त्यांना हे माहीत होतं की कोणी आपल्याला लिफ्ट नाकारली की किती ओशाळल्यासारखं होतं ते. आता प्रवीणजी रोज स्वतःच्या कोऱ्या करकरीत स्कूटरवरून शाळेत जात असत आणि रस्त्यात कोणी ना कोणी रोज त्यांच्याकडे लिफ्ट मागत असे आणि त्यांच्याबरोबर जात असे. परत येताना सुद्धा कोणी ना कोणी त्यांच्याबरोबर असे.
एक दिवस, जेव्हा प्रवीणजी शाळेतून परत येत होते तेव्हा रस्त्यात, एक व्यक्ती हताश होऊन लिफ्ट मागण्यासाठी हात दाखवत होती. आपल्या सवयीनुसार प्रवीणजींनी आपली स्कूटर थांबवली आणि ती व्यक्ती काहीही न बोलता त्यांच्या स्कूटरवर मागे बसली. थोडं पुढे गेल्यावर त्या व्यक्तीने चाकू काढला आणि प्रवीणजींच्या पाठीवर टेकवून म्हणाला, “असतील तितके सगळे पैसे आणि ही स्कूटर माझ्या हवाली कर.”
ही धमकी ऐकून प्रवीणजी खूप घाबरले आणि त्यांनी लगेच स्कूटर थांबवली. त्यांच्याजवळ जास्त पैसे नव्हतेच. पण ही स्कूटर तर होतीच, जिच्यावर त्यांचे जिवापाड प्रेम होते. स्कूटरची किल्ली त्याला देत प्रवीणजी म्हणाले, “एक विनंती आहे.”
“काय ?” त्या व्यक्तीने खेकसून म्हटले.
प्रवीणजी विनंतीच्या सुरात त्याला म्हणाले, “तू कधीही कोणाला हे सांगू नकोस की ही स्कूटर तू कुठून आणि कशी चोरलीस. विश्वास ठेव मी पण पोलिसात तक्रार करणार नाही.”
त्या व्यक्तीने आश्चर्याने विचारले, “का?”
मनामध्ये असलेली भीती आणि चेहऱ्यावर असलेल्या औदासीन्याने प्रवीणजी म्हणाले, “ हा रस्ता खूप उबड-खाबड आणि निर्जन आहे. इथे क्वचितच वाहन मिळते. त्यात या रस्त्यावर जर अशा घटना घडल्या तर जे थोडेथोडके लोक लिफ्ट देतात, तेसुद्धा लिफ्ट देणे बंद करतील.”
प्रवीणजींची ही भावपूर्ण गोष्ट ऐकून ती व्यक्ती हळवी झाली. त्याला प्रवीणजी एक चांगली व्यक्ती वाटली, पण त्यालाही तर स्वत:चे पोट भरायचे होते. ” ठीक आहे ” असं म्हणून तो स्कूटर घेऊन तिथून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवीणजी जेव्हा वर्तमानपत्र घेण्यासाठी दरवाजाजवळ आले व त्यांनी दरवाजा उघडला, तर त्यांना त्यांची स्कूटर समोर उभी असलेली दिसली. प्रवीणजींचा आनंद गगनात मावेनासा झाला. ते पळत पळत स्कूटर जवळ गेले आणि आपल्या स्कूटरवर प्रेमाने हात फिरवू लागले, जणूकाही ते त्यांचे मूल होते. त्यांना तिथे एक कागद चिकटवलेला दिसला.
त्यावर लिहिले होते :
“मास्टर साहेब, असं समजू नका की तुमच्या बोलण्याने माझे हृदय द्रवले. काल मी तुमची स्कूटर चोरी करुन गावी गेलो. वाटलं भंगारवाल्याला ती विकून टाकावी. पण ज्याक्षणी भंगारवाल्याने ती स्कूटर पाहिली, मी काही बोलायच्या आधीच तो उद्गारला, ” अरे ही तर मास्तरसाहेबांची स्कूटर आहे.”
स्वतःला वाचविण्याच्या प्रयत्नात मी त्याला म्हणालो, ” हो ! मास्तर साहेबांनी मला बाजारात काही कामानिमित्त पाठवल आहे.” कदाचित त्याला माझा संशय आला होता.
तिथून सूटून मी एका बेकरीत गेलो. मला खूप भूक लागली होती व काहीतरी खाण्याचा मी विचार केला. बेकरीवाल्याची नजर स्कूटरवर पडताच तो म्हणाला, ” अरे ही तर मास्तर साहेबांची स्कूटर आहे.” हे ऐकून मी घाबरून गेलो आणि गडबडून म्हणालो, “होय, या गोष्टी मी त्यांच्यासाठीच घेतोय, कारण त्यांच्या घरी काही पाहुणे आले आहेत.” कसंतरी करून मी तिथूनही निसटलो.
मग मी विचार केला की गावाबाहेर जाऊन कुठेतरी तिला विकून येतो. मी थोड्याच दूरपर्यंत गेलो होतो, की नाक्यावरील पोलिसाने मला पकडलं आणि रागाने विचारलं की, ” कुठे चालला आहेस? आणि ही मास्तरसाहेबांची स्कूटर तुझ्याकडे कशी आली? ” मग काहीतरी बहाणा करून, मी तिथून ही पळालो. पळून पळून मी आता दमलो आहे ! मास्तर साहेब मला सांगा, ही तुमची स्कूटर आहे की अमिताभ बच्चन?? सगळेच तिला ओळखतात. तुमची अमानत मी तुमच्या स्वाधीन करत आहे. तिला विकण्याची ना माझ्यात हिंमत आहे, ना ताकद. तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल मला क्षमा करा आणि त्रास दिल्याच्या बदल्यात, मी तुमच्या स्कूटरची टाकी पूर्ण भरून दिली आहे. ”
हे पत्र वाचून प्रवीणजींना हसू आले आणि ते म्हणाले, ” कर भला तो हो भला.”
—-जर तुम्ही उदात्त अंतःकरणाचे असाल, तर तुमच्या आसपासच्या लोकांना नक्कीच आनंद जाणवेल. म्हणून जीवनात कधीही कोणालाही मदत करण्यास मागे पुढे पाहू नका —–
—संग्राहक – सुश्री मृदुला अभंग
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈