मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घन तमी शुक्र बघ राज्य करी ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ घन तमी शुक्र बघ राज्य करी ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

भा. रा. तांबे

भास्कर रामचंद्र तांबे

घन तमी शुक्र बघ राज्य करी

सध्या झी मराठी चॅनेलवर सारेगमप लिटिल चॅम्पस् ही गाण्याची स्पर्धा चालू आहे. मध्यंतरी एका चिमुरडीने,

‘तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा

            ताई आणखी कोणाला? चल रे दादा चहाटळा’

हे गाणं सादर केलं. त्या गाण्याने माझं बोट धरलं आणि मला थेट शाळेत घेऊन गेलं. ६वी-७वीचा वर्ग असेल. ऑफ तास असला की गाण्याच्या भेंड्या खेळायच्या  हे अगदी नक्की  ठरलेलं. मग, सुरुवातीलाच काही काही अक्षरांची गाणी आठवून ठेवायची. ‘त’अक्षर आलं की पहिल्यांदाच म्हंटलं जाई, ‘तुझ्या गळा माझ्या गळा …’ सुरुवात कोणी का करेना, दोन्ही गट गाणं म्हणायला लागत.  यात आपोआपच मुलांचा गट, दादाच्या ओळी म्हणे आणि मुलींचा गट ताईच्या ओळी. हे गाणं खरं तर हळुवारपणे ताईची गोड चेष्टा करणारं. पण ते एकमेकांकडे बघून हावभाव करत म्हणताना, कव्वालीच्या जुगलबंदीचं त्याला रूप येई. पुन्हा ‘त’ आलं की ‘तिनिसांजा सखे मिळाल्या हे ठरलेलं. ‘ड’ आलं की पहिलं गाणं असे, ‘डुमडुमत डमरू ये, खणखणत शूल ये. शंख फुंकीत ये… येई रुद्रा.. येई रुद्रा.’ सुरुवात कुणी तरी करे आणि मग सर्व वर्गच त्याला साथ देई. गाणं कोरसमध्ये ‘खणखणत येणार्यां शूलाप्रमाणे’ खणखणित आवाजात गायलं जाई. इतक्या खणखणित आवाजात की शेजारच्या वर्गातून कुणी तरी सांगत येई, ‘डमरू जरा हळू वाजू दे आमच्या वर्गात सरांनी बोलेलेलं आम्हाला ऐकू येत नाही. आमचे आवाज थोडे खालच्या पट्टीत यायचे.  ‘र’ येताच पुन्हा कोरस सुरू व्हायचा.,

‘रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी

ही पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली.  इथे झाशीच्या राणीचं स्मरणही खणखणत शूल ये, याच जातकुळीतलं करायचं. 

ही भा.रा. तांबे यांची गीतं अगदी दुसरीपासून पाठ्यपुस्तकात असलेली आणि आम्ही अभ्यासलेली आठवताहेत. इयत्ता दुसरीत, ‘पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढा नेई सोने वाटे वाहूणीया दूर ‘ अशी निखळ निसर्ग  वर्णनाची कविता होती, तर चौथीमधे ‘या बाळांनो यारे या. लवकर भरभर सारे या.’

६वी किंवा ७ वीत ‘रे हिंदबांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी ‘ ही कविता होती. पुढे बहुतेक ९ वीत ‘मधु मागासी माझ्या सख्या परी, मधुघटची रिकामे पडती घरी ‘ ही रूपकात्मक कविता. आता नवीन लिहिण्याची शक्ती नाही, असे सांगणारी’ (मधू पिळण्या परी रे बळ न करी’ आणि ११वीत होती ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ ही शाश्वत सत्य उलगडून दाखवणारी कविता॰ अशा कविता आभ्यासल्या होत्या. त्यांच्या कविता सहज पाठ होत. मुद्दाम त्यासाठी पुस्तक डोळ्यासमोर धरून पाठ करायची जरूर नसे. या सगळ्या कवितांची गीतं झाली होती आणि ती ऐकून ऐकून पाठ होतच होती.  

पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर ‘मराठी कवितेचा इतिहास’ अभ्यासताना भा. रा. तांबे अर्थात भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता अभ्यासली.  १९३५ साली राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि पुढे याच्या अनेक आवृत्या निघाल्या. ग्वाल्हेर संस्थानचे ते राजकवी होते. वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी घेतले होते. याशिवाय हिन्दी कविता, उर्दू नज्म , गझल याविषयी त्यांचा अभ्यास होता. या दोन्हीचे संस्कार घेऊन ताब्यांनी कविता लिहिल्या. त्यांची कविता साधी, सहज, सुलभ होती. कवितांचा अर्थ सहज समजे. त्यांच्या लेखनाने आनंददायी कवितेची वाट प्रशस्त झाली.त्यांच्या कवितांची गीतरूपे  आकाशवाणीवरून  प्रसारित झाली॰ अजूनही होत आहेत..  आकाशवाणीवर वाजताहेत. कार्यक्रमात गायली जाताहेत..  त्यांच्या शब्दांना स्वरसाजाचे  लखलखीत सुवर्ण कोंदण लाभले आणि त्या कोंदणात त्यांची कविता हिर्या्सारखी झळाळून उठली. त्यांना गीतकाव्याचे प्रवर्तक असं सार्थपणे म्हंटलं जातं. त्यांचं एक गीत आहे, ‘घनतमी शुक्र बघ राज्य करी..’ मनाची खिन्नता घालवण्यासाठी ते सांगताहेत, ‘ अंधार घनदाट असला, तरी वर शुक्रतार्या्कडे बघ! बघ. तो कसा अंधारातही तेजाळतो आहे ते! त्या शुक्राप्रमाणेच त्यांची गीते जनमानसावर गारुड करतात. त्यांना आनंद देतात. 

कॉलेजमध्ये असताना आम्हाला त्यांच्या

 ‘तिनिसांजा सखे मिळाल्या देई वचन तुला

आजपासूनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला’, ‘नववधू प्रिया मी बावरते’ झालंच तर ‘ डोळे हे जुलमी गडे’, कशी काळनागिणी सखे ग वैरीण झाली नदी’,  या सारख्या अनेक गीतांनी मोहवलं होतं.

आज मात्र त्यांच्या शाश्वत सत्य सांगणार्याै ‘मावळत्या दिनकरा’, मधू मागसी माझ्या, ‘जन पळभर म्हणतील हाय हाय ‘ सारख्या कविता अधीक जवळिकीच्या वाटू लागल्या आहेत.

आपल्या कवितांनी दैनंदिन जीवनातील दु:खे विसरायला लावणार्याट भा. रा. तांबे यांच्या स्मृतीला नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खेळ…! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐ खे ळ !  ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

” खेळ मांडीयेला वाळवंटी काठी….”

निरनिराळ्या ‘खेळांची’ परंपरा आपल्या भारतात अगदी पूर्वीच्या काळापासून चालत आली आहे ! अगदी तुकोबा सुद्धा आपल्या वरील अभंगात ‘खेळाचा’ उल्लेख करतात !  पण तुकोबांच्या या अभंगात त्यांना जो ‘खेळ’ अभिप्रेत आहे, तो माऊलीच्या भक्तीत रंगून चंद्रभागेच्या वाळवंटात नाचणाऱ्या भक्तांना उद्देशून आहे ! नंतर नंतर कालपरत्वे ‘खेळ’ या शब्दाची व्याख्या, संदर्भ आणि अर्थ बदलत गेले !

“चला मुलांनो, दिवेलागण झाली, आता पुरे करा तुमचे खेळ ! सगळ्यांनी घरात चला आणि हातपाय धुवून शुभंकरोती सुरु करा बघू !” हे असे उद्गार माझ्या पिढीतील अनेकांनी लहानपणी आपल्या आजी, आजोबांकडून अथवा आई वडिलांकडून अंगणात खेळतांना ऐकले असतील, याची मला शंभर टक्के खात्री आहे ! यातील ‘खेळ’ या शब्दाचा अर्थ निदान त्या काळी तरी आम्ही खेळत असलेल्या, लपाछपी, लगोऱ्या, लंगडी, हुतुतू इत्यादी अनेक खेळांसाठी असायचा ! हे ‘खेळ’ काय असतात, हे हल्लीच्या पिढीतील लहान मुलांना माहित असण्याचा संभव तर सोडाच, या खेळांची नांव तरी त्यांना माहित असतील का नाही, याचीच मला शंका आहे ! असो !

नंतर जसं जसे वय वाढत जातं, तस तसे आयुष्यातले अनेक टक्के टोणपे खाता खाता ‘खेळ’ या शब्दाच्या अनेक व्यापक अर्थांची, नव्याने जाणीव व्हायला लागते. काही बऱ्या वाईट ‘खेळांचे’ अनुभव आपल्याला दुसऱ्या लोकांकडून यायला लागतात ! त्यातून जो शिकतो तोच जगात तरतो, हे झालं माझं मत !

जगात अनेक प्रकारचे ‘खेळ’ खेळले जातात ! या दुनियेत निरनिराळे ‘खेळ’ करणारे आणि तो आवडीने बघणारे लोकं, यांची अजिबातच वानवा नाही ! लहानपणी शाळेत जातांना रस्त्यावर, भागाबाई व राजा, हा माकड आणि माकडीणीचा ‘खेळ’ किंवा दोन टोकाच्या दोन दोन बांबूना मधे उंच ताणून बसवलेल्या तारेवर कसरत करून ‘खेळ’ दाखवत आपापली पोट भरणारा डोंबारी, यांचे ‘खेळ’ आम्ही रस्त्यात उभे राहून आवर्जून पहात होतो आणि मगच पुढे शाळेत जात होतो. काही काही भाग्यवान कसरत पटूना त्यांचे ‘खेळ’ दाखवायची संधी सर्कसच्या तंबुत मिळायची, हे ही तितकेच खरं !

तरुणपणी कॉलेजला जातांना, आपल्या रोजच्या यायच्या जायच्या मार्गांवर, एखादी सुंदर तरुणी रोज दिसायला लागली की, आपण पण साधारण तीच ठराविक वेळ रोज गाठायचा प्रयत्न सुरु करतो ! प्रथम तिच्याशी नजरा नजर, नंतर थोडं हसणं, यामुळे हृदयात फुलपाखरं नाचायला लागतात ! आपणहून तिच्याशी बोलायचं धाडस होतं नाही, पण रात्रीची झोप खराब व्हायला एवढं कारण पुरतं ! कधी एकदा तिचं दर्शन होतय, हा एकच विचार सकाळी उठल्यापासून मनाला छळत असतो ! मग यातून सुरु होतो एकतर्फी प्रेमाचा ‘खेळ’ ! मन लगेच भावी आयुष्याची स्वप्न पाहण्याचा ‘खेळ’ खेळण्यात दंग होऊन जातं ! हा एकतर्फी प्रेमाचा ‘खेळ’ असाच काही दिवस चालू रहातो आणि एक दिवस रोजच्या सारखी समोरून येतांना ती दिसते ! पण, आज तिच्या हातात हात घालून, एक उमदा तरुण चालत असतो ! ती दोघं हसत खिदळत आपल्याच मस्तीत आपल्या अंगावरून जातात. तिच आपल्याकडे बघून रोजच हसणं तर सोडाच, पण ती आपल्याकडे ढुंकूनही न बघता, त्याच्या बरोबर निघून जाते ! तरुणपणी अनुभवास आलेल्या पहिल्या वहिल्या एकतर्फी प्रेमाच्या ‘खेळाचा’ दि एंड होतो !

ऑफिस मध्ये सुद्धा बॉस आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवून, आपल्या कडून जास्त काम काढून घेण्याचा ‘खेळ’ खेळत असतो ! पण शेवटी तो बॉस असल्यामुळे, आपल्याला नाईलाजास्तव त्याच्या ‘खेळात’ हसत मुखाने सामील होऊन त्या ‘खेळात’ कायमच हरण्याचे नाटक करण्यावाचून गत्यन्तर नसते !

काही व्यापारी व्यापार करतांना, गिऱ्हाईकाच्या हावरेपणाचा फायदा घेऊन, आपला खराब माल वेगवेगळ्या स्कीम खाली  (sale) त्याच्या गळ्यात मारण्याचा “खेळ” आत्ता पर्यंत निरंतर खेळत आले आहेत आणि या पुढील काळात पण ते असा “खेळ” खेळत राहतील, यात काडीमात्र शंका नाही !

माझं दुसरं असं एक निरीक्षण आहे की, हल्लीच्या काही तरुण मुलांना, बोलतांना शब्दांचे ‘खेळ’ करायला भारीच आवडतं ! माझ्या मित्राचा एक मुलगा आहे कॉलेजला जाणारा, त्याला एकदा मी विचारलं, “काय रे गौरव, बाबा आहेत का घरी ?” तर हा पट्ठ्या मला म्हणतो कसा “आई बाहेर गेली आहे !” त्यावर मी काही बोलणार, त्याच्या आत स्वारी माझ्या समोरून गायब सुद्धा झाली ! आता बोला !

लेखाचा विषय कुठलाही असला, तरी त्या विषयात नेते मंडळींचा उल्लेख नसेल, तर तो लेख पूर्ण झाल्यासारखे, निदान मला तरी वाटतं नाही ! तर ही नेते मंडळी सुद्धा आपापल्या अनुनयांच्या भावनांना हात घालून त्यांच्याशी ‘खेळ’ मांडतात आणि  राजकारणातली आपली उदिष्ट साध्य करण्यात कुठलीच कसर बाकी ठेवत नाहीत ! आणि इतकंच नाही तर त्यांची ती उदिष्ट एकदा का साध्य झाली, की नंतर त्याच अनुनयांना वाऱ्यावर सोडण्याचा ‘खेळ’ तितक्याच कोरडेपणाने खेळतात !

शेवटी, आपल्याकडून वेगवेगळे ‘खेळ’ करवून घेणारा किंवा आपल्याशी ‘खेळ’ करायला दुसऱ्या कोणाला तरी उद्युक्त करणारा सर्वांचा “खेळीया” हा वर बसला आहे, यावर माझा गाढ विश्वास आहे ! आपण सगळे फक्त त्याच्या ईशाऱ्यावर, तो सांगेल तेंव्हा, तो सांगेल तो ‘खेळ’ खेळणारे खेळाडू आहोत एवढं ध्यानात धरलं, की आपल्या वाट्याला येणाऱ्या कुठल्याही खेळातल्या जय, पराजयाचा त्रास आपल्या मनाला होणार नाही याची खात्री बाळगा !

शुभं भवतु !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

२४-११-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वैद्यो नारायणो ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ वैद्यो नारायणो ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

कुठेही असलो तरी आम्ही डॉक्टर, आमच्यातल्या  डॉक्टरला  मुळीच विसरत नाही. त्याच संदर्भातली माझी  एक आठवण—-

चार  वर्षांपूर्वी मुलीकडे अमेरिकेला गेले होते. तिकडून इकडे परत येताना स्वाभाविकच मन अगदी कासावीस आणि व्याकुळ होते. विमानतळावर पोचवायला लेक जावई आणि सगळ्यात लाडकी नात आली होती. “ आजी नको ना जाऊ.  मी पण येणार  इंडियाला “–असे म्हणत  माझा जीव आणखीच व्याकूळ करणारी माझी नात. 

जड अंतः करणाने त्यांचा निरोप घेऊन विमानात बसले,  पण मन मात्र अजून तिच्या घरातच होते. 

तीन महिने अनुभवलेली ती आद्याची गोड बडबड—आई डॅडी रागावतील म्हणून त्यांना न सांगता केलेले लाडिक हट्ट—सगळं सगळं बरोबर घेऊनच पाऊल विमानात ठेवले होते। विमान म्युनिकला पोचले आणि आता ४ तास तिथेच थांबायचे होते. मुंबईला जाणारे इतर बरेच लोक भेटले, आणि ४  तास कसे गेले समजलेच नाही.

मुंबईच्या विमानात बसलो आणि विमानाने आकाशात झेप घेतली. नेहमीच्या सवयीने मी पुस्तक काढून वाचायला लागले. जरा वेळाने माझ्या पुढच्या सीट वरून मला कोणीतरी रडत असल्यासारखा भास झाला. जरा वेळाने चक्क हुंदके ऐकायला आले. न राहवून मी डोकावून बघितले, तर तिथे बसलेल्या जवळपास ८०-८२ वर्षाच्या एक आजी रडत होत्या. मराठी दिसत होत्या.

मी विचारले, “ काय झाले आजी ? काही होतंय का तुम्हाला? “ 

तर म्हणाल्या, “ माझं भयंकर डोकं दुखतंय. काही सुचत नाहीये. “ 

मी हवाई सुंदरीला बोलावले. ती जवळ बसली.  विचारू लागली. पण आता आजी आणखीच रडायला लागल्या. ती बिचारी घाबरली आणि तिने सिनियरला बोलावले.

” मला आता हे सहन होत नाहीये. माझ्या छातीत पण दुखतंय.” आजी कळवळत म्हणाल्या

आता तर त्या एअर होस्टेस ही घाबरल्या. हे सगळे मी बघत होते

मी विचारलं, “ मी बघू का ? मी डॉक्टर आहे, आणि मदत करू शकते.” 

त्वरित आजीच्या शेजारचा प्रवासी उठला, आणि म्हणाला “ डॉक्टर प्लीज पुढे या.” 

मी त्याच्या सीटवर गेले. एअरहोस्टेस खूपच टेन्स झाल्या होत्या. मी आजीच्या जवळ बसले. 

म्हणाले, “  आजी घाबरू नका. मी आहे ना आता तुमच्याजवळ ? “

मी एअरहोस्टेसना म्हटलं, “ माझ्या कडे उत्तम पेन किलर गोळ्या आहेत, मी याना देऊ का– त्यांना लगेच बरे वाटेल.” 

“ द्या ना प्लीज।” त्या लगेच म्हणाल्या.

“ आजी तुम्हाला कसली allergy आहे का ?”

“ नाही “ 

“ सकाळपासून काय खाल्लंय तुम्ही ?”

“ काही नाही हो. मन नुसतं बेचैन झालंय। मला काही सुचले नाही खायलाही.” 

मी एअरहोस्टेसना  ज्यूस आणायला सांगितला. 

आजींना म्हटले, “ आजी ही गोळी घेऊन टाका.  मस्त बरे वाटेल बघा. अहो मलाही खूप वाईट वाटतंय– मुलीला आणि  नातीला सोडून येताना. पण काय करणार ? “ 

 आजी म्हणाल्या, “ ४ महिने होते हो  मुलाजवळ. आता या वयात असे मानसिक आघात

सहन नाही होत. मी पुन्हा नाही येणार आता कधी परदेशात.” 

मी गोड बोलून आजीना गोळी घ्यायला लावली. थोडा ज्यूस पाजला. आजींना झोप लागली. 

हे बघून मगच एअरहोस्टेस मला विचारून तिथून आपल्या  कामाला गेल्या.

आजी थोड्या वेळाने जाग्या झाल्या. माझा हात त्यांच्या हातातच होता.

मला म्हणाल्या, “ खूप कमी झाले हो माझे डोके.  अगदी बरे वाटतेय मला.” 

म्हटले, “ आजी तुम्हाला मानसिक त्रास झाला, बाकी काही नाही. मी विशेष काहीच नाही केले. “ 

मला म्हणाल्या, “ बाई ग देवासारखी आलीस हो मदतीला. काय सुंदर दिलेस बाई औषध. अग मी एकटीच असते मुंबईला. मुलगा नातू सून अमेरिकेत. माझे मिस्टर  मागच्या वर्षी  गेले, आता मी एकटीच रहाते फ्लॅटमध्ये. एकटीने प्रवास करायची ही माझी पहिलीच वेळ. म्हणून हे सगळे दडपण आले.” 

आजीचे डोळे पुन्हा भरून आले—-“ मुलगा म्हणतो आई एकटी नको राहू. इकडे कायमची ये. 

 मी ग्रीन कार्ड करतो. पण मला नाही आवडत तिकडे. तुझे आभार ग बाई. हे विमानातले खाणेही

मुळीच आवडत नाही मला.” आजी म्हणाल्या. 

मी माझ्या जवळचा शिरा आणि लाडू आजीना दिला. म्हटले “ बघा ,लेकीची माया. आईची काळजी किती. सकाळी शिरा आणि पुऱ्या करून दिल्या.” 

आजींनी आनंदाने सगळे खाल्ले. आता डोके छाती सगळे थांबले म्हणाल्या. पुन्हा त्यांना मस्त झोप लागली. एअरहोस्टेसनी माझे आभार मानले, आणि सुटकेचा निश्वास टाकला.

मुंबई आली– सगळे  सोपस्कार उरकून बाहेर आले तर आजी वाट बघत होत्या. त्यांची बहीण त्यांना न्यायला आली होती. माझी ओळख करून देत म्हणाल्या,“ ही मुलगी नसती तर माझे कठीण होते बाई. .मला कोणती गोळी दिलीस ती लिहून दे हो. “ 

मी हसले आणि म्हणाले, “ आजी, ती साधी पेन किलर होती. तुम्हाला फक्त धीर, प्रेम आणि आश्वासनाची गरज होती तेवढेच काम मी केले, बस.” मी आजींना नमस्कार केला.

त्या म्हणाल्या. “  देव कल्याण करो ग बाई तुझे. डॉक्टरला धन्वंतरी म्हणतात ते उगीच नाही. “ 

 त्यांनी मला हात जोडले–” अशीच पुण्यकर्म करत रहा ग बाई. अग देव काही  वेगळा असतो 

का ? तुझ्या रूपात भेटलाच की मला.” 

“ आजी एवढे नका मला मोठेपण देऊ हो. माझे कर्तव्य केले मी.” 

आजींनी मला जवळ घेतले, माझ्या डोक्यावरून हात फिरवला, आणि डोळे पुसत बहिणीबरोबर चालू लागल्या—

त्या थकलेल्या दोघी वृद्ध बहिणी बघून माझेही डोळे भरून आले ——

 

©  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अशा सांजवेळी… ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार

सौ. कल्पना मंगेश कुंभार

?विविधा ?

☆ अशा सांजवेळी… ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार ☆

सांजवेळ…! ही वेळचं किती विचित्र आहे ना..??या वेळेच्याही दोन छटा आहेत..

एक आहे सुखाची,प्रसन्नतेची, हास्याची,शांततेची,आनंदाची, सकारात्मक…

आणि दुसरी आहे..दुःखाची, आठवणींची,मनात काहूर माजवणारी,कोणाच्या तरी प्रतिक्षेची,नकारात्मक….

सांजवेळ…!सांजवेळ येते ती शांतपणे…प्रसन्नतेचे वातावरण पसरत…देवापुढे सांजवात लावून..आपली संस्कृती जपत… शुभम् करोति.. चा संस्कार लहान बालकांमध्ये रुजवत..एखादया नव्या नवेली नवरीप्रमाणे लाजून चूर होऊन…म्हणूनच की काय..ती सूर्याची लाली पाहून वारा अधिकच गंधाळतो आणि सारा आसमंत शहारतो…

सांजवेळ…! प्रत्येकाला ओढ लागलेली असते घरी परतण्याची… सगळे ऑफिस, सगळ्या शाळा सुटलेल्या असतात आणिआई ,बाबा …मुले सगळेच घराच्या ओढीने घरी लवकर परतण्यासाठी धडपडत असतात.आकाशातील पक्षांचे थवेच्या थवे जणू अस्ताला जाणाऱ्या सूर्याला ” उद्या पुन्हा भेटू ” असे सांगून आपल्या पिल्लांच्या ओढीने घरी परतत असतात.ते दृश्यचं इतकं नयनरम्य असतं ना; की वाटतं आपणही पक्षी व्हावं आणि त्या पक्षांच्या थव्याबरोबर सूर्याची कोमल, सोनेरी किरणे पंखावर झेलत त्याला निरोप देऊन घरी उडत उडत परतावं….अशी ही किलबिलाटाने भारलेली मनमोहक सांजवेळ! पण….पण किती भुर्रकन उडून जाते ना…

अशा या सांजवेळेची दुसरी छटा… हवीहवीशी  वाटणारी पण तितकीच नकोशीही…अगदी जीवघेणी..

सांजवेळ ..! हीच वेळ…हीच वेळ मनात उठवत असते काहूर..हीच वेळ..हीच वेळ जागे करू पहाते माणसाचे अंतर्मन…..अंतर्मनात दडलेल्या त्या….अनेक ‘आठवणी’…. मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपलेले अनेक ‘क्षण ‘…काही गोड, हवेहवेसे.. तर काही कटू…काहूर माजवणारे…

या आठवणीमधील ‘ तो ‘

एक चेहरा…. जो आठवता मन जाते भारावून… आणि मग..तुला मनाला आवर घालणे कठीण होऊन बसते.अशा वेळी ही सांजवेळ जणू छळू लागते मनाला… दाटून येतो आठवांचा पाऊस आणि भिजवून चिंब चिंब करतो प्रत्येक क्षणाला.. हरवून जाते मन भूतकाळात….

भूतकाळातील ‘ तो ‘ किंवा ‘ ती ‘ …त्याच्याबरोबरच्या अनेक आठवणी….रुसवे फुगवे, एकत्र घालवलेले अनेक क्षण,मित्रमैत्रिणीचे चिडवणे…झालेली भांडणं…. धरलेला अबोला….रुसवा काढण्यासाठी केलेले प्रयत्न… तो लटका नाकावरचा राग…सगळं…अगदी सगळं आठवू लागतं आणि आपण स्वतः लाच विसरून जातो.कधी ओठावर गोड हसू उमटतं… तर कधीं नकळत पापण्या ओलावतात.अशी ही सांजवेळ……

सांजवेळ…! नव्या नवेली नवरीला क्षणात माहेरच्या अंगणात घेऊन जाते…तिची माहेराप्रतिची ओढ.. अशा एकाकी सांजवेळी उफाळून येते… मग तीही रमून जाते माहेरच्या कुशीत…आठवत रहाते तिचं बालपण… भावाबहिणीची लुटुपुटूची भांडणं… आईबाबांचे प्रेम….अगदी सगळं नजरेसमोरून जाऊ लागतं अगदी चित्रपटाप्रमाणे…मग दाटून आलेल्या या सांजवेळी तीही होते थोडी सैरभैर… पण इतक्यात लागते सख्याची चाहूल आणि त्याच्या ओढीने ती क्षणात सासरी परतते आणि रमून जाते तिच्या घरांत.. अशी ही सांजवेळ.. .जितके उलगडावे तिला तितके आपणच गुरफटून जाऊ तिच्यामध्ये…

सांजवेळ…! प्रत्येकाला पहायला लावते कोणाची तरी वाट..प्रत्येकजण असतो कोणाच्या तरी प्रतीक्षेत..पण….हवीहवीशी वाटणारी ती व्यक्ती जेव्हा येत नाही; तेंव्हा हीच सांजवेळ बनते भयाण.. भेसूर…

अशा या सांजवेळी मला कवी ग्रेस यांची एक कविता आठवते…

 

” भय इथले संपत नाही

   मज तुझी आठवण होते..

    मी संध्याकाळी गातो

    तू मला शिकवले गे ते..”

किती आर्तता आहे ना या गाण्यात… जेवढे हृदयातून ऐकू तेवढेच त्या गाण्यात हरवून जातो आपण…

पण…ही दुसरी छटा आहे। म्हणूनच पहिल्या छटेलाही अर्थ आहे,नाही का??

 

“येते लाजून चूर होऊन

सूर्याची लाली गाली लेऊन पक्षांच्या पंखांवर स्वार होऊन

हवेत गारवा पसरवून

सगळीकडे दिव्यांची रोषणाई करून

अशी ही सांजवेळ….

  पण…

जाते मात्र…

मनात काहूर माजवून

कोणाची तरी आठवण..

मनात ठेवून

डोळ्यांच्या पापण्या

ओल्या करून…

शांत सागरी

लाटा उठवून…

        अशी ही सांजवेळ……

 

© सौ. कल्पना मंगेश कुंभार

शाळा : हुतात्मा बाबू गेनू विद्यामंदिर क्र 28, इचलकरंजी

मोबाईल : 9822038378

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणी दाटतात— ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  मनमंजुषेतून ?

☆ आठवणी दाटतात ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

ऐकताच त्या काव्य ओळी—

आठवणी दाटतात—

माझे लग्न ठरले. त्यावेळी वडीलांनी आम्हाला सर्वांना ‘ या सुखांनो या’ हा सिनेमा दाखवला होता. आता केव्हाही  ‘या सुखानो या’ हे गाणे ऐकले की त्या मधुर आठवणी जाग्या होतात. एका निमित्ताने सीमाताई देवांशी बोलताना आम्ही या सिनेमाबद्दल, आठवणीबद्दल बोललोही आहोत.

माझ्या लग्नातली ही आठवण– लग्न अगदी थाटात लागले. ‘मिष्ठान्नम् इतरे जन:|’ या उक्तीप्रमाणे पंगतीवर पंगती उठत होत्या. लग्न मिरजेतील एका नामांकित कार्यालयात होते. त्याकाळी आजच्यासारखी सगळीकडे कार्यालयांची सोय नव्हती. त्यामुळे मिरजेतील कार्यालयांचा खूप नावलौकिक होता. माझे माहेर एक छोटेसे तालुक्याचे गाव होते. तिथल्या बऱ्याच जणांनी अशा कार्यालयातील लग्न पाहिलेलेच नव्हते‌. त्यामुळे बऱ्याच जणांना रंगीत पाटांची मांडणी, रांगोळ्या, उदबत्या, आग्रहाने वाढलेली पंगत या गोष्टींची खूपच अपूर्वाई वाटली.

ह्या पंगती सुरू असतानाच सर्व लग्न विधी पार पडले. आता दोन्हीकडची मानाची माणसे जेवायला बसणार होती. त्यामुळे या खाशा पंगतीसाठी गरम गरम भजी, पुऱ्या,  मसालेभात वगैरे खास व्यवस्था केली होती. रांगोळ्या, समया, उदबत्या, चांदीचे ताट- वाटी, असा थाट होता. आम्ही दोघे मध्ये आणि आजूबाजूला सर्व नातेवाईक असे जेवायला बसलो. उखाणे घेत आम्ही एकमेकांना घास दिले. हसत खेळत पंगत सुरू झाली

ह्यांच्या मामींनी  ‘ लक्ष्मी तू या नव्या घराची झालीस गं लाडके ‘ हे गाणे खूप छान म्हटले. ऐकून जरा धीर आला‌. तोपर्यंत एक जणीने ‘ गंगा यमुना डोळ्यात उभ्या का ‘ हे गाणे सुरू केले आणि सगळे वातावरणच बदलून गेले.

माझे वडील आधीच खूप संवेदनशील होते. त्यातच आजी गेल्यापासून जास्तच हळवे झालेले होते. या गाण्यामुळे त्यांचे डोळे भरून आले. मी १- २ वर्षांची लहान असताना आई-वडील मला लाडाने बाळे म्हणत असत. ‘कडकडूनी तू मिठी मारता बाळे’  ही ओळ ऐकली आणि माझ्या वडिलांच्या डोळ्यातून धारा सुरू झाल्या. त्यांचे पाहून बहुतेकांचे डोळे पाणावले. एक दोघींनी तर हुंदके दिले. पाहता पाहता पंगतीचा सगळा नूरच पालटला. रंगाचा पुरता बेरंग झाला होता. पक्वान्नांची तर चवच गेली होती.

माझी अवस्था फारच केविलवाणी झाली होती. शेजारी नवरदेव आणि सासरची मंडळी. सर्वांच्या नजरा आमच्यावर खिळलेल्या. त्यामुळे तोंडावर उसने हसू आणत कसेबसे जेवण पार पाडले. दुपारचा हा प्रसंग अनुभवल्याने संध्याकाळी सासरी जायला निघताना रडू आवरण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. त्याचे माझ्या मनावर इतके दडपण आले की नंतर दोन-तीन दिवस चक्क दुखणे आले.

काही काही माणसांना काळ-वेळाचे भानच नसते. आपल्या कृतीने इतरांच्या आनंदावर विरजण पडते, याचे त्यांना काहीही देणे घेणे नसते. आमच्या लग्नाची ही पंगत माझ्या मनात कायमची घर करून बसली आहे. लग्नातल्या इतर सर्व आनंददायी गोष्टींवर तिने जरा जास्तच मात केलेली आहे. प्रत्येक गाण्याला गीतकार, संगीतकार, गायक यांच्या दृष्टीने एक विशिष्ट असा इतिहास असतो. या गाण्यामुळे हा असा इतिहास माझ्या मनात कायमचा कोरला गेला आहे. लग्नाला यंदा ४५ वर्षे होतील. पण आजही जेव्हा केव्हा हे गाणे मी ऐकते तेव्हा नकळत डोळ्यांपुढे धुके दाटतेच.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ग्राइप वाॅटर. ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

?विविधा ?

☆  ग्राइप वाॅटर ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

काय झाले बाळ रडत होते वूडवर्डस ग्राईप वॉटर दे त्याला

काय झाले बाळ रडत होते वूडवर्डस ग्राईप वॉटर दे त्याला हि जाहिरात आपण वर्षोनवर्षे पहात व ऐकत आलो आहोत. पण हे ग्राईप वॉटर म्हणजे नक्की काय ?

विलिअम वूडवर्डस या औषध निर्मात्याने इंग्लंडमध्ये १८५१ साली ग्राइप वॉटरचा शोध लावला. १८४० साली पूर्व इंग्लंडमध्ये लहान मुलांमध्ये फेन फिव्हरची लागण होत होती. त्याच वेळी तेथे हिवतापाचीही साथ होती. या दोन्ही रोगांवरील उपचारांतून प्रेरणा घेऊन वुडवर्डने ग्राइप वॉटरची निर्मिती केली. फेन फिव्हरसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाने बालकांमधील पचनसंस्थेच्या तक्रारी दूर होतात असे त्याचे निरीक्षण होते.

वुडवर्डच्या मूळ ग्राइप वॉटरमध्ये ३.६ टक्के अल्कोहोल, बाळंतशेपू  तेल, सोडिअम बायकार्बोनेट, साखर तसेच पाणी हे घटक होते. १८७६ मध्ये वुडवर्डने ग्राइप वॉटर या ट्रेडमार्कची नोंदणी केली.

कधीकधी ग्राइप वॉटरमध्ये बडीशोप व आल्या चाही समावेश असतो.

शेपा जे ग्राइप वॉटर चे मूळ घटक आहे ह्याचे शास्त्रीय नाव Anethum graveolens असे आहे. अंबेलिफेरी कुटुंबातली ही पालेभाजी इंग्रजीत Dill या नावाने ओळखली जाते. यास बाळंतशोपा असेही नाव आहे. Anethum हे नाव ग्रीक ऍनिसोन  या शब्दापासून बनवले आहे ज्याचा अर्थ तीव्र वास असा होतो. Dill या शब्दाचे उगम सॅक्सन शब्द Dillan हया शब्दापासून  झाले आहे. Dillan means dull the restless child to sleep,  म्हणजेच अस्वस्थ मुलाची अस्वस्थता कमी करणे.या ३० ते ९० सेंमी. उंचीच्या ओषधीय बहुवर्षायू पालेभाजीचे मूलस्थान भूमध्य सामुद्रिक प्रदेश असून भारतात तिचा प्रसार सर्वत्र आहे. खानदेश व गुजरातमधील काही भागांत शेपूची मोठया प्रमाणात लागवड करतात. दक्षिण यूरोप व पश्चिम आशियात ती लागवडीत आहे.

हिरव्या लहान पानाची ही भाजी शरिरासाठी उपयोगी आहे. ही  द्विदलीय फूले असणारी वनस्पती आहे. शेपू ची फुले लहान पिवळी व संयुक्त चामरकल्प फुलोऱ्यात साधारण जुलै-ऑगस्टमध्ये येतात

यूरेशियामध्ये शेपू मोठ्या प्रमाणात घेतले जाते जेथे त्याची पाने आणि बियाणे अन्नासाठी चव येण्यासाठी औषधी वनस्पती किंवा मसाला म्हणून वापरली जातात. ह्याची फळे व बिया सपाट आसतात. पालेभाजी तिखट, कडवट असते.शेपू फळामध्ये बाष्पनशील किंवा उडनशील तेल  असते. ह्या तेलात दिल अपियोल , अनिथॉल, युजिनॉल व कॅरवोन हे घटक असतात. अल्फा फिलाँड्रीन लिमोनिन डिल इथेर ह्या तेलातील घटकामुळे शेपूला एक विशिष्ठ सुवास येतो. हयात व्हिटॅमिन  अ व व्हिटॅमिन क व फ्लावनॉइड मोठया प्रमाणात आठळतात. पोटदुखी, दात येतानाची वेदना, पोट बिघडणे, तसेच पचनसंस्थेच्या इतर तक्रारींसाठी लहान बालकांमध्ये ग्राइप वॉटर दिले जाते.शेपू कफवातनाशक, शुक्रदोषनाशक , कृमिनाशक समजतात.हा बाळंतशेपा म्हणून ओळखला जातो. गर्भवती महिलांना शेपा पचना साठी व निद्रानाश ह्यासाठी उपयुक्त आहे. नैराश्य दुर करण्यासाठी डिल चा वापर करता. अरोमाथेरपी मध्ये डिल तेल चा वापर होतो. डायबिटीस असलेलया लोकांमध्ये  साखरेचे नियंत्रण ठेणवण्यासाठी हि शेप्याचा उपयोग होतो. डिल तेल कीटक प्रतिबंधक म्हणून वापरले जाते. शेतकरी बऱ्याचदा बुरशीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी इतर धान्याबरोबर शेप्याची लागवड करतात. स्वयंपाकघरात शेपा आणि जिरे ह्यांचा एकत्रित उपयोग मसाला म्हणून करतात. स्वयंपाकात ह्याचा उपयोग  केल्यास पदार्थ चविष्ट बनतो.असा हा बहुगुणी स्वास्स्थवर्धक शेपा आपल्या स्वयंपाक घरातील आवश्यक घटक आहे.

 

© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे

संपर्क :  सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.

फोन   : ७५०६२४३०५०

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुगरण — ” बिघडलं ? घडलं.” ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? मनमंजुषेतून ?

☆ सुगरण — ” बिघडलं ? घडलं.” ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

आमचा दूधवाला  त्याच्याकडची म्हैस व्याली की आम्हाला चीक आणून देतो. ‘पहिल्या दिवसाचा पाहिजे हं.’ त्याला सांगितलेलं आहे. एक दिवस त्याने असाच चीक आणून दिला. चिकाएव्हढं दूध, गूळ, वेलदोड्याची पूड असं  सगळं घालून मी लगेच नेहेमीसारखा खरवस शिजायला ठेवला. पण काय झालं कोण जाणे, वीस मिनिटांनी बघितलं तर चोथा पाणी– बापरे ! आता हा खरवस कोण  खाणार ? सगळ्यांना  वेलदोड्याची तीट लावलेल्या शुभ्र वड्या आवडतात. ‘ मग आता काय करायचं याचं ?’ असा विचार करताकरता  एक युक्ती सुचली. खरवस रवीने चांगला घुसळला. डब्यात भाजलेला रवा होता. अंदाजाने दोन वाट्या, तो भाजलेला रवा त्या घुसळलेल्या खरवसात घातला. नि कुकरमध्ये ठेवला. शिटी न लावता.—-पंधरा मिनिटांनी कुकरचं झाकण उघडलं. आणि –आहा—” मिशन सक्सेसफुल “ — सोनेरी रंगाचा सुंदर सांजा तयार. पूर्वी आपण गुळाचा सांजा करायचो ना तसा. सगळ्यांना बशीतून खायला दिला. उरला तर सांज्याच्या पोळ्या करू असं ठरवलं होतं, पण उरलाच नाही. सर्वांनी आणखी आणखी मागून घेतला. मुलांनी  विचारलं ,     

“आई पुन्हा असा सांजा कधी करणार? ” मी म्हटलं– “खरवस बिघडल्यावर.”

लेखिका : श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070, 9561582372.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दिवाळीच्या फराळाची मैफल – भूपाल पणशीकर ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ दिवाळीच्या फराळाची मैफल – भूपाल पणशीकर ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित 

“रुके क्यू बेटा; गाओ सदाशिव गाओ, और गाओ” असे म्हणणारे खाँसाहेब असतील तर सदाशिव आणखीन झकास गातो… दिवाळीच्या फराळाचं असंच आहे. “रुके क्यू बेटा; खाओ और खाओ” असा आग्रह करणारे कोणी ‘खा’ साहेब असतील तर आणखीन एक बेसन लाडू तोंडात सरकवायला जास्त मजा येते !

फराळाचे पदार्थ करणे हे याग किंवा यज्ञकर्म असेल, तर तो असा साग्रसंगीत खावा की जणू संगीताची मैफलच आहे.

तुमचे बर्गर वगैरे टेबलावर बसून खावे, पण फराळासाठी झकास बिछायत असावी. लोड तक्के असावेत. अत्तराचा कानात बोळा आणि डाव्या पालथ्या हातावर ते फासलेलं असावं.

शक्यतो सुरवार-कुर्ता आणि स्त्री वर्ग साडीत असेल तर पदार्थांची चव दुपटीने वाढते.

पहिल्या षड्जासाठी कान आतुरलेले असतात, तसा पहिल्या घासासाठी घसा आतुर असावा. मैफलीच्या आधी जसे तंबोरे, तबला सुरात लावताना बाहेर गोड आवाज येतो, तसा आत डबे उघडल्याचा, चहाच्या कपाचा किणकिणाट बाहेर यायला हवा. मांडीवर शाल ओढून जसे गवई दोन तंबोऱ्यात बसतात, तसे रेशमी रुमालाने झाकलेले फराळाचे ताट दिमाखात खाद्यमंचावर यायला हवे; आणि जशी पहिल्या ‘सा’ ला ओठातून ‘क्या बात है!’ अशी दाद येते, तशीच लाडवाच्या पहिल्या तुकड्याला किंवा चकलीच्या पहिल्या तुकड्याला पोटातून ओठात आणि ओठातून जिभेवर दाद यायला हवी !

काही राग काफी थाटाचे असतात, तसे इथे देखील ‘ कॉफी ‘ थाट असेल तर मजा कुछ औरच ! अर्थात पदार्थाची बैठकही जमलेली असावी.

काही स्वर आरोहात वर्ज्य असतात, तसे पदार्थाचे बाह्य रूप असावे. म्हणजे चकली थोडी अबोली रंगाकडेच झुकलेली हवी. ती चवीला कितीही चांगली असली तरी काळपट दिसली की उगीच सम चुकते.

बेसन लाडू बाळसेदार आणि पठाणी जपानी अशा मिक्स- ब्रीड रंगाचाच हवा. अवरोह म्हणजे चव आणि जिभेवरील त्याचे विरघळणे.

भीमपलासी रागात अवरोहात धैवताला पंचम आणि रिषभला षड्जाचा कण जरा चिकटला की जशी खुमारी वाढते, तसेच चिवड्यात दाणे, काजू याचं अस्तित्व हवं. नाहीतर मूळ रागच बेसूर होऊन जातो. 

यमनात गंधार आणि निषाद हे वादी-संवादी आहेत, तसे लाडवात बेसन, रवा ही मंडळी वादी आणि साखर संवादी आहे. त्यामुळे यांचे प्रमाण अचूक हवे. गवयाच्या गळ्यासारखा रवा, बेसन व्यवस्थित तापलेला म्हणजे भाजलेला हवा. 

चकली ही अनेक रागांचे मिश्रण असलेली पण शृंगारप्रधान ठुमरी आहे. तिला एक ठसका आहे, लय आहे. चकली त्याच ठसक्यात असायला हवी. उगीच बेचव करून ठुमरीचं भावगीत करू नये.

शंकरपाळे वगैरे मंडळी हे मूळ गायक नव्हेत. मुख्य गायकाला श्वास घेण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी त्यांच्या बरोबर ते ओढे, म्हणजे कट्यारमधले चांद आणि उस्मान आहेत तसे असतात.

करंजी, अनारसे या बाबत मी फार भाष्य करणार नाही.

शेवटी सर्व स्वर कोमल असलेली भैरवी म्हणजे चहा, कॉफी, मसाला दूध ही मंडळी.

मैफिलीत सुरांनी सचैल स्नान घडावं आणि खाद्य मैफिलीत उत्तम चवीचं सचैल स्नान घडावं.

 

– भूपाल पणशीकर

संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चविष्ट चटकदार मसाला..! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ चविष्ट चटकदार मसाला..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

खोटं बोलणे आणि थापा मारणे यात कांही अंशी अवगुणात्मक फरक नक्कीच आहे.खोटं नेहमी स्वार्थासाठीच बोललं जातं असं नाही.समोरच्या माणसाला त्याच्याच हितासाठी कांही काळ अंधारात ठेवण्याच्या उद्देशाने खरं सांगणं योग्य नसेल तिथं खोट्याचा आधार घ्यावा लागतोच.एरवी बऱ्याचदा खोटं बोललं जातं ते भितीपोटी, स्वार्थापोटी,किंवा स्वतःची कातडी बचावण्यासाठीही.बेमालूम खोटं बोलणं सर्रास सर्वांना जमतंच असं नाही.तीही एक अंगभूत कलाच म्हणावी लागेल आणि नित्य सरावाने ते कलाकार त्यात पारंगतही होत असावेत.

थाप मारणे ही क्रिया मात्र मला उत्स्फुर्तपणे घडणारी क्रियाच वाटते.ऐनवेळी आलेल्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सुचेल ते खोटं बोलणं म्हणजे थाप मारणं.अशी थाप मारण्यात अहितकारक उद्देश असतोच असं नाही.पण एकदा थाप मारुन प्रश्न सुटल्याचा आभास निर्माण झाला की त्याची मग सवयच लागते‌.ती एकदा अंगवळणी पडलेली सवय मग अनेक अडचणीना निमंत्रण देणारीच ठरते.स्वार्थासाठी थापा मारुन दुसऱ्यांना टोप्या घालणारे थापाडे किंवा खोटं बोलून स्वतःचं उखळ पांढरं करुन घेणारे खोटारडे यांना मात्र सख्खी भावंडंच म्हणायला हवे.

बिकट परिस्थितीतून वाट शोधण्याचा सोपा मार्ग म्हणून एक थाप मारणारे हळूहळू त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे दुसरी थाप मारायला प्रवृत्त होतात आणि मग नाईलाजाने एकामागोमाग एक थापा मारीत स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात अडकून बसतात.या कल्पनेचा लज्जतदार मसाल्यासारखा वापर करुन खुमासदार विनोदी चित्रपट निर्माण करणारे कल्पक दिग्दर्शक आणि उत्स्फुर्त नैसर्गिक अभिनयाने त्यांना दिलखुलास साथ देणारे कलाकार यांच्या समन्वयाने आपल्याला हसवत ठेवल्याच्या अनेक हसऱ्या आठवणी हा प्रदीर्घ लेखाचाच विषय होईल.प्रोफेसर, अंगूर,पडोसन, गोलमाल,चाची ४२०, मालामाल विकली, हंगामा,बरेलीकी बर्फी,वाट चुकलेले नवरे,चिमुकला पाहुणा,थापाड्या, अशी ही बनवाबनवी हे वानगीदाखल सांगता येतील असे कांही  हिंदी मराठी चित्रपट..!’थापा’म्हणजे या सारख्या चित्रपटात वापरलेला, दु:ख-विवंचना विसरायला लावणारा आणि खळखळून हसवणारा चविष्ट खुमासदार विनोदमसालाच…!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ ना गी ण ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? ना गी ण ! ??

रविवार असल्यामुळे, नाष्टा वगैरे करून फुरसतीत दाढी करत होतो आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तोंड फेसाने माखल्यामुळे बायकोला म्हटलं, “बघ गं जरा कोण तडमडलय सकाळी सकाळी ते !” “बघते !” असं बोलत बायकोने दरवाजा उघडला. “मकरंद भावजी तुम्ही एवढ्या सकाळी आणि ते ही लुंगीवर आणि हे तुमच्या बरोबर कोण आलंय ?” हिचा तो तार स्वर ऐकून मी घाबरलो आणि टॉवेलने तोंड पुसत पुसत बाहेर आलो. “काय रे मक्या, काय झालंय काय असं एकदम माझ्याकडे लुंगीवर येण्या इतकं?” “वारेव्वा, मला काय धाड भरल्ये ? अरे तुलाच ‘नागीण’ चावल्ये ना ? वहिनी म्हणाल्या तसं मोबाईलवर, म्हणून शेजारच्या झोडपट्टीत राहणाऱ्या ह्या ‘गारुडयाला’ झोपेतून उठवून आणलंय, तुझी नागीण उतरवायला !” “अरे मक्या गाढवा नागीण चावली नाही, नागीण झाल्ये मला !” “असं होय, मला वाटलं चावल्ये, म्हणून मी या गारुड्याला घेवून आलो !” मी गारुड्याला म्हटलं “भाईसाब ये मेरे दोस्त की कुछ गलतफईमी हुई है ! आप निकलो.” “ऐसा कैसा साब, मेरी निंद खराब की इन्होने, कुछ चाय पानी….” मी गपचूप घरात गेलो आणि पन्नासची नोट आणून त्याच्या हातावर नाईलाजाने ठेवली. तो गारुडी गेल्यावर मी मक्याला म्हटलं “अरे असं काही करण्या आधी नीट खात्री का नाही करून घेतलीस गाढवा ? आणि नागीण चावायला आपण काय जंगलात राहतो का रे बैला ?” पण मक्या तेवढ्याच शांतपणे मला म्हणाला “अरे जंगलात नाहीतर काय ? ही आपली ‘वनराई सोसायटी’ आरे कॉलनीच्या जंगलाच्या बाजूला तर आहे ! आपल्या सोसायटीत रात्री अपरात्री बिबट्या येतो हे माहित नाही का तुला ?” “अरे हो पण म्हणून…” “मग नागीण का नाही येणार म्हणतो मी ? गेल्याच आठवड्यात बारा फुटी अजगर पकडाला होता ना आपल्या पाण्याच्या टाकी जवळ, मग एखादी नागीण…” शेवटी मी त्याची कशी बशी समजूत काढली आणि त्याला घरी पिटाळलं !

पण मक्या गेल्या गेल्या बायको मला म्हणाली, “आता साऱ्या ‘वनराईत’ तुमच्या या नागिणीची बातमी जाणार बघा !” “ती कशी काय ?” “अहो आपल्या ‘वनराई व्हाट्स ऍप गृपचे’ मकरंद भाऊजी ऍडमिन आणि अशा बातम्या ते ग्रुपवर लगेच टाकतात !” तीच बोलणं पूर होतंय न होतंय तोच आमच्या दोघांच्या मोबाईलवर, एकाच वेळेस मेसेज आल्याची बेल वाजली ! बायकोच भाकीत एवढ्या लवकर प्रत्यक्षात उतरेल असं वाटलं नव्हतं ! तो मक्याचाच व्हाट्स ऍप मेसेज होता ! “आपल्या ‘वनराईत’ बी बिल्डिंगमध्ये राहणारे वसंत जोशी यांना नागीण झाली आहे. तरी यावर कोणाकडे काही जालीम इलाज असल्यास त्यांनी लगेच जोशी यांच्याशी संपर्क साधावा, ही कळकळीची नम्र विनंती !” मी तो मेसेज वाचला आणि रागा रागाने मक्याला झापण्यासाठी मोबाईल लावणार, तेवढ्यात परत दाराची बेल वाजली ! कोण आलं असेल असा विचार करत दरवाजा उघडला, तर वरच्या मजल्यावरचे ‘वनराईतले’ सर्वात सिनियर मोस्ट गोखले अण्णा दारात काठीचा आधार घेत उभे !

“अण्णा, तुम्ही ? काही काम होत का माझ्याकडे ?” “अरे वश्या आत्ताच मक्याचा व्हाट्स ऍप मेसेज वाचला आणि मला कळलं तुला नागीण झाल्ये म्हणून ! म्हटलं चौकशी करून यावी आणि त्यावर माझ्याकडे एक जालीम उपाय आहे तो पण सांगावा, म्हणून आलो हो !” “अण्णा माझे डॉक्टरी उपाय चालू आहेत, बरं वाटेल एक दोन….” मला मधेच तोडत अण्णा म्हणाले “अरे वश्या ह्या नगिणीवर आलो्फेथीचे डॉक्टरी उपाय काहीच कामाचे नाहीत बरं !” “मग?” “अरे तिच्यावर आयुर्वेदिकच उपाय करायला हवेत, त्या शिवाय ती बरं व्हायचं नांव घेणार नाही, सांगतो तुला!” “पण डॉक्टर म्हणाले, तसा वेळ लागतो ही नागीण बरी व्हायला, थोडे पेशन्स ठेवा!” “अरे पण पेशन्स ठेवता ठेवता तीच तोंड आणि शेपटी एकत्र आली, तर जीवाशी खेळ होईल हो, सांगून ठेवतो !” “म्हणजे मी नाही समजलो ?” “अरे वश्या ही नागीण जिथून सुरु झाल्ये ना ती तिची शेपटी आणि ती तुझ्या कपाळावरून जशी जशी पुढे जात्ये नां, ते तीच तोंड !” “बापरे, असं असतं का ?” “हो नां आणि एकदा का त्या तोंडाने आपलीच शेपटी गिळली की खेळ खल्लास!” “काय सांगताय ? मग यावर काय उपाय आहे म्हणालात अण्णा ?” “अरे काय करायच माहित्ये का, रात्री मूठ भर तांदूळ भिजत घालायचे आणि सकाळी मूठभर हिरव्यागार दुर्वा आणून त्यांची दोघांची पेस्ट करून त्याचा लेप करून या नागिणीवर लावायचा ! दोन दिवसात आराम पडलाच म्हणून समज !” “अहो अण्णा, पण नागीण आता कपाळावरून केसात शिरत्ये, मग केसात कसा लावणार मी लेप ?” “वश्या तुझ्याकडे इलेक्ट्रिक रेझर असेलच ना, त्याने त्या सटवीच्या मार्गातले केस कापून टाक, म्हणजे झालं !” “अण्णा पण कसं दिसेल ते ? डोक्याच्या उजव्या डाव्या बाजूला रान उगवल्या सारखे केस आणि मधून पायावट! हसतील हो लोकं मला तशा अवतारात !” “हसतील त्यांचे दात दिसतील वश्या ! तू त्यांच हसणं मनावर घेवू नकोस!” “बरं बघतो काय करता येईल ते !” अण्णांना कटवायच्या हेतूने मी म्हणालो. “नाहीतर असं करतोस का वश्या, सगळं डोकंच भादरून टाक, म्हणजे प्रश्नच मिटला, काय ?” “अहो अण्णा, पण तसं केलं तर लोकं वेगळाच प्रश्न नाही का विचारणार ?” “ते ही खरंच की रे वश्या ! तू बघ कसं काय करायच ते, पण त्या सटविच तोंड आणि शेपटी एकत्र येणार नाही याची काळजी घे हो बरीक ! नाहीतर नस्ती आफत ओढवायची !” असं म्हणून अण्णा काठी टेकत टेकत बाहेर पडले आणि मी सुटकेचा निश्वास टाकला !

मी किचनकडे वळून म्हटलं “अगं जरा चहा टाक घोटभर, बोलून बोलून डोकं दुखायला लागलंय नुसतं !” आणि सोफ्यावर बसतोय न बसतोय तर पुन्हा दाराची बेल वाजली ! आता परत कोण तडमडल असं मनात म्हणत दार उघडलं, तर दारात शेजारचे कर्वे काका हातात रक्त चंदनाची भावली घेवून उभे ! मी काही विचारायच्या आत “ही रक्त चांदनाची भावली घे आणि दिवसातून पाच वेळा त्या नागिणीला उगाळून लाव, नाही दोन दिवसात फरक पडला तर नांव नाही सांगणार हा धन्वंतरी कर्वे !” असं बोलून आपल्या शेजारच्या घरात ते अदृश्य पण झाले! ते गेले, हे बघून मी सुटकेचा निश्वास टाकतोय न टाकतोय तर लेले काकू, हातात कसलासा कागदाचा चिटोरा घेवून दारात येवून हजर ! लेले काकूंनी तो कागद मला दिला आणि म्हणाल्या “या कागदावर किनई एका ठाण्याच्या वैद्याच नांव, पत्ता आणि फोन नंबर आहे, ते नागिणीवर जालीम औषधं देतात ! आधी फोन करून अपॉइंटमेंट घ्या बरं ! त्यांच्याकडे भरपूर गर्दी असते, पण लगेच गुण येतो त्यांच्या हाताचा ! आमच्या ह्यांना झाली होती कमरेवर नागीण, पण दोन दिवसात गायब बघा त्यांच्या औषधी विड्याने ! आणि हो काम झाल्यावर हा पत्त्याचा कागद आठवणीने परत द्या बरं का !” एवढं बोलून लेले काकू गुल पण झाल्या !
मी त्या कागदावरचा नांव पत्ता वाचत वाचत दार लावणार, तेवढ्यात ए विंग मधल्या चितळे काकूंनी एक कागदाची पुडी माझ्या हातावर ठेवली आणि “ही आमच्या ‘त्रिकालदर्शी बाबांच्या’ मठातली मंतरलेली उदी आहे ! ही लावा त्या नागिणीवर आणि चिंता सोडा बाबांवर! पण एक लक्षात ठेवा हं, ही उदी लावल्यावर दुसरा कुठलाच उपाय करायचा नाही तुमच्या नागिणीवर, नाहीतर या उदीचा काही म्हणजे काही उपयोग होणार नाही, समजलं ?” मी मानेनेच हो म्हटलं आणि आणखी कोणी यायच्या आत दार बंद करून टाकलं ! आणि मंडळी घरात जाऊन पहिलं काम काय केलं असेल, तर PC चालू करून त्यावर “Please do not disturb !” अस टाईप करून त्याची मोठ्या अक्षरात प्रिंटरवर प्रिंट आउट काढली आणि परत दार उघडून पटकन बाहेरच्या कडीला अडकवून दार लॉक करून, शांतपणे सोफ्यावर आडवा झालो !

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares