मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अलेक… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ अलेक… ☆ श्री सुनील शिरवाडकर

अलेक पद्मसी

त्या दिवशी ‘लिंटास’ मध्ये मिटींग होती. ‘युनीलिव्हर’ चं एक प्रॉडक्ट ‘रिन डिटर्जंट बार’ भारतामध्ये लॉंच करायचं होतं. तसं हे प्रॉडक्ट इतर देशात फेल गेलेलं.. ‘लिव्हर्स’ चा आग्रह होता की जाहिराती मध्ये ‘हा बार स्वस्त आहे’ यावर भर द्यावा पण अलेक आणि त्याच्या टिमचं म्हणणं.. शुभ्रतेवर भर द्यावा.

बऱ्याच चर्चेनंतर अखेर भर शुभ्रतेवरच द्यावा हे म्हणणं मान्य झालं. आणि मग अलेक पद्मसी आणि त्याच्या सहकार्यांनी ‘ती’ जाहिरात बनवली आसमंतातुन येणारा विजेचा झोत.. आणि मग त्यामागे येणारे शब्द..

Whitening strikes again and again with RIN

आणि मग त्यानंतर इतिहास घडला. रिन आणि भारताचे अतूट नाते निर्माण झाले. रिनच्या विक्रीचे आकडे छप्पर फाडून वर गेले.

अगदी याउलट झाले ते काहीवर्षांनंतर. ‘निरमा’ पावडरचा खप प्रचंड वाढला होता. ‘सर्फ’ ची विक्री खूपच घसरलेली. ‘सर्फ’ साठी नवीन जाहिरात बनवायची होती. पुन्हा एकदा अलेक पदमसी आणि त्याची टीम कामाला लागली. यावेळी ‘लिव्हर्स’ चं म्हणणं जाहीरातीत शुभ्रतेवर भर द्यावा. वास्तविक ‘निरमा’ च्या तुलनेत ‘सर्फ’ खूपच महाग होता. यावेळी अलेकचं म्हणणं वेगळं होतं. अर्धा किलो सर्फ एक किलो निरमाच्या बरोबरीचा आहे हे त्याला गिऱ्हाईकांना पटवून द्यायचं होतं. अंतिमतः सर्फच घेणं फायदेशीर कसं आहे हे दाखवण्यासाठी त्याने एक भारतीय गृहिणी उभी केली.. ‘ललिताजी’ तिचं नाव. वेगवेगळ्या जाहिरातीतुन ललिताजी मग पटवुन देऊ लागली…

” भाई साब, सस्ती चीज और अच्छी चीज में फर्क होता है”… ती प्रत्येक गोष्ट विचार करुनच खरेदी करते.. आणि शेवटी म्हणते..

 “ सर्फ की खरीददारी में ही समझदारी है “

आणि मग तिथुन सर्फने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली.

अश्या अनेक जाहिरातींमागे अलेकचं कल्पक डोकं होतं. मग ‘चेरी ब्लॉसम’ चा चार्ली असो.. की धबधब्याखाली आंघोळ करणारी ‘लिरील गर्ल’ असो.. ‘कामसुत्र’ची पूजा बेदी असो की ‘एमआरएफ’ चा मसलमॅन… अलेक पद्मसीने भारतीय समाजमन अचुक जाणलं होतं. प्रत्येक जाहिरात तो विचारपूर्वक बनवायचा.

अलेक पद्मसी.. एक खरा भारतीय. दक्षिण मुंबईत कुलाबा कॉजवेवर त्यांची अलिशान हवेली होती. वडिलांचा काचेचा व्यवसाय. घरात पाश्चात्य वळण.. पाश्चिमात्य वस्तूंची रेलचेल.. हंड्या.. झुंबरं.. भव्य पेंटिंग्ज.. इटालियन फर्निचर.. रविवारी सगळं कुटुंब ‘मेट्रो’ ला जायचं…. इंग्लिश फिल्मस् पहायला.

पण अलेक आणि त्याच्या भावंडांना मात्र नाटकाचं वेड. रात्र रात्र त्यांच्या दिवाणखान्यात तालमी चालायच्या. आणि मग त्यातुनच अलेकमधला अभिनेता घडत गेला.

रिचर्ड अँटनबरो ‘गांधी’ बनवत होते. महंमद अली जिनांच्या भुमिकेसाठी त्यांनी अलेकची निवड केली.

‘गांधी’ च्या संपुर्ण निर्मिती प्रक्रियेत तो अँटनबरो सोबत होता. गांधींच्या अंत्ययात्रेचं शुटींग करायचं होतं. त्यासाठी दिल्लीतल्या राजपथावर सुमारे पाच लाख लोकांची आवश्यकता होती. 31 जानेवारी 1981 या दिवशी हे शुटींग करण्याचं ठरलं. लोकांनी यात सहभागी व्हावं म्हणून वर्तमानपत्रात जाहिरात द्यायची होती.

रिचर्ड अँटनबरो अलेकला म्हणाले.. “ तू जाहिरात क्षेत्रातला आहेस.. लोकांनी शूटींगसाठी यावं यासाठी तू एक जाहिरात बनवशील? “…. आणि मग 30 जानेवारीच्या हिंदुस्थान टाईम्समध्ये अलेक पदमसीने बनवलेली एक ओळीची जाहिरात प्रसिद्ध झाली…. ३१ जानेवारीला इतिहासाची पुनर्निर्मिती होणार आहे. त्यावेळी तुम्ही तिथे असाल ?

… आणि खरंच त्या जाहिरातीला मिळालेला प्रतिसाद अपूर्व होता. अँटनबरोंच्या मनातील कल्पना ते जशीच्या तशी साकारु शकले ते केवळ आलेकमुळे.

अलेक पद्मसीच्या आत्मकथेचं नाव आहे.. “ अ डबल लाईफ. ”

खरंच तो दुहेरी आयुष्य जगला. चित्रपट.. दूरदर्शन.. वर्तमानपत्र.. यासाठी त्याने शेकडो जाहिराती बनवल्या.. पण तो एक उत्तम अभिनेता होता, दिग्दर्शक होता आणि एक रत्नपारखी सुध्दा.

अलेकनं अनेक जणांना घडवलं. त्यात श्याम बेनेगल होते.. कबीर बेदी होता.. डान्स डायरेक्टर शामक दावर.. अलीशा चिनॉय होती.. पॉपसिंगर शेरॉन प्रभाकर तर त्याची बायकोच. तिच्यामधले गुण हेरुन …. त्याच्याच मार्गदर्शनाने ती पॉप म्युझिकमध्ये टॉपला पोहोचली.

भारतीय समाजमन अचूक जाणणारा.. आपल्या जाहिरातींमधून त्यांच्या भावनेला हात घालणारा इंग्रजी रंगभूमीवर पन्नास नाटकांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारा अलेक पद्मसी…. उच्च कोटीची प्रतिभा. कलात्मकता.. सर्जनशीलता.. आणि अपूर्व संघटन कौशल्य.. नाटकातून पैसा कमावणं हे त्याचं उद्दिष्ट कधीच नव्हतं. म्हणूनच तो म्हणतो ….

“रंगभूमी रोजीरोटी मिळवून देऊ शकत नाही, हे खरं आहे…. पण तो माझा श्वास आहे. जाहिरात क्षेत्रात मात्र असं नाही. कॉपी लिहा…. शब्दांशी खेळ करा.. चित्रिकरण करा.. सुंदर कल्पना प्रत्यक्षात आणा.. आणि भरपूर पैसे खिशात टाका. “

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चुकून घडलेले अपघात… – लेखिका : सौ. माधुरी म. इनामदार ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ चुकून घडलेले अपघात… – लेखिका : सौ. माधुरी म. इनामदार ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

माझी मुलगी कायम माझ्यावर, स्वयंपाक घर आणि माझे काम यावर चिडलेली असते. दररोज कशाला सगळ्यांच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ करत बसतेस?आणि सगळ्यांच्या हातात देत बसतेस? त्यांच्या वेळा सांभाळत बसतेस?तुझा तुला किती वेळ मिळतो सांग, असं म्हणते.

माझी लेकही सगळेच पदार्थ खूप छान करते. पुरणपोळी ते तांदळाचे मोदक. अगदी नवीन पदार्थही. तिचा स्वतःचा फूड ब्लॉग पण आहे. पण त्यावेळी जावई इतर कामे करतो. एकूणच सगळीच कामे ते मिळून करतात. खरे सहजीवन कसे असते, हे मला कॅनडामध्ये गेल्यावरच समजले. आता इकडेही काही पुरुष सगळी कामे करतात, हे मी बघतेय. (अलीअलीकडे आमच्या घरातील पुरुषही काही बाबतीत तरी छान मदत करत आहेत.)

हे सगळे आठवायचे कारण.. काल सकाळी नाश्त्यासाठी मी भरपूर भाज्या घातलेले आप्पे, चटणी करायची ठरवली.. बाकी सगळे तयार होते. पण चटणीला फोडणी घालायला गेले आणि कसे काय कोण जाणे, हातातून फोडणीचा डबा निसटला आणि तो मायक्रोवेव्ह, मिक्सर आणि ओटा यांच्यावर पडल्याने सगळ्या रंगाची रंगपंचमी झाली.. त्यांचे शुभ्र रंग हळद, तिखट, मसाला इत्यादी रंगात माखून गेले. (इकडे आल्यावर मी डबा घासून पूर्ण भरला होता.) ओटाही सगळा भरून गेला. हे नाष्टा करून बाहेर जायच्या तयारीत बसले होते. सून माहेरी. मुलाने नुकताच लॅपटॉप उघडला होता. (वर्क फ्रॉम होम). पण माझा झालेला गोंधळ बघून लगेच मुलगा आला. बाबा आणि त्याने मिळून बाहेर घेऊन जाऊन मायक्रोवेव्ह आणि मिक्सर स्वच्छ एरियल लावून पुसून उन्हांत ठेवले. तोपर्यंत मी कट्टा आवरला. या सगळ्या गोष्टींमुळे नाश्त्याला वेळ लागला, तो वेगळाच. पण सगळ्यांनी मिळून, समजून केल्याने मला कसलाच त्रास वाटला नाही.

या घटनेमुळे सहजच एक जुनी आठवण जागी झाली. मिरजेत असताना एकदा कोणीतरी खास पाहुणे आले, म्हणून मी माझ्या ठेवणीतील क्रोकरी काढली होती. त्या वेळी मी नोकरीही करत होते. सासूबाईंची तब्येत बिघडली होती, म्हणून त्या झोपल्या होत्या. सिंक कपबश्या, क्रोकरीने भरले होते. आम्हा सगळ्यांना रोज ताक लागतेच. तर मी घाईघाईत ताक केले. त्यावेळी घरी फिल्टर नव्हता. स्टीलचे मोठे पिंप. आणि त्यावर पाण्याने भरलेली कळशी होती.. (पिण्याचे पाणी भरून ठेवण्यासाठी). पिंपात पाणी भरणे घाईत विसरले होते. त्यामुळे ते खाली गेले होते. मी ताकाच्या गुंडीत तसाच पिंप वाकवून पाणी घ्यायला गेले.. आणि वरची कळशी गुंडीवर पडून ताक तर सगळीकडे उडालेच आणि माझी काचेची क्रोकरी बहुतेक सगळी फुटली. एक, दोन बाऊल तेवढे वाचले. त्या वेळी आर्थिक चणचणही जास्त होती आणि त्यात हे अती घाईने झालेले नुकसान. त्यामुळे माझे डोळे लगेच भरून आले. मुले कॉलेजला जाण्याच्या तयारीत होती.. जोरात झालेला आवाज ऐकून दोघं आत पळत आली. माझ्या अंगभर ताक उडून अगदी अवतार झाला होता. दोघांनी लगेच हसत हसत मला आरसा दाखविला. “होतं आई असे कधी कधी. त्यात रडण्यासारखे काय आहे?” म्हणून राहिलेले दोन बाऊल माझ्या हातात देऊन त्यांनी काचा गोळा करून टाकल्या.

असे चुकून झालेले अपघात थोड्या वेगवेगळ्या फरकाने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात. पण त्यातील नकळत राहिलेल्या पक्क्या रंगाकडे बघायचे की पुसून शुभ्र झालेल्या रंगाकडे बघायचे?तसेच तुटलेले आठवायचे की त्यातूनही सही सलामत वाचलेले बघायचे?हे तर नक्कीच आपल्या हातात असते ना?

लेखिका:सौ. माधुरी म. इनामदार

प्रस्तुती: सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ थेम्सच्या नदीकिनारी… ☆ प्रा. डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा. डॉ.सतीश शिरसाठ

? क्षण सृजनाचे ?

थेम्सच्या नदीकिनारी… ☆ प्रा. डॉ.सतीश शिरसाठ ☆

लंडन येथील नदीचे नाव- थेम्स, त्या नदीवर एक मोठा ऐतिहासिक पूल आहे- टाॅवर ब्रिज. या पुलाच्या बाजूंना दोन मोठे टाॅवर असून राजघराण्यातील व्यक्ति बोटीने जाताना मध्यभागातून तो उघडला जातो.त्या नदीवर एक मोठा दुसरा पूल असून त्याला लंडन ब्रिज म्हणतात. मी त्यावर  मुक्त पध्दतीत एक कविता लिहीली आहे. 👇🏻

☆ थेम्सच्या नदीकिनारी… ☆ प्रा. डॉ.सतीश शिरसाठ ☆

थेम्सच्या नदीकिनारी

पाहिला मी टाॅवर  ब्रिज

ब्रिटिश राजसत्तेला

अभिवादन करताना

मध्यातून  मुडपणारा.

 *

थेम्सच्या नदीकिनारी

पाहिला मी लंडनब्रिज

मुखवटे घालून फिरणा-या

शेकडो  माणसांच्या

घामांत भिजलेला.

 *

थेम्सच्या नदीकिनारी

पाहिला मी एक भिकारी

कळकटलेल्या कपडयांवर

फेकलेली नाणी

गोळा करताना.

© प्रा. डाॅ. सतीश शिरसाठ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वृद्धपण आणि मौन… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

?  विविधा ?

☆ वृद्धपण आणि मौन… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

वृद्धपण आणि मौनः

मौन” हा शब्द ऐकल्याक्षणी कुसुमाग्रजांची कविता आठवली.

शिणलेल्या झाडापाशी

कोकिळा आली

म्हणाली, गाणे गाऊ का ?

झाड बोललं नाही

कोकिळा उडून गेली.

 

शिणलेल्या झाडापाशी

सुग्रण आली

म्हणाली घरटे बांधु का?

झाड बोललं नाही

सुग्रण निघून गेली.

 

शिणलेल्या झाडापाशी

चंद्रकोर आली

म्हणाली जाळीत लपू का?

झाड बोललं नाही.

चंद्रकोर मार्गस्थ झाली.

 

बिजली आली

म्हणाली मिठीत येवू का?

झाडाचे मौन सुटलं

अंगांअंगातून

होकारांचे तुफान उठलं.

.

.

.

.

 

पहिल्यांदा वाचली तेव्हा नव्हती समजली. परत वाचली….

परत परत वाचली…

आणि लक्षात आले की हे तर शिणलेल्या झाडाचे समजूतदार मौन आहे….

अनेक वर्ष कोकिळा येवून  गात असेल, बर्‍याच सुगरण पक्षांनी पिल्लांसाठी सुंदर घरटी विणली असतील, चंद्रकोर तर कितीतरी वेळा झाडाच्या जाळीत लपली असेल….

असे सगळ्यांच्या सोबतीत ऐश्वर्यसंपन्न आयुष्य घालवलेल्या झाडासाठी आता आपण थकलो आहोत…

शिणलो आहोत हे स्विकारणे किती कठिण झाले असेल…

 

पक्षांच्याही लक्षात आले आहे की झाड दमलेय….

म्हणून तर विचारताहेत….

की शिणलेल्या झाडाला एकटे वाटू नये म्हणून येताहेत…

 

“नाही” पण म्हणता येत नाही आणि “हो” पण…

 

अश्या वेळी मौनाची सोबत असते….

थोडीशी घुसमट…

पण शब्दाशिवाय पोहोचते बरेच काही….

अशी ही मौनाची भाषा…

आणि कवितेचा शेवट तर….

 

समर्पणाचा…

मनाला चटका लावणारा…..

 

यानिमित्ताने आठवत राहिले ते स्वतःहून स्विकारलेलेले मौन….

 

पटत नसले तरी त्या क्षणी वाद वाढू नये म्हणून,

खूप आनंदाच्या वेळी शब्दातून व्यक्त होता येत नाही तेव्हा,

जंगलातील नीरव शांततेत,

कधीतरी स्वतः लाच चाचपडत असतांना….

 

माणसामाणसातील नात्यांमध्ये तर

कधीतरी  समोरच्याला समजून घेतांना

एकाने थांबणे पण गरजेचे….

.

.

.

.

 

यानिमित्ताने एक प्रसंग आठवला. तरुण मंडळींनी गावातल्या एका आजीबाईंना विचारले की

 

 इतकी वर्ष तुम्ही आनंदाने कसा संसार केला?

त्या म्हणाल्या “तो आग झाला की मी पाणी व्हते…”

 

गम्मत म्हणजे एका तरुण मित्राने लगेच प्रतिसाद दिला आणि म्हणाला

 “म्हणून तर ती राजाची राणी होते “

 

……असे पाणी होतांना मौनाची सोबत नक्की होत असेल का? 

खरं तर मला असे वाटते की ठरवून धारण केलेल्या मौनाची ताकद असतेच असते पण कधी व्यक्त व्हायचे आणि कधी मौनात रहायचे हे  समजले की आयुष्य मात्र नक्की सोपे, सहज होते.

लेखक : अज्ञात 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सकारात्मकता : एक कला…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “सकारात्मकता : एक कला☆ श्री जगदीश काबरे ☆

पावसाळ्याचे दिवस होते. संध्याकाळी एका उद्यानात फिरायला गेलो होतो. तिथे दोन मैत्रिणींची मुलं झाडावर चढलेली दिसली. मैत्रिणीच्या झाडाखालीच गप्पा मारत बसल्या होत्या. मुलं झाडावर उंच पोहचल्यावर अचानक जोराचं वादळ आलं. ते झाड वाऱ्यानं गदागदा हालू लागलं.

पहिल्या मुलाची आई तिच्या मुलाला म्हणाली, “अरे, पडशील !”

तर दुसऱ्या मुलाची आई म्हणाली, ” सांभाळ, फांदी घट्ट पकडून ठेव.”

खरंतर दोन्ही मैत्रिणींना आपापल्या मुलांना पडण्यापासून वाचवायचं होतं. परंतु त्यांच्या मुखातून निघालेल्या संदेशांमध्ये मात्र खूप फरक होता. परिणामी पहिल्या स्त्रीचा मुलगा घाबरून फांदीवरून घसरून खाली पडला. मात्र दुसऱ्या स्त्रीच्या मुलानं फांदी घट्ट धरून ठेवली आणि तो अलगद उतरून खाली आला.

काय बरं असेल यामागचं कारण? ….. 

…. पहिल्या स्त्रीच्या शब्दामध्ये नकारात्मकता होती. जी तिच्या मुलानं ग्रहण केली आणि तो पडला.

…. या उलट दुसऱ्या स्त्रीनं उच्चारलेल्या शब्दांमध्ये सकारात्मकता असल्याने तिच्या मुलानं ती ग्रहण केली आणि तो फांदीवर आपले पाय घट्ट रोवून बसला आणि नंतर सावकाश खाली आला. 

…… म्हणून सकारात्मक वागणं, बोलणं ही एक कला आहे आणि ती प्रत्येक पालकाने आत्मसात करायला हवी.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आई … ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आई …  ☆ डॉ अभिजीत सोनवणे

साधारण चार वर्षांपूर्वी COVID लॉकडाऊन काळात मला भेटलेली एक माऊली… 

स्वतःचं सर्व आयुष्य उध्वस्त झालेलं… 

मुलं सोडून गेलेली… 

आयुष्य संपवायच्या विचारात असलेली…

 

त्याच टप्प्यावर एक अपंग मुलगा तिच्या आयुष्यात येतो… 

ती त्याचं मातृत्व स्वीकारते…. 

70 व्या वर्षी ती पुन्हा आई होते… 

त्याच्या आनंदासाठी ती कोणत्याही थराला जावू शकते… 

….. फक्त एक आईच हे करू शकते…. !!! 

 

हा सर्व भावपूर्ण प्रसंग मी माझ्या शब्दात ” आई ”  या शीर्षकाखाली मांडला होता ! 

 

श्री. व सौ. भाविका काळे हे माझे स्नेही… त्यांचा मुलगा विवस्वत काळे… ! 

कोवळ्या वयातच या मुलाने दिग्दर्शक होण्याचे स्वप्न पाहिले… ! 

पहिल्यांदा हा मला भेटला, त्यावेळी मी त्याला विचारले, “ बाळा आयुष्यात तुला पुढे काय करायचंय ?” 

 

“ समाजाला एक सकारात्मक दिशा मिळेल… नुकत्याच उमलणाऱ्या आमच्यासारख्या तरुणांना एक आशा मिळेल; असे चित्रपट मला पुढे बनवायचे आहेत काका …  मला व्ही. शांताराम सर, सत्यजित रे साहेब यांच्यासारखा दिग्दर्शक व्हायचंय… “ .. ठाम स्वरात विवस्वत बोलत होता. 

…. हा मुलगा जेमतेम १८  वर्षाचा सुद्धा नसेल… 

 

अठरा वर्षांचा असतानाचा मला मी आठवलो … 

शाळा / कॉलेज बुडवून, दे धमाल हाणामारीचे पिक्चर मी मित्रांसोबत पाहायचो… 

एकतर डोअरकीपर आमचा मित्र असायचा… आमच्या भीतीने तो तिकीट नसतानाही गप गुमान आम्हाला आत सोडायचा… 

एखाद्या अनोळखी डोअरकीपरने आत सोडायला आम्हाला अटकाव केला तर, चित्रपटाआधीच आमच्यातल्या प्रत्येकाच्या अंगात बच्चन… मिथुन… धर्मेंद्र यायचा… ! 

… मग त्या नवीन डोअर कीपरचा आम्ही “चुथडा” करायचो… ! 

 

मी साधारण त्यावेळी बारावीत असेन… 

मला कोणतीही दिशा नव्हती… ! 

वडील पोलीस डिपार्टमेंट मध्ये…. वडिलांचे मित्र म्हणजे लय मोठे अधिकारी… 

ते घरी यायचे आणि मला विचारायचे, “ बाळा आयुष्यात पुढे तू कोण होणार आहेस… ? “

मी नव्या नवरीगत खाली मान घालून उत्तर द्यायचो… “ बच्चन, मिथुन किंवा धर्मेंद्र… ! “

….. ते मोठे सायेब गेल्यावर, बापाचा लय मार खात असे मी… ! 

 

आम्हाला … म्हणजे आमच्यासारख्या मुलांना एक सकारात्मक दिशा मिळेल… नुकत्याच उमलणाऱ्या, आमच्यासारख्या तरुणांना एक आशा दिसेल, असे आमच्यापुढे कोणीच रोल मॉडेल नव्हते… किंवा असतील तर त्यांना पाहण्याइतपत … समजण्याइतपत आमची अक्कल आणि लायकी नव्हती…  

 

‘ अशा मोठ्या लोकांना पहा रे… समजून घ्या रे बाळांनो… ‘   हे प्रेमानं सांगणारे लोकही आम्हाला त्यावेळी भेटले नाहीत… ! 

मला फक्त आठवतात… चुकलो म्हणून मुस्काटावर खणखणीत मारलेला हात…. आणि ढुंगणावर बसलेली लाथ… !

 

…. “हात” आणि “लाथ” यापेक्षा आमच्यासारख्या नालायक मुलांशी, थोडीशी जर कोणी केली असती “बात”….  तर आम्ही बी घडलो असतो… ! 

… पण नाही… आम्ही बिघडलो…. ! 

 

“ सर…” विवस्वत ने हाक मारली आणि मी डोळे उघडून, भूतकाळातून पुन्हा वर्तमान काळात आलो…!

“ सर मला तुमचा “आई” हा अनुभव आवडला आहे…  आणि मी त्यावर शॉर्ट फिल्म करू इच्छितो, आयुष्याची सुरुवात … ध्येयाची सुरुवात मी आपल्यापासून करू इच्छितो… आपल्या शब्दांनी एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल समाजामध्ये…आपण मला शॉर्ट फिल्म करायची परवानगी द्याल काय ?” 

 

डोळे उघडून मी जागा झालो…  

…. जगाने “ना लायक” ठरवलेल्या माझ्यासारख्या एका मुलाला, विवस्वत नावाच्या दुसऱ्या एका “लायक” मुलाने दिलेली ही सलामी होती…

माझ्या डोळ्यात पाणी होतं… !!! 

 

मी त्याला म्हणालो,  “ ए भावा, समाजाला दिशा किंवा तरुणांची आशा म्हणून माझे शब्द किती योग्य ठरतील मला माहीत नाही रे… पण तू आयुष्याची सुरूवात माझ्या सारख्या नालायक माणसापासून करू नकोस… समाजात खूप लायक आणि नायक लोक आहेत… तू त्यांची एखादी कथा किंवा अनुभव घे ना..!”

 

“ सर, प्लीज तुम्ही लायक आहात किंवा नालायक हे समाजाला ठरवू द्यात… विवस्वत सारख्या मुलांना ठरवू द्यात… तुम्ही जजमेंट नका देऊ…”  सौ भाविकाताई काळे, विवस्वतची आई बोलली. 

…. यापुढे परमिशन देण्या आणि घेण्याचा प्रश्नच नव्हता… ! 

 

यानंतर या छोट्या मुलाने, “आई” नावाने एक शॉर्ट फिल्म बनवली… 

ती जगभर गाजली… 

माझ्या शब्दांना त्याने चित्ररूप दिले… ! 

या शॉर्ट फिल्मची लिंक खाली देत आहे…

…… शॉर्ट फिल्म आवडली, तर त्याचे सर्व श्रेय विवस्वतचे… ! … माझा रोल करणाऱ्या श्रीपाद पानसे यांचे… 

… आजीचा रोल करणाऱ्या श्रीमती आरती गोगटे यांचे… 

https://youtu.be/zhm6g-X2IoQ?si=J-1bGa6aAKZlXaiv

नाहीच आवडली फिल्म, तर सर्व शिव्या या  ना – लायकाच्या पदरात घाला… ! 

मी पदर पसरून उभा आहे माऊली… !!! 

आपला;

डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जठराग्नीत उजळलेलं सोनं !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“जठराग्नीत उजळलेलं सोनं ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

… अर्थात भुकेलाही खाऊन उरलेली माणसं !

क्षुधा हा संस्कृत शब्द..आणि भूख बहुदा जर्मन भाषेतून जगभर पसरलेला शब्द…आपल्याकडे भूक  अर्थात या शब्दाच्या आधीपासूनच जगात भूक आहेच..सर्वव्यापी! भुकेचा आणि पोटाचा संबंध असणं स्वाभाविक आणि त्यामुळे भुकेल्या पोटी,अर्धपोटी राहिलेल्या लोकांचाही इतिहास असणं स्वाभाविक. 

भुकेपोटी भीकेला लागलेली माणसं,जठराग्नी शांत करण्यासाठी कोणत्याही थराला जाणारी  जगाने पाहिलीत तशी भुकेला खाऊन राहिलेली माणसंही पाहिलीत…ती संख्येने अगदी थोडी असली तरी! 

खरं तर जगात अन्नाची कमतरता कधीच नव्हती. कमतरता होती आणि आहे ती अन्नाच्या समान वितरणाची. कुणाचं ताट शिगोशीग भरलेलं तर कुणाचं ताट निरभ्र आकाशासारखं…रितं! माणसं दैव नावाच्या कुंभाराने घडवलेलेल्या मडक्यांसारखी.. कुणाच्या मुखी लोणी तर कुणा मुखी अंगार पडतो. 

देवाला जगात यापुढे अवतार घ्यावा लागला तर तो भाकरीच्या रुपात घ्यावा लागेल,असं म्हणतात. ज्यांची पोटं भरलेली आहेत आणि ज्यांची रिकामी आहेत…हे दोन्ही गट देवाने अवतार घेण्याची वाट पाहताना दिसतात! 

गानकलेच्या क्षेत्रात अत्युच्च शिखरावर चिरंजीव विराजमान झालेली स्वरांची अपत्ये म्हणजे दीनानाथ आणि माई मंगेशकर यांची पंचरत्ने. त्यांनी, विशेषत: लतादीदी आणि आशाताई या दोघींनी मिळून तर दोन्ही ध्रुव आपल्या आवाजाच्या कवेत घेतले. हृदयनाथ,लता,आशा,उषा आणि मीना यांचे यश देदीप्यमान आहेच. पण त्यापेक्षाही त्यांनी भुकेशी दिलेला लढा असामान्य असाच म्हणावा लागेल. या संघर्षातून त्यांची व्यक्तिमत्वे घडली….अनेक कंगोरे असलेली. ज्याने भूक अनुभवली त्याच्या जीवनात तो अनुभव कदापि विसरता न येणारा असतो. किंबहुना पानात पंचपक्वान्ने वाढलेली असताना, त्यांच्या जिव्हाग्री त्यांनी उपवासनंतर चाखलेला पहिला घास नांदत असतो….आणि तो भरवणारा हातही! 

दैनिक सकाळ सप्तरंग पुरवणीत गेले काही महिने रविवारी पंडित हृदयनाथ मंगेशकर एक महान इतिहास शब्दबद्ध करून ठेवत आहेत….त्यांचे हे कार्य सिद्धीस जावो,ही माता सरस्वतीचरणी प्रार्थना. आजच्या लेखनात माई,आशा,उषा आणि हृदयनाथ यांनी त्यांच्या खानदेशातील गावातून मुंबईपर्यंत केलेल्या रेल्वे प्रवासाची आठवण लिहिली गेली आहे. 

संपूर्ण प्रवासभर सहप्रवासी विविध पदार्थ सेवन करीत असताना प्रचंड भुकेजलेली ही मुलं कुणाकडे हात पसरत नाहीत. पाणी पिऊन भुकेची समजूत काढत काढत उघड्यावर निजतात. किती तरी तासांनी पुढ्यात आलेल्या बिस्किटास आईच्या संमतीशिवाय हात लावत नाहीत. त्यांच्या समोर इतर माणसं जेवून उठत असताना यांच्या चेह-यावर बुभुक्षितपणाची रेषाही उमटत नाही. पहिल्या पंगतीतून काही कारणाने उठावे लागते आणि दुस-या पंगतीत त्यांच्या आईने, माईने दाखवलेला बाणेदारपणा भुकेवर मात करून पंगत सोडून उठतो…आणि ताठ मानेने पुढच्या प्रवासात निघतो! 

तिस-या दिवशी हाता तोंडाची गाठ पडायची होती….पण इथे तो हात दैवी होता आणि तोंड बाळाचे होते. माई,आशा,उषा इत्यादी समोर असताना त्यांच्याशी न बोलता दीदी थेट हृदयनाथ यांच्याकडे आल्या आणि त्यांना अन्नाचा घास भरवला….हा पहिला घास अमृताचा न ठरता तरच नवल! जठरात पेटलेल्या अग्नीत हे स्वर-सुवर्णालंकार काळाने घातले ते जाळाव्यास नव्हेत तर उजळावायास…आणि त्यांचा प्रकाश सा-या जगाने अनुभवला आहे! 

प्रत्यक्ष हा लेख वाचताना प्रत्येक सहृदय माणसाच्या पोटात कालवाकालव झाल्याशिवाय राहणार नाही..असाच हृदयनाथांनी लिहिलेला अनुभव आहे. 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “प्राक्तन…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “प्राक्तन…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… ज्याचं त्याचं प्राक्तन किती वेगवेगळं असतं… हे जागतिक सत्य आहे आणि ते सर्वांना विदीत असतचं… फरक एव्हढाच असतो आपल्या सगळ्यांना मात्र हवं असतं फक्त अनुकूल असणारं प्राक्तन… म्हणजे बघा अथ पासून इति पर्यंत.. नव्हे नव्हे आदी पासून अंतापर्यंत अर्थात जन्मापासून ते मृत्युपर्यंत सगळा आयुष्याचा प्रवास कसा सुशेगात आणि सुखात होईल.. आता त्या मिळणाऱ्या सुखाची मात्रा थोडीफार कमीजास्त चालते पण अगदीच सुख मिळूच नये अशी भावना कधीच नसते बरं त्यात… तो आला राजा सारखा, सुखाचा जगला नि गेला अशी मागची जगरहाटी बोलत राहावी हिच एकमेव इच्छा असते…. पण पण…

प्राक्तनाचं दान देणाऱ्याच्या मनात नेहमी वेगळचं काहीतरी असतं… आपल्याला कायमचं ते गुढ असतं, रहस्यमय असतं… चारचौघांसारखाच असणारा आपला हा आयुष्याचा प्रवासात सतत आपल्या वाट्याला नेहमीच इतरांपेक्षा वेगळचं येत असतं… अनाकलनीय गोष्टी घडत असतात… अगदी कितीही पद्धतशीरपणे नियोजनबद्ध जगायचं आपणं ठरवतो हो पण तो नियंता तिसरचं आपल्या भाळी मारत असतो…घालमेल होते तेव्हा आपल्या जिवाची… सगळ्यांनाचं भलं करणार आपल्यालाच कसा विसरला असा प्रश्न पडतो.. आणि गमंत म्हणजे हे असं प्रत्येकाच्या मनात तस्सचं येतं.. मग तुम्ही कसंही जगा.. स्वतःसाठी, दुसऱ्या साठी काहीही फरक पडत नाही… जे जे होणार ते ते ठरल्याप्रमाणे तसेच होणार… ना आपल्याला ना दुसऱ्याला त्यात काडीमात्र बदल घडवून  आणता येत नाही… साधी गोष्ट जन्म कुठे कधी व्हावा ते शेवटचा श्वास कधी कुठे सोडून द्यावा आहे का आपल्या हातात… मग या दोघांच्या मधल्या प्रवासातील अनेक गोष्टींचा आयुष्यभर आटापिटा करत असतो तो अनुकुलता असावी… पण प्रतिकुलतेची छाया सतत मंडरत राहते आणि आपला संघर्ष तिथे सुरू असतो… क्षणाचा आनंद मिळतो आयुष्याची बाजी लावून… संघर्षात उभे असतात आपलेच म्हणवारे,शत्रू, हितचिंतक… मुखवटे घातलेले चेहरे दाखवून…आणि आणि यादी कितीही मोठी करता येईल… तर हा सगळा प्रपंच आठवला कशावरून… ते प्राजक्ताचं फुल दिसलं आणि हा फापट पसारा मांडत गेलो…

प्राजक्ताचं इवलं इवलसं नाजूक सुकोमल फुलं बघाना..  उमलून येतं तेव्हा सुंगधाने  किती परिलुप्त असतं.. फांदी फांदीवर लगडलेलं दिसतं.. किती किती प्रसन्न, टवटवीत नि आनंदविभोर असतं ते स्वतः आणि इतरांनाही ते तसाच अनुभव देतं… त्या प्राजक्तांच्या फुलांकडे बघताना प्रत्येकाला त्या फुलांबदल प्रेम हे वाटतचं… असं वाटतं या फुलानं असचं कायम या फांदीवर झुलत राहावं… पण तो वाहणारा वारा मात्र दोषाचा धनी होतो… अगदी मंद झुळूकेच्या रूपात वाहत  जातो तेव्हा तो या निष्पाप फुलांना फांदी वरून अलगदपणे उचलून घेऊन जातो आणि आणि मधेच जड झाले बुवा आता तू माझ्या मागे मागे चाली चाली करत ये बरं असं सांगून त्या फुलांना तो जमिनीवर सोडून जातो… काही वेळ ती अबोध फुलं जमिनीवरून देखील वाऱ्यासह घरंगळत पुढे पुढे जाउ लागतात… पण तो प्रवास अल्पजीवी असतो.. त्यांचं सुकोमल देह धुळीत, मातीत लोळून गेल्यानं दगड धोंडे यांसारख्या अडथळ्यांना तटल्याने   थकून जाऊन गलितगात्र होऊन मातीमय होतात… आपला शेवटचा श्वास त्या मातीमध्ये घेताना त्या मातीला आपला सुगंध अर्पण करून जातात… जवळपास सगळ्या फुलाचं असचं होतं… पण काही फुलं वाऱ्याने इतस्ततः होतात., भरकटतात… एकटीच पडतात… शोध घेत असतात इतरही फुलांचा ती कुठे आहेत… पण तो शोध कधीच लागत नाही… मग एकटेच पडल्याने त्यांच्या नशीबी बेवारसाचं मरणाला सामोरं जावं लागतं…जगणं आनंदाचं झालं वाटतं नाही तोच बाभळीच्या काट्यासारख्या झाडांच्या फांदीत अडकून पडणं होतं.. अरे तू कोण आहेस.. आणि इतका सुंदर सुगंध तुझ्याजवळ कोठून आला… थोडा आम्हालाही तो सुंगधानं न्हाऊ घालना.. नाही तरी आमच्या जगण्याला तसा काहीच अर्थ उरलेला नाही… ना आमच्या कडे कधी कोणी ढुंकूनही पाहिले जात नाही… आज तू आमच्या तावडीत बरा सापडला आहेस.. तेव्हा आमचं सगळ्याचं जिणं सुगंधीत करं बरं… असं म्हणून  त्या प्रत्येक काट्याने त्या फुलाला कवटाळून घेण्यास सुरुवात करायला घ्यावी… या काट्यांच्या धुसमुळेपणाने त्या प्राजक्ता च्या फुलाच्या नाजूक देहाला कैक ओरखडे बसू लागतात…एकेक पाकळी विर्दिण होत जाते.. छिन्नविछिन्न  होते.. केशरी देठ अलग होऊन  तो एकिकडे खाली मातीत पडतो  नि त्या त्या पाकळ्या आपला निश्वास सोडत दूर दूर मातीत गलितगात्र होऊन पडतात… त्या आक्रस्ताळी काट्यांना प्राजक्ताचा  सुगंध तर मिळालाच नाही… उलट  जनमानसाकडून त्याच्या या कृत्याची निर्भत्सना मात्र त्यांची  झाली… अरसिक,निर्दयी मनाचे काट्यांनी अखेर त्या चुकलेल्या फुलाची जीवन यात्राच संपविली…. मग कुणी सात्वंनपर म्हणत गेलं त्याचं प्राक्तनच तसं होतं… आगळं वेगळं जगावेगळं… क्षणभंगुर जीवनात सुगंधाची बरसात करून जगलं… मी नियंता असूनही मला त्या प्राजक्ताच्या सुंगधाला वंचित व्हावं लागावं हा केव्हढा दैवदुर्विलास आहे…त्या नियंत्याला सुध्दा एक वेळ मनात किंतु चा कंटक टोचत राहतो…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सार्वजनिक संस्थेचा गाभा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “सार्वजनिक संस्थेचा गाभा…–☆ श्री जगदीश काबरे ☆

लोकांपासून कसलेही काम घ्यावयाचे असेल, तर सोशिकपणा धारण केला पाहिजे, हा आपल्या विचाराचा गाभा असला पाहिजे तरच आपण समाजसुधारणेच्या कामात तग धरू शकू. सुधारणेची गरज वाटते ती सुधारकाला. तो ज्या लोकांना सुधारण्याची अपेक्षा करतो, त्यांच्याकडून त्याने विरोधाची, तिरस्काराची, किंबहुना जीवावरील संकटाचीही अपेक्षा ठेवली पाहिजे. कारण सुधारक जिला सुधारणा म्हणतो, ती कुधारणाच आहे, असे स्थितिशील समाजाला वाटत असते. अशा वेळेस सार्वजनिक संस्था उभारणे आणि शस्त्रकाट्याच्या कसोटीवर टिकवून ठेवणे ही एक कसरतच असते.

अनेक सार्वजनिक संस्था सुरू करून, त्यांची व्यवस्था चालविण्याच्या जबाबदारीचा अनुभव घेतल्यानंतरच मी अशा दृढ निर्णयावर आलो की, कोणत्याही जाहीर संस्थेने कायम फंडावर गुजारा करण्याचा प्रयत्न करू नये. तसे करण्यामध्ये तिच्या नैतिक अधोगतीचे बीज साठविलेले आहे. सार्वजनिक संस्था म्हणजे लोकांची मान्यता आणि लोकांचे पैसे यांवर चालणारी संस्था. अशा संस्थेला लोकांची मदत मिळेनाशी होईल, तेव्हा तिला अस्तित्वात राहण्याचा हक्कच राहत नाही. कायम फंडावर चालणाऱ्या संस्था लोकमताविषयी बेपर्वा होताना आढळतात; कित्येक वेळा तर धडधडीत लोकमतांविरुद्ध आचरण करताना दृष्टीस पडतात. अशा तऱ्हेचे अनुभव देशात आपल्याला पावलोपावली येतात. धार्मिक म्हटल्या जाणाऱ्या कित्येक संस्थांच्या हिशेबठिशेबांचा ठावठिकाणा नाही. त्यांचे संस्थापक, त्यांचे मालक होऊन बसले आहेत आणि त्यांच्यावर कोणाचा ताबा चालत नाही.

सृष्टी ज्याप्रमाणे रोजचे अन्न रोज तयार करून रोज खाते, त्याप्रमाणे सार्वजनिक संस्थांचे असले पाहिजे, याबद्दल मात्र मला तिळमात्र शंका नाही. ज्या संस्थेला लोक मदत करण्यास तयार नाहीत, त्या संस्थेला सार्वजनिक संस्था म्हणून जगण्याचा अधिकारच नाही. प्रतिवर्षी मिळणारा फंड, ही त्या त्या संस्थेच्या लोकप्रियतेची व तिच्या चालकांच्या प्रामाणिकपणाची कसोटी आहे आणि प्रत्येक संस्थेने या कसोटीला उतरलेच पाहिजे, तरच ती संस्था लोकांच्या विश्वासास पात्र ठरेल.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सम्राट अशोक आणि जागतिक शांतता. – ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ सम्राट अशोक आणि जागतिक शांतता. ☆ श्री सुनील देशपांडे

खालील मजकूर मला व्हाट्सअप वरून फिरत फिरत आला. तो आणि त्यावरचे माझे विचार सादर करीत आहे –

सम्राट अशोकाची जयंती आपल्या देशात का साजरी केली जात नाही?

खूप विचार करूनही “उत्तर” सापडत नाही ! तुम्हीही या “प्रश्नांचा” विचार करा !

 सम्राट अशोक

 वडिलांचे नाव – बिंदुसार गुप्त

 आईचे नाव – सुभद्राणी

 …. एकच “सम्राट” ज्याच्या नावाने जगभरातील इतिहासकारांनी “महान” हा शब्द लावला.

… या “सम्राटा” चे राजेशाही चिन्ह “अशोक चक्र” भारतीयांनी त्यांच्या ध्वजात ठेवले.

… हाच “सम्राट” ज्याचे शाही चिन्ह “चारमुखी सिंह” हे भारत सरकारने “राष्ट्रीय चिन्ह” मानून चालवले आहे आणि “सत्यमेव जयते” स्वीकारले आहे.

… ज्या देशात सैन्याचा सर्वोच्च युद्ध सन्मान, सम्राट अशोकाच्या नावावर आहे, तो “अशोक चक्र” आहे.

… “अखंड भारत” (आजचे नेपाळ, बांगलादेश, संपूर्ण भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान) च्या विशाल भूभागावर एकहाती सत्ता गाजवणारा सम्राट, ज्याच्या आधी किंवा नंतर असा राजा किंवा सम्राट कधीच नव्हता…

… सम्राट अशोकाच्या काळात “23 विद्यापीठे” स्थापन झाली. त्यामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, कंदाहार इत्यादी विद्यापीठे प्रमुख होती. या विद्यापीठांमध्ये परदेशातून विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतात येत असत.

… “सम्राट” च्या कारकिर्दीला जगातील विचारवंत आणि इतिहासकार भारतीय इतिहासातील सर्वात “सुवर्ण काळ” मानतात.

… “सम्राट” च्या काळात भारत “विश्वगुरु” होता. तो “सोन्याचा पक्षी” होता. जनता सुखी आणि भेदभावमुक्त होती.

… ज्यांच्या कारकिर्दीत, “ग्रॅंट ट्रंक रोड” या प्रसिद्ध महामार्गासारखे अनेक महामार्ग बांधले गेले. 2, 000 किलोमीटरच्या संपूर्ण “रस्त्या’च्या दोन्ही बाजूला झाडे लावण्यात आली. “सराय” बांधण्यात आली..

 माणसं माणसं आहेत.. , प्राण्यांसाठीही, पहिल्यांदाच “वैद्यकीय गृह” (हॉस्पिटल) उघडण्यात आली. प्राण्यांची हत्या बंद झाली.

……. असा “महान सम्राट अशोक” ज्यांची जयंती त्यांच्याच देशात का साजरी केली जात नाही? तसेच सुट्टीही का जाहीर केली जात नाही?

ज्या नागरिकांनी ही जयंती साजरी करावी ते आपला इतिहास विसरले आहेत, आणि ज्यांना हे माहित आहे, त्यांना ही जयंती का साजरी करावीशी वाटत नाही हे कळत नाही हे खेदजनक आहे.

… “जो जिंकतो तो चंद्रगुप्त” होण्याऐवजी “जो जिंकतो तो सिकंदर (अलेक्झांडर)” कसा झाला??

चंद्रगुप्त मौर्याचा प्रभाव पाहूनच अलेक्झांडरच्या सैन्याने युद्ध करण्यास नकार दिला होता हे सर्वांनाच माहीत आहे. सैन्याचे मनोबल वाईटरित्या तुटले आणि अलेक्झांडरला “मागे फिरावे” लागले.

वरील सर्व मजकूर वाचल्यानंतर खरोखरच हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात यावा आणि आत्तापर्यंत जे घडले नाही ते इथून पुढे तरी घडावे.

चंद्रगुप्त मौर्यापासून सम्राट अशोकापर्यंत भारत देश आणि संस्कृतीचा संपूर्ण जगावर प्रभाव पडला होता.

सम्राट अशोक हा आपल्या देशाचा सगळ्यात मोठा राजकीय आणि सांस्कृतिक ठेवा आहे हे सर्वमान्य आहेच, म्हणूनच त्याची प्रतिके आज सुद्धा स्वतंत्र भारताची प्रतिके म्हणून आपण अभिमानाने धारण करतो. अशा या महान सम्राटाची जयंती पुण्यतिथी कुणाला माहिती आहे काय? असल्यास ती साजरी करणे आणि जीवनगाथा सर्व समाजाला ज्ञात व्हावी अशा दृष्टीने जागृती करणे हे कार्य करण्याची गरज आहे.

…. अनेक सामाजिक संस्थांना विनंती की याबाबत काहीतरी अधिक कार्यवाही व्हावी. त्यातून आपल्या महान परंपरेची आठवण आणि समाज जागृती व्हावी. मला असे वाटते सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून तर त्याचे महत्त्व अधिक आहे. सम्राट अशोकामुळे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसारच नव्हे तर अंगीकार संपूर्ण आशिया खंडात, विशेषतः पूर्व आणि दक्षिण आशियामधील सर्व देशांमध्ये झाला होता. आपल्या मातीतील सर्वश्रेष्ठ चक्रवर्ती हिंदू सम्राट त्याच्या उत्तर आयुष्यात बुद्ध धर्माचा प्रचारक झाला ही खूप मोठी आणि अभिमानास्पद घटना आहे.

शांततेचा प्रसार शक्तिमान व्यक्ती किंवा राष्ट्राकडूनच चांगला होऊ शकतो. हिंसेचा अतिरेक झाल्यानंतर शांतीचा पुरस्कार ही खूप मोठी क्रांतिकारक घटना आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युनोचा जन्म झाला. शेवटी अपरिमित मनुष्यहानी नंतरच माणसाला जाग येते, परंतु ती जास्त काळ टिकत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर शांततेचे वारे व युनोचा उदय या घटना घडून सुद्धा त्याचा परिणाम फार काळ टिकला नाही. सध्या तर सगळीकडे युद्धाचाच ज्वर पुन्हा पसरलेला दिसतो. यावेळी आपल्या भारतीय संस्कृतीतील या महान परंपरेची आठवण जागृत ठेवून जागतिक शांततेच्या दृष्टीने भारताने प्रयत्नशील राहावे. जागतिक शांततेसाठी सम्राट अशोक यांच्या जीवन कार्याची आठवण सतत जागती ठेवणं ही गोष्ट अत्यावश्यक आहे असे वाटते…… तीच चक्रवर्ती सम्राट अशोकाला सर्वात मोठी श्रद्धांजली आणि भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा सन्मान ठरेल. या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर काही हालचाल होईल का? आपण आशा करूया ! 

© श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print