मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अर्धा ग्लास ☆ संग्राहक – श्री माधव केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ अर्धा ग्लास ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

हॉटेलमध्ये वेटरकडून किंवा इतर ठिकाणी कुणाकडूनही पिण्यासाठी पाणी घेताना कृपया फक्त दोन शब्द म्हणा..‘ अर्धा ग्लास ‘–  कारण आपले दोन शब्द कुणाचे तरी प्राण वाचवू शकतात .

खरं वाटत नाही आहे ना– मग हा संदेश नक्की पूर्ण वाचा .

आज काही मित्रांना भेटायला एका हॉटेल मधे गेलेलो. विषय अर्थातच पाण्याचा होता. गप्पा चालू होत्या.  विषय जसा-जसा पुढे सरकत होता, तसं एक गोष्ट पहात होतो– अनेक टेबल्सवर लोक बिल पे करून निघून जाताना पिऊन उरलेले पाण्याचे अर्धे ग्लास तसेच राहत होते… गोष्ट अतिशय नॉर्मल अन कित्येकदा स्वतः केलेलीही अन पाहिलेलीही…

आमच्याही टेबलवर जाताना मला 4 ग्लास अर्धेच दिसले. आमच्याच नकळत घडलेलं हे—

मनाला काहीतरी खटकत होतं.

मीटिंग संपली. सगळे बाहेर आलो. मित्रांना Bye करून परत हॉटेलमध्ये गेलो. परवानगी घेतली अन वेटर्सचा जो मॅनेजर होता त्याला भेटलो. 

म्हटलं, “ हे आता जे आमच्या टेबलवरचं चार अर्धे  ग्लास पाणी होतं, त्याचं काय केलं ? “ 

तो म्हटला, “  ज्या वेटरने टेबल क्लिअर केलं असेल, त्याने ते पाणी बेसिनमधे ओतून दिलं असणार,  तेच करतो आम्ही. त्या उष्ट्या पाण्याचा काही उपयोग नाही ना आता.! “ 

“  विक-डेज मधे तासाला अंदाजे किती लोक येत असतील? ‘ मी विचारलं

“ नाही म्हटलं तरी १५  ते 20 जण सरासरी– दुपारी लंचला अन रात्री डिनरला जास्त.” त्याने सांगितलं . 

मग मी त्याला म्हटलं, “  म्हणजे १0 तास हॉटेल चालू आहे असं पकडलं, तर साधारण सरासरी २५० जण एका दिवसात हॉटेलला येतात. हेच शनिवार रविवार दुप्पट होणार. त्यातून तुमचं हे छोटं हॉटेल. मोठ्या हॉटेल्सची हीच संख्या हजारात असणार ! म्हणजे सरासरी रोज ३५० जण. यातल्या साधारण 200 जणांनी जरी अर्धा किंवा एक ग्लास पाणी न पिता तसंच ठेवलं, तर अंदाजे १00 लिटर पाणी बेसिनमधे “रोज वाया”. म्हणजे एक हॉटेल कमीतकमी १00 लिटर “अतिशय चांगलं अन प्रोसेस्ड पाणी” बेसिन मधे रोज ओतून देतं. हे पाणी ड्रेनेजमधून जाऊन शेवटी नदीच्या इतर ‘घाण’ पाण्यात मिसळतं. “ 

पुण्यात सध्या अंदाजे छोटे मोठे पकडून ६000 च्या वर हॉटेल्स आहेत– म्हणजे दिवसाला 6000*100 लिटर– म्हणजे 6 लाख लिटर  प्यायचं पाणी आपण रोज नुसतं ओतून देतोय. आता या घडीला हे झालं एका दिवसाचं.  असं आठवड्याचं म्हटलं तर ४2 लाख लिटर, अन वर्षांचं म्हटलं तर 22 कोटी लिटर शुद्ध पिण्याचं पाणी आपण फक्त ओतून देतोय.

या पाण्याला शुद्ध करायचा आलेला खर्च वेगळाच.

हे झालं एका शहराचं– अशी महाराष्ट्रात कमीत कमी १५ मोठी शहरं आहेत .

बरं हे कोणत्या देशात घडतंय??—तर जिथं सरकारी आकडेवारीनुसार दर ४ तासाला एक जण ‘शुद्ध पाण्याअभावी’ होणाऱ्या डायरियासारख्या रोगाने मरतोय, त्या देशात.

म्हणजे एकीकडे लोक पाण्यावाचून तडपून मरतायत.  अन दुसरीकडे  एवढं शुद्ध केलेलं पाणी आपणच मातीत मिसळतोय.

आपण जे वाया घालवतोय, ते शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी आहे— ” उद्या शेतकऱ्याच्या गळ्यात पडणारे फास आपण आपल्या हातानेच एका बाजूला आवळत असताना, दुसऱ्या बाजूला आपणच त्यांना वाचवायच्याही बाता करतोय “…

हे सगळं थांबू शकतं, फक्त तुमच्या ओठातून येणाऱ्या “दोन” शब्दांनी….. 

इथून पुढं कधीही वेटर वा इतर कोणीही तुमच्यासमोर  ग्लासमधे पाणी ओतत असेल, तर त्याला फक्त एवढंच म्हणा —–’ अर्धा ग्लास !! ‘

ह्याने तुम्हाला लागेल एवढंच पाणी तुम्ही घ्याल अन उरलेलं पाणी वाचेल.  हॉटेलचं वाचलं म्हणजे नगरपालिकेचं, नगरपालिकेचं वाचलं म्हणजे धरणांचं अन धरणांचं वाचलं म्हणजे “आपलंच..!!”

हे वाचलेले पाणी शेतकऱ्याला वा पाण्याअभावी मृत्यु पावणाऱ्या लोकांना  मिळेल.

याची सुरुवात आपण फक्त दोन शब्द बोलायची सवय लावून करायची आहे.

फार छोटी गोष्ट,  पण तुमचे दोन शब्द तुमचेच 22 कोटी लिटर पाणी वाचवू शकतात. कृपया आपण जे निर्माण करत नाही, ते कमीतकमी वाचवूयात तरी … आपल्याच माणसांचे प्राण वाचवण्यासाठी…!!

 ( हाच उपाय आपण घरीपण करूया ) 

 

संग्राहक – सुश्री मानवी केळकर/श्री माधव केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शांतपणाने केवळ अलिप्त व्हा.. ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ शांतपणाने केवळ अलिप्त व्हा.. ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

ताज्या फुलांचे आपल्याला कोण कौतुक असते. आणि ती देवाच्या पायांवर वाहिली की आणखी आनंद होतो. फुले घेताना ती ‘माझी’ असतात. पण देवाला वाहिली की ‘त्याची’ होतात…… किती शांतपणे आपण हे स्वीकारतो. अगदी अलिप्त होतो…..    ‘ज्याचे होते त्याला दिले’…. फक्त हा भाव मनात असतो. त्या फुलांची ओढ संपलेली असते.

काल वाहिलेली फुले आज शिळी होतात. निर्माल्य होऊन जातात. मग निरिच्छ मनाने, ती उचलून आपण गंगार्पण करतो…….त्यांच्याप्रती आपल्याला कोणताही मोह नसतो. अपेक्षा नसते. हे कसे सोडू? हा प्रश्न नसतो. पुन्हा त्यांची आठवणही येत नाही. 

अगदी तसेच, आपली दु:खे  ‘त्याच्या’ चरणावर वहायची आणि शांत होऊन जायचे….

त्यांच्याप्रती कोणतीही भावना बांधून ठेवायची नाही…….. आतापर्यंत जी ‘माझी’ दु:खे होती, ती आता ‘त्याची’ झाली. त्यांचा कसला विचार करायचा…..आणि कालची दु:खे तर, आज निर्माल्य झाली. त्यांचा मोह नाहीच धरायचा. त्यांना कवटाळून बसण्याचा काहीच उपयोग नसतो.

शिळ्या फुलांप्रमाणे, मग ती सडायला लागतात. आणि मग मनाला पोखरायला लागतात….म्हणूनच जोपर्यंत ती  निर्माल्य आहेत, तोपर्यंतच गंगार्पण करून मोकळे व्हायचे. 

आज पेरण्यासाठी आपण आनंद आणू ना. धान्याची पेरणी करताना, जशी जमिनीची  मशागत करतात…..तशी मनाची साफ-सफाई करु…. आणि तिथे आनंद पेरु या. तो शतपटीने उगवून येतो…. त्याची जोपासना करु….. त्याचा परतावा जीवन समृद्ध करतो.  म्हणूनच …..

 

“दु:ख सोडून द्यावे,

निर्माल्य बनून जाते.

आनंद पेरत जावा,

समाधान बनून रहाते.”

 

संग्राहक : श्री अनंत केळकर   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मुलांना कसे वाढवावे? भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ मुलांना कसे वाढवावे? भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(कौशिक प्रकाशन, सातारा, यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी झालेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार मिळालेला लेख.)

मुलांना कसे वाढवावे?

((पालकांनी घरात शिक्षकांबद्दल अनुद्गार काढू नयेत. त्याचा परिणाम म्हणून  मुलांच्या मनात  त्यांच्याविषयी अढी बसते.) इथून पुढे —

मुलांना मैदानी खेळांमध्ये भाग घ्यायला जरूर पाठवावे .त्यामध्ये यश- अपयश हे ठरलेलेच असते. त्यामुळे यशाच्या आनंदाबरोबर अपयशही पचविण्याची सवय होते. यश- अपयशाच्या पलीकडे जाऊन ,भविष्यकाळ कसा घडवता येतो, याची उदाहरणे त्यांच्या मनावर लहानपणापासूनच बिंबवायला हवीत. अब्दुल कलाम, नरेंद्र मोदी, नारायण मूर्ती, अंबानी, अमिताभ बच्चन , सचिन तेंडुलकर ,हे काही एका क्षणात मोठे झालेले नाहीत .त्यांची जिद्द, आत्मविश्वास ,प्रयत्नांची पराकाष्ठा, शिस्त, आदर्शाचा अंगीकार आणि आत्मपरीक्षण मुलांच्या समोर, शाळेत व घरात दाखवायला हवे. मुलांच्या हित- अहिताच्या गोष्टींची समजुतीच्या शब्दात त्यांना जाणीव करून द्यायला हवी .’कसे जगावे,’ याबाबत व्यायाम, प्राणायाम, ध्यान ,भाषणे यांच्या माध्यमातून भरणाऱ्या शिबिरांना त्यांना जरूर पाठवावे .त्यातून खूप फरक पडतो ,असा माझा अनुभव आहे. व्यायामाबरोबर आहार शक्य तितका शाकाहारी व सात्विक देण्याची जबाबदारी पालकांची आहे असे मला वाटते. शक्यतो बाहेरचे आणि जंक फूड खाणे योग्य नाही. दुष्परिणाम लगेच दिसत नाहीत. पण  स्लो पॉइझनिंग सुरू होते. घरात ताणतणाव वाटल्यास, घरात स्वास्थ्यसंगीतही लावावे.

मुलांना वाढवत असताना घर, शाळा याबरोबरच बाहेरच्या समाजातही ती वाढत असतात. एखाद्या मुलाचा पाय घसरला असे वाटत असेल तर ,इतरांनी ती गोष्ट पालकांना सांगायला हवी व त्याबद्दल पालकांनी राग मानू नये. तरुण पिढीला सर्वांनी मिळून घडवायला हवे .ब्ल्यू व्हेल, सारख्या चोकिंग गेम , हफिंग, डस्टिंग ,एबीसी स्क्रँचिंग अशा सगळ्या गेम्सवर सरकारकडून बंदी आणण्याचे प्रयत्न करायला हवेत. आर्थिक आणि सामाजिक कारणांमुळे अडचणीत असलेल्या मुलांना सामाजिक पाठबळ देऊन, ‘समाज आणि मुलांचे वाद सामंजस्याने मिटविणारी व्यासपीठे’ व्हायला हवीत. अध्यात्मिक विचारधारेतून त्यांच्यामध्ये उत्साह व महत्त्वाकांक्षा निर्माण केली पाहिजे. “नीरक्षीरविवेक आत्मनात्मान “.

मनुष्यजन्म ही परमेश्वराची महान देणगी आहे. आयुष्य हे जन्म आणि मृत्यू यामधील प्रवास आहे .तो प्रवास वाटेत  गाडीतून उडी न मारता, सर्वांसोबत आनंदाने ,उत्साहाने, खेळीमेळीने असा करावा.  ‘आनंद ‘ हा इप्सित स्टेशन पर्यंत गोळा करत रहावा . गेलेला काळ परत मिळत नाही.  आलेल्या अडचणींचा स्वीकार करून, त्यांना पुढे जायला प्रवृत्त करायला हवे. लहानपणापासून मुलं खरोखरीच आदर्श विचारधारेत वाढली तर ती म्हणत रहातील,—-

“आज जाणिले,आम्ही जन्मलो राजहंस की होण्यासाठी,

आज जाणिले, या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी.”

——आणि हेच पद ती मुलं मित्रांमध्ये पसरवतील.

शेवटी सांगावसं वाटतं की, खरोखरीच पाल्यांच्या बाबतीत पालक काळजीत पडलेले आहेत. प्रत्येकालाच आपली मुलं सद्गुणी, सद्वर्तनी, स्मार्ट व्हायला हवीत असं वाटत असतं. स्वतः पाल्य, पालक ,शाळा आणि समाज सगळ्यांनी जर या बाबतीत जागरूकता दाखवली तर, सुदृढ

व्यक्तिमत्व असलेली तरुण पिढी ,जी राष्ट्राचा आधार आहे ,ती राष्ट्रोद्धारक होईल यात शंका नाही. हीच पिढी भारताला महासत्ता बनविणार आहे. ही गोष्ट एकट्या दुकट्याने करण्याची नाही, तर सर्वांनी मिळून, सर्वांच्या मुलांसाठी हातभार लावायला हवा, असे आवर्जून म्हणावेसे वाटते..

ॐ सहनाववतु सहनौभुनक्तु ।
सह वीर्यं करवावहै
तेजस्विनावधीतमस्तु ।
मा विद्‌विषावहै
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ।

समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक स्टाफ रुम…..☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

? मनमंजुषेतून ?

☆ एक स्टाफ रुम ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

 

शुभ्र आच्छादनाखाली निश्चेष्ट, प्रेतवत पहुडल्या गाद्या उचलताना

तो मिश्किल हसत रहातो —-

इतस्ततः पसरलेल्या कागदी बोळ्यांना, चुरगळलेल्या कागदी कपांना

शेंगांच्या फोलांना अन फळांच्या सालींना

प्रश्न एक विचारतो —-

“घरेही यांची अशीच असतात का ? स्वच्छतेचे धडे देणारे गुरू न गुरुमाऊली

सार्वजनिक स्वच्छतेचे धडे स्वतः गिरवत नसतात  का ?—-

कुबट गाद्या कुत्सित हसून साक्ष देतात—

डेस्कवरील चहाचे चिकट डाग ओठ गच्च मिटतात !

पांचट विनोद ,राजकारण अन गावगप्पांचे आवाज हिंदळत राहतात भिंतीवर —-

ऑफ तासाला चघळत नाहीत कुणी–  विद्यार्थ्यांचे  जटील प्रश्न जिभेवर !

चटकदार खमंग वास अधून मधून दरवळतात भिशी पार्टीचे—

चघळत असतो कुणी शिष्य–डब्यातले कोरडे घास  चटणी भाकरीचे—-

“विठ्ठल नामाची शाळा भरली …” दूरवरून एक आवाज रेंगाळतो कानावर–

कल्पनेतली शाळा आकार घेते मनावर–

झटकतो आच्छादन अन मनातले विचार—

शिपाई तो शाळेतला निमूटपणे करतो–  शेवटी रूढ पायंडयाचा  स्वीकार !!

 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीज्ञानेश्वरी ‘जयंती’चा रोचक इतिहास ☆ संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

? इंद्रधनुष्य ? 

☆ श्रीज्ञानेश्वरी ‘जयंती’चा रोचक इतिहास ☆ संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने ☆ 

भाद्रपद वद्य षष्ठी ही तिथी श्री ज्ञानेश्वरी जयंती म्हणून साजरी करण्यात येते. अर्थात श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी हा ग्रंथ या दिवशी लिहून पूर्ण केला असा काहींचा समज झाला असेल.  परंतू  ते खरे नाही. पैठणनिवासी शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांनी इ.स.१५८४ साली याच तिथीस या ग्रंथाची शुद्धप्रत तयार करुन पूर्ण केली. 

झाले असे की, समाधीस्थानात गळ्याभोवती विळखा घातलेली अजानवृक्षाची मुळी काढण्याच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वरमहाराजांनी संत एकनाथमहाराजांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि आळंदीला बोलावून घेतले. नाथमहाराज आळंदीला आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की , माऊलींची समाधी सापडत नाहीये. परिसरात चौकशी केली तर असे कोणते स्थान येथे असल्याचे खात्रीलायक कोणाला माहित नसल्याचे कळले. यदाकदाचित समाधी असली तरी ते स्थान नेमके कोणते हे सांगता येत नाही असे कळले.

आपल्याबरोबर आलेल्या भक्तमंडळीना इंद्रायणी नदीच्या तीरावर थांबायला सांगून नाथमहाराज तेथील जंगलसदृश्य परिसरात गेले. माऊलींच्या समाधीचा परिसर काट्याकुट्यांनी व्यापला होता. त्यातच परिसरात असलेल्या अनेकानेक समाध्या ! मग यातील नेमकी माऊलींची समाधी कोणती? हा प्रश्न पडला. मग एका स्थानावर बसून नाथ महाराजांनी माऊलींचे ध्यान लावले. (हे स्थान म्हणजे हल्ली माउलींच्या समाधी मंदिरात असलेला ‘शांतिब्रह्म श्री संत एकनाथमहाराज पार’ होय.) ज्ञानेश्वरमहाराजांनी समाधीच्या आत येण्याचा निर्देश केला.  त्याप्रमाणे नाथमहाराज नंदीखालील द्वारातून आत गेले. तेथे श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे ते दिव्य अलौकिक स्वरूप पाहून नाथ हरखून गेले.

श्री ज्ञानदेवे येऊनि स्वप्नात !

सांगितली मात मजलागी !!

दिव्य तेज:पुंज मदनाचा पुतळा !

परब्रह्म केवळ बोलतसे !!

अशी त्यांची भावना झाली. चर्चा सुरु असताना श्रीज्ञानेश्वरीमध्ये समाविष्ट झालेल्या, हेतुपुरस्सर टाकल्या गेलेल्या आगंतुक ओव्यांनी माऊली व्यथित झालेे असल्याचे नाथमहाराजांनी जाणले. त्यांना त्यात योग्य ती सुधारणा करण्यासाठी अधिकारसंपन्न व्यक्तीची आवश्यकता होती व ती नाथ महाराजांच्या रुपाने पूर्ण होणार होती. त्यामुळे अजानवृक्षाच्या मुळीचे निमित्त करुन माऊलींनी नाथमहाराजांना बोलावून घेतले होते. या दोन महात्म्यांचा श्रीज्ञानेश्वरीसंदर्भाने समाधीत तब्बल तीन दिवस संवाद चालला. 

तीन दिवस झाले तरी नाथमहाराज परत न आल्याने बरोबर आलेल्या भाविकांच्या मनात घालमेल होऊ लागली. भक्तांचे हाल होऊ नयेत यासाठी श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी वाण्याचे रुप घेतले व नाथ महाराजांनी तुमची शिधापाण्याची व्यवस्था लावण्याचे सांगितले असल्याचे त्यांना सांगितले. 

समाधीस्थानातून बाहेर आल्यावर सर्व भाविकांना माऊलींच्या समाधीचे दर्शन घडावे या हेतूने नाथ सर्वांना त्या स्थानी घेउन आले व सर्वांना माऊलींचे दर्शन घडविले. समाधीचा शोध लावल्यानंतर समाधीचा जीर्णोद्धार केला, मूळ गाभारा बांधला, मंदिर परिसर सुशोभित केला, नित्य पुजेची व्यवस्था लावली व आळंदीची कार्तिकीयात्रा पुन्हा सुरु केली. 

या नंतर वर्षभरातच श्री संत एकनाथमहाराजांनी श्रीक्षेत्र पैठण येथे श्रीज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. त्याची पूर्णता ज्या दिवशी झाली तो दिवस म्हणजे भाद्रपद वद्य षष्ठी ! आणि तोच दिवस 

“ श्रीज्ञानेश्वरी जयंती  ‘ म्हणून वारकरी संप्रदायात साजरा करण्यात येतो.

श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी इ स १२९० मध्ये ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली.  परंतू  समाप्तीची तिथी न लिहिल्याने श्रीज्ञानेश्वरी जयंतीचा नेमका दिवस कोणता ? हे सांगता येत नाही. 

पुढील काही काळात नाथमहाराजांनी महाराष्ट्र आणि बाहेरीलही श्रीज्ञानेश्वरीच्या शेकडो प्रती जमा करुन शुद्ध प्रती  तयार केल्या व शुद्धप्रती परत  पोचत्या केल्या. 

आज ज्या श्रीज्ञानेश्वरीचे आपण पारायण करतो, ती श्री नाथमहाराजांनी शुद्ध केलेली आहे. म्हणून नाथमहाराज हे श्रीज्ञानेश्वरीचे आद्य संपादक आहेत. एवढेच नाही,  तर ते मराठी वाङ्मयाचेही आद्य संपादक ठरतात. श्रीएकनाथमहाराजांनी ग्रंथाच्या शेवटी चार ओव्या लिहून ठेवल्या आहेत,

 त्या अशा –

शके पंधराशे साहोत्तरी ! तारणनाम संवत्सरी !

एकाजनार्दने अत्यादरी ! गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली !!१!!

 

ग्रंथ पुर्वीच अतिशुद्ध ! परि पाठांतरी शुद्ध अबद्ध !

तो शोधुनिया एवंविध ! प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी !!२!!

 

नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका ! जयाची गीतेची वाचितां टीका ! 

ज्ञान होय लोकां ! अतिभाविकां ग्रंथार्थिया !!३!!

 

 बहुकाळ पर्वणी गोमटी ! भाद्रपद मास कपिलाषष्ठी !

 प्रतिष्ठानी गोदातटी ! लेखन कामासाठी संपूर्ण जाहली !!४!!

हा आहे श्रीज्ञानेश्वरी ‘जयंती’चा इतिहास ! 

(संकलन- श्री सद्गुरू ह.भ.प श्री योगीराज महाराज गोसावी ( पैठणकर )- शांतिब्रह्म श्रीमंत  श्रीसंत एकनाथ महाराज यांचे 14 वे वंशज.).

जय ज्ञानेश्वर…. जय एकनाथ—–

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मुलांना कसे वाढवावे? भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ मुलांना कसे वाढवावे? भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(कौशिक प्रकाशन, सातारा, यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी झालेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार मिळालेला लेख.)

(पौगंडावस्थेतील मन अत्यंत संवेदनशील असल्यामुळे चांगले किंवा वाईट लक्षात न घेता कोणत्यातरी आकर्षणाच्या मागे धावायला लागते, असं मानसोपचार तज्ञांचं मत आहे.) —– इथून पुढे—-

मुलांना वाढवत असताना  त्यांच्या वयाचा विचार करता, अगदी लहानपणापासून ते सात आठ वर्षापर्यंतची ,आणि नऊ दहा वर्षापासून ते  टीनएज पर्यंतची ,व पुढची मुलं असा विचार करावा लागेल .अगदी लहान असताना मुलं अनुकरणातून शिकत असतात. बिंब जसे असेल तसेच प्रतिबिंब पडणार. त्यामुळे पालकांनी आपल्यापासून सुरुवात करावी. त्यांना संस्कार वर्गाला पाठवावं. ज्यायोगे त्यांच्या वर्तणुकीत फरक पडतो .मूल थोडे मोठे झाले की, शाळेत जायला लागते.  घरी आल्यानंतर घरात कोणीतरी असले की त्याला आनंद होतो. शाळेत घडणाऱ्या गोष्टी सांगायला त्याला कोणीतरी हवं असतं. त्याला आधार हवा असतो. त्यामुळे त्याला प्रेमाचा ओलावा मिळतो.  ऊब मिळते. एक उपाय मला आवर्जून सांगावासा वाटतो की, वृद्धाश्रम आणि बालवाड्या जवळ-जवळ असाव्यात.  त्यांना एकमेकात मिसळून द्यावे. ज्यायोगे, वृद्धांना बोधपर ,प्रेरणादायी अशा गोष्टी मुलांना सांगता येतील. मुलांनाही आजी-आजोबा, आणि वृद्धांना नातवंडांचा सहवास मिळेल. मुलं थोडी मोठी झाली की, स्वतःचे स्वतः काही प्रमाणात निर्णय घ्यायला लागतात. त्यांना ते तसे घेऊ द्यावेत. चूक होणे स्वाभाविक आहे .पण अशा वेळी सतत चुकीचा पुनरुच्चार न करता,

चुकीची दुरुस्ती करून सांगावी. “तुला काय येतय? तो बघ किती हुशार आहे”. असं म्हणून आपल्या मुलाची सतत दुसऱ्या मुलांशी तुलना करू नये. त्यांना आश्वासक अशा सहवासाची, प्रेमाची गरज असते .बऱ्याच वेळा आपणच त्यांना समजून घ्यायला कमी पडतो असं मला वाटतं .चूक स्वीकारणं, चूक सुधारणं आणि चुकायचं टाळणं हे त्यांना पटवलं पाहिजे. भूतकाळातील चुका,  त्यासाठीच्या शिक्षा या भविष्यकाळातल्या यशाच्या पायऱ्याही बनू शकतात. मुलं पौगंडावस्थेत आली की, संवेदनशील बनतात. त्यांचं  स्वतःचं  एक व्यक्तिमत्व घडत असतं. त्यांना कोणी अपमान केलेला आवडत नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे त्यांनी करावी ,अशी पालकांनी अपेक्षा बाळगणं योग्य नाही. त्याच्या कुवतीप्रमाणे अपेक्षा बाळगाव्यात. नाहीतर “श्यामची मम्मी” नाटकातील श्यामची अवस्था पहावी लागेल. जे पालक मुलांना चुकांमधून शिकण्याची हिम्मत देतात, चुका दुरुस्त करून सांगतात ,तेच पालक मुलांसमोर आदर्श ठरतात. अभ्यास करताना, त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकून, विचारविनिमय करून, प्रोत्साहन दिलं तर, ती एक पाऊल नक्कीच पुढे टाकतील. या वयात मुलांना विरुद्धलिंगी आकर्षण वाटणे नैसर्गिक आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार किंवा अतिरेक होत नाही ना, इकडे लक्ष द्यायला हवे. त्यांचे मित्र मंडळ कसे आहे? मुलाचं वागणं कसं आहे? याकडेही लक्ष द्यायला हवं .आजच्या विज्ञान युगात मुलांसोबतचा संवाद हरवत चाललाय. पालकांनी कौटुंबिक सुसंवाद आणि मित्रत्वाचं नातं जपायला हवं. सामाजिक प्रतिष्ठेपायी मुलांनी अमुकच व्हायला हवं, असं त्यांच्यावर दडपण आणलं आणि अपेक्षाभंग झाला तर सर्वांनाच निराशाजनक समस्यांना तोंड द्यायची वेळ येते.

मुलांचा जवळ-जवळ  अर्धा दिवस शाळेत जातो. त्यामुळे ती बऱ्यापैकी शाळेत घडतच असतात .वाढत असतात. अधून मधून पालकांनी शिक्षकांकडे पाल्याबाबत चौकशी करावी. शिक्षकांनीही शुद्ध चारित्र्य ठेवायला हवे. तर-तम भाव न ठेवता, मुलांना समान वागणूक द्यायला हवी .शिक्षणात विद्यार्थ्याचा कल कुणीकडे आहे, हे शिक्षकांनी पालक सभा घेऊन सांगावे.  पालकांनी घरात शिक्षकांबद्दल अनुद्गार काढू नयेत. त्याचा परिणाम म्हणून  मुलांच्या मनात  त्यांच्याविषयी अढी बसते.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दूरचे दिवे…. ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ दूरचे दिवे…. ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

लहानपणी एक गोष्ट वाचल्याचे आठवते —-

—- बादशहाने यमुना नदीत रात्रभर उभ्या राहिलेल्या माणसाला बक्षीस दिले. 

पण पोटदुखी झालेल्या दरबाऱ्यांनी म्हटले—’ याला नदीकाठी दिवे होते, त्याची ऊब मिळाली, म्हणून तो उभा राहिला, याला बक्षीस देऊ नये महाराज। ‘

यावरूनच मनात आले —- दूरचे दिवे हे कधी कोणाला ऊब देतात का ? ते दूर असतात,आणि त्यांनी ऊब द्यावी ही अपेक्षाच चुकीची आहे ना. व्यवहारात बघा–या दूरच्या दिव्यांचा, रोषणाई- व्यतिरिक्त काही उपयोग नसतो। मिरवणुकीत झगमगाट करतात, आणि मिरवणूक संपली,की  लोक त्यांना विसरूनही जातात.

अलीकडेच बघा, घरटी एक मूल परदेशात स्थाईक झालेले आढळते. त्यांचे आईवडील, त्या मुलांचे, नातवंडांचे फोटो, मोठ्या अभिमानाने आणि कौतुकाने सगळ्यांना दाखवत असतात. बघणाऱ्याला काहीवेळा त्यांचे ते कौतुक  ऐकूनच उबग येतो. पण बोलणार कोण,आणि त्यांच्या उत्साहाला टाचणी लावणार कशी, आणि  का ? रमतात बिचारे स्वप्नरंजनात, तर रमेनात का—

पण खरी परिस्थिती त्यांनाही चांगलीच माहीत असते. मग नातवंडांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या, की हे तिकडे 2 महिने जातात, आणि सुट्टी संपली,की मायदेशी परत येतात.

या संदर्भात लेखिका मंगला गोडबोलेंचा, ” बाल्टिमोरची कहाणी “ हा अतिशय सुंदर लेख मला नेहमी आठवतो. किती परखड आणि सत्य लिहिलंय त्यांनी – तिकडे असलेल्या मुलांचे तोंड फाटेपर्यंत कौतुक, आणि इथे सतत जवळ राहून, हवे नको बघणाऱ्या मुला- सुनेला दुय्यम स्थान.– जसजसे वय वाढू लागते, तसे परदेशवाऱ्या झेपेनाशा होतात.

तिकडे सिटीझनशीप घेऊन कायमचे राहणाऱ्या लोकांना मी भेटलेय, बोललेय.

ते लोक 40 -45 वर्ष तिकडेच राहिलेले असतात. त्यांची कोणतीही मुळे भारतात रुजलेली रहात नाहीत. त्यांची पूर्ण मानसिक तयारी असते,की आपल्याला वृद्धाश्रम हाच पर्याय उरतो.

सुना अमेरिकन, जावई व्हिएतनामी, आणखी एखादी सून चिनी, –असले सगळे विविधदेशीय लोक, या म्हाताऱ्यांना कशाला हो विचारतात. 

पण तरी ते मात्र सांगत असतात, की आम्हीच oldage होम हा पर्याय निवडलाय.

–एका अमेरिका भेटीत मी बघून आले ते वृद्धाश्रम.  काळे,गोरे, चिनी, मराठी, पंजाबी,असे अनेक वृद्ध तिथे होते. ना आपुलकी,ना प्रेम। पण काळजी, कर्तव्यात मात्र कमी नाही.

भरपूर पैसे मोजावे, आणि रहावे. आता आता, तिथल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन, आपल्या colonies करायला सुरुवात केलीय–इथल्या ‘अथश्री ‘सारख्या.

मला तिकडे एक आजी दिसल्या.  मी जवळ जाऊन त्यांच्याशी बोलले.

त्या म्हणाल्या, “ मी जर माझ्या गोऱ्या सासूला एकही दिवस सांभाळले नाहीये, तर माझ्या सुनेकडून मी कशी अपेक्षा करावी ,की  ती गोरी सून मला कायमचं घरी ठेवून घेईल.”

त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. म्हणाल्या, ” भाग्यवान हो तुमची आई. ८५  वर्षाची आहे, पण तुम्ही बहिणी संभाळताय.–माझी तक्रार नाही, पण इथे नको वाटते ग. संध्या छाया भिववतात.

माझा मुलगा सून चांगले आहेत हो. नवराही छानच होता. त्या काळात मी अमेरिकन नवरा केला,तर भारतात माझे आई वडील नुसते संतापले होते. बरोबरच  आहे ग. आता समजतो मला त्यांचा संताप. पण  4 वर्षांपूर्वी नवरा  गेला,आणि माझे घरच  गेले. मुले मला एकटी राहू देईनात.मग काय, हेच माझे घर आता. नशिबाने पैसा आहे, म्हणून या चांगल्या वृद्धाश्रमात  रहाणं परवडतेय मला.  नाही तर कठीण होते बाई सगळेच. “ 

माझ्या पोटात  कालवले ही कहाणी ऐकून.

मला त्यांनी विचारले, “ काय ग, इंडियात नसतील ना असे वृद्धाश्रम ? किती छान असेल तिथले म्हातारपण ? “ 

कोणत्या तोंडाने त्यांना मी सांगणार होते, की “ आजी असे अजिबात नाहीये. पैश्याच्या ओढीने तिकडेच गेलेली मुले, नाईलाजाने का होईना, पण एकाकी उरलेल्या आई किंवा वडिलांना ठेवतात हो वृध्दाश्रमात. एवढेच कशाला, परदेशात नसूनही, आई बाप नकोसे झालेली मुलेही कमी नाहीत—-” 

पण हे काहीही न बोलता, मी त्यांना वाकून नमस्कार केला. बरोबर आणलेला खाऊ त्यांना दिला— “ इथे आहेस तोवर येत जा मला भेटायला. मराठी बोलायलाही कोणी नाही ना ग इथे.” —–खिन्न मनाने मी मुलीबरोबर परत आले. तिला म्हणाले, “ बाई ग, इथे नका हं राहू म्हातारपणी. हा देश आपला नाही ग बाई. “ 

मुलगी माझ्या जवळ बसली. म्हणाली, ”आई,तू का रडतेस? बघू,ग आम्ही. येऊ परत साठ  वर्षाचे झालो की.”

पण मला मनातून माहीत आहे की –’ सिंहाच्या गुहेत गेलेली सशाची पावले, परत आलेली कोणी बघितली आहेत का.?’

 पुन्हा विचार केला–म्हणजे मनाला समजावलं — देश सोडण्याचा निर्णय त्यांचा, त्याचे भले बुरे परिणाम भोगायची तयारीही त्यांचीच—-

—निमूट बॅग भरली, आणि ठरलेल्या वेळी माझ्या देशात परत यायला निघाले ।—

 विमानाने टेकऑफ घेतला. मी अगदी सहज खिडकीतून बाहेर बघितलं —–

 अमेरिका दिव्यांनी नुसती झगमगत होती. हळूहळू विमान आकाशात उंच झेपावलं —- इतका वेळ झगमगणारे दिवे पुसट पुसट होत गेले, आणि एका क्षणी दिसेनासेच झाले—–का कोण जाणे, पण नकळत हसू आलं —- आणि झर्रकन मनात विचार आला —- 

“ दिवे असोत, की माणसे असोत, दूर असले की ऊब मिळण्याची अपेक्षा व्यर्थच ठरणार .” 

©  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फिरूनी पुन्हा जन्मेन मी.. ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ फिरुनी पुन्हा जन्मेन मी ! ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

मध्यप्रदेशाची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये एप्रिल आणि मे मध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला होता. गेल्या चार महिन्यात भोपाळच्या भदभदा विश्रामघाटावर सात हजाराहून अधिक मृतदेहांवर अंतिम संस्कार झाले. दररोज होणारे शेकडो लोकांचे मृत्यु आणि रात्रंदिवस जळणाऱ्या चिता यामुळे हा विश्रामघाट चर्चेत आला होता. भोपाळच्या याच बहुचर्चित भदभदा विश्रामघाटावर सध्या एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे. हा प्रेरणादायी प्रयोग भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात पहिल्यांदाच घडतो आहे, ही एक अभिमानाची गोष्ट आहे.

स्मशानभूमीशेजारी असलेल्या मोकळ्या जागेमध्ये कोरोनामध्ये जीव गमावलेल्या आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ एक आगळेवेगळे कोविड स्मृतीवन निर्माण केले जात आहे. बारा हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर असलेल्या जमिनीवर जपानचे मियावाकी तंत्रज्ञान वापरुन हे नवे घनदाट उद्यान फुलवण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोरोना महामारीमुळे ज्यांचे अंतिम संस्कार या स्मशानभुमीमध्ये झाले, त्या सर्व मृतदेहांची राख या उद्यानातील झाडांसाठी खत म्हणून वापरली जात आहे. या बागेमध्ये पन्नासहून अधिक प्रजातींच्या तब्बल साडेचार हजार वृक्षांची रोपं लावली जाणार आहेत. नुकतीच या उपक्रमाची सुरुवात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि त्यांच्या पत्नी साधना सिंग यांच्या शुभहस्ते करण्यात आली. 

उद्यानासाठी लागणारी माती विश्रामघाटातील राख, सुपीक काळी माती, शेणखत यांच्या मिश्रणापासून तयार केली गेली. कोरोनाने हिरावून घेतलेल्या आपल्या आप्तस्वकीयांच्या आठवणी वृक्षारोपणाच्या माध्यमातून कायमच्या जतन करण्यासाठी सात जुलैच्या संध्याकाळपर्यंत हे उद्यान सामान्य जनतेसाठी खुले ठेवण्यात आले होते. या आवाहनाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. आपल्या प्रिय स्वजनांना गमावल्यामुळे व्याकूळ झालेल्या लोकांनी या उद्यानाच्या निर्मितीमध्ये मोठा हातभार लावला. आपली प्रिय व्यक्ती, तिच्या आठवणी एका वृक्षाच्या रुपात कायमच्या जतन केल्या जातील या भावनेने त्यांच्या मानसिक आघातावर फुंकर घालण्याचे काम केले. 

भदभदा विश्रामघाटाचे सचिव ममतेश शर्मा यांनी सांगितले की एप्रिल-मेमध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या भीषण लाटेमध्ये अनेक लोक केवळ अस्थी घेऊन जात होते. मात्र संसर्गाच्या भीतीने मृतदेहाची राख सावडण्यास कोणीही तयार नव्हते. पंचवीस डंपर एवढे भस्म या विश्रामघाटावर साठले होते. या राखेच्या डोंगरांचे काय करावे असा प्रश्न  उपस्थित झालेला असताना या राखेचा वापर करुन जपानी पद्धतीच्या मियावाकी पद्धतीने दाट वनराईची निर्मिती केली जाऊ शकते अशी एक कल्पना पुढे आली आणि त्यातून या श्रीरामवनाचा जन्म झाला. 

मियावाकी पद्धतीने लागवड केलेली रोपं दुप्पट वेगाने वाढतात. त्यांचा टवटवीतपणा तीव्र उन्हातही टिकून राहतो. या पद्धतीने लागवड केलेल्या वनांचे तापमान आजूबाजूच्या परिसरापेक्षा तीन ते चार अंशांनी कमी असते. येत्या पंधरा ते अठरा महिन्यांमध्ये या इवल्या इवल्या रोपांचे मोठ्या वृक्षांमध्ये रुपांतर होवून लवकरच या ओसाड जागेचा कायापालट होईल. स्मशानभूमीत नंदनवन फुलवणे हे एक मोठे आव्हान होते. कोरोना महामारीच्या आणि भुताखेतांच्या भीतीमुळे चिताभस्मापासून खत तयार करण्याच्या कामास कोणीही तयार नव्हते. शेवटी भोपाळमधील मास्टर ऑफ सोशल वर्क या पदव्युत्तर महाविद्यालयाच्या तरुणांनी हिरीरीने पुढाकार घेतला आणि या उद्यानाची पायाभरणी झाली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आपल्या सर्वांना ऑक्सिजनचे महत्व समजले. रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने आपल्या प्रियजनांना वाचवण्यासाठी ऑक्सिजन बेडच्या शोधात वणवण भटकणारे हवालदिल आणि चिंताग्रस्त लोक पाहून ऑक्सिजनला प्राणवायू का म्हणतात त्याची जाणीव प्रत्येक भारतीयाला झाली. भदभदा विश्रामघाटात जी घनदाट वनराई आकार घेत आहे, त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती होईल. ही झाडे मोठी होवून येणाऱ्या काळात लोकांना या वनामध्ये छान हवा उपलब्ध होईल. मोकळा श्वास घेता येईल. या रोपांचे वृक्षांमध्ये रुपांतर होईपर्यंत त्यांची निगा राखण्याची जबाबदारी घाट प्रबंधन समितीकडे सोपवण्यात आली आहे. भारताच्या प्रत्येक स्मशानभूमीमध्ये अशा प्रकारची हिरवीगार दाट वनराई उभी केली तर मृताम्यांना खरी श्रद्धांजली मिळेल आणि पर्यावरणाचा, दूषित हवेचा गंभीर प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत होईल.

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मुलांना कसे वाढवावे? भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ मुलांना कसे वाढवावे? भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(कौशिक प्रकाशन, सातारा, यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी झालेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार मिळालेला लेख.)

ईशावास्य उपनिषदामधे एक श्लोक आहे.—

  कुर्वन्नेवेह कर्माणि जिजिविषेत् शतं समाः|

  एवं त्वयि नान्यंथेतोsस्ति न कर्मं लिप्यते नरे ||

वाट्याला आलेली कर्मे करीतच शंभर वर्षे( पूर्ण आयुष्य) जगण्याची इच्छा धरावी. तसेच ‘उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात ‘ या महामृत्युंजय मंत्रात,आत्महत्या न करता, भोग भोगून अमृताच्या मार्गाने जावे असे म्हटले आहे. अध्यात्मातील असा विचार सांगण्याचं  प्रयोजन काय ? तर सद्यस्थितीत ते सांगण्याची नितांत गरज भासायला लागली आहे. मुलांना कसे वाढवावे, याचा विचार करताना सध्या दिसणारे समाजाचे चित्र कसे आहे? ते तसे का आहे? आणि त्यावर कौटुंबिक, सामाजिक,आर्थिक, नैतिक उपाय काय? याचा विचार करावा लागेल.

अगदी माहितीतली उदाहरणे–हुशार सुजय चुकीच्या  रिझल्टमुळे नापास झाल्याचं  कळलं आणि त्याच रात्री त्याने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. सुदेश उत्तम मार्काने फार्मसी पास झाला, पण बरोबरीच्या मित्राला मार्क कमी पडूनही आरक्षणातून नोकरी मिळाली. आणि  बेकार अवस्था असह्य होऊन सुदेशने घरातल्याच पंख्याला लटकवून घेतलं . सुधीर इंजिनीअरिंगला नापास झाला,  आणि त्याने गच्चीतून उडी मारली. सावित्री परधर्मीय मुलाच्या प्रेमात पडली. पण नंतर त्याचा कावा लक्षात आल्यावर तिने रेल्वेखाली उडी घेतली. शाळेतील मुलं गट करुन शिक्षकांना धमकावतात.  क्लबमध्ये जातात. अफू, चरस, गांजा, मेफ्रेडोन, यासारख्या अमली पदार्थांच्या आहारी जातात. जगाच्या कुठल्याही भागातून त्या वस्तू घरपोच मिळू शकतात. खेदजनक गोष्ट अशी की ,महाराष्ट्र याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सहलीच्या नावाखाली समुद्र, पूर, धबधबा अशा ठिकाणी, दारू पिऊन, सेल्फीच्या नादात कित्येक जीवांचा बळी गेलाय. रेव्ह पार्ट्या, बर्थडे पार्ट्या, यासाठी लागणारा पैसा आणि त्या पैशासाठी वेगवेगळे विकृत मार्ग, अशी श्रुंखला सुरू होते. ब्लू व्हेल या गेमने तर पालकांची झोप उडवली होती. उच्चशिक्षित, उच्चपदस्थ, सुसंस्कृत घरातला  म्हैसकर, चौदा वर्षांचा मनप्रीतसिंग , तामिळनाडूतला बारा वर्षांचा मुलगा, अशी बोलकी उदाहरणं

पालकांच्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाली आहेत. काळजीन पोखरुन काढलंय त्यांना ! डिजिटल क्रांतीनंतर आँनलाईन गेमच्या नादात जगात असंख्य बळी गेले आहेत. सुरुवातीला मोबाइल गेम, नंतर लॅपटॉप व आँनलाईन गेम यांचे व्यसन, आणि नंतर त्यातून सुटका नाही, असे दुष्टचक्र सुरू होते. ब्ल्यू व्हेल गेममधे तर हॉरर गोष्टींपासून सुरुवात होते. हातावर तीक्ष्ण हत्याराने माशाचा आकार, उंच इमारतीच्या कठड्यावर चढणे, आणि शेवटी पन्नासाव्या टास्कला विजय घोषित करून आत्महत्या—–या गेमचा निर्माता फिलिप बुडेकिन आता तुरुंगात आहे. पण समाज स्वच्छ करण्यासाठी ( जैविक कचरा ) हा गेम सुरू केल्याचे तो सांगतो. या खेळाने भारतातही हात पाय पसरले होते. पौगंडावस्थेतील अनेक मुलांना अस्वस्थता आणि नैराश्याचा आजार जडल्यासारखे झाले आहे.

मुलं अशी भन्नाट का वागतायत, याच्या कारणांच्या मुळाशी जाऊन विचार करायला हवाय. विभक्त कुटुंब पद्धती सुरु झाली आणि मुलांचा आधार हरवला गेला. आई आणि वडील दोघेही नोकरीला जातात.रात्री कंटाळून परत आल्यानंतर मुलांशी संवाद साधायला, त्यांच्यासाठी वेळ द्यायला ते कमी पडतात. कोणाचंच नियंत्रण नाही, इंटरनेट वर किती वेळ आणि काय पहातात हे कोण विचारणार ? लहान असताना पाळणाघर, नंतर शाळा, अशावेळी प्रेमाचा ओलावा शोधत शोधत गेमच्या आभासी दुनियेत रमायला लागतात. घरातील वातावरण जर तणावपूर्ण असेल, आई वडील जर सतत भांडत असतील तर मुले एकतर आक्रमक तरी होतात, नाहीतर  बुजरी अबोल एकलकोंडी होतात. पौगंडावस्थेतील मन अत्यंत संवेदनशील असल्यामुळे चांगले किंवा वाईट लक्षात न घेता कोणत्यातरी आकर्षणाच्या मागे धावायला लागते, असं मानसोपचार तज्ञांचं मत आहे.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जातीअंतासाठी – भाग 2 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? मनमंजुषेतून ?

☆ जातीअंतासाठी   – भाग 2 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

(त्यांच्या मते त्यांनी एक चांगला विनोद केला होता.) इथून पुढे —- 

मी सगळ्यांचं ऐकलं नि माझं म्हणणं माडलं–“आत्ता प्रश्न जातीचा नाहीये. गुणवत्तेचा आहे. हा तरुण मुलगा हुशार आहे. वडील लवकर गेलेत, आईने मोलमजुरी करून संसार पेललाय, चांगले संस्कार केलेत , त्यांचे मार्क्स बघा. त्यांनी शिकताना इंग्रजीच्या शिकवण्या घेतल्या आहेत.  ते हार्मोनियम उत्तम वाजवतात. त्यांना संगीताची जाण आहे. गावातल्या भजनी मंडळांना, धनगरी ओव्यांना साथ करायला ते जातात. आपल्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम बसवायला बाहेरचे  वादक बोलवायला लागतात, त्याना पैसे द्यावे लागतात. (पैसे हा शाळेचा वीक पॉईन्ट असतो ना.)  ते काम ह्यांच्याकडे सोपवता येईल. इतर सगळ्या उमेदवारांपेक्षा हयांची गुणवत्ता सर्व बाबतीत सरस आहे. केवळ त्यांची जात आपल्याला नको म्हणून त्यांना नेमायचं नाही का? म्हणजे रोष्टरचं बंधन आहे म्हणून ,नाहीतर खालच्या जातींवर आपण अन्यायच करणार का? हे मला बरोबर वाटत नाही. माझं ऐका प्लीज, ह्यांना नेमू या “.  बरीच वादावादी झाली. भांडलेच जवळजवळ. ठाम राहिले. काहीना माझं बरोबर वाटलं. नि झाली एकदाची माझ्या आवडत्या शिक्षकाची निवड.  ती योग्य ठरली.  २-३ वर्षांतच, मी निवडलेले शिक्षक मुलांचे आवडते  झाले. दरवर्षी समूहगीत स्पर्धेतलं  जिल्हा पातळीवरचं पहिलं बक्षिस आमची शाळा पटकाऊ लागली. ‘ उषःकाल होता‘ अशी अवघड गाणी त्यानी पंचवीस-तीस मुलांच्या समूहामध्ये बसवली. वेगवेगळ्या जातीधर्माची मुलंमुली एका सुरांत गाताना ‘एक ह्रदय’ झाली. आसपासच्या शाळा  त्यांना बोलावू लागल्या. मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन ते जातात. त्यावेळी बुडलेले तास ते जादा तास घेऊन भरून काढतात. मुलांच्या अभ्यास- विषयांचं महत्त्व ते जाणतात. कर्तव्य तत्पर आहेत ..नीतीमान आहेत. आता तर म्हणे त्यांनी काही पुरस्कारही मिळवलेत ‘ आदर्श शिक्षक ‘ म्हणून.  शाळेतल्या मुलांचा कार्यक्रम त्यानी दूरदर्शनवरही सादर केला. 

पंधरा वीस वर्षांपूर्वी, सहजपणे, जातीभेद मानणाऱ्या संस्थाचालकांशी (मुख्याध्यापकांचं सर्व्हिस बुक वगैरे त्यांच्या हातात असतं तरीही) झगडून मिळवलेलं ते अगदी छोटसं यश मला समाधान देऊन गेलं आहे.

‘Destiny of the nation is being shaped in the classroom.’ हे लक्षात घेऊन शिक्षकांनी वर्गात, शाळेत, जातीअंतासाठी प्रयत्न केले तर थोडे तरी यश येऊ शकते.

जवळपास एखादी सहल निघते. फिरून झाल्यावर मोठा गोल करून डबे खायला बसायचं.  शिक्षकांनी मध्ये गोल करावा. वेगवेगळ्या मुलांसमोर हात करावा. मुलं आपल्यातलं शिक्षकांना तत्परतेने देतात. कोणत्याही जातीच्या मुलाने  दिलेलं खावं. ‘ मस्त झालय ‘ म्हणावं. आपले शिक्षक आपण दिलेलं पण आवडीने खातात , हे बघून मुलांना ब्रम्हानंद होतो.

हल्ली बऱ्याच शाळांचे माजी विद्यार्थी गेट-टुगेदर करतात. लहानपणचे भिन्न जातीतले असलेले मित्रमैत्रिणी पुन्हा एकत्र येतात. तेव्हा जात लक्षात ठेवली तर वाईट दिसेल म्हणून मनात आलं तरी दाखवलं जाणार नाही. अशी संमेलनं करायला हवीत. 

एखादा मुलगा किंवा मुलगी आजारी असते. त्याची जात कोणतीही असली तरी शिक्षकांनी त्याच्याकडे बघायला जावं. बरोबर तीनचार विद्यार्थ्यांना न्यावं.  सर ,बाई जात पाळत नाहीत हे मुलांना कळतं . मुलं नेहमीच शिक्षकांचं अनुकरण करतात.  मुलांच्या मनावर ते ठसतं. आमची खारेपाटणची शाळा नवीन निघाली होती. स्वातंत्र्य सैनिक शंकरराव पेंढारकर–’ आता  स्वराज्य मिळालं, पण ते सुराज्य व्हायला हवं.  त्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायला हवा,’ म्हणून त्यांनी ‘ शिक्षणातून पुनर्रचना ‘हे ध्येय ठरवलं. खारेपाटणसारख्या अगदी लहान गावात ते आले. त्या जुन्या काळात त्यांनी विद्यार्थ्यांवर जातीभेद न पाळण्याचे संस्कार युक्ती युक्तीने केले. कारण समाजाला दुखवून चालणार नव्हतं. आंबेडकर जयंतीला आम्ही गावाबाहेरच्या वस्तीतल्या झोपड्या स्वच्छ करायला जायचो. पर्युषण काळात बस्ती सजवायचो, गणपती उत्सव , नवरात्र ह्या गावातल्या सार्वजनिक सणांना आम्ही गावकऱ्यांना मदत करायचो, श्रमदानातून भेदाभेद न पाळण्याची सवयच लागली आम्हा त्या काळच्या मुलांना. एक खेडवळ बाई म्हणाली, ” पोरानो, सर सांगतात तसा वागा.  कोणाक भिवुचा नाय. लोका काय, चार दिवस कावकाव करतंत. मगे गपचुप बसतंत.”  प्रयत्न केले तर अडाणी सुध्दा शहाणी होतात ती अशी.

जातीअंतासाठी मानअपमान मात्र बाजूला ठेवावा लागेल.

आम्ही बरीच वर्षं श्रावणातल्या, गौरीच्या, सवाष्णी म्हणून वेगवेगळ्या जातीच्या बायकांना बोलावतो. त्यांची रीतसर ओटी वगैरे भरतो. त्यांना छान वाटतं. आम्हालाही समाधान वाटतं.

अशा अनेक गोष्टी करून पाउलं पुढेच पडतील, मागे तर नक्कीच जाणार नाहीत.

समाप्त 

लेखिका : श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070, 9561582372.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares